Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

NCPचा अवघ्या नऊ मतांनी विजय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विष्णूनगर वॉर्ड क्रमांक ७६ मधून राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ नऊ मतांनी विजय मिळविला. या अत्यंत चुरशीच्या लढाईत शेवटच्या फेरीपर्यंत यशाचे पारडे राष्ट्रवादी व भाजपकडे झुकत होते. चार फेऱ्यांपर्यंत भाजपच्या कविता चव्हाण आघाडीवर होत्या. पाचव्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकिता चव्हाण यांनी मुसंडी मारली आणि विजय मिळविला.

महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी हा वॉर्ड राखीव होता. भाजपकडून कविता चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अंकिता विधाते रिंगणात होत्या. याठिकाणी शिवसेना व भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी कायम करून भाजपसमोर अडचण निर्माण केली होती. मतमोजणीत पहिल्या चार फेऱ्यांमध्ये चव्हाण आघाडीवर राहिल्या. पहिल्या फेरीत कविता चव्हाण यांना ३५३, अंकिता विधाते यांना २४२, दुसऱ्या फेरीत ३४२ व २६४ तिसऱ्या फेरीत ३०९, ३८८, चौथ्या फेरीत ३३५ व ३२३ मते पडली. पाचव्या फेरीत चुरस निर्माण झाली. या फेरीत चव्हाण मागे पडल्या. विधाते यांना ४५० तर चव्हाण यांना ३१६ मते पडली. टपाली मतदानातही चव्हाणच आघाडीवर होत्या. अंकिता विधाते यांना १६६८, तर कविता चव्हाण यांना १६५९ मते पडली. भाजपच्या चव्हाण यांना नऊ मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्रांतिचौक केंद्रात अडवाअडवी

$
0
0

औरंगाबाद : क्रांतिचौक मतमोजणी केंद्रात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना जाऊन देण्यास मज्जाव करण्यात आला. एकीकडे शहरातील अन्य नऊ मतमोजणी केंद्रांवर मात्र कॅमेरा, मोबाइलसह प्रसारमाध्यम प्रतिनिधींना प्रवेश दिला गेला. मिन्नतवाऱ्या करूनही अधिकाऱ्यांनी ऐकले नाही. पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून प्रवेश मिळवून दिला.

सेंट फ्रांन्सिस शाळेच्या मैदानावर गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाली. मुख्य प्रवेशद्वारालगत एक तंबू टाकून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बसविले. मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी मात्र जाण्यास मज्जाव केला. कारण विचारल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तुम्हाला प्रवेश नाकारला आहे, असे सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे, मिडिआ इन्चार्ज फड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याकडे तक्रार केली, पण त्याचाही उपयोग झाला नाही. पालिका आयुक्त प्रकाश महाजन यांनीही मोबाइल उचलला नाही. अखेरीस पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक आयुक्त राजपूत यांनी मध्यस्थी करून पत्रकारांना केंद्रात प्रवेश मिळवून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएमची लक्षवेधी घोडदौड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्षणक्षणाला उत्कंठा वाठविणारा निकाल, प्रत्येक फेरी कान देवून ऐकणारी मंडळी, आपला उमेदवार पुढे आला की जल्लोष अन् घोषणा असे वातावरण मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन मतमोजणी केंद्रावर होते. वॉर्ड कार्यालयाच्या कक्षेतील बारा उमेदवारांपैकी आठ जागांवर एमआयएम, दोन शिवसेना, एक काँग्रेस तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली. उमेदवार निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात, फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

केंद्रातील ८० मतदान केंद्रावरील बारा वॉर्डाच्या मतमोजणीस सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. प्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. यानंतर ईव्हीएममशीन मतांची मोजणी सुरू झाली. प्रारंभी केंद्रावर मतमोजणी संथ गतीने सुरू होती. पहिल्या फेरीनंतर रंगत वाढत गेली. तर केंद्राबाहेर विविध पक्षांचे उमेदवार, कार्यकर्ते मतमोजणी केंद्र परिसरात सकाळपासून जमा होत होते. फ‌ेरीनिहाय मतांची आकडेवारी जाहीर करताच केंद्राबाहेरील कार्यकर्ते जल्लोष करत होते. मतमोजणीच्या फेऱ्या फारशा नसल्याने बारा वाजेपर्यंत अनेक वॉर्डाचे निकाल जाहीर झाले. अनेक दिग्गजांना मतदारांनी घरचा दाखविला. गाजी सदोद्दीन यांच्या पत्नी पराभूत झाल्या, तर विद्यमान नगरसेवक परवीन कैसर, माजी नगरसेवक लिखत जैदी यांना पराभव पाहावा लागला. वॉर्ड क्रमांक दहा रोजेबागमध्ये चुरशीच्या लढतीत मोहन मेघावाले २८३ मतांनी विजयी ठरले. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे पटेल साजिद समी राहिले. मतांच्या विभाजन झाल्याचा फायदा मेघावाले यांना झाला. विश्वासनगर, हर्षनगर वॉर्डात काँग्रेसचे अय्युब खान यांनी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी यांना २२३ मतांनी पराभूत केले. पहासिंगपुरा, बेगमपुरा वॉर्डात शिवसेनेचे बंडखोर ज्ञानेश्वर जाधव यांनी शिवसेनेच्या अनिल भिंगारे यांचा ३७४ मतांनी पराभव केला. आरेफ कॉलनी वॉर्डात एमआयएमचे कादरी जमीर अहेमद रहीम व एमआयएमचे बंडखोर अपक्ष उमेदवार वाहेद अली झाकेर अली हाशमी यांच्यात चुरस होती. यात एमआयएमचे कादरी जमीर ४५७ अधिक मते घेवून विजयी ठरले. जयभीमनगर, असेफिया कॉलनीत एमआयएमचे सय्यद मतीन रशीद यांनी विजयश्री खेचून आणली भारिपचे प्रवीण म्हस्के यांच्यापेक्षा १,८३२ अधिकची मते पडली. बुढीलेन, कबाडीपुरा वॉर्डात एमआयएमच्या शकीला बेगम यांनी आपल्या प्रतिस्पर्धी निखत परवीन यांच्यावर ४९९ मतांची आघाडी घेत विजय मिळविला.

लोटाकारंजामध्ये तसनीम बेगम या एमआयएमच्या उमेदवार विजयी ठरल्या. चेलीपुरा, काचीवाडा वॉर्डात रंगतदार लढतीत एमआयएमच्या खान सायरा बानो अजमल यांचा १०४ मतांनी विजय झाला. गणेश कॉलनीत एमआयएमचे सिद्दीकी नासेर यांनी काँग्रेसचे अ.रशीद यांना दीड हजारमताच्या फरकाने पराभूत केले. नहेरूनगरमध्येही एमआयएमच्या शेख नरगीस विजयी ठरल्या. त्यांनी १,७०४ मताच्या फरकाने अपक्ष उमेदवार जुलेखा बेगम यांना पराभूत केले. शताब्दीननगरमध्ये एमआयएमचे खान जहागीर मुलानी (अज्जू पहेलवान) यांनी काँग्रेसचे मोमीन अजीज खन गणीखान यांना पराभूत केले.

स्वामी विवेकानंद वॉर्ड ठरला एकतर्फी

स्वामी विवेकानंद वॉर्ड सुरुवातीपासून रंगतदार ठरला. शिवसेना, भाजपच्या बंडखोर उमेवार, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपाचे उमेदवार रिंगणात होते. यात शिवसेनेच्या सीमा खरात यांनी एकतर्फी विजय मिळविला. त्यांना २,४०६ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार प्रत्येकी हजाराच्या आत मते पडली.

