Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बंदोबस्तावरील पोलिस मतदानापासून ‌वंचित

$
0
0

औरंगाबादः महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी शहरात बुधवारी ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापैकी अनेक कर्मचारी मतदार होते. यापैकी अनेक पोलिस कर्मचारी बंदोबस्तामुळे मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहिले.

शहरातील महापालिका निवडणुकीसाठी तैनात केलेल्या आलेल्या बंदोबस्तात साडेतीन हजार स्थानिक पोलिसांचा समावेश होता. मतदानाच्या पार्श्वभूमीवर ६५७ मतदान केंद्रावर १३८४ पोलिसांचा बंदोबस्त होता. उर्वरित कर्मचाऱ्यांचा पेट्रोलिंग पथकामध्ये समावेश होता. या पोलिस कर्मचाऱ्यांना सकाळी सहापासून बंदोबस्तासाठी बोलाविण्यात आले होते. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया साडेसात वाजता सुरू करण्यात आली. पेट्रोलिंग पथकातील कर्मचाऱ्यांनी वेळ अॅडजेस्ट करून आपला मतदानाचा हक्क बजाविला. बूथवर तैनात करण्यात आलेल्या कर्मचांऱ्यापैकी काहींना ठिकाणी वरिष्ठांची परवानगी मिळाल्यानंतर तात्पुरता बदली सहकारी देऊन मतदानासाठी सूट देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेचा फैसला आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्याचे लक्ष लागून असलेल्या आणि युतीची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या औरंगाबाद महापालिकेतील सत्तेचा फैसला उद्या (२३ एप्रिल) होणार आहे. युती होऊनही सेना-भाजपमधली सुंदोपसुंदी आणि एमआयएमने भरविलेली धडकी कितीपत खरी, याचा निकाल दुपारपर्यंत लागेल. पालिकेच्या १११ वॉर्डांसाठी बुधवारी सरासरी ६२ ते ६४ टक्के मतदान झाले. काही वॉर्डांत झालेल्या किरकोळ हाणामाऱ्यांत तिघे जखमी झाले. तणाव निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमआयएम आणि काँग्रेसच्या दोन उमेदवारांना अटक करण्यात आली.

दोन वॉर्डांमध्ये बिनविरोध निवड झाल्याने ११३ पैकी १११ वॉर्डांत निवडणूक झाली. त्यासाठी ९०४ उमेदवार रिंगणात होते. शिवसेना - भाजप युती, एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शहर बचाव आघाडी यांच्यासह अन्य पक्ष व अपक्षांमध्ये चुरस होती. एमआयएमच्या औरंगाबादमधील उदयानंतर पालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्व राजकीय पक्षांचे या निवडणुकीकडे लक्ष आहे. सकाळी साडेसातपासूनच विविध मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. गुलमंडी, औरंगपुरा, शहागंज, शहाबाजार, रहेमानिया कॉलनी, रेल्वेस्टेशन, सिडको, हडको, गारखेडा, शिवाजीनगर परिसरातील वॉर्डांमध्ये गर्दी दिसून आली. आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, सुभाष झांबड, सतीश चव्हाण, इम्तियाज जलील सकाळपासूनच मतदानाचा आढावा घेत फिरत होते. हर्सूलमधील महापालिका केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर झाले होते. तरीही पोलिस व प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. दिवसभर या केंद्रावर वादावादी व तणावाचे प्रसंग घडले. नेहरूनगरातील एका मतदान केंद्रावर आमदार जलील यांनी १०० मीटर सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत काँग्रेस उमेदवार मेहरून्निसा बेगम यांनी पोलिसांकडे तक्रार केली. शिवाजीनगर वॉर्डात शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र जंजाळ आणि अपक्ष विनोद सोनवणे यांच्यात मेहरसिंग नाईक विद्यालयाच्या केंद्रावर वादावादी झाली. सोनवणेंचे नातेवाईक मतदानकेंद्रात येऊन मतदारांना प्रभावित करत असल्याचा आरोप जंजाळ यांनी केला. पोलिसांनी मध्यस्थी करून नातेवाईकांना बाहेर काढले. शिवाजीनगर परिसरातील जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या केंद्रावर हुल्लडबाजीमुळे अनेकवेळा अडथळा आला. दगडफेकीच्या घटना दिवसभर सुरू होत्या. पोलिसांची मात्र धावपळ झाली. फोस्टर हायस्कूल केंद्रात सायंकाळी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मतदानाचा वेळ अर्धा तास वाढवून देण्यात आला. दुपारी तीन वाजता गणेश कॉलनी वॉर्डात काँग्रेस आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली, त्यात तिघे जखमी झाले. एका मतदारावर आक्षेप नोंदविल्यावरून तणाव निर्माण झाला. मारहाणीनंतर दगडफेक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. एमआयएम उमेदवार नासेर सिद्दीकी, काँग्रेसचे नदीम मस्तान यांना गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. सिडकोतील संस्कार विद्यालयात दुपारी तीनला तणाव होता.

विश्रांतीनगर वॉर्डात शाई संपली

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन जवळील विश्रांतीनगर, कलावती चव्हाण शाळेच्या केंद्रावर शाई संपल्याने मतदान ठप्प झाले होते. मार्करची पर्यायी व्यवस्था लवकर न झाल्याने मतदारांची गैरसोय झाली. विश्रांतीनगरात मतदानाचा वेळ दीड तासाने वाढवून देण्यात आला. संजयनगर, बायजीपुरा दक्षिण वॉर्डातील महापालिका शाळा, इंदिरानगर शाळेच्या केंद्रावर दुपारी दीड वाजता व साडेचार वाजता दगडफेक झाली. दुसऱ्या दगडफेकीनंतर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. संजयनगर, मुकुंदवाडी वॉर्डात पैसे वाटत असल्याच्या संशयावरून तणाव निर्माण झाला होता. सकाळी साडेसात ते साडेअकरा दरम्यान मतदानाचा वेग चांगला होता. त्यानंतर उन वाढल्याने मतदानाचा वेग मंदावला. चार ते साडेपाच या काळात पुन्हा मतदानाचा जोर वाढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानकेंद्रांचा सावळा गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकाच शाळेत पाच ते सहा मतदानकेंद्र कोंबल्यामुळे मतदानासाठी उत्स्फूर्तपणे आलेला मतदार, निवडणूक कर्मचारी आणि पोलिसांची त्रेधा तिरपीट उडाली. केवळ मतदानकेंद्रांच्या या सावळ्या गोंधळामुळे नियोजनाचे पितळ ऐन मतदानाच्यादिवशीच उघडे पडले.

पोलिस बंदोबस्तात मतदानकेंद्राबाहेर लांबच लांब रांगा, मतदारांचा गोंधळ-हुल्लडबाजी आणि पोलिसांची मध्यस्ती, असे चित्र सर्वच केंद्रांवर होते. एकाच शाळेत अनेक मतदानकेंद्र असल्यामुळे मतदानकेंद्रावर गोधळ उडला होता. हर्सूल (वॉर्ड क्रमांक १) येथील महापालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या एकाच इमारतीमध्ये ५ मतदान केंद्र होते. दुपारी १२ पर्यंत हर्सूलच्या या केंद्रावर प्रचंड गर्दी होती. शाळेमध्ये जाण्यासाठी एकच मार्ग रस्ता असलेल्या अत्यंत अरूंद जागेत ओळीने असलेल्या खोल्यांमध्ये हे मतदान केंद्र देण्यात आले होते. यामुळे मतदारांची रांग तासंतास संपत नसल्याने अनेक वेळा वाद उद्भवले. एकाच अरूंद जागेमध्ये दोन रांगा ठेवाव्या की तीन रांगा, असा प्रश्न निवडणूक कर्मचारी व पोलिसांना पडला होता. वॉर्डातील तब्बल ६ हजार मतदान एकाच केंद्रावर असल्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये या केंद्रावर तुफान गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रणासाठी मतदानकेंद्रात दहा तर केंद्राबाहेर पाच पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मतदानकेंद्राच्या अवस्थेमुळे पोलिसांना गर्दी काबू करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. भगतसिंगनगर, म्हसोबानगर, एकतानगर, लक्ष्मीकांत विद्यालय, ज्ञानसागर प्राथमिक विद्यालयामध्ये अशीच अवस्था होती.

