Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उपाध्यक्षपदावरून नाराजी

0
0

प्रत्येकी एक वर्षाच्या वाटणीस नकार; आमदार भुमरेंचा सभात्याग

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदासाठी निम्म्यापेक्षा जास्त संचालक इच्छुक होते. काहीजणांनी उपाध्यपद एक-एक वर्षासाठी द्यावे, अशी मागणी केली होती. परंतु, त्यास पॅनलप्रमुखांनी नकार दिल्याने अनेकजण नाराज झाले. आमदार संदीपान भुमरे तर निवडीनंतर ताबडतोब निघून गेले. दरम्यान, निवडीनंतर बोलताना रामकृष्ण बाबा पाटील यांनी बँकेच्या कारभारास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे जबाबदार राहतील, असे विधान केले आहे.

जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड गुरुवारी करण्यात आली. अध्यक्षपदावर सुरेश पाटील यांची निवड अपेक्षित असल्याने उपाध्यक्षपद मिळविण्यासाठी अनेक संचालकांची धडपड होती. आमदार संदिपान भुमरे, बाबुराव पवार, किरण पाटील, रंगनाथ काळे, वर्षा जगन्नाथ काळे हे उपाध्यक्षपदासाठी इच्छुक होते. त्यांनी हरिभाऊ बागडे, सुरेश पाटील यांच्याकडे प्रयत्न सुरू केले होते. परंतु, बागडे यांच्या जवळचे दामोधर नवपुते यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली. त्यामुळे इच्छुकांमध्ये काहीशी नाराजी व्यक्त झाली. निवडणुकीनंतर आमदार भुमरे हे सभागृहातून बाहेर पडले. तत्पूर्वी काही संचालकांनी उपाध्यक्षपद एक-एक वर्षासाठी वाटून मिळावे, अशी अपेक्षा बोलवून दाखवली. त्यास पॅनल प्रमुखाकडून नकार मिळाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला. त्यांनी ही नाराजी खासगीत बोलून दाखविली, पण कोणी उघडपणे भाष्य केले नाही. दरम्यान, कोणीही नाराज नसून सर्वांनुमतेच निवड झाली असून आमदार भुमरे हे अन्य एका महत्वाच्या बैठकीसाठी गेले, असा दावा अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केला.

नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष दामोधर नवपुते यांचा संचालक आणि बँकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. त्यास उत्तर देताना अध्यक्ष पाटील यांनी नोकरभरती प्रकरणात कारण नसताना भाजून निघालो, त्याची पुनरावृत्ती होणार नाही. संचालक मंडळाला त्रास होईल, असे काम होणार नाही, अशी ग्वाही दिली. कर्जापासून बदल्यासाठी योग्य कामे सांगा, नियमबाह्य कामे होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. बंद अवस्थेतील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेसाठी शासनाकडून मदत मिळाल्यास बँकेचा व कर्जदार शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल, असे सांगून या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती बागडे यांना केली.

यावेळी बोलताना बँकेचे संचालक व विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी उपसा जलसिंचन योजनेसह अन्य मोठ्या थकित कर्ज प्रकरणांचा हिशोब समोर ठेवण्यात यावा; हे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, असे सांगितले.

रामकृष्ण बाबांचा बागडेंना इशारा

बँकेचे संचालक व माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी, यापुढे बँकेचा जो काही फायदा तोटा होईल, त्यास बँकेचे संचालक म्हणून हरिभाऊ बागडे जबाबदार राहतील, असे वक्तव्य केले. दादा (सुरेश पाटील) तुमचेच ऐकतील, असे विधान करताच सभागृहात एकच हशा पिकला. काही कारणास्तव रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना अडचणीत आली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. त्यासाठी नानांनी (बागडे) शासनामार्फत मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पूर्वी सत्तार यांचे सरकार होते, असा टोलाही बाबांनी मारला. त्यावर बोलताना बागडे यांनी पत्रकार तुमचेच भाषण प्रामुख्याने छापतील, अशी कोपरखळी मारली. बागडेंच्या अनुभवाचा फायदा बँकेला होईल, असे मत आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांच्या हाती मातीची आरोग्यपत्रिका

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशातील जमिनीचा पोत सुधारण्यासाठी केंद्र सरकारने मृदा आरोग्यपत्रिका मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील मातीचे ३४ हजार नमुने तपासले जाणार आहेत. येत्या तीन वर्षांत जिल्ह्यातील सर्व गावांचा या उपक्रमात समावेश होणार आहे.

रासायनिक खतांचा अतिवापर, जमिनीची धूप, कमी पर्जन्यमान या कारणांचा पीक उत्पादनावर परिणाम झाला आहे. मातीची तपासणी करून शेतकऱ्यांना खताच्या मात्रांची माहिती देण्यासाठी मृदा आरोग्यपत्रिका मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील मातीचे नमुने गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या या मोहिमेत राज्याचाही सहभाग आहे. तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक गाव पातळीवर माती नमुने घेत आहेत. या नमुन्यांचे संकलन जिल्हा कार्यालयात होणार आहे. त्यानंतर खासगी आणि शासकीय यंत्रणेमार्फत माती तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक गावात प्रातिनिधीक अडीच हेक्टर बागायती व दहा हेक्टर कोरडवाहू क्षेत्र निवडले जाणार आहे. या मातीची तपासणी करून परिसरातील शेतकऱ्यांना आरोग्यपत्रिका दिली जाणार आहे. या पत्रिकेत मातीतील घटकांची सविस्तर माहिती असेल. तसेच जमिनीत कोणत्या खताची किती मात्रा असावी याचा सल्ला दिला जाणार आहे. नत्र, पालाश व स्फूरद या घटकांचे प्रमाण अनेक ठिकाणी अत्यंत कमी आहे. त्यामुळे मृदा तपासणी मोहीम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषी विभाग माती तपासणीचे महत्त्व विषद करीत आहे.

आर्थिक समीकरण

काही पिकांमध्ये रासायनिक खतांचा जास्तीचा वापर सुरू आहे. तर अत्यंत दुर्गम भागात खताचा अजिबात वापर नाही. दोन्ही ठिकाणी जमिनीचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना योग्य माहिती नसल्याने हा प्रकार घडतो. माती तपासणी मोहिमेमुळे शेतकऱ्यांमध्ये जागृती वाढण्याची शक्यता आहे.

माती तपासणीचे काम पुढील तीन वर्षे अथकपणे सुरू राहणार आहे. सध्या प्रत्येक तालुक्यातून माती नमुने गोळा केले जात आहेत. माती तपासल्यानंतर आरोग्यपत्रिका दिली जाणार आहे.

प्रकाश पाटील, मृद सर्वेक्षण अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाज्या कडाडल्या; मिरची तिखट

0
0

आवक घटल्याचा परिणाम; फक्त कांदे, बटाटे स्वस्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आवक घटल्यामुळे शहरात भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. हिरव्या मिरचीचे दर किलोमागे सुमारे तब्बल २० रुपयांनी वाढून ते ६० रुपये किलो झाला आहे.

