Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अफू प्रकरणातील २५ शेतकऱ्यांना जामीन

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड जिल्ह्यातील मोहा, घोरपडदरा तांडा येथे अफुची लागवड करणाऱ्या २५ शेतकऱ्यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एम. टी. जोशी यांनी मंगळवारी मंजूर केला. २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व तेवढ्याच रकमेचा जामीनदार या अटी या शेतकऱ्यांवर घातल्या आहेत. या शेतकऱ्यांविरुद्ध २५ फेब्रुवारी २०१२ रोजी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंबाजोगाई सेशन कोर्टाने या शेतकऱ्यांना दोषी ठरवत, १० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती.

पांडुरंग शेप, आत्माराम शेप, उद्धव मोरे, बाबासाहेब देशमुख यांच्यासह २५ शेतकऱ्यांनी जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली. या फौजदारी अर्जावर न्या. जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. 'हे शेतकरी गरीब आहेत. सेशन कोर्टात खटला चालू असताना ते ६ महिने ते १ वर्ष तुरुंगात होते. ते अपिलाच्या सुनावणीच्या वेळी हजर राहतील. त्यामुळे या शेतकऱ्यांचा जामीन अर्ज मंजूर करावा,' असा युक्तिवाद त्यांचे वकील व्ही. डी. साळुंके, जी. व्ही. मोहेकर व एस. जे. साळुंके यांनी केला. त्यावर सरकारचे वकील आर. पी. कदम यांनी या शेतकऱ्यांनी अफूची शेती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिर्डीच्या भाविकांना वैजापूरमध्ये लूटले

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

दुचाकीवर आलेल्या तिघांनी शिर्डीला जाणाऱ्या पाच तरुणांना चाकूचा धाक दाखवून सोमवारी मध्यरात्री एक वाजता रोटेगाव स्टेशन रस्त्यावर लुटले. या प्रकरणातील तिघांना पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून १,६५० रुपये रोख व तीस हजार रुपये किंमतीची दुचाकी हस्तगत केली आहे.

जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील नागापूर येथील रहिवासी विलास हरिभाऊ राठोड, अविनाश गणेश चव्हाण, राहुल संपत आढे, अमोल मोहन आढे व सुनील दिलीप आढे हे शिर्डीला जाण्यासाठी सोमवारी रात्री औरंगाबाद येथून नंदीग्राम एक्स्प्रेसने रोटेगाव येथे आले. रोटेगावहून रात्री अकरा वाजता बसने शिर्डीला जाण्यासाठी ते वैजापूरच्या बसस्थानकात आले. परंतु, बस न मिळाल्याने रेल्वेने शिर्डीला जाण्याचे ठरवले. स्टेशनला पायी जाताना करुणा निकेतन शाळेजवळ दुचाकीवर आलेल्या तिघांय़ी चाकूचा धाक दाखवून १,६५० रुपये व मोबाइल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पोलिसांची मोटार आल्याने दोन जण पळून गेले, पण पाच जणांनी एकाला पकडून ठेवले. फौजदार श्रीनिवास भिकाणे, खिल्लारे, नंदकुमार नरोटे, सचिन सोनार यांनी पाठलाग करून दोघांना पकडले. वाल्मिक दिलीप गांजे (वय २१, रा. भारम ता. येवला) गणेश सुरेशसिंग राजपूत (वय २४, रा. येवला) व बलराम महावीर राजपूत (वय २६, रा. बुंदेलगाव), अशी त्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोंबकळणाऱ्या तारांतून मिटमिट्यात आगीचे लोळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, मिटमिटा

लोंबकळणाऱ्या तारांमुळे मिटमिटा परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी तारा जमिनीला टेकतील इतपत खाली आहेत. त्यामुळे एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तारा लोंबकळून त्यांचे घर्षण झाल्याने वारंवार आगीचे लोळ पडतात.

आर्च आंगण व तारांगण परिसरातील भागात अनेक तारा लोंबकळत आहेत. या भागात अनेकदा लहान मुले खेळतात. परिसरात गुरे चरतात. शॉर्ट सर्किटमुळे फ्यूज उडतो. परिसरातील वीज अनेकदा गायब असते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 'तारेला तार चिटकून आगीचे गोळे पडतात. वेळोवेळी लाइट जाते. त्यामुळे प्रचंड मनस्ताप होतो. मुलांना रात्री अभ्यास करणे अवघड होऊन बसते', असे दत्तू मुळे यांनी सांगितले.

लोंबकळणाऱ्या तारांमुळे मुले व जनावरांनाही धाेका आहे. 'खांबावरील तारा लोंबकळत असल्याने फ्युज उडून अनेकदा लाइट जाते. गुरे, जुनावरे अनेकदा खाली असतात. अनेकदा लहान मुले खाली खेळतात. अशावेळी अपघात होऊ शकतो', अशी काळजी अमित चौधरी यांनी व्यक्त केली. 'लाइट गेल्यामुळे अनेकदा त्रास सहन करावा लागतो. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा एखादा मोठा अपघात होऊ शकतो', या शब्दात सुनिता चौधरी यांनी लक्ष वेधले. विशेष म्हणजे या तारा प्रमाणापेक्षा जास्त खाली आल्यामुळे एखाद्याचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणने हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजूनही १००३ टँकर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जून महिना संपला तरी मराठवाड्यातील पाणीटंचाई अद्याप दूर झालेली नाही. मराठवाड्यात अजुनही १००३ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक ४६४ टँकर बीड जिल्ह्यात सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात मात्र फक्त तीन टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.

