Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बीएचआरचे प्रमोद रायसोनी संचालक मंडळासह कोठडीत

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, उस्मानाबाद

मुदतठेवीची रक्कम मुदत संपल्यानंतरही परत देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रमोद रायसोनी यांच्यासह संचालकाविरोधात उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी चेअरमन रायसोनीसह बारा संचालकांना उस्मानाबाद पोलिसांनी ताब्यात घेऊन गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

उस्मानाबाद येथील डॉ. पालकर यांनी बीएचआर मल्टिस्टेटच्या उस्मानाबाद शाखेत काही रक्कम मुदतठेव अंतर्गत ठेवली होती. मुदत ठेवीचा कालावधी संपल्यानंतर मल्टीस्टेटकडे वारंवार मागणी करूनही मुदत ठेवीचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे बीएचआरकडून फसवणूक होत असल्याची तक्रार डॉ. पालकर यांनी २० डिसेंबर २०१४ रोजी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात नोंदविली. या तक्रारीवरून बीएचआरच्या संचालक मंडळाविरुद्ध उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बीएचआरच्या उस्मानाबाद शाखेत अनेक ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. याबाबत काही मंडळींनी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात संयुक्तरीत्या २८ नोव्हेंबर २०१४ रोजी तक्रारी नोंदवली. मात्र, या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात पोलिस हेतुत: टाळाटाळ करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वैद्यनाथ’च्या निवडणुकीत मुंडे विरूद्ध मुंडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा ज्वर वाढायला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, पंडितअण्णा मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज निवडणुकीसाठी दाखल केले. गुरुवारी बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाच्या ४५ जणांनी उमेदवारी दाखल केली असल्याने आगामी काळात होत असलेल्या या निवडणुकीत पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष रंगणार आहे.

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी २३ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखलकरण्यास सुरुवात झाली. गुरुवारी भाजपकडून पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह ४५ जणांनी अर्ज दाखल झाले. त्यांच्यासोबत आमदार आर. टी. देशमुख, यशश्री मुंडे, विद्यमान उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी भाजपाकडून अर्ज दाखल केले. शुक्रवारी आणखी एका मुंडेंनी कारखाना निवडणुकीत पॅनेल ‌रिंगणात उतरवले आहे. शुक्रवारी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व त्यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांच्यासह परळी तहसील कार्यालयात जाऊन उमेदवारी दाखल केली. धनंजय मुंडे यांनी भटक्या जाती जमाती गटातून तर पंडितअण्णा मुंडे यांनी संस्था मतदार संघातून अर्ज दाखल केला. बीड जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे विरूद्ध मुंडे अशी लढत आता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन मुंडेमध्ये कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंठा तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी मंठा तालुक्यातील उटवद शिवारात घडला. राजेश दत्तराव सरोदे (वय ३४) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सरोदे यांची माळरानावर सहा एकर शेती असून त्यांच्यावरच त्यांची उपजिवीका अवलंबून होती. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतातील पीके जमिनदोस्त होत असल्याने आर्थिक परिस्थिती बिघडल्याने त्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. पोलिस उपनिरीक्षक चरभरे, तलाठी नितीन चिंचोले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानसिक रुग्णाने केला मुलीसमोर पत्नीचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

एका मानसिक रुग्णाने आई व पाच वर्षाच्या मुलीसमोर गळफास देऊन पत्नीचा खून केला आहे. त्याच्यावर बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथे अघोरी उपचार सुरू होते. दोन महिने उपचार घेऊन तो १५ दिवसांपूर्वीच परतला होता.

काही वर्षापासून एकतुनी येथील विलास सर्जेराव घोडके याच्या अंगात येत होते. पण त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्याऐवजी कुटुंबाने बुलढाणा येथील सैलानी बाबा येथे उपचार सुरू केले होते. सैलानी बाबा येथे दोन महिने अघोरी उपचार केल्यावर १५ दिवसांपूर्वी तो कुटुंबासोबत एकतुनी येथे आला होता. एकतुनी येथे आल्यानंतर विलासची पत्नी रेणुकाबाई घोडके पाच दिवस माहेरी गेल्या होत्या. त्या गुरुवारी (२६ मार्च) परत आल्या. रात्रीचे जेवण झाल्यानंतर घरातील सर्वजण झोपण्याच्या तयारीत असताना विलास याने अचानक रेणुकाबाईवर हल्ला केला, त्यांना गळफास देण्याचा प्रयत्न करू लागला. विलासची आई सुभद्राबाई यांनी सुनेला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण विलासने आईवर हल्ला करून चावा घेतला व त्यांना घराबाहेर काढले. त्यांनी शेजाऱ्यांना बोलावेपर्यंत रेणुकाबाई मरण पावली होती. ही घटना त्याचा पाच वर्षाच्या मुलीसमोर घडली.

खून करून पसार

पत्नीचा खून केल्यानंतर विलास घोडके एकतुनीमधून पळून गेला आहे. सुभद्राबाई व पाच वर्षाची मुगी यांच्या जबाबावरून पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देहदान दुप्पट, ४ वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) देहदानाचे प्रमाण जवळजवळ दुप्पट झाले असून, मागच्या चार वर्षांतील सर्वाधिक २० व्यक्तींचे देहदान २०१४ मध्ये झाले आहे. विशेष म्हणजे हे प्रमाण केवळ 'अपघाता'ने वाढले नसून देहदानाचा संकल्प करणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. तर, एक जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत चार जणांचे देहदान झाले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्ध्यांसाठी, प्रात्यक्षिकांसाठी मृतदेहांची गरज असते. मात्र देहदान करणाऱ्यांचे प्रमाण अजूनही खूप कमी असल्याचा फटका विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक अभ्यासाला बसतो आहे. त्यासाठीच विविध पातळ्यांवर जनजागृती केली जात असून, २०१४ मध्ये केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे समोर आले आहे. या जनजागृतीपर उपक्रमासाठी घाटीच्या शरीरक्रियाशास्त्र (अॅनॉटॉमी) विभागासह घाटीच्या स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. अर्चना मोहगावकर यांनी विशेष पुढाकार घेतला. डॉ. मोहगावकर यांनी गीता स्वाध्याय मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये देहदानासाठी प्रचार केला आणि यानिमित्त अनेकांनी देहदानाचा संकल्प केला. तसेच घाटीच्या वतीने वृद्धाश्रमांमध्ये, विविध कार्यक्रमांमध्येही प्रचार-प्रसार करण्यात आला, असे विभागप्रमुख व अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले. या वर्षीही प्रचार-प्रसाराचा उपक्रम सुरुच असून, सहयोगी प्रा. डॉ. प्रतिमा कुलकर्णी यांनी पुढाकार घेतल्याचेही सांगण्यात आले. मात्र अजून मोठ्या प्रमाणावर देहदान होण्याची गरज असून, नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. दिवाण यांनी केले आहे.

