Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पेट्रोल पंपांवर सुविधांचा ठणठणाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः

शहरातील निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपांवर कंपनीने निश्चित केलेल्या सुविधा वाहनधारकांना पुरविल्या जात नाहीत. अनेक पंपांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, चाकांत हवा भरणे आदी व्यवस्था नाहीत. याशिवाय काही पंपांवर वाहने बेशिस्तपणे थांबत असल्याचा त्रास अन्य वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

मोंढ्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांना पिण्यासाठी आणि हवा भरण्याची सुविधा उपलब्ध नाही. सेव्हल हिल्स उड्डाणपुलाच्या उत्तरेकडे असलेल्या पंपावर पाणी आणि स्वच्छता गृहाची व्यवस्था आहे. गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील इस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपावर हवा भरून देण्याचेही यंत्र गायब आहेत. याशिवाय उल्कानगरी, शिवाजीनगर भागातील पेट्रोल पंपावरही वाहनधारकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. शहरातील निम्म्या पेक्षाजास्त पेट्रोल पंपावर कंपनीने निश्चित केलेल्या सुविधा वाहनधारकांना देण्यात आलेल्या नाहीत.

शहरातील हिंद सुपर, उस्मानपुरा भागातील पेट्रोल पंप वगळता अन्य ठिकाणी हवा भरणे आणि पाण्याची सोय करून देण्यात आलेली नाही. याशिवाय काही पेट्रोल पंपांवर पाण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. त्यात राज पेट्रोल पंप, कंपनीच्या पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह आणि पाण्याची सोय आहे.

काही पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी लागलेल्या वाहनांच्या रांगांनाही शिस्त नसते. एपीआय कॉर्नरच्या चौकाच्या पुढील असलेल्या पेट्रोल पंपावर अनेक वाहनधारकांना उन्हात उभे राहून पेट्रोल भरावे लागते. बीड बायपास रोडवर गोदावरी ढाब्याजवळील पेट्रोल पंपावर पेव्हर ब्लॉक बसविलेले नाहीत. त्याचबरोबर या परिसराचे व्यवस्थित सपाटीकरणही केलेले नाही.

सुविधा देणे परवडत नाही

पंप चालकांना पेट्रोल, डिझेल विक्रीतून मिळणारा नफा कमी असतो. यामुळे या सुविधा देणे पंप चालकांना परवडत नाही. हवा भरण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाते. या कर्मचाऱ्याचा पगार आणि इतर गोष्टींवर होणारा खर्च वाढला आहे. वाहनधारकांना सुविधा देण्यासाठी पैसे आकारण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी औरंगाबाद पेट्रोलिअम डिलर्स असोसिएशने संबंधित पेट्रोल कंपन्यांकडे केली आहे.

जागो ग्राहक जागो

पेट्रोल पंपावर हवा पाणी आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्राहकांकडून काही मोजकी रक्कम घेतली जाते. अनेक ग्राहकांना या सुविधेसाठी आपण पैसे मोजतो, हेच माहित नसते. तर ज्यांना याबद्दलची माहिती असते, असे ग्राहक या सुविधा न दिल्याबद्दल कोणतीही तक्रार करत नाहीत. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपचालकांचे फावते. ते या सुविधा देण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.

बेशिस्तीचे प्रमाणच अधिक

पंपांवर येणारी वाहने रांगेत उभी नसतात. त्यामुळे काही पंपांवर वाहनांची गर्दी होते. त्याचबरोबर दुचाकी वाहने उभी असलेल्या पंपावरूनच चारचाकी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यात येते. त्यामुळे पंपांवर वादाचे प्रसंगही उद्भवतात. चारचाकी वाहनांसाठी वेगळा पंप असावा, अशी दुचाकीधारकांची भावना आहे.

३६ पंपांवर सीसीटीव्ही नाहीत

पंपावर अनेक वेळा पेट्रोल भरणाऱ्यांसोबत वाहनधारकांची हुज्जत होत असते. याशिवाय काही वेळा मद्यपी वाहनधारक पंपावरील कर्मचाऱ्यांची हुज्जत घालतात, त्यांना दमदाटी करतात. अनेक जण बाटलीत पेट्रोल घेऊन जातात. वाहने जाळण्यासाठीही पेट्रोलचा वापर होऊ शकतो. त्यामुळे पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही लावण्याची गरज आहे. शहरातील ३६ पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत.

पंपावर उन्हात अनेक वेळ थांबावे लागते. तेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे पेट्रोल भरल्यानंतर पाणी पिण्यासाठी हॉटेलमध्ये जावे लागते. पेट्रोल पंपांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी.

- अश्विन चौधरी

अनेक पेट्रोल पंपांवर स्वच्छतागृह नसल्याचे वाहनधारकांना सांगितले जाते. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांसाठी उभारलेले स्वच्छतागृह वाहनधारकांसाठी असल्याचे दाखविण्यात येते. पेट्रोल पंपांवर वाहनधारकांसाठी स्वच्छतागृहाची वेगळी व्यवस्था असणे आवश्यक आहे. जेणेकरून वाहनधारकांना सोय होईल.

- एस. व्ही. श्रीनिवास

महिलांसाठी विशेष स्वच्छतागृहाची व्यवस्था शहरात कुठेही नाही. पेट्रोल पंपांवरही महिलांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही. महिला कर्मचारी व वाहनधारकांना यामुळे फारच त्रास होतो.- लता शेळके

पेट्रोल पंपावर हवा भरण्यासाठी यंत्र लावण्यात आलेले आहे. अनेक वेळा ते यंत्र खराब असल्याचे सांगण्यात येत असतात. यामुळे गाडी पक्चंर झाल्यास ढकलत न्यावी लागते. कधी कधी हवाही व्यवस्थ‌ित भरली जात नाही.- अजीम खान

जुन्या पेट्रोल पंपावर हवा, पाणी आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. मात्र, काही जुन्या पेट्रोलपंप चालकांनी येणाऱ्या ग्राहकांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या नवीन पेट्रोल पंपावर या सुविधा आहेतच.

