Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कोट्यवधी लिटर पाणी नाल्यात

$
0
0

जालना रोडवरील अनेक कॉलन्यातून दोन किलोमीटरपर्यंत शुद्ध पाण्याचा लोंढा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल दोन दिवसांपासून म्हणजेच शनिवारी (९ मे) रात्रीपासून ते सोमवारी (११ मे) रात्रीपर्यंत म्हणजेच वृत्त लिहिण्याच्या वेळेपर्यंत कोट्यवधी लिटर पाण्याची नासाडी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जालना रोडवरील कंडी टॉवरपासून ते श्रीनिकेतन कॉलनी, बंजारा कॉलनी, गांधीनगर मार्गे दोन किलोमीटरचा वळसा घालून चक्क नाल्यामध्ये हे शुद्ध पाणी मिसळत असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. मागच्या दोन महिन्यांत किमान चार ते पाच वेळा याच पद्धतीने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याची तुळतुळ व संताप परिसरातील नागरिकांनी 'मटा'कडे व्यक्त केला.

श्रीनिकेतन कॉलनीतील रहिवासी प्रशांत नागर यांनी या प्रतिनिधीला मोबाइलवरून कळविले आणि स्वतःच्या डोळ्याने पाण्याची नासाडी पाहण्याची वेळ आली. कंडी टॉवरसमोर (औरंगाबाद पान सेंटर) मोठी पाइपलाइन शनिवारी रात्री फुटली आणि काही क्षणातच प्रचंड प्रमाणातील पाणी संपूर्ण जालना रस्त्यावरून वाहण्यास सुरुवात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तिथून वाहणारे पाणी अमरप्रीत हॉटेलजवळून थेट श्रीनिकेतन कॉलनीत घुसले आणि संपूर्ण उतारावरून बंजारा कॉलनी, गांधीनगर मार्गे नाल्यात जात आहे. शनिवारी रात्रीपासून वाहणारे पाणी सोमवारी रात्री आठच्या सुमारासदेखील वाहत असल्याचे सांगण्यात आले. या दोन दिवसांत अधून-मधून काही तास पाणी वाहणे बंद होते, पण पुन्हा पाणी वाहणे सुरू झाल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे शनिवारी प्रचंड दाबाने पाणी वाहात होते आणि तळमजल्यावरील दुकानांमध्ये पाणी शिरते की काय, अशी भीती निर्माण झाली होती. एकीकडे शहरातील असंख्य नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नसताना, असंख्य शहरवासियांना पाण्यासाठी कसरत करावी लागत असताना, चांगल्या पाण्याची नासाडी बघवत नसल्याची भावनाही नागरिकांनी व्यक्त केली. असे प्रकार झाल्यानंतर वाहतूक बंद करण्यात येते आणि त्याचा व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रारही अनेकांनी बोलून दाखविली.

मागच्या दोन महिन्यांत किमान चार ते पाच वेळा हा प्रकार झाला आणि संबंधितांना तक्रारी करूनही पाण्याची नासाडी काही केल्या थांबत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. आम्हाला अर्धा-पाऊण तास पाणी येते, पण आमच्या समोरून लाखो लिटर पाणी चक्क वाया जात असल्याचे दुःख होते.
- प्रशांत नागर, रहिवासी

तब्बल दोन दिवसांपासून दोन किलोमीटरपर्यंत दिवस-रात्र ही पाण्याची गंगा वाहत आहे. जालना रोडवरून ५० ते ६० टन वजनाची वाहने जातात. त्यामुळे पाइपलाइन अजून खालून पाहिजे आणि मुख्य म्हणजे निकृष्ठ दर्जाच्या पाइनलाइनमुळेच वारंवार पाइपलाइन फुटण्याचे प्रकार घडत आहेत.
- यादव पटेल, रहिवासी

जालना रोडवरून शनिवारी रात्री नदीसारखे पाणी प्रचंड दाबाने वाहात होते. हे पाणी दुकानांमध्ये शिरते की काय, अशी भीती आम्हाला वाटत होती. तसे झाले असते तर भयंकर नुकसान झाले असते. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे आमच्या व्यवसायावरही प्रतिकुल परिणाम होत आहे.
- अब्दुल सत्तार, रहिवासी

पाण्याच्या नासाडीबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणालाही काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. आम्हाला मात्र, आमच्या डोळ्यांनी पिण्याच्या पाण्याची नासाडी बघावी लागते. सध्या औरंगाबादमध्ये पाण्याची प्रचंड कमतरता आहे. अशा परिस्थ‌ितीतही पाण्याची नासाडी सुरू आहे.
- गिरीश पटेल, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...आम्ही फक्त सेवा करतो!

$
0
0

धनंजय कुलकर्णी

सामाजिक कार्यकर्ते किशोर शितोळे यांनी 'जलदूत' संस्थेची स्थापना केली अन् अतिशय नियोजनबद्धपणे शहरी, ग्रामीण भागात काम सुरू केले. लोकसहभागातून बंधारे, वृक्षलागवड या क्षेत्रात त्यांचे कार्य अविरतपणे सुरू आहे. पर्यावरणतज्ज्ञ डॉ. क्षमा खोब्रागडे, विजय हुलसुलवार, राजश्री तांबे-घारे, ज्योती शितोळे, पद्माताई नवपुते, शेषराव ढेपे, फैय्याजभाई, डॉ. रामभाऊ गाडेकर यांच्या साथीने जलदूतचे काम जिल्हाभर पसरले आहे. या कामाची ओळख आजच्या सहयोगमध्ये.

