Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

निवासी डॉक्टरला लुबाडणारे जेरबंद

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला लुबाडणाऱ्या तिघांना गुन्हेशाखेने २४ तासांच्या आत अटक केली. आरोपीमध्ये कुख्यात गुन्हेगारांचा समावेश आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजता हा प्रकार घडला होता. घाटीतील निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये डॉ. सिद्धार्थ खोब्रागडे हे आपल्या रुममध्ये झोपले होते. यावेळी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तीन अज्ञात तरुणांनी त्यांच्या रुममध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर जेवणाच्या डब्ब्याने हल्ला करण्यात आला. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, मोबाइल आदी ऐवज लंपास केला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हेशाखेचे पथक देखील या गुन्ह्याचा तपास करीत होते. या गुन्ह्यामध्ये कुख्यात गुन्हेगार शेख चांदपाशा व सहकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती.

या माहितीवरून पोलिसांनी आरोपी शेख चांदपाशा शेख नईम (वय २० रा. एसटी क्वाटर्स, बसस्टँड समोर), शेख लतीफ उर्फ कन्नड्या शेख रशिद (वय २५ रा. पिशोर ता. कन्नड) व शेख राजू शेख इकबाल शेख अयुब (वय २३ रा. अलाना कंपनीसमोर चितेगाव) यांना अटक केली. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींना बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल वाघ, रमेश कंदे, प्रकाश भालेराव, मनोज चव्हाण, शेख जावेद, संतोष सूर्यवंशी, मंगेश मनोरे, मुक्तेश्वर लाड यांनी केली.

जेवणाच्या डब्ब्याने हल्ला

डॉ. सिद्धार्थ खोब्रागडे घाटीतील निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये आपल्या रुममध्ये झोपलेले असताना लुटारूंनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. मुख्य म्हणजे डब्याचाच शस्त्रासारखा वापर करून त्यांना हल्लेखोरांनी मारहाण केली व त्यांच्याकडील ऐवज लंपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौदा लाख रुपयांचा उद्योजकाला गंडा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील उद्योजक ‌हेमंत मिरखेलकर यांना सायबर भामट्यांनी चौदा लाख रुपयांना गंडा घातला आहे. भामट्यांनी त्यांच्या कंपनीच्या व्यवहाराची बँक बदलल्याचा मेल पाठवत दुसऱ्या बँकेत रक्कम जमा करण्यास भाग पाडून ही रक्कम लाटली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत माधवराव मिरखेलकर (वय ५१ रा. सम्राटनगर, दर्गारोड) यांची वरूण इंटरप्रायजेस नावाने कंपनी आहे. थायलंड येथील नॅशनल स्टार्च अँड केमिकल फायनल लिमिटेड या कंपनीचे भारतातील एकमेव वितरक आहेत. त्यांनी मे महिन्यात कंपनीला पर्चेस ऑर्डर पाठवली होती. २ जून रोजी त्यांना कंपनीकडून ई-मेलद्वारे कंपनीचे इन्व्हाइस तसेच बँक बदलल्याचे पत्र पाठवले. यापूर्वी अमेरिकन एक्स्प्रेस बँकेत ते कंपनीचे पेमेंट देत होते. बँक बदलल्याचे पत्र आल्यामुळे त्यांनी जालना रोडवरील ओव्हरसिज बँकेतून पिकाओ बँकेत २२ हजार १४० युएस डॉलर (भारतीय चलनात चौदा लाख रुपये ) पाठवले. त्यानंतर त्याना पुन्हा एक मेला आला. यामध्ये ही बँक युएस डॉलरमध्ये पैसे घेत नसून इंग्लड मधील लॉयड्स टीएसबी बँकेत पैसे भरण्याचे सांगण्यात आले. मिरखेलकर यांनी ओव्हरसिज बँकेमार्फत १७ जून रोजी पुन्हा या ‌बँकेत रक्कम जमा केली. दरम्यान २३ जून रोजी मिरखेलकर यांना कंपनीच्या मुंबई कार्यालयातून सेल्स मॅनेजरचा फोन आला. तुम्ही रक्कम जमा केली नसल्याने मालाची डिलिव्हरी देता येणार नाही, असे सांगण्यात आले. रक्कम पाठवण्यात आल्याचा पुरावा त्यांना देण्यात आला. यावेळी त्यांनी रक्कम मिळाली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच कंपनीने कोणतीही बँक बदलली नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीच्या वतीने देण्यात आले. दरम्यान अज्ञात आरोपीने ‌लॉयड्स बँकेतून ही रक्कम काढून घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मिरखेलकर यांनी पोलिस आयुक्त ‌अमितेशकुमार यांची भेट घेत प्रकार सांगितला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळात विद्यापीठाचे चटके!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पदव्युत्तर शिक्षणाच्या शुल्कात दहा ते पंधरा पट वाढ करत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने दुष्काळात विद्यार्थ्यांना चटके देणे सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना एमएसाठी १८ ते २० हजार, तर एमएस्सीसाठी जवळपास ३५ ते ४० हजारांचे शुल्क मोजावे लागेल.