उन्हाची तीव्रता आठवड्यापासून वाढली आहे. परिणामी भाजीपाल्याची आवक घटून दर वाढले आहेत. महागाईमुळे किलोवर भाजीपाला घेणारा ग्राहक पाव किलोवर आला आहे. यावर्षी काही फळे आणि बटाटे, कांदे मात्र स्वस्त झाले आहेत. गेल्या महिन्यापर्यंत भाज्यांचे दर सध्याच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी होते. मे महिन्याच्या सुरुवातीपासून भाजीपाल्याची आवक घटण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांचे दर वाढले आहेत.

भाजीपाल्याचेदर वाढल्यामुळे गृहिणींचे किचनचे बजेट कोलमडले आहे. सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळे अनेकांनी जेवणात डाळींसह कडधान्यांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे डाळींची मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मे महिना सुरू झाल्यापासून मिरचीचे भाव वाढले आहेत. सध्या बाजारात ५० ते ६० रुपये किलोप्रमाणे मिरचीची विक्री होत आहे. नाशिक, मालेगाव, सातारा, सांगली, येथून येणाऱ्या मिरचीचे प्रमाण ७० टक्क्यांनी घसरले आहे. त्यामुळे सध्या आंध्र प्रदेशातून मिरची मागवली जात अाहे. त्यामुळे मिरचीचे भाव गगनाला भिडले आहेत, असे भाजीपाला विक्रेते जर्नादन जाधव यांनी सांगितले.

येणाऱ्या महिनाभरात भाजीपाल्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. आवक घटल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत, असे सुधाकर पवार यांनी सांगितले. सर्व भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे दर वाढले आहेत. ही वाढ सुमारे २० ते ३० रुपये एवढी आहे. फक्त कांदे व बटाटे स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा आहे. नाशिकची काकडी आणि मिरची पुणे, मुंबई, पनवेल येथे पाठविली जात असल्यामुळेही औरंगाबादमधील भाजीपाल्यावर झाला आहे.

पर्यायी भाज्यांचा वापर

भाजीपाला महाग होत असल्याने महिलावर्गाकडून मटकी, वाल, पावटा, हुलगा आदी कडधान्यांसह सोयाबीन वडी, डाळींचे सांडगे, हरभऱ्याची सुकवलेली भाजी, घोळाची भाजी आदींचा वापर होताना दिसत आहे.

भाज्यांचे सध्याचे दर

कोथिंबिरः १० ते १५ रु. जुडी

मेथीः १२ ते १५ रु. जुडी

शेपू, पालकः १५ ते २० रु. जुडी

शेवगा शेंगाः४० ते ४५ रु. किलो

पानकोबीः ६० ते ७० रु. किलो

फुलकोबीः ५० ते ६० रु. किलो

कांदाः ८ ते १० रुपये किलो

बटाटेः १० ते १२ रु. किलो

भेंडीः ५० ते ६० रु. किलो

वांगेः ५० ते ६० रु. किलो

टोमॅटोः ४० ते ५० रु. किलो

कारलेः ५० ते ६० रु. किलो

ढोबळी मिरचीः ५० ते ६० रु. किलो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हार, बुकेंना उन्हाच्या झळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उन्हाच्या झळा फुलांनाही बसल्या असून आवकही कमी झाली आहे. त्यामुळे सध्या फुलांचे भाव वधारले आहेत. तर काही ठिकाणी नैसर्गिक फुलांची जागा कृत्रिम फुलांनी घेतली असून बुके, हार, सजावटीमध्ये त्याचाच अधिक वापर होत आहे. लग्न, समारंभात सजावटीसाठी तसेच फुलांचे हार, बुके यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे विविधरंगी निरनिराळ्या फुलांची आवश्यकता लागते. मात्र, उन्हाळ्यात फुलांची आवक कमी झाल्याने हा बाजार थंडावला आहे. त्यानुसार फुलांचे भावही कमी-जास्त होत आहेत.

नैसर्गिक फुलांमध्ये मोगऱ्याला मोठी मागणी आहे. महिलांमध्ये गजरा जास्त आवडीचा असल्याने मोगऱ्याच्या गजऱ्यांची मागणी लग्नकार्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. साधारण १०० ते १५० रुपये किलोप्रमाणे मिळणारा मोगरा तर लग्नकार्यात ५०० ते ६०० रुपयांवर मिळत आहे. लग्नतिथीनुसार फुलांची बाजारपेठेत उलाढाल होत आहे. मात्र, उन्हाचा फटका मोगऱ्यालाही बसला असून त्याची आवकही उन्हामुळे मंदावली आहे. त्याचबरोबर निशीगंधा आठ ते १५ रुपये स्टीक, नवरंग साधारण ८० ते १०० रुपये किलो, गुलाब ३०० ते ४०० रुपये किलोयानुसार बाजारात उपलब्ध आहे.

जर्बेरा, डच, गुलाब आणि मोगरा यांची आवक हैदराबादसह आता पुणे आणि मुंबईहून होऊ लागली आहे. पुण्याच्या मार्केटमधून येत असलेले फुले अधिक सुंदर, उत्तमपणे टिकणारे आणि किफायतशीर आहेत, असे फुलविक्रेते मोहमंद बाबूभाई यांनी सांगितले.

बुकेच्या किंमती वधारल्या

जर्बेरा, निशिगंध, गुलाब यांच्यासह विविध फुलांचे बुके सर्वसाधारणपणे ५०ते ७५ पासून मिळायचे ते आता १०० ते १२५ पासून ५०० रूपयांपर्यंत मिळू लागले आहेत. फुलांचा खरा बहार हिवाळा असतो. त्यामुळे उन्हाळ्याचा फटका फुलांनाही बसतोच. तसेच लग्नात अधिक काळ टिकण्यासाठी आम्ही फुलांना व बुकेंना दोनदा ते चारदा पाणी टाकत आहोत. फुलांनाही उन्हाच्या झळा बसल्या असून बुकेंच्या किंमतीही वाढल्या आहेत, असे पैठण गेटजवळील लकी प्लँटस अँड फ्लोरिस्टचे संचालक मोहंमद अकबर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याला विखेंचा खोडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'गोदावरीच्या उर्ध्व खोऱ्यातील पाण्यावर हक्क प्रस्थापित करणाऱ्या मराठवाड्याच्या प्रयत्नाला माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेहमीच खोडा घातला. कोर्टात याचिकेद्वारे समन्यायी पाणी वाटप कायद्याची अंमलबजावणी होऊ दिली नाही. त्यामुळे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर बोलण्याचा विखे यांना नैतिक अधिकार नाही' अशी टीका मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख यांनी केली आहे. स्वामी रामानंद तीर्थ स्मृती केंद्रात ते गुरुवारी बोलत होते.

