Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

३४ वर्षांनंतरही जालन्याला विकासाची आस

$
0
0

विजय कमळे, जालना

भारतातील स्टील आणि बियाण्यांची राजधानी म्हणून सर्वत्र ख्याती असलेला जालना जिल्हा एक मे रोजी ३५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आजपर्यंत जालना जिल्ह्याची अपेक्षित अशी प्रगती होऊ शकलेली नाही. याउलट जिल्ह्याचा नेतृत्व करणाऱ्या सर्वपक्षीय राजकीय मंडळीच्या नाकर्तेपणामुळे सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाली आहे. केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता आहे. बबनराव लोणीकर यांच्या रूपाने जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. खासदार रावसाहेब दानवे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याने जालना जिल्ह्याचा गेल्या ३४ वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरून 'अच्छे दिन' येतील,अशी आस जालनेकर बाळगून आहेत.

यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्याचा तालुका असलेला जालना एक मे १९८१ रोजी स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वास आला. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळात ही घोषणा करण्यात आली होती. व्यापारी आणि उद्योजकांच्या प्राबल्यामुळे 'जालना सोने का पालना' अशी प्रशंसा केली जात होती. स्वतंत्र जिल्हा म्हणून नावारूपास आल्यानंतर जालन्यात विविध प्रकाराच्या सोयी-सुविधा उपलब्ध होऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, अशी सर्वसामान्य जालनेकरांची अपेक्षा होती. मात्र, यासर्व अपेक्षा जालनेकरांसाठी एक दिवास्वप्नच ठरल्या आहेत.

कोणत्याही भागाचा विकास करण्यात तेथील नेतेमंडळीचा सिंहाचा वाटा असतो. परंतु, दुर्दैवाने जालन्याचा विकास करण्यात किंवा करून घेण्यात येथील राजकीय नेते सपशेल अपयशी ठरले आहेत. जालना जिल्ह्याच्या मागासलेपणाचे कारण म्हणजे येथील राजकीय पुढाऱ्यांची उदासीनता आहे. राजकीय नेत्यांना आतापर्यंत रस्ते, वीज, पाणी, पथदिवे, बेशिस्त वाहतूक आणि प्रदूषण यासारख्या मुलभूत समस्या सोडविता आल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्याचा विकास पूर्णपणे खुंटला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदेड जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान तंत्र अधिनियमाची नांदेड जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या लिंग गुणोत्तर प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या या सर्व उपाय योजनाचा परिणाम म्हणून जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण हे सन २०११-१२ मध्ये ८९७ होते. ते आता सन २०१४-१५ मध्ये ९५७ झाले आहे. तीन वर्षत लिंग गुणोत्तर प्रमाणात ६० ने वाढ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सीक डॉ. विजय कंदेवाड यांनी दिली.

याकरीता जिल्हास्तरीय दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कंदेवाड, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. मीरा कुलकर्णी व जिल्हास्तरीय पीसीपीएनडीटी कक्ष यांचे अभिनंदन केले आहे.

या कायद्याची अंमलबजावणी व्हावी व मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी या करिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने जिल्हास्तरीय दक्षता समिती (टास्क फोर्से)चे स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची दरमहा बैठक घेण्यात येते. महानगरपालिका कार्यक्षेत्र तसेच उर्वरित जिल्ह्यात सोनोग्राफी केंद्राच्या तपासणीचा आढावा घेण्यात येत आहेत. एक किंवा जास्त स्त्री अपत्य आलेल्या महिलांची सोनोग्राफी करण्यात आल्यास, सदर महिलेचा गर्भपात करण्यात आला आहे का? याचा तपास जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी, आशा, कार्यकर्ती यांच्याकडून करण्यात येत आहे. या महिलेचा गरोदरपणा खंडित झाल्यास गर्भपात करणे वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक होते का याची तपासणी तज्ज्ञ समितीमार्फत करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान व स्त्री भ्रृणहत्या यांचा समाजावर होणारा दुष्परिणाम याची माहिती दर्शविणारे होर्डींग, रेडीओ जिंग्लेस यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. सन २०१३ मध्ये अवैध गर्भपात केल्याबद्दल भोंदू महिला आरिफा बी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे अवैध गर्भपात करणाऱ्यांना आळा बसला आहे.

जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्याची कार्यशाळा घेण्यात आली. आशा कार्यकर्तीना गर्भलिंग निदान करणारे गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांबाबत माहिती दिल्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. जिल्ह्यातील महिला आंध्र व कर्नाटक राज्यात जाऊन गर्भपात करत असल्याची माहिती मिळाल्यामुळे निजामाबाद, आदिलाबाद व बिदर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात नांदेड जिल्ह्याची महिला सोनोग्राफी करण्यासाठी आल्यास त्यांची माहिती जिल्हा प्रशासनास देण्याची विनंती करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने केलेल्या या सर्व उपाय योजनाचा परिणाम म्हणून नांदेड जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९५७ वर पोहचले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या १८० विद्यार्थ्यांची प्रवेश पूर्व परीक्षेची फीस न भरता उस्मानाबाद येथील आय गुगल नेट कॅफेने फसवणूक केली. त्यामुळे १८० विद्यार्थ्यांच्या भवितव्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, याबाबतचे वृत्त 'मटा'मधून प्रसिद्ध होताच त्याची दखल शिक्षणमंत्री तावडे यांनी घेतली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

उस्मानाबाद येथील आय गुगल नेट कॅफेच्या चालकाने वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या १८० विद्यार्थ्यांची प्रवेश पूर्व परीक्षेची फीस न भरता त्यांची फसवणूक केली होती. बुधवारी प्रवेशपत्र न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी बुधवारी या नेट कॅफेला गराडा घातला होता.

दरम्यान, याबाबतचे वृत्त 'मटा'मधून प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले. हा प्रकार शिक्षणमंत्री तावडे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ दखल घेतली. त्यानंतर या १८० विद्यार्थ्यांची परीक्षा फिस भरून घेण्यात आली. त्यांचे प्रवेशपत्र भरुन घेण्याची प्रक्रिया गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. या विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट शुक्रवारपर्यंत तयार करून मिळणार आहेत. त्यासोबतच जिल्हाधिकारी नारनवरे यांनी या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी तत्काळ बैठकीची व्यवस्था केली आहे. या १८० विद्यार्थ्यांमध्ये उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांची एक लाख ३५ हजार रुपये फिस या कॅफे चालकाने भरल्याने त्यांच्या परीक्षेचा मार्ग सुकर झाला आहे.

