Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वीज उपकेंद्राच्या कामात अडथळा आणणाऱ्यांस अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

कानडगाव येथे ३३ केव्ही उपकेंद्राच्या कामात अडथळा आणणाऱ्या दांम्पत्याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर हे काम पोलिस बंदोबस्तात काम करण्यात येत आहे.

महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रासाठी शासकीय गायरान जमीन गट नंबर १३ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जागा दिली आहे. या जागेवर काम सुरू झाले असतांना गुरुवारी सदाशिव संपत सोनवणे व निर्मलाबाई सदाशिव सोनवणे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार सहाय्यक अभियंता दिनकर दुमने यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. दुमने यांच्या हातातील टेप हिसकावून घेऊन सोनवणे दांम्पत्याने शिवीगाळ करून शेतात पाय ठेवला तर पाय मोडून टाकू अशी धमकी दिली होती. या घटनेची माहिती पोलिसांना कळविताच पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे, मंडळ अधिकारी शेखर शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

न्या. भोसले यांची बदली

खुलताबादः तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. भोसले यांची पुणे येथे बदली झाली आहे. ते येथे तीन वर्षांपासून कार्यरत होते. तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला, गावोगावी कायदेविषयक मार्गदर्शन केले. ते उत्कृष्ट क्रिकेटपटू असल्याने जिल्हास्तरावर अनेक क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळूजला भरदिवसा दुचाकी जाळली

$
0
0

म.टा.प्रतिनिधी वाळूज

वाळूज येथे एका लग्नसमारांभासाठी आलेल्या पाहुण्यांची झाडाच्या सावलीखाली उभी केलेल दुचाकी अज्ञात माथेफिरूने जाळून टाकल्याची घटना आज (२६ एप्रिल) रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास घडली. शेख शामीर शेख नशीर रा. माटेगाव ता. गंगापूर हे हिरोहोंन्डा पॅशन (क्र. एमएच २० एएम ३६४८) गाडी घेवून वाळूज येथे लग्न समारंभासाठी आले होते. उन खूप असल्याने त्यांनी आपली गाडी मोंढ्याजवळ असलेल्या एका झाडाखाली सावलीसाठी लावली. लग्न मंडपात गेल्यानंतर काही वेळाने सदरील दुचाकी जळाल्याचे काही महिलांनी पाहिले. त्यानंतर ती विझविण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला, मात्र तोपर्यंत दुचाकी जळून गेली होती. भरदिवसा दुचाकी जाळून देखील कोणीही पाहिले कसे नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेची आत्महत्या

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार पडेगाव भागात शुक्रवारी घडला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक येथील कय्युम पठाण यांची मुलगी सबा हिचा विवाह मे २००६ मध्ये आयनोद्दीन सादिक शेख याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर तीला ह‌मीद (वय ६) व हुफेज (वय ४) ही दोन अपत्य झाली. गेल्या काही दिवसापासून पडेगाव भागातील कासंबरी दर्गामागे ती सासू, पतीसोबत राहत होती.

गेल्या काही दिवसांपासून तिला माहेरून दीड आणण्यासाठी छळ सुरू होता. १८ एप्रिल रोजी तिच्या वडिलांनी तिला नाशिकला नेले होते. यावेळी आयनोद्दीनने तिला आता घेऊन जातो व २६ तारखेला पुन्हा पाठवतो, असे सांगत सोबत नेले होते. शुक्रवारी सबाने विषारी औषध घेतल्याची माहिती त्यांच्या जावयाने दिली. तिला उपचारासाठी घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र शनिवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सासरच्या छळाला कंटाळून सबाने आत्महत्या केल्याच्या आरोपाखाली तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पती आरोपी आयानोद्दीन, सासू बानो बी सादीक शेख, नंनद आलिमा सलीम शेख, मोहमुदा आजम शेख, मोहमदी रेहमत खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशांचा पाऊस पाडण्याची थापा मारणाऱ्यांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

पैशांचा पाऊस पाडून तुमची कडकी दूर करून देतो, असे सांगून एका दाम्पत्यास ५ हजार रुपयांना चुना लावणाऱ्या तिघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी काल (२५ एप्रिल) रोजी रात्री उशीरा ताब्यात घेतले. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत असाच प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता.

