Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पालिका कारभाराचे वाभाडे निघाले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनी, प्रचंड खड्डे असलेले रस्ते, बीओटीवरील जागा, मोकळ्या जागा हडपणे, शहर बस वाहतुकीचा बोजवारा, विविध योजनांत झालेले गैरप्रकार अशा विविध मुद्यांना हात घालत विरोधी पक्षातील सदस्यांनी शुक्रवारी (१० एप्रिल) विधानपरिषदेत सरकारला धारेवर धरले. महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढले.

विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी औरंगाबादसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोबिंवली या महापालिका क्षेत्रांमध्ये विविध नागरी समस्यांसंदर्भात २५९ अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला होता. या चर्चेत आमदार अमरसिंह पंडित, आमदार सतीश चव्हाण यांनी सहभाग घेत औरंगाबाद महापालिकेत विविध कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. पंडित म्हणाले, 'तीनशे कोटींची समांतर जलवाहिनी योजना आज १,२०० कोटींची झाली आहे. २००६ पासून या योजनेवर काम सुरू आहे. मात्र, अद्यापही ही योजना पूर्ण झाली नाही. लोकांना पाणी देण्यापेक्षा या कामाचे कंत्राट कोणाला द्यायचे, त्यात किती वाटा मिळवायचा, इतकीच काळजी महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्यांनी घेतली आहे. या समांतर जलवाहिनीच्या योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे,' असे पंडित यांनी चर्चेत सांगितले.

'बीओटी व मोकळ्या जागा विकसित करण्याच्या नावाखाली बळकावून त्यातून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गिळंकृत करण्याचे काम महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले आहे. शहरबस वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. शहरात प्रचंड खड्डे असलेले रस्ते, दुरुस्तीच्या नावाखाली रस्त्यात अडथळे, अस्वच्छता, प्रचंड प्रदूषण, अतिक्रमणे असे शहराचे भयावह चित्र पाहण्यास मिळत आहे,' असे चित्र मांडत आमदार पंडित यांनी सरकारला धारेवर धरले.

चौकशीची मागणी

मेट्रो सिटीची स्वप्ने दाखवून महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्यांना चांगल्या पायाभूत सुविधा देखील देता आलेल्या नाहीत. महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आमदार अमरसिंह पंडित यांनी विधानपरिषदेत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलसंपदा कार्यालयात जप्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा देण्यास टाळाटाळ केल्याने जलसंपदा ‌कार्यालयातील फर्निचर कोर्टाच्या आदेशाने शुक्रवारी (१० एप्रिल) जप्त करण्यात आले. दुसरे अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. जलसंपदा विभागाच्या वतीने मुक्ताबाई घुले या महिलेची जमिन संपादित करण्यात आली होती. या जमिनीचा ८ लाख १ हजार ४८५ रुपयांचा मावेजा देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र, या आदेशाची जलसंपदा विभागाकडून पायमल्ली करण्यात आली. या प्रकरणी जलसंपदा ‌कार्यालयातील फर्निचर जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी जलसंपदा कार्यालयातील संगणक, खुर्च्या आदी साहित्य जप्त करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत बंडखोरी; शिवाजीनगरात चुरस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवाजीनगर वॉर्डाची लढत एकतर्फी होण्याची शक्यता अखेर फोल ठरली. विद्यमान नगरसेवक साईनाथ वेताळ यांनी माघार घेतली; मात्र माजी नगरसेवक विनोद सोनवणे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. या परिस्थितीत राजेंद्र जंजाळ (शिवसेना), विनोद सोनवणे (अपक्ष) आणि सीताराम कदम (राष्ट्रवादी काँग्रेस) अशी तिरंगी लढत रंगणार आहे.

शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांमुळे शिवाजीनगर वॉर्डाची लढत चुरशीची ठरणार आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजेंद्र जंजाळ यांच्यासाठी माजी नगरसेवक साईनाथ वेताळ यांनी माघार घेतली. वॉर्डातील १८ उमेदवारांपैकी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता दहा उमेदवारात निवडणूक रंगणार आहे. यात जंजाळ, विनोद सोनवणे आणि कदम तुल्यबळ उमेदवार मानले जात आहेत. वॉर्डाच्या नव्या रचनेनंतर होणारी पहिली निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. सेना नेत्यांच्या मध्यस्थीनंतर काही बंडखोरांनी माघार घेतली; मात्र बंडखोर उमेदवार सोनवणे यांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे जंजाळ आणि सोनवणे यांची लढत उत्कंठावर्धक ठरणार आहे.

'नोटा'साठी स्वतंत्र यंत्र

शिवाजीनगर-भारतनगर (११३) वॉर्डात सोळा उमेदवार रिंगणात आहेत. मतदान यंत्रावर १६ उमेदवारांची नावे टाकणे शक्य असते; मात्र या वॉर्डात 'नोटा'साठी स्वतंत्र मतदान यंत्र उपलब्ध करावे लागणार आहे. इतर वॉर्डात कमी उमेदवार असल्यामुळे एकाच यंत्राची आवश्यकता आहे. आता शिवाजीनगर-भारतनगर वॉर्डात केवळ 'नोटा'साठी स्वतंत्र यंत्र ठेवावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीतून अशोक चव्हाणांची माघार?

$
0
0

औरंगाबाद : पालिका निवडणुकीत काँग्रेसला पुनरूज्जीवीत करण्याची संधी होती. मात्र, उमेदवार निवडीपासून प्रचारप्रक्रियेच्या नियोजनापर्यंत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाठ फिरवली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर चव्हाण एकदाच औरंगाबादला आले. उमेदवारांच्या मुलाखती, निवडप्रक्रिया राबविण्यासाठी सचिन सावंत, विश्वजित कदम, नसीम खान यांच्यावर जबाबदारी टाकली. पार्लमेंटरी बोर्डाची मुंबईत बैठक झाली. तीत विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आघाडीसाठी संमती दर्शविली होती. पण स्थानिक नेत्यांनी, मुंबईच्या पुढाऱ्यांना हाताशी धरून अनेक वॉर्डात अक्षरशः तिकिटे वाटली. या कुठल्याही प्रक्रियेत अशोक चव्हाणांनी लक्ष न घातल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपात्र १४ उमेदवारांच्या याचिका फेटाळल्या

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज अवैध ठरलेल्या १४ उमेदवारांच्या याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुनील पी. देशमुख यांनी फेटाळल्या. संजय गाडेकर वॉर्ड क्रमांक ९४, नीता भालेराव वॉर्ड ३७, शेख सुलताना कय्युम ५८, दीपाली करोडे ८१, कैलास राऊत ८८, बाळासाहेब पुंडे ८८, प्रकाश नाडे ११३, छाया म्हस्के ९०, शीला मगरे ७४, प्रकाश प्रधान १४, भारत दाभाडे ८७, नितीन गायकवाड, कविता देशमुख ९१, अवतारसिंग रंधवा १४या चौदा उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळले. या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रावर सही केलेली नाही. शपथपत्राची नक्कल जोडली. गुन्हे विषयक रकान्यात निरंक लिहिले नाही. सूचक, अनुमोदकाची सही नाही अशा विविध कारणांमुळे या उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले. हे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची विनंती याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केली. ही विनंती कोर्टाने फेटाळली.