केंद्र बदलले नाही

संजयनगर खासगेट येथे अत्यंत अरूंद गल्लीमधील अमर हायस्कूल येथील इमारतीमध्ये असलेले केंद्र बदलण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखवली. एकाच गल्लीमध्ये अनेक मतदानकेंद्र असल्यामुळे येथे एकच गर्दी झाली होती. अरूंद रस्ते असल्यामुळे शाळेच्या एकाबाजुचा रस्ताही बंद करण्यात आला होता. दिवसभर या भागामध्ये तणावाचे वातावरण होते.

मतदार, कर्मचारी घामाघूम

वानखेडेनगर (वॉर्ड क्र.५) येथील ज्ञानसागर प्राथमिक विद्यालयामध्ये एका वॉर्डाचे संपूर्ण पाच केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र टीनपत्र्याच्या खोल्यांमध्ये मतदान कर्मचारी, अधिकारी अक्षरक्ष घामाघूम झाले होते. भर उन्हामध्ये कर्मचाऱ्यांची अवस्था दयनीय झाली होती. या पद्धतीचे मतदान केंद्र का? असे प्रश्न कर्मचारी व मतदारांनी यावेळी केले. काही शाळांमध्ये पंख्यांची व्यवस्था करण्यात आली होती; मात्र पंखे नादुरुस्त होते.

रॅम्प नसल्याने अपंगांची अडचण

अपंग मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था आवश्यक आहे; मात्र नारेगाव, शिवाजीनगर, चौधरी कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी येथे अपंगांसाठी रॅम्पची सोय करण्यात आली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किडनी विक्रीसाठी वकिलाचा अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

महसुली कागदपत्रात हरवेली जमीन पुन्हा नावावर करून देण्यासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत असलेले जमीनमालक दिलीप बेडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे किडनी विक्रीची परवानगी मागितली आहे. पैशाची नितांत गरज असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. परंतु, यातून सरकारच्या मंदगती कारभाराचीही प्रचिती मिळते.

औरंगाबादेत वकिली व्यवसायात मन न रमल्याने बेडेकर दाम्पत्य ३५ वर्षांपूर्वी म्हैसमाळ येथे परत आले आहे. म्हैसमाळच्या पर्यटन व वन विकासासाठी त्यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावाही केला, पण त्यांना फारसे यश आले नाही. याच काळात त्यांनी वन विभागाची सर्व्हे नंबर १३२ मधील भूमाफियांनी बळकावलेली जमीन सरकार जमा करण्यात महत्वाची भूमिका बजवली. या बद्दल त्यांना शासनाकडून साधे आभाराचे पत्र मिळणे दूरच उलट त्यांची स्वतःची १० एकर जमीन सरकारी कागदपत्रात हरवली आहे.

म्हैसमाळ येथील सर्व्हे नंबर १०७, गट नंबर १२७ हा १२ हेक्टर २४ आर चा होता. त्यापैकी ६ हेक्टर ४० आर जमीन दिलीप बेडेकर यांनी विकत घेतली. बेडेकर यांनी त्यांच्याकडील २२ एकर जमिनीपैकी १० एकर जमीन उदरनिर्वाहासाठी विकली, त्यानंतर १२ एकर जमीन शिल्लक राहिली. परंतु, दोन वर्षांपूर्वी संगणकातील चुकीमुळे त्यांच्या नावे फक्त दोन एकर जमीन शिल्लक राहिली आहे.

बेडेकर यांनी दोन वर्षांपूर्वी ही जमीन विक्रीस काढली असता हा प्रकार उघडकीस आला. टाकळी राजेराय सज्जाच्या तत्कालीन तलाठ्याने दिलेल्या अहवालावरून बेडेकर यांच्या सातबारा उताऱ्यावर केवळ दोन एकर जमीन शिल्लक दाखविण्यात आली आहे. बेडेकर यांनी क्षेत्र दुरुस्त व्हावे यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी दाद मागितली.

लोकशाही दिनात तक्रार केली, पण आजवर क्षेत्र दुरुस्तीबाबत कसलीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे हतबल झालेल्या बेडेकरांनी अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतःची किडनी विक्री करण्याची परवानगी मागितली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयोगानेच घरे फोडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीत मतदारांची घरे निवडणूक आयोगानेच फोडल्याचे चित्र बुधवारी दिवसभर शहरातील विविध केंद्रावर होते. मतदार यादीतील प्रचंड घोळामुळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. तक्रार करायची तर कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला. ऐनवेळी आलेल्या तक्रारींचे निराकरण करणे शक्य नसल्याचे मतदान केंद्रांवरील अधिकारी सांगत होते.

मतदार यादीतील घोळाची चर्चा वॉर्डांचे आरक्षण जाहीर झाल्यापासून केली जात होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने मतदार यादी प्रसिध्द केली. त्या संदर्भात मतदारांनी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतले घेतले, पण त्यांचे आक्षेपही फेटाळण्यात आले. त्याचा परिणाम मतदानाच्या दिवशी दिसून आला. अनेक मतदान केंद्रांवर मतदार यादीत नावे शोधण्यासाठी मतदारांची हाल होत होते. आजूबाजूच्या तीन-चार वॉर्डांमध्ये एकाच कुटुंबातील मतदारांची नावे विखुरली गेली होती. त्यामुळे मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी मतदारांना चांगलेच फिरावे लागले. काही मतदान केंद्रांच्या बाहेर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते लॅपटॉप घेऊन बसले होते. मतदारांची नावे शोधून देण्याचा ते प्रयत्न करीत होते, पण त्यात त्यांना यश येत नव्हते. मतदारांसाठीच्या पोलचिट वाटप करण्याचे काम महापालिकेतर्फेच केले जाणार होते, पण महापालिकेचे पोलचिट वाटप करणारे कर्मचारी मतदारांपर्यंत पोचलेच नाहीत. या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांच्या परिसरात पोलचिट घेऊन बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. राजकीय पक्षांच्या बुथवर मतदार यादीत नाव सापडत नाही, असे लक्षात आल्यावर मतदार या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचायचे. कर्मचाऱ्यांकडून काही मतदारांचे पोलचिट देऊन समाधान केले जायचे, तर अनेक मतदारांना नाव शोधण्यासाठी या मतदार केंद्रातून त्या मतदार केंद्रात जावे लागत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपने युतीधर्म पाळला नाही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने युतीधर्म पाळला नाही,' असा आरोप खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना केला. महापालिका निवडणुकीचे मतदान सायंकाळी साडेपाच वाजता संपल्यानंतर निरालाबाजार येथे चंद्रकांत खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'युती केली नसती आणि स्वतंत्र लढलो असतो तर फार बरे झाले असते. भाजपच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी बंडखोरांचेच काम केले. त्याचे वीस पुरावे माझ्याकडे आहेत. ते पुरावे मी मुख्यमंत्र्यांनाही दाखवले आहेत. भाजपने युती धर्म पाळला नाही. याचा खूप त्रास झाला आणि दुःखही वाटले. आमच्यातही आपापसात भांडणे आहेत, पण 'मातोश्री'वरून आदेश आल्यावर आम्ही आपापसातील भांडणे विसरून लगेचच एक होतो. तसे भाजपमध्ये नाही. त्यांच्या-त्यांच्यात गटतट आणि भांडणे खूप आहेत. रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, पण मी पण काही कमी नाही. माझ्याकडेही चार राज्यांची सूत्रे आहेत.'

