Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पुतळ्यांचेही दर आयोगाने ठरवले

$
0
0



उन्मेश देशपांडे, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत एखाद्या राष्ट्रपुरुषाचा पुतळा वापरताना जरा जपून. कारण आता निवडणूक आयोगाने या पुतळ्यांचा खर्च उमेदवाराच्या माथी मारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उंचीनुसार पुतळ्यांचे दरही ठरविले आहेत. अर्थात निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे कठोर कारवाई केल्याचे एकही उदाहरण नाही, मात्र फक्त कागद काळे करण्याचा उद्योग आयोगाकडून सुरू असल्याची चर्चा आहे.

निवडणूक आयोगाने पुतळ्याबरोबर टोप्या, हार, पाण्याचे पाऊच आदींचे दर निश्चित केले आहेत. प्रचारसभांमध्ये व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी राष्ट्रपुरुषांचे पुतळे ठेवण्यात येतात. आयोगाने पुतळ्यांचे आकार निश्चित केले आहेत. २४ इंच उंचीचा पुतळा वापरल्यास उमेदवाराच्या नावावर २,८२५ रुपये खर्च नोंद होईल. ३२ इंच आणि ४२ इंच उंचीच्या पुतळ्यासाठी अनुक्रमे ५,९८० रुपये आणि ८,९७० दर असेल. त्याचबरोबर १६ बाय २० इंच आकाराच्या फोटोचा दर ४५० रुपये निश्चित केला आहे. वास्तविक सभांमधील पुतळे व फोटो कार्यकर्त्यांच्या घरून आणले जातात. मात्र, ते नवीन आहेत असे आयोग मानणार आहे. खादीच्या कापडाचे दरही निवडणूक आयोगाने निश्चित केले आहेत. हे दर २८०, ३७० आणि ४८० रुपये मीटर असे आहेत.

प्रचाराचे साहित्य स्वस्तात आणले तरी, आयोगाच्या दरानुसारच खर्च गृहित धरणार आहेत. कार्यकर्त्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या टोप्यांच्या किंमती ८ ते १७ रुपयांपर्यंच असतील. ढोल ताशाच्या दहा माणसांच्या पथकासाठी प्रतिदिन साडेअकरा हजार रुपये दर आकारला जाणार आहे.

तपासणीबाबत प्रश्नचिन्ह

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्यावेळी उमेदवारांबरोबर आयोगाकडून व्हिडिओ कॅमेरा तैनात करण्यात येतो. त्यांच्या प्रचाराचे चित्रिकरण करण्यात येते. महापालिका निवडणुकीत मात्र एक हजारांपेक्षा जास्त उमेदवार आहेत. प्रत्येक उमेदवाराच्या हालचालीवर लक्ष ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे उमेदवाराबरोबर किती कार्यकर्ते होते. पदयात्रेत किती टोप्या, हार, झेंडे वापरले आदींवर निवडणूक आयोग लक्ष ठेवू शकणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने प्रचारसाहित्याचे दर ठरविणे म्हणजे केवळ कागद काळे करण्याचा उद्योग असल्याची चर्चा उमेदवारांमध्ये आहे.

आयोगाने ठरवलेले हारांचे दर

झेंडू २५ ते १०० रु.

चिल्ली १०० ते २०० रु.

निशीगंध ३०० ते ४०० रु.

गुलाब ४०० ते ५५० रु.

ऑर्चिड ८०० ते १००० रु.

यापेक्षा कमी दर मान्य केले जाणार नाहीत, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खर्च नियंत्रण कक्ष प्रमुखांना कळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राणेंनीच ओवेसींना ऑफर दिली होती!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

एमआयएम हा शिवसेनेचा नंबर एकचा शत्रू आहे. देशाच्या मुळावर उठलेल्या या पक्षाशी आम्ही साटंलोटं करण्याचा प्रश्नच येत नाही. उलट, वांद्रे पोटनिवडणूक न लढवण्यासाठी नारायण राणेंनीच ओवेसी बंधूंना पाच-पाच कोटी रुपयांची ऑफर दिली होती, पण हे सेटिंग फिस्कटल्यानं ते आमच्यावर आरोप करताहेत, असा प्रतिहल्ला शिवसेना नेते आणि औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी आज चढवला.

वांद्रे पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना नेते आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. शिवसेना राणेंवर कडवी टीका करतेय, त्यांना खोचक सल्ले देतेय, टोमणे मारतेय. पराभव झाल्यानं राणेंची बाजू तशी दुबळी आहे, पण तरीही त्यांचे समर्थक सारवासारव करायचा प्रयत्न करताहेत. अशातच, आपल्या वडिलांच्या बचावासाठी धाकटे चिरंजीव, अर्थात नितेश राणे धावून आले. 'एबीपी माझा'वरील मुलाखतीत त्यांनी राणेंवरील टीकेला, आरोपांना प्रत्युत्तरं दिली. राणेंनी एमआयएमला कुठलीही ऑफर दिली नव्हती, एमआयएम हे तर शिवसेनेचं पिल्लू असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला होता. रामदास कदम एमआयएमच्या आमदारासोबत जेवल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. त्यामुळे कदमांच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला होता. त्याचा खुलासा त्यांनी 'एबीपी'कडेच केला.

