Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

टँकरने ३३ गावांना दूषित पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

मुधलवाडी टँकर भरणा केंद्राची क्षमता न वाढवल्याने तालुक्यातील ३३ गावांना ढोरकीन येथील भरणा केंद्रावरून दूषित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दूषित पाण्यामुळे या ३३ गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या तालुक्यातील १०१ गावांना १२९ टँकरद्वारे २५६ फेऱ्या करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मुधलवाडी, फारोळा व ढोरकीन या प्रमुख तीन भरणा केंद्रावरून अनुक्रमे ४१ गावे, २७ गावे व ३३ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यापैकी ढोरकीन येथील भरणा केंद्रावरील पाणी दूषित असल्याचे पाण्याची तपासणी केल्यावर समोर आले आहे, अशी माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभागप्रमुख सुधाकर काकडे यांनी दिली. ढोककीन येथे पाणी शुद्धीकरण केंद्र नाही. त्यामुळे येथे जायकवाडीतून येणारे प्रक्रिया न केले पाणी ३३ गावांना पुरवले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुधलवाडी येथे एमआयडीसीचे पाणी शुद्धीकरण केंद्र आहे. तेथून होणारा पाणीपुरवठा शुद्ध पाण्याचा आहे. त्यामुळे तालुक्यातील ३३ गावांना मुधलवाडी येथील भरणा केंद्रावरून टँकर भरावेत, असे पंचायत समितीचे प्रयत्न आहेत. परंतु, तेथे सध्या ५० हॉर्स पॉवरचा विद्युत पंप आहे. येथे १०० हॉर्स पॉवरचा पंप बसवल्यास मुधलवाडी भरणा केंद्राची क्षमता वाढेल व ढोरकीन येथील केंद्रावरून दूषित पाणीपुरवठा करण्याची गरज पडणार नाही, अशी माहिती काकडे यांनी दिली.

एमआयडीसीचे दुर्लक्ष

मुधलवाडी भरणा केंद्रावर १०० हॉर्स पॉवरचा पंप बसविण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांना १८ व २२ मे रोजी पत्र लिहून कळवले आहे. परंतु, त्याला एमआयडीसीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

एमआयडीसीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ढोरकीनच्या भरणा केंद्रावरून ३३ गावांना दूषित पाणीपुरवठा करावा लागत आहे.

- उल्हास सोमवंशी, गटविकास अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...पाठीवर कौतुकाची थाप हवीच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावी, बारावीच्या परीक्षेला दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. मात्र, परीक्षेतील गुणवंतांची गुणवत्ता यादी शिक्षण मंडळाने बंद केल्यामुळे, पाच वर्षांपासून यशवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडलीच नाही.

मेरीटमध्ये येणारे विद्यार्थी इतरांना आदर्श असतात. त्यामुळे गुणवत्ता यादी जाहीर करावी, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते. गुणवत्ता यादी जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण, दबाव येतो म्हणून शिक्षण मंडळाने गेल्या पाच वर्षांपासून गुणवत्ता यादी जाहीर करणे बंद केले. त्यामुळे कॉलेजांसह विद्यार्थ्यांनामध्येही नाराजीचा सूर आहे. वर्षभर रात्र-रात्र जागरण करत, डोळ्यात तेल घालून अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचे कोडकौतुक होत नाही. गुणवत्ता यादी जाहीर होत नसल्याने निकाल आणि गुणपत्रिका मिळण्याच्या दिवशी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावलेली असते. आपले काम कमी करण्यासाठी, अन् चुका टाळण्यासाठीच मंडळाने हा खटाटोप केल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे पुन्हा गुणवत्ता यादी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

...मग इथेच अन्याय का?

एकीकडे बारावीनंतर इंजिनीअरिंग, मेडिकल अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रथम, द्वितीय अशी क्रमवारी काढली जाते. केंद्रीय माध्यमिक बोर्डानेही निकालात ग्रेड सिस्टीम ठेवली आहे. मग दहावी, बारावीचीच गुणवत्ता यादी का जाहीर केली जात नाही, यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव मिळत नाही, अशी ओरड होत आहे.

मेहनत करून विद्यार्थी चांगले गुण मिळवितात. त्यामुळे त्यांचे कौतुक व्हावे, असे त्यांना वाटते. असे विद्यार्थी आदर्श असतात. इतर विद्यार्थ्यांना ते प्रोत्साहन देतात. मात्र, गुणवत्ता यादी नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असते. यामुळे मंडळाने फेरविचार करायला हरकत नाही.

- चंद्रकांत गायकवाड, उपप्राचार्य, देवगिरी कॉलेज, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल जोहरवर छापा; तरुण, तरुणी ताब्यात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिलकॉर्नर येथील हॉटेल जोहरवर दामिनी पथकाने बुधवारी दुपारी छापा टाकला. या छाप्यामध्ये अल्पवयीन तरूण-तरुणीला ताब्यात घेण्यात आले. व्यवस्थापकासह या जोडप्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

जोहर हॉटेल व लॉजमध्ये काही तरूण-तरुणी अश्लील चाळे करीत असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. यावेळी त्यांना वर्षांचे महाविद्यालयीन तरूण-तरुणी खोलीमध्ये आढळून आले. पोलिसांनी व्यवस्थापक सचिन वाल्मिक पाटीलसह या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी हॉटेलच्या इतर खोल्यांची पाहणी केली असता दारूच्या बाटल्याचा साठा सापडला. या तरूण-तरुणींच्या पालकांना बोलावून त्यांना समज देऊन तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडण्यात आले. ही कारवाई दामिनी पथकाच्या सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनीता मिसाळ, मनिषा पवार, पूजा बनकर, सुषमा हाके, परवीन पठाण आदींनी केली.

सर्व नियम धाब्यावर

हॉटेल जोहरवर यापूर्वीदेखील अशा पद्धतीने छापा टाकण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या काळात या ठिकाणी सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर छापा टाकण्यात आला होता. विशेष म्हणजे गुन्हेशाखेचे पोलिस कर्मचारीच या ठिकाणी पत्ते खेळताना आढळले होते. हॉटेलमधील रूम किरायाने देताना हॉटेलचालकाने सर्व नियम धाब्यावर बसवत गैरकृत्यासाठी रूम देत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दारूची दुकाने चहाच्या हॉटेलसारखी चालवू नका’

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दारूची दुकाने चहाच्या हॉटेलसारखी सकाळीच उघडू नका. नियमानुसार दुकाने चालवा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल असा सज्जड दम बुधवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी देशी विदेशी दारू विक्रेत्यांना दिला.