महापौर निवडणुकीसंदर्भात काय रणनीती असेल असे खैरे यांना विचारले असता ते म्हणाले, 'प्रथम आम्ही युतीधर्म पाळण्याचा प्रयत्न करू. त्यातून काही शक्य झाले नाही, तर अपक्षांकडे लक्ष देऊ. अपक्ष नगरसेवकांकडे जाण्याची वेळ येईल असे वाटत नाही. महापौर शिवसेनेचाच होईल,' असा दावा त्यांनी केला.

बाउंन्सर्सचे संरक्षण

खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी बाउंसर्सचे संरक्षण घेतले होते. त्यांच्या दोन्हीही बाजूला एक-एक बाउंसर सतत उभे होते. बाउंसर्सला पाहून शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्ते आश्चर्य व्यक्त करीत होते. शिवसेनेच्या गोटात दिवसभर या बाउंसर्सचीच चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'मतदार राजा' वर पैशांचा पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मतदानासाठी 'ताकदीच्या' उमेदवारांनी पैसे वाटप केल्याची मंगळवारी रात्री सुरू झालेली चर्चा मतदानाच्या दिवशी दिवसभर रंगली. विशेषतः झोपडपट्टी परिसरात 'बोली' लावून मतदान खरेदीच्या घटना घडल्या. सर्वाधिक किंमत देणाऱ्या उमेदवाराच्या शोधात मतदार मतदान केंद्र परिसरात घुटमळत होते. महापालिका निवडणुकीत पैसे वाटप झाल्याचे कळूनही प्रशासनाने कारवाई केली नाही हा 'एमआयएम'चे आमदार इम्तियाज जलील यांचा आरोप खळबळ उडवणारा ठरला.

महापालिका निवडणूक पारदर्शी करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली होती. बंडखोरांचे सर्वाधिक संख्या आणि निवडणुकीतील चुरस वाढल्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांना पैशाचे आमिष दाखवण्यात आले. मतदानाच्या पूर्वसंध्येला झोपडपट्टी आणि गुंठेवारी भागात मतदानासाठी 'बोली' लागली. सर्वाधिक 'किंमत' मोजणाऱ्या उमेदवाराकडून टोकन घेऊन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी बुधवारी दिवसभर पैसे वाटपाची चर्चा रंगली होती. भारतनगर-शिवाजीनगर, प्रियदर्शनी इंदिरानगर, काबरानगर, गणेश कॉलनी, विश्वासनगर-हर्षनगर, जयभीमनगर, पुंडलिकनगर, उल्कानगरी, नारेगाव, ब्रिजवाडी, मुकुंदवाडी, गुलमंडी या वॉर्डात चुरशीच्या लढतीमुळे सर्वाधिक पैसे वाटप झाल्याची चर्चा आहे.

भारतनगर-शिवाजीनगर वॉर्डातील पंडीत जवाहरलाल नेहरू महाविद्यालय केंद्रावर मतदारांची सकाळपासून गर्दी होती. मतदार झुंडीने उभे राहून उमेदवारांची वाट पाहत होते. दुपारी तीननंतर गर्दी वाढल्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. मतदान केंद्र परिसरातच मताचे 'मोल' ठरत होते. समाधानकारक पैसे मिळाल्यानंतरच मतदारांनी मतदान केले. उच्चभ्रू वसाहतींमध्ये तुलनेने मतदानाचे प्रमाण कमी होते; मात्र झोपडपट्टी व गुंठेवारी वसाहतीत पैशाचे आमिष दाखवून सर्वाधिक मतदान करवून घेतले गेले. शहरातील अनेक ठिकाणी दिवसभर मतदारांवर पैशाचा पाऊस पडला. शिवसेना, भाजप, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुख्य चुरस आहे.

मतदानाची 'खूणगाठ'

मतदानाच्या दिवशी सर्वाधिक बोली लावून मतदारांना केंद्रापर्यंत आणण्याचे नियोजन उमेदवारांनी केले होते. मतदाराने मतदान आपल्याच उमेदवाराला केले का याची चाचपणी करण्यासाठी कार्यकर्ते तैनात होते. केंद्रातून बाहेर पडलेल्या मतदाराला 'किती नंबरचे बटण दाबले' अशी विचारणा एकजण करायचा तर, काही अंतरावर असलेला दुसरा कार्यकर्ता पुन्हा हाच प्रश्न विचारून खातरजमा करायचा. पैसे मोजून मतदानाची पुरेपूस वसुली करण्यासाठी खास फिल्डिंग लावण्यात आली होती.

काही पक्ष पैसे देऊन मत विकत घेत असल्याच्या तक्रारी येऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही. प्रशासन निष्क्रिय राहिल्यामुळे निवडणूक पैशाच्या बळावरच झाली असे खेदाने म्हणावे लागेल.

- इम्तियाज जलील, आमदार, एमआयएम.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचे चार नगरसेवक महापौरपदाचे दावेदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौरपदासाठी शिवसेनेचे चार ज्येष्ठ नगरसेवक दावेदार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुणाच्या बाजूने कौल देतात यावर महापौर कोण याचे उत्तर मिळणार आहे. २९ एप्रिल रोजी महापौरपदाची निवडणूक होणार आहे.

महापालिका निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. शिवसेनेचे २८ नगरसेवक निवडून आले आहेत, तर भारतीय जनता पक्षाचे २२ नगरसेवक विजयी झाले. मावळत्या महापालिकेत शिवसेनेचे ३० तर भाजपचे १५ नगरसेवक होते. या आकडेवारीचा विचार करता शिवसेनेला यावेळी दोन जागा कमी मिळल्या, तर भाजपला सात जागांचा लाभ झाला. मात्र, युतीमध्ये मोठा पक्ष म्हणून शिवसेनेचाच महापौरपदावर दावा असल्याचे मानले जात आहे.

महापौरपदाची माळ आपल्याच गळ्यात पडली पाहिजे यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक त्र्यंबक तुपे, रेणुकादास (राजू) वैद्य, नंदकुमार घोडेले आणि विकास जैन यांच्यात स्पर्धा असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने नगरसेवकपदाच्या उमेदवारांची निवड करताना खुल्या प्रवर्गातील वॉर्डातून बहुतेक ठिकाणी खुल्या प्रवर्गातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली. यावेळचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. नगरसेवकपदाचे उमेदवार देताना लावलेला निकष शिवसेना महापौरपदासाठीचा उमेदवार देताना लावणार का, अशी चर्चा आता शिवसेनेच्या गोटात सुरू झाली आहे. पुढील तीन - चार दिवसात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महापौरपदाच्या उमेदवाराची घोषणा करतील असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


५२१२ मतदारांना उमेदवार नापसंत

$
0
0

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत बहुसंख्य वॉर्डात मतदारांनी मताचा नकाराधिकार (नोटा) वापरला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांनी अनेक आयडिया लढविल्या. यानंतरही अनेक वॉर्डात काही मतदरांनी 'नोटा'चा वापर करत एकही उमेदवार पसंत पडला नसल्याचे स्पष्ट केले. शहरात ११३ वॉर्डात मिळून ५२१२ मतदारांनी नकाराधिकाराचा वापर केला.

