Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भाडेकरूंमुळे एसटीला १० कोटींचा फटका!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील प्रत्येक बसस्थानकावर विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी एसटीने भाडेतत्वावर जागा दिली आहे. मात्र, या विक्रेत्यांनी निर्धारित जागेपेक्षा जास्त जागेचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला १० कोटींचा फटका बसला आहे. शिवाय लाखोंची थकबाकी या भाडेकरूंकडे आहे.

विभागातील बसस्थानकावर ज्यूस विक्रेता, कॅन्टीनचालक, रसवंती, पानटपरीवाल्यांनी व्यवसाय करण्यासाठी भाडेतत्त्वार जागा घेतली. मात्र, अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी जास्त जागेचा वापर करणे सुरू केले आहे. लातूर येथील बसस्थानकात एका दुचाकी पार्किंगवाल्याला सहा वर्षापूर्वी ४०० स्क्वेअर फुटाची जागा भाड्याने देण्यात आली. प्रत्यक्षात या पार्किंग व्यवसायिकाने १,५०० स्क्ेवर फुटाच्या जागेचा वापर सुरू केला. या प्रकरणी सुरक्षा व दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. जागेचा अतिरिक्त वापर केल्याप्रकरणी संबधिताला १० लाखांचा दंड ठोठावला. या प्रकरानंतर राज्यातील सर्व बसस्थानकात व्यावसायिक वापरासाठी देण्यात आलेल्या जागेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाने दिले आहेत.

औरंगाबाद विभागातील विविध बस स्थानकामधील जवळपास १५ हजार स्केवर फूट जागेचा फुकटात वापर सुरू आहे. यामुळे २ कोटी ५१ लाख रुपयांचा भुर्दंड महामंडळाला बसला आहे. यात पन्नास लाखांहून अधिक भाडे भाडेकरूंकडे थकले आहे. यातील अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याची माहिती एसटी विभागाच्या सूत्रांनी दिली.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

एसटीचे कर्मचारी, अधिकारी, सहप्रादेशिक व्यवस्थापकांना प्रत्येक महिन्याला किंवा तीन महिन्याला या बसस्थानकातील आस्थापनांची प्रत्यक्ष भट देऊन चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही तपासणी केलीच नाही.

लातूर विभागात पार्किंगच्या अतिरिक्त जागा वापराबाबतचा प्रकार समोर आला. त्यानंतर वाणिज्यिक वापरासाठी दिलेल्या जागेची आम्ही संपूर्ण बस स्थानकात चौकशी सुरू केली आहे. चौकशी करणे सुरू आहे. अहवालही तयार केला जात आहे. यामुळे याबाबत आता कोणतीही माहिती देता येणार नाही.

- भगवान घुगे, वरिष्ठ सुरक्षा दक्षता अधिकारी, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जांभळं बाजारात; १६० रुपये किलोंचा भाव !

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

उन्हाळा संपतासंपता आणि पावसाचे आगमन होण्याच्या मधल्या काळात जांभळांचं उत्तम पीक येते. औरंगाबाद शहरातही आता जांभळाच्या गाड्या तुरळक प्रमाणावर दिसू लागल्या आहेत. जांभूळ शहरात १२० ते १६० रुपये किलो या दराने विकले जात आहेत. बाजारात बासमती तांदळाचा भाव ११० ते १२० रुपये किलो आहे तर डाळींचेही दर सुमारे ९० रुपये ते ११० रुपये किलो आहेत. त्या तुलनेत जांभळं त्यांच्यापेक्षाही महाग विकली जात आहेत आणि विशेष म्हणजे १६० रुपये किलो दरानेही नागरिक जांभळांचा आस्वाद घेत आहेत.

सध्या रानमेव्याला सुगीचे दिवस आले आहेत. पर्यटक आणि सुटीच्या दिवसात गावाकडे वळलेले चाकरमानी जांभूळ या रानमेव्याची चव चाखत आहेत. जांभळाच्या हंगामी पिकाची औरंगाबाद जिल्हा, चाळीसगाव, जळगाव व नाशिकहून आवक होऊ लागली आहे. सध्या जांभळाला मिळणारा भावही विक्रेत्यांसाठी समाधानकारक असल्याने यावर्षी जांभूळ उत्पादक, मजूर व विक्रेते खूष आहेत.

दरवर्षी जांभळाला ७० ते ८० रुपये किलो दर मिळत होता; यावर्षी मात्र हा दर १२० ते १६० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. बाजारात जांभळाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे वाढलेल्या नफ्यामुळे उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत. काळ्याभोर, टपोऱ्या तसेच रसरशीत जांभळांनी बाजारात आंब्यापाठोपाठ चढा दर घेतला आहे, असे फळविक्रेते जर्नादन जाधव यांनी सांगितले. सध्या २० किलोच्या कॅरेटला सुमारे २ हजार ते २ हजार २२५ रुपयांचा भाव होलसेलमध्ये मिळत असून कृषी उत्पन्न बाजार समितीतही आता जांभळं अधिकप्रमाणात येऊ लागली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा जावयांना मिळणार धोंडा

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

अधिकमास म्हटला की जावयाला वाण देण्याची प्रथा नजरेसमोर येते. याला 'धोंडा' असेही म्हणतात. त्यामुळे १७ जूनपासून जावईबापूंसाठी सुगीचा महिना येणार आहे. विशेषतः नवविवाहित तरुणांसाठी सासरवाडीहून भेटवस्तूंची अधिक रेलचेल होणार आहे.