या प्रकारानंतर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंतदादा बँकेवर जप्तीच्या कारवाईसाठी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

नितळी (ता. उस्मानाबाद) येथील जयलक्ष्मी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर वसंतदादा बँकेवर जप्तीच्या कारवाईसाठी मोर्चा काढला. जयलक्ष्मी कारखान्याने गाळप केलेल्या उसाचे पैसे न दिल्याच्या निषेधार्थ भाजप नेते पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

विजय दंडनाईक चेअरमन असलेल्या वसंतदादा बँकेवर जप्तीची कारवाई करून जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या उसाचे बिल देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करणारे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जयलक्ष्मी साखर कारखान्याने गतवर्षी शेतकऱ्यांचा विश्वास संपादित करून मोठ्या प्रमाणात उस गाळपास घेतला. गळीत हंगाम संपून बराच कालावधी लोटला तरी कारखान्याने अजूनही शेतकऱ्यांचे बिल अदा केले नाही. पैशासाठी उसउत्पादक शेतकऱ्यांनी अनेक हेलपाटे घातले, मात्र, उपयोग झाला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचा आधार घेऊन साखर आयुक्त (पुणे) उपायुक्त (नांदेड) तसेच जिल्हाधिकारी यांचे दरवाजे ठोठावले.

जिल्हा प्रशासनाने कारखाना लिलावत काढून शेतकऱ्यांच्या उसाचे बिल अदा करण्याचे आदेश दिले. मात्र, या संदर्भाने अपेक्षित कारवाई अद्याप झाली नाही. दरम्यान पंजाब नॅशनल बँक व युनियन बँक ऑफ इंडियाने या कारखान्यावरील कर्जापोटी कारखान्याची मालमत्ता तसेच चेअरमन विजय दंडनाईक यांची व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या जप्तीची व लिलावाची मोहीम हाती घेतल्यामुळे शेतकरी धास्तावले.

२० मे रोजी बँकेने यासर्व मालमत्तेची ई टेंडरद्वारे ऑनलाइन लिलाव जाहीर केलेला आहे. त्यामुळे बँक त्यांचा पैसा वसूल करेल व शेतकऱ्यांच्या उसाचे बिल मिळणार किंवा नाही, अशी धास्ती या शेतकऱ्यांनी घेतली. चेअरमन विजय दंडनाईक हे सुद्धा सध्या उस्मानाबादेत उपलब्ध होत नाहीत.

यासर्व पार्श्वभूमीवर मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरवर टंचाईचे संकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूर जिल्ह्यातील टंचाईच्या परिस्थितीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात ५५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे सरकारने ५२५ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. त्यापैकी ४८० विहिरीतील पाणी टँकरने दिले जात आहे. उन्हाची वाढती तीव्रता आणि गावोगावची टँकरची वाढती मागणी लक्षात घेता पुढील आठवड्यातच टँकरची संख्या वाढेल असा प्रशासनाचा अंदाज आहे.

लातूर जिल्ह्यातील काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आ‌हे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच टंचाईचे संकट वाढत असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. लातूर तालुक्यातच सर्वाधिक १२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुका निहाय टँकरची संख्या पुढील प्रमाणे आहे. औसा- ३, रेणापूर-३, उदगीर-११, अहमदपूर- ८, चाकुर-७, देवणी-२, जळकोट- ५, निलंगा चार अशी आहे.

रेणापूर शहराला भंडारवाडी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होत होता. गेल्या चार दिवसांपूर्वी भंडारवाडीचा पाणी साठा संपला. त्यामुळे ग्रामपंचायतीने रेणापूरला यापुढे नळाला पाणी येणार नसल्याचे घोषीत केले आहे. या बाबत बोलताना ग्रामसेवक एम. टी. माने म्हणाले, 'भंडारवाडीचा पाणीसाठा संपल्याची माहिती गावकऱ्यांना दिली आहे. त्याचप्रमाणे यापुढे रेणापूरला पाणीपुरवठा कसा करायचा याबाबत तहसीलदार यांना निवदेन सादर केले आहे.'

सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार म्हणाले, 'गेल्या वर्षी ज्या गावात जलसंधारणाचे, नाला, नदी सरळीकरण, खोलीकरणाचे कामे झाली आहेत. त्या ठिकाणी टँकर लावावे लागले नाहीत. त्याच उत्तम उदाहरण हे शिरुर अनंतपाळ तालुका आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुपेंच्या गावात गुढ्या उभारून आनंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

औरंगाबादच्या महपौरपदी त्रिंबक तुपे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मूळ गाव आडगाव खुर्द येथे गावकऱ्यांनी बुधवारी (२९ एप्रिल) फटक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला. गावात गुढ्या उभारण्यात आल्या होता.

महापौर तुपे यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण आडगावमध्ये झाले आहे, त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते औरंगाबादला गेले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांनी वृत्तपत्र टाकण्याचेही काम केले आहे. आईचे निधन लहानपणी झाल्याने वडिलांनी सांभाळ केला, या आठवणी गावकऱ्यांनी काढल्या. तुपे यांनी आडगावमध्ये गिरीगान प्रतिष्ठानची स्थापना केली असून त्यानिमित्ताने ते दर १५ दिवसाला गावाकडे येत असतात. दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी क्रिकेट सामने भरविण्याची परंपरा त्यांनी सुरू केली आहे. या छोट्या गावातील तरुणाने औरंगाबादचे महापौरपद मिळविल्यामुळे गावकऱ्यांनी आनंद साजरा केला आहे. या उत्साहात सरपंच सुनिता तुपे, उपसरपंच जनाबाई गिरी, माजी सरपंच काकाजी तुपे, माजी सरपंच भगवान लोणकर, कवी देविदास तुपे, बाळू तुपे, ज्ञानेश्वर गाडेकर, माजी पोलिस पाटील सदाशिव तुपे, दगडू गाडेकर, आजिनाथ तुपे आदींसह गावकरी सामील झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बँकेने तगादा लावल्यास तक्रार करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

'कोणतीही बँक कर्ज वसुलीसाठी तगादा लावू शकत नाही. बँकांनी जबरदस्ती केल्यास थेट माझ्याकडे तक्रार करावी,' असे आवाहन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी गुरुवारी (३० एप्रिल) तालुक्यातील कनकशीळ येथे केले. त्यांनी गावकऱ्यांना स्वतःचा मोबाइल नंबरही दिला.

