Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

परिश्रमातून उभारली मराठवाडा साहित्य परिषद

$
0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

'गेल्या दहा वर्षांत मराठवाडा साहित्य परिषदेच्या परिपूर्ण विकासासाठी सांघिक प्रयत्न केले. मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन व विश्व मराठी साहित्य संमेलनातून परिषदेचा लौकिक वाढवला. हक्काचे नाट्यगृह व परिषद आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्यामुळे मतदार पुन्हा संधी देतील' असा विश्वास 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केला. कार्यकारी मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी संवाद साधला.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकूण ५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विद्यमान कार्यकारिणीला 'परिवर्तन आघाडी'ने आव्हान दिले आहे. तसेच राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे ही निवडणूक उत्कंठावर्धक ठरणार आहे. विरोधकांनी जोर वाढवला असला तरी सुजाण मतदार पुन्हा विजयी करतील असा दावा ठाले यांनी केला. ते म्हणाले 'गेल्या दहा वर्षांत मसापचा लौकिक वाढला. तेरा वर्षांत १४ मराठवाडा साहित्य संमेलने घेतली. विश्व मराठी साहित्य संमेलन व मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाद्वारे पूरक काम केले. 'प्रतिष्ठान' मासिक दर्जेदार झाले आहे. नवोदित लेखकांसाठी 'स्वागत' उपक्रम घेऊन परिषदेने एक पाऊल पुढे टाकले. मान्यवर साहित्यिकांशी संवाद साधणारा 'साक्षात' उपक्रम लक्षणीय ठरला. या भरीव कामामुळे विद्यमान कार्यकारिणी जोरदार प्रचार करीत आहे. साहित्यिकांचे योगदान लक्षात घेऊन 'जीवनगौरव' पुरस्कार सुरू केला. या पुरस्काराने डॉ. सुधीर रसाळ, चंद्रकांत पाटील व ना. धों. महानोर यांना सन्मानित केले. 'यशवंतराव चव्हाण वाड्मय पुरस्कार', 'लोटू पाटील नाट्यकर्मी पुरस्कार' सन्मानजनक ठरले. खेड्यात संमेलने घेतल्यामुळे परिषद सर्वांपर्यंत पोहचली. चांगल्या साहित्यिकांना ऐकण्यासाठी रसिक संमेलनाला येतात. त्यामुळे नेहमी तेच चेहरे दिसतात हा विरोधकांचा आक्षेप बिनबुडाचा आहे.

साहित्याशी संबंधित प्रत्येकाला संधी देणे परिषदेचे काम आहे. हा वारसा परिषद कायम ठेवील. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह उभारणी 'मसाप'साठी फायदेशीर ठरली असून बँक आणि नाट्यगृहाच्या भाड्यातून दरमहा दीड लाख रुपये उत्पन्न सुरू आहे,' असे ठाले म्हणाले.

आमदार चव्हाण तटस्थ ?

'मसाप'च्या निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण यांचे कुणाला पाठबळ असल्याचा दावा ठाले यांनी फेटाळला. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे काही 'हौशी' प्राध्यापक निवडणुकीत उतरुन चव्हाण यांच्या नावाचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वाधिक उमेदवार असलेल्या प्रतिस्पर्धी गटाचा पुरोगामीपणाचा दावा फोल आहे. दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा 'मसाप'वर लोभ होता. राजकीय शिष्य असल्यामुळे शरद पवार यांनाही 'मसाप'बाबत आस्था आहे. त्यामुळे परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरदहस्त आहे असा अर्थ कुणी काढू नये, असे ठाले यांनी स्पष्ट केले.

आमचे पॅनल विजयी झाल्यानंतर परभणीत एका संस्थेने बळकावलेले 'बी. रघुनाथ सभागृह' कायदेशीर मार्गाने परत मिळवू. मराठवाडा साहित्य परिषदेच्या आवारात दुमजली इमारत बांधून भाषांतर केंद्र सुरू करणार आहोत.

- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, मसाप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिन्याभरासाठी राज्य भारनियमन मुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रमजान आणि आषाढी एकादशी निमित्त राज्यात कोणत्याही भागात भारनिय‌मन केले जाणार नसल्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. अ. ब. क. आणि ड वर्ग आधीच भारनियमन मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सर्वाधिक वीज तोटा असलेल्या इ, फ आणि ग गटातील १७ जून ते २७ जुलै दरम्यान भारनियमन होणार नसल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली, अशी माहिती महावितरणाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. दरम्यान, शहरात एमआयएमच्या नगरसेवकांनी रमजान व हिंदू बांधवांच्या आगामी सणाच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि महावितरणतर्फे वीज पुरवठाही सुरळीत व्हावा अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केलेली घोषणा राज्यभरातील नागरिकांना दिलासा देणारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उर्दूतील ‘श्यामची आई’ २ महिन्यांत मिळणार

$
0
0

अब्दुल वाजेद, औरंगाबाद

मराठी भाषिक पिढ्यांवर मानवी मुल्यांचे संस्कार केलेल्या 'श्यामची आई' चे उर्दू भाषांतराचे काम जवळपास संपले आहे. उर्दुमधील 'श्याम की माँ' दोन महिन्यात वाचकांच्या हाती येणार आहे.