निवडणुकीच्या निकालानंतर अनेक मतदारांनी नकाराधिकाराचा वापर केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मनपा निवडणुकीतही त्याचा वापर झाला. अनेक वॉर्डात नकाराधिकारचा वापर केलेल्या मतदारांचा हा आकडा शंभरच्या पुढे गेलेला आहे. उमेदवार योग्य नसल्याचे सांगणारी ही आकडेवारी विचार करायला लावणारी आहे. जकात नाका केंद्र परिक्षेत्रातील सर्व वॉर्डांमध्ये मिळून २७७ मतदारांनी नकाराधिकार वापरला. क्रांतीचौकात ६८८, ताठे सभागृह ५४१, डॉ. आंबेडकर कला कॉलेज केंद्र ६५४, सिडको कम्युनिटी सेंटर ६७८, आयटीआय केंद्र ३६७, जवाहर कॉलनी ५६३, वॉर्ड ब सिडको ४५४, मौलाना आझाद केंद्र ५४८ तर गरवारे क्रीड संकुल केंद्र परिक्षेत्रातील वॉर्डांमध्ये एकूण ४४२ मतदारांनी 'नोटा'चा वापर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक अधिकाऱ्यामुळे अंतिम निकालास उशीर

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला महाविद्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण बोडखे यांच्या ढिसाळ नियोजनामुळे मतमोजणी उशिराने झाली. मतमोजणीनंतरही उमेदवारांना तब्बल चार तास प्रमाणपत्रांसाठी ताटकळावे लागले. दुपारी तीन वाजता लाऊडस्पिकरवरून निकाल जाहीर करण्यात आले. या केंद्रावरील टपाली मतदानाची नोंदणी सकाळी साडेदहा वाजता सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण बोडखे यांच्याकडे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी ‌मतमोजणीनंतर आकडेवारीची मागणी केली. बोडखे यांना उशीर होत असल्याची जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी,'तर निवडणूक निर्णय अधिकारी बदलायला पाहिजे होता,' असे उत्तर दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ता स्थापनेसाठी युतीच्या बंडखोरांवर मदार

$
0
0

१८ अपक्षांपैकी १० युतीचे बंडखोर

रवींद्र टाकसाळ, औरंगाबाद

गेल्या पाच निवडणुकांची परंपरा औरंगाबादकरांनी कायम ठेवत शिवसेना-भाजप युतीला कौल दिला, परंतु सत्ता स्थापनेसाठी पूर्ण बहुमत न मिळाल्याने युतीला पुन्हा एकदा बंडखोर आणि अपक्षांचा सहारा घ्यावा लागत आहे. विजयी झालेल्या एकूण १८ अपक्षांपैकी १० जण युतीचे बंडखोर उमेदवार असून त्यांची घरवापसी होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, परंतु गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा शिवसेनेच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. गेल्या निवडणुकीत सेनेचे ३० सदस्य होते तर यंदा हा आकडा २८ वर आला आहे. तर लहान भाऊ असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मात्र सात जागा वाढल्या आहेत. यंदा भाजपाचे एकूण २२ नगरसेवक विजयी झाले आहेत. युतीला मतदारांनी कौल दिला असला तरी सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला ५७ हा जादूई आकडा गाठण्यासाठी ते अद्यापही दूर आहेत. त्यामुळे त्यांना आता अपक्षांसह बंडखोरांची मदत घ्यावी लागत आहे.

या निवडणुकीत एकूण १८ अपक्ष विजयी झाले आहेत. त्यात देवानगरी वॉर्डातून साधना सुरडकर यांनी माघार घेतल्यानंतर भाजपाने शोभा बुरांडे यांना पुरस्कृत केले. त्या विजयी झाल्याने भाजपचे संख्याबळ एकने अधिक वाढले. तर गुलमंडी वॉर्डातून भाजपचे नेते माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे भाऊ राजू तनवाणी विजयी झाले आहेत. यासह सत्यभामा दामोधर शिंदे (वॉर्ड ८१), गोकुळसिंग मलेक (वॉर्ड ३५) हे नवनिर्वाचित नगरसेवकही भाजपच्या जवळचे आहेत, असे मानले जाते. त्यांची भाजपला साथ मिळेल, अशी शक्यता सूत्रांनी दिली. वॉर्ड क्रमांक चारमधून विजयी झालेल्या ज्योती अभंग याही भाजपच्या गोटात येतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. सेनेचे बंडखोर गजानन बारवाल ( वॉर्ड ७०), सेनेचे किशोर नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे (वॉर्ड ९) अपक्ष म्हणून विजयी झाल्या असून सत्ता स्थापनेच्या निमित्ताने त्यांची सेनेमध्ये घर वापसी होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. अर्थात, बारवाल यांनी भाजपात जाण्याचे संकेत दिले आहेत. तर एकतानगर मधून विजयी झालेले रुपचंद वाघमारे हे माजी आमदार सेना नेते प्रदीप जैस्वाल यांच्या शहर प्रगती आघाडीत सक्रीय होते. तसेच ज्ञानोबा जाधव (वॉर्ड क्रमांक १२), सुरेखा बाळासाहेब सानप ( वॉर्ड ३६), स्मिता घोगरे ( वॉर्ड ११०), यशश्री बखारिया (वॉर्ड ४७) यासह अन्य अपक्षांची साथ घेत सत्ता स्थापनेसाठी युतीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, जास्तीत जास्त अपक्ष आपल्या गळाला लावून संख्या बळ वाढविण्यासाठी सेना-भाजपमध्येही स्पर्धा लागल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना बंडखोराचा शिवाजीनगरात धुडगूस

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‌मनपा निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवसेना बंडखोर उमेदवाराने शिवाजीनगरात धुडगूस घातल्याचा प्रकार गुरूवारी सांयकाळी चार वाजता घडला. एका महिलेवर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शिवाजीनगर वॉर्ड क्रमांक ११२ मध्ये सेनेचे अ‌धिकृत उमेदवार राजेंद्र जंजाळ यांनी सेना बंडखोर उमेदवार विनोद सोनवणे यांचा पराभव केला. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास विनोद सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवाजीनगर गाठले. येथील सुनिता दिलीप दायमा यांच्या घरात घुसून सोनवणे व साथीदारांनी तलवारीचा धाक दाखवत धमकावले तसेच सुनिता दायमा यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा वार चुकवल्याने त्या बचावल्या. शेजारी धावत आल्याने सोनवणे व साथीदार तेथून पसार झाले. यानंतर रोहीत पाटील यांच्या घरी जाऊन तलवारीचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी नागरिकांनी धाव घेत जवाहरनगर पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी सोनवणे व साथीदाराविरुद्ध खूनाचा प्रयत्न करणे, शिवीगाळ करून धमक्या देणे, बेकायदा शस्त्र बाळगणे आदी कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. विनोद सोनवणे, प्रविण सोनवणे, गणेश पवार, हर्षल पाटील, शंतनू उरेकर यांना जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

सौम्य लाठीमार

सोनवणे यांनी धुडगूस घातल्यानंतर शिवाजीनगर भागातील नागरीक मोठ्या प्रमाणावर पोलिस ठाण्यासमोर जमा झाले होते. सोनवणे यांच्या मदतीसाठी काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली होती. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला.