घाटीकडे आता २८ मृतदेह

काही प्रमाणात देहदानाचे प्रमाण वाढल्यामुळे घाटीच्या अॅनॉटॉमी विभागाकडे आता २८ मृतदेह शिल्लक आहेत. यामध्ये १४ महिलांचे, तर १४ पुरुषांचे मृतदेह आहेत. याचा पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सहा महिने ते एक वर्षापर्यंत उपयोग होणार असल्याचेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाहीच कुणी अपुले; प्राणांवर नभ धरणारे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलांसाठी जगात सगळ्यात सुरक्षित ठिकाण म्हणजे आईचा पदर. अन् आईनेच टाकले तर...विचारानेही अंगावर काटा येतो. शुक्रवारी असाच प्रकार घडला अतुल आणि भक्ती सोबत. अनुक्रमे दीड आणि तीन वर्षांच्या आसपास असलेल्या या चिमुरड्यांना दुपारी दोनच्या सुमारास सोडून माता फरार झाली. हडको कॉर्नरच्या बालगृह आवारात ही घटना घडली.

दुपारच्या सुमारास बालगृह आवारात दोन चिमुकले रडत होते. कर्मचाऱ्यांनी तातडीने ही खबर बाल न्याय समितीच्या अध्यक्ष अॅड. रेणुका घुले यांना सांगितली. त्या यावेळी बालगृहातच होत्या. त्यांनी तातडीने जाऊन मुलांना पाहिले. तीन वर्षाची मुलगी भक्ती व तिच्या सोबत ‌दीड वर्षांचा अतुल. या चिमुरड्यांच्या जवळ एक कॅरीबॅग होती. त्यात त्यांचे वापरायचे कपडे व खायच्या वस्तूही होत्या. याच चिमुरड्यांसोबत काही वेळांपूर्वी दिसलेली महिला मात्र तिथे नव्हती. कर्मचाऱ्यांना बाल न्याय समितीच्या बैठकीसाठी आलेले हे कुटुंब असेल असे वाटले, पण महिलेने आपली मुले सोडली आणि फरार झाली. आई दृष्टीआड जाताच मुले भांबावली. त्यांनी टाहो फोडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. अॅड. घुले यांनी त्यांची आस्थेने चौकशी केली. यावेळी नावाव्यतिरिक्त तीन वर्षांच्या भक्तीला काही सांगताच आले नाही. त्यामुळे सिटीचौक पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलिस तब्बत दोन तासांनी तेथे पोहचले, अशी माहिती अॅड. घुले यांनी दिली. पोलिसांनी या मुलांची एन २ भागातील भारतीय समाज सेवा केंद्रामध्ये रवानगी केली. या घटनेची नोंद सिटीचौक पोलिस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान बालगृहातील प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही कॅमेरा बंद आहे. त्यामुळे या कॅमेऱ्यात बालकांना सोडणारी आई कैद झाली नाही.

...क्षणभर दुःख विसरले!

भारतीय समाज सेवा केंद्रात अतुल आणि भक्तींना दाखल केले. तिथल्या चिमुकल्यांनी या भावंडांना खेळवले. सायकल व बॉल खेळण्याच्या नादात क्षणभर त्यांना, आपल्याला आई सोडून गेलीय याचाही विसर पडला. पण अतुल कुठल्याही पुरुष कर्मचाऱ्याकडे जात नव्हता. त्याला महिला पोलिस कर्मचाऱ्याने जवळ घेतले. पाण्याची विचारणा केली. त्याने हो म्हणत मान डोलावताच त्याला मायेने जवळ घेत पाणी पाजले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामविकासाठी केंद्राचे ‘बुरे दिन’

$
0
0

मकरंद कुलकर्णी, औरंगाबाद

पंचायत राजच्या बळकटीसाठी काँग्रेस सरकारने सुरू केलेले राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान वर्षभरातच गुंडाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ग्रामीण भागात येऊ लागलेल्या अच्छे दिनला यामुळे ब्रेक लागला आहे. योजनेतील हजारो कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून, कोट्यवधींच्या निधीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना कामकाज कसे करावे; योजनांची अंमलबजावणी कशी करावी, याचे प्रशिक्षण देणे या उद्देशाने तसेच पंचायत राज बळकटीकरणासाठी केंद्राने ही योजना सुरू केली. राज्यातून हजारो लोकप्रतिनिधींनी प्रशिक्षण घेतले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) मध्ये गेले वर्षभर हे कार्यक्रम झाले. याशिवाय या पंचायत राज संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षणाची सुविधा या योजनेत होती.

ज्या ग्रामपंचायतीच्या इमारती २० वर्षे जुन्या आहेत, तेथे नवीन बांधकामासाठी १२ लाखांची तरतूद या योजनेतून करण्यात आली होती. तसेच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ५,००० हून जास्त आहे. तेथील विकासकामांवर देखरेखीसाठी पंचायत अभियंता हे स्वतंत्र पद निर्माण केले होते. तेथील कामांच्या नोंदी ठेवण्याचे काम या अभियंत्यांवर सोपविले होते.

कुठलेही कारण न दाखविता केंद्र सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आशयाचे पत्र देशभरातील राज्यांच्या ग्रामविकास खात्याला केंद्रीय अर्थ विभागाने पाठविले आहे. ३१ मार्चपासून या योजनेंतर्गत कोणतेही प्रशिक्षण

घेऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्याची दखल घेऊन यशदा आणि राज्याच्या ग्रामविकास खात्याने राज्यभरातील जिल्हा परिषदांना पत्र पाठवून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. योजनेंतर्गत घेतलेल्या हजारो कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

बांधकामे अर्धवट राहणार ?

ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी या योजनेतून १२ लाखांची मदत दिली जाणार होती. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात २० ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी साडेचार लाखांचा पहिला हप्ता मिळाला होता. आता योजनाच गुंडाळली गेल्याने पुढचा निधी येणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्रामगृह जप्तीची पालिकेची नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडील मालमत्ता व पाणीपट्टीची चार लाख ८२ हजार ९०२ रुपये थकबाकी वसुलीसाठी नगरपालिकेने येथील ऐतिहासिक विश्रामगृहाला जप्तीची नोटीस बजावली आहे. ही थकबारी ३० मार्चपर्यंत न भरल्यास विश्रामगृह सील करण्यात येणार आहे.

खुलताबाद येथील विश्रामगृहाला एका शतकाची परंपरा आहे. निजामकालीन वैभव व वास्तुरचनेचे उदाहरण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या इमारतीचा मालमत्ता कर व पाणीपट्टी थकली आहे. विश्रामगृहात पाण्याचा ठणठणाट असल्याने येथे भेट देणाऱ्या अभ्यागतांना सुविधा मिळत नाहीत. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या खुलताबाद कार्यालयाच्या तिजोरीत खडखडाट असून पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी निधी नसल्याने कार्यकारी अभियंता (पश्चिम) यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. हा निधी वेळेत मिळाला नाही, तर ऐतिहासिक विश्रामगृहावर जप्तीची वेळ येणार आहे.

इमारतीवर अवकळा

खुलताबाद येथे टेकडीवरील विस्तीर्ण जागेवर ८१ हजार ७६४ रुपये खर्च करून १९११मध्ये ही भव्य वास्तू बांधण्यात आली. या वास्तुचे दोन भाग आहे. पहिल्या मजल्यावर एक भोजन कक्ष व सहा शयनकक्ष आहेत. तळमजल्यातील संग्रहालयात निजामकालीन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. शंभरी गाठलेल्या या इमारतीला अवकळा आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गद्दारी करणाऱ्यांची गय करणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीने येणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून पक्ष बळकटीचे काम करण्याची गरज आहे. त्यासोबतच सामाजिक न्याय देण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जनतेशी जवळीक साधावी, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना लवकरच धडा शिकवू, असा दम शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी दिला.

नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात गुरुवारी रात्री उशीरा महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा वापर काळजीपूर्वक करीत असताना सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागातील जनतेशी तसेच शहरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात नागरिकांशी संपर्कात रहावे, त्याचप्रमाणे जनतेच्या हिताची वेगवेगळी कामे करताना त्यांची नाळ जुळेल व ते कसे संपर्कात राहतील, त्यांच्या समस्या कशा पध्दतीने सुटतील यादृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण हे धोरण असून, जनतेच्या मुळ समस्यांचे निराकरण करताना त्यांचे समाधान होईल यासाठी परिश्रम घ्या. येणाऱ्या जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायती, पंचायत समितीच्या निवडणूका पूर्णपणे जिंकण्यासाठी ग्रामीण भागात व शहरी भागात जनतेच्या संपर्कात रहा, शिवसेना सदस्य नोंदणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोंदणी करुन शिवसेनेच्या प्रवाहात सर्व हिंदूप्रेमी व त्यांच्याशी संबंधित मंडळींना आणण्यासाठी प्रयत्न करा. पक्षाशी गद्दारी करुन पक्षासंदर्भात उघडपणे बोलणाऱ्यांना त्यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, भुजंग पाटील, आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्यासह शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांची सभा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ४ एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात येणार असून, लोह्याजवळ त्यांची जाहीर सभा होणार आहे. भेटी दरम्यान ते शेतकऱ्यांशी देखील चर्चा करणार आहेत. दौऱ्याच्या दृष्टीने चांगले वातावरण निर्माण करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कटीबद्ध व्हावे, असे आवाहन थोरात यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबाद शिवसेनेत गटबाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

शिवसेनेच्या उस्मानाबाद शहरप्रमुखपदी पुन्हा नगरसेवक राजाभाऊ पवार यांचीच वर्णी लागली. नगरसेवक पवार हे शिवसेनेचे विद्यमान शहरप्रमुख आहेत. मात्र, पप्पू मुंडे यांची शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले होते. या सर्व प्रकारावरून उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेत गटबाजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख तथा खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते व जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे पप्पू मुंडे यांना शहरप्रमुखपद नियुक्तीचे पत्र देण्यात आले होते.

उस्मानाबाद शहरप्रमुखपदी केलेली पप्पू मुंडे यांची निवड जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांना व नेतेमंडळींना भावली नाही. त्यांनी पदाधिकारी निवडीचा हा सावळा गोंधळ व मनमानी कारभार पक्षश्रेष्ठींच्या कानी घातला. यानंतर सेनेचे सचिव असलेले खासदार अनिल देसाई व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या संदर्भाने जिल्हाप्रमुख व जिल्हा संपर्कप्रमुख यांची कानउघाडणी केली. पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून होतात याकडे त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुखांचे लक्ष वेधले. शिवाय खासदार चंद्रकांत खैरेमार्फत करण्यात आलेली पप्पू मुंडे यांची उस्मानाबाद शहरप्रमुखपदी करण्यात आलेली नियुक्ती रद्द केली आणि राजाभाऊ पवार हेच शहरप्रमुखपदी असतील असे स्पष्ट केले.

पक्षश्रेष्ठींच्या कानपिचक्यानंतर जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या नातलगांच्या नियुक्तीचे काम तूर्ततरी थंडावले आहे. जिल्ह्यात सेनेचा एक खासदार व एक आमदार कार्यरत असताना शिवाय माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरसह अन्य पदाधिकाऱ्यांना जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुख विचारात घेत नाहीत अशा काही तक्रारीने सुद्धा आता जोर धरला आहे. यामुळे जिल्ह्यातील गटबाजी आता उफाळून येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

शिवसेनेचा गड म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात सेनेची आणखीन ताकद वाढावी म्हणून गौरी शानबाग यांची जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी वर्णी लागली. त्यापूर्वी त्यांनी लोकसभा निरीक्षक म्हणूनही येथे काम केले होते. जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शानबाग हे ‌केवळ धनदांडग्यातच वावरतात अशी प्रामाणिक शिवसैनिकांची तक्रार आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील गटबाजीने जोर धरला आहे.