साने गुरूजी यांची सुप्रसिद्ध 'श्यामची आई' ही कांदबरी मराठी भाषकांना प्रेरणा देणारी ठरली आहे. आईची थोरवी नमूद करताना या कादंबरीतून किशोरवयीन मुलांवर मानवी मुल्यांचे संस्कार करण्यात आले आहेत. जळगाव येथील खान्देश विद्यापीठाने मराठीतील महत्त्वाची पुस्तके उर्दूतून भाषांतरित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात 'श्यामची आई' चे उर्दू भाषांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी बीसीयूडी डॉ. ए. जी. खान करीत आहेत. ते डॉ. रफिक झकेरिया कॅम्पसचे संचालक आहेत. 'श्याम की माँ' चे भाषांतर पूर्ण झाले असून सध्या मुद्रित शोधन सुरू आहे. एक महिन्यात उर्दू भाषांतरित पुस्तकाची छपाई पूर्ण होईल. उशीर झालाच, तर दोन महिन्यात पुस्तक वाचकांच्या हाती येईल असी माहिती डॉ. खान यांनी दिली.

'श्यामची आई' या कादंबरीची सहज, सोपी व थेट भिडणारी संवादी मराठी उर्दूमध्ये भाषांतरित करण्याचे आव्हान होते. या कांदबरीतून व्यक्त होणारी भावना उर्दूमध्ये मांडण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले, असे डॉ. खान यांनी सांगितले. परंतु, या भाषांतरामुळे मोठे समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घातक रसायनप्रकरणी कारवाईस टाळाटाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेंद्रा शिवारातील सहा एकर शेतामध्ये रॅडिको एन. व्ही. डिस्टिलरीज कंपनीने रसायन सोडल्याची तक्रार शेतकरी आत्मराम ठुबे यांनी ११ मे रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळ, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात देऊन तब्बल एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला. मात्र, नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल अजून आलाच नसल्याचे निमित्त करून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे.

दरम्यान, विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रा. सतीश पाटील यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात काही प्रमाणातील तथ्य नक्कीच स्पष्ट होते. त्याचवेळी शेतामध्ये सोडलेले रसायन नेमके किती घातक आहे, यासाठीच्या सर्व प्रकारच्या तपासण्यांसाठी पाच ते सहा दिवसांपेक्षा जास्त काळ लागत नसल्याचे प्रा. पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महिन्यापूर्वी पंचनामा करूनही रिपोर्ट मिळाला नसल्याचे कारण देत धूळफेक केली जात आहे.

सहा महिन्यांपूर्वीच 'रॅडिको'ला इशारा

नियमांचे उल्लंघन केल्यामुळेच प्रदूषण मंडळाने रॅडिको एन. व्ही. कंपनीला पाच डिसेंबर २०१४ रोजी कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच, कंपनीने आपल्या शेतामध्ये घातक रसायन सोडल्याची तक्रार ठुबे यांनी दिली. हे रसायन सोडल्यामुळे अनेक झाडे अचानक जळून गेल्याचाही तक्रारीमध्ये उल्लेख आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वीच कारवाईचा इशारा देऊनही कंपनीवर आता थेट कारवाई न करता पुन्हा कारणे दाखवा नोटीस, कंपनी बंद का करण्यात येऊ नये, अशा निर्देशांमध्ये मंडळ वेळ घालवत असल्याचे दिसून येत आहे.

मी स्वतः ११ जून रोजी घटनास्थळाला भेट देऊन, कंपनी बंद का करू नये, वीज-पाणी पुरवठा खंडित का करू नये, याबाबत सात दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रॅडिको एन. व्ही. डिस्टिलरीज कंपनीला दिले आहे. यासंबंधीच्या रसायनांच्या तपासण्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवालानंतर गांभीर्य बघून कारवाई करू.

- बी. पाटील, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

रसायने नेमकी किती प्रमाणात घातक आहेत, यासाठी 'केमिकल ऑक्सिजन डिमांड' (सीओडी), 'बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड' (बीओडी) आदी तपासण्या महत्त्वाच्या ठरतात. त्यासाठी दोन ते पाच दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागत नाही. वस्तुतः एका दिवसातदेखील काही प्रमाणातील तथ्य

समोर येतात.

- प्रा. सतीश पाटील, विद्यापीठ पर्यावरणशास्त्र विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर वसुलीचे सव्वा कोटींचे चेक बाउंस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मार्च अखेरीस मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी महापालिकेने घेतलेल्या चेकपैकी एक कोटी २५ लाख २१५ रुपये किंमतीचे चेक बाउंस झाले आहेत. पालिकेच्या लेखा विभागाकडून ही माहिती मिळाली.

मालमत्ता कर वसुलीसाठी दरवर्षी मार्च महिन्यात मोहीम हाती घेतली जाते. याअंतर्गत वसुली टार्गेट पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांकडून चेक घेण्यात येतात. ताब्यात घेतलेल्या चेकची गोळाबेरीज करून टार्गेटच्या जवळपास पोहचल्याची बतावणी केली जाते. ताब्यात घेतलेल्या चेक पैकी अनेक चेक वटलेच जात नाहीत. त्यामुळे वसुलीचे टार्गेट घसरते. घसरलेले टार्गेट जाहीर होऊ नये याची खबरदारी कर आकारणी व वसुली विभागातर्फे घेतली जाते. मात्र, लेखा विभागाने मालमत्ता कर वसुलीपोटी जमा केलेल्या, पण न वटलेल्या चेकची यादीच तयार केली आहे. ही यादी गुरुवारी पत्रकारांच्या हाती लागली. त्यानुसार एक कोटी २५ लाख २१५ किंमतीचे चेक वटले नाहीत.