विचारलेल्या आवश्यक बाबी शपथपत्रात रिकामी ठेवता येत नाही. त्यावर आवश्यक नाही, निरंक असे लिहिणे बंधनकारक आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. स्वाक्षरी नसेल त्या कागदपत्राला शपथपत्र म्हणता येत नाही. शपथपत्रात असलेली अपूर्ण माहिती ही सुद्धा उमेदवारी अर्ज फेटाळण्याचे प्रमुख कारण आहे, असा युक्तिवाद निवडणूक आयोगाचे वकील एस. टी. शेळके यांनी केला. हा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला. याचिकाकर्त्यांची बाजू देवदत्त पालोदकर, रवींद्र गोरे , एन. के. चौधरी, अभय राठोड, पी. बी. पाटील, गौतम कर्ने यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेने दाबला निवडणुकीचा निधी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकांसाठी प्रशासन तब्बल चार कोटी रुपये खर्च करत असले तरी, निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आहोरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अन्न-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एन ११ येथील ताठे सभागृह या निवडणूक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पदरमोड करून चहा व जेवणाचा खर्च भागवावा लागत अाहे. त्यामुळे निवडणुकीसाठी असलेला निधी गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सिडको-हडको भागातील १२ वार्डांसाठी एन ११ येथील ताठे सभागृहामध्ये निवडणूक कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. अपुरा कर्मचारीवर्ग, अपुरे साहित्य, जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे येथे या केंद्रातील कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

ताठे सभागृहामध्ये गेल्या दहा-बारा दिवसांपासून निवडणुकीचे कार्यालय थाटले आहे. तेथे २२ कर्मचारी आहेत. यातील १२ कर्मचारी निवडणूक निर्णय अधिकारी अंजली धानोरकर यांनी त्यांच्या अधिकारात मागविले आहेत. या केंद्रावर महापालिकेने केवळ दोन कंम्प्युटर व एका प्रिंटरची व्यवस्था केली आहे. महापालिकेला सायंकाळी पाचपर्यंत शपथपत्र; तसेच विविध अहवाल पाठवावे लागतात. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दोन अन्य कंम्प्युटरची व्यवस्था करावी लागली.

खर्च जातो कुठे?

भत्ता, साहित्य, जेवणाचा; तसेच इतर खर्चासाठी नाक मुरडणाऱ्या महापालिकेचा निवडणुकीसाठीचा खर्च जातो कुठे, असा प्रश्न पडला आहे. राज्य निवडणुक आयोगाने निश्चित केलेल्या निकषांनुसार सर्व व्यवस्था केली आहे काय, असा प्रश्नही उपस्थित होतो.

अधिकाऱ्यांनी नाकारले जेवण

कार्यालय सुरू केल्यापासून महापालिकेने केवळ पाच ते सहा अधिकाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली, मात्र इतर कर्मचाऱ्यांच्या जेवणाची कोणतही व्यवस्था केलेली नाही. हे कर्मचारी आपापल्या घरून जेवणाचे डबे घेऊन येत असल्याने अधिकाऱ्यांनीही महापालिकेचे जेवण घेणे नाकारले. कर्मचारी सकाळी डबा घेऊन येतात, मात्र जेवणाची वेळ निश्चित नसल्यामुळे दुपारपर्यंत डब्यातील अन्न खराब होते. यामुळे कर्मचाऱ्यांना उपाशीपोटी राहावे लागले. काही वेळा वर्गणी करून जेवण, चहापानाची व्यवस्था करण्यात आली. १२ दिवसांपासून सुरु केलेल्या या कार्यालयात आतापर्यंत पाण्याचे केवळ चार जार पुरविण्यात आले आहेत. अधिकारी, कर्मचारी पाणीही घरूनच सोबत आणत आहेत.

निवडणुकीच्या कामाला असलेले सर्व कर्मचारी सकाळी आठपासून रात्री उशिरापर्यंत कामे करतात, मात्र त्यांच्या साध्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली नाही. या अव्यवस्थेबद्दल मला खेद आहे. निवडणूक कार्यालयात पाणी, कंम्प्युटर, साहित्य यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी कळविण्यात आले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. या अव्यवस्थेसंदर्भात निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार केली आहे.

- अंजली धानोरकर, निवडणूक निर्णय अधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपायुक्त, प्रकल्प अधिकाऱ्याला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या सुवर्णजयंती रोजगार योजनेत अपहार झाल्याची तक्रार आयुक्त प्रकाश महाजन यांनी दिल्यानंतर शुक्रवारी दुपारी सिटी चौक पोलिसांनी उपायुक्त डॉ. आशिष पवार व प्रकल्प अधिकारी प्रमोद खोब्रागडे यांना अटक केली. कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध नसलेल्या ट्रेडसाठी लाभार्थी देऊन त्यांच्या नावचे १ कोटी ७० लाख ८८४ रुपये उचलण्याचा प्रयत्न असल्याचे लक्षात आल्याने आयुक्तांनी पोलिसात तक्रार दिली होती.

महापालिकेच्या प्रकल्प विभागांमार्फत सुवर्णजयंती रोजगार योजना राबविली जाते. या योजनेतून सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात २१८४ बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे टार्गेट प्रकल्प विभागाला देण्यात आले होते. त्यापैकी ११४५ लाभार्थींची यादी प्रकल्प विभागातर्फे तयार करण्यात आली. ही यादी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटला देण्यात आली. फॅशन डिझाइन, प्लंबर आणि हेअर ड्रेसर या तीन ट्रेडसाठी ही यादी देण्यात आली होती. त्यांचे शु्ल्क म्हणून १ कोटी ७० लाख ८८४ रुपयांचे बिल तयार करण्यात आले आणि फाइल मंजुरीसाठी उपायुक्त आशिष पवार आणि प्रकल्प अधिकारी प्रमोद खोब्रागडे यांनी सादर केली. संबंधित ट्रेड कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये नाहीत, असे आयुक्त प्रकाश महाजन यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अस्थापना अधिकारी अय्युब खान यांच्या माध्यमातून गुरुवारी रात्री सिटी चौक पोलिस ठाण्यात डॉ. पवार आणि खोब्रागडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोनपेक्षा जास्त अपत्ये; उमेदवारी रद्द करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

कैसर कॉलनी (४५) वॉर्डातील 'एमआयएम'चे उमेदवार शाहेदा खातून शहानवाझ खान यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेत निवडणूक अधिकारी नारायण उबाळे, महापालिका व शाहेदा खातून यांना नोटीस बजावण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुनील पी. देशमुख यांनी दिले आहेत.

