Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दिल्लीच्या बुकींना २८ पर्यंत कोठडी

$
0
0

औरंगाबाद : आयपीएल सट्टाप्रकरणी दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या दोघांना कोर्टाने गुरुवारपर्यंत (२८ मे) पोलिस कोठडी सुनावली, तर अटकेतील नरेश पोटलवाड यास न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.

हे सट्टा प्रकरण १५ मे रोजी उघडकीस आले आहे. याप्रकरणात दिल्ली येथील अमित विजय बाली (३४, रा. रुम नं. ५३/२, हकीकत नगर, नॉर्थ दिल्ली) आणि प्रिन्स उर्फ किंगमेकर उर्फ मन्नू सोमनाथ बहल (२४, रा. रुम नं. १९/२, हकीगत नगर, नॉर्थ-वेस्ट दिल्ली) या दोघांना सायबर क्राइमच्या पथकाने शनिवारी (२२ मे) अटक केली. हे दोघे महाराष्ट्रातील बुकींकडून भाव घेऊन त्यांना त्यावरील कमिशनचे वाटप करायचे, अशी माहिती सायबर क्राइमचे पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.

दिल्लीच्या हायप्रोफाइल वसाहतीत बाली आणि बहल विद्यार्थ्यांना खोल्या, कुलर भाड्याने देतात. या दोघांचे शिक्षण दहावी ते बारावीपर्यंत झालेले आहे. पोतलवाड हा बाली आणि बहल यांचा आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांशी संपर्क घडवून आणायचा. एका सट्टेबाजावर पोतलवाड याला चार ते पाच हजार रुपयांचे कमिशन मिळायचे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पडेगावात पुरलेले रिव्हॉल्व्हर जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अॅड. नीलेश घाणेकर गोळीबार प्रकरणात वापरल्यानंतर पुरून ठेवलेले रिव्हॉल्व्हर पोलिसांनी सोमवारी पडेगाव येथील कासंबरी दर्गा परिसरातून जप्त केले. हा हल्ला घाणेकर यांनीच घडवून आणल्याचा संशय आहे.

अॅड. घाणेकर एका खटल्यानिमित्त ५ मे रोजी अहमदनगर येथे खासगी कारने गेले होते. तेथून परतताना त्यांनी राजू जहागीरदारचा मुलगा मुजफ्फर उर्फ सोनू याच्याशी संपर्क साधला. कारचालकास बाहेर काढून त्याच्यासोबत काही वेळ चर्चा केली. याच वेळी गोळीबाराचा कट रचला गेला, अशी माहिती तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर राजू जहागीरदार आणि समीर पठाण यांनी औरंगाबादला येऊन अॅड. घाणेकर यांची भेट घेतली. ठरल्यानुसार जहागीरदार, समीर आणि मुजीब मोमीनपुरा भागात भेटले. जहागीरदारने दोघांना प्रत्येकी दोन-दोन काडतुसे असलेले रिव्हॉल्व्हर दिले. समीर आणि मुजीबने ठरल्यानुसार संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ अॅड. घाणेकर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. तेथून पळ काढताना मुजीबने काही अंतरावर रिव्हॉल्व्हरचे मॅग्झिन उघडले. त्यातील एक गोळी रस्त्यातच पडली. यानंतर दोघांनी मोमीनपुऱ्यात जाऊन मोहिम फत्ते झाल्याचे जहागीरदारला सांगितले, अशी माहिती तपासात समोर आली आहे. गोळी झाडल्यानंतर झटापट करताना हल्लेखोरांचे रिव्हॉल्व्हर खाली पडले, असा बनाव करण्यात येणार होता. मात्र, मुजीब आणि समीर ते विसरले. व रिव्हॉल्व्हर सोबत घेऊन गेले. ही चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुजीबने रात्रीतून ते पुरले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवार (२७ मे) वेबसाइटवर दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना ४ जून रोजी गुणपत्रिका मिळणार आहेत. शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते २६ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. २७ मे रोजी मंडळाच्या वेबसाइटवर दुपारी १पासून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. यासह ४ जून रोजी विद्यार्थ्यांना कॉलेजांमधून गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत अर्ज भरता येतील, तर २७ मे ते १५ जूनपर्यंत उत्तरपत्रिकांच्या छायांकितप्रतीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येणार आहेत.

निकालाच्या वेबसाइट - www.mahresult.nic.in, www.maharashtraeducation.com, www.hscresult.mkacl.org, www.rediff.com/exams

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्याच्या अंगणात निवडणुकीचा रंग!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. विद्यमान कार्यकारिणीला शह देण्यासाठी तीन स्वतंत्र पॅनल मैदानात उतरणार आहेत. शिवाय निवडणुकीत प्रथमच 'ओबीसी पॅटर्न' राबविण्याची तयारी काही साहित्यिक करीत आहेत. सर्वाधिक मतदार असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसार मंडळाची भूमिकाही निवडणुकीत निर्णायक असल्यामुळे शेवटच्या टप्प्यात चुरस वाढणार आहे.