- अखिल अब्बास, सचिव, औरंगाबाद पेट्रोलीयम डिलर्स असोसिऐशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीनिंग प्रेसिंगवर काँग्रेसची पकड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

गेल्या कित्येक वर्षांपासून ताब्यात असलेल्या सिल्लोड तालुका सहकारी जीनिंग प्रेसिंगवर आमदार अब्दुल सत्तार व प्रभाकर पालोदकर यांनी वर्चस्व राखले आहे. संचालक मंडळाच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपच्या व अन्य उमेदवारांनी अर्ज परत घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या निवडणुकीसाठी पॅनल उभे केले नव्हते, पण काही मतदार संघात उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

बिनविरोध निवडून आलेले संचालक मंडळ पुढीलप्रमाणेः वैयक्तिक मतदार संघ एकनाथ गरूड, अनिसखाँ पठाण, उत्तम नामदेव जाधव, दिनकर पवार, नरसिंग चव्हाण, शेख लतीफ शेख घासी, जीवनसिंग जाधव, संस्था सभासद प्रतिनिधी नानाराव विठ्ठल कळम, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ राजाराम पाडळे, ओबीसी मतदारसंघ जगन्नाथ कुदळ, भटके विमुक्त जाती मतदारसंघ रंगनाथ जरारे, महिला मतदारसंघ सखुबाई जाधव, लिलाबाई बनकर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त दुधाचे संकट

$
0
0

रवींद्र टाकसाळ, औरंगाबाद

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध भुकटीचे दर उतरल्यामुळे खासगी दूध डेअरींनी दुधाचे दर लिटरमागे तब्बल तीन रुपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांनी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडे धाव घेतली. परिणामी संघाला अतिरिक्त दूधाचा फटका बसला आहे.

'देवगिरी महानंद' या ब्रॅण्डने दुग्ध उत्पादनांची विक्री करणारा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ दररोज सरासरी ७० ते ७५ हजार लिटर दुधाचे संकलन करतो. त्यापैकी ६० ते ७० हजार लिटरची विक्री होते. उर्वरीत दुधाचे इतर पदार्थ तयार केले जातात. काही दूध मुंबईत पाठवले जाते. शासनाचा खरेदीदर २० रुपये प्रतिलिटर असूनही हा संघ २३ ते २४ रुपये प्रतिलिटरने दुधाची खरेदी करतो. परंतु, खासगी डेअरीचे दर कमी झाल्याने दोन महिन्यांपासून दररोजच्या सरासरी संकलनात २५ हजार लिटरची वाढ झाली आहे. परिणामी जिल्हा दूध संघानेही दुधाचा खरेदी दर दोन रुपयांनी कमी करून २१ रुपये केला आहे. इतर सहकारी संस्था व खासगी डेअरीपेक्षा हा भाव जास्त असल्याने दूध उत्पादक येथेच दूध देत असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी.बी. पाटील यांनी 'म.टा.'शी बोलताना दिली.

दररोज २५ हजार लिटर दुधाचे संकलन वाढल्याने जिल्हा संघासमोर या अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक खर्च, तापमानामुळे लिटरमागे २० पैशांनी वाढलेला शीतकरण खर्च यामुळे जिल्हा संघ अडचणीत आला आहे. सध्या अतिरिक्त दूध मुंबई महानंद व शासनाला पाठवण्यात येत आहे. अन्य सहकारी संस्थाही अडचणी सापडल्याने शासनाने मदत करावी, अशी मागणी होत आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे दर कपात

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध भुकटीचे दर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून उतरण्यास सुरुवात झाली. काही देशांच्या तुलनेत भारतीय दूध पावडर महाग असल्याने फार उठाव नाही. परिणामी, देशात मोठ्या प्रमाणात पावडर पडून आहे. मागणीच नसल्याने पावडर निर्मिती करणाऱ्या प्रकल्पचालकांनी दुधाचा खरेदी दर टप्प्या-टप्प्याने कमी करीत १४ ते १६ रुपये प्रतिलिटर वर आणला आहे. या प्रकल्पांना पुरवठा करणाऱ्या खासगी डेअरींनी खरेदी दर कमी केले. परिणामी दूध उत्पादकांनी सहकारी संघाकडे धाव घेतली आहे.

जिल्हा संघाला ४९२ दूध उत्पादक संस्था नियमित पुरवठा करतात. परंतु, खासगी डेअरीचे दर कमी झाल्याने दररोजचे संकलन वाढले आहे. त्याप्रमाणात ग्राहकांकडून मागणी नाही. ही स्थिती कायम राहिली तर अडचण निर्माण होईल.

- नंदलाल काळे, उपाध्यक्ष जिल्हा दुध संघ.

आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे भाव किलोमागे १४० ते १४५ रुपये झाले आहेत. शिवाय मागणी नसल्याने अनेक प्रकल्पांत साठा पडून आहे. त्यामुळे नाईलाजाने दुधाचे खरेदीदर कमी करावे लागले. शासनाने अनुदान देण्याची गरज आहे.

- एस. व्ही. कुलकर्णी, प्रभात डेअरी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घागरभर पाण्यासाठी वणवण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

आपेगाव व हिरडपुरी बंधारे पूर्ण कोरडे पडल्याने या भागातील चाळीस गावांमध्ये भीषण पाणीटंचाई भासत आहे. कोरड्या नदीपात्रात झरा खोदल्यानंतर गावकऱ्यांना थोडेफार पाणी मिळत आहे. त्यामुळे या भागातील गावकऱ्यांनी जायकवाडी धरणातून दोन्ही बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी केली आहे.

दोन महिन्याच्या कालावधीत जायकवाडी धरणातून दोनदा आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले. मात्र, दोन्ही वेळेस या दोन्ही बंधाऱ्यात अत्यल्प पाणी सोडण्यात आल्याने पंधरा दिवसांपासून दोन्ही बंधारे पूर्ण कोरडे पडले आहेत. परिणामी या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेवगाव, गेवराई व पैठण तालुक्यातील जवळपास चाळीस गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

या भागातील पैठण तालुक्यातील बहुतांशी गावांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरच्या पाण्याने केवळ माणसांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटतो. पण जनावरांसाठी व अन्य कामांसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. बहुतांशी गावकरी पाण्यासाठी कोरड्या पडलेल्या नदीपात्रात झरा खोदून पाणी मिळवत आहे. नदीपात्रात खोदलेल्या झऱ्यातून थोडे थोडे पाणी मिळते. त्यामुळे एक हंडा पाण्यासाठी गावकऱ्यांना जवळपास अर्धा तास वाट पहावी लागत आहे.