या अधिकमासाच्या महत्वामुळे वाणाचा बाजारही सजला आहे. अनारशांऐवजी बत्तासे, म्हैसूरपाक, वगैरे जाळीदार पदार्थ सध्या बाजारात विकण्यास आले आहेत. ३३ वस्तूंचे हे पाकिट सुमारे ५० ते जास्तीत जास्त ३५० रूपयापर्यंत मिळत आहे. दिवे १० ते २५ रूपये नग, कपडे, व इतर सामान यासाठीही बाजारपेठ सजली आहे. चैत्र, ज्येष्ठ श्रावण हे १२ वर्षांनी, आषाढ १८ वर्षांनी, भाद्रपद २४ वर्षांनी, आश्विन १४१ वर्षांनी कार्तिक ७०० वर्षांनी अधिकमास होतो. भाद्रपदापर्यंतच्या मासांना अधिकमास म्हणतात. आश्विन कार्तिक अधिक झाले, तरी त्यास तसे म्हणत नाहीत. ज्यावर्षी आश्विन अधिक होतो, त्यावर्षी पौष क्षयमास होतो. अशावेळी दोन प्रहरांपर्यंत मार्गशीर्ष दोन प्रहरांनंतर पौष मानून दोन्ही मासांची धर्मकृत्ये एकाच महिन्यात करतात. या जोड मासाला संसर्प असे म्हणतात.

या महिन्यातील देव पुरुषोत्तम म्हणजे विष्णू मानले असून त्यांच्या कृपेसाठी पुढील विधी करण्यास सांगितले आहेत. पापक्षालनासाठी मलमास व्रत, प्रत्येक दिवशी अनारसे आदी पक्वान्ने ३३ या संख्येने कांस्यपात्रात भरून पात्रासह द्यायचे असते. महाराष्ट्रात अधिकमासात अनरशांचे वाण बहुधा जावयाला देतात. कन्या जावायास लक्ष्मी-नारायणस्वरूप मानले आहे. त्यातून ही पद्धत आली असावी. त्यात जावईबापूंना कपडे, दागिने, भांडी स्वरुपात वस्तू भेट दिल्या जातात. पंचपक्वान्न गोड-धोडच्या जेवणावळी होतात. जी कर्मे अन्यवेळी करणे शक्य असेल, ती अधिकमासात वर्ज्य सांगितली आहेत, पुरोहित अनंत पांडव यांनी सांगितले.

अधिक मास म्हणजे काय?

१७ तारखेपासून अधिक मास सुरू होत आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते, परंतु इंग्रजी व भारतीय सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात आणि हा ११ दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी (अचूकपणे सांगावयाचे झाल्यास ३२ महिने १६ दिवसांनी) एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे. दर महिन्याला सूर्य एका राशीतून संक्रमण करतो, परंतु या अधिक तेराव्या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते म्हणून याला 'मलमास' असे सुद्धा म्हणतात, असे पांडव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘औरंगाबादमार्गे मुंबई रेल्वे वाढवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद मार्गे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे औरंगाबाद-मुंबई मार्गावर नवीन रेल्वेगाड्या सुरू करा, अशी मागणी रेल्वे ग्राहक समितीच्या सदस्यांनी केली. नांदेड विभागातील रेल्वे ग्राहक समितीची १३ वी बैठक सोमवारी (१५ जून) नांदेड येथे घेण्यात आली. या बैठकीत रेल्वे समितीच्या १८ पैकी १३ सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी अकोला, हिंगोली, वाशीमसह औरंगाबादहून भावेश पटेल, नंदकुमार घोडेले, परभणीहून एस.अयुब कादर, पुर्णाहून सुधाकर खराटे यांच्यासह नांदेडहून शंतनू एस. डोईफोडे आदी उपस्थित होते. रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पी.सी. शर्मा, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक सी.एम. गुप्ता यांच्यासह नेहा रत्नाकर, राजकुमार वानखेडे आणि अन्य रेल्वे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नांदेड-बिकानेर नवीन गाडी औरंगाबाद मार्गे सुरू करावी, नांदेड मुंबई नवीन रेल्वे सुरू करावी, पुणे गाडीच्या फेऱ्या वाढवा, अकोला-पूर्णा गाडी नांदेडपर्यंत वाढवा, स्थानकावरील स्वच्छतेत सुधारणा करा आदी मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोठ्यावर भिंत पडून ४ जनावरे जखमी

$
0
0

औरंगाबादः भडकलगेट भागातील न्यू नूर कॉलनीतील गोठ्यावर ‌भिंत कोसळल्याने चार म्हशी जखमी झाल्या. सोमवारी सायंकाळी पाच वाजता ही दुर्घटना घडली. सोमवारी दुपारापासून दमदार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे भडकलगेट भागातील आयटीआयची सरंक्षक भिंत सुज्जू भाई यांच्या गोठ्यावर कोसळली. यावेळी गोठ्यातील चार म्हशी आतमध्ये दबल्या. तसेच तेथे उभ्या असलेल्या एका रिक्षाचेही नुकसान झाले. नागरिकांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात हा प्रकार कळवला. पोलिसांच्या मदतीने जखमी म्हशींना बाहेर काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा-देवळाईप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारने औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत सातारा-देवळाई परिसराचा समावेश करण्याची अधिसूचना १४ मे रोजी जारी केली. या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. या प्रकरणी मंगळवारी दाखलपूर्व सुनावणी होणार आहे. सातारा भागातील रहिवासी राजेंद्र फकीरराव कानडे यांनी ही याचिका केली आहे. या याचिकेत नगरविकास सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तत्कालीन प्रशासक विजय राऊत यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