'एमएमआय'चे सर्वाधिक विजयी उमेदवार ठरलेले केंद्र

मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र परिक्षेत्रात एमआयएमचे सर्वाधिक उमेदवार विजयी ठरले. १२ वॉर्ड या परिक्षेत्रात होते. यात तब्बल आठ वॉर्डात एमआयएमच्या उमेदवारांनी विजय मिळविला, तर दोन जागांवर शिवसेना एका वॉर्डात काँग्रेसचा उमेदवार विजयी ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-भाजपने आपापले गड राखले

$
0
0

अकरापैकी आठ वॉर्डांत सेना-भाजपचे उमेदवार विजयी; पाच फेऱ्यानंतर वॉर्डांचा निकाल

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उत्कंठावर्धक महापालिका निवडणुकीत जवाहर कॉलनी कार्यालयाअंतर्गत असलेल्या अकरा वॉर्डांत शिवसेना-भाजप युतीने आठ जागा पटकावल्या. राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम व रिपाइं डेमोक्रॅटीक पक्षाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. विद्यमान महापौर कला ओझा यांना बाळकृष्णनगर वॉर्डातून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

जवाहर कॉलनी निवडणूक कार्यालयाअंतर्गत असलेल्या अकरा वॉर्डात चुरशीची लढत झाली. टपाली मतदान मोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. मतमोजणीच्या पाच फेऱ्यानंतर वॉर्डांचा निकाल जाहीर करण्यात आला. शिवशंकर कॉलनी वॉर्डात (७४) शिवसेनेच्या नितीन साळवी यांनी दोन हजार ४१७ मते मिळवत एकतर्फी विजय मिळवला. काँग्रेसच्या नरेश पाखरे यांचा त्यांनी दारुण पराभव केला. उत्तमनगर (७५) वॉर्डात शिवसेनेचे त्र्यंबक तुपे यांनी दोन हजार मतांनी निर्विवाद विजय मिळवला. अपक्ष उमेदवार पुखराज काळे यांचा तुपे यांनी पराभव केला. गजाननगर वॉर्डात (९४) शिवसेनेचे आत्माराम पवार यांनी १,३५२ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रेमसिंग चव्हाण यांना पराभूत केले. बाळकृष्णनगर (९५) वॉर्डात शिवसेनेच्या विद्यमान महापौर कला ओझा तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती मोरे यांनी १,२३८ मते मिळवून विजयी ठरल्या. तर अपक्ष उमेदवार संगीता रत्नपारखे यांना ९७१ मते मिळाली. या उमेदवारांच्या चुरशीत ओझा यांना फक्त ८१६ मते पडली. गारखेडा (९६) वॉर्डात भाजपच्या विमल केंद्रे यांनी एक हजार ९२५ मते मिळवून अपक्ष उमेदवार संगीता लोखंडे यांचा पराभव केला. या वॉर्डात शिवसेना-भाजपच्या बंडखोरात लढत झाली. रामकृष्णनगर (९७) वॉर्डात शिवसेनेच्या सीमा चक्रनारायण यांनी आश्चर्यकारक विजय मिळवला. चक्रनारायण यांनी १,४७९ मते मिळवून अपक्ष उमेदवार राधिका वाघमारे यांचा पराभव केला. सेना बंडखोर उमेदवार सुशील खेडकर यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत असलेल्या उल्कानगरी (९८) वॉर्डात भाजपचे दिलीप थोरात अवघ्या १९३ मतांनी विजय ठरले. सेना-भाजपात मतांची विभागणी होऊनही थोरात यांनी नियोजनबद्ध प्रचारातून विजय मिळवला. भाजपच्या पारंपरिक विश्वभारती कॉलनी वॉर्डात (९९) अर्चना निळकंठ विजयी झाल्या. निळकंठ यांनी १,५१५ मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता शिंदे यांचा पराभव केला. प्रियदर्शनी इंदिरानगर (१११) वॉर्डात एमआयएमच्या सलीमा कुरेशी एक हजार ३९ मते मिळवून विजयी झाल्या. भाजपच्या रंजना ढेपे यांचा कुरेशी यांनी पराभव केला. शिवाजीनगरच्या प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ दोन हजार ३५ मते घेऊन विजयी ठरले. अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांचा त्यांनी पराभव केला. तर शिवसेनेचे दिग्विजय शेरखाने व अपक्ष उमेदवार जालिंदर शेंडगे यांचा सहज पराभव करुन रिपाइं डेमोक्रॅटीक पक्षाचे कैलास गायकवाड विजयी ठरले. गायकवाड यांना १,४२७ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दुपारी बारा वाजता सर्व विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान केले.

तीन हजारांपेक्षा अधिक

मतांनी विजयी उमेदवार

नसीम बी सांडू (३९५०, एमआयएम, किराडपुरा)

साजेदा फारुखी (३९३५, एमआयएम, रोशनगेट)

राखी देसरडा (३६२५ मते, भाजप, सुराणानगर)

भारती सोनवणे (३५८० मते, बहुजन समाज पार्टी, आंबेडकरनगर वॉर्ड)

खान नसरीन बेगम (३३५२, एमआयएम, कोतवालपुरा)

नितीन चित्ते (३३२८, भाजप, पवननगर)

विजय औताडे (३२५४, भाजप, मयूरपार्क)

कीर्ती शिंदे (३१९६, अपक्ष, नागेश्वरवाडी)

इर्शाद खान (३१७९ मते, एमआयएम, रहेमानिया कॉलनी)

सर्वात अधिक मतांच्या फरकाने विजयः साजेदा फारुखी (३२९७, एमआयएम, रोशनगेट वॉर्ड)

सर्वात कमी मतांच्या फरकाने विजयः अंकिता विधाते (९ मतांनी विजय, राष्ट्रवादी काँग्रेस, विष्णूनगर वॉर्ड)

सर्वात कमी वय असलेले विजयी उमेदवारः यशश्री लक्ष्मीनारायण बाखरिया (वय २१, अपक्ष, राजाबाजार वॉर्ड)

सर्वात अधिक वय असलेले विजयी उमेदवारः खतिजा छोटू कुरेशी (वय ८१, अपक्ष, कैसरकॉलनी वॉर्ड)


६७ जणांवर नामुष्की

जवाहर कॉलनी निवडणूक कार्यालयअंतर्गत असलेल्या ११ वॉर्डातील ६७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. यातील अनेक उमेदवार दोन आकडी मते मिळवण्यातही अपयशी ठरले. प्रमुख पक्षांच्या स्पर्धेत अपक्ष व बंडखोर उमेदवारांचा धुव्वा उडाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला शक्तीने राखली NCPची पत

$
0
0

सुधीर भालेराव, औरंगाबाद

महापालिकेच्या मावळत्या सभागृहाच्या शिवसेनेच्या महापौर कला ओझा यांना पराभवाचा धक्का दिला तो राष्ट्रवादी काँग्रेसने. विद्यमान महापौरांचा पराभव करून ज्योती मोरे 'जाएंट किलर' ठरल्या. पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त तीन उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीची 'पत' महिलांनीच राखली आहे. पक्षाने ७७ उमेदवार रिंगणात उतरवले होते, तर मावळत्या सभागृहात ११ नगरसेवक होते.

खासदार चंद्रकांत खैरे यांनी महापौर कला ओझा यांना विजयी करण्यासाठी चांगलेच डावपेच लढवले होते. परंतु, बाळकृष्णनगर वॉर्डात त्यांना धोबीपछाड देऊन ज्योती मोरे विजयी झाल्या. हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेससाठी आनंददायी ठरला. मात्र, हा आनंद त्यांच्यासाठी क्षणभंगूरच आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघे तीनच उमेदवार विजयी झाले आहेत. ज्योती मोरे, अंकिता विधाते आणि मुल्ला सलिमा बेगम खाजोद्दीन या तिघींनी पक्षाची 'पत' काही प्रमाणात राखली आहे.