विद्यापीठाने येत्या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शुल्कवाढीला मंजुरी दिली आहे. ही शुल्कवाढ थोडीथोडकी नव्हे तर आजपर्यंतची सर्वाधिक शुल्कवाढ ढरली आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत कॉलेजांमध्ये शिक्षक नसल्याचे प्रकरण ताजे असताना, विद्यापीठ प्रशासनाने शुल्कवाढीला मंजुरी देत संस्थांचालकांसाठी पायघड्या अंथरल्या आहेत. शुल्क आकारण्यात कॉलेजांमध्येही फरक असून कॉलेजांची मनमानी सुरू आहे. विषय निहाय आणि मागणीनुसार कॉलेजांचे शुल्क ठरलेले आहेत. अशावेळी शुल्कवाढ करत विद्यापीठाने संस्थांचालकांचे हित जपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. विद्यार्थी संघटनांनी वाढीव शुल्क वाढी विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

समितीचा अहवाल

विद्यापीठाने शुल्कवाढीसाठी डॉ. दत्तात्रय आघाव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने शुल्कवाढीचा अहवाल दिला. अहवालात दहा ते पंधरा टक्क्यांनी शुल्कवाढ दर्शविली. यात ट्युशन फी १० ते २० हजार रुपये दर्शविण्यात आली. तर लायब्ररीचे शुल्क ५ हजार ते १० हजार करण्यात यावी असे सांगितले आहे. यासह माहिती पुस्तिका, कॉलेज डेव्हलपमेंट, पात्रता प्रमाणपत्र शुल्क अशा विविध हेडखाली शुल्क दर्शविण्यात आले आहे. विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या कॉलेजांची संख्या १५२ आहे. यामध्ये पात्र प्राध्यापकांची संख्या केवळ १५ एवढी आहे. अशी स्थिती असताना समितीने दिलेला अहवाल आश्चर्यकारक मानला जात आहे.

अनेक वर्षांपासून शुल्कवाढ झाली नव्हती. यामुळे विद्यापीठाने समिती नेमली. त्यांनी अहवाल दिलेला आहे. यात शुल्कवाढ जास्त असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. व्यवस्थापन परिषदेत हा विषय ठेवला जाईल.

- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू

दुष्काळाच्या झळा मराठवाडा सोसत असताना विद्यापीठाचे शुल्कवाढीचे चटके देणे योग्य नाही. याबाबत रस्त्यावर येऊन आवाज उठविला जाईल.

- पंडित तुपे, अधिसभा सदस्य

कॉलेजांना शासन कोणत्याही प्रकारचे अनुदान देत नाही. यात विद्यापीठाने पात्र शिक्षकांच्या नियुक्तीचे पत्र कॉलेजांना दिले आहे. यासह चांगल्या सुविधा देण्यासाठी ही निधीची आवश्यकता भासते, अशावेळी शुल्कवाढी शिवाय पर्याय नाही. तसेच समितीने केवळ सुचविले, व्यवस्थापन समितीने त्याला मान्यता दिली.

