Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कन्नडमध्ये पाच दुकाने फोडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

येथील मुख्य बाजारपेठेत सुमारे पाचशे मीटरच्या अंतरात पाच दुकानाचे शटर सोमवारी (८ जून) मध्यभागी उचकटून चोरी करण्यात आली. यामुळे व्यापाऱ्यांत खळबळ उडाली असून कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद-धुळे महामार्गावरील पवन किराणा, अष्टविनायक प्रोव्हिजन, आकाशदीप क्लॉथ स्टोअर, मंगल मेडिकल स्टोअर्स व तेजश्री एंटरप्रायजेस ही दुकाने सोमवारी मध्यरात्री व मंगळवारी पहाटे फोडण्यात आली. चोरांनी तेजश्री एंटरप्रायजेस मध्ये एलसीडी टीव्ही, विविध कंपनीचे मोबाइल हँडसेट चोरून नेले. या मालाची किंमत अंदाजे साडेचार लाख रुपये आहे. इतर दुकानांमधील कॅश काउंटर फोडून रोख रक्कम पळवण्यात आली. ही चोरी करताना दुकानांसमोर मोठ्या ट्रकचा आडोसा निर्माण करण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. तेजश्री एंटरप्रायजेसचे किशोर मधुकर वज्रे यांनी कन्नड पोलिसांना कळविल्यानंतर उपविभागीय पोल‌िस अधिकारी प्रीतम यावलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील, पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलिस उपनिरीक्षक रोहित बेंबरे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टँकरमुक्तीची वीस गावांत अपेक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तालुक्यातील वीस गावांमध्ये कामे सुरू आहेत. यामुळे ही गावे टँकरमुक्त होण्याची अपेक्षा आहे. लघुसिंचन जलसंधारण विभागामार्फत ताजनापूर, दरेगाव, पाडळी, भांडेगाव, विरमगाव, खांडी पिंपळगाव, रसुलपुरा, खिर्डी, वेरूळ, कनकशीळ येथे सिमेंट साखळी बंधाऱ्याची २९ कामे सुरू आहेत. या कामांवर पाच कोटी ३० लाख रुपयांचा खर्च होणार आहे.

या शिवाय गदाना, बोरवाडी, घोडेगाव, गोळेगाव, ममनापूर, बाजारसावंगी, वडगाव, दरेगाव, खांडी पिंपळगाव, ताजनापूर, वडगाव, कानडगाव, भडजी या गावांतही कामे सुरू आहेत. या कामांमुळे या वर्षीचा पाऊस या गावांच्या शिवारात जिरवला जाणार आहे. याशिवाय वेरूळ येथील येळगंगा व बाजारसावंगी येथील धांड नदीचे लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची अपेक्षा असल्याने त्याचा लाभ सिंचनासाठी होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सिंचनासाठी पाणी

पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. याचा थेट लाभ शेतातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास होणार आहे. यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन मदत होणार आहे.

विरमगाव येथे लोकसहभागातून तीन सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरू आहे. गिरीजा व त्रिशूल नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.

- सविता अधाने, सरपंच विरमगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी परत गेल्यास ग्रामसेवकाचे निलंबन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

'जागेचा वाद किंवा गावकऱ्यांच्या भांडणामुळे ग्रामपंचायतीची विकास कामे ठप्प होऊन वर्ष अखेरीस निधी परत गेल्यास संबंधित ग्रामसेवकाला जबाबदार धरून निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला. मग्रारोहयोअंतर्गत प्रलंबित १०७ विहीरींची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश त्यानी दिले आहेत.

तालुक्यातील मग्रारोहयोअंतर्गत अपूर्ण विहिरी, जलयुक्त शिवार अभियान, स्वच्छ भारत मिशन, पर्यावरण सप्ताहांतर्गत वृक्षारोपण आदी कामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती सभागृहात मंगळवारी (९ जून) बैठक घेण्यात आली. बैठकीला डॉ. चौधरी यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, ज्ञानदेव चाटे, पंचायत समिती सभापती द्वारका पवार, उपसभापती सुभाष जाधव, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, सहायक गटविकास अधिकारी डी. एस. आहिरे, एच. बी. कहाटे, रमेश भालेराव उपस्थित होते.

बैठकीत सोळंके यांनी विविध योजनांतून मंजूर झालेल्या कामांचा गावनिहाय आढावा घेतला. यावेळी मंजुरीनंतर अनेक गावात स्थानिक कारणांमुळे कामे सुरू झाली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे डॉ. चौधरी यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. विविध योजनांतून विकास कामांसाठीचा निधी गावातील वादामुळे परत जातो. त्यामुळे ग्रामसेवकांनी जागरूक राहून गटविकास अधिकाऱ्यांना कळवावे, असे निर्देश त्यांनी दिले.

मग्रारोहयो अंतर्गत अपूर्ण १०७ विहिरींच्या कुशल कामांचा निधी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामसेवकांनी ही कामे पूर्ण करावीत, स्वच्छ भारत मिशन योजनेत शौचालये बांधावीत, गावात किमान एक हजार झाडे लावावीत, जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभाग वाढवून किमान दोन कामे करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बायोमेट्रिक मशिन बसवा

अधिकारी व कर्मचाचारी कर्मचारी कार्यालयात थांबत नसल्याने कामे खोळंबत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कार्यालयात बायोमेट्रिक मशिन बसवून गटविकास अधिकाऱ्यांनी मासिक रिपोर्ट तपासवा, कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी यांनी बैठकीत दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंत्रणांच्या वादात कचऱ्याचे ढीग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