मराठवाड्याचा समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न कायमचा निकाली काढू असे आमच्या सरकारला सांगितले होते; पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष दिले नसल्याने हा प्रश्न तसाच राहिला असे वक्तव्य विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी मराठवाडा दौऱ्यात केले. विखे यांच्या विधानावर मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख यांनी टीका केली आहे. 'मराठवाडा जनता विकास परिषदेच्या जनहित याचिकेवर जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने

दिले होते. या आदेशाला स्थगिती मिळण्यासाठी विखे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. आपला कारखाना आणि सहकाऱ्यामार्फत त्यांनी वेळोवेळी याचिका करुन मराठवाड्याच्या समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा प्रत्यक्षात येऊ दिला नाही. तसेच सर्व याचिका मुंबईला वर्ग केल्या' असे देशमुख म्हणाले. सर्व पाणी अहमदनगर-नाशिककडे वळवले जात असताना विखे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री होते. विशेष म्हणजे प्रत्येक सुनावणीला ते स्वतः कोर्टात उपस्थित असत. त्यामुळे मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नसल्याची टीका देशमुख यांनी

केली आहे. पाणीप्रश्नी मराठवाड्यातील जनतेचा विशेष रोष वाढला आहे. या रोषाला विखे यांनी खतपाणी घातल्याचेही जनता परिषदेचे म्हणणे आहे. मंत्र्याने राज्याच्या हिताची भूमिका घेण्याची गरज असताना विखे यांनी नेहमीच नगरच्या हिताची भूमिका घेतली असे देशमुख म्हणाले. काही दिवसांपूर्वीच विखे राज्याचे विरोधी पक्षनेते झाले. त्यामुळेच त्यांना मराठवाड्याचा पाणीप्रश्न आठवला. अर्थात, त्यांचा हा कळवळा निव्वळ ढोंगीपणा असल्याचेही देशमुख म्हणाले.

मराठवाड्याचा पाणीप्रश्न, मुख्यमंत्र्यांची भेट होईना

शेतकऱ्यांना विशेष पॅकेज, मंत्रिमंडळ बैठक सुरू करणे, औरंगाबादच्या पर्यटन धोरणाची अंमलबजावणी आदी मुद्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा जनता विकास परिषदेसोबत बैठक घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ही बैठक १५ जूनपूर्वी मुंबई किंवा औरंगाबाद येथे घ्यावी. अन्यथा, परिषद रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेला अॅड. प्रदीप देशमुख, डॉ. शरद अदवंत, सारंग टाकळकर, गोपीनाथ वाघ, शंकरराव नागरे, द. मा. रेड्डी उपस्थित होते.

रक्ताच्या पाटाची भाषा

नगरचे पाणी जायकवाडीला दिल्यास रक्ताचे पाट वाहतील अशी भाषा लोक करीत होते. कोर्टाच्या निर्णयाचा अवमान सुरू असताना विखे यांनी दोन्ही जिल्ह्यात समन्वय राखला नाही. जायकवाडीत १९ टीएमसी पाण्याची मागणी असूनही मागील वर्षी केवळ ६.४ टीएमसी पाणी सोडले. यातील फक्त ४ टीएमसी पाणी प्रकल्पात पोहचले असे अॅड. देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकामांसाठी परवानगी पालिकेतून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा, देवळाई भागातील बांधकाम परवानग्या आता महापालिकेच्या नगररचना विभागातून दिल्या जाणार आहेत. या भागातील अनधिकृत आणि अतिक्रमित बांधकामांवर देखील महापालिकेचे नियंत्रण राहणार असल्याचे नगररचना विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सातारा भागातील बांधकाम परवानग्या देण्याचे काम आतापर्यंत ग्रामपंचायत आणि नगर पालिकेकडून केले जात होते, परंतु दोन दिवसांपूर्वी सातारा, देवळाई भागाचे हस्तांतर महापालिकेकडे केल्यामुळे बांधकाम परवानग्या आणि अतिक्रमणांवर पालिकेचा अंकुश राहणार हे स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भात माहिती देताना नगररचना विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बीपीएमसी अॅक्टनुसार सातारा, देवळाई भागाच्या सध्या अस्तित्वात असेलल्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आता महापालिकेवर आली आहे.

आतापर्यंत या भागातील बांधकाम परवानग्या झालर क्षेत्रानुसार दिल्या जात होत्या. झालर क्षेत्राचा अंतिम आराखडा मंजूर झालेला नसला तरी प्रारूप आराखड्याला शासनाने मान्यता दिलेली आहे. या प्रारूप आराखड्यानुसार बांधकाम परवानग्या दिल्या जाऊ शकतात. शासनाच्या अधिसूचनेनुसार नियोजन प्राधिकरणात बदल झाला आहे.

आता या भागाचे नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिका काम करणार आहे. त्यामुळे अधिसूचनेची अंमलबजावणी सुरू झाली त्या दिवसापासून बांधकाम परवानग्या महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत.

अतिक्रमणांची आज पाहणी

सातारा भागातील नाल्यावरच्या अतिक्रमणांची पाहणी शुक्रवारी महापौर त्र्यंबक तुपे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह करणार आहेत. सातारा भागात सुमारे साठ फूट रुंदीचे नाले होते, अतिक्रमणांमुळे ते वीस फुटांचेच झाले आहेत. त्यामुले पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, ही बाब लक्षात घेऊन अतिक्रमणांची पाहणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी बस पॅव्हेलिअनमध्ये

0
0

पोलिस आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी, शहरातील घिरट्या बंद

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसला (ट्रॅव्हल्स) गुरुवारपासून शहरबंदी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार खासगी बसला सकाळी सात ते रात्री ११ या वेळेत शहरात प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे शाहनूरमियॉ दर्गा चौकातील ‌श्रीहरी पॅव्हेलिअन येथून ट्रॅव्हल्स बसची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

शहरात विविध ट्रॅव्हल्स एजंटच्या कार्यालयात थांबलेल्या प्रवाशांना घेण्यासाठी खासगी बस महावीर चौकापासून एपीआयपर्यंत फिरत होत्या. त्यामुळे जागोजाही वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ट्रॅव्हल्स बसला सकाळी सात ते रात्री अकरा यावेळेत शहरात प्रवेश करण्यात बंदी घातली आहे. या बंदीनंतर औरंगाबाद बस ओनर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिशएनने पोलिस आयुक्तांना भेटून पर्यायी जागा देण्याची मागणी केली. त्यावेळी इझी डे मॉल शेजारील श्रीहरी पॅव्हेलिअन येथे बस उभ्या करून तेथूनच शहराबाहेर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बंदीची गुरुवारपासून खासगी बसला बंदी लागू झाल्याने त्या सकाळी आठपासून दिवसभर श्रीहरी पॅव्हेलिअनमध्ये थांबविण्यात आल्या. अहमदाबाद, लातूर आणि गोव्याकडे जाणाऱ्या बस दुपारी ‌बीड बायपासमार्गे सोडण्यात आल्या. याशिवाय इतर बस रात्री अकरानंतर, तसेच काही बस आठनंतर निघणार असल्याची माहिती ट्रॅव्हल्स एजंटनी दिली. पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या बस पडेगाव येथे थांबविण्यात आल्या. पडेगावला थांबलेल्या चालकांनी श्रीहरी पॅव्हेलिअनची पाहणी केली. या बसही शुक्रवारपासून येथेच उभ्या करण्यात येणार आहेत. शुक्रवारपासून शहरातील सर्व खासगी बस श्रीहरी पॅव्हेलिअनमधून सुटतील, अशी माहिती ट्रॅव्हल्स चालकांनी दिली. अदालत रोड, सिद्धार्थ उद्यान या नेहमीच्या ठिकाणी खासगी बस नसल्याने एजंटांच्या कार्यालयातसमोर गर्दी नव्हती.

