Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘रामतारा’वासीयांना महिन्यापासून ‘शिक्षा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रामतारा हौसिंग सोसायटीमध्ये मागच्या तब्बल दोन महिन्यांपासून दिवसा-रात्री-मध्यरात्री अचानक दोन-दोन तास विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे परिसरातील रहिवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार जवळजवळ रोजच होत असून, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून शून्य प्रतिसाद मिळत असल्यामुळे रहिवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. या संदर्भात कनिष्ठ अभियंता श्रीमती कामत यांना रहिवाशांनी शुक्रवारी वारंवार फोन करुनसुद्धा त्यांनी फोन उचलला नाही आणि श्री. चार्बे यांनी उलटसुलट उत्तरे दिल्याच्या तक्रारी नागरिकांनी 'मटा'कडे केल्या आहेत. तातडीने सुधारणा झाली नाही तर मोर्चा काढण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. अवेळी होत असलेला पाऊस आणि गारपीटीमुळेही शहरात वीज गुल होत असल्याच्या घटना पुढे येत आहेत. येत्या काही दिवसांतच पावसाळ्याची चाहूल लागणार असून रामतारावासियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘८००० मृत्यूंना डॉक्टर जबाबदार’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतामध्ये चार टक्के 'थॅलेसेमिया मायनर'चे प्रमाण आहे, पण दरवर्षी देशामध्ये आठ हजार, तर महाराष्ट्रामध्ये साडेपाच हजार 'थॅलेसेमिया मेजर' मुले व युवकांचा मृत्यू होतो. सद्यस्थितीत देशामध्ये एक लाख 'थॅलेसेमिया मेजर' मुले आहेत आणि दरवर्षी दहा हजार 'थॅलेसेमिया मेजर' बालकांचा जन्म होतो. या एकूणच स्थितीला देशातील डॉक्टर आणि विशेषतः स्त्रीरोगतज्ज्ञ जबाबदार आहेत, असा आरोप थॅलेसेमियाबाबत कार्य करणारे मुंबईतील 'थिंक फाऊंडेशन'चे सचिव विनय शेट्टी यांनी केला आहे.

शहरातील थॅलेसेमिया सोसायटी व दत्ताजी भाले रक्तपेढीच्या वतीने विविध कार्यक्रमांसाठी आले असता, त्यांनी 'मटा'शी संवाद साधला. पती व पत्नी दोघेही 'थॅलेसेमिया मायनर' असल्यास त्यांच्यापासून जन्मणारे मूल हे 'थॅलेसेमिया मेजर' असण्याची दाट शक्यता असते आणि 'मेजर' मुलास दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्याच्या आत रक्त द्यावे लागते. दुर्दैवाने अशी मुले आयुष्याची विशी-पंचविशीही गाठू शकत नाहीत. आपल्या देशात 'मायनर'चे प्रमाण चार टक्के आहे, पण 'सायप्रस' या देशामध्ये 'मायनर'चे प्रमाण १३ ते १५ टक्क्यांपर्यंत असताना आणि एकेकाळी इथे 'मेजर'चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतानाही आज 'मेजर'चे प्रमाण चक्क नगण्य झाले आहे. तिच परिस्थिती इटली, ग्रीस यासारख्या देशांची आहे. या देशामध्ये 'मायनर'चे प्रमाण कमी झालेले नाही, पण 'मेजर'चे प्रमाण अत्यल्प झाले आहे. या देशामध्ये आता 'मेजर' मुले जन्म घेत नाहीत. असे आपल्या देशात का होऊ शकत नाही, असा सवाल उपस्थित करीत, याला आपली सदोष आरोग्य व्यवस्था व जागृत नसलेली डॉक्टर मंडळी कारणीभूत आहे, असे शेट्टी म्हणाले.

केवळ ७०० ते १००० रुपयांच्या एका तपासणीमध्ये 'थॅलेसेमिया मायनर'ची तपासणी होऊ शकते. मात्र या तपासणीचे किती महत्त्व आहे, हे डॉक्टरांनी आणि विशेषतः प्रसुतीदरम्यान उपचार करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितल्याशिवाय सर्वसामान्यांना कसे करणार? या तपासणीचे महत्त्व अतिशय जबाबदारीने प्रत्येक महिला-पुरुषाला, पती-पत्नीला समजून सांगितले, तर ही तपासणी करून घेणाऱ्यांचे प्रमाण कित्येक पटींनी वाढेल आणि 'थॅलेसेमिया मेजर' मूल जन्मण्यापासून नक्कीच वाचेल. अनेकदा उशिरा समजते आणि गर्भपात करता येत नाही. त्यामुळे अशी तपासणी सरसकट सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून सर्व ठिकाणी का उपलब्ध करून दिली जात नाही? त्याचबरोबर प्रत्येक रक्त तपासणीच्या रिपोर्टमध्ये थॅलेसेमियासाठी सूचक मानण्यात येणाऱ्या 'एमसीव्ही' व 'एमसीएस'ची आवर्जुन नोंद झाल्यास निदान सर्व सुशिक्षित व्यक्ती सजग झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