एमआयडीसी प्रशासन व वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत यांच्यात कचरा उचलण्यावरून वाद आहे. त्यामुळे बजाजनगरात जागोजागी कचरा साठला आहे. दरम्यान दोन दिवसांपासूनच्या पावसामुळे डबके साचून रोगराई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाळूज एमआयडीसीतील कामगारांची वसाहत म्हणून बजाजनगर ओळखली जाते. येथील कचरा उचलण्याचा प्रश्न वादग्रस्त झाला आहे. बजाजनगर स्थापन झाल्यापासून कचरा उचलणाऱ्या एमआयडीसी प्रशासनाने चार महिन्यापूर्वी कचरा उचलण्यास नकार दिला. बजाजनगर हा एमआयडीसीचा भाग असल्याने येथील कर वसुलीही एमआयडीसी प्रशासनाकडे आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने कचरा उचलण्यास नकार दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने ग्रामपंचायतीने कचरा उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, त्यास दोन महिन्याच्या कालावधीची मर्यादा घालण्यात आली. पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण देऊन ग्रामपंचायतीने हात झटकले आहेत, तर एमआयडीसीचा नन्नाचा पाढा कायम आहे. या परिस्थितीत चार दिवसांपासून बजाजनगरमध्ये जागोजागी कचरा साठला आहे. मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्याने साठलेला कचरा भिजून दुर्गंधी सुटली आहे. साचलेल्या कचऱ्यात पाणी तुंबून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे कचरा उचलण्याचा प्रश्न तत्काळ निकाली लावावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष

बजाजनगर हा भाग अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. औरंगाबाद पश्चिम विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक शिवसेनेची मदार बजाजनगरातील मतदारांवर असते. राज्यात शिवसेना- भाजप युतीचे सरकार आहे. वडगाव कोल्हाटी येथेही शिवसेनेची सत्ता आहे. तरीही सत्ताधारी पक्षांकडून कचरा उचलण्याच्या मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. 'स्वच्छ भारत मिशन' राबविणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे बजाजनगरातील सर्वसामन्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

बजाजनगरमधील कचरा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नागरिकांकडून आठ रुपये प्रति चौरस फूटप्रमाणे कर घेतला जाईल. कर वेळेवर जमा झाला तर कचरा उचलला जाईल.

- सुनील काळे, उपसरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरण पुन्हा नॉट रिचेबल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जयभवानीनगरमध्ये चार-पाच दिवसांनंतर नळाला येणारे पाणी व सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक प्रचंड संतापले आहेत. परिसरात ऐन पाणी येण्याच्या वेळी वीज गुल होते. या प्रकाराची महावितरणचे अधिकारी दखल घेत नाहीत. वारंवार सांगूनही अधिकारी दाद देत नसल्याने नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

दर शुक्रवारी वीजपुरवठा खंडित करूनही पहिल्याच पावसात जयभवानीनगरमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. मध्यंतरी आलेल्या जोरदार वादळामुळे जयभवानीनगर व सिडकोची तेराव्या योजनेत मोठमोठी झाडे उन्मळून पडली. यातच वीजेच्या ताराही तुटल्या. त्यामुळे दुरुस्ती करताना बऱ्याच घरातल्या लाइन बदलल्या गेल्या. यानंतर सातत्याने या बदललेल्या लाइनचे फ्यूज जातात. बहुतांश वेळा ही वेळ नळाला पाणी येण्याची असते. मंगळवारी नळाला पाणी आले व काही मिनिटातच वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे महावितरणाच्या कार्यालयात नागरिक सातत्याने संपर्क करत होते, पण कर्मचारी फोन बाजूला ठेऊन मोकळे झाले. वरिष्ठांचे फोन नॉट रिचेबल होते. महावितरणाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिक विशेषतः महिला संतापल्या आहेत. महावितरणाने लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यावर भाईगिरी करणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थ्याचा मोबाइल हिसकावून घेत त्याच्या कुटुंबियाना धमक्या देणाऱ्या गुंडास गुन्हेशाखेने अटक केली. विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे दाद मागितली होती. या आरोपीविरूद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाकरेनगर , एन-२ भागात अमित विजय दीक्षित (वय १९) हा तरूण वृद्ध आई-वडीलांसोबत राहतो. अमितने धूत हॉस्पिटलसमोरील म्हाडा कॉलनीमध्ये फोटोग्राफीचा क्लास लावला होता. त्याचा परिचय शुभम विलास जगताप (रा. संजयनगर) याच्यासोबत झाला होता. शुभम हा नेहमी फोन करून अमितला भेटण्यासाठी बोलावत होता. अमितने नकार दिल्यास त्याला मारण्याची धमकी देण्यात यायची. ५ मे रोजी ‌अमित फोटोग्राफीच्या क्लासला गेला होता. यावेळी त्याला शुभमने अडवून मारहाण करीत मोबाइल हिसकावून घेतला. यानंतर देखील अमितला मारण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. यानंतर काही दिवसांनी शुभम सात ते आठ साथीदारांसोबत अमितच्या घरी आला. अमितच्या कुटुंबियांना मोबाइल देत नाही, काय करायचे करून घ्या, तुमच्या मुलाचे काय हाल करतो बघा, मुकुंदवाडी पोलिस माझ्या ओळखीचे आहेत. अशा धमक्या या टोळक्याने दिल्या. याप्रकरणी २६ मे रोजी अमितच्या कुटुंबियाने पोलिस आयुक्तांकडे याप्रकरणी तक्रार केली. गुन्हेशाखेकडे हे प्रकरण सोपवण्यात आले.

मात्र, ही माहिती मिळताच शुभम पसार झाला होता. सोमवारी मध्यरात्री तो संजयनगर भागात आला असल्याच्या माहितीवरून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरिक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार साईनाथ महाडीक, आरके, ससाणे, रमेश भालेराव यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पठाणच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अॅड. नीलेश घाणेकर बनावट गोळीबार प्रकरणातील आरोपी समीर पठाणच्या पोलिस कोठडीमध्ये कोर्टाने तीन दिवसांची वाढ केली आहे. सोमवारी त्याला पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे कोर्टात हजर करण्यात आले होते.

