Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बाखरियांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वॉर्ड क्रमांक ४७ राजाबाजार मधून निवडून आलेल्या यशश्री लक्ष्मीनारायण बाखरिया यांचे नगरसेवकपद रद्द करा, अशी मागणी माजी नगरसेवक जगदीश सिद्ध यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. बाखरिया यांनी निवडणूक लढवताना सादर केलेले जन्म प्रमाणपत्र खोटे आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

माहितीच्या अधिकारात महापालिकेकडून माहिती मागवली असता धक्कादायक बाब समोर आली आहे. १५ जानेवारी १९९४ ही नोंदच रजिस्ट्रेशन क्रमांक १८९ फेब्रुवारी १९९४ चे रजिस्टरवर आढळून आले नाही. मात्र फेब्रुवारी १९९४ मधील रजिस्ट्रेशन क्रमांक १८९ वर १ फेब्रुवारी १९९४ अशी जन्म तारीख असून बाळाचे नाव सोनाली, वडिलांचे नाव नंदकिशोर खुढाहाले व आईचे नाव मंजू असे आहे. यावरून केवळ निवडूक लढवण्यासाठी जनतेची व शासनाची दिशाभूल करून बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढवली आहे. त्यामुळे यशश्री बाखरिया यांची निवड रद्द करण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे. या संदर्भात यशश्री बाखरिया यांचे वडील लक्ष्मीनारायण बाखरिया यांनी सादर केलेले जन्म प्रमाणपत्र बरोबर आहे. त्याबद्दल त्यावेळीच का आक्षेप घेतला नाही. प्रमाणपत्र चुकीचे असते, तर निवडणूक आयोगाने ते स्वीकारलेच नसते, असे ते म्हणाले. वॉर्डातील नागरिकांना बदल हवा होता, त्यामुळे त्यांनी यशश्रीला निवडून दिले. त्यामुळे सिद्ध यांचे पोटशूळ उठले आहे. पराभव सहन न झाल्यामुळे आक्षेप घेतला आहे, महापालिकेतील त्यांचे लागेबांधे बंद झाले आहेत,असा पलटवार त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘विलासराव, ठाकरेंचेही स्मारक उभारावे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरात गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकास आमचा विरोध नाही. परंतु, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख व आर. आर. पाटील यांचेही स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जिल्हा बँकेचे संचालक अभिजीत देशमुख यांनी केली.

त्यांनी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली. दूध डेअरी परिसरात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. समाजातील तळागाळातील जनतेसाठी मुंडे यांनी दिलेले योगदान न विसरण्याजोगे आहे. मात्र, या स्मारकाच्या जागेवरून सुरू झालेला वाद दुर्देवी आहे. संकुचित मनोवृत्तीचे लोक याचे राजकारण करीत आहेत. मुंडे यांच्या स्मारकास आमचा कुठलाही विरोध नाही. मात्र, याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, आर.आर. पाटील यांचेही स्मारक उभारावे. मराठी माणसाला स्वाभिमानाने उभे करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य व कर्तृत्त्व सर्वज्ञात आहे.

विलासराव देशमुख व आर. आर. पाटील यांनीही राज्याच्या विकासात दिलेले योगदान महत्त्वपूर्व आहे. मुंडे आणि विलासराव यांची मैत्री सर्वश्रुत होती. त्यामुळे तिघांचे एकत्रित स्मारक झाल्यास या लोकनेत्यांच्या स्मृतींना उजाळा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांच्या पाहणीत १६८ कर्मचारी गैरहजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौर त्र्यंबक तुपे यांनी महापालिकेच्या मुख्यालयासह दोन वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पाहणी केली तेव्हा तब्बल १६८ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. या सर्व कर्मचाऱ्यांचे हजेरी रजिस्टर जप्त करून तुपे यांनी आयुक्तांना सादर केले. आता तुम्हीच कारवाई करा आणि त्याचा अहवाल सादर करा, असे त्यांनी आयुक्तांना सांगितले.

महापालिका मुख्यालय आणि वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबद्दल गेल्या काही दिवसांपासून महापौरांनी अचानक भेटी देऊन तपासणी सुरू केली आहे. त्यांनी सोमवारी सकाळी वॉर्ड 'ड' कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी वॉर्ड अधिकारी एस. आर. जरारे उपस्थित होते. पण ५३ कर्मचाऱ्यांपैकी ३१ कर्मचारी गैरहजर असल्याचे लक्षात आले. वॉर्ड अभियंता 'ड' कार्यालयातील १३ पैकी ५ कर्मचारी गैरहजर होते. वॉर्ड कार्यालय 'क' मधील ५५ पैकी ४४ तर वॉर्ड अभियंता कार्यालय 'क' मधील ११ पैकी ६ कर्मचारी गैरहजर असल्याचे लक्षात आले. महापालिकेच्या मुख्यालयातील विविध विभागांना त्यांनी भेटी दिल्या, तेव्हा वर्ग तीन आणि वर्ग चार चे मिळून ११२ कर्मचारी गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांचे हजेरी रजिस्टर महापौरांनी जप्त करून आयुक्तांच्या स्वाधीन केले. त्यांच्या बरोबर उपायुक्त किशोर बोर्डे, अस्थापना अधिकारी भालचंद्र पैठणे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वार महिला ट्रकच्या धडकेत ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार तर, अन्य एक जण गंभीर जखमी झाला. सावंगी बायपास रोडवर पोखरी शिवारात सोमवारी सायकांळी हा अपघात झाला. घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या ट्रकचालकास नागरिकांनी पाठलाग करत पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संतप्त जमावाने ट्रकही पेटवून दिला. याप्रकरणी फुलंब्री पोलिस अधिक तपास करत आहेत.

