Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महागाईचा दाल तडका; आम आदमी भडका

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रोजच्या जेवणातील डाळीला महागाईचा तडका बसल्याने शहरवासीयांचा जीव कासावीस झाला आहे. किलोमागे जवळपास ८० रुपयांपासून ते १४० रुपयांपर्यंत डाळीच्या किंमती महागल्यात. त्यामुळे वर्षाची धान्य खरेदी करताना चाकरमान्यांचा जीव मेटाकुटीला येतो आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत दुष्काळ आणि गारपिटीमुळे सध्या तूर, मूग आणि इतर डाळींची आवक घटली आहे. या डाळींच्या दरात क्विंटलमागे सुमारे २०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

सार्वजनिक कंपन्यांच्या माध्यमातून आयात

यंदा देशात कमी पावसाचा अंदाज आहे. त्यात कॅनडा, ऑस्ट्रेलिया येथील डाळींचे उत्पादनघटले आहे. परिणामी जागतिक पातळीवरच डाळींचे भाव वाढत चालले आहेत. भारतात दरवर्षी १.८ ते १.९ कोटी टन डाळ उत्पादन होते, तरीही स्थानिक गरजभागविण्यासाठी ३० ते ४० लाख टन डाळ आयात होते. आजपर्यंत ही आयात खासगीव्यापाऱ्यांमार्फत केली जात असे. यंदा मात्र एमएमटीसी सारख्या सार्वजनिकक्षेत्रातील कंपन्यांमार्फत ही आयात केली जाणार असल्याचे समजते.

डाळींचे भाव गेल्या तीन महिन्यांपासून वाढतच आहेत. मूग, तूर आणि उडीद विशेषत: सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत हे नक्की. आवक कमी आणि मागणी जास्त असल्यानेही दर वाढत आहेत.

- लक्ष्मीकांत दरख, व्यापारी, मोंढा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंद घरांवर चोरांची नजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः

शिवशंकर कॉलनीत रविवारी (२४ मे) भरदुपारी घरफोडी झाली. एका घराचे कुलूप तोडून चोरांनी मौल्यवान वस्तू पळवल्या. दरम्यान, घरफोडीनंतर जवाहर कॉलनी पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. शिवशंकर कॉलनीत वैजापूरचे तालुक्यातील पालखेडचे तलाठी सतीश पाटील हे राहतात. ते रविवारी सकाळी नाशिकला गेले. त्यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरांनी दुपारी कुलूप तोडून प्रवेश केला. चोरांनी घरातील दोन कपाटे फोडून वस्तू चोरल्या. विशेष म्हणजे तलाठी सतीश पाटील याच्या घराशेजारीच त्यांचे बंधु राहतात. ही चोरी होताना त्यांना थोडीही कुणकूण लागली नाही. या घरातून किती रुपयांचा ऐवज चोरीस गेला याची माहिती सतीश पाटील परतल्यानंतरच कळणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रविवारी बहुतेक लोक हे घरीच असतात. या परिस्थितीत शिवशंकर कॉलनी सारख्या गजबजलेल्या भागात चोरी झाल्याने आसपासच्या परिसरात आश्चर्य व्यक्त होत होते. दुपारच्या उन्हामुळे नागरिक घरात होते व रस्त्यावर गर्दी कमी असल्याने चोरीचा सुगावा लागला नसावा. या भागातील एका घरातून चोरांनी शनिवारी चार हजार रुपये पळवले आहेत. या घराचे कुलूप नीट लावलेले नव्हते. मात्र या चोरीची फिर्यात पोलिसांत दिलेली नाही. रविवारच्या चोरीनंतर ही घटना समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटी हृदय उपचारांविनाच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हाऊस ऑफिसर (एचओ) तसेच फरफ्युजिनिस्ट नसल्याने अँजिओप्लास्टीसह हृदयाच्या शस्त्रक्रिया घाटीमध्ये मागच्या काही वर्षांपासून ठप्प आहेत. विशेष म्हणजे अल्प मानधनामुळेच परफ्युजिनिस्ट मिळत नसल्याचे 'डीएमइआर'ला वारंवार कळवूनही 'डीएमइआर'कडून कुठलाच सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) हृदयाचा झटका (हार्ट अॅटॅक) आलेल्या एका ४३ वर्षीय रुग्णाचा शुक्रवारी (२२ मे) वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आणि मागच्या कित्येक महिन्यांपासून हीच स्थिती असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. अशा हृदयरोग्यांना घाटीमध्ये तातडीने प्राथमिक उपचार मिळाले तरी पुढच्या उपचार-शस्त्रक्रियांसाठी पुन्हा खासगी रुग्णालयात जाण्याशिवाय पर्याय नसल्याची स्थिती कायम आहे. घाटीत हृदयावरील सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार मिळावेत आणि सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी 'सीव्हीटीएस' हा स्वतंत्र विभाग सुरू केला. या विभागाची सुसज्ज व भव्य इमारत आजही सर्वांचे लक्ष वेधून घेते. सर्व प्रकारची उपकरणे विभागात उपलब्ध आहेत. मात्र; उपचार उपलब्ध नाही, अशी 'सीव्हीटीएस'ची दुर्दैवी स्थिती मागच्या काही वर्षांपासून आहे. या विभागामध्ये सध्या हृदयविकारतज्ज्ञ (कार्डिओलॉजिस्ट) म्हणून डॉ. शिरीश देशमुख मानदतत्वावर उपलब्ध आहेत, तर डॉ. सदानंद पटवारी यांची या विभागात ऑक्टोबर २०१४ मध्ये पूर्णवेळ हृदय शल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती झाली आहे. मात्र, हृदयाच्या कुठल्याही शस्त्रक्रियेसाठी आवश्यक परफ्युजिनिस्ट हे तांत्रिक पद रिक्त असल्यामुळे काही अपवाद वगळता डॉ. पटवारी यांच्या काळात हृदयाची कुठलीही शस्त्रक्रिया झालेली नाही. शासकीय दरांनुसार परफ्युजिनिस्टला केसमागे १,५०० रुपये मानधन मंजूर आहे, पण खासगी रुग्णालयांमध्ये परफ्युजिनिस्टना ३,००० ते ५,००० रुपयांपर्यंतचे मानधन मिळते. त्यामुळे कोणीही घाटीमध्ये येण्यास तयार नसल्याची वस्तुस्थिती आहे. बाहेरगावाहून येणारे तंत्रज्ञदेखील मंजूर मानधनामध्ये येण्यास तयार नाहीत.

कुठलीही शस्त्रक्रिया आणि त्यातही हृदयाची शस्त्रक्रिया व अँजिओप्लास्टीसारख्या विशेष उपचार प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित रुग्णाची देखभाल करण्यासाठी आणि २४ तास लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टर आवश्यक असतो. हे काम हाऊस ऑफिसर (एचओ) म्हणजेच वैद्यकीय पदवीप्राप्त डॉक्टर करतात. अशा दोन 'एचओ'च्या पदांना 'सीव्हीटीएस'मध्ये मान्यता आहे. मात्र, दोन्ही 'एचओं'साठी निधी उपलब्ध झाला नसल्याने या विभागासाठी 'एचओ' मिळत नसल्याची स्थिती आहे. मागे काही 'एचओ'नी काम केले, पण वेतनच मिळाले नसल्याने कंटाळून निघून गेले.