शहरात देशी दारूची दुकाने पहाटेच कशी काय उघडली जातात असा सवाल करीत आयुक्तांनी दारू विक्रेत्यांना धारेवर धरले. वाईन शॉपमधून दारूचे बॉक्स विकत घेऊन ऑम्लेटच्या हातगाड्यांवर त्याची विक्री चालणार नाही. रात्री अकरा वाजेनंतर कोणत्याही परिस्थीतीमध्ये दारू विक्री करता कामा नये, असा इशाराही आयुक्तांनी दिला. ग्राहकांना दारू पाजायची असेल तर तुमच्या दुकानात पाजा, असा खोचक सल्लाही आयुक्तांनी दिला. प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये दारू विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पथक तयार करण्यात येणार असून नियमांची अमलबजावणी कोणत्याही परिस्थितीमध्ये व्हायलाच हवी, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दारू विक्रेत्यांना बजावून सांगितले आहे.

दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

औरंगाबाद शहरामध्ये अनेक ठिकाणी दारूची दुकाने अगदी सकाळपासूनच सुरू होतात. त्यामुळे अनेक भागांमध्ये दारूड्यांचा सकाळपासून दिवसभर हैदोस सुरू असतो. दिवसाढवळ्या या दारूड्यांमुळे महिला, तरुणींना रस्त्यावरून जाणेही अवघड होऊन बसते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी दिलेल्या या आदेशामुळे दारू विक्री दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेत आढळला अनोळखी मृतदेह

$
0
0

औरंगाबादः रामेश्वर ओखा या रेल्वेमध्ये अनोळकी व्यक्तीचा मृतदेह आज (बुधवारी) आढळला. अपंगांसाठीच्या विशेष कोचमध्ये ६५ वर्षांची अनोळखी व्यक्ती बेशुदध अवस्थेत असल्याची माहिती औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या प्रमुखांनी लोहमार्ग पोलिसांना दिली. लोहमार्ग पोलिसांनी या बेशुद्ध व्यक्तीला घाटी रूग्णालयात नेले. घाटीत डॉक्टरांनी सदर व्यक्तीला तपासून मृत घोषित केले. या व्यक्तीचे वय ६५ असून रंग निमगोरा, डोक्यावर पांढरे-काळे केस, दाढी पांढरी आहे. अशा व्यक्तीबाबत कोणतीही माहिती आढळल्यास लोहमार्ग पोलिस धनराज गढलिंगे यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९८२३५६७२७४ वर संपर्क साधावा असे आवाहन लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी गोदामावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी साठा केलेला रेशनचा १९ लाखाचा गहू तांदूळ विशेष पथकाने जप्त केला. सालुखेडा ता. खुलताबाद येथे मंगळवारी ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.

सालुखेडा येथील कैलास विठ्ठल काळे (वय ३०) याच्या मालकीच्या खासगी गोदामामध्ये शासकीय स्वस्त धान्य दुकानातील गहू व तांदूळ कमी भावाने खरेदी करून काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी साठा करून ठेवला असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. मंगळवारी हा माल एका ट्रकमध्ये भरण्यात येत होता. ही माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने सालुखेडा गाठून काळेच्या गोदामावर छापा टाकला. यावेळी त्यांना २२९ पोते गहू व १२६० किलो तांदळाचा साठा आढळून आला.

या मालाच्या पोत्यावर भारतीय खाद्य निगम लिहिलेले आहे. पोलिसांनी हा साठा जप्त केला असून एकूण अठरा लाख ७० हजार रूपये किमतीचा हा साठा आहे. आरोपी ‌कैलास काळे विरूद्ध ‌खुलताबाद पोलिस ठाण्यात जिवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक नविनचंद्र रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलिस निरिक्षक कांचनकुमार चाटे, सहायक फौजदार, दिलीप मगरे, संजय खंडागळे, प्रकाश मोहिते, संजय घुगे, कृष्णा ढाकरे व रवी लोखंडे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारने बेरोजगारांची थट्टा थांबवावी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भीक नको हक्क द्या, बेरोजगारांना नोकरी द्या, फडणवीस सरकारचे करायचे काय, अशा घोषणांनी बुधवारी औरंगाबाद दणाणले. नोकर भरती बंदच्या विरोधात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली. मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.

आर्थिक स्थिती चांगले नसल्याचे कारण पुढे करत राज्य सरकार नोकर भरतीवर बंदी आणू पाहते आहे. शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेऊ नये. बेरोजगारांची ही थट्टा असेल अशी भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. पैठण गेटवरून निघालेला हा मोर्चा गुलमंडी, सिटीचौक, काला दरवाजा, रंगिन दरवाजा मार्गे आयुक्तालयावर धडकला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत महाराष्ट्र विद्यार्थी कृती समिती स्थापन केली आहे. या परिषदेतर्फे हा मोर्चा काढण्यात आला. अपंग विद्यार्थ्यांसह मुलींची संख्या मोर्चात मोठ्या प्रमाणात होती. रोजगार द्या, बेरोजगारी वाढवू नका, भीक नको हक्क द्या, बेरोजगारांना नोकरी द्या, नोकरी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची अशा घोषणांचे फलक विद्यार्थ्यांच्या हाती होते. आयुक्तालयाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी शासनाच्या भूमिकेबाबबत मनोगतातून नाराजी व्यक्त केली. उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले. विविध विद्यार्थी संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला. मोर्चामध्ये कृती समितीचे अध्यक्ष राज आव्हाड, आशिष फोकाटे, अभिजित भोसले, विजय शेळके, सुनील राठोड, नीलेश अंबेवाडीकर, रमेश जोशी, अंकुश चोरे, ज्ञानेश्वर जगदाळे, नागनाथ पवार, बालाजी मुंडे, राज कांदे, डॉ. उमाकांत राठोड, कुंडलिक खेत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

