Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सेना-भाजप युतीला मतदार कंटाळले

$
0
0

औरंगबाद : 'गेल्या २५ वर्षांत शिवसेना-भाजप युतीने शहराला लुटले आहे. शहराचा बट्ट्याबोळ झाला आहे. समांतर भ्रष्टाचार वाहिनी घराघरातून वाहिली. रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये भ्रष्टाचाराचा चिखल झाला आहे. कचऱ्यातून भ्रष्टाचाराचा कुबट वास येत आहे. जनता याला कंटाळली असून आता युतीची सद्दी संपली. पालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकणार,' असा दावा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. महापालिका निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपला. त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले,'या निवडणुकीत आम्ही ताकदीने उतरलो. सक्षम उमेदवार दिले. औरंगाबादकरांना वास्तवाची जाणीव झाली असून ते आमच्या पारड्यात मत टाकतील. चार दिवसांआड पाणी मिळते. रस्त्यावर खड्डे, कचऱ्याचे ढीग याला जनता कंटाळली आहे. ठिकठिकाणी आम्हाला मिळालेला प्रतिसाद पाहता आमचे 'मिशन ६० प्लस' नक्की यशस्वी होईल. महापौर आमचाच होईल,' असा दावा सावंत यांनी केला. शिवसेना-भाजपने राजकीय पोळ्या भाजून घेतल्या. अकार्यक्षमता लपवून ठेवण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तांत्रिक बाबी माहीत नसताना आघाडीवर आरोप करत आहेत. त्यांना नुसते लुटणे माहीत आहे, असा टोला सावंत यांनी लगावला. याप्रसंगी आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, एम. एम. शेख, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेरपर्यंत मोर्चेबांधणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणूक प्रचाराच्या धडाडणाऱ्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री रामदास कदम, काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांच्यासह नेते, मंत्र्यांच्या पदयात्रांनी शहरातील वातावरण ढवळून निघाले. स्थानिक नेत्यांच्या बरोबरीने राज्यस्तरावरील नेत्यांनी अखेरपर्यंत प्रचाराचा धडाका लावल्याने निवडणुकीतील चुरस कमालीची वाढली आहे. बंडखोर तसेच अपक्षांनीही जोर लावल्याने अनेक वॉर्डात विविध पक्षांच्या उमेदवारांची चिंता वाढली आहे.

गेल्या २८ वर्षांपासून महापालिकेची सत्तासूत्रे ताब्यात ठेवणाऱ्या शिवसेना-भाजप युतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार असल्याने शहराचा कारभारही आपल्या हाती राहावा, यासाठी युतीच्या नेत्यांचे प्रयत्न आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (एमआयएम) पक्षाने शहरात प्रवेश केल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रचाराची शिकस्त केली. शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या गुलमंडी वॉर्डात अभिनेते अमोल कोल्हे यांची सभा झाली. पालकमंत्री रामदास कदम यांनीही या सभेत आक्रमकपणे विरोधकांवर हल्ला चढविला. कोल्हे व कदम यांनी सभेबरोबरच अन्य वॉर्डातही प्रचार फेऱ्यांत सहभाग घेत निवडणुकीतील वातावरण अधिकच तापविले. जलसंपदामंत्री आणि भाजप नेते गिरीष महाजन यांनी उल्कानगरी, पवननगर, यादवनगर आदी वॉर्डांमध्ये प्रचार फेऱ्या, कॉर्नर बैठका घेतल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, राज्य प्रदेशाध्यक्ष आमदार स्मिता वाघ, देवयानी फरांदे यांनी सिडको, गारखेडा आदी भागात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मयूरपार्क, अंबिकानगर, जयभवानीननगर आदी भागांत प्रचार बैठका घेतल्या. भाजप नेत्यांनी शेवटच्या तासापर्यंत प्रचाराचा धडाका लावला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री रामदास कदम यांनी संयुक्तपणे युतीचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी विविध वॉर्डातील उमेदवारांसाठी प्रचार फेऱ्या काढल्या. काही वॉर्डांत पदयात्रेतही त्यांनी सहभाग घेतला आणि मतदारांच्या गाठीभेटीवरही त्यांनी भर दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३०० कोटींची पर्यटननगरी

$
0
0

उन्मेष देशपांडे, औरंगाबाद

'औरंगाबादमध्ये ३०० कोटींची पर्यटननगरी आकार घेणार आहे. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे काम २०० एकर जागेवर काही महिन्यात सुरू होईल,' अशी माहिती पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी (२० एप्रिल) 'मटा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.

पालकमंत्री म्हणून कदम यांनी सूत्रे स्वीकारली आणि जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांची आखणी केली. त्यासंदर्भात त्यांनी 'मटा'शी दिलखुलास चर्चा करून आगामी उपक्रमांची माहिती दिली. कदम म्हणाले, 'औरंगाबादपासून ५ ते ७ किमीवर पर्यटननगरीसाठी २०० एकर जागा निश्चित केली. येत्या पंधरा दिवसात ही जागा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष दाखवली जाईल. मुंबईतले स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, संयुक्त महाराष्ट्राचे दालन आणि औरंगाबादेतील हैदराबाद मुक्तिसंग्राम संग्रहालय या तिन्ही वास्तू उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून निर्माण झाल्या. पर्यटननगरीच्या संदर्भातही त्यांच्या काही संकल्पना आहेत. त्यानुसार या जागेचा विकास केला जाणार आहे. त्या जागेवर केवळ प्राणिसंग्रहालय न बनविता विविध प्रकल्प विकसित केले जातील. या कामासाठी बजेटमध्ये ३०० कोटी राखून ठेवले आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासाठी सहकार्य केले.'

समांतर जलवाहिनीः 'समांतर जलवाहिनी प्रकल्पातील त्रुटी दूर करू. येत्या पाच महिन्यांत या योजनेतून नागरिकांना २४ तास शुध्दपाणी मिळेल. हे काम सुरू केले नसते, तर केंद्राचा निधी परत गेला असता. भविष्यात ही योजना झाली नसती. या योजनेचा भार नागरिकांवर पडू देणार नाही,' असे कदम म्हणाले.

रस्ते विकासः 'पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी शहरातील आठ रस्त्यांची कामे सुरू केली, पण निधी दिला नाही. आपण पालकमंत्री झाल्यावर रस्ते विकासासाठी भरघोस निधी दिला. आमदार अतुल सावे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांनी रस्ते विकासासाठी २५ कोटी दिले. डीपीडीसीतून आपण १५ कोटींचा आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून ३० कोटी दिले. या निधीतून रस्त्यांची कामे सुरू होतील. रस्त्यांचे काम दर्जेदार व्हावे यासाठी क्वालिटी कंट्रोलची सक्ती करू. अजिंठा-वेरूळकडे जाणाऱ्या रस्त्यांना विशेष प्राधान्य देऊ. पालिकेला आर्थिक शिस्त लावणार आहे. प्रत्येक महिन्याला शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेऊन पालिकेच्या महसूल वाढीबद्दल प्रयत्न केले जातील. गुंठेवारी भागातील घरे नियमित झाल्यावर पालिकेच्या महसुलात वाढ होणार आहे. त्याचा फायदा विकास कामांना होईल. त्यामुळे अर्थसंकल्प फुगवण्याची वेळ येणार नाही,' असे कदम म्हणाले.