३% एचआयव्ही, १४% कावीळ

सुरक्षित रक्त मिळत नसल्यानेच थॅलेसेमियाग्रस्तांमध्ये तीन टक्के एचआयव्ही, तर गंभीर मानण्यात येणाऱ्या कावीळ 'क'चे प्रमाण १४ टक्क्यांपर्यंत आहे. त्याशिवाय कावीळ 'अ', 'ब'चे प्रमाणही लक्षणीय आहे. मुळात थॅलेसेमियाचे अतिशय क्लिष्ट उपचार घ्यावे लागत असताना, दुसरीकडे एचआयव्ही, काविळीचेही उपचार घ्यावे लागतात. सरकारी आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये 'नॅट' टेस्टेट रक्त देणे बंधनकारक केले तर निदान जंतुसंसर्ग कमी होऊ शकेल. थॅलेसेमियाग्रस्तांमध्ये लोहाचे प्रमाण वाढून अवयव निकामी होतात. त्यांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होण्यासाठी रोजच विशिष्ट गोळ्या घ्याव्या लागतात; परंतु 'राजीव गांधी जीवनदायी'मध्ये थॅलेसेमियाचा समावेश करूनही सरकारी रुग्णालयांमध्ये या महागड्या गोळ्या मिळत नाहीत, अशी अनास्थाच थॅलेसेमियाग्रस्तांच्या मृत्यूला कारणीभूत ठरते, असेही शेट्टी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोगेश्वरी येथून तरुणी बेपत्ता

0
0

औरंगाबाद : जोगेश्वरी येथील सुनीता परशुराम औचरमल (वय १८) ही तरुणी मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता आहे. सुनीताची उंची पाच फूट, चेहरा लांब, अंगात पिवळा सलवार कुर्ता आहे. तिच्या वडिलांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी बेपत्ता असल्याची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडीत कबुतरे, कोंबड्याही पळवल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका घरफोडीत चोरांनी रोख वीस हजार रुपयांसह १२० कबुतरे व वीस कोंबड्या पळवल्या आहेत. ही चोरी गुलशननगर, कोलठाणवाडी येथे शुक्रवारी रात्री झाली. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युसूफखान हमीदखान (वय ५०) हे वाड्याला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. चोरांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या वाड्यात प्रवेश करून खोलीचे कुलूप तोडले. खोलीतील कपाटातील रोख वीस हजार रुपये पळवले. त्यानंतर छतावरील पिंजऱ्यात असलेल्या वीस कोंबड्या व १२० कबुतरांचीही चोरी केली. युसूफखान शनिवारी परत आल्यानंतर चोरी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

होर्डिंग्सचे फ्लेक्स पळवले

निलेश क्षत्रीय (वय ४० रा. म्हाडा कॉलनी, दर्गा रोड) यांच्या घराच्या कंपाउंड मधून चोरांनी जाहिरात होर्डिंग्सचे फ्लेक्स शनिवारी दुपारी पळवले. याप्रकरणी क्षत्रीय यांच्या संशयावरून किरण वावरे (वय २२, रा. गरमपाणी) यांच्याविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौघांची दोघांना मारहाण

घराजवळ फेऱ्या मारणाऱ्यास विचारणा केल्यानंतर दोघा भावांना चौघांनी मारहाण केली. वाळूजमधील बकवालनगर येथे शनिवारी सकाळी काही तरूण गल्लीत चकरा मारत होते. त्यावेळी अनिल व योगेश म्हस्के या दोघांनी त्यांना कारण विचारले. यावेळी वाद होऊन म्हस्के बंधुंना चौघांनी लोखंडी सळईने मारहाण केली. याप्रकरणी अनिलच्या तक्रारीवरून रमेश आरगडे, नवनाथ आरगडे, सुंदर वायाळ, दीपक वैद्य (सर्व रा. बकवालनगर) यांच्याविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भावाला मारहाण

दिनेश दांडगे (वय ३०, रा. बंजारा कॉलनी) याला सख्खा भाऊ मंगेश दांडगे याने शुक्रवारी रात्री लोखंडी गजाने मारहाण केली. हे भांडण राहत्या घराच्या वाटणीवरून झाले. याप्रकरणी मंगेशविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रोटेगाव-कोपरगाव रेल्वेमार्ग करावा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः

रोटेगाव-पुणतांबा हा रेल्वे मार्ग होत नसेल तर रोटेगाव-कोपरगाव रेल्वेमार्ग करावा, अशी मागणी मराठवाडा रेल्वे विकास संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रुळाशेजारून कॅडलाइन टाकून हा मार्ग पूर्ण करावा, असा पर्याय सूचवण्यात आला असून त्यासाठी शिर्डी देवस्थानने दोन हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा, स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लड्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत त्यांनी औरंगाबाद-दौलताबाद-चाळीसगाव रेल्वे मार्गाचे काम ठराविक मुदतीत पूर्ण करण्याची मागणी केली. याशिवाय मानवत-पाथरी-माजलगाव-सोनपेठ या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न करावा. अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्ग लवकर पूर्ण करावा, रेल्वे बजेटमध्ये घोषित चार रेल्वे विद्यापीठांपैकी एक औरंगाबाद येथे स्थापन करावे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. पुर्णा येथील रेल्वेच्या जागेत रेल्वे डबे तयार करण्याचा कारखाना सुरू केल्यास रोजगाराची संधी वाढेल, असे या निवेदनात म्हटले आहे.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनाहून लांब पल्ल्यांच्या रेल्वे सुरू करण्यासाठी पीटलाइनचे काम सुरू करावे. मनमाड-मुदखेड दुहेरी मार्गाचे काम सुरू करून विद्युतीकरणासह दुहेरीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. औरंगाबाद, जालना, परभणी येथील रेल्वेची मोठी जागा उपलब्ध असून नर्सिंग कॉलेज किंवा हॉस्पिटलसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. या मागण्या रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

'कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबावे'