मराठवाड्यात २०१२ मध्ये भीषण दुष्काळ पडला. पोटच्या पोरांसारखे सांभाळलेले, हाता-तोंडाशी आलेले पीक डोळ्यांदेखत जळून गेले. गाव-खेड्यातला तरुणवर्ग पारावर रिकाम्या हातावर हात ठेवून बसून होता. 'जलदूत'ने हे पाहिले आणि या गावकऱ्यांना एकत्र केले. 'जलदूत'कडे कसलेही आर्थिक पाठबळ नव्हते, पण होती दुर्दम्य इच्छा. शेतकरी बांधवांसोबत उभे राहण्याची. या विचारातून पैठण तालुक्यातील येळगंगा नदी... नदी कसली ३० फुटाचा नाला उरला होता. गाळाने तळ प्लास्टिकसारखा झाला होता. या नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा ध्यास 'जलदूत'ने घेतला. नांदलगाव, ताहेरपूर, कौडगाव आणि धूपखेडा या चार गावातून पैठणच्या नाथसागराला मिळणाऱ्या ६ किलोमीटरच्या येलगंगेवर काम करायचे ठरले. गावकऱ्यांना एकत्र बसवले, योजना सांगितली. तुम्ही होऊ शकता तुमच्या जीवनाचे शिल्पकार या उक्तीनुसार, गाववर्गणी करायला लावली. प्रत्येक घराघरांतून यथाशक्ती वर्गणी मिळाली. अगदी गावच्या भंडाऱ्यासाठी जमा असलेली रक्कम गावकऱ्यांनी या कार्याला दिली. बघता बघता २ लाख उभे राहिले. जलदूतचे अध्यक्ष किशोर शितोळे स्वतः सिव्हिल इंजिनीअर. सोबत इंजिनीअर अरुण घाटे, उद्योगपती पुरुषोत्तमजी हेडा अशी मोठी मंडळी होती. बघता-बघता योजनाबध्द आराखडा तयार झाला. गावातील लहान-थोर माताभगिनी, प्रत्येकाने श्रमदान केले. काम करताना एक तत्व ठरले, या कार्यात राजकारण आणयचे नाही. कोणी कोणत्याही पक्षात राहा, पण येथे ग्रामस्थ म्हणून या आणि विकास गंगेत सामील व्हा. बघता-बघता २१ दिवसांत, चार लाखांत, चार बंधारे बांधण्याचा विक्रम या एकजुटीने केला. पहिल्या पावसांत बंधारे भरले. गावातील दुष्काळ संपला. पाण्याची व्यवस्था झाली. हे कार्य बघून आसपासच्या ७ गावांमध्ये किशोर शितोळे, डॉ. क्षमा खोब्रागडे यांनी व्याख्याने, स्लाइड-शोद्वारे प्रबोधनाचे काम सुरू केले. जिल्हाधिकारी विक्रमकुमार या गावांच्या पाठीशी उभे राहिले. मागील ५ वर्षांपासून जलदूतने जून महिन्यांत सहकुटुंब वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. वर्गणीकरून ट्री गार्ड विकत आणायचे, घरटी दोन ट्री गार्ड व साधारण २०० ते ३०० वेगवेगळे वृक्ष आणून त्यांचे वापट करायचे. एका कुटुंबाने फक्त दोनच झाडे जगवावीत, हा मंत्र देवून दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला जातो.

बीड बायपास भागात पाण्याची कमतरता आहे. जलदूतने हॉटेल व्यवसायिकांकडून बिसलरीच्या रिकाम्या ५०० बाटल्या आणल्या. त्यांची खालची बाजू कापली. बाटली उलटी करून उंचीमध्ये दोन छिद्र पाडली. कॉलनीतील रहिवाशांना रविवारी भल्या पहाटे सहकुटुंब मुलांसोबत एकत्र केले. अन् परिसरातील झाडाच्या बाजूला खड्डे करून या बाटल्या त्यात उलट्या रोवल्या. नंतर बाटल्यात पाणी टाकले. त्या दोन छिद्रातून थेंब थेंब सलाइनप्रमाणे पाणी आता झाडांना मिळत आहे. 'जलदूत' ने शेतकऱ्यांच्या मुलांची अफाट बौध्दीक क्षमता हेरली, पण त्यांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक पथ नाही. हे पाहून ते एमआयटी इंजिनीअरिंगचे सचिव मुनीष शर्मांना भेटले. या खेड्यांतील कामांची माहिती दिली. त्यांनी त्वरित प्राचार्य संतोष भोसले यांना एक गाव दत्तक घेण्यास सुचविले. त्यातअंतर्गत गावातल्या पारावर, झाडाखाली बसून ४ थीच्या विद्यार्थ्यांपासून फेट्यावाल्या आजोबांपर्यंत सर्वांना आकाश टॅब चे प्रात्यक्षिक शिकविण्यात आले. या कार्यात दर रविवारी ४ विद्यार्थी नियमित स्वखर्चाने जात. २ तास कम्प्युटर शिकवत. हे काम पाहून संस्थाचालक मुनिष शर्मा यांनी या गावाला पाच संगणक कायमचे भेट दिले. जलदूतच्या ज्योती शितोळे, राजश्री तांबे यांनी शहरातील महिला डॉक्टरांना हे एकत्र केले. त्यांना गावातील महिलांच्या आरोग्य विषयक समस्या सांगितल्या. त्यानंतर महिलांच्या आरोग्या गप्पा-गोष्टी हा कार्यक्रम अनेक आठवडे राबविला.

डीएमआयसीमध्ये अनेकांच्या जमिनी गेल्या. त्याचा निधीही शेतकऱ्यांना मिळाला, पण या निधीचा विनियोग कसा करावा? याचे मार्गदर्शनही जलदूतने केले.

पांढरपेशी समाज निवडणुकांच्यावेळी सुटी उपभोगतो, मतदानाला बाहेर पडत नाही. यात बदल घडविण्यासाठी जलदूतने कंबर कसली. विशेषपत्रक व संपर्काद्वारे आपले मतदान करणे किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाने मतदान करा, चांगला उमेदवार निवडून द्या, असे आवाहन केले. ही सगळी कामे शासनाची मदन न घेता, लोकसहभागातून जलदूतने केली. लोकांना जोपर्यंत हे काम आपले वाटत नाही, तो पर्यंत ते सामाजिक काम उभे राहात नाही.

जलदूतचे कार्यकर्ते अत्यंत नम्रपणे सांगतात, 'आम्ही समाजावर कोणतेही उपकार करीत नाही. आम्ही कोणालाही मदत करीत नाही, तर आम्ही फक्त सेवा करतो. अन् ती करत राहणार,' अशा या सामाजिक कार्याबद्दल जलदूतला महाराष्ट्र शासनासह अनेक सस्थांनी वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजी विक्रेत्यांवर कारवाई

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुंडलिकनगर रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांवर पोलिस प्रशासन आणि महापालिकेतर्फे कारवाई केली जात आहे. सोमवारीही या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या सर्वांना त्रिमुर्तीचौकात बांधलेल्या भाजी मंडईत स्थलांतरीत केले जाणार आहे.

गजानन महाराज मंदिर चौक ते पुंडलिकनगर रस्त्यावरील तिरुमला मंगल कार्यालय या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्रेते बसतात. त्यांनी संपूर्ण रस्ता गिळंकृत केला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन गेल्या आठ दिवसांपासून भाजी विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना हटवले जात आहे. गजानन महाराज मंदिर चौक ते जयभवानीनगर चौकापर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला रहावा, असा प्रयत्न पोलिस आणि महापालिकेचे प्रशासन यांच्यातर्फे केला जात आहे. आज सायंकाळी भाजी विक्रेत्यांना पूर्णपणे हटवण्यात आले. या संदर्भात माहिती देताना पालिकेचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली म्हणाले, 'त्या रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी बसू नये यासाठी कारवाई केली जात आहे.