कैसर कॉलनीतून 'एमआयएम'च्या उमेदवार शाहेदा खातून यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाला याचिकाकर्ते खातिजा कुरेशी छोटू कुरेशी यांनी आक्षेप घेतला. शाहेदा खातून यांना १३ सप्टेंबर २००० नंतर दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत. त्याआधी त्यांना २ अपत्ये होती. आक्षेप घेतांना पुरावे जोडण्यात आली, पण निवडणूक निर्णय अधिकारी उबाळे यांनी शाहेदा खातून यांची उमेदवारी अर्ज वैध ठरविला. या निर्णयाला खातिजा यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. कायद्यानुसार १३ सप्टेंबर २००० नंतर दोन पेक्षा जास्त अपत्य असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढविता येत नाही. तरीही शाहेदा खातून यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शाहेदा यांना अफामखान व झैद खान ही दोन मुले अनुक्रमे १६ मे २००४ व १ ऑक्टोबर २००७ रोजी जन्मले. याचा पुरावा म्हणून या दोन मुलांची शालेय कागदपत्रे याचिकेसोबत जोडली आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या खातून यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. प्रतिवादी निवडणूक अधिकारी, शाहेदा खातून व महापालिका यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैठणला कैद्यांचे उपोषण!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

चौदा वर्षांची शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांची तुरुंगातून सुटका करावी या मागणीसाठी पैठण येथील खुल्या कारागृहातील सर्व कैद्यांनी शुक्रवारपासून (१० एप्रिल) उपोषणाला सुरुवात केली आहे. या कारागृहातील २१ कैदी शिक्षा समाप्तीनंतर सुटकेच्या आदेशाची वाट पाहत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानंतर ९ जुलै २०१४ नंतर सुटका होणाऱ्या कैद्याच्या सुटकेला स्थगिती देण्यात आली आहे. परिणामी, शिक्षा समाप्तीनंतर अनेक कैदी आपल्या सुटकेची वाट पाहत आहे. सध्या पैठण येथील खुल्या जिल्हा कारागृहात जवळपास ४१४ कैदी आपल्या शिक्षेच्या शेवटच्या वर्षात आहेत. कारागृहातील २१ कैद्यांनी चौदा वर्षाची शिक्षा पूर्ण केलेली आहे. दहा महिने उलटूनही त्यांची सुटका झालेली नाही.

शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही सुटका न झालेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी येथील जवळपास सर्वच कैद्यांनी शुक्रवारी उपोषणाला सुरुवात केली आहे. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर दहा महिने उलटूनही त्यांची सुटका न झाल्याने भविष्यात स्वतःवरही हीच पाळी येऊ नये यासाठी उपोषण करीत असल्याचे कैद्यांनी सांगितले. या २१ कैद्यांची त्वरित सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

उपोषण करणाऱ्या कैद्यांसोबत चर्चा केली आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे कैद्यांची सुटका झालेली नाही. शासन याबद्दल लवकरच निर्णय करणार असल्याचे त्यांना सांगितले. उपोषण सोडण्याची विनंती केली आहे.

- राजकुमार साळी, कारागृह अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एम.ए.ला जुन्या प्रश्नपत्रिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यापीठाच्या परीक्षेत रोज एक नवीन गोंधळाचा प्रकार घडतो आहे. शुक्रवारी (१० एप्रिल) एम. ए. इंग्रजीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमांचा पेपर देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी भांबावले. त्यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने नवीन अभ्यासक्रमाचा पेपर पाठवून दिला. मात्र, यात विद्यार्थ्यांना तासभर ताटकळावे लागले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेत प्रशासनाच्या गोंधळाची मालिका सुरूच आहे. बी. कॉम. अभ्याक्रमाची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या एक दिवस आधी विद्यार्थ्यांकडे होती. यानंतर विद्यापीठाला प्रश्नपत्रिका बदलून परीक्षा घेण्याची वेळ आली. हा प्रकार गुरुवारी होत नाही तोच शुक्रवारी डॉ. रफीक झकेरिया कला, वाणिज्य व विज्ञान महिला कॉलेजमध्ये गोंधळ झाला. एम. ए. बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र असलेल्या या केंद्रावर इंग्रजी प्रथम वर्षाचा 'इंग्लिश लिटरेचर'‌चा पेपर सकाळी ९ ते ११च्या दरम्यान होता. यावेळी विद्यार्थ्यांना जुन्याच अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. परीक्षार्थींनी तात्काळ ही बाब केंद्रप्रमुखांना सांगितली. यानंतर परीक्षा विभागाला कळविण्यात आले. परीक्षा विभागाने नवीन अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका पाठवून दिल्या. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेर येत विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला. विद्यार्थ्यांचा रोष पाहता पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु विद्यार्थ्यांनी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करत पेपर दिला नाही. दुपारी आमचा पेपर असल्याने वेळ वाढवून दिला तरी आम्ही पेपर देणार नाही. अशी भूमिका काही विद्यार्थ्यांनी घेतली. यातल्या काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आता हा पेपर परत घेण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. या पेपरला परीक्षा केंद्रावर १२० ‌पेक्षा अधिक विद्यार्थी होते.

कुलगुरू दौऱ्यात मग्न

विद्यापीठात परीक्षा सुरू आहेत, तर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हे दौऱ्यावर गेले आहेत. परीक्षेतील गैरप्रकारांबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे विद्यार्थ्यांनी तक्रार केली, पण असे प्रकार घडले नाहीत, असा दावा करण्यात येत आहे. कुलगुरूच जागेवर नसल्यामुळे दाद मागणार कुणाकडे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारी मागे घेण्यासाठी डावपेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उभे असलेल्या उमेदवारांची मनधरणी करून त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राजकीय पक्षांनी विविध डावपेच आखले होते. हात जोडण्यापासून हात उगारण्यापर्यंत सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. त्याचे सूत्रधार असलेले दिग्गज नेते पडद्यामागून हालचाली करीत होते.

गांधीनगर - खोकडपुरा वॉर्ड क्रमांक ५४ सर्वात जास्त म्हणजे ३२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १५ जणांनी अर्ज मागे घेतले. आता या वॉर्डातून निवडणूक रिंगणात १७ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. एका 'ईव्हीएम'वर पंधरा उमेदवारांची नावे घेता येतात. या वॉर्डात १७ उमेदवार राहिल्यामुळे प्रशासनाला दोन जास्तीच्या उमेदवारासाठी एक जास्तीची 'ई्व्हीएम' लावावी लागणार आहे. या वॉर्डातून भाजपतर्फे उमेदवारी मिळालेले रामेश्वर भादवे यांनी स्वतःला पूरक ठरतील अशा सुमारे आठ जणांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. नम्रपणे बोलून आणि हातजोडून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले. ते स्वतः यासाठी धावपळ करताना दिसून येत होते. अजबनगर - खोकडपुरा वॉर्डातून १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ११ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. या वॉर्डातून शिवसेनेने आशा भालेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात कमीत कमी उमेदवार असावेत यासाठी राजेंद्र दानवे यांनी फिल्डिंग लावली होती. आठ ते दहा उमेदवारांना त्यांनी एकत्र जमा केले होते. सर्वांना एकत्र निवडणूक कार्यालयात आणून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी दानवे आणि त्यांचे कार्यकर्ते धावपळ करीत होते, पण त्यांना त्यात यश आले नाही. फक्त तीन जणांनीच उमेदवारी अर्ज मागे घेतले.