घटनादुरुस्ती आणि तांत्रिक कारणांमुळे सातत्याने लांबणीवर पडलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदारयादी प्रसिद्ध झाली असून येत्या सोमवारपासून (१ जून) नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंडळ कार्यरत आहेत. सर्वस्तरातून दबाव वाढल्यानंतर परिषदेची निवडणूक होत आहे. एकूण तीन हजार मतदार असून इच्छुक उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. मागील काही वर्षात परिषदेच्या अनेक शाखा स्थापन झाल्यामुळे सदस्यसंख्या वाढली आहे. बहुतेक शाखा विद्यमान मंडळाशी निगडीत असल्यामुळे प्रतिस्पर्धी पॅनलला तगडे आव्हान आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील आठ जिल्हे, बृहन्महाराष्ट्रातील सदस्य आणि विदेशातील मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विद्यमान कार्यकारिणी मंडळ प्रयत्नशील आहे. दरम्यान, निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता मावळली आहे. भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेने २२ जागा लढवण्याची घोषणा केली आहे. या परिषदेचे नेतृत्त्व डॉ. सर्जेराव जिगे, प्रा. शिवाजी हुसे करीत आहेत. तर निवडक जागा लढवण्याची तयारी मराठवाडा साहित्य परिषद विकास समितीने केली आहे.

विशेष म्हणजे निवडणुकीत प्रथमच 'ओबीसी पॅटर्न' राबविला जाणार आहे. एका ज्येष्ठ साहित्यिक व प्रकाशकाने या पॅटर्नच्या पॅनलसाठी पुढाकार घेतला आहे. विद्यमान कार्यकारिणीसोबत झालेल्या मतभेदातून पॅनलची तयारी सुरू आहे.

सर्व जागा जिंकणे शक्य नसल्यामुळे किमान २-३ जागा जिंकून परिषदेत 'एंट्री' करण्याचा प्रयत्न आहे. हक्काचे मतदार असलेल्या उमेदवाराला पॅनलमध्ये घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील आठवड्यात अर्ज दाखल झाल्यानंतर वैयक्तिक प्रचार सुरू होणार आहे.

'मशिप्र' मंडळाची भूमिका

सर्वाधिक मतदार असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणुकीत निर्णायक भूमिका आहे. काही उमेदवार विद्यमान कार्यकारिणीच्या पॅनलमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. मात्र, मंडळात नोकरीला असल्यामुळे त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह उभे आहे. ऐनवेळी मंडळाच्या प्रमुखांनी निवडणुकीतून अंग बाजूला काढल्यास विद्यमान मंडळाला निवडणूक सहजसोपी ठरण्याची शक्यता आहे.

तगडे आव्हान

मराठवाडा साहित्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीने आपल्या कार्यकाळात महत्त्वाची कामे केली आहेत. लेखिका साहित्य संमेलन व विश्व मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह उभारणी, ना. गो. नांदापूरकर सभागृह उभारणी, 'प्रतिष्ठान'चे नियमित प्रकाशन, 'साक्षात' व 'स्वागत' उपक्रमासह नवीन साहित्य उपक्रम राबवले आहेत. परिषदेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यातही कार्यकारिणीला यश आले. या मुद्यांवर ठाले यांचे पॅनल निवडणूक लढवणार असल्यामुळे प्रतिस्पर्ध्यांसोर तगडे आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५ हजार कर्मचाऱ्यांना फायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात बॅँकेच्या पाच हजार कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा फायदा होणार आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना १८ ते २० टक्के घसघशीत पगार वाढ मिळली असून, ऑल इंडिया बँक एम्प्लाइज असोसिएशनसोबत झालेल्या दहाव्या द्विपक्षीय करारावर मुंबईत स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती युनियनचे जनरल सेक्रेटरी व महाबँकेचे माज‌ी संचालक देविदास तुळजापूरकर यांनी दिली.

तुळजापूरकर म्हणाले, 'नव्या पगारवाढीच्या करारात सुमारे ५ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे २ हजार २७० कोटींची ही एकूण वाढ असून १ नोव्हेंबर २०१२ पासूनचे एरिअर्स सर्व अधिकारी, कर्मचारी, क्लर्क आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मिळेल. या करारामुळे सर्वच्या सर्व अर्थात चौदा राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँकांमधील कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.'

आज होणार जल्लोष : 'वाढलेल्या पगाराचा आनंद आणि गेल्या ३० महिन्यांपासूनच्या लढ्याला यश मिळाल्याबद्दल स्टेट बँक ऑफ हैदराबाद येथील विभागीय कार्यालयासमोर सर्व बँक कर्मचारी संध्याकाळी ५ वाजता जल्लोष करणार आहेत. पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी केली जाईल,' असे तुळजापूरकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यातला पैसा साताऱ्यात खर्च करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'साताऱ्यातून जमा झालेला पैसा साताऱ्यातच खर्च करा. शहरातील कामांसाठी किंवा ठेकेदारांची बिले देण्यासाठी हा पैसा खर्च करू नका,' असे स्पष्ट आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्या पैशातून सातारा-देवळाई भागात लगेचच विकास कामे सुरू करता येतील असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या सुमारे साडेपाच कोटी रुपये सातारा नगरपालिकेत जमा आहेत.