सध्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परळी थर्मलकरीता पाचशे क्युसेक प्रतितास या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावकरी पाण्यासाठी वणवण भटकत आहे. त्यामुळे शासनाने जायकवाडी धरणातून आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

बंधाऱ्यात पाणी असेपर्यंत आम्हाला पाण्याची चिंता नसते. पंधरा दिवसांपासून बंधारे कोरडे पडल्याने हाल होत आहेत. टँकरमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसाबसा सुटतो. इतर गरजांसाठी पाणी कोठून आणायचे हा प्रश्न आहे.

- मकबूल पठाण, गावकरी, नवगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जन्मदात्यानेच केला मुलीचा खून

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, सातारा

चारित्र्याच्या संशयावरून पोटच्या मुलीचा जन्मदात्याने व भावाने खून केल्याची घटना सातारा गावात घडली. तसेच तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांना खोटेच सांगितले, परंतु पोस्टमार्टम रिपोर्ट व मयताच्या बहिणीच्या जबाबावरून पोलिसांनी सूत्रे हलवत आरोपींना तात्काळ अटक केली.

हमशेराबाई मोईन खान (३०, रा. सातारा गाव) हिचे पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न लावून दिले, परंतु दुसरा नवरा वयाने मोठा असल्यामुळे ती त्याच्यासोबत न नांदता माहेरीच राहत होती. रविवारी सायंकाळी ती सासरी न नांदता इकडे तिकडे फिरत राहते म्हणून वडील बशीर खान महेताब खान (७० रा. सातारा गाव) यांनी हमशेराबाईस मारहाण केली. रविवारी रात्री १०.३० ते १२ च्या दरम्यान हमशेराबाईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुबीयांनी सातारा पोलिस ठाण्याला कळविली. पोस्टमार्टम रिपोर्टवरून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असता मयतेच्या बहिणीने वडील हमशेराबाई यांच्यात भांडण होऊन तिच्यावर संशय घेऊन झापडा, बुक्क्याने मारहाण केल्याचे सांगितले. अधिक चौकशी केली असता बशीरखान व भाऊ कदीरखान या दोघांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा दाबून खून केला. तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करत पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघींनी विष घेतले

औरंगाबाद : रंजना राजू अहिरे (वय ३५, रा. मिलकॉर्नर) यांनी सोमवारी पहाटे सहा वाजता घरात विषारी औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या घटनेत वर्षा पांडुरंग पाचरणे (वय १५, रा. हनुमाननगर, हर्सूल) या मुलीने सोमवारी सकाळी नऊ वाजता घरामध्ये विषारी औषध प्राशन केले. तिच्यावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दोन्ही घटनांची मेडिकल चौकीत नोंद केली आहे.

१७ दिवसांत दुसरा खून

सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सतरा दिवसात दुसरा खून झाल्याच्या घटना घडली. १ मे रोजी सीताबाई सूरज वाघमारे हिचे प्रेत आढळले होते. तिच्या मारेकऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. तोवर साताऱ्यात खुनाची दुसरी घटना घडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेयजल योजनेतील दोषींवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिऊर राष्ट्रीय पेयजल योजनेची २१ दिवसांत सत्यशोधन समितीची स्थापना करुन दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करावी. अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

शिऊर येथील सुभाष देशमुख यांनी शिऊर राष्ट्रीय पेयजल योजनेबाबतची सविस्तर माहिती लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. वैजापूर तालुक्यीतल शिऊर हे पंधरा-वीस हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावाला दोन विहिरी खोदून पाणी पुरवले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते, परंतु गावात २००६ पासून आत्तापर्यंत गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय पेयजल योजना मन्याड धरणातून प्रस्तावित का करण्यात आली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दहा टक्के लोकवर्गणी कोणी भरली, कशी भरली, त्यासाठी निधी कोठून आणला असे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. गाव शंभर टक्के हणगदारीमुक्त झालेले नसतानाही योजनेच्या निधीचा दुसरा हप्ता ग्रामपंचायतने कसा घेतला असा प्रश्न निर्माण होतो आहे. चार कोटींची योजना २६ जानेवारी २०११ रोजी एकाच दिवशी कागदोपत्री पूर्ण कशी झाली आणि एवढी मोठी योजना असूनही गावाला टँकरने पाणी पुरवठा होत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

योजना प्रस्तावित करण्याकरता बोलावलेल्या सभेत जी उपस्थिती दाखवली गेली ती खरी आहे का, कार्यकारी अभियंत्यांना अंदाजपत्रकारच्या पाच टक्के रक्कम देण्याचे ठरावात नमूद केलेले आहे ते कसे आणि ते कुठल्या कायद्यानुसार असा प्रश्न निर्माण होतो. पेयजल योजनेत गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे. या योजनेत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, ग्रामीण पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण या विभागांनी गावाला पाण्याविना ठेवले आहे ही वस्तुस्थिती आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी २१ दिवसांच्या आत सत्यशोधन समिती स्थापन करून चौकशी करावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा देशमुख यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रडारवरील बुकी शहरातून पसार

$
0
0

औरंगाबाद : पोलिसांच्या कारवाईनंतर शहरातील रडारवर असलेले बुकी पसार झाले आहे. दरम्यान, प्रमुख आरोपींच्या तपासासाठी सायबर सेलचे पोलिस निरीक्षक दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. पसार बुकींमध्ये शहरातील आणखी काही प्रतिष्ठितांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गुन्हे शाखेने गुरुवारी (१४ मे) रात्री आयपीएल स्पर्धेतील क्रिकेट सामन्यावर बेटींग सट्टा चालवणाऱ्या सहा बुकींना अटक केली होती. त्यांच्यात नरेश पोतलवाड, अलोक अग्रवाल, प्रफुल्ल राठी, ललित कोठारी, अनिल मुनोत व विनय जैन या प्रतिष्ठितांचा समावेश आहे. छापा पडला त्यावेळी नरेश पोतलवाड हा मोबाइल लाइनबॉक्सच्या माध्यमातून २८ बुकींचे काम करीत असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हेशाखेने या २८ बुकींवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यापैकी स्वप्नील मणियार या एका बुकीला अटक करण्यात आली. ही कारवाई होताच शहरातील इतर बुकी पसार झाले असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. दरम्यान या बुकींचे धागेदोरे दिल्ली येथे असल्याचे तपासात समोर आले आहे. दिल्ली येथील प्रमुख सुत्रधाराला पकडण्यासाठी सायबर सेलचे पोलिस निरीक्षक गौतम पातारे सध्या दिल्लीत ठाण मांडून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीला ३० कोटींचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) चार विभागांच्या बांधकामासाठी तसेच घाटी परिसरातील इमारतींच्या किरकोळ दुरुस्त्यांसाठी ३० कोटी रुपये मिळणार आहेत. यापैकी विविध विभागांच्या बांधकामासाठी २६ कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री देणार आहेत, तर इमारतीच्या दुरुस्त्यांसाठी अर्थमंत्र्यांकडून ३ कोटी मिळणार आहेत. तसेच किरकोळ दुरुस्त्यांसाठी घाटीला दरवर्षी एक कोटी रुपये मिळणार आहेत. यातील यंदाची रक्कम घाटीला प्राप्त झाली आहे. त्याचवेळी १५० कोटींच्या घाटीतील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार असल्याचे शुभ संकेत आहेत.