शासनाची ही भूमिकाच योग्य नाही. बेरोजगारांची संख्या वाढत असताना नोकर बंदीचा विचार करणेही चुकीचे आहे.- स्नेहा शिंदे

आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सांगत नोकर भरती बंद केली जात आहे. त्याचवेळी शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याची तयारी केली जाते. हेच का अच्छे दिन. - राज आव्हाड

एका जागेसाठी हजार पेक्षा अधिकजण रांगेत असतात. प्रचंड स्पर्धा, नोकरीच्या संधी कमी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेकदा नैराश्य येते. - मीरा गायकवाड

चार-पाच वर्षापासून मी स्पर्धा परीक्षांची तयारी करते आहे. संधी कमी होत आहेत. बेरोजगरांची संख्या वाढते आहे. शासनाने अधिकाधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. - पल्लवी खोतकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओतील वेटिंग घटविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहन चालविण्याचा परवाना, अर्थात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळविणाना दोन-अडीच महिने वाट पाहावी लागत होती. आता दुचाकी-चार चाकी वाहन चालविण्याचे लायसन्स काढण्यासाठी अपॉइंटमेंटचा कोटा वाढविणे प्रस्तावित आहे. त्यामुळे लवकरच लायसन्स काढण्यासाठी वेटिंगचे प्रमाण कमी होणार आहे. राज्य भरातील आरटीओ कार्यालयात १ सप्टेंबर २०१४ रोजी लायसन्स काढण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट आणि इतर कार्यवाहीसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक आरटीओ कार्यालयासाठी ठराविक कोटा देण्यात आला आहे.

मर्यादित कोटा असल्यामुळे नागरिकांना लायसन्स मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान तीन ते चार महिने वाट पाहावी लागत होती. ऑनलाइन अपॉइंटमेट कोट्यात वाढ करण्याबाबत सहाय्यक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी आरटीओ गोविंद सैदांणे यांच्यासमोर प्रस्ताव सादर केला आहे. जेसीबी, ट्रॅक्टर; तसेच जड वाहने चालविण्याचे लायसन्स काढण्यासाठी निश्चित केलेल्या कोट्यापेक्षा कमी अपॉइंटमेट असतात.

या वाहनांचा कोटा कमी करून कार आणि दुचाकी वाहनधारकांचा कोटा प्रत्येकी २० किंवा त्यापेक्षा जास्त वाढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हा प्रस्ताव परिवहन आयुक्त कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर लायसन्स घेण्यासाठी वेटिंगचा वेळ कमी होणार आहे.

लायसन्सच्या आॅनलाइन अपॉइटंमेंटसाठी अनेक महिन्यांचे वेटिंग असल्याबद्दल नागरिकांचा तक्रारी आहेत. त्यामुळे कार आणि दुचाकी वाहनाचा कोटा वाढविण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. त्याला मान्यता मिळाल्यास शंभरांवर अपॉइंटमेंट निश्चित वाढतील.

- किरण मोरे, सहाय्यक परिवहन अधिकारी, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तांचे आदेश मोडून ट्रॅव्हल्स शहरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात दिवसा प्रवेशाला बंदीचे पोलिस आयुक्तांचे आदेश मोडून काही ट्रॅव्हल्स कंपन्या एसटी स्टँड परिसराजवळ प्रवासी गोळा करीत आहेत. या खासगी बस मुख्य रस्त्यावर उभ्या नसतात. स्टँड लगत असलेल्या गल्ल्यांमध्ये बस उभ्या करून प्रवासी गोळा करण्याचा उद्योग सुरू आहे.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सकाळी ७ ते रात्री ११ या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्स बसला शहरात बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर काळी-पिवळी जीपलाही शहरात बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांच्या आदेशानंतर खासगी ट्रॅव्हल्स बस शाहनूरमिया दर्गा परिसरातील श्रीहरी पॅव्हेलिअन येथे थांबा करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी तात्पुरती मान्यता दिली आहे.

पोलिसांच्या बंदी आदेशानंतरही एसटी बस स्टँड परिसरात सकाळी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवासी भरण्यात येत आहेत. स्टँडलगत गरमपाणी भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल्स बस सकाळी आठ-साडेआठपर्यंत उभ्या असतात. या बस नगर, पुणे मार्गावर जातात. त्यासाठी बस स्टँडमध्ये प्रवासी गोळा करण्यासाठी दलाल फिरत असतात. प्रवासी पळविण्याच्या या प्रकारामुळे एसटीचे नुकसान होत आहे.

सकाळच्या सकाळी सहा ते आठ यादरम्यान ट्रॅव्हल्सच्या बस एसटी स्टँडच्या भिंतीला लागून उभ्या केल्या जातात. नगर, पुणे येथे जाण्यासाठी एसटी स्टँडमध्ये आलेल्या प्रवाशांना ट्रॅव्हल्सचे दलाल घेऊन जातात.

- संदीप जाधव, डेपो सचिव, एसटी कामगार संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदी-नाल्यांत खळाळणार शुद्ध पाणी

$
0
0

आशिष चौधरी, औरंगाबाद

प्रदूषित नदी, नाल्यांचे पाणी पुन्हा शुद्ध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या संशोधकांनी 'ग्रीन लेक अँड ग्रीन ब्रीज टेक्नॉलॉजी' शोधून काढली आहे. कंपन्यांनी सोडलेल्या रसायनमिश्रित पाणी, सांडपाण्यामुळे नदी-नाल्यांच्या विषगंगा झाल्या आहेत. त्यासाठी हे संशोधन वरदान ठरणार आहे. या संशोधनानुसार; नद्या-नाल्यांमधील ऑक्सिजन ३०० टक्क्यांनी वाढून दूषित पाण्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी होतो.