पराभूत उमेदवारांमध्ये मिटमिट्यात चकमक

मिटमिटा भागात तुझ्यामुळे आमचा पराभव झाल्यावरून वाद घालत अपक्ष उमेदवाराला गुरुवारी सायंकाळी मारहाण करण्यात आली. मिटमिटा वॉर्डामध्ये शिवसेनेचे उमेदवार रावण आम्ले गुरुवारी झालेल्या मतमोजणीमध्ये विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मुळे यांचा पराभव केला. या वॉर्डात लक्ष्मण सोमदे हे देखील अपक्ष म्हणून उभे होते. सोमदे यांच्यामुळे आपला पराभव झाल्याची भावना मुळे यांच्या मनात निर्माण झाली. सायंकाळी रावण आम्ले यांची विजयी रॅली वॉर्डातून जात होती. यावेळी अमोल मुळे यांने सोमदे यांना मारहाण केली. या प्रकरणामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी दोन्ही गट रात्री उशिरापर्यंत छावणी पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणीनंतर गुलमंडीवर राडा

$
0
0

पराभूत उमेदवार राजेश व्यास, सचिन खैरे यांच्या समर्थकांत तुंबळ हाणामारी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुलमंडी वॉर्डातील पराभूत उमेदवार राजेश व्यास व सचिन खैरे यांच्या समर्थकांत गुरुवारी दुपारी तुंबळ हाणामारी झाली. या प्रकारानंतर परिसरात दहशत पसरल्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. या घटनेनंतर या भागात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

गुलमंडी वॉर्डात पालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजू तनवाणी यांचा विजय झाला. त्यांनी सेनेचे अधिकृत उमेदवार सचिन खैरे व सेनेचे बंडखोर राजेश उर्फ पप्पू व्यास यांचा पराभव केला. या निवडणुकीत व्यास यांना १,९९८ तर खैरे याना १४७७ मते पडली. व्यास व खैरे यांच्यात मतविभागणीमुळे भाजपा बंडखोर निवडूण आल्याची भावना खैरे कुटुंबियांत निर्माण झाली. याचा अनोख्या पध्दतीने निषेध करण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पत्नी वैजयंती खैरे, उमेदवार सचिन खैरे यांच्या पत्नी तसेच इतर काही महिलांनी दुपारी एकच्या सुमारास पानदरीबा येथील व्यास यांचे घर गाठले. त्यांच्यासोबत काही समर्थक देखील होते. व्यास यांच्या घरी गेल्यानंतर तुमचा सत्कार करण्यासाठी आलो आहे, असे सांगितल्यानंतर व्यास कुटुंबियांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात झोंबाझोंबी झाली. दरम्यान व्यास यांच्या घराच्या खाली त्यांचे समर्थक देखील मोठ्या प्रमाणावर जमले. वरती वाद झाल्याचे कळताच खाली समर्थकामध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. रस्त्यावर होत असलेल्या या हाणामारीमुळे परिसरात तनाव निर्माण झाला. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. काही वेळाने दोन्ही गट पांगल्यानंतर वातावरण सुरळित झाले. सिटीचौक पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी गुलमंडीवर धाव घेतली. या घटनेनंतर या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


निवडणुकीत पराभव होत असतो. खैरे कुटुंबियांनी नैराश्यातून हा प्रकार केला. याबद्दल कोणतीही तक्रार करण्यात आली नाही.- राजेश व्यास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपमहापौरांच्या पत्नी अन् माजी महापौरांना धोबीपछाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आयटीआय केंद्राअंतर्गत येणाऱ्या १०० ते ११० वॉर्डांच्या निवडणुकीत उपमहापौर संजय जोशी यांच्या पत्नी स्वाती जोशी आणि माजी महापौर अनिता घोडेले यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे कांचनवाडी (१०६) वॉर्डातील निवडणुकीत अनिता घोडेले यांना अपक्ष उमेदवार विमल जनार्धन कांबळे यांनी पराभूत केले, तर विटखेडा वॉर्डात (१०७) विमल कांबळे यांचे पती जनार्धन कांबळे यांना अनिता घोडेले यांचे पती नंदकुमार घोडेले यांनी पराभूत केले. केवळ याच केंद्राअंतर्गत शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

या केंद्रात ज्योतीनगर-दशमेशनगर (१००) वॉर्डामध्ये शिवसेनेच्या सुमित्रा हाळनोर व काँग्रेसकडून सुनीला क्षत्रिय या दोनच उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. त्यातही क्षत्रिय यांनी त्यांचा अर्ज शेवटच्या दोन तासांत भरला होता. मूळच्या शिवसेनेच्या क्षत्रिय यांना पक्षाकडून तिकिट न मिळाल्याने त्या काँग्रेसच्या मांडवात दाखल झाल्या होत्या आणि काँग्रेसकडून तिकिट मिळाल्यामुळे त्यांनी घाईघाईने अर्ज भरला होता. त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे किंबहुना त्यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठीची 'शिष्टाई' यशस्वी झाल्यामुळे हाळनोर या बिनविरोध विजयी ठरल्या. एकनाथनगर (१०१) वॉर्डात १२ उमेदवारांमध्ये निवडणूक लढल्या गेली. यामध्ये शिवसेनेच्या शोभा सूर्यवंशी, अपक्ष उमेदवार ललिता अंभोरे, एमआयएमच्या लता मगन निकाळजे, काँग्रेसच्या मनिषा माळकरी यांच्यामध्ये चुरस होणार, असे चित्र होते. प्रत्यक्षात निकाळजे यांना १८६५ मते, तर सूर्यवंशी यांना १०१३ मते मिळाली. कबीरनगर (१०२) वॉर्डामध्ये तब्बल १९ उमेदवारांच्या खिचडीमुळे मतांचा आकडा कमी दिसून आला आहे. बसपचे राहुल पंढरीनाथ सोनवणे यांना ८४३ मते मिळाली, तर रिपब्लिकन सेनेचे कचरू विश्वनाथ मोरे यांना ८१८ मते मिळाली. म्हणजेच केवळ ३५ मतांनी सोनवणे विजयी झाले. उमेदावारांच्या गर्दीमुळेच या वॉर्डातील एकूण ४९३७ मतांपैकी काहींना ११, २०, ३९, ५९, ६०, १०४ अशीही मते मिळाली आहेत. वेदांतनगर (१०३) वॉर्डामध्येही शिवसेनेचे विकास जैन बिनविरोध विजयी झाले. या वॉर्डामध्ये पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आणि काँग्रेसचे उमेदवार महतोले यांना अपात्र ठरविण्यात आले. त्याविरुद्ध ते हायकोर्टात गेले, परंतु त्यांनी याचिका मागे घेतल्यामुळे जैन हे बिनविरोध ठरले. बन्सीलालनगर (१०४) वॉर्ड तसा पहिल्यापासूनच शिवसेनेसाठी अनुकूल होता आणि अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे सिद्धांत शिरसाट हे ७०० पेक्षा जास्त मतांनी विजयी ठरले. आमदार संजय शिरसाट आणि विकास जैन यांच्या प्रचारामुळे शिवसेनेला वॉर्ड सहज राखता आला. राहुलनगर-सादानगर (१०५) वॉर्डामध्ये काँग्रेसचे अब्दुल मोहम्मद नाविद हे पराभूत उमेदवारापेक्षा दुप्पट मतांनी म्हणजेच २६३१ मतांनी विजयी झाले. या वॉर्डामध्ये अपक्ष उमेदवार पठाण मोमीन मतीन खान यांना १३६०, एमआयएमचे रोशन अजीज खान यांना ९६१ मते पडली.

मयुरबन कॉलनीत नाराजी व्यक्त

हमालवाडा (१०८) वॉर्डाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मुल्ला सलीमा बेगम खाजोद्दीन या तब्बल १५१३ मतांनी विजयी झाल्या. त्यांच्यापुढे एमआयएमच्या मोहम्मद शबाना बेगम खिजर हयात यांचे आव्हान होते, मात्र या वॉर्डात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने एमआयएमच्या उमेदवारावर कुरघोडी केली. शिवसेनेच्या सुचिता राजेंद्र मोतिंगे या ९४० पेक्षा जास्त मते घेऊ शकल्या नाहीत. देवानगरी (१०९) वॉर्डात मतदारांचा विरोध लक्षात घेऊन आणि मुस्लिम मतदारांचे आव्हान पेलण्याचा आत्मविश्वास नसल्यामुळेच भाजपच्या उमेदवार साधना सुरडकर यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे एमआयएमच्या फरहीन बेगम महंमद रिजवान पठाण या मुसंडी मारणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती, मात्र ऐनवेळी अपक्ष उमेदवार शोभा बुरांडे यांना भाजपने पुरस्कृत केले आणि बुरांडे यांनी पठाण यांना २४४ मतांनी पराभूत केले. मयुरबन कॉलनी (११०) वॉर्डामध्ये भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान उपमहापौर संजय जोशी यांच्या पत्नी स्वाती जोशी, शिवसेनेच्या बंडखोर स्मीता दिगंबर घोगरे, काँग्रेसच्या अनू अनिल मुळे यांच्यामध्ये तिहेरी लढत होणार, असे चित्र होते, मात्र संजय जोशी यांच्याविषयी असलेली नाराजी मतदारांनी मतदानातून दाखवून दिली. स्मीता घोगरे यांना १४८३, तर स्वाती जोशी यांनी ११०० मते मिळाली.