आराखड्याला स्थगिती

शहराच्या विस्तारित विकास आराखड्याला आपण स्थगिती दिली आहे. या आराखड्याची अंमलबजावणी योग्य होत नाही असे लक्षात आले आहे. विस्तारित विकास आराखडा विशिष्ट अधिकाऱ्यांनी हितसंबंध जोपासत तयार केल्याचे लक्षात आल्यामुळे या आराखड्याला स्थगिती दिली आहे' असे कदम यांनी सांगितले.

उद्धव महापौर ठरविणार

महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातीलच महापौर होणार का, असा प्रश्न कदम यांना विचारला असता ते म्हणाले, 'महापौर कोण असेल हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच ठरवतील. त्यांचाच तो अधिकार आहे. शिवसेनेचे बंडखोर निवडून आले तरी त्यांच्याशी कोणतीही तडजोड करणार नाही,' असे त्यांनी ठासून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेरच्या टप्प्यात दणकेबाज प्रचार

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिकेसाठी अखेरच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी दणकेबाज प्रचार करून वातावरण ढवळून टाकले. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, रिपाइ, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी गेल्या चार दिवसांत मॅरेथॉन प्रचार करून खऱ्या अर्थाने निवडणुकीचा आखाडा गाजवून सोडला.

वांद्रे पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक गेल्या आठवड्यात झाली. त्याचा निकाल १५ एप्रिल रोजी लागला. काँग्रेसने शिवसेनेला आव्हान दिल्यामुळे राज्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष मुंबईत लागले होते. तेथील निकाल जाहीर झाल्यानंतरच औरंगाबादकडे सर्वपक्षीय नेत्यांनी येण्यास सुरवात केली. शिवसेना-भाजप युतीला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वात आधी जाहीरनामा प्रसिद्ध करून निवडक वॉर्डातून उमेदवार देऊन आखाड्यात तेवढ्याच ताकदीने उतरत असल्याचे संकेत दिले होते. एमआयएमविषयी विधानसभा निवडणुकीपासून प्रचंड उत्सुकता आहे. रिपाइं, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीही सभा घेतल्या.

गुरुवार ते रविवार प्रचारसभांची धूम होती. दिवसभरात तीन ते पाच सभा घेऊन नेत्यांनी १११ वॉर्डांमधील वातावरण तापविले. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडत शहराच्या विकासासाठी राजकीय पक्षांनी मताचा जोगवा मागितला. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्याने पाहिले. पुढची चार वर्षे कुठल्याही निवडणुका नसल्याने राजकीयदृष्ट्या वर्चस्व प्रस्थापित करण्यात कोण यशस्वी होईल, याचे उत्तर गुरुवारी मिळणार आहे.

राज्यभरातील नेत्यांची प्रचारासाठी शहरात हजेरी

शिवसेना : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार अनिल देसाई, आमदार नीलम गोऱ्हे, संपर्कनेते विनोद घोसाळकर, आमदार अर्जून खोतकर.

भाजप : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री राम शिंदे, दिलीप कांबळे, आमदार चेनसुख संचेती, स्मिता वाघ.

काँग्रेस : प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी पालकमंत्री बाळासाहेब थोरात, माजीमंत्री नितीन राऊत, आरेफ नसीम खान, डॉ. विश्वजित कदम, प्रवक्ते सचिन सावंत.

राष्ट्रवादी काँग्रेस : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, आमदार विद्या चव्हाण.

एमआयएम : पक्षप्रमुख असदुद्दिन ओवेसी, आमदार अकबरुद्दिन ओवेसी, वारीस पठाण, जफर हुसेन.

रिपाइं : खासदार रामदास आठवले.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीः आमदार जोगेंद्र कवाडे.

रिपब्लिकन सेनाः पक्षप्रमुख आनंदराज आंबेडकर.

समाजवादी पार्टीः आमदार अबू आजमी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिछड्या’ भावांचा ३० वर्षांनंतर मिलाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

बारावीमध्ये नापास झाल्यानंतर वडील रागावतील, या भीतीने कंधार येथील तरुणाने घर सोडले. त्याला शोधण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी जंगजंग पछाडल्यानंतरही हा तरुण सापडलाच नाही. अखेर शोध थांबविला, तरीही आपला भाऊ कधी तरी परत येईल, अशी वेडी आशा त्याच्या बहिणीला होती. तीस वर्षांनंतरही ती शक्य त्या मार्गाने भावाचा शोध घेत होती. फेसबुक प्रोफाइलवरूनही तिने शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या या तपश्चर्येला यश आले. तीस वर्षांच्या काळानंतर हा तरुण कंधारमध्ये आला आणि ताटातूट झालेल्या या कुटुंबीयांची भेट झाली.

नांदेड जिल्ह्यातील कंधारच्या लाठकर कुटुंबीयांसाठी हा प्रसंग घडला. व्यवसायाने वकील असणाऱ्या दिनकरराव लाठकर यांना दोन मुले व एक मुलगी, त्यातील जयवंत हा मोठा मुलगा. तो १९८६मध्ये बारावीला होता आणि परीक्षेत नापास झाला. वडील रागावतील, या भीतीने त्याने आईकडून वीस रुपये घेतले आणि नांदेडला काकांकडे गेला. तिथे आठ दिवस राहिल्यानंतर, काकांकडून जयवंत आल्याचा निरोप कंधारला गेला होता. त्याला घेण्यासाठी दिनकरराव आणि त्यांच्या पत्नी नांदेडला गेल्या. मात्र, जयवंतने आदल्या दिवशीच कंधारला जाण्यासाठी घर सोडले होते. प्रत्यक्षात जयवंत कंधारला कधीच आला नाही आणि त्यानंतर दोन-तीन वर्षे शोध घेतल्यानंतरही त्याचा पत्ता लागला नाही. दोन-तीन वर्षांच्या शोधानंतर नाईलाजाने शोध थांबविण्यात आला. मात्र, औरंगाबादमध्ये राहणाऱ्या जयवंतच्या बहिणीच्या मनामध्ये हरवलेल्या भावाची सल कायम होती. अखेर फेसबुक पाहताना त्यांना अविनाश ताम्हणे या व्यक्तीचा चेहरा जयवंतसारखा वाटला. कुतुहल वाटल्यामुळे त्यांनी फेसबुकवरून त्याच्याशी मैत्री केली. सुरुवातीच्या ओळखीनंतर ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर मिळविला. त्यावरून संपर्क केल्यानंतर जुनी माहिती विचारली आणि अनेक गोष्टी जुळून आल्यानंतर तो जयवंतच असल्याची खात्री पटली. जयवंतला एका गुजराती कुटुंबीयाने वाढविले होते आणि सध्या तो उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका बँकेमध्ये नोकरीला आहे. त्याचे लग्न झाले असून, तो कुटुंबीयांना भेटण्यासाठी कंधारलाही येऊन गेला.