सातारा-देवळाई परिसराचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे यांनी या भागातील सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देणे सुरू केले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून याच भागातील प्रश्नांच्या संदर्भात महापालिकेत बैठकांचे सत्र सुरू आहे. प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेण्याचे काम केले जात आहे. सातारा ग्रामपंचायत आणि त्यानंतर नगरपालिकेत सुमारे साडेपाच कोटी रुपये जमा आहेत, असे लक्षात आले आहे. त्यात १३ व्या वित्तआयोगाचे २ कोटी ९७ लाख ६१ हजार २७१ रुपये, नागरी दलित वस्ती उपक्रमाचे १ कोटी १६ लाख ६६ हजार ३७५ रुपये, नगरोत्थान महाअभियानाचे ७९ लाख ९२ हजार ३२० रुपये, कर भरणातून १ लाख ६९ लाख २ हजार १५७ रुपये आणि ८३ लाख ३१ हजार ५४३ रुपये, रस्ते अनुदानासाठीचे २ लाख १४ हजार ९३७ रुपयांचा समावेश आहे. हे सर्व पैसे सातारा भागासाठीच खर्च करा. महापालिकेत अन्य कामांसाठी, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी किंवा ठेकेदारांची बिले देण्यासाठी ही रक्कम वापरू नका असे आदेश महापौरांनी दिले आहेत. सातारा भागात पूर्वी पन्नास हजार लिटरच्या टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात होता, त्यामुळे हे टँकर गल्लीत जाऊ शकत नव्हते. आता महापालिकेतर्फे दहा हजार लिटरचे टँकर दिले जात आहेत. त्यामुळे गल्ल्यांमध्ये हे टँकर जाऊ शकतात. नागरिकांना पाणी भरण्यासाठी त्रास होणार नाही असा दावा केला. कचरा उचलण्यासाठी या भागात दोन टिप्परची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

सातारा-देवळाई भागाला टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. आज १४ टँकरने पाणीपुरवठा झाला. त्यात सहा टँकरची भर येत्या एक - दोन दिवसात टाकली जाणार आहे. पूर्वी चार दिवसाआड एक ड्रम पाणी सातारावासियांना दिले जात होते. आता एक दिवसाआड एक ड्रम पाणी सातारावासियांना दिले जाईल.

- त्र्यंबक तुपे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळ सोकावला अन् रस्ता गिळला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोडगेपणाची हद्द ओलांडल्याचा प्रत्यय जयभवानी नगरमध्ये दिसून येतो. सार्वजनिक रस्ता आपल्या मालकीचा समजून, अनेकजण मुख्य रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकत आहेत. वॉर्ड अधिकारी इकडे फिरकत नसल्यामुळे सगळे रान मोकाट आहे.

यंदाच्या दुष्काळाने जायकवाडीचे धरण आटले, शहरवासियांचा घसा कोरडा पडला. मात्र, जयभवानी नगरमध्ये बांधकाम जोरात सुरू आहे. यासाठी पाण्याची प्रचंड नासाडी होते. शिवाय बांधकामासाठी आणलेली वाळू, विटा, लोखंडी गज हे साहित्य सर्रासपणे रस्त्यावर टाकण्यात येते. विशेषतः शिवाजी चौक ते सिडकोच्या तेराव्या योजनेला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर हे प्रकार जास्त आहेत. अनेकदा एक वाहनही जात नाही. यामुळे या भागात पहाटेपासून वाहतूक कोंडी होते. लहान मुलेही इथे खेळतात. मुख्य रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. अशातच अवजड वाहन आले, तर किमान अर्धा तास कोंडी सुटण्याची शक्यता नसते. याकडे प्रशासन लक्ष कधी देणार, असा सवाल नागरिक करत आहेत.

सिडकोवासीयांची दमदाटी

जयभवानी नगर, सिडको तेरावी योजना या भागात वर्षभर बांधकाम सुरू असते. वर्षभर बांधकाम साहित्य रस्त्यावर पडलेले असते. योजनेला जोडून असलेल्या गल्ल्यांचा उपयोगही बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी होतो. यामुळे रस्ताच बंद होतो. कुणी जाब विचारायला गेले की, हा आमचा रस्ता आहे. आम्ही पाहिजे तसा वापरू, अशी दमदाटी सिडकोवासीय दडपशाही करतात. वारंवार तक्रार करूनही ही दादागिरी सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक भागात रस्त्यांमध्ये लोखंड खांब रोऊन अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. जयभवानी नगरमध्ये असे करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, नागरिकांनी विरोध केला.