प्रतिसाद नाही

एकूणच या प्रकाराविषयी डिसेंबरमध्ये व त्यानंतरही वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला (डीएमइआर) पत्र पाठवून, परफ्युजिनिस्टचे मानधन वाढवण्याबरोबरच 'एचओ'चा निधी उपलब्ध करण्याविषयी कळविण्यात आले. मात्र, 'डीएमइआर'कडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ नदीम हा परफ्युजिनिस्टचे अधिकृत प्रशिक्षण घेऊन परफ्युजिनिस्टचे काम करण्यास इच्छुक असून, 'डीएमइआर'ने त्याच्या प्रसिक्षणाची सोय करावी, असेही 'डीएमइआर'ला कळविले. यावरही 'डीएमइआर'ने कुठलाच प्रतिसाद दिला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

'सीव्हीटीएस'च्या 'एचओं'साठी निधी उपलब्ध नाही, तर १५०० रुपयांच्या मानधनामध्ये परफ्युजिनिस्ट उपलब्ध होत नाही. याविषयी 'डीएमइआर'ला अनेकवेळा कळविण्यात आले आहे. मात्र, 'डीएमइआर'कडून उत्तर मिळालेले नाही.

डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुभाजकांची अक्षम्य दुर्दशा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरामध्ये दररोज हजारो पर्यटक, व्हीआयपींचा राबता असतो. खड्ड्यांचे शहर, असे ओळख असलेल्या या नगरीत काही दिवसांपासून रस्त्यांच्या कामाला वेग आला. मात्र, रस्त्यांवरील दुभाजकांची चाळणी झाली आहे. अनेक ठिकाणी दुभाजक अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. दुभाजकांच्या कचराकुंड्या झाल्या असून, महापालिका प्रशासनाने इकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे.

शहरातील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या जालना रस्त्यावर सध्या उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. या रस्त्यांवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे येथे सोयीनुसार दुभाजक फोडण्यात आले आहेत. क्रांतिचौक ते बाबा पेट्रोलपंपर्यंतचा रस्ता महापालिकेच्या ताब्यात आहे. या भागामध्ये दुभाजकांची पूर्ण चाळणी झाली आहे. उड्डाणपूल संपल्यापासून ते अदालत रोडच्या सिग्नलपर्यंत अनेक ठिकाणी रस्तावरील दुभाजक फोडले आहेत. काही ठिकाणी सिमेंटचे मोठे तुकडे ठेवण्यात आले आहेत. हे तुकडे अनेक ठिकाणी सोयीनुसार तोडण्यात आले आहेत.

अदालत रोड ते निरालाबाजार रस्ता चकाचक झाला आहे. या ठिकाणी लोखंडी दुभाजकांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या जाळ्यांमध्ये लावण्यात आलेल्या झाडांची अवस्थाही बिकट आहे. शहरातील सर्वांत चर्चेमध्ये असलेल्या क्रांतिचौक ते रेल्वेस्टेशन रस्ता पूर्ण तयार करण्यात आला. मात्र, ठिकठिकाणी दुभाजकांची समस्या कायम आहे. रेल्वेस्थानकाच्या आवारात दुभाजक नसल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. शिवाय लहान मोठे अपघातही होतात.

...तर अतिक्रमण रोखता येईल

शहागंज बसस्थानकासमोर रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करण्यात येत होती. पोलिस तसेच महापालिका प्रशासनाने ही वाहने हटवली. या ठिकाणी रस्ता मोकळा झाला असून, ये‌थे तत्काळ दुभाजक बसवण्याची गरज आहे. यामुळे येथे फळवाले, फेरीवाल्यांचे नेहमी होत असलेले अतिक्रमण रोखण्यास मदत होईल.

...ही कसली स्वच्छता!

महापालिकेने अनेक दुभाजकांवर स्वच्छ शहर, सुंदर शहर अशा पाट्या लावल्या आहेत. शहरातील अनेक ठिकाणी, अनेक दुभाजकांवर ही अक्षरे आपले लक्ष वेधून घेतात. मात्र, या अक्षरांवरून नजर हटली अन् दुभाजकात लक्ष गेले की घोर निराशा होते. दुभाजकचऱ्याने भरलेले असते. शहराची अवकळा या सुंदर स्लोगनमधून उठून दिसते.

दुभाजक केले गायब

अनेक ठिकाणी रस्त्यांचे कामे होत आहेत. मात्र, दुभाजक जुनेच आहेत. रस्त्याची उंची वाढल्यामुळे दुभाजक रस्त्याच्या बरोबरीचे झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही ठिकाणाहून वाहने दुसऱ्या रस्त्यावर जाऊ शकतात. टीव्ही सेंटर चौक ते सलीम अली सरोवर दरम्यान नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, येथील दुभाजक जैसे थे असल्यामुळे दुभाजक रस्त्यामध्ये दबून गेले आहेत. या ठिकाणी दुभाजक बदलण्याची गरज आहे. सलीम अली सरोवर ते गणेश कॉलनीपर्यंत दुचाकी वाहनांसाठी अनेक ठिकाणी दुभाजक फोडण्यात आले आहेत. त्यामुळे दररोज लहान मोठे अपघात होतात. सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट मार्गावरही वाहनांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दुभाजकांनाही आंबेडकरनगर, रेणुका माता मंदिरासमोर, टी पॉइंट सिग्नल जवळ तोडण्यात आले आहे. रस्ता ओलांडण्यासाठीही पादचारी याच तोडलेल्या दुभाजकाचा वापर करतात. यामुळे मोठे अपघात होण्याचीही भीती आहे.

शहरामधील मोठ्या रस्त्यांमध्ये दुभाजक आवश्यक आहेत. खरे तर रस्त्यांच्या कंत्राटामध्येच दुभाजक तयार करण्याची अट टाकावी. अनेक ठिकाणी दुभाजकाच्या कचराकुंड्या झाल्या आहेत हे खरे आहे. शहरातील सर्व दुभाजक हे सुशोभीकरणासाठी उद्योजक किंवा एनजीओ यांना देण्यात यावेत. यामुळे महापालिकेवर आर्थिक ताण पडणार नाही. या बदल्यामध्ये उद्योजक तेथे जाहिरात करू शकतात. गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर चौकापर्यंतच्या रस्ता उद्योजकांनी सुशोभीकरणासाठी घ्यावा. महापालिकेने यासाठी सरळ परवानगी द्यावी.