छावणी व 'धूत'जवळ जागेचा शोध

'प्रवाशांची सोय होण्यासाठी शहराच्या जवळून बस सुटाव्यात असा प्रयत्न आहे. छावणी परिसर, धूत हॉस्पिटलजवळील 'पे अॅण्ड पार्क' मध्ये खासगी बस उभ्या करण्याचा प्रयत्न आहे. छावणी परिसरात परवानगी मिळाल्यानंतर तेथून पुणे व त्या भागात जाणाऱ्या बस निघतील. सध्या कोणत्याही खासगी बसचे वेळापत्रक बदलेले नाही. मात्र, प्रवाशांची गरज पाहून दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल. पोलिस आयुक्तांच्या आदेशांचा सन्मान ठेवत, प्रवाशांना सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे,' अशी माहिती औरंगाबाद बस ओनर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे अध्यक्ष राजन हौजवाला यांनी दिली.

एसटी बसच्या प्रवासी संख्येत वाढ

वरद गणेश मंदिर चौकापासून मिल कॉर्नरपर्यंत खासगी बस थांबवून दलाल मध्यवर्ती बस स्थानकातून प्रवाशांना पळवून नेत होते. परंतु, गुरुवारपासून शहरात खासगी बस प्रवेशावर बंदी आल्याने या रस्त्यावर बस नव्हता. परंतु, काही दलाल बस स्थानकातून प्रवाशांना नेण्यासाठी धडपडत होते. पण बस दिसत नसल्याने प्रवाशांनी एसटी बसलाच प्राधान्य दिले. पूर्वी एसटी महामंडळाच्या निमआराम बसमधन ३० ते ३५ प्रवासी जात होते. खसागी बस बंद झाल्याने ही संख्या ४० ते ४५च्या वर गेल्याचे एसटीच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायद्याचा धाक

0
0

>> रवींद्र टाकसाळ

नव्यानेच रुजू झालेले पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम हाती घेतले आहे. शहरातील गल्लीबोळातून भरधाव वेगाने पळणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सी, लक्झरी बस, रस्त्यांवर दुकाने थाटून वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर त्यांनी बडगा उगारला आहे. त्यामुळे 'कायदा' जाणवण्यास सुरुवात झाली आहे.

रस्ते आणि तेथील वाहतूक व्यवस्थेवरून त्या त्या शहराची प्रतिमा निर्माण होते. रस्ते निर्मिती किंवा देखभाल दुरुस्ती हा महापालिकेचा विषय असून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, वाहतूक कोंडी होऊ नये, यांची जबाबदारी सर्वस्वी वाहतूक पोलिसांची असते. पर्यटननगरी असलेल्या आपल्या शहरात वाहतुकीची कोंडी आणि बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न गेल्या काही वर्षात गंभीर झाला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याची मोहीम होती घेतली आहे. त्यांनी सुरुवातीलाच बदल्यांत पारदर्शक प्रक्रिया राबवून पोलिसांचे मनोबल वाढवले. त्यामुळे आता काम करून दाखवा, असे निर्देश देत त्यांनी सर्वांना कामाला लावले आहे. शहरातील कायदा- सुव्यवस्था आबाधित राखण्याचे काम करताना वाहतूक कोंडी फोडण्यासाठी, बेशिस्त मोडून काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

बसस्थानकजवळ बेकायदा पार्किंग करून प्रवासी पळविणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सी चालकांच्या मुजोरपणाला लगाम घालण्याचे काम सुरुवातीला केले. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी त्यांनी काळी-पिवळीला शहराबाहेर काढून शहराला लागून असलेले थांबे दिले. त्यामुळे बेलगामपणे काळी-पिवळी चालकांना शिस्त काय असते, यांची समज आली असावी. तसेच त्याचा अप्रत्यक्षरित्या एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासही हातभार लागत आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणावरून जाणारी जडवाहने व लक्झरी बसमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

पोलिस आयुक्तांच्या हातात काही जादूची छडी नाही. पण आयुक्त म्हणून असलेल्या अधिकाराचा वापर आणि कायद्याची काटेकारपणे अंमलबजावणी केल्यास परिस्थितीत बदल होऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे कायद्याचा धाक निर्माण होत आहे. रस्त्यांवर दुकाने थाटणारे, वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधातही वाहतूक शाखेने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे अनेक चौकांचा कोंडलेला श्वास मोकळा होण्यास मदत होत आहे. वाहतूक शाखा म्हणजे पोलिस विभागाचे ड्राईंग रूम आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत करून पोलिसांची प्रतिमा उंचविण्याचा प्रयत्न यातून होताना दिसत आहे. वाहतूक विभागाला नव्या दमाचे पोलिस अधिकारी, साधनसामुग्री देण्यात आली आहे.

दादागिरी करणारे, अवैध दारू विक्री, वाहनांवरील चित्रवित्रिच नंबर प्लेट आदी विविध विषय हाती घेऊन पोलिसांनी त्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे बेशिस्त वर्तन करणाऱ्यांना वचक बसला आहे. यामुळे शिस्तप्रिय नागरिकांना हायसे वाटत असावे. यामुळे पोलिसांचे खरे कार्य काय असते याचा अनुभव येत आहे. रस्ता केवळ आपल्यासाठीच आहे, असा समज काही अॅपेरिक्षा चालकांनी करून घेतलेला आहे. त्यांच्या बेशिस्तीला लगाम लावण्याचे प्रयत्न पुरेसे होताना दिसत नाहीत. अॅपेरिक्षां चालकांना लगाम लावावा, अशी नागरिकांची अपेक्षा आह. पोलिसांबद्दल विश्वास वाढावा, यासाठी 'कम्युनिटी पोलिसिंग' हा उपक्रम राबविण्याबरोबरच कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी 'क्युआरटी' अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचा मानस आयुक्तांनी बोलवून दाखविला. एकूणच कायद्याचा बडगा दाखवत बेशिस्तीला लगाम घालण्याचा आणि त्या माध्यमातून शहराची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँकेची प्रगती रोखली

0
0

शिवाजीराव पाटील यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एसटी बँकेतर्फे कोअर बँकिंगसह इतर सुविधा देण्याचा मानस आहे. मात्र चेअरमन आणि विरोधी संचालकांमुळे ही प्रगती थांबली आहे, असा आरोप एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केला आहे. एसटी बँक नफ्यात असून तिची वसुली शंभर टक्के आहे.