घाटीतील शल्यचिकित्साशास्त्र, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, बालरोगशास्त्र व अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागांच्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी २६ कोटी रुपये मान्य केले असून, तसा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून (डीएमइआर) नुकताच मागवला आहे. संचालनालयाच्या आदेशानुसार घाटीने हा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या आहेत. हा प्रस्ताव पूर्ण होताच घाटीकडून 'डीएमइआर'कडे व 'डीएमइआर'कडून पालकमंत्र्यांकडे पाठविला जाणार असल्याचे समजते. यामध्ये या चार विभागांची स्वतंत्र इमारत उभी राहणार आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्याचबरोबरच घाटीला दरवर्षी किरकोळ बांधकाम व नूतनीकरणासाठी एक कोटी रुपये मिळणार असून, यंदाची रक्कम घाटीला प्राप्त झाली आहे. याबरोबरच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण यांच्याशी संपर्क साधून तीन कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. या निधीतून नूतनीकरण व किरकोळ दुरुस्ती होणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये विविध इमारतींचे वॉटर प्रुफिंग, गळक्या ओटींची-वॉर्डांची कामे, ड्रेनेज लाईनचे काम होणार असल्याचे समजते.

सुपरस्पेशालिटीचे काम लवकरच

घाटीच्या नेत्र विभागाच्या मागील बाजूस १५० कोटी खर्चून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार १२० कोटी रुपये व राज्य सरकार ३० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत १८,३४३ चौरस मीटरची प्रत्यक्ष जागा असलेले सहा मजल्यांचे हॉस्पिटल उभे राहणार आहे. यामध्ये नेफ्रॉलॉजी, युरॉलॉजी, बर्न व प्लास्टिक सर्जरी, न्युरोसर्जरी, कार्डिओलॉजी, निओनॅटॉलॉजी आदी विषयांतील उपचार व शस्त्रक्रिया होणार आहेत. स्वतंत्र ओटी व सिटी स्कॅनसह सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. या हॉस्पिटलचे संपूर्ण बांधकाम व उपकरणांची उपलब्धता केंद्र सरकारच्या अख्त्यारित होणार आहे. लवकरच या बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी सांगितले.

निधी परत जाऊ नये

मागेही घाटीला मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला, पण तो वेळेत खर्च न झाल्याने परत गेल्याचे दुर्दैवी प्रकार झाले आहेत. 'डीपीसी'मधून उपकरणांसाठी लाखो-कोट्यवधी रुपये मिळतात, परंतु वेळेत खरेदीची प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे शेवटी घाटीच्या पदरात काहीच पडत नाही, असे वारंवार दिसून आले आहे. निदान आता मिळालेल्या मोठ्या प्रमाणावरील निधीचा योग्य विनियोग व्हावा, अशी अपेक्षा केली जात आहे.

नव्याने बांधकाम, नूतनीकरण व दुरुस्त्यांसाठी एकूण ३० कोटींचा निधी घाटीला मिळणार आहे. त्यामुळे बांधकामाशी संबंधित सर्व प्रश्न मिटतील, अशी अपेक्षा आहे.

- डॉ. भास्कर खैरै, प्रभारी अधिष्ठाता, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विस्थापितांच्या पुनर्वसनाला गती द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठवाड्यातील विविध जलसिंचन प्रकल्पांसाठी विस्तापित झालेल्या गावांच्या पुनर्वसनाला गती देण्यात येईल. तसेच पुनर्वसन करण्यात येणाऱ्या गावांसाठी खर्चांची कमतरता पडू देणार नाही,' असे आश्वासन मदत व पुनर्वसन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सोमवारी (१८ मे) दिले. त्यांनी दिवसभर विभागीय आयुक्त कर्यालयात विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला.

सकाळच्या सत्रात कांबळे यांनी अल्पसंख्यांक विकास विभागाच्या कामांचा तसेच विभागातील पुनर्वसनांच्या कामाचा आढावा घेतला. दुपारी सामाजिक सहाय आणि उत्पादन शुल्क विभागाशी निगडित कामांचा आढावा घेतला. पुनर्वसन आढावा बैठकीत कांबळे म्हणाले, 'कोणत्याही विकास कामांसाठी शासानाकडे जमीन, घर, गाव सोपवले की संबंधित प्रकल्पाचे काम होते. मात्र, त्यासाठी घर, जमिनी देणाऱ्या गावकऱ्यांचे पुनर्वसन होत नाही, अशी भावना निर्माण झाली आहे. संबंधित प्रकल्पाच्या एकूण रकमेच्या पाच टक्के रक्कम ही त्या प्रकल्पासाठी पुनर्वसित केलेल्या लोकांच्या सोयी-सुविधासाठी खर्च करणे आवश्यक असते. मात्र, आता ही रक्कम देता येत नाही. पुनर्वसन झालेल्या या नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी खर्चाच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली असून, त्यांच्या तातडीच्या सुविधांसाठी कोणताही निधी अपुरा पडणार नाही. जलयुक्त शिवाराच्या निधीचाही यासाठी उपयोग होऊ शकतो,' असे कांबळे यांनी सांगितले.

मराठवाड्यात १९७६ पूर्वी तयार करण्यात आलेले ३, तर त्यानंतरच्या ४३ प्रकल्पांमुळे २०४ गावांना विस्तापित व्हावे लागले. यापैकी ३६ गावांमध्ये नियमाप्रमाणे सोयी-सुविधा देण्यात आल्याचे, उपायुक्त महेंद्र हरपाळकर यांनी सांगितले.

बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी विभागातील आठही जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या कामांचा आढावा सादर केला. नांदेड जिल्ह्यातील लेंडी प्रकल्पातसंदर्भात अहवाल उपायुक्त महेंद्र हरपाळकर यांनी सादर केला. पुनर्वसनाच्या कामासंदर्भात विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीत माहिती सादर केली. बैठकीला औरंगाबादचे जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह, नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, जालन्याचे जिल्हाधिकारी नायक, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनववरे, उपायुक्त जितेंद्र पापळकर यांच्यासह विभागातील महसूल तसेच पुनर्वसन यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वाहतुकीचा गनिमी कावा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या हातावर तुरी देत रिक्षाचालकांनी सध्या गल्ली-बोळातून जास्तीचे प्रवासी कोंबत अवैध प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. पोलिस कारवाई टाळण्यासाठी रिक्षाचालकांचा हा गनिमी कावा शहरात ठिकठिकाणी दिसून येत आहे.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पदभार स्वीकारताच शहरातील बेशिस्त वाहतूक सुधारण्याचा निर्धार केला. त्यासाठी शहागंज बाजारपेठेतील टेंपोचालकांचे अतिक्रमण हटवले. रेल्वे स्टेशनवरील वाहतुकीला वळण लावले, काळीपिवळी आणि जड वाहनांचे मार्ग निश्चित केले. आता भंगार, परमिट नसणाऱ्या, जास्त प्रवासी कोंबणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक शाखेने कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई टाळण्यासाठी रिक्षाचालक आता पोलिसांनाच वळसा घालत आहेत. त्यासाठी मुख्य रस्त्याऐवजी गल्ली-बोळातले मार्ग त्यांनी वाहतुकीसाठी निवडले आहेत. जयभवानीनगरच्या गल्ल्यातून राजनगरकडे जाणारा मार्ग, उल्कानगरी भागातील पेट्रोल पंपासमोरच्या मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करण्यात येत आहे. क्रांतिचौकातील पोलिसांना टाळण्यासाठी उस्मानपुरा भागातून काल्डा कॉर्नरच्या मार्गाने वाहतूक सुरू आहे. याशिवाय बालाजीनगर आणि हेडगेवार रुग्णालय ते गजानन महाराज मंदिर, उल्कानगरी ते सूतगिरणी चौक या मार्गानेही रिक्षाचालकांची वाहतूक सुरू आहे. या मार्गावरून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन रिक्षाचालक रिक्षा दामटत आहेत.

मुकुंदवाडी स्टेशनसमोर रिक्षाचालक मोकाट

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनसमोर बेशिस्त पद्धतीने अनेक रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना स्टेशनच्या बाहेर पडणे त्रासदायक ठरते. येथील रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे वसूल करतात, अशी प्रवाशांची तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याच्या तपासासाठी पोलिस मध्यप्रदेशात रवाना

$
0
0

औरंगाबाद : छावणी येथील दरोडा प्रकरणात आरोपींच्या शोधासाठी छावणी पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात रवाना झाले. उद्योजक जुनेदखान यांच्या घरावर २४ फेब्रुवारी रोजी दरोडा टाकून १४ लाख रुपयांचा ऐवज पळवण्यात आला आहे.

जुनेदखान यांच्या घरावर मध्यप्रदेश येथील दरोडेखोर मुछड सांळुकी व स्थानिक आरोपींनी दरोडा टाकून ऐवज पळवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दरोड्यानंतर दोन दिवसात नऊ दरोडेखोरांना अटक करून 'मकोका' लावला आहे. या टोळीतील मध्यप्रदेशातील काही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. 'मकोका' लावण्यात आलेल्या आरोपींवर मध्यप्रदेशात गुन्हे दाखल आहेत का याची माहिती पोलिस घेत आहेत. यासाठी सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे व पथक मध्यप्रदेशात रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रोझोनमध्ये मुलांसाठी लंडनसारखी टुरिस्ट बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पर्यटकांसह बालगोपाळांना लंडन दर्शनासाठी ज्याप्रमाणे ओपन डेक बसेस फिरवल्या जातात त्याच धर्तीवर शहरातील प्रोझोन मॉलमध्ये टुरिस्ट बस चालविण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या सुटीत धम्माल खरेदी आणि अनोखी सफरी याचा आनंद लुटण्यासाठी प्रोझोनला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केवळ खरेदीच नव्हे, तर असंख्य प्रकारचे फुड्स, मनोरंजनासाठी प्रोझोन मॉल ओळखला जातो. याठिकाणी नामांकित कंपन्यांची दालने असून मुलांच्या मनोरंजनासाठी एकापेक्षा एक प्ले स्टेशन सुद्धा आहेत. लहान मुलांना मॉलचे दर्शन घडविण्यासाठी लहानशी रेल्वे उपलब्ध आहे. लंडनप्रमाणे ओपन डेक बस आता मॉलचे नवे आकर्षण असणार आहे. केवळ लहान मुलेच नव्हे तर तरुण-तरुणींना देखील या बसमध्ये बसून मॉल दर्शन करता येणार आहे. ओपन डेक बसच्या वरच्या मजल्यावर मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सेफ्टी बेल्ट लावण्यात आले आहेत. वरच्या मजल्यावर आठ लहान मुले-मुली, तर खालच्या फ्लोअरवर सहा जण सफारीचा आनंद घेऊ शकतात.

आम्ही प्रोझोनच्या माध्यमातून औरंगाबादकरांच्या खरेदीला नवे परिमाण देण्यात यशस्वी झालो आहोत. प्रोझोन मॉलमध्ये लहान मुलांपासून सर्व वयोगटासाठी खरेदीची एकापेक्षा एक दालने आहेत. आता ओपन डेक बसमुळे मॉलमध्ये आलेल्या कुटुंबांना छान अनुभव घेता येणार आहे.

- अनिल इरावणे, अध्यक्ष, प्रोझोन मॉल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहने जाळणाऱ्या आरोपीच्या भावाला तलवारीसह अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी अटक केली. जयभवानीनगरात वाहने जाळणारा आरोपी जॉन तीर्थेचा हा भाऊ आहे. रविवारी सकाळी जॉनला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांशी याने झटापट केली होती.