गुजराती कुटुंबीयाची भेट आणि अपघात

कंधारला परतताना झालेल्या अपघाताची माहिती सांगताना जयवंत म्हणाला, 'कंधारला परतत असताना, त्याला एक गुजराती कुटुंब भेटले. त्यांना कंधार किल्ला दाखविण्यासाठी मी गाडीमध्ये बसलो. कंधारकडे येत असताना गाडीला अपघात झाला. त्यात गाडीतील काही जण जखमी झाले, तर मी गंभीर जखमी झालो. त्या कुटुंबीयाने मला त्यांच्याबरोबरच नेऊन उपचार केले. माझ्यावर उपचार करून, त्यांनीच माझे पालणपोषण केले. अजय ताम्हणे असे त्यांचे नाव होते. मी त्यांनाच आईवडील समजत गेलो आणि त्यांनी माझे नाव अविनाश असे ठेवले.' ताम्हणे व्यापारी असल्याने वेगवेगळ्या राज्यात सतत जात असत नंतर आम्ही दिल्ली च्या बाजूस गाझियाबाद येथे स्थायिक झालो. नंतरच्या काळात बरेली येथे एका मुलीसोबत माझे लग्न लावून दिले. दोन महिन्यांपूर्वीच अजय ताम्हणेंनी त्याला ही माहिती दिल्याचे त्याने सांगितले.

चिठ्ठी आणि त्यानंतरची तगमग

अजय ताम्हणे यांनी जयवंतला दिलेल्या चिठ्ठीमध्ये मंजुषा दिनकर पंत लाठकर (रा. कंधार) असे लिहिलेले होते. ही माहिती कळाल्यानंतर सतत घटनेने आठ दिवस मला डोकेदुखीचा त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर फेसबुकवरून शोधल्यानंतर भाऊ सुमंत लाठकरचा संपर्क झाला. मोबाइलवरून भावाला बोलत असताना, माझा भाऊ माझ्यावर विश्वास ठेवलेला नव्हता. मी त्याला जुन्या आठवणी ओळखीचे प्रसंग सांगितल्यावर त्याचा माझ्यावर विश्वास बसला, असेही त्याने सांगितले. त्यानंतर दिल्लीत राहणाऱ्या कंधारच्या संतोष जवादवार यांनी माझी भेट घेतली आणि त्यानंतर कुटुंबीयांशी संपर्क झाला. या काळामध्ये अविनाशला नीट मराठी बोलता येत नाही. तसेच, त्याला कंधारच्या त्याच्या शेतातील गड्याचे नाव मात्र आठवते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंब्याचे तूर्त तरी ‘दूरदर्शन’च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

अक्षय्य तृतीयेसाठी फळाचा राजा आंबा शनिवारपासूनच उस्मानाबाद शहरात दाखल झाला होता. परंतु, आंब्याचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्याला परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे अनेकांनी मंगळवारी हापूस आंबा दर्शनानेच अक्षय्य तृतीया सण साजरा केला.

शनिवारपासूनच उस्मानाबाद शहरात आंब्याची आवक सुरू झाली होती. यामध्ये रत्नागिरीचा हापूस, कर्नाटकातील लालबाग तर हैदराबाद व विजयवाडा येथील बदाम जातीच्या आंब्याचा समावेश होता. मात्र, आंब्याची आवक कमी असल्यामुळे आंब्याचे दर सामान्यांचे आवाक्याबाहेर होते. 'अवकाळी पाऊस, गारपीट, सुसाटवारे यामुळे यंदा देवगड हापूस आंब्याची आवक मंदावली आहे. परिणामी, हापूस आंब्याचे भाव तेजीकडे झुकलेले आहेत. याचा परिणाम‌ गिऱ्हाईकांवर झाला आहे,' असे फळांचे व्यापारी हरी पेढे यांनी सांगितले.

रत्नागिरी हापूसची भूक कर्नाटक किंवा बलसाड हापूसवर भागविण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे, अशी शीतल जैन यांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. अक्षय्य तृतीयेसाठी आंबा खरेदी करण्यासाठी आलेल्या बहुतांश नागरिकांच्या भावनाही अशाच होत्या. त्यामुळे थोडे आंबे खरेदी करत, भाव आवाक्यात येण्यासाठी प्रतीक्षा करण्याचा निर्णय अनेकांनी घेतल्याचे दिसून येत होते.

प्रशासनाचे दुर्लक्ष

आंबा लवकर पिकविण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाईडचा वापर सद्या फ्रुट मार्केटमध्ये चोरट्या पद्धतीने केला जात आहे. मात्र, याकडे अन्न व औषध प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे. हितसंबंधामुळेत अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी या कार्बाईडच्या वापराकडे कानाडोळा करीत आहे, असा आरोप होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात सॉ मिलची अखंड घरघर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जिल्ह्यात बेसुमार वृक्षतोड सुरू असून कापलेल्या मोठमोठ्या वृक्षांची कटाई करणाऱ्या शहरातील पन्नासहून अधिक सॉ मिल अखंडीत सुरू असल्याचे दिसून येत आहे. दुष्काळाचा सातत्याने फेरा येणाऱ्या जालना जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र जेमतेमच आहे. मात्र, वन क्षेत्रासाठी आरक्षित असणाऱ्या बहुतांश क्षेत्रावर बेसुमार वृक्षतोड झाली असून, जिल्ह्यात नाममात्र वनक्षेत्रच उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. जालना शहरालगत औद्योगिक वसाहती शेजारीच असणाऱ्या राखीव जंगलात आता केवळ बंजर जमिनच शिल्लक राहिली आहे. मोतीबाग तलावक्षेत्राच्या मागील परिसरात राजीव गांधी उद्यान आहे. मात्र, या ठिकाणी फक्त पावसाळ्यात गवत उगवते आणि त्याच्या संरक्षणासाठीच वन खात्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. जालना जिल्ह्यात एकूण सरासरी नऊ हजार ९९३ हेक्टर क्षेत्रात जंगल आहे. मात्र, प्रत्यक्षात हजारो हेक्टर क्षेत्रात अतिक्रमणे झाली आहेत. यात काही जणांविरुद्ध न्यायालयात खटले प्रलंबित आहेत. शहरातील कन्हैयानगर परिसरालगत असलेले राखीव जंगलात मोठे अतिक्रमण झाल्याचे दिसून येते आहे.