यांचे चेक बाउंस ः सुरेंद्र बमनोटे, जगन्नाथ शिंदे, राजू जाधव, मेहरसिंग नाईक कॉलेज, जे. जी. रंधवा, सतीश संचेती, शैलजा लोहारकर, एच. रझवी, सेवा टुर्स अँड ट्रॅव्हल्स, हरमीदसिंग नामधारी, बंजारा विद्यार्थी वसतिगृह, कुलदीपसिंग जेढी, शिवाजीराव काळे हॉटेल पुष्पांजली, कुलभूषण जैस्वाल, त्रिमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, व्यंकटेश कंस्ट्रक्शन, दि मॅनेजर मराठवाडा विकास भवन, प्रादेशिक परिवहन कार्यालय, शिवाजी बिल्डर अँड डेव्हलपर्स, शिवाई सेवा ट्रस्ट मुंबई, वर्षा डिस्ट्रीब्युटर्स अँड कंपनी, स्वीटी ओबेरॉय, आर. डी. प्रिंटर (पेट्रोल पंप), वरिष्ठ कोषागार अधिकारी लेखा कोष भवन, वक्फ बोर्ड, अय्युब जहागीरदार, भागचंद रुणवाल, दिलीप रुणवाल, सावित्रीबाई फुले हायस्कूल, भवानी ट्रेडर्स.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूर जिल्हा कोर्टात महिलेची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

जमिनीच्या वादातून निराश झालेल्या महिलेने जिल्हा न्यायालयाच्या आवारातच अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच दुपारी या महिलेचा मृत्यू झाला. राहीबाई ग्यानबा सुरवसे (वय ५५, रा. धनेगाव, ता. लातूर) असे या महिलेचे नाव आहे. त्यांच्या पतीचे २००१मध्ये निधन झाले. तेव्हापासून तिचा पुतण्यासोबत जमिनीवरून वाद सुरू होता. येथील कनिष्ठ न्यायालयाने काही दिवसांपूर्वी राहीबाई यांच्या बाजूने निकाल दिला, मात्र त्याच्या विरोधात पुतण्याने उच्च न्यायालयात दाद मागितली.

या प्रकरणात स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे यांनी नैराश्यातून बुधवारी दुपारी न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्याजवळ अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. हा प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी लातूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच दुपारी चारच्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे अभियंते ‘समांतर’च्या दावणीला

$
0
0

उन्मेष देशपांडे, औरंगाबाद

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील १५ अभियंते समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या दावणीला बांधण्यात आले आहेत. आयुक्त प्रकाश महाजन यांनी १० जून रोजी या संबंधीचा आदेश काढून या सर्व अभियंत्यांच्या सेवा कंपनीकडे वर्ग केल्या आहेत. यापूर्वी २५ अभियंते कंपनीकडे वर्ग करण्यात आले. त्यांचा पगार मात्र महापालिकेतर्फे केला जात आहे. त्यांच्या पगारावर दरमहा ११ लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत.

समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी महापालिकेने कंपनीबरोबर करार केला. त्यानुसार समांतर जलवाहिनी टाकण्याच्या कामासह पाणीपुरवठा करण्याचे काम कंपनीकडे दिले आहे. महापालिकेने लाइनमन व तत्सम काम करणारे २८७ कर्मचारी कंपनीकडे कायमस्वरुपी वर्ग केले. या कर्मचाऱ्यांचा पगार कंपनीतर्फे केला जात आहे. त्यानंतर पाणीपुरवठा विभागातील २५ अभियंते व कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या अस्थापनेवर राहून कंपनीचे काम करण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे या सर्वांचा दर महिन्याचा ११ लाख रुपयांचा पगार पालिकेच्या तिजोरीतून केला जात आहे. त्यानंतर आयुक्त प्रकाश महाजन यांनी १० जून रोजी कार्यालयीन आदेश काढून पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या १५ अभियंत्यांना प्रतिनियुक्तीवर कंपनीच्या ताब्यात देऊन टाकले. या सर्वांना कंपनीकडे प्रतिनियुक्तीवर देण्याचे कारण स्पष्ट करताना आयुक्तांनी या आदेशात म्हटले आहे की, मागील महिन्यापासून शहरातील वितरण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्कळितपणा आला असून, नगरसेवक, नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत.

प्राप्त परिस्थितीवर नियंत्रण आणणे व शहरातील वितरण प्रणाली सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेले उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व दुय्यम अवेक्षक यांना पुढील आदेशापर्यंत कंपनीकडे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. या काळात नियमानुसार देय असलेले वेतन व भत्ते कंपनीतर्फे दिले जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवारांची चौकशी नाही : फडणवीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासंदर्भात राज्यात कोणतीही चौकशी सुरू नाही. त्यांना चौकशीला बोलविण्याचा सध्यातरी प्रश्न नाही. त्याचबरोबर माजीमंत्री छगन भुजबळ यांच्यावर नियमानुसार आणि कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई सुरू आहे. सरकार अकास बुद्धीने कसलीही कारवाई करत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत विविध कामांची पाहणी करण्यासाठी ते गुरुवारी जिल्ह्यात आले होते. राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते शरद पवार यांनी भुजबळ यांची पाठराखण करतानाच, 'मी आणि माझे सहकारी यांना हे सरकार आम्हाला कधी जेलमध्ये टाकणार याची वाट बघत आहोत,' असे विधान केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवार यांची राज्यात कोणतीही चौकशी सुरू नसल्याचे स्पष्ट केले. भुजबळ यांच्यावरील कारवाई ही नियमानुसार आणि कोर्टाच्या निर्देशांप्रमाणे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही कायद्याने काम करीत असून, अँटी करप्शन ब्युरो पुराव्यांच्या आधारे काम करत आहेत. सरकार अकस बुद्धीने कसलीही कारवाई करत नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेट्रोल भरले; निघाले पाणी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकीत पेट्रोल भरले की क्षणात त्याचे पाणी होते. इथेनॉल मिश्र‌ित इंधनामुळे हा प्रकार वाढला आहे. त्यामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. शहरात दररोज तीन लाख लिटर पेट्रोलचा पुरवठा केला जातो. पूर्वी ५ टक्के इथेनॉल मिश्र‌ित पेट्रोल शहरात यायचे. मात्र, एक जूनपासून इंधन कंपन्यांनी १० टक्के इथेनॉल मिश्र‌ित पेट्रोलचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. यामुळे तीन लाख लिटर पेट्रोलमध्ये अंदाजे ३० हजार लिटर इथेनॉल मिसळले जाते. या पेट्रोलमध्ये पाण्याचा पाण्याचा थेंब गेल्यास, इथेनॉलचे पाण्यात रुपांतर होते. शहरात पाऊस वाढल्याने याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