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेच्या संचालकपदाची निवडणूक २७ मे रोजी होणार आहे. या निवडणूक प्रचारासाठी आयोजित मेळाव्यासाठी पाटील आले होते. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांही हा आरोप केला. ते व हनुमंत ताटे यांच्यावर पाल्यांना बँकेत नोकरी लावल्याचा आरोप आहे. त्याबद्दल बोलताना पाल्यांनी गुणवत्तेवर नोकरी मिळवल्याचे सांगितले. मात्र इंटकच्या सध्याच्या संचालकांनी अनेक परिचितांना बँकेत नोकरी दिल्याचा आरोप त्यांनी केला.

बँकेच्या प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी विरोधी संचालक व बँक अध्यक्षांनी रोखल्याचा आरोप पाटील यांनी केला. या निवडणुकीत विरोधकांची अनामत जप्त करून मान्यताप्राप्त संघटनेचा विजय होईल, असा दावा त्यांनी केला.

काही दिवसांपूर्वी नवीन रस्ते सुरक्षा विधेयकाविरोधात संप पुकारण्यात आला होता. या संपाला मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचा पाठिंबा नव्हात नियमानुसार संघटनेला संप करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनप्रकरणी दिरांसह तिघांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण रोडवरील ऑरेज सिटीजवळ वीस दिवसांपूर्वी झालेल्या महिलेच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यापैकी दोन जण तिचे दीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऑरेंज सिटीजवळ १ मे रोजी एका महिलेचा खून झाला होता. महिलेची ओळख पटू शकली नव्हती. तिच्या हातावर कांती सूरज मनोज, असे लिहिलेले होते. त्यावरून पोलिसांनी केलेल्या तपासानंतर ५ मे रोजी तिची ओळख पटली. तिचे नाव सीताबाई सूरज वाघमारे असून, ती मोरेगाव, ता. सेलू, जि. परभणी येथील रहिवासी असल्याचे समजले. ती भीक मागून उदरनिर्वाह करायची, अशीही माहिती मिळाली.

या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश बाबुराव नागरे (२०), दीपक बाबुराव नागरे (२२) रा. रेल्वे स्टेशन, औरंगाबाद या दोन दिरांसह नागेश जगन्नाथ गायकवाड (२५) रा. पंढरपूर, वाळूज याला अटक केली. या प्रकरणाचा तपास सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास प्रजापती हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहकांवर गुन्हे दाखल करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकापेक्षा जास्तवेळा अपहार करताना सापडेल्या वाहकांवर थेट गुन्हे दाखल करावेत, असे आदेश एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाने दिले आहेत. हा आदेश २० मे पासून लागू करण्यात आला आहे.

एसटीतील वाहकांकडून प्रवाशांकडून भाडे घेऊन तिकिट न देणे, तिकिटांची पुन्ही विक्री करणे, कमी दराचे तिकिट देणे, लगेजमधील अनियमितता आदी गैरप्रकार होत आहेत. राज्यात एप्रिल २०११ ते मार्च २०१५ या चार आर्थिक वर्षात अपहारांची ५४,३११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात ४५१ वाहकांना बडतर्फ करून ९२३४ प्रकरणांमध्ये वाहकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. २८,९३२ प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय ३२२६ अपहार प्रकरण दप्तरी दाखल करण्यात आली आहे. राज्यातील दाखल प्रकरणांत शिक्षेत एकसूत्रीपण नाही, त्यामुळे सुरक्षा व दक्षता विभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

सुरक्षा व दक्षता विभाग व मार्ग तपासणी पथकांना २० मे नंतर वाहक अपहार करीत असल्याचे आढळल्यास कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. वाहकाकडून एकापेक्षा जास्त वेळेस अपहार झाला असल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संघटनेचा विरोध

महामंडळातील मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने या आदेशाला विरोध केला आहे. महामंडळातील बडे अधिकारी भ्रष्ट्राचार करीत असून त्यांच्याविरोधात पुरावे देऊनही कारवाई होत नाही, असा आरोप करण्यात आला आहे. वाहकांवर नियमानुसार कारवाई करावी. मात्र गुन्हे दाखल करण्याची कारवाई अयोग्य आहे. हा नियम अंमलात आणल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मसी कॉलेजचा लिपिक गजाआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रक्ताच्या कॅन्सरने निधन झालेल्या कार्यालयीन अधीक्षकाच्या वैद्यकीय बिलातील त्रुटीची पूर्तता करून मंजुरीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठविण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेताना कमला नेहरू फार्मसी कॉलेजच्या लिपिकास गुरुवारी (२१ मे) पकडण्यात आले. त्याचे नाव मधुकर लक्ष्मण बोर्डे (वय ४८, रा. छावणी), असे आहे.

अँटी करप्शन ब्युरोकडे दिवंगत कार्यालय अधीक्षकांच्या भावाने तक्रार दिली होती. त्याचे रक्ताच्या कॅन्सरने २०१२ मध्ये निधन झाले. उपचारासाठीची ४ लाख ३९,६२३ रुपयांची तीन वैद्यकीय बिले प्रतिपूर्तीसाठी मिळण्यासाठी दाखल करण्यात सादर केली होती. या बिलात त्रुटी आढळल्याने तंत्रशिक्षण संचालनालय कार्यालयाकडून कॉलेजकडे पाठविण्यात आली. त्या त्रुटींची पूर्तता करून पुढे मंजुरीसाठी पाठविण्याचे काम कॉलेजचा लिपिक मधुकर बोर्डे याच्याकडे होते. या कामासाठी त्याने २० हजार रुपयाची मागणी केली. पण लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रार करण्यात आली. ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली. बोर्डे याने तडजोडीअंती पंधरा हजार रुपयाची मागणी केल्याचे आढळून आले.

त्यानुसार अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, विवेक सराफ यांनी कॉलेजमधील कार्यालय अधीक्षक यांच्या दालनात गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास सापळा रचला. लाचेची रक्कम घेताना लिपिक बोर्डे यास पकडले. पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भरत राठोड, कर्मचारी श्रीराम पंडुरे, विजय ब्राम्हदे, अजय आवले, सचिन शिंदे, बाळासाहेब महाजन, संदीप चिंचाले आदींनी ही कामगिरी केली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घरझडती घेण्याचे काम सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदोबस्तावरील पोलिस निलंबित

0
0

घाटीतून पळालेला आरोपी सापडेना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी हॉस्पिटलमधून बुधवारी (२० मे) हातकडीसह पळून गेलेला खून प्रकरणातील कच्चा कैदी शेख वाजीद उर्फ बबला असद अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान या कैद्यांसोबत बंदोबस्तासाठी असलेल्या चारही पोलिसांना निलंबित करण्यात आले.