जयमाल पेटारे (वय ३०, रा. सावंगी) असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. पेटारे या नातेवाईक राजू भालेराव (वय ४६) यांच्यासह स्कुटीवरून (क्रमांक एमएच २० बीएस ५६९०) पोखरीकडून पिसादेवी रोडकडे जात होत्या. पोखरी फाट्यावरून जात असतानाच सावंगीकडून आलेल्या ट्रकने (क्रमांक एचआर ५५ एस ४०७०) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात पेटारे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात राजू भालेराव हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, अशी माहिती फुलंब्री पोलिसांनी दिली.

दरम्यान, अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या ट्रकचालकास नागरिकांनी पाठलाग करत पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संतप्त झालेल्या काही नागरिकांनी ट्रक पेटवून दिला. पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केले. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपघाताचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस जमादार समद शेख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधन समायोजन आकार कपात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाजेनको कंपनीने उद्योग क्षेत्राला लागू असलेल्या इंधन समायोजन आकार (फ्युएल अॅडजेस्टमेंट चार्जेस) कमी करण्यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरने (सीएमआयए) उर्जामंत्र्यांकडे यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्याची तत्काळ दखल घेत सरकारने जून २०१५च्या बिलात ते समायोजित करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सीएमआयएचे विनोद नांदापूरकर यांनी रविवारी पत्रकारांना दिली.

सीएमआयएचे अध्यक्ष मुनिष शर्मा, उपाध्यक्ष आशिष गर्दे, माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, उर्जा विभागाचे प्रसाद कोकिळ, सुरेश तोडकर आदींची यावेळी उपस्थिती होती. नांदापूरकर म्हणाले,'उद्योगासाठीचे महाराष्ट्रात लागू केलेले दर हे देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत २५ टक्के जास्त आहेत. यासंदर्भात आपण गेल्या कित्येक वर्षांपासून संघर्ष करत आहोत. त्यात आता महावितरणने प्रस्तावित केलेली दरवाढ लागू होणार आहे. ही करू नये यांसह अन्य मागण्या आम्ही उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केल्या होत्या. त्यांनी १९ मे रोजी सीएमआयएच्या शिष्टमंडळाला मुंबईत बोलाविले. आमदार अतुल सावे यांच्या पुढाकाराने बैठक झाली. उद्योगासाठीचे वीज दर कमी करावेत, रात्रीच्या वेळी मिळणारे रिबेट आणि इंन्सेटिव्ह कमी करू नये, एक मेगावॅटपेक्षा अधिक वीज वापर असलेल्या उद्योगांना क्रॉस सबसिडीचा लाभ मिळावा, इंधन समायोजन आकार कमी करावा या चार मागण्या मांडल्या.'

इंधन समायोजन आकार थेट २० टक्क्यांनी वाढविला होता. बावनकुळे यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतर त्यांना ही बाब निदर्शनास आली. यावेळी महावितरण, महानिर्मितीचे अधिकारीही उपस्थिती होते. उद्योजकांवर अतिरिक्त भार पडत असल्याचे मान्य झाल्यानंतर श्री. बावनकुळे यांनी हा अधिभार घटवून दहा टक्के करण्याचे आदेश दिले. सरकारने तत्काळ दखल घेऊन अंमलबजावणीही केली यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे, असे त्यांनी सांगितले.

वीजदर कमी व्हावेत

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात २५ टक्के जास्त वीज दर आहेत. ते कमी करण्यासाठी सीएमआयए प्रयत्न करणार आहे. उद्योगांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे विजेवरील क्रॉस सबसिडी सरचार्ज शून्य असावा, सध्या अस्तित्वात असलेले पॉवर फॅक्टर, लोड फॅक्टर, नाइट रिबेट आदी इंन्सेटिव्ह येऊ घातलेल्या दर सुधारणेत कमी करण्यात येऊ नयेत, आदी मागण्याही सीएमआयएने मांडल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकलठाणा MIDC दीड दिवसांपासून अंधारात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रविवारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या फटक्यात चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील वीज गायब झाली. दीड दिवस उलटून गेले तरी अर्ध्या भागात वीज न आल्याने उद्योजकांना कोट्यवधींचा फटका बसला आहे. महावितरणने मात्र दुरुस्ती केल्याचा दावा केला आहे.

