Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नगरसेविकेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शाळा सोडल्याचा दाखल्यात खाडाखोड करून जात व वैधताप्रमाणपत्र प्राप्त केल्याच्या तक्रारीवरून नगरसेविकेसह मुख्याध्यापिकेविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रेशमा अशफाक कुरेशी असे नगरसेविकेचे आणि असगरी बेगम असे मुख्याध्यापिकेचे नाव आहे. याप्रकरणात डॉ. अंजली कराड यांनी पोलिसांत तक्रार दिली. एप्रिल २०१५मध्ये त्यांनी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असेलेल्या वार्ड क्रमांक ६९मधून निवडणूक लढवली. दरम्यान, माहिती अधिकारात रेशमा कुरेशी यांची शैक्षणिक माहिती घेतल्याचे डॉ. कराड यांनी नमूद केले. कुरेशी यांनी अल असगरी उर्दू माध्यमिक शाळेले दिलेल्या इयत्ता नववीच्या टीसीत शाळा सोडल्याची तारीख नाही. महापालिकेच्या चेलीपुरा शाळेतील तिसरीच्या टीसीत तफावत आढळली. अल असगरी शाळेच्या टीसीत त्यांनी खाडाखोड करून 'कुरेशी, खाटिक, ८८' असा उल्लेख केला. अंक इंग्रजीऐवजी मराठीत लिहिले आहेत. महापालिकेच्या प्रवेश निर्गम उताऱ्यात जातीचा उल्लेख नाही. अल असगरी शाळेच्या इयत्ता नववीच्या टीसीत मुस्लिम खाटीक असा उल्लेख आहे. टीसीत बदल करून त्याद्वारे ओबीसी प्रवर्गाचे जात व वैधता प्रमाणपत्र मिळवून पालिका निवडणूक लढवली, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले. त्यावरून जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमोहन सोनियांचे आदेश मानत असत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सोनिया गांधी यांच्या इशाऱ्यावर नाचत होते. पंतप्रधान केवळ सोनियांचेच आदेश मानत होते, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी शनिवारी औरंगाबादमध्ये केली.

चार्टर्ड अकाउंटंटच्या पश्चिम विभागीय मंडळाच्या अधिवेशनासाठी ते येथे आले होते. त्यांच्या उपस्थितीत शनिवारी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यांनी भाषणात दोन वेळा माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, 'आपल्या विचारसणीवर देशाच्या विकासाची वाटचाल अवलंबून असते. त्यामुळे विचारसणी सर्वात अधिक महत्त्वाची असते. मनमोहनसिंग शक्तीशाली पदावर होते, परंतु ते केवळ सोनियांचेच अज्ञानधारक राहिले.'

टेलिकॉममध्ये वन-जी, टू-जी, थ्री-जी, फोर-जीबाबत आपण ऐकतो. पंतप्रधान असताना मनमोहनसिंग यांना याबाबत विचारले असता त्यांनी सोनियाजी अँड राहुलजी, असे उत्तर दिले होते. अशी गल्लत करू नका, असे सांगत त्यांनी सोनिया आणि राहुल यांची खिल्ली उडविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगासाठी ‘सेल’चा डेपो औरंगाबादेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उद्योगांची वाट सुकर होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अपेक्षित सहकार्य असले पाहिजे. औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचा (सेल) डेपो औरंगाबादेत उभारण्यात येईल. या दृष्टीने पाऊल टाकण्यासाठी लवकरच दिल्लीत बैठक बोलाविण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत ​गिते यांनी शनिवारी येथे केली.

मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'चे लोकार्पण शुक्रवारी झाले. यानिमित्ताने 'डेस्टिनेशन मराठवाडा फॉर मेक इन इंडिया' उपक्रम आयोजित केला होता. त्याचा समारोप गिते यांच्या उपस्थितीत शनवारी झाला, यावेळी ते बोलत होते.

गिते म्हणाले, 'देश व राज्यात बदलाचे परिणाम हळूहळू जाणवत आहेत. हा बदल घडताना नागरिकांनी काही अपेक्षा ठेवल्या आहेत. त्या आम्हीच वाढविल्या आहेत. त्या पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी आमच्यावर आहे. थोडा वेळ लागेल, पण सुरूवात झाली आहे. मराठवाडा ऑटो क्लस्टर ही काळाची गरज आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल तर असे उपक्रम आवश्यक आहेत. उद्योगांची वाट सुकर व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घेण्याचे ठरविले आहे.'