- डॉ. दत्तात्रय आघाव, अध्यक्ष, शुल्क निश्चिती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाच्या ‘कृत्रिम’ गप्पा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यासह कमी पाऊस असलेल्या जिल्ह्यांमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णयावर राज्य सरकार ठाम असल्याचे कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितले. मात्र, सध्या मराठवाडाच काय संपूर्ण राज्यात पाऊस पाडणारे ढग नाहीत. येत्या काही दिवसांत ते निर्माण होण्याची शक्यताही नाही. त्यामुळे कृत्रिम पावसाच्या तूर्तास गप्पाच ठरण्याची शक्यता आहे.

पावसाने मारलेली दडी आणि मराठवाड्यावर घोंगावणारे दुष्काळाचे सावट या चिंतेपायी राज्यमंत्री राम शिंदे यांनी काही जिल्ह्यांमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याची घोषणा केली. मात्र, तूर्तास तरी हे शक्य नसल्याचे दिसते. हवामान तज्ज्ञांच्या मते पाऊस पाडण्यासाठी पावसाच्या ढगांची तसेच आर्द्रतेची आवश्यकता असते. काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायन फवारून पाऊस पाडावा लागतो. मात्र, वातावरणामध्ये ढग नसतील तर पाऊस पाडणार कसा? पावसासाठी ढगांमधील बाष्पाची क्षमता, तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग असे अनेक घटक आवश्यक असतात. यापैकी एकाही घटकाची कमतरता किंवा असमतोल झाला, तर पावसाची शक्यता कमी होते. याआधी राज्यात कृत्रिम पावसाचे झालेल्या प्रयोगांनाही फारसे यश मिळाले नाही. शिवाय यावर खर्च मोठा आहे.

कृत्रिम पावसाला आवश्यक वातावरण आणि आभाळ असणे आवश्यक असते. मात्र, सध्या मराठवाड्यात काय संपूर्ण राज्यातही असे वातावरण दिसत नाही. सध्याची परिस्थिती पाहता पाऊस पाडता येईल, याची शक्यता नाही. पाऊस कुठे पाडणार, विमाने कुठून उडवणार, या बाबीही पाऊस पाडण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात.

- श्रीनिवास औंधकर; हवामान अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२३ व्या वर्षी मातेला सर्वोच्च भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवघ्या २३ व्या वर्षी मुलाने आपल्या मातेला मूत्रपिंड दान केल्याची दुर्मिळ घटना शहरात घडली. एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये शनिवारी (चार जुलै) ही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. दरम्यान, हा धाडसी तरुण किडनी देण्यासाठी सज्ज असल्याचे वृत्त 'मटा'ने ११ मे २०१५ रोजी 'मदर्स डे'निमित्त प्रसिद्ध केले होते, हे विशेष.

वाशिमच्या कांचन सुर्वे (४२) यांचे दोन्ही मूत्रपिंड (किडनी) निकामी झाले होते आणि घरातील इतर कोणीही किडनी देण्यासाठी पात्र ठरत नव्हते. अपवाद होता त्यांचा सर्वांत धाकटा मुलगा मुकेश. किडनी देण्यासाठी मुकेश उत्स्फूर्तपणे पुढे आला; परंतु कांचन काही केल्या तयार होईनात. मात्र समजूत काढल्यानंतर त्यांनी संमती दिली. मुकेशची किडनी जुळली आणि सर्व तपासण्यांमध्ये तो मूत्रपिंड दाता (डोनर) म्हणून योग्य असल्याचे स्पष्ट झाले. शेवटी सगळी तयारी झाल्यानंतर आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार जुलै रोजी एमजीएम रुग्णालयामध्ये ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सुधीर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आता कांचन सुर्वे यांची प्रकृती सुधारत असून, सद्यस्थितीत त्या रुग्णालयात दाखल आहेत. अर्थातच, आपल्या आईला किडनी देता आल्यामुळे मुकेश खूप समाधानी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील वीज महागच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य वीज नियामक आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या वीज दरवाढ आदेशाचा मोठा आर्थिक फटका यावेळी घरगुती वीज ग्राहकांना बसणार आहे. ३०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या वीज ग्राहकास २० टक्के, तर ५०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकास आता २६ टक्के जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. यामुळे राज्यातील वीज स्वस्त नव्हेे, तर महाग झाली अाहे,अशी माहिती उर्जा मंचतर्फे देण्यात आली.