रविवारी सायंकाळी शहराला पावसाने झोडपले. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसात शहराची वीज गायब झाली. दुरुस्तीनंतर अनेक भागात वीजपुरवठा सुरळीत झाला, पण चिकलठाणा औद्योगिक वसाहत त्याला अपवाद होती. रविवारी रात्रभर पावरलूम, ब्रीजवाडी परिसरात वीज नव्हती. सोमवारी सकाळी महावितरणने या भागातील विजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यात थोडे यश मिळाले, पण जवळपास १५ कंपन्यांचा विजपुरवठा सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. कंपन्या बंद असल्याने कोट्यावधींचे नुकसान झाले. या भागातील अनेक उद्योग मोठे आहेत. जेथे रात्री मोठ्या प्रमाणावर काम चालते. रविवारी रात्रीपासून वीज नसल्याने काम बंद झाले.

फिडरवर बिघाड झाल्यामुळे विजपुरवठा खंडित झाला आहे. काही वेळात दुरुस्त होईल असे उत्तर महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरमधून देण्यात आले, पण प्रत्यक्षात विजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. सोमवारी रात्री उशिरापर्यंत वीज न आल्याने वैतागलेल्या उद्योजकांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र त्यांना बिघाड दुरुस्त झाल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी तरी हा प्रश्न सुटणार की नाही? अशी चिंता आता उद्योजकांना पडली आहे. यासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता मदन शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता चिकलठाण्यात रविवारी विस्कळित झालेला वीजपुरवठा सोमवारी सुरळीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांना कर्जमाफीची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळ व गारपिटीने शेतकरी त्रस्त असून, आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाने थाळीनाद आंदोलन केले. दुष्काळ व गारपिटीने शेतकरी हतबल झाला असून सरकारला शेतकऱ्यांच्या अवस्थेची जाणीव व्हावी यासाठी, आत्महत्येसाठी वापरतात तसा दोर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला.

राज्यातील शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करावा व त्यांना नव्याने दर एकरी किमान २५ हजार रुपये कर्ज उपलब्ध करून द्यावे, सर्वसमावेशक पीक वीमा योजना लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी मराठवाडा सचिव मनिषा चौधरी, सुग्रीव मुंडे, सय्यद अमजद, कृष्णा जाधव, सुरेश पवार, आसमा शेख यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता कर भरा

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

चेन्नई नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, व्हिओम नेटवर्क लिमिटेड आणि रिलायन्स कम्युनिकेशन या तीन टॉवर कंपन्यांना एप्रिल ते सप्टेंबरदरम्यानचा मालमत्ता कर चार आठवड्यांत भरण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. नरेंद्र बोर्डे व न्या. पी. आर. बोरा यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे औरंगाबाद महापालिकेच्या तिजोरीत ८९ लाख ५० हजार रुपये जमा होणार आहेत.

औरंगाबाद महापालिकेने चेन्नई नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, व्हिओम नेटवर्क लिमिटेड आणि रिलायन्स कम्युनिकेशन या तीन टॉवर कंपन्यांना थकबाकीसह चालू वर्षाचा मालमत्ता कर भरण्याची नोटीस बजाविली होती. या नोटिसला या तिन्ही कंपन्यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यातील १२९नुसार भूखंड किंवा इमारतीलाच मालमत्ता कर लावता येतो.

गच्चीवर तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येणाऱ्या टॉवरला मालमत्ता कर लागू होत नाही, असा युक्तीवाद चेन्नई व व्हिओम नेटवर्कचे वकील राहुल करपे यांनी केला; तसेच भारतीय टपाल कायद्यानुसार मोबाइल टॉवरनां परवानगी मिळते. या कायद्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. राज्य सरकार त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे हस्तक्षेप करत आहे, असाही आक्षेप याचिकाकर्त्यांचा आहे. महापालिकेच्या माध्यमातून मालमत्ता कराची वसुली केली जात आहे, असा युक्तीवाद रिलायन्सचे वकील आनंद भंडारी यांनी केला आहे.

आतापर्यंतची थकबाकी या कंपन्यांकडून घेत नाही. चालू वर्षांतील सहा महिन्यांचा मालमत्ता कर भरावा, असा युक्तीवाद औरंगाबाद महापालिकेचे वकील अतुल कराड यांनी केला. कोर्टाने या तीन कंपन्यांना एप्रिल ते सप्टेंबरदरम्यानचा मालमत्ता कर भरण्याचे निर्देश दिले आहेत. चेन्नईला साडेआठ लाख, व्हिओमला ३९ लाख आणि रिलायन्सला ४२ लाख रुपये एका आठवड्यात औरंगाबाद महापालिकेत भरावे लागणार आहेत. याचिकेची पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.

औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार या तिन्ही कंपन्यांना चालू वर्षातील सहा महिन्यांचा मालमत्ता कर भरावा लागणार आहे. त्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

- शिवाजी झनझन, उपायुक्त, करमूल्यांकन, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३८ हजार विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आठवडाभरापासून लक्ष लागलेल्या, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी (८ जून) वेबसाइटवर जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागाच्या गुणवत्तेत सलग चौथ्या वर्षी वाढ झाली आहे. यंदा विभागातील ३८ हजारावर विद्यार्थी विशेष प्राविण्यासह (डिस्टिंक्शन) उत्तीर्ण झाले आहेत.