अॅड. घाणेकर यांच्यावरील गोळीबार प्रकरणात सहभागी असलेला आरोपी समीर पठाण याला १ जून रोजी गुन्हेशाखेने अटक केली होती. घाणेकर यांच्यावर ५ मे रोजी बीड बायपास भागात मुज्जफर व समीरने गोळीबार केला होता. गेल्या मंगळवारी पठाण याला कोर्टात हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार राजू जहागीरदार पसार असून त्याला अटक करणे बाकी आहे. सुपारी घेऊन हा गुन्हा केला आहे का याची चौकशी करणे बाकी आहे, आदी कारणासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. कोर्टाने ही मागणी मान्य करीत पठाणच्या कोठडीत तीन‌ दिवसांची वाढ केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडोखोरांची टोळी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाटमारीच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या टोळीला गुन्हेशाखेच्या पथकाने जेरबंद केले. सोमवारी रात्री दहा वाजता पिसादेवी रोडवर जाधववाडी भागात ही कारवाई करण्यात आली. पकडलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गुन्हेशाखेचे पथक सोमवारी रात्री जाधववाडी भागात गस्त घालत होते. यावेळी पिसादेवी रोडवरील सनी सेंटर जवळील एका घराच्या भिंतीजवळ अंधारात पाच तरूण संशयास्पद स्थितीत आढळून आले. या तरूणांना हटकले असता त्यांनी पलायनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी यापैकी चार जणांना अटक केली तर एकजण पसार होण्यात यशस्वी झाला. पकडलेल्या आरोपींमध्ये जुबेरखान हमीदखान उर्फ जुब्बू (वय २१ रा. नारेगाव), बरकत शहा नशीद शहा (वय २५ रा, शेख सरताज शेख रज्जाक वय २६ रा. दोघे रा. मिसारवाडी), सय्यद सरताज सय्यद सिकंदर (वय २४ रा. मोंढारोड, जाधववाडी) यांचा समावेश असून समीरखान रसूलखान हा पसार आहे. आरोपींच्या ताब्यातून एका कोयता, फायटर, मीरची पूड, दोन मोबाइल व दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. सिडको पोलिस ठाण्यात जमादार रणजितसिंग राजपूत यांच्या तक्रारीवरून दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार नितीन मोरे, देवीदास राठोड, वाल्मीक जगदाळे, दत्तात्रय गडेकर, विलास धनवटे व लाड आदींनी केली.

वाटमारीचा प्लॅन फसला

महिन्याचा पहिला आठवडा असल्याने या भागात राहणाऱ्या अनेक कामगाराचे पगार या कालावधीत होतात. ही बाब हेरून टोळीचा सूतरधार जुबेरखानने हा प्लॅन आखला होता. मात्र, पोलिसांच्या नजरेस ही टोळी आल्याने वाटमारीचा प्लॅन फसला व अनेकांचे पगार वाचले.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांची गंजेट्टी टोळी

या टोळीतील जुबेरखान हा मूळचा जालना येथील रहीवासी आहे. त्याच्यावर कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. बरकतशहा या आरोपीवर सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. तर सय्यद सरताज व शेख सरताज यांच्यावर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हा करण्यापूर्वी ही टोळी गांजाचा नशा करीत होती. पोलिसांनी पकडले तेव्हा पण ही टोळी नशेमध्ये होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यातील सव्वा लाख युवकांना नोकरीची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात सध्या सव्वा लाख युवक नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. यात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेले सव्वा दोन हजार, तर पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण झालेले २५ हजारांहून अधिक तरुण आहेत. महिनाभरात ७१४ जणांनी पुन्हा नव्याने रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोकरी मिळावी म्हणून नोंदणी केली आहे. शेंद्रा, चिकलठाणा, वाळूज आदी औद्योगिक क्षेत्र असतानाही जिल्ह्यातील भूमीपुत्रांना नोकरीसाठी वणवण फिरावे लागते. जागतिकीकरणाचा परिणाम छोट्या उद्योगधंद्यावर होत आहे. त्यात कंत्राटी पद्धतीमुळे कायमस्वरुपी रोजगारांच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. त्यामुळे जागा कमी आणि उमेदवार जास्त असे चित्र अनेक नोकरी भरतीवेळी समोर येते.

आज रोजगार मेळावा

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी यासाठी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या प्लेसमेंट सेल विभागातर्फे बुधवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ परिसरातील सेंट्रल ऑडिटोरियम येथे सकाळी दहापासून या मेळाव्यास सुरुवात होईल. ट्रेनी, वितरण, मार्केटिंग, टिम मेंबर अशा विविध पदाच्या ३२६ जागा या मेळाव्याच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. यात नेसेन्सी इंफो टेक्नो, ज्योतिबा टेक्नॉलॉजी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, इंग्नो आदी नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची निवड करतील.



....यांना हवा रोजगार!

एकूण बेरोजगार - १ लाख २८ हजार ७९५

अभियांत्रिकीच्या पदवीधर - २ हजार १४१

पदव्युत्तर - ११०

वैद्यकीय अभ्यासक्रमधारक - १४०

कला शाखेचे पदवीधर - १५ हजार

विज्ञान शाखेचे पदवीधर - ५ हजार ७८८

वाणिज्य शाखेचे पदवीधर - ३ हजार ३४९

विविध डिप्लोमाधारक - २ हजार १७२

अभियांत्रिकीधारक - २ हजार २९५

डी. एड व अन्य पदविका - ४ हजार ०४६

व्यवस्थापन अभ्यासक्र - ६४०

कायदे पदवीधारक - १२४

www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येते. रोजगार मेळाव्यातून गेल्या वर्षी ८७० जणांना रोजगार मिळाला. रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमअंतर्गत १ हजार ९२५ जणांना लाभ मिळाला.