आम्ही दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. 'इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन' आणि मेगा आणि मेट्रो शहरांमध्ये ज्या पब्लिक ट्रान्स्पोर्ट आहेत, तेथे इंधनाला पर्याय म्हणून बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांचा विचार केला जाणार आहे. १४ हजार कोटींचा हा कार्यक्रम असून त्याची अंमलबजावणी एप्रिलपासून सुरू झाली आहे. दुसरा उपक्रम 'कॅपिटल गुड्स सेक्टर' असेल. लघु व मध्यम उद्योगांसाठी हा ९३० कोटींचा उपक्रम असून त्यातील ५८० कोटी रुपये सरकार देईल. उर्वरित रक्कम संबंधित संघटनांच्या माध्यमातून जमा केली जाईल. देशभरात पाच क्लस्टर उभारले जातील, अशीही माहिती गिते यांनी दिली. खासदार चंद्रकांत खैरे, मराठवाडा ऑटो क्लस्टरचे चेअरमन राम भोगले, आमदार प्रशांत बंब, महापौर त्र्यंबक तुपे, 'मासिआ'चे अध्यक्ष बालाजी शिंदे, 'सीएमआयए'चे माजी अध्यक्ष मुनीष शर्मा, विजय लेकुरवाळे व्यासपीठावर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राकाज्’ म्हणजे अलिबाबाची गुहाच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राकाज् लाइफ स्टाइल क्लब म्हणजे अलिबाबाची गुहाच असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. महापालिकेचे नाव पुढे करून या ठिकाणी मसाज पार्लरही चालविले जात असल्याचे उघडकीस आले. या प्रकारामुळे अचंबित झालेले आयुक्त प्रकाश महाजन यांनी रीतसर पंचनामा करून या क्लबला सील ठोकण्याचे आदेश दिले. कराराचे उल्लंघन केले असेल तर, क्लबवर कायदेशीर कारवाई केली जाईल, पोलिसांतही तक्रार नोंदवली जाईल असे आयुक्त म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी छापा मारून हुक्का पार्लर बंद केला होता. त्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी या क्लबला भेट देऊन पाहणी केली तेव्हा अनेक अनियमितता पुढे आल्या. विनापरवाना पूल टेबल, हुक्का पार्लर, संगीत शिकवण्याची खोली, डान्स रूम, लेडीज आणि जेंटस् पार्लर आदी बाबी समोर आल्या. पूल टेबलच्या हॉलच्या काचेतून पोहण्याच्या तलावात पोहणाऱ्यांचे निरीक्षण करण्याची व्यवस्था होती. या प्रकाराची गंभीर देखल घेऊन महापौरांनी अनधिकृत व अतिक्रमित बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. त्यानंतरही क्लबच्या संचालकाला अभय देण्याचाच संबंधित पालिका अधिकाऱ्यांचा 'मूड' होता. पालिकेचे बीओटी कक्ष प्रमुख सिकंदर अली हे आहेत. त्यांनी कारवाईस टाळाटाळ केल्याचे लक्षात आल्यामुळे शनिवारी सायंकाळी महापौर व उपमहापौरांनी पुन्हा 'राकाज्' ला भेट दिली. तेव्हा आधीच्या भेटीत लक्षात न आलेले मसाज पार्लर त्यांना आढळले. त्यांनी आयुक्त प्रकाश महाजन यांनाही बोलावून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम पावसाचा निर्णय लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. या परिस्थितीत राज्य सरकार कृत्रिम पाऊस पाडण्याच्या निर्णयावर ठाम आहे. या प्रयोगासाठी 'एनजीओ'चे प्रस्ताव आले असून प्रात्यक्षिक पाहिल्यानंतरच कृत्रिम पावसाचा अंतिम निर्णय घेतला जाईल' अशी माहिती कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी (४ जुलै) झालेल्या कृषी आढावा बैठकीत ते बोलत होते.

मागील बारा दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे खरीपाची पिके संकटात आहेत. मराठवाड्यात जवळपास ६० टक्के पेरणी झाली आहे. या पिकांना पावसाची नितांत गरज असताना पाऊस गायब झाला. मागील वर्षी गंभीर दुष्काळ अनुभवल्यामुळे राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांनी घेतलेल्या कृषी आढावा बैठकीत या प्रयोगाची सविस्तर माहिती दिली. 'आतापर्यंत राज्यात एकूण १०५ टक्के पाऊस झाला; मात्र उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद, हिंगोली अशा जिल्ह्यात पावसाचे नगण्य प्रमाण आहे. उगवलेली पिके कशीबशी तग धरून आहेत. कृत्रिम पावसाचा निर्णय सरकारने घेतला आहे. दुष्काळी परिस्थिती दूर करणे आणि खरीप पिकांना जीवदान देण्यासाठी लवकरच कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल' असे शिंदे यांनी सांगितले. कृत्रिम पावसाचा प्रयोग केलेल्या काही 'एनजीओं'नी राज्य सरकारला प्रस्ताव दिले आहेत. निवडक संस्थांचे प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर तात्काळ प्रयोगाला संमती दिली जाईल असेही शिंदे म्हणाले. पावसाने दडी मारल्यामुळे कृत्रिम पावसाचा निर्णय लवकर घेण्यात येणार आहे. याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे दोन आठवड्यात मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात कृत्रिम पावसाची शक्यता आहे.

औरंगाबाद केंद्र

कृत्रिम पावसाचा प्रयोग औरंगाबादला केंद्रबिंदू ठेवून केला जाणार आहे. औरंगाबाद परिसराच्या २५० किलोमीटर परिघात पाऊस पाडला जाणार आहे. यापूर्वी राज्यात राबविलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे यश उल्लेखनीय नव्हते. त्यामुळे सर्व कसोट्यांवर पडताळणी करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील २३ हजार गावे दुष्काळात होरपळली आहेत. त्यामुळे राज्य सरकार कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी आग्रही आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षांचे निकाल जाहीर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इंजिनीअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमांचे निकाल लवकर जाहीर करा, असे साकडे राज्यातील विद्यापीठांना तंत्रशिक्षण विभागाने केले आहेत. विद्याप‌ीठांचे निकाल रखडल्याने अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या थेट द्वितीय वर्षाची प्रक्रिया रखडलेली आहे. पॉलिटेक्निकचा अंतिम वर्षाचा निकाल जाहीर होऊन महिनाभराचा कालावधी उलटला, तरी प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने विद्यार्थी वैतागले आहेत.