सातारा-देवळाईसाठी २८ ऑगस्ट २०१४ रोजी स्वतंत्र नगर पालिका स्थापन करण्यात आली होती. या नगरपालिकेची निवडणूक होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारीही सुरू केली होती, असे असताना सातारा-देवळाईचा संपूर्ण परिसर महापालिकेच्या हद्दीत घेण्याची रणनीती फेब्रुवारीत आखण्यात आली. मात्र, त्यावेळेस काढण्यात आलेली अधिसूचना औरंगाबाद खंडपीठात मागे घेण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली होती. १४ मे रोजी राज्य शासनाने पुन्हा नव्याने अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेला आव्हान देण्यात आले आहे. ही अधिसूचना रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे सिद्धेश्वर ठोंबरे हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्त पदांची माहिती द्या

$
0
0

रवींद्र टाकसाळ, औरंगाबाद

खासगी क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिकांना मनुष्यबळाचा तपशील आणि रिक्त पदांची माहिती देणे सक्तीचे केले आहे. या आदेशाचे पालन झाले नाही तर उद्योजकांवर कारवाई करू, असा इशारा जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

बेरोजगारीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात सध्या सव्वा लाख तरुण बेरोजगार आहेत. यात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेले सव्वा दोन हजार, तर पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण झालेले २५ हजारांहून अधिक युवक आहेत. या तरुणांना आश्वासित, पारदर्शक रोजगार, स्वयंरोजगारांची सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्राकडून होत आहे. त्याचाच भाग म्हणून सेवायोजन कार्यालये (रिक्त पदांची सूचना देणे सक्तीचे) अधिनियम १९५९ या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केंद्राने सुरू केली आहे.

या कायद्यानव्ये २५ किंवा त्या पेक्षा जास्त कामगार असलेले खासगी क्षेत्रातील उद्योग, आस्थापना यांना केंद्राकडे नोंदणी करणे, मनुष्यबळाचा तपशील तिमाही देणे, रिक्त पदांची माहिती देणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. त्यासाठी खास www.maharojgar.gov.in या संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. शासकीय - निमशासकीय तसेच राज्यातील खासगी क्षेत्रातील उपलब्ध रिक्त जागांची माहिती, नोकरी भरती जाहिराती पाहण्याची, अर्ज करण्याची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नोकरी उत्सुक उमेदवारांना फायदा होत आहे. उद्योजकांना रिक्तपदांची जाहिरात ऑनलाइन करतानाच आवश्यक ते मनुष्यबळ शोधणे शक्य होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एक हजारांहून अधिक नोंदणी

आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ५४ उद्योग, आस्थापनांनी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्राकडे नोंदणी केली आहे. यात बजाज कंपनीसह मोठ्या उद्योग, व्यावसायिकांचा समावेश आहे. तर ६३७ शासकीय-निमशासकीय कार्यालय प्रशासनातर्फे नोंदणी करण्यात आलेली आहे.

उमेदवारांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढविणे, उद्योजकांना रोजगार व स्वयंरोजगार विभागांतर्गत उमेदवार घेण्यासाठी उद्युक्त करणे व त्याद्वारे युवकांचा सामाजिकस्तर वाढविण्याचा आमचा उद्देश आहे. नोंदणी न करणाऱ्या, रिक्त पदांची माहिती न देणाऱ्यांवर कायद्यानव्ये कडक कारवाई केली जाणार आहे.

- विजय रिसे; सहाय्यक संचालक, जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेकडून ‘समांतर’ची पाठराखण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराचा विस्कळित झालेला पाणीपुरवठा आणि समांतर जलवाहिनी प्रकल्पाविरोधात निर्माण झालेल्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन 'समांतर'ची पाठराखण केली. कंपनी आणि महापालिका यांच्यात समन्वय नसल्यामुळे या योजनेची बदनामी होत आहे. आपापसात समन्वय ठेवा आणि जनतेशी सुसंवाद राखा, असे शिवसेनेने आयुक्तांना बजावले आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त प्रकाश महाजन यांची भेट घेतली. यावेळी महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख राजू वैद्य, संतोष जेजुरकर, बाळासाहेब थोरात, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, सुनिता आऊलवार, माधुरी जोशी आदी उपस्थित होते.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात शिवसेनेने म्हटले आहे की, 'शहरातील जनतेस सुरळित पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने होऊ घातलेली समांतर पाणीपुरवठा योजना अतिशय अभिमानास्पद आहे. मात्र, समांतरचे कंत्राटदार आणि महापालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे या योजनेची बदनामी केली जात आहे. ही बाब शहराच्या विकासाच्या दृष्टिने धोकादायक आहे. काही पक्ष एकीकडे सदर योजना मंजूर करताना आघाडीवर होते, तर आता ते या योजनेवर टिकाटिप्पणी करीत आहेत. काही पक्ष तर योजना समजून न घेताच ती बंद करा, अशी भूमिका घेत आहेत. शिवसेना या दोन्हीही प्रवृत्तींच्या विरोधात आहे. अशा प्रकारची योजना शहरासाठी आवश्यकच आहे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. असे असले तरी काही बाबी प्रशासन आणि योजनेचे कंत्राटदार यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत पाणी असूनही पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. पाणीपुरवठा प्रभावीपणे होण्यासाठी फारोळा आणि पैठण येथील पंपस्टेशनची यंत्रणा अत्याधुनिक करण्याची गरज आहे. पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल झाल्यास तो जनतेस कळवणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा झाला नाही तर त्या ऐवजी टँकर अथवा तत्सम व्यवस्था करणे गरजेचे आहे. जनतेशी विसंवादाचे प्रकार घडत असताना, जनतेशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न पाणीपुरवठा यंत्रणेने करणे आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे.'