शहराच्या पूर्व दिशेला सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा रस्त्यावर सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्रावर राखीव जंगल आहे. या ठिकाणी झाडे तोडून नेणाऱ्या टोळ्यांचा धुमाकुळ सुरू असून, लाकूड तोडणाऱ्या ट्रकची या भागामध्ये अखंड वाहतूक सुरू आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तारांचे कुंपण करण्यात मोठा खर्च करण्यात आला आहे. मात्र, हे कुंपण अगदीच कुचकामी आहे. अनेक ठिकाणी या कुंपणाचे खांब उखडून चोरट्यांनी लंपास केले आहेत.

वनखात्याकडून प्रतिसाद नाही

जालन्यात वनखात्याची दोन कार्यालये आहेत. या प्रकरणांमध्ये या कार्यालयांमध्ये जाऊन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकारी उपलब्ध नव्हते आणि त्यांनी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतरही प्रतिसाद दिला नाही.

तापमानवाढ रोखणे आवश्यक

जालन्यात स्टील उद्योगात सुमारे चाळीसहून अधिक लोखंड वितळवणाऱ्या भट्ट्या आहेत. प्रत्येक भट्टीचे तापमान किमान चौदाशे अंश सेल्सिअसइतके आहे. या तापमानामुळे शहरातील वातावरण बदलून जाते आणि किमान तापमानामध्येही वाढ होत असते. ही तापमानवाढ रोखण्यासाठी शहरामध्ये वृक्षसंवर्धन करण्याची गरज आहे.

संवर्धनाच्या निधीचे गौडबंगाल

जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळात जालन्यातील स्टील उद्योगपतींच्या वतीने दीड कोटी रुपयांचा निधी वन संवर्धनासाठी देण्यात आला. या वेळी यांच्या रक्कमेतून शहराला लागून असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणावर झाडे लावून त्यांचे संगोपन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मुंडे यांच्या हस्ते प्रारंभी वृक्षारोपण करण्यात आले होते. मुंडे यांची काही दिवसांनंतर बदली झाली आणि त्यानंतर हा कार्यक्रमही बदलून गेला. या दीड कोटी रुपयांचा निधी खर्च कुठे करण्यात आला, हेही गुलदस्त्यात आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वैद्यनाथ’चा फड आला रंगात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची २६ एप्रिल रोजी निवडणूक होत असून, मुंडे विरुद्ध मुंडे अशा होत असलेल्या या निवडणुकीकडे साऱ्या मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून, दोन्ही गटांकडून घेण्यात येणाऱ्या प्रचारसभांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा सत्ताधारी पॅनेलकडून सभासदांसमोर मांडण्यात येत आहे, तर धनंजय मुंडे कारखान्याच्या कारभारावर जोरदार टीका करत आहेत.

'वैद्यनाथ साखर कारखाना या भागातील शेतकऱ्यांची रोजीरोटी आहे. मुंडेसाहेबांनी स्वकष्टातून निर्माण केलेली ही संस्था जपणे प्रत्येक सभासदाचे कर्तव्य आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याला आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत घेत असून सभासदांनी आम्हाला शक्ती द्यावी,' असे आवाहन लोकनेते गोपीनाथ मुंडे वैद्यनाथ पॅनलच्या उमेदवार युवा नेत्या यशश्री मुंडे यांनी केले.

लोकनेते गोपीनाथ मुंडे वैद्यनाथ पॅनलच्या प्रचारासाठी यशश्री मुंडे यांनी सभासद मतदारांशी संवाद साधला. पॅनलचे उमेदवार आमदार आर. टी. देशमुख, फुलचंद कराड, नामदेव आघाव, श्रीहरी मुंडे, शिवाजीराव गुट्टे, परमेश्वर फड, आश्रोबा काळे, किशन शिनगारे या वेळी उपस्थित होते. यशश्री मुंडे म्हणाल्या, 'वैद्यनाथ साखर कारखान्यावर सभासदांची मालकी आहे, त्यावर दरोडा घालण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी या भागातील शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी साकारलेले हे स्वप्न आम्ही आयुष्यभर जपणार आहोत त्यासाठी आपली साथ आम्हाला पाहिजे आहे. गोपीनाथ मुंडे यांनी कारखान्याला प्रगतीच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. त्याला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आम्ही सर्व उमेदवार कठोर मेहनत घेत आहोत. सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत.'

या वेळी त्यांनी विरोधी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलवरही टीका केली. त्या म्हणाल्या, 'विरोधी पॅनेलची मंडळी केवळ शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी निवडणुकीत उतरली आहे. स्वतःच्या ताब्यातील संस्था मुळासकट उपटून खाणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे अशा लोकांना पुन्हा एकदा जागा दाखवून द्या.'

जिल्ह्याबाहेरील उसाचे गाळप सभासदांना मारक

'कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांचा पंधरा-पंधरा महिन्यांचा उस वाळवायचा आणि परभणी, नांदेड जिल्ह्यातील नऊ महिन्यांच्या उसाचे गाळप करून स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधण्याचे काम वैद्यनाथ कारखान्याच्या संचालकांनी केले आहे. सभासद शेतकऱ्यांचे आणि कारखान्याचे नुकसान करणाऱ्या या सत्ताधारी संचालकांना पराभूत करा,' असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. तर, ऊसतोडीत भालेराव टोळीच्या नावाखाली करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीतील वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांनी उजणी, उजणी व बारावाड्या, निरपणा, बागझरी येथील सभासदांच्या बैठका घेऊन वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन केले.

धनंजय मुंडे म्हणाले, 'वैद्यनाथच्या संचालकांनी 'घरचे उपाशी आणि बाहेरचे तुपाशी' या म्हणीप्रमाणे कारभार केला. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस वाळेपर्यंत गाळप करायचे नाही आणि बाहेर जिल्ह्यातील नऊ महिन्यांचा ऊस गाळप करून त्यांना काटा पेमेंन्ट करायचे, या संचालकांच्या रितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आमचे पॅनेल विजयी झाल्यास बाहेरचे कारखाने चालवणार नाही. तसेच सभासदांचा ऊस संपेपर्यंत बाहेरचा ऊस आणणार नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिल्लोडमधून टँकरचे प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड तालुक्यात वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई भेडसावत आहे. सध्या तालुक्यातील बारा गावांना १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून १७ गावांसाठी ३६ खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पाणीटंचाई तीव्र होत असल्याने बायागत पट्ट्यातून प्रशासनाकडे टँकरचे प्रस्ताव दाखल होत आहेत.