विधानसभा निवडणुकीत एमआयएमने मिळविलेले यश राष्ट्रवादीने गांभीर्याने घेतले नाही. महापालिकेत एमआयएमला मुस्लिम मतदार विधानसभेप्रमाणे भरभरून मतदान करणार नाहीत, हा राष्ट्रवादीचा अंदाज सपशेल खोटा ठरला. एमआयएमच्या वादळात राष्ट्रवादी भुईसपाट झाली. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने ७७ वॉर्डात पक्षाचे उमेदवार उभे केले होते. काही ठिकाणी त्यांचे उमेदवार अपक्ष म्हणून लढले. एक-दोन वॉर्डात राष्ट्रवादीने अपक्षाला पुरुस्कृत केले. मावळत्या सभागृहात राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक होते. मात्र, मनपा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीचे अवघे तीनच नगरसेवक सभागृहात असणार आहेत. तीन महिला उमेदवारांचा विजय होत असताना एकही पुरूष नगरसेवक निवडून आला नाही ही पक्षासाठी धोक्याचीच घंटा आहे. वर्षोनुवर्षे पक्ष कार्य करणाऱ्या पुरूष पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मतदारांनी नाकारले ही चिंतेचीच गोष्ट आहे.

काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्सुक होता. परंतु, काँग्रेसकडून आघाडीसाठी फारसा प्रतिसाद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सर्वात अगोदर निवडणूक जाहीरनामाही जाहीर केला. उमेदवारांची यादीही सर्वात अगोदर तयार केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यकर्त्यांना दिशा दिली. मात्र, त्यानंतर पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांना वाऱ्यावर सोडून दिले. आमदार सतीश चव्हाण यांच्याच खांद्यावर सर्व जबाबदारी टाकण्यात आली. मराठवाड्यातील नेते धनंजय मुंडे, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, विक्रम काळे यांनी अल्पसा वेळ प्रचारासाठी दिला. औरंगाबादचे संपर्कमंत्री राजेश टोपे यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यापासून मनपा निवडणुकीत रस दाखवला होता. परंतु, निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात टोपे शहरात फिरकलेच नाहीत. त्याचा फटका अनेक ठिकाणी बसलाच. आमदार सतीश चव्हाण, शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, अभिजीत देशमुख अशा काही पदाधिकाऱ्यांनीच अखेरपर्यंत किल्ला लढवला. ७७ पैकी अवघे तीन महिला उमेदवार निवडून आले. डॉ. बाळासाहेब पवार (विद्यानगर), संदीप मुके (मिटमिटा), प्रकाश मते (पवननगर), लक्ष्मण औताडे (मयूरपार्क), सलीम पटेल (इंदिरानगर-उत्तर बायजीपुरा) असे प्रमुख उमेदवार हे दुसऱ्या स्थानावर राहिले. मोतीलाल जगताप, सुनील जगताप यांना पराभवाचा धक्का बसला. काही वॉर्डात राष्ट्रवादीचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिले.

निवडणूक कोणतीही असो, ती जिंकण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची गरज असते हेच मुळी राष्ट्रवादीचे नेते विसरल्याचे दिसून आले. शिवसेना-भाजपच्या बालेकिल्ल्यात स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे खूपच आवश्यक आहे.

प्रत्येक वॉर्डात नागरिकांशी थेट संपर्क साधण्याकरिता कार्यालये सुरू केली तर पक्षवाढीसाठी ती निश्चितच उपयोगी ठरतील. केवळ निवडणुकीच्या तोंडावर विकासाची भाषणे झाडून उपयोग होणार नाही. राष्ट्रवादीचे नेते या पराभवातून निश्चितच धडा घेतील अशी अपेक्षा करुयात.


तीन वॉर्डात राष्ट्रवादी

निवडणूक रिंगणात ७७ उमेदवार उभे केल्यानंतर अवघ्या तीन वॉर्डात मिळालेला विजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निश्चितच भूषणावह नाही. एमआयएमच्या आव्हानाकडे केलेले दुर्लक्ष राष्ट्रवादीला प्रचंड महागात पडले. आगामी काळात राष्ट्रवादीला पुन्हा एकदा पक्षबांधणीबरोबरच जनमाणसांत स्थान मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याची गरज आहे. निवडणूक गांभीर्याने न घेणे, प्रचाराचे फारसे नियोजन नसणे, राज्य पातळीवरील नेत्यांचे निवडणुकीकडे दुर्लक्ष या उणीवा पक्षाला महागातच पडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

MIMच्या जिल्हाध्यक्षांचा पराभव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या कामगिरीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले होते. एमआयएम मनपा निवडणुकीत विजयाची घौडदौड करत असतानाच त्यांच्या जिल्हाध्यक्षांना पराभवाची चव चाखावी लागली. एमआयएमसाठी हा पराभव जिव्हारी लागणारा होता.

महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या तिकिट वाटपावरून गोंधळ झाला होता. अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष किंवा इतर पक्षाकडून तिकिट मिळवित रिंगणात उडी घेतली. त्यातच वादावादीच्या घटना समोर आल्या. याचा फटका निवडणुकीत एमआयएमला बसेल असेही बोलले जात होते, परंतु त्याचा फटका बसला नाही. एमआयएमचे अनेक वॉर्डात उमेदवार निवडून येत होते. त्याचवेळी वॉर्ड क्रमांक ११ मध्ये पक्षांचे जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी यांचा पराभव झाला. त्यांना काँग्रेसच्या खान अय्यूब यांनी धूळ चारली. पराभव दिसत असल्याचे लक्षात येताच, मौलाना आझाद मतमोजणी केंद्रावरून त्यांनी काढता पाय घेतला. मनपा निवडणुकीत २५ जागा जिंकरणाऱ्या एमआयएमच्या यशासह जिल्हाध्यक्षांच्या पराभवाची चर्चाही अधिक रंगली होती.

अन् रडू कोसळले..

जिल्हाध्यक्ष यांचा पराभव एमआयएमला जिव्हारी लागला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्ते जल्लोष करत होते. त्याचवेळी काही कार्यकर्त्यांना रडू कोसळले. एमआयएम पक्षाची औरंगाबादमध्ये मुहूर्तमेढ रोवण्यात कुरेशी यांचा अधिकचा वाटा असल्याचे बोलले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खैरेंच्या प्रतिष्ठेला सुरुंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौर कला ओझा आणि पुतणे सचिन खैरे यांच्या महापालिका निवडणुकीतील पराभवामुळे शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रतिष्ठेला सुरूंग लागला आहे. या दोन्हीही जागांसह खैरे यांनी आपले पुत्र ऋषिकेश यांच्यासाठी वॉर्ड सोडण्यावा म्हणून आग्रह धरला होता, पण त्यांना आपल्या पुत्राचीच जागा वाचवता आली.

महापालिका निवडणूक जाहीर झाल्यावर खासदार खैरे यांनी ऋषिकेश खैरे आणि सचिन खैरे यांना उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी आग्रह धरला होता. त्याच बरोबर महापौर कला ओझा यांनाही उमेदवारी दिलीच पाहिजे, असे त्यांनी वरिष्ठ नेत्यांना ठणकावून सांगितले. कला ओझा यांना महापौर करण्यात खैरे यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र, ओझा यांच्या कारभाराबद्दल पालिकेच्या वर्तुळात नाराजीचीच भावना कायम होती. असे असतानाही ओझा यांना निवडणुकीत तिकीट देण्यासाठी खैरे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाकडे आग्रह धरला. ओझा यांच्यासाठी उमेदवारी मिळवून घेतली. खैरे यांनी ओझा यांना विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदार संघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळवून दिली होती. या निवडणुकीतही ओझा यांना निवडून आणण्यात खैरे यांना यश आले नाही. आता महापालिका निवडणुकीतही खैरे ओझा यांना जिंकून आणू शकले नाहीत. दुसरीकडे गुलमंडीवरही शिवसेनेला पाणी सोडावे लागले. युतीच्या जागा वाटपात शिवसेनेने गुलमंडी वॉर्ड प्रतिष्ठेचा केला होता. गुलमंडी परंपरेने शिवसेनेकडेच होती. शिवसेनेची औरंगाबादमधील पहिली शाखा गुलमंडीवर स्थापन झाली. त्यामुळे गुलमंडी वॉर्ड शिवसेनेलाच हवा असे म्हणत खैरे यांनी युतीत हा वॉर्ड शिवसेनेसाठी सोडवून घेतला. या वॉर्डातून पुतणे सचिन खैरे यांना उमेदवारी दिली. मात्र, ओझा पाठोपाठ सचिन खैरे यांचाही पराभव झाला. फक्त ऋषिकेश खैरे यांनाच चंद्रकांत खैरे विजयी करू शकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसला नडला अती आत्मविश्वास

$
0
0

मकरंद कुलकर्णी, औरंगाबाद

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतरही काँग्रेसने महापालिका निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिले नाही. काँग्रेसने सर्वाधिक १०६ जागा लढवून केवळ दहा जागा मिळवल्या. मुस्लिमबहुल वॉर्डात एमआयएमला टक्कर दिली अशा वल्गना करणाऱ्या नेत्यांना मतदारांनीच चपराक दिली. काँग्रेस श्रेष्ठी सलग तिसऱ्या वेळी फाजील आत्मविश्वासाचे बळी पडले.

