Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वन पर्यटनावर कोट्यवधींचा चुराडा

$
0
0

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची वाताहत; देवळाईच्या उजाड उद्यानाला कुलूप

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे वन पर्यटनाचा बोजवारा उडाला आहे. शहरापासून अवघ्या चार किलोमीटरवरील देवळाई वन उद्यान उजाड झाले आहे. हीच परिस्थिती सार्वत्रिक असल्यामुळे वन उद्यानावर लाखो रुपयांचा निव्वळ चुराडा झाला आहे. राज्य सरकारने नवीन अर्थसंकल्पात वन पर्यटनासाठी विशेष आर्थिक तरतूद जाहीर केली आहे; मात्र पर्यटनाचे उद्दिष्ट साध्य होत नसल्याने वन पर्यटनावर पैशाची उधळपट्टी कशासाठी करायची, असा सवाल पर्यटकांनी केला आहे.

वन पर्यटनाला चालना देणे आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करण्यासाठी वन विभागाने ठिकठिकाणी पर्यटनस्थळे विकसित केली. जिल्ह्यात निसर्ग पर्यटनासाठी वृक्षारोपण आणि पायाभूत सुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. म्हैसमाळ, सारोळा, अंतूर, दौलताबाद, वेताळवाडी, दौलताबाद, अजिंठा आणि देवळाई या प्रमुख पर्यटनस्थळांचे सुशोभीकरण आणि वनीकरण केले; मात्र देखभालीअभावी या पर्यटनस्थळांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. औरंगाबाद शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील देवळाई परिसरात दोन वर्षांपूर्वी वन उद्यान उभारले. सद्यस्थितीत उद्यानाची वाताहत झाली असून प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले आहे.

उद्यानाची संरक्षक भिंत ढासळली आहे. तसेच लहान मुलांसाठी बसवलेली महागडी खेळणी तुटली आहेत. उद्यानात जनावरांचा मुक्त संचार असून पर्यटक शोधूनही सापडत नाही. नियोजनाचा अभाव आणि दर्जाहीन कामामुळे उद्यानाकडे शहरातील पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. दौलताबाद येथील देवगिरी किल्ला पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येतात. किल्ल्याच्या समोरील भागात वन उद्यान आहे. येथे नक्षत्रवन आणि गुलाब वन साकारले आहे. सध्या उद्यान उजाड झाले आहे. गावात हजारो पर्यटक असले तरी उद्यानात भटकंती करणाऱ्या पर्यटकांची संख्या मोजकीच आहे. पूर्वीपासून म्हैसमाळ आणि सारोळा येथे पर्यटकांची वर्दळ असते; पण पर्यटकांची संख्या लक्षात पाहता दोन्ही ठिकाणी पुरेशा सुविधा नाहीत. सुविधा नसल्यामुळे पर्यटकांचे प्रमाण घटले आहे. अंतूर आणि वेताळवाडी किल्ला परिसरातही सुविधांची वानवा आहे. अजिंठा परिसराला ग्लिरीशिडीया झाडांनी वेढले आहे. इतर झाडे अपवादानेच असल्यामुळे पर्यटनाचा उद्देश फसला आहे. 'पायाभूत सुविधा असतील तरच पर्यटक येतील.

आर्थिक तरतुदीचे काय ?

वन पर्यटनासाठी वन विभागाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. आता राज्य सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे; पण वारेमाप खर्च करुनही पर्यटनाचे उद्दिष्ट साध्य होत नसेल तर हा खर्च कशासाठी करायचा असा सवाल पर्यटकांनी उपस्थित केला आहे. उपहारगृह आणि विश्रामगृह नसलेल्या पर्यटनस्थळी पिण्याचे पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे.