दोन पती, दोन पत्नींची लढत

कांचनवाडी (१०६) वॉर्ड व विटखेडा (१०७) वॉर्डामधील लढत खऱ्याअर्थाने लक्षवेधी ठरली. कांचनवाडीमध्ये माजी महापौर व शिवसेनेच्या उमेदवार अनिता घोडेले यांना अपक्ष उमेदवार विमल जनार्धन कांबळे यांनी ४२० मतांनी पराभूत केले, तर विटखेड्यात विमल जनार्धन कांबळे यांचे पती व अपक्ष उमेदवार जनार्धन कांबळे यांना शिवसेनेचे उमेदवार नंदकुमार घोडेले यांनी तब्बल १६४६ मतांनी पराभूत केले. कांचनवाडीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या रेखा त्रिवेदी यांनीही १३५७ मते मिळविली, हे विशेष. विटखेड्यात मात्र उर्वरित एका उमेदवाराला चक्क ३० मते पडली. त्यामुळे विटखेड्यात खऱ्याअर्थाने दोघांतच लढत झाली, असे म्हणावे लागेल. दोन्ही वॉर्डांतील लढत ही दोन पती व दोन पत्नींची लढत ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत आल्या ५८ महिला निवडून

$
0
0

एमआयएमच्या १३ महिला विजयी

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या निवडणुकीत ११३ पौकी ५८ जांगांवर महिला निवडून आल्या. ५७ जागांवर अधिकृत आणि एक महिला सर्वसाधारण पुरूष वॉर्डातून निवडून आली आहे. यामुळे ११३ नगरसेवकांच्या महापालिकेत ५६ पुरूष विजयी होऊ शकले. पुरुषांपेक्षा १ जागा अधिक निवडून आल्याने महापालिकेत महिलाराज असेल यात काही शंका नाही. शिवसेना (१०), भाजप (१२), एमआयएम (१३), काँग्रेस (५), रा.काँ. (२), बसप (२), अपक्ष (१३), सर्वसाधारण पुरूष गटात महिला (१) अशा महिला निवडून आल्या आहेत. शिवसेनेने ६४ जागांवर उमेदवर उभे केले त्यापैकी २८ जागांवर महिला उभ्या केल्या होत्या.

भाजपने ४९ जागांवर उमेदवार उभे केले त्यापैकी २६ जागांवर महिला होत्या. एमआयएमने ६० उमेदवार उभे केले. त्यापैकी एमआयएमने २३ जागा महिलांना दिल्या. काँगेसने १०६ जागांवर उमेदवार उभे केले त्यापैकी २३ जागा महिलांना दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने ७६ जागांपैकी ३३ जागांवर महिला उभ्या केल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मी भाजपमध्ये जाणार : बारवाल

$
0
0

औरंगाबाद : ज्या पक्षासाठी ३० वर्षे मेहनत घेतली. पक्षहिताशिवाय दुसरे काहीच केले नाही. कोअर कमिटीने माझी दखल घेतली नाही आणि उमेदवारी दुसऱ्याला दिली. अपक्ष म्हणून मी जनतेकडे कौल मागितला. मतदारांनी मला निवडून दिले. आता पुन्हा शिवसेनेत जाणार नाही. भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असे नगरसेवक गजानन बारवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पदमपुरा वॉर्डातून बारवाल अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेनेचे संजय बारवाल यांचा पराभव केला. निवडून आल्यानंतर ते म्हणाले, 'मी शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच येत नाही. ३० वर्षे सेवा केली. पक्षाशी गद्दारी केली नाही. यावेळी तिकिट मागितले म्हणून काय चूक केली? कोअर कमिटीने मला डावलले. आता पुन्हा शिवसेनेत जाणार नाही. भाजपमध्ये जाणार आहे. भाजपकडून काय मिळणार याविषयी विचार केलेला नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडमोडे विजयी

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष भगवान घडमोडे हे वॉर्ड क्रमांक ८६ मधून संघर्षपूर्ण लढतीत निवडून आले. त्यांना २३११ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद तोरडमल (अपक्ष) यांना १६३५ मते मिळाली.

निवडणूक जाहीर झाल्यापासून घडमोडे यांना त्यांच्याच वॉर्डात जखडून ठेवण्यात त्यांच्या स्पर्धकांना यश आले होते. यामुळेच ते निवड येतात की नाही याविषयी उलटसुलट चर्चा होती, परंतु या चर्चांना पूर्णविराम देत भगवान घडामोडे यांनी विजयश्री खेचून आणली.

ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या वॉर्डात चुरस वाढली होती. शिवसेनेच्या बंडखोरामुळेच शहराध्यक्ष भगवान घडमोडे यांना वॉर्डातच अडकून पडावे लागले होते. विरोधकांची घडमोडेंना जखडून ठेवण्याची योजना पंधरवड्यात यशस्वी ठरली होती. भगवान घडमोडे हे रामनगर वॉर्ड क्रमांक ८६ मधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवित होते. त्यांना काँग्रेसचे उमेदवार प्रल्हाद बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाग्यश्री राजपूत आणि सोनाजी गिरी, कैलास आघुडे, राजेंद्र तोरणमल, शिवाप्पा बेंद्रे या चार अपक्षांनी आव्हान दिले होते. या वॉर्डातील ७,६२० मतांसाठी लढत रंगली. अखेरच्या टप्प्यात ही लढाई भाजप विरुद्ध काँग्रेस अशी झाली व भाजपचे घडमोडे जिंकून आले. घडामोडे यांनी १९९५ मध्ये विठ्ठलनगर, २००५ मध्ये रामनगरमधून विजय मिळवला होता. २०१० मध्ये त्यांनी पत्नी सविता घडामोडे यांना विठ्ठलनगरमधून निवडून आणून नगरसेवकपद घरातच ठेवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला मह‌ाविद्यालयात झालेल्या १२ वॉर्डांच्या मतमोजणीत शिवसेना, एमआयएम व अपक्षांना प्रत्येकी तीन, भाजप, बसप व काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. सर्व शहराचे लक्ष लागलेल्या गुलमंडी वॉर्डातून खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे शिवसेनेचे सचिन खैरे पराभूत झाले. येथे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे बंधू भाजपाचे बंडखोर राजू तनवाणी विजय झाले. या भागातील बहुतांशी लढती एकतर्फी झाल्या आहेत.

शहराचे लक्ष लागलेल्या गुलमंडी वॉर्ड क्रमांक ४८ येथे चुरशीची लढत झाली. सचिन खैरे यांच्यासमोर शिवसेना बंडखोर पप्पू व्यास व भाजप बंडखोर राजू तनवाणी यांचे आव्हान होते. या चुरशीच्या लढतीत राजू तनवाणी त्यांनी पप्पू व्यास यांचा १५८ मतांनी पराभव केला. सचिन खैरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. तनवाणी यांना २१५६, व्यास यांना १९९८, तर खैरे यांना १४७७ मते मिळाली. औरंगाबाद पश्चिमचे आमदार इम्तियाज जलील यांचे निवासस्थान असलेल्या भडकल गेटमध्ये (वॉर्ड क्रमांक ४९) एमआयएमचे उमेदवार गंगाधर ढगे यांनी एकहाती विजय मिळवला. त्यांना २२६० मते, काँग्रेसचे विजेंद्र जाधव ११६३ मतांनी पराभूत झाले. भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांना ९११, प्रशांत प्रितमकुमार शेगावकर यांना २९० मते मिळाली.