राज्यातील १५ वर्षांची सत्ता नोव्हेंबरमध्ये काँग्रेसने घालविली. औरंगाबाद जिल्ह्यात केवळ एक जागा मिळाल्यापासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास गमाविला आहे. या अडचणीतच महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. राज्यातील काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली. चव्हाण मराठवाड्यातीलच असल्याने औरंगाबाद पालिकेसाठी ते विशेष व्यूहरचना करतील, असे मानले जात होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण होते. अशोक चव्हाणांच्या महिनाभरापूर्वीच्या दौऱ्यात त्यांनी स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले होते. आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, एम. एम. शेख, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम या मंडळींवर जबाबदारी टाकण्यात आली. सचिन सावंत, बाळासाहेब देशमुख, आरेफ नसीम खान आणि विश्वजित कदम यांना निरीक्षक म्हणून औरंगाबादेत पाठवण्यात आले होते. या मंडळींनी दोन दिवस मुलाखती घेतल्या. निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार निवडण्याऐवजी ओळखीचे आणि वशिल्याचे उमेदवार निवडले. महिला आघाडीला पूर्णपणे डावलले गेले. त्याचे तीव्र पडसाद उमटले. प्रचारात महिला आघाडी कुठेच दिसली नाही. उमेदवार निवडीपासून सुरू झालेला घोळ अखेरपर्यंत संपलाच नाही. फॉर्म दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्मचे वाटप केले गेले.

प्रचारयंत्रणेच्या बाबतीत काँग्रेसचे नियोजन पुरते ढिसाळ होते. कोणत्या दिवशी कोणता नेता येणार आहे, याची साधी माहितीदेखील स्थानिक नेत्यांना नव्हती. स्टार प्रचारकांची २० नेत्यांची यादी होती. त्यातून केवळ सहा जणच औरंगाबादेत आले. सचिन सावंत, बाळासाहेब देशमुख वगळता एकाही नेत्याने काँग्रेसच्या प्रचारासाठी वेळ दिला नाही.

स्थानिक नेत्यांनीही आपापले पाठीराखेच सांभाळले. त्यामुळे काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे दणका बसला. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची नाही असा हेका काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावला होता. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या शब्दाला मान दिला, पण अपेक्षित यश मिळवून देण्यात स्थानिक कमी पडले. २०१० च्या निवडणुकीत काँग्रेसला १९ जागा मिळाल्या होत्या. यावेळी हा आकडा दहापर्यंत अडकला. अशीच परिस्थिती राहिली तर काँग्रेसला शहरात अस्तित्वासाठी धडपड करावी लागणार आहे.

गटातटाचे राजकारण

एमआयएमने विधानसभेत दणका दिल्यानंतर काँग्रेसची कार्यपद्धती सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, पण पालिकेच्या निकालाने हे साफ धुळीस मिळाले. १११ पैकी ३५ वॉर्डापुरतेच काँग्रेसचे लक्ष राहिले. त्यामुळे अन्य वॉर्डातील काँग्रेसचे मतदार संभ्रमात राहिले. काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण प्रचारातही दिसून आले. उमेदवारांनी स्वतःच्या हिमतीवर प्रचार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपला अपेक्षेइतक्याच जागा

$
0
0

प्रमोद माने, औरंगाबाद

छोट्या भावाची भूमिका निभावणाऱ्या भारतीय जनता पक्षाला औरंगाबाद महापालिका निवडणुकीत अपेक्षित इतक्याच जागा मिळाल्या आहेत. भाजपने २३ जागा जिंकल्या आहेत. नवीन चेहऱ्यांचाच त्यात सिंहाचा वाटा आहे. प्रदेशाध्यक्ष दानवे आणि आमदार नारायण कुचे यांना हादरा देणारे निकाल काही वॉर्डात लागले.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जालना लोकसभा मतदारसंघातील दहा वॉर्डांचा समावेश महापालिकेत आहे. केवळ ३ वॉर्डांमध्ये भाजपला यश मिळाले. पाच वॉर्डांमध्ये भाजपला पूर्णपणे अपयश आले. हा दानवे यांना फटका आहे. तसाच फटका भाजपचे बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांना बसला आहे. त्यांच्या भगिनी गंगाबाई भवरे आणि बंधूला पराभव पत्करावा लागला. ते ज्या प्रभागातून निवडून आले, तो प्रभागही त्यांना राखता आला नाही. भारतीय जनता पक्षाचे तीन बंडखोर निवडून आले आहेत. तसेच शिवसेनेचे नाक असलेल्या गुलमंडीत भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांनी बाजी मारली आहे. शिवसेनेला गुलमंडीत महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला. तो भाजपच्या बंडखोराकडून. अन्य पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणारे राजगौरव वानखेडे, विजय औताडे आणि प्रमोद राठोड यांनी आपापल्या वॉर्डात विजय मिळ‌वला आहे. सुरेंद्र कुलकर्णी यांच्या पत्नी जयश्री कुलकणी यांनी बाजी मारली आहे. गेल्या पाच वर्षांत आपण भाजपचे सदस्य नसल्याचा दावा करणारे राजू शिंदे हे पुन्हा एकदा कमळाच्या चिन्हावर निवडून आले आहेत.

हर्सूलमध्ये पूनमचंद बमणे यांनी जोरदार विजय मिळविला आहे. माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांच्या सुविद्य पत्नी राखी देसरडा यांनी सुराणानगर वॉर्डातून शानदार विजय प्राप्त केला आहे. मात्र, विद्यमान उपमहापौर संजय जोशी यांच्या पत्नीला पराभव पत्करावा लागला. उल्कानगरीतून भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस दिलीप थोरात यांना विजय मिळाल्यामुळे बंडखोर सेनेचा उमेदवार पराभूत झाला आहे. देवानगरमध्ये एनवेळी साधना सुरडकर यांनी माघार घेतल्याने भाजपने पुरस्कृत केलेल्या शोभा बुरांडे या निवडून आल्या आहेत. माजी महापौर डॉ भागवत कराड यांच्या पत्नी डॉ अंजली कराड या पराभूत झाल्या आहेत. हा मोठा झटका म्हणावा लागेल. गतवेळपेक्षा भाजपला सात जागांची अधिक कमाई झाली आह.