यंदा ९०.५७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत २.९७ टक्क्यांनी वाढ झाली. मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. शिक्षण मंडळातर्फे घेण्यात ३ ते २६ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेला विभागातून १ लाख ६० हजार ६१९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ लाख ४५ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी दहावीचा टप्पा पार केला. निकालाची टक्केवारी ९०.५७ एवढी आहे. गेल्या चार वर्षांपासून निकालाच्या टक्केवारीत वाढ होत आहे. निकालात यंदाही मुलींनी आघाडी घेतली असून, मुलांच्या तुलनेत ३.२२ टक्क्यांनी अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. विभागातून ९२ हजार ९२२ मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८२ हजार ९०० मुले उत्तीर्ण झाले. ६७ हजार ६९७ मुलींनी दहावीची परीक्षा दिली. त्यातील ६२ हजार ५७२ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण होण्याचे मुलांचे प्रमाण ८९.२१ टक्के तर, मुलींचे ९२.४३ एवढे टक्के आहे. फेरपरीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ४४.७२ एवढी आहे. विभागातून दहावीला बसलेल्या फेरपरीक्षार्थींची संख्या १० हजार ७८३ होती. त्यापैकी ४८२२ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण ठरले.

राज्याचा निकाल

राज्यभरातून १५ लाख ७२ हजार २६८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यापैकी १४ लाख ३७ हजार ९२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९१.४६ आहे. राज्यात १ लाख ५३ हजार ४०१ विद्यार्थ्यंनी फेरपरीक्षा दिली होती. त्यापैकी ७२ हजार २६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशाचे ‘नो टेन्शन’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल सोमवारी (८ जून) जाह‌ीर झाला. औरंगाबाद गुणवत्तेत आघाडीवर असून उत्तीर्णतेचा टक्का वाढत आहे. पण सर्वांना अकरावीत प्रवेश मिळेल एवढी क्षमता शहरात आहे. दहावी निकाल ऑनलाइन जा‌हीर करण्यात आला असला, तरी विद्यार्थ्यांना १५ जून रोजी गुणपत्रिका मिळणार आहे. परंतु, पालकांची अकरावीत प्रवेशासाठी लगेच धावपळ सुरू होते. कोणते कॉलेज घ्यावे, कोणती शाखा निवडावी यासाठी विद्यार्थ्यांसह पालकही सहभाग असतात. मंगळवारपासून पालक, विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेत कॉलेजांनी प्रवेश प्रक्रियेची सोमवारीच तयारी करून ठेवली आहे. दहावीनंतर विविध अभ्यासक्रमांची संधी त्यांची प्रवेश क्षमता पाहता विद्यार्थ्यांसमोर अनेक संधी आहेत. अकरावी प्रवेश क्षमता विद्यार्थी संख्येच्या तुलनेत मोठी आहे. मात्र हवे त्या कॉलेजसाठी स्पर्धा असेल.

आयटीआय, पॉलिटेक्निकचीही संधी

मराठवाड्यासह शहरात आयटीआय, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची क्षमता मोठी आहे. औरंगाबाद शहरात तीन आयटीआय कॉलेजमध्ये प्रवेश क्षमता सुमारे ९९० एवढी आहे. पॉलिटेक्निक कॉलेजांची संख्या १५ असून त्याची प्रवेश क्षमता साधारण ५४१५ एवढी आहे.

दहावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी व विविध पर्यायही उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवेशाबाबत चिंता करण्याचे कारण नाही. कला, वाणिज्य, विज्ञान शाखांसह एमसीव्हीसी, आयटीआय, पॉलिटेक्निक अशा अनेक संस्था शहरात आहेत.

- सुरेश भाले, उपप्राचार्य, वसंतराव नाईक कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी चिंता शिर्डीच्या प्रवाशांची

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिर्डीच्या प्रवाशांसाठी औरंगाबादहून जास्तीच्या रेल्वे सोडण्याचा विचार आहे. भविष्यात शिर्डीसाठी आणखी गाड्या वाढविण्याबाबत नियोजन केले जात आहे. मराठवाड्याच्या मागण्याबाबत निश्चित विचार करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. के. श्रीवास्तव यांनी दिली.

श्रीवास्तव यांनी औरंगाबाद रेल्वे स्टेशनला भेट दिली. प्रवाशांसाठी उभारण्यात येणाऱ्या सरकत्या जिन्याच्या कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,'औरंगाबाद मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त रेल्वे घावत आहेत. नांदेडकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत घट झाली आहे. भाविकांना शिर्डीकडे जाता यावे, यासाठी विशेष नियोजन करण्यात येत अाहे.'