- वि. रा. रिसे, सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन परवान्यासाठी अपाइंटमेंट घेणे सोपे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कार आणि दुचाकी चालविण्याचा वाहन परवाना काढण्यासाठी निर्धारित केलेल्या अपॉईंटमेंट कोट्यात १०० हून १४० पर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे वाहन चालविण्यासाठी अपॉइंटमेंट घेणे सोपे झाले आहे. आरटीओ कार्यालयात वाहन चालविण्याचा परवाना घेण्यापूर्वी मोटार वाहन निरीक्षकांसमोर ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागते. ही टेस्ट देण्यासाठी 'वाहन' या संकेत स्थळावर अपॉईमेंट घ्यावी लागते. यापूर्वी या संकेतस्थळावर कार आणि मोटार सायकलचा वाहन परवाना तयार करण्यासाठी इच्छुक असलेल्यांना अपॉइंटमेंट मिळत नव्हती.

लोकांच्या या तक्रारीनंतर जेसीबी, ट्रॅक्टर आणि इतर जड वाहनांचा कोटा कमी करून, कार आणि मोटार सायकलचा परवाना वाढविण्याचा प्रस्ताव प्रस्ताव सहायक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सादर केला होता. हा प्रस्ताव आता आरटीओने मान्य केला आहे. त्यामुळे मोटार सायकल आणि कार यांचे लायसन काढण्यासाठीच्या अपॉईंटमेंट कोट्यात १०० हून १४० पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

आरटीओ कार्यालयात येणाऱ्यांची अपाॅइंटमेंट मिळत नाही अशी तक्रार होती. या तक्रारीनंतर कोटा वाढविण्यात आला आहे. यामुळे वाहन चाचणी देण्यासाठी देण्यास इच्छुक असलेल्यांना लवकर अपॉइंटमेंट मिळणार आहे. आरटीओ कार्यालयात आलेल्या लोकांची कामे लवकर व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

- किरण मोरे, सहायक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक कचऱ्यातून इंधन तेलाची निर्मिती

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिकपासून इंधन तेलाच्या (फ्युल ऑइल) निर्मितीचा अत्याधुनिक प्रकल्प नाशिकमध्ये उभारला जात आहे. औरंगाबादेतील प्रसिद्ध उद्योजक आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष राम भोगले यांचा हा प्रकल्प पुढच्या महिन्यात कार्यान्वित होत आहे. 'पायरोलिसिस'चा प्रकल्प राज्यातील आधुनिक प्रकल्प असणार आहे.

प्लास्टिक कचऱ्याप्रमाणे पेट्रोलिअम उत्पादनातही हायड्रोकार्बन असते. प्लास्टिक कचरा रासायनिक प्रक्रिया करून काय करता येईल, यावर जगभर संशोधन सुरू होते. उच्च तापमानावर प्लास्टिकचे विघटन करून त्यापासून फ्युल ऑइल तयार करण्याबाबत संशोधन करण्यात आले. दहा वर्षांपूर्वी जगाला यात यश मिळाले, पण ते व्यावहारिकदृष्ट्या फायदेशीर नव्हते. एक किलो प्लास्टिक कचऱ्यापासून ३० मिली लिटर फ्युल ऑइलची निर्मिती होत होती. पाच वर्षांत संशोधन होऊन हे प्रमाण ७०० मिली लिटरपर्यंत पोचले. वीटभट्ट्या, मोठ्या कंपन्यांमध्ये फ्युल ऑइल वापरले जाते. भोगले यांनी या संशोधनाचा अभ्यास करून गोंदे नाशिक एमआयडीसीत प्रकल्प उभारला आहे. यासाठी मुंबईतील उद्योजक सुहास दीक्षित यांनी बनविलेल्या मशीनरी घेतल्या आहेत. जुलैअखेर उत्पादन सुरू होईल. दररोज सहा टन प्लास्टिक कचऱ्यापासून फ्युल ऑइल तयार करण्यात येईल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑइल निर्मिती करणारा हा देशातील पहिला प्रकल्प असणार आहे.

प्लास्टिकचा फेरवापर एकदा शक्य होतो. पुन्हा त्या प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न असतो. पायरोलिसिसच्या माध्यमातून कचरा निर्मूलन आणि फ्युल ऑइल निर्मिती असा दुहेरी फायदा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'स्वच्छ भारत मिशन'साठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे.