दररोज अपघात

बांधकाम साहित्य रस्त्यावर पसरले आहे. रात्रीच्या वेळी अरुंद गल्लीत वळण घेतल्यावर चालकाला अंदाज येत नाही. त्यामुळे या भागात रोज एखादा तरी अपघात होतो. विशेष म्हणजे या भागात आजवर एकदारी वॉर्ड अधिकारी फिरकले नाहीत. ना कुणाला दंड आकारला जातो. ना साहित्य उचला असे सांगितले जाते. यामुळे नागरिक बेफिकीर आहेत. आता हा बेजबादारपणा टाळण्यासाठी अपघातात एखादा बळी गेल्याची वाट प्रशासन पाहतेय काय?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूजमध्ये दुचाकी जाळणारा पकडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

बजाजनगर परिसरात गेल्या दीडवर्षापासून वाहने जाळणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सोमवारी (२५ मे) पकडले. त्याने ६० दुचाकी जाळल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे समजते. तीन वर्षात या परिसरात सुमारे अडीचशे दुचाकी जाळण्यात आल्या आहेत. औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी जाळण्याचे सत्र बजाजनगरातून सुरू झाले. पोलिसांनी सुरुवातीला ही बाब गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे दुचाकी जाळण्याच्या घटना वाढल्या. तत्कालीन पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन दुचाकी जाळणाऱ्यास पकडण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, वाळूज लाइननगर येथील शिवाजी किसन राहटवाड (वय २५, मुळ रा. तुर्काबाद खराडी) याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पंधरा दिवसांपासून एक पोलिस अधिकारी व दोन कर्मचारी त्याच्या मागावर होते. त्याच्या घरावर दोन दिवसांपासून पाळत ठेवण्यात आली होती. हा संशयित तरूण सोमवारी (२५ मे) घरी येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. या तरुणाची पोलिसांची चांगली चौकशी केली. तेव्हा त्याने दीडवर्षात साठ दुचाकी जाळल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच दुचाकी जाळलेल्या ठिकाणांचीही माहिती दिली. त्याने दिलेल्या माहितीत तथ्य आढळल्यानंतर पोलिसांनी पुढील कार्यवाहीस सुरुवात केली. परंतु, याबद्दल पोलिसांकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही.

वाळूज व बजाजनगर परिसरात दुचाकी जाळण्याच्या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे. त्यावरून नागरिकांमध्ये पोलिसांविरुद्ध असंतोष आहे. त्यातच तत्कालीन पोलिस निरिक्षकाच्या बदलीनंतर हे प्रकार वर्षभर थांबले. त्यामुळे पोलिसांतील अंतर्गत वादातून हे प्रकार सुरू आहेत का? अशी शंका नागरिक व्यक्त करीत होते. परंतु, वर्षभरानंतर पुन्हा इंदलसिंग बहुरे यांच्या कार्यकाळातही दुचाकी जाळण्याचे प्रकार सुरू झाले.

दुसरा व्यक्ती कोण ?

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पकडलेल्या संशयिताने साठ दुचाकी जाळल्याचे सांगितले आहे. त्याशिवाय इतर दुचाकी जाळण्याच्या घटनांबद्दल त्याने कानावर हात ठेवल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे दुचाकी जाळणारे दुसरे कोण आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेचे बजेट फुगले कसे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे बजेट फुगले कसे, अशी विचारणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्राद्वारे महापालिका आयुक्तांना केली आहे. आता या पत्राचा खुलासा काय करायचा, या विचारात पालिका प्रशासन आहे.

महापालिकेत गेल्या पाच वर्षांत बजेट फुगवण्याची स्पर्धाच लागली होती. विकासाची कामे होवोत की न होवोत, जास्तीत जास्त नगरसेवकांना खूष करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला गेला. त्यामुळे पालिकेची आर्थिक शिस्त कोलमडली. केलेल्या बजेटच्या निम्म्या बजेटपर्यंतही पोचता येत नसल्यामुळे पाच वर्षाच्या काळात महापालिकेत मोठा आर्थिक पेच निर्माण झाला. त्यामुळे कामे होत नसल्याची ओरड नगरसेवकांमधून होत गेली. तिजोरीत पैसाच नाही, त्यामुळे कामे कशी करणार, असा सवाल प्रशासनातर्फे विचारला जाऊ लागला. या व्दंव्दातून शहराच्या विकासाचा गाडा मात्र रुतला. या प्रकाराची दखल थेट मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी महापालिकेला मुख्यमंत्री कार्यालयाकडून पत्र प्राप्त झाले. त्या पत्रात म्हटले आहे की, 'असे निदर्शनास आले आहे की, आयुक्तांनी बजेट ठेवल्यावर त्यात मोठी वाढ केली जाते. त्यामुळे योजनाबाह्य खर्च वाढतो. विकासाची कामे त्यातून ठप्प होतात. वाढवले जाणारे बजेट आणि त्यामुळे वाढणारा योजनाबाह्य खर्च या बद्दल आयुक्तांनी आपले मत मुख्यमंत्री कार्यालयाला कळवावे.' या पत्रामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडे या संदर्भातला खुलासा करण्यासाठी आयुक्त प्रकाश महाजन मुंबईला रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकनाथ आवाड यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मानवी हक्क अभियाना'चे संस्थापक, आंबेडकरी चळवळीतून दलित व वंचितांसाठी संघर्ष करणारे बंडखोर दलित नेते व साहित्यिक अॅड. एकनाथ आवाड (वय ६५) यांचे सोमवारी सकाळी साडेआठला हैदराबादेत निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी तेलगाव (जि. बीड) येथे नेल्सन मंडेला वसाहतीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पोटाच्या अल्सरने त्रस्त असल्याने हैदराबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. सततच्या संघर्षातूनच 'जग बदल घालुनि घाव' हे त्यांचे आत्मकथन जन्माला आले. ते दलित चळवळीसाठी मार्गदर्शक ठरले आहे. १९९०मध्ये त्यांनी मानवी हक्क अभियानाची स्थापना करून दलित, आदिवासींवरील अन्यायांविरोधात आवाज उठविला. २००१मध्ये त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या वंशभेदविरोधी परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती.