आंध्र प्रदेशासह दक्षिण भारतातून शिर्डीला मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यांना चांगल्या सुविधा देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्याच्या रेल्वेप्रश्नांकडे लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती श्रीवास्तव यांनी दिली.

मनमाड ते परभणी दुहेरीकरणासंदर्भात ते म्हणाले,'यामार्गावर मालवाहतुकीतून रेल्वेला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे या मार्गाचे दुहेरीकरण करण्यात अडचणी येत अाहेत.' शिर्डीसाठी जाणाऱ्या प्रवाशांचा विचार करून रेल्वेच्या संख्येत वाढ होणार आहे. यानंतर औरंगाबाद सह मराठवाडयातील अन्य रेल्वेच्या मागण्यापुर्ण करण्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे आश्वासन महाव्यवस्थापकांनी दिले. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, ‌विभागीय रेल्वे व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

आम्ही करू प्रयत्नः खैरे

मनमाड ते परभणी दुहेरीकरणाचा प्रश्न कायम आहे. तो सोडविण्यासाठी काम करणार आहे. याशिवाय रोटेगाव ते पुणतांबा लोहमार्गाच्या प्रश्नासाठी दहा एकरची औरंगाबाद शहरातील जागेची किंमत सध्या शंभर कोटींवर आहे. रेल्वेची जागा विकून हा लोहमार्ग तयार करावा, अशी सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.

स्वातंत्र्यसैनिकांचा आवाज केला बंद

रेल्वे महाव्यवस्थापकांच्या पत्रकार परिषदेत खासदार चंद्रकांत खैरे यांनी काही प्रश्नांची उत्तरे देत असताना कमीत कमी वेळेत कार्यक्रम अटोपण्याचा यशस्वी प्रयत्न केला. रेल्वेप्रश्नांबाबत स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लड्डा यांनी प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खासदार खैरे यांनी शांत बसण्याची सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुयारी मार्गासाठी MSRDC चा निधी

0
0

औरंगाबादः शिवाजीनगरच्या रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न लवकरच मिटणार आहे. या क्रॉसिंगवर भुयारी मार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) २३ कोटी ५० लाख रुपये देण्याचे मान्य केले अाहे, अशी माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली.

शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगमुळे वाहतुकीची कायम कोंडी होते. त्यामुळे या क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र उड्डाण पुलासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे तेथे रेल्वे अंडर ब्रिजचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एमएसआरडीसीच्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. या कामासाठी संबंधित विभागाने २३ कोटी ५० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय शाहनूरमिया दर्गा येथेही भुयारी मार्गाचीही मागणी आहे, अशी माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रेल्वे विभागाकडून रेल्वे अंडर ब्रिजचा प्रस्ताव लवकरात लवकर मान्य करून या कामाला सुरुवात करावी, अशी सूचना खासदार खैरे यांनी रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीबाणी कायम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणीबाणी कायम असल्यामुळे शहरातील नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. सिडको-हडकोसह जुन्या शहरात पाच-सहा दिवसांपासून निर्जळी असल्यामुळे पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न नागरिकांच्या समोर निर्माण झाला आहे. या परिस्थितीतून तात्काळ मार्ग काढण्याऐवजी 'समांतर' आणि 'महावितरण'चा खेळ सुरूच आहे.

औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सोमवारी पुन्हा पाणीपुरवठ्याबद्दल पत्रक प्रसिद्ध करून महावितरणने नक्षत्रवाडी येथे एक तासाचा शटडाउन घेतल्यामुळे मंगळवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सायंकाळी ६ ते ७ या काळात वीज बंद होती. त्यामुळे ५६ एमएलडीचे जुने पंपिग स्टेशन एका तासासाठी बंद ठेवावे लागले. त्याचा परिणाम म्हणून मंगळवारी पाणीपुरवठ्यावर काही प्रमाणात परिमाण होणार आहे. नक्षत्रवाडीचा विद्युत पुरवठा आज सोमवारी पहाटे ५च्या सुमारास सुरू झाला होता. रविवारी दुपारी ४ वाजून २० मिनिटांपासून येथील दोन्ही फिडर बंद होते. त्यामुळे तब्बल १२ तास ५६ एमएलडीचे जुने पंपिग स्टेशन बंद होते. त्यात आज महावितरणने पुन्हा एका तासाचा खंड काळ घेतला आहे. यामुळे पाणीपुरवठ्यावर काही प्रमाणात परिमाण होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