- राजू वैद्य, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिव्हिल’ औषधीची तपासणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने पाठविलेली औषधी नेमकी किती वापरात आली आहे, हे तपासण्यासाठी आरोग्य संचालकांनी चार सदस्यीय समिती तपासणीसाठी पाठविली आहे. या समितीकडून आठवडाभरापासून अतिशय सूक्ष्म पद्धतीने स्टॉक तपासणी सुरू आहे. सोमवारी हे पथक खुलताबाद आणि करमाड रुग्णालयांना भेटी देऊन तपासणी करणार आहे.

तीन वर्षांपूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाने मध्यवर्ती खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत असलेल्या रुग्णालयांना वर्षभरात किती औषधी, सलाइन व अन्य साहित्य लागते याचा आढावा मागवून खरेदी करण्यात आली. औरंगाबाद सिव्हिल हॉस्पिटलनेही खरेदी केली, पण त्यांच्याकडे ही सामग्री ठेवण्यासाठी भांडारच नव्हते. मुदतीच्या आत औषधींचा वापर होणार नाही आणि शिल्लक साहित्याबाबत वाच्यता होऊ नये, यासाठी घाटी हॉस्पिटलला संपर्क साधून त्यांच्याकडून दोन क्वार्टर घेण्यात आले. या क्वार्टरमध्ये ७० टक्के औषधी ठेवण्यात आली. दरम्यान, नाशिक येथे सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने औषधी खरेदी केलेली नाही, अशी धक्कादायक माहिती 'महाराष्ट्र टाइम्स'ने उघडकीस आणली. सद्यस्थितीत उपलब्ध असलेला साठा १५ दिवसांचा असून अनेक औषधींची मुदत संपल्याचेही यातून समोर आले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही सिव्हिल हॉस्पिटलना भेटी देऊन औषधींची तपासणी करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला. याच कालावधीत औरंगाबादेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधी ठेवण्यासंदर्भात हलगर्जीपणा केल्याची माहिती आरोग्य संचालकांपर्यंत पोहचली होती.

संचालकांनी नगर, नाशिक, बीड आणि पुणे येथील मुख्य औषधनिर्माणशास्त्रज्ञांची एक चार सदस्यीय समिती नेमून त्यांना औरंगाबादेत तपासणी करण्याचे आदेश दिले. औषधी भांडारची तपासणी होणार हे कळाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलकडून आरोग्य उपसंचालकांना मुदत वाढवून मागण्यात आली. मात्र, संचालकांनी ही मुदत फेटाळली आणि गेल्या सोमवारपासून तपासणी पथक औरंगाबादेत दाखल झाले. पहिल्या टप्प्यात पथकाने घाटी परिसरातील दोन क्वार्टरमध्ये असलेला स्टॉक तपासला. सिव्हिल हॉस्पिटलअंतर्गत दहा ग्रामीण रुग्णालये आणि तीन उपजिल्हा रुग्णालये येतात.

याठिकाणी वर्षाकाठी हजारो पेशंट येतात त्यांच्यापर्यंत औषधी पोचली की नाही याचीही तपासणी यानिमित्ताने करण्यात येत आहे. औषधी व सामग्रीचा स्टॉक एवढा आहे की दोन क्वार्टर व्यतिरिक्त सिव्हिल हॉस्पिटलमधील नेत्र विभाग, निजाम बंगला परिसरातील स्टोअरमध्येही सामग्री ठेवली आहे. गंगापूर आणि वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात सलाइन ठेवण्यात आले आहे. त्याचीही तपासणी पथकाने केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी खुलताबाद येथील बँडेज क्लॉथची तपासणी होणार असून करमाड ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आलेले सलाइनही तपासले जाणार आहे.

मुदत संपलेल्या औषधींचे काय ?

सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरविल्या जाणाऱ्या औषधींची मुदत तीन वर्षांपर्यंत असते. औरंगाबादेत तीन वर्षांपासून औषधी व सामग्री उपलब्ध करून देण्यात आली. त्यापैकी काही औषधींची मुदत संपलेली असू शकते. अशा औषधींचे काय करणार ? वेळेत औषधी वाटप न केल्यामुळे दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही, याकडे आता आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी महिनाभर ‘पाणीबाणी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कृत्रिम पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या औरंगाबादकरांना आणखी महिनाभर तरी हा त्रास सहन करावा लागेल. दैनंदिन मागणीच्या तुलनेत २० एमएलडी पाणी कमी येत असल्याने पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे पाण्याचे वेळापत्रक सुरळीत होणे अशक्य आहे.

मागील तीन महिन्यांपासून शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडले आहे. कधी तांत्रिक तर कधी वीजेचे कारण सांगून पाणीपुरवठा विस्कळित झाला. पालिकेने पाणीपुरवठ्याची जबाबदारी औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनीकडे दिली आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांना अजूनही पाणीपुरवठ्याच्या सिस्टीमचा आवाका आलेला नाही. डिसेंबरमध्ये फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील पंप खराब झाला होता. त्यावेळी आठवडाभर शहराने निर्जळी अनुभवली. फेब्रुवारीपासून सातत्याने शहराच्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सुरू आहेत. शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होतो, पण तांत्रिक कारणे आणि जायकवाडीतून पाणी कमी क्षमतेने आल्याची कारणे दाखवून पंधरा दिवसांतून एकदा गॅप दिला जातो. याचा अर्थ महिन्यातून दहा दिवसच शहरात पाणीपुरवठा होत आहे. गेल्या आठवड्यात हे नियोजन पुरते बिघडल्याने गहजब निर्माण झाला होता. नेतेमंडळींना समांतरच्या अधिकाऱ्यांना तंबी देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सांगितले. मात्र, प्रत्यक्षात पाणीबाणी दूर होणे तूर्तास तरी अशक्य आहे. शहराला दररोज १५५ एमएलडी पाण्याची गरज आहे. सध्याच्या क्षमतेनुसार १४२ एमएलडी पाणी शहरापर्यंत येते. १३ एमएलडी पाणी कमी येत असल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे शहरातून दहा एमएलडी पाण्याची मागणी वाढली आहे. कायमस्वरुपी कमी येणारे १३ एमएलडी आणि आता मागणी वाढलेले दहा असे २३ एमएलडी पाणी आणायचे कसे असा प्रश्न कंपनीसमोर आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावत वाढल्याने पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. हा दूर करण्यासाठी तत्काळ कुठलीही उपाययोजना होणे शक्य नाही. पावसाळा सुरू होण्यास आणखी वेळ आहे. त्यामुळे हे वेळापत्रक आणखी महिनाभर तरी असेच कोलमडण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यात आपल्याकडे दैनंदिन येणारे पाणी अपेक्षेपेक्षा कमी येते. तो गॅप वाढला आहे. तो भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांना कमीत कमी त्रास कसा होईल, यासाठी आम्ही काही उपाययोजना केल्या आहेत. लवकरच वेळापत्रक सुरळीत करण्यात येईल.