विद्यापीठांतर्फे घेण्यात येणाऱ्या इंजिनीअरिंग परीक्षांच्या निकालावर थेट द्वितीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया अवलंबून असते. प्रथम वर्षाच्या निकालानंतर किती रिक्त जागा आहेत, याचे चित्र स्पष्ट होते. पदविका अभ्यासक्रमाचे उत्तीर्ण विद्यार्थी त्यासाठी पात्र ठरतात. राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर होऊन महिना होत आला तरीही अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमासाठीची थेट द्वितीय वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. विद्यापीठांमुळे प्रक्रियेला विलंब होत अाहे. त्यामुळे तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर करा, असे सांगितले आहे. निकालाला विलंब झाला तर ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी ऑगस्टच्या दुसरा किंवा शेवटचा आठवडा लागेल, असेही तंत्रशिक्षणच्या सूत्रांनी सांगितले. प्रक्रिया केव्हा सुरू होणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागलेले आहे.

दरवर्षी सुमारे ४० हजार विद्यार्थी या प्रक्रियेतून प्रवेश घेताता. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या २० टक्के जागा राखीव असतात. त्याचबरोबर प्रथम वर्षाला अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमुळे रिक्त राहणाऱ्या जागांही याच प्रवेश प्रक्रियेतून भरल्या जातात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व विद्यापीठांनी प्रथम वर्षाचे निकाल त्वरित जाहीर करावेत. त्यामुळे थेट द्वितीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया राबविता येईल असे, तंत्रशिक्षणने पत्रात स्पष्ट केले आहे.

परीक्षांनाच उशीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या परीक्षाच मेअखेरपर्यंत सुरू होत्या. त्यानंतर निकाल, पुढे रिड्रेसलची प्रक्रिया असते.. त्यामुळे निकाल लांबण्याचे प्रकार दरवर्षी होतात. यामुळे प्रत्यक्ष निकालाला मुहूर्त केव्हा लागणार, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८२ बियाणे दुकानांवर बंदी

$
0
0

अरुण समुद्रे, लातूर

नामवंत कंपन्याच्या नावाने बोगस बियाणे विकण्याच्या तक्रारीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने जून महिन्याच्या सुरुवातीपासुनच कंबर कसली होती. त्यामुळे पाच जिल्ह्यातील २८२ दुकानदारांना विविध पिकाचे बियाणे विक्रीवर बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या दुकानांमध्ये नांदेड जिल्ह्यातील दुकाने सर्वाधिक आहेत.

लातूर विभागात लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्याचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारी आणि कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी एक जुलै २०१५ पर्यंत केलेल्या तपासणीत आढलेले बनावट खते, बियाणे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे.

विक्रीवर बंदी घातलेली संख्या ही २८२ असून त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील १४४ दुकानांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील १४, उस्मानाबाद जिल्ह्यातील ३०, परभणी जिल्ह्यातील २७, आणि हिंगोलीत ६७ दुकांनाचा समावेश आहे. या दुकानामध्ये बनावट आढळून आलेले आहे. त्याचे नमुने जप्त करुन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. त्या कंपनीचे किंवा वाणाच्या बियाणे विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. खताच्या बाबतीत ही विभागात ३७ प्रकारची खते विकण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जप्त केलेल्या बियाण्याची किमंत आठ लाख २५ हजार असून खताची किंमत ३३ हजार रुपये आहे.

या सर्व घटनांमध्ये बियाण्याच्या प्रकारात दोन, खत प्रकरणी तीन, पोलीस केसेस करण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे १६ बियाणे विक्रेते, २३ खत विक्रेते, १५ किटकनाशक विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. १८ बियाणे विक्रेत्यांचे, ३३ खत विक्रेत्यांचे, १९ किटकनाशक विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. बियाण्याच्या प्रकरणात पाच, खत प्रकरणी दोन आणि किटकनाशक प्रकरणात तीन दुकानदारांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पिपंळगाव येथील एका दुकानात अजित सिडस कंपनीच्या अजित एसीएच १५५ वाणाचे बीटी कापसाचे बनावट बियाणे विकले जात असतानाच ते पकडले गेले. लातूर विभागचे कृषी सहसंचालक कार्यालयाचे तंत्र अधिकारी व्ही. एम. व्यवहारे म्हणाले, 'अजित सिडस कंपनीच्या नावानेच बनावट बीटी कापसाचे बियाणे विकले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करुन बियाण्याच्या ९० पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्याच्या विरोधात कंपणी आणि कृषी विभागाने संयुक्त तक्रार दाखल केली आहे. वाशी पोलिस त्या परिसरात याच कंपनीचे बनावट बियाणे विकले जात आहेत का? त्याचे काही रॅकेट आहे का याचा शोध घेत आहेत.'

जिल्हा कारवाई केलेली दुकाने

नांदेड १४४

लातूर १४

उस्मानाबाद ३०

परभणी २७

हिंगोली ६७

एकूण २८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राकाज्’मध्ये मसाज पार्लर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने बीओटी तत्त्वावर विकसित केलेल्या आणि राकाज् लाइफ स्टाइल क्लबला चालवण्यासाठी दिलेल्या स्विमिंग पुलाच्या परिसरात जलतरणाला दुय्यम स्थान होते. क्लबच्या पहिल्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या जेंटस् आणि लेडिज पार्लरच्या नावाखाली खुलेआम मसाज पार्लर चालविले जात असल्याचे उघड झाले. महापौर, उपमहापौर, महापालिकेचे आयुक्त यांनी आज शनिवारी याची पाहणी केली, त्यावेळी अनेक अवैध धंद्यांचा भांडाफोड झाला.