कंपन्यांमधून रसानयुक्त पाणी आणि शहरातील सांडपाणी नद्यांत सोडण्यात येते. त्याचा विपरित परिणाम नदी-नाल्यातील जैववैविध्यावर होते आहे. पाण्यांमधील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी विद्यापीठाच्या संशोधकांनी दोन वर्षांच्या संशोधनातून 'ग्रीन लेक अँड ग्रीन ब्रीज टेक्नॉलॉजी' शोधून काढली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण ३०० टक्क्यांनी कमी वाढते, पाण्याचे प्रदूषण सुमारे ८० टक्क्यांनी कमी होतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. याचे पेटंट मिळविण्यासाठीही विभागाचे प्रयत्न आहेत. प्राध्यापक डॉ. सतीश पाटील यांच्यासह संशोधक विद्यार्थी विनायक धुलप यांनी हे संशोधन केले आहे.

काय आहे टेक्नॉलॉजी..

नदी, नाले वाहत आहेत, त्यावर छोटे-छोटे 'ग्रीन ब्रीज' उभारण्यात येतात. पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण तपासून, ते कमी करण्यासाठी योग्य असलेली वनस्पती तेथे लावण्यात येते. त्यात पानकणीस, हत्तीगवत, घास, जलपर्णी, केंद्रळ, आळू, कर्दळी आदी आठ वनस्पितींचा समावेश आहे. पाण्याच्या प्रदूषणाच्या पातळीनुसार हे ब्रीज उभारले जातात. या प्रक्रियेद्वारे शुद्ध झालेले पाणी पात्रात पुढे जाताना आणखी शुद्ध होते. काही वनस्पती पाण्यातील बॅक्टेरिया, गढूळपणा, बायोलॉजिकल ऑक्सिजन, आल्मधारकता यांवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर घातक रसायनांची तीव्रता कमी होते आणि जैववैविध्य टिकून राहते. खाम नदीवर २६ किलामीटरदरम्यान त्यांनी प्रदूषण नियंत्रणाचे प्रयोग केले आहेत. वनस्पतींच्या वापरामुळे पाण्याच्या प्रदूषणावर नियंत्रण शक्य आहे, असा निष्कर्ष त्यांच्या प्रयोगातून समोर आला आहे.

शहरातील नदी-नाल्यांमधील पाण्याचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. अशा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ग्रीन ब्रीज, ग्रीन झोन निर्माण केले जातात. प्रदूषण कमी करणाऱ्या वनस्पती तेथे जगविल्या जातात. त्यामुळे प्रदूषण कमी होते.

- प्रा. डॉ. सतीश पाटील, प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षानंतरही रस्ता ’जैसे थे‘

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज

पंढरपूर येथील तिरंगाचौक ते गुडईअर कंपनीपर्यंतच्या रस्त्याचे काम कंत्राटदाराने वेळेत पूर्ण न केल्याने एमआयडीसी प्रशासनाने कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या वर्षीही पावसाळ्यात कामगार व उद्योजकांना या खराब रस्त्यावरूनच प्रवास करावा लागणार आहे.

वाळूज एमआयडीसीत जवळपास दीड हजार कारखाने असून प्रामुख्याने मोठ्या उद्योगांना कच्चा माल पुरविण्याचे काम येथील लघु उद्योजकांकडून करण्यात येते. हा माल पोहचविण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले रस्ते अत्यंत वाईट आहेत. या वाईट रस्त्यांमुळे उद्योजकांचे नुकसान होत होतेच पण अपघातात प्राणहानीही होत होती. त्यामुळे रस्ते करण्याच्या मागणीसाठी उद्योजकांनी गेल्या वर्षी एमआयडीसी कार्यालयासमोर आंदोलन केले. उद्योजकांच्या आंदोलनामुळे तिरंगाचौक ते सिमेन्स व सिमेन्स ते गुडईअर कंपनीपर्यंतच्या रस्त्यासाठी साडेबारा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यामुळे उद्योजकांनी समाधान व्यक्त केले होते.

या रस्त्यासाठी निधीची तरतूद झाल्यानंतर तत्काळ टेंडर प्रक्रिया राबविण्यात येऊन ते दोन कंत्राटदारांमध्ये विभागून देण्यात आले. हे काम पावसाळ्याऐवजी उन्हाळ्यात करण्याचे निर्देश टेंडरमध्ये होते. परंतु, रस्ताचे काम करण्याची मुदत गेल्या महिन्यात संपली. त्यामुळे वेळेत काम न केल्याचा ठपका ठेवून टेंडर रद्द करण्याची प्रक्रिया एमआयडीसीने सुरू केली आहे. टेंडर रद्द झाल्यानंतर नव्याने निविदा काढण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र गावडे यांनी दिली.

रस्ते खराब असल्याने वाळूज एमआयडीसीमधील उद्योजकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने लक्ष न दिल्याने नव्याने टेंडर काढणे, त्यास मंजुरी व नवीन कंत्राटदार, त्यानंतर रस्त्याचे काम, यात हे वर्ष जाईल. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील उद्योजक व कामगारांना यावर्षीही खराब रस्त्यांवरूच प्रवास करावा लागणार आहे.

टेंडर काढूनही रस्ता पूर्ण न होणे अत्यंत वाईट आहे. यापुढे तरी रस्ता वेळेत पूर्ण होईल. याकडे लक्ष द्यावे. शिवाय कामाची गुणवत्ता राखली जावी.

- बी. एस. खोचे, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटी उद्योगाकडे सरकारचे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कच्या इमारतीत औरंगाबादमध्ये फेब्रुवारी महिन्यात अचानकपणे साडेसहा पट भाडेवाढ करण्यात आली. दुष्काळ, मंदी यामुळे अडचणीत असलेल्या उद्योजकांची कोंडी झाली होती. भाडेवाढ रद्द करावी, अशी मागणी उद्योजकांनी सरकारकडे केली होती. तीन महिने उलटून गेले तरी यासंदर्भात कुठलाही निर्णय न झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.