तालुक्यात नुकताच अवकाळी पाऊस व गारपीट झाली तरी, बायागत पट्ट्यात पाणीटंचाई जाणवत आहे. खाजगी विहीर अधिग्रहणासाठी मोढा खर्द येथून प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पिंपळदरी, सराटी, मुखपाठ, दीडगाव, परदेशीवाडी या पाच गावांतून टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत. टँकरचे प्रस्ताव आल्यानंतर मंजुरी आधी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग, भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रेणेतर्फे पाहणी केली जाते. या पाहणीसाठी हे प्रस्ताव सध्या प्रलंबित आहेत. अंधारी हे बाजारपेठेचे मोठे गाव असल्याने येथून अतिरिक्त टँकरची मागणी करण्यात आली आहे. हा प्रस्तावही प्रलंबित आहे. तालुक्यातील अंधारी, अनाड, पळशी, जंजाळा खातखेडा, रेलगाववाडी, कोऱ्हाळातांडा, गव्हाली, पिंपळदरीवाडा, पिंप्री, वरूड, डकला या गावांमध्ये १९ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे. टाकळी, आसडी, म्हसला, निल्लोड, भराडी, उपळी,कोऱ्हाळा बनकिन्होळा, मांडगाव रेलगाव, लोणवाडी, वरखेडी, भायगाव अंधारी आदी गावांसाठी खाजगी विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारला अपघात; एक ठार, ३ जखमी

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, वाळूज

लासूर येथून यात्रा करून परत येताना कारला झालेल्या अपघातात कारचालक ठार झाला तर 3 जण जखमी झाले आहे. खवडा डोंगर परिसरात हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भावसिंगपुरा येथील संदीप मधूकर शेट्टी (२३) हे अपल्या कुटुंबियांना घेऊन इंडिगो कारने (एमएच-२२ बी-२४०४) लासूर येथे यात्रेसाठी गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर नागपूर मुंबई हायवे मार्गाने ते परत येत होते. दरम्यान, सकाळी दहा वाजेच्या सुमारास कार खवडा डोंगर जवळ आल्यावर संदीप यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. त्यात संदीप हा जागीच ठार झाला तर गाडीतील इतर तीन जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना घाटीत दाखल केले. अपघाताची नोंद एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या नोटीसमुळे गावपुढारी संतप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा

दुष्काळी परिस्थ‌ितीमुळे ए टू झेड या सामाजिक संस्थेने पाणी साठवण्यासाठी साताऱ्यात ५ हजार लिटरच्या प्लास्टिकच्या २० टाक्या दिल्या होत्या. तत्कालीन ग्रामपंचायत सदस्यांनी त्या टाक्या २ दिवसात परत कराव्यात नसता गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी नोटीस सातारा-देवळाई नगरपालिकेने बजावल्याने माजी सदस्य संतप्त झाले आहेत. ग्रामपंचायतीने दिलेल्या टाक्या नगरपालिका कशी काय परत मागू शकते, असा सवाल त्यांनी केला आहे.

दुष्काळी परिस्थ‌ितीवर मात करण्यासाठी सामाजिक संस्था सरसावल्या होत्या. ५ हजार लिटरच्या २० टाक्या या संस्थेकडून सातारा ग्रामपंचायतीला मिळाल्या होत्या. तत्कालीन ग्रा.पं. सदस्यांचे मत विचारात घेऊन वॉर्डात आवश्यक त्या ठिकाणी या टाक्या बसविण्यात आल्या. एवढाच काय तो सदस्यांचा टाक्यांसंदर्भात आलेला संबंध. नगरपालिका आठ महिन्यांपूर्वीच अस्तित्वात आली. त्यासोबतच या सर्वांचे सदस्यपदही गेले. मंगळवारी नगरपालिकेने या टाक्या परत करण्यासंदर्भात सर्वच सदस्यांना नोटीस बजावली. त्या टाक्या दोन ‌दिवसात कार्यालयात जमा कराव्यात, नसता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यात नमूद केले आहे. या प्रकारामुळे सदस्य संतप्त झाले असून त्या टाक्या ग्रामपंचयातीने सदस्यांना दिल्या नव्हत्या. त्यामुळे अशी नोटीस बजावण्याचा नगरपालिकेला काहीही अधिकार नाही, असे या सदस्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरकपात झाल्याने दूध उत्पादक अडचणीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

दुधाचा दर लिटरमागे सहा रुपये कमी झाल्याने तालुक्यातील अंधारी परिसरातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शासनाने किमान तीस रुपये भाव द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

तालुक्यातील अंधारी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीला जोडधंदा म्हणून दूग्ध व्यवसाय करतात. येथून सकाळ व सायंकाळी सुमारे चारशे लिटर दूध डेअरीला घातले जाते. परंतु, काही दिवसांपासून दुधाचा दर २२ रुपये लिटरवरून १६ रुपयांवर आला आहे. दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जनावारांच्या चाऱ्याचा दर, ढेप, सुग्रास, वेळोवेळी जनावरांना दिली जाणारी औषधी आदींचा खर्च वाढला असतांना भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. यामुळे दुधाळ जनावरांचा सांभाळ करणे कठीण जात आहे. दुधास प्रति लीटर तीस रुपये दर द्यावा अशी मागणी सिद्धेश्वर मोहिते, साहेबराव पांडव, अस्लम पटेल, सुदाम तायडे, महादू तायडे, ज्ञानेश्वर मोहिते, काकासाहेब थोरात, पंढरीनाथ ढेपले आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३ माय-लेकींचा तलावात बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन माय-लेकींचा आडगाव माऊली येथील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. तळ्यात पडलेल्या सगळ्यात लहान मुलीला वाचवण्यासाठी उडी मारलेल्या दोघींचाही या घटनेत अंत झाला. त्यांच्यासोबतचा नऊ वर्षाचा मुलगा बचावला आहे.

करमाडजवळील आडगाव माऊली येथील अमिनाबी हसनखान (वय ३२) या मंगळवारी (२१ एप्रिल) शकिला (वय १२), अकिला (वय १०) व इम्रान (वय ९) या मुलांना सोबत घेऊन पाझर तलाव क्रमांक ३ येथे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुताना दहा वर्षाची अकिला तोल जाऊन पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी शकिला पाण्यात उतरली; मात्र दोन्ही मुली गटांगळ्या खात असल्याने अमिनाबी यांनी पाण्यात उडी मारली. अमिनाबी यांनाही पोहता येत नसल्याने त्याही गटांगळ्या खात होत्या. नऊ वर्षाच्या इम्रानने घाबरून आरडाओरडा सुरू केला. त्याच्या आवाजाने गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली तोपर्यंत तिघी पाण्यात बुडाल्या होत्या. त्यांचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती कळविल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या करमाड पोलिसांनी मृतदेह औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवले. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अकिला व शकिला या दोघी उर्दू प्रशालेत अनुक्रमे पाचवी व तिसरीच्या विद्यार्थिनी होत्या. एकाच घटनेत तिघींचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. गावकरी व नातेवाईकांनी घाटी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसभर शहरात पोलिसांचे पेट्रोलिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बुधवारी महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदान होणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. पेट्रोलिंगवर भर देण्यात आला असून, झोन व बुथनिहाय पेट्रोलिंग करण्याचे नियोजन पोलिस खात्याने आखले आहे.

