Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

निवडणूक आयोगाने मागवली माहिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा-देवळाई परिसर महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची अधिसूचना शासनाने काढल्यानंतर निवडणुक आयोगाने देखील आपले काम लगोलग सुरू केले आहे. सातारा-देवळाई परिसरातील निवडणुकीच्या दृष्टिने महत्त्वाची असलेली माहिती तात्काळ पाठवा, असे पत्रच आयोगाने महापालिकेच्या आयुक्तांना पाठवले आहे. त्यामुळे अधिकारी कामाला लागेल आहेत. आयोगाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे.

शासनाने सातारा-देवळाई नगर पालिका स्थापन केली. त्यानंतर या नगर पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिने वॉर्ड रचना निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात आली, पण त्यानंतरची प्रक्रिया ढेपाळली. आता या संपूर्ण परिसरचा समावेश शासनाने महापालिकेत केला आहे. तशी अधिसूचना सोमवारी काढण्यात आली. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने आयुक्तांच्या नावे पत्र पाठविले. निवडणूक आयोगाने, सातारा-देवळाई भागाची माहिती तात्काळ पाठवावी, असे या पत्राद्वारे कळविले आहे.

त्यानुसार उपायुक्त किशोर बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली मालमत्ता अधिकारी वसंत निकम, आबेद अली, वॉर्ड अधिकारी सी. एम. अभंग या अधिकाऱ्यांचे एक पथक सातारा नगर पालिकेच्या कार्यालयात गेले होते. तेथून त्यांनी पोट निवडणुकीसाठी आवश्यक असलेली माहिती संकल‌ित केली. त्यात सातारा-देवळाई भागाची भागाची एकूण लोकसंख्या, मतदारांची संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या वर्गातील मतदारांची संख्या, महिला आणि पुरुषांची संख्या या माहितीचा समावेश आहे. ही सर्व माहिती एकत्रित करून तातडीने निवडणूक आयोगाला पाठवली जाणार आहे, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘व्हॅक्सिन रिमाइंडर’साठी दीड लाख नोंदणी

$
0
0

न‌िखिल निरखी, औरंगाबाद

केवळ एक 'एसएमएस' करा आणि वयाच्या १२ वर्षांपर्यंत प्रत्येक लसीची (व्हॅक्सिन) तीनदा आठवण देणारे 'एसएमएम' पूर्णपणे मोफत मिळवा. अशी महत्त्वपूर्ण सुविधा 'नॅशनल व्हॅक्सिन रिमाइंडर' या विशेष योजनेद्वारे अलीकडेच उपलबध झाली आहे. एवढेच नव्हे, तर यातील कोणत्या व्हॅक्सिन सरकारी रुग्णालयांमध्ये आणि कोणत्या खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत, याचीही इत्यंभूत माहिती या योजनेतून मिळत आहे. 'इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स'तर्फे (आयएपी) भारतभर सुरू झालेल्या या योजनेसाठी आतापर्यंत दीड लाखापेक्षा जास्त कुटुंबांनी नोंदणी केली आहे.

केंद्र सरकारने मान्यता दिलेली ही योजना 'आयएपी'ने 'व्होडाफोन'च्या सहाय्याने लाँच केली. या योजनेसाठी नोंदणीपासून एसएमएस मिळण्यापर्यंत कुठलेही शुल्क लागत नाही. केवळ एक एसएमएस एका विशिष्ट क्रमांकावर पाठवावा लागतो. त्यानंतर बालकाचे नाव, जन्मतारखेची नोंदणी होऊन त्याच्या वयानुसार भारतीय बालरोग संघटनेने सुचवलेल्या लसीची आठवण देणारे तीन 'एसएमएस' त्या त्या आठवड्यामध्ये पालकांना मिळतात. संबंधित लस कुठून घ्यावी, याविषयी भाष्य न करता, ती कोणत्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे हे 'एसएमएस'द्वारे कळविले जाते.

पाच वर्षांत २० लाख बालमृत्यू

एका अभ्यासानुसार, लसीकरण न झाल्यामुळे देशामध्ये पाच वर्षांत सुमारे २० लाख बालमृत्यू होतात, तर सुमारे दहा लाख बालकांमध्ये विकलांगता येते. राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, झारखंड आदी राज्यांमध्ये अजूनही अत्यल्प लसीकरण आहे. लसीकरणामुळे जिवाला धोका होतो, असा विचित्र गैरसमज असंख्य नागरिकांमध्ये आहे. त्यामुळेच लसीकरणाविषयी सर्वस्तरीय व सर्वव्यापी जागृतता निर्माण होऊन बालमृत्यू व अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यासाठी 'आयएपी'ने या विनाशुल्क सेवेसाठी संपूर्ण देशामध्ये पुढाकार घेतला, असे 'आयएपी'च्या शहर शाखेचे सचिव डॉ. मंदार देशपांडे यांनी 'मटा'ला सांगितले.

असा घ्या सेवेचा लाभ

या सेवेचा लाभ घेण्यासाठी 'Immunize(स्पेस)बालकाचे नाव(स्पेस)जन्मतारीख' हा एसएमएस ५६६७७८ या क्रमांकावर पाठवायचा आहे. उदाहरणार्थ : 'Immunize REKHA 07-08-2014' असा मेसेज वरील क्रमांकावर पाठविल्यानंतर 'एन्रोलमेंट सक्सेसफुल'चा मेसेज संबंधित पालकांना मिळतो व लागलीच पुढच्या व्हॅक्सिनची तारीख कळविण्यात येते. या विषयी info@immunizeindia.org या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

अजूनही देशामध्ये लसीकरणाचे 'कव्हरेज' केवळ ६०-६१ टक्के आहे. हे कव्हरेज ९० टक्क्यांवर होण्याच्या हेतुनेच ही योजना सुरू केली आहे.