जैस्वाल यांचा इशारा

'पाणीपुरवठ्याच्या संदर्भात कंपनीचे काहीच नियोजन नाही. पाणीपुरवठ्याची स्थिती सुधारली नाही, तर आम्ही या योजनेच्या विरोधात उतरू. शिवसेनेच्या पध्दतीने हिसका दाखवू,' असा इशारा महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी आयुक्तांना दिला. 'कंपनीने 'माइल स्टोन'नुसार किती काम केले याचा खुलासा करा,' असे राजेंद्र जंजाळ म्हणाले. 'पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून कंपनीला नोटीस द्या,' असे अंबादास दानवे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समांतरने फोडले महावितरणवर खापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विस्कळित पाणीपुरवठ्याचे खापर समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे उपाध्यक्ष अर्णव घोष यांनी महावितरणवर फोडले आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित झाला. नागरिक आणि नगरसेवकांनाही त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

अर्णव घोष यांनी सोमवारी दुपारी अचानक पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, 'ज्या गोष्टी कंपनीच्या आवाक्यात आहेत त्या करणे आम्हाला शक्य आहे, पण ज्या गोष्टी कंपनीच्या आवाक्याच्या बाहेर आहेत त्या बद्दल आम्ही काहीच करू शकत नाही. महापालिकेची पाणीपुरवठ्याची यंत्रणा सदोष आहे. पंपिंग सिस्टीम, पाइपलाइन जुनी झाली आहे. पाणीपुरवठ्यावरच्या एकूण खर्चापैकी ८० टक्के खर्च विजेवर करावा लागतो. वीज आमच्या आवाक्यात नाही. वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. वीजपुरवठा योग्य प्रकारे झाला, तर पाणीपुरवठ्यात अडचण येणार नाही. शहरातील पाणीपुरवठ्याची पध्दत 'टप्पा सिस्टीम' आहे. अशी पध्दत अन्यत्र कुठेच नाही. त्यामुळे त्याचाही पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. सर्वांना समान पाणी देण्याचा आमचा उद्देश आहे, पण हा उद्देशही सफल होत नाही.

कारण महापालिकेने टाकलेली पाइपलाइन वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही. जलकुंभांची संख्या पुरेशी नाही. नागरिक आणि काही राजकीय व्यक्ती आंदोलन करतात, जलकुंभावर येऊन पाणीपुरवठा यंत्रणेचा ताबा घेतात हे सगळे प्रकार अडचणीचे आहेत.'

पन्नास कंत्राटदार करणार काम

मुख्यजलवाहिनी आणि अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामाबरोबरच जलकुंभाच्या उभारणीसाठी एकूण पन्नास कंत्राटदार काम करतील. या कामांचे नियोजन कंपनीचे उपाध्यक्ष सोनल खुराणा करणार आहेत. ३५ जलकुंभ १३ ते १४ कंत्राटदारांच्या माध्यमातून बांधले जाणार आहेत. शहरांतर्गत टाकण्यात येणारी १५०० किलोमीटरची जलवाहिनी देखील कंत्राटदारात विभागून देण्यात आली आहे. ३०० किलोमीटरसाठी एक या प्रमाणे पाच कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. हे कंत्राटदार प्रत्येकी दहा कंत्राटदार नेमतील. त्यामुळे काम लवकर होईल, असा दावा घोष यांनी केला. प्रकल्पाची किंमत ७९२ कोटी रुपयांवरून १०१८ कोटी झाली आहे असे ते म्हणाले.

बिलाच्या वसुलीत कोणत्याही नागरिकावर सक्ती केली जात नाही. समांतर जलवाहिनीचा प्रकल्प तीन वर्षात म्हणजे ऑगस्ट २०१७ पर्यंत पूर्ण होईल. जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम देखील पुढील महिन्यात सुरू होईल.

- अर्णव घोष; उपाध्यक्ष, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ गो बॅक!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सक्तीने मीटर बसविण्याचे काम त्वरित बंद करावे, समांतरचे खासगीकरण रद्द करावे या मागणी सोमवारी आम आदमी पक्षाने क्रांतिचौकात निदर्शने केली. शहरातील प्रत्येक घराला दररोज पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. यासाठी समांतर जलवाहिनीचे खासगीकरण रद्द करून पाणी महापालिकेने पुरवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महापालिकेच्या सत्तेध्ये असणारे लोक समांतर रद्द करण्याची भाषा करतात. यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न आंदोलकर्त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी शहर संयोजक सुरेश पवार, दत्तू पवार, सतीश संचेती, प्रसन्ना वायकर, संजय नागरे, सिद्धार्थ बनसोडे, रेखा महाजन आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत तेजस्विनीला पुन्हा सुवर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिंगापूर येथे सुरू असलेल्या आशियाई रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू तेजस्विनी सागरने पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकले आहे. या स्पर्धेत तिने सातपैकी साडेपाच गुणांची कमाई करीत जेतेपद पटाकाविले.

रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेपूर्वी तेजस्विनीने २० वर्षांखालील गटात खेळताना तीन पदके जिंकली. या यशामुळे तिचा आत्मविश्वास दुणावला. त्याचे प्रतिबिंब रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत उमटले. या स्पर्धेत तिने सात फेऱ्यांमध्ये चार डावांत विजय मिळविला तर, तीन डावांत तिला बरोबरी साधली. अपराजित राहण्याचाही तिने बहुमान संपादन केला. प्रथम मानांकित इंडोनेशियाच्या वुमन चेस मास्टर्स लिगिओ पराहिताला गायको पियानो प्रकाराने झालेल्या डावात पराभूत करून तेजस्विनीने सुवर्णपदक निश्चित केले.

महिनाभरात ६ पदके

गेल्या महिन्याभरापासून विविध स्पर्धांत खेळत असलेल्या व्हेरॉक उद्योग समूहाच्या तेजस्विनीने एकापाठोपाठ पदके जिंकून आपल्या कामगिरीचा आलेख उंचावला आहे. महिन्याभरातील सहाव्या स्पर्धेत तिने पदकांची कमाई केली आहे. जागतिक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेतही तिने सुवर्णपदक पटाकाविले. आशियाई शालेय ब्लिट्झ स्पर्धेतही तिने सुवर्णपदक संपादन केले. २० वर्षांखालील गटात रौप्यपदक, सांघिक रौप्यपदक पटाकाविले. एकूण सहा पदकांची कमाई तिने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशपांडेंच्या लॉकरमध्ये १.७५ किलो सोने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बांधकाम घोटाळ्यातील संशयित आरोपी दीपक देशपांडे यांच्या दोन बँक लॉकरची सोमवारी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. लॉकरमध्ये तब्बल पावणेदोन किलो (सुमारे ४० लाख रुपये) सोन्याचे दागिने आढळले. दरम्यान, या घोटाळ्यातील संशयित असलेल्या मुंबई येथील तत्कालीन अधीक्षक अभियंत्याचा औरंगाबादेत फ्लॅट असल्याचे त्याच्या घरझडतीमध्ये समोर आले.

महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहारात माहिती आयुक्त व माजी बांधकाम सचिव दीपक देशपांडे यांचा संशयित आरोपी म्हणून समावेश आहे. त्यांच्या घरझडतीमध्ये पोलिसांना भाग्यनगर येथील पटियाला बँकेमध्ये त्यांचे दोन लॉकर असल्याचे निष्पन्न झाले होते. सोमवारी औरंगाबाद विभागाच्या पथकाने बँक लॉकरची तपासणी केली. दोन्ही लॉकरमध्ये तब्बल १ किलो ७५१ ग्रॅमचे सोन्याचे दागिने सापडले. त्यांची किमत ४० लाख ६३ हजार रुपये दाखविण्यात आली आहे. ही झडती इन कॅमेरा घेण्यात आली. शनिवारी त्यांच्या घरझडतीमध्ये अडीच कोटीच्या ठेवी, ए‌क किलो सोने, २७ किलो चांदी बँकेमध्ये पन्नास लाख रुपये आणि मालमत्तेची कागदपत्रे आढळली होती. मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती दिली.

दुसऱ्या संशयित आरोपीचा औरंगाबादेत फ्लॅट

या घोटाळ्यातील आणखी एक संशयित आरोपी व सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन अधीक्षक अभियंता अरूण विठ्ठलराव देवधर (रा. किंजल टॉवर, भायखळा) याच्या फ्लॅटची झडती सोमवारी घेण्यात आली. यामध्ये त्याचा मुंबई येथे ७५ लाख रुपये किमतीच्या फ्लॉटसह औरंगाबाद व पुणे येथे फ्लॅट असल्याचे उघड झाले, असी माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर ‘समांतर’चा करार रद्द करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांत जलवाहिनीची कंपनी करारातील अटी पाळत नसेल तर, त्यांना त्याबाबत लेखी नोटीस द्या. त्यानंतरही त्यांच्या कामात सुधारणा न झाल्यास करार रद्द करा, अशा शब्दांत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांना ठणकावले.

शहरात दोन महिन्यांपासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. नागरिक आणि नगरसेवकांनी पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. या आंदोलनांची दखल घेऊन सोमवारी पोलिस आयुक्तांनी आपल्या कार्यालयात पाणीपुरवठ्याबाबत बैठक आयोजित केली होती. बैठकीला पालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, औरंगाबाद सिटी वॉटर युटिल‌िटी कंपनीचे उपाध्यक्ष अर्णव घोष, सोनल खुराणा व अन्य अधिकारी उपस्थित होते.

बैठकीतील चर्चेची माहिती उपमहापौर राठोड यांनी पत्रकारांना दिली. 'वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण होत आहेत,' असे सांगण्याचा प्रयत्न कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला. त्याला पालिकेचे आयुक्तांनी समर्थन दिले. ही बाब अमितेशकुमार यांना खटकली. वीजपुरवठा खंडित होत असेल तर, पर्यायी व्यवस्था करण्याचा उल्लेख करारात आहे, याकडे अमितेश कुमार यांनी लक्ष वेधले. यावर अर्णव घोष यांनी सांगितले की, ग्रामीण भागात पाच तर, शहरात दहा जनरेटर सेट उभारण्याचे करारात नमूद करण्यात आले आहे, पण ग्रामीण भागात जनरेटर सेट उभारणे अवघड आहे.