सोलापूर जळगाव रेल्वेमार्ग पैठणमार्गे करावा, अशी तेथील नागरिकांची मागणी आहे. हा मार्ग जालना-भोकरदन मार्गे वळविण्यात आल्याने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद ‌खंडपीठात याचिका दाखल केली आहे. कोर्टाच्या निर्णयापर्यंत कोणताही निर्णय करू नये, अशी मागणी ओमप्रकाश वर्मा यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेलीफिशिंग अॅटॅकरचा तरुणाला गंडा

0
0

औरंगाबाद : आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगत एका तरुणाला वीस हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश जाधव (वय २७, रा. पुंडलिकनगर) या तरुणाचे आयसीआयसीआय बँकेत खाते आहे. त्याला एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून शुक्रवारी सायंकाळी सात वाजता फोन आला. समोरील व्यक्तीने आयसीआयसीआयच्या मुंबई शाखेतून बोलत असल्याची माहिती दिली. जयेशकडे एटीएम कार्डचा क्रमांक मागत त्याचे केवायसी अपडेट करायचे असल्याची थाप मारण्यात आली. जयेशने त्याच्यावर विश्वास ठेवून त्या व्यक्तीला क्रमांक सांगितला. त्यानंतर काही वेळातच त्याच्या खात्यातून २०,४०० रुपये काढून घेतल्याचा मॅसेज आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जयेशने पोलिस ठाण्यात जाऊन फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या पोलिस आयुक्तांना मंगळसूत्र चोरांची सलामी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बजरंग चौकात दुचाकीस्वारांनी एका महिलेच्या गळ्यातील पावणेदोन तोळ्याचे गंठण पळवले. ही घटना रविवारी (१७ मे) दुपारी घडली. नवीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना मंगळसूत्र चोरांनी आपले आव्हान कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

सीमा भीमराव मोहिते (वय २९, रा. एन ७, सिडको) या रविवारी दुपारी बजरंग चौकातून पायी जात होत्या, तेव्हा विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून दोन जण त्यांच्याजवळ आले. त्यांनी 'ओ मावशी' अशी हाक मारली. या हाकेने मोहिते यांनी मागे वळून पाहिले. ही संधी साधून चोरांनी त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून पळून गेले. मोहिते आरडाओरड करेपर्यंत ते दिसेनासे झाले होते. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंगळसूत्र चोरीचा हा पहिला गुन्हा आहे. गेल्या काही महिन्यानंतर मंगळसूत्र चोरांनी डोके वर काढले. नव्या आयुक्तांना देखील मंगळसूत्र चोरांनी सलामी देत आव्हान कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रिणीच्या मदतीने एक बुकी जाळ्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सायबर सेलने आयपीएलवर सट्टा चालवणाऱ्या टोळीतील आणखी एका बुकीला शनिवारी रात्री (१६ मे) अटक केली. त्याने या गुन्ह्यासाठी मैत्रिणीच्या नावे असलेल्या मोबाइलचा वापर केला होता. पोलिसांनी त्याला या मैत्रिणीच्या मदतीनेच अटक केली. दरम्यान, कोर्टाने गुरूवारी रात्री पकडलेल्या सहा बुकींची पोलिस कोठडी दोन दिवसांनी वाढवली आहे.

गुन्हे शाखेने शहरात गुरुवारी छापे टाकून सहा बुकींना आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन व कोलकत्ता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्यावर सट्टा घेताना अटक केली. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा या बॉक्समध्ये २८ बुकींच्या बेटिंग लाइन सुरू होत्या. त्यांचा सायबर सेलतर्फे शोध सुरू आहे. दरम्यान या २८ पैकी स्वप्नील मणियार (रा. बजाजनगर) याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. स्वप्नील मणियारने बेटिंगसाठी वापरलेले सिमकार्ड मैत्रिणीच्या नावावर आहे. पोलिस या या तरुणीपर्यंत पोहचल्यानंतर ही माहिती उजेडात आली. पोलिसांनी युक्तीने या तरुणीला स्वप्नीलला फोन करण्यास भाग पाडले. त्याला बोलावून घेऊन अटक केली. तो तुर्काबाद खराडी व वाळूज परिसरात बुकी म्हणून काम पाहत होता.

मणियारसह अटकेतील नरेश पोतलवाड, अलोक अग्रवाल, प्रफुल्ल अंबीरचंद राठी, ललित कोठारी, अनिल मुनोत, विनय जैन यांना रविवारी कोर्टात हजर करण्यात आले. या गुन्ह्यात आणखी काही जणांचा समावेश असून त्यांना अटक करायचे आहे. काही महत्वाची कागदपत्रे व मोबाइलचा तपास करायचा आहे, यासाठी पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी कोर्टात करण्यात आली. कोर्टाने सात जणांची कोठडी मंगळवारपर्यंत वाढवली आहे.

दरम्यान, पोलिसांनी पकडलेल्या बुकींचा दिल्ली येथे लिंक असल्याचे उघड झाले आहे. नवी दिल्लीपर्यंत सट्टा बाजाराची पाळेमुळे पोलिसांना खणून काढावी लागणार आहेत. त्यामुळे दिल्लीतील आरोपींच्या शोधासाठी सायबर सेलचे पथक रविवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माणसे-जनावरे दगावली काय?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांनी खाम नदीच्या प्रदूषणामुळे झालेल्या घटनांची माहिती नदी किनाऱ्यावरील ग्रामपंचयातींकडे मागितला आहे. गेल्या काही वर्षात झालेले आजार, मृत्यू, जनावरांची स्थिती आदींबाबत माहिती मागवण्यात आली आहे. दरम्यान, आरोग्य विभाग, पशूसंवर्धन व प्रदूषण नियंत्रण मंडळालाही नोटीस बजावण्यात आली आहे.