औरंगाबादेत आयटी उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १५ वर्षांपूर्वी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये एक इमारत उपलब्ध करून दिली. याठिकाणी गाळे करून आयटी उद्योगांना भाडेतत्वावर देण्यात आले. पाणी, वीज तसेच अन्य प्राथमिक सुविधा पुरविताना एमआयडीसी प्रशासनाने खुले भूखंड व गाळे विक्रीसाठीही उपलब्ध करून दिले. या सुविधेचा लाभ घेण्यास उद्योजकांनीही प्रतिसाद दिला. आज राज्य सरकारच्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कच्या इमारतीत २५ आयटी उद्योग आहेत. याठिकाणहून जगभर सॉफ्टवेअर निर्यात होतात. कोट्यवधींची उलाढाल आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात एमआयडीसीने आयटी उद्योगांसाठी साडेसहा पट भाडेवाढ केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या भाडेवाढीमुळे उद्योजक चिंतेत पडले. त्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि प्रस्तावित भाडेवाढ कमी करावी अशी मागणी केली. त्यास तीन महिने उलटून गेले तरी कुठलाही निर्णय झालेला नाही. पंधरा दिवसांपूर्वी आयटी उद्योजकांचे एक शिष्टमंडळ मुंबईला गेले होते. आमदार अतुल सावे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत एक बैठक झाली. तीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. देसाई सकारात्मक आहेत, पण उद्योग विभागातील अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात अद्याप पावले उचलली न गेल्याने उद्योजकांची चिंता वाढली आहे.

उद्योगमंत्र्यांसमवेत झालेली बैठक फलदायी झाली. लवकरच यातून सकारात्मक मार्ग निघणार आहे. औरंगाबादमध्ये आयटी उद्योगांना चांगला वाव आहे. या महिन्यात निर्णय अपेक्षित आहे.

- केदार पानसे, आयटी उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय साहित्य गोदामात पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गोदामात शालेय विद्यार्थ्यांसाठीचे साहित्य केंद्रप्रमुखांनी उचलल्याची नोंद आहे. पंरतु, प्रत्यक्षात हे साहित्य गोदामातच पडून असल्याचे उघडकीस आले आहे. हे साहित्य शुक्रवारपर्यंत (५ जून) केंद्रप्रमुखांनी उचलावे, असे आदेश गटशिक्षणाधिकारी ए. ए. लाटकर यांनी दिले आहेत.

तालुक्यातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी व शाळांसाठी गटशिक्षण विभागातर्फे विविध साहित्य पुरविण्यात येते. विद्यार्थ्यांना बसण्याच्या चटया, वॉटर फिल्टर, वॉटर प्युरिफायर, फायर एस्ट्युगेशर, सौर उर्जा संच आदी साहित्य पुरविण्यात येते. तालुक्यात २० केंद्रांमार्फत हे साहित्य शाळांवर पोहोचवण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखाची आहे.

हे साहित्य केंद्रप्रमुखांनी ताब्यात घेतल्याची नोंद गोदामात आहे. परंतु, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना बसण्यासाठीच्या चटया १४ महिन्यांपासून गोदामात आहेत. मुलांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठीची आठ यंत्रे १० महिन्यांपासून पडून आहेत. प्रत्येक शाळेत शालेय पोषण आहार शिजवला जातो. तेथील स्वयंपाक घर व शाळेच्या सुरक्षेसाठीचे ८६ फायर एस्ट्युगेशर शासनाने पाठवले आहेत. ते वितरित केल्याचे दाखवण्यात आले, प्रत्यक्षात १६ फायर एस्ट्युगेशर गोदामात पडून आहेत. शालेय उपक्रमात सौर उर्जेची माहिती व वापरासाठी सौर किट पाठवले जाते. ते सुद्धा गोदामातच आहे. हे सर्व साहित्य प्रत्यक्षात वितरित केल्याच्या नोंदी आहेत.

वाहतूक खर्चामुळे टाळाटाळ

शाळांसाठीचे साहित्य गोदामातच पडून असल्याची माहिती उघड झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी ए. ए. लाटकर यांनी सोमवारी (१ जून) सर्व केंद्रप्रमुखांची बैठक घेतली. हे साहित्य शुक्रवारपर्यंत घेऊन जाण्याचे आदेश देण्यात आले. प्रामुख्याने दूरवरील गावांतील शाळांतील हे साहित्य आहे. वाहतूक खर्चामुळे केंद्रप्रमुखांनी साहित्य नेण्यासाठी टाळाटाळ केल्याचे या बैठकीत उघड झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शूऽऽऽ... कुणीतरी आहे तिथं

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गारखेडा, विजयनगर भागातील नागरिक गेल्या चार-पाच दिवसांपासून दहशतीखाली आहेत. मध्यरात्री दोन ते पाच यादरम्यान अज्ञात तरुणांचे टोळके परिसरात फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चोरट्यांकडून दगडफेकीची घटना देखील घडली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांची या भागात गस्त वाढवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

विजयनगर भागात साधारणः चार हजार नागरिक राहतात. सोमवारी रात्रीपासून या भागात अज्ञात तरुणांचा वावर वाढला आहे. मध्यरात्री दोन ते पाच या कालावधीत विजयनगर, बाळकृष्णनगर, भारतनगर आदी ‌ठिकाणी या तरुणांचे टोळके फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले. काही जागरूक नागरिकांनी ही माहिती पोलिस नियंत्रण कक्षालादेखील फोनद्वारे देण्याचा प्रयत्न केला, मात्र, नियंत्रण कक्षाकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे या भागातील नागरिकांनी सांगितले.

सोमवारी रात्री या तरुणांनी काही घरांवर दगडफेकही केली. नागरिक घराबाहेर येईपर्यंत ते पसार झाले होते. या तरुणांच्या वावरण्यामुळे येथील नागरिकांत दहशत पसरली आहे. अनेकांनी रात्री घराबाहेर पहारा देण्यास सुरुवात केली आहे.

सहा महिन्यांपुर्वी तरुणांच्या टोळक्यांकडून घराची पत्रे उचकटून चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. यागुन्ह्यांची नांेद पोलिसांनी घेऊन या भागात गस्त वाढविण्यात आली होती.

गुरखाही बेपत्ता

या भागात काही महिन्यांपूर्वी रात्री गुरख्याची गस्त होत होती. परिसरातील नागरिक त्याला या कामासाठी घरामागे दहा रुपये देत होते, मात्र हा गुरखा देखी बेपत्ता झाला अाहे, असे नागरिकांनी सांगितले.