- राम भोगले, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातून २४०० ब्रास वाळू जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील विविध ठिकाणच्या वाळूसाठ्यांवर छापे टाकण्यात येत आहेत. तीन दिवसांत शहरात सुमारे २४०० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. जिल्ह्यात वाळूपट्ट्यांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवली तरी शहरात ठिकठिकाणी वाळूसाठे करण्यात येत आहेत. ही वाळू माफियांमार्फत येते हे स्पष्ट आहे. वाळूमाफियांना आळा घालणे व अवैध वाळू विक्रीला आळा घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी दिले आहेत. त्यांच्या आदेशाने जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. ही पथके २४ तास कार्यरत राहणार असून शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वाळूसाठ्यांवरील कारवाईत सुमारे २४०० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. गुरुवारी ३५०, शुक्रवारी ४५० आणि शनिवारी सुमारे १६०० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या वाळूसाठ्याचा लिलाव करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा, तालुका आणि गावस्तरावरील पथके अवैध वाळूविक्री रोखण्यासाठी कार्यरत राहणार आहेत. भरारी पथकांवर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या पथकांनी केलेल्या कारवाईची तपासणी करण्यासाठी अचानक स्थळांना भेटीही देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज न दिल्याने उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उस्मानपुरा सर्कलमधील साई स्क्वेअर येथील स्टेट बँक ऑफ बिकानेर जयपूरने कर्ज न दिल्याने अनिल गरंडवाल (भारतनगर,औरंगाबाद) या युवकाने आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा मंगळवारी (दि. ९) दुसरा दिवस होता. जोपर्यंत स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर कर्ज मंजूर करत नाही तोपर्यंत आपण उपोषण करत राहू असा इशारा गरंडवाल याने गुरू रविदास क्रांती सेनेमार्फत दिला आहे. संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळाद्वारे फुटवेअर या व्यवसायासाठी कर्जाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या कर्जाची फाईल स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर या बँकेकडे आली, पण बँकेने पाच लाख रूपये मंजूर केले नाही. या संबंधी माझी व माझ्या घराची माहिती घेण्यासाठी बँक अधिकारी माझ्या घरी येऊन गेले. पाहणी करून माझी भेट घेऊनही कर्ज का मंजूर केले जात नाही यासंबंधीही बँकेने काहीच कळवले नाही. मॅनेजर आणि अधिकारी यांच्याशी वारंवार भेट घेऊनही कर्ज का मंजूर होत नाही. याबाबत काहीच न सांगण्यात आल्याने आम्ही उपोषणास बसलो आहोत असे सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कासोटे आणि अनिल गरंडवाल यांनी सांगितले. संबंधित फाईल बँकेने महामंडळाकडे परत पाठवली असल्याचा आरोपही या दोघांनी केला आहे. दरम्यान, याविषयी स्टेट बँक ऑफ बिकानेरचे अधिकारी संतोष उभे यांनी यासंबंधी बँकेचे व्यवस्थापक सध्या बाहेरगावी गेले असून १५ जूनला ते परतल्यानंतर या प्रकरणासंबंधी तेच माहिती देऊ शकतील, असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेने नाला विकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उल्कानगरीच्या श्रीकृष्णनगरातील नालाच महापालिकेने बिल्डरला विकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा प्रकार पाहून खुद्द महापौरही हतबल झाले. आता काय करावे, असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. 'आता आपण काहीच करू शकत नाही,' असे पुटपुटत ते पुढे निघून गेले. अधिकारी मात्र हा प्रकार निमूट पहात होते.

महापौर त्र्यंबक तुपे यांनी नाल्यांची आणि नाल्यांवरच्या अतिक्रमणांची पाहणी करण्यासाठी मंगळवारी सकाळी दौरा सुरू केला. त्यांच्या बरोबर महापालिकेचे कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी, हेमंत कोल्हे, समीर जोशी उपस्थित होते. नाल्यांवरील अतिक्रमणांची पाहणी करत ते श्रीकृष्णनगरात आले. या ठिकाणी त्यांना विचित्र प्रकार पाहण्यास मिळाला. तीस ते चाळीस फूट रुंदीच्या नाल्यावर बिल्डरने स्लॅब टाकून, त्या स्लॅबवर अपार्टमेंटचे बांधकाम सुरू केल्याचे निदर्शनास आले. अशाच प्रकारची बांधकामे नाल्याच्या अन्य भागातही झाल्याचे दिसून आली. बिल्डरने नाल्यावर टाकलेल्या स्लॅबचा दर्जाही संशयाच्या भोवऱ्यात सापडावा असाच आहे. त्यावर बांधण्यात येणाऱ्या इमारतींचे आयुष्य कसे आणि किती असेल, असा प्रश्नही यावेळी महापौरांच्या समोर निर्माण झाला. त्यांनी या बाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली, पण अधिकारीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. महापालिकेच्या नगररचना विभागानेच बांधकामाची परवानगी दिली. त्यामुळे बांधकाम केले जात आहे, असे महापौरांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या प्रकारामुळे महापौर हतबल झाले. 'आता आपण काहीच करू शकत नाही,' असे पुटपुटत ते पुढे निघून गेले. बांधकाम परवानगींची माहिती मात्र त्यांनी मागवली. शिवशंकर कॉलनी भागात वारंवार ड्रेनेजलाइन चोकअप होण्याची समस्या होती. त्यामुळे त्र्यंबक तुपे यांनी या भागालाही भेट दिली. नागरिकांशी चर्चा केल्यावर त्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ बोलावले व चोकअप काढण्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ड्रेनेजचे पाइप उखडून चोकअप काढण्याचे काम सुरू करण्यात आले. पाइपमध्ये वाळू, माती आणि रिकाम्या बाटल्या आढळल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेगाब्लॉकमुळे चौक कोंडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जालना रस्त्याला पर्यायी रस्ते नसल्याचा फटका आज औरंगाबादकरांनी अनुभवला. मोंढा नाका चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या बाजूने असलेल्या सर्व्हिस रोडवर डांबरीकरण करण्यासाठी मंगळवारी मेगाब्लॉक करण्यात आला. त्यासाठी सिंचन भवन ते अमरप्रीत चौक हा रस्ता सकाळपासून बंद ठेवण्यात आला. त्यामुळे जवाहर कॉलनी, विश्वभारती कॉलनी, सावरकर चौक, उस्मानपुरा चौकात दिवसभर ट्रॅफिक जॅम होते. मोठ्या वाहनांनी रस्ते अडवून ठेवल्याने गल्ली-बोळातून जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली होती. काही ठिकाणी वादावादीचेही प्रकार घडले.