प्रामाणिक शिवसैनिकांवर अन्याय

जिल्हा संपर्कप्रमुख शानबाग यांचे वागणे हे हाय फाय आहे. तशाच त्यांच्या आवडी निवडी आणि सवयी आहेत. त्यामुळे सर्वसामान्य पदाधिकारी व शिवसैनिक त्यांच्या सान्निध्यात वावरू शकत नाही. परिणामी, प्रामाणिक शिवसैनिकांवर अन्याय होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शांतता लढा हायकोर्टातून जिंकला!

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

गारखेडा भागातील गिरिजादेवी हौसिंग सोसायटीच्या महापालिकेविरुद्धच्या लढ्याला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात यश मिळाले. केवळ तीस दिवसांचीच ही लढाई होती. प्रत्येक नागरिकाला घटनेने शांततेत राहण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. या अधिकाराचा भंग होत असल्यामुळे सोसायटीचे अध्यक्ष गोपीनाथ वाघ यांनी औरंगाबाद युटिलिटी आणि महापालिकेविरोधात जनहित याचिका दाखल केली होती.

हौसिंग सोसायटीत सार्वजनिक मैदान आहे. या मैदानावर कॉलनीतील मुले खेळतात आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठीही या मैदानाचा वापर होतो. पालिकेच्या विनंतीवरून सोसायटीच्या माजी अध्यक्षांनी या जागेवर पंप हाऊस बांधण्याला ना हरकत प्रमाणपत्र दिले. याचाच फायदा औरंगाबाद वॉटर युटीलिटी कंपनीने घेतला. या पंपहाऊसमधून दिवस-रात्र टँकरने पाणी भरले जात होते. याचा प्रचंड त्रास हौसिंग सोसायटीतील नागरिकांना झाला. सोसायटीतील रस्ते अरूंद आहेत. रात्री-बेरात्री केव्हाही टँकरने पाणी नेत असल्यामुळे नागरिकांच्या झोपेवर परिणाम होत होता. टँकरच्या आवाजाने वयोवृद्धांना रात्रीच्या वेळी शांतपणे झोपही घेता येत नव्हती, असे गोपीनाथ वाघ यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. दीड महिन्यांपूर्वी सोसायटीतर्फे महापौर कला ओझा, आयुक्त यांना या पंप हाऊसमधून ठराविक वेळेतच टँकरने पाणी भरावे अशी विनंती केली. परंतु ही विनंती मान्य झाली नाही. या परिसरातील अनेक शाळांमध्ये मुले जातात, ती टँकर खाली येऊ नयेत याची काळजीही घेतली जात नव्हती. एका मुलाचा अपघात होता-होता वाचला. त्यामुळे नागरिक संप्तत झाले. त्यांनी बैठक होऊन कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला.

अन्य भागातील नागरिकांना गिरिजादेवी हौसिंग सोसायटी टँकरमध्ये पाणी भरू देत नाही, असा भडकविण्याचा प्रयत्न वॉटर युटिलिटी कंपनीने केला. अन्य भागातील नागरिकांचा जमाव आणून दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला. हे टँकर भरू देत नाहीत, असा आक्षेप वॉटर युटिलिटी कंपनीने घेतला. या विरोधात सोसायटीने पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल केली. अखेर हायकोर्टाने सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेतच पंप हाऊसमधून टँकरने पाणी भरावे, असे निर्देश दिले. टँकरच्या येण्या-जाण्याने रस्ते खराब झाले होते. हे रस्तेही तयार करून देण्याचे आदेश कोर्टाने दिले.

शांततेत जगण्यासाठीच...

शहरातील अन्य नागरिकांना पाणी मिळू नये हा उद्देश यामागे नव्हता. शांततेत जगता यावे यासाठीच हा लढा होता. या लढ्याला हायकोर्टाच्या निर्णयाने बळ मिळाले.

- गोपीनाथ वाघ, याचिकाकर्ते

मूलभूत अधिकार

घटनेने प्रत्येक नागरिकाला शांततेत राहण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. पाण्याचा गंभीर प्रश्न असला तरी चोवीस तास टँकरने पाणी नेण्याने नागरिकांच्या अधिकारावर गदा आली होती.

- सिद्धेश्वर ठोंबरे, याचिकाकर्त्याचे वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोठे वाटणारे नेते खूपच खुजे

$
0
0


औरंगाबादः दिल्लीत जे नेते मला दुरून खूप मोठे वाटत होते, ते प्रत्यक्षात खूपच खुजे आणि जे नेते खूप छोटे वाटत होते ते मोठे वाटले, असे विधान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केले. गडकरी म्हणाले, 'मी दिल्लीत अनेक देशांच्या अध्यक्षांना, मोठ्या नेत्यांना भेटतो. त्यावेळी मनात असा विचार येतो की आपण ज्यांना महान समजत होतो, ते जवळून खूप खुजे वाटतात आणि जे किरकोळ नेते वाटतात ते खूपच मोठे आहेत.' कोणताही संदर्भ नसताना त्यांनी केलेल्या या विधानामुळे श्रोते अवाक् झाले. पत्रकारांनी गडकरी यांना याचा अर्थ विचारला, तेव्हा अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. आपल्याच पक्षातील अडगळीत टाकल्या गेलेल्या नेत्यांविषयी ते बोलले असावेत, अशी चर्चा विद्यापीठात सुरू झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीलाही निवडणुकीचे वेध

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीलाही निवडणुकीचे वेध लागले आहेत. तब्बल दहा वर्षांनी या जाधववाडीतील मोंढ्यात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. याद्या बनवण्यांचे काम सुरू झाले असून एक ते दोन महिन्यांत ते पूर्ण होईल व नंतर जुलै पहिल्या आठवड्यात निवडणुका होतील, असे संकेत मिळत आहेत.