बावीसशे रुपयांचे पाणी

सेव्हन हिल येथील राज पेट्रोल पंपावर डॉ. नवल मालू यांनी मारुती रिट्झ गाडीत (एमएच २० सीएच ७६०५) बावीसशे रुपयांचे पेट्रोल भरले. काही अंतर प्रवास करताच त्यांची गाडी बंद पडली. मेकॅनिकने गाडीची तपासणी केली असता, गाडीत पेट्रोल शिवाय पाणी असल्याचे समजले. डॉ. मालूंसह शहरातील अनेक वाहनधारकांना असा फटका सहन करावा लागत आहे.

घरातून पेट्रोल पंपापर्यंत गाडी चालवत आणली. गाडीत पेट्रोल होते. मात्र, पेट्रोल भरल्यानंतर गाडी बंद पडली. गाडीच्या टाकीत पेट्रोल कमी आणि पाणी जास्त आढळले. या मनस्तापाबाबत मी ग्राहक मंचाकडे तक्रार करणार आहे.

- डॉ. नवल मालू;

ग्राहक

इथेनॉल मिश्र‌ित पेट्रोलमुळे हा प्रकार झाला आहे. याबाबत मी आमचे ग्राहक नवल मालू यांच्याशी बोललो आहे. ते आमचे जुने ग्राहक आहेत. हा प्रकार आमच्या चुकीमुळे झालेला नाही. तरीही त्यांची नुकसान भरपाई देण्यास तयार आहे.

- चंदनमलजी खिंवसरा;

राज पेट्रोल पंप

पेट्रोल टाकीत पाण्याचा थेंब गेल्यानंतर पेट्रोलमधील इथेनॉलचे पाणी झाले असेल. गाडीच्या टाकीत पाण्याचे काही अंश असले, तर ‌त्यामुळे ही समस्या येते. पावसाळ्यात वाहनांच्या पेट्रोलच्या टाक्या साफ करून घ्याव्यात.

- अपेक्षा भदोरिया; उपव्यवस्थापक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांमुळे रस्ते झाले धोकादायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते धोकादायक बनले आहेत. त्यामुळे शहरात किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. धोकादायक बनलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे पालिकेच्या प्रशासनाने अद्याप लक्ष दिलेले नाही. रस्त्यांची कामेही संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे संपूर्ण पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यांवर यातनाच सहन कराव्या लागणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील काही प्रमुख रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगचे काम महापालिकेने सुरू केले आहे. त्यासाठी कंत्राटदाराशी केलेल्या करारानुसार ही कामे नऊ महिन्यांतच पूर्ण होणे अपेक्षित होते, पण दोन वर्षांचा कालावधी उलटूनही रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. बहुतेक कामे रखडलेली आहेत. आता हे रखडलेले रस्ते पावसाळ्यात धोकादायक बनले आहेत.

क्रांतिचौक ते पैठणगेट या रस्त्याचे काम व्हाइट टॉपिंगच्या माध्यमातून केले जात आहे. हे काम सिल्लेखाना चौकात सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे या चौकात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हा चौक उखडला आहे. तो पावसाच्या पाण्याने भरून जातो. या चौकातून मार्ग काढताना वाहनचालकांनी कसरत करावी लागते. अशीच स्थिती सब्जीमंडई ते पैठणगेट रस्त्याची झाली आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. या रस्त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांनाच नव्हे तर, पादचाऱ्यांनाही कसरतच करावी लागते. औरंगपुऱ्यात जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोरचा रस्ताही पावसामुळे धोकादायकच बनला आहे. रस्त्याच्या दोन्हीही बाजुंना खड्डे आहेत. खडकेश्वर ते मिलकॉर्नर या रस्त्याचीही चाळणी झाली आहे, पण त्याकडे पालिकेच्या यंत्रणेचे लक्ष नाही. जुन्या शहरातील रंगारगल्लीची अवस्थाही अशीच झाली आहे. गेल्या काही वर्षांत या गल्लीत डांबराचा थर टाकण्यात आलेला नाही.

कैलासनगर स्मशानभूमी ते एमजीएमपर्यंतच्या रस्त्याच्या कामाकडे पालिकेच्या प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे. जालना रोडला समांतर असलेल्या या रस्त्यावर तुलनेने वाहतूक जास्तच असते. रस्त्याचे काम झालेले नाही. वाहनचालकांना अडथळे पार करीत पुढे जावे लागते. पावसामुळे आता या रस्त्याचा वापर बंद होण्याच्या मार्गावर आहे. सिडकोतील आझाद चौकाचीही अवस्था अशीच आहे. खड्डे आणि त्यात साचणारे पावसाचे पाणी यांमुळे वाहनचालकांसाठी अपघाताचे ठिकाण म्हणून या चौकाची ओळख होत आहे. बजरंग चौक, टीव्ही सेंटर चौक, हडको कॉर्नरचा परिसर आणि टीव्ही सेंटर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा रस्ता पावसामुळे उखडला गेला आहे.