टोळक्याचा हेतू अस्पष्ट

दररोज मध्यरात्री फिरणाऱ्या या टोळक्याचा हेतू मात्र अद्याप स्पष्ट झालेला नाही. या टोळक्याने अद्याप परिसरात चोरी अथवा घरफोडीचा प्रयत्न केला नाही. अथवा कोणत्याही वाहनांचे नुकसान करण्यात आलेले नाही. मोठा गुन्हा करण्याच्या हेतूने हे तरूण पाळतीसाठी फिरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

गुरखाही बेपत्ता

या भागात काही महिन्यांपूर्वी रात्री गुरख्याची गस्त होत होती. परिसरातील नागरिक त्याला या कामासाठी घरामागे दहा रुपये देत होते, मात्र हा गुरखा देखील बेपत्ता झाला आहे, असे नागरिकांनी सांगितले.

टोळक्याचा हेतू अस्पष्ट

दररोज मध्यरात्री फिरणाऱ्या या टोळक्याचा हेतू मात्र अद्याप स्पष्ट झालेला नाही. या टोळक्याने अद्याप परिसरात चोरी अथवा घरफोडीचा प्रयत्न केला नाही. अथवा कोणत्याही वाहनांचे नुकसान करण्यात आलेले नाही. मोठा गुन्हा करण्याच्या हेतूने हे तरूण पाळतीसाठी फिरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

रात्री-बेरात्री तरूणांचे टोळके परिसरात ‌दिसून येत आहे. लाइट बंद असल्यान ते पसार होतात. पोलिसांची या भागात गस्त वाढवण्याची गरज आहे.

- सखुबाई आवटे

विजयनगरच्या आजुबाजुला मोकळा परिसर आहे. चोरट्यांना लपायला अनेक जागा आहेत. पूर्वी फिरत असणारा गुरखाही आता गस्त घालत नाही. बंद पथदिवे सुरू करण्याची गरज आहे.

- मीना धुमाळ

मध्यरात्री या टोळक्याला फिरताना अनेकांनी पाहिले आहे, मात्र त्यावेळी हे तरूण पसार होतात. हे नेमके चोर आहेत काय, त्यांचा हेतू काय आहे, हे स्पष्ट झालेले नाही. यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

- सुनीता घोरपडे

चोरट्यांचा; तसेच मद्यपींचा या भागात वावर वाढला आहे. या भागात स्वतंत्र पोलिस चौकीची गरज आहे. अज्ञात तरुणांच्या टोळक्याचे फिरण्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी नागरिकात भीती पसरली आहे.

- अमोल धुमाळ

गेल्या चार दिवसांपासून पहाटे अनोळखी तरुणांचा वावर या परिसरात वाढला आहे. चोरीच्या भीतीने नागरिक रात्र जागून काढत आहेत. पोलिसांची या भागात पेट्रोलिंग वाढली तर चोरट्यांवर वचक बसू शकतो. - नीलम जाधव

बंद पथदिव्यांमुळे रात्री रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असते. चोरांना हे सोयीचे ठरतेे. पोलिसांची सातत्याने गस्त व या परिसरासाठी चौकी उभारण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. ती पूर्ण व्हायला हवी.

- संतोष साळवे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज रिक्षांचा चक्का जाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पेट्रोलच्या वाढलेल्या दराप्रमाणे रिक्षा मीटर दरवाढ करावी, रिक्षा स्टँड वाढवून देण्यात यावेत या मागण्यांसाठी औरंगाबाद रिक्षा चालक मालक कृती समितीने गुरुवारी (४ जून) रिक्षा बंदचे आवाहन केले आहे. त्यामुळे उद्या सर्वसामान्य औरंगाबादकरांची गैरसोय होणार आहे.

शहरातील १३ विविध रिक्षा संघटनांनी एकत्र येऊन रिक्षा चालक मालक कृती समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या मेळाव्यात ४ जून रोजी रिक्षा चालकांच्या मागण्यांसाठी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पैठण गेट येथून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होईल, अशी मा‌हिती अाैरंगाबाद रिक्षा चालक मालक कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

रिक्षाचालक कायद्याचा विरोधात नाहीत. ‌त्यांना सु‌विधा दिल्या पाहिजेत, ही आमची मागणी आहे. पोलिस आयुक्तांच्या भेटीनंतर बेमुदत संपाचा निर्णय घेऊ.

- बुद्धीनाथ बराळ, समन्वयक, औरंगाबाद रिक्षा चालक-मालक कृती समिती

रिक्षा चालकांच्या बेमुदत संपामुळे नागरिकांचे हाल होऊ नये. यासाठी सिटीबसच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. गरज पडल्यास अन्य एसटीबसही प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येतील.

- आर. एन. पाटील, विभागीय नियंत्रक, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शुद्ध बिजा पोटी...

$
0
0

केतकी, शार्दुल भावंडांची लक्षणीय कामगिरी

ग‌िरीधर पांडे

शुद्ध बिजा पोटी, फळे रसाळ गोमटी अशी मराठीत एक म्हण आहे. केतकी सराफ आणि शार्दुल सराफ यांच्या बाबतीत ही तंतोतंत खरी ठरते. ज्येष्ठ बाल साहित्यिक, नाट्य कलाकार सूर्यकांत सराफ यांची ही दोन्ही मुले आज मुंबापुरीत आपले अभिनयाचे नाणे खणकणितपणे वाजवित आहेत. औरंगाबादच्या बाल रंगभूमीवर सूर्यकांत सराफ यांचा मोलाचा वाटा आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी नुसती बालनाट्ये केली नाहीत तर एक बालनाट्य शिबिरांमधून एक पिढी घडविण्याचे मोठे काम केले आहे. त्यांच्याच शिबिरांतून शिकून, संस्कारित होऊन त्यांची मुले आज टीव्ही मालिका, नाटकांमध्ये आपले नाव कमवित आहेत. सराफ सरांच्या शिकवणीतून तावून-सुलाखून निघालेले हे दोन हिरे औरंगाबादचा लौकिक वाढवित आहेत.