गेल्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने मराठवाड्यात उन्हाळ्यात टँकरने पिण्याचे पाणी पुरवावे लागले. मराठवाड्यात १ जून रोजी सर्वाधिक १८६० टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर ही संख्या कमी होत असली तरी, टँकरच्या घटमधील सर्वाधिक वाटा औरंगाबाद जिल्ह्याचा आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात टँकरचा आकडा ५६० पर्यंत गेला होता. परंतु, जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पावसामुळे जिल्ह्यातील टँकरची झपाट्याने कमी झाली असून सध्या जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात एक व सिल्लोड तालुक्यात दोन असे फक्त तीन टँकर सुरू आहेत. इतर तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत. जिल्ह्यात ८ जून रोजी ५५१ टँकर सुरू होते. एका आठवड्यानंतर ही संख्या निम्म्यावर म्हणजे २६८ वर आली. त्यानंतर जिल्ह्यातील टँकरसंख्येत सातत्याने घट होऊन २८ जून रोजी वैजापूर आणि सिल्लोड वगळता सर्व तालुक्यातील टँकरसंख्या शून्यावर आली आहे.

सध्या विभागामध्ये १००३ टँकर सुरू असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत १२९ टँकर कमी झाले आहेत. सर्वाधिक ४६४ टँकर बीड जिल्ह्यात असून जालना, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत टँकरची संख्या शंभरपेक्षा अधिक आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

औरंगाबाद जिल्ह्यांत मराठवाड्यातील सर्वाधिक १७१.७५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. फुलंब्री, पैठण, खुलताबाद, वैजापूर, कन्नड या तालुक्यांतील पावसाची सरासरी शंभर मिलीमिटर पेक्षा जास्त आहे. त्यामुळे टँकरची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूखंड माफियांविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोर्टात दाखल केलेला दावा मागे घेण्यासाठी पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या भूखंड माफियांविरूद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भूखंडमाफियांविरूद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात देखील अपहार, फसवणूक व विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. अनेक नागरिकांनी त्यांच्याविरूद्ध पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेत तक्रारी केल्या आहेत.

सुभाष रामराव शेळके (वय ६३, रा. खोकडपुरा) या जेष्ठ नागरिकाचे खोकडपुरा भागात घर आहे. सदरील घर वडीलोपार्जित असून १९६४ पासून शेळके कुटुंब तेथे वास्तव्यास आहे. घर जुने झाल्याने ते पाडून नविन घराचे बांधकाम शेळके यांनी सुरू केली आहे. बांधकाम सुरू असताना सत्तारखान खाजाखान, गफ्फारखान खाजाखान व शकुरखान गफ्फारखान यांनी त्यांचे बांधकाम अडविले. बांधकाम करायचे असेल तर पाच लाख रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. शेळके यांनी नकार दिल्याने खानबंधूनी ही जागा त्यांच्या मालकीची असल्याचा दावा दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने हा दावा खारीज केला होता. यानंतर मनपाने बांधकामाची परवानगी दिल्यामुळे मनपाविरूद्ध देखील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असून तो सध्या प्रलंबित आहे. दरम्यान, रविवारी साडेदहा वाजता बांधकामाच्या ठिकाणी येऊन शेळके यांना सत्तार व गफ्फारखान यांनी ठार मारण्याची धमकी दिली. तसेच दावा मागे घेण्यासाठी पाच लाखाच्या खंडणीची मागणी केली. या प्रकरणी शेळके यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमोहित करून लुबाडले

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दूध विक्रेत्याला बोलण्याच्या नादात संमोहित करून लुबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपीला जागरूक नागरिकामुळे पकडण्यात आले. मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजता उस्मानपुरा परिसरात हा प्रकार घडला. जमावाने पकडू नये म्हणून आरोपीने चाकूचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या ताब्यातून चाकू हस्तगत करण्यात आला असून क्रांतिचौक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांचनवाडी भागात राहणारा गोविंद चिमा साठीया (वय २३) हा दूध विक्रेता सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास उस्मानपुरा परिसरात एका हॉटेलमध्ये दूध टाकण्यासाठी आला होता. यावेळी त्याला सूरज अशोक आघाडे (वय २१ रा. सिद्धार्थनगर) याने अडवून 'मला काम द्या', असे म्हणत गप्पांमध्ये गुंतविले. यानंतर गोविंदच्या वरच्या खिशातील तेराशे रुपये सूरजने काढून घेतले. काहीवेळाने हा प्रकार दूध विक्रेत्याच्या लक्षात आला. पलायनाच्या तयारित असलेल्या सूरजला त्याने चोप देत पैसे परत घेतले. दरम्यान, हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या मनोज बजाज या नागरिकाच्या लक्षात आला. त्याने दूध विक्रेत्याला विचारले असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. यावेळी नागरिकांची गर्दी जमली. जमाव जमल्याचे पाहून सूरजने त्याच्या बॅगमधून धारदार चाकू काढून धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनोज बजाज व अन्य नागरिकांना सूरजला ताब्यात घेण्यात यश आले. नेमके यावेळी तेथून क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर तसेच सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी जात होते. या आरोपीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपी सूरजविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार्लीचा शहाजोगपणा...

भर रस्त्यात हा प्रकार झाल्यानंतर अनेक नागरिकांनी १०० क्रमांकावर फोन केला. मात्र, काहीच प्रतिसाद आला नाही. अखेर पोलिस निरीक्षकांचे वाहन जात असताना त्यांना हा प्रकार सांगण्यात आला. संशयित आरोपीला पोलिस ठाण्यात नेल्यानंतर चार्लीचे तेथे आगमन झाले. त्यांना नागरिकांनी १०० क्रमांक लागत नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी तो क्रमांक बिझी असल्याचे सांगत प्रत्येक पोलिस ठाण्याचा फोन क्रमांक नागरिकांनी सोबत ठेवायला हवा, असा तऱ्हेवाईक सल्ला दिला.