जिल्ह्यातील वन पर्यटनस्थळे

- म्हैसमाळ

- सारोळा

- दौलताबाद

- वेताळवाडी

- अंतूर

- देवळाई

- सातारा

- भांगसीमाता गड

- अजिंठा

वन पर्यटन संकल्पनेत पायाभूत सोयी, निवास व्यवस्था, उपहारगृह, गाइड अशा अनेक सुविधांची गरज असते. तज्ज्ञ व्यक्तींनी पर्यटनस्थळाचे काम केल्यास योग्य काम होते. शिवाय 'पीपीपी' तत्त्वावर काम करणे आवश्यक आहे. जिल्ह्याला वन पर्यटनासाठी कमी निधी मिळत असल्यामुळे विकासकामात अडचणी येतात.

- अजित भोसले, उपवनसंरक्षक, वन विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आरटीई’ची जबाबदारी पालिकेचीच

$
0
0

उपमहापौरांच्या उपस्थितीत 'शोध', अर्जासाठी मुदतवाढ

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षणाचा मुलभूत अधिकाराचा कायदा (आरटीई) शहरात राबवण्याची जबाबदारी महापालिकेचीच असल्याचा 'शोध' गुरूवारी (१९ मार्च) उपमहापौर संजय जोशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत लागला. महापालिका एवढे दिवस या कायद्याबद्दल अनभिज्ञ होती. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही ही बाब पालिकेच्या लक्षात आणून दिली नव्हती. दरम्यान,आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शहरातील ६१ शाळांना जिल्हा परिषदेने नोटीस बजावली आहे. प्रवेशाच्या ऑनलाइन नोंदणीसाठी पालिकेने शहरात १४ केंद्र सुरू केले आहेत.

शासनाने आरटीई कायद्यान्वये विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसाह्यित सर्व माध्यमांच्या शाळांना लागू झाला आहे. त्यानुसार इयत्ता पहिलीमध्ये २५ टक्के जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्ग, दुर्बल घटक व अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांमधून मोफत भरणे बंधनकारक आहे. याप्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. महापालिका क्षेत्रातील शाळांमधील प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिका व ग्रामीण भागात जिल्हा परिषदेची आहे. परंतु, महापालिकेतर्फे आतापर्यंत या प्रकारच्या प्रवेशाबद्दल काहीच काम करण्यात आले नव्हते. या प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी आपल्यावर नाहीच अशा पद्धतीने शिक्षण विभागाचा कारभार सुरू होता. ही बाब उपमहापौर संजय जोशी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, महापालिकेचे शिक्षण विभागाचे उपायुक्त बी. एल. जाधव, शिक्षण विभागातील अन्य अधिकारी व मुख्याध्यापकांची बैठक घेतली. आरटीई अंतर्गत शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची जबाबदारी महापालिकेचीच असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले, अशी माहिती संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ऑनलाइन प्रवेशाची मुदत २० मार्च रोजी संपत आहे. परंतु, महापालिकेतर्फे प्रवेशाबद्दल काहीच काम झालेले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही मुदत ३० मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवेशासाठी शहरात १४ केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर जिल्हा परिषद आणि महापालिकेचा प्रत्येकी एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे, अशी माहिती जोशी यांनी दिली. या केंद्रातून प्रवेशासाठीचे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.

अर्ज भरण्यात अडचणी असलेल्या नागरिकांनी महापालिकेच्या नागेश्वरवाडी येथील सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. गोरगरीब मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे ही या कायद्यामागची भूमिका आहे, तो उद्देश साध्य झाला पाहिजे, असे उपमहापौरांनी स्पष्ट केले.

आयुक्तांना अधिकार

'आरटीई'अंतर्गत गरीब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीत प्रवेश न देणाऱ्या औरंगाबाद शहरातील ६१ शाळांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी यावेळी सांगितले. महापालिकेच्या क्षेत्रात ३२४ शाळा असून त्यात २२०० प्रवेश क्षमता आहे. १९७८ प्रवेश अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले आहेत. नोटीस दिल्यानंतरही ज्या शाळा ऑनलाइन प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाकडे नोंदणी करणार नाहीत आणि प्रवेश देणार नाहीत, त्यांची मान्यता रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. या कारवाईचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत, असे उपासनी यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीची जागा वाटप चर्चा रविवारी

$
0
0

महापालिका निवडणुकीसाठी होणार खलबते

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर जागा वाटपासाठी शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांची चर्चेची दुसरी येत्या दोन दिवसांत होणार आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपने ३९ तर शिवसेनेने ५९ जागा लढविल्या होत्या. त्यात त्यांना अनुक्रमे १५ आणि ३१ जागावर यश मिळाले, परंतु १२ नगरसेवक तबुंत दाखल झाल्याने पक्षाची ताकद वाढली आहे, असे सांगत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अधिक जागांवर दावा केला आहे.