- व्ही. बी. शिवांगी, ऑपरेशन अँड मेंटेनन्स इन्चार्ज,औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडच्या सीईओंना हजर राहण्याचे आदेश

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सर्व शिक्षा अभियानांतर्गत संगणक प्रोग्रॅमर म्हणून काम करणाऱ्या १० कर्मचाऱ्यांनी केलेल्या याचिकेत बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार कायद्याचे पालन करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका राजीव तेरखेडकर व अन्य संगणक प्रोग्रॅमर यांनी औरंगाबाद खंडपीठात केली आहे. कर्मचाऱ्यांनी या प्रकल्पात १५ वर्षांपेक्षा जास्त सेवा केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे या सर्वांची नेमणूक बीड जिल्हा परिषदेने रितसर जाहिरात देऊन केली आहे. हायकोर्टाने या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भातील दस्ताऐवज मागितले होते. बीड जिल्हा परिषदेने अपूर्ण दस्ताऐवज कोर्टासमोर सादर केले. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मूळ नियुक्तीच्या कागदपत्रांसह कोर्टात हजर राहण्याचे आदेश न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. इंदिरा जैन यांनी दिले आहेत. ते हजर न राहिल्यास कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नाही, म्हणून कारवाई केली जाईल, असे आदेशात म्हटले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे सतीश तळेकर, जिल्हा परिषदेतर्फे कैलाश मोरे, राज्य सरकारतर्फे रेखा लड्डा, केंद्र सरकारतर्फे डी. जी. नागोडे हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११ वर्षांचा तंटा, ७ तासांत समेट

0
0

विजय कमळे, जालना

गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या एका कुटुंबातील पती-पत्नीमधे क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि या वदाचे पर्यवसान कौटुंबिक कलहात झाले. याच कलहातून संसार उद्ध्वस्त होऊन जालना जिल्ह्यातील एक उच्चभ्रू दाम्पत्य विभक्त झाले होते. तब्बल ११ वर्षांपासून या प्रकरणी कोर्टात चकरा मारणाऱ्या या दाम्पत्याला अवघ्या सात तासांमध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आणण्याची किमया जालन्याच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वैकल्पिक वाद निवारण केंद्राने करून दाखविली.

जालना पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस शिपायाचा १७ फेब्रुवारी २००३ मध्ये विवाह झाला. लग्नानंतर गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या दाम्पत्यात काही वर्षांनंतर क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या ना त्या कारणांमुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले. वाद टोकाला गेल्यामुळे २००५मध्ये या कुटुंबाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यातून ही विवाहिता माहेरी निघून गेली. सुरुवातीला महिला सुरक्षा कक्षाच्या माध्यमातून दोघांमधे समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तो अयशस्वी झाला. अखेर पिडीत विवाहितेच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळींविरोधात डिसेंबर २००६मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. यातून दोन्ही बाजूंच्या पोलिस ठाण्यातील फेऱ्या सुरू झाल्या. हा प्रकार जाफ्राबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या निदर्शनास आला असता, त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वैकल्पिक वाद निवारण केंद्राचे अधीक्षक पांचाळ यांच्याशी चर्चा केली आणि या प्रकरणात मध्यस्थी करून समेट घडवून आणण्याचे ठरविले. पाटील आणि पांचाळ यांनी पुढाकार घेऊन दोन्ही कुटुंबीयांना जिल्हा न्यायालय परिसरातील वैकल्पिक वाद निवारण केंद्रात पाचारण केले. दुपारी दीड वाजता सुरू झालेली चर्चा रात्री साडेआठपर्यंत सुरू होती. न्या. आर. व्ही. देशमुख आणि न्या. राजेश्री परदेशी यांच्यासमोर ही प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा विधी सेवा प्राधिकराणाचे प्रमुख अॅड. आर. बी. पडूळ, अॅड. आर. व्ही. देशमुख, अधीक्षक बी. पी. पांचाळ, पोलिस निरीक्षक संतोष पाटील या वेळी उपस्थित होते.


११ वर्षांनंतर मुलीला पितृछाया

विवाहिता माहेरी जाताना गर्भवती होती आणि माहेरी गेल्यानंतर तिने मुलीला जन्म दिला. ही मुलगी आता पाचवीमध्ये शिकत आहे. या समेट प्रक्रियेसाठी तिलाही पाचारण करण्यात आले होते. समेट झाल्यामुळे तब्बल अकरा वर्षांनंतर तिला पितृछाया मिळणार आहे.

'वाद नको समेट बरा; हाच सुखी जीवनाचा आनंद खरा,' हे वैकल्पिक वाद निवारण केंद्राचे ब्रिदवाक्य आहे. वाद कोर्टात दाखल असो किंवा नको, वेळ आणि पैसा वाया न घालविता थेट केंद्राकडे आल्यास, आम्ही मोफत समेट घडवून प्रकरण तात्काळ निकाली काढू.

- बी. पी. पांचाळ, मुख्य अधीक्षक, वैकल्पिक वाद निवारण केंद्र, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भरतीसाठी आलेल्या तरुणीचा मृत्यू

0
0

लातूरः सीमा सुरक्षा दलाच्या भरतीसाठी आलेल्या जालना जिल्ह्यातील तरुणीचा चाचणीवेळी अचानक मृत्यू झाला. ही घटना चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथे घडली. चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथे सीमा सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र असून, या ठिकाणी सीमा सुरक्षा दलाची भरती सुरु आहे. यावेळी प्रथमच मुलीही भरतीसाठी आल्या आहेत. या भरतीमध्ये सकाळी प्रशिक्षणासाठी विविध चाचण्यांपैकी धावण्याची चाचणी पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर दिपाली साहेबराव वाकुर्डेला (रा. वरुड, ता. जाफ्राबाद, जि. जालना) धावताना चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारी आणि जवानानी तिला चाकूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केल. वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी तरुणीची तपासणी केली असता, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून, मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. चाकूर पोलिस ठाण्यात मात्र आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाज्यांच्या दराने बजेट कोलमडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

दुष्काळाचा परिणाम शेतीतील सर्व उत्पादनांवर झाल्यामुळे त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. उस्मानाबादच्या बाजारांमध्ये भाज्यांची आवक मंदावली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वरच्या दिशेने जात असून, भाववाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे आणि पाणीटंचाईमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पालेभाज्यांचे उत्पादन घटल्यामुळे मंडईतील आवक घटली आहे. मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर या भाज्या दुर्मिळ झाल्या आहेत. तर, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर कोबी, भेंडी, दोडका, कारले अशा भाज्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सध्या बाजारपेठेत केवळ गवार, वांगी आणि शेवग्याची शेंग यांचे दर काही प्रमाणात आवक्यात आहेत. काही दिवसांपूर्वी दर कोसळल्यामुळे कांदा व टोमॅटो उत्पादकांना रडविर्णाया शेतकॡ्यांसाठी आता चांगले दिवस आले असून कांदा व टोमॅटोच्या दराने सुद्धा मंडईत चांगलीच उचल खाली आहे.