महापौर त्र्यंबक तुपे आणि उपमहापौर प्रमोद राठोड यांनी दोन दिवसांपूर्वी 'राकाज्'ला भेट दिली होती. त्यावेळी पूल टेबल हॉलची सरकती खिडकी, सरकत्या खिडकीतून दिसणारा पोहण्याचा तलाव, हुक्का पार्लर आदी उघड झाले होते. आज पुन्हा तुपे, राठोड यांनी 'राकाज्' भेट दिली. यावेळी पालिकेचे बीओटी कक्षप्रमुख सिकंदर अली, राकाज् लाइफ स्टाइलचे संचालक सुनील राका उपस्थित होते. सिकंदर अली राका यांची पाठराखण करण्यासारखे बोलत होते, पण त्याकडे या पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी राका यांना बोलावले व त्यांच्याकडून क्लबमध्ये सुरू असलेल्या अवैध व अनैतिक बाबींविषयी विचारणा केली. दरम्यानच्या काळात आयुक्त प्रकाश महाजन देखील आले.

पोहण्याच्या तलावाच्या समोरच्या बाजुला प्रशासकीय कामासाठी इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीच्या गच्चीवर लेडीज आणि जेंट्स पार्लरचे विनापरवाना बांधकाम करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट झाले. लेडिज आणि जेंट्स पार्लरला जाण्यासाठी एकच दार होते. एकाच खोलीत महिला आणि पुरुषांची कटिंग केली जात होती.

विशेष म्हणजे महिलांची कटिंग करण्यासाठी पुरूष कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते, ही बाबही यावेळी उघड झाली. महापौरांनी सुरुवातीला सौम्य आवाजात आणि त्यानंतर आवाज चढवून या दोन्ही पार्लरबद्दल तेथील कर्मचाऱ्यांना माहिती विचारली. त्यावेळी, 'येथे मसाज केली जाते,' असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. महिलांच्या मसाजसाठी पुरुषांची तर, पुरुषांच्या मसाजसाठी महिलांची नियुक्ती केली जात असल्याचे महापौरांच्या लक्षात आणून देण्यात आले. मसाजसाठीच्या प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा होता. तेथे फक्त दोन व्यक्ती मावतील एवढ्या छोट्या आकाराचे केबिन्स तयार केले होते. प्रत्येक केबीनमध्ये पलंग होता. हे चित्र पाहिल्यावर, 'या केबिन्समध्ये काय चालत असेल याची कल्पनाच न केलेली बरी,' अशी प्रतिक्रिया महापौर, उपमहापौरांच्या तोंडातून बाहेर पडली.

प्रत्येक खोलीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कंट्रोलिंग पार्लरच्या एका कोपऱ्यात होते. सर्व केबीनमधल्या हालचाली या कोपऱ्यात उभे राहून पहता येत होत्या. सीसीटीव्हीचे कंट्रोलिंग पॅनल महापौरांच्या आदेशाने सिकंदर अली यांनी ताब्यात घेतले. हे सर्व पाहून आयुक्त प्रकाश महाजन यांनीही आश्चर्य व्यक्त केले. 'राकाज्'च्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

'राकाज्' बंद करून उद्यान विकसित करा

राकाज् लाइफ स्टाइल क्लब कायमचा बंद करावा. क्लबच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत उद्यान विकसित करावे, अशी मागणी ज्योतीनगरमधील महिलांनी महापौर त्र्यंबक तुपे व आयुक्त प्रकाश महाजन यांच्याकडे केली आहे. महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, क्लबमध्ये रात्री-अपरात्री मुले येतात. मद्यपान करून मोठ्या आवाजात गाणे लावतात. दारूच्या बाटल्या फोडतात. हे क्लब रहिवाशांना त्रासदायक आहे. निवेदनावर तारा पवार, सुरेखा वैद्य, अपर्णी जोशी, सुचिता सोनवणे, शीतल पवार, सरोज संघई यांच्यासह ३५ महिलांची नावे आहेत.

टपोरी मुलांची वर्दळ

राकाज् लाइफ स्टाइल क्लबमध्ये असलेल्या पार्लरमध्ये टपोरी मुलांची सतत वर्दळ सुरू होती. महापौर, उपमहापौर व आयुक्तांच्या पाहणीत आक्षेपार्ह काहीही सापडू नये यासाठी त्यांची धडपड सुरू होती. एका पार्लरचे दार महापौरांनी तेथील कर्मचाऱ्याला उघडायला लावले तेव्हा पार्लरमध्ये आरशाच्या समोर तोकडे कपडे घातलेल्या दोन मुली खुर्चीवर बसल्या होत्या व त्यांची कटिंग दोन मुले करीत होते. पदाधिकारी, अधिकारी यांची ये-जा वाढल्यावर मुलींना तेथील कर्मचाऱ्यांनी गुपचूप बाहेर काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

कळंब तालुक्यांतील व वाशी तालुक्यांतील पोटनिवडणुकीचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागले आहेत. नायगाव व इंदापूर येथील राष्ट्रवादीच्या पराभवाने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. पक्षात वाढत चाललेली एकाधिकारशाही, हुकुमशाही प्रवृत्ती, नियोजनाचा अभाव, प्रचार यंत्रणेसाठीच्या खर्चाबाबतचे आखडते धोरण यामुळेच नायगाव येथील जिल्हा परिषदेसाठीच्या आणि इंदापूर येथील पंचायत समितीसाठीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला हार पत्करावी लागली.

कळंब तसेच वाशी तालुक्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. त्यामुळेच उस्मानाबाद व भूम-परंडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीला यशप्राप्ती झालेली आहे. मात्र, आता याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राष्ट्रवादीचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर या पराभवामुळे नामुष्की ओढावली आहे. एरव्ही कोणत्याही बाबीचे श्रेय लाटण्यासाठी आघाडीवर असलेले राणा जगजितसिंह पाटील हे मात्र, या पराभवाचे खापर स्वताकडे घेण्यास अद्याप पुढे आलेले नाहीत.