भाजपकडे एकूण २७, तर सेनेकडे आता केवळ २५ विद्यमान नगरसेवक आहेत. या जागा त्या-त्या पक्षाने घ्याव्यात आणि उर्वरित जागा निम्या निम्या वाटून घेतल्या पाहिजे, अशी मागणी भाजप नेत्यांकडून होत आहे. तर केवळ ४५ टक्के जागा भाजपाला सोडू, असे शिवसेना नेत्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. पहिल्या बैठकीत कुणीच माघार न घेतल्याने, ती चर्चा वांझोटी ठरली. तर युती व्हावी, अशी प्रामाणिक इच्छा असल्याचे दावे दोन्ही पक्षांकडून होत आहेत. दरम्यान, अधिवेशनानिमित्त भाजप आमदार अतुल सावे मुंबईत असल्याने शक्यतो येत्या रविवारी जागा वाटपासाठी चर्चेची दुसरी फेरी होईल, अशी माहिती युतीच्या सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या वादातून दोन गटात मारामारी

$
0
0

औरंगाबाद : जुन्या वादाच्या कारणावरून पैठण गेट येथे गुरुवारी (१९ मार्च) दुपारी दीड वाजता दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नमाज अदा करण्यासाठी जात असताना फतेमोहम्मद, अश्फाक, मुश्ताक व नदीम (सर्व रा. पैठणगेट) यांनी बेदम मारहाण केली, अशी तक्रार मोहम्मद बागवान (वय १९) याने दिली आहे. त्यावरून चौघांविरुद्ध मारहाण व रस्ता अडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी तक्रार हाजी फतेमोहम्मद (वय ६६) यांनी दिली आहे. फते मोहम्मद हे देखील नमाज पढण्यासाठी जात होते. त्यावेळी जुन्या वादातून त्यांना शेख अन्वर, आमेर शेख, बाटी अब्दुल रऊफ व कैसर अब्दुल करीम (सर्व रा. सब्जीमंडी, पैठणगेट) यांनी मारहाण केली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दपार गुन्हेगारासह दोघांना अटक

$
0
0

औरंगाबाद : पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोन कुख्यात गुन्हेगारांना गुन्हेशाखेने बुधवारी (१८ मार्च) मुकुंदवाडी परिसरात अटक केली. राजनगर, मुकुंदवाडी भागात हद्दपार केलेला बाळू भागाजी मकळे (वय २०, रा. आंबेडकरनगर) हा आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. राजनगरमध्ये मकळे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत भारत शंकर तिर्थे (वय २२, रा. जयभवानीनगर याला अटक केली. तो एन २, कामगार चौकाजवळ मध्यरात्री संशयास्पद अवस्थेत फिरताना सापडला. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने एक लाखाची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बँकेत लिपिकाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणीला एक लाख रुपयाचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यत जेसन रॉय नावाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरिहंतनगर येथील दिप्तीमनी डेका (वय २७) यांची २६ जानेवारी रोजी नेटवर जेसन रॉय नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. त्याने दिप्तीमनी यांना इंड्स बँकेत लिपिकाच्या जागा भरायच्या आहेत, बँकेत ओळख असल्याची माहिती दिली. दिप्तीमनीने नोकरीसाठी तयारी दाखविल्यानंतर त्याने बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात १ लाख १ हजार ७८० रुपये भरण्यास सांग‌ितले. ही रक्कम वेगवेगळ्या टप्प्यात भरण्यास सांगितली होती. रॉय याने २० फेब्रुवारीनंतर दिप्तीमनीशी यांच्याशी संपर्क कमी केला. वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने फसवणूक लक्षात आलय़. त्यानंतर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

MIDC तील सहायकास ३ वर्षांची सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) प्रादेशिक कार्यालयातील सहायक मधुकर बोगाने याला लाच घेतल्याप्रकरणी तीन वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना १८ ऑक्टोंबर २००५ रोजी घडली होती.