मध्यंतरी पालेभाज्यांची आवक प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे पालेभाज्यांचे दर गडगडले होते. भाजीपाला उत्पादकांचा वाहतुकीचा खर्च निघणेही अवघड झाले होते. आता परिस्थिती त्याउलट झाली आहे.

सध्या वांगी, टोमॅटो, कोबीच्या दरात वाढ झाली असली तरी इतर पालेभाज्यांच्या व लांबवर्णीय भाज्यांच्या तुलनेत ती कमी आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्यामुळे कोथिंबीर, मेथी, पालक, कांदा, बटाटे, टोमॅटो, भेंडी, दोडका या पालेभाज्यांना चांगली मागणी आहे. शिवाय अपेक्षेपेक्षाही चांगला भाव मिळू लागला आहे. दोडका, कारले व दुधी भोपळा यांनी तर दराची साठी ओलांडली आहे.

आता पालेभाज्यांची कमतरता पुढील दोन महिने जाणवणार असून, ज्या शेतक ॡ्यांनी पालेभाज्यांची लागवड केली आहे. त्यांच्यासाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. तर या एकतर्फी दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मात्र भरडला जाणार आहे.

आवक कमी व मागणीतील वाढ तशातच पावसाबाबतची अनिश्चितता यांमुळे डाळीचे दर हे भरमसाठ वाढू लागले आहेत. डाळीचे दर हे सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर जात आहेत हे नक्की.

- संजय कदम, व्यापारी

लग्नसराईमुळे फुलांना मागणी वाढली आहे. मात्र, पाणीटंचाईमुळे फुलांचे दरही तेजीत आहेत. जरबेरा फुलाची किंमत तीन रुपयांवरून सहा ते सात रुपयांवर गेली आहे. अन्य फुलांचे दरही वाढत आहेत.

- जॉ. दत्तात्रय खुणे, फूल उत्पादक शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी प्रकरणानंतर आडत्यांचा ‘बंद’

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

आडत व्यावसायिकाला खंडणी मागत, जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ लातूरच्या आडत व्यापाऱ्यांनी सोमवारी 'बंद' पाळला. व्यापाऱ्यांकडून खंडणी मागण्याचे प्रकार वारंवार घडत असून, पोलिसांनी दखल घ्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

आडत व्यापाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत, याची माहिती दिली. सोयाबीनवर प्रक्रिया करणारे आणि अडत व्यवसायीक संजय घार खंडणी यांना रवी रोंगे आणि त्याच्या साथीदारांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याची माहिती घेताना घार म्हणाले, 'रिंगरोड परिसरातील तिरुपती अॅग्रो एजन्सीमध्ये रविवारी सायंकाळी रवी रोंगे आणि त्यांच्या तीन साथीदारांनी कामगारांना दमदाटी करून तलवारीचा धाक दाखविला. कामगारांनी या प्रकाराची माहिती दिल्यानंतर मी तेथे पोहोचलो. तर, रवी रोंगेने २५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत, तर मुंडके उडविण्याची धमकी दिली. तो तलवार घेऊन माझ्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. या घटनेची माहिती देताच, पोलिस आले आणि त्यांनी रवी रोंगेला ताब्यात घेतले.'

खंडणी मागण्याचे प्रकार वारंवार घडत असून, त्याचा लातूरच्या बाजारपेठेवर परिणाम होत आहे. पोलिसांनी या प्रकारांची दखल घेऊन खंडणीखोरांचा बंदोबस्त करावा. अन्यथा, बेमदुत बंद पुकारावा लागेल, असा इशारा घार यांनी दिला. या प्रकरणी गांधी चौक पोलिसांकडे विचारणा केली असता, गुन्हा नोंद झाला आहे आणि आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती ठाणे अंमलदारांनी दिली.

या प्रकरणी बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, 'या प्रकारासाठी बाजार एक दिवस बंद होता आणि मंगळवारपासून पुन्हा बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांच्या धडपडीतून अवतरली ‘गंगा’

0
0

सुरेश कुलकर्णी, जालना

पाणीटंचाईमुळे बारा महिने टँकर आणि खासगी पाणीपुरवठादारांवर अवलंबून असणाऱ्या जाफराबाद तालुक्यातील डोणगावची सुटका झाली आहे. गावातील तरुणांनी प्रयत्न करत, बिघडलेल्या पाणीपुरवठा यंत्रणेचा अभ्यास करत दुरूस्ती केली. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

जालना जिल्ह्यातील अन्य गावांप्रमाणेच जाफराबाद तालुक्यातील डोणगावलामध्येही पाणीटंचाई होती. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू असायची, तर गावातील स्वागत ड्रमच्या रांगांनी होत असे. महिना घरटी किमान हजार रुपये खर्च केल्यानंतर येणाऱ्या टँकरकडे सर्वांचे डोळे लागलेले असायचे. या गावातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने २००६मध्ये जलस्वराज्य योजनेतून पाणीपुरवठा योजना पूर्ण केली होती. सावखेडा तलावातून ६० लाख रुपये खर्चून ही पाइपलाइन आणल्यानंतरही, गावात एकही दिवस पाणी आले नाही. तलावाजवळ २० अश्वशक्तीची मोटार सुरू केल्यानंतरही गावात पाणी येत नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये हतबलतेची भावना निर्माण झाली होती. अशातच, गावाच्या परिसरात २०१३पासून औरंगाबाद येथील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या गावाची चर्चा सुरू झाली. बाहेरून येणाऱ्या माणसांकडून जलसंधारणाचे काम होत असल्यामुळे तरुण एकत्र आले. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांबरोबर योजनेची पाहणी सुरू केली. त्यामध्ये ही यंत्रणा कुचकामी ठरल्याचे दिसून आले. यातील काही पाइपही खराब झाल्याचे आणि काही पाइप चोरीला गेल्याचे या वेळी निदर्शनास आले. त्यावर ग्रामस्थांमध्ये पुन्हा चर्चा झाली आणि खासगी इंजिनीअरच्या माध्यमातून सल्ला घेण्याचे ठरले. जालन्यातील प्रशांत जाफराबादकर आणि औरंगाबादच्या सर्जेराव वाघ यांनी पाहणी केल्यानंतर सहा इंची पाइपलाइनचे आउटलेट अडीच इंची ठेवल्याचे निदर्शनास आले. तसेच, वळणांची संख्या जास्त असल्यामुळे पाण्याचा दबाव वाढत होता आणि पाइपलाइन फुटत होती. मधल्या टप्प्यावर पाणी घेऊन, पुन्हा पंपिंग घेण्याचा सल्ला या तज्ज्ञांनी दिला. त्यानुसार, तरुणांनी एकत्र येऊन लोकवर्गणी आणि लोकसभागातून काम पुढे नेण्याचे ठरविले. सातेफळ येथील पंपाची मोटार दुरूस्त करण्यात आली.