उत्सव मंगल केंद्र ते भाजीवाली बाई चौक या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले, मात्र या रस्त्यावरून ज्योतीनगरमध्ये जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमामात रहदारी असते. उखडलेल्या रस्त्यामुळे नागरिक त्रासले आहेत. खड्डे, अर्धवट झालेली कामे यांमुळे हे रस्ते धोकादायक झाले आहेत.

शहरातील रस्ते खरोखरच खराब झाले आहेत. पावसामुळे ते धोकादायक झाले आहेत, याबाबत दुमत नाही. सोमवारी स्थायी समितीची बैठक होणार आहे. त्यावेळी रस्त्यांबद्दल चर्चा करून महापालिकेच्या प्रशासनाला योग्य ते आदेश दिले जातील. नागरिकांना त्रास होऊ नये अशीच आमची भूमिका आहे.

- दिलीप थोरात, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच तासांत घडविले योगशिक्षक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त येत्या रविवार (२१ जून) होणाऱ्या शिबिरांसाठी आता योग शिक्षकांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अवघ्या अडीच तासांचे प्रशिक्षण देऊन योगशिक्षक घडविण्याची किमया साधली जात आहे.

योगदिनाच्या कार्यक्रमाची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. शहरात चार प्रमुख ठिकाणांसह शाळा, कॉलेजांमध्ये हे शिबिर होणार आहे. शिबिरासाठी प्रशिक्षित शिक्षकांची मोठी मागणी आहे. प्रशिक्षित योगशिक्षकांची संख्या कमी असल्याने शाळांमधील शिक्षकांनाच ट्रेनिंग देण्यात येत आहे. जिल्ह्यात सुमारे ९ हजार शिक्षक ट्रेनिंग घेऊन योगशिक्षक झाले आहेत. प्रत्येकाला सुमारे दोन ते अडीच तासाचे ट्रेनिंग देण्यात आले. आता या शिक्षकांवर योग शिबिरांची धुरा असणार आहे.

२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. शाळा, कॉलेजांमध्ये योग शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. सकाळी ७ ते ७.३३ या कालावधीत हे शिबिर घेतले जाईल. त्याचे वेळापत्रक, कोणती योगासने घ्यावीत, याची माहिती त्या-त्या विभागांना देण्यात आली आहे. शिबिरासाठी आवश्यक ते प्रशिक्षित शिक्षकांची वानवा आहे. पूर्णपणे प्रशिक्षित शिक्षकांची संख्या ३५०च्या घरात आहे. त्यामुळे शिबिरासाठी प्रशिक्षित शिक्षक तयार करण्यासाठी योगासनांचे शिक्षण देण्याचे काम करणाऱ्या संस्थांची धावपळ उडाली आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल ९ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांना ट्रेनिंग दिले आहे. तालुका पातळीवरही प्रशिक्षणाची लगबग सुरू आहे. शिक्षकांना दोन ते अडीच तासांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही संस्थांनी एका तासाचे ट्रेनिंग सेशन घेऊन योगशिक्षक घडविले आहेत. त्यात विविध योगासने, ती करताना कोणती काळजी घ्यावी, कोणी कोणती आसने करावीत आदींचा प्रशिक्षणात समावेश आहे. प्रशिक्षणासह या शिक्षकांचा सराव ही करून घेतला जात आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर या शिक्षकांना आपापल्या शाळेत योग दिनी प्रोटोकॉलप्रमाणे आसने करून घ्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षकांची होते परीक्षा

शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेतून एक शिक्षक प्रशिक्षित झाला पाहिजे, हे उद्दिष्ट ठेवले आहे. शिबिरासाठी प्रशिक्षित करण्यात येत असलेल्या शिक्षकांची परीक्षाही घेतली जाते आहे. दोन-तीन तासांत तयार होणाऱ्या या शिक्षकांच्या खांद्यावर या उपक्रमाची धुरा असेल.

योग शिबिरासाठी सर्व संस्थांनी एकत्र येत संघ स्थापन केला आहे. त्यानुसार आम्ही विविध शिक्षिकांना ट्रेनिंग देत आहोत. शहरासह तालुकापातळीवरही हे प्रशिक्षण दिले जात आहे.

- शिवशंकर स्वामी, योग शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिमंडळ बैठक सात वर्षांनंतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनापूर्वी मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (१८ जून) येथे पत्रकारांना दिली. त्याचबरोबर विदर्भ आणि कोकणातही मंत्रिमंडळाची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,'मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १७ सप्टेंबरपूर्वी येथे बैठक घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि कोकणातही मंत्रिमंडळाच्या बैठका घेण्यात येणार आहेत.'

मराठवाड्यात जलसंधारणाची मूलभूत कामे या योजनेतून होत आहेत. माथ्यापासून पायथ्यापर्यंतची कामे केली जात आहेत. पहिल्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्याने मोठे जलसाठे निर्माण होत आहेत. नदी-नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण यांचा लाभ झाला आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. सुमारे ५० टक्के भाग प्रभावी सिंचनाखाली येत नाही, मात्र जलयुक्त शिवार योजनेमुळे हा भाग सिंचनाखाली येणार आहे. या योजनेमध्ये नागरिक, स्वयंसेवी संस्था, प्रशासन एकत्र येऊन काम करीत आहे, असे त्यांनी सांगितले.

जायकवाडीच्या पाण्यासाठी नियमावली

मराठवाड्यामध्ये जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व भागातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याविषयी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'जायकवाडी'मध्ये पाणी सोडण्याचा निर्णय आमच्याच शासनाने घेतला आहे. आवश्यक असेल त्यावेळी जायकवाडीला नियमानुसारच पाणी सोडण्यात येणार अाहे. यासाठी सरकार एक नियमावली तयार करणार अाहे.