मधुकर बोगाने याला प्लॉटचे ताबा प्रमाणपत्र देण्यासाठी १६०० रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी अटक करून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तपासाअंती गायकवाड यांनी कोर्टात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्याचा गुरुवारी निकाल देण्यात आला. आरोपी मधुकर बोगाने याला कलम ७ नुसार तीन वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद; कलम १३ (१) (ड) सह कलम १३ (२) नुसार तीन वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी काम पाहिले. त्यांना पोलिस जमादार रवी शिरसाठ, अनिल भावसार यांनी मदत केली. सहायक सरकारी वकील एस. एम. रझवी यांनी पोलिसांची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका निवडणुकीत समाज पक्ष रिंगणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष रवी वैद्य यांनी दिली. वैद्य म्हणाले, 'वॉर्डनिहाय माहिती आढावा घेण्यात येत असून प्रबळ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी झालेली आहे. त्यासाठी योग्य उमेदवार रिंगणात उतरविणार आहोत.' निवडणूक तयारीसाठी जिजाऊ भवनात कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रा. भास्कर टेकाळे, प्रल्हाद राठोड, संतोष कोल्हे, डॉ. देवांग जोशी, दिलीप रिठ्ठे, योगेद्र निकुंभ, मंजुश्री धडे, पांडुरंग काळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यानगरातील उमेदवारीसाठी महापौरांची शिफारस महत्त्वाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यानगर वॉर्डातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी महापौर कला ओझा यांची शिफारस महत्त्वाची ठरणार आहे. महापौर सध्या या वॉर्डाच्या नगरसेविका आहेत. त्यामुळे त्या ज्यांच्या नावची शिफारस करतील, त्याच व्यक्तीला उमेदवारी देण्याचा विचार सेनेतील काही नेते करीत आहेत.

विद्यानगर वॉर्ड महापालिका निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला आहे. त्यामुळे या वॉर्डावर अनेकांनी लक्ष केंद्रीत केले आहे. विविध पदांवर काम करणारे शिवसेनेतील पदाधिकारी देखील या वॉर्डातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु या सर्वांना महापौर कला ओझा यांच्या शिफारशी शिवाय तिकीट मिळणार नाही असे बोलले जात आहे. तसा अलिखीत फतवाच एका स्थानिक नेत्याने काढला आहे. कला ओझा देखील याच वॉर्डातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना विजयनगर-बाळकृष्णनगर हा वॉर्ड देखील आहे. हा वॉर्ड सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे.

विद्यानगर वॉर्ड जसा ओझा यांच्यासाठी सुरक्षित आहे, तसाच विजयनगर-बाळकृष्णनगर वॉर्ड देखील त्यांच्यासाठी सुरक्षित मानला जात आहे. त्यामुळे त्यांनी या वॉर्डातून निवडणूक लढवावी आणि विद्यानगर वॉर्डातून शिवसेनेच्या सक्षम पदाधिकाऱ्याने किल्ला लढवावा असे बोलले जात असताना ओझा यांच्या शिफारशीची अट घातली जात आहे. ही अट पक्षासाठी फायदेशीर ठरेल का, या बद्दलही शिवसेनेत उलटसुलट चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या पथकावर बेगमपुऱ्यात दगडफेक