नायगाव जिल्हा परिषदेचा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. या परिसरात शिवाय कळंब तालुक्यात तसेच येरमाळा परिसरात नायगाव मतदार संघातून निवडून आलेल्या राष्ट्रवादीचे नेते नानासाहेब जाधवर यांचे वर्चस्व होते. एका बस अपघातात झालेल्या दु:खापतीमध्ये त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे नायगाव जिल्हा परिषदेच्या जागेसाठीची ही निवडणूक होती. त्यांच्या निधनाच्या सहानुभूतीवर येथून राष्ट्रवादीचा उमेदवार सहजपणे निवडून येणे अपेक्षित होते. मात्र, येथे तसे घडले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीच्या आत्मविश्वासामुळे येथे राष्ट्रवादीचा पराभव झाला. राष्ट्रवादीचा उमेदवार सहानभुतीच्या लाटेवर निवडून आला अशा तोहऱ्यात पक्षश्रेष्ठी वावरत होते. नेमका याचाच फटका येथे राष्ट्रवादीला बसला.

या उलट या पोटनिवडणुकीत शिवसेना व भाजप एकसंध दिसले. शिवसेना युवा सेनेचे सुरज साळुंखे, सेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उद्योजक शंकर बोरकर तसेच भाजपचे नितीन काळे, संजय निंबाळकर, संजय पाटील-दुधगावकर, अॅड. मिलिंद पाटील आदींनी नायगावची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली. मतदारांशी सुसंवाद साधत त्यांनी आपुलेसे केले व नायगावची जागा राष्ट्रवादीच्या कब्ज्यातून काढून घेण्यात यश मिळविले. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीची ताकद कमी होऊ लागल्याचेच या पोटनिवडणुकीने सिद्ध केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौण खनिजाच्या तस्करीकडे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

डोंगर आणि शेती परिसरातील खादानीतून मुरूम व पैनगंगा नदीतून वाळू उत्खनन करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. या तस्करांवर कारवाई करण्यासाठी महसूल प्रशासन दिरंगाई करत आहे. त्यामुळे शहरातील बांधकामावर मुरूम आणि पैनगंगा नदीतून वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

हिमायतनगर शहराच्या एका बाजूंनी डोंगर, टेकड्या व एका बाजूनी पैनगंगा नदी आहे. हे डोंगर पोखरून दगड, मुरुमाचे विनापरवाना उत्खनन करण्याचे काम सुरू आहे. पैनगंगा नदीतून बेसुमार वाळूचा उपसा करून साठेबाजी करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने खदानी, स्टोन क्रशन यांच्या परवान्यांचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे वाळू, दगड, मुरुमाचे उत्खनन करण्यास सध्या बंदी आहे. असे असतानाही शहरालगतच्या काही खदानीतून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी रात्रदिवस उत्खनन सुरू आहे. या सर्व प्रकाराची माहिती प्रशासनाला असताना याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. याबाबतच्या अनेक तोंडी व लेखी तक्रारी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे नागरिकांनी केल्या आहेत. मात्र, गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कोणताच परिणाम झाला नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे गौण खनिजाच्या उत्खननासाठी पर्यावरण समितीची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. सरकारनेही या संदर्भातील नियम तयार केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईओंवर अविश्वास ठराव दाखल करणार

$
0
0

नांदेडः हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यातील दरी वाढल्याने समेट घडून येण्याच्या अशा मावळल्या आहेत. १७ जुलै रोजी बोलावलेल्या विशेष सभेत कार्यकारी अधिकारी राहुल रेखावर यांच्यावरील अविश्वास ठराव दाखल करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लक्ष्मी यशवंते यांनी पक्षांच्या सदस्यांना तसा आदेश दिला आहे. रेखावार सर्वांना विश्वासात घेवून कामकाज करण्यास इच्छूक नाहीत. पाणीटंचाईच्या काळात समस्या सोडविण्यात त्यानी असर्मथता दाखविली, असे आक्षेप नोंदविण्यात आलेले आहेत. अविश्वास ठरावातील दोषारोपांत अनेक मुद्दे देण्यात आले आहेत. दरम्यान, रेखावर यांच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती घेतली असता त्यांचे नियमांवर बोट ठेऊन कारभार करण्याची भूमिका सदस्य व पदाधिकारी यांना मान्य नसल्याचे समजते. यासंदर्भात रेखावार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दर्शविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाअभावी शेतकरी चिंताग्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे खरीपातील पेरण्या मोठ्या उत्साहाने करण्यात आल्या. मात्र, गेल्या आठवडाभरापासून शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी, शेतातील पिके आता मान टाकण्याच्या अवस्थेत आहेत, पावसाची उघडीप दुबार पेरणीचे संकट निर्माण करणारी आहे.

गेल्या चार वर्षांनंतर प्रथमच यंदा मान्सून अगदीच वेळेवर झाला. आठ जूनपासून पावसाळी वातावरण होते, जिल्हय़ातील शेतकरी सततच्या अडचणींना तोंड देऊन कंटाळून गेलेला असतानाच सुरवातीचा पाऊस मोठा ऊत्साह निर्माण करणारा झाला.