संभाजीनगर हा अस्मितेचा अजेंडा

शहराला संभाजीनगर असे नाव देण्याची मागणी पुढे येत असल्याचा प्रश्न पुढे आहे. महापालिकेच्या निवडणुकीतही हा मुद्दा होता. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, 'आमचा अजेंडा विकासाचा आहे. त्यावरच आम्ही महापालिकेच्या निवडणूक लढलो. संभाजीनगरचा मुद्दा हा अस्मितेचा अजेंडा आहे. पूर्वीच्या काळात युतीने त्याबाबत निर्णय घेतला आहे.'

मराठवाड्याला कायम डावलले जात असल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, मराठवाड्याला नॅशनल स्कूल ऑफ आर्किटेक्चर दिले. त्याचबरोबर लॉ युनिव्हर्सिटीचे आश्वासन पूर्वी देण्यात आले होते. त्यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. आम्ही ही संस्था मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. ही संस्था उभारण्याची आम्ही पूर्ण व्यवस्था करीत आहोत. यापुढेही आम्ही अनेक संस्था मराठवाड्याला देणार आहोत. मराठवाड्याच्या अनेक मागण्या आहेत त्याबाबतीत संबंध‌ित विभागाचे मंत्री काम करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोचा नवा आराखडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर परिसरातील ३६ गावांमध्ये सिडकोच्यावतीने झालर क्षेत्र विकसित करण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध लक्षात घेऊन सिडकोचे पूर्वीचे आरक्षण रद्द करण्यासाठी पालिकेने शासनाकडे प्रयत्न सुरू केले आहेत. ते आरक्षण रद्द झाल्यानंतर पालिकेच्या हद्दवाढीचा प्रश्न निर्माण होताना सुनियोजित शहर निर्माण करण्यासाठी सिडकोने सहकार्य करण्याचे ठरविले असल्याची माहिती महापालिका आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांच्यामार्फत देण्यात आली.

भविष्यात लातूर महापालिकेची हद्दवाढ होणार आहे. निर्माण होणारी नविन वस्ती ही सुनियोजित व्हावी यासाठी महापालिकेने सिडकोच्या सहकार्याने प्रयत्न सुरू केले असल्याचे प्रास्ताविकात महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले. यावेळी सिडकोच्या नव्या प्रकल्पाचे सहयोगी नियोजनकार आशुतोष निखाडे आणि भूषण चौधरी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

लातूरसाठीची नवी योजना ही नवी मुंबईच्या नयना प्रकल्पाच्या धर्तीवर, सिडको व जमीन मालक यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद-जालन्याच्या धर्तीवर राबवता येऊ शकते याची माहिती देण्यात आली. दोन्ही प्रकल्पाचे फायदे-तोटे यावेळी सांगण्यात आले. या दोन्ही योजनेत सरकार किंवा सिडको नव्या शहर विकासासाठी काम करणार आहे. सुनियोजित शहरासाठी जी सिडकोची ओळख आहे. त्यानुसार हे काम होणार असल्याचे सांगण्यात आले. जोपर्यंत ३६ गावातील ग्रामस्थ या योजनेसाठी तयार होणार नाहीत. तो पर्यंत योजना सुरू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. या सादरीकरणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अमित देशमुख होते. यावेळी खासदार डॉ. सुनिल गायकवाड, आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती प्रतिभा पाटील-कव्हेकर, माजी आमदार शिवाजीराव पाटील-कव्हेकर, महापौर अख्तर शेख, रेणा कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील-सेलुकर, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी उपस्थित होते.

खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी शेतकऱ्यांची मानसिकता लक्षात घेऊन, गावोगावच्या सरपंचाशी चर्चा करूनच निर्णय करण्याचे आवाहन केले. माजी आमदार शिवाजीराव पाटील-कव्हेकर यांनी गुजरात पॅटर्ननुसार योग्य त्या ठिकाणी आरक्षण ठेवण्याचे आवाहन केले. महापौर अख्तर शेख यांनी स्वागत केले. उपमहापौर कांबळे यांनी आभार मानले.

३६ गावासाठीचे आरक्षण रद्द होणार

आमदार अमित देशमुख म्हणाले, 'लातूर परिसरातील ३६ गावासाठीचे सिडकोचे आरक्षण रद्द होणार आहे. येत्या काही दिवसात त्याचा अध्यादेश निघणार आहे. लातूरच्या विकासासाठी सिडकोसारख्या यंत्रणेची आवश्यकता आहे. नवी योजना ही सिडको आणि शेतकरी यांच्या सहभागीदारीतल प्रकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणालाही वेठीस न धरता विकास केला जाणार असून सर्वांशी चर्चा केली जाणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्ल‌िचिंग पावडरचा साठा पडून

$
0
0

खुलताबादः येसगाव येथील गिरजा मध्यम प्रकल्पातून तालुक्यातील १२ गावांना पाणीपुरवठा करणारी योजना आहे. या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या ब्ल‌िचिंग पावडरच्या ५०० गोण्या येसगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात एक वर्षांपासून वापरा विना पडून आहेत.