समर्थनगर वॉर्डातून खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषिकेश खैरे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासह एकूण १५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी जास्तीतजास्त उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी खैरे यांच्या गोटातून टोकाचे प्रयत्न करण्यात आले. खैरे यांच्या कार्यालयातील काही कर्मचारी आणि युवा सेनेचे पदाधिकारी या कामाला जुंपले होते, पण या वॉर्डातून संकेत प्रधान या एकमेव उमेदवाराने माघार घेतली.

क्रांतिचौक वॉर्डातून तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेच्या शिल्पाराणी वाडकर यांनी या वॉर्डातून अधिकृतपणे अर्ज भरला होता, त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या नगरसेविका सुनीता सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची जबाबदारी राजेंद्र दानवे यांच्यावर पक्षाने टाकली होती. दुपारी अडीचच्या सुमारास सुनीता सोनवणे यांना सोबत घेऊन दानवे निवडणूक कार्यालयात आले व त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. रोहिणी महाजन या काँग्रेस पुरस्कृत उमेदवारानेही अर्ज मागे घ्यावा यासाठी शिवसेनेतर्फे प्रयत्न सुरू होते, पण शेवटपर्यंत महाजन किंवा त्यांच्या सूचक - अनुमोदकांची शिवसेना कार्यकर्त्यांची भेट होऊ शकली नाही. समतानगर - कोटलाकॉलनी वॉर्डातून भाजपचे प्रदेश चिटणीस व माजी महापौर डॉ. भागवत कराड यांच्या पत्नी डॉ. अंजली कराड यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात डॉ. कराड यांचे कट्टर समर्थक कचरू घोडके यांनी पत्नी राधा घोडके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नाही, अशी टोकाची भूमिका घोडके यांनी घेतली होती. स्वतः डॉ. कराड यांनी घोडके यांची मनधरणी केली, त्यानंतर डॉ. अंजली कराड घोडके यांना घेऊन निवडणूक कार्यालयात आल्या आणि त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यात भाग पाडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती कागदावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भारतीय जनता पक्षाने केलेली युती कागदावरच राहिल्याचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. नेत्यांच्या आशीर्वादाने अनेक छुपे उमेदवार निवडणूक रिंगणात अपक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन उतरले आहेत. काही वॉर्डांमधून शिवसेना - भाजप आमनेसामने असून, काही ठिकाणी स्वकीयांनीच बंडाचे निशाण फडकावून निवडणुकीत रंगत आणली आहे. एकुण ११३ वॉर्डांमधून ५२६ उमेदवारांनी माघार घेतली. ९२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात अाहेत.

आश्वासनांची खैरात, पुढची पदे, श्रेष्ठींना सांगून राजकीय पुनर्वसनाचा शब्द घेत अनेकांनी निवडणुकीतून माघार घेतली, पण अनेक महत्त्वाच्या वॉर्डांमधून बंडखोरी झाल्याने युतीचे संकट वाढले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गुलमंडीतून शिवसेनेचे सचिन खैरे यांच्याविरोधात शिवसेना बंडखोर राजेश (पप्पू) व्यास आणि भाजपचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. पद्मपुरा वॉर्डातून शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक गजानन बारवाल यांनी बंडखोरी करत पक्षासमोर आव्हान उभे केले आहे. उल्कानगरीतून भाजपच्या दिलीप थोरात यांना शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक सुशील खेडकर, महापौर कला ओझा यांच्यासमोर भाजपच्या संगीता रत्नपारखी यांनी आव्हान उभे केले आहे. शिवाजीनगरमधून शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांच्याविरोधात शिवसेनेचे विनोद सोनवणे, भारतनगरमधून शिवसेनेचे दिग्विजय शेरखाने यांच्याविरुद्ध भाजप बंडखोर जालिंदर शेंडगे रिंगणात आहेत. सुराणानगरातून भाजपच्या राखी देसरडा यांच्याविरुद्ध शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रफुल्ल मालानी यांच्या पत्नी किरण मालानी यांनी बंडखोरी केली आहे. विद्यानगरातून शिवसेनेच्या रेणुकादास वैद्य यांच्यासमोर भाजप बंडखोर मंगलमूर्ती शास्त्री, सिडको एन -तीनमधून भाजप बंडखोर संगीता शिरसे तर पुंडलिकनगर वॉर्डातून शिवसेनेच्या उमेदवारासमोर भाजप बंडखोर सरला दामले यांनी आव्हान उभे केले आहे.

भडकलगेटमधून भाजपचे विनोद जाधव यांच्यासमोर रिपाइंचे प्रशांत शेगावकर यांनी, अाविष्कार कॉलनीतून शिवसेनेच्या सोपान बांगर यांच्यासमोर भाजपचे मयूर वंजारी, संभाजी कॉलनीतून शिवसेनेच्या शीतल गादगे यांच्यासमोर शिवसेनेच्या माजी महापौर विमल राजपूत, एमआयडीसी चिकलठाणा वॉर्डातून भाजपच्या राजू शिंदे यांच्याविरोधात भाजपचे आमदार नारायण कुचे यांचे बंधू किशोर कुचे, गणेशनगर वॉर्डातून शिवसेनेच्या मकरंद कुलकर्णी यांच्याविरोधात शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक प्राजक्ता भाले यांचे पती मंगेश यांनी आव्हान उभे केले आहे. पवननगरमधून भाजपच्या नितीन चित्ते यांच्याविरोधात शिवसेना बंडखोर नारायण आघाव, भाजप बंडखोर सतीश जाधव, मयूरनगरमधून शिवसेनेच्या वंदना इधाटे यांच्यासमोर शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक किशोर नागरे यांच्या पत्नी स्वाती व भाजप बंडखोर संगीता ताठे यांचे आव्हान असणार आहे.

चर्चा करून निर्णय

बंडखोरांवर कारवाई करावीच लागेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करू. त्यांनी न ऐकल्यास कारवाई करावीच लागेल, युती असल्यामुळे भाजपने देखील बंडखोरांवर कारवाई केली पाहिजे.

- विनोद घोसाळकर, शिवसेना

अधिकृत उमेदवाराविरुद्ध उभे राहिलेल्यांवर कारवाई करावीच लागेल. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. बंडखोरी ही गंभीर बाब आहे. भाजपने ती गांभीर्याने घेतली आहे. शिवसेनेनेही बंडखोरीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई केली पाहिजे.