गुन्हे शाखेचे पथक रविवारी सकाळी जॉन उर्फ भरत तीर्थे या आरोपीला पकडण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. यावेळी त्याचा भाऊ सतीश शंकरराव तीर्थे (वय २६, रा. जयभवानीनगर) याने पोलिसांना अटकाव करीत जॉनला पळून जाण्यासाठी मदत केली होती. जॉनला नंतर अटक करण्यात आली. दरम्यान, रविवारी सायंकाळी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळील रिक्षा स्टँडजवळ सतीश हा तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सतीशला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या पँटच्या आतील बाजुला लपविलेली एक धारदार तलवार पोलिसांना सापडली. त्याला अटक करण्यात आली असून, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हेशाखेचे जमादार मच्छींद्र ससाणे, भीमराव आरके, गोविंद पचरंडे, प्रभाकर राऊत आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशीत ‘स्टरलाइट’ची टाळाटाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्टरलाइट कंपनीकडून गुन्हेशाखेला तपासाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेल्या एका अधिकाऱ्याला कंपनीने परस्पर रजेवर पाठवल्याचे ‌समोर आले आहे. दरम्यान, पुरवठा मॅनेजर अमित रत्नपारखी याच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी (१८ मे) संपल्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्याच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ झाली.

खाम नदीत सोडण्यात आलेले विषारी रसायन स्टरलाइट या कंपनीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीचा पुरवठा मॅनेजर अमित रत्नपारखी हा अटकेतील सुमित खांबेकर, आगाखान यांचा साथीदार असल्याचे तपासात समोर आले आहे. गेल्या सोमवारी अमित रत्नपारखीला गुन्हेशाखेने अटक केली होती. सोमवारी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी केलेल्या मागणीनुसार त्याच्या कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली. दरम्यान, गुन्हेशाखेने स्टरलाइट कंपनीला तपासासाठी काही कागदपत्रे पुरवण्याबद्दल कळविले होते. तसेच काही ‌अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. कंपनीने यासाठी सुरुवातीला आठ दिवसांची मुदत मागून घेतली. मात्र गुन्हेशाखेने कारवाईचा इशारा दिल्यानंतर काही कागदपत्रे सादर केली. मात्र चौकशीसाठी बोलावलेल्या एका अधिकाऱ्याला त्यांनी परस्पर रजेवर पाठवल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान सोमवारी तीन अधिकाऱ्यांची तसेच कंत्राटदाराची गुन्हेशाखेने चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीच्या कारची धडक; वृद्धाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकीला धक्का लागल्याचा कांगावा करून जबरदस्तीने पळवलेल्या कारच्या धडकेत एका सत्तर वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन तरुणांवर क्रांतिचौक पोलिस ठाण्यात कारचोरीचा व जिन्सी पोलिस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

'टॅक्सी फॉर शुअर' चे टॅक्सीचालक गणेश वैद्य सोमवारी (१८ मे) सकाळी सहा वाजता बाबा पेट्रोलपंप येथून पेट्रोल भरून बाहेर पडले. त्यावेळी एका दुचाकीचा त्यांच्या कारला धक्का लागला. दुचाकीवरील शेख शाहरूख शेख नजिबोद्दिन व शेख फरहान (रा. युनूस कॉलनी, कटकटगेट) यांनी कार अडवली. या दोघांनी दुचाकीचे नुकसान झाल्याचे सांगत नुकसान भरपाईची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्यास गणेशने नकार दिल्यानंतर शाहरूख याने कारचा ताबा घेतला. कारचालकासह तो कटकटगेट, युनूस कॉलनीकडे जबरदस्तीने कार घेऊन येत होता.

यावेळी शेख अजीज शेख छोटे (वय ७०, रा. युनूस कॉलनी) हे जेष्ठ नागरिक वर्तमानपत्र खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. तेव्हा रोशन गेट भागात निष्काळजीपणे कार चालवणाऱ्या शाहरूखने पायी जाणाऱ्या शेख अजीज यांना धडक दिली. या धडकेत तो सुद्धा जखमी झाला. या अपघातानंतर घाबरलेल्या मुळ कारचालक गणेश वैद्य याने घटनास्थळावरून पलायन केले. त्याने क्रांतिचौक पोलिस ठाणे गाठून सकाळपासूनचा प्रकार सांगितला व अपघाताचीही माहिती दिली.

वैद्य याच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शेख अजीज यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. क्रांत‌िचौक पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...या कलाकृतीचा चित्रकार अंधारातच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पर्यटनदृष्ट्या समृद्ध औरंगाबाद आणि डनहाँग (चीन) ही शहरे 'सिस्टर सिटी' करण्याचा करार नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. चीनमध्ये डनहाँगचे उपराज्यपाल जिया हाँगमीन यांना फडणवीस यांनी 'पद्मपाणी' चित्र भेट दिले. हे चित्र औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचे आहे; मात्र याबाबत कुलकर्णी यांना कळवण्याचे सौजन्यही कला संचालनालयाने दाखवले नाही. शिवाय मूळ चित्रावरून दुसरे चित्र रेखाटून कुणी स्वतःच्या नावावर दिले असण्याची शक्यता आहे.

चीन देशाची महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात चीन दौरा केला. या दौऱ्यात प्राचीन पर्यटन वारसा असलेल्या औरंगाबाद आणि डनहाँग शहरात 'सिस्टर सिटी' करार झाला. या कार्यक्रमाला डनहाँगचे उपराज्यपाल जिया हाँगमीन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात फडणवीस यांनी हाँगमीन यांना अजिंठा येथील प्रसिद्ध 'पद्मपाणी' चित्राकृती भेट दिली. विशेष म्हणजे हे चित्र रेखाटलेले चित्रकार विजय कुलकर्णी यांना याबाबत साधी कल्पनाही नाही. अजिंठा चित्रशैलीसाठी कुलकर्णी जागतिक स्तरावर

परिचित आहेत. औरंगाबाद येथील स्टुडिओत त्यांचे काम सुरू असते. देशभरातील जाणकार रसिक चित्रांची खरेदी करतात. विशेषतः 'पद्मपाणी' आणि 'वज्रपाणी' चित्रांना सर्वाधिक मागणी असते. पद्मपाणी चित्र चीनमध्ये पोहचले; पण, याबाबत कुलकर्णी यांना अंधारात ठेवण्यात आले.