- डॉ. विजय येवले (मुंबई), माजी अध्यक्ष, आयएपी

सद्यस्थितीत देशातील सुमारे दीड लाख कुटुंबियांनी या सेवेसाठी नोंदणी केली आहे. लवकरच ही योजना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

- डॉ. प्रवीण मेहता (मुंबई), सचिव, आयएपी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यासाठी हवा पाचशे कोटींचा निधी

$
0
0

उन्मेष देशपांडे, औरंगाबाद

सातारा, देवळाई परिसराच्या विकासाची जबाबदारी महापालिकेवर येऊन पडली आहे. त्यानुसार महापालिकेचे प्रशासन कामाला लागले असून, आजच यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. साताऱ्याच्या विकासासाठी किमान ५०० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा लागेल व हा निधी मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल, असे मत या बैठतीत मांडण्यात आले.

सातारा परिसराचा समावेश महापालिकेत करण्यात आल्याची अधिसूचना १४ मे रोजी शासनाने काढली. ही अधिसूचना सोमवारी जिल्हा प्रशासनाला मिळाली. आता सातारा परिसरात विकास कामे करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. त्यादृष्टिने महापालिका काय नियोजन करीत आहे हे जाणून घेण्यासाठी 'मटा'ने महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'यासंदर्भात आज सकाळीच आयुक्तांबरोबर बैठक झाली. त्या संपूर्ण भागात विकास कामे आता महापालिकेलाच करावी लागणार आहेत. त्यामुळे सातारा परिसराचे नकाशे सर्वप्रथम अभ्यासावे लागतील. रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज आणि साफसफाई या मूलभूत सुविधा त्या भागातील नागरिकांना द्याव्याच लागणार आहेत. महापालिकेकडे कर्मचारी वर्ग फारच अपुरा आहे. कर्मचारी देखील वाढवावे लागणार आहेत. त्या दृष्टिने एकत्रित डीपीआर तयार करण्याचे काम आता हाती घ्यावे लागेल. आवश्यक त्या मूलभूत सुविधा देण्यासाठी किमान ५०० कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला पाहिजे, अशी महापालिकेची अपेक्षा आहे. डीपीआर तयार करण्यासाठी एक प्रकल्प सल्लागार संस्था (पीएमसी) नेमावी लागणार आहे. त्याचबरोबर सातारा परिसराचा विकास आराखडाही तयार करावा लागणार आहे. हे काम नगररचना विभागाच्या मदतीने केले जाऊ शकेल, परंतु या सर्व कामांसाठी कर्मचाऱ्यांची भरती करावी लागणार आहे. त्याचीही मान्यता शासनाकडून घ्यावी लागेल.'

प्रकल्प सल्लागार संस्था नेमून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामाला किमान सहा महिने लागतील. त्यानंतर हा अहवाल शासनाला सादर करून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल, असे पानझडे म्हणाले. सातारा परिसराच्या समावेशामुळे महापालिकेवरची जबाबदारी अधिक वाढली आहे, असेही त्यांनी सांगितले.

सातारा, देवळाई परिसराचा विकास आराखडा नव्या तयार करावा लागेल. नागरी सुविधा पुरविण्यासाठी किमान ५०० कोटी रुपयांची गरज आहे.

- सखाराम पानझडे, शहर अभियंता, महापालिका.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी भांडणारे नेते झोपले होते का?

$
0
0

बीड : आज मराठवड्यातील पुढारी समन्यायी पाण्यासाठी भांडत आहेत. मात्र पंधरा वर्षापूर्वी गोदावरी खोऱ्याची मागणी कुणी केली नाही, त्यावेळी मराठवड्यातील सगळे पुढारी झोपले होते का, असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. कृष्णा खोऱ्यासाठी जी राजकीय र्इच्छाशक्ती राजकीय मंडळींनी दाखवली, ती गोदावरी खोऱ्याबाबत दाखवली नसल्याचा आरोप त्यांनी केला. बीड जिल्ह्याच्या दुष्काळी भागाचा दौरा केल्यानंतर, विखे पाटील बोलत होते. पत्रकारांनी त्यांना समन्यायी पाणी वाटपासंदर्भात छेडले असता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, मात्र आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी, पाणी प्रश्नाचे जाणकार यांना एकत्र बसवून चर्चा घडवून आणण्याची मागणी केली होती असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रमी तापमानाने शहर घामाघूम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवकाळी पावसानंतर आता मराठवाड्यावर सूर्यदेव कोपला असून, मंगळवारी संपूर्ण मराठवाड्यात उष्णतेची लाट पसरली. औरंगाबाद शहरात मे महिन्यातील गेल्या ३१ वर्षांतील सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. विभागात परभणी जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सर्वाधिक तापमान ४४. ५ अंश सेल्सिअस तापमान होते.