गेल्या पाच वर्षांपासून या बाजार समितीत प्रशासक असून दहा वर्षांनी येथे निवडणूक होत आहे. गाळेधारक, भाजीपाला उत्पादक, शेतकरी, लायसन्सधारक आणि मापाडींसह शहरातील सर्वच व्यापारी व आजी माजी आमदारांसह या निवडणुकीत अनेक जण सभासद आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद मंडळ, व गावपातळींवर या बाजार समितीचे मतदार आहेत. १ हजार २०० लायसन्सधारक आणि ४५० मापाडी असे बाजारसमितीतील मतदार आहेत. शिवाय मतदारही यंदा १० वर्षांनी मतदान करणार असल्याने त्यांच्यातही चैतन्य आहे. या समितीच्या मतदार याद्यांचे काम सुरू झाले आहे. एक महिना त्यावर आक्षेप नोंदवणे, मतदार नावे दुरुस्त करणे आदी कामे चालतील. ही कामे व याद्या अंतिम करणे याला दोन महिने लागतील असे सुत्रांनी सांगितले. जुलै महिन्यात हे काम पूर्ण होईल आणि एकंदरीतच त्यानंतर निवडणुका होतील. २००५ ला निवडणूक झाली होती तर २०१० ला या बाजार समितीवर प्रशासक ‌नेमला होता. दरम्यान, आता निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार होत असल्याने या परिसरात चैतन्याचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

$
0
0

>>रामचंद्र वायभट, औरंगाबाद

दिल्ली निवडणुकीत बाजी मारणाऱ्या आम आदमी पार्टीचे गल्लीतील निवडणूक लढवावी की नाही यावरून तळात मळ्यात सुरू आहे. पक्षाने निवडणूक लढविण्याबद्दल अद्याप निर्णय केला नसताना इच्छुक मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. दरम्यान राज्य संयोजक सुभाष वारे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत १८ ते २० इच्छुकांनी वॉर्डातील नागरिकांचे समर्थन असल्याचे निवेदन सादर केले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळाल्यानंतर लोकांच्या व पक्ष कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला पर्याय म्हणून आम आदमी पार्टीने पुढे आले पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र पक्षाचे निवडणूक लढवण्याबाबतचे निकष व नियम पाहता कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची सोडावी लागेल का याची भीती सतावत आहे.

शहरात होत असलेला भ्रष्टाचार निमुटपणे पाहण्यापेक्षा व केवळ रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याऐवजी व्यवस्थेत सहभागी होऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढविण्याची गरज असल्याचे इच्छुक उमदेवार सांगत आहेत. दुसरीकडे पक्ष निवडणूक लढवणार की नाही याबाबतच संभ्रम असल्यामुळे त्यांना आणखी दोन तीन दिवस वाट पहावी लागणार आहे. २८ मार्च रोजी दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीत राज्य संयोजक सुभाष वारे हे औरंगाबादच्या स्थितीचा अहवाल मांडणार आहेत.

निकष आड येणार ?

महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम आदमी पार्टी काही निकषांचा आधार घेण्याची शक्यता आहे. पक्षाचे प्रत्येक वार्डात किमान पाच टक्के सभासद असणे, शहरातील ५० टक्के वार्डांमध्ये बुथ कमिटी, ५० टक्के वार्ड लढण्यासाठी तयारी असणे हे निकष आहेत. या निकषांनुसार इच्छुकांनी मतदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र संयोजकांना सादर केले.

मी बैठकीत सर्वांसोबत चर्चा केली, वार्डातील परिस्थिती लक्षात घेतली. इच्छुकांनी मतदारांच्या पाठिंब्याचे पत्रही दिले आहे. दिल्ली येथे शनिवारी होणाऱ्या राष्ट्रीय बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना मांडणार आहे.

- सुभाष वारे, राज्य संयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्न ऐरणीवर

$
0
0

शहरात पाण्याचे खासगीकरण झाले आणि उस्मानपुरा वॉर्डात पाण्याची समस्या तीव्र झाली. शहा कॉलनीसह अनेक भागातील लोकांना दिवाळीपासूनच पाण्याची चिंता सतावते आहे. वॉर्डातील मुख्य रस्ताही खराब झाला आहे. त्यामुळे लोकांचा खड्ड्यातून प्रवास सुरू आहे.

माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय हे यापूर्वी उस्मापुरा वॉर्डातून तीनदा निवडून आले आहेत, तर २०१०च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अक्रम पटेल विजयी झाले. मागील वीस वर्षांत या भागात विकासकामे तशी कमीच झाली. उघडे नाले, ड्रेनेजलाइनची कामे झाले आहे. याशिवाय अनेक भागात अंतर्गत रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र

उस्मानपुरा चौक ते पीरबाजाराचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्याचे काम होणे आवश्यक होते, मात्र ते झाले नाही. शहा कॉलनीसह अनेक गल्ल्यांत अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या तीव्र आहे. याबाबत 'समांतर'कंपनीकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. पण त्यावर तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे रस्ता आणि पाणीप्रश्नामुळे लोक हैराण झाले आहेत.

चतुःसीमा

पीरबाजार रिक्षा स्टॅण्डपासून ते शहा कॉलनीच्या मशिदीपर्यंत, शहा कॉलनीच्या मशिदीपासून ते भीमपुरा, भीमपुरा ते चेलीपुरा हायस्कूलच्या पाठीमागील वसाहतीपासून ते एसएससी बोर्डमार्गे पीरबाजार रिक्षा स्टॅण्डपर्यंत. २०१५ च्या निवडणुकीत स्वतंत्र उस्मानपुरा वॉर्ड आता दशमेशनगरला जोडला आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस कमी झाली आहे.

वॉर्डात पाच वर्षात भरपूर काम केली आहेत. शहा कॉलनी येथे पाण्याची समस्या आहे. 'समांतर'मुळे या भागातील लोकांना पाण्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिंटीकरण केले आहे. याशिवाय काही ठिकाणी गट्टू बसविले आहेत. एससीसी बोर्ड ते पीरबाजार पर्यंतचा रस्ता सव्वा दोन कोटी खर्चून तयार केला जाणार आहे.

- अक्रम खान, नगरसेवक

वॉर्डातील समस्या सोडविण्यासाठी स्थानिक उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. मागील पाच वर्षात वॉर्डाचा विकास करण्याचा प्रयत्न झाला आहे. आगामी काळातही विकास करणारा उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून यावा.

- मोहम्मद हनिफोद्दीन

गेल्या पाच वर्षांत वॉर्डात अनेक विकासकामे झाली आहेत. आगामी काळातही वॉर्डाचा विकास करणारा, जनतेसाठी झटणारा नगरसेवक निवडून यावा.

- राजेश शर्मा

वॉर्डात ड्रेनेजपासून रस्त्याच्या समस्येपर्यंत अनेक समस्या सोडविण्यात आल्या आहेत. आगामी काळातही वॉर्डाचा विकास अधिक चांगला करण्यासाठी सुशिक्षीत आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार निवडून यावा.