कला संचालनालयाने किमान सौजन्य म्हणून माहिती द्यायला हवी होती अशी खंत कुलकर्णी यांनी व्यक्त केली. वृत्तपत्रात संबंधित फोटो झळकल्यानंतर कुलकर्णी यांनी आपले चित्र ओळखले. आपल्या मूळ चित्रावर बेतलेले चित्र कुणी स्वतःच्या नावावर देण्याची शंकाही त्यांना आहे. दरम्यान, याबाबत कला संचालनालय व सांस्कृतिक कार्य संचालनालयाशी संपर्क साधला असता ठोस माहिती मिळाली नाही.

कलाक्षेत्राची उदासीनता

प्रसिद्ध चित्रकारांच्या दुर्मिळ चित्रांची कोट्यवधी रुपयांना विक्री करणे, मूळ चित्रकाराला श्रेय न मिळू देणे असे अनेक प्रकार कला क्षेत्रात वाढले आहेत. मृदू स्वभावाचे चित्रकार कुलकर्णी या व्यवहारापासून अलिप्त आहेत. वेरूळ लेणीच्या पायथ्याशी अनेक वर्षे चित्रकला जोपासणारे कुलकर्णी कला संचालनालयाकडून उपेक्षित आहेत.

प्रसारमाध्यमात चित्र पाहिल्यानंतर आश्चर्य वाटले. हे चित्र कुणी खरेदी केले आणि चीनपर्यंत कसे पोहचले याची माहिती नाही. किमान मूळ चित्रकाराला कळवण्याचे सौजन्य दाखवणे आवश्यक होते.

- विजय कुलकर्णी, चित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेत आता ‘पोएम’ शस्त्रक्रियाही उपलब्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्युच्च तंत्रज्ञानासह केली जाणारी 'पर ओरल एन्डोस्कोपिक मायोटोमी' (पोएम) ही क्लिष्ट शस्त्रक्रिया आता औरंगाबादमध्येही उपलब्ध झाली असून, मराठवाड्यातील पहिलीच शस्त्रक्रिया ११ मे रोजी एमजीम रुग्णालयामध्ये यशस्वी झाली. विशेष म्हणजे गेवराई तालुक्यातील एका खेड्यातील ५१ वर्षीय व्यक्तीवर ही शस्त्रक्रिया झाली. 'थर्ड स्पेस एन्डोस्कोपी' या अत्युच्च वैद्यक तंत्राद्वारे २००७ मध्ये जगात पहिल्यांदा जपानमध्ये, २०१२ मध्ये मुंबईत, २०१४ मध्ये पुण्यात, तर औरंगाबादमध्ये नुकतीच ही शस्त्रक्रिया झाली.

त्र्यंबक वडाजी गायके (ता. गेवराई, जि. बीड) यांना तब्बल दोन महिन्यांपासून गिळण्यास आणि जेवल्यावर उलट्यांचा तीव्र त्रास होत होता. पोटामध्ये पाण्याचा एक घोट गेला तरी तत्काळ दुप्पट पाणी बाहेर पडत होते. 'अॅकेलेशिया कार्डिया' या आजारामध्ये अन्ननलिकेतून जठरामध्ये जाणारे अन्न-पाणी ज्या 'व्हॉल्व्ह'सारख्या भागातून जाते, तो भाग अतिशय घट्ट-टणक होऊन जातो. त्यामुळे 'व्हॉल्व्ह'च्या शिथिलतेअभावी रुग्णाने खाल्लेले अन्न जठरामध्ये न जाता तत्क्षणी पुन्हा वापस अन्ननलिकेतून जसेच्या तसे बाहेर पडते. एरवी सामान्यपणे अन्न-पाणी अन्ननलिकेतून जातानाच संवेदन प्रक्रियेमुळे हे 'व्हॉल्व्ह' आपोआप उघडते व अन्न-पाणी जठरामध्ये जाताच पुन्हा आपोआप बंद होऊन जाते. त्यामुळेच जठरातील आम्ल नैसर्गिकरित्या बाहेर येत नाही. मात्र, 'अॅकेलेशिया कार्डिया'मध्ये हे होत नाही व खाल्लेले अन्न पुढे न जाता उलट्या होऊन बाहेर फेकले जाते. परिणामी, रुग्णाची स्थिती दिवसेंदिवस अतिगंभीर होत जाते. या आजाराचे प्रमाण ०.५ ते १ टक्क्यांपर्यंत आहे.

अशा केसेसमध्ये 'पोएम' शस्त्रक्रियेद्वारे आणि विशेष म्हणजे 'शर्ड स्पेस एन्डोस्कोपी'द्वारे 'व्हॉल्व्ह'ला विविध छेद देऊन अन्न-पाणी जठरामध्ये जाऊ शकेल, अशी खास शिथिलता आणली जाते. त्यासाठी अन्ननलिकेतून जठरामध्ये एन्डोस्कोपद्वारे स्नानूचा भाग कापून अन्न-पाणी जाण्यासाठी विशेष 'पिन्स'च्या सहाय्याने खास मार्ग तयार केला जातो.

तब्बल अडीच-तीन तासांच्या क्लिष्ठ शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाच्या जिवाला धोका होऊ शकतो. मात्र एमजीएमच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख, सीईओ डॉ. प्रवीण सूर्यवंशी व सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. बधीकरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. संहिता कुलकर्णी, शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. सुडे, सहाय्यक डॉ. स्वरूप आदींनी शस्त्रक्रियेमध्ये सहकार्य केले.

१२ हजारांत शस्त्रक्रिया

आता रुग्णाच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत असून, या शस्त्रक्रियेसाठी पुण्या-मुंबईत दीड लाख रुपये घेतले जातात. मात्र रुग्णाची स्थिती पाहून केवळ १२ हजारांच्या मानधनामध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रसंगी एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित श्रॉफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे बजेट संकटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे नवीन वर्षातील बजेट संकटात सापडण्याची शक्यता आहे. तब्बल ७२ कोटी रुपयांची बिले अधिकाऱ्यांच्या टेबलवर प्रलंबित आहेत. नव्याने तयार केल्या जाणाऱ्या बजेटमधून ही रक्कम वजा केल्यास विकास कामांसाठी निधी शिल्लक राहणार नाही, असे बोलले जात आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने महापालिकेने चार महिन्यांसाठी लेखानुदान सादर केले. सुमारे अडीचशे कोटी रुपयांचे हे लेखानुदान आहे. निवडणुकीनंतर महापालिका स्थापन झाली. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या पालिकेसमोर नवीन वर्षाचे बजेट मांडण्याची तयारी लेखा विभागाने सुरू केली आहे. उर्वरित आठ महिन्याचे हे बजेट असेल. गतवर्षीचे महापालिकेचे बजेट ९०२ कोटी रुपयांचे होते. सुधारित बजेट सादर केल्यावर, त्यात सुमारे चारशे कोटी रुपयांची तूट आली. आता हाती आलेल्या माहितीनुसार ठेकेदारांची प्रलंबित बिले पालिकेला प्राधान्याने द्यावे लागतील.