भाजीविक्रेत्यांच्या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. त्रिमुर्तीचौक, चैतन्य हाऊसिंग सोसायटी आणि एसबीएच कॉलनी येथे पर्यायी जागा उपलब्ध आहे. या जागांचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.
- रेणुकादास (राजु) वैद्य, नगरसेवक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्तीचे काम; वाहतूक जाम

$
0
0

लक्ष्मणचावडी ते तारभवन वाहनांच्या रांगा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लक्ष्मणचावडी चौकात सोमवारी (११ मे) शहरवासियांना वाहतुकीच्या प्रचंड कोंडीला सामोरे जावे लागले. चौकातून तारभवनपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. मोंढानाका उड्डाणपुलाखाली एका बाजूला पाइपलाइन दुरुस्ती, तर दुसऱ्या बाजूला रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ही कोंडी झाली.

जालना रोडसाठी मोंढानाका चौक महत्त्वाचा. उडडाणपुलाच्या कामामुळे येथे उडडाणपुलाच्या खालच्या बाजूला असलेला रस्ता बंद करण्यात आला होता. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने रहदारी सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, सोमवारी सकाळी आकाशवाणी ते मोंढानाका चौकातून वाहतूक पुलाखालून लक्ष्मण चावडीकडे वळविण्यात आली. मोंढानाका ते हॉटेल राजसमोरील चौकापर्यंतच्या सर्व्हिस रोडचे काम एमएसआरडीसीने सुरू केले आहे. त्यामुळे चौकावरील वाहतूक थांबविली आहे. याशिवाय उड्डाणपुलाजवळच्या औरंगाबाद पानसेंटर समोरून जाणाऱ्या रस्तावर पाण्याची पाइपलाइन फुटली आहे. ही पाइपलाइन दुरुस्त करण्यासाठी हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे क्रांतिचौकाकडून येणाऱ्या वाहनांना रोकडिया हनुमान कॉलनीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून लक्ष्मण चावडीच्या मार्गावरून जावे लागत आहे. त्यामुळे तारभवनाच्या चौकात वाहतुकीची कोंडी झाली.

मोंढानाका उड्डापुलाखालचा रस्ता सुरू केल्याने आकाशवाणी चौकातून क्रांतिचौकाकडे जाणाऱ्या वाहनांना मोंढानाका उड्डाणपूलाखालून लक्ष्मण चावडीच्या चौकातून वळण घेऊन सिल्लेखाना मार्गाकडे जावे लागते. लक्ष्मण चावडीच्या चौकात मोंढ्याकडून येणारी वाहने, कैलासनगर भागातून येणारी वाहने तसेच तारभवन चौकातून येणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होत आहे.


अचानक रस्ता वळविला

मोंढानाका उड्डाणपुलाच्या नम्रता स्वीट समोरील रस्ता बंद करून अचानक मोंढानाका उड्डाणपुलाखालून मार्ग वळविल्याने सर्वसामान्यांना एकतर बालाजीनगर भागातून किंवा लक्ष्मण चावडीतून वाहने न्यावी लागली. त्यामुळे चौकात फक्त वाहनांच्या रांगाच रांगा होत्या. दरम्यान सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी काही दिवस लागतील. यासाठी मंगळवारी सर्व्हिस रोड पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त वाहतुकीला चाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ऐतिहासिक, औद्योगिक औरंगाबादमध्ये वाहतूक, ट्रॅफिकचे प्रश्न गंभीर आहेत. औरंगाबाद शहर हद्दीत वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणे यावर विशेष लक्ष दिले जाईल. जड वाहनांना शहरात प्रवेश देताना काही निकष लावले जातील. काळीपिवळी जीपसाठी धोरण आखले आहे. अवैध रिक्षांच्या बाबतीतही धडक मोहीम हाती घेतली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जालना रस्त्यावरील अतिक्रमणे, पार्किंग पुढच्या पंधरवड्यात हटवली जातील. औरंगाबादमधील वाहतुकीला शिस्त लावण्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल,' असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

अमितेश कुमार यांनी सोमवारी 'महाराष्ट्र टाइम्स' कार्यालयास भेट दिली. शहराची कायदा सुव्यवस्था, ट्रॅफिक समस्या, अतिक्रमणांनी वेढलेले चौक, रस्त्यावर मांडलेले व्यवसाय, काळी-पिवळी टॅक्सी व सहा आसनी रिक्षांना शहरहद्दीत येण्याबाबत काही निर्बंध घालणे, शहरातून जड वाहतुकीला मनाई करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर त्यांनी सविस्तर चर्चा केली. शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असल्याची कबुली पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. शहरातील मुख्य जालना रोडवर तीन उड्डाणपुलांचे काम चालू असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. यासह अन्य भागातही कमी अधिक प्रमाणात ही समस्या भेडसावत आहे. त्यात प्रामुख्याने शहर हद्दीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी टॅक्सी आणि सहा आसनी रिक्षांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अशा वाहनांना शहराच्या हद्दीत सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत मज्जाव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या वाहनांना जळगाव रोडवरील हर्सूल, जालना रोडवरील चिकलठाणा, अहमदनगर, नाशिक रोडवर नगरनाका तसेच पैठण रोडवर महानुभाव आश्रम चौकात थांबे देण्यात आलेले आहेत. मात्र, मराठवाडा टॅक्सी, जीप ओनर्स असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी यात काही दिलासा मिळावा, अशी मागणी केल्याने थांब्याबाबत थोडाफार बदलही होऊ शकतो.


शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावली जाईल. अवैध रिक्षांच्या बाबतीतही धडक मोहीम हाती घेतली आहे. नियम तोडणाऱ्या रिक्षाचालकांकडून जबर दंड आकारण्यात येईल. जालना रस्त्यावरील अतिक्रमणे, पार्किंग पुढच्या पंधरवड्यात हटवली जातील.

- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

अतिक्रमणधारकांसाठी एज्युकेशनल प्रोगाम

औरंगाबादः जालना रोड हा शहरातील महत्त्वाचा रस्ता मानला जातो. जालना रोडवर मोंढा नाका व सिडको येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रचंड ताण वाहनधारकांवर पडत आहे. महत्त्वाचे म्हणजे या रोडच्या दोन्ही बाजूला फेरीवाल्यांचे, दुकानचालकांचे दुकानपुढील अतिक्रमण हा कळीचा मुद्दा आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार घेतल्यानंतर जालनारोडची पाहणी केली. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड असणे आवश्यक आहे. हे सर्व्हिस रोड तयार केले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या रोडच्या डांबरीकरणाचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. वाहतुकीच्या बाबतीत अमरप्रीत चौ‌‌क, मोंढा नाका असे काही बेशिस्त पॉइंटही निदर्शनास आले. येथील फेरीवाले व अतिक्रमण करणाऱ्या दुकानचालकांसाठी त्यांनी विशेष एज्युकेशनल प्रोगाम राबवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी नवीन सात पोलिस उपनिरीक्षकाची पथके त्यांनी तयार केली आहेत. प्रत्येकी दोन किलोमीटर प्रमाणे तीन सेक्टर त्यांनी तयार केले आहेत. या दोन किलोमीटरमध्ये ही पथके पायी फिरून फेरीवाले, दुकानदार यांना सांगत आहेत. दहा दिवसांत त्यांनी अतिक्रमण हटवले नाही, तर त्यांच्यावर जप्तीच्या कारवाईचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.