नासेरखान बाबूखान उर्फ खानमामू (५५) रा. रशीदपुरा औरंगाबाद व अप्पा बारकू समींदर (५०) रमेश पांडूरंग हिवराळे (४५, दोघेही रा. साजापूर) या तिघांनी मिळून वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथील गोपाळ हिरामन उबाळे (२५) यास भानामती व मंत्रतंत्राद्वारे पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी पाच हजार रुपये घेतले. शनिवारी सकाळी ७ वाजता साजापूर येथील गोपाळ उबाळे यांच्या राहत्या घारी आले. उबाळे यांच्या पत्नीस समोर बसवून सात वाजेपासून तर २ वाजेपर्यंत लिंबू गंडेदोरे भस्म लावून मंत्रतंत्र जप सुरू केला, मात्र दुपार होऊन देखील पैशांचा पाऊस पडत नसल्याने गोपाळ उबाळे यांनी शंका उपस्थित केली. त्यावर तिघांनीही त्यांना तुम्ही बाहेर जाऊन आभाळ भरले आहे का ते बघा, असे सांगितले. ते बाहेर गेल्याची संधी साधून तिघे पळून गेले. घरात आल्यानंतर तिघेही पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर उबाळे यांनी थेट एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले व झालेला प्रकार सांगून आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली.

पोलिस निरिक्षक इंदलसिंग बहूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक वसंत शेळके, संजय आहिरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल डी. एम. साबळे, संजय रोकडे, अमोल शिंदे आदींनी मिळून तिघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी उबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तीन त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक संजय बहिरव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय निवासस्थानांच्या दुरुस्ती कामात गैरव्यवहार

$
0
0

औरंगाबादः सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक एक अंतर्गत स्नेहनगर, कोटला कॉलनी व घाटी परिसरात कामे केल्याचे दाखवून सात लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. ही तक्रार आर. बी. शेटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.

२३ ऑक्टोबर २०१३ मध्ये माहितीच्या अधिकाराखाली २०१२-१३ मध्ये घेतलेल्या कामाची मागणी केली होती. महत्प्रयासाने ही माहिती मिळाली. त्याआधारे केलेल्या कामाच्या पावत्यांची तपासणी केली. तसेच दुरुस्ती दाखविलेल्या निवासस्थानात जाऊन विचारणा केली असता तेथे कोणत्याही प्रकारची कामे झाली नसल्याचे सांगण्यात आले. वॉशबेसीन, नळतोटी, गवत काढणे या कामासाठी सरसकट बिले लावण्यात आली आहेत. मजुरांच्या स्वाक्षऱ्याही खोट्या आहेत. स्नेहनगर, कोटला कॉलनी आणि घाटी परिसरातील कामे कागदोपत्री दाखविली गेली पण प्रत्यक्षात कामे झाली नाहीत. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार देऊनही काहीच कार्यवाही झालेली नाही. सरकारने साठवणूक केलेले लोखंडी साहित्य व सागवानी लाकडी साहित्य बेकायदेशीरपणे विकण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी केली गेली नाही, तर बेमुदत उपोषणाचा इशारा शेटे यांनी दिला आहे. यासंदर्भात अधीक्षक अभियंता यू. के. आहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही. कार्यालयात संपर्क साधल्यानंतर ते बैठकीसाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत प्रवेश प्रक्रियेत प्रवेश मिळेल का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरटीईनुसार मोफत प्रवेश प्रक्रियेत प्रवेशाची 'लॉटरी' काढण्यात आली. परंतु पुढील प्रक्रियेबाबत स्पष्टता नसल्याने, शाळांचा प्रतिसाद मिळेल का? अशा प्रश्नांमुळे पालकांना चिंता सतावते आहे. ज्या शाळांनी प्रवेश प्रक्रियेला दाद दिली नाही, अशा शाळांना शिक्षण विभागाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. या प्रक्रियेतून औरंगाबादमध्ये १६२५ प्रवेश होणार आहेत.

शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या २५ टक्के जागांवरी मोफत प्रवेशाची प्रक्रियेत शुक्रवारी लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली. यानंतर अद्याप प्रत्यक्ष प्रवेशाबाबत स्पष्टता नाही, यामुळे ही प्रक्रिया केव्हा होणार याकडे पालकांचे लक्ष लागलेले आहे. तसेच अद्याप अनेक शाळांनी प्रवेशाचा कोटाच स्पष्ट केलेला नाही. यामुळे प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेवेळी धांदल उडण्याची शक्यता आहे. शहरात केवळ १५५ शाळा मोफत प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत. यंदा प्रथमच औरंगाबादमध्ये ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शहरात ४,०७५ पालकांनी मोफत प्रवेशासाठी अर्ज केले. यापैकी १६२५ पालकांना प्रवेश मिळणार आहेत.

त्या शाळांना अभय

शिक्षण विभागातील अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार मोफत प्रवेश प्रक्रियेत ५२४ शाळांमध्ये प्रवेश होणे अपेक्षित होते. परंतु यंदा केवळ १५५ शाळांनीच यात सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीपासून प्रक्रियेला प्रतिसाद न देणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाने अद्याप कारवाई केली नाही. शाळांना शिक्षण विभागाचा अभय मिळत असल्याने पालकांमध्ये नाराजी आहे.