खाम नदीत गेल्या काही वर्षांपासून विषारी रसायन सोडण्यात येत आहे, असा संशय आहे. या नदीच्या काठावर औरंगाबाद पोलिस आयुक्तालय हद्दीतील बारा गावे येतात. या गावांच्या ग्रामपंचायतींना गुन्हे शाखेने पत्र पाठवून माहिती मागवली आहे. गेल्या काही वर्षात नदीचे पाणी पिण्यामुळे काही जनावरे दगावली का? आजार पसरले का? कोणाचा मृत्यू झाला आहे का? आदी माहिती मागविण्यात आली आहे.

नदी किनाऱ्यावर गोलवाडी, वळदगाव, पंढरपूर, पाटोदा, नायगाव, लांझी, पिंपरखेडा, हनुमंतगाव ही गावे आहेत. यापैकी काही गावच्या ग्रामसेवकांनी गुन्हे शाखेकडे माहिती दिल्याचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले. खाम नदीत ‌स्टरलाइट कंपनीचे रसायन सोडणाऱ्या टोळीला अटक केल्यानंतर खाम नदी प्रदूषित करण्याचे कारस्थान उघडकीस आले आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांचा तपास संशयास्पद असल्याने तो एक आठवड्यांपूर्वी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. गुन्हे शाखेने स्टरलाइट कंपनीचा पुरवठा मॅनेजर अमित रत्नपारखी याला अटक केली आहे. या गुन्ह्यात रत्नपारखीचा सक्रीय सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याची माहिती देण्यात आली.

सरकारी कार्यालयांना नोटीस

गुन्हे शाखेने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयास नोटीस बजावून विचारणा केली आहे. खाम नदी‌ किनाऱ्यावरील गावांतील आरोग्य केंद्रामध्ये दूषित पाण्यासंदर्भात कोणी उपचार घेतले आहे याची माहिती मागवण्यात आली आहे. दूषित पाण्यामुळे दगावलेल्या जनावरांबद्दल पशूसंवर्धन‌ विभागाकडे विचारणा करण्यात आली आहे. सुरुवातीला टँकर पकडल्यानंतर कोणता अहवाल पाठवला, कोणती कारवाई केली, प्रदूषण नियंत्रण कायद्यान्वये कोणती कलमे लावली, याची माहिती प्रदूषण नियत्रंण मंडळाकडे नोटीस बजावून मागवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा योजना; चौकशीची मागणी

0
0

फुलंब्रीः फुलंब्री तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या प्रलंबित कामांची चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समिती उपसभापती रऊफ कुरेशी यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. तालुक्यातील आळंद, डोंगरगाव कवाड, धानोरा, बोरगाव अर्ज, पिंपळगाव वळण, शेवता खुर्द, शिरोडी खुर्द, डोंगरगाव शीव आदी गावांसाठी शासनाने विविध योजनांमधून पाणी पुरवठ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र आजही या गावात शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही या गावामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ येत आल्याने या कामांची चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कुरेशी यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांकडून आयुक्तांची कानउघडणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पालकमंत्री रामदास कदम यांनी महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांची रविवारी सकाळी (१७ मे) कानउघडणी केली. एका विषयावर चर्चा सुरू असताना उपस्थित कार्यकर्त्याने मत मांडले. ते न आवडल्याने आयुक्तांनी आवाज वाढविला आणि त्यावरून पालकमंत्र्यांनी आयुक्तांना फैलावर घेतले.

पालकमंत्री कदम रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास सुभेदारी विश्रामगृहावर आयुक्त महाजन यांच्याशी त्यांची चर्चा सुरू होती. तीन महिन्यांपासून सांगितलेली कामे न झाल्याबद्दल कदम आयुक्तांना विचारणा करीत होते. त्यावेळी आयुक्तांनी नियमाने हे काम होऊ शकत नाही, असे सांगितले. तेव्हा पालकमंत्र्यांनी, आता तुम्ही मला नियम शिकवणार काय ? असा प्रतिप्रश्न आयुक्तांना केला. यावेळी तिथे निवडक मंडळीच उपस्थित होती, असे सूत्रांनी सांगितले. या मुद्यावर गरमागरम चर्चा सुरू असताना एका कार्यकर्त्याने एक मुद्दा मांडला. हे न पटल्याने आयुक्तांनी त्या कार्यकर्त्याला आवाज वाढवून खाली बसण्यास सांगितले. आयुक्त कार्यकर्त्यावर राग काढत असल्याचे पाहून कदम संतापले आणि त्यांनी महाजनांना चांगलेच फैलावर घेतले. या प्रकरणाची पालिका वर्तुळात दिवसभर चर्चा होती.

पालिकेतील पाचशे कर्मचाऱ्यांना कायम केले, आणखी १४ कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न तीन महिन्यांपासून सुटलेला नाही. त्याबद्दल एका कार्यकर्त्याने मुद्दा मांडला. आयुक्त त्याच्याशी आवाज वाढवून बोलले. मी त्यांना 'कुणी आपल्याला काही सांगत असेल, तर शांतपणे ऐकून घ्यावे, त्याच्यावर चिडून चालत नाही,' असे म्हणालो.

- रामदास कदम, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी जाळणारे गजाआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जयभवानीनगरमध्ये दुचाकी जाळणाऱ्या जॉन तिर्थे याला पोलिसांनी साथीदारासह रविवारी सायंकाळी (१७ मे) सायंकाळी अटक केली. वाहने जाळणाऱ्या व लुटमार करणाऱ्या जॉनवर 'मकोका' कायद्यान्वये कारवाई करणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. दरम्यान, त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याच्या कुटुंबियांनी हल्ला केला.