बाकी छोटी कामे केली. चोरीला गेलेल्या पाइपांच्या जागी पाइप बसविण्यात आले. त्यानंतर सातेफळपासून ४ किलोमीटर अंतरावर संतोष घोडके यांच्या विहिरात पाणी सोडण्यात आले आणि तेथून गावात पाणी आणण्यात आले. गावात पाणी आल्या दिवशी डोनगावात अक्षरश: दिवाळी साजरी झाली, जल पूजन, मिरवणूक काढण्यात आली. या सगळ्या दुरूस्तीचा खर्च एक लाख साठ हजार रुपये झाला. जे काम होणारच नाही, असे सांगणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडात बोटे घालावी लागली.

'गावात पाणी आले आता शेतात पाणी कसे मिळवायचे यावर आम्ही सगळे मिळून कामाला लागणार आहोत,' असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह मकरंद चांदोडकर यांनी सांगितले. बाबासाहेब पुंगळे, गणेश अंभोरे, राजेंद्र पुंगळे, साहेबराव हिवाळे, राजेंद्र अंभोरे, संजय सराटे, जनार्दन पुंगळे, विठ्ठल हिवाळे, रेणुका पुंगळे, ज्योती हिवाळे, ज्योती पुंगळे, पूजा रदाळे, पूजा खरात आणि अनेक सहकाऱ्यांनी या कामामध्ये योगदान दिले.

अनेक वर्षे सर्वच राजकीय नेत्यांकडे गेल्यानंतरही काम झाले नाही. गावातील तरुण एकत्र आले आणि अशक्य वाटणारे काम पूर्ण झाले. या कामातील यशानंतर महिला आणि सर्व गावकरी आता वेगळा विचार करत आहेत.

- गंगाधर खरात, सरपंच, डोणगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधावर लगबग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदा उन्हाचा तडाखा असल्यामुळे, मान्सून वेळेवर येईल, असा विश्वास व्यक्त करत मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. मान्सूनपूर्व पावसाबरोबरच शेतकऱ्यांना मृग नक्षत्राचे वेध लागले आहेत. त्यामुळे मृगाच्या १५ दिवस आधी नांगरणी आणि अन्य मशागतीसाठी शेतांमध्ये लगबग सुरू झाल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर शेतकऱ्यांना यंदा पावसाकडून खूप अपेक्षा आहेत. त्यातच, मान्सून वेळेवर दाखल होऊन प्रगती करेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्या अंदाजाप्रमाणे मान्सून अंदमानात दाखलही झाला आहे. पावसाच्या वाटचालीकडे डोळे लावतानाच, शेतकऱ्यांनी शेतीतील कामांना सुरुवातही केली आहे. नांगरणी आणि अन्य मशागतीच्या कामांबरोबरच, बियाण्यांविषयीची चौकशी सुरू झाली आहे. मृग नक्षत्रापर्यंत तयारी पूर्ण करत, पेरणीला तयार राहण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न दिसून येतो.

मृग नक्षत्र ८ जूनला

मृग नक्षत्र ८ जूनला लागत असून, मृग नक्षत्रातून पावसाळ्याला सुरुवात होते, असा शेतकऱ्यांमध्ये विश्वास आहे. मृग नक्षत्रातील पावसानंतरच बहुतांशपणे पेरण्याच्या कामांना सुरुवात होत असते. त्यामुळेच, शेतकऱ्यांचे मृग नक्षत्राकडे लक्ष लागले आहे.

मान्सून १० जूननंतर

गेल्या वर्षी मराठवाड्यासह राज्याच्या काही भागांपासून दडी मारलेला मान्सून यंदा पुरेशा प्रमाणात पडेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मान्सूनच्या प्रगतीवर लक्ष ठेवणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांकडूनही, मान्सून वेळेवर दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मान्सून अंदमानात दाखल झाला असून, २७ ते २९ मे दरम्यान मान्सून केरळच्या किनारपट्टीला धडकेल. दक्षिण भारत व्यापल्यानंतर मात्र मान्सूनचा वेग मंदावण्याचा अंदाज आहे. मान्सून पुण्यापर्यंत पोहोचण्यासाठी १० जूनचा दिवस उजाडण्याची शक्यता असून, त्यानंतर मराठवाड्यामध्ये मान्सूनचा प्रवेश होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड जिल्ह्यात २०३ टँकर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

जिल्ह्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाणी टंचाईमध्येही वाढ होत आहे. जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या २०३वर गेली असून, सर्वाधिक ६५ टँकर लोहा तालुक्यामध्ये सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असताना पाच दिवसापासून वाढलेल्या उष्णतेने टंचाईची समस्या अतिगंभीर बनली आहे. जिल्ह्यात आजघडीला जवळपास ७१० बोअर, विहिरींची अधिग्रहण करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे ग्रामीण भागात दिवाळीपासूनच पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या होत्या. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची व जनावरांची भटकंती होत असल्याचे दिसत होते. यावर उपाय म्हणून जिल्हा पाणी पुरवठा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले असले तरी जनावरांच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबर चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ५०२ गावांसाठी बोअर, विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून त्या माध्यमातून नागरिकांसाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात नांदेड तालुक्यातील २३, अर्धापूर ७, मुदखेड १२, भोकर ६३, उमरी १९, हदगाव ६६, हिमायतनगर १९, बिलोली १३, धर्माबाद २०, नायगाव ८६, देगलुर ५३, मुखेड ११३, कंधार ७७, लोहा ७५, किनवट ५३ आणि माहूर तालुक्यातील ११ बोअर व विहिरींचा समावेश आहे. ज्या तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाई आहे. त्या ठिकाणी तात्काळ टँकर सुरू केले जात आहेत. आतापर्यंत २१५ गावांमध्ये सुरू करण्यात आलेल्या टँकरने २०३ चा आकडा गाठला आहे. यात लोहा तालुक्यात सर्वाधिक ६५ टँकरचा समावेश आहे. त्याच बरोबर कंधार तालुक्यात ४४ टँकर सुरू करण्यात आले आहेत. पाणी टंचाई तीव्रता वाढल्यास टँकरची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर तलाठी पोलिसांच्या जाळ्यात

0
0

नांदेड : शेतीचा फेरफार करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्याला अटक करण्यात आली. ही घटना हिमायतनगर तालुक्यातील खडकी बा. येथे घडली. संजय मेहूणकर असे या तलाठ्याचे नाव आहे.