ग्रामरोजगार दिनानिमित्त जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी गुरुवारचा दिवस कनकशीळ येथील रोजगार हमी योजनेच्या मजुरांसोबत घालविला. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. शासनाच्या २०० योजनांतून दुष्काळावर मात करणे शक्य आहे, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर यांनी यावेळी गावाचे वॉटर बजेट सादर करून कमी पाण्यात वाढणारी दहा हजार वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन असल्याची माहिती दिली. सीईओ डॉ. अभिजीत चौधरी यांनी घरोघरी शौचालय बांधून वापर करण्याचे आवाहन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कनकशीळ शिवारात आडवे चर खोदणे, बांधाची उंची वाढविणे, गाळ काढणे, कंपार्ट बल्डिंग, २० शेततळे, ७ मातीनाला बांध, तीन सीसीटी आदी दोन कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती दिली.

आत्महत्या केलेले शेतकरी रावसाहेब लक्ष्मण तांगडे यांच्या पत्नी गंगाबाई रावसाहेब तांगडे यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजनेतून मदतीचा धनादेश देण्यात आला. रोहयो मजूर सरलाबाई लक्ष्मण कामठे यांनी मुलगी कल्याणी हिला इंजिनीअरिंगच्या शिक्षणासाठी पाठविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी मजुरांच्या मुलांना कृषी विभागातर्फे पुस्तकांचा संच देण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रशांत काळे, गटविकास अधिकारी डॉ. राम लाहोटी, अधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नड तालुक्यात तीव्र उन्हासोबत पाणीटंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

उन्हाचा चटका वाढत असताना तालुक्यातील पाणीटंचाई सुद्धा तीव्र होत आहे. तालुक्यात एप्रिलअखेर ३२ विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखीन नऊ प्रस्ताव प्रलंबित असून ४१ नवीन प्रस्ताव दाखल झाले आहेत. या महिन्यात तालुक्यातील टँकरची संख्या एकने वाढली आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तालुक्याच्या काही भागात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने सर्वसामान्य शेतकरी चिंतित झाले होते. त्यानंतर आता कडक उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. या परिस्थितीत पाणीटंचाईने डोके वर काढले असून विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल होत आहेत. तालुक्यातील गावांतून प्रत्येकी एक याप्रमाणे ४१ प्रस्ताव दाखल झाले. या शिवाय आमदाबाद, कानडगाव, खेडी, पिंपरखेडा, तलाववाडी, निमडोंगरी, सहानगाव, गौरपिंपरी, साळेगाव, कळंकी या नऊ गावांचे प्रस्ताव विविध कारणांनी प्रलंबित आहेत.

तालुक्यातील ३३ गावांना विहीर अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मोहरा, अमदाबाद, नाचनवेल, मोहाडी, जवखेडा बुद्रुक, औराळी, सासेगाव, बिबखेडा या आठ गावांना बारा हजार लिटर क्षमतेच्या सात टँकरच्या माध्यमातून १५ फेऱ्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांसाठी १८ फेऱ्या आहेत, परंतु वीज भारनियमानामुळे दररोज तीन फेऱ्या कमी होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैठण तालुक्यात अवैध वृक्षतोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील संरक्षित वन परिसर व रस्त्याकडेच्या झाडांची तोड करण्यात येत आहे. अवैधरित्या तोडलेले हे लाकूड दररोज सायंकाळी पाचनंतर १५ ते २० ट्रॅक्टरमधून शहरातील सॉ मिलवर आणले जात आहे.

शहर व तालुक्यात दीड डझनपेक्षा जास्त वैध व त्यापेक्षाही जास्त अवैध सॉ मिल सुरू आहेत. लाकडाच्या व्यवसायात मोठा नफा असल्याने शहर व तालुक्यात अवैध वृक्ष तोड करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्या तालुक्यातील पाचोड रोड, शेवगाव रोड, मुंगी रोड व शहागड रस्त्यावरील वन संरक्षित भाग, रस्ताकडेची झाडे तोडत आहेत. हे लाकूड ट्रक्टर ट्रॉलीत भरून ठेवले जाते, सायंकाळी या ट्रॉली सर्रास शहरात आणल्या जातात. सॉ मिल चालक कोणतीही चौकशी न करता या लाकडाची कटाई करून देतात, अशी माहिती मिळाली आहे. संरक्षित वन परिसरातील वृक्षाचे रक्षण करणे व अवैध वृक्षतोड थांबवणे, अवैध लाकूड वाहतुकीवर कारवाई करणे वनविभाग व पोलिस यांच्याकडून अपेक्षित आहे. या दोन्ही विभागांचे दुर्लक्ष होत आहे.



उद्या कारवाई करतो !

वृक्षतोड, रस्त्याकडेला उभ्या राहणाऱ्या लाकडाने भरलेल्या ट्रॉली व शहरात येत असलेले लाकूड याबद्दल वनपाल सुनील मेहेर यांच्याकडे विचारणा केली. त्यावर त्यांनी 'उद्या कार्यवाही करतो' असे उत्तर देऊन अधिक बोलणे टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी किती आत्महत्या बघणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळ आणि गारपिटीने झोडपलेल्या शेतकऱ्यांना कणभर मदत मिळाली नाही. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. या बिकट परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचे दुःख ऐकणार काय? असा सवाल भाजप कार्यकर्ते आणि महाराष्ट्र राज्य मोसंबी उत्पादक संघाचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सूर्यवंशी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. निसर्गाच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना अजूनही सरकारी मदत नाही. 'शेतकरी आत्महत्येचा प्रदेश' अशी मराठवाड्याची ओळख जागतिक पातळीवर झाली आहे. 'नुकसानभरपाईसाठी मिळण्यासाठी किती शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतील,' असा सवाल महाराष्ट्र राज्य मोसंबी उत्पादक संघाचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी केला आहे. सध्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी सूर्यवंशी यांच्यासह संघाचे इतर पदाधिकारी फिरत आहेत. या पाहणीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

'जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांनी पत्नीचे दागिने गहाण टाकून पीक विम्याची रक्कम भरली. सतत तीन वर्षे रक्कम भरुनही नुकसानभरपाई मिळाली नाही. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत देताना २००५ च्या अध्यादेशाप्रमाणे एक लाख रुपयांची मदत केली जात आहे. या दहा वर्षात महागाई निर्देशांक १० पटीने वाढला आहे. त्यामुळे मदतसुद्धा वाढवून देणे गरजेचे आहे,' असे सूर्यवंशी यांनी सांगितले.