हर्सूल जेलमधील खून प्रकरणात १९ वर्षांपासून शिक्षा भोगणारा माळी राजू खर्डे, लूटमार प्रकरणी न्यायालयीन कोठडीतील अमोल बाबुराव खोतकर (वय २८) आणि खून प्रकरणातील संशयित आरोपी शेख वाजीद उर्फ बबला असद (वय २३, रा. कटकट गेट) या तिघांना बुधवारी (२० मे) उपाचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये आणले होते. त्यांना जेलमधून आणणे व उपचारानंतर जेलमध्ये सोडण्याची जबाबदारी पोलिस मुख्यालयातील सहायक फौजदार एन. एन. गायकवाड, ए. ई. तांदळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल टी. जी. शेख आणि डी. बी. वाघ यांच्यावर सोपविण्यात आली होती. उपचारानंतर वाहनाकडे घेऊन जाताना खोतकर आणि शेख वाजीद यांनी पोलिसांच्या हाताला झटका देत हातकडीसह पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत खोतकरला पकडले; मात्र शेख वाजीद त्यांच्या हाती लागला नाही. दरम्यान, याप्रकरणी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बंदोबस्तावरील सहायक फौजदार एन. एन. गायकवाड यांच्यासह चारही पोलिसांना निलंबित केले आहे. दरम्यान, पसार झालेला वाजीद उर्फ बबला याचा शोध घेण्यासाठी बेगमपुरा पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिस प्रयत्न करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांच्या फोनलाही जुमानले नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौर त्र्यंबक तुपे यांचा फोनही समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उचलला नाही. त्यामुळे महापौरांनी महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांना विनंती केली आणि कंपनीच्या अधिकाऱ्याला मला बोलायला सांगा. पानझडेंनी निरोप दिल्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापौरांना फोन केला. शहराच्या प्रथम नागरिकाला समांतरच्या कंपनीकडून अशी वागणूक मिळत असेल तर, सामान्य माणसांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गुलमंडी-राजाबाजार वॉर्डात पाणीपुरवठा न झाल्यामुळे या भागातील नागरिक नगरसेवकासह शहागंज येथील जलकुंभावर जमा झाले होते. ही माहिती समजल्यावर महापौर त्र्यंबक तुपे आणि सभागृहनेते राजेंद्र जंजाळ तेथे गेले. त्यांनी तेथे जमा झालेले नागरिक आणि नगरसेवकांशी चर्चा केली. नगरेसवक राजू तनवाणी यांनी परिस्थिती महापौरांच्या लक्षात आणून दिली. महापालिकेचे अधिकारी आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे अधिकारी आमचा फोन उचलत नाहीत, चर्चा करायला येत नाहीत, पाणीपुरवठा सुरळीत करीत नाहीत, असे ते महापौरांनी म्हणाले. त्यानंतर महापौरांनी स्वतःच्या मोबाइलवरून कंपनीचे उपाध्यक्ष अर्णव घोष यांना फोन लावला, पण घोष यांनी फोन उचलला नाही. घोष फोन उचलत नाहीत, असे लक्षात आल्यावर महापौरांनी महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांना फोन लावला. आम्ही एक ते दीड तासांपासून शहागंजच्या जलकुंभावर आहोत. कंपनीचा किंवा महापालिकेचा कोणताही अधिकारी दखल घ्यायला तयार नाही. घोष यांना फोन केला, मात्र ते फोनही उचलत नाहीत. तुम्हीच त्यांना फोन करा आणि मला बोलायला सांगा, असे महापौर पानझडे यांना म्हणाले.

पानझडे यांनी महापौरांना निरोप घोष यांना दिला आणि दुसऱ्याच मिनिटात महापौरांना घोष यांचा फोन आला. 'तुम्ही फोन का उचलत नाही, जलकुंभावर नगरसेवक, नागरिक जमा झाले आहेत. तुमचा कुणीच अधिकारी अद्याप आलेला नाही, तुम्ही तातडीने,' या असे आदेश महापौरांनी दिले, पण घोष यांनी जलकुंभावर येण्यास असमर्थता दर्शवली. मी पैठणला आहे, असे त्यांनी सांगितले. तुम्ही पैठणला असाल तर दुसरा कुणी अधिकारी पाठवा, असे महापौर म्हणाले तेव्हा, दुसरा अधिकारी लगेचच पाठवतो, असे म्हणत घोष यांनी फोन ठेवून दिला. त्यानंतर सुमारे एक तास महापौर आणि सभागृहनेता बसून होते, पण कंपनीचा कोणताही अधिकारी चर्चा करण्यासाठी आला नाही.

महापौरांनी केला खासदारांना फोन

कंपनीचे अधिकारी ऐकत नाहीत, फोन घेत नाहीत, चर्चा करण्यासाठी येत नाहीत, म्हणून वैतागलेले महापौर त्र्यंबक तुपे यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांना फोन लावला. शहराच्या पाणीप्रश्नी अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. आपण लक्ष घालून मार्ग काढला पाहिजे, असे महापौर त्यांना म्हणाले. खैरे दिल्लीत होते. औरंगाबादला आल्यावर बैठक घेऊ, असे म्हणत त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलकुंभावर नगरसेवकांचा ठिय्या

0
0

दूषित पाण्यामुळे क्रांतिचौकातील कार्यालयाचा नागरिकांनी घेतला ताबा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुलमंडी आणि राजाबाजार वॉर्डाचे पाणी पळविल्यामुळे या दोन्हीही वॉर्डाच्या नगरसेवकांनी नागरिकांसह बुधवारी रात्रीपासून शहागंज येथील जलकुंभावर ठिय्या आंदोलन केले. नागरिकांनी जलकुंभाच्या प्रवेशव्दाराला कुलूपही ठोकले. दुसरीकडे दूषित पाण्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी क्रांतिचौक जलकुंभाच्या पायथ्याशी असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाचाच ताबा घेतला. या दोन्हीही ठिकाणी कंपनीचे किंवा महापालिकेचे अधिकारी फिरकले नाहीत. महापौर त्र्यंबक तुपे यांनी मात्र दोन्हीही ठिकाणी भेट देऊन प्रश्न समजून घेतले आणि ते सोडवण्याचे आश्वासन दिले.