खडकी बा.येथील एका शेतकऱ्याने ७२ गुंटे शेत जमिनीचा फेरफार करण्यासाठी कागदपत्रासह तलाठी संजय मेहूणकरकडे एक मे रोजी अर्ज केला होता. मेहूणकरने सुरुवातीपासून कामामध्ये टाळाटाळ केली. अखेर त्याने फेरफार करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली. त्यावर या शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. मेहूणकरला पकडण्यासाठी दोन-तीन वेळा सापळा लावण्यात आला. मात्र, त्यात यश आले नाही. अखेर सोमवारी दुपारी खडकी बा.शेतशिवारात सापळा रचण्यात आला. त्यावेळी लाच स्वीकारताना मेहूणकरला अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


CBSE त औरंगाबादचे विद्यार्थी चमकले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल सोमवारी (२५ मे) जाहीर झाला. औरंगाबादमधील सीबीएसई बोर्डाच्या विविध ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. नाथ व्हॅलीचा अक्षत बाकलीवाल सर्वाधिक ९७ टक्के गुण मिळवित अव्वल ठरला. अक्षत वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे.

नाथ व्हॅली

नाथ व्हॅलीचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. दहा विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले, सतरा विद्यार्थी ९० पेक्षा अधिक तर २३ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. विज्ञानपेक्षा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत चमकदार कामगिरी केली. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य रणजित दास यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अक्षत बाकलीवाल याला सर्वाधिक ९७ टक्के गुण मिळाले. दर्शन गट्टाणी (९५.४), रजत मालू ९५.४), अभिनव शर्मा(९४.८), अनुष संकलेचा(९४.४), अनुपम कारवा(९४), अंजली देशमुख(९३), पायल रामनानी (९२.४), रोषनी दयालनी (९१.८), सत्यजित कैनवसरा (९१.८), यश मलारा (९१.८), ईशा ठोले (९१.६१).

रिव्हरडेल हायस्कूल

रिव्हरडेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत चांगले गुण मिळवित यश मिळविले. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून राधिका शेलार या विद्यार्थिनीने ९३ टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला. यासह किर्ती दास, अभिनंदन गुप्ता यांना अनुक्रमे ९२ टक्के गुण मिळाले असून त्यांनी द्वितीय क्रमांक तर श्रृती कल्याणीकर हिने ९१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. शाळेचे ७६ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राघवेंद्र जोशी, संजीव शेलार, सी.पी. त्रिपाठी, नरेंद्र चपळगावकर, जयंतराव देशपांडे, प्रताप बोराडे, पी.व्ही. सोळुंके, प्राचार्य जयश्री गुजर, आशिष गट्टाणी यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये राधिका शेलार, किर्ती दास, अभिनंदन गुप्ता, संदीप दुवडा, श्रृती कल्याणीकर, वरूण रघुकुमार, ऋषभ भरद्वाज, आयुश खंडेलवाल, आदित्य बाबरा, साहिबप्रित कौर, प्रसाद जंगम, सचिन पचार, संकेत भाले, अनुज बोरगावकर, श्रद्धा कोहली, श्र्वेता गाडेकर, संचय व्यास, हरिदय आनंद, हिमलेखा रेड्डी, प्रिया सिंग, कार्तिक पालिवाल, सैफीया नूर, वैष्णवी विश्वकर्मा, समिक्षा सेठी, फरिया खान, माला निलेश, स्नेहा सोनी, अभिषेक रावत, विराज माथूर, सौफियन शेख, कौशिक शहा, प्रियंका दांडेकर यांचा समावेश आहे.

केंद्रीय विद्यालयाचे यश

केंद्रीय विद्यालयाचे ३७ विद्यार्थी बारावी परीक्षेत यश मिळविले. विद्यालयाचा निशांत कदम याने ९१.४ टक्के गुण मिळविले. शाळेतून तो अव्वल ठरला. शाळेतून ५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेत वाणिज्य शाखेचे १७ तर विज्ञानचे २० विद्यार्थी यशस्वी ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य एन. एस. वाठोरे यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्लॅब दुरुस्ती खर्च ग्रामपंचायत उचलेना

0
0

म.टा.प्रतिनिधी, वाळूज

ग्रामपंचायतीने नकार दिलेला असताना नागरिकांनी एकत्र येत लोकवर्गणीतून ड्रेनेजलाइन, सेप्टिक टँकचे काम पूर्ण करीत आदर्श निर्माण केला. मात्र, वाळूजमधील छत्रपतीनगरच्या या आदर्श कामगिरीचे ग्रामपंचायतीला काहीही घेणेदेणे नाही असेच दिसून येते. कारण ११ वर्षांपूर्वी नागरिकांनीच बांधलेल्या सेप्टिक टँकचा स्लॅब कोसळल्यावर तो दुरुस्त करण्याची रास्त मागणीही ग्रामपंचायत पूर्ण करून देण्याच्या मनस्थितीत नाही. कर घ्यायचा मात्र कामे करायची नाहीत, मग ग्रामपंचायत हवी कशाला? असा सवाल नागरिकांनी आता केला आहे. एवढेच नव्हे तर स्लॅब दुरुस्तीचे काम तातडीने न केल्यास आंदोलन करू असा इशाराही छत्रपतीनगरच्या नागरिकांनी दिला आहे.

वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीत छत्रपतीनगरचा समावेश होतो. सुरुवातीस तुरळक वस्ती असलेले हे नगर २००३-०४ मध्ये दाट वस्तीने नगर गजबजून गेले. त्यामुळे या नगरात ड्रेनेजलाईन करणे गरजेची बाब बनली होती. त्यासाठी येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे धाव घेतली. मात्र, ग्रामपंचायतीने निधी नसल्याचे सांगून हात वर केले होते. यावर तोडगा काढण्यासाठी काही नागरिकांनी लोकवर्गणीचा प्रस्ताव मांडला. त्यास सर्वांनी सहमती दर्शवित ड्रेनेजलाइनसह सेप्टिक टँकचे काम होईल इतका पैसा लोकांनी जमा झाला. त्यातून ही दोन्ही कामे पूर्ण करण्यात आली. सेप्टिक टँकमध्ये जमा होणारा मैला दरसहा महिन्यानंतर काढून करण्याचे कामही लोकवर्गणीतून करण्यात येते. सेप्टिक टँकच्या कामाला आता ११ वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्याचा स्लॅब कुचकामी होऊन कोसळत आहे. त्याचा काही भाग पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या स्लॅबचे काम ग्रामपंचायतीने करून द्यावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून नागरिक करत आहेत. मात्र, ग्रामपंचायतीचा नन्नाचा पाढा सुरूच आहे. लोकवर्गणीतून ड्रेनेजलाइन, सेप्टिक टँकचे काम नागरिकांनी स्वतः पूर्ण केले. आता किमान दुरुस्तीचे काम तरी ग्रामपंचायतीने करून द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. हे काम ग्रामपंचायतीने पूर्ण नाही केले तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असा पावित्रा नागरिकांनी घेतली आहे.

ड्रेनेजलाइन लोकवर्गणीतून केली, त्यावेळेही ग्रामपंचायतीने हात झटकले होते. येथे राहणारा प्रत्येक नागरिक हा ग्रामपंचायतीचा वार्षिक कर भरत असतो. मग सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. कर घेवून सुविधा न देणे ही फसवणूक आहे. त्यामुळे स्लॅबचे काम व ड्रेनेजलाइनचा पुढील खर्च हा ग्रामपंचायतीने न केल्यास आम्हाला त्यासाठी लढा द्यावा लागेल.