BT कॉटन बियाणांच्या दरात कपात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अखेर राज्य सरकारने कापूस बियाण्यांची किमती कमी केल्या आहेत. बीटी कापूस, बोलगार्ड १, बोलगार्ड २ आणि संकरित कापूस बियाण्यांची कमाल विक्री किंमत शंभर रुपयांनी कमी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी निर्धारित किमतीतच बियाणे खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिनकर पवार यांनी केले आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना स्वस्त दरात कापूस बियाणे देण्याची सूचना कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी मांडली होती. प्रत्येक पाकिटामागे शंभर रुपये दर कमी करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. बियाणे कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही तर, राज्य सरकार अधिसूचना काढून दर कमी करेल, असे खडसे यांनी सांगितले होते. बियाणे कंपन्यांनी निश्चित केलेल्या दरातच बियाणे विक्री केली. त्यामुळे अखेर कृषिमंत्र्यांनी सोमवारी अधिसूचना काढून बियाणे दर कमी केले. यात बीटी कॉटन, बोलगार्ड १ (प्रति पाकिट ७३० रुपये), बीटी कॉटन, बोलगार्ड २ (प्रती पाकिट ८३० रुपये) आणि संकरित कापूस (प्रती पाकिट ५०० रुपये) यांचा दर निश्चित करण्यात आलाे. या दरात बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती दिनकर पवार यांनी केले आहे. जिल्ह्यात खताचा सरासरी वापर १.७० लाख टन असून, आतापर्यंत १.३७ लाख टन खताचा पुरवठा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबाद ‘डीसीसी’मध्ये वसुलीची गडबड

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

कर्जवसूली केल्याशिवाय राज्य सरकार उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेला अर्थसहाय्य करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे बँकेकडून कर्जवसुलीसाठी कडक धोरण राबविण्यास सुरुवात झाली आहे.

राज्य सरकारच्या या धोरणामुळे कर्जवसुलीसाठीचे कडक धोरण अवलंबविण्याचे जिल्हा बँकेच्या संचालकांनी ठरविले आहे. यासाठी कर्जवसुलीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखविला, तर मात्र वेतन बंद करण्याची तंबी देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण आहे. बँकेच्या हितासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे तंबी द्यायला नको, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.

उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या अस्तित्वासाठी कर्जवसुलीशिवाय पर्याय नाही, असे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बँकेच्या अस्तित्वाची खऱ्या अर्थाने लढाई सुरू झाली आहे. आतापर्यंत थकबाकीदार कोण, त्याच्यावर वरदहस्त कोणाचा याचा विचार करून वसुलीचे प्रयत्न करण्यात येत होते. आता मात्र, कोणाचीही तमा न बाळगता कारवाईचे प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंत थकबादीदार कोण आहेत, हे माहीत असतानाही कारवाई होत नव्हती. त्यांना अभय देणाऱ्या कारभाऱ्यांकडून आता अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबी देण्यात येत आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच बँकेचे अस्तित्व कायम आहे, असे अधिकारी-कर्मचारी उघडपणे बोलून दाखवत आहेत.

बँकेवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. गेल्या दोन वर्षांमध्ये या मंडळींनीसुद्धा कर्ज वसुलीप्रकरणी विशेष मोहीम हाती घेतली. मात्र, अवैध मार्गाने कर्ज घेऊन कर्जाची रक्कम हडप करणाऱ्या धनदांडग्यांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची १२८ प्रकरणे पोलिस ठाण्यांकडे पाठविली आहेत. राष्ट्रवादीसह अन्य पक्षांच्या स्वार्थी मंडळींनी राजकीय दबावाचा वापर करीत पोलिस यंत्रणेला कारवाई करण्यापासून रोखण्यात यश मिळविले होते, असे म्हटले जाते.

राष्ट्रवादीचे प्रयत्न

उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेवर सध्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे, तर उपाध्यक्षपद भाजपकडे आहे. बँकेवर भाजपाचा पदाधिकारी असल्याचे दाखवून राज्य सरकारकडून आर्थिक निधी मिळविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न होता. यासाठी राष्ट्रवादीने शरद पवारांची मदत घेतल्यानंतरही उपयोग झाला नाही, असे सांगण्यात येत आहे.

'आपला-परका भेद नको'

अपुरा कर्मचारी वर्ग, वेतन यांबाबतची अनिश्चितता असतानाही जिल्हा बँकेतील अधिकारी-कर्मचारी वर्ग बँकांनी आस्था व तळमळ बाळगून आहेत. साखर कारखान्याकडील कर्जवसुलीसाठी न्यायालयीन प्रक्रिया राबविलेली आहे, शासनाकडून हमीच्या कोट्यवधी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. या सर्व वसुलीसाठी संचालकांची साथ हवी आहे. तसेच, कर्जाची वसुली प्रसंगी पुरेसे संरक्षण मिळणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया बँकेचे कार्यकारी संचालक एच. व्ही. भुसारे यांनी व्यक्त केली. कर्जवसुलीबाबत आपला व परका असा भेदही व्हायला नको, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

'राजकीय' देणी भरपूर

उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेतील काही संचालकांच्या तसेच राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींच्या नातलगांकडेच बँकेची भलीमोठी थकबाकी आहे. यातील काही मंडळींनी राजकीय वरदहस्ताचा लाभ घेत आपल्या संस्था अवसायनात कढून कर्जाची रक्कम हडप करण्याची शक्कल शोधून काढली व त्याव्दारे स्वतःचा आर्थिक लाभ करीत बँकेत बाधाही आणली आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई कशी करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. संचालक मंडळांनी तेरणा व तुळजाभवानी साखर कारखान्यांना अवैध मार्गाने कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले किंवा देण्यास भाग पाडले आहे. अशा संचालकांविरुद्ध कारवाई होणे गरजेचे आहे, असेही अधिकारी आता खासगीत बोलू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरी प्रकरणात सहा महिला जेरबंद