शिल्पकार या संस्थेच्या शिबिरांमध्ये आठ-दहा वर्षे संस्कार, शिस्त, अभिनयाचे धडे घेऊन केतकी आणि शार्दुल ही दोन्ही भावंडे पुढे पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात दाखल झाली. तिथे या दोन हिऱ्यांना पैलू पाडणारा मोठा कारागिर होता. त्याचं नाव सतीश आळेकर. नाटककार आळेकरांनी या दोघांमधील गुण अचूक हेरले आणि त्यांना व्यावसायिक रंगभूमी, चलचित्र माध्यमाच्या स्पर्धेत ठामपणे उभे राहता येईल, असे तयार केले. त्यानंतर या दोन्ही भावंडांनी मुंबईत जावून नशीब आजमावले. नशीब आजमावले हे केवळ म्हणायला हवे, कारण दहा-पंधरा वर्षांच्या प्रशिक्षणातून, तयारी नंतर आलेला प्रचंड आत्मविश्वास त्यांना मागे सारणार नव्हताच. काही वर्षातच दोघांनी नाटक, सिनेमा, टीव्ही मालिकांमध्ये अत्यंत लक्षवेधी कामगिरी केली आहे.

शार्दुल सराफ

> रात्रंदिन आम्हा या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी झी गौरव सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार, लेखनासाठी मिफ्ता पुरस्कारासाठी निवड > (दिग्दर्शन) अपवाद आणि नियम या मूळ जर्मन नाटकाचे मराठीतून महराष्ट्रात अनेक प्रयोग > व्यावसायिक नाटके - (अभिनय) सारे प्रवासी घडीचे, संगीत गर्वनिर्वाण, पुनश्च हनिमून, मनस्वाना ब्ल्यूज, मिकी माउस रेस्टॉरंट, महापूर > व्यावसायिक नाटक - (लेखन आणि दिग्दर्शन) एकाच माळेचे मणी > कमला, दुर्वा मालिकांचे पटकथा लेखन > आजचा दिवस माझा, दुसरी गोष्ट, प्राईम टाईम चित्रपटात व कमला मालिकेत अभिनय > वळू, गाभ्रीचा पाउस, सलाम, कॅरी on पांडू (हिंदी) चित्रपटांचा सहाय्यक दिग्दर्शक > प्रशांत दामले यांच्या अॅक्टिंग अकादमीत मुख्य प्रशिक्षक.

केतकी सराफ

> एकमेकांत या नाटकासाठी झी गौरव उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार (२०१०) > कामवाल्या > बाया या नाटकासाठी झी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकन (२००९) > व्यावसायिक नाटके - ती, ती आणि ती, संगीत स्वरसम्राज्ञी, लव्ह बर्डस > संगीत गर्वनिर्वाण, अशी हि ट्वेंटी थर्टी (या नाटकाचे प्रयोग सध्या चालू आहेत) > प्रयोगिक नाटके - एकमेकांत, मनस्वाना ब्ल्यूज, रात्रंदिन आम्हा, मिकी माउस रेस्टॉरंट > मालिका - आंतरपाट (स्टार प्रवाह), अवघाची संसार, एका लग्नाची तिसरी गोष्ट (झी मराठी) > चित्रपट - हरिश्चंद्राची फॅक्तरी, टपाल, डोह, कच्चा लिंबू (हिंदी) > स्मिता तळवलकर यांच्या नाटक अकादमीत प्रशिक्षक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्बांधणी

$
0
0

जलयुक्त शिवारच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

म. टा. प्रतिनिधी, बीड

राज्याच्या आर्थिकस्थितीत परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता जलयुक्त शिवार अभियानात आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बीड येथे व्यक्त केला. शेतीसाठी पाण्याइतकेच महत्त्व वेळेवर पुरेसे पीक कर्ज मिळण्यास आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या कर्जाची पाच वर्षांसाठी पुनर्बांधणी करण्याचे ठरविण्यात आले आहे. या प्रक्रियेत बँकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. ज्या बँका यात सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर कार्यवाही करण्याची भूमिका प्रशासनाने घ्यावी अशा सूचानही यावेळी त्यांनी केल्या.

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या बीड जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी घेतला. बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला पालकमंत्री पंकजा मुंडे , खासदार प्रितम मुंडे, खासदार रजनी पाटील, आमदार लक्ष्मण पवार, संगिता ठोंबरे, भीमराव धोंडे, विनायक मेटे, आर. टी. देशमुख यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'गेल्या काही वर्षातील कृषी क्षेत्रातील परिस्थिती समाधानकारक राहिलेली नाही. या क्षेत्रातील वाढीचा वेग नकारात्मक आहे. रोजगाराच्या दृष्टीने ५० टक्के जनता आजही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. अशा परिस्थतीत जलयुक्त शिवार अभियानामुळे विकेंद्रीत जलसाठे निर्माण होऊन त्याचा शेतीसाठी उपयोग होऊ शकला तर शेतीत पर्यायाने राज्याच्या आर्थिक परिस्थतीत मोठा बदल होऊ शकेल. जलयुक्त शिवार अभियानाची ही क्षमता ओळखून सर्वांनी या अभियानात मनापासून आणि सातत्याने काम केले पाहिजे.'

जलशिवार अभियानात बीड जिल्ह्यातील आजवरचे काम समाधानकारक असल्याचा अभिप्रायही मुख्यमंत्र्यानी व्यक्त केला. अभियानात समाविष्ट असलेली काही कामे वारंवार करावी लागणार आहेत, याची जाणीव ठेऊन त्या दृष्टीने यंत्रणेने तसेच जनतेने कामात सातत्य ठेवले पाहिजे. या अभियानात बीड जिल्ह्यातील जनतेने नोंदविलेला सहभाग महत्वाचा असून त्यासाठी केलेले काम कौतूकास्पद आहे. चांगल्या कामात कोणी अडथळे आणत असेल, तर असे प्रयत्न सहन करण्याचे काहीही कारण नाही, असेही मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील वैशिष्टपूर्ण काम लोकापर्यंत पोहचले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

CM फडणवीस शेतकऱ्याच्या दारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

राज्यात दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या लक्षात घेता गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या दारापर्यंत गेले. बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील शेतकरी शहादेव इंगोले यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन त्यांनी केले. त्यासोबतच शासन शेतकऱ्याच्या पाठीशी असल्याची हमी दिली.