$
0
0

औरंगाबाद : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर बेगमपुरा येथे जमावाने शुक्रवारी (२० मार्च) दगडफेक केली. या दगडफेकीत पथकातील एका कर्मचाऱ्याच्या डोक्याला मार लागला, तर काही नागरिक जखमी झाले. बेगमपुरा भागातील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेली टपऱ्यांची अतिक्रमणे काढण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पालिकेचे पथक पोचले. या पथकाने एक रसवंती आणि काही टपऱ्या काढल्या. पानटपरीचे अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेचे पथक काम करून लागले तेव्हा तेथे जमलेल्या नागरिकांनी अचानक दगडफेक सुरू केली. यात पालिकेच्या पथकातील एक कर्मचारी जखमी झाला, त्याच्या डोक्याला मार लागला. प्रशासकीय अधिकारी महावीर पाटणी यांनी त्यास घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहागंज, गुलमंडीत ४५ हातगाड्यांवर कारवाई

$
0
0

औरंगाबाद : शहागंज व गुलमंडीवरील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी (२० मार्च) कारवाईचा बडगा उगारला. शहागंज व गुलमंडी भागातील ४५ हातगाड्यांवर कारवाई करीत हातगाडीधारकांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली.

गुलमंडी व शहागंज परिसरात हातगाडीधारकांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहनधारक व नागरिकांना याबद्दल सिटीचौक पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. पोलिसांनी सूचना देऊनही दाद देत नसल्याने कारवाई करण्यात आली. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या शहागंजमधील २९ व गुलमंडीवरील १६ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. हातगाडीधारकांवर रस्त्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना नोटीस बजावण्यात आली असून कोर्टात दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ‘पत्रांदोलन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकरी विरोधी भूसंपादन कायद्यात बदल करण्यात यावा, या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ५०० विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (२० मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले. लोकसभा निवडणुकीत तरुणांनी नरेंद्र मोदी यांना प्रतिसाद देत भाजपच्या हाती सत्ता दिली. मात्र या भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याऐवजी उद्योगपतींच्या हितासाठी भूसंपादन कायद्यात बदल करून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याची भावना विद्यार्थ्यांनी पत्रामध्ये व्यक्त केली आहे. काही विद्यार्थ्यांनी पत्रात शेतकऱ्यांच्या गरिबीचे भीषण वास्तव मांडले आहे.

विद्यार्थ्यांसोबतच काही प्राध्यापकांनीही पंतप्रधानांना पत्र पाठविले आहे. विद्यार्थी व प्राध्यापकांनी सामुहिकपणे विद्यापीठातील पोस्ट कार्यालयाजवळ बसून पत्रे लिहून पोस्टाच्या पेटीत टाकली. या अभिनव उपक्रमासाठी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता. पत्र पाठविणाऱ्यांमध्ये विविध विधागातील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ प्रा. डॉ. राम माने, डॉ. राम चव्हाण, 'रासेयो' समन्वयक डॉ. राजेश करपे, डॉ. बापु शिंगोटे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे, भाविसेचे तुकाराम सराफ, एसएफआयचे सुनील राठोड, डॉ. जेधे यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाठ्यपुस्तक मंडळाचे सहा दिवस व्यवहार बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय कार्यालयांमधील आवक-जावक, विक्रीचे व्यवहार २६ ते ३१ दरम्यान बंद असणार आहेत. या दरम्यान पुस्तके, कागद, छापील साहित्याची वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी होणार आहे. त्यामुळे हे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्थांनी याची नोंद घेण्याचे आवाहन पाठ्यपुस्तक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूने गर्भवतीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) स्वाइन फ्लूने चिकलठाणा येथील नऊ महिन्यांच्या एका गरोदर महिलेचा शुक्रवारी (२० मार्च) मृत्यू झाला. आतापर्यंत घाटीमध्ये स्वाइन फ्लूमुळे १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७ झाली आहे.