२० मे १९८४ रोजी औरंगाबाद शहराचे तापमान ४६.६ अंश सेल्सियस असे नोंदविण्यात आले होते. मे महिन्यामध्ये गेल्या ३१ वर्षांनंतर तापमानाचा हा विक्रम मोडला. दरम्यान, मराठवाड्यात मंगळवारी उष्णतेची लाट होती. विभागमध्ये सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद परभणी येथे झाली तर, नांदेडमध्ये ४४.२ आणि उस्मानाबादमध्ये ४१.८ अंश सेल्सिअस अशी तापमानाची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक ४५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोला येथे झाली. केवळ मराठवाडाच नाही तर, मंगळवारी विदर्भामध्येही उष्णतेची लाट होती. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार येणाऱ्या आठवड्यात उष्णतेच्या लाट कायम राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हामुळे होरपळून निघालेल्या औरंगाबाद शहरामध्ये तापमान सरासरी ४० ते ४२ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. गेल्या आठवड्यात शहरात ढगाळ वातावरण होते, मात्र वातावरणात कालपासून बदल झाला. मंगळवारी शहरामध्ये सकाळी ९पासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. तापमानात वाढ झाल्यामुळे शहरातील वर्दळ काही प्रमाणात कमी झाली होती तर, रस्ते सामसूम होते. औरंगाबादच्या बाजारपेठेतील गुलमंडी या कायम गजबजलेल्या भागातही मंगळवारी दुपारी शुकशुकाट होता. दरम्यान, येत्या दोन दिवसांत विदर्भात उष्णतेची तीव्र लाट असेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० हजारांचे पाकिट रिक्षाचालकाने केले परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सध्याच्या काळात प्रामाणिकपणा शोधून सापडत नाही, असे बोलले जाते. एखादी मोठी रक्कम हाती लागल्यास ती संबंधितांना परत दिल्याचे प्रसंगही दुर्मिळ, पण मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास महावीर चौकात एका रिक्षाचालकाला २० हजार रुपये असलेले पाकीट सापडते. मग तो पाकीट मालकाला शोधून ते पैसे परत करतो आणि त्याबद्दल देऊ केलेले बक्षिसही नाकारतो... माणुसकी, प्रामाणिकपणा जिवंत असल्याची प्रचिती या प्रसंगातून आली.

शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मच्छींद्र सोनवणे आपल्या दुचाकी वाहनावरून महावीर चौकातून रेल्वेस्टेशनकडे जात होते. त्यांच्या खिशातून पैशाचे पाकीट पडले. थोडे पुढे गेल्यावर त्यांना आपल्या खिशात पाकीट नसल्याचे जाणवले. त्यांनी खिसा चाचपडला, पाकीट नव्हते. पाकिटाच्या शोधात ते परत फिरले, पण त्यांना ते काही मिळाले नाही. त्यात २० हजार रुपये होते. पाकीट हरवल्यामुळे अस्वस्थ झालेले सोनवणे त्यांचे मित्र जयप्रकाश गुदगे यांच्याकडे आले. तेवढ्यात त्यांना फोन आला आणि पाकीट सापडल्याची माहिती कळाली. सोनवणे यांनीच ही माहिती दिली. संजय पाटोळे या रिक्षाचालकाला ते पाकीट सापडले. शांतीपुरा भागात पाटोळे यांची रिक्षा लागते. तेथून प्रवाशाला घेऊन ते महावीर चौकात आले होते. पाकीट सापडल्यावर त्यांनी ते बारकाईने पाहिले. त्यात त्यांना एक हजार रुपयांच्या २० नोटा असल्याचे लक्षात आले, त्याशिवाय एटीएम कार्ड, पॅनकार्ड होते, सोबत डॉ. भारत देशमुख यांचे व्हिजिटिंग कार्ड देखील होते. पाटोळे यांनी व्हिजिटिंग कार्डच्या आधारे डॉ. देशमुख यांना फोन केला व सोनवणे यांचे पाकीट आपल्याला सापडले आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर डॉ. देशमुख यांनी लगोलग सोनवणे यांना फोन केला आणि पाकीट पाटोळे यांच्या जवळ असल्याचे सांगितले. पाटोळे कुठे उभे आहेत, याची माहितीही त्यांनी दिली. सोनवणे पाटोळे यांच्याकडे शांतीपुरा भागात गेले. सोनवणे आल्यावर पाटोळेंनी त्यांचे पाकीट त्यांच्या स्वाधीन केले. पाकीट परत केल्या बद्दल सोनवणे यांनी पाटोळेंना एक हजार रुपयाचे बक्षिस देण्याची तयारी दाखवली, पण पाटोळे यांनी ते स्वीकारले नाही.

गेल्या १५-१६ वर्षांपासून मी रिक्षा चालवतो. प्रथमच अशी घटना घडली. सापडलेले पाकीट ज्याचे त्याला परत करण्याचा विचार लगेच मनात आला. माझ्या आई-वडिलांनी तसे संस्कार केले आहेत. म्हणून मच्छींद्र सोनवणे यांचा शोध घेतला आणि त्यांचे पाकीट परत केले.

- संजय पाटोळे, रिक्षाचालक

२० हजार रुपये म्हणजे थोडीथोडकी रक्कम नाही. संजय पाटोळे यांनी ही रक्कम मला परत केली, हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांच्यावर झालेल्या संस्काराचा तो भाग आहे. मी त्यांना बक्षिसही देऊ केले, पण त्यांनी ते स्वीकारले नाही. अशा प्रामाणिक रिक्षाचालकांचा पोलिसांनी सत्कार केला पाहिजे.