केंद्र व राज्य शासनाची दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाल्याची राज्य सरकारने घोषणा केली; मात्र २० टक्के शेतकऱ्यांना मदत पोहचली नाही. चुकीचे पंचनामे केल्यामुळे शेतकऱ्यांना गारपिटीत नुकसान होऊनही मदत मिळाली नाही. काही ठिकाणी मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची शेती जिराईत दाखवून मदतीपासून वंचित ठेवले गेले. सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा केला आहे; मात्र दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना जगणे कठीण झाले आहे. आता चारा नसल्यामुळे जनावरे विकण्यावाचून पर्याय नाही; मात्र नवीन कायद्यामुळे कुणीही जनावरे विकत घेत नाही. या प्रकारामुळे जनावरांना उपाशीपोटी मरणयातना सहन कराव्या लागण्याची भीती आहे. त्यामुळे चारा उपलब्ध करण्याची गरज आहे. येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाही. शेताची मशागत झाली नाही. बि-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी कर्जबाजारी शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. येत्या चार मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद शहरात येणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी अशा अनेक समस्या मांडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू साठ्यांकडे प्रशासनाचा कानाडोळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील वाळुपट्ट्यांमधून बेकायदा काढलेल्या वाळूचा औरंगाबाद शहरात साठा केला जात आहे. प्रशासनाने बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त केल्या; मात्र जागोजागी असलेल्या वाळूसाठ्यांकडे कानाडोळा केला जात आहे.

शहरातील किराडपूरा, आझाद चौक, हर्सूल टी पॉइंट, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, बीड बायपास, पंचवटी चौक या भागात वाळूचा साठा करण्यात येत आहे. पैठण, वैजापूर व गंगापूर तालुक्यांतून उपसा केलेली वाळू शहरात आणून विकली जाते. गौण खनिज विभागाच्या नियमानुसार विक्रीसाठी वाळूचा साठा करता येत नाही. साठा आढळल्यास वाळू व वाहन जप्त करून दंड केला जातो. परंतु, ही कारवाई अपवादानेच होते. प्रशासन केवळ रस्त्यावरील वाहनांना पकडून कारवाई करण्यात गुंग आहे. त्यामुळे शहरातील वाळू साठ्यांवर कारवाई केव्हा करणार, असा प्रश्न आहे. एकीकडे शहरामध्ये अतिक्रमण, रस्त्याच्या शेजारी पडलेले बांधकाम साहित्य जप्त करणे, दंड लावणे या कारवाया महापालिका प्रशासनाकडून करण्यात येतात. परंतु, शहराच्या हद्दीत महापालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून साठा करून विक्री होत असातना जिल्हा प्रशासन गप्प का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधी पक्षनेत्यासाठी संघर्ष

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आणि एमआयएममध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी (गुरुवारी) या दोन्ही पक्षांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणारे पत्र महापौर कार्यालयात सादर केले.

महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर आता महापालिकेत विरोधी पक्षनेता कोण या चर्चेला सुरुवात झाली आहे. या पदावरून एकमेकांचे पत्ते कापण्याचे राजकारणही राजकीय पक्षांमध्ये तापू लागले आहे. एमआयएम पक्षाला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता नाही, असा मुद्या काँग्रेसने उपस्थित केला आहे.

एमआयएमला मान्यता नसल्यामुळे महापालिकेत दहा नगरसेवक असलेला काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद या पक्षाला मिळाले पाहिजे, असा दावा दाखल करणार असल्याचे दोन दिवसांपूर्वी नगरसेवक अफसर खान यांनी स्पष्ट केले होते. आज त्यांनी त्या संबंधीचे पत्रच महापौर कार्यालयाला दिले आहे. पत्रावर काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांची स्वाक्षरी आहे. त्याशिवाय दहा नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या देखील आहेत. अफसर खान यांना विरोधी पक्षनेतेपदावर नियुक्त करावे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दुसरे पत्र एमआयएमतर्फे देण्यात आले आहे. एमआयएमतर्फे कुणाला विरोधी पक्षनेता करावे, याचा उल्लेख पत्रात नाही, परंतु एमआयएमच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या पक्षालाच विरोधी पक्षनेतापद देण्यात यावे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेतेपद कोणत्या पक्षाला द्यायचे, याचा निर्णय महापौर करणार आहेत. त्यामुळे आता हा मुद्दा महापौरांच्या कोर्टात गेलेला आहे.

यासंदर्भात नगर सचिव विभागाशी पत्रकारांनी संपर्क साधला असता, ज्या पक्षाकडे जास्त नगरसेवक त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता, असे सूत्र असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीच्या वेळी 'हेड काउंट' होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वीकृत सदस्यांसाठी फिल्डिंग

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत स्वीकृत सदस्य होण्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचे नियम बदलले असल्यामुळे कार्यकर्ते सुखावले असून त्यांनी नेत्यांना गाठण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या आखणे सुरू केले आहे.