माझ्यासमोर एक दूध विक्रेता पळत होता. त्याला‌ विचारले असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. चाकूचा धाक दाखवणाऱ्या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मनोज बजाज, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेशाखेत ३० बेवारस दुचाकी

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुन्हेशाखेने विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या तीस दुचाकी बेवारस अवस्थेत पडून आहेत. यांच्या मूळ मालकांचा शोध लागलेला नाही. काही दुचाकी विना क्रमांकाच्या असून काही दुचाकीवर चुकीचे क्रमांक टाकल्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे.

ज्या नागरिकांच्या दुचाकी चोरी झाल्या आहेत. त्यांनी मूळ कागदपत्रासह चेसीज व इंजिन क्रमांक याची खात्री करून या दुचाकी नेण्याचे आवाहन गुन्हेशाखेच्या वतीने करण्यात आले आहे. या दुचाकीमध्ये पॅशन, स्प्लेंडर, यामाहा, ग्लॅमर, डिस्कव्हर, चॅलेंजर, स्टार स्पोर्टस, सिडी डिलक्स, स्टार सिटी, प्लॅटिना, इंडसुझूकी, मॅक्स आर सुझूकी आदी वाहनांचा समावेश आहे. १० जुलै पूर्वी वाहनधारकांनी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही वाहने नेण्यास कोणी न आल्यास कोर्टाच्या आदेशाने या वाहनांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस ठाणे ऑनलाइन!

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील १३ पोलिस ठाण्यांत बुधवारपासून ऑनलाइन कामकाज सुरू होणार आहे. दौलताबाद व हर्सूल या नव्या पोलिस ठाण्यांचा यामध्ये समावेश नाही. सीसीटीएनस (क्राईम अँड क्रिमीनल ट्रॅकींग नेटवर्क अॅँड सिस्टिम) अंतर्गत या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. सर्व पोलिस ठाण्यात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

केंद्रशासनाच्या उपक्रमानुसार पोलिस दलाचे आधुनिकीकरण करून देशातील सर्व पोलिस ठाणी एकमेकाशी ऑनलाइन जोडण्याचा उपक्रम २०१२ साली राबवण्याचे ठरले होते. याअंतर्गत क्राईम अँड क्रिमीनल ट्रॅकींग नेटवर्क अॅँड सिस्टिम (सीसीटीएनएस ) प्रणालीद्वारे असलेल्या उपक्रमामध्ये तक्रारदाराची तक्रार, पंचनामा, पुरावे, यासोबत गुन्हेगारांची माहिती त्यांची कार्यपद्धती आदींचा समावेश होता. जानेवारी २०१३ पासून या उपक्रमाअंतर्गत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू करण्यात आले होते. १५ ऑगस्ट २०१४ रोजी हा प्रोजेक्ट पूर्ण करून शहरातील पोलिस ठाणे ऑनलाईन करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे हे काम रखडले. हे काम संपुष्टात आले असून बुधवारपासून शहरातील तेरा पोलिस ठाण्यात ऑनलाईन कामकाज सुरू करण्यात येणार आहे. रविवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यामध्ये भेट देऊन संगणकावर कामकाज करून स्वतः आढावा घेतला. ज्या अडचणी त्यांना वाटत होत्या त्या सबंधितांना तात्काळ सोडवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

स्वतंत्र लॉगइन

ही संगणक प्रणाली हाताळण्यासाठी आतापर्यंत आयुक्तालयातील ३६४ अधिकारी व १९८० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. यामध्ये तपासी अंमलदारापासून पोलिस आयुक्तापर्यंत प्रत्येकाचे स्वतंत्र लॉगईन व पासवर्ड राहणार आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांचे ऑनलाईन कामकाज वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहता येईल, अशी व्यवस्था या संगणक प्रणालीमध्ये करण्यात आली आहे.

पोलिस ठाणी पेपरलेस करण्याचा प्रयत्न

संपूर्ण भारतात ही प्रणाली कार्यान्वित झाल्यास कोणत्याही गुन्हेगाराची माहिती एका क्लिकवर पोलिसांना उपलब्ध होणार आहे. यामुळे पोलिस ठाणे पेपरलेस करण्यावर भर दिला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेरिटोनिअल डायलिसिसने वाचले अर्भकाचे प्राण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवघ्या सात दिवसांच्या अर्भकाच्या मूत्रपिंडाचे कार्य थांबले असताना, पेरिटोनिअल डायलिसिस उपचार प्रक्रियेने त्याचे प्राण वाचविण्यात एमजीएमच्या डॉक्टरांना यश मिळाले. ७२ तासांच्या डायलिसिसनंतर मूत्रपिंडाच्या कार्यात सुधारणा झाली असून संबंधित अर्भकाला घरी सोडले.