जड वाहनांना बंदी

वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून येत्या मंगळवारपासून शहरातून जड वाहतुकीला मनाई केली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. जालना रस्त्यावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यात जड वाहनांमुळे त्यात भर पडते, असे दिसून आले आहे. सर्व सामान्य वाहनधारकांची होणारी गैरसोय लक्षात घेता शहरातून जड वाहनांना मनाई केल्याचे त्यांनी सांगितले. एस.टी बस, शासकीय -निमशासकीय वाहने व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहनांना यातून वगळले आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेससाठीचे थांबे लवकरच निश्चित करू, असेही त्यांनी सांगितले. या आदेशाची अंमलबजावणी १२ मेच्या मध्यरात्रीपासून प्रायोगिक तत्वावर होणार आहे.


जड वाहनांसाठी असा राहणार मार्ग

पुणे-नगरकडून येणारी जड वाहने पैठण लिंकरोड, महानुभाव चौक, बीडबायपास मार्गे जातील.

वैजापूर-धुळेकडून येणारी जडवाहने नगरनाका, वाळूज रस्ता, पैठण लिंकरोड, महानुभाव चौक मार्गे जातील.

जालनाकडून येणारी व पुणे, नगर, वैजापूर, धुळेकडे जाणारी जड वाहने केंब्रीज हायस्कूलसमोरून बीडबायपास, पैठण लिंकरोड मार्गे जातील.

जालनाकडून येणारी व जळगावकडे जाणारी जड वाहने केंब्रीज हायस्कूलसमोरून सावंगी या नवीन बायपास मार्गे जातील.

जळगाव रोडकडून येणारी जड वाहने सावंगी बायपास रोडने केंब्रीज हायस्कूलसमोरील जालना रोड व बीडबायपास मार्गे पुढे जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीमध्ये २५ नवे डॉक्टर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आणि शासकीय विभागीय कॅन्सर हॉस्पिटलसाठी २५ सहाय्यक प्राध्यापकांची (लेक्चरर) निवड झाली आहे. विशेष म्हणजे दीर्घ प्रतिक्षेनंतर एकाच वेळी मोठ्या संख्येने सहाय्यक प्राध्यापकांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ अाहे. यापैकी काही डॉक्टर सेवेत रुजू झाले आहेत.

घाटी, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अनेक विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा असल्यामुळे रुग्णसेवाला फटका बसत होता. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मेडिसिन विभागामध्ये विभागप्रमुख डॉ. मुळे यांच्याशिवाय एकही सहाय्यक प्राध्यापक किंवा सहयोगी प्राध्यापकही नव्हता. त्यामुळेच अनेक रुग्णांना घाटीच्या मेडिसिन विभागामध्ये दाखल करावे लागत होते. या विषयी दोन आठवड्यांपूर्वी 'मटा'च्या वृत्तामधून लक्ष वेधण्यात आले होते. आता मेडिसिन विभागासाठी दोन लेक्चरर मिळणार आहेत. यामध्ये घाटीतील औषधवैद्यकशास्त्र, बालरोगशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, न्यायवैद्यकसास्त्र, स्त्रीरोगशास्त्र विभागासाठी १८ आणि कॅन्सर हॉस्पिटलसाठी ७ सहाय्यक प्राध्यापक मिळणार आहेत.


एमपीएसस्सीद्वारे लेक्चरर पदावर एकाचवेळी मोठ्या संख्येने निवड होत आहे. यामुळे रुग्णसेवा बळकट होण्यास मदतच होईल. नर्सिंगसह इतर कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती लवकरच होणार आहे.
- डॉ. छाया दिवाण,अधिष्ठाता, घाटी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना रोड घेणार मोकळा श्वास

$
0
0

‌शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा नवे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा संकल्प

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील सर्वात महत्त्वाचा असलेला जालना रस्ता अतिक्रमण, अवैध पार्किंगमुळे कोंडला आहे. पुढच्या काही दिवसांत तेथील अतिक्रमणे प्राधान्याने हटवून, हा रस्ता केवळ वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. बेशिस्त पार्किंगवर कारवाई केली जाईल. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यावर पहिल्या टप्प्यात भर दिला जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

अमितेश कुमार यांनी सोमवारी 'महाराष्ट्र टाइम्स' कार्यालयास भेट दिली. संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था, ट्रॅफिक समस्या, अवैध रिक्षांवर आळा घालण्यासाठी सुरु केलेल्या उपाययोजना, जड वाहतूक; तसेच मोठ्या वाहनांना शहरात प्रवेशासाठी केलेले प्लॅनिंग या विषयांवर सविस्तर चर्चा केली. पोलिस आयुक्त म्हणाले,'शहरातील सर्वात महत्त्वाचा रस्ता जालना रोड आहे. ठिकठिकाणी अवैध पार्किंग, अतिक्रमणे, फेरीवाले, रिक्षांचे थांबे यांमुळे रस्त्याचा श्वास कोंडला आहे. महापालिका, एमएसआरडीसी आणि संबंधित यंत्रणांची एक बैठक मी घेतली. जालना रस्त्यावरील ट्रॅफिक समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आहे. त्यानुसार लकडी पूल ते एपीआय कॉर्नर या रस्त्याचे तीन टप्पे आम्ही केले. प्रत्येक टप्प्यासाठई एक ट्रॅफिक पीएसआयची नियुक्ती केली. हे अधिकारी आणि कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या भागातील अतिक्रमणे, फेरीवाले, दुकानदार, व्यावसायिक यांना भेटून प्रबोधन करतील. पुढच्या दहा दिवसांत रस्त्यावरील अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत, यासाठी आग्रह धरणार आहोत. दहा दिवसांनंतर मात्र कारवाई सुरू केली जाईल. तीन उड्डाणपुलांच्या कामामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जॅमची समस्या आहे. ती सुटण्यास मदत होईल. अवैध रिक्षांच्या बाबतीतही ठोस धोरण ठरविले आहे. विनापरवाना रिक्षांची जप्ती मोहीम सुरू केली आहे. नियमबाह्य चालणाऱ्या रिक्षांवर थातुरमातुर कारवाई न करता मोठी कारवाई केली जाईल. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढच्या महिनाभरात आवश्यक ती पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्या कर्जाचेच पुनर्गठन

$
0
0

पीक कर्ज वेळेत देण्याच्या महसूलमंत्र्यांच्या सूचना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