महापालिकेत ११३ नगरसेवक निवडून आले आहेत. आता त्यात पाच स्वीकृत सदस्यांची भर पडणार आहे. येत्या २२ मे रोजी स्वीकृत सदस्यांच्या सदस्यांची नियुक्ती अधिकृतपणे केली जाण्याची शक्यता आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला स्वीकृत सदस्यपदी माजी नगरसेवकाला नियुक्त करता येणार नाही, असा नवा नियम शासनाने लागू केला आहे. स्वीकृत सदस्य म्हणून कुणाकुणाची नियुक्ती होऊ शकते, त्याची माहितीही शासनाने प्रसिध्द केली आहे. त्यानुसार डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शासकीय किंवा निमशासकीय सेवेतील पाच वर्षाचा अनुभव असलेला अधिकारी अशा विविध पाच क्षेत्रातील व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त करता येते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे राजकीय पक्षांचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

१६ नगरसेवकांमागे एका सदस्याची नियुक्ती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १६ नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य नियुक्त केला जाणार आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप, एमआयएम आणि अपक्ष नगरसेवकांच्या माध्यमातूनच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होऊ शकतो. दोन्हीही काँग्रेसचे संख्याबळ १३ आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला स्वीकृत सदस्य येण्याची शक्यता नाही. पाचपैकी तीन सदस्य शिवसेना-भाजप युतीचे, तर दोन सदस्य एमआयएम किंवा अपक्ष नगरसेवकांच्या शिफारशीचे असू शकतील असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्टिप्लेक्सची मनमानी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीन दिवसांच्या सुट्या लक्षात घेऊन शहरातील मल्टिप्लेक्सचालकांनी तिकीटासोबत 'फूड कूपन'ची सक्ती सुरू केली आहे. 'टाइमपास' आणि 'गब्बर' या चित्रपटांची अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन मल्टिप्लेक्सनी पुन्हा प्रेक्षकांच्या खिशावर डल्ला मारला आहे. प्रेक्षकांची लुबाडणूक करणाऱ्या चित्रपटगृहांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र, प्रेक्षकांना कूपनचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

शहरातील 'बिग अंजली मल्टिप्लेक्स'मध्ये चित्रपटाच्या तिकीटासोबत प्रेक्षकांना ६० रुपयांचे फूड कूपन दिले जात आहे. या कूपनवर शीतपेय आणि पॉपकॉर्न मिळते. मात्र, ६० रुपयांचे कूपनसाठी प्रेक्षकांवर सक्ती केली जात आहे. प्रेक्षकांनी विरोध केल्यास तिकीट नसल्याचे उत्तर मिळते. कूपन घेतलेल्या प्रेक्षकांनाच चित्रपटाचे तिकीट मिळत असल्याची वस्तुस्थिती आहे. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने गेल्या आठवड्यात वृत्त प्रसिद्ध केले होते. 'प्रेक्षकांना कूपनची सक्ती नसून सोयीचा पर्याय आहे. शीतपेय आणि पॉपकॉर्न प्रत्येकी ६० रुपयांना आहे. तिकीटासोबत कूपन घेतल्यास ६० रुपयांत दोन्ही गोष्टी मिळतात' असे अंजली बिग मल्टिप्लेक्सच्या व्यवस्थापकाने सांगितले होते. आता महाराष्ट्र दिनाच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर शहरात 'टाइमपास' आणि 'गब्बर' हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मल्टिप्लेक्सची पाहणी केली असता फूड कूपनची सक्ती कायम असल्याचे दिसले. 'कूपन नको, फक्त तिकीट द्या' असे सांगणाऱ्या दोन प्रेक्षकांना तिकीट विक्रेत्याने अरेरावी केली. हे प्रकार घडत असूनही करमणूक कर विभाग दुर्लक्ष करीत आहे. शहरात मल्टिप्लेक्सचालक मनमानी पद्धतीने फूड कूपन देत असल्यास कारवाई करू असे करमणूक कर विभागाचे अधिकारी किसनराव लवंडे यांनी सांगितले.

तिकीट दर दुप्पट

अंजली बिग मल्टिप्लेक्समध्ये ९० रुपयांचे तिकीट फूड कूपनसह दीडशे रुपयाला घ्यावे लागत आहे. सर्वसामान्य प्रेक्षक आणि विद्यार्थी प्रेक्षकांना याचा त्रास होतो. कमी दराचे तिकीट कूपनमुळे जास्त किमतीत का घ्यावे, असा सवाल प्रेक्षकांनी केला आहे. मल्टिप्लेक्सचालकांच्या मनमानीला आळा बसत नसल्यामुळे प्रेक्षक संतप्त झाले आहेत. तर इच्छा नसल्यास फूड कूपन घेऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसापची रणधुमाळी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या २२ सदस्य, सभासदांच्या निवडणुकीची प्रक्र‌िया २ मेपासून सुरू होत आहे. २१ ऑगस्ट रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील,' अशी माहिती गुरुवारी निवडणूक अधिकारी डॉ. चंद्रदेव कवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

'मसापच्या घटनेनुसार ही निवडणूक प्रक्र‌िया सुमारे ४ महिने असेल. यामुळेच याला अधिक वेळ लागेल. यादी जाहीर करणे, त्यावरील आक्षेप आणि नंतर मतदानाची मुदत यामुळे हा वेळ अधिक जाईल. सर्व निवडणूक प्रक्र‌िया घटनेच्या ३, ४ व ५ नियमांनुसार होणार आहे,' असे डॉ. चंद्रदेव कवडे यांनी सांगितले. मराठवाड्यासह राज्यात, राज्याबाहेर आणि अमेरिकेत मसापचे सभासद असून त्यांची एकूण संख्या २ हजार ६४२ एवढी आहे.

मराठवाड्यातील सभासद

औरंगाबाद ९६९

उस्मानाबाद १८६

जालना १६०

नांदेड २२६

परभणी १५१

बीड ३५६

लातूर ९२

हिंगोली ९२

निवडणूक वेळापत्रक

मतदार यादीची प्राथमिक प्रसिद्धी २मे

सुधारित अंतिम यादीची प्रसिद्धी २१मे

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत १ ते ६जून

उमेदवारी अर्ज छाननी, प्रसिद्ध ८जून

उमेदवारी परत घेण्याची मुदत १३जून

उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी १३जून

मतपत्र‌िका पाठवणे, देणे ३०जून

मतदानाची मुदतजुलै ते २०ऑगस्ट

मतमोजणी, निकाल२१ऑगस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबाद मनपाचा हलगर्जीपणा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत कोणतीही बैठक सुरू होण्यापूर्वी 'वंदेमातरम्' हे राष्ट्रगीत म्हटले जाते. यासाठी एक कॅसेट गेल्या अनेक वर्षांपासून वाजवली जात आहे. आता ही कॅसेट घासून-घासून खराब झाली आहे. या खराब झालेल्या कॅसेटमुळे पालिकेच्या कारभाराचा पंचनामा विशेष सभेत जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर झाला आणि सर्वजण सुन्न झाले. आज अखेर उपमहापौर प्रमोद राठोड यांनी अधिकाऱ्यांना बोलावून नवीन तंत्रज्ञान वापरण्याची सूचना केली.