- शेख रमजानी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समस्यांनी मांडले ठाण

$
0
0



एकनाथनगर भागात रस्त्यावर ठिकठिकाणी साचलेले कचऱ्यांचे ढीग, पाण्यासाठी करावी लागणारी वणवण, रस्त्यावरचे खड्डे आणि पीरबाजार चौकात सतत होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे परिसरातील नागरिक वैतागले आहेत. गेल्या पाच वर्षांत या वॉर्डाकडे नगरसेवकाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे.

एकनाथनगर भागातील वॉर्ड क्रमांक ९० मध्ये २०१० साली झालेल्या निवडणुकीत सिंकदर साजीद निवडून आले. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून त्यांनी ही निवडणूक लढवली. त्यापूर्वी २००५ मध्ये हिंमतराव दाभाडे नगरसेवक होते. या वॉर्डातली २०१० ची निवडणूक मोठी चुरशीची झाली. त्यानंतर झालेल्या बदलामुळे वॉर्डाचा कायापालट होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. सध्या फुलेनगर, एकनाथनगर, म्हाडा कॉलनी भागात कचऱ्याच्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागात दोन दिवसानंतर कचरा उचलण्यात येतो. वॉर्डात ठिकठिकाणी कायम कचऱ्याचे ढीग पडलेले असतात. पीरबाजार चौकात होणारी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. एकनाथनगर भागात चार वर्षापूर्वी रस्ता रुंद करण्यात आला, मात्र या रस्त्याचे काम चक्क तीन वर्ष रखडले होते. या वर्षी या रस्त्याचे काम मार्गी लागले. व्हॉइट टॉपिंगचा रस्ता काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला.

म्हाडा कॉलनी आणि इतर भागात पाण्याची समस्या तीव्र आहे. पाण्याच्या वेळा न पाळणे, कमी दाबाने पाणीपुरवठा यामुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो. सध्याचे नगरसेवक सिकंदर साजीद हे या वॉर्डातले नाहीत. त्यांचा या वॉर्डात काही ठावठिकाणी नसतो, की वॉर्डातील कामाकडे लक्षही नसते. त्यामुळे छोट्या-छोट्या कामासाठी लोकांना थेट महापालिकेत धाव घ्यावी लागते. दरम्यान, या भागातील कामाबाबत माहिती विचारण्यासाठी नगरसेवक सिकंदर साजीद यांना मोबाइलवर संपर्क साधला, मात्र तो झाला नाही.

चतुःसीमा

पीरबाजार चौक ते मुख्य रस्त्याने न्यू ग्रेट सागर रेस्टॉरन्ट, पटेल हार्डवेअर ते मुख्य रस्त्यावरील जुनी पानपोईपर्यंत, प्रकाश निकाळजे यांच्या घरापासून ते प्रतापनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कासलीवाल रेन्सीडेन्सीपर्यंत, कासलीवाल रेसीडेन्सीपासून ते मिलिंदनगर येथील नाल्यालगतच्या घरापर्यंत, नाल्यापासून ते आनंद गाडे चौक रस्त्याने पीरबाजार चौकापर्यंत.

वॉर्डातील समस्या दुसऱ्या वॉर्डातील व्यक्तीला माहित नसते. त्यामुळे नागरिकांच्या छोटया-मोठया समस्या सोडविण्यासाठी वॉर्डातील नागरिकांमधूनच वॉर्ड नगरसेवक निवडण्यात यावा. आम्हाला उपरा नगरसेवक नको.

- आर. एस. परदेशी, नागरिक.

वॉर्डामध्ये मागील पाच वर्षांत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे आता चांगला जनसंपर्क असणारा, समस्या सोडविणारा, लोकांची कामे करणारा नगरसेवक निवडून दिला पाहिजे.

- अशोक गरूड, नागरिक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४ नगरसेवकांवर कारवाईसाठी अप‌ील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले नगरसेवक प्रमोद राठोड, रवी कावडे, सत्यभामा शिंदे आणि रावसाहेब गायकवाड यांच्याविरुद्ध पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद अक्रम यांनी केली आहे. याबाबत विभागीय आयुक्तांकडे अपील केले असून अपिलावर १३ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती अक्रम यांनी दिली. गांधी भवनात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या चार नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. २०१० मध्ये काँग्रेसच्या 'पंजा' निशाणीवर निवडणूक लढवून चौघांनी विजय मिळवला होता. पक्षांतर करताना कायद्यानुसार पक्षाचा राजीनामा दिला नाही किंवा मनपा आयुक्तांकडे राजीनामा सादर केला नाही. तसेच पक्षांतराबाबत कोणतीही माहिती दिली नाही. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अनहर्ता अधिनियम व इतर नियमांचे उल्लंघन केले असून कायद्यातील तरतुदीनुसार या चौघांवर सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घालावी, असे शहराध्यक्ष अक्रम यांनी अपिलात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंठेवारीची साडेसाती डोईवरती!

$
0
0

मकरंद कुलकर्णी

शहरात राहूनही खेड्यात राहण्याचा अनुभव गेल्या २६ वर्षांपासून घेणाऱ्या चार लाख नागरिकांना गुंठेवारी वसाहत कायम केल्याचा राज्य सरकारचा निर्णय दिलासाजनक ठरणार आहे. गुंठेवारचा गुंतला सुटला असला, तर सरकारकडून तत्काळ सुविधा मिळणार की नाही हा प्रश्न आहे.