युती सरकारच्या कार्यकाळात वितरित केलेल्या शेती कर्जाचेच पुनर्गठन करण्यात येणार आहे. मागच्या सरकारचे मला माहिती नाही. आताचे काय ते बोला, असे सांगून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गेल्या वर्षभरात दिलेल्या कर्जाचेच पुनर्गठन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी खरीप हंगान नियोजनाचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विभागात गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्जच्या पुनर्गठनासंदर्भात खडसे यांना विचारले असता, केवळ याच वर्षातील कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार असल्याचे सांगितले. कर्जाचे पुनर्गठन करताना त्यावरील व्याजदर १२ऐवजी ६ टक्के कायम ठेवण्यात येणार आहे, शेतकऱ्यांना कर्ज हे ५ वर्षे वापरता येणार आहे. यासंदर्भात शासन नाबार्ड आणि इतर राष्ट्रीयकृत बँकांसोबत पत्रव्यवहार करत अाहे. त्यांच्याकडून परवानगी न मिळाल्यास ६ टक्के व्याज हा शासनाच्या तिजोरीतून भरले जाईल, असेही महसूलमंत्र्यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे पीककर्ज भरले नाही. याविषयी खडसे यांनी, काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकाळातील मला काही माहिती नाही, असे सांगत, या वर्षीपासून शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ होणार असल्याचे स्पष्ट केले. गेल्या दोन-तीन वर्षांतील अवर्षण, अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आहे. गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तेथील शेतकऱ्यांच्या कर्जाचे ३ वर्षांएवजी ५ वर्षांसाठी पुनर्गठन करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्टरलाइटच्या मॅनेजरला अटक

$
0
0

खाम नदीत रसायन सोडल्याचे प्रकरण; तब्बल नऊ तास चौकशी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूज एमआयडीसी परिसरातल स्टरलाइट कंपनीचा सप्लाय चेन मॅनेजर अमित रत्नपारखी याला गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. खाम नदीत विषारी रसायन सोडल्याप्रकरणी गुन्हा वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल आहे. या कटात रत्नपारखी याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

२८ फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे खाम नदीत विषारी रसायन सोडणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली होती. यामध्ये मनसेचा शहराध्यक्ष सुम‌ित खांबेकर, नगरसेवक आगाखान, तुषार पाखरे, अस्लम शेख, चंदन नागेंद्रसिंह यांचा समावेश होता. चौकशीमध्ये हे घातक रसायन स्टरलाइट कंपनीचे असल्याचे सिद्ध झाले होते. नुकताच हा तपास वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. सोमवारी गुन्हे शाखेने स्टरलाइटचे प्लांट हेड अनिल भदोरिया व सप्लाय च‌ेन मॅनेजर अमित रत्नपारखी याना चौकशीसाठी बोलाविले होते. सकाळी अकरापासून यांची चौकशी सुरू होती. नऊ तासांच्या चौकशीनंतर रत्नपारखी याचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर रात्री नऊ वाजता रत्नपारखी याला अटक करण्यात आली. ही चौकशी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी केली.

बंद कंपनीला दिले कंत्राट

आरोपी रत्नपारखी याचा सुरुवातीपासून या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. ठाणे येथील बालाजी केमिकल्स या बंद पडलेल्या कंपनीसोबत त्याने रसायनाची विल्हेवाट लावण्याचा करारनामा केला होता; तसेच या गुन्ह्यातील मुख्य कंत्राटदार आरोपी पसार आहेत. या आरोपींच्या संपर्कात रत्नपारखी असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. या गुन्ह्यात आणखी दोन कलमे वाढविण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यानी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हाइट टॉपिंगचे काम संकटात

$
0
0

बिल न दिल्यामुळे कंत्राटदाराने कामे थांबविली

उन्मेष देशपांडे, औरंगाबाद

वेळेवर पेमेंट न मिळाल्याचे कारण पुढे करून कंत्राटदाराने व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यांची कामे बंद केली आहेत. अर्धवट कामांमुळे रस्ते आणि चौक धोकादायक बनले आहेत. महापालिकेच्या धोरणामुळे औरंगाबादकरांच्या नशिबातील 'खडतर प्रवास' संपण्याचे चित्र नाही.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे रस्त्यांच्या कामाला पैसा कमी पडणार नाही, असे सांगितले जात होते. पहिल्या टप्प्यात १० आणि दुसऱ्या टप्प्यात ५ रस्त्यांचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी पुणे येथील कंत्राटदार जे. पी. शहा यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कंत्राटदाराला प्रशासनाने

करारनुसार वेळोवेळी पेमेंट केले नाही. त्यामुळे कंत्राटदाराने आता कामच बंद करून टाकले आहे. त्यांनी बहुतेक यंत्रसामग्री स्थलांतरित केली आहे. त्यामुळे व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यांची कामे संकटात सापडली आहेत.

व्हाइट टॉपिंगची कामे करण्यासाठी उखडण्यात आलेल्या रस्त्यांमुळे येणाऱ्या काळात वाहतुकीचा प्रश्न गंभीर होईल. आनंद गाडे चौक ते भाजीवाली बाई पुतळा रस्त्याचे व्हाईट टॉपिंगचे काम करण्यात आले आहे, परंतु डांबरी रस्ता आणि नवा रस्ता परस्परांना जोडण्यात नसल्याने धोकादायक. अशीच अवस्था एसएससी

बोर्डाजवळ आहे. यासंदर्भात महापालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख के. आर. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता माहिती देण्यात त्यांनी टाळाटाळ केली, मात्र व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यांची कामे बंद झाली आहेत, हे त्यांनी मान्य केले.


व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यांची सध्याची स्थिती

पूर्ण झालेले रस्तेः समर्थनगर, नूतनकॉलनी-पेन्शनपुरा, नंदनवन कॉलनी, कोकणवाडी, पीरबाजार ते एसएससी बोर्ड.

अर्धवट रस्तेः क्रांतिचौक ते पैठण गेट, सब्जीमंडई ते पैठणगेट (पूर्ण काम बाकी), सिल्लेखानाच्या चौकात प्लेव्हर ब्लॉक बसविणे रखडले. उत्सव मंगल कार्यालयासमोरील चौकाचे काम बाकी. उद्धवराव पाटील चौक ते सिद्धार्थनगरमार्गे टी. व्ही. सेंटर-जळगाव टी पॉइंट रस्त्याचे काही महिन्यांपासून बंदच. टीव्ही सेंटर चौक, भारतमातानगर, सिद्धार्थनगर हे चौक धोकादायक. सिडको बस स्टँडजवळील वसंतराव नाईक चौक ते सिडको कार्यालयासमोरून हर्सूलपर्यंत जाणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम सिडको एन ७पर्यंत झाल्यावर थांबविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आसडीतील शेतकऱ्यांचे महावितरणला निवेदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