0
0

जालनाः एमआयडीसीमध्ये बंद पडलेल्या कंपनीमध्ये घुसून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा महिलांच्या टोळीला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरात शहा यांचा 'संकेत फूड्स' हा कारखाना आहे. राज्य सरकारने गुटखा बंदी जाहीर केल्यापासून हा कारखाना बंद आहे. या कारखान्यामध्ये मंगळवारी सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास काही महिला भिंतीवरून आत शिरत, साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न करत होत्या. कदीम जालना पोलिसांनी या सहा महिलांना मुद्देमालासह अटक केली. मंगल कुंवारे, मंगल आडके, उषा खरात, वंदना खंडागळे, मीणा भालके आणि वंदना म्हस्के अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगे पुढील तपास करीत आहेत. सहायक पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, पोलिस निरीक्षक गावडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ लाख लुटणारी तरुणांची टोळी गजांआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

शहरातील मंठाळे नगर भागामध्ये नागरिकाच्या डोळ्यामध्ये तिखट टाकून ४२ लाख रुपयांची लूट करणाऱ्या तरुणांच्या टोळीला पोलिसांनी बुधवारी अटक केली. ही घटना ३० मे रोजी घडली होती. या तरुणांनी सुरेश रजपूत यांना लुटले होते. रजपूत हे एका व्यापाऱ्याचे मदतनीस असून, त्यांच्याकडे मोठी रक्कम असल्याची माहिती मिळाल्यानंतर टोळीने ही लूट केली होती. या तरुणांकडून पोलिसांनी साडेनऊ लाख रुपये जप्त केले आहेत, असी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक लता फड, स्थानिक गुन्हे शाखेचे बी. बी. मिसाळ, पोलिस निरीक्षक बावकर उपस्थित होते. बेलाळे आणि ढगे या दोन पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, या चोरीच्या तपासासाठी पाच टीम तयार करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी हे २० ते २२ वर्षांचे आहेत. रजपूत यांच्यावर पाळत ठेवूनच त्यांनी ही लूट केल्याचे स्पष्ट होत आहे. दीपक हाके (वय २८, रा. लातूर), यशपाल कदम (२२, रा.कातपूर), प्रेमसागर उर्फ अण्णा धनगावे (२२, रा. खाडगाव), अजित म्हस्के (२०, रा. कातपूर), संदीप शिंदे (२४, रा. लातूर), आकाश भेकरे (२२, रा. खाडगाव) अशी आरोपींची नावे आहेत. यातील आकाश भेकरे याला अद्याप अटक केलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध कोठडीप्रकरणी भरपाई

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

बीडमधील एका व्यक्तीला अवैधपणे दीड दिवस पोलिस कोठडीमध्ये ठेवल्याप्रकरणात हायकोर्टाने सहायक पोलिस निरीक्षकाला दणका दिला आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्याला ५० हजार रुपयांची भरपाई देण्याबरोबरच याचिकेच्या खर्चापोटी १० हजार रुपये देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

बीडच्या फैय्याज शमशुद्दीन अतार यांनी ही याचिका केली होती. या प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. इंदिरा जैन यांनी हा आदेश दिला आहे. अतारने आंतरजातीय विवाह केला होता. त्यांना दोन मुले असून, त्याची पत्नी एक जून २०१२ रोजी घरातून निघून गेली होती. या प्रकरणात २३ जुलै २०१२ रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. एस. हरणे यांनी अतार यांना बीडच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये बोलाविले. शिवीगाळ करून लॉकअपमध्ये बंद केले आणि त्यांना दुसऱ्या दिवशी सायंकाळी कोठडीच्या बाहेर काढले. ही कारवाई का करण्यात आली? याचे उत्तर पोलिस अधिकाऱ्यांनी दिले नाही. कोणत्याही कारणाशिवाय कारवाई केल्याप्रकरणी अतार यांनी सहा ऑक्टोबरला तक्रार केली. तरीही हरणे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. दोन दिवस आणि एक रात्र कोठडीमध्ये काढावे लागले आणि त्याची जबाबदारी हरणे यांच्यावर आहे, असा आक्षेप घेत अतार यांनी २०१४मध्ये फौजदारी याचिका केली होती.