रस्ते विकास महामंडळाकडून मोंढा नाका रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. पूर्व-पश्चिम उभारण्यात येणाऱ्या पुलालगत वाहनांसाठी पर्यायी रस्ता ठेवण्यात आला, पण रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब, अतिक्रमण यामुळे गेले वर्षभर वाहतूक कोंडीचा सामना औरंगाबादकरांना करावा लागत आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी १५ दिवसांपूर्वी याचा आढावा घेतला. उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याआधी दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचे डांबरीकरण करावे, अशी सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार मंगळवारी २०० मीटरच्या रस्त्यावर पॅचवर्क करण्याचे काम सुरू झाले. सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे रस्ता ओला होता. ओल्या रस्त्यावर डांबरीकरण करता येत नाही. त्यामुळे दुपारपर्यंत काम सुरूच झाले नव्हते. पोलिसांनी मात्र सकाळपासूनच आकाशवाणी चौकातून मोंढ्याकडे येणारा रस्ता बंद केला होता. त्यामुळे सकाळी नऊपासून जवाहर कॉलनी चौकाकडून वाहनांची गर्दी वाढली. जवाहर कॉलनी ते विश्वभारती कॉलनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम झाली. सरकारी कार्यालये, वाळूज एमआयडीसीकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. काहींनी खबरदारी घेण्यासाठी सेव्हन हिल्स चौकातून गजानन महाराज मंदिर चौक; तसेच जवाहरनगर पोलिस स्टेशन चौकातून मार्ग शोधला, पण ही सर्व वाहने सावरकर चौकात येताच तेथे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम झाला. अमरप्रीतकडून येणाऱ्या वाहनांचीही गर्दी वाढली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास सावरकर चौकात हजारो वाहने अडकली होती. याठिकाणी वादावादीच्या घटना घडल्या. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी केवळ दोन पोलिस चौकात तैनात करण्यात आले होते.

काल दहावीचा निकाल जाहीर झाला. कॉलेजात प्रवेशासाठी अनेक विद्यार्थी पालकांबरोबर निघाले होते. तेही या वाहतूक कोंडीत अडकले. आकाशवाणी चौकातून मित्रनगर, बालाजीनगर, शिवशंकर कॉलनीतून दुचाकीधारकांनी मार्ग शोधला होता. त्यात सहा आसनी रिक्षांनी रस्ते अडविल्याने गल्ली-बोळातही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

आजही मेगाब्लॉक

उड्डाणपुलाच्या उत्तरेकडील सर्व्हिस रोडचे डांबरीकरण बुधवारी करण्यात येणार आहे. २०० मीटरच्या पॅचवर्कसाठी अमरप्रीत चौक ते आकाशवाणी चौक हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. पर्यायी रस्ता नसल्याने बुधवारी क्रांतिचौकापासूनच मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम होण्याची शक्यता आहे. कैलास नगर रस्त्यावरही वाहनांची गर्दी वाढणार आहे.

...तर फायदा शून्य

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोंदीनुसार उड्डाणपुलाच्या बाजुचा सर्व्हिस रोड सात मीटरचा आहे. मंगळवारी झालेल्या डांबरीकरणात एवढ्या रुंदीचे काम झाले, पण काही ठिकाणी विजेचे खांब अजूनही रस्त्यात आहेत. शिवाय वाहने थेट रस्त्यावर लावली जातात. वाहतूक पोलिसांनी यापुढे रस्त्यावर पार्किंग होऊ नये, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा वाहतूक कोंडी कायम राहणार आहे. मंगळवारी मेगाब्लॉकमुळे उत्तरेकडील रस्त्याचा नियम तोडून वापर करण्यात आला. अरूंद रस्त्यावरून दुतर्फा वाहतूक पोलिसांच्या समोर सुरू होती. मात्र एकाही वाहनावर कारवाई करण्यात आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समांतर’ला हायकोर्टात आव्हान

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहराच्या समांतर जलवाहिनीच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आणखी एक जनहित याचिका करण्यात आली आहे. समांतरबरोबरचा करार रद्द करण्याची मागणी जलाधिकार कृती समितीचे विजय शिरसाट व सचिन भोजने यांनी याचिकेद्वारे केली आहे. महापालिकेने समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदाराबरोबर केलेला करार रद्द करावा, या प्रकल्पाचे खासगीकरण रद्द करावे, पालिकेने स्वतःची कंपनी स्थापन करून नागपूरप्रमाणे पाणी पुरवठा करावा, राज्य शासनाने पी पी पी ला दिलेली मंजूरी रद्द करावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

सध्या ही योजना १२०० कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. औरंगाबाद पालिकेने समांतर जलवाहिनीचे खासगीकरण करण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची मंजुरी घेण्यासाठी केलेली प्रक्रिया पूर्णतः बेकायदा आहे. केंद्र सरकारने या योजनेला मंजुरी दिली नाही, असेही याचिकेत म्हटले आहे. शासन निर्णयातील सवलत कराराप्रमाणे महापालिकेला खासगी कंपनीकडून भाडे मिळणे अपेक्षित आहे. या करारात मात्र महापालिकाच कंपनीला दरवर्षी ६३ कोटी रुपये ६ टक्के वाढीव याप्रमाणे २० वर्षांपर्यंत देणार आहे. ही बाब शासन निर्णयास विसंगत आहे, असे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेत औरंगाबाद पालिकेला उत्तर देण्यास एक आठवड्याची मुदत देण्यात यावी, अशी विनंती पालिकेचे वकील नंदकुमार खंदारे यांनी केली त्यास न्या. रवींद्र बोर्डे व न्या. पी. आर. बोरा यांनी मंजुरी दिली. केंद्र सरकारलाही उत्तर देण्याची अवधी देण्यात आली आहे.