७२ कोटी रुपयांची ही बिले आहेत. याशिवाय आठ ते दहा कोटी रुपयांची बिले दाखल होण्याच्या प्रक्रियेत आहेत. या प्रलंबित बिलांचा परिणाम नव्याने तयार केल्या जाणाऱ्या बजेटवर होईल, असे मानले जात आहे. यंदा विकास कामांना बजेट देता येणार नाही. जो ठराविक खर्च आहे त्यासाठीच तरतूद करावी लागेल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असे झाले तर नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा भ्रमनिरास होण्याचीच शक्यता आहे. पहिल्याच वर्षी त्यांना आपल्या वॉर्डातील विकास कामांसाठी बजेट मिळण्याची शक्यता नाही.

लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली. काही कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत, हे त्यांनी लक्षात आणून दिले आहे. असे असले तरी गडबडून जाण्याचे कारण नाही. पाण्यावरचा महापालिकेचा खर्च खूप कमी झाला आहे. ड्रेनेजवरचा खर्चही कमी झाला आहे. रस्ते, दिवाबत्ती आणि साफसफाई याच कामांवर लक्ष द्यावे लागणार आहे. बजेट फुगवण्याचा प्रकार यावेळी होणार नाही. वास्तववादी बजेट तयार करून सर्व नगरसेवकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.

- त्र्यंबक तुपे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४४ खासगी शाळांवर गुन्हे दाखल करणार

$
0
0

औरंगाबाद : मान्यता न घेता अनधिकृतपणे चालवल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील ४४ शाळांवर तत्काळ गुन्हे दाखल केले जातील, नवीन वर्षांत अनधिकृत शाळा कोणत्याही परिस्थितीत चालू देणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी सोमवारी दिला.

स्थायी समितीची बैठक अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शिक्षकांच्या अंतरजिल्हा बदल्यांच्या विषयावर दीपक राजपूत, रामदास पालोदकर यांनी अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ज्ञानेश्वर मोटे यांनी सिल्लोड तालुक्यातील अनधिकृत शाळांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर राजे शिवाजी इंग्रजी स्कूल निल्लोड, स्वामी विवेकानंद मराठी प्राथमिक शाळा गोळेगाव आणि किडस् गुरूकुल विद्यामंदिर सिल्लोड या तीन शाळा अनधिकृत असल्याचे लेखी उत्तर देण्यात आले. मोटे यांनी केवळ तीनच नव्हे, तर आणखी काही शाळा अनधिकृत असल्याचा आरोप केला व अधिकारी चुकीची माहिती देत आहेत असे ते म्हणाले. अॅड. मनोहर गवई यांनीही अनधिकृत शाळेबद्दल तक्रार केली. या शाळेची चौकशी केल्याचे शिक्षणाधिकारी उपासनी यांनी सांगितले. गटशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी चौकशी अहवाल वाचून दाखवला. जिल्ह्यातील अनेक शाळा बिनधास्तपणे चालवून पालकांची फसवणूक केली जाते, असे स्थायी समितीच्या अन्य सदस्यांनी प्रभावीपणे मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर-नगरसेवकांत जुंपली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतील विरोधीपक्ष नेतेपदावरून महापौर त्र्यंबक तुपे आणि एमआयएमच्या नगरसेवकांत सोमवारी खडाजंगी झाली. एमआयएमच्या नगरसेवकांनी महापौरांवर कॉँग्रेसशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला. त्याला प्रत्युत्तर देताना महापौर म्हणाले, 'तुम्हाला जे समजायचे ते समजा. कुठे जायचे तेथे जा. नगरविकास खात्याचा निर्णय येईपर्यंत मी विरोधीपक्षनेत्यांची नियुक्ती करणार नाही.'

महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक झाल्यापासून महापालिकेत विरोधीपक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि एमआयएममध्ये वाद सुरू आहे. एमआयएमला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता नाही. त्यामुळे विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसला द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक अफसरखान यांनी केली. तसे पत्रही महापौर कार्यालयाला दिले. एमआयएमने देखील महापौर कार्यालयाला पत्र देऊन विरोधीपक्षनेतेपद देण्याची मागणी केली. महापौर त्र्यंबक तुपे यांनी हे दोन्ही पत्र राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवून दिले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने हे प्रकरण नगरविकास खात्याकडे सोपवले. नगरविकास खात्याने अद्याप त्यावर काहीच निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान सोमवारी एमआयएमचे सर्व नगरसेवक अॅड. शेख सलीम यांना घेऊन महापौरांना भेटले. एमआयएमलाच विरोधीपक्षनेतेपद कसे दिले पाहिजे, हे त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौर आपल्या मतावर ठाम होते. नगरविकास खात्याचा अभिप्राय आल्यानंतर विरोधीपक्षनेतेपदाचा निर्णय केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एमआयएमचे काही नगरसेवक चिडले. एमआयएमला विरोधीपक्षनेतेपद द्यायचे नाही, असे तुम्ही ठरवले आहे का, असे म्हणत काँग्रेसशी तुम्ही हातमिळवणी केल्याचा आरोप त्यांनी महापौरांवर केला. त्यामुळे महापौर संतापले. तुम्हाला जे समजायचे ते समजा. कुठे जायचे तेथे जा. नगरविकास खात्याचा अभिप्राय आल्याशिवाय मी काहीच निर्णय घेणार नाही. महापौरांच्या या भूमिकेमुळे एमआयएमच्या नगरसेवकांना माघारी फिरावे लागले.

परस्पर संपर्क साधा

राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि. ज. वागळे यांनी पालिका आयुक्तांच्या नावे पत्र पाठवले असून विरोधीपक्षनेतेपद देणे ही बाब राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे त्या संबंधीचे पत्र आवश्यक त्या कार्यवाहीसाठी नगरविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधावा, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images