राजाबाजारमध्ये हादरा

सिडको एन २ या वॉर्डातील दामूअण्णा शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, त्यांच्या पत्नी सत्यभामा शिंदे यांना भाजपने तिकीट नाकारले होते. त्यांनी बंडखोरी करून भाजपच्या अधिकृत उमेदवारावर मात केली. राजाबाजार वॉर्डात भाजपला चांगला हादरा बसला आहे. तनवानी यांचे समर्थक जगदीश सिद्ध यांच्या वहिनी रिना सिद्ध यांना पराभव पत्करावा लागला. शिवसेनेची बंडखोर उमेदवार यशश्री बाखरिया यांनी सिद्ध यांच्यावर शानदान विजय मिळविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गड आला, पण बुरूज ढासळला

$
0
0

उन्मेश देशपांडे, औरंगाबाद

गड आला पण गडाचा बुरूज ढासळला असेच वर्णन महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या झालेल्या विजयाचे करावे लागणार आहे. ज्या गुलमंडीतून शिवसेनेची सुरुवात झाली, त्याच गुलमंडीत शिवसेनेचा दारुण पराभव झाला. त्यामुळे एका डोळ्यात हासू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू, अशी स्थिती शिवसेनेच्या नेत्यांची झाली.

औरंगाबाद म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे औरंगाबाद असे समीकरण निर्माण झालेले आहे. असे असतानाही यंदा महापालिकेच्या निवडणुकीत विकास कामांच्या मुद्यांवरून आपला टिकाव लागणे शक्य होणार नाही, हे लक्षात आल्यावर शिवसेनेने एमआयएमचे भांडवल करीत भारतीय जनता पक्षासोबत युती केली. एमआयएमचे भुत उभे करून मतांचा जोगवा मागण्याचे काम शिवसेनेने केले. त्यातून गेल्यावेळेपेक्षा आपली स्थिती सुधारेल असा अंदाज शिवसेनेचे नेते वर्तवत होते, पण त्यांचा भ्रमनिरास झाला. २०१० मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला ३० जागा मिळाल्या. यंदा एवढ्या जागा मिळवताना शिवसेनेच्या तोंडाला फेस आल्याचे चित्र एकूणच निकालावरून स्पष्ट होते. हे असे का घडले याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता शिवसेनेच्या नेत्यांवर आली आहे. केवळ भावनेवर आरूढ होऊन आपल्याला यश मिळेल, असे यापुढे शिवसेनेला गृहित धरता येणार नाही. शिवसेनेचे काही नेते अपेक्षित यश न मिळाल्याचे खापर बंडखोरांवर फोडत आहेत. त्यांचा हा पवित्रा 'सोअर ग्रेप्स'च्या कथे सारखाच आहे. आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडून काय साध्य होणार, याचाही विचार शिवसेनेच्या नेत्यांनी केला पाहिजे. बुधवारी मतदानाची वेळ संपल्यावर सायंकाळी खासदार चंद्रकांत खैरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, 'युती न करता स्वतंत्र लढलो असतो, तर बरे झाले असते.' आता हाती आलेल्या निकालावरून असे लक्षात येते की शिवसेना स्वतंत्र लढली असती, तर आहे त्या पेक्षा वाईट स्थितीला शिवसेनेला सामोरे जावे लागले असते. पालिकेत २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. या २५ वर्षांतील वीस वर्ष सोडून दिली तरी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांचा हिशेब नागरिकांनी शिवसेनेच्या नेत्यांना विचारला असता आणि तो हिशेब देता देता शिवसेनेच्या नेत्यांना नाकीनऊ आले असते. कारण कधी नव्हे ते गेल्या पाच वर्षात शहराची इतकी दुर्दशा झाली की त्याला काही अंत नाही. गुलमंडी शिवसेनेचा बालेकिल्ला. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिली शाखा गुलमंडीवर सुरू झाली. युतीत जागा वाटप करताना गुलमंडी वॉर्ड प्रतिष्ठेचा करीत शिवसेनेने या वॉर्डावर दावा केला आणि वॉर्ड सोडवून घेतला, परंतु या वॉर्डावरचा भगवा शिवसेनेला कायम राखता आला नाही. या पराभवाला बंडखोरीचे कारण शिवसेनेचे नेते सांगत आहेत. हे कारण खरे असेलही, पण एवढे एकच कारण गुलमंडी हातची घालवण्यासाठी पुरेसे आहे का, याचा विचारही शिवसेनेच्या नेत्यांना करावा लागेल. युतीमुळे शिवसेनेला महापालिकेचा गड राखता आला. गुलमंडीसह अनेक महत्त्वाच्या जागा गमवाव्या लागल्यामुळे गडाचे बुरूज ढासळू लागले आहेत, हे देखील शिवसेनेच्या नेत्यांनी वेळीच लक्षात घेतले पाहिजे.

सिध्द करताना दमछाक

पालिकेच्या प्रशासनावर नसलेला अंकुश, आपसातील हेवेदावे आणि 'आपल्या माणसाची' नको तेवढी पाठराखण या कारणांमुळे सेनेला निवडणुकीच्या मैदानात स्वतःला सिध्द करताना दमछाक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता जबाबदारी विकासाची

$
0
0

धनंजय लांबे

पर्यटन, उद्योग आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेले शहर कसे असावे, याचा विचारदेखील ज्यांना गेल्या २८ वर्षांत शिवला नाही त्यांचीच सत्ता पुन्हा महापालिकेत आली आहे. या शहरात मतांचे जाती-धर्माच्या आधारावर धृवीकरण होते, या ठपक्यावर आकड्यांच्या गणिताने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. भ्रष्टाचार, प्रशासन-लोकप्रतिनिधींचे हितसंबंध आणि नागरिकांबद्दलच्या अनास्थेमुळे नाव गमावलेल्या महापालिकेचा कारभार सुधारण्याची जबाबदारी मतदारांनी पुन्हा युतीवर टाकली आहे. राज्य व केंद्रात कॉँग्रेसचे सरकार असल्यामुळे विकासनिधी मिळत नाही, अशी ओरड करणारी युती आता दोन्हीकडे अनुकूल सरकार असताना स्वच्छ आणि कार्यक्षम कारभार करू शकेल काय, याचीच शहराला उत्सुकता आहे.

एमआयएमला रोखायचे असेल तर आम्हालाच मते द्या, हे शिवसेना-भाजप युतीने केलेले आवाहनच अखेर प्रभावी ठरले. विधानसभा निवडणुकीत एमआयएमला यश मिळाले, तेव्हाच पालिकेचा निकाल ठरला होता. या शहराने सलग सहाव्यांदा ज्यांना सत्तेवर बसवले, त्यांनी यापुढे तरी विकासाला दुय्यम स्थान देऊ नये, हीच अपेक्षा. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस निष्प्रभ ठरल्यामुळे मतदारांपुढे फारसे पर्याय नव्हते. तरीही युतीला स्पष्ट बहुमत मिळू शकलेले नाही. घराणेशाहीसाठी निष्ठावान कार्यकर्त्यांना सतरंज्याच उचलण्यास भाग पाडण्याचे धोरण युतीच्या अंगलट आले. मतदारांनी अशा अनेक वशिलेबाजांना घरी बसवले. रस्ते, पाणी, स्वच्छता आणि पर्यावरणाच्या प्रश्नांबद्दल पालिकेने संवेदनशील प्रशासन द्यावे, यासाठी जागल्याची भूमिका 'मटा' यापुढेही बजावणार आहेच, पण सुजाण नागरिकांनाही पालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी जागरुक राहावे लागणार आहे. अन्यथा युती विरुद्ध एमआयएम असा संघर्ष पेटण्याचा आणि पुन्हा एकदा विकासाचे प्रश्न अडगळीत पडण्याचा धोका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादकरांचा युतीलाच कौल!

$
0
0

श‌िवसेनेने गुलमंडी गमावली; महापौरांचा पराभव; भाजपला 'बोनस'; एमआयएमची मुसंडी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला मतदारांनी सलग सहाव्यांदा कौल दिला. स्पष्ट बहुमतासाठी आपल्याच बंडखोरांचा टेकू घेऊन युतीला सत्ता मिळवावी लागणार आहे. एमआयएमने जोरदार मुसंडी मारत २५ जागा पटकाविल्या. बहुजन समाज पक्षानेही पाच जागा मिळवून आपले अस्तित्त्व दाखवून दिले. मतदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला हबाडा दिला, तर महापौर कला ओझा, माजी महापौर अनिता घोडेले यांना घरचा रस्ता दाखवला.

निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. शिवसेनेला २८ वॉर्डांत यश मिळाले, तर भाजपचे उमेदवार २२ वॉर्डात निवडून आले. एमआयएम २५, काँग्रेस १०, राष्ट्रवादी काँग्रेस ३, बहुजन समाज पक्ष ५, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) २ आणि १८ अपक्ष असे उमेदवार निवडून आले. बाळकृष्णनगरातून विद्यमान महापौर कला ओझा या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. कांचनवाडीतून शिवसेनेनेच माजी महापौर अनिता घोडेले यांचाही पराभव झाला. भाजपचे उपमहापौर संजय जोशी यांच्या पत्नी स्वाती जोशी यांना मतदारांनी अव्हेरले. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांचाही मतदारांनी पराभव केला. या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने देखील लक्षवेधी यश मिळवले. मावळत्या महापालिकेत या पक्षाचा एकही नगरसेवक नव्हता, आता मात्र पाच नगरसेवक निवडून आले आहेत.

शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या गुलमंडी वॉर्डात भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना जोरदार धक्का दिला. खैरे यांचे पुतणे सचिन यांचा तनवाणी यांचे बंधू राजू यांनी पराभव केला. सचिन खैरे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. या निवडणुकीत शिवसेना - भाजप युतीच्या बंडखोरांची लॉटरी लागली आहे.

या दोन्ही पक्षांचे ५० नगरसेवक निवडून आले. महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी ५७ नगरसेवकांची आवश्यकता आहे. निवडून आलेल्या बंडखोरांमधून ही तूट भरून काढली जाईल. भाजपला गेल्या निवडणुकीत १५ जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यांना ७ जागांचा बोनस मिळाला आहे.

एकहाती सत्तेचे शिवसेनेचे स्वप्न भंगले
कॉँग्रेस-राष्ट्रवादीला मतदारांचा 'हबाडा'
बसपचा ५ जागांवर विजय; रिपाइंला (डेमो.) यश
अपक्षांचे अमाप पीक, तरूणाईला मतदारांची पसंती

आमचा राग भाजपवर नाही. किशनचंद तनवाणी यांनी आपल्या भावाला गुलमंडी वॉर्डातून उभे केले. त्यामुळे शिवसेनेच्या सचिन खैरेंचा पराभव झाला. तनवाणी यांनीच युतीधर्म पाळला नाही. त्यांचे असे वागणे म्हणजे पैशाची मस्ती आहे. पैसेवाले कुणाचेही नसतात हे लक्षात घेण्याची वेळ आली आहे, असे असले तरी महापालिकेवर सहाव्यांदा झेंडा फडकवण्याचे काम शिवसेना - भाजप युतीने केले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा हा विजय आहे. यापुढे शहराचा विकास हेच ध्येय असेल.
- रामदास कदम, पालकमंत्री.

अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले. सर्वात जास्त दुःख गुलमंडीचे झाले. भाजप-शिवसेनेच्या बंडखोरांनी ज्यांनी पदे भोगली त्यांनीच गुलमंडीवरून शिवसेनेचा झेंडा उतरवला. आता या शहरात शिवसेना टिकवण्याचे काम मलाच करावे लागणार आहे. संघटना डळमळीत होत असेल, तर आता मला त्यात लक्ष घालावेच लागेल. एमआयएमशी मुकाबला करायचा असेल तर संघटना मजबूत करावीच लागेल. आमचेच युतीचे काही लोक अपक्ष म्हणून निवडून आले आहेत, त्यांचे सहकार्य घेऊ.
- चंद्रकांत खैरे, खासदार.

कार्यकर्त्यांनी सामूहिकपणे केलेल्या कामामुळे आणि त्यास जनतेने दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे हे यश प्राप्त झाले आहे. जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखविला आहे, तो आम्ही सार्थ ठरवू. विकासकामाच्या माध्यमातून शहराचा कायापालट करू. अनेक आव्हाने आहेत. रस्त्यांची दयनीय अवस्था सुधारायची आहे. आता केंद्रात आणि राज्याबरोबर महापालिकेत सत्ता आल्याने विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
- रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष भाजप.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीकविमा कंपनीविरोधात कोर्टात याचिका करणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

हवामानावर आधारित पीकविम्यामध्ये पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केल्याचा आरोप करत, पीकविमा कंपनीविरोधात याचिका करणार असल्याची माहिती पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली.

राज्य सरकारने राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हवामानावर आधारित पीकविम्याची योजना राबविली होती. यासाठी नांदेड जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, उडीद आणि मूग या पिकांचा विमा बँकांमध्ये उतरविला होता. पिकाच्या नुकसानीची रक्कम पीकविमा कंपनी देईल, या आशेमध्ये शेतकरी होते. मात्र, पीकविम्याच्या संरक्षित रकमेपेक्षा अत्यंत तोकडी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली. कापसच्या विम्यापोटी शेतकऱ्यांना हेक्टरी साडेबाराशे रुपये मिळाले. या विम्यासाठी शेतकऱ्यांनी साडेसातशे रुपयांचा हप्ता कंपनीकडे भरला होता. ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप देवसरकर यांनी केला आहे.

जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार करूनही याचा काहीच फायदा झाला नाही. सर्व शेतकऱ्यांनी मिळून पीकविमा कंपनीच्या विरोधात कोर्टामध्ये दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. पीकविमा कंपनीच्या विरोधामध्ये लवकरच कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात येईल, अशी माहितीही भागवत देवसरकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जिल्ह्यातील दुष्काळी वातावरणात ग्रामीण भागात लोकांना काम हवे आहे. मात्र, गावपातळीवरील रोजगार सेवक कामांची मागणी करीत नाहीत, या वस्तुस्थितीवर जालन्याचे जिल्हाधिकारी रंगा नायक यांनी शुक्रवारी बोट ठेवले. दरम्यान, गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात बाधित झालेल्या ३ लाख ८६ हजार ५१० शेतकऱ्यांना २१३ कोटी रुपयांचे अनुदान त्यांच्या वैयक्तिक खात्यावर वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नायक यांनी ही खंत व्यक्त केली. निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड, तहसीलदार अनिता भालेराव, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे उपअभियंता बी. एस. महाजन यांची उपस्थिती होती. गावातील लोकांना रोजगार आणि विविध प्रकारच्या सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या लाभ योजना ग्रामपंचायतींमार्फतच राबवण्याच्या धोरणात्मक निर्णयाला डावलून कामे पूर्ण करता येत नाहीत. अनेकदा लाभार्थींना राजकीय कारणावरून डावलले जाते. 'मनरेगा' योजनेचे सोशल ऑडिट करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना परिसरात शिल्लक लाभार्थीना विहिरींच्या अपूर्ण कामांची माहिती मागितली आहे. ३० एप्रिल रोजी 'मजूर दिवस' साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ४ लाख १४ हजार ४०९ अल्प भूधारक शेतकरी असून, २०१४च्या हंगामात ४ लाख दोन हजार ८९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जिल्ह्यातील ८६ टक्के शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळालेले आहे. ८० कोटी रुपयांची मागणीसाठी प्रस्ताव पाठवला आहे.

शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान वाटपात गैरप्रकार करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या अंबड शाखेत दुष्काळी अनुदानातून कर्ज कपात करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पीक कर्ज बोजा उतरविण्यात यावा, अशाच बँकाना सूचना दिल्या आहेत. मात्र, आठ दिवसांत त्यांनी हे केले नाही, तर थेट आम्ही महसूल अधिकारी तलाठी यंत्रणेतून हे काम पूर्ण करू, मग कोणत्याही पुढील अडचणी निर्माण झाल्यास बँक जबाबदार राहील, असा त्यांनी इशारा दिला आहे.