नागेश्वरवाडी वॉर्ड क्रमांक ५१ येथे विद्यमान अपक्ष नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी गड कायम राखला. त्यांनी ३१९६ मते घेत शिवसेनेचे विनायक देशमुख यांचा ११२८ मतांनी पराभव केला. खडकेश्वर वॉर्ड क्रमांक ५२ या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात एमआयएमने झेंडा रोवला आहे. शिवसेनेच्या सुगंधकुमार गडवे यांचा एमआयएमचे विकास एडके यांनी ७१७ मतांनी पराभव केला. ऐडके यांना २१२० मते मिळाली. औरंगपुरा वॉर्ड क्रमांक ५२ मधून भाजपने पुन्हा विजय मिळवला आहे. येथून बबिता विजय चावरिया यांनी २००६ मते मिळवत एमआयएमच्या लतिका नरवडे यांचा ७९३ मतांनी पराभव केला. वॉर्ड क्रमांक १३ भीमनगर उत्तर येथे वर्षा बनसोडे व आ‌शा निकाळजे या दोन्ही अपक्षांमध्ये लढत झाली. आशा निकाळजे यांनी बनसोडे यांचा ४३५ मतांनी पराभव केला. बसपाच्या डॉ. अर्चना गणवीर तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. पडेगाव वॉर्ड क्रमांक १४ येथे एमआयएमचे मिलिंद शेजवळ यांचा शिवसेनेचे सुभाष शेजवळ यांनी ४०६ मतांनी पराभव केला. सुभाष शेजवळ यांना १९९६ मते मिळाली. मिटमिटा वॉर्ड क्रमांक १५ येथे शिवसेनेच्या रावसाहेब आम्ले यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मुळे यांनी आव्हान उभे केले होते. आम्ले यांनी ८९५ मतांनी मुळे यांचा पराभव केला. भावसिंगपुरा वॉर्ड क्रमांक १६ येथे शिवसेनेच्या मनिषा लोखंडे यांनी एकहाती विजय मिळवला. त्यांनी अपक्ष उमेदवार मीना जाधव यांचा विक्रमी २१९९ मतांनी पराभव केला. नंदनवन कॉलनी वॉर्ड क्रमांक १७ मधील लढतही एकतर्फी झाली. बहुजन समाज पक्षाच्या प्रेमलता मिलिंद दाभाडे यांनी शिवसेनेच्या डॉ. चारूलता मगरे यांचा ७४७ मतांनी पराभव केला.

अफसरखान विजयी

जयसिंगपुरा वॉर्ड क्रमांक १८ मधील लढतही एकतर्फी झाली. काँग्रेसचे अफसरखान यांनी शिवसेनेचे विलास संभाहारे यांचा तब्बल १४४१ मतांनी पराभव केला. या वॉर्डातून एमआयएमचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. कोतवालपुरा वॉर्ड क्रमांक ५० येथे एमआयएमच्या खान नसरीन बेगम समद यारखान विजयी झाल्या. या एकतर्फी लढतीत नसरीन बेगम यांनी ३३५२ मते मिळवत रिपाइं आठवले गटाच्या लीलाबाई पाखरे यांचा १९३६ मतांनी पराभव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएम, अपक्षांनी अंदाज चुकवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गरवारे क्रीडा संकुल निवडणूक केंद्राअंतर्गत येणाऱ्या अकरा वॉर्डांमध्ये सर्वाधिक चार जागा 'एमआयएम'ने जिंकून राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकवले. भाजपने दोन, शिवसेना, काँग्रेस व बहुजन समाज पक्षाने एकेक जागा मिळवली. दोन अपक्षांनी धक्कादायक निकालाची नोंद करीत प्रमुख पक्षांना हादरा दिला.

आंबेडकरनगर वॉर्डात (३२) एकूण १३ उमेदवार रिंगणात होते. बहुजन समाज पक्षाच्या भारती महेंद्र सोनवणे यांनी ३,५८० मते घेऊन अपक्ष राखी सुरेश इंगळे यांचा (१,६४८) १,९३२ मतांनी पराभव केला. इतर उमेदवारांना मतदारांनी फारसे महत्त्व दिलेच नाही. भारती सोनवणे यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवली. या वॉर्डात ५,९३८ मतदारांनी मतदान केले. मिसारवाडी वॉर्डात (३३) काँग्रेसच्या शबनम बेगम कलीम कुरेशी यांना १,२०४ मते मिळाली. त्यांनी भाजपच्या कविता गीतेश सोनवणे यांचा ७७७ मतांनी पराभव केला. सोनवणे यांना ४२७ मते मिळाली. या वॉर्डात एकूण सात उमेदवार रिंगणात होते. काँग्रेस व भाजपमध्येच थेट लढत झाली. आरतीनगर-मिसारवाडी वॉर्डात (३४)२,९९३ मतदारांनी हक्क बजावला. त्यात 'एमआयएम'च्या संगीता सुभाष वाघुले यांनी ८९३ मते घेऊन विजय मिळविला. त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या पूजा अनिल जाधव (७५५) यांचा १३८ मतांनी पराभव केला. भाजपच्या मोनिका नागेश भालेराव या ७४९ मतांसह तिसऱ्या स्थानावर राहिल्या. या तीन उमेदवारांमध्येच लढत झाली. चुरशीच्या लढाईत वाघुले यांनी बाजी मारली.

राजू शिंदे दुसऱ्यांदा विजयी : एमआयडीसी चिकलठाणा वॉर्डातून (३८) भाजपचे राजू शिंदे हे दुसरऱ्यांदा निवडून आले. राजू शिंदे यांनी २,७४० मते मिळविली. त्यांनी अपक्ष सचिन मिसाळ (१२०४) यांचा १,५३६ मतांनी पराभव करुन आपला मतदार संघ राखला. काँग्रेसच्या भगवान रगडे यांना १२० तर राष्ट्रवादीच्या तुषार वाघमारे यांना ८४ मते मिळाली. या वॉर्डात ४,३११ मतदारांनी सात उमेदवारांसाठी मतदान केले. अयोध्यानगर वॉर्डातून (३९) भाजपच्या सुरेखा गौतम खरात यांनी १,२८६ मते घेताना अपक्ष ज्योती लोहार (१०७८) यांचा २०८ मतांनी पराभव केला. अपक्ष शुभांगी भांबळे यांनी १,०३३ मते घेऊन तिसरे स्थान मिळविले. या वॉर्डात भाजप व दोन अपक्षांमध्येच चुरशीची लढत झाली. काँग्रेसच्या सुनीता तायडे यांना १११ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या रुचिता गवळे यांनी ११७ मते मिळवली. रोशनगेट वॉर्डात (४४) 'एमआयएम'च्या साजेदा फारुखी सईद फारुखी यांनी ३,९३५ मते घेऊन दणदणीत विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या करीमुन्निसा बेगम जमील खान (६३८) यांचा ३,२९७ इतक्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या वॉर्डात अवघे चारच उमेदवार रिंगणात होते.