- मच्छींद्र सोनवणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी एक बुकी गजाआड

$
0
0

औरंगाबाद : आयपीएल बेटिंग सट्टा प्रकरणात सोमवारी (१८ मे) रात्री आणखी एका बुकीला गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणात एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांना मंगळवारी (१९ मे) कोर्टात हजर करण्यात आले. यापूर्वी पकडलेला नरेश पोतलवाड व सोमवारी पकडलेल्या बुकीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.सोमवारी रात्री पकडलेल्या बुकीचे नाव राजू बालाप्रसाद जाजू (रा. भवानीनगर, जुना मोंढा), असे आहे. मोबाइल लाइन ऑपरेटर पोतलवाड याच्या ताब्यातून जप्त केलेल्या बॉक्समध्ये लाइन बॉक्समध्ये २८ बुकींच्या लाइन सुरू होत्या. त्यापैकी एक लाइनधारक राजू जाजू होता. एन १ परिसरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा संशयितांमध्ये समावेश आहे. हा बुकी पुण्यातून पसार झाला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. सोमवारी पकडलेला आरोपी जाजू हा शहरातील बुकींकडून भाव घेऊन पुढे दिल्लीला पाठवत होता, अशी माहिती पोलिसांकडे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमारेषा आता इतिहासजमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रशासकीय सोयीसाठी सातारा-देवळाई ग्रुप ग्रामपंचायतीचे ४४ वर्षांपूर्वी विभाजन करण्यात आले होते. नगर पालिकेच्या निमित्ताने एकत्र आलेला हा भाग आता महापालिकेतही एकाच दिवशी समाविष्ट झाला. आता वॉर्डरचनेच्या निमित्ताने दोन्ही गावांतील सीमारेषाही इतिहासजमा होणार आहेत.

१९६२मध्ये सातारा-देवळाई ग्रुप ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर केवळ आठ वर्षे दोन्ही ग्रामपंचायतींचा कारभार एकत्र होता. लोकसंख्या वाढल्याच्या निकषावर ग्रामपंचायतींचे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९७०मध्ये सातारा आणि देवळाई या दोन ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या. या विभाजनानंतर काही वर्षे दोन्ही ग्रामपंचायतींचा कारभार एकाच ग्रामसेवकाच्या खांद्यावर होता. १९७१मध्ये साताऱ्याची लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास होती. दोन्ही गावांच्या उदरनिर्वाहाचे साधन शेती हेच होते. शहरीकरणापासून दोन्ही गावे दूर होती. औरंगाबादकरांचा साताऱ्याशी संबंध होता तो खंडोबाच्या दर्शनापुरता. साताऱ्यात जाण्यासाठी त्याकाळी फारसा चांगला रस्ताही नव्हता.

सध्याच्या बीड बायपास रोड सिंगल लेनचा होता. पाचोडच्या बाजारासाठी सातारा, देवळाईतील ग्रामस्थ बैलगाडीतून जात असत. १९९०च्या सुमारास जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बीड बायपास रोड विकसित करण्यात आला. या रस्त्यावर एमआयटी महाविद्यालय सुरू होते. पुढे कमलनयन बजाज हॉस्पिटल सुरू झाले. त्यामुळे या रस्त्यावरील वर्दळ वाढली. दरम्यानच्या काळात औरंगाबादेत घर घेणे मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आणि सातारा, देवळाईतील शेतीचे प्लॉटिंग सुरू झाले. रस्त्यालगत हॉटेल, ढाबे सुरू झाले. काहींनी घरे बांधून सातारा परिसरात स्थलांतर केले. १९९० ते २००० या काळात या परिसरात पक्के रस्ते नव्हते. गेल्या दशकात मात्र या दोन्ही गावांच्या वाढीने वेग घेतला. २००१मध्ये साताऱ्याची लोकसंख्या १७ हजार १९८ आणि देवळाईची लोकसंख्या ३ हजार २१७ होती. त्यात १० वर्षांत मोठी वाढ झाली. साताऱ्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३९ हजार ९४८पर्यंत आणि देवळाईची लोकसंख्या १७ हजार १९८पर्यंत पोहोचली. त्यात सातत्याने वाढ होत आहे.

सहा-सात वर्षांपूर्वी साताऱ्यात नगर पालिका स्थापन करण्याची मागणी समोर आली. त्यानुसार सरकारने सर्वेक्षण केले. शेतीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी असल्यामुळे ग्राम पंचायतीचे नगर पालिकेत रुपांतर करावे, असा प्रस्ताव सादर करण्यात आला. सुमारे दोन वर्षांपूर्वी सातारा पालिका करण्याचा निर्णय सरकार घेणार होते. त्यावेळी देवळाईचाही या पालिकेत समावेशाची मागणी समोर आली. त्यामुळे पालिकेच्या स्थापनेचा मुहूर्त लांबला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताऱ्यातील मालमत्तांचे सर्वेक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा-देवळाई परिसरात पायाभूत सुविधा उभारण्याचे आव्हान महापालिकेसमोर असेल. त्यासाठी महापालिकेला या भागाचा विकास आराखडा तयार करावा लागेल. त्याचबरोबर या भागातील सोयी-सुविधांसाठी सुमारे ७०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइन या प्रमुख समस्या सातारा-देवळाईला भेडसावतात. त्यासाठी महापालिकेला सुमारे ५०० कोटी रुपयांची गरज असेल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. या भागातील नागरिकांपर्यंत मूलभूत सुविधा नागरिकांपर्यंत पोचविण्याचे आव्हान महापालिकेला पेलावे लागणार आहे.