तालुक्यातील आसडी येथील कृषी ग्राहकांना वीज जोडणी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. येथील ११ शेतकऱ्यांनी २०१४ मध्ये ए. वन. फॉर्म, कोटेशन भरले आहे. या कामाची मंजुरी सुध्दा मिळालेली आहे. महावितरणने ट्रान्सफार्मरचे खांबही उभे केले आहेत. मात्र राहिलेले काम सध्या बंद आहे. शेतकऱ्यांनी विजेसाठी उसनी, व्याजाने रक्कम घेऊन महावितरणकडे भरली आहे. सध्या शेतात पीक नसल्याने या दिवसातच काम पूर्ण होऊ शकते. त्यामुळे रखडलेले काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर फकिरबा पुंजाजी पंडित, जीजाबाई मिरगे, लक्ष्मण मिरगे, उखर्डू मिरगे, विष्णु नारायण भारती, यशवंता शंकर मिरगे, लताबाई विश्वास पालोदकर, केशरबाई जयवंता सोनवणे, रत्नाकर तुकाराम सिरसाठ, शामराव शंकर मिरगे, ज्ञानेश्वर साहेबराव मिरगे आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाख अभिलेखांचे स्कॅनिंग

$
0
0

म. टा. प्रतिनधी, फुलंब्री

राज्य शासनाच्या वतीने तहसील कार्यालयातील संपूर्ण जुने-नवे अभिलेखे संगणकात साठविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अभिलेखे स्कॅनिंग प्रक्रियेत फुलंब्री तालुका औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे तहसीलदार किशोर देशमुख यांनी सांगितले. आजपर्यंत दोन लाख ८३ हजार १३ अभिलेख्यांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे.

या अभिलेखे स्कॅनिंग प्रक्रियेला २७ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली. खासरा पाहणी, जुने-नवे सातबारे, फेरफार नक्कल आदी अभिलेखांचा समावेश आहे. सदरील अभिलेखे स्कॅन करण्याचे काम 'रिको इंडिया' या प्रायव्हेट कंपनीला देण्यात आले आहे. जुने-सातबारे, फेरनक्कल गहाळ होऊ नये, फाटू नये म्हणून स्कॅनिंग करून संगणकात साठविण्याचे काम सुरू आहे. तहसीलदार किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयातील संपूर्ण दस्तवेज नायब तहसीलदार प्रवीण पांडे, अव्वल कारकून सुनील विश्वास, संतोष राऊत, कंपनीचे अर्जून वाघ, गणेश भुमे, राहुल गायके हे काम पाहत आहेत.

तहसीलमधील संपूर्ण दस्तवेज, अभिलेखे स्कॅनिंग करून संगणकात साठविले जात आहे. अभिलेख जपून ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून ही काळजी घेतली जात आहे.

- किशोर देशमुख, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीच्या वादातून भावांमध्ये हाणामारी

$
0
0

वैजापूर : शेतीच्या वादातून दोन भावांच्या कुटुंबीयांमध्ये लोखंडी गज व काठ्यांनी जोरदार मारामारी झाली. ही घटना रविवारी (१० मे) तालुक्यातील शहाजतपूरवाडी येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील शहाजतपूरवाडी शिवारात गट क्रमांक ७४ मध्ये शिवाजी विनायकराव शेलार व गोरख विनायकराव शेलार या दोन भावांची शेतजमीन आहे. या जमीनीवरून दोघांमध्ये जुना वाद आहे. शिवाजी शेलार रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान वीज मोटारीचे स्टार्टर बसवत होते. त्यावेळी भाऊ गोरख व पुतणे तेजस व संदीप यांनी लोखंडी गज व काठीने मारहाण केली, अशी तक्रार शिवाजी शेलार यांनी दिली आहे. या तक्रारीनुसार गोरख शेलार, तेजस शेलार व संदीप शेलार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शेतात पाइपलाइन टाकल्याच्या कारणावरून शिवाजी शेलार, त्यांची पत्नी मंदाबाई व पुतण्या अनिल यांनी लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केल्याची तक्रार गोरख शेलार यांनी दिली आहे. त्यानुसार या तिघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार नारायण घुगे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुऱ्हाडीचे घाव घालून पैठणमध्ये पत्नीचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

शहरात आप्ताकडूनच एक खून व एक खुनाचा प्रयत्न झाल्याच्या घटना मंगळवारी (१२ मे) सकाळी उघडकीस आल्या. संशयाने पछाडलेल्या एका पतीने पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला आहे, तर दुसऱ्या घटनेत वडिलाने झोपलेल्या मुलाला कुऱ्हाडीने जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

शहरातील नेहरू चौक भागात राहणाऱ्या रशीद हाजी कुरेशी याने घरगुती कारणावरून मुलगा आसीफ रशीद कुरेशी (वय ३०) हा याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यावेळी आसीफ झोपेत होता. ही घटना पहाटे साडेतीनच्या दरम्यान घडली. गंभीर जखमी आसीफ यास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दुसऱ्या घटनेत नाथसागर जलाशयाच्या पायथ्याशी असलेल्या शेतात सुरेखा जालिंदर कुचे (वय ३०) यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. त्यांचा पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने पत्नीचा कुऱ्हाडीने खून केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी जालिंदर कुचे यास ताब्यात घेतले. हा खून चारित्र्याच्या संशयावरून झाल्याचा संशय आहे. दोन्ही प्रकरणात रशीद हाजी कुरेशी याच्यावर ३०७ व जालिंदर भाऊलाल कुचेवर ३०२ प्रमाणे कारवाई करण्यात आली. याप्रकरणाचा तपास उप अधीक्षक चंद्रकांत अलसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सहाने व दिपाली वाघ करीत आहेत.

रोहयोवर २८४ मजूर

कन्नड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या कामावर तालुक्यात सध्या फक्त २८४ मजूर काम करीत आहेत. तालुक्यातील जॉब कार्डच्या तुलनेत ही संख्या अगदीच कमी आहे. रोजगार हमी योजनेत एका वर्षात शंभर दिवसाच्या कामाची हमी देण्यात आली आहे. योजनेतून तालुक्यात विविध १२ ठिकाणी दहा ग्रामपंचायतमार्फत कामे सुरू आहेत. त्यात विहीर पुनर्भरणाच्या दोन कामावर चार मजूर, चिमणापूर पाझर तलाववातील गाळ काढण्याच्या कामावर ४०, चापानेर येथील विहीर कामावर २४ मजूर काम करीत आहेत. काही ठिकामी रस्त्याच कामे सुरू आहेत. त्यात टाकळी (ल.) येथे ३० मजूर, जळगाव (घा.) २८, करंजखेड २२, टाकळी (अ.) ८३, जैतापूर १६, देभेगाव ३६ मजूर कामे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरांची संख्या घटल्याने शेण खताचा तुटवडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

शेतीचा पोत वाढवण्यासाठी शेण खताऐवढे चांगले दुसरे खत नाही. त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी शेण खताला महत्त्व देतात. परंतु, अलिकडच्या काळात गुरा-ढोरांची संख्या कमी होत असल्याने शेणखत मिळणे मुश्किल झाले आहे.