जयभवानीनगर तेरावी योजना येथे शनिवारी (१६ मे) पहाटे आठ दुचाकी पेटवण्यात आल्या. याच भागात शुक्रवारी दुपारी प्रकाश भोसले याची अॅपेरिक्षा चाकूचा धाक दाखवून पळवली. त्यानंतर मनसोक्त दारू पिऊन चार जणांनी रात्री जयभवानीनगर गाठले. रात्री साडेदहा वाजता नेताजी मुळे या किराणा दुकानाचालकावर दगडफेक केली. त्यानंतर अरूण नावाच्या तरुणाला मारहाण करून त्याचे सहाशे रुपये लुबाडले.

दुचाकी पेटवण्याआधी प्रकाश राठोड यांचे घर फोडून चौदा हजार रुपयांचा ऐवज पळवला, शेवटी पहाटे आठ दुचाकी जाळल्या. या घटनांमुळे जयभवानीनगर परिसरात खळबळ उडाली. या घटनांमध्ये अट्टल गुन्हेगार जॉन उर्फ भारत शंकर तिर्थे (वय २२, रा. राजनगर) याचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जॉनला पकडण्यासाठी गुन्हेशाखेचे पथक रविवारी सकाळी त्याच्या घरी गेले होते. त्यावेळी त्याची आई व भावाने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच जॉनला मागच्या दाराने पळवून लावले.

सायंकाळी मुकुंदवाडी पोलिस पकडण्यासाठी गेले तेव्हा नशेतील जॉनने चाकूचा धाक दाखवून पकडण्यास गळ्यावर वार करून घेण्याची धमकी दिली. मात्र पोलिसांनी त्याला अखेर जेरबंद केले. पोलिसांनी त्याचा साथीदार ज्ञानेश्वर मनोज यादव (रा. गल्ली क्रमांक १५, जयभवानीनगर) यांना अटक केली. त्यांचे दोन साथीदार अनिल आव्हाड व अजय श्रीवास्तव पसार झाले आहेत. पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, हारूण शेख, हेमंत सुपेकर, सुनील जाधव, राहुल हिवराळे, आनंद वाहूळ, शोन पवार व परशुराम सोनूने यानी ही कारवाई केली.

एक लाखाचे बक्षीस

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्याला भेट देऊन चौकशी केली. जॉनला पकडणाऱ्या पथकाला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करून ते सोमवारी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 'मकोका' लावणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ गेटमधून मोकाट जनावरांची ‘एंट्री’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आवारात मोकाट जनावरांचा मुक्त संचार बंद करण्यासाठी प्रशासनाने दोन गेट बंद केले. काही ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त वाढवला असला तरी मुख्य प्रवेशद्वारातून मोकाट जनावरांची घुसखोरी सुरू आहे. विद्यापीठाला रविवारी (१७ मे) सुटी असल्यामुळे सर्वत्र गुरांची मनसोक्त भटकंती सुरू होती. पहिल्या टप्प्यातच या प्रकाराला आळा घालण्यात विद्यापीठ प्रशासन सपशेल अपयशी ठरले.

घनदाट दुर्मिळ वनराई असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आवारात गायी, म्हशी आणि शेळ्यांचा वावर वाढला आहे. प्रत्येक विभागाच्या आवारात मोकाट जनावरे चरत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. झाडांच्या फांद्या तोडून शेळ्यांना चारा दिला जात आहे. या प्रकाराला आळा घातला नसल्यामुळे विद्यापीठ परिसर जनावरांचे कुरण झाला आहे. या पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'उजाड विद्यापीठ' ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली. या मालिकेनंतर विद्यापीठ प्रशासनाने सामाजिकशास्त्र विभाग आणि गेस्ट हाउसमागील गेट बंद केले. त्यामुळे बेगमपुरा आणि पहाडसिंगपुरा भागातील विद्यार्थी वळसा घालून मुख्य गेटने येत आहेत. मोकाट जनावरांचा प्रवेश रोखण्यासाठी दोन्ही गेट बंद केल्याचे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सांगितले. काही विद्यार्थ्यांनी गेटजवळ लहान रस्ता ठेवण्याची मागणी केली आहे. बंदोबस्त वाढवूनही मोकाट जनावरांचा वावर थांबलेला नाही. विद्यापीठ कॅम्पसची रविवारी पाहणी केली असता अनेक विभागांच्या आवारात गायी, म्हशी, शेळ्या चरताना दिसल्या. विशेष म्हणजे काळजीपूर्वक तयार केलेल्या 'लॉन्स'वर म्हशी चरत होत्या. कुलगुरुंच्या बंगल्याजवळील संगीत विभागासमोर म्हशी आढळल्या. मागील आठवड्यात एका व्यक्तीला म्हशीने जखमी केल्यानंतरही प्रशासनाने हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. गुरांच्या मनसोक्त वावरामुळे परिसरातील वनराई धोक्यात आली आहे. मुजोर गुराख्यांना रोखण्यात सुरक्षारक्षक कचरत असल्यामुळे हा प्रकार वाढला आहे.