करारानुसार कंपनी काम करीत नसेल तर, त्यांच्याकडून तसे लिहून घ्या आणि कंपनीबरोबरचा करार रद्द करा, असे अमितेश कुमार यांनी पालिका आयुक्तांनी सांगितले. पाच दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होत असल्याचे सांगत आपले हात झटकले. दुसरीकडे शिवसेनेने पालिका आयुक्तांना निवेदन देऊन कंपनी, महापालिका यांच्यात समन्वय नसल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, असे स्पष्ट केले. आम आदमी पार्टीनेही समांतरच्या विरोधात निदर्शने केली.

घरगुती कनेक्शनवर कारवाई नको

व्यावसायिक नळ कनेक्शन शोधून काढण्यासाठी पोलिस यंत्रणा कंपनीला आणि महापालिकेला मदत करेल. व्यावसायिक नळांना मीटर लावा. कोणी विरोध केल्यास आम्हाला सांगा, असेही पोलिस आयुक्तांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. घरगुती नळ कनेक्शनवर मात्र कारवाई करू नका, असे स्पष्ट आदेशही त्यांनी दिल्याचे प्रमोद राठोड यांनी सांगितले.

पाणीपुरवठ्यावर गंभीरपणे चर्चा सुरू असताना औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट सोनल खुराणा कोणत्याही विषयावर गंभीर नव्हते. ते पोलिस आयुक्तांना खटकले. खुराणा यांना ते म्हणाले, 'प्रत्येक गोष्ट तुम्ही कॅज्युअल घेत असताल तर, ते योग्य नाही. आम्ही गांभीर्याने चर्चा करीत आहोत. तुम्हीही त्याचे गांभीर्य लक्षात घ्या.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंठा, वेरूळ, गौताळा, शिर्डीसाठी ९०२ कोटींचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

औरंगाबाद जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला असून, जिल्ह्यातील पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी तिसऱ्या टप्प्यात ९०२ कोटी ४० रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली. वेरूळ महोत्सव पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वेरूळ येथे त्यांच्या पर्यंटन राज्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थिती सोमवारी (१५ जून) आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी त्यांनी वेरूळ येथील पर्यटन केंद्राची पाहणी केली. तिसऱ्या टप्प्यात अजिंठा, वेरूळ, शिर्डी, लोणार, गौताळा अभयारण्य यांचा विकास करण्यात येणार आहे. परदेशी पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी औरंगाबाद विमानतळातील धावपट्टीची लांब वाढवून थायलंड, कंबोडिया, श्रीलंकेतील पर्यटक थेट येथे यावेत, असा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील पर्यटन वाढीसाठी नवीन धोरण विचाराधीन आहे. त्यासाठी नियुक्त सल्लागार समितीचा अहवाल जुलैअखेर प्राप्त होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत अहवालावर निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

तिसऱ्या टप्प्यातील विकास कामे

आठ स्मारकांचे संवर्धन, वनीकरण, पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा, अजिंठ्याच्या पायथ्याशी युरोपीय पद्धतीची रेल्वे, अजिंठा गावचा विकास, माहिती केंद्र, ट्राम-वे, महामार्गालगत पर्यटकांसाठी सुविधा केंद्र, औरंगाबाद येथे ध्वनी व प्रकाश योजना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेचे डबे अंगावरून जाऊनही सुखरुप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वेचे पाच डबे अंगावरून जाऊनही साठ वर्षांचे वयोवृद्ध निसारभाई मृत्यूच्या दाढेतून सुखरुप परतले. चित्रपटात शोभेल अशी ही घटना, रविवारी (१४ जून) औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर (१४ जून) घडली.

निसार अहेमद हे हैदराबादहून काही कामानिमित्त चेन्नई नगरसोल रेल्वेने औरंगाबादला आले. डब्यातून उतरताना पायरीवरून त्यांचा पाय घसरला. ते फलाटावर न येता थेट रुळावर पडले. त्यांच्या डोक्याला आणि कमरेला मोठा मार लागला. त्यांना उठताही येत नव्हते. याच वेळी रेल्वे नगरसोलकडे निघाली. तिचे पाच डबे त्यांच्या अंगावरून गेले. प्रवाशांनी माहिती देताच रेल्वे थांबवून वयोवृद्ध निसारभाईंना बाहेर काढण्यात आले. रेल्वे प्रवासी सेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिकेला कळवून, त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यांचा जीव वाचविण्यासाठी रेल्वे सेनेचे संतोष कुमार सोमाणी, वाहतूक निरीक्षक एल. के. जाखडे, स्थानक प्रमुख अशोक निकम, लोहमार्ग सहायक निरीक्षक डंबाळे यांनी मदत केली. निसारभाईंनी आपल्या कुटुंबीयांना आपण सुखरुप असल्याचे कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनेक भागात ५ दिवसाआड पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात काही भागांत पाच, तर काही भागांत दोन दिवसांनी पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या त्रासामुळे आजवर महिनाभरात चार ते पाच लक्षवेधी आंदोलने झाली. आंदोलनांचे केंद्र शहागंज आणि सिडको एन ५ येथील जलकुंभ होते.