औरंगाबादचा पालकमंत्री म्हणून तिथले अनेक नेते वेगवेगळी कामं घेऊन मला भेटायला येतात. तसेच एमआयएमचे आमदारही भेटायला आले होते. त्यावेळी आम्ही जेवत होतो, म्हणून मी त्यांनाही जेवायचा आग्रह केला. एकत्र जेवल्याचा अर्थ साटंलोटं आहे, असा होत नाही. देशाच्या मुळावर उठलेल्यांसोबत साटंलोटं करण्याचा प्रश्नच येत नाही, असं रामदास कदम यांनी निक्षून सांगितलं. राणेंच्या मुलांना गल्लीतही कुणी किंमत देत नाही, त्यामुळे त्यांना गांभीर्यानं घ्यायची गरज नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला. नारायण राणेंनीच ताज हॉटेलमध्ये ओवेसींची भेट घेऊन दोन भावांना पाच-पाच कोटी आणि पक्षासाठी वेगळा निधी देण्याची ऑफर दिली होती, पण त्यांची बोलणी फिस्कटल्याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही कदम यांनी केला आहे. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणखी काही दिवस सुरूच राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्यांच्या टेकूमुळे बंडखोर फॉर्मात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नेत्यांनी दिलेल्या टेकूमुळे बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात फॉर्मात आल्याचे चित्र आहे. बंडखोरांवर तात्काळ कारवाई करण्याचे धारिष्ट्य नेत्यांनी न दाखवल्यामुळे अधिकृत उमेदवारांसमोर संकट घोंघावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंडाळी कायम असल्यामुळे युती कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती अगदी शेवटच्या दिवशी झाली. त्यामुळे दोन्हीही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. बंडखोरी मोडून काढण्याच्या वल्गना युतीच्या नेत्यांनी केल्या, पण त्यांचे पुढे काहीही झाले नाही. आता या बंडखोरांना नेत्यांचा खंबीर टेकू मिळत असल्यामुळे निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बहुतेक अपक्ष फॉर्मात आलेले आहेत.

शहराचा गुलमंडी हा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा वॉर्ड आहे. या वॉर्डातून खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचेच जुने कार्यकर्ते पप्पू व्यास यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना शिवसेनेतील एका मोठ्या गटाचा पाठिंबा आहे. व्यास निवडणूक आल्यावर पुन्हा शिवसेनेतच येतील याची खात्री या गटाला वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांच्यामागे शक्ती लावण्याची व्यूहरचना आखली जात आहे. खैरे यांच्या सामर्थ्याला धक्का देण्याचा देखील हा प्रकार मानला जातो. शिनसेनेतून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची बंधू राजू तनवाणी देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. सुरुवातीच्या काळात किशनचंद तनवाणी यांनी त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली नाही, पण आता ते राजू तनवाणींच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र आहे. पद्मपुरा वॉर्डातून शिवसेनेचे नगरसेवक, माजी महापौर व महापालिकेतील गटनेते गजानन बारवाल यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय बारवाल यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. गजानन बारवाल आमदार संजय शिरसाट गटाचे मानले जातात. त्यांचे आणि खासदार चंद्रकांत खैरे यांचे अनेकवेळा खटके उडाले आहेत. त्यामुळे त्यांचा पत्ता कायमचा कट करण्यासाठी खैरे यांनी संजय बारवाल यांच्याबाजूने कौल दिला. संजय बारवाल यांना प्रदीप जैस्वाल यांचाही पाठिंबा आहे. उल्कानगरी वॉर्डातही अशीच स्थिती आहे. या वॉर्डातून भाजपने दिलीप थोरात यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे नगरसेवक व माजी सभागृहनेते सुशील खेडकर यांनी बंडखोरी केली आहे. खेडकर आमदार संजय शिरसाट यांचे कट्टर समर्थक आहेत. खेडकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी विशेष प्रयत्न केलेले नाहीत. भारतनगर - शिवाजीनगर वॉर्डातून शिवसेनेचे दिग्विजय शेरखाने यांच्या विरोधात भाजपचे आमदार नारायण कुचे यांचे समर्थन असलेले जालिंदर शेंडगे अपक्ष उमेदवार आहेत. कुचे यांनी शेंडगेंच्या मागे ताकद उभी केल्याची चर्चा आहे. कुचेंना रोखण्यात भाजपच्या नेत्यांनीही पुढाकार घेतलेला नाही.

खैरे विरुद्ध सावे

बाळकृष्णनगर वॉर्डातून महापौर कला ओझा शिवसेनेच्या उमेदवार आहेत. त्यांना आमदार अतुल सावे गटाच्या संगीता रत्नपारखी यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत आव्हान दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी रत्नपारखी यांनी केलेल्या कामाची पावती सावे देत आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे या वॉर्डात खासदार चंद्रकांत खैरे विरुद्ध आमदार अतुल सावे अशीच लढत होईल, असे मानले जात आहे. सुराणानगर वॉर्डातून माजी महापौर प्रशात देसरडा यांच्या पत्नी राखी देसरडा भाजपतर्फे उभ्या आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रफुल्ल मालाणी यांच्या पत्नी किरण मालाणी अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या आहेत. मालाणी खैरेंचे खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात अवकाळी पाऊस सुरूच

$
0
0

टीम मटा औरंगाबाद

गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बुधवारी मराठवाड्यातील बीड, नांदड, लातूर जिल्ह्यात हजेरी लावली. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. लातूर जिल्ळ्यात वीज कोसळल्याने दोन जनावरांचा मृत्यू झाला.

लातूरात पावसाळी वातावरण लातूर-लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा व चाकुर तालुक्यातील काही भागात पावसाने बुधवारी हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वत्र दिवसभर पावसाळी वातावरण होत. मंगळवारी रात्री विज पडल्याने सरवडी येथील राम इंगळे यांच्या म्हशीच वासरु तर तनदिन येथील संभाजी इंगळे यांच्या म्हशीचा मृत्यू झाला. औसा तालुक्यातील सिंदाळा, बोरफळ, बेलकुंड या परिसरात जोरदारे वाऱ्यासह पाऊस झाला.

बीड : गेल्या सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस बीड जिल्ह्याची पाठ सोडायला तयार नाही. बीड जिल्ह्यात बुधवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. सांयकाळी साडे सहाच्या सुमारास पावसाच्या सरी आल्याने पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. सात वाजण्याच्या सुमारास जोरात पावसाला सुरुवात झाली. एक दिवस खंड देवून पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली.