चिकलठाणा येथील शिवाजी चौक परिसरातील रहिवासी राधिका बंडू म्हस्के (२३) यांना १४ मार्च रोजी घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत घाटीच्या स्वाइन फ्लू वॉर्डात ४ रुग्ण असून त्यापैकी १ रुग्ण पॉझिटिव्ह, तर ३ रुग्ण संशयित आहेत. यातील एका रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तसेच तीन महिन्यांच्या गरोदर महिलेवरही याच वॉर्डात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी दिली. या संदर्भात, संबंधित मृत गरोदर महिला किमान चार ते पाच दिवस उशिरा घाटीच्या वॉर्डात दाखल झाली. या महिलेला दाखल करतानाच तिची प्रकृती गंभीर होती. तसेच तिच्यावर उशिरा औषधोपचार सुरू झाल्याचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी सांगितले. संबंधित मृत महिलेला चार वर्षांची मुलगी असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीची थाप : १० लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रयत ‌शिक्षण संस्थेत लिपिकाच्या नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाला दहा लाख रुपयांना गडवण्यात आले आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली. संजय आडे (रा. कासलीवाल तारांगण, मिटमिटा) यांची तीन वर्षांपूर्वी विश्वनाथ उपलवाड याच्यासोबत ओळख झाली होती. पुणे येथील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांची ओळख असून संस्थेत लिपिकाच्या जागा भरायच्या असल्याची थाप उपलवाडने मारली. नोकरीची गरज असल्याने संजय यांनी तयारी दाखविल्यानंतर त्यासाठी दहा लाख रुपये लागणर असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला पाच लाख व नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर पाच लाख रुपये देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार आडे यांनी ९ मे २०१३ रोजी उपलवाड याला पाच लाख रुपये दिले. त्यानंतर १६ सप्टेंबर २०१३ रोजी उपलवाड याने आडे यांना एक नियुक्तीपत्र दिले; त्यावेळी पाच लाख रुपये दिले. आडे यांना १ ऑक्टोबर २०१३ रोजी नोकरीवर रुजू होण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार आडे रुजू होण्यासाठी गेले असता नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उपलवाड याच्याकडे वारंवार मागणी करूनही रक्कम परत करण्यास टाळाटाळ करण्यात आली. रक्कम मिळत नसल्याने याप्रकरणी गुरुवारी (१९ मार्च) छावणी पोलिस ठाण्यात विश्वनाथ उपलवाड, त्याला सहकार्य करणारे सविता उपलवाड, हरीश उपलवाड व धनश्री उपलवाड यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विश्वनाथ उपलवाड याला अटक केली आहे.

आडेची अडवणूक

नियुक्तीपत्र दिल्यानंतर विश्वनाथ उपलवाड वेगवेगळी कारणे सांगून आडेला अडवित होता. एकदा नोकरीला रुजू होण्यासाठी जाताना फोन करून शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाला आपला मेल मिळाला नसून तुम्ही परत या, असे एकदा सांगितले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष व सचिव बदलले असून नियुक्तीपत्र मिळण्यास अडचण येत असल्याची थापही त्याने मारली होती. पुणे येथे जाऊन खात्री केल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघड झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वादग्रस्त तलाठी सानप निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साहित्यिक बाबा भांड यांची चितेगाव येथील जमीन खोट्या कागदपत्राद्वारे बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी आमदार प्रशांत बंब यांनी गुरुवारी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. हा प्रश्न सभागृहात प्रचंड गाजल्यानंतर तलाठी तुकाराम सानप याला निलंबित करण्याचे आदेश दिले असून तहसीलदार राजीव शिंदे यांना नोटीस बजावली असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीर केले.