सातारा-देवळाई परिसर महापालिकेत समाविष्ट झाल्यामुळे या संपूर्ण परिसरासाठी एक स्वतंत्र वॉर्ड कार्यालय आणि किमान ७०० जणांच्या कर्मचारीवर्गाची गरज असेल., असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारपासून महापालिकेने या भागातील मालमत्ता आणि अन्य स्थावर बाबींचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे.

सातारा-देवळाई परिसर महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्याची अधिसूचना काल शासनाने काढली. त्यानंतर आज लगेचच महापालिकेने त्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली. सातारा-देवळाई परिसराची लोकसंख्या सुमारे ५५ हजार आहे. त्यामुळे या संपूर्ण भागासाठी महापालिकेला स्वतंत्र वॉर्ड कार्यालय सुरू करावे लागेल, असे जाणकारांचे मत आहे. या वॉर्ड कार्यालयाच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व कामे केली जाऊ शकतील. दरम्यान, आज पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सातारा नगर पालिकेच्या कार्यालयाला भेट दिली व तेथे उपलब्ध असलेली माहिती ताब्यात घेतली. त्यात सातारा परिसरातील एकूण मालमत्ता, पूर्वीची ग्रामपंचायत व आताच्या नगर पालिकेचे कर्मचारी, नगर पालिकेच्या मालमत्ता आदींचा समावेश आहे.

सातारा परिसराचा विस्तार लक्षात घेता या भागासाठी एक वॉर्ड अधिकारी, एक कार्यकारी अभियंता, एक उपअभियंता, एक शाखा अभियंता, दुय्यम अवेक्षक यांसह सफाई कामगार अशा किमान सातशे कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे बोलले जात आहे. हा कर्मचारीवर्ग उपलब्ध करून देण्याचे आव्हान महापालिकेच्या समोर आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन म्हणाले, 'सातारा-देवळाईची जबाबदारी शासनाने महापालिकेवर टाकली आहे. सध्या आहे त्याच कर्मचाऱ्यांमधून सातारा-देवळाईसाठी कर्मचारी दिले जातील. कर्मचारी आणि निधीसाठी शासनाकडे मागणी केली जाईल. सातारा-देवळाई परिसराचा समावेश समांतर जलवाहिनी आणि भूमिगत गटार योजनेतही करावा लागेल.'

अभंग यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

महापालिकेच्या वॉर्ड फ कार्यालयाचे वॉर्ड अधिकारी सी. एम. अभंग यांच्याकडे सातारा-देवळाई परिसराचा तात्पुरता कार्यभार देण्यात आला आहे. वॉर्ड फ कार्यालयातूनच ते या परिसराचे कामकाज पाहणार आहेत. अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेनुसार स्वतंत्र अधिकारी या भागासाठी दिला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता तरी चांगले काम करा: ठाकरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पूर्वीचा अनुभव चांगला नाही. आता तरी चांगले काम करा आणि निवडणुकीच्या काळात दिलेली वचने पूर्ण करा, असा कानमंत्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना मंगळवारी कानमंत्र दिला.

निवडणुकीच्या निकालानंतर आज प्रथमच शिवसेनेचे सर्व नगरसेवक मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. 'मातोश्री'वर ही भेट झाली. यावेळी शिवसेनेचे नेते ममोहर जोशी, संपर्कनेते विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, संदिपान भुमरे, महानगरप्रमु्ख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहर प्रमुख राजु वैद्य, बाळासाहेब थोरात, संतोष जेजुरकर, महापौर त्र्यंबक तुपे, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. सुमारे अर्धातास ही भेट झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचीत नगरसेवकांचे स्वागत केले. त्यानंतर चांगले काम करा, असा संदेश दिला. निवडणुकीत केलेल्या घोषणा आणि दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आतापासून कामाला लागा, असे त्यांनी नगरसेवकांना सांगितले.

आदित्य घेणार आढावा

आदित्य ठाकरे दर तीन महिन्यांनी औरंगाबाद शहरात झालेल्या विकास कामांचा आढावा घेतील, असे त्यांनी नगरसेवकांसमोर स्पष्ट केले. सर्व नगरसेवकांनी नेत्यांच्या संपर्कात रहावे. अडीअडचणी मोकळेपणाने मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा संकटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण येथील नाथसागराचा डाव्या कालव्यातून पाटबंधारे विभागाने पाणी सोडणे सुरू केल्यामुळे औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. डाव्या कालव्याजवळ असलेल्या महापालिकेच्या उपसा विहिरी जवळची पाण्याची पातळी घसरली असून, पाणी उपसणाऱ्या पंपात गाळ आणि गवत अडकू लागल्यामुळे पंपही बंद पडू लागले आहेत. पंपात अडकणारे गवत काढण्यासाठी पाणबुड्यांची मदत घेतली जात आहे.