वीज पडून गुराख्यासह ३३ शेळ्या ठार

जालनाः वाघ्रूळ जहागीर (ता. जालना) येथे बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास वीज कोसळून एका गुराख्यासह ३२ शेळ्या जागीच ठार झाल्या. शेख इशू शेख जानू (वय ४५) असे मृत गुराख्याचे नाव आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. तेव्हा इशू शेख शेळ्यांसह झाडाखाली आडोशाला थांबला होता. त्यावेळी वीज कोसळल्याने इशू ३३ शेळ्यांसह गंभीर भाजला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोठ्या प्रमाणात बंडखोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याची कबुली शिवसेनेचे नेते व पालकमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. बंडखोरांसंदर्भात युतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

निवडणुकीच्या प्रचारासाठी रामदास कदम आज शहरात आले. समर्थनगर येथील प्रचार कार्यालयात त्यांनी पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'दोन वॉर्डातून उमेदवार बिनविरोध निवडून आले असले तरी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. युतीच्या नेत्यांची बैठक घेऊन बंडखोरांबाबत निर्णय घेतला जाईल. आपण एकमेकांविरोधात लढलो तर लाभ दुसऱ्यांच होईल, हे बंडखोरांनी लक्षात घेतले पाहिजे. एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसण्यापेक्षा आपले कोण ते ओळखा, असे आवाहन मी बंडखोरांना करतो.' युतीची लढाई एमआयएमबरोबरच आहे, असे कदम यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. समांतर जलवाहिनीसंदर्भात गैरसमज पसरविले जात आहेत. ही योजना रद्द झाली असती तर, त्यासाठी शासनाकडून आलेला निधीही परत गेला असता. शिवसेनेच्या दृष्टीने या शहराचे पाणी आणि योजना हे दोन्ही आवश्यक आहे. 'समांतर'च्या आडून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप कदम यांनी केला.
राणेंनी ग्रामपंचायत लढवावी : रामदास कदम

नारायण राणे यांच्या पराभवासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कदम म्हणाले, 'राणेंनी आता नगर पालिका, ग्रामपंचायतीचा एखादा वॉर्ड शोधून तेथे निवडणूक लढवावी. राणे यांच्या पराभवामुळे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. शिवसेनाप्रमुखांनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना समर्थपणे सांभाळली आहे. तासगावमध्ये शिवसेनेने आर. आर. पाटील यांच्या पत्नीच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. वांद्र्यामध्ये काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशीच अपेक्षा होती, पण त्यांनी राणेंच्या रुपाने उमेदवार दिला. शरद पवारही त्यात सहभागी झाले. पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती, पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या सर्वांना धडा शिकविला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राणेंनी ग्रामपंचायत लढवावी : रामदास कदम

$
0
0

नारायण राणे यांच्या पराभवासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कदम म्हणाले, 'राणेंनी आता नगर पालिका, ग्रामपंचायतीचा एखादा वॉर्ड शोधून तेथे निवडणूक लढवावी. राणे यांच्या पराभवामुळे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. शिवसेनाप्रमुखांनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना समर्थपणे सांभाळली आहे. तासगावमध्ये शिवसेनेने आर. आर. पाटील यांच्या पत्नीच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. वांद्र्यामध्ये काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशीच अपेक्षा होती, पण त्यांनी राणेंच्या रुपाने उमेदवार दिला. शरद पवारही त्यात सहभागी झाले. पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती, पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या सर्वांना धडा शिकविला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घृष्णेश्वर कारखान्याची विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना उद्योजक सतीश घाटगे यांच्या उमंग शुगर इंडस्ट्रीजने विकत घेतला आहे. मशिनरी दुरुस्ती व गाळपासाठी नियोजन करण्यात येत असून यंदा कारखान्याचे बॉयलर पेटण्याची चिन्हे आहेत. राज्य सहकारी बँकेकडून ताबा मिळाल्यावर कारखाना सुरू करण्याच्या कामाला वेग येणार आहे.

माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर यांनी घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना स्थापन केला आहे. परंतु, हा कारखाना सुरू होऊ शकला नाही. पर्यायाने कारखान्यावर राज्य बँकेसह इतरही बँकांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. कर्जवसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने ४२ कोटी रुपयांच्या किंमतीत कारखाना लिलावात काढला. याअगोदरच्या लिलावात संपूर्ण पैसे न भरल्यामुळे दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. दुसऱ्या लिलावात उमंग शुगर इंडस्ट्रीजने घृष्णेश्वर कारखाना विकत घेतला. उमंग शुगरला राज्य सहकारी बँकेच्या ताब्यातून कारखाना ताब्यात घेऊन मशिनरी दुरुस्ती, अधिकारी, कर्मचारी भरती, वाहतूक व्यवस्था, ऊसतोडणी कामगारांचा करार आदी कामे करावे लागणार आहेत.

उमंग शुगरने कारखाना विकत घेतला आहे. त्यांच्याकडून पैसे आल्यानंतर ताबा दिला जाईल. काही अटींवर कारखान्यात कामे करण्यासाठी परवानगी दिली आहे.

- एस. एम. म्हात्रे, व्यवस्थापक, राज्य सहकारी बँक

थोडक्यात इतिहास

१९८० मध्ये स्थापनेसाठी जुळवाजुळव

२७ मार्च १९८२ रोजी बँकेत खाते उघडले

१९ मे १९८९ ला इरादा पत्रासाठी प्रस्ताव

२२ मार्च १९९४ रोजी ओद्योगिक परवाना पत्र

१६ मे १९९४ ला साखर आयुक्ताकडे नोंदणी

२० डिसेंबर १९९४ राजी जागा निश्चिती

२० सप्टेंबर १९९५ रोजी भूमिपूजन

विक्रम प्रोजेक्टसला २ कोटी ९९ लाख ९८ हजार अदा

विक्रम प्रोजेक्टस या कंपनीसोबत यंत्रसामुग्रीबद्दल करार

विक्रम प्रोजेक्टस दिवाळखोरीत निघाल्याने काम रखडले

उत्तम इंजिनिअरिंगसोबत यंत्रसामुग्रीबद्दल नवा करार

१६ मे २००२ पासून यंत्रसामुग्री येण्यास सुरुवात

उत्तम इंजिनीअरिंगला १३ कोटी ५१ लाख रुपये अदा

विक्रम प्रोजेक्टविरुद्ध सहकार न्यायालयात दावा

दिलेली रक्कम व ८ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी दावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेभाज्या कवडीमोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पालेभाज्या कवडीमोल विकल्या जात आहेत, तर फळभाज्यांच्या किंमतीही उतरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या चार दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीतही भाज्यांची आवक दुपटीने वाढली आहे.