एमजीएममधील नवजात शिशू अति-दक्षता विभागात सात दिवसांचे नवजात अर्भक दोन दिवस लघवी न होऊन मूत्रपिंडावर परिणाम झाल्याच्या लक्षणांमुळे दाखल झाले. बाळाची तपासणी नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. सुनील गव्हाणे यांनी केली असता, त्या अर्भकाला श्वास घेण्यास त्रास होता असल्याचे आणि दोन्ही मूत्रपिंड कार्य करत नसल्याचे स्पष्ट झाले. जन्मावेळी हे अर्भक रडले नव्हते आणि त्याला पुरेसे दूध न मिळाल्यामुळे त्याच्या तब्येतीवर गंभीर परिणाम झाला होता. बाळाला कृत्रिम श्वसन मशीनवर ठेवण्यात आले होते. दरम्यान केलेल्या मूत्रपिंड कार्याच्या रक्ततपासणीच्या अहवालानुसार युरिआचे प्रमाण ४९०, तर क्रिएटिनीनचे १०.४ होते. त्यामुळे बाळाच्या मेंदूवर अनिष्ट परिणाम झाला होता आणि प्रौढांप्रमाणे अर्भकाच्या मूत्रपिंडाचे कार्य थांबले होते. अशा वेळी नवजात शिशुंमध्ये अत्यल्प प्रमाणात वापरली जाणारी पेरिटोनिअल डायलिसीस ही उपचार-प्रक्रिया यशस्वीरित्या वापरण्यात आली. अर्भकाचे प्राण वाचल्याबद्दल एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, अधिष्ठाता डॉ. अजित श्रॉफ, उप-अधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, बालरोग विभाग प्रमुख डॉ. अंजली काळे यांनी डॉ. सुनील गव्हाणे व पथकाचे अभिनंदन केले आहे.

तब्बल ७२ तास डायलिसिस

या प्रक्रियेत अर्भकाच्या पोटात नळी टाकून डायलिसिस करण्यात आले. वेळीच हा निर्णय घेतल्यामुळे अर्भकाच्या प्रकृतीत लक्षणीय फरक पडला. ७२ तासांच्या डायलिसिसनंतर अर्भकाच्या मूत्रपिंडाच्या कार्यात चांगली सुधारणा झाली. त्यानंतर कृत्रिम श्वसन हळू-हळू कमी करून बंद करण्यात आले आणि नैसर्गिक श्वसन सुरळीतपणे सुरू झाले. एकूण प्रकृतीमध्येही समाधानकारक सुधारणा झाल्यामुळे त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्टरलाइट’च्या टँकरवर जीपीएस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्टरलाइट' कंपनीचे रसायन थेट खाम नदीमध्ये सोडणारे टँकर पोलिसांनी रंगेहाथ पकडून कारवाई करण्यात आली असताना, आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कंपनीच्या रसायन घेऊन जाणाऱ्या टँकरवर 'जीपीएस' सिस्टीमद्वारे नजर ठेवणार आहे. मंडळाच्या आदेशानुसार टँकरवर 'जीपीएस' सिस्टीम बसविण्यात आली आहे.

खाम नदीमध्ये स्टरलाइट कंपनीचे घातक रसायन सोडणारे ८ टँकर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी २८ फेब्रुवारी २०१५ रोजी पकडले होते. या प्रकरणी पाच जणांना घटनेवेळी अटक करण्यात आली होती, तर मागच्या महिन्यात कंपनीचे व्यवस्थापक अमित रत्नपारखे यांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीचे उत्पादन सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे बाय-प्रोडक्ट म्हणजेच हायड्रोक्लोरिक अॅसिडची (एचसीएल) दोन ते तीन टँकरच्या माध्यमातून रोजच वाहतूक होते. ही वाहतूक वर्धा तसेच मुंबईतील काही कंपन्यांपर्यंत केली जात असल्याचे समजते. या कंपन्यांकडून स्टरलाइट कंपनीचे बाय-प्रोडक्ट खरेदी केले जातात. मात्र टँकरद्वारे नेण्यात येणाऱ्या रसायनांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे किंवा नाही, याविषयी शंका राहते. त्यामुळेच अलीकडे टँकरद्वारे होणाऱ्या कंपनीच्या रसायनांची वाहतूक ही योग्य पद्धतीने, योग्य मार्गाने आणि योग्य तिथे होत आहे किंवा नाही, यावर नजर ठेवण्यासाठी टँकरवर 'जीपीएस' सिस्टीम बसविण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. मंडळाच्या आदेशानुसार ही सिस्टीम टँकरवर बसविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. परिणामी, टँकरवर बारकाईने नजर ठेवणे शक्य होणार असल्याची अपेक्षा केली जात आहे. रसायने घेऊन जाताना टँकर कुठे-कुठे थांबला, किती-किती वेळ थांबला आणि नेमक्या कुठल्या मार्गाने टँकर जात आहे, याची थेट माहिती कंपनीसह प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळणार आहे. यामध्ये कुठेही शंका आली तर कंपनीसह मंडळाला तात्काळ हस्तक्षेप करून माहिती घेणे, संपर्क साधणे शक्य होणार आहे. त्यामुळे कंपनीच्या अपरोक्ष होणारे प्रदूषण रोखणे शक्य होणार आहे.

इत्यंभूत माहिती मिळणार

कंपनीच्या टँकरवर बसविण्यात आलेल्या 'जीपीएस' सिस्टीमचे सगळे ट्रॅक रेकॉर्ड स्टरलाइट कंपनीला तयार ठेवावे लागणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाला कधीही आणि कोणत्याही वेळेला तपासणी करता येणार आहे. मंडळाला जेव्हा-केव्हा शंका येईल, तेव्हा मंडळ कंपनीकडून माहिती मागवू शकते आणि रेकॉर्डची तपासणी केली जाऊ शकते.