याचिकाकर्त्याची बाजू प्रदीप देशमुख हे मांडत आहेत. या याचिकेची पुढील सुनावणी एक आठवड्यानंतर होणार आहे. येथ‌ील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी याआधी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ श्यामची आई’ लवकरच नाट्यस्वरुपात

$
0
0

विजय कमळे, जालना

आईच्या मातृत्वाची 'न भूतो न भविष्य' अशी अनूभूती करून देणाऱ्या साने गुरूजी यांच्या 'श्यामची आई' या पुस्तकाने मोठी लोकप्रियता मिळवली. हीच 'श्यामची आई' आता लवकरच नाट्यस्वरूपात उपलब्ध होणार असून त्यासाठी परतूर तालुक्यातील सातोना (ब्रु.) येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी प्रयत्नशील असल्याची माहिती दत्तात्रय हेलसकर यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. हेलसकर यांनी १५ नोव्हेंबर १९९४ रोजी मराठवाडयात सर्वप्रथम साने गुरूजी कथामालेची मुहूर्तमेढ रोहली होती. हेलस (ता. मंठा) येथे २० वर्षांपूर्वी लावलेल्या एका छोटयाशा रोपटयाचे आज एका विशाल वटवृक्षात रुपांतर झाले आहे. साने गुरूजी कथामालेच्या माध्यमातून साने गुरूजी यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. साने गुरूजी यांनी १९३६ साली 'श्यामची आई' या पुस्तकाच्या माध्यमातून आईचे मातृत्व व वात्सल्य जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या आवृत्तीपासूनच 'श्यामची आई' या पुस्तकाला वाचकांनी अक्षरक्षः डोक्यावर

घेतले होते.

तब्बल ७५ वर्षांचा प्रदीर्घ कालखंड लोटून देखील आज पण या पुस्तकाची लोकप्रियता कायम आहे. आजपर्यंत या पुस्तकाच्या तब्बल ८० आवृत्या प्रकाशित करण्यात आल्या. १९९६ नंतर तर मालकी हक्क मुक्त झाल्यानंतर तर असंख्य प्रकाशक 'श्यामची आई'चे पुर्नप्रकाशन करीत आहे. एवढे असून देखील 'श्यामची आई'ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पुस्तकांचा आधार घेत 'श्यामची आई'वर आधारित अनेक गीत, चित्रपट, कथा व इतर साहित्य निर्माण करण्यात आले आहे. परंतु, आजपर्यंत याचे नाटय रुपांतर न झाल्याची खंत हेलसकर यांच्या मनात सदैव होती.

संस्कार कथांचा जागर या उपक्रमाअंतर्गत त्यांनी मराठवाडयातील ३४७ शाळांमधील १९ हजार विदयार्थ्यांना घेऊन शालेय परिपाठात 'श्यामची आई' या कथेचे वाचन केले. यातूनच प्रेरणा घेत सातोना येथील जिल्हा परिषद शाळेच्या विदयार्थ्यांनी 'श्यामची आई' नाटयस्वरुपात आण्ण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सातवी इयत्तेत शिकणाऱ्या कु. मंदाकिनी बिडवे, कु. सुषमा घेंबड, कु. राधा टोणपे व कु. शीतल कुलथे या चार विद्यार्थीनींने दत्तात्रय हेलसकर यांच्या मार्गदर्शनाखाली या पुस्तकातील ४२ संस्कार कथांना नाट्यप्रसंगात रुपांतर करण्याचे कार्य अंतिम टप्प्यात आले आहे. देशभरात शालेय स्नेह संमेलनात 'श्यामची आई'च्या नाटयरुपांतरांचा समावेश होऊन त्याचा प्रचार व प्रसार व्हावा, असे यामागील उद्देश आहे.


हेलस शाखेच्यावतीने विविध संस्कारपूरक उपक्रमांबरोबरच मराठवाडास्तरावर गेल्या अठरा वर्षांपासून' विभागीय सामान्यज्ञान स्पर्धा' आयोजनात पुढाकार असतो. शिवाय विविध समविचारी संस्थांच्या सहकार्याने' साने गुरुजी पुरस्कार', 'बालचित्रपट महोत्सव', कथाकथन, या माध्यमांतून कथामालेचे कार्य सुरु आहे.

- दत्तात्रय हेलसकर, संस्थापक , साने गुरूजी कथामाला, हेलस

'श्यामची आई' ही कथा पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला परिचित होती. शालेय परिपाठात दररोज याचे वाचन होत असल्याने त्याबद्दलची उत्सकुता अधिकच वाढत गेली. दत्तात्रय हेलसकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'श्यामची आई' नाट्यस्वरूपात साकारण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा नाट्यस्वरूप सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी ठरणार आहे.

- मंदाकिनी बिडवे, विद्यार्थिनी, सातोना (ब्रु.), ता. परतूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल शॉपी चोरट्याने फोडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

अंबड शहरातील मोबाइल शॉपी फोडून चोरट्यांनी २६ मोबाइल आणि १२०० रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. शहरातील बीड मार्गावरील मशिदीसमोर दीपक पाटनी यांच्या मालकीची मोबाइल शॉपी आहे. मंगळवारी रात्री उशिरा अनोळखी चोरट्यांनी शटरचा कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. यावेळी चोरट्याने विविध कंपनीचे २६ मोबाइल व त्यासोबत १२०० रूपये रोख चोरून पोबरा केला. हा प्रकरा पाटनी यांनी बुधवारी सकाळी दुकान उघडण्यास गेल्यानंतर लक्षात आला. याप्रकरणी दीपक पाटणी यांनी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार जहागिरदार हे करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

युवकाचा निर्घृण खून; ६ जणांविरूद्ध गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

देशी दारुची विक्री व वेश्या व्यवसाय बंद केला नाही, या कारणाचा राग मनात धरून भोकर तालुक्यातील देवठाणा येथील एका तरुणाचा सहा जणांनी निर्घृणरित्या खून केला. या प्रकरणी भोकर पोलिस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूर्यकांत नागोराव सोनूले असे मृत तरुणाचे नाव आहे. २४ मे ते २५ मे दरम्यान देवठाणा येथील शेत गट क्रमांक १७ बी येथे देशी दारुची विक्री व वेश्या व्यवसाय बंद केला नसल्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून सूर्यकांत याचा घरी जाऊन निर्घृणरित्या खून केला. गौतम सोनबा वाघमारे, सुबाबाई सोनबा वाघमारे, रेखाबाई गौतम वाघमारे, साहेबराव गजराम चिंचोळकर, मिलींद नागोराव जंगमे, नागोराव विठ्ठल जंगमे या सहा जणांनी मिळून सूर्यकांतचा खून केला.