अतार यांनी या आधी २०१२मध्येच हरणे यांच्यावर कारवाई व्हावी, म्हणून याचिका केली होती. बीडच्या पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्याची मुभा देत, हायकोर्टाने ही याचिका निकाली काढण्यात आली होती. त्यानुसार, अतार यांनी ६ ऑक्टोबर २०१२ रोजी बीडच्या पोलिस अधीक्षकांकडे हरणे यांच्यावर कारवाई करण्याची तक्रार केली होती. मात्र, पोलिस अधीक्षकांनीही त्यांच्यावर कारवाई न केल्याने याचिकाकर्त्याने पुन्हा औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. या याचिकेची अंतिम सुनावणी न्या. नलावडे व न्या. जैन यांच्यासमोर मेमध्ये पूर्ण झाली. मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या याचिकेचा निकाल लागला. अवैधरित्या डांबून ठेवलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाने याचिकाकर्त्याला ५० हजार रुपये देण्याचे निर्देश कोर्टाने दिले. तसेच याचिकेच्या खर्चापोटी १० हजार रुपये देण्याचे निर्देशही देण्यात आले. याचिकाकर्त्याची बाजू एस. एस. काझी यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनुकुल परिस्थिती निर्माण न झाल्यामुळे, मान्सूनची प्रगती झाली नाही. मात्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये बुधवारी आणि गुरुवारी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

केरळमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनचा प्रवास अपेक्षेपेक्षा समाधानकारक प्रगती करत, सोमवारी रत्नागिरीमध्ये दिमाखात प्रवेश केला होता. त्यावेळी राज्याच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र अनुकुल परिस्थिती निर्माण न झाल्यामुळे मान्सून रत्नागिरी परिसरामध्ये स्थिर राहिला होता. येत्या दोन दिवसांमध्ये अनुकुल वातावरण निर्माण होऊन, मान्सून कर्नाटक आणि अरबी समुद्रामध्ये पोहोचण्याचा अंदाज आहे. दरम्यान, बुधवारी कोकण आणि गोव्यामध्ये बहुतांश भागात आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर, गुरुवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात झाले असून, त्याचे नामकरण अशोबा असे करण्यात आले आहे. हे चक्रीवादळ मुंबईपासून वायव्य ते उत्तर या दिशेने ते पुढे सरकत आहे. अशोबा दूर गेल्याने मुंबईसह उत्तर कोकणात सोमवारी पावसाने पाठच फिरवली होती. अशोबा दूर जाताना सोबत पाऊसही घेऊन जाईल, असा अनुमान वर्तवण्यात येत होता. परंतु, त्याचा परिणाम मान्सूनवर फारसा जाणवणार नाही, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. यंदा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, पाऊस समाधानकारक असेल, असा सुधारित अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनर्वसित गावांत टंचाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील शिवना- टाकळी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या केसापूर, वैसपूर, अंतापूर या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे आलापूर येथील चार योजना फोल ठरल्याने एका शेतकऱ्याकडून पिण्याचे पाणी घ्यावे लागत आहे.

तालुक्यातील या विस्थापित गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजना लघु पाटबंधारे विभाग १ व अधीक्षक अभियंता औरंगाबाद मंडळाच्या अखत्यारित येतात. गावांना मुलभूत सुविधा देण्याची जबाबदारी शासनस्तरावर या विभागांवर आहे. केसापूर, आलापूर व अंतापूर ही तीन गावे मिळून ग्रुप ग्रामपंचायत असून या गावांचे पुनर्वसन होवून आठ वर्षे झाली आहेत. या प्रत्येक गावासाठी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी तयार केलेल्या तीन योजना यशस्वी झाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

केसापूर व अंतापूर ही दोन गावे धरणापासून काही मीटर अंतरावर असताना एक दिवसाआड केवळ पंधरा मिनिटे पिण्याचे पाणी मिळते. आलापूर गावासाठी २१ लाख रुपयांची राजाराम पाणीपुरवठा योजना, ५६ लाख रुपयांची टाकळी-अंतापूर योजना व व तिसरी १२ लाख ८५ हजार रुपयांची योजना राबविण्यात आली. या तिन्ही योजनांतून पाणी मिळत नसल्याने आता ४१ लाख रुपये खर्चाच्या योजनेचे काम आलापूरमध्ये सुरू आहे. या योजना करूनही पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने सध्या ग्रामपंचायतीच्या मदतीने पोपट भावलाल राजपूत या शेतकऱ्याच्या बोअरवेलमधून मोफत पाणीपुरवठा केला जात आहे.

केसापूर, अंतापूर व आलापूर गावांची पाणीपुरवठा योजना फोल ठरली आहे. धरण अत्यंत जवळ असताना गावाला पिण्यासाठी पाणी पाणी मिळत नाही. नोकरशाहीपुढे लोकशाहीचे काही चालत नसल्याने आम्ही हतबल झालो आहोत.

- सीमा शिरसाठ, सरपंच

सिंचन विभाग व ग्रामपंचायतीच्या चूक धोरणाचा फटका गावकऱ्यांना बसत आहे. सध्या गावकऱ्यांना पाणीटंचाईचा फटका बसत आहे.

- बंडू जाधव, ग्रामस्थ केसापूर

आलापूरसाठी लाखो रुपयांच्या चार योजना राबवूनही शेतकऱ्याकडून पाणी घेण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. पुनर्वसनाचे मोठे काम बाकी असून शासनातर्फे कंत्राटदराचे भले केले जात आहे.

- जनार्धन कोरडे, ग्रामस्थ, आलापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images