औरंगाबाद शहराला जायकवाडीच्या नाथसागरातून पाणीपुरवठा केला जातो. नाथसागराच्या डाव्या कालव्यावर महापालिकेने उपसा विहीर बांधली आहे, या विहिरीवरच पंप हाउसचे बांधकाम करण्यात आले आहे. तेथे जुने आणि नवीन असे दोन पंप हाउस आहेत. डाव्या कालव्यातील पाणी थेट महापालिकेच्या उपसा विहिरीपर्यंत येते आणि त्यानंतर ते पंपांच्या मदतीने उपसले जाते. पाटबंधारे विभागाने डाव्या कालव्याचा दरवाजा उघडून त्यातून पाणी सोडणे सुरू केले. त्यामुळे महापालिकेच्या उपसा विहिरीकडे येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाला. पाण्याबरोबर वाहत येणारा गाळ आणि गवत उपसा विहिरीच्या पंपांमध्ये अडकू लागल्यामुळे पंपांची पाणी उपसण्याची क्षमता ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. पाणी उपसा विहिरी जवळ निर्माण झालेल्या स्थितीची माहिती मिळाल्यावर महापालिका आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे अधिकारी जायकवाडीला पोचले. त्यांनी पाहणी केली आणि पंपांमध्ये अडकणारा गाळ, गवत काढण्याचे काम सुरू करण्यात आले. यासाठी पाणबुड्यांची मदत घेण्यात आली.

पालिकेच्या उपसा विहिरीतून पाणी उपसण्याचे प्रमाण घटल्यामुळे शहरात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणातही घट झाली आहे. त्यामुळे बुधवारी अनेक भागात कमी वेळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. काही भागातील पाणीपुरवठा खंडित देखील होऊ शकतो, अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे.

सिडको-हडकोतील नागरिक त्रस्त

अनियमीत पाणीपुरवठ्या मुळे सिडको-हडको भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सिडकोच्या काही भागात पाच दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. महापालिकेने किंवा कंपनीने पर्यायी व्यवस्था देखील केलेली नाही. त्यातच पुन्हा नाथसागरातील डावा कालवा सुरू करण्यात आल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या अडचणीत अधिकच भर पडल्याचे मानले जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला नाही तर, सिडको-हडको भागातील नागरिकांनी आजून किमान एक ते दोन दिवस निर्जळीला सामोरे जावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५४ हजारांचा ऐवज दरोड्यात लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

शहरातील यशवंतनगर परिसरातील एका सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घरात मंगळवारी (१९ मे) रात्री दरोडा पडला. वीस ते पंचवीस वयोगटातील चार दरोडेखोरांनी प्राध्यापकास जबर मारहाण करत एकूण ५४ हजार रुपयाचा ऐवज लुटून नेला. शहराच्या मध्यभागातील वस्तीत दरोडा पडल्याने घबराहट पसरली आहे.

यशवंतनगर परिसरातील हुतात्मा स्मारकाजवळ सेवानिवृत्त प्राध्यापक बबन साहेबराव बोबडे (वय ६५) हे राहतात. काही दिवसांपूर्वी बोबडे यांचे कुटुंब बाहेरगावी गेल्याने ते एकटेच होते. मंगळवारी रात्री ते आपल्या घरात झोपले असता चार अज्ञात चोरांनी मागील भागातून घरात प्रवेश केला. बबन बोबडे यांना जबर मारहाण करत त्यांचे समोरचे दोन दात तोडले. चोरट्यांनी बोबडे यांच्या घरातून रोख रेक्कम व सोन्या चांदीचे दागिने, असा एकूण ५४ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक महिन्यापासून शहरात भुरट्या चोऱ्यां होत होत्या. मात्र, मध्यवस्तीत दरोडा पडल्याने नागरिक भयभित झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीचे लाचखोर कर्मचारी निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका अपघात प्रकरणात मृत्यू झालेल्या एका व्यक्तीला नुकसान भरपाईच्या आदेशामध्ये अपील न करण्यासाठी तसेच चेक जमा केल्याच्या बक्षीसासाठी पाच हजाराची लाच घेताना विभागीय नियंत्रक कार्यालय परिसरात एसटी महामंडळाच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (१९ मे) अटक केली आहे. त्यांना बुधवारी (२० मे) निलंबित करण्यात आले आहे.

एक तरूण २८ ऑक्टोबर २०१० रोजी एसटी बसच्या अपघातात ठार झाला होता. याबद्दलच्या खटल्यात कोर्टाने या तरुणाच्या नातेवाईकांना आठ लाख लाख १५ हजार रुपये नुकसान भरपाई व खटला दाखल झाल्यापासून सात टक्के व्याजाने रक्कम देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात कोर्टाच्या आदेशानूसार चेक जमा करण्यासाठी आणि अपील न करण्यासाठी विभागीय नियंत्रक कार्यालयातील एसटीचे वाहतूक निरीक्षक हिरालाल राधाकृष्‍ण श्रावणे व लिपिक स्वराज लाजरस अॅन्‍थोनी यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. या दोघांना मंगळवारी विभागीय नियंत्रक कार्यालयातील परिसरात पकडण्यात आले. त्यावर एसटी महांडळाने त्वरित कार्यवाही करीत दोघांनाही निलंबित केले आहे.