शेतीचा पोत सुधारून हमखास उत्पादन वाढीसाठी शेतकरी शेण खताला प्राधान्य देतात. शेतखत टाकल्यानंतर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमामात वाढते. विशेषतः अद्रक, मिरची, भाजीपाला, कापूस, मका ही पिके घेणारे शेतकरी शेण खताचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. पीक लावण्याच्या अगोदर शेतात शेण खत पांगवतात. रासायनिक खतासोबत शेण खताची मात्रा दिली, तर पीक जोमदार येऊन हमखास उत्पादन मिळते. त्यामुळे दरवर्षी शेणखत टाकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.

शेतककऱ्यांकडून शेण खताची मागणी वाढत असताना यांत्रिकीकरणामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्यांची कमी होत आहे. मनुष्यबळाअभावी शेतकऱ्यांनी पाळणे कमी केले आहे. जनावारांची किंमत वाढल्याचा फटकाही पशुपालनास बसला आहे. चाऱ्याचे वाढलेले भाव व चाराटंचाई यामुळे शेतकरी जनावरे पाळण्यास नकार देत आहेत. या परिस्थितीत शेण खताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे शेण खत आहे ते स्वतःच्या शेताला प्राधान्य देतात. त्यांची गरज भागल्यानंतर शेण खताची विक्री केली जाते. त्यामुळे सध्या शेतकरी शेण खतासाठी दारोदार भटकत आहेत. काही शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरल्यामुळेही शेण खताची मागणी वाढली आहे. सध्या दीड हजार ते अडीच हजार रुपये ट्रॅक्टर ट्रॉली या दराने शेण खताची विक्री सुरू आहे. ही रक्कम मोजूनही मुबलक शेण खत मिळण्याची खात्री नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यंदा नगदी पिकाला फाटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात बदलत्या हवामानाचा फटका बसल्यानंतर कापूस उत्पादनात कमालीची घट झाली आहे. हलक्या आणि मध्यम प्रतीच्या जमिनीत इतर पिकांचा पर्याय देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. या खरीप हंगामात कापसाचे ३३ हजार हेक्टर क्षेत्र कमी करण्याचे विभागाचे उद्दिष्ट आहे. या प्रयोगामुळे कापसाचे उत्पादन घटणार नसून शेतकऱ्यांना इतर पिकांच्या माध्यमातून आर्थिक फायदा होईल असे कृषीतज्ज्ञांनी सांगितले.

नगदी पीक असलेल्या कापसाच्या क्षेत्रात दरवर्षी कमालीची वाढ होत आहे. कापसाचे पीक खर्चिक असूनही शेतकरी अधिक फायद्यासाठी याच पिकाला प्राधान्य देतात. रासायनिक खत, बियाणे, आंतरमशागत आणि वेचणी या चार टप्प्यांवर प्रचंड खर्च होतो. परिणामी, शेतकऱ्याला फारसे पैसे उरत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही कापसाची मागणी घटली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही कापसाचे दर कोसळत आहेत. मागील वर्षी कापसाला अवघा ३१०० ते ३४०० रुपये दर मिळाला. कापसाला चार हजारांपेक्षा अधिक दर मिळाला असता तर शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. शिवाय खरीप हंगामात पावसाने उघडीप दिली होती. हलक्या जमिनीतील पिकाला परतीचा पाऊस आवश्यक असतो. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस झाला नाही. या निसर्ग बदलाचा फटका कापसाला बसला आहे. एकरी अवघे दीड ते दोन क्विंटल उत्पादन निघाल्यामुळे एकूण शेतीचे अर्थचक्र धोक्यात आले आहे. जिल्ह्यात सरासरी ६७५ मिलीमीटर पाऊस पडतो; मात्र मागील वर्षी फक्त ४०८ मिलीमीटर पाऊस झाला. कमी पावसाचा कापूस उत्पादनाला फटका बसला.

बदलते हवामान आणि कापसाचे उतरलेल्या दराचा विचार करून कृषी विभागाने कापसाचे क्षेत्र कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१४ यावर्षी जिल्ह्यात कापसाचे ४ लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्र होते. यावर्षी क्षेत्र ४ लाख हेक्टर ठेवणे प्रस्तावित आहे. या पिकाला मका आणि सोयाबीन या पिकांचा पर्याय कृषीतज्ज्ञांनी सूचवला आहे.

जमिनीचा पोत महत्त्वाचा

भारी जमिनीत कापूस पीक फायदेशीर ठरते. मध्यम स्वरुपाच्या जमिनीत सिंचनाची सोय असेल, तर कापूस पीक घ्या, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. हलक्या जमिनीत पुरेसे उत्पादन होत नाही. शिवाय पाऊस कमी झाल्यामुळे मका पिकाला प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कापसाचे क्षेत्र वाढले आहे.

मागील दोन-तीन वर्षांचा आढावा घेतल्यास शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान कापसामुळे झाल्याचे दिसते. नगदी पीक म्हणून कापसाचा अट्टाहास धरण्याची गरज नाही. इतर पिकांचा विचार करणे आवश्यक आहे.

- सतीश शिरडकर, उपसंचालक, 'आत्मा'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झारखंडच्या विक्रेत्यांची स्थानिकांवर गदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हापूस रत्नागिरीचा असो की देवगडचा, तुमच्यापर्यंत पोहचविणारा विक्रेता तुमच्या शहरातला किंवा कोकणातला असतो. मात्र, आता तसे असेलच असे नाही. याचे कारण म्हणजे झारखंडमधून आलेले तब्बल शंभरावर विक्रेते शहरात दाखल झाले आहेत आणि त्यांच्याकडून शहरात जागोजागी देवगडचा हापूस असल्याचे सांगून आंब्यांची विक्री होत आहे. शहरवासियांना हे विक्रेते झारखंडचे आहेत किंवा नाहीत, याची माहिती होईलच असे नाही; परंतु त्यांच्यामुळे स्थानिक विक्रेत्यांवर गदा आली आहे. तसेच हा देवगडचा हापूस नसून, झारखंड-आंध्र प्रदेशचा हापूस असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

मागच्या दोन वर्षांपासून झारखंडचे विक्रेते शहरामध्ये व्यवसायासाठी येत आहेत. अर्थात, मागच्या वर्षी ही संख्या कमी होती. यंदा मात्र या विक्रेत्यांची संख्या शंभरावर असल्याचे समजते. हे विक्रेते शहरात कुठेही ठिय्या मारून आंब्यांची विक्री करताना दिसून येत आहे. हापूसच्या खोक्यांमध्ये विक्री केले जाणारे आंबे हे देवगड हापूस असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. ६०० ते ८०० रुपयांना दोन डझन आंब्याच्या पेटीची विक्री केली जात आहे. हे विक्रेते गारखेडा, झांबड इस्टेट, सहकार बँक कॉलनी, शहानूरवाडी रस्ता, उस्मानपुरा, औरंगपुरा आदी भागांत दिसून येत आहे.