इतरांना सक्तीची मागणी

स्टरलाइटप्रमाणेच घातक रसायन वाहून नेणाऱ्या सर्व प्रकारच्या कंपन्यांच्या टँकरवर अशा प्रकारची अत्याधुनिक सिस्टीम बसवावी, जेणेकरून शहर व शहरालगतचे प्रदूषण रोखता येईल, अशी अपेक्षा केली जात आहे. ही कारवाई केवळ एका कंपनीपुरती मर्यादित नको आणि प्रामाणिकपणे तिची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षाही केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात पाडणार कृत्रिम पाऊस

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठवाड्यासह कमी पाऊस असलेल्या जिल्ह्यांमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कृत्रिम पावसाच्या या प्रयोगाबाबत येत्या पंधरा दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याचे कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांनी मंगळवारी सांगितले. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद येथे मुख्य केंद्र उभारण्यात येणार आहे. औरंगाबादच्या अडीचशे किलोमीटर परिसरात हा पाऊस पाडण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तत्त्वावर हा प्रयोग केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात १ ते ७ जुलै दरम्यान कृषी जागृती सप्ताह राबविला जाणार आहे. त्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत राज्यमंत्री शिंदे यांनी कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची माहिती दिली. राज्यात आतापर्यंत ४० टक्के म्हणजे ५० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. मात्र, राज्यात सर्वदूर पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. 'बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर तसेच जालना व परभणी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे हा प्रयोग केला जाणार आहे,' असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पाऊस व हवामानाची स्थिती शेतकऱ्यांना कळावी, यासाठी मंडल स्तरावर २ हजार ६५ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) सहकार्याने ही केंद्रे उभारण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी येथे (४८ मिमी) झाली. सांताक्रूझ, महाबळेश्वर, सांगली, परभणी, नागपूर, वर्ध्यातही पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवसांत राज्यात कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांचा ओढा सायन्सकडेच

0
0

व्यवसाय मार्गदर्शन चाचणीतील निष्कर्ष; प्रशासकीय सेवेला दहा टक्के विद्यार्थ्यांची पसंती

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारच्या व्यवसाय मार्गदर्शन केंद्राकडून दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखेकडे जावे याची कलचाचणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत ८५ टक्के विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान शाखेकडेच असल्याचे समोर आले. वाणिज्य शाखेकडे जाण्याकडे विद्यार्थी कमी इच्छुक आढळून आले तर, कला शाखेत जाऊन प्रशासकीय सेवेकडे जाण्याचा मार्ग निवडण्यासाठी इच्छा १० टक्के विद्यार्थ्यांनी दर्शविली.
शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात राज्य सरकारची व्यवसाय मार्गदर्शन संस्था आहे. विभागीय संस्थेतून औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी आणि बीड जिल्ह्याचे काम चालते. वर्षभर माध्यमिक शाळांना भेटी देऊन या संस्थेमार्फत समुपदेशक कलचाचणी, व्यवसाय मार्गदर्शन केले जाते, असे विभागीय व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी डी. आर. चवणे यांनी सांगितले. दहावी व बारावीची परीक्षा झाल्यानंतर या केंद्रातर्फे कलचाचणी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा एप्रिल, मे आणि जून महिन्यांत घेतली जाते. यंदाच्या परीक्षेविषयी सांगताना सहायक व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी संजय ससाणे यांनी सांगितले की, ३६१ विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. चाचणीमध्ये विद्यार्थ्यांचा कल कुठे आहे, कुठल्या क्षेत्रात करिअर करावेसे वाटते, आवडत्या क्षेत्राचे ज्ञान कसे आहे, यांच्याशी निगडित प्रश्न विचारले जातात. संबंधित विषयातील तज्ज्ञ उत्तरांची तपासणी करतात. यंदाच्या चाचणीतून ८५ टक्के विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे ओढा असल्याचे समोर आले. मेडिकल, इंजीनिअरिंग, फार्मसी क्षेत्रात करिअर करण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता दिसून आली. १० टक्के विद्यार्थी कला शाखेकडे जाऊन प्रशासकीय सेवेत जाण्याच्या मार्गाने विचार करणारे होते. वाणिज्य शाखेकडे मात्र तुलनेत कमी ओढा दिसून आला.

आता प्रत्येक विद्यार्थ्यांची कलचाचणी

राज्य सरकारने यापुढील काळात राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याची कलचाचणी घेण्याचे ठरविले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली तर या केंद्राला पुन्हा 'अच्छे दिन' येणार आहेत. आठवीपासून विद्यार्थ्यांची कल चाचणी तपासली गेली तर चांगली साखळी निर्माण होऊ शकेल. शालेय जीवनापासून कल निश्चित झाला तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचेही महत्त्व त्या प्रमाणात वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृप्ती अंधारे यांचे निलंबन शिक्षण आयुक्तांकडून रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

भूम येथील गट शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांचे सीईओ जिल्हा परिषद यांनी केलेले निलंबन शिक्षण आयुक्त यांनी रद्द केले. एवढेच नव्हे तर आयुक्तांनी सीईओच्या निलंबनाच्या आदेशावर ताशेरे ओढले आहेत.

कर्तव्यात कसूर करणे, नोकरीच्या ठिकाणी अनुपस्थित रहाणे, बेजबाबदार वर्तनासह वरिष्ठांना आदेश न जुमानणे याशिवाय सातारा येथील पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बदनामीच्या गुन्ह्याचा संदर्भ देत भूम (जि. उस्मानाबाद) येथील शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांना जिल्हा परिषद सीईओ सुमन रावत यांनी तडकाफडकी निलंबित करून कार्यमुक्त केल्याचे आदेश २९ जून रोजी दिले होते. या आदेशाविरोधात तृप्ती अंधारे यांनी शिक्षण आयुक्त यांच्याकडे दाद मागितली होती.