औरंगाबाद शहराचा चौफेर विकास झाला. वसाहती उभ्या राहिल्या. २६ वर्षांपूर्वी दक्षिण औरंगाबादमध्ये २० बाय ३० च्या प्लॉटवर मोठ्या वसाहती उभ्या राहिल्या. शहराच्या हद्दीत उभ्या राहणाऱ्या प्रत्येक वसाहतीला पाणी, रस्ते, वीज, ड्रेनेज या प्राथमिक सुविधा देणे ही महापालिकेची जबाबदारी असते. पण कायद्यावर बोट ठेवून या वसाहतीला कुठल्याही सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत. पाहता-पाहता आज शहराच्या विविध भागात गुंठेवारी वसाहतींची संख्या ११९ वर पोहचली आहे. १९८९ पूर्वी काही वसाहती निर्माण झाल्या, पण त्यांचा उल्लेख गुंठेवारी म्हणून झाला नाही. शासनाच्या नोंदीत या वसाहती अनधिकृत होत्या. त्यामुळे सुविधा पुरविण्यासाठी कुठलिही तरतूद नव्हती. तत्कालीन सरकारने एक जानेवारी २००१ पूर्वीच्या वसाहती अधिकृत करण्याचा निर्णय घेतला, पण त्यात संदिग्धता होती. ज्या प्लॉटची विक्री बाँडवर झाली आहे, अशा मालमत्तांसाठी काही तरतूद नव्हती. २००८ मध्ये औरंगाबादेत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांनी जुने सर्व अधिनियम रद्द करत सर्व प्रकारच्या गुंठेवारी वसाहतींना कायम करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान २००५ ते २००८ दरम्यान गुंठेवारी भागातील वसाहतींसाठी सुविधा पुरविण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. केवळ ४३ मालमत्तांनाच पीआर कार्ड देण्यात आले. मालमत्ताधारकांकडून करवसुली करून त्यातून सुविधा पुरविण्याची योजना होती. मुळातच सुरुवातीपासून या वसाहतींकडे दुर्लक्ष झाल्यानंतर करभरण्यासाठी कोण पुढे येणार, असा प्रश्न होता. महापालिकेच्या हद्दीत असलेल्या, पण गुंठेवारी असलेल्या वसाहतींमधून निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या ३८ आहे. पण पालिकेकडून सुविधा पुरविण्यासाठी कधीच भरभरून निधी दिला गेला नाही. गुंठेवारी भागासाठी विकासकामे करताना केवळ रस्ते आणि सभागृहांसाठीच निधीची तरतूद केली गेली. पुंडलिकनगर, गजाननगर, भारतनगर, विश्रांतीनगर, जयभवानीनगर, न्यायनगर, हुसेन कॉलनी, गजानन कॉलनी, विजयनगर, गुरुदत्त नगर, शिवशंकर कॉलनी, बालाजीनगर, उत्तमनगर, मयूर पार्कचा काही भाग, हर्सूलचा काही भाग, आरेफ कॉलनी, आसेफिया कॉलनी, अल्तमश कॉलनी, रहेमानिया कॉलनी, राजनगर, मुकुंदनगर या वसाहतींमध्ये मग प्राथमिक सुविधांची गरज भासणे सुरू झाले.

खासदार, आमदार निधीतून रस्ते, जलवाहिनी काही भागात मलनिस्सारण वाहिनीची कामे झाली. शहरात असूनही खेड्याचे जीवन या भागातील नागरिकांच्या नशिबी आहे. गुंठेवारी वसाहत कायम करावी, या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर जनआंदोलने उभी राहिली. चळवळीच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला, पण सरकार दरबारी याची कधीच दखल घेतली गेली नाही. २०१० च्या महापालिका निवडणुकीत युतीच्या वचननाम्यामध्ये गुंठेवारी वसाहती नियमित करण्याचा मुद्दा समाविष्ट करण्यात आला होता. चार वर्षे आघाडीचे सरकार राज्यात आणि पालिकेत युती असे चित्र असल्याने या प्रश्नावर काहीच निर्णय होत नव्हता. सरकार बदलल्यानंतर रामदास कदम पालकमंत्री झाले आणि त्यांनी हा प्रश्न ऐरणीवर आणला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुंठेवारीच्या फाइलवर स्वाक्षरी केली. त्याची अधिसूचना काढण्यात आली, पण त्यात थेट उल्लेख नाही. महापालिकेने २०१० पर्यंतच्या वसाहती कायम कराव्यात असा प्रस्ताव दिला होता. पण अधिसूचनेत कोणत्या वर्षांपर्यंतच्या गुंठेवारी मालमत्ता अधिकृत केल्या जातील याचा उल्लेख नाही. त्यामुळे संभ्रम आणखी वाढला आहे.

गेल्या पाच वर्षांत या वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. २००१ मध्ये २० हजार मालमत्ता होत्या. आज हा आकडा एक लाखांवर गेला आहे. या मालमत्ता अधिकृत झाल्यानंतर त्यांना सुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकारने काय प्लॅन केला आहे, याबाबतही अनेक प्रश्न आहेत. सद्यस्थितीला या वसाहतींना सुविधा पुरविण्यासाठी १०० कोटी रुपयांची गरज लागणार आहे. यासाठी स्वतंत्र तरतूद केली जाणार काय ? असा प्रश्न आहे. गुंठेवारीमध्ये झालेल्या दुमजली, तीनमजली इमारतींना किती दंड लावणार ? त्या अधिकृत करताना काय प्रक्रिया राबविली जाईल, हे प्रश्न नागरिकांसमोर पडले आहेत. एकूणच गुंठेवारीचा गुंता सुटला, पण सुविधा मिळणार की नाही हे मात्र अनुत्तरित आहे.

नव्या वसाहतींचे काय ?

पालिकेकडील नोंदीनुसार गुंठेवारीच्या ११९ वसाहती आहेत. गेल्या तीन वर्षांत पडेगाव, मिटमिटा, सुंदरवाडी, झाल्टा, बीड बायपास परिसरात अनेक वसाहती उभ्या राहिल्या. या वसाहतींना नवीन अधिसूचनेत न्याय मिळणार की नाही असा प्रश्न आहे.

१०० कोटींची गरज

गुंठेवारी वसाहतीत २००१मध्ये २० हजार मालमत्ता होत्या. आता हा आकडा एक लाखांवर गेला आहे. ४ लाख लोक इथे राहतात. पाणी, रस्ते या पायाभूत सुविधांसह इतर सुविधा पुरविण्यासाठी या वसाहतींना १०० कोटी रुपयांची गरज लागणार आहे. हा निधी केव्हा मिळणार, या प्रश्नी सरकार काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

गुंठेवारीचा प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून भिजत पडला आहे. अनेक वेळा अनेक जण आश्वासन देतात, पण तेथे विकास झालेलाच नाही. ही वस्ती म्हणजे राजकारण झाले आहे. गुंठेवारी भागासाठी विकासकामे करताना केवळ रस्ते आणि सभागृहांसाठीच निधीची तरतूद केली गेली. पुंडलिकनगर, गजाननगर, भारतनगर, विश्रांतीनगर, जयभवानीनगर, न्यायनगर, हुसेन कॉलनी, गजानन कॉलनी, विजयनगर, गुरुदत्त नगर येथे काय सुविधा आहेत हे त्यांचे त्यांनाच माहित.