आवाड यांचा जन्म मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात मातंग कुटुंबात झाला होता. अत्यंत खडतर परिस्थितीत शिष्यवृत्तीच्या बळावर, त्यांनी बी. ए. आणि नंतर एम. एस. डब्ल्यू. आणि एलएलबीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते विवेक पंडित यांच्याबरोबर ठाणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी काम करू लागले. वेठबिगारांच्या प्रश्नावर त्यांनी रान उठवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचा व्यापार तेजीत

$
0
0

उन्मेष देशपांडे, औरंगाबाद

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचा पाण्याचा व्यापार तेजीत आला आहे. दुसरीकडे नागरिकांवर मात्र पाणीपाणी करण्याची करण्याची वेळ आली आहे. नागरिकांना महाग आणि उद्योगांना स्वस्त पाणी असा व्यस्त कारभारही कंपनीकडून सुरू असल्यामुळे त्यातही आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य नागरिक भरडले जाऊ लागले आहेत.

महापालिकेने औरंगाबाद शहराची पाणीपुरवठा योजना १ सप्टेबर २०१४पासून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या ताब्यात दिली आहे. तेव्हापासून शहरातील सर्व नागरिकांना आणि खासगी उद्योग, संस्थांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कंपनीवर आली आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या दरानुसार कंपनीतर्फे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहराच्या अनेक भागात पाच-सहा दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात आहे. या प्रकारांमुळे आंदोलनाचे प्रमाणही वाढले आहे. पाणीपुरवठा करणे शक्य झाले नाही त्याभागात महापालिकेतर्फे टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जात होता. कंपनी मात्र पाण्याची पर्यायी व्यवस्था करीत नाही. मागणी केल्यावरही टँकर पाठविले जात नाही, अशी तक्रार नागरिक आणि नगरसेवकांकडून केली जाते. त्यातूनच सिडको एन-५ आणि शहागंज येथील जलकुंभावर गेल्या आठवड्यात आंदोलने झाली. सिडको एन-५च्या जलकुंभावरून टँकरमध्ये पाणी भरले जाते आणि ते शहराच्या विविध भागात पाठविले जाते. या जलकुंभाला 'मटा' प्रतिनिधीने सोमवारी भेट दिली असता वेगळेच चित्र समोर आले. तेथे पाणी भरण्यासाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या टँकर्सऐवजी खासगी टँकरचीच संख्या जास्त होती. ट्रॅक्टर, टिप्पर, छोटा हत्ती या वाहनांवर पाण्याची टाकी बसवून पाणी भरून नेण्याचे काम केले जात होते. याशिवाय लोडिंग रिक्षांचाही वापर केला जात असल्याचे लक्षात आहे. पाणी भरून घेण्यासाठी वाहनांची मोठीच्या मोठी रांग होती. त्यात खासगी वाहने अधिक होती. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीतर्फे पाच हजार लिटरच्या पाण्याच्या टँकरसाठी ६६० रुपये दर आकारले जातीत तर, दहा हजार लिटरच्या पाण्याच्या टँकरसाठी ११०० रुपये दर आकारले जाते. खासगी संस्था, उद्योगांना मात्र हजार लिटरसाठी केवळ ७३ रुपये दराने (दहा हजार लिटरसाठी ७३० रुपये) पाणी दिले जाते. हे दर लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना टँकरद्वारे पुरविले जाणारे पाणी उद्योगांना पुरवल्या जाणाऱ्या पाण्यापेक्षा महाग आहे.

महापालिकेने दिलेल्या निर्देशानुसार आणि पाणीपट्टी उपविधीनुसार पाण्याचे दर कंपनीतर्फे आकारले जात आहेत. कंपनीने त्यात कोणताही बदल केलेला नाही. खासगी टँकर जास्त दिसत असले तरी, काही टँकर कंपनीने भाडेतत्त्वावर घेतले आहेत. त्यांवर कंपनीचा लोगो लावणे राहून गेले आहे.

- राहुल मोत‌ियळे, जनसंपर्क अधिकारी, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईचा बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

तालुक्यातील पाणीटंचाईने एक बळी घेतला असून एक तरुणी गंभीर जखमी आहे. कनकशीळ येथे पाणी शेंदताना एक महिला व एक तरुणी विहिरीत पडल्या. त्यापैकी महिलेचा बुडून मृत्यू झाला.