या प्रकरणी तृप्ती अंधारे यांची बाजू ऐकून घेऊन पुणे येथील शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्हा परिषद सीईओचे आदेश रद्द केल्याचा फतवा ३० जून रोजी काढला. तसेच त्यांना पूर्ववत कामावर रुजू करून घेण्याबाबत आदेश दिले आहेत. यामुळे अंधारे यांना पुन्हा पदस्थ होण्याचा मार्ग मोकळा झाला.

सातारा येथील एका अधिकाऱ्याचा बदनामी केल्याचा गुन्हा सातारा पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे कारण दाखवून शिवाय याचबरोबर अन्य कारणे दर्शवित जिल्हा परिषद सीईओ सुमन रावत यांनी गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांना निलंबित केले होते. निलंबन करताना अनेक कारणेही देण्यात आली.

अंधारे यांचा गुन्हा सिद्ध झालेला नाही. शिवाय तो गुन्हा वैयक्तिक स्वरुपाचा गुन्हा असल्याने लोकहिताला बाधा नाही. गुन्ह्यातील अभिकथने गंभीर स्वरुपाची नाहीत. सातारा येथे गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांच्याकडून तपासाला बाधा येणार नाही, आदी बाबींचा निलंबन करताना विचार करण्यात आलेला नाही, असेही शिक्षण आयुक्तांच्या निलंबन रद्दबाबतच्या आदेशांत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्रमशाळेची मान्यता रद्द

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

आघाडी सरकारचे तत्कालीन आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड यांचा आश्रमशाळा सुरू करण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.रवींद्र बोर्डे व न्या. व्ही. के. जाधव यांनी रद्द ठरविला.आदिवासी विकास आयुक्तांचे आदेश कायम झाल्याने माटसावंगी (जि.हिंगोली) येथील आश्रमशाळेची मान्यता रद्द झाली आहे. चोंडीचे सरपंच दिनेश अंभोरे यांनी जनहित याचिका केली होती.चोंडी फाट्याजवळील माटसावंगी येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत असुविधा आहेत. त्यामुळे या शाळेची मान्यता रद्द करावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. कोर्टाने ही विनंती मान्य केली.

३ जानेवारी १९९९ रोजी या आश्रमशाळेला मान्यता मिळाली. आदिवासी विकास आयुक्तांनी फेब्रुवारी २०१०मध्ये या शाळेची तपासणी केली. ही तपासणी अमरावतीचे जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांनी केली होती. या शाळेत असुविधा होत्या. संस्थेची इमारत नाही, मुलांना निवासाची सोय पुरविली नाही, शाळेच्या ग्रंथालयात पुस्तके कमी, विज्ञान ग्रंथालय नाही, प्रयोगशाळा नाही, रात्रीच्या वेळी मुलींसाठी महिलेची नियुक्ती केली नाही, मुला -मुलींची वैद्यकीय तपासणी केली जात नाही, मुला -मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही, स्वयंपाकघर नीट-नेटके नाही अशा असुविधा या तपासणीत आढळल्या. त्यामुळे आदिवासी विकास आयुक्तांनी या आश्रमशाळेची मान्यता रद्द केली. या निर्णयाला आव्हान देण्यात आले. असुविधांची पूर्तता करण्याची हमी घेतल्यानंतरच पुन्हा आश्रमशाळेला मान्यता देण्यात आली. ५ मार्च २०१२रोजी या संस्थेला पुन्हा कारणे दाखवा नोटीस दिली होती. ७ जून २०१३ रोजी आयुक्तांनी शाळेची मान्यता दुसऱ्यांदा रद्द केली. या आदेशाला संस्थाचालकाने आदिवासी मंत्र्याकडे अपील केले. तत्कालीन मंत्री मधुकरराव पिचड यांनी एका ओळीत आदेश देऊन आश्रमशाळा सुरू करण्याची शेवटची संधी दिली. या आदेशाला सरपंच दिनेश अंभोरे यांनी हायकोर्टात आव्हान दिले.

कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार या शाळेची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार एकात्मिक बाल विकास योजनेचे प्रकल्प अधिकारी यांनी तपासणी पूर्ण करून हायकोर्टात अहवाल सादर केला. या अहवालातही आश्रमशाळेत सुविधांचा अभाव होता. त्यामुळे कोर्टाने मंत्र्यांचा आदेश रद्द केला. अखेर ही आश्रमशाळा बंद झाली. याचिकाकर्त्याची बाजू रामचंद्र निर्मळ यांनी मांडली. राज्य शासनातर्फे संगीता धुमाळ , तर संस्थेतर्फे एच.एच.पाडळकर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्णा कारखान्यास हायकोर्टाची नोटीस

0
0

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ऊसाला एफ.आर.पी. (किमान भाव )नुसार पैसे देणे बंधनकारक आहे. परंतु, पूर्णा सहकारी साखर कारखान्याने त्यानुसार भाव दिला नाही म्हणून ऊसउत्पादक शेतकऱ्याने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली . या याचिकेत प्रतिवादी राज्य व केंद्र शासनासह पूर्ण सहकारी साखर कारखान्यास नोटीस बजावण्याचे आदेश न्या. रवींद्र बोर्डे व न्या. पी. आर. बोरा यांनी दिले आहेत.