ही प्रक्रिया मंगळवार, बुधवारपासूनसुरू होईल, पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची प्रक्रिया सांगितली जाईल. यानंतर शाळेमध्ये जावून प्रवेशाची प्रक्रिया पालकांनी पूर्ण करावयाची आहे. याबाबत शाळांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.

- नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा संपल्यानंतर सरकारची आधार कार्ड मोहीम

$
0
0

मकरंद कुलकर्णी, औरंगाबाद

भविष्यात एकही मुलगा शाळाबाह्य राहू नये, यासाठी राज्य सरकारने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी मोहीम राबविण्याचे जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून होणार असून, सुटीच्या काळात विद्यार्थ्यांना शोधायचे कसे, या विचाराने गुरुजी चक्रावले आहेत. सरकारच्या या अजब परिपत्रकाबाबत मात्र शिक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत सहा ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाचे नाव पटावर नोंदले जाणे, नियमित शाळेत यावे, यासाठी दर्जेदार शिक्षण मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही, तसेच त्याच्या आधार जोडणीच्या सहाय्याने तो कोणत्या शाळेत शिकत आहे. याचीही माहिती प्राप्त होण्यासाठी आधार नोंदणी कार्यक्रम २७ एप्रिलपासून गावागावात राबविला जाणार आहे. ही मोहीम २६ जूनपर्यंत चालविण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मुळात प्रश्न असा आहे की, ही मोहीम २७ एप्रिलपासून राबविण्याचा निर्णय कसा ठरविला गेला? कारण शाळांना सध्या सुट्या लागल्या आहेत. केवळ कार्यालयीन कामकाज सुरू आहे. एक मे रोजी यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम दिवस असणार आहे. चार दिवसांत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आधार डाटा गोळा कसा करायचा, असा प्रश्न आहे. आधार नोंदणी कार्यक्रम गावागावात राबविला जाईल, पण विद्यार्थीच नसतील तर नोंदणी होणार कशी ? असा प्रश्न गुरुजींसमोर पडला आहे. सहा ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाचे पटावर नोंदलेले नाव आधार क्रमांकाशी संलग्न होईल. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील मशीनरी वापरण्यात येणार आहेत. गाव, वॉर्ड, शाळा पातळीवर हे अभियान राबविले जाईल.

गुरुजी झाले नाराज

मोहिमेसाठी आठ मे रोजी गावागावातून प्रभात फेरी काढावी. १०० टक्के बालकांचे आधारकार्ड तयार करण्याचा संकल्प करावा; स्वयंसेवी कार्यकर्ते, संस्था, नागरिक, युवक, शिक्षक संघटनांनी प्रचार व प्रसिद्धी करावी, २६ जूनपर्यंत १०० टक्के नोंदणी करण्यावर भर द्यावा, असेही मुख्याध्यापक-शिक्षकांना आदेशित केले आहे. शैक्षणिक सत्र संपताना सरकारने काढलेल्या या परिपत्रकामुळे गुरुजीमंडळींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असताना आलेल्या या परिपत्रकामुळे शिक्षकांची अडचण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवालामार्गे जाणारे ५८ लाख रुपये जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हवालामार्गे जाणारी ५८ लाखांची रक्कम विशेष पथकाने शनिवारी (२५ एप्रिल) रात्री सिडको बसस्टँड भागात जप्त केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही रक्कम जालन्यावरून मुंबईला नेण्यात येत होती.

पोलिस उपायुक्त परिमंडळ दोनचे अरविंद चावरिया यांच्या पथकाला जालन्यावरून एक व्यक्ती सॅकमध्ये मोठी रक्कम घेऊन सिडको बसस्टँडकडे निघाल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला. संशयित बसमधून खाली उतरल्यानंतर एका दुचाकीस्वाराच्या दुचाकीवर बसत असताना दोघांना ताब्यात घेतले. जालन्यावरून आलेल्या राजेश जयंतीलाल ठक्कर (रा. तिरूपतीनगर, राजकोट, गुजरात) व त्याला नेण्यासाठी आलेला निमेश किरीटभाई ठक्कर (भक्तीनगर, राजकोट, गुजरात) यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची तपासणी केली. त्यावेळी राजेशच्या बॅगमध्ये ५८ लाख रुपये सापडले. या रकमेबाबत कोणती‌ही अधिकृत माहिती या दोघांना देता आली नाही. दोघांनाही अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे पैसे मोजण्यात पोलिसांची रात्र गेली.