नियोजनाच्या अभावामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. प्रामुख्याने जुने शहर आणि सिडको - हडकोचा परिसर पाणीप्रश्नात होरपळून निघाला आहे. जुन्या शहरातील गुलमंडीपासून किराडपुरा - गणेशकॉलनी पर्यंतचा भाग पाण्यासाठी भांडतो आहे. याभागातील नगरसेवकांनी महिनाभरात किमान चार ते पाच वेळा आंदोलनाचे हत्यार उपसले. नगरसेवक राजू तनवाणी यांनी नागरिकांसह एक रात्र आणि एक दिवस पाण्यासाठी शहागंज जलकुंभाच्या परिसरात काढला, पण पाणी काही मिळाले नाही. एमआयएमचे नगरसेवक फेरोज खान यांच्यासह नासेर सिद्दिकी अन्य नगरसेवक व नागरिकांनी देखील याच जलकुंभावर आंदोलन केले. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. या उपरही पाणीप्रश्न सुटला नाही. तेव्हा एमआयएमच्या नगरसेवकांनी क्रांतिचौक येथील जलकुंभावर आणि त्यानंतर कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. जुन्या शहरातील नागरिक व नगरसेवकांचे आंदोलन सुरू असतानाच सिडको - हडको भागातील नागरिक व नगरसेवकांनी देखील सिडको एन ५ येथील पाण्याच्या टाकीच्या परिसरात आंदोलने केली. रविवारी संतापलेल्या नागरिकांनी जलकुंभाच्या परिसरात उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरची हवा सोडून दिली. पाणीपुरवठाच होत नसल्याची त्यांची तक्रार होती, पण ही तक्रार ऐकूण घेण्यासाठी कंपनीचे अधिकारी उपस्थित नव्हते आणि महापालिकेचेही अधिकारी उपस्थित नव्हते.

पाणीपुरवठ्याच्या बिघडलेल्या नियोजनाची झळ संपूर्ण शहराला सहन करावी लागत असताना, जुने शहर आणि सिडको-हडकोच्या काही भागात पाच-सहा दिवसांच्या नंतर पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आता वाढू लागल्या आहेत. या तक्रारींकडे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. पाच-सहा दिवस पाणीपुरवठा होत नसल्यामुळे व पर्यायी व्यवस्थाही केली जात नसल्यामुळे नागरिकांच्या सहनशक्तीचा बांध फुटू लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षातून पाचच विद्यार्थ्यांची वाहतूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे रिक्षामध्ये पाचपेक्षा जास्त विद्यार्थी बसविलेले चालणार नाही, असे पोलिस आयुक्तांनी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना सुनावले. रिक्षामध्ये आठ विद्याथी बसविण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी रिक्षाचालकांचे शिष्टमंडळ सोमवारी त्यांना भेटण्यासाठी गेले होते.

सोमवारपासून शहरातील अनेक शाळा सुरू झाल्या. अनेक विद्यार्थी रिक्षांमधून शाळेत जातात. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी, रिक्षामध्ये पाच विद्यार्थ्यांची वाहतूक करावी. त्यांचे दप्तर व वॉटरबॅग रिक्षातच असावेत, असे आदेश दिले आहेत. यापार्श्वभूमीवर रिक्षाचालकांच्या १५ जणांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेतली. पाच विद्यार्थ्यांची वाहतूक करणे परवडत नाही. त्यामुळे आठ विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. आयुक्तांनी, 'आठ मुले रिक्षा कोंबून बसवू नका. असे चालणार नाही. रिक्षात पाचच विद्यार्थी बसवावे लागतील,' असे स्पष्ट केले. पालकांना भाडे परवडत नाही, असे रिक्षाचालकांनी सांगितले. त्यावर, पालकांच्या आर्थिक प्रश्नाची तुम्ही चिंता करू नका, असे आयुक्तांनी सुनावले पालक व रिक्षाचालक यांचीची एक मिटिंग घ्यावी, या सूचनेवर आयुक्त अमितेशकुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पालकांची मिटिंग आयोजित करून मुलांच्या सुरक्षेविषयी जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक शाखेला दिल्या.

गरीब विद्यार्थ्यांसाठी सिटीबसची व्यवस्था

गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना भाडेवाढ परवडत नाही, असे रिक्षाचालकांनी सांगितले. त्यावर, 'गरीब विद्यार्थ्यांसाठी शहर बससेवा सुरू करण्याचे प्रयत्न अाहेत. यासंदर्भात एसटी महामंडळाशी चर्चा सुरू आहे,' आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’च्या चुकांमुळेच वीज खंडित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मे आणि जून महिन्यात जायकवाडी येथे पाणी पुरवठ्यासाठी असलेले फिडर फक्त दोनदा ट्रिप झाल्याने बंद पडले. त्यात महावितरणाची चूक नव्हती. औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने वापरलेल्या उपकरणांतील तांत्रिक बिघाडमुळे जायकवाडी येथील फिडर बंद पडला होता. शहरात बिघडलेल्या पाणी पुरवठ्यावरून कंपनीने महावि‌तरणाच्या माथ्यावर खापर फोडू नये,' असे महावितरणाचे मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

शहरात पाणी पुरवठ्याचे बिघडलेले गणित, त्यामुळे होणारा जनक्षोभ विचारात घेऊन समांतर जलवाहिनीसाठी नेमण्यात आलेल्या खासगी कंपनीच्या प्रतिनिधींसह महापालिकेचे अधिकारी, पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक सोमवारी पोलिस आयुक्त ‌अमितेश कुमार यांनी घेतली. पाणीपुरवठ्याच्या बिघडलेल्या वेळापत्रकाला महावितरण जबाबदार असल्याचे या बैठकीत कंपनीचे अधिकारी, महापालिकेचे आयुक्त यांनी सांगितले.