ऊसउत्पादक रुपेश देशमुख यांनी ही याचिका केली आहे.२०१३-१४मध्ये केंद्र शासनाने एफ.आर.पी. नुसार२१०० रुपये प्रती टन असा भाव ठरविला होता.हा दर ९.५ टक्के उताऱ्यासाठीचा होता. पुढील १ टक्यास २२१रुपये भाव ठरविला होता.परंतु पूर्णा साखर कारखान्याने १९००रुपये प्रती टन भाव दिला होता. त्यामुळे याचिकाकर्त्याने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. कोर्टाने प्राथमिक सुनावणीत राज्य, केंद्र शासन आणि पूर्णा कारखान्यास नोटीस बजावली.राज्य शासनातर्फे डी. आर. काळे तर केंद्रातर्फे संजीव देशपांडे यांनी नोटीस स्वीकारली. याचिकाकर्त्यांची बाजू शिवसांब जनकवाडे हे मांडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विश्रांतीनंतर पावसाची हजेरी

0
0

टीम मटा, औरंगाबाद

गेल्या दहा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असतानाच बुधवारी बीड, लातूर जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सुकू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पुन्हा एकदा पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे.

बीडमध्ये वरुणराजाचे आगमन

बीड जिल्ह्यात दडी मारलेल्या वरुणराजाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातील काही भागात बुधवारी पावसाने हजेरी लावली.

दुपारपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात आभाळ भरुन आले होते. काही ठिकाणी वरुणराजा बरसल्याने पवासाअभावी सुकू लागलेल्या पिकाला जीवदान मिळाले आहे. मात्र,अजूनही जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होणे अपेक्षित आहे. बीड जिल्ह्यातील काही भागात सात जूनच्या सुमारास पाऊस पडला. त्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी उरकली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने बळीराजा अडचणीत सापडला होता. मात्र, बुधवारी पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने आता शेतकरी वर्गात आशेचे किरण दिसत आहेत.

लातूरमध्ये पावसाला सुरुवात

तब्बल तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर लातूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे. लातूर शहरात बुधवारी एक तास जोरदार पाऊस झाला. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वांभर गावंडे म्हणाले, 'जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे. अहमदपूर, उदगीर शहरात पावसाने हजेरी लावली. निलंगा, देवणी परिसरात रिमझिम पाऊस होता. चाकुर तालुक्याच्या ठिकाणी पाऊस नसला तरी नळेगाव आष्टामोड यापरिसरात पाऊस झाला. पेरणीसाठी मात्र, मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकरी करीत आहेत.

उस्मानाबादमध्ये रिमझिम

उस्मानाबाद- उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील काही भागात बुधवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने प्रतीक्षेत असलेल्या बळीराजातून समाधान व्यक्त केले जात आहे. बुधवारी दुपारनंतर शहरात ढगाळ वातावरण होते. सांयकाळनंतर रिमझिम पावसाने हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फडणवीस सरकार शेतकरी विरोधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

'केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी असून राज्यातील फडणवीस सरकारचे धोरणही कोणत्याही प्रकारे शेतकरी हिताचे नाही. त्यामुळे राज्यात शिवसेना-भाजप युतीत कधीही काडीमोड होऊ शकतो,' असे खळबळजनक विधान शिवसेनेचे माजी आमदार आर. एम. वाणी यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या कांदा आयात धोरणाचा शिवसेनेतर्फे बुधवारी (१ जुलै) येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना वाणी यांनी मित्र पक्षावर जाहीर टीका केली. 'सध्याचे फडणवीस सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या पावलावर पाऊल ठेऊन भ्रष्ट कारभार करत आहे. त्यामुळे या सरकारमध्ये काम करण्यास शिवसेनेला रस नाही,' असे ते म्हणाले. येत्या १८ जुलै रोजी ज्येष्ठ नेते सुभाष देसाई वैजापुरात येणार आहेत. त्यावेळी शिवसैनिकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे आश्वासन माजी आमदार वाणी यांनी दिले. 'लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याने भाजपच्या डोक्यात हवा गेली. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती तोडण्याची भाषा केली. परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत राज्यात साठपेक्षा अधिक जागा मिळवणाऱ्या शिवसेनेने एक महिना विधानसभेत विरोधी बाकावर बसणे पसंत केले,' अशी आठवणही त्यांनी यावेळी भाषणात करून दिली.

यावेळी तालुकाप्रमुख रमेश बोरनारे, बाजार समिती उपसभापती अॅड. आसाराम रोठे, संजय पाटील निकम, आनंदी अन्नदाते यांची भाषणे झाली. सूत्रसंचलन सुनील गायकवाड यांनी केले. पंचायत समिती सदस्य रामहरी जाधव, खुशालसिंह राजपूत, मनाजी मिसाळ, अविनाश गलांडे, अनिल आल्हाट, भाऊसाहेब गलांडे, राजेंद्र साळुंके, प्रमोद कुलकर्णी, कचरू पाटील डिके, शिवलिंग साखरे, साहेबराव औताडे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वेक्षणासाठी शाई आणायाची कोठून?

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

तालुक्यात ४ जुलै रोजी पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात शाळाबाह्य मुलाच्या बोटावर शाईने खूण केली जाणार आहे. परंतु, त्यासाठी शाईचा पुरवठा न केल्याने प्रश्न निर्माण झाला आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटात प्रत्येक बालकास शिक्षण देणे अनिवार्य आहे. परंतु, काही कारणामुळे काही मुले शाळेत जात नाहीत. त्यांना शोधण्यासाठी संपूर्ण राज्यात एकच पद्धत वापरून सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण, कामगार, आदिवासी, अल्पसंख्याक, सार्वजनिक आरोग्य आदी अकरा विभागाचे अधिकारी व कर्मचारी सामील होणार आहेत. यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यात एकाच दिवशी शहर, गाव, खेडे, वाडी, वस्ती, तांडे, शेतमळा आदी विविध ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. बसस्थानक, रेल्वेस्टेशन, बाजार आदी ठिकाणीही निवडणूक आणि पल्स पोलिओ मोहिमेसारखेच सर्वेक्षण करण्यात करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी दिल्या आहेत. सर्वेक्षणात शाळाबाह्य मुलांच्या बोटाला शाई लावली जाणार असून सर्वेक्षणानंतर आठ दिवसांत या मुलांचे आधारकार्ड नोंदणी करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