विद्यापीठाचा लौकिक

केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी े कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे सक्रिय आहेत. मात्र, विद्यापीठाच्या लौकिकासाठी नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध परिसर आणि उत्तम कॅम्पस आवश्यक असतो याचा विसर त्यांना पडला आहे. एवढ्या मुक्तपणे जनावरांना चारण्याची परवानगी देणारे हे एकमेव विद्यापीठ आहे. निसर्गप्रेमींनी वृक्ष लागवड आणि वनस्पतीशास्त्र उद्यानाच्या संवर्धनाची मागणी करूनही प्रशासन उदासीन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळीत वॉर्डाला गरज अधिक कुलर-एसींची

0
0

औरंगाबादः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) जळीत (बर्न) वॉर्डामध्ये अजूनही अधिक प्रमाणात कुलर व एसींची गरज आहे. सद्यस्थितीत तीन कुलर व दोन एसी नादुरुस्त आहेत. यापैकी दोन्ही एसी हे मागच्या काही महिन्यांपासून बंद असल्याचे समजते.

जळीत वॉर्डामध्ये सध्या २५ रुग्ण दाखल आहेत. यापैकी ४ बालरुग्ण आहेत, तर २१ प्रौढ रुग्ण आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर काहीअंशी रुग्णसंख्या वाढली असून, ही रुग्णसंख्या ४० पर्यंतही जाऊ शकते, असेही वॉर्डातून सांगण्यात आले. या वॉर्डामध्ये ६ कुलर, २ एसी आणि त्याशिवाय काही प्रमाणात डेझर्ट कुलर उपलब्ध आहेत. मात्र, यातील ३ कुलर व दोन्ही एसी बंदच आहेत. तसेच वाढती रुग्णसंख्या पाहता आणि जळीत रुग्णांच्या गरजेनुसार अजून अधिक प्रमाणात कुलर व एसींची गरज असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, वॉर्डामध्ये इतर वैद्यकीय साहित्य व औषधे बऱ्यापैकी उपलब्ध असले, तरी बँडेजची कमतरता असल्याचेही सूत्रांनी सांगितले. जळीत रुग्णांच्या ड्रेसिंगसाठी मोठ्या प्रमाणावर बँडेजची गरज असते आणि त्यामुळेच बँडेज पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही नातेवाईकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावशिवार चेतवणारा तरुणाईचा लोकजागर

0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

पिण्याच्या पाण्यासाठी पाच-पाच किलोमीटर पायपीट करणारे गावकरी, चारा टंचाई आणि रोजगाराची शोधाशोध. ग्रामीण भागातील भयावह स्थितीने सर्वांचीच घालमेल सुरू आहे. सध्या अमर्याद पाणी उपशाला आपण जबाबदार आहोत, असे परखड भाष्य करणारे पथनाट्य गावोगाव गाजत आहे. दिशा फाउंडशेनने ग्रामीण भागात राबविलेल्या या जनजागृती उपक्रमात कॅनडाच्या विदेशी दाम्पत्यानेही सहभाग घेतला. किमान पाणी जिरवण्याच्या काही उपाययोजना केल्याच पाहिजे याचा बोध गावकरी घेत आहेत.

दुष्काळावर फक्त हळहळ व्यक्त करण्यापेक्षा लोकप्रबोधन करण्याच्या उद्देशाने दिशा इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्ट व लेट्स अॅक्ट अॅक्टर स्टुडिओ यांनी पथनाट्य जनजागृती उपक्रम सुरू केला आहे. जलयुक्त शिवार योजनेची माहिती सांगतानाच पाणी अडवा पाणी जिरवा असा महत्त्वाचा संदेश पथनाट्यातील कलाकार देत आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय पथनाट्याचे प्रयोग सुरू आहेत. पाणी टंचाईमुळे शेतकरी अडचणीत आहे. दरवर्षीचे पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी नैसर्गिक जलस्त्रोत अडविण्याचा संदेश कलाकार देत आहेत. ग्रामीण बोलीभाषेचा प्रभावी वापर करून पथनाट्याची मांडणी करण्यात आली आहे. 'दिशा फाउंडेशन'चे किरॉन वैष्णव व 'लेट्स'चे विनय शाक्य यांनी ग्रामीण जीवनशैलीचा वेध घेणारे कथानक लिहिले. तर विद्यार्थी कलाकार सुशील रायबोले आणि अमोद जांदे यांनी पथनाट्याचे दिग्दर्शन केले आहे. शेतकरी आत्महत्या, आत्महत्या टाळण्याचे उपाय, मनोधैर्य उंचावणारे मार्गदर्शन, विहीर पुनर्भरण, शेततळी, माती नालाबांध, शेतीपूरक व्यवसाय अशा अनेक गोष्टींवर पथनाट्यातून प्रकाशझोत टाकला जात आहे. आतापर्यंत हिवरा, चिंचोली, एकोड, सिंदोन, भिंदोन यासह बारा गावात पथनाट्य सादरीकरण झाले आहे. पथनाट्यातील उपाययोजनांची अंमलबजवाणी केली तरच तुमच्या गावात चहा घेऊ असे कलाकार सांगतात. त्यामुळे अनेक ग्रामस्थांनी पाणी जिरवण्याचा निर्धार केला आहे. या पथनाट्यात रोहीत कंबार, समर्थ चौधरी, शुभम हुंडीवाले, स्मिता पाटील, वेदश्री जाधवर, ऋतुजा पळणीटकर, कृष्ण, अमोल, सोमनाथ, फारुख शाह यांनी सहभाग घेतला आहे. या उपक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने पथनाट्य चमूसाठी वाहन दिले आहे.