कनकशीळ हे तालुक्यातील दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. गिरीजा मध्यम प्रकल्पातील वडोद शिवारात असलेल्या विहिरींचे पाणी गावातील तीन विहिरीत सोडून पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी सोडले जाते, तेव्हा महिला, पुरूष, लहान मुलांची एकच गर्दी होते. ग्रामपंचायत कार्यालयाजवळील विहिरीत पाणी सोडले जात असताना सोमवारी (२५ मे) नेहमीप्रमाणे सकाळी साडेअकराच्या सुमारास पाणी सोडण्यात आले. त्यावेळी नेहमीप्रमाणे गर्दी झाली.

पाणी शेंदतना तोल जाऊन कमलाबाई माणिकराव बोडखे (वय ५१) व कोमल विष्णू कामठे (वय १६) या विहिरीत पडल्या. त्यांना विहिरीतून बाहेर काढून उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता कमलाबाई बोडखे यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. कोमल कामठे हिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर ग्रामपंचायतीने विहिरीवर चारी (पाणी शेंदण्यासाठी लोखंडी चाक) बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

गावकऱ्यांची प्रशासनावर नाराजी

तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी 'एक दिवस मजुरासोबत' कार्यक्रमात ३० एप्रिलचा दिवस कनकशीळ येथे घालवला होता. त्यावेळी महिलांनी किती दिवस पाणी शेंदायचे, असा प्रश्न उपस्थित करून नळ पाणीपुरवठा योजना द्या, अशी मागणी केली होती. मात्र उपस्थित अधिकाऱ्यांनी या गावासाठी योजना लोकसंख्येच्या निकषात बसत नाही, असे सांगून वेळ मारून नेली. या मागणीनुसार तात्पुरती पाच हजार लिटरची टाकी बसवून तोट्या लावून दिल्या असत्या तर ही दुर्घटना घडली नसती, अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा चालकांचा आंदोलनाचा निर्णय

$
0
0

औरंगाबादः रिक्षा चालकांच्या मागण्यांकडे लक्ष न देता त्यांच्या विरोधात पोलिस आणि आरटीओची कारवाई सुरू आहे. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात होत असलेली कारवाई चुकीची आहे. या कारवाईच्या विरोधात रिक्षा चालक एकजूट होऊन आंदोलन उभारणार असल्याची माहिती बुद्धीनाथ बराळ यांनी दिली. औरंगाबाद रिक्षा चालक मालक कृती समितीच्या म्हाडा कॉलनीत झालेल्या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला. या मेळाव्यात दगडू शहाणे, गजानन वानखेडे, हबीब पठाण, राजू देहाडे, इम्रान खान पठाण, अज्जूभाई, एस. के. खलील, शेख लतीफ, अनिलराव मोगले, जावेद मनियार, राजेश रावळकर, शेख नजीर भाई यांची उपस्थिती होती. रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी विविध कार्यालयांवर मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले. चार जून रोजी पैठण गेटहून पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण हटविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

सिडको प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव पथकाने लिंकरोड चौक व नगर २ साऊथ सिटी चौकातील अतिक्रमणे हटविली. विशेष म्हणजे 'सिडको वाळूज महानगरातील चौकात अतिक्रमणाकडे काणाडोळा' या मथळ्याखाली म.टा.मध्ये वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले व ही कारवाई करण्यात आली.

सिडकोच्या वाळूज महानगर प्रकल्पाचे काम एकीकडे जलदगतीने सुरू आहे तर दुसरीकडे चौकातील अतिक्रमणात वाढ होत असल्याचे दिसून येते. सिडकोने यापूर्वी देखील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र, पुन्हा ती अर्धवट सोडून दिली. सिडकोच्या या अर्धवट मोहिमेमुळे परिसरात अतिक्रमणांच्या संख्येत वाढ झाली आहे. या अतिक्रमणांसंदर्भात 'मटा'ने 'अतिक्रमणांकडे काणाडोळा' ही बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी घेवून सदरील अतिक्रमण तत्काळ काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे सोमवारी सकाळीच सिडकोचे विकास अधिकारी पंजाबराव चव्हाण, मालमत्ता अधिकारी शशीकांत वाईकार, अतिक्रमण हटाव पथकाचे अधिकारी गजानन साटोटे, अतिक्रमण पथकप्रमुख खैरे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी ही अतिक्रमणे काढून टाकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅन्सर’ला ‘समांतर’चा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल तीन वर्षांपासून खासगी टँकरवर असलेल्या महाराष्ट्रातील पहिल्याच स्वतंत्र शासकीय कर्करुग्णालयाला महापालिकेप्रमाणेच 'वॉटर युटिलिटी कंपनी'नेही हात दाखवला आहे. 'टँकरसह गरजेनुसार पाणी पुरवठा करू', असे पत्र खुद्द कंपनीने कर्करुग्णालयाला दिले असताना, आता 'तुम्हीच टँकर आणा, आम्ही फक्त पाणी देऊ' असा कंपनीचा खाक्या समोर आला आहे.