कापूस, सोयाबीन, मका आणि उडीद, मुग, तुरीची मोठी पेरणी झाली आहे. शेतात सत्तर टक्क्यांवर ओलावा निर्माण झाला होता. जिल्ह्यात सर्व दूर वातावरणात पेरणीसाठी अनुकूलता निर्माण झाली. मृग नक्षत्राच्या पाठोपाठ आता आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने चिंता वाढली आहे. आषाढ महिना अधिक मासिक आहे त्यामुळे जिल्हय़ातील सर्व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल आहे, याच सुमारास मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यामुळे बाजारातील वातावरणात तेजी आहे. मात्र सर्वत्र पावसाची वाट बघत आहेत. जालना जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पात जोत्याखाली पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे, जून महिन्यात टॅँकरच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. आता पुन्हा परिस्थिती बिघडत चालली आहे. टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने मागणी वाढली आहे. प्रशासन सर्व तयारीत आहे.असे जिल्हाधिकारी रंगा नायक यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सध्या तरी या विस्कळीत अवस्थेत पाण्याची टंचाई ची कामे करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत वाढविलेली मुदतवाढ संयुक्तीक ठरेल. मराठवाडय़ातील सर्वात तीव्रतेच्या पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पडण्यासाठी मार्ग शोधला जाऊ शकतो. या संदर्भात गेल्या काही काळात चर्चा सुरू आहे, राज्य सरकार यावर अत्यंत गंभीर विचार करत आहे.

- बबनराव लोणीकर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांगतपुरी शिवारात बिबट्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

तालुक्यातील चागतपुरी येथे रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान एका मजुराला बिबट्या दिसला आहे. यामुळे गावात खळबळ उडाली असून वनविभागचे पथक चांगतपुरी परिसरात बिबट्याचा शोध घेत आहे.

चांगतपुरी यथील उत्तमराव नलभे यांच्या शेतात भीमा नवपुते हे मजूर आहेत. त्यांना सकाळी अकराच्या दरम्यान बिबट्या दिसला. बिबट्या दिसताच घाबरलेले नवपुते गावाकडे पळाले, त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली. घटनास्थळी पोहचल्यानंतर गावकऱ्यांना जागोजागी बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले. याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे पथक चांगतपुरी येथे दाखल झाले आहे. बिबट्याचा सायंकाळी पाचपर्यंत शोध घेण्यात येत होता.

दरम्यान, सध्या खरीप पिकांच्या पेरणी व लागवडीचे काम सुरू असल्याने बहुतांश शेतकरी, मजूर शेतात आहेत. परिसरात बिबट्याचा वावर असल्याची वार्ता परिसरातील गावांमध्ये पसरल्याने शेतकरी दहशतीखाली आहेत. दोन वर्षापूर्वी, चांगतपुरी परिसरात बिबट्या दिसला होता. त्याच्या दोन दिवसानंतर ७ जानेवारी २०१३ रोजी बिबट्याने नायगाव येथे एका डुकराला ठार मारले व वासरू पळवून नेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबाद तालुक्यात शौचालयांची सक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असलेला खुलताबाद तालुका मार्च २०१६च्या अखेरीस हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी घरोघरी शौचालय बांधण्याची सक्ती केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच स्वच्छ भारत मिशनमधील कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत डॉ. चौधरी यांनी तालुका हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प जाहीर केला. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने या बैठकीस लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले नव्हते. मात्र जुलै व ऑगस्टमध्ये गावनिहाय आराखडा तयार करण्याचे निर्देश ग्रामसेवकांना देण्यात आले. प्रत्यक्ष कामाला सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक गावासाठी एक जिल्हास्तरीय अधिकाऱ्याची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

या योजनेची माहिती १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत देण्याचे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले. बांधलेली शौचालये, वापरात नसलेली शौचालये, बांधावयाची शौचालये आदींची यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाडळी, गल्लेबोरगाव, गोळेगाव, सुलीभंजन, भडजी, खिर्डी, झरी, देवळाणा या गावांतील शौचालयांचे बांधकाम ऑक्टोबर अखेर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. चांगले काम करणाऱ्या ग्रामसेवकांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार आहे. या बैठकीला स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, विभागीय समन्वयक अरूण रसाळ, गटविकास अधिकारी डॉ. राम लाहोटी, गटशिक्षणाधिकारी बबनराव शिंदे, तालुक्यातील अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते. मुख्य कार्यकारी आधिकाऱ्याच्या आदेशानंतर कामकाज सुरू करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासनाला खरीप अनुदानाचा विसर?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाने गेल्यावर्षी दुष्काळामुळे खरीप अनुदानाची घोषणा केली; मात्र दुसरा खरीप हंगाम सुरू झाला, तरी मराठवाड्यात ३४१ कोटी १६ लाख रुपयांचे वाटप झालेले नाही. या रकमेचा दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी उपयोग होणार आहे. मात्र विभागीय प्रशासनाने अनेकदा मागणी करूनही ही रक्कम मिळालेली नाही.

गेल्यावर्षीच्या दुष्काळाचे दुःख विसरून बळीराजा पुन्हा एकदा खरीप पेरणीसाठी सज्ज झाला आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या दमदार पावसामुळे विभागात चार जिल्ह्यांत पेरणी बऱ्यापैकी आहे. इतर चार जिल्ह्यात पेरणीचा वेग कमी आहे. गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणी करावी लागेल, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

शेतकऱ्यांनी हाती ठेवलेला पैसा पेरणीत गेला आहे. काही शेतकऱ्यांना पेरणीसाठीही रक्कम नाही. या परिस्थिती शासनाकडील थकित अनुदान मिळाल्यास मदत होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. राज्य शासनाने घोषित केलेल्या २०३२.६६ कोटी रुपयांच्या खरीप अनुदानापैकी विभागामधील २३ लाख ७३ हजार शेतकऱ्यांनाच्या बँक खात्यात १६९१.५ कोटी रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना ३४१.४४ कोटी रुपयांची प्रतीक्षा आहे. मराठवाड्यात शासनाने दोन टप्प्यांत खरीप अनुदानाची रक्कम दिली.

परंतु बँक खात्यांच्या अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना अनुदान उशिराने प्राप्त झाले. बहुतांश शेतकऱ्यांनी बँक खाते तसेच संमत्तीपत्र सादर केल्यानंतर प्रशासनाने रक्कम जमा केली. पहिल्या टप्प्यात ८४५.५५ कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ८४५.९५ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यानुसार ६, ७२० बाधित गावांमधील सुमारे २३ लाख शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आली आहे.