महावितरणतर्फे गेल्या फेब्रुवारी २०१५ मध्ये राज्य वीज नियामक आयोगापुढे २०१३-१४ ते २०१५-१६ या तीन वर्षासाठीचा (मल्टीइयर टेरीफ) वीज दरवाढ प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. आयोगाने वीज कायद्यातील तरतुदीनुसार या वीज दरवाढ प्रस्तावावर राज्यात सहा ठिकाणी जाहीर सुनावणी घेतली. औरंगाबाद येथे ९ एप्रिल रोजी सुनावणी घेण्यात झाली व त्यानंतर शेवटी पुणे येथे झालेल्या १० एप्रिलच्या सुनावणीनंतर आयोगाकडून वीज दरवाढीबाबत निर्णय जाहीर होणे अपेक्षित होते. पण आयोगाने २६ जून रोजी नवीन वीज दर जाहीर केले आहेत.

वीज नियामक आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात दरवाढीचा बोजा जाहीर करताना एप्रिल २०१५ या महिन्याचे वीज बिल व त्यावेळी लावण्यात आलेला इंधन अधिभार मिळून टक्केवारी काढण्यात आली आहे.

इंधन अधिभार हा जागतिक पातळीवर होणाऱ्या इंधनाच्या किमतीवर आधारीत असतो त्यामुळे तो दर महिन्याला वेगवेगळा असतो.एप्रिल २०१५ मध्ये इंधन अधिभार हा चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला होता व तो अवाजवी (वीज दाराच्या २० ते २५ टक्के इतका) होता. ह्या वाढीव इंधन अधिभाराचा परतावा वीज ग्राहकांना मे व जून २०१५ च्या वीज बिलातून देण्यात येत आहे. त्यामुळे ह्या आधारावर काढण्यात आलेले वीज दरवाढीची टक्केवारी चुकीची असून वीज दरवाढ कमी प्रमाणात असल्याचे भ्रामक चित्र तयार होत आहे.

राज्य सरकारकडून आंदोलन बेदखल

महावितरण वीज कंपनीचे आद्योगिक वीज दर इतर शेजारील राज्याच्या तुलनेत जास्त असल्यामुळे राज्यात उद्योगाची वाढ होत नसून अनेक उद्योग राज्याबाहेर जाण्याच्या मार्गावर असून नवीन उद्योजक येत नसल्याचे आद्योगिक संघटना सातत्याने सांगत आहेत. वाढीव वीज दराविरुद्ध उद्योजकांनी आंदोलनही केले. नवीन सरकार सत्तेत आल्यांनतर वीज दर कमी होतील, अशी अपेक्षा होती, तसे उर्जा मंत्र्यांनी जाहीरही केले होते. पण प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात वीज दरकपात झाली नाही, असे उर्जा मंचचे ‌हेमंत कपाडिया, विनोद नांदापूरकर, प्रसाद कोकीळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणचा धन्वंतरी वेदनामुक्तीचा दूत!

$
0
0

निखिल निरखी, औरंगाबाद

पैठणचा एक धन्वंतरी वेदनामुक्तीचा दूत ठरला आहे. त्यांच्या तंत्राने आजवर कमी खर्चात शस्त्रक्रियाकरून २० हजारांहून अधिक जणांना वेदनामुक्त केले. जगभर ७० ठिकाणी 'देसरडा रिपेअर' म्हणून हे तंत्र वापरले जाते. तरीही त्यांनी केवळ जगाच्या कल्याणासाठी, या तंत्राचे पेटंट घेतले नाही. अशा या तंत्राचे निर्माते डॉ. मोहन देसरडांच्या संशोधनाचा स्वंतत्र धडा, आता इंग्लंडच्या 'अॅटलास ऑफ जनरल सर्जरी' पुस्तकात समाविष्ट होत आहे.