-अनंत बोरकर

गुंठेवारी भागाला कोणी वाली नाही. रस्ते, वीज, पाणी आणि इतर सोयी-सुविधा तर फार दूर. रोज या विषयी किती आणि कुणाकडे दाद मागायची हेच कळत नाही. मालमत्ता अधिकृत झाल्यानंतर त्यांना सुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकारने काय प्लॅन केला आहे, याबाबतही अनेक प्रश्न आहेत. गुंठेवारीमध्ये झालेल्या दुमजली, तीनमजली इमारतींना किती दंड लावणार ? त्या अधिकृत करताना काय प्रक्रिया राबविली जाईल, हे प्रश्न नागरिकांसमोर पडले आहेत.

- गणेश वाघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी ४८ बोअरचा मालक

$
0
0

>> प्रियंका काकोडकर । टाइम्स वृत्त

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील मराठवाडा विभाग दुष्काळग्रस्त म्हणूनच ओळखला जातोय. उन्हाळ्याचे चार महिने तिथे पिण्याच्या पाण्याचंही दुर्भिक्ष्य जाणवत असल्यानं, 'शेतीसाठी पाणी' ही तर कल्पनेपलीकडचीच गोष्ट. पण याच मराठवाड्यातला एक शेतकरी तब्बल ४८ बोअरवेलचा मालक आहे आणि तो डाळींबाची यशस्वी शेती करतोय. विश्वास बसणं जरा कठीणच असलं तरी ही वस्तुस्थिती आहे. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील या शेतकऱ्याचं नाव आहे, विश्वंबर जगताप.

'बोअरवेल मॅन' म्हणून ओळखले जाणारे विश्वंबर जगताप हे आष्टीतील 'सेलिब्रिटी'च झालेत. दुष्काळग्रस्त आणि सिंचनापासून वंचित मराठवाड्यात शेतीसाठी पाणी हवं म्हणून २००५ पासून ते बोअरवेल खोदताहेत आणि आज त्यांच्या १८ एकरांच्या शेतात तब्बल ४८ बोअर आहेत. त्यातल्या बऱ्याच विहिरी एक हजार फुटांपेक्षाही खोल, म्हणजेच ६० मजली इमारतीच्या उंचीइतक्या आहेत. परंतु, सततच्या दुष्काळामुळे भूजलसाठा इतका कमी झालाय, की आज त्यातल्या फक्त १५ बोअरवेलना पाणी असल्याचं ते सांगतात. यावर्षी आपण फक्त एकच बोअरवेल खोदल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

बोअरवेल खोदण्याच्या कामासाठी जगताप यांनी लाखो रुपये खर्च केलेत. एक बोअरवेल खणण्यासाठी किमान ७५ हजार रुपयांचा खर्च येतो. खोली जसजशी वाढत जाते, तसतशी ही रक्कम वाढत जाते. तसंच, पाणी न लागल्यास सगळा खर्च वायाही जातो, असं त्यांनी नमूद केलं. बोअरला पाणी कुठे लागू शकतं, याचा वेध घेण्यासाठी काही जुन्या प्रथा आहेत. जमिनीवर ठेवलेला नारळ ज्या दिशेला वळेल, तिथे पाणी लागेल, असा समज गावात रूढ आहे. जादू व्हावी तसा हा नारळ फिरताना जगतापांनी पाहिलंयसुद्धा, पण तिथे पाणी काही लागलं नव्हतं, अशी आठवण त्यांनी सांगितली. त्यांच्या सुदैवानं, १५ बोअर कार्यरत असल्यानं येत्या उन्हाळ्यात त्यांना पाण्याची काळजी नाही. तरीही, दोन महिने त्यांना टँकर मागवावाच लागणार आहे आणि त्यासाठी तब्बल १५ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. मग, इतर शेतकऱ्यांचं काय होणार, याची कल्पनाही न केलेली बरी!

बोअरमुळे शेतकरी कर्जबाजारी

पावसाची अवकृपा आणि सिंचन घोटाळा, या दुष्टचक्रात अडकलेले असंख्य शेतकरी बोअरवेलचा पर्याय निवडताना दिसतात. परंतु, हा पर्यायच त्यांना कर्जाच्या गर्तेत घेऊन जाणारा ठरतोय. कारण, मराठवाड्यात खडकाळ भूप्रदेश असल्यानं २०० फुटांच्या खाली पाणी लागणं शक्य नसल्याचं माजी केंद्रीय सचिव माधव चितळे यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांना ही बाब लक्षातच येत नाही. ते पाण्याच्या शोधात अधिक खोल खणत राहतात आणि या कामाचा खर्च लाखांच्या घरात जातो. त्यामुळे सिंचन प्रकल्पच या शेतकऱ्यांना तारू शकतो, असं जाणकारांचं स्पष्ट मत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएचआरचे प्रमोद रायसोनी संचालक मंडळासह कोठडीत

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, उस्मानाबाद

मुदतठेवीची रक्कम मुदत संपल्यानंतरही परत देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रमोद रायसोनी यांच्यासह संचालकाविरोधात उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी चेअरमन रायसोनीसह बारा संचालकांना उस्मानाबाद पोलिसांनी ताब्यात घेऊन गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

उस्मानाबाद येथील डॉ. पालकर यांनी बीएचआर मल्टिस्टेटच्या उस्मानाबाद शाखेत काही रक्कम मुदतठेव अंतर्गत ठेवली होती. मुदत ठेवीचा कालावधी संपल्यानंतर मल्टीस्टेटकडे वारंवार मागणी करूनही मुदत ठेवीचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे बीएचआरकडून फसवणूक होत असल्याची तक्रार डॉ. पालकर यांनी २० डिसेंबर २०१४ रोजी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात नोंदविली. या तक्रारीवरून बीएचआरच्या संचालक मंडळाविरुद्ध उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बीएचआरच्या उस्मानाबाद शाखेत अनेक ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. याबाबत काही मंडळींनी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात संयुक्तरीत्या २८ नोव्हेंबर २०१४ रोजी तक्रारी नोंदवली. मात्र, या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात पोलिस हेतुत: टाळाटाळ करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images