खुलताबाद तालुक्यात २५ हजार ४२७ कुटुंब संख्या गृहित धरून सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे पथकांसोबत शाळाबाह्य मुलांच्या बोटांना लावण्यासाठी शाई द्यावी लागणार आहे. पण शासनाकडून अद्याप शाईचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणेसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शाईबद्दल जिल्हास्तरावरून अद्याप सूचना आल्या नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यात्रा मैदानावर गंडांतर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

संत एकनाथ नाथषष्ठी यात्रा महोत्सवासाठी आरक्षित जागेवर कोणतेही पक्के बांधकाम करू नये, असे आदेश असतानाही नगरपालिकेतर्फे यात्रा मैदानात व्यापारी संकुल बांधले जात आहे. यामुळे यात्रा मैदानाची जागा निम्म्याने कमी होणार आहे.

दरवर्षी संत एकनाथ महाराज यात्रा महोत्सव नाथ समाधी मंदिर परिसरात साजरा केला जातो. यात्रा उत्सवादरम्यान राज्यभरातून जवळपास पाच ते सहा लाख भाविक व बाहेरगावाचे व्यापारी पैठणमध्ये दाखल होतात. यात्राकाळात भाविकांची राहण्याची व्यवस्था व व्यवसायासाठी नाथ समाधी मंदिर परिसर यात्रा मैदान म्हणून आरक्षित करण्यात आला आहे. यात्रा मैदानात कोणत्याही प्रकारच्या पक्क्या बांधकामाला परवानगी नाही. शिवाय ही जागा कोणासही भोगवटा म्हणून भाडेतत्त्वावर देण्यात देवू नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी कार्यालकडून पैठण नगरपालिकेला देण्यात आलेले आहेत.

हे आदेश धाब्यावर बसवून अनेक वर्षांपासून नगरपालिकेतर्फे यात्रा मैदानातील जागा जवळपास शंभर व्यापार्यांना अकरा महिन्याच्या भाडेकररावर देण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून यात्रा मैदानातील मारवाडी धर्मशाळेशेजारी व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या व्यापारी संकुलामुळे अर्धे यात्रा मैदान व्यापले जाणार आहे. परिणामी, नाथषष्ठी यात्रेसाठी येणारे भाविक व व्यापार्यांना जागा अपुरी पडणार आहे.

याविषयी माजी मंत्री व पैठणचे माजी नगराध्यक्ष अनिल पटेल यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, मी नगराध्यक्ष असताना यात्रा मैदानात पक्के बांधकाम तर सोडाच कोणालाही तातपुरता शेडही उभे करण्याची परवानगी देवू नये, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरपालिकेस प्राप्त झाले होते.

गेल्या वर्षीच्या नाथषष्ठी यात्रेत नगरपालिकेने दहापट भाडेवाढ करून बाहेरगावाहून येणाऱ्या व्यापाऱ्यांची कंबर मोडली होती. आता आरक्षित यात्रा मैदानावर व्यापारी संकुल बांधून नाथषष्ठी उत्सवात अडथळा निर्माण केला जात आहे. दरम्यान, यात्रा मैदानात व्यापारी संकुल बांधून नगरपालिका यात्रेच्या मूळ हेतुला बाधा पोहचवित आहे. हे बांधकाम त्वरित थांबवून जागा यात्रेसाठीच राखीव ठेवावी, अशी मागणी शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी केली आहे.

यात्रा मैदानात पक्के बांधकाम करण्यास परवानगी देऊ नये, असा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असेल, तर त्याबद्दल मला माहिती नाही. या आदेशाचा शोधा घ्यावा, असे निर्देश नगरपालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

- संजय पवार, तहसीलदार तथा मुख्याधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौका-चौकात वाहनांच्या रांगा

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

वाळूज महानगर व एमआयडीसीत वाहतुकीला शिस्त राहिली नसून अनेक चौकात जड वाहनांच्या रस्त्याकडेला रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. वाळूज एमआयडीसीत दररोज शेकडो वाहनांची ये-जा असते. अपेरिक्षांसह, खासगी बस, जड वाहनांची वर्दळ आहे. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये रस्त्याकडेला सर्वत्र वाहने पार्क करण्यात येत असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना वाट काढावी लागते. रस्त्याकडेला थांबलेल्या वाहनांमध्ये कंपन्याचा माल असतो. चौकांमध्ये अॅपेरिक्षा, लोडिंग वाहनांनी ठाण मांडलेले असते. त्यामुळे वाळूज महानगरमध्ये सर्व रस्त्यावर सर्वत्र वाहनांच्या रांगा लागल्यासारखी परिस्थिती आहे. वाहनांच्या मागून अचानक दुसरे वाहन येते, त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत.

तिरंगा चौकात एमआयडीसीने लावलेला वाहतूक सिग्नल नहेमीच बंद असतो. त्यामुळे सायंकाळी काही वाहनधारकांमुळे अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होता. मोरे चौक, महाराणा प्रताप चौक आदी ठिकाणीही वाहतूक सिग्नल आहेत. पण तेथे वाहतूक पोलिसाची नियुक्ती नसल्याने वाहनधारक शिस्त पाळत नाहीत. येथील वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images