या प्रकरणी भीमराव शंकर सोनुळे यांनी या भोकर पोलिस ठाण्यात लेखी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा सहाजणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक आरदवाड पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

भरधाव जाणाऱ्या जीपने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात पिंपळगाव येथील मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. सूर्यकांत सुभाष दाशतवार असे मरण पावलेल्याचे नाव आहे. सूर्यकांत हा त्याच्या मोटारसायकलवरून (क्रमांक एम. एच. २६ जे ५३४७) जात होता. त्याच वेळी एक जीप (क्रमांक एम. एच. २६ एन-२९२३) जात होती. जीपची धडक मोटारसायकलला बसली. त्यात सूर्यकांता हा गंभीर जखमी झाला आणि मृत्युमुखी पडला.

अट्टल आरोपीला जालन्यात अटक

म. टा. प्रतिनिधी, जालना

जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील एका अट्टल आरोपी गेल्या बऱ्याच दिवसांपासून फरार होता. या फरारी आरोपीला सदर बाजार पोलिसांनी जालना शहरातील रामनगर परिसरात बुधवारी जेरबंद केले.

श्रीकांत ताडेपकर (रा. कानडी वस्ती, रामनगर) असे या आरोपीचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या ताडेपकर यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, लुटमारसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. गेल्या अनेक दिवसांपासून तो पोलिसांना हवा होता. दरम्यान, हा वाँटेड असलेला आरोपी रामनगर परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती सदर बाजार पोलिस ठाण्यातील डीबी पथकाचे जमादार अरविंद झावरे-पाटील यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनखाली डीबी पथकाया पोलिसांनी अरविंद झावरे-पाटिल, संजय गवळी, नंदू खंदारे, चेके, गायकवाड, झोटे यांच्या पथकाने सापळा रचून श्रीकांत ताडपेकर याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीप्रश्नी रस्त्यावर उतरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी आणि पुढील हंगामासाठी पुरेशी मोफत बि-बियाणे व खते देण्याची घोषणा केली नाही. त्यामुळे विधिमंडळाचे पुढील अधिवेशन चालू देणार नाही, काँग्रेसप्रसंगी रस्त्यावरही उतरेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे एका पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. खासदार चव्हाण म्हणाले, 'भाजपच्या फडणवीस सरकारसारखे असंवेदनशील सरकार महाराष्ट्राने कधीही पाहिले नाही. कर्जापोटी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वेगाने वाढते आहे. शासकीय मदत न मिळाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे शेतकरी लिहून ठेऊ लागले आहेत. या पश्चातही राज्य सरकार त्यांना कर्जमाफी द्यायला तयार नाही. वेगवेगळ्या सबबी सांगून कर्जमाफीसाठी टाळाटाळ सुरू आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत असल्याचे काँग्रेस पक्षाने वारंवार सरकारच्या निदर्शनास आणून दिले; परंतु, शेतकऱ्यांप्रती सरकारची आस्थाच संपली असून शेतकरी जगला काय किंवा संपला काय, याच्याशी फडणवीस सरकारला काहीही घेणे-देणे नसल्याचे त्यांच्या भूमिकेतून दिसून येते.'

एलबीटी फक्त महानगरपालिका क्षेत्रांमध्ये म्हणजे शहरी भागांत लागू होता. त्यामुळे एलबीटी रद्द केल्यानंतर होणारी महसुली तूट भरून काढण्यासाठी पर्यायी उपाययोजना केवळ शहरी भागांतच लागू करायला हवी. महानगरपालिकांना नुकसानभरपाई देण्यासाठी ग्रामीण जनतेवर व्हॅटचा अधिभार कशाला? असा प्रश्नही खासदार चव्हाण यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृगाच्या पावसाची दमदार हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता वाढलेली असताना बीड जिल्ह्यातील काही भागात बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. मृगाचा पाऊस पडल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या पावसादरम्यान केज तालुक्यात वीज पडल्याने एक जण मृत्युमुखी तर चार जखमी झाले आहेत.

बीड जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशीरा आणि बुधवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला. मंगळवारी रात्री बीड शहरासह म्हालसजवळा, वडवणी, गेवराई, शिरूर तालुक्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळपासून पावसाची शक्यता निर्माण झाली होती. दुपारी साडेतीन चारच्या सुमारास मृगाच्या सरी उतरल्या. यावेळी सर्वत्र दमदार पाऊस झाला. बीड तालूक्यातील नेकनूर, मांजरसुंबा, चौसाळा, खडकी परिसरात तासभर पाऊस पडला. केज तालुक्याला या पावसाने झोडपले. त्यामुळे हलक्या रानात पाणी साठले होते.

केज तालुक्यातील येवता येथे विहिरीचे काम सुरु होते. दरम्यान, पाऊस सुरू झाल्याने विहरीवर काम करत असलेले कामगार पावसापासून बचाव करण्यासाठी जवळ असलेल्या शेतातील पत्र्याच्या कोठ्यात बसले होते. या कोठ्यावर वीज पडली. त्यामध्ये सुनील विष्णू गवळी (वय २०) याचा मृत्यू झाला. सुग्रीव कुंडलीक सोनवणे (वय २२), सुखदेव नामदेव गवळी (वय २२), अशोक अरुण गवळी (वय २०), विनोद महादेव गवळी (वय २०) हे चार जण जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच केजच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी तात्काळ केज येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

पेरणीची घाई करू नका

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस होत असला तरी हा पाऊस पेरणी योग्य नाही. पेरण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. चांगली ओल असल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images