जालना ते मुंबई हवाला कांड

राजेश हा औरंगाबादच्या कानजीभाईसाठी काम करतो. केवळ मोबाइलवर त्याचा कानजीभाईशी संपर्क आहे. जालन्यावरून रात्री नऊ वाजता राजेश बसमध्ये बसला. औरंगाबादला उतरल्यानंतर त्याला रेल्वेमध्ये बसवून देण्याची जबाबदारी निमेशची होती. निमेश जी दुचाकी घेऊन राजेशला घेण्यासाठी आला होता, ती दुचाकी औरंगाबाद पासिंगची आहे. ही दुचाकी कोणाची? जालना येथील ही रक्कम कोणाची? ती मुंबईला कोणाला देण्यात येत होती? याचा तपास पोलिस करीत आहेत.

सापडलेल्या नोटा

१०० रुपयांच्या ८ हजार ४०० नोटा.

५०० रुपयांच्या ८ हजार ६४० नोटा.

१,००० रुपयांच्या ६८० नोटा.

नोटा खऱ्या आहेत का नाही याच्या तपासणीसाठी बँकेला सोमवारी पत्र देणार आहोत. आयकर विभागाला माहिती कळविली आहे. ह‌वाला मार्गे जाणारी ही रक्कम असण्याची शक्यता आहे.

- अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येणारा आठवडा हॉट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या काही दिवसांपासून शहर चांगलेच तापू लागले असून शहराचे तापमान स्थिर आहे. रविवारी (२६ एप्रिल) औरंगाबादचा पारा ३९.५ अंशापर्यंत पोहचला. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार येणाऱ्या आठवड्यामध्ये शहराचा पारा ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

गेल्या १५ दिवसांपसासून शहराच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे. आठ दिवसांपूर्वी शहराच्या तापमान ४० अंशापर्यंत पोहचले होते. २० व २१ एप्रिल रोजी शहरात तापमानाची चाळीशी कायम होती. वातावरणात झालेल्या या बदलामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठवड्यात उन्हाचा पारा आणखी वाढणार असून या आठवड्यामध्ये शहराचे कमाल तापमान ४० अंशापर्यंत जाऊ शकते. अवकाळीनंतर गेल्या १५ दिवसांपासून वातावरणात झालेला बदल हा काही दिवस कायम राहणार असून येणारा आठवडा हा यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचा सर्वात हॉट आठवडा ठरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या आठवड्यामध्ये तापमानाचा पारा ४२ अंशापर्यंत जाण्याची शक्यता ‌वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, डॉक्टरांनी उन्हात फिरणे टाळा, जास्तीत जास्त पाणी प्या, गॉगलचा वापर करा, डोक्यावर टोपी किंवा रुमाल घालण्याचा सल्ला दिला आहे.

असे राहील तापमान

(अंश सेल्सियसमध्ये)

दिनांक तापमान

२७ एप्रिल ४१.०

२८ एप्रिल ४२.०

२९ एप्रिल ४२.०

३० एप्रिल ४२.०

१ मे ४२.०

२ मे ४२.०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिसाळलेले दुसरे माकड पकडले

$
0
0

सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील मंगरूळमध्ये उच्छाद मांडलेल्या एका माकडाला रविवारी पकडण्यात आले. या गावात गुरुवारीच एका माकडला पकडण्यात आले होते. पिसाळलेल्या दुसऱ्या माकडामुळे गावकऱ्यांची भीतीने गाळण उडाली होती.

सिल्लोड तालुक्यातील चांदापूर व मंगरूळ गावच्या परीसरात धुमाकूळ घातलेल्या एका पिसाळलेल्या माकडाला वनविभागाने गुरुवारी पिंजऱ्यात जेरबंद केले होते. सहा जणांना चावा घेतलेल्या या माकडाला पकडल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. परंतु, शुक्रवारी दुसऱ्या माकडाने मंगरूळ येथील भीमराव मोरे, जनाबाई मरकडे यांना चावा घेऊन लोटून दिले, बरडे नावाच्या व्यक्तिला खाली पाडून घोसळले होते. दुसऱ्या माकडाने चावा घेण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. या घटनेची माहिती दिल्यानंतर वन अधिकारी जिया फारुखी, वनपाल कारभारी पल्हाळ, वनमजुरांची शनिवारी पिंजरा लावला. अंभई येथील समाधान गिरी महाराज यांच्या मदतीने रविवारी सकाळी हे माकड पकडण्यात आले. या महाराजांनी यापूर्वीही वनविभागाच्या सूचनेनुसार माकडे पिंजऱ्यात अडकवली आहेत. दरम्यान, पिंजरा आणणे, माकड जंगलात सोडणे यासाठी टेम्पो-डिझेल आदी खर्च व पकडणाऱ्याचे बक्षीस आदीसाठी १५ हजार रुपये लोकवर्गणी करावी, अशी सूचना वनविभागाने केली आहे, अशी माहिती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली. परंतु, त्यासाठी वनविभागाने स्वतःची यंत्रणा राबवावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिनी पुन्हा फुटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

चोवीस तासांपूर्वी दुरुस्त केलेली भरणा जलवाहिनी रविवारी सायंकाळी पुन्हा एकदा फुटली आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे दोन दिवसात हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.