गुलमंडी आणि राजाबाजार वॉर्डातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सलग ५ दिवस पाणी न आल्यामुळे बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास गुलमंडी वॉर्डचे नगरसेवक राजू तनवाणी काही नागरिकांसह शहागंज येथील जलकुंभावर आले. तेव्हा गुलमंडी वॉर्डचे पाणी सिटीचौक वॉर्डात वळविण्यात आल्याचे या सर्वांच्या लक्षात आले. पाणी पळविण्याच्या या प्रकारामुळे सगळेजण संतापले, दरम्यानच्या काळात राजाबाजार वॉर्डच्या नगरसेवक यशश्री बाखरिया यांचे वडील लक्ष्मीनारायण बाखरिया देखील तेथे आले. त्यांच्या वॉर्डातही पाणीपुरवठा झाला नव्हता. त्यामुळे तेथील नागरिकही त्रस्त झाले होते. या सर्वांनी मिळून जलकुंभाच्या परिसरातच ठिय्या आंदोलन सुरू केले. पहाटे चारपर्यंत सर्वजण जलकुंभाच्या परिसरात होते, पण त्यांची दखल ना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली, ना औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे हे सर्वजण आज सकाळी नऊया सुमारास पुन्हा जलकुंभावर आले. पहाटे चार वाजता घरी जाताना त्यांनी जलकुंभाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले होते. सकाळी नऊपर्यंत ते कुलूप तोडून टाकण्यात आले होते. नऊपासून या सर्वांनी पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू केले. अधिकारी चर्चेसाठी येत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका या सर्वांनी घेतली.

अधिकारी आलेच नाहीत, पण महापौर त्र्यंबक तुपे आणि सभागृहनेते राजेंद्र जंजाळ या सर्वांच्या भेटीसाठी आले. त्यांनी चर्चा केली, अधिकाऱ्यांना फोन केले, पण त्यानंतरही अधिकारी जलकुंभावर आले नाहीत. सायंकाळी सहा वाजता बैठक घेऊन मार्ग काढू, असे सांगून महापौरांनी नागरिक आणि नगरसेवकांची समजूत काढली.

क्रांतिचौक कार्यालयातही पाणी पेटले

खोकडपुरा, कामगार कॉलनी, राधामोहन कॉलनी, बापूनगर, दलालवाडी, चुनाभट्टी, गांधीनगरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार तक्रार करूनही महापालिका किंवा वॉटर युटिलिटी कंपनीचे अधिकारी दखल घेत नाहीत, अशी तक्रार करीत कामगार नेते बुद्धिनाथ बराळ यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी क्रांतिचौक जलकुंभाच्या परिसरातील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाचा ताबा घेतला. शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, अशा घोषणा ते देत होते. महापौर त्र्यंबक तुपे यांनी या सर्वांची भेट घेतली आणि चर्चा केली. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तुमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवतो, असे आश्वासन त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अजिंठा-वेरूळ पर्यटकांच्या हातात!

0
0

पर्यटनस्थळाची प्रतिकृती असलेल्या शेकडो वस्तू उपलब्ध, नवा बहुआयामी उपक्रम

तुषार बोडखे, औरंगाबाद

पर्यटकांच्या मनात अढळ स्थान मिळविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती असलेल्या वस्तू उपलब्ध केल्या आहेत. वेरूळ-अजिंठा लेणीचे मोबाईल कव्हर, देवगिरी किल्ल्याच्या प्रतिकृतीचा पेनस्टँड, नेकटाय, फोल्डर पर्यटकांना आकर्षित करीत आहे. टोपी, टी-शर्ट, किचेन, माउसपॅड, बॅग अशा नानाविध वस्तूंवर विराजमान झाल्यामुळे पर्यटनस्थळांच्या प्रसाराला गती मिळणार आहे.

राज्याच्या पर्यटन व्यवसायाला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या लाखो पर्यटकांच्या माध्यमातून राज्यातील पर्यटनस्थळांचा प्रचार करण्यासाठी लहान-मोठ्या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. किचेन, आयपॅड कव्हर, माउसपॅड, पेनस्टँड, बॅग, टी-शर्ट, टोपी, पासपोर्ट फोल्डर, आयपॅड बॉक्स, नेकटाय, मोबाईल कव्हर अशा अनेक वस्तूंवर पर्यटनस्थळांची प्रतिकृती रेखाटली आहे. अजिंठा-वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला, एलिफंटा लेणी, तारकर्ली, गेट वे ऑफ इंडिया पर्यटनस्थळे या वस्तूंवर आहेत. प्रत्येक वस्तू सुबक आणि आकर्षक असून, पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे. आग्रा येथील ताजमहाल किंवा इतर पर्यटनस्थळी अशा वस्तू विक्रीसाठी असतात; मात्र महाराष्ट्रात प्रतिकात्मक वस्तूंची वानवा होती. पर्यटकांना आकर्षित करणे आणि पर्यटनस्थळांचा प्रसार करण्यासाठी वस्तू उपयुक्त असल्याचे लक्षात आल्यानंतर 'एमटीडीसी'ने हा प्रयत्न केला. औरंगाबाद येथील बिदरी कलाकुसरीचे दागिनेही उपलब्ध आहेत. यात बांगड्या, कर्णफुले आणि नेकलेसचा समावेश आहे. शिवाय पैठणीची छाप असलेल्या पर्स महिला पर्यटकांना विशेष भावल्या आहेत. 'एमटीडीसी'चे व्यवस्थपाकीय संचालक पराग जैन नैनुटिया यांच्या कल्पकतेतून हा प्रयोग सुरू झाला आहे. राजमुद्रा, कोल्हापुरी फेटा, वारली चित्रकला यांनाही वस्तूंवर स्थान मिळाले आहे. प्रत्येक वस्तूची किंमत पर्यटकांच्या आवाक्यात ठेवली असून 'एमटीडीसी' कार्यालय आणि प्रमुख पर्यटनस्थळी या वस्तू उपलब्ध आहेत.

औरंगाबादी बॅग

औरंगाबाद शहरात फिरल्यानंतर शहराची आठवण म्हणून पर्यटकांसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. 'आय लव्ह यू औरंगाबाद' असे नाव असलेली देखणी बॅग, हिमरू शालीची छाप असलेले स्कार्फ, पैठणीचा छाप असलेल्या पर्स आणि बिदरी दागिने आकर्षण ठरले आहेत.

राज्यातील पर्यटनस्थळांचा जगभर प्रसार व प्रचार करण्यासाठी आकर्षक वस्तू तयार केल्या आहेत. पर्यटकांना वस्तू आवडतील अशीच त्यांची रचना आहे. व्यवस्थापकीय संचालक पराग जैन यांच्या पुढाकाराने पर्यटन क्षेत्र नवा आकार घेत आहे.

- चंद्रशेखर जैस्वाल, वरिष्ठ व्यवस्थापक, एमटीडीसी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​एफडीएने घेतले ‘मॅगी’चे नमुने

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरातील दोन दुकानांतील मॅगीचे दोन पॅकिटे अन्न व औषधी प्रशासनाने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत. मॅगीमध्ये शिशे व अन्य घातक पदार्थ आढळल्यामुळे देशभर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर हे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशातील एका शहरात फूड सिक्युरिटी अॅथॉरिटीला मॅगीच्या एका पॅकिटात शिशे व इतर अप्रमाणित घटके आढळले. त्यानंतर कंपंनीने मॅगीचे संबंधित बॅचचे सर्व पॅकिटे बाजारातून परत मागविले, परंतु या व्यतिरिक्त इतर बॅचच्या उत्पादनांबाबतही शंका उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्येही दोन दुकानांतून मॅगीची दोन पाकिटे तपासणीसाठीच घेण्यात आली आहेत, अशी माहिती अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिली. ते म्हणाले, 'अद्याप या पॅकिटांची प्रयोगशाळेत तपासणी व्हायची आहे. तपासणीअंती काही अप्रमाणित घटक आढळल्यास नक्कीच कारवाई करण्यात येईल.'