शासनाकडेही मागितली दाद

मराठवाड्याच्या खरीप अनुदानाची थकबाकी देण्याबद्दल प्रत्येक जिल्हा व विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी औरंगाबादला घेतलेल्या बैठकांमध्ये या रकमेची मागणी करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटननगरीत वनोद्यान झाले गायरान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात पर्यटनवृद्धीसाठी उभारलेल्या वनोद्यानांची वाताहत झाली आहे. देवगिरी किल्ल्यासमोर लाखो रुपये खर्च केलेल्या वनोद्यानाचा अक्षरशः उकिरडा झाला आहे. मोडकी खेळणी आणि वाढलेले गाजर गवत यांमुळे पर्यटक वनोद्यानात फिरकत नाहीत. परिणामी, वनोद्यान जनावरांसाठी मोकळे कुरण झाले आहे.

पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या औरंगाबाद जिल्ह्यात वन पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटनवृद्धीसाठी वनोद्यान उभारले आहेत. सारोळा, दौलताबाद आणि देवळाईत वनोद्यान आहे. तेथे आकर्षक खेळणी, नक्षत्रवन, दाट वनराई आणि इतर सुविधांचा समावेश होता. प्रत्यक्षात अत्यंत सुमार दर्जाची खेळणी बसवण्यात आली आहेत. देवळाई व दौलताबाद वनोद्यानातील खेळणी तुटली असून, नियमित देखभालीअभावी उद्यानाचा उकिरडा झाला आहे. जिल्हा नियोजन समितीने वनोद्यानासाठी वेळोवेळी निधी दिला आहे, मात्र निधीचा योग्य वापर झाला नसल्याने उद्यानाची वाताहत झाली. गेल्या सहा महिन्यांपासून देवळाईचे उद्यान पर्यटकांसाठी बंद आहे तर, दौलताबाद वनोद्यानात पर्यटक फिरकत नाहीत. देवगिरी किल्ला पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येतात. त्यांनी वनोद्यानात येणे अपेक्षित होते. या माध्यमातून वन विभागाला उत्पन्न मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे उद्यानांचा मोठा गाजावाजा करण्यात आला, पण पर्यटकांना आकर्षित करण्यात वन विभाग सपशेल अपयशी ठरले आहे. अगदी देवगिरी किल्ल्यासमोर असूनही वनोद्यान ओस पडले. उद्यानाची खेळणी मोडकळीस आली आहेत. गाजर गवत आणि कचरा वाढल्यामुळे पर्यटक क्षणभरही थांबत नाहीत. वनोद्यानात सुरक्षा रक्षक नसल्यामुळे जनावरे उद्यानात मनसोक्त चरत असतात. भटक्या कुत्र्यांचाही वावर वाढला आहे. निसर्ग पर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांनी वनोद्यानाच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. मुख्य प्रवेशद्वार बंद असल्यामुळे पर्यटक दुसऱ्या मार्गाने उद्यानात जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीमध्ये गॅस्ट्रोचे ६८; तर कॉलराचे ६ पेशंट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरामध्ये गॅस्ट्रो तसेच कॉलराचे प्रमाण वाढत असून, एकट्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) केवळ महिनाभरात गॅस्ट्रोच्या ६८, तर कॉलराच्या ६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील बहुतांश रुग्ण हे शहरातील आहेत आणि यामध्ये बुढीलेन, टाऊनहॉल परिसरातील रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. मागच्या दोन ते तीन आठवड्यांपूर्वी शहर-परिसरात जोरदार पाऊस झाला आणि गॅस्ट्रोचे रुग्ण झपाट्याने वाढले. एक जूनपासून आतापर्यंत रुग्णालयामध्ये गॅस्ट्रोच्या ६८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील बहुतांश रुग्ण हे शहर व परिसरातील होते. यामध्ये अर्थातच बुढीलेन, टाऊनहॉल व आसपासच्या परिसरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. गॅस्ट्रोप्रमाणेच कॉलराही हळूहळू वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत उपचार करण्यात आलेल्या कॉलराच्या ६ रुग्णांपैकी ५ रुग्ण हे शहरातील, तर १ रुग्ण ग्रामीण भागातील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायकेंनी अडकावले; जाधवांचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लोकविकास बॅँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी आपल्याला अर्जुन गायके आणि नामदेव पवार यांनी अडकावले आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर रिझर्व्ह बॅँक आणि पोलिसांची दिशाभूल करून त्यांनी हे कारस्थान रचले आहे,' असा आरोप बॅँकेचे माजी अध्यक्ष एकनाथ जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. मात्र, गायके यांनी 'मटा'शी बोलताना हे आरोप फेटाळून लावले.