वाशी मार्केटमधून आंबे आणत असल्याचा दावा

झारखंडमधून आलेल्या विक्रेत्यांनी शहरामध्ये दोन महिन्यांसाठी खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. या खोल्यांमध्ये आंबे पिकवण्यासाठी ठेवण्यात येतात. हे विक्रेते जाधववाडीतून आंब्यांची ठोक खरेदी करीत नाहीत, तर वाशी मार्केटमधून आणि विशेष म्हणजे झारखंडच्या व्यापाऱ्यामार्फत रोज ट्रकने शहरात आंबे आणण्यात येतात, अशी माहिती जमाल शेख, मोहम्मद नसीम शेख, अहमद शेख या विक्रेत्यांनी 'मटा'ला दिली. आम्ही दोन वर्षांपासून केवळ व्यवसायासाठी शहरात येत असून, इतर दहा महिने मुंबईमध्ये नारळ पाण्याचा व इतर व्यवसाय करतो, असेही त्यांनी सांगितले.

मुळात हे आंबे देवगडचे नाहीत. ते झारखंड किंवा आंध्र प्रदेशचे आहेत. ही शहरवासियांची फसवणूक आहे. हा शहरातील व्यापारी-विक्रेत्यांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा प्रकार असून, शहरातील पैसा दुसऱ्या राज्यात जात आहे.

मोहम्मद बागवान, स्थानिक व्यापारी

शेतीनियमित माल हा बाजार समितीमध्ये आणून बाजार फी भरल्याशिवाय त्याची परस्पर विक्री करता येत नाही. काही व्यापारी बाजार फी न भरता आंबे विकत असल्याचे समजते. अशा विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश फिरत्या पथकास देण्यात आले आहे.

एन. एन. आधाने, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवार बाळगणारा कुख्यात गुंड गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशन भागात तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या कुख्यात गुंडाला गुन्हे शाखेने सोमवारी दुपारी जेरबंद केले. पिराजी संजू सोनवणे (वय २१, रा. सिल्लेखाना) हा तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली होती. त्याआधारे हॉटेल लालाजीसमोर पिराजीला तलवारीसह ताब्यात घेण्यात आले.पीएसआय सुभाष खंडागळे यांनी ही कारवाई केली. पिराजीविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयित आरोपीला पोलिसांचे अभय ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पतीने फसवणूक व बदनामी केल्याच्या प्रकरणात क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दीड महिना उलटला, मात्र अद्यापपर्यंत संशयित आरोपींना पकडण्यात आलेले नाही. पीडित सीमा एप्रिल २०१४ मध्ये अडीच महिन्याच्या गर्भवती होत्या, पण पती अक्षयने त्यांना गोळ्या खाण्यास देऊन गर्भपात केला. औरंगाबादला आल्यानंतर दवाखान्यात तपासणीसाठी गेल्यानंतर डॉक्टरांनी सीमा यांना अर्धवट गर्भपात झाल्याची माहिती दिली. त्यानंतर अक्षयने जबरदस्तीने गोळ्या देऊन पुन्हा गर्भपात केला.

दरम्यान, अक्षयने नैनासोबत विवाह केलेला असताना सीमासोबत लग्न करण्याचे कारण नव्हते. परंतु, नैना दुसऱ्या जातीची असल्याने बहिणीच्या लग्नात अडथळा येण्याची शक्यता होती. त्यामुळे जातीतील लोकांना दाखविण्यासाठी सीमासोबत विवाह केला. मात्र काही महिन्यानंतरच त्याचे खरे रूप समोर आले. सीमाला वडील नसून आई व दोन लहान बहिणी आहेत. हे कुटुंब खानावळ चालवून उदरनिर्वाह करते. या घटनेमुळे सीमाच्या माहेरची मंडळी हवालदिल झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलमधील कैद्याचा अन्नत्यागाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वरिष्ठ तरुंगाधिकाऱ्यांकडून सतत छळ होत असून, त्यांच्याविरुद्ध उपोषण केले असता, संबंधित तुरुंगाधिकाऱ्यांनी जिवे मारण्याची व नाशिक कारागृहात पाठविण्याची धमकी देत अमानुषपणे मारहाण केली. त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई न झाल्यास अन्नत्याग करणार असल्याचा इशारा हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील कैदी कैलास परशुराम बनसोडे (३८) याने दिला आहे. या संबंधीची तक्रार त्याने राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, वैद्यकीय अधीक्षक (घाटी), राज्य मानव अधिकार आयोग आदींकडे केली आहे.

या तक्रारीत कैद्याने अनेक आरोप केले आहेत. हा कैदी ८३ महिन्यांपासून 'मकोका'खाली कैदेत आहे. वरिष्ठ तुरुंगाधिकारी मोमीन यांच्या छळामुळे १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान तक्रार अर्ज देऊन उपोषण सुरू केले. परंतु, उपोषण मागे घेण्यास सांगून, जातीयवादी शिवीगाळ करीत जिवे मारण्याची व नाशिक कारागृहात पाठविण्याची धमकी देत मारहाण केली. या संदर्भात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी २७ फेब्रुवारी २०१५ रोजी घाटी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. उपोषण काळात घाटीमध्ये असताना ४ मार्च २०१५ रोजी कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी, 'तुरुंगाधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली असून उपोषण सोडावे' असे सांगण्यात आले. कारागृहात परतल्यावर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा 'एफआरआय' दाखल झाला नसल्याचे किंवा कारवाई झाली नसल्याचे लक्षात आले. याउलट मलाच नाशिक कारागृहात पाठविण्यासाठी कारागृह प्रशासनाच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत, असे या तक्रारीत म्हटले आहे.

अवयवदान, देहदानाची विनंती

या तक्रारीत कैदी बनसोडे याने, अन्नत्यागामध्ये माझे काही बरेवाईट झाल्यास, माझे अवयव गरजूंना दान करावेत आणि मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दान करावा, असे म्हटले आहे. या पत्राला अनुसरून घाटीच्या शरीररचनाशास्त्र (अॅनॉटॉमी) विभागाने कारागृहाच्या अधीक्षकांना, संबंधित कैद्याकडून देहदानाचा अर्ज भरून पाठवावा, असे पत्रही पाठविले आहे.

मी कुणाचाही छळ केलेला नाही. संबंधित कैद्याने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. माझा या प्रकरणाशी संबंध नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षेची अंमलबजावणी झाली आहे.

- एम. एस. मोमीन, वरिष्ठ तुरुंगाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images