शहरात एकूण ६५७ मतदानकेंद्रावर बुधवारी मतदान होणार आहे. यासाठी ७० अधिकारी, १३८४ पोलिस कर्मचारी, ४८४ होमगार्ड व केंद्रीय राखीव दलाचे ४२ प्लाटून या केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. तसेच पेट्रोलिंगसाठी वेगळी योजना राबवण्यात आली आहे. परिमंडळ एक व परिमंडळ दोन झोनमध्ये ५३ ठिकाणी पेट्रोलिंग, तर सहायक पोलिस आयुक्त सर्कलमध्ये ६४ ‌ठिकाणी पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. बुथवर तसेच पोलिस ठाणे हद्दीत वेगळी पेट्रोलिंग पथके राहणार असून ४४ बीट मार्शल देखील त्यांच्या बिटमध्ये पेट्रोलिंग करणार आहेत. पेट्रोलिंग दरम्यान प्रत्येक झोनल ऑफीसर सोबत विशेष शाखा तसेच गुन्हेशाखेच्या ५३ अनुभवी कर्मचाऱ्यांची विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रेष्ठींचे दुर्लक्ष; पालिकेत काँग्रेस बॅकफूटवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खालेल्या काँग्रेसला औरंगाबाद महापालिकेत जोरदार कमबॅक करण्याची संधी होती. मात्र, श्रेष्ठींनी औरंगाबाद निवडणुकीकडे फारसे गांभीर्याने लक्ष न दिल्याने आजतरी काँग्रेस पुरती बॅकफूटवर आहे.

महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने संघटनात्मक बदल केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे राज्याची कमान सोपविली. मराठवाड्याचे नेते असलेल्या चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला होता. उमेदवार निवडीपासूनच काँग्रेस चर्चेत राहिली. आरेफ नसीम खान, विश्वजित कदम, सचिन सावंत, बाळासाहेब देशमुख, नितीन राऊत यांना निरीक्षक म्हणून धाडले. विधानसभा निवडणुकीत एमआयएमने काँग्रेसला धोबीपछाड दिल्याने पालिका निवडणूक लढविण्यास किती जण येतील, असा प्रश्न होता. पण ११३ वॉर्डांतून तब्बल ६५० इच्छुक आले होते. दोन दिवसांच्या मुलाखतीनंतर यादी फायनल करण्यासाठी तब्बल दहा दिवस लागले. मुंबईत बैठकांचे सत्र झाले. याच काळात विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करावी, अशी मागणी केली. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या गुढीपाडव्यादिवशीच्या दौऱ्यात बहुतांश स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आघाडी नको असा सूर लावला होता. त्यामुळे चव्हाणांनी हा निर्णय स्थानिकांवर सोपविला आणि अखेरच्या क्षणी काँग्रेसने स्वतंत्र लढणार असल्याचे सांगून एकप्रकारे शिवसेना - भाजप युतीला निवडणूक सोपी करून देण्याचा पहिला टप्पा पार केला. उमेदवार निवडताना असंख्य अडचणी आल्या. १०८ वॉर्डांतून अधिकृत उमेदवार जाहीर केले गेले आणि पाच ठिकाणी अपक्षांना पुरस्कृत केले. एमआयएमचा प्रभाव असलेल्या वॉर्डांमधूनही अशीच पद्धती अवलंबिली गेली. मात्र, यावेळी मुस्लिमबहुल वॉर्डातील उमेदवार निवडताना विशेष काळजी घेतली गेली. एमआयएमशी टक्कर देणारा उमेदवार असा निकष ठेवूनच उमेदवार निवडले. शिवसेना - भाजपच्या पट्ट्यात मात्र तुलनेत कमकुवत उमेदवार दिल्याचे खुद्द पक्षातील नेते सांगत आहेत. उमेदवारी दिल्यानंतर त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी नेत्यांनी वॉर्डात फिरणे आवश्यक असते. प्रदेशाध्यक्ष चव्हाण, विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी धावते दौरे करून औपचारिकता पार पाडली. आमदार सुभाष झांबड यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविली गेली. आमदार अब्दुल सत्तार शेवटचे तीन दिवस सक्रिय झाले होते. माजी आमदार एम. एम. शेख, डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आपापली बाजू सांभाळली, पण काँग्रेसकडून एकसंघ प्रचाराची पद्धती अवलंबिल्याचे कुठेच दिसले नाही.

विखे, थोरात, खान, राऊत वगळता एकही बडा नेता औरंगाबादला फिरकला नाही. वांद्र पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस काहीशी बॅकफूटवर गेली. ती पुढे आल्याचे चित्र कुठेच दिसले नाही. उमेदवारांनी मात्र आपापल्या परीने किल्ला लढविला. आत्मविश्वास कमी झालेल्या काँग्रेसला किती जागा मिळणार याची उत्सुकता मात्र असणार आहे.

महिला आघाडी सक्रिय नाही

महिला पदाधिकाऱ्यांना डावलून नेत्यांच्या नातेवाइकांना तिकीट दिल्याबद्दल महिला आघाडीत नाराजी पसरली. थेट मुंबईपर्यंत तक्रारी झाल्या. महिला आघाडी प्रचारात कुठेच सक्रिय दिसली नाही. त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांचे पंख कापून दुसऱ्याच उमेदवारांच्या गळ्यात माळ घालण्याचे प्रकार अनेक वॉर्डात घडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैसे वाटल्याप्रकरणी शिवेसना उमेदवारावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कबीरनगर वॉर्डातील शिवसेना उमेदवार विशाल इंगळे यांच्याविरुद्ध मतदारांना पैसै वाटप केल्याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चिकलठाणा एमआयडीसी वॉर्डातील भाजप उमेदवार राजू शिंदे यांच्याविरुद्धही पैसे वाटप करीत असल्याचा तक्रार अर्ज सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याशिवाय उस्मानपुरा पोलिस ठाण्यातही पैसे वाटप केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल झाला आहे.