सन २०१५ ते २०२० या कालावधीत जालना जिल्ह्यात होणार्या सरपंच पदाच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून जालना-१२१ ग्रामपंचायती, बदनापुर-७९, भोकरदन-१२५, जाफ्राबाद-७३, परतुर-८१, अंबड-१११, मंठा-९३ व घनसावंगी ९७ ग्रामपंचायती असे एकूण ७८० ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या शिवाय, विविध योजनांविषयीही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती सादर केली.

जालना जिल्ह्यात १९२ टँकर

जिल्ह्यातील १६१ गावे आणि ४२ वाड्यांना १९२ टँकरमार्फत पाणीपुरवठा होत आहे. पाणी पुरवठा करण्यात येणार्या टँकरवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून दररोज ४९८ टँकरच्या फेऱ्या केल्या जातात. ३२३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. २४ हजार २०८ कामांवर ७६ हजार ४०६ मजूरवर्ग काम करत आहेत, असे जिल्हाधिकारी नायक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबड तालुक्यामध्ये विवाहितेवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

अंगणात झोपलेल्या विवाहितेला धमकावून, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना अंबड तालक्यातील रूई येथे घडली. या प्रकरणात आरोपीने पिडीत विवाहितेच्या पतीलाही मारहाण केल्याचे समोर आले आहे.
अर्जुन श्रीहरी राजगुरू असे आरोपीचे नाव आहे. उकाडा जाणवत असल्यामुळे ही विवाहिता आणि तिचा पती गुरुवारी रात्री अंगणात झोपले होते. अर्जुन राजगुरू मध्यरात्री कंपाउंडवरून घराच्या आवारात शिरला आणि त्याने पिडितेला धमकावून तिच्यावर अत्याचार केला. या वेळी विवाहितेच्या पतीला जाग आली आणि त्याने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता अर्जुनने त्याला मारहाण केली. तसेच, अर्जुनचा भाऊ विजयही तेथे आला आणि त्यानेही शिवीगाळ करून, चापटा-बुक्क्याने मारहाण केली. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना परत पाठवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

आंतरजिल्हा बदलीचा बीड जिल्ह्यातील मुद्दा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे. मागील वर्षभरामध्ये आलेल्या आंतरजिल्हा बदलीने बीड जिल्हा परिषद शाळेत रुजू झालेल्या शिक्षकांना मूळ जिल्ह्यातील आस्थापनावर पाठविण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदलीचे प्रकरण गाजले होते. गेल्या काही वर्षांमध्ये चुकीच्या आणि नियमबाह्य पद्धतीने आंतरजिल्हा बदल्या झाल्या होत्या. या बदल्यांविषयीही अनेक जणांनी आरोप-प्रत्यारोप केले होते. या प्रकरणानंतर शिक्षण विभागाने आदेश काढत बाहेरील जिल्ह्यातील आलेल्या शिक्षकांना मूळ जिल्ह्यातील आस्थापनांवर परत पाठविण्याचे सांगितले आहे. या शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे, असेही म्हटले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्रक पाठवून हे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच, जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या सर्व वसतिशाळा शिक्षकांच्या नियुक्त्या तत्काळ रद्द करण्यात याव्यात, असेही कळवण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षात चुकीच्या आणि नियमबाह्य पद्धतीने शेकडो शिक्षक आंतरजिल्हा बदलीने आले होते. त्यांना या निर्णयाने फटका बसणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागामध्ये खळबळ उडाली असून, जिल्हा परिषद परिसरात दिवसभर आज अनेक शिक्षकांनी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड जिल्हा बँकेवर भाजपचा वरचष्मा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी पाच जागा बिनविरोध आल्या असून, त्यातील चार जागांवर भाजपच्या उमेदवारांची नियुक्ती झाली आहे. एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकाची वर्णी लागली आहे.

एकेकाळी मराठवाड्यातील आघाडीच्या बँकांपैकी एक असणाऱ्या आणि गैरव्यवहारांमुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर सापडलेल्या या बँकेची निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची आहे. एकूण १९ जागांसाठी पाच मे रोजी मतदान होणार होते. त्यातील पाच जागा बिनविरोध आल्या असल्या, तरी १४ जागांसाठी कशा पद्धतीने मोर्चेबांधणी होते आणि सात मे रोजी काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणाचा नूर बदलला असून, त्यानंतर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी एकूण १९९ जणांनी अर्ज केले होते. या उत्साहामुळे बहुरंगी

निवडणूक होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात होता. मात्र, गुरुवारी आणि शुक्रवारी मोठ्या प्रमाणात अर्ज काढण्यात आल्याने पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. शुक्रवारी केज, बीड, आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तालुक्यातून प्रत्येकी एकच अर्ज शिल्लक राहिल्याने पाच संचालक बिनविरोध निवडून गेले आहेत.

केज तालुक्यातून माजी आमदार बाबुराव आडसकर यांचे नातू व माजी संचालक रमेश आडसकर यांचे पुतणे हृषिकेश आडसकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज काढल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. बीडमधून शीतल दिनकर कदम, आष्टीमधून थोरवे साहेबराव पंढरीनाथ आणि पाटोद्यातून बांगर सत्यभामा रामकृष्ण व शिरूरमधून वनवे संध्या दशरथ हे बिनविरोध निवडून आले. यात भाजपचे समर्थक चार, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर समर्थक एक संचालक बिनविरोध निवडून आला आहे.

नातेवाइकांसाठी प्रयत्न

मागील काळात अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या चुकीच्या कर्जवाटप प्रकरणामुळे जिल्हा बँक अडचणीत आली होती. त्यामध्ये जुन्या संचालकांवर आरोप करण्यात आला आहे. नव्या सहकार कायद्यामुळे गोत्यात येण्याची भीती या माजी संचालकांना आहे. त्यामुळेच, या नेत्यांनी नातेवाइकांना अर्ज दाखल करत, बँकेवरील वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. बिनविरोध निवडींमुळे यातील काही जणांना यश आल्याचे दिसून येत आहे. तर, काही जणांना प्रत्यक्ष निवडणुकीतून सहकारातील अनुभवाचे कसब पणाला लावावे लागणार आहे. यात प्रामुख्याने महिला प्रतिनिधी मतदार संघात माजी राज्यमंत्री सुरेश धस यांची पत्नी संगीता सुरेश धस यांच्यासह चार उमेदवारांमध्ये लढत आहे.

घोटाळ्याची किनार

बीड जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम होती. एकेकाळी ११०० कोटी रुपयांच्या ठेवी असलेली बँक २००७-०८पर्यंत लातूरनंतर मराठवाड्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळखली जात होती. मात्र, संचालक आणि अधिकारी यांच्या संगनमताने नियमबाह्य कर्ज वाटप करण्यात आल्यामुळे अडचणीत आली. अनेक संस्थांकडे पूर्वीची थकबाकी असताना आणि अनेक संस्था या बुडीत असल्याचे माहित असताना तसेच शिक्षण संस्था, जिल्ह्याबाहेरील कर्जदारांना जिल्हा बँकेच्या संचालकांनी कर्जवाटप केले. त्यामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळली. बँकेला ठेवीदारच्या अडचणीत पैसे देणे मुश्कील झाले. बीड जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्याची आर्थिक नाडी आपल्या हातात राहावी यासाठी भाजपने प्रयत्न केले, त्यात त्यांना यश आल्याचे दिसते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप नेत्यांच्या साथीने लातुरात ‘देशमुखी’ कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

मराठवाड्यातील आघाडीच्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश आले असले, तरी १९पैकी १३ उमेदवार बिनविरोध निवडून आणत बँकेवरील वर्चस्व कायम राखण्यात देशमुख गटाला यश मिळाले आहे.