भूमिगत गटार योजनेअंतर्गत शहरातील भारत टॉकीज परिसरात पाइप टाकण्यात येत आहेत. त्यासाठी खोदकाम करताना शुक्रवारी रात्री पैठणला पाणीपुरवठा करणारी मुख्य भरणा जलवाहिनी फुटली. त्य़ामुळे शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद होता. नगरपालिकेतर्फे शनिवारी रात्री उशिरा जलवाहिनी दुरुस्त करण्यात आल्याने रविवारी पाणीपुरवठा सुरळीत झाला. रविवारी सायंकाळी चार वाजता शहरातील जलकुंभ भरले जात असताना शनिवारी दुरुस्त केलेली भरणा जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे या ठिकाणाहून हजारो लिटर पाणी वाहून गेले. दरम्यान, याविषयी पाणीपुरवठा विभागप्रमुख भगवान कुलकर्णी यांच्याची संपर्क केला असता ते म्हणाले, पाइप सटकल्याने याठिकाणी पाणी लिकेज होत आहे. पाण्याचे प्रेशर कमी होताच, जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. भरणा जलवाहिनी गळतीचा शहराच्या पाणीपुरवठ्यावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. भरणा जलवाहिनी पुन्हा एकदा फुटल्याची वार्ता शहरात पसरताच, पाणीपुरवठा होणार की नाही याविषयी नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अनेक नागरिक रविवारी सायंकाळी पाण्याची पर्यायी व्यवस्था करताना दिसले.

कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

दरम्यान, याप्रकरणी तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी संजय पवार यांनी भूमिगत गटार योजनेच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदासाठी शिवसेनेची कोंडी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादचे महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. या पदावर अनुसूचित जातीचा उमेदवार कायम ठेवला तर आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका निवडून आलेल्या दलित नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेची सर्वच बाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपने महापौरपदासाठी अनुसूचित जातीचे राजू शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अडीच-अडीच वर्षांचा फार्म्युला मानायला शिवसेनेचे नेते तयार नाहीत. त्यामुळे युतीतला तणाव वाढला आहे. निवडणुकीच्या वेळीही शिवसेना-भाजप नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. भाजपने महापौरपदाची मागणी केल्यामुळे शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. पहिले अडीच वर्ष महापौरपद द्यावे, अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे. सेनेने ही मागणी फेटाळून लावली आहे. युतीतील बंडखोरीचा फटका बसल्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. त्यात आता नवीन मागणी केल्यामुळे सेनेच्या नेत्यांना कोंडीत पकडण्याची भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. सेना-भाजपचे बंडखोर आता विभागले गेले आहेत. उभय पक्षांकडे ३२-३२ नगरसेवक असल्याचा दावा केला जात आहे. राजू शिंदे हे भाजपचे उमेदवार असतील तर त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका आठ दलित नगरसेवकांनी घेतली आहे. भाजपने त्याला अनुकूलता दर्शविली आहे. बहुजन समाज पक्षाचीही हीच भूमिका असल्याचे कळते. भाजपने ही नवीन खेळी करून सेनेला आणखी खिंडीत गाठले आहे. पाच वर्ष शिवसेनेचाच महापौर आणि भाजपचा उपमहापौर या फार्म्युल्यावर शिवसेना ठाम आहे. या वादाचा तोडगा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या चर्चेतून निघण्याची शक्यता आहे.

बंडखोर, दलित नगरसेवकांवर मदार

युती काठावरच पास झाली. बंडखोर आणि अन्य पक्षाच्या दलित नगरसेवकांच्या जोरावर भाजपने महापौरपदावर दावा केला आहे. भाजपने ही खेळी करून सेनेवर मात केली तर त्यांच्या कोंडीत वाढच होणार आहे. उपमहापौरपदासाठी भाजपने प्रमोद राठोड यांना रिंगणात उतरवले, मात्र सेनेने या पदासाठी अर्जच दाखल केलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परळीतील केंद्रावर हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी रविवारी किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. २० जागेसाठी ४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ४५ मतदान केंद्रावर एकूण ८२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कांबळे यांनी दिली. परळीतील कन्या शाळा परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर किरकोळ कारणांने राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यात बाचाबाची झाली. त्यातून हाणामारी सुरू झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला. मतमोजणी २८ एप्रिल रोजी होणार आहे.

बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रविवारी यासाठी तब्बल ८२ टक्के मतदान झाले. परळी शहरातील कन्या शाळा परिसरात असलेल्या मतदान केंद्रात मतदान सुरू झाल्यानंतर दुपारच्यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपा कार्यकर्त्यात बाचाबाची झाली. त्यातूनच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडल्याने हाणामारी सुरू झाली. पोलिसांनी यावेळी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. त्यानंतर शांततेत मतदान सुरू झाले. या मतदान केंद्राला पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट दिली.

बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ कारखाना दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा कारखाना म्हणून ओळखला जात होता. या कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना विविध सोयी सवलती देण्यात येत होत्या. त्यांच्या निधनानंतर कारखान्याची निवडणूक पहिल्यांदा होते आहे. यामध्ये मुंडे विरुद्ध मुंडे अस संघर्ष रंगला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाले. आता कारखान्याच्या सभासद मतदारांनी कौल दिला असून तो मतपेटीत बंद झाला आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी पालकमंत्री पंकजा मुंडे, यशश्री मुंडे, धनंजय मुंडे यांनी नाथ्रा येथील मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला. कारखान्यावर आगामी काळात कोणाचे वर्चस्व राहणार हे आता २८ एप्रिल रोजी होत असलेल्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, निवडणुकीनंतर पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे या दोघांनीही वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आपलेच पॅनेल विजयी होईल, असा दावा केला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पोलिस प्रशासनाने शांततेत आणि निपक्षपाती मतदान व्हावे म्हणून मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता. मतदान दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस विशेष काळजी घेत होते. मुख्य लढत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथ मुंडे पॅनेल विरुद्ध विधान परीषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनेलमध्ये होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवडणुकीत घोडेबाजार तेजीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बुधवारी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी घोडेबाजार तेजीत आला आहे. फोडाफोडीच्या राजकारणाने गती घेतल्याने नगरसेवकांचे भाव कमालीचे वधारले आहेत. नगरसेवकाची बोली लाखो रुपयांपासून लागण्यास सुरुवात झाल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे. घोडेबाजारात शिवसेना - भाजपची युती राहणार की तुटणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत औरंगाबादकरांनी युतीच्या बाजुने कौल दिलेला असला, तरी स्पष्ट बहुमत मात्र दिलेले नाही. २०१०मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ३० नगरसेवक निवडून आले होते, तर भाजपच्या नगरसेवकांची संख्या १५ होती. यावेळी मतदारांनी शिवसेनेचे २८ नगरसेवक निवडून दिले. भाजपचे मात्र सात नगरसेवक वाढले आणि त्यांचे संख्याबळ २२ झाले. यावेळी 'एमआयएम' या पक्षाने पालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांचे २५ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे महापालिकेतील सत्तेचे गणितच बदलून गेले. सात नगरसेवक वाढल्यामुळे भाजपने पहिल्या महापौरपदावर दावा केला आणि राजू शिंदे यांना उमेदवारीही देऊन टाकली. शिवसेनेने 'मोठा भाऊ' या नात्याने नगरसेवक त्र्यंबक तुपे यांना महापौरपदाची उमेदवारी दिली.

महापौर कुणाचा, शिवसेनेचा की भाजपचा यामुद्यावर दोन्हीही पक्षांच्या नेत्यांमध्ये खल सुरू आहे. दरम्यानच्या काळात स्थानिक पातळीवर घोडेबाजार तेजीत आला आहे. एका नगरसेवकाची बोली ५० लाखांपासून सुरू होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही नगरसेवकांचा भाव भलताच वधारल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात ३.५ लाखांची घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

घरचा दरवाजा तोडून चोरट्यांनी तब्बल साडे तीनलाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये दोन लाख रूपये रोख आणि सहा तोळे सोन्याच्या दागिन्याचा समावेश आहे. ही घटना जालना शहरातील संभाजीनगर परिसरात सोमवारी सकाळी उघडकीस आली. संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या संदीप तोष्नीवाल यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले रोख एक लाख ५० हजार रुपये आणि सहा तोळे सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. ही घटना घडली तेव्हा तोष्णीवाल कुटुंबीय आपल्या काकाच्या घरी झोपायला गेले होते.