औरंगपुरा, पीरबाजार, टी. व्ही. सेंटर आणि शिवाजीनगर या भागातील भाजी मंडईत असलेले भाज्यांचे दर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या भाज्यांचे दर यातही फारशी तफावत नाही. कारण उत्पन्न, आवक आणि विक्री यांचा ताळमेळ सध्या व्यवस्थित बसत असल्याचे मत भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केले. औरंगाबाद जिल्हा, नगर आणि नाशिक भागातून शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भाज्यांची आवक होत आहे. सुमारे ८० ते १२० क्विंटल भाज्या गेल्या चार दिवसांत शहरात आल्या आहेत.

कोथिंबीरचे दर चढेच

कोथिंबीरचे दर अजूनही चढेच आहेत. १० ते १५ रुपयाला एक जुडी विकली जात आहे. पालक ३ ते ५, मेथी २ ते ४ तर चुकाही ५ रुपये जुडी विकला जात आहे. भाज्यांच्या दरात घसरण झाल्याने हॉटेल व्यावसायिकांसह सर्वसामन्यांनाही दिलासा मिळाला आहे. हे दर पुढील आठवडयापर्यंत कायम असतील, असा अंदाजही भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केला.

भाज्यांचे किलोमागचे दर

वांगी २० ते ३० रु. (४० ते ५० रु.)

शेवगा २० ते ३० रु. (५० ते ६० रु.)

भेंडी ३० ते ४० रु. (६० ते ७० रु.)

गवार २० ते ३० रु. (५० ते ५० रु.)

पत्ताकोबी ५ ते २० रु. (४० ते ५० रु.)

फुलकोबी २० ते ३० रु. (४० ते ५० रु.)

दिलपसंद ४० ते ५० रु. (६० ते ८० रु.)

टमाटे १० ते २० रु. (३० ते ४० रु.)

(कंसात आठवड्यापूर्वीचे दर)

गारपीट व अवकाळीचा परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात भाज्या कवडीमोल दराने विकाव्या लागल्या. त्याचा पालेभाज्यांवर जास्त परिणाम झाला आहे.

- शशीकला खोबरे, भाजी विक्रेत्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेना- भाजप वाढीला MIM मुळे मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) हा पक्ष राज्यात धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पाडण्यासाठी दाखल झाला आहे. मुस्लिमांच्या एकत्रिकरणाची भाषा करीत हा पक्ष भाजप- शिवसेनेच्या जागा वाढवण्यास मदत करीत आहे,' असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबु आसीम आझमी यांनी केला.

समाजवादी पक्षाचे १२ उमेदवार महापालिका निवडणुकीत उतरले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आमदार अबु आझमी शहरात आले होते. त्यानिमित्ताने त्यांनी पत्रकार परिषदेत एमआयएमच्या वाढत्या प्रभावाबद्दल मत मांडले. 'एमआयएमच्या राज्यातील प्रवेशापासून शिवसेना, भाजपच्या विजयाचे प्रमाण वाढले आहे. एमआयएम हा जातीयवादी पक्ष असून त्यांच्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होते. त्याचा शिवसेना, भाजपला फायदा मिळत आहे,' असे आमदार आझमी म्हणाले.

काँग्रेसचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी वांद्रे विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाने उमेदवार दिला नाही. एमआयएमने मात्र येथे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी केली, असा आरोप त्यांनी केला. या पक्षाबद्दल सर्वसामान्य जनतेते काळजी घ्यावी, असा सल्ला आमदार आझमी यांनी दिला.

अपयश लपवण्यासाठी वाद

शिवेसना- भाजप युतीने महापालिकेत सत्ता भोगून २५ वर्षात शहराचा विकास केला नाही. हे अपयश लपवण्यासाठी सतत 'औरंगाबाद की संभाजीनगर' असा प्रचार केला जातो. औरंगाबादचे नाव बदलू शकत नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचे जैन बिनविरोध

$
0
0

म. टा.विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

वेदांतनगरमधून (वॉर्ड क्रमांक १०३) काँग्रेसचे उमेदवार माणिकचंद आसाराम महतोले यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शोभा ठाकूर यांनी अवैध ठरविला होता. त्याला महतोले यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. ही याचिका त्यांनी मागे घेतल्याने शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन हे वेदांतनगरमधून बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे २ नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत.

शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन यांचे भवितव्य या याचिकेच्या निर्णयावर अवलंबून होते. या वॉर्डात जैन यांचाच उमेदवारी अर्ज शिल्लक होता. महतोले यांनी याचिका मागे घेतल्याने जैन यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. वेदांतनगर वॉर्ड हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत नगरसेवक म्हणून निवडून येण्याची ही पाचवी वेळ आहे. ठाकूर यांना सविस्तर शपथपत्र सदर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुनील पी. देशमुख यांनी दिले होते. या आदेशानुसार ठाकूर या शपथपत्र सादर केले. महतोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना अपत्यासंदर्भातील शपथपत्र दाखल केले नव्हते, असे निवडणूक निर्णय अधिकारी शोभा ठाकूर यांनी शपथपत्रात म्हटले. या याचिकेची सुनावणी सुरू होताच महतोले यांचे वकील अश्विन साकोळकर यांनी माघार घेत असल्याचे शपथपत्र दाखल केले. निवडणूक आयोगातर्फे शिवाजी टी. शेळके, जैन यांच्यातर्फे श्रीकांत अदवंत तर, पालिकेतर्फे अतुल कराड यांनी बाजू मांडली.

सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने माझी बिनविरोध निवड झाली, याचा मला आनंद झाला आहे. महतोले यांनी त्यांच्या अर्जासोबत शपथपत्र दाखल केले नव्हते म्हणूनच आक्षेप दाखल केला होता. तो मंजूर झाला. त्यांनी माघार घेतली आहे. हा हिंदुत्वाचा विजय आहे. माझ्या कामाची ही पावती आहे.

- विकास जैन, माजी महापौर

आता प्रचार करण्यास केवळ पाच दिवस उरले आहेत. एवढ्या कमी दिवसांत प्रचार करणे अवघड होते. त्यामुळे माघारीशिवाय पर्याय नव्हता.

- माणिकचंद महतोले, काँग्रेस उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार कुचे यांना ‘स्वाइन फ्लू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांना 'स्वाइन फ्लू' झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्यावर शहरातील दंडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आमदार कुचे यांच्यासह सात रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये 'स्वाइन फ्लू'चे उपचार सुरू आहेत. वातावरण बदलाने पुन्हा एकदा आजाराने डोके वर काढल्याचे चित्र आहे.

एसआरएल लॅबच्या रिपोर्टनुसार आमदार कुचे यांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले. त्यांच्याशिवाय एकलहरा (ता. अंबड, जि. जालना) येथील ६० वर्षीय पुरूष रुग्णावर शहरातील गजानन हॉस्पिटलमध्ये उपचार होत आहेत. रहाटघन (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील ३० वर्षीय पुरुष रुग्णावर शहरातील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोघांचा एसआरएल लॅबने दिलेल्या रिपोर्टनुसार स्वाइन फ्लूचे निदान झाले. या रुग्णांशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) स्वाइन फ्लू वॉर्डात तीन संशयित रुग्ण व एक पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी कळविली आहे. यापैकी एका गर्भवती महिला रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचेही समजते.

दोन दिवसांत 'स्वाइन फ्लू'चे रुग्ण काहीसे वाढल्याचे दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे असे रुग्ण वाढू शकतात. अर्थात, ही रुग्णांची वाढ खूप जास्त नाही.

- डॉ. मंगला बोरकर, मेडिसिन विभागप्रमुख, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून ‘टाइम्स ऑटो कार्निव्हल’ सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वतीने औरंगाबादकरांसाठी १७ व १८ एप्रिल २०१५ रोजी दोन दिवसीय 'टाइम्स ऑटो कार्निव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्निव्हलमध्ये चारचाकी वाहनांच्या खरेदीवर आकर्षक सूट मिळणार आहे. शिवाय जुन्या वाहनांच्या एक्स्चेंजवर उत्तम किंमत मिळणार आहे. या कार्निव्हलमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वतीने वाचकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या 'टाइम्स ऑटो कार्निव्हल'मध्ये 'धूत हुंदाई' आणि 'फोक्सवॅगन- औरंगाबाद' सक्सेस पार्टनर म्हणून सहभागी आहेत. या कार्निव्हलमध्ये नव्या वाहनाच्या खरेदीवर अत्यंत आकर्षक ऑफर्स तर मिळणार आहेच, शिवाय आपल्याकडील जुन्या वाहनाच्या एक्स्चेंजसाठी उत्तम किंमत मिळू शकेल. नव्या वाहनाच्या स्पॉट बुकिंगवर यावेळी भरीव सूट देण्यात येणार आहे. यावेळी 'धूत हुंदाई' आणि 'फोक्सवॅगन - औरंगाबाद' वाहनांची टेस्ट ड्राइव्हची व्यवस्था करण्यात आली आहे.

'मटा' कार्यालयात आयोजन

टाइम्स ऑटो कार्निव्हलचे आयोजन महाराष्ट्र टाइम्स कार्यालय, साई स्क्वेअर, उस्मानपुरा येथे करण्यात आले असून, इच्छुकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोरांची सुरमा गँग जेरबंद

$
0
0

पकडण्यात आलेले कुख्यात सुरमा गँगच्या सहा दरोडेखोर.

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरोडेखोरांच्या कुख्यात सुरमा गँगच्या सहा दरोडेखोरांना गुन्हे शाखा व सातारा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असताना अटक केली. बुधवारी रात्री नाथ व्हॅली शाळेजवळील परिसरात असलेल्या डोंगराच्या पायथ्याच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. या आरोपीकडून दोन चाकू, लाकडी दांडे आदी साहित्य जप्त करण्यात आले.

सातारा परिसरात नेवासा येथील कुख्यात गुन्हेगार राहुल अशोक खंडागळे हा साथीदारांसह आला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून सातारा पोलिसांच्या मदतीने तेथे छापा टाकण्यात आला. त्यावेळी पोलिसांना सहा आरोपी आढळून आले.

आरोपी राहुल अशोक खंडागळे (रा. नेवासा), गौतम लक्ष्मणराव त्रिभुवन, योगीराज भास्कर सुर्वे, गजानन रमेश घोरपडे, दिनेश भीमराव भालेराव सय्यद नबी लाला (सर्व रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर) यांना पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून दोन चाकू, लाकडी दांडे, दोन दुचाकी, मिरची पूड आदी साहित्य आढळून आले. आरोपींविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात दरोड्याच्या तयारीत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुरेश खाडे, विलास वाघ, अशोक नागरगोजे, देविदास इंदोरे, अप्पासाहेब खिल्लारे, फिरोज पठाण, सुरेश कुसाळे, प्रमोद देवकाते, भागवत सुरवाडे, सातारा पोलिस ठाण्याचे राजेंद्र साळुंके, सतीश हंबर्डे, देशराज मोरे यांनी केली.

डोळ्यात अंजन घालून गुन्हे

या टोळीतील सदस्य कोणताही गुन्हा करण्यापूर्वी डोळ्यात अंजन घालत असत. त्यामुळे सुरमा गँग नावाने ही टोळी प्रसिद्ध आहे. यातील राहुल खंडागळे, गौतम त्रिभुवन व दिनेश भालेराव यांच्यावर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात खून व मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘युतीच्या सत्तेसाठी एमआयएम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेना-भाजपने शहराला ५० वर्षे मागे नेण्याचे काम केले, तर एमआयएमचे आगमनच युतीला सत्ता मिळवून देण्यासाठीच झाले आहे,'अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी (१६ एप्रिल) रोशनगेट येथे आयोजित प्रचार सभेत केली.