कोकाटेंना पराभवाचा धक्का

गणेशनगर वॉर्डात (४०) शिवसेना व अपक्ष उमेदवारांमध्येच प्रतिष्ठेची लढत होती. त्यात शिवसेनेचे मकरंद कुलकर्णी यांनी २,१५० मते घेऊन अपक्ष काशीनाथ कोकाटे यांचा ४६३ मतांनी पराभव केला. शिवसेनेचे बंडखोर मंगेश भाले यांना अवघी ३९१ मते मिळाली. ज्येष्ठ नगरसेवक कोकाटे यांची राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली होती. या वॉर्डातून ते दुसऱ्यांना उभे होते. एकदा मतदारांनी त्यांना संधी दिली होती. ४,३४१ मतदारांनी शिवसेनेच्या बाजूने कौल दिला. कोकाटेंना १,६८७ मते मिळाली. पहिल्या फेरीत कोकाटेंनी ३२० मते घेऊन मकरंद कुलकर्णींविरुद्ध (२७७) ४३ मतांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत कुलकर्णी यांनी ५६४ मते घेत पिछाडी भरून काढताना २७५ मतांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवली. रहेमानिया कॉलनी वॉर्डात (४१) ४,७२३ मतदारांपैकी ३,१७९ मतदारांनी एमआयएमचे इर्शाद खान यांच्या बाजूने कौल दिला. त्यांनी काँग्रेसचे रमजानी खान (१,४९३) यांचा १,६८६ मतांनी पराभव केला. या वॉर्डात केवळ तीनच उमेदवार रिंगणात होते. मात्र, एमआयएम व काँग्रेसमध्येच थेट लढत झाली. किराडपुरा वॉर्डात (४२) एमआयएमच्या नसीम बी सांडू यांनी ३,९५० मते घेऊन मोठा विजय मिळवला. त्यांनी अपक्ष सय्यद नसीम बानो (७६९) यांचा ३,१८१ इतक्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला. काँग्रेसच्या साफिया बानो (६१४) तिसऱ्या स्थानावर राहिल्या.

शिवसेनेला १५ मतदान

नारेगाव वॉर्डातील (३५) निवडणूक अटीतटीची झाली. त्यात अपक्ष गोकुळसिंग संपतसिंग मलके व अशोक सखाराम लुटे यांच्यातच चुरश होती. गोकुळसिंग मलके यांनी १,७१७ मते घेऊन विजय मिळवला. त्यांनी अपक्ष अशोक लुटे (१०८१) यांचा ६३६ मतांनी पराभव केला. 'एमआयएम'चे अब्दुल समीर साजेद (७७२) हे तिसऱ्या, तर काँग्रेसचे शहा जुबेर कादर (७२५) हे चौथ्या स्थानावर राहिले. शिवसेनेचे बाबासाहेब राजाराम गदाई यांना अवघे १५ मतदान पडले. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला एवढे निच्चांकी मतदान या वॉर्डात झाले. या वॉर्डात ४,३४९ मतदान झाले.

शरीफ कॉलनीत अपक्ष

शरीफ कॉलनीतील (४३) निवडणूक अतिशय चुरशीची झाली. ५,९३९ मतदारांनी मतदान केले. त्यात अपक्ष अजिज अहेमद रफिक यांनी २,३३६ मते घेऊन एमआयएमच्या खान निसार अहेमद यांचा १०६ मतांनी पराभव केला. निसार खान यांना २,२३० मते मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीला आठ, कॉँग्रेस दोन जागांवर विजयी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वॉर्ड कार्यालय ब, इ सिडको निवडणूक कार्यालयांतर्गत ११ वॉर्डांपैकी शिवसेना व भाजपने प्रत्येकी चार जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला दोन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकला एक जागा मिळाली. या वॉर्डातून भाजपचे उमेदवार माजी उपमहापौर प्रशांत देसरडा पराभूत झाल. त्यांच्या पत्नी राखी देसरडा (भाजप) विजयी झाल्या आहेत. या ११ वॉर्डात सहा वॉर्डात अपक्ष, एमआयम दोन, भाजप, सेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले.

संत तुकाराम नाट्यगृहात सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली. माजी उपमहौपार प्रशांत देसरडा, त्यांची पत्नी राखी देसरडा, काँग्रेसला सोडचिठ्ठीत देत भाजपात आलेले प्रमोद राठोड, भाजप महिला आघाडी शहराध्यक्षा अॅड. माधुरी अदवंत, अपक्ष आगा खान यांच्याविषयी उत्सुकता होती. दोन फेऱ्यांनंतर कल लक्षात आला व विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष सुरू केला. पराभवाचा अंदाज आलेले उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी काढता पाय घेतला. वॉर्ड ५९ इंदिरानगर दक्षिण बायजीपुरामध्ये अटीतटीच्या लढतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे रमेश जायभाय यांनी ७५ मतांनी एमआयएमचे मोहमंद रियासुद्दीन यांना धुळ चारली. जायभाय यांना २५२६ मते मिळाली. या वॉर्डात भाजपचे उमेदवार माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांना फक्त १२९ मते मिळाली. वॉर्ड ६५ सुराणानगरमधून भाजपच्या राखी प्रशांत देसरडा विजयी झाल्या. त्यांना ३६२५ मते मिळाली. शिवसेना बंडखोर किरण प्रफुल्ल मालानी यांना ७९१ मतांवर समाधान मानावे लागले. नव्याने तयार झालेल्या विश्रांतीनगर (९२ वॉर्ड) येथून भाजपचे प्रमोद राठोड यांनी ११६२ मते घेत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार भारत गायकवाड यांना ७१३ मते मिळाली. जयभवानी नगरातून (वॉर्ड ९१) भाजपच्या मनिषा मुंडे यांनी २९७३ मते घेत विजय नोंदविला. पुंडलिकनगर वॉर्डातून शिवसेनेच्या मीना गायके १६५१ मते घेऊन वियजी झाल्या, त्यांच्या प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार लक्ष्मीबाई लुटे यांनी कडवी झुंज देत १५१७ मते मिळवली.

भवानीनगर वॉर्डातून शिवसेनेचे मनोज बल्लाळ यांनी ४४९ मतांची आघाडी घेत एमआयएमचे पठाण नसीर खान रशीद खान यांचा पराभव केला. संजयनगर (वॉर्ड ५६) मधून काँग्रेसच्या मलेका बेगम हबीब कुरेशी यांनी २६२५ मते घेत शिवसेनेच्या सुर्वणा संतोष जेजूरकर यांचा पराभव केला. जेजूरकर यांना १३५८ मतांवर समाधान मानावे लागले. विद्यानगर वॉर्डातून शिवसेनेचे रेणुकादास वैद्य यांनी ६०२ मताची आघाडी घेत विजय मिळविला. त्यांना १५८७, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार बाळासाहेब पवार यांना ९८५ मते मिळाली. न्यायनगर वॉर्डातून शिवसेनेचे गजानन मनगटे विजयी झाले. त्यांना १७०६, तर अपक्ष उमेदवार पुष्पा निरपगारे १३३२ मते मिळाली. एन-४ पारिजात नगर वॉर्डातून विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवार अॅड. माधुरी अदवंत-देशमुख यांना २०२९ मते मिळाली. राजनगर मुकुंदनगर वॉर्डातून भाजप आमदार नारायण कुचे यांच्या भगिनी तथा भाजपच्या उमेदवार गंगाबाई भवरे यांना १०६८ मतांवर समाधान मानावे लागले. या वॉर्डातून काँग्रेसच्या अनिता साळवे यांनी १५९५ मते मिळवून विजय मिळवला.

नोटाचा वापर

या ११ वॉर्डात मिळून तब्बल ४५४ मतदारांनी नकाराधिकाराचा (नोटा)वापर केला, तर ७२ उमेदवारांची अनामत जप्त झाली. इंदिरानगर बायजीपुरा (वॉर्ड ५९) मधील काँग्रेसचे उमेदवार शाह अहमद पापा यांना केवळ १७ मते मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images