कर्करुग्णालय सुरू झाल्यापासून पालिकेच्या आठ इंची पाईपलाईनद्वारे प्रत्येक तिसऱ्या दिवशी केवळ दहा हजार लिटर मिळत आहे; परंतु रुग्णालयाची दररोजची गरज ही दीड लाख लिटर पाण्याची आहे. त्यामुळेच मागच्या तीन वर्षांपासून कर्करुग्णालयाला टँकरशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातही पिण्यासह सर्व प्रकारच्या उपचार-शस्त्रक्रियांसाठी पालिकेचे प्रक्रियायुक्त पाणी हे खासगी टँकरपेक्षा चांगले असल्याने पालिकेचे टँकर मिळविण्यासाठी कर्करुग्णालयाने पालिकेकडे वारंवार मागण्या केल्या. मात्र, पालिकेने प्रत्येकवेळी मागण्या धुडकावून लावल्यामुळेच कॅन्सर हॉस्पिटल मागच्या तीन वर्षांपासून खासगी टँकरवर सुरू आहे. या संदर्भात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाची सुमोटो याचिका दाखल असून कोर्टाने कर्करुग्णालयासाठी स्वतंत्र जलवाहिनी तयार करण्याचे आदेश दिले. तसेच जलवाहिनी पूर्ण होईपर्यंत रुग्णालयाच्या गरजेनुसार पाणी पुरवठा करण्याचे आदेश पालिकेला दिले. मात्र, पाणी पुरवठ्याचे काम पालिकेने वॉटर युटिलिटी कंपनीच्या हवाली करून टाकले आहे आणि कंपनीने तर सरळसरळ हात वर केले आहेत. त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाचीही अंमलबजावणी होत नाही.

खर्च आवाक्याबाहेर

कंपनी ६७० रुपये प्रती दहा हजार लिटर पाणी, असे आकारणार आहे. मात्र, रिकामे टँकर नेऊन भरून आणण्यासाठी प्रत्येक खेपेला ७०० ते ८०० रुपये अतिरिक्त खर्च येत असल्यामुळे पालिकेच्या प्रक्रियायुक्त पाण्याचा खर्च १३७० ते १४७० रुपयांपर्यंत जात असून, तो कर्करुग्णालयाच्या आवाक्याबाहेर आहे. त्या उलट ६००० लिटरचे खासगी टँकर ६९० रुपयांना दिले जाते. म्हणूनच शेवटी नाईलाजाने रुग्णालयाला खासगी टँकर घ्यावे लागत आहे. कंपनीला ३-४ पत्र देऊनही प्रतिसाद दिलेला नाही, अशीही तक्रार आहे.

टँकरसह पाणी पुरवठा करण्याचे कंपनीने मान्य केले आहे. तसे पत्रही दिले आहे. मात्र, आम्हाला ठरल्यानुसार पाणी मिळत नाही. कंपनीने मान्य केल्यानुसार पाणी द्यावे.

- डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, कॅन्सर हॉस्पिटल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन गटात तुंबळ हाणामारी

$
0
0

औरंगाबादः जाफरगेट परिसरातील हॉटेल सवेरा येथे दोन गटात वाद होऊन तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एक जण जखमी झाला असून पाच जणांना क्रांतिचौक पोलिसांनी अटक केली आहे. येथील सवेरा हॉटेलमध्ये सोमवारी रात्री तीन तरूण जेवणासाठी गेले होते. यावेळी जेवण उशीरा देण्याच्या कारणावरून त्यांचा हॉटेलचालकाशी वाद झाला. या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दरोडा व मारहाणीचा गुन्हा क्रांतिचौक पोलिस ठाण्यात दाखल झाला. दोन्ही गटाचे आरोपी सय्यद नासेर, पाशा खान, दादाराव शिंदे, विशाल चावरिया व युवराज चावरिया यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती क्रांतिचौक पोलिसांनी दिली.

मोबाइल पळविले

सिडको, एन-९ भागातून शैलेश मोहिते या तरूणाचा चोवीस हजार रूपयांचा मोबाइल रविवारी रात्री चोरट्यांनी पळवला. उघड्या खिडकीतून हात टाकून चोरट्यांनी हा प्रकार केला. सिडको पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या घटनेत एन १, टाऊन सेंटर येथून अमोल बच्छाव यांच्या घराच्या व्हरांड्यातून २७ हजार रूपयांचा मोबाइल नऊवारी साडी घातलेल्या महिलेने पळविला. सोमवारी दुपारी साडेबारा ते दीडच्या दरम्यान हा प्रकार घडला. सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडकोत तरुणाला मारहाण

वॉचमन आणि स्थानिक नागरिकाचे भांडण सोडविण्यासाठी गेलेले उमेश खेडकर (वय २६) यांना प्रतापनगर, हडको, एन-९ येथे दोघांनी रविवारी दुपारी मारहाण केली. प्रतापनगरातील वॉचमन आणि रहिवासी कुलकर्णी यांच्यातील भांडण सोडविण्यासाठी खेडकर गेले होते. तेव्हा रवी डोंगरे आणि मंगेश डोंगरे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. मंगेशने डाव्या डोळ्यावर दगड मारत गंभीर जखमी केले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळापत्रकाबाबत विद्यापीठाची पोलिसात तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे खोटे वेळापत्रक व्हॉटस् अॅपवर फिरत होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर याबाबत प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल करत परीक्षा बुधवार (२७ मे) पासूनच सुरू होतील असे स्पष्ट केले.