पहाटे त्यांचे काका मॉर्निंग वॉकला जात असताना संदीप तोष्नीवाल यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर चोरट्यांनी शेजारी राहणाऱ्या निरजकुमार पटेल यांचेही घर फोडले. याठिकानाहून चोरट्यांनी कपाटातील रोख ५० हजारावर डल्ला मारला. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक शितलकुमार बल्लाल, मनीष पाटिल, श्रीमंत ठोंबरे, संजय गवळी आदींनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी संदीप तोष्नीवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरन सदर बाजार पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे करीत आहेत.

श्वान पथकासाठी पोलिसांची धावपळ

दरम्यान, घटनेचे गांभिर्य लक्षात घेता फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि श्वान पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. फिंगरप्रिंट एक्सपर्टने घटनास्थळाचा पंचनामा केला. मात्र, जालन्याचा श्वान आजारी असल्याने औरंगाबाद येथील श्वान बोलविण्यात आला. हे श्वान पथक सायंकाळी पाच वाजेपर्यंत जालन्यात आले नव्हते. श्वान पथकासाठी सदर बाजार पोलिसांची मोठी धावपळ सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंजिनीअर, हेल्परला लाच घेताना अटक

$
0
0

नांदेडः नांदेड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता रवींद्र तांदळे, लाइन हेल्पर सीताराम बोंडले यांना १३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर सोमवारी अटक करण्यात आली.

चारचाकी वाहनाने इलेक्ट्रीक पोलला धडक दिली होती. त्यावरून तक्रारदाराविरुद्ध इलेक्ट्रीक पोल पाडल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी यापूर्वी सहाय्यक अभियंता तांदळे यांनी दहा हजार रुपये स्विकारले होते. याचसाठी अजून त्यांनी तक्रारदाराकडे आणखी १३ हजार रुपयाची मागणी केली होती, अशास्वरुपाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे दिली होती. त्यानुसार सोमवारी धर्माबाद येथे सापळा रचण्यात आला होता. त्यामध्ये सहाय्यक अभियंता रवींद्र तांदळे यांना तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारून बोंडले यांच्याकडे ठेवण्यासाठी देताना दोघानांही रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत लाचलूचपत प्र‌तिबंधक विभागाचे एन. व्ही देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मोहमद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे, अशोक गिते यांनी सापळा रचून कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘MIM’विरोधात एल्गार पुकारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

रझाकाराप्रमाणेच समाजात विषारी विचार पेरण्याचे काम 'एमआयएम' ही संघटना करीत आहे. पावसाळी छत्रीप्रमाणे उगवलेल्या या पक्षाला दलित संघटनेतील काही स्वार्थी नेते मदत करीत आहेत. विषारी विचार पेरणाऱ्यांना साथ देणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची प्रतारणा करण्यासारखे आहे. त्यामुळे आगामी काळात अशा प्रकारच्या अभद्र युतीच्या विरोधात एल्गार पुकारणार असल्याची घोषणा भाजपचे खासदार अमर साबळे यांनी केली.

उस्मानाबाद येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नित‌ीन काळे उप‌स्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या कसबे तडवळे या गावाला त्यांनी भेट दिली. खासदार निघीतून त्यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. यावेळी पुढे बोलताना खासदार साबळे म्हणाले, 'मी दलित, वंचित, पीडित घटकाचे प्रतिनिधीत्व करणारा कार्यकर्ता आहे. गेल्या २० वर्षांपासून मी पत्रकार म्हणूनही कार्यरत आहे. सामान्य कार्यकर्त्यांस एका रात्रीत खासदार करू शकणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. मी मागणी केली नसतानाही मला पद देऊन दलित कार्यकर्त्यांचा भाजपने यथोचित सन्मान केला आहे.' मराठवाड्यावर ह‌ैदराबाद येथील निजामाने जलमी अत्याचार केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील नंदगाव, चिलवडी आणि देवधानोरा या गावात रझाकाराने जाळपोळ केल्याने असंख्य ग्रामस्थ शहीद झाले. या सर्व गावांना त्यांनी भेटी दिल्या. समाजात विषाची बिजे पेरणाऱ्या 'एमआयएम' या जातीयवादी पक्षाविरोधात एल्गार पुकारणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त शिक्षकांना दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने प्रयत्न सुरू आहेत. हा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार असून यासंदर्भात येत्या दोन महिन्यात सकारात्मक निर्णय घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी मंत्रालयात अतिरिक्त शिक्षकांच्या शिष्टमंडळाला दिले.

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या सुमारे ८५० शिक्षकाचा प्रश्न सध्या गाजत आहे. या प्रश्नासाठीच गेल्या महिन्यात शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले होते. यावेळी उपोषण कर्त्यापैकी एका शिक्षकाने आत्महत्या केल्याने हा प्रश्न चांगलाच गाजला होता. यावेळीच पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रश्नी लक्ष घालून बीड जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या सुमारे ८५० शिक्षकाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते.