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी ब्लीचिंग पावडरची खरेदी केली जाते. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने खुलताबाद तालुक्यासाठी ५०० ब्लीचिंग पावडरच्या गोण्या खरेदी करून येसगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाठविल्या होत्या. २५ किलोची एक गोणीची किंमत पाचशे रुपये इतकी आहे. त्यामुळे अडीच लाख रुपयांचा खर्च वाया गेला आहे. ब्लीचिंग पावडर चार महिने टिकते त्यानंतर त्याचा परिणाम कमी होतो असे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ओ. के. हेडाऊ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आत्महत्येला परवानगी द्या’

$
0
0

उस्मानाबादः रोजगार हमी योजनेतून खोदलेल्या विहिरीचे बिल कळंब येथील पंचायत समितीकडून अदा केले जात नाही. त्यामुळे आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याप्रकरणी अनेक वेळा खेटे मारले, परंतु अधिकारी जुमानत नाहीत. विहिर खोदाईची मजुरी देण्यासाठी पत्नीचे मंगळसूत्र विकले तरी देखील पंचायत समितीमधील अधिकारी व पदाधिकारी यांना दया आली नाही.

त्यामुळे वैतागलेल्या आवाड शिरपुरा, ता. कळंब येथील शेतकरी सुधाकर कुलकर्णी यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक सचिव महेश पाठक यांची कळंब येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे विनवणी करून संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, या भेटीपासूनही त्यांना रोखण्यात आले. शेवटी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची त्यांनी भेट घेतली. या प्रकरणाची त्यांना कहाणी ऐकविली. प्रशासनाच्या कारभाराला वैतागून आता आपले जगणे असह्य झाले आहे. आपणास आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती सुधाकर कुलकर्णी यांनी केली आहे.

माजी सैनिकाचा आत्महत्येचा इशारा

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद शाळेला दान दिलेल्या चार एकर जमिनीपैकी ३० गुंठे जमीन परत मिळावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी सैनिक दत्तात्रय लिंगफोडे यांनी २२ जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशसनाला दिला आहे. शिवाय या निर्णयावर ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रशासनाकडे माझ्या वडिलांनी जागा दान दिल्याचा कोणताही पुरावा नाही, तरी सुद्धा मी शाळा व आरोग्य केंद्र बांधून शिल्लक राहिलेले सुमारे दहा गुंठे जागा मला परत द्यावी, अशी मागणी केली आहे. प्रशासन माझ्यावर अन्याय करीत असून २२ जून रोजी आपण आत्मदहन करणार आहे.

- दत्तात्रय लिंगफोडे, सावरगाव, ता. तुळजापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झेडपीसमोर आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

जिल्हा प्रशासनाकडून विकास कामांच्या दर्जाबाबत कानाडोळा करण्यात आल्याने सीईओंच्या दालनापुढे बाळासाहेब सुभेदार यांनी रॉकेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. परिसरातील कर्मचारी यांनी सतर्कता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला. हा प्रकार शुक्रवारी दुपारनंतर घडला.

दाऊतपूर (ता. उस्मानाबाद) येथे राबविण्यात आलेल्या विकास कामाचा दर्जा व अन्य प्रश्नाबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही उस्मानाबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी याबाबीकडे हेतूतः कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे गटविकास अधिकारीसह संबंधिताविरोधात कारवाई करावी, याकडे लक्ष वेधण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हा परिषद इमारतीतील सीईओ सुमन रावत यांच्या दालन परिसरात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी दुपारनंतर ही घटना घडली. परिसरातील कर्मचारी यांनी सतर्कता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आवारात अचानक रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रकार घडल्याने सर्वजण आवक झाले. हा प्रकार काही कर्मचाऱ्याच्या जागरुकतेमुळे टळला. यानंतर मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी धावपळ झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाइपच्या प्रस्तावावरील कार्यवाही थांबवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डीआय (ड्युक्टाइल आयर्न) पाइपऐवजी एचडीपीआय (हाय डेन्सिटी पॉली इथिलीन) पाइप वापरण्याच्या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही न करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती करणारे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्त उमाकांत दांगड यांना दिले.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करणार असून, 'समांतर' मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडमोडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेना समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या बाजूने आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

डीआयऐवजी एचडीपीआय पाइप वापरण्याच्या ठरावाच्या इतिवृत्ताला सर्वसाधारण सभेत महापौर तुपे यांनी मंजुरी दिल्यावर दुपारी तीनच्या सुमारास भाजपच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्त उमाकांत दांगड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शहराध्यक्ष भगवान घडमोडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर सायंकाळी उपमहापौर प्रमोद राठोड यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत घडमोडे यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी राठोड यांच्यासह स्थायी समितीचे सभआपती दिलीप थोरात, गजानन बारवाल, राज वानखेडे, कचरू घोडके आदी उपस्थित होते.

घडमोडे म्हणाले, 'एचडीपीआय पाइप वापरण्याच्या ठरावाचे इतिवृत्त मंजूर करू नये अशीच आमची भूमिका आहे. हा पाइप वापरणे कसे योग्य आहे, त्यातून १५३ कोटींचा लाभ पालिकेला कसा होणार, हे शहर अभियंत्यांनी सांगितले, पण त्याचा सविस्तर खुलासा त्यांनी केला नाही. हाच मुद्या घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार अाहोत.'

शिवसेना - भाजपची सत्ता आहे. युती असताना 'समांतर'वरून असा गोंधळ होतो खरे म्हणजे हे अपेक्षित नाही. सत्तेत असूनही विरोधी भूमिका घ्यावी लागते हे दुर्दैव आहे. समन्वयाने प्रश्न सुटला पाहिजे. समांतर जलवाहिनी आणि एचडीपीआय पाइपविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनीही पुढे आले पाहिजे.

- शिरीष बोराळकर, प्रवक्ते, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैध प्रवासी वाहतूक आणि नियम मोड वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ग्रामीण पोलिसांनी गेल्या ६ महिन्यांत ९ हजार ९७८ बेशिस्त वाहनचालकांकडून सुमारे ४८ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी मोहीम हाती घेतलेली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी महामार्गावरील अतिक्रमणे, दुकाने हटविण्यात येत आहेत. वाहतुकीचे नियमाचे पालन करावे, यासाठी जनजागृती अभियानही हाती घेण्यात आले आहे.