शिवेसना उमेदवार विशाल इंगळे व त्यांच्या वडिलांनी आपल्याला दोन हजार रुपये व एक चिठ्ठी दिली, त्यात मतदानानंतर एका मताला पाचशे रुपये या प्रमाणे दोन हजार रुपये देण्यात येतील, असा उल्लेख होता, अशी तक्रार सुनील गंगाधर घोरपडे (रा. मिलिंदनगर) यांनी पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून विशाल इंगळे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उस्मानपुरा परिसरात काही उमेदवारांचे समर्थक मतदारांना पाचशे रुपयांची नोट देताना सोबत दहा रुपयांची स्वाक्षरी केलेली नोट देत आहेत. निवडून आल्यानंतर सहीची नोट मतदाराने दाखवावी व हजार रुपये घेऊन जावे, असे आमिष दाखवण्यात येत आहे, अशी तक्रार अपक्ष उमेदवार मिलींद खंडागळे यांनी दिली. त्यावरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिकलठाणा एमआयडीसी वॉर्ड क्रमांक ३८ येथील भाजपचे उमेदवार राजू शिंदे एका बंद कंपनीत पैसे वाटप करीत असल्याची तक्रार अपक्ष उमेदवार सचिन मिसाळ यांनी सिडको एमआयडीसी पोलिसांकडे केली होती. या तक्रारीवरून संबंधित ठिकाणी तपासणी केली. परंतु, काहीही आढळले नाही, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छोट्या भावाला अपेक्षा मोठ्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत मोठे यश प्राप्त करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला महापालिका निवडणुकीत तोच कित्ता गिरविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. बंडखोरी, स्थानिक नेत्यांमधील समन्वयाचा अभाव आदी कारणांमुळे काहीसा बॅकफूटवर गेलेल्या भाजपला सेनेचे पाठबळ कितीपत मिळते, यावरच मोठ्या विजयाचे गणित अवलंबून आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपने ३९, तर शिवसेनेने ५९ जागा लढविल्या होत्या. त्यात त्यांना अनुक्रमे १५ आणि ३० जागावर यश मिळाले. मात्र, १२ नगरसेवक तबूंत दाखल झाल्याने पक्षाची ताकद वाढली आहे, असे सांगत भाजच्या नेत्यांनी जागा वाटपात अधिक जागांवर दावा केला होता. तर स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे, असा सूर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा होता, पण नेते युतीच्या बाजुने होते. स्थानिक पातळीवर जागा वाटपासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या वांझोट्या ठरल्या. त्यानंतर युतीच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष घालावे लागले. त्यात काथ्याकूट झाल्यानंतर भाजपला मात्र दुय्यम स्थान मिळाले. आणि पक्षाचे मिशन ६० प्लसचे टार्गेट मागे पडले. त्यानंतर मिळालेल्या ४९ जागांमधून जास्तीत जास्त जागावर विजय मिळविण्यासाठी प्रचाराची खास तिहेरी यंत्रणा राबविण्यात आली. उमेदवार व त्यांची यंत्रणा, स्थानिक पदाधिकारी तसेच प्रदेशातूनही खास कुमक मागविण्यात आली होती. तिकीट वाटपात आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नातेसंबधातील लोकांना तिकीट वाटप केल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. ती दूर करण्यासाठी नेत्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अर्थात, ते कितपत यशस्वी ठरले, ते निकालानंतरच स्पष्ट होईल.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा घेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणाचा पाऊस पाडला. त्यात प्रचारापासून दूर राहिलेल्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी हजेरी लावत काही वॉर्ड नंतर पिंजून काढले.

महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री राम शिंदे, दिलीप कांबळे, आमदार चेनसुख संचेती, स्मिता वाघ आदी नेत्यांनी प्रचारासाठी हजेरी लावत भाजपच्या पारड्यात अधिक वजन पडावे यासाठी प्रयत्न केले. त्याप्रमाणे संघाची मदतही भाजपने घेतली असून लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीत भाजप करिश्मा दाखविणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दानवेंची प्रतिष्ठा पणाला

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेवटचे तीन दिवस येथेच तळ ठोकला. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांची पहिलीच निवडणूक असल्याने त्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. त्यामुळे त्यांनी वॉर्ड फेऱ्या, कॉर्नर बैठका घेत प्रचार केला. मात्र, बंडखोरी मोडून काढण्यात त्यांना पुरेसे यश आले नाही. सेनेच्या आठ ते दहा बंडखोरांनी भाजप विरोधात तर भाजपच्या ४ ते ६ बंडखोरांनी सेनेच्या उमेदवारांविरोधात निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांची खर्चात चक्क काटकसर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला चार लाख रुपयांची खर्च मर्यादा होती, परंतु बहुतेक उमेदवारांची निवडणूक एक लाख रुपयांपेक्षा कमी खर्चात आटोपली आहे. १११ वॉर्डातून ९०४ उमेदवार रिंगणात अाहेत. त्यापैकी अवघ्या १६ उमेदवारांचाच खर्च एक लाखांपेक्षा अधिक झाला आहे, हे विशेष. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आकड्यांपेक्षा प्रत्यक्षातील आकडे भयंकर आहेत हे उमेदवारही खासगीत मान्य करतात.

निवडणुकीसाठी विविध गोष्टींचा वापर करण्याकरिता दरसूचीच जाहीर करण्यात आलेली होती. त्यात प्रामुख्याने वाहन, चहा, नाष्टा, जेवण, प्रिटिंग, जाहिरात, व्हिडिओ शुटिंग, प्रचार साहित्य, पाणी पाऊच, टेबल, खुर्च्या, मंडप, साउंड सिस्टिम अशा विविध गोष्टींचा समावेश आहे. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. काही उमेदवारांनी खर्च देण्यास टाळाटाळ केली, त्यांना निवडणूक विभागाने नोटीसही बजाविल्या. निवडणूक विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार; १६ उमेदवारांनी एक लाखांपेक्षा अधिक खर्च केलेला आहे. त्यात अपक्षांची संख्या पाच आहे, हे विशेष. नारेगाव वॉर्डातून शहा जुबेर कादर यांनी १ लाख ७७ हजार ८२ रुपये इतका खर्च सादर केलेला आहे. त्यापाठोपाठ शिवाजीनगरमधून रिंगणात असलेले सेनेचे राजेंद्र जंजाळ यांचा क्रमांक लागतो. त्यांनी १ लाख ६० हजार ५०९ रुपये खर्च केला आहे. राजनगर-मुकुंदनगर वॉर्डात भाजपच्या गंगाबाई भवरे (१ लाख २ हजार ३००), बारी कॉलनीत काँग्रेसच्या सोफिया बानो (१ लाख ४२ हजार), कैसर कॉलनीत एमआयएमच्या शाहेदा खातून शहानवाज खान (१ लाख ७ हजार), संजयनगरात शेख समिना इलियास (१ लाख ३२ हजार), अविष्कार कॉलनीत समाजवादी पक्षाचे शेख अजहर (१ लाख २२ हजार), एमआयएमचे शेख अज्जू नाईकवाडी (१ लाख ३३ हजार) यांनी दीड लाखाच्या आतच आपला खर्च ठेवला. सिडको एन-६ वॉर्डात शिवसेनेच्या शीतल गादगे व काँग्रेसच्या विजया जुनागडे यांनी एक लाखांपेक्षा अधिक खर्च केला आहे.