प्रसिद्ध साहित्यिक बाबा भांड आणि किरण देशमुख यांची चितेगाव (ता. पैठण) येथील शेतजमीन पैठणचे तत्कालीन तहसीलदार राजीव शिंदे व तलाठी तुकाराम सानप यांनी खोटी कागदपत्रे बनवून बळकावण्याचा प्रयत्न केला. फेरफार करुन स्वतःच मंजूर करणे, अर्जदारासाठी स्वतः अर्ज लिहून त्याची सही करुन खोटा पंचनामा करणे, पंचनाम्याच्या आधारे तहसीलदार राजीव शिंदे यांनी महसूल नियमांचे उल्लंघन करुन निर्णय दिल्याबद्दल दोघांविरुद्ध पैठण येथे फौजदारी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. या दोघांना निलंबित करण्याची मागणी बंब यांनी केली होती. तलाठी सानप याला निलंबित केले असून तहसीलदार शिंदे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रत्यक्षात सानप कामावर असल्याचा खुलासा आमदार संदिपान भुमरे यांनी केला. यावर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले. 'आज सकाळी आपण जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केली असून सानपला निलंबित करण्याचे आदेश दिले. लक्षवेधी सूचना आल्यानंतर तातडीने निलंबनाची कारवाई केली' असे खडसे म्हणाले. महसूल खात्याच्या अनागोंदीबाबत बाबा भांड यांनी महसूलमंत्री, जिल्हाधिकारी व आयुक्त यांना भेटून तक्रारी केल्या होत्या. माहितीच्या अधिकारात तलाठी सानप याच्या महसूल नोंदीतील गैरप्रकाराबद्दल वरिष्ठांकडे तक्रार करुनही कार्यवाही झाली नव्हती. याबाबत 'मटा'ने 'तलाठ्याची हेराफेरी' या वृत्तमालिकेअंतर्गत पाठपुरावा केला होता.

इतर शेतकऱ्यांचे काय ?

तलाठी व तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी जमीन नोंदी आणि खोटी कागदपत्रे करुन अनेक शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करीत आहेत. तालुक्यातील पाच अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी पोलिस अधीक्षक (ग्रामीण) यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्यास मला अधिक आनंद होईल, असे साहित्यिक बाबा भांड म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

BJP तालुका उपाध्यक्षांचा खून

$
0
0

म .टा. प्रतिनिधी, वाळूज

अहमदनगर रस्त्यावरील लिंबेजळगाव परिसरातील गोकूळ ढाबा येथे भारतीय जनता पक्षाचे गंगापूर तालुका उपाध्यक्ष प्रकाश आलोने यांचा तलवारीचे वार करून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (१९ मार्च) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेतील मुख्य आरोपी फरार असून पोलिसांनी त्याच्या साथीदारास अटक केली आहे.

लिंबेजळगाव येथील शिवसेना कार्यकर्ते व स्वस्त धान्य दुकानदार अंजा बापू शिंदे यांचे हरेश अकबर पटेल यांच्या सोबत काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. हा वाद न्यायालयात गेला असून त्यासाठी साक्षीदार म्हणून प्रकाश आलोने (रा. लिंबेजळगाव) यांचे नाव टाकण्यात आले होते. आलोने आपल्या बाजुने साक्ष देणार नाहीत याची खात्री शिंदे यांना झाली होती. त्याने गुरुवारी नगर रोडवरील गोकुळ ढाबा येथे अलोने यांना दारू व जेवणासाठी बोलविले होते. तेथे वाद पेटल्यानंतर शिंदेने तलवार काढून आलोने यांच्या छाती व मानेवर वार केले. या हल्ल्यात अलोने यांचा जागीची मृत्यू झाला. या घटनेनंतर शिंदेचा साथीदार दिलिपसिंग राजपूत याने तलवार लंपास करून पुरवा नष्ट केला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त रामराव हाके, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे, पोलिस निरीक्षक वसीम हाशमी यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आलोने यांना घाटी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणी भरत लक्ष्मण आलोने यांच्या तक्रारीवरून वाळूज पोलिस ठाण्यात अंजा शिंदे व दिलीपसिंग राजपूत (रा. मलकापूर-शिरोडी ता. गंगापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राजपूत यास अटक असून अंजा बापू शिंदेचा पोलिस शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक वसीम हाशमी करीत आहेत.