विदेशींचे मराठीत मार्गदर्शन

कॅनडा येथील शिक्षक दाम्पत्य ब्लेक बॉउचर्ड आणि टॅमारा बॉउचर्ड गावोगाव फिरुन पथनाट्यातून जनजागृती करीत आहे. सध्या दोघे दक्षिण कोरियात कार्यरत आहेत. दोघांनी भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनाचा विशेष अभ्यास केला आहे. दिशा फाउंडशेनच्या उपक्रमात 'स्वयंसेवक' म्हणून सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार मागील पंधरा दिवसांपासून या दाम्पत्याने काही मराठी शब्द वापरत शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या पथनाट्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाची बिकट परिस्थिती लक्षात आली. आमच्या ग्रुपने नायगाव दत्तक घेतले आहे. तर काही विदेशी संस्थांना इतर गावांच्या विकासासाठी दत्तक घेण्याचे आवाहन केले आहे.

- किरॉन वैष्णव, सचिव, दिशा फाउंडेशन ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येणारा आठवडा ‘हॉट’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऐन उन्हाळ्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने शहर परिसरसरात हजेरी लावली होती, मात्र आता वातावरणात पुन्हा बदल होत उन्हाचा पारा चढू लागला आहे. येणारा आठवडा कडक उन्हाचा राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, रविवारी (१७ मे) शहरात कमाल ४१. ७ व किमान २५.१ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली.

कधी अवकाळी पाऊस तर कडक उन्हामुळे हैराण असलेल्या औरंगाबादकरांना आता येणाऱ्या आठवड्यातही कडक उन्हाला सामोरे जावे लागणार आहे. रविवारी उन्हाचा पारा ४१ अंशाच्या पार गेला असून येत्या आठवड्यातही अशीच परिस्थिती राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे. या बदलाने शहरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. औरंगाबाद शहरात अवकाळी पावसाचा अंदाज नसला तरी मराठवाड्याच्या काही भागात १९ व २० मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळी-पिवळी बंद; एसटीला फायदा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काळी-पिवळीला टॅक्सीला शहरातील बंदीचा निर्णय एसटी महामंडळासाठी फायदेशीर ठरला आहे. फुलंब्री, बिडकीन आणि खुलताबाद मार्गावर अतिरिक्त बस सोडल्याने एसटीला दररोज पाच लाख रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळत आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम शहरात बेलगाम फिरणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सीला लगाम घातला. त्यामुळे बस स्थानक परिसरातून होणाऱ्या काळी-पिवळी चालकांकडून प्रवासी पळविणे बंद झाले. शहरात बंदी असल्याने काळी-पिवळी चालक प्रवाशांना शहराबाहेर सोडत होते. त्यामुळे प्रवाशांना शहरात येण्यासाठी पुन्हा प्रवास खर्च सोसावा लागत आहे. परिणामी प्रवाशांनी एसटी बसचा पर्याय बऱ्यापैकी स्वीकारल्याचे दिसते. काळी-पिवळी टॅक्सी बंद झाल्याने एसटी विभागाने जादा गाड्यांचे नियोजन केले. महामंडळाकडून ५ मे रोजी तीन मार्गावर तीन बस सुरू करण्यात आल्या, त्यापैकी प्रत्येक मार्गावर दोन बस सोडण्यात आल्या आहेत.

सध्या फुलंब्री मार्गावर दररोज २८ फेऱ्या, बिडकीन मार्गावर २८ आणि खुलताबाद मार्गावर २८ फेऱ्या होत आहेत. शिवाय या मार्गावरील पैठण-औरंगाबाद, कन्नड-औरंगाबाद आणि सिल्लोड-औरंगाबाद या नियमित सेवा देणाऱ्या बसमध्ये विविध थांब्यावरील प्रवाशांना घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. काळी-पिवळी बंद तीन मार्गावर दररोज पाच लाख रुपयांचे अतिरिक्त महसूल मिळत असल्याची माहिती देण्यात आली.

ट्रॅव्हल्स चालकांकडून मध्यवर्ती बस स्थानकावरून प्रवासी पळविले जात आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी एसटी कामगार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२ तासांत आटोपला ठाकरेंचा दौरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी (१७ मे) शहरातील काम सुरू असलेले उड्डाणपूल, रस्ते, नालेसफाई, भूमिगत गटार योजना आदी कामांनी भेटी दिल्या. त्यांनी अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेऊन सूचना दिल्या. परंतु, उन्हामुळे त्यांनी हा दौरा फक्त दोन तासांत आटोपला.

पालकमंत्री रामदास कदम यांच्या लाल दिव्याच्या मोटारीत बसून आदित्य ठाकरे यांनी विकास कामांची पाहणी केली. प्रत्येक कामाच्या ठिकाणी थोडा वेळ थांबल्यानंतर पुढील विकासकामांना भेटी देण्यासाठी गाड्यांचा ताफा निघत असे, यामुळे आदित्य ठाकरे आल्यावर फटाके उडवायचे की स्वागत करायचे हे कार्यकर्त्याना समजत नव्हते. त्यांना काही कळेपर्यंत ते पुढील ठिकाणी जाण्याची तयारी करत, त्यामुळे शिवेसना नेत्यांचीही दमछाक झाली.

विमानतळाहून शहरात येताना ठाकरे यांनी सकाळी ११ वाजता सिडको चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. उड्डाणपुलांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. एमएसआरडीसीच्या अभियंत्यांनी सिडको उड्डाणपूल जानेवारी २०१६ व मोंढा नाका उड्डाणपूल एक महिन्यात पूर्ण होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचा ताफा आंबेडकरनगर येथील प्रस्तावित आरोग्य केंद्राच्या पाहणीसाठी गेला. तेथे ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तेथून शिवशंकर कॉलनी येथे नालेसफाई कामांची पाहणी केली. मोंढा नाका येथील उड्डाणपुलाच्या पाहणीनंतर सावरकर चौकातील रस्त्याची पाहणी केली.

यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना साईड ड्रेन तयार करण्याच्या सूचना दिल्या. महावीर चौक ते सावरकर चौक रस्त्याच्या पाहणीनंतर महानुभाव आश्रम चौक ते पैठण लिंक रोड या दोन किलोमिटर रस्त्याच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन केले. त्यानंतर कांचनवाडी येथील नालेसफाई तसेच भूमिगत गटार योजनेच्या कामांची पाहणी करून आदित्य ठाकरे यांनी दौरा आटोपता घेतला. यावेळी त्यांच्यासोबत महापौर त्र्यंबक तुपे, पालकमंत्री कदम, खासदार चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती.

आता राज्य, केंद्र आणि महापालिकेतही सत्ता आहे. जनतेने आम्हाला कामे करण्यासाठी निवडून दिले आहे. जनतेला जे वचन दिले ती कामे पूर्ण करणार आहोत. शहरातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.

- आदित्य ठाकरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते पालिकेच्या अधिकारात यावेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शहराच्या कार्यक्षेत्रात असलेले रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेकडेच असले पाहिजेत. जेणेकरून रस्त्याची देखभाल व्यवस्थित होईल. यासाठी महापौरांचे अधिकारही वाढवले पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे,' असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

ठाकरे रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. शहरातील रस्ते, तीन उड्डाणपुलांच्या कामांची पाहणी त्यांनी केली. सायंकाळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'पालिका निवडणुकीपूर्वी मी आलो होतो. निवडणूक संपले की विसरणे ही शिवसेनेची संस्कृती नाही. घोषणा केलेल्या कामांची पूर्तता करणे हे आमचे कर्तव्य आहे. सुरू झालेल्या कामांना गती मिळाली की नाही, याची पाहणी करण्यासाठी आज आलो आहे. उड्डाणपूल, रस्त्यांच्या कामावर भर उन्हात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले. यापुढे दर तीन महिन्यांनी येऊन कामांचा आढावा घेतला जाईल. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले होते. त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत रस्त्यांची कामे सुरू झाली. पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे हे दोघे या कामांवर लक्ष ठेवून आहेत. सिडको बसस्टँड चौकातील उड्डाणपूल पश्चिमेकडून बाजूने वाढवून घेण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर झाला आहे. एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून हा प्रश्न मार्गी लावला जाईल. पाणीप्रश्नीही पुढील तीन महिन्यांत दिलासा मिळेल,' असे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील पाच प्रमुख रस्ते पीडब्ल्यूडीच्या ताब्यात आहेत. त्यांना निधी मिळण्यास अडचण येते. यावर काय उपाय? असे विचारले असता आदित्य म्हणाले, 'शहरातील रस्ते महापालिकेकडे द्यायला हवेत. कारण त्यामुळे देखभाल दुरुस्तीस अधिक सोपे जाते. किंबहुना महापौरांना किती अधिकार वाढविले पाहिजेत. यासंदर्भातही विचार झाला पाहिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५० नवे पेट्रोल पंप!

0
0

अब्दुल वाजेद, औरंगाबाद

वाहनधारकांची वाढती संख्या लक्षात घेता मराठवाडा आणि खान्देशात आगामी दोन वर्षांत अडीचशे नवे पेट्रोल पंप सुरू होणार आहेत. ग्रामीण भागात अजूनही सर्वदूरपर्यंत पेट्रोल पंपांचे जाळे पसरलेले नाही. त्यामुळे तेथील वाहनधारकांच्या अडचणी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ऑइल कंपनीच्या सूत्रांनी दिली.

आजघडीला औरंगाबाद जिल्ह्याची वाहन संख्या साडेनऊ लाखांवर गेली आहे. शहरात जवळपास पाच लाख वाहने आहेत. यामुळे औरंगाबादसह ग्रामीण भागातील काही मार्गावर पेट्रोल पंप सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव एचपीसीएल, आयओसी आणि बीपीसीएल या कंपनीकडे देण्यात आला आहे. ही मागणी लक्षात घेता ८०० पेट्रोल पंपाचे वाटप करण्याची जाहिरात मुंबईहून प्रसिद्ध केली होती. मात्र, या जाहिरातीच्या प्रकाशनानंतर काही तांत्रिक कारणामुळे पेट्रोल पंप वाटप करणे लांबणीवर पडले. या अडचणी दूर करण्यात यश आल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल पंप वाटपाची प्रक्रिया युद्धपातळीवर राबवली जाणार आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, हिंगोलीसह खान्देशचा भाग बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीच्या अखत्यारित आहे. या भागात आगामी दोन वर्षात अडीचशे पेट्रोल पंप वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.

सदस्यांचा विरोध

दोन पेट्रोल पंपामध्ये ठराविक अंतर असावे लागते. मात्र, मराठवाडा आणि खान्देशमध्ये अनेक ठिकाणी दोन पेट्रोल पंपामधील अंतर कमी आहे. त्यामुळे याठिकाणी अजून एखादा पेट्रोल पंप सुरू झाला, तर इतरांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पेट्रोल पंपाचे वाटप करताना दोन्ही पंपातील अंतराच्या नियमांचे पालन करावे, अशी मागणी जोर धरते आहे. शहरी भागात पेट्रोल पंपांचे अंतर अगोदरच कमी आहे. मात्र, ग्रामीण भागात तशी परिस्थिती नाही. या ठिकाणी जर पेट्रोल पंपाचे वाटप केले, तर इतर पंपांना आर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागू शकते. त्यामुळे पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनच्या अनेक सदस्यांनी या वाटपाला विरोध केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images