अपक्ष उमेदवारांचा खर्चही लाखात

मयुरनगर वॉर्डात अपक्ष माया भदाने यांनी १ लाख ३५ हजार २७७ रुपये तर, सुरेवाडीत अपक्ष सतीश ताठे यांनी १ लाख ९ हजार ९०१ रुपये खर्च केला आहे. पारिजातनगर येथून रिंगणात असलेल्या अपक्ष राधिका शर्मा यांनी १ लाख ७ हजार ४९६ रुपये तर, भवानीनगर वॉर्डात अपक्ष गंगाबाई भवरे यांनी १ लाख २ हजार ३०० रुपये खर्च सादर केलेला आहे. गणेशनगर वॉर्डातून रिंगणात असलेले काशीनाथ कोकाटे यांनी १ लाख ३४ हजार ५२६ रुपये खर्च केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण बाजार समिती बरखास्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

बाजार समितीचे हित न जोपासणे, कर्तव्यात कसूर करणे, नियमांचे उल्लंघन आदी आक्षेप नोंदवत जिल्हा सहकार उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. या बाजार समितीवर सहायक निबंधक एस. इ. सोन्ने यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आगामी सहा महिन्यांत निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरव्यवहार व अनियमितता होत असल्याची तक्रार बाजार समिती संचालक राम एरंडे व माजी आमदार संदीपान भुमरे यांनी अनुक्रमे ६ जानेवारी २०१४ व ३१ जानेवारी २०१४ ला केली होती. अडीच वर्षांपूर्वी ३० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या माती व पाणी परीक्षण केंद्रात अद्याप माती व पाणी परीक्षणास सुरुवात करण्यात आली नाही. बाजार समितीच्या मालकीचे विहामांडवा येथील १११ प्लॉट ऐनवेळी ठराव घेऊन व वरिष्ठ कार्यालयाची मान्यता न घेता विक्री करण्यात आले. चारा छावण्यांमध्ये साहित्य खरेदी, शेणखत विक्री, चारा छावणी चालविण्यासाठी बेकायदेशीर व्यक्तीची निवड करणे व मिळालेल्या अनुदानापेक्षा तीन लाख १६,५३२ रुपये अधिक खर्च करणे. अज्ञात व्यक्तीने बोगस पावती बुक छापून मार्केट फी वसूल करणे व कोणतेही काम न करता जेसीबीच्या भाड्यापोटी पाच लाख रुपये चेकद्वारे देणे आदी तक्रारी होत्या. या अनुषंगाने सहायक निबंधक सहकारी संस्था पैठण यांनी चौकशी केली. चौकशी अहवालात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व संचालकांवर बाजार समितीचे हित न जोपासणे, कर्तव्यात कसूर करणे, नियमांचे उल्लघन करणे, असे आक्षेप नोंदवल्याने सहकारी संस्था उपनिबंधक आघाव यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण यांना एक वर्षापूर्वी कडक निर्देश दिले होते. या निर्देशांचे पालन न झाल्याने सोमवारी (२० एप्रिल) बाजार समिती बरखास्त करण्यात आली आहे.

सहकार उपनिबंधकांच्या निर्देशांना हरताळ

बाजार समितीने एक महिन्याच्या आत माती व पाणी परीक्षण केंद्र सुरू करावे, विहामांडवा येथील प्लॉट विक्रीची प्रक्रिया रद्द करून वरिष्ठ कार्यालयाची मान्यता घेऊन प्लॉटचे वाटप करावे, चारा छावणीत केलेला जास्तीचा खर्च व भूमीविकसनच्या नावाने खर्च केलेली रक्कम जबाबदार व्यक्तीकडून वसूल करावी, बोगस पावती बुक छापून मार्केट फी वसूल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावे, असे निर्देश सहकार उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी पैठण बाजार समितीला एक वर्षापूर्वी दिले होते. या निर्देशांचे पालन न झाल्याने अखेर बाजार समिती बरखास्त करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावलीच्या शोधात सर्वांची पळापळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आपल्या जाहीरनाम्यात एकाही राजकीय पक्षाने शहरात झाडे लावण्याचा मुद्दा मांडलेला नाही. यापूर्वीच्या महापालिका निवडणुकीतही हा मुद्दा जाहीरनाम्यात नव्हता. आता उन्हापासून सुटका करून घेण्यासाठी झाडे शोधण्याची वेळ याच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींवर आली आहे. शहरातील मतदान केंद्रांच्या उजाड परिसरात बुधवारी दिवसभर पक्ष प्रतिनिधींना व मतदारांना घामाच्या धारा पुसताना नाकीनऊ येणार आहेत.

शहरात उन्हाचा पारा चाळीशीपार गेला आहे. सकाळी दहा वाजताच उन्हाचा तडाखा सर्वसामान्यांना बेजार करीत आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हात मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करून घेणे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसाठी आव्हान ठरणार आहे. शहरातील शाळा आणि इतर सरकारी कार्यालये मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर पोलचीट वाटपासाठी राजकीय प्रतिनिधींना टेबल मांडण्यास परवानगी आहे. या टेबलवर एकच छत्री असावी, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे; मात्र हाच नियम प्रतिनिधींसाठी तापदायक ठरणार आहे. एका छत्रीखाली फक्त दोन प्रतिनिधी बसू शकतात. इतर कार्यकर्त्यांना भर उन्हात उभे राहून मतदारांची व्यवस्था करावी लागणार आहे. सध्या शहरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. मतदान केंद्राच्या परिसरात शोधूनही झाड सापडत नाही. वाहन लावण्यापासून ते टेबल मांडण्यापर्यंत प्रत्येकाला झाडाची आठवण येत आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला राजकीय प्रतिनिधींनी मतदान केंद्राची पाहणी केली. सभोवतालची उजाड परिस्थिती पाहून त्यांची घालमेल वाढली आहे. एकाही राजकीय पक्षाला शहरातील घटणाऱ्या झाडांची चिंता नाही. शहरात पर्यावरण समतोल राखण्यासाठी भरपूर झाडे लावण्याचे आश्वासन एकाही उमेदवाराने किंवा पक्षाने जाहीरनाम्यात दिले नाही. आता पुढील दोन दिवस झाडांच्या आश्रयाशिवाय उन्हाचा फटका सहन करीत काम करावे लागणार आहे.

'एसी' गाडीची व्यवस्था

छत्रीखाली दिवसभर टेबल सांभाळणे पक्ष प्रतिनिधींना कठीण होणार आहे. उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून काही उमेदवारांनी 'एसी' वाहनाची व्यवस्था केली आहे. टेबलाऐवजी वाहनात बसून काम करण्याचा तोडगा काही उमेदवारांनी काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images