अहवालाकडे दूर्लक्ष

विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या अपघात प्रकरणे असलेल्या 'टेबल'बद्दल सुरक्षा व दक्षता पथकाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त आहेत. या तक्रारींची माहिती घेऊन एसटीच्या सुरक्षा व दक्षता पथकाने १९ डिसेंबर २०१४ रोजी अहवाल दिला आहे. मात्र या अहवालाकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उकाड्यामुळे गच्चीवर झोपणे पडले महागात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मयूर पार्क येथील एका रहिवाशाला चांगलेच महाग पडले आहे. ही संधी साधून चोरट्याने घरात प्रवेश करीत रोख पन्नास हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन दादाराव जाधव (वय ३८, रा. प्लॉट नंबर १०, शिवगिरी हाउसिंग सोसायटी, मयूर पार्क परिसर) हे उकाड्यामुळे मंग‍ळवारी रात्री (१९ मे) कुटुंबासह गच्चीवर झोपण्यासाठी गेले. ही संधी साधून चोरांनी घरामागील बाजुने प्रवेश केला व खिडकीतून हात घालून दराची कडी उघडली. खोलीतील दोन लोखंडी कपाट फोडून त्यातील रोख पन्नास हजार रुपये, ३० ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे पैजण, कड्याचे जोड, असा एकूण सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही चोरी झाल्याचे सकाळी सहा वाजता लक्षात आल्यानंतर जाधव यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती कळवली. त्यानंतर हर्सूल पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कल्याण चाबूकस्वार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृध्देचे मंगळसूत्र श्रेयनगरमधून पळवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरासमोर उभ्या असलेल्या महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ही घटना श्रेयनगर भागातील त्रिदल अपार्टमेंट येथे बुधवारी (२० मे) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. सविता महेश भटमुळे (वय ६२), असे या वृध्देचे नाव असून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रेयनगर मधील त्रिदल अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सविता भटमुळे सकाळी नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकवरून आल्या. अपार्टमेंटखाली शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीशी गप्पा मारत होत्या. त्याच सुमारास अपार्टमेंटच्या पाठीमागील रस्त्यावरून भरधाव दुचाकीने आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. मात्र, भटमुळे यांनी आरोपीचे हात गळयाला लागताच मंगळसूत्र घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे मंगळसूत्र तुटून अर्धे चोराच्या, तर अर्धे भटमुळे यांच्या हातात राहिले.

त्यांनी ही माहिती तत्काळ उस्मानपुरा पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक भारत काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप परळीकर करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ ५ आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

अंबड तालुक्यातील भगवाननगर येथे विवाहितेने तीन मुलीसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अंबड न्यायालयाने पाचही आरोपींना येत्या २२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मल्हारी मिसाळ यांची मुलगी अलका हिचा विवाह भगवानगर (ता. अंबड) येथील दत्तात्रय रावसाहेब सानप यांच्या सोबत २००५ साली झाला होता. सुरुवातीची पाच वर्षे या दोघांचा संसार अत्यंत गुण्यागोविंदाने झाला. त्यानंतर तीन मुली झाल्या. वैष्णवीचा जन्म झाल्यानंतर सासरच्या मंडळीने तिचा शारीरीक व मानसिक छळ सुरू केला. हा त्रास तिला सहन होईना. परंतु, तिने आपला संसार सुरुच ठेवला. मात्र, तिसरी मुलगी झाल्यानंतर मात्र तिच्या त्रासात आणखी वाढ झाली. राम व लक्ष्मण या दोन्ही दिरांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेत. या त्रासाला कंटाळून अलका हिने मंगळवारी आपल्या तिन्ही मुलीसह विहिरीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवली असल्याचा आरोप अलकाच्या वडिलांनी केला.

याप्रकरणी पती दत्तात्रय, सासू गंगुबाई, सासरा रावसाहेब, दिर राम-लक्ष्मण, नणंद आशाबाई तांदळे लालसावंगी यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाचही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अंबड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस निरीक्षक अशोक घोरबांडे करीत आहेत.