- देविदास साळे

संपूर्ण छत्रपतीनगराचे ड्रेनेज या ठिकाणच्या स्पेप्टिक टँकमध्ये जमा होते. जवळपास ३ हजार लोकसंख्या असल्याने मोठ्या प्रमाणात हे ड्रेनेज वाहून येते. त्यातच सेप्टिक टँकचा स्लॅब कोसळल्याने ड्रेनेजचे उघडे पडले आहे. हा मैला व घाण पाणी नागरिकांच्या आरोग्यस धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ या गंभीर बाबीकडे लक्ष देवून काम पूर्ण करावे.

- हर्षद वनगुजर

ग्रामपंचायतीकडून चांगल्या सोईसुविधा मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे. असे असतानाही नागरिकांनी लोकवर्गणीतून कामे केली आहेत. ग्रामपंचायतीने केलेले दुर्लक्ष ही बाब खटकणारी आहे. लोकवर्गणीची वाट पाहण्यापेक्षा ग्रामपंचायतीने स्वतः पुढाकार घेवून आता दुरुस्तीचे काम करावे व नागरिकांना दुर्गंधीच्या त्रासापासून मुक्त करावे.

- कौतिकराव म्हस्के

स्लॅब कोसळल्याने सर्व मैला उघडा पडला आहे. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. ही दुर्गंधी दूर करण्यासाठी ड्रेनेजवरील स्लॅब पुन्हा नव्याने टाकण्याची गरज आहे. परिसरात सकाळी व संध्याकाळच्या वेळी मोठी दुर्गंधी पसरते. त्यामुळे अनेकवेळा नाकाला रुमाल लावण्याची वेळ देखील येते. यापासून मुक्ती देण्यासाठी ग्रामपंचायतीने तात्काळ काम पूर्ण करावे.

- पुष्पाबाई तोडकर

छत्रपतीनगरात प्रत्येक गोष्टीसाठी आज वर्गणी करण्याची वेळ आली आहे. सर्वच सोईसुविधा लोकवर्गणीतून पुर्ण कराव्या लागणार असतील तर मग ग्रामपंचायतीने कर देखील माफ करावा. कर आकराताना मात्र कोणतीही सवलत दिली जात नाही. ग्रामपंचायतीची ही भूमिका पूर्णतः चुकीची आहे.

- देविदास जामुंदे

छत्रपतीनगरात राहणारे नागरिक हे बहुसंख्य कंपनी कामगार आहेत. त्यामुळे त्यांना दररोज रोजीरोटीचा विचार करावा लागतो. त्यातच काहीजण हे भाडेकरू आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी लोकवर्गणीचा विषय समोर आल्यास आर्थिक गणित बिघडू शकते. आता ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून सेप्टिक टँकचे काम पूर्ण करून द्यावे.

- बबूताई देशमुख

या उघड्या सेप्टिक टँकमध्ये कुत्रे, मांजरसह अन्य जनावर पडण्याची भीती निर्माण झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याच्या आशाने जनावरे त्यात डोकावतात. त्यामुळे ही भीती वाढली आहे. त्यातच लहान मुलांनाही यापासून धोका आहे. ग्रामपंचायतीने हे काम पूर्ण करावे.

- महानंदा शिरसकर

देशात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे काम सरकार करत आहे. मात्र, येथे लोकसहभागातून काम होऊन देखील स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायत पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. स्लॅब कोसळल्याने होणारी दुर्गंधी ही साथरोगाला निमत्रंण देणारी आहे.

- संगिता चंदा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिग्मा हॉस्पिटललगत पाण्याची नासाडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहानूरवाडी परिसरातील युनायडेट सिग्मा हॉस्पिटलगत असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर चक्क पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे. मागच्या काही दिवसांपासून प्रत्येक पाण्याच्या दिवशी वॉलमधून पाण्याची गळती होत असून, हे पाणी लांबपर्यंत मैदानावर साचत आहे. या वॉलची दुरुस्ती केली जात नसल्याने सर्वांच्या डोळ्यांदेखत पाण्याची नासाडी सुरू असते. लवकरात लवकर वॉलची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवार बाजारात भाजी विक्रेत्यास लूटले

0
0

औरंगाबाद : जाफर गेट येथील रविवार बाजारात एका भाजी विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवून लूटण्यात आले. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदनवन कॉलनी येथील राहुल गिरधारी (वय २२) हे रविवार बाजारात भाजी विक्री करतात. रविवारी (२४ मे) दुपारी साडेतीनच्या सुमारास पवन रामकिसन चावरिया (रा. गांधीनगर) याने गिरधारी यांना शिवीगाळ करत पैशांची मागणी केली. त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा चाकूचा धाक दाखवत गल्ल्यातील एक हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी चावरियाविरुद्ध लूटमार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अर्जून पवार करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोराला पकडणाऱ्या नागरिकांवरच बालंट

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोकणवाडीतील नागरिकांनी गस्त घालताना पकडलेल्या एका चोराविरुद्ध तक्रार दाखल होण्याऐवजी चक्क पकडणाऱ्यांवरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता होती. पण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर क्रांतिचौक पोलिसांना चोराविरूद्ध गुन्हा दाखल करावा लागला.

कोकणवाडीत वारंवार चोऱ्या होत असल्याने स्थानिक नागरिक पुढाकार घेऊन गस्त घालत आहेत. विशेषतः मशीद व त्या आसपासच्या परिसरात होणाऱ्या भुरट्या चोरांनी लोक हैराण आहेत. नागरिकांनी शनिवारी रात्री (२३ मे) या परिसरात शेख अब्दुल गफार उर्फ बाबू (वय १९) याला पकडून चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन संबंधित नागरिकांना रविवारी (२४ मे) सकाळी येऊन तक्रार देण्यास सांगितले. त्यामुळे रविवारी सकाळी काही नागरिक क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गेले. तेव्हा पोलिसांच्या वागणुकीमुळे त्यांच्यावरच गुन्हा दाखल होण्याची पाळी आली. पोलिसांनी तरुणाविरुद्ध तक्रार घेण्याऐवजी त्याला मारहाण झाल्याची तक्रार नोंदवून मारहाण करणाऱ्याना हजर होण्याचे आदेश दिले. याप्रकारामुळे नागरिक चांगलेच गोंधळून गेले. त्यांच्यापैकी काहीजणांनी सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्याकडे धाव घेतली. बाहेती यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्यानंतर संशयीत तरुणावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर क्रांतिचौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दोन मोबाइल, सीमकार्ड

नागरिकांनी पकडलेल्या शेख गफार याच्याकडे दोन मोबाइल, आठ सीमकार्ड व आयपीएलच्या तिकिटांची एक बॅग सापडली आहे. त्यासोबत असलेले आणखी दोनजण पळून गेल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images