- शिरीष बोराळकर, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-भाजप समोरासमोर

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद

शिवसेना-भाजपने युती केलेली असली तरी उभय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांपुढे बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. अनेक वॉर्डांत शिवसेना उमेदवारांपुढे भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, तर अनेक ठिकाणी भाजपच्या उमेदवारांपुढे शिवसेनेचे दिग्गज कार्यकर्ते षड्डू ठोकून उभे आहेत. यात प्रामुख्याने गुलमंडी, खडकेश्वर, उल्कानगरी, जवाहर कॉलनी, सिडको गणेशनगर, चिकलठाणा अशा अनेक वॉर्डांचा समावेश आहे.

गुलमंडी (क्रमांक ४८) वॉर्डातून खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात माजी आमदार व सध्या भाजपमध्ये असलेले किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांनी तसेच शिवसेनेचे जुने कार्यकर्ते पप्पू व्यास यांनी उमेदवारी कायम ठेवून आव्हान उभे केले आहे. जैस्वाल गटातून व्यास यांच्यासाठी तिकिटाची मागणी करण्यात आली होती, पण त्यांना तिकीट नाकारण्यात आले.

खडकेश्वर वॉर्डात भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले गौतम खरात यांचे पुत्र कुणाल खरात यांनी शिवसेनेच्या सुगंधीकुमार गढवे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. सिडकोतील गणेशनगर वॉर्ड (४०) हा पारंपरिक शिवसेनेचा गड मानला जातो. शिवसेनेने मकरंद कुलकर्णी यांना येथून उमेदवारी दिलेली असली, तरी शिवसेनेच्याच विद्यमान नगरसेविका प्राजक्ता भाले यांचे पती मंगेश भाले यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. भाले हे खासदार चंद्रकांत खैरे गटाचे असून त्यांचा पत्ता कट करून जैस्वाल गटाचे कुलकर्णी यांना पक्षाने तिकीट दिले आहे.

एमआयडीसी चिकलठाणा वॉर्डातून (३८) भाजपने विद्यमान नगरसेवक राजू शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचेच आमदार नारायण कुचे यांचे बंधू किशोर कुचे हे अपक्ष म्हणून उभे आहेत. आमदार कुचे हे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निकटचे मानले जातात. राजू शिंदे हे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या गटातील सर्वात विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

गुलमोहर कॉलनी वॉर्डातून (६४) भाजपचे अधिकृत उमेदवार शिवाजी दांडगे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे सुधीर लुंगारे यांनी दंड थोपटले आहेत. दांडगे हे आमदार अतुल सावे गटाचे, तर लुंगारे हे महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल गटाचे मानले जातात. राष्ट्रवादीचे अशोक वीरकर यांनीही बंडाचा झेंडा फडकावला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निकटचे संजीव खर्डीकर यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. खैरे गटाचे सुधीर भाले यांनीही आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.

आविष्कार कॉलनी वॉर्डात (६३) शिवसेनेने सोपान बांगर यांना उमेदवारी दिलेली आहे. बांगर हे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे समर्थक मानले जातात. त्यांच्या विरोधात शिवसेनेचेच कृष्णा माडगुळकर आणि भाजप युवा मोर्चाचे मयूर वंजारी यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. माडगुळकर हे खैरे गटाचे, तर वंजारी हे मुंडे गटाचे मानले जातात.

स्वामी विवेकानंद नगर (२८) वॉर्डातून शिवसेनेच्या सीमा खरात या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या मनीषा कांबळे तर भाजपच्या मीना कांबळे, निर्मला गवई यांनी बंड केले आहे. मनीषा कांबळे यांचे पती आनंद कांबळे हे नगरसेवक मोहन मेघावाले यांच्या निकटचे आहेत.

दक्षिण औरंगाबादमधील बहुतांश वॉर्डात युतीतील बंडखोरी शुक्रवारी स्पष्ट झाली. उत्तमनगर (७५) वॉर्डात नगरसेवक त्र्यंबक तुपे यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली असून त्यांच्या विरोधात सेनेचे जगन्नाथ कोऱ्हाळे हे उभे आहेत. बाळकृष्णनगर (९५) वॉर्डातून महापौर कला ओझा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत, पण त्यांच्या विरोधात आमदार सावे गटाच्या संगीता रत्नपारखी यांनी बंड केले आहे.

शिवनेरी कॉलनी वॉर्डातून (३१) शिवसेनेने ज्योती पिंजरकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपच्या सोनाली सातदिवे यांनी बंडखोरी केली आहे. सातदिवे यांना माजी आमदार तनवाणी यांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. पिंजरकर या खैरे गटाच्या मानल्या जातात. याच वॉर्डातील शारदा पद्मणे या सेनेच्या जुन्या कार्यकर्तीला तिकीट नाकारल्यामुळे त्यांनीही रिंगणात उडी घेतली आहे.

पदमपुरा (वॉर्ड क्र.७०) मधून शिवसेनेचे गजानन बारवाल यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेने या वॉर्डातून संजय बारवाल यांना उमेदवारी दिली आहे. २०१० मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत संजय बारवाल शहर प्रगती आघाडीतर्फे शिवसेनेचे गजानन बारवाल यांच्या विरोधात उभे होते.

गजानन बारवाल यांनी त्यावेळी त्यांचा पराभव केला होता. आता संजय बारवाल यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेचे महानगरप्रमु्ख प्रदीप जैस्वाल यांनी आग्रह धरला होता. गजानन बारवाल संजय शिरसाट गटाचे म्हणून ओळखले जातात. महापालिकेत ते शिवसेना - भाजप गटाचे गटनेते होते. गटनेत्यानेच आता अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली आहे.

ठाकरेनगर एन-२ (वॉर्ड क्र.८१) कॉंग्रेसमधून भाजपमध्ये नुकताच प्रवेश माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे यांच्या पत्नी सत्यभामा शिंदे या अपक्ष म्हणून उभ्या आहेत. त्यांचे पती दामूअण्णा शिंदे यांना भाजपने उमेदवारी नाकारली. यामुळे त्यांनी या वॉर्डात पत्नीला उभे केले. या कामी भाजपच्या व काँग्रेसच्याही काही नेत्यांनी नाराज दामूअण्णांना सल्ला दिल्याची चर्चा आहे. या वॉर्डातून भाजपने मीराताई चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.

चिकलठाणा (वॉर्ड क्र. ८९) हा वॉर्ड भाजपला सुटला आहे. ज्योती सुनील नाडे यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे, पण भाजपच्याच स्वाती हरिभाऊ लहाने यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि तो कायम ठेवला आहे.

शिवाजीनगर

शिवाजीनगर वॉर्डातून (११२) जैस्वाल गटाचे राजेंद्र जंजाळ यांना शिवसेनेने तिकीट दिले आहे. त्यांच्याविरुद्ध सेनेचे कार्यकर्ते विनोद सोनवणे यांनी दंड थोपटले आहेत. भारतनगर-शिवाजीनगर (११३) वॉर्डातून दिग्विजय शेरखाने हे शिवसेनेच्या तिकिटावर उभे आहेत. त्यांना आमदार नारायण कुचे गटाचे जालिंदर शेंडगे यांनी आव्हान दिले आहे.