'लोकविकास'चे माजी अध्यक्ष तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, आशिष जहागीरदार व अरुण मलिक यांच्याविरुध्द बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. उपमहाव्यवस्थापक संजय औटी यांनी केलेल्या तक्रारित या तिघांनी ३४ लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात रविवारी जाधव यांनी पत्रकार परिषद घेत या आरोपाचे खंडन केले. जाधव म्हणाले, 'ज्या काळात हे प्रकरण घडले, त्यावेळी आपण अध्यक्ष नव्हतो. नामदेव पवार अध्यक्ष होते. दोन वर्षापूर्वीचे विद्यमान अध्यक्ष अर्जुन गायके व तत्कालीन अध्यक्ष नामदेव पवार यांनी पाच लाख सत्तर हजारांचा अपहार केला. त्यांच्या विरुद्ध सहकार आयुक्तांनी कारवाई सुरू केली. त्यामुळे पुढील सहा वर्षांसाठी ते निवडणूक लढवण्यास अपात्र ठरणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात बँकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले आहे. या प्रकरणी रिझर्व्ह बँकेने लोकविकास बँकेला खुलासा मागून सबंधितांवर काय कारवाई केली याची विचारणा केली. मात्र, गायके व पवार यांनी रिझर्व्ह बॅँकेची दिशाभूल केली. बॅँकेला एकनाथ जाधव हे अध्यक्ष असल्याची खोटी माहिती दिली. तसेच पोलिसांना देखील चुकीची माहिती दिली. आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला', असा आरोप जाधव यांनी पत्रकार ‌परिषदेत केला आहे. यावेळी अरुण मलीक, आ‌शिष जहागीरदार यांची उपस्थिती होती.

लोकविकास बँकेने कोणावरही जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशाने कायदेशीररित्या हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या ऑडिटमध्ये हा फ्रॉड उघड झाला आहे.

- अर्जुन गायके; संचालक, लोकविकास बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाच्या दावणीला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दिलेल्या ओढीमुळे मराठवाडा पुन्हा एकदा दुष्काळाच्या दावणीला बांधला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. लहान-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्यात घट होत असून, अनेक गावांत पुन्हा टॅँकर सुरू होण्याची शक्यता आहे.

जून महिन्याच्या प्रारंभीच मान्सूनचे जोरदार आगमन झाल्याने मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. पहिल्या दोन दमदार पावसात जायकवाडीमध्ये पाण्याची आवक सुरू झाली. अवघ्या चार दिवसांमध्ये मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांत ४८, तर आठवड्याभरात पाणीसाठ्यामध्ये तब्बल ६२ दशलक्ष घनमीटरने वाढ झाली. मात्र, त्यानंतर केवळ १५ दिवसांत चित्र बदलले. पावसाने मारलेल्या दडीमुळे मराठवाड्यात पुन्हा एकदा दुष्काळी वातावारण निर्माण झाले आहे. आता लहान-मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा तळाला गेला आहे.

मराठवाड्यातील सर्व लहान मोठ्या ८३५ प्रकल्पांमध्ये १९ जून रोजी ५४४.९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. आता या पाणीसाठ्यात तब्बल १९ दशलक्ष घनमीटरने घट झाली आहे. एकूण टक्केवारीत फारसा फरक पडला नसला तरी, आता प्रकल्पांमध्ये ५२५.२७ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. दुष्काळी परिस्थिती, तापमानात झालेली वाढ यामुळे पाणीसाठ्यात उन्हाळ्याप्रमाणेच घट नोंदवण्यात येत आहे. ७ जूनपासून विभागामध्ये चांगला पाऊस सुरू असला, तरी माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, सीना-कोळेगाव या चार मोठ्या प्रकल्पांमधील पाणी जोत्याखाली आहे.

१ दलघमी पाण्याची वाफ

जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नाथसागरात पहिल्यांदाच जून महिन्यात पाण्याची आवक सुरू झाली. मात्र, पावसाने मारलेली दडी व उन्हामुळे दीड दिवसाला सुमारे १ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाल्याने दररोजचे बाष्पीभवन शून्य झाले होते. २५ जून रोजी धरणामध्ये ४८.४४९ (२.२३)दलघमी पाणीसाठा उपलब्ध होता. आता २८.३६६ साठा (१ टक्के) शिल्लक आहे.

१००३ टॅँकर सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात ५५७ वर गेलेल्या टँकरची संख्या दमदार पावसामुळे ३ झाली होती. मात्र, आता पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होत असल्यामुळे विविध गावांतून टँकरची मागणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात चार दिवसांमध्ये २५ टँकर सुरू करावे लागले. सध्या टँकरची संख्या २८ झाली आहे. विभागातही परिस्थिती भयंकर असून सध्या ८ जिल्ह्यांमध्ये ७६३ गावांना व ४१४ वाड्यांना १००३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नामांकित कंपनीत नोकरीस लावून देतो, असे आमिष दाखवून सुशिक्षित तरुणांची फसवणूक करणाऱ्या दोघा भामट्यांना करमाड पोलिसांनी अटक केली. योगेश प्रभाकर शेजूळ (रा - बजाजनगर) आणि विनोद सपकाळ ( रा- सिडको) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील पर्कींन्स कंपनीत नोकरी लावून देतो, अशी थाप काहीजण मारत आहेत, अशी तक्रार कंपनी अधिकारी विवेक सोळुंके यांनी करमाड पोलिसांकडे केली.

सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोंकणे व पथकाने चौकशी केली असता बजाजनगर येथील योगेश प्रभाकर शेजूळ व त्याचा साथीदार विनोद सपकाळ हे नोकरीचे आमिष दाखवत गंडा घालत असल्याचे लक्षात आले. फसवणूक झालेल्या एका तरुणांची पोलिसांनी मदत घेत दोन्ही आरोपींना पकडले. आयटीआय, पॉलिटेक्निक, बी.ई, एम.ई झालेल्या उच्चशिक्षित तरुणांना नामांकित कंपन्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी आम्ही अधिक तपास आहोत, असे सहायक पोलिस निरीक्षक कोंकणे यांनी सांगितले.

संजयनगर येथून विवाहितेचे अपहरण

औरंगाबादः संजयनगर येथील एका विवा‌हितेला आरोपी तुळशीराम चंदूलाल गदरखळे याने लग्नाची फूस लावून पळवून नेले. या विवाहितेने शेतीची कागदपत्रे, बँकेचे पासबूक सोबत नेले आहे. विवाहितेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images