परिसरात बंद

भाजप तालुका उपाध्यक्ष प्रकाश आलोने परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यामुळे खुनानंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याने नागरिकांनी बंद पाळला. अलोने यांच्या पार्थिवावर पोलिस बंदोबस्तात लिंबेजळगाव येथील स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मारेकऱ्यासह सूत्रधारास अटक करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. या हत्याकांडामागील खरे कारण शोधण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीचे नमन घोळाने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीची सुरुवातच घोळाने झाली आहे. वॉर्डनिहाय आरक्षणाची याचिका निकाली लागायच्या अगोदरच प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये मोठी गडबड समोर आली आहे. काही वॉर्डांत दहा हजार, तर काही वॉर्डांत साडेतीन ते चार हजार मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पालिकेने शुक्रवारी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली. या यादीनुसार महापालिकेच्या क्षेत्रात एकूण मतदारांची संख्या आता ८ लाख १२ हजार झाली आहे. २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदारांमध्ये सुमारे सव्वालाखांची भर पडली आहे. १० फेब्रुवारी २०१५ पर्यंत ज्या व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदवले आहे, त्या सर्वांची नावे प्रारुप मतदार यादीत घेण्यात आली असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. विधानसभा मतदार संघनिहाय असलेल्या मतदार याद्यांचे विभाजन वॉर्ड निहाय करण्यात आले आहे. पालिकेच्या मुख्यालयात आणि वॉर्ड कार्यालयात मतदार याद्या मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक वॉर्डाची एकच मतदार यादी ठेवण्यात आली आहे. मतदार यादी पाहू इच्छिणाऱ्याने आपले मतदार ओळखपत्र सुरक्षा रक्षकाला दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक नोंदवून घेऊन त्यांना मतदार यादी पाहण्यासाठी दिली जात होती. यातही घोळ झाले.

काही जणांनी मतदार यादी पळवून नेण्याचा प्रयत्न केला, त्यांना सुरक्षारक्षकांनी थांबवून त्यांच्या जवळची मतदार यादी काढून घेतली. त्यामुळे वादाचे प्रसंगही ओढावले. काही जणांनी मतदार यादी ताब्यात घेतली आणि अर्धा-पाऊणतास सोडलीच नाही, त्यावरूनही वाद झाले.

प्रारुप मतदार यादी सकाळी सात वाजता इंटरनेटवर अपलोड करण्यात येणार होती, पण सायंकाळपर्यंत यादी अपलोड करण्याचे काम झालेच नाही. त्यामुळे ऑनलाइन यादी कुणालाही पहायला मिळाली नाही. दरम्यान काही वॉर्डांच्या मतदारांमध्ये मोठी तफावत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. काही मतदारसंघात मतदारांची संख्या दहा हजारांच्या घरात तर काही वॉर्डात मतदारांची संख्या साडेतीन - चार हजारांच्या घरात आहे. एवढी तफावत कशी याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या वादातून दोन गटात मारामारी

$
0
0

औरंगाबाद : जुन्या वादाच्या कारणावरून पैठण गेट येथे गुरुवारी (१९ मार्च) दुपारी दीड वाजता दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नमाज अदा करण्यासाठी जात असताना फतेमोहम्मद, अश्फाक, मुश्ताक व नदीम (सर्व रा. पैठणगेट) यांनी बेदम मारहाण केली, अशी तक्रार मोहम्मद बागवान (वय १९) याने दिली आहे. त्यावरून चौघांविरुद्ध मारहाण व रस्ता अडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी तक्रार हाजी फतेमोहम्मद (वय ६६) यांनी दिली आहे. फते मोहम्मद हे देखील नमाज पढण्यासाठी जात होते. त्यावेळी जुन्या वादातून त्यांना शेख अन्वर, आमेर शेख, बाटी अब्दुल रऊफ व कैसर अब्दुल करीम (सर्व रा. सब्जीमंडी, पैठणगेट) यांनी मारहाण केली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दपार गुन्हेगारासह दोघांना अटक

$
0
0

औरंगाबाद : पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोन कुख्यात गुन्हेगारांना गुन्हेशाखेने बुधवारी (१८ मार्च) मुकुंदवाडी परिसरात अटक केली. राजनगर, मुकुंदवाडी भागात हद्दपार केलेला बाळू भागाजी मकळे (वय २०, रा. आंबेडकरनगर) हा आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. राजनगरमध्ये मकळे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत भारत शंकर तिर्थे (वय २२, रा. जयभवानीनगर याला अटक केली. तो एन २, कामगार चौकाजवळ मध्यरात्री संशयास्पद अवस्थेत फिरताना सापडला. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images