इंजिनीअरिंग परीक्षेचा निकाल आणि रिड्रेसल प्रकरणांना लागलेल्या विलंबामुळे यंदाही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ विद्यापीठ प्रशासनावर आली. २७ मेपासून परीक्षा सुरू होत असल्याचे वेळापत्रक जाहीर केले. यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे परिपत्रक व्हॉटस् अॅपवर फिरत होते.

परीक्षा नियंत्रकांच्या स्वाक्षरीचे, विद्यापीठाच्या परिपत्रकाप्रमाणे हुबेहुब हे परिपत्रक होते. यात अभियांत्रिकी, फार्मसी, बीटेकच्या २७ मेपासून सुरू होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून या आता ७ जूनपासून तर आर्किटेक्चर, पदव्युत्तर अभियांत्रिकीच्या परीक्षा १० जूनपासून सुरू होतील असे सांगण्यात आले होते. दरम्यान, आर्किटेक्चरची परीक्षा १ जूनपासून सुरू होत आहे. तसेच अभियांत्रिकी पदव्युत्तर एमई, एमटेक परीक्षा वेळापत्रकही जूनपासून आहे.

बनावट परिपत्रक तयार करून संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार खोडसाळपणा दिसतो आहे, याबाबत आम्ही पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे.

- डॉ. वाल्मिक सरवदे, परीक्षा नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमोहित करून दागिने लंपास

$
0
0

औरंगाबाद : कल्हई करून देण्याच्या बहाण्याने महिलेला संमोहित करून तीन तोळ्याचे दागिने महिलेने लंपास केले. शुक्रवारी चिकलठाणा भागातील सावता माळी नगरात हा प्रकार घडला. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावता माळी नगरातील समीना पठाण या महिलेच्या घरी गुरूवारी दुपारी एक महिला आली होती. भांड्याला कल्हई करून देते असे तिने सांगितल्यामुळे समीना पठाण यांनी तिला दोन भांडी कल्हई करण्यासाठी दिली. या महिलेने ही भांडी कल्हई करून दिल्यामुळे समीना पठाण यांनी तिला दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावले होते. शुक्रवारी ही महिला त्यांच्या घरी आली. बोलण्याच्या नादात तिने आपल्याला संमोहित केल्यामुळे आपण तिला गळ्यातील गंठण व हातातील बांगड्या काढून दिल्याचा उल्लेख समीना पठाण यांनी तक्रारित केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात महिला आरोपीविरूद्ध चोरीचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघांना मारहाण; कारची तोडफोड

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हळदीच्या कार्यक्रमात सुरू असलेले भांडण पाहणे तीन जणांच्या चांगलेच अंगलट आले. त्यांना मारहाण करून कारच्या काचा फोडण्यात आल्या. रविवारी रात्री साडेदहा वाजता नागसेननगर भागात हा प्रकार घडला. उस्मानपुरा भागातील नागसेननगर येथील गल्ली क्रमांक पाचमध्ये रविवारी रात्री साडेदहा वाजता लग्नानिमित्त हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी त्या ठिकाणी भांडण सुरू झाले. तेथील महादेव साबळे, दादासाहेब साबळे, हिरालाल साबळे व नीतेश जगताप हे भांडण बघत गल्लीच्या कोपऱ्यावर उभे होते. हा प्रकार पाहून भांडण करणारी मंडळी त्यांच्या दिशेने चालून आली व दादासाहेब साबळे याला मारहाण सुरू केली. या भांडणाचा जाब विचारणाऱ्या महादेव, हिरालाल व जगताप यांनाही आरोपींनी दगडफेक करीत मारहाण केली. महादेव साबळे याच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्या कारच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. उस्मानपुरा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅड. घाणेकरांना न्यायालयीन कोठडी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी अॅड. नीलेश घाणेकर व गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींची मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. एच. ठोंबरे यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ५ मे रोजी बीड बायपास परिसरात हा हल्ल्याचा बनाव करण्यात आला होता.

अॅड. नीलेश घाणेकर यांनी सातारा पोलिस ठाण्यात ५ मे रोजी रात्री आपल्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यामध्ये त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या ज्युनीयर वकील अॅड. स्मिता पाटील यांच्यासह दोन अनोळखी दुचाकीस्वारांवर संशय व्यक्त केला होता. तपासामध्ये हा गोळीबाराचा प्रकार बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते. अॅड. घाणेकर यांनी स्वतः हा कट रचला होता. नेवासा येथील मुज्जफर उर्फ सोनू जहागीरदार व पडेगाव येथील सय्यद मुजीब या गोळीबार करणाऱ्या दोघांसह अॅड. घाणेकर यांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. अॅड. घाणेकर यांच्यावतीने स्वतः घाणेकर, अॅड. शेवाळे तसेच अभयसिंह भोसले यांनी युक्तीवाद केला. यामध्ये पोलिस जुनेच मुद्दे मांडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या वतीने सरकारी वकील बी. एम. राठोड यांनी युक्तीवाद केला. यामध्ये पोलिसांना एक पिस्तूल हस्तगत करावयाचे आहे तसेच दोन पसार आरोपींचा शोध घ्यायचा आहे, असा युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने तीन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images