'पुना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर', 'गॅलेक्सी केअर सेंटर', 'इंडियन हार्निया इन्स्टिट्यूट' आदी संस्थांशी जोडले गेलेले प्रोफेसर एमिरिटस डॉ. देसरडा यांनी २००१ मध्ये हे संशोधित तंत्र विकसित केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले. तेव्हापासून 'देसरडा रिपेअर' या नावानेच हे तंत्र ओळखले जाते. वजन उचलल्याने किंवा सततच्या खोकल्याने किंवा इतर तत्सम कारणांनी हार्निया होत असल्याचा मतप्रवाह खोडून काढत, जांघेतील स्नायुच्या दोषामुळे हार्निया होत असल्याचे त्यांनी जगासमोर आणले. त्यासाठी मेष (जाळी) पद्धतीने किंवा मेष व दुर्बिणीद्वारे करण्यात येणाऱ्या प्रचलित शस्त्रक्रियेपेक्षा 'देसरडा रिपेअर' पद्धत सर्वार्थाने उपयुक्त व दुष्परिणामविरहित असल्याचे त्यांनी सिद्ध केले.

'देसरडा रिपेअर'मध्ये जवळची दुसरी स्नायुपट्टी जोडली जाते आणि त्यासाठी मेष किंवा दुर्बिण लागत नाही. आता ही पद्धत जगभरात स्वीकारण्यात येत असून, सर्वांना त्याचा वापर करता यावा म्हणूनच पेटंट घेतले नसल्याचे डॉ. देसरडा म्हणतात.

'रिपेअर'चे दुष्परिणाम शून्य

हार्नियाचे प्रमाण २ ते ५ टक्के आहे. यामध्ये जांघेत किंवा नाभीसमोर फुगा येतो आणि खोकला आला की फुगा फुगतो-वेदना होतात आणि खोकला कमी झाला की फुगा कमी होतो. मेष पद्धतीने पुन्हा हार्निया होण्याचे प्रमाण २ ते ३० टक्क्यांपर्यंत आहे. तसेच सेप्टिक होणे, वेदना होतच राहणे, वृषणकोष काढावे लागणे व अपत्यप्राप्तीवर परिणाम होणे, असे विविध दुष्परिणाम मेष पद्धतीने होतात. मात्र, हे दुष्परिणाम 'देसरडा रिपेअर'मध्ये दिसत नाही. खर्च पाच ते दहा हजारांनी कमी होतो. रुग्ण लवकर सर्वाथाने उभा होतो आणि पुन्हा हार्निया होण्याचे प्रमाण जवळजवळ शून्य टक्के असल्याचे डॉ. देसरडा म्हणतात.

... तर ४०० कोटी वाचतील डॉ. मोहन देसरडा

'देसरडा रिपेअर'ने आजवर मी स्वतः २,५०० शस्त्रक्रिया केल्या. या तंत्राचा देशामध्ये १०० टक्के वापर झाला, तर आरोग्यावर होणारा ४०० कोटींचा खर्च वाचेल. हार्नियाच्या रुग्णांचे कामाचे अनेक लाख तास वाचतील. या पद्धतीच्या शस्त्रक्रियेने रुग्ण लवकर कामावर परतू शकेल आणि त्यांची उत्पादनक्षमता वाढेल, असे अनेक फायदे आहेत. त्याविषयी केंद्रीय-राज्य आरोग्य मंत्र्यांपासून अनेकांना कळविले आहे, पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राकाज’ क्लबला अखेर टाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्टाइल क्लबच्या नावाखाली हुक्का पार्लर, मसाज सेंटर चालवणाऱ्या राका लाइफस्टाइल क्लबला अखेर महापालिकेने टाळे ठोकले. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. दशमेशनगर या उच्चभ्रू वसाहतीत राकाज लाइफस्टाइल क्लबमधले गैरप्रकार बुधवारी (३ जून) उघड झाले. पालकांनी स्वतः पोलिस आयुक्तांकडे येऊन इथल्या गैरप्रकाराबाबत तक्रार केली. त्यानंतर अमितेशकुमार यांनी तक्रारीची तत्काळ दखल घेत, या क्लबवर छापा टाकला. यावेळी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर गुरुवारी महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी राका लाइफस्टाइल क्लबची पाहणी केली. या पाहणीतून अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले. पूल टेबलच्या हॉलमध्ये एक काळी खिडकी लावण्यात आली होती. या खिडकीतून स्विमिंग पूलवर आलेल्या महिलांना न्याहळण्याचा प्रकार व्हायचा. हे प्रकार पाहून महापौर, उपमहापौर ही चक्रावले. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. महापालिका आयुक्त प्रकाज महाजन यांनी या क्लबची पाहणी केली. तेव्हा इथे मसाज पार्लर सुरू असल्याचे उघड झाले. स्त्रियांच्या मसाजसाठी पुरुष आणि पुरुषांच्या मसाजसाठी स्त्रिया, असा प्रकार इथे सुरू होता. हे पाहून आयुक्तांनीही बीओटी कक्ष प्रमुख सिकंदर अली यांना राकाज लाइफस्टाइल क्लबला टाळे ठोकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आगीत ११ लाखांचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,नांदेड