बुधवारी महापालिकेत महापौर-उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विक्रमकुमार होते. सभेची सुरुवात नेहमीप्रमाणे 'वंदेमातरम्'ने करण्यात आली. मुख्य सभागृहात एका कोपऱ्यात इलेक्ट्रेशियनसाठी केबीन आहे. या केबीनमधूनच 'वंदेमातरम्' ची कॅसेट लावली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत हीच पध्दत अवलंबली जाते. नेहमीप्रमाणे काल सभा सुरू झाल्यावर 'वंदेमातरम्' ची कॅसेट लावण्यात आली. मात्र, ही कॅसेट अनेकवेळा अडकली. त्यामुळे राष्ट्रगीत सन्मानाने पूर्ण होऊ शकले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी या बद्दल नाराजीही व्यक्त केली.

महापौर - उपमहापौर निवडणुकीनंतरच्या आजच्या पहिल्या दिवशी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी काल सभागृहात घडलेल्या त्या प्रकाराची तत्काळ दखल घेतली. दुपारी त्यांनी सभागृहातील इलेक्ट्रेशियनच्या केबीनची पाहणी केली. तेव्हा 'वंदेमातरम आणि जन गण मन' या राष्ट्रगीताच्या कॅसेटस् खराब झाल्याचे लक्षात आले.

उपमहापौरांच्या पाहणीवेळी टेप रेकॉर्डर आणि कॅसेटचा वापर केला जात होता असेही लक्षात आले. त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना सूचना केली. तंत्रज्ञान खूप पुढे गेलेले आहे. सीडी, डिव्हीडी किंवा पेनड्राइव्हचा वापर करा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर पेनड्राइव्ह वापरण्यावर अधिकारी राजी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँक्रिटमधील इनोव्हेटर

$
0
0


सुधीर भालेराव

अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर आशिष पोकर्णा यांनी वडिलांच्या पाइप निर्मितीच्या उद्योगात लक्ष घालण्यास सुरुवात केली. या व्यवसायाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याबरोबर त्यांनी नवनवे प्रयोगही केले आहेत. हलक्या वजनाच्या विटा तयार करण्याचा उद्योग ते लवकरच सुरू करणार आहेत. त्यांच्या कारकिर्दीची ओळख...

अभियांत्रिकी शिक्षण अर्धवट सोडून वयाच्या २३व्या वर्षी आशिष पोकर्णा यांनी वडिलांचा उद्योग व्यवसाय पाहण्यास सुरुवात केली. पोकर्णा कुटुंबीय हे मुळचे लातूरचे. १९७२मध्ये रमेश पोकर्णा यांनी परभणी येथे आरसीसी ह्यूम पाइप तयार करण्याचा कारखाना उभारला. पुसद, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत त्यांनी मोटारसायकलवरून प्रवास करून व्यवसायाची व्याप्ती वाढवली. १९८३मध्ये त्यांनी औरंगाबादला येण्याचा निर्णय घेतला. उस्मानपुरा भागातील श्री गुरूतेग बहादूर हायस्कूलमधून दहावी पास झाल्यानंतर आशिष पोकर्णा यांनी देवगिरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बारावीनंतर जेएनईसीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेण्यास सुरुवात केली, मात्र काही कारणांनी त्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण सोडावे लागले. पुढे त्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेत बीकॉमची पदवी संपादन केली. पदवी वाणिज्य शाखेतील असली तरी, त्यांना मिळालेला उद्योगाचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांना वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

रमेश पोकर्णा हे प्री-कास्ट, प्री-स्ट्रेस्ट काँक्रिटमधील जाणकार. नेवासा फाटा येथे १९८३-९४मध्ये पोकर्णा यांनी इलेक्ट्रिक पोल निर्मितीचा कारखाना उभारला. याच कारखान्यातील काम पाहण्यास आशिष पोकर्णा यांनी वयाच्या २३व्या वर्षी प्रारंभ केला. या क्षेत्रातील वडिलांचा वारसा आणि अनुभव दांडगा असल्याने आशिष यांनी व्यवसायात नवनवीन प्रयोग केले. एमएसईबीला प्रामुख्याने ते इलेक्ट्रिक पोलचा पुरवठा करतात. रेल्वे स्लीपर बनवण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. काळाच्या एक पाऊल पुढे राहण्याच्या दृष्टिकोनामुळे १९८४मध्ये रमेश पोकर्णा यांनी स्पन पोलची निर्मिती सुरू करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेसाठी या पोलची मोठी मागणी आहे. स्पन पोल निर्मितीत त्यांनी उच्च दर्जा राखल्यामुळे त्यांना १९८७-८८मध्ये राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

आशिष पोकर्णा यांनी २००२मध्ये राउंड पोलची निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली. हायमास्ट दिव्यांसाठी सिमेंट पोल निर्मिती ही त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरली. आठ मीटरपासून ते तीस मीटरपर्यंत उंचीचे हायमास्ट त्यांच्या कंपनीत तयार होतात. भारतात त्यांच्या कामांची दखल घेण्यापूर्वीच त्यांना इथोओपियात काम करण्याची संधी मिळाली. आरपीजी ग्रुपला ऑर्डर मिळाली होती. त्याची कन्सल्टन्सी पोकर्णा यांना मिळाली होती. आशिष पोकर्णा यांनी इथोओपियात जाऊन प्रेझेंटेशन केले. वास्तविक या कामाचे ग्लोबल टेंडर निघाले होते, मात्र पोकर्णांच्या प्रेझेंटेशननंतर टेंडर बदलण्यात आले. त्यांना पोल डिझायनिंग व प्लांट डिझायनिंगचे काम मिळाले. त्यावर त्यांनी दोन वर्षे संशोधन केले आणि इनबिल्ट व्हिंच मेकॅनिझम बसविण्यात आले. हा प्रयोग जगात प्रथमच करण्यात आला.