बनावट खाते उघडून एक लाखाचा अपहार

म. टा. प्रतिनिधी, जालना

बनावट खाते उघडून सन २०१४-१५ मधील दुष्काळी अनुदानाचे एक लाख रूपये संगणमत करून, अपहार केल्याप्रकरणी राणीउंचेगाव विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन, जिमस बँक शाखाधिकारी, ग्रामसेवक, यांच्याविरूध्द अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राणीउंचेगाव (ता.घनसावंगी) येथे ऑक्टोंबर २०१४- २०१५ मध्ये विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्रीरंग सखाराम शिंदे व इतरांनी संगणमत करून, बनावट कागदपत्राआधारे जिमस बँक शाखा राणीउंचेगाव येथे खाते उघडले. तसेच या खात्यातून शासनाकडून आलेला दुष्काळ निवारणाचा १ लाख रूपयांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड जिल्ह्यात उष्मघाताचा बळी ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिरासमोर एका अनोळखी ज्येष्ठ नागरिकाचा आकस्मिक मृत्यू झाला. या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू उष्मघाताने झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविल्याने नांदेड जिल्ह्यातील उष्मघाताचा हा पहिला बळी ठरला आहे. ही घटना बुधवारी (२० मे) सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. गेल्या तीन दिवसांपासून उष्णतेचा पार सतत वाढत असल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक घराबाहेर न पडता सावलीचा व थंड पेयाचा आधार घेत आहेत. बुधवारी तर उष्णतेने गेल्या २५ वर्षात प्रथमच अचानक उच्चांक गाठला आहे. जवळपास ४४ अंश सेल्सियसवर पारा गेला आहे. अशा वातावरणात वृद्ध तर सोडाच युवा वर्ग सुद्धा उष्णतेने हैराण झाले आहेत. गेल्या चार - पाच दिवसांपासून एका अनोळखी ८० वर्ष असलेला ज्येष्ठ नागरिक हिमायतनगर शहरात दाखल झाला होता. मंदिर परिसराच्या बसस्थानकात मिळेल ते खाऊन राहत होता. सदर वृद्धाची दया आल्याने दर्शनार्थी भक्तांनी त्यास जमेल त्या पद्धतीने अन्न पाणी दिल्याचे सांगितले जाते. त्या मयत वृद्धाच्या अंगात धोती, पांढरा सदरा व गळ्यात तुळशीमाळ, जवळ लालरंगाची थैली, आधारासाठी काठी वापरत असल्याचे दिसून आले. बुधवारी अचानक सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी पोचून त्यांच्या जवळील साहित्याचा व मृत देहाचा पंचनामा करून प्रेत ताब्यात घेवून उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. याच उष्णतेची गरम वाफ लागून तथा वाढलेली अती उष्णता सहन न झाल्यामुळे अज्ञात वृद्धाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी पंचनाम्यानंतर वर्तविला आहे. वृत्त लिहीपर्यंत मयत वृद्धाची ओळख पटली नव्हती, घटनेची नोंद पोलिसात डायरीत करण्याची प्रक्रिया सुरू होती. -- ​याबाबत येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. डी. गायकवाड म्हणाले, 'हा वृद्ध तंदुरुस्त आहे. कोणतीही आजार नसून त्याचा मृत्यू हदय क्रिया थांबल्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध पार्किंग करणाऱ्या लखानी शोरुम विरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज ‍ वाळूज औद्योगिक परिसरात दुचाकीसह इतर वाहनांची अवैध पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक शाखेच्या पोलिसांनी धडकेबाज कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत आज (२० मे) रोजी एमआयडीसी रोडवरील लखानी होंडा शोरुमच्या व्यवस्थापकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूज एमआयडीसी परिसरात मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी पार्किंगचे अड्डे बनले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी पाहावयास मिळते. त्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करणे सुरू केले आहे. आज लखानी होंडा शोरुमच्या विनापासिंग गाड्या वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याच्या कारणावरून पोलिस निरिक्षक जी. एस. दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मुख्य रस्त्यांवर पार्किंग करणाऱ्यांचे धाबे दणणले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस हेडकाँन्सस्टेबल टी. एन. पवार करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलकुंभ भरले, पण पाणीच मिळाले नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन ५ येथील जलकुंभ पाण्याचे तुडूंब भरले, पण औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल चार तास पाणीपुरवठा सुरूच केला नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळाले नाही. पाणी येत नसल्यामुळे काही लोकप्रतिनिधींनी जलकुंभावर धाव घेतली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

सिडकोच्या निम्या भागात एन ५ च्या जलकुंभावरून पाणीपुरवठा केला जातो. काल रात्री हे जलकुंभ पूर्णपणे भरले. पण सकाळी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे बालाजी मुंडे, दामुअण्णा शिंदे आज बुधवारी सकाळी सहा वाजता जलकुंभावर पोचले. तेव्हा संघर्षनगर मधील नागरिकांनी जलकुंभावर धाव घेऊन पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण केल्याचे लक्षात आले. मुंडे आणि शिंदे यांनी हा प्रकार महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सांगितला. सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा बंद होता. त्याची दखल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. जलकुंभावर कंपनीचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. या अधिकाऱ्यांना फोन करून जलकुंभावरील घटनेची माहिती दिली. पण त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. जलकुंभात पाणी असूनही चार तास सिडको भागाचा पाणीपुरवठा बंद होता. या प्रकाराला जबाबदार कोण याचा शोध घ्या व संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी महापौरांना कडे केली.

महापौर त्र्यंबक तुपे यांनी या प्रकाराबद्दल महापालिकेचे आणि कंपनीचे अधिकारी यांच्याकडे खुलासा मागितला, पण कोणत्याही अधिकाऱ्याने खुलासा केला नाही. यापुढे अशी स्थिती निर्माण झाली, तर कंपनीच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेचे अनधिकृत बांधकाम पाडले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कटकटगेट भागातील शाळेचे अनधिकृत बांधकाम बुधवारी (२० मे) महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने पाडले. अतिक्रमण पाडण्याच्या संदर्भात काही जणांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला न जुमानता ही कारवाई करण्यात आली.

कटकटगेट परिसरात रजिया फातेमा दौलत उर्दू हायस्कूल आहे. या शाळेची पाच मजली इमारत असून त्यात इयत्ता बारावीपर्यंतचे वर्ग चालतात. पाचपैकी तीन मजले अनधिकृत असल्याची तक्रार काही नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीवर काही महिन्यांपासून अधिकारी अभ्यास करीत होते. अखेर आयुक्तांनी ते तीन मजले पाडून टाकण्याचे आदेश अतिक्रमण हटाव विभागाला दिले. आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटाव पथक सकाळीच कटकटगेट भागात पोचले. पथकाच्या सोबत दोन ब्रेकर मशीन्स होत्या. ब्रेकर मशीन्सच्या सहाय्याने इमारतीचे मजले पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यात काही नागरिकांनी विरोध करण्यास सुरूवात केली. शाळेची इमारत पाडता येत नाही, असा त्यांचा आक्षेप होता. पण आयुक्तांचे आदेश असल्यामुळे ही कारवाई करावीच लागेल, असे सांगून इमारतीच्या तीन मजल्यांना ब्रेकरच्या सहाय्याने तोडण्यात आले. यावेळी इमारत निरीक्षक अजमत खान, एस. एस. गायकवाड, पी. बी.गवळी व पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images