बीड जिल्ह्यात साधारण ८५० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यातून बदली होऊन बीड जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांना त्यांच्या मूळ जागी परत पाठविण्याबाबत शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने बीड जिल्हा परिषदेला २३ एप्रिल रोजी एका पत्रान्वये निर्देश दिले होते. त्यामुळे या शिक्षकांमधून अस्वस्थता होती. त्यामुळे आता त्यांना मूळ जागी परत पाठ‌विण्यात येणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

दरम्यान, या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांनी पालकमंत्री मुंडे यांची भेट घेऊन याप्रश्नी दिलासा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुंडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांच्याकडून माहिती घेऊन तसेच शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करून या प्रश्नी तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यास अनुसरुन जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या सुमारे दोनशे शिक्षकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री तावडे यांची भेट घेऊन चर्चा केली. तावडे यांनीही या प्रश्नी सकारात्मक भूमिका घेऊन पंकजा मुंडे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. याप्रश्नी शालेय शिक्षण विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन येत्या दोन महिन्यांत आपण सकारात्मक मार्ग काढू, असे आश्वासन तावडे यांनी त्यांना दिले. शिष्टमंडळात भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, अतिरिक्त शिक्षकांचे प्रतिनिधी शाम सातपुते आदींचा समावेश होता.

पदोन्नतीने शिक्षकांची भरती करणार

शिष्टमंडळाच्या इतरही मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू, असे तावडे यांनी याप्रसंगी सांगितले. शिक्षकांच्या संचमान्यतेला २०१४ मध्ये देण्यात आलेली स्थगिती उठविणे, सर्वांना समायोजित करून घेणे तसेच पदोन्नतीने शिक्षकांची भरती करणे आदी मुद्द्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन तावडे यांनी शिष्टमंडळाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आग विझली, किल्ला काळवंडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यात रविवारी (२६ एप्रिल) सायंकाळी सहाच्या सुमारास लागलेली आग सोमवारी दुपारी (२७ एप्रिल) पूर्णपणे विझवण्यात यश आले. या आगीत किल्ल्याच्या बारादरीचा काही भाग काळवंडल्याचे दिसून आले.

दौलताबाद किल्ल्यात आग लागल्याने रविवारी रात्री दुरून आगीचे लोट दिसत होते. आग लागल्यानंतर औरंगाबाद येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. परंतु, किल्ल्यात पसरलेल्या आगीवर त्वर‌ित नियंत्रण आणणे अत्यंत कठीण असते. किल्ल्यावरील कर्मचारी व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी या आगीवर नियंत्रण मिळविल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही, मात्र आगीत किल्ल्यावरील झाडेझुडपे जळून खाक झाली. आगीत होरपळून मोर, ससे, घोरपड आदी वन्यजीव मरण पावल्याचेही सांगण्यात आले. या आगीसंदर्भात माहिती घेण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क होऊ शकला नाही.

साधनांची कमतरता

किल्ल्यात दरवर्षी उन्हाळ्यात आग लागते. ती विझविण्याचे कोणतेही साधन किल्ल्यावर नाही. किल्ला पाहण्यासाठी येणारे पर्यटक व स्थानिकांकडून जळती विडी सिगारेट फेकल्यास ही आग लगेच पसरते. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर तपासणी करून काड्याची पेटी, लायटर, ज्वलनशील पदार्थ काढून घेण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिनी दुरुस्त; गळती सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

तीन दिवसात दोनदा फुटलेली पैठण शहर पाणीपुरवठ्याची भरणा जलवाहिनी, नगरपालिकेने सोमवारी (२७ एप्रिल) दुरुस्त केली. मात्र त्यानंतरही जलवाहिनीतून पाण्याची गळती होत आहे. भूमिगत गटार योजनेअंतर्गत शहरातील भारत टॉकीज परिसरात पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी रात्री पाईप टाकण्यासाठी खोदकाम करताना पैठण शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य भरणा जलवाहिनी फुटली. तिची दुरुस्ती केल्यानंतर ती केवळ चोवीस तासात पुन्हा फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. परंतु, याच जलवाहिनीद्वारे पाण्याच्या टाक्या भरण्यात आल्याने सोमवारी शहरात सुरळीत पाणीपुरवठा झाला. दरम्यान,भूमिगत गटार योजनेचा कंत्राटदार व नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फुटलेली जलवाहिनी दुरुस्त केली. या जलवाहिनीतून संध्याकाळी पाणी भरण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यातून पुन्हा त्याच ठिकाणी गळती सुरू झाली आहे. ही गळती वेळीच दुरुस्त करण्याची गरज नागरिक बोलून दाखवित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images