दरम्यान शहरात मॅगीचे वितरण करणारे चार प्रमुख डिलर्स आहेत. काही रिटेलर्सही मॅगी व नेस्लेची विविध उत्पादने विकलात. तपासणीअंती मॅगीमध्ये काही अप्रमाणित घटक आढळल्यास विक्रेते व स्टॉकिस्टवर नक्कीच कारवाई होऊ शकते, असेही साळुंके यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाच्या मृत्यू, ट्रकवर हल्ला

0
0

बीड बायपासवरील घटना; पोलिसांचा लाठीहल्ला

म. टा. प्रतिनिधी, सातारा

बीड बायपासवरील मराठवाडा हार्डवेअरसमोर गुरुवारी दुपारी अडीच वाजता ट्रकखाली सापडून एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने ट्रक व कंटेनरच्या काचा फोडून ते पेटवून देण्याचा प्रयत्न केला; परंतु घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्यानंतर जमाव पांगला. दरम्यान, बायपासवर तासभर वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिस आयुक्त अमितेशकुमार घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रक व कंटेनर हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

इसराइल उल हक सिद्दिकी (वय १९, रा. सईदा कॉलनी, हर्सूल) असे या तरुणाचे नाव आहे. बीड बायपासवर अपघातात निधन झालेल्या पाहुण्याच्या अंत्यविधीसाठी तो आला होता. शाहशोक्ता मियाँ दर्गा परिसरातील दफनभूमीत अंत्यविधी झाल्यानंतर तो दुचाकीवरून (क्रमांक ः एमएच २० डीई ४२४८) घरी जात होता. बीड बायपासवरील मराठवाडा हार्डवेअरसमोर ट्रक (क्रमांक टीएन ५२ ए ९६०५) हा कंटेनरला (क्रमांक ः डब्ल्यूबी २३ - २६०१) ओव्हरटेक करीत होता. त्यावेळी ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात तो ट्रकच्या समोरच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. संतप्त जमावाने अपघातग्रस्त ट्रक व कंटेनर च्या चाकातील हवा सोडून दिली. दगडफेक करून काचा फोडल्या. त्यानंतर जमाव ट्रक व कंटेनर पेटवून देण्याचा प्रयत्नात असताना पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर जमाव पांगला. अपघातानंतरवाहतूक खोळंबल्याने ट्रकच्या एमआयटी कॉलेजच्या चौकापर्यंत रांगा लागल्या होत्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिस आयुक्त अमितेशकुमार घटनास्थळी आले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रक व कंटेनर रस्त्याच्या बाजुला घेण्यात आले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

अतिक्रमण हटविणार

बीड बायपासला सर्व्हिस रोड नाहीत. पुरेसे स्पीडब्रेकर नाहीत. हाय-वेच्या दोन्ही बाजुला अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे हाय-वेवर अपघातांचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांनी पोलिस आयुक्तांना सागितले. अतिक्रमण तातडीने हटविण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा करू; तसेच आवश्यक ठिकाणी स्पीडब्रेकरही वसविण्यात येतील, असे आयुक्तांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेच्या अध्यक्षपदी सुरेश पाटील

0
0

उपाध्यक्षपदी नवपुते यांचीही बिनविरोध निवड

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सुरेश पाटील यांची तर, उपाध्यक्षपदी दामोधर नवपुते यांची गुरुवारी (२१ मे) बिनविरोध निवड झाली. पाटील यांनी २३व्या वेळेस अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला आहे.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत २०पैकी १८ जागांवर विजय मिळवत कॉँग्रेस नेते सुरेश पाटील (दादा) आणि भाजप नेते हरिभाऊ बागडे (नाना) यांच्या सहकार विकास पॅनलने बाजी मारली. उत्कर्ष पॅनलचे दोन उमेदवार विजयी झाले. विकास पॅनलचे उमेदवार अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारतील आणि निवडणूक बिनविरोधच होईल, हे सर्वश्रुत होते.

निवडणूक निर्णय अधिकारी नारायण आघाव यांच्या उपस्थितीत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी जिल्हा बँकेच्या मुख्य सभागृहात नवनिर्वाचित संचालकाची बैठक दुपारी साडेबारा वाजता घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी सुरेश पाटील यांनी दोन स्वंतत्र अर्ज सादर केले. हरिभाऊ बागडे आणि आमदार अब्दुल सत्तार हे सूचक तर रामकृष्ण बाबा पाटील व प्रभाकर पालोदकर यांनी अनुमोदक होते. उपाध्यक्षदासाठी दामोधर नवपुते यांनी अर्ज सादर केला. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी या दोघांचेच अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी आघाव यांनी अध्यक्षपदी सुरेश पाटील तर उपाध्यक्षपदी नवपुते यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. सुरेश पाटील यांच्याकडे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद तेवीसव्या वेळेस आले आहे. त्यानंतर बँक परिसरात समर्थकांनी जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेवारस वाहने ३ दिवसांत हटवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असतानाच नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंह यांनीही वाहतुकीचा मुद्दा गांभिर्याने घेतला आहे. शहरातील रस्त्यांलगत आणि फुटपाथवर उभी असलेली बेवारस वाहने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. ही वाहने ३ दिवसांत हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी दिले. पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारामुळे शहराची वाहतुकीला शिस्त लागेल, असे मानले जाते.

जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणांबाबत बैठक झाली. त्यावेळी वीरेंद्रसिंह बोत होते. यावेळी महापालिका, पोलिस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे आधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शहरातील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या जालना रस्त्यावर उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. यामुळे या रस्त्यांवर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. शहरातील इतर लहान-मोठ्या रस्ते, फुटपाथ यांच्या जागेवर जुनाट वाहने वर्षानुवर्षे एकाच जागेवर उभी आहेत. या रस्त्यांच्या शेजारी असलेली अतिक्रमणांमुळे हा रस्ता अधिकच अरूंद होतो. यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याचे चित्र आहे. यामुळे वाहतुकीमध्ये खोळंबा निर्माण करणाऱ्या अनधिकृतपणे उभ्या असलेल्या वाहनांना मालकांनी येत्या ३ दिवसांत ही वाहने हाटवावीत. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका पोलिस आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त पथकामार्फत ही वाहने रस्त्यांवरुन काढण्यात येतील असा इशाराही जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंह यांनी दिला.

खर्चाची वसुली वाहनधारकांकडून

संयुक्त पथकाच्या माध्यमातून रस्त्यांवरून वाहने काढण्याचा खर्च हा संबंधित वाहनाच्या मालकाकडून वसूल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नियमानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाईही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंह यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images