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी केल्यानंतर बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथे शेतकऱ्याच्या घरी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंगोले कुटुंबियांच्या शेतात असलेल्या विहिरीचे पुनर्भरण करण्याच्या सुचना तसेच इंगोले कुटुंबियांवर बँकेचे असलेल्या कर्जासंदर्भात माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.

यावेळी एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश कै. शहादेव यांच्या पत्नी श्रीमती कांताबाई यांना मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे , आमदार विनायक मेटे त्यांच्या सोबत होते. दुबार पेरणीला तयार राहण्याचा सल्लाराज्यात यावर्षी पुन्हा एकदा पाऊस लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई गडबड न करता पावसाची शक्यता लक्षात घेवून पेरणी करावी. अन्यथा दुबार पेरणीची वेळ येवू शकते ती आल्यास त्याचीही तयारी शेतकऱ्यांनी ठेवावी असा सल्ला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने शेतकरी धास्तावला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी केली, कन्हेरवाडी, पाली धरण येथे भेट दिल्यानंतर त्यांनी या वर्षी पाऊस लांबण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये टेक्स्टाइल पार्क

$
0
0

प्रस्ताव विचाराधीन असल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, बीड

'कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये कापसावर प्रक्रिया उद्योग उभारण्याचा मुद्दा विचाराधीन आहे. बीड जिल्ह्यामध्येच टेक्स्टाइल पार्क उभारल्यास त्याचा फायदा स्थानिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होईल आणि कापसाला चांगला भाव मिळण्यास मदतही होईल,' अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.

मुख्यमंत्री गुरुवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, या वेळी त्यांनी ही माहिती दिली. टेक्स्टाइल पार्कच्या माध्यमातून कापसावरील प्रक्रिया उद्योग उभा राहिला, तर शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याबरोबरच रोजगार निर्मितीही होऊ शकते. शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी मुख्यमंत्री म्हणाले, 'गेल्या काही वर्षांमध्ये कृषी क्षेत्रातील परिस्थिती समाधानकारक राहिलेली नाही. कृषी क्षेत्राच्या वाढीचा वेग नकारात्मक झाला आहे. ही परिस्थिती असताना, आजही राज्यातील ५० टक्के जनता रोजगाराच्या दृष्टीने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत जलयुक्त शिवार अभियानामुळे विकेंद्रीत जलसाठे निर्माण होऊन त्याचा शेतीसाठी उपयोग होऊ शकला, तर शेतीत पर्यायाने राज्याच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होऊ शकेल. जलयुक्त शिवार अभियानाची ही क्षमता ओळखून सर्वांनी या अभियानात मनापासून आणि सातत्याने काम केले पाहिजे. शेतीसाठी पाण्याइतकेच महत्त्वाचे असणारे वेळेवर पुरेसे पीक कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजाड माळरानांनी वाजवली धोक्याची घंटा

$
0
0

मराठवाड्यात अवघे ४.४५ टक्के वनक्षेत्र; पर्यावरणाचा समतोल आणखी ढासळला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरवर्षी किमान २० लाख रोपांची लागवड करूनही औरंगाबाद जिल्ह्याचे वनक्षेत्र लक्षणीय घटले आहे. वृक्षलागवड ही निव्वळ शासकीय औपचारिकता ठरल्यामुळे उजाड माळरान वाढले आहेत. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ३३ टक्के वनक्षेत्र आवश्यक असते; मात्र जिल्ह्याचे एकूण वनक्षेत्र ७.६२ टक्के आणि मराठवाड्याचे वनक्षेत्र फक्त ४.४५ टक्के आहे.

दुष्काळ, बेसुमार वृक्षतोड, वृक्ष लागवडीबाबत अनास्था आणि शासकीय धोरणातील विसंगती या कारणांनी वनक्षेत्र घटण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. दरवर्षी जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात वृक्ष लागवड करण्यात येते. वन विभाग, सामाजिक वनीकरण, वन्यजीव संरक्षक विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका आणि स्वयंसेवी संस्था या माध्यमातून लाखो रोपांची लागवड होते. प्रत्यक्षात रोपे जगण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. डोंगर, सपाट जमीन आणि रस्त्याच्या दुतर्फा कोणती झाडे असावी याचा संभ्रम कायम आहे. त्यामुळे काही ठिकाणी चुकीची झाडे लावली जात आहेत. डोंगरात जंगली झाडे टाळून इतर झाडे लावली जात आहेत. परिणामी, ही झाडे कोरड्या वातावरणात टिकण्याची प्रमाण कमी आहे. तर डोंगर उतार आणि इतरत्र लावलेली झाडे पाणी नसल्याने जळतात. गेल्या काही वर्षात कमी पावसामुळे रोपे जळण्याचे प्रमाण अधिक आहे असे वन अधिकारी सांगतात. एकूण लागवडीपैकी फक्त ३० टक्के झाडे जगतात असा निष्कर्ष आहे; पण सद्यस्थितीत जेमतेम पाच टक्के झाडे जगत असल्याची वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत रोप निर्मिती होते. रोपवाटिका, रोपांची निगा राखणे, खड्डे खोदणे, वृक्ष लागवड आणि पाणी देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी दरवर्षी जवळपास २० ते २५ कोटी रूपये खर्च होतो. हा खर्च लक्षात घेतल्यास वनक्षेत्र वाढण्याचे प्रमाण किरकोळ आहे असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. वृक्ष लागवड निव्वळ सरकारी औपचारिकता झाल्यामुळे वनक्षेत्राचे प्रमाण जैसे थे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ३३ टक्के वनक्षेत्र आवश्यक असते. सध्या एकूण मराठवाड्याचे वनक्षेत्र फक्त ४.४५ टक्के आहे. तर औरंगाबाद जिल्ह्याचे वनक्षेत्र ७.६१ आहे. घटत्या वनक्षेत्रामुळे निसर्गचक्र विस्कळीत झाले आहे. बेसुमार वृक्षतोड रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना नसल्याने वनक्षेत्र आणखी विरळ होत आहे. जैवविविधतेवरही परिणाम झाला असून घटते वनक्षेत्र चिंतेचा विषय ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images