हायमास्ट पोलची निर्मिती

इथोयिओपात पोकर्णांच्या प्रयोगाची चर्चा असताना भारतात त्यांच्या तंत्रज्ञानाची दखल घेण्यात आली. मुंबई महापालिकेने वर्सोवा सिव्हेज प्लांटसाठी हायमास्ट पोल बसवण्याची ऑर्डर दिली. तेथील लोखंडी खांबांना गंज चढत असल्याने ते लवकर खराब होत असे. सिमेंटने बनवलेले हायमास्ट पोल बसवण्यात आल्यानंतर चार वर्षांत त्या पोलची एकही तक्रार आली नाही. त्यानंतर त्यांना डहाणूपासून ते मालवणपर्यंत समुद्र किनाऱ्यावर स्टॉर्म वॉर्निंग सिग्नल्स आणि हायमास्ट पोल बसवण्याची ऑर्डर मिळाली. श्रीवर्धन बंदरातही त्यांनी हे पोल बसवले आहेत. समुद्र किनारी खलाशांना दिशादर्शनासाठी लाइट हाउस उभारावे लागतात. प्रामुख्याने ते डोंगरावर असतात. अशा प्रकारचे लाइट हाउसची उभारणी त्यांनी केली. सिमेंटच्या एका पोलचे वजन सुमारे सव्वा टन असते. त्यांनी हे पोल डोंगरावर नेऊन बसविले. या कामाची चर्चा देशभर झाली. साहजिकच समुद्र किनारा लाभलेली राज्ये पोलची ऑर्डर देण्यासाठी पोकर्णा यांच्याच कंपनीची निवड करू लागले. ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यात त्यांनी मोठे काम केले आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी तब्बल नऊ हजारांपेक्षा अधिक पोल बसविलेले आहेत.

सिंगल पोल ट्रान्सफॉर्मर

बेटॉन काँक्रिट प्रॉडक्ट कंपनीच्या माध्यमातून त्यांनी इनोव्हेशन करताना सिंगल पोल ट्रान्सफॉर्मरची निर्मिती केली. ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी चार पोल, संरक्षण भिंत असावी लागते आणि त्यासाठी मोठी जागाही लागते. यावर उपाय काढताना त्यांनी एकाच पोलवर ट्रान्सफॉमर बसवता येईल अशी निर्मिती केली. त्यावर २५० केव्हीएचे ट्रान्सफॉर्मर बसवले जाऊ शकतात. राजधानी दिल्लीत त्यांनी असे ट्रान्सफॉर्मर बसविले आहेत. या कामासाठी त्यांच्या कंपनीला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे.

नव्या उद्योगाची उभारणी

व्यवसायात नाविन्य आणण्यासाठी ते लवकरच एका नव्या उद्योगाची सुरुवात करणार आहेत. वजनाने हलक्या आणि उच्च दर्जाच्या सिमेंटचे ब्लॉक निर्मिती ते करणार आहेत. नेवासा येथेच या कारखान्याची उभारणी करण्यात येत आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी एका औद्योगिक प्रदर्शनाच्या निमित्ताने आशिष पोकर्णा हे चीनला गेले होते. त्या प्रदर्शनात त्यांनी 'लाइट वेट ब्रिक्स' पाहिल्या. या विटा बनविण्यासाठी जर्मन तंत्रज्ञान वापरतात.

पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी या विटांच्या निर्मितीला भविष्यात मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यांनी व्यक्त केली. लाइटवेट ब्रिक्समुळे खर्चात जवळपास १५ ते २० टक्के बचत होते आणि विटांच्या तुलनेत कमी वेळेत काम पूर्ण होते. बांधकाम व्यावसायिक आता ब्रिक्सच्या वापराकडे वळत आहेत. त्यामुळे भविष्यात या ब्रिक्स निर्मितीला मोठी संधी असणार असा त्यांना विश्वास वाटतो. व्यवसाय कोणताही असो, धोका पत्करावाच लागतो. त्यानंतरच यश मिळते. 'थिंग बिग, एक्झिक्यूट स्मॉल बट विथ पॅशन' हा त्यांच्या यशाचा मंत्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणून होते वाहतूक कोंडी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको आणि औरंगाबाद शहराला जोडणारा चिश्चिया चौक हातगाड्यांच्या विळख्यात अडकला आहे. भर रस्त्यात वाहने उभी करण्यात येत असल्याने या चौकातून मार्ग काढताना वाहधारकांना कसरत करावी लागते. चौकालगत असलेल्या टाक्यांवर पाणी भरण्यासाठी आलेले टँकर रस्त्यात उभे असतात. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर चौकालगतच्या दुभाजकांवर कायम कचरा टाकला जात असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असते.

सिडकोच्या आरखड्यानुसार या भागातील रस्ते, चौक सुंदर व अतिक्रमणमुक्त होते. चिश्चिया कॉलनीतील चौक हा या भागातील महत्त्वाचा चौक. सिडको, जालना रोड, जळगाव रोड आणि जुने औरंगाबाद शहर या भागांतून येणाऱ्या रस्त्यांचा संगम चिश्चिया चौकात होतो. सिडको-हडकोला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन टाक्यात, पोलिस चौकी अाणि कॅनॉट आदी या चौकाच्या परिसरात आहे. भगवान होमिओपॅथी कॉलेज, एमजीएम परिसरही या चौकापासून हाकेच्या आंतरावर आहे. अशा या महत्त्वाच्या चौकाला हातगाड्यांच्या अतिक्रमणाचा विळखा आहे. त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था नाही. पादचाऱ्यांसाठी फूटपाथचा पत्ताच रस्त्यावर नाही. अर्ध्या रस्त्यापर्यंत चारचाकी, दुचाकी वाहने उभी केली जातात. त्याचबरोबर पाण्याचे टँकर रस्त्यावर उभे असतात. यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कायम कोंडी होते. अनेक वेळा किरकोळ अपघात होतात. विशेष म्हणजे याच चौकात पोलिस चौकी आहे. तरीही वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागत नाही. जीर्ण झालेले दुभाजक, त्यातील अस्ताव्यस्त वाढलेली झाडे अन् अस्वच्छता त्यामुळे चौक बकाल झाला आहे.