यासंदर्भात महावितरणाचे मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांना विचारले असता, ते म्हणाले 'शहराचा पाणी पुरवठा व्यवस्थित राहावा म्हणून महावितरणकडून वीज वितरणात कोणताही व्यत्यय येऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात येते. नक्षत्रवाडी येथील मास्टर बॅलेन्सिंग रिझव्हॉयर (संतुलित जलकुंभ) येथून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी तेथे बसविण्यात आलेल्या फिडरला वाळूज आणि हर्सूल या दोन ठिकाणांहून वीज पुरवठा करण्यात येत आहे. फारोळा जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी असलेल्या फिडरला बिडकीन आणि चितेगाव या दोन ठिकाणांहून वीज पुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर ढोरकीन येथील पाणीपुरवठा केंद्राला पैठण आणि निलजगाव येथून वीज पुरविण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन ठिकाणांहून वीज पुरवठा करण्यात येत असल्याने एक वीज वाहिनी बंद पडल्यास दुसऱ्या ठिकाणाहून वीज पुरविली जावी, अशी खबरदारी महावितरणने घेतली आहे,' अशीही माहिती त्यांनी दिली.

३ महिन्यांत ५ वेळा वीज खंडित

'जायकवाडी येथे एक फिडर आहे. या फिडराला नियमित वीज पुरवठा सुरू आहे. एप्रिल महिन्यात दोन वेळेस ट्रिपिंग झाले होते. मे महिन्यात एकदाही ट्रिपिंग झाले नाही. जून महिन्यात दोनदा ट्रिपिंग झाले. तेही 'समांतर'च्या कंपनीकडील उपकरणांत झालेल्या बिघाडामुळे. त्यात महावितरणाचा कोणताही दोष नव्हता,' अशी माहिती मुख्य अभियंता चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. मुंडे पतीपत्नी : ४ वर्षांची कैद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बेकायदा गर्भलिंग निदानप्रकरणी परळीतील डॉ. सुदाम व सरस्वती मुंडे यांना परळीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एल. जी. पाच्छे यांनी सोमवारी वेगवेगळ्या ८ कलमांखाली प्रत्येकी ६ महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली. या सगळ्या शिक्षा त्यांना वेगवेगळ्या भोगायच्या आहेत.

बेटी बचाव अभियानाच्या वर्षा देशपांडे यांनी २०१०मध्ये परळीमधील मुंडे हॉस्पिटलचे स्टिंग ऑपरेशन केले होते. तेथे बेकायदा गर्भलिंग निदान केल्याचे त्यावेळी निष्पन्न झाले होते. महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंडे हॉस्पिटलची तपासणी केली. त्यावेळी गर्भलिंग निदान चाचणीचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले नसल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर डॉ. सुदाम मुंडे हे पसार झाले होते. काही दिवसानंतर ते स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले होते. प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्यानुसार डॉ. सुदाम मुंडे व डॉ. सरस्वती मुंडे या दांपत्याला विविध ८ कलमांखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी सहा महिने कैद व दहा हजार रुपये अशी एकुण ४८ महिने कैद व ८० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठविण्यात आला आहे. या सर्व शिक्षा स्वतंत्रपणे भोगायच्या आहेत. डॉ. सरस्वती मुंडे यांचा जामीन फेटाळण्यात आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणात सोमवारी परळी येथील न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडे व डॉ. सरस्वती मुंडे यांच्यावरील आरोप निश्चित केल्यानंतर शिक्षा सुनावली. प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार (पीसीसीएनडीटी) मुंडे दांम्पत्यावर १९ सप्टेंबर २०१० रोजी परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कैलास दुधाळ यांच्या फिर्यादीवरून विविध आठ गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणात अॅड. शैला जाधव, गरोदर माता प्रेरणा भिल्लारे, परळीचे नायब तहसीलदार प्रसाद कुलकर्णी व विभागीय कार्यालयातील राजेंद्र जोशी यांची साक्ष ग्राह्य धरण्यात आली. या प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. बालाजी आयनिले यांनी काम पाहिले. सुनावनीवेळी मुंडे दांम्पत्य कोर्टात हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूसंपादन कायदा बदलून शेतकऱ्यांची लूट थांबवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

भूसंपादन कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून मोदी सरकारने शेतकऱ्यांची जमीन घेऊन उद्योजकांचे भले करू नये. भूसंपादन कायद्यात बदल करून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी मंगळवारी (१६ जून) केली.

युवक काँग्रेसतर्फे भूसंपादन कायद्याविरोधात फुलंब्री ते पाथ्री, अशी पदयात्रा काढण्यात आली. या नऊ किलोमीटरच्या अंतरात कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या. पदयात्रेच्या समारोपानिमित्त पाथ्री येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 'मोदी सरकार हे सुटबुटाचे शासन गरिबांवर लादत आहे,' असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणाचीही जमीन घेता येणार नाही, असा बदल करावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्याचे कर्ज माफ करा, दुधाला २५ ते ३० रुपये प्रति लिटर दर द्यावा, कापूस-मका-ज्वारी आदी शेतमालाला चांगला भाव देऊन शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी डॉ. काळे यांनी केली. यावेळी युवक काँग्रेसचे नेते हरिकृष्णा, जिल्हाध्यक्ष समीर सत्तार, तालुकाध्यक्ष वरूण पाथ्रीकर यांनीही मोदी सरकारवर टीका केली. भूसंपादन कायद्यातील बदलासाठी युवक काँग्रेसतर्फे राज्यात एकूण १७०० किलोमीटर पदयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी पंचायत समिती माजी सभापती डॉ. सारंग गाडेकर, उपसभापती किशोर बलांडे, तालुकाध्यक्ष सुदाम मते, बाळसाहेब पवार, देवीदास गाडेकर, शिवाजी खरात, राजू बलांडे, यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images