सिडको एन-६

सिडको एन-६ वॉर्डातून (६२) शिवसेनेच्या शीतल गादगे यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या माजी महापौर विमल राजपूत यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. गादगे यांचे पती वीरभद्र गादगे हे खैरे गटाच्या निकटचे आहेत. याच वॉर्डातून एकदा निवडून आल्यामुळे विमल राजपूत यांनी पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. भाजपच्या मीना खरात यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे.

गारखेडा

गारखेडा वॉर्डातून (९६) भाजपच्या उमेदवार विमल केंद्रे यांना जैस्वाल गटाच्या सुनंदा पाटील यांनी बंडखोरी करून आव्हान दिले आहे. उल्कानगरी वॉर्डात दिलीप थोरात हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात आमदार संजय शिरसाट गटाचे मावळते नगरसेवक सुशील खेडकर यांनी बंडखोरी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी पाठ सोडेना

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद

अवकाळी पाऊस राज्याची पाठ काही सोडताना दिसत नाही. अवकाळी पावसाच्या तडाख्याने शनिवारी मराठवाड्यासह नाशिक, कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अहदमदनगर औरंगाबाद, नांदेड, जालना व बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यात वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर झाड पडल्याने १२ जण जखमी झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्याने झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जालना जिल्ह्यात मोठया प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून पाऊस होत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

बीडमध्ये वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर, जालन्यात भोकरदन, जाफराबाद तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीने थैमान घातले. सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. नांदेड जिल्ह्याला सलग चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या पावसाने रब्बी पिकासह जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले आहे. तर एका महिलेचा वीज पडल्याने मृत्यू झाला.

उस्मानाबाद- उस्माना‌बाद जिल्ह्यातील काही भागात शनिवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. भूम, परंडा तालुक्यातील काही भागात वाळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यासोबतच तुळजापूर तालुक्यातील इटकळ परिसरात पाऊस झाला. यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिल्लोड तालुक्यात शनिवारी दुपारी तीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तालुक्यातील बऱ्याच गावात गारपीट झाली.

नाशिक जिल्ह्यालाही शनिवारी पावसाने झोडपले. येवला, मालेगाव, सिन्नर, नांदगावसह जिल्ह्यातील इतर भागात अवकाळी पावसाने जोरदार वादळी वाऱ्यांसह १० ते १५ मिनिटे तडाखा दिला. मालेगाव तालुक्यात दुपारी अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. कोल्हापूर, सांगली, कराड शहरासह पाटण तालुक्याला शनिवारी दुपारी वादळी वारा, व‌िजेच्या कडकडाटासह गारपीठ व अवकाळी पावसाने झोडपून काढले.

मराठवाड्याला पावसाचा तडाखा

अवकाळी पावसाच्या तडाख्याने मराठवाड्यात मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. औरंगाबाद, नांदेड, जालना व बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यात वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर झाड पडल्याने १२ जण जखमी झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्याने झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

वीज पडल्याने एकाचा मृत्यू

बीड जिल्ह्यात शनिवारी दुपारी सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला. जिल्ह्यातील बहुतेक भागात शनिवारी दुपारी तासभराहून अधिक काळ दमदार पाऊस झाला. चिंचोटी (ता. वडवणी) येथील श्रीराम सोपानपाटणकर (वय ५०) या शेतकऱ्याचा वीज पडल्याने मृत्यू झाला. या पावसाने बीड वडवणी कुप्पा परिसरात रस्त्यावर मोठे झाड पडल्याने बीड-परळी मार्ग बंद झाला होता. हे झाड बाजूला करून रास्ता सुरळीत करण्याचे काम सुरू होते. झाड पडल्याने १२ जण जखमी झाल्याची घटना हिवारसिंग येथे घडली. गावातील मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू होता. त्यावेळी जेवायला बसलेल्या नागरिकाच्या अंगावर झाड पडल्याने भिंत कोसळल्याने १२ जण जखमी झाले.

नांदेडमध्ये वादळी पाऊस

नांदेड जिल्ह्याला सलग चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसला. शनिवारी सायंकाळी विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे शहरातील वीजपुरवठा काही काळ खंडीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात ९६ मिली मीटर पाऊस झाला आहे.

लातूरमध्ये हजेरी

लातूर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. लातूरात १५ मिनिटेच जोरदार पाउस झाला. अहमदपूर आणि चाकुर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाउस झाला. रेणापूरात ही पाउस सुरु असल्याचे सांगण्यात आले.

उस्मानाबादमध्ये रिमझिम

उस्माना‌बाद जिल्ह्यातील काही भागात शनिवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. भूम, परंडा तालुक्यातील काही भागात वाळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यासोबतच तुळजापूर तालुक्यातील इटकळ परिसरात पाऊस झाला.

झाड उन्मळून पडले

अवकाळी पावसाने शनिवारी दुपारी हजेरी लावली. विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे आंब्याची व काही प्रमाणात कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. तालूक्यातील गणोरी, बाबरा, वडोदबाजार परीसरात सर्वञ पाऊस झाला. औरंगाबाद-जळगाव महामार्गावर आळंद परीसरात झाड उन्मळून पडले होते.

वैजापूरकरांना दिलासा

वैजापूर शहर व परिसरात शनिवारी दुपारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उन्हाच्या चटक्यापासून नागरिकांची सुटका झाली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरात पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास हा पाऊस सुरु होता. त्यामुळे तापमानात घट होऊन उन्हाच्या काहिलीपासुन नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

सिल्लोडमध्ये गारपीट

सिल्लोड तालुक्यात शनिवारी दुपारी तीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तालुक्यातील बऱ्याच गावात गारपीट झाली. या पावसाने शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने कांदा बियाणे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. वडाळा येथे जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्र तपासणी संकटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मतदान केंद्रांची तपासणी करण्याची जबाबदारी झोनल ऑफिसर्सवर सोपविली आहे, मात्र मतदानाच्या एक दिवस आधी त्यांना गाड्या मिळणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांची तपासणी कशी करावी, असा प्रश्न या अधिकाऱ्यांना पडला आहे.

२२ एप्रिल रोजी पहाटेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. सर्व मतदान पथके २१ रोजी रात्री मुक्कामाला मतदान केंद्रावर जाणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये महापालिकेने २१ रोजी वाहने दिली तर अधिकाऱ्यांना मतदान केंद्र तपासता येणार नाही. एखाद्या केंद्रामध्ये त्रुटी आढळल्या तर त्या दूर करता येणार नाहीत.

केंद्रांवर मतदान प्रक्रियेसाठी किमान आवश्यक व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर आहे. १ एप्रिल रोजी निवडणुक आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीमध्ये निवडणूक आयुक्तांनीही सुस्थितीत नसलेली मतदान केंद्र महापालिकेने तत्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले होते, मात्र आता महापालिकेने क्षेत्रिय अधिकाऱ्यांना २१ एप्रिल रोजी वाहन देण्यात येणार असल्याचे सांगितल्याने हे अधिकारी मतदान केंद्रांची पाहाणी कशी करणार, असा प्रश्न आहे.