जानेवारी ते मे २०१५ या कालावधीत अवैध प्रवासी करणे, ओव्हर लोड वाहतूक, नियमाचे पालन न करणाऱ्या अशा ९ हजार ९७८ जणांवर कारवाई करून ४८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८० वाहनांचे परवाने (काळीपिवळी वाहन) निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक बाजीराव कुटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस असल्याचे सांगून लुबाडणाऱ्यास पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत असल्याची बतावणी करून टपरीचालकाला तीन हजारांना लुटणाऱ्या एका तोतयाला पोलिसांनी अटक केली आहे. किरण मिलिंद जाधव (२३, रा. श्रीकृष्णनगर, मिसारवाडी, पिसादेवी रोड) असे त्याचे नाव आहे. जालना रोडवरील वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळ असलेला पानटपरी चालक शेख मुजाहेद शेख जहांगीर (१९, रा. कासबरी दर्गा, पडेगाव) याच्याकडे शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास किरण जाधव गेला आणि सिडको पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचारी असल्याचे सांगितले.

पानटपरीत गुटखा विक्री करत असल्याचे कारण सांगून शेख मुजाहेद यांना त्याने कारवाईची धमकी दिली. कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने जाधव याने अंगझडती घेण्याचे नाटक करत फिर्यादीच्या खिशातून तीन हजार रुपये काढून घेतले. संशय आल्याने फिर्यादीने आरडा-ओरड केली. त्यामुळे शेजारील काही दुकानदार धावत आले. त्यांच्या मदतीने शेखने त्याला पकडून ठेवत सिडको पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले. पोलिस उपनिरीक्षक हरिश खटावकर यांच्यासह पोलिस कर्मचारी अरूण उगले, राजू घुनावत यांनी घटनास्थळी धाव घेऊन जाधवला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध शेखच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत ४० हजारांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घर उघड असल्याचे संधी साधून चोरट्याने मोबाइलसह ४० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरल्याची घटना गुरुवारी (१८ जून) एन पाच सिडको येथे घडली. याप्रकरणी सिडको पोलिस अधिक तपास करत आहेत. अमोल चिकटे (वय २५, रा. सावरकरनगर, एन ५, सिडको) असे फिर्यादीचे नाव आहे. अमोल यांनी घरामध्ये मोबाइल चार्जिंगला लावला आणि ते अन्य कामात व्यस्त होते. घराचा दरवाजा उघड असल्याची संधी चोरट्याने साधली. मोबाइल, रोख एक हजार रुपये असा एकूण ४० हजार ३०० रुपयांचा ऐवज व आधार कार्ड चोरून नेले. अमोल चिकटे यांनी सिडको पोलिसांत तक्रार दिली.

मोबाइल चोरला

औरंगाबादः गर्दीचा फायदा घेत चोरट्याने मोबाइल चोरला. रोषनगेट परिसरात बुधवारी रात्री घडली. फिर्यादी शेख तस्लीम (वय ३४, रा. संजयनगर, बायजीपुरा) हे रात्री आठ वाजता रोषनगेट परिसरातील फराह बुक अँड स्टेशनरी येथे वह्या, पुस्तके खरेदी करत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने फिर्यादीच्या खिशातील ६ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल चोरून नेला. हा प्रकार लक्षात येताच शेख यांनी जिन्सी पोलिसांकडे धाव घेतली.

पावणेदहा हजार दुकानातून चोरले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्राहक म्हणून आलेल्या एका चोरट्याने दुकानातून ९ हजार ७५० रुपये चोरले. सातारा परिसरात शुक्रवारी हा प्रकार घडला. फिर्यादी मेघा खंडेलवाल (वय ३४, रा. हरिसाई पार्क, सातारा) यांचे सातारा परिसरात कटलरीचे दुकान आहे. सकाळी दहा वाजता एक ग्राहक दुकानात आला. त्याने विविध वस्तुंची मागणी केली. फिर्यादीचे त्या वस्तू काढत असतानाच भामट्याने रॅकवर ठेवलेली पर्स लंपास केली. त्यात ९ हजार ७५० रुपये रोख आणि जोडवे असा ऐवज होता. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहायक फौजदार एस. बी. केदारे अधिक तपास करत आहेत.

आत्मदहनाचा इशारा; रिक्षाचालकावर कारवाई

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस कर्मचारी न्याय मिळून देत नाही, असा आरोप करून आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या रिक्षाचालकावर शनिवारी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. अझर खान जमीर खान (रा. इन्शाअल्हा कॉलनी, हर्सूल) असे त्यांचे नाव आहे. ८ मार्च २०११ रोजी ताज हॉटेलसमोर अझर खान यांच्या रिक्षाचा अपघात झाला होता.

एका खाजगी कंपनीत व्यवस्थापकाच्या चारचाकीचा त्यांच्या रिक्षाला धक्का लागला होता. रिक्षा उलटल्याने अजहर खान जखमी झाले. व्यवस्थापकाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र कुठलही नुकसान भरपाई दिली नाही, असे अझर यांचे म्हणणे आहे. न्याय मिळावा यासाठी आपण सिटीचौक पोलिस ठाण्यात गेलो, मात्र न्याय मिळत नाही, अशी तक्रार त्यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडेही तक्रार केली होती. अपघातप्रकरणी येत्या सात दिवसांत मला न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी पोलिस आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात दिला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्याच्यकाडून आत्मदहन करणार नाही, अशी लेखी हमी घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images