'युतीने शहरासाठी काय केले, शहराच्या विकासासाठी कुठला निर्णय घेतला, याचा विचार नागरिकांनी करण्याची वेळ आली आहे. त्याचवेळी केंद्रात आणि राज्यातही 'अच्छे दिन' नव्हे 'बुरे दिन'ची सुरुवात झाली आहे. भाजप-शिवसेनेला सत्ता मिळवून देण्यासाठी एमआयएम आहे, याचेही भान मतदारांनी ठेवावे, असे ते म्हणाले. शहरामध्ये मागच्या कित्येक वर्षांत कुठलाच सकारात्मक बदल झालेला नाही. त्याउलट काँग्रेसने बोलल्याप्रमाणे शहरामध्ये कॅन्सर हॉस्पिटल उभे केले, हज हाऊस-वंदेमातरम सभागृहाचे काम मार्गी लावले. मुस्लिम बांधवांसाठी शहरातून हज यात्रेला जाण्यासाठी खास सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे आता नागरिकांनीच प्रगती हवी की अधोगती, याचा विचार करावा, असे आवाहन विखे पाटील यांनी केले. माजी अल्पसंख्यांक मंत्री नसीम खान म्हणाले, युतीने कुठल्याच मूलभूत सोयी-सुविधा दिल्या नाही. एकीकडे पंतप्रधान मोदींनी 'अच्छे दिन'च्या नावाखाली देश व देशवासियांची दिशाभूल केली. विदेश दौरे सुरू असताना देशातले शेतकरी मरत आहे, याचेही मोदींना काही देणे घेणे राहिलेले नाही, तर 'एमआयएम'कडून 'आरएसएस' व भाजपची दलाली सुरू आहे. या वेळी आमदार आसिफ खान, माजी आमदार एम. एम. शेख, कदीर मौलाना आदी उपस्थित होते.

आता म्हणतात साध्वींना सोडून द्या

मालेगाव स्फोटात अनेक मुस्लिम मारले गेले आणि त्याला जबाबदार असल्याचे साध्वी व इतरांनी मान्य केले. मात्र आता त्यांना शिवसेनेचे आमदार सोडून द्या, असे म्हणत आहे, असे आमदार आसिफ खान म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दुचाकीवरून फिरा; हाल कळतील’

$
0
0

खासदार ओवेसींचा युतीच्या नेत्यांना सल्ला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'प्रचारासाठी येणाऱ्या शिवसेना- भाजपच्या नेत्यांनी, मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या रस्त्यांवरून दुचाकी किंवा तिचाकीतून फिरावे, म्हणजे त्यांना रस्त्याची अवस्था समजेल,' असा सल्ला एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिला आहे. राजकीय गुलाम करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकवूच. त्यासोबत इतर पक्षाशीही मुकाबला करणार आहे,' असे उद्गारही त्यांनी काढले.

महापालिका निवडणूक प्रचारासाठी त्यांनी गुरुवारी (१६ एप्रिल) आमखास मैदानात सभा घेतली. यावेळी मंचावर एमआयएमच्या ५४ उमेदवारांसह आमदार इम्तियाज जलील, महेफुजर रहेमान, हैदराबादचे आमदार जफर हुसैन यांची उपस्थिती होती.

खासदार आवेसी यांनी निवडणूक प्रचारासाठी येणाऱ्या भाजप- शिवसेना नेते व मुख्यमंत्र्यांना शहरातील रस्त्यांवर दुचाकी किंवा तीन चाकी वाहनांवर फिरावे, असे आवाहन केले. शहरातील रस्त्यांचे हाल झाले असून त्यावरून फिरणे सुद्धा शक्य नसल्याची टीका त्यांनी केली. केंद्र सरकारच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात दलितांसाठी कमी निधी दिल्याचा आरोप त्यांनी केला. 'जातीयवादी पक्ष म्हणून मजलीसला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत भाजपा आणि शिवसेनेची भीती दाखवून मते घेऊन सोयीचे राजकारण केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सामना करूच पण शिवसेना, भाजपशीही मुकाबला करण्यासाठी तयार आहोत,' असे खासदार ओवेसी म्हणाले.

नाराजीला मी जबाबदार

तिकीट वाटपात गोंधळ झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी यांनी सभेत कुराण व मुलाच्या डोक्यावर हाथ ठेवून निरपराध असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, ओवेसी यांनी कुरेशी यांना रोखले. पक्षप्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे, असे सांगून ओवेसींनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कागद निर्मितीत ऑटोमेशन

$
0
0

>> मकरंद कुलकर्णी

वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय तेवढ्याच क्षमतेने पुढे नेण्याची किमया साधणे भल्याभल्यांना शक्य होत नाही. अमेरिकेतून एमबीएची पदवी मिळवून आल्यानंतर त्यांनी कंपनीत लक्ष देणे सुरू केले. १२ वर्षांत कंपनीचा विस्तार झाला. उत्पादनाची मागणी वाढली. नवीन तंत्रज्ञानाची कास धरत सुरू असलेली अक्षय राठी यांची वाटचाल आजच्या कार्पोरेट विश्वमध्ये.

कॉमर्स विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रकाश राठी यांनी एका पेपर मिलमध्ये काम केल्यानंतर स्वतःची कंपनी सुरू करण्याचे ठरविले. मित्रमंडळी, नातेवाईक; तसेच या व्यवसायातील तज्ज्ञांशी बोलून १९९२मध्ये औरंगाबाद-पुणे रस्त्यावर कायगाव टोका (ता. गंगापूर) येथे कायगाव पेपर मिल सुरू केली.