महापालिका निवडणूक तोंडावर आली असली तरी, महापालिका आपल्या चुका दुरुस्त करण्यास तयार नाही. महापालिका उपायुक्तांनी घेतलेल्या बैठकीमध्ये प्रत्येक निवडणूक कार्यालयांमधील झोनल ऑफिसर्सना गाड्या पुरवणार असल्याचे निश्चित झाले होते, मात्र महापालिका प्रशासनाने मतदानाच्या एक दिवस आगोदर गाड्या देणार असल्यामुळे हे मतदान केंद्र व्यवस्थित आहेत की नाहीत, हे कळणे अवघड आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी (क्रमांक १) महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहेत. या प्रकारामुळे निवडणुकीच्या कामातील महापालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

...तर जबाबदरी कुणाची?

गेल्या काही दिवसांपासून शहरात अवकाळी पावसाचा जोर आहे. अनेक मतदान केंद्रे गळकी असल्यामुळे येथे ईव्हीएम मशीन; तसेच मतदान साहित्य खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मुदतीमध्ये मतदान होऊ शकले नाही तर याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपूर्ण कामे ठरणार त्रासदायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या विविध वॉर्डांमध्ये अपूर्ण राहिलेली कामे महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांसाठी त्रासदायक ठरणार आहेत. रस्ते, पाणीपुरवठा आणि पथदिवे यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रचाराचा जोर चढल्यावर ते उमेदवारांना जाब विचारण्याच्या मनःस्थितीत आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिलेल्या बहुतेक उमेदवारांनी आजपासून प्रचाराचा प्रारंभ केला. येत्या दोन - तीन दिवसांत सगळेच उमेदवार प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसणार आहे. या उमेदवारांना शहरातील विविध अपूर्ण कामांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेत 'सक्रिय' राहिलेल्या नगरसेवकांनी आपल्या वॉर्डात रस्ते, वीज, पाणी यांसारख्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत, परंतु अनेक वॉर्डांमध्ये या सुविधांचा अभाव आहे. शहरातील मुख्य रस्त्यांची दुरावस्था तर आहेच, पण त्याबरोबर वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांची अवस्थाही नागरिकांच्या मनात चीड निर्माण करणारी ठरू लागली आहे. त्यामुळे मत मागत रस्त्यावरून फिरणाऱ्या उमेदवारांना नागरिक रस्त्यांच्या प्रश्नावरून भांडावून सोडण्याची शक्यता आहे. महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना नागरिकांच्या

प्रश्नांना सामोरे जावे लागेल, असे बोलले जात आहे.

रस्त्यांबरोबच पाण्याचा प्रश्नही नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. शहराची पाणीपुरवठा व्यवस्था महापालिकेने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे हस्तांतरित केल्यापासून पाणीपुरवठ्याबद्दल अनंत अडचणी निर्माण झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. कमी वेळ होणारा पाणीपुरवठा, अवेळी येणारे पाणी यामुळे नागरिकांचे वेळापत्रकच बिघडले आहे. शहरातील दिवाबत्तीची व्यवस्था फारच सुमार दर्जाची आहे. बहुतेक पथदिवे बंद असल्यामुळे मुख्य आणि वॉर्डांतर्गत असलेले रस्ते काळोखात बुडाले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेने एलईडी लाइटचा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रकल्प न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे बंद पथदिवे बंदच असल्याचे चित्र आहे. नागरिकांसाठी असलेल्या प्रमुख समस्या अधिकच गंभीर होत असल्यामुळे या समस्यांबद्दल नागरिकांना काय आश्वासन द्यायचे, असा प्रश्न येत्या काळात उमेदवारांना भेडसावेल असे मानले जात आहे.

रस्ते रखडले

महापालिकेने फार मोठा गाजावाजा करून सुरू केलेले व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यांचे काम रखडले आहे. १४ रस्त्यांचे काम ९ महिन्यात पूर्ण करण्याची महापालिकेची योजना होती, परंतु दोन वर्षांनंतरही या रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होऊ लागली आहे. नागरिकांसाठी हा प्रकार डोकेदुखीचा ठरू लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचारासाठी ओवेसी बंधू तळ ठोकून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी एमआयएमने तयारी सुरू केली आहे. पक्षाचे नेते ओवेसी बंधुंच्या तीन ते चार सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेवटचे सहा दिवस ओवेसी बंधू औरंगाबादेत तळ ठोकून राहणार असल्याची म‌ाहिती एमआयएमच्या सूत्रांनी दिली.

महापालिकेच्या निवडणुकीत मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन पक्षाने ५३ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी खासदार असदुद्दिन ओवेसी आणि आमदार अकबरुद्दिन ओवेसी यांच्या दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. १४ एप्रिलपासून ओवेसी बंधू औरंगाबादेत येणार अाहेत. खासदार असदुद्दिन ओवेसी शहरात चार दिवस राहणार असून, आमदार अकबरुद्दिन ओवेसी दोन दिवस शहरात असतील. ओवेसी बंधूच्या सभांचे नियोजन करण्यात येणार आहे.



औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारासाठी पक्षप्रमुख खासदार ओवेसी येणार आहे. आमदार अकबरुद्दिन ओवेसी हे ही येतील. याबाबत शंका नाही. सध्या प्रचाराचे नियोजन सुरू आहे.- सय्यद इम्तियाज जलील, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकच महिला उमेदवार ९ वॉर्डांत!

$
0
0

आशिष चौधरी, औरंगाबाद

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपण एक उमेदवार दोन मतदारसंघात निवडणूक लढवित असल्याचे पाहिले आहे, मात्र तब्बल नऊ वॉर्डांत उभे राहण्याचा नवा विक्रम औरंगाबाद शहरातील महिला अपक्ष उमेदवार सईमु‌न्निसा पठाण यांनी केला आहे. ९ वॉर्डातून निवडणूक लढविण्याचे राज्यातील हे पहिलेच उदाहरण असावे.

महापालिका निवडणुकीत अनेकांच्या घरातील दोन-दोन उमेदवार रिंगणात आहेत, परंतु सईमु‌न्निसा अब्दुुल रशीद पठाण शहरातील तब्बल नऊ वॉर्डातून लढत आहेत. त्यांनी वॉर्ड क्रमांक ११, १९, २१, ३३, ३४, ३५, २१, ५९, ८५मधून उमेदवारी अर्ज भरले आहेत. जिन्सी रोड (बायजीपुरा) येथील रहिवसी असलेल्या अब्दुल रशिद पठाण यांच्या त्या कन्या आहेत. सईमु‌न्निसा अब्दुुल रशीद पठाण यांच्याकडे ओबीसी प्रवर्गाचे जातवैधता प्रमाणपत्र आहे. या प्रवर्गाचे वैध प्रमाणपत्र कमी उमेदवारांकडे असेल. यामुळे आपल्याला संधी मिळेल, असे त्यांना वाटले. यामुळे त्यांनी नऊ वॉर्डांतून अर्ज भरले, परंतु जातवैधता प्रमाणपत्रासाठी उमेदवारांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आल्याने त्यांच्या आशेवर पाणी फिरले. यानंतरही माघार घ्यायची नाही, असे ठरविले.