लातूर जिल्हा बँकेसाठी पाच मे रोजी मतदान होत असून, बँकेवरील देशमुख गटाचे वर्चस्व कायम राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न झाल्यामुळे निवडणुकीत काय होणार, याची उत्कंठा होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचनेवरून, गोविंद केंद्रे आणि बाबू खंदाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. पतसंस्था मतदार संघात मात्र भाजपाचे रमेश कराड लढत देणार आहेत. शेवटच्या दिवशी आमदार विनायकराव पाटील यांच्यासह अनेकानी माघार घेतल्यामुळे देशमुख गटाचे आमदार दिलीपराव देशमुख, विश्वंभर माने, एस. आर. देशमुख, श्रीपती काकडे, नाथसिंह देशमुख, प्रमोद जाधव, शिवकन्या पिंपळे, स्वयंप्रभा पाटील, संभाजी सूळ, पृथ्वीराज शिरसाट, चंद्रशेखर भोसले, अशोक पाटील निलंगेकर आणि सुधाकर रुकमे बिनविरोध निवडून आले आहेत. माघारीच्या निर्णयाविषयी माजी आमदार गोविंद केंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, 'उदगीरमध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागले असते. पॅनेल पूर्ण नसल्यामुळे उमेदवारी मागे घ्या, अशी सूचना पंकजा मुंडे पालवे यांनी केली. त्यानुसार, मी आणि बाबू खंदाडे यांनी अर्ज मागे घेतले आहेत.'

सहा जागांसाठी निवडणूक

लातूर जिल्हा बँकेमध्ये १३ उमेदवार बिनविरोध निवडून आले असले, तरीही सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यात माजा आमदार बाबासाहेब पाटील विरुद्ध आबासाहेब देशमुख, चाकूर तालुक्यात एन. आर. पाटील विरुद्ध शिवाजी काळे, देवणी तालुक्यात भगवानराव पाटील तळेगावकर विरुद्ध भगवानराव पाटील विजयनगरकर, जळकोट तालुक्यात शीलाताई पाटील विरुद्ध धर्मपाल देवशेट्टे, शिरुर अनंतपाळ तालुक्यात लक्ष्मण बोधले विरुद्ध व्यंकटराव बिराजदार, पतसंस्था मतदार संघात अशोक गोविंदपूरकर विरुद्ध रमेश कराड अशी लढत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिनविरोध’चा बार फुसका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

तब्बल दहा वर्षांनी होत असणारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न फसला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेत्यांनी एकत्र येऊन शेतकरी पॅनेल उभा केला आहे. त्यामुळे बँकेवर अशोक चव्हाणांचे वर्चस्व की विरोधकांचे अस्तित्व याचा कौल घेण्यासाठीच ही निवडणूक होणार आहे.

नांदेड जिल्हा बँक काही वर्षांपूर्वी आर्थिक दृष्ट्या मोठ्या अडचणीत आली होती. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये १०० कोटी रुपयांची मदत दिल्यामुळे या बँकेला संजीवनी मिळाली आहे. त्यानंतर आता या बँकेची निवडणूक होत आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी अशोक चव्हाण यांच्याकडून प्रयत्न झाले. मात्र त्यांना यश आले नाही. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. अशोक चव्हाण यांच्याविरोधात खतगावकरांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनल उभे आहे. दरम्यान, आमदार अमर राजूरकर आदींनी आधीच रिंगणातून माघार घेतली. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनीही माघार घेतली.

२१ जागांसाठी ४५ उमेदवार

नांदेड जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुकवारी (दि.२४) शेवटचा दिवस होता. त्यानंतर हे चित्र स्पष्ट झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा नांदेडचे उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांनी दिली. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी उपविभागीय कार्यालय

परिसरात चारचाकी वाहनांची गर्दीच गर्दी होती. भर उन्हातच ग्रामीण भागातील पुढारी, कार्यकर्ते आवारात हजर होते. एकूण ६७ जणांनी माघार घेतली. आता ५ मे रोजी निवडणुकीसाठी मतदान सर्व तालुका पातळीवर होणार आहे. ७ मे रोजी मतमोजणी होईल.

पुढील पिढीही रिंगणात

जिल्हा बँकेच्या निमित्ताने काही नेत्यांची पुढील पिढी सहकाराच्या राजकारणामध्ये उतरत आहे. ज्येष्ठ नेते शामराव कदम यांचे चिरंजीव डॉ. सुनील कदम हे या निवडणुकीला प्रथमच उभे आहेत. माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांचे पुत्र आमदार नागेश पाटील आष्टीकर प्रथमच निवडणुकीला उभे आहेत. तर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांचे चिरंजीव प्रवीण हे पितापुत्र निवडणुकीला उभे आहेत. गंगाधरराव कुंटूरकर यांचे चिरंजीव राजेश यांनीसुद्धा उडी घेतली आहे.

आरोपांच्या फैरी गाजणार

बँक बंद पाडण्यास कारणीभूत असलेले अनेक माजी संचालक उजळमाथ्याने पुन्हा निवडणुक रिंगणात उभे आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारामध्ये 'बँक बुडवायला कोण जबाबदार?' यावरील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी गाजणार असे दिसत आहे. अनेक मतदार संघात चुरशीच्या लढती होणार आहेत. तर मतदारांना गुप्त ठिकाणी नेण्याच्या हालचाली सुद्धा चालू झाल्या आहेत. प्रचाराच्या निमित्ताने अशोक चव्हाण पुन्हा मैदानात उतरणार आहेत. बँक बुडवणाऱ्यांना पुन्हा थारा देऊ नका, यावर ते प्रचारात भर देणार असल्याचे अशोक चव्हाण यांचे समर्थक सांगतात.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बुडविणारे नेते निवडणुकीच्या निमित्ताने हळुवार पावलांनी पुन्हा आले आहेत. बँकेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी हेच नेते पुन्हा भर उन्हात प्रचारासाठी धावतील. आर्थिक अडचणीची परिस्थिती बँकेने अनुभवली आहे. बँक ताब्यात घेण्याचा त्यांचा कुटील डाव मतदारांनी हाणून पाडावा.

- डॉ. डी. आर. देशमुख, अध्यक्ष, बँक बचाव समिती, नांदेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिसाळलेल्या माकडाचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

मंगरुळ-चांदापूर परिसरात पिसाळलेल्या माकडाने पाच दिवस धुमाकूळ घातला. त्यामुळे नागरिकांना हातात काठी, कुऱ्हाड घेतल्याशिवाय बाहेर पडणे अशक्य झाले होते. गुरुवारी वनविभागाने या माकडाला जेरबंद केले.

मंगरुळ-चांदापूर परिसरात गेल्या पाच दिवसांपासून पिसाळलेल्या माकडाने धुमाकूळ घातला होता. या माकडाच्या हल्ल्यात मंगरूळ येथील हरीभाऊ भालोरे, माणिकराव फुले व चांदापूर येथील कमलाकर दौड, हरिसिंग राजपूत जखमी झाले होते. माकडाच्या हल्ल्याने गावातील नागरिक भयभीत झाले होते. दोन्ही गावात माकडाची दहशत निर्माण झाली होती. आजूबाजूच्या गावकऱ्यांनी माकडाच्या भीतीने या गावाशी असलेला संपर्क तोडला होता. माकड केव्हा येईल अन् हल्ला करेल या भीतीने ग्रामस्थांना ग्रासले होते. शेतात जाण्यासाठी काठी हातात घेऊन घराबाहेर पडावे लागत होते. वनविभागाने गुरुवारी अंभई येथील समाधान गिरी यांच्या मदतीने या माकडाला पिंजऱ्यात पकडण्यात आले. समाधान गिरी यांनी आतापर्यत शेकडो माकडे पिंजऱ्यात जेरबंद केले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी जिया फारूखी, वनपाल कारभारी पल्हाळ, वनमजूर व ग्रामस्थाच्या सहकार्याने हे पिसाळलेल माकड जेरबंद करण्यात आले आहे.

माकडाला पकडल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आता आम्ही या माकडाला बुलढाणा जिल्ह्यातील जंगलात सोडणार आहोत.

- जिया फारूखी, वनपरिक्षेत्र अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images