टाकाऊ कागदावर प्रक्रिया करून त्यापासून क्राफ्ट पेपर बनविला जातो. कोरोगेटेड बॉक्सेस बनविणाऱ्या कंपन्यांना या कागदाचा पुरवठा केला जातो. प्रकाश राठी यांचे चिरंजीव अक्षय यांनी २००३मध्ये शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर कंपनीचा कारभार सांभाळणे सुरू केले आणि बारा वर्षांत आमूलाग्र बदल केले आहेत. अक्षय यांनी केंद्रीय विद्यालयातून दहावी व बारावी पूर्ण केल्यानंतर २०००मध्ये जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातून (जेएनइसी) प्रॉडक्शन विषयात इंजिनीअरिंग पूर्ण केले. त्यानंतर अक्षय एमबीए (फायनान्स) करण्यासाठी अमेरिकेत गेले. २००३मध्ये अमेरिकेतून परतल्यानंतर प्रकाश राठी यांनी अक्षय यांच्यावर कंपनीच्या संचालकपदाची जबाबदारी सोपविली. कंपनीचे संचालक म्हणून काम सांभाळताना अक्षय यांनी मार्केटचा अभ्यास केला. क्राफ्ट पेपर पुरविणाऱ्या कंपन्यांची संख्या निवडक होती. दररोज १५० टन पेपरचे उत्पादन होते. औरंगाबाद, पुणे, नाशिक, सोलापूरसह राज्याबाहेर इंदूर, हैदराबाद, गोवा आणि वापी याठिकाणच्या कंपन्यांना सप्लाय होतो. उत्पादनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने अक्षय यांनी नवनवीन संकल्पना समोर आणल्या. पूर्वी कंपनीत महिनाभरात २००० टन पेपर बनविला जात होता. आता हे प्रमाण ३५०० टनांपर्यंत पोचले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राठी यांनी परदेशातून यंत्रसामग्री मागविली आणि त्याचा फायदा दिसून आला. पूर्वी कंपनीत क्राफ्टमधील दोन तीन प्रकारचाच पेपर बनविला जात होता. आता यात व्हरायटी आणली आहे. हे सगळे अक्षय राठी यांच्या पुढाकाराने घडून आले. मार्केट वाढले, गरजा वाढल्या आणि मागणीही वाढू लागली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ऊर्जा संवर्धनाचे कामही कायगाव पेपर मिलमध्ये केले जाते. अॅटोमेशनचा वापर वाढला आहे. खास ब्रिटनमधील कंपनीतून हे तंत्रज्ञान मागविण्यात आले आहे. गेल्या बारा वर्षांत झालेल्या झालेल्या प्रगतीचे श्रेय आई-वडिलांना देताना अक्षय सांगतात की, वडील प्रकाश आणि आई मंगल राठी यांनी कायम प्रोत्साहन आणि पाठबळ दिले. पत्नी मेघा, कृती आणि सुदिती या कन्यांची साथही सदैव मोलाची आहे. कंपनीच्या कामातून वेळ मिळाला की अक्षय कुटुंबीयांमध्ये रमतात.

कायगाव पेपर मिलने मिळविलेले यश आणखी वृद्धिंगत व्हावे यासाठी अक्षय कंपनीचा विस्तार करत आहेत. परदेशी तंत्रज्ञान आणून उत्पादन केले जाणार आहे. सेटअप बसविल्यानंतर कंपनीत दर महिन्याची उत्पादन क्षमता ६००० टनाच्या पुढे जाऊ शकेल. एकूणच अक्षय राठी यांची भावी वाटचाल आणखी यशस्वी होईल, यात शंका नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओवेसींना हैदराबादला परत पाठवणारचः कदम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'हैदराबादहून आलेले ओवेसी बंधू मतांसाठी मतदारांचे माथे भडकविण्याचे काम करत आहे. त्यांना हैदराबादला पाठविल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही,' असा पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी (१६ एप्रिल) नागेश्वरवाडी येथे झालेल्या जाहीर सभेत दिला. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करणारच असा दावाही त्यांनी केला.

पालकमंत्री कदम यांनी या सभेत बोलताना एमआयएम आणि ओवेसी बंधूंवर चौफेर हल्ला चढवला. ओवेसी बंधू प्रचारासाठी २२ एप्रिलपर्यंत थांबण्याच्या गोष्टी करत असेल. तर आपणही निकाल लागेपर्यंत म्हणजे २३ एप्रिलपर्यंत शहरात ठाण मांडून बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. समांतर जलवाहिनीबाबत मतदारांनी विश्वास ठेवू नये. शहराला २४ तास पाणी पुरवठा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, पालकमंत्री कदम यांचे भाषण रंगले असतानाच ध्वनीक्षेपक यंत्रात बिघाड झाला. कदम यांनी ध्वनीक्षेपक यंत्र बाजूला सारत आपले भाषण सुरू केले. या सभेला खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे, नागेश्वरवाडी-भोईवाडा वॉर्डाचे उमेदवार विनायक देशमुख, खडकेश्वरचे उमेदवार सुगंधकुमार गडवे, समर्थनगरचे उमेदवार ऋषीकेश खैरे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात आता केंद्रीय प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येत्या शैक्षणिक वर्षापासून अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने करणार आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेतील अनियमितता दूर होईल, तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणाऱ्या पदव्युत्तर कॉलेजांना चाप बसणार आहे.