चौकातील रस्ते हे सिमेंटचे करण्यात आले आहेत. त्यासाठी तब्बल सहा कोटी रुपये खर्च केले गेले, परंतु अर्धे रस्ते पार्किंगने, अतिक्रमणांनी व्यापलेले असतात. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही काहीच उपयोग झालेला नाही. त्याचबरोबर साडेसहा लाख रुपये खर्च करून हायमास्ट बसविण्यात आले, परंतु तेही सुरू झालेले नाहीत. नियमितपणे चौकाच्या सुशोभिकरणाकडे लक्ष दिले जात होते. सिडकोचे महापालिकेकडे हस्तांतर केल्यानंतर चौकाची दुरवस्था झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादमध्ये पर्यटकांचे हाल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऐतिहासिक औरंगाबाद जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी राज्य सरकार 'पर्यटन जिल्हा' संकल्पना राबवित आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला महिना उलटला तरी पर्यटकांचे हाल संपलेले नाहीत. शहरात मुख्य रस्त्यांवर दिशादर्शक फलक नसल्यामुळे दररोज हजारो पर्यटकांची गैरसोय होते. राज्याच्या पर्यटननगरीत वाट चुकलेल्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.

दोन प्राचीन वारसास्थळ आणि इतर ऐतिहासिक वास्तूंसाठी औरंगाबाद जिल्हा देशभर परिचित आहे. राज्याच्या पर्यटन राजधानीचा दर्जा शहराला सहा वर्षांपूर्वी मिळाला. सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर औरंगाबाद जिल्ह्याला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा राज्य सरकारने दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटन जिल्ह्याची घोषणा करुन महिना उलटला आहे. याबाबत शासकीय अध्यादेशही जारी झाला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि महापालिका प्रशासनाला फारसे अप्रूप वाटले नाही. कारण रोजगार निर्मितीला प्राधान्य देणाऱ्या पर्यटन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न थांबले आहेत.

जिल्ह्यात वेरूळ-अजिंठा लेणी आणि बीबी का मकबरा या पर्यटनस्थळांना सर्वाधिक पर्यटक भेट देतात. एप्रिल महिन्यात ९३ हजार पर्यटकांनी मकबरा पाहिला. देश-विदेशातील पर्यटकांची वर्दळ असली तरी गैरसोय कायम संपलेली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल्समध्ये पर्यटकांचा मुक्काम असतो. या ठिकाणापासून मकबरा पर्यटनस्थळांपर्यंत एकाही ठिकाणी दिशादर्शक फलक नाही. विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड आदी मुख्य ठिकाणी बीबी का मकबरा या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाबाबत कोणतीही माहिती नाही. परिणामी, हजारो पर्यटकांचा रस्ता चुकतो. खासगी वाहनाने आलेले पर्यटक मिलकॉर्नर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ हमखास रस्त्याची चौकशी करताना दिसतात.

अनेकदा बायजीपुरा रस्त्याने सरळ गेलेले पर्यटक भलत्याच चौकात जाऊन पोहचतात. जगप्रसिद्ध पर्यटनस्थळाची ही अवस्था पर्यटकांना घामाघूम करणारी ठरली आहे. शिवाय पाणचक्की, सोनेरी महल, ऐतिहासिक दरवाजे, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय येथे पोहचतानाही पर्यटक नाकीनऊ येत आहेत. जिल्हा प्रशासन किंवा महापालिका प्रशासनाने मुख्य चौकात आणि रस्त्यांवर इंग्रजी व स्थानिक भाषेत दिशादर्शक फलक लावल्यास पर्यटकांची अडचण दूर होईल. सध्या पर्यटन जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी असूनही सोयीसुविधांची प्रचंड वानवा आहे.

मुजोरी

औरंगाबाद लेणी आणि बीबी का मकबरा या दोन पर्यटनस्थळी जाण्यासाठी पर्यटकांची सर्वाधिक लूट सुरू आहे. रिक्षाचालक मनमानी भाडे वसूल करीत आहेत. मकबरा ते औरंगाबाद लेणीसाठी २५० रुपये आकारले जात आहे. स्वतःचे वाहन आणलेल्या पर्यटकांनाही दिशादर्शक फलक नसल्यामुळे हेलपाटे मारावे लागत आहेत. सध्या या वैतागाने पर्यटकांची संख्या घटण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी बांधला बंधारा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल कुंभारे यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील तीन गावांत पोलिस टंचाई निवारणाची कामे करणार आहेत. त्यापैकी खंडाळा येथील बोर नदीवर श्रमदान करून वनराई बंधारा बांधला आहे.

वैजापूर पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात पोलिस अधीक्षक कुंभारे यांनी पाणीटंचाई निवारणासाठी दोन गावे दत्तक घेण्याचे सूतोवाच केले होते. दत्तक घेतलेल्या गावात पोलिसांतर्फे श्रमदान करून पाणी साठवण क्षमता वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांतर्फे खंडाळा येथे जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'तूर्त एका गावाची निवड केली असून, शिऊर व वीरगाव पोलिस ठाण्यांतर्गत दोन गावे दत्तक घेणार आहोत. शेतकऱ्यांशी संपर्क करून साइट निवड, जलस्त्रोत बळकट करणे व वनराई बंधारे बांधणे ही कामे केली जाणार आहेत,' अशी माहिती पंडित नवसरे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

खंडाळा येथील बोर नदीवर बुधवारी (२८ एप्रिल) वनराई बंधारा बांधण्यासाठी औरंगाबाद ग्रामीणचे ५० पोलिस कर्मचारी, वैजापूर, वीरगाव व शिऊर ठाण्यातील पोलिसांनी श्रमदान केले. या उपक्रमात पोलिस नाईक रवींद्र काळे, संतोष राठोड, अविनाश भास्कर, इरफान पठाण, हरीश पालेजा, जयेश पालेजा आदींनी सहभाग घेतला. 'शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात गावकऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा,' असे आवाहन यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नवसारे यांनी केले.

उपविभागीय पोलिस अधिकारी पंडित नवसरे, गंगापूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी जयश्री देसाई, पोलिस निरीक्षक बापुसाहेब महाजन, शिऊरचे पोलिस निरीक्षक श्रीराम चौधरी, एपीआय बी. एन. रयुतवार, स्वच्छता अभियानाचे मार्गदर्शक धोंडिरामसिंह राजपूत, सरपंच संजय जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधाऱ्याचे काम करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images