शनिवारी चिन्ह वाटपाप्रसंगी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उप‌स्थित राहणे आवश्यक होते. नऊ ठिकाणी सईमुन्निस्सा यांचे काही नातेवाईकांना थांबविले होते. त्या वॉर्डाचा नंबर आला की संबंधित व्यक्ती रहीम पठाण यांना फोन करून बोलवित होती. यामुळे एका निवडणूक केंद्रातून दुसऱ्या केंद्रात जाताना सईमुन्निस्सा यांचे प्रतिनिधी रहीम खान यांना धावपळ करावी लागली.

साम‌ाजिक कार्यातून समाजात काम करण्याची आवड निर्माण झाली होती. या कार्यासाठी माझ्या पतीसह सर्वच कुटुंबीयांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. - सईमुन्निसा पठाण, उमेदवार.

पठाण कुटुंबीय यांनी सामाजिक कामे करते. आमचे ज्येष्ठ बंधु गाढे जळगाव येथे सरपंच हाेते. यामुळे अाम्ही सईमु‌न्निसा ‌‌हिचा उमेदवारी अर्ज नऊ जागांवर भरला. अाता प्रचाराची रुपरेषा आम्ही ठरवित आहोत.- अब्दुल रहिम पठाण सईमुन्निसा पठाण यांचे काका.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएमचा ‘पतंग’ कटला!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत नसल्याने एमआयएमला आमदारांच्याच वॉर्डातून पंतग चिन्ह गमाविण्याची वेळ एमआयएमवर आली. भडकल गेट वॉर्डातून पंतग चिन्हासाठी एमआयएम सह रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी मागणी केल्याने चिठ्ठी काढून निर्णय घेण्यात आला. यात चिठ्ठीत रिपब्लिकन पक्षाच्या उमदेवाराला पतंग चिन्ह मिळाले.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत चिन्ह वाटपाच्या दिवशी आमदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या भडकल गेट वॉर्डातून एमआयएमने गंगाधर ढगे यांना उमेदवार आहेत. एमआयएम उमेदवारासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या प्रशांत प्रितम शेगावकर यांनीही पंतग या निवडणूक चिन्हावर दावा दाखल केला. पंतग हे एमआयएमचे अधिकृत असल्याचे स्पष्टीकरण गंगाधर ढगे यांनी दिले, मात्र हा पक्ष राज्यात अधिकृत नसल्याने निवडणूक चिन्हावर प्रशांत शेगावकर यांनी‌ही आपला दावा दाखल केला. त्यामुळे चिठ्ठी काढून निर्णय घेण्यात आला. चिठ्ठी काढल्यानंतर पतंग चिन्ह शेगावकर यांना मिळाले. यामुळे आमदारांच्याच वॉर्डातून पतंग चिन्ह शिवाय एमआयएम उमेदवाराला निवडणूक लढवावी लागणार आहे.

याशिवाय म्हसोबा नगर (वॉर्ड क्रमांक २) येथेही एमआयएम पक्षाने कांबळे पद्माकर शामराव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तेथे पतंग चिन्हावर आंबेडकर नॅशलिस्ट पक्षाचे वसंत बनसोडे यांनीही दावा केला होता. तेथे चिठ्ठी काढण्यात आली. या वॉर्डातही एमआयएमच्या उमेदवाराला पतंग हे चिन्ह मिळू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकच महिला उमेदवार ९ वॉर्डांत!

$
0
0

आशिष चौधरी, औरंगाबाद

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपण एक उमेदवार दोन मतदारसंघात निवडणूक लढवित असल्याचे पाहिले आहे, मात्र तब्बल नऊ वॉर्डांत उभे राहण्याचा नवा विक्रम औरंगाबाद शहरातील महिला अपक्ष उमेदवार सईमु‌न्निसा पठाण यांनी केला आहे. ९ वॉर्डातून निवडणूक लढविण्याचे राज्यातील हे पहिलेच उदाहरण असावे.

महापालिका निवडणुकीत अनेकांच्या घरातील दोन-दोन उमेदवार रिंगणात आहेत, परंतु सईमु‌न्निसा अब्दुुल रशीद पठाण शहरातील तब्बल नऊ वॉर्डातून लढत आहेत. त्यांनी वॉर्ड क्रमांक ११, १९, २१, ३३, ३४, ३५, २१, ५९, ८५मधून उमेदवारी अर्ज भरले आहेत. जिन्सी रोड (बायजीपुरा) येथील रहिवसी असलेल्या अब्दुल रशिद पठाण यांच्या त्या कन्या आहेत. सईमु‌न्निसा अब्दुुल रशीद पठाण यांच्याकडे ओबीसी प्रवर्गाचे जातवैधता प्रमाणपत्र आहे. या प्रवर्गाचे वैध प्रमाणपत्र कमी उमेदवारांकडे असेल. यामुळे आपल्याला संधी मिळेल, असे त्यांना वाटले. यामुळे त्यांनी नऊ वॉर्डांतून अर्ज भरले, परंतु जातवैधता प्रमाणपत्रासाठी उमेदवारांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आल्याने त्यांच्या आशेवर पाणी फिरले. यानंतरही माघार घ्यायची नाही, असे ठरविले.

शनिवारी चिन्ह वाटपाप्रसंगी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उप‌स्थित राहणे आवश्यक होते. नऊ ठिकाणी सईमुन्निस्सा यांचे काही नातेवाईकांना थांबविले होते. त्या वॉर्डाचा नंबर आला की संबंधित व्यक्ती रहीम पठाण यांना फोन करून बोलवित होती. यामुळे एका निवडणूक केंद्रातून दुसऱ्या केंद्रात जाताना सईमुन्निस्सा यांचे प्रतिनिधी रहीम खान यांना धावपळ करावी लागली.

साम‌ाजिक कार्यातून समाजात काम करण्याची आवड निर्माण झाली होती. या कार्यासाठी माझ्या पतीसह सर्वच कुटुंबीयांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. - सईमुन्निसा पठाण, उमेदवार.

पठाण कुटुंबीय यांनी सामाजिक कामे करते. आमचे ज्येष्ठ बंधु गाढे जळगाव येथे सरपंच हाेते. यामुळे अाम्ही सईमु‌न्निसा ‌‌हिचा उमेदवारी अर्ज नऊ जागांवर भरला. अाता प्रचाराची रुपरेषा आम्ही ठरवित आहोत.- अब्दुल रहिम पठाण सईमुन्निसा पठाण यांचे काका.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images