विद्यापीठांसह अंतर्गत सर्व कॉलेजांमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमास क्रेडिट व ग्रेडिंग पद्धत लागू करण्याची सक्ती यूजीसीने केली आहे. या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आपल्या अंतर्गत सर्व कॉलेजांमध्ये ही सिस्टीम यंदापासून लागू करणार आहे. याबाबत अभ्यास मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. अशा प्रकारची सिस्टीम राबविताना, प्रवेश प्रक्रियेत, अभ्यासक्रमात सुसत्रता येणे महत्त्वाचे आहे. यासाठी विद्यापीठ आपल्या अंतर्गत सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया एकाच छताखाली राबविणार आहे. ऑनलाइन राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन विषयनिहाय कॉलेज, विषयाचे ऑप्शन भरावे लागेल. प्रवेश अर्ज आल्यानंतर विषयनिहाय गुणवत्ता याद्या जाहीर केल्या जातील. यानंतर प्रवेश दिले जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेडिट सिस्टीमवर प्रश्नचिन्ह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला संलग्न कॉलेजच्या प्राचार्यांनी गुरुवारी (१६ एप्रिल) 'क्रेडिट व ग्रेडिंग'चे धडे गिरविले. विद्यापीठ येत्या शैक्षणिक वर्षापासून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात 'चॉईस बेस्ट क्रेडिट सिस्टीम' लागू करणार आहे. पात्र प्राध्यापक व प्राचार्य नसलेल्या कॉलेजमध्ये ही पद्धत लागू होणार का या प्रश्नावर प्रशासनाने मौन बाळगले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुचनेनुसार क्रेडिट व ग्रेडिंग सिस्टीम लागू केली जाणार आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी विद्यापीठाने विभागप्रमुख, प्राचार्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत गुणप्रणालीपासून ते प्रवेशाचे निकष, उत्तीर्णतेचे मानांकन याची माहिती देण्यात आली. 'चॉईस बेस्ट क्रेडिट सिस्टीम'ची उपयुक्तता, त्यातील अभ्यासक्रमाची रचना कशी असेल, त्याची उद्दिष्टे काय, गुणप्रणाली कशी असेल, प्रवेशाचे निकष कसे असतील, मानांकन कसे द्यायचे याची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे अभ्यासक्रमात सुसूत्रता येणर असून विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा होईल, असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. बीसीयूडी डॉ. के. व्ही. काळे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीला दीडशे जणांची उपस्थिती होती. परंतु, अनेक प्राचार्यांनी दांडी मारली.

त्या कॉलेजांचे काय?

विद्यापीठशी संलग्न अनेक कॉलेजमध्ये पात्र प्राध्यापक नाहीत, २१० पेक्षा अधिक कॉलेजांना पूर्णवेळ प्राचार्य नाहीत. या कॉलेजमध्ये ही पद्धत लागू कशी करणार?, असा सवाल बैठकीत उपस्थित करण्यात आला. पात्र शिक्षक नसणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करण्यात येईल, त्यांचे संलग्नीकरण रद्द करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र ही पद्धती कशी लागू करणार याचे उत्तर प्रशासनाने दिले नाही.

विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व कॉलेजातील शिक्षकांनी नवीन पद्धत समजून घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला ती यशस्वी होवू शकते. - डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतर प्रकल्पाची CBI चौकशी करा

$
0
0

राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरातील नागरिकांना पाण्याची सोय व्हावी, यासाठी तत्कालीन आघाडीच्या केंद्र व राज्य सरकारने समांतर जलवाहिनीसाठी ८०० कोटी रुपये मंजूर केले. दोन वर्षे उलटून गेले तरी त्याचे काम सुरू झालेले नाही. पालिकेत २० वर्षांपासून शिवसेना-भाजपची सत्ता आहे. त्यांनी या योजनेसाठी काहीच हालचाल केली नाही. उलट विकासक नेमण्यापासून सगळी योजनाच संशयाच्या भोवऱ्यात आहे. समांतर जलवाहिनीची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ विखे गुरुवारी औरंगाबादेत आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'गेल्या वीस वर्षांपासून महापालिकेत युतीची सत्ता आहे. आपण सगळ्या कालावधीचा हिशेब मागण्याऐवजी गेल्या पाच वर्षांत त्यांनी विकासाची काय कामे केले, हे सांगावे. शहरात एक रस्ता व्यवस्थित नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटन व औद्योगिक शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे, पण युतीने शहराची दुरवस्था केली आहे. केंद्र व राज्यात आमचे सरकार असताना सर्व प्रकारच्या नागरी सुविधांसाठी निधी दिला, पण त्याचा उपयोग स्थानिक सत्ताधाऱ्यांनी योग्य पद्धतीने केला नाही. केवळ भावनिक प्रश्न निर्माण करून मतदारांना भुलविले जाते. यामुळे शहर तर भकास झाले आहेच. पण इथे राहणाऱ्या सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. 'पालिकेने केलेला विकास दाखवा आणि बक्षीस मिळवा,' असे म्हणण्याची पाळी आली आहे.' 'समांतर जलवाहिनीची योजना शहरवासीयांसाठी फायद्याची होती, पण युतीने ही योजना योग्यप्रकारे राबविली नाही. विकसक नेमताना पारदर्शकता असायला हवी होती. केंद्र व राज्याकडून मिळालेला निधी कुठे व कसा खर्च केला, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. आजही शहरात पाणी मिळेल की नाही, याची खात्री नाही. समांतरच्या गैरव्यवहाराची 'सीबीआय' चौकशी झाली पाहिजे. सतारूढ पक्षांनी महापालिकेला अधोगतीकडे नेले आहे. जनता या महापालिकेत त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले.

माजीमंत्री नसीम खान म्हणाले, की युतीने शहराचा विकास केला नाही आणि विधानसभा निवडणुकीत येऊन एमआयएमने जातीय तेढ वाढविली. यावेळी हे हैदराबादचे पार्सल परत जाईल. नागरिक दबावतंत्राला बळी पडणार नाहीत. यावेळी आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, एम. एम. शेख, इब्राहिम पठाण उपस्थित होते.

राणेंच्या पराभवाचे दुःख

वांद्रे पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या राणेंचा झालेला पराभव दुःखदायक आहे, असे विखे पाटील म्हणाले. राणे सक्षम उमेदवार आहेत. सहा महिन्यांत दुसऱ्यांदा निवडणूक लढविण्याचे धाडस त्यांनी दाखविले. या निवडणुकीत काँग्रेसचे मताधिक्य वाढले आहे. जय पराजय होत असतो. मतदारांनी काँग्रेसवर विश्वास दाखविल्याचे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images