घरांना अचानक आग लागल्याने १० शेतकऱ्यांच्या घरादारासह संसार उपयोगी साहित्य जळून भस्मसात झाले. या आगीत ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना वडगाव (ता. हिमयातनगर) येथे रविवारी मध्यरात्री घडली.

हिमायतनगर तालुक्यातील वडगाव येथे रविवारी मध्यरात्री अचानक आग लागली. रात्री १२ च्या सुमारास या आग लागल्याने घरातील सर्व शेतकरी कुटुंबासह उठून बाहेर आले. त्यानंतर घराला लागलेली आग विजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाणीटंचाई असल्याने शेतकऱ्यांना शेतातून पाईप लावून पाणी आणावे लागले. दरम्यान, वाऱ्यामुळे आग भडकत गेली. यामध्ये १० घरांना मोठा फटका बसला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने यामध्ये अन्नधान्य, संसार उपयोगी साहित्य, कपडे, टीन पत्रे, जनावरांचा चारा, खते, शेती उपयोगी साहित्य, रोख रक्कम, मालमत्तेची कागदपत्रे आदी जळून भस्मसात झाली. या घटनेने १० शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर आले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आगीच्या घटनेने नुकसानीत कुटुंबियांना शासनाने तातडीने मदतीचा हातभार लावावा अशी मागणी केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच तलाठी पी. जी. माने यांनी घटनास्थळी सकाळी ९ वाजता भेट देवून जळीत घटनेचा पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील बालाजी ताडकुले उपस्थित होते. यामध्ये दहा जणांचे अकरा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीच्या वादातून पत्नीचा खून

$
0
0

नांदेडः शेतीच्या वादावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकूड घालून खून केला. ही घटना किनवट तालूक्यातील सेवादास तांडा सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या परिसरात घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रकला नरेंद्र पवार असे खून झालेल्या महिलचे नाव आहे. याबबत महिती अशी की, नरेंद्र पवार हा दारूच्या आहारी गेल्याने व्यसनाधीन झाला होता. यामुळे चंद्रकालाच्या सासूने सुनेच्या नावावर काही शेती करून दिली.

शेतीच्या वादातून चंद्रकला व तिचा पती नरेद्र पवार या दोघांमध्ये नेहमी वाद होत होता. या वादाला कंटाळून चंद्रकला ही माहेरी सेवादास तांडा येथे आली होती. नरेंद्र पवार सोमवारी सकाळी सेवादास तांडा येथे सासरवाडीत येऊन पत्नीसोबत वाद घालत होता. यावेळी नरेंद्रने पत्नीच्या डोक्यामध्ये सागवान लाकडाने मारहाण केली. लाकडाचा मार डोक्यात लागल्याने चंद्रकलाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नरेंद्रने घटनास्थळावरून पळ काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. केसरी यांची कोठडीत रवानगी

$
0
0

नांदेडः निमा संघटनेच्या माजी अध्यक्ष डॉ. दीपक केसरीची दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर मागितलेली वाढीव पोलिस कोठडी नाकारून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. एस. सूर्यवंशी यांनी न्यायालयीन कोठडीत पाठवून दिले.

निमा या भारतीय स्तरावर काम करणाऱ्या वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. दीपक वसंतराव केसरी यांच्याविरूद्ध संघटनेचे सदस्य डॉ. श्रीराम मुंकूदराव कल्याणकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर डॉ. केसरीविरूद्ध गुन्हा दाखल झाला. काही त्रास होऊ नये म्हणून डॉ. केसरीने पोलिस उपनिरीक्षक रमेश सूर्यकरला लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सूर्यकरवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली.

दरम्यान डॉ. केसरीकडे न्यायालयात दिलेला अटकपूर्व जामीन होता. त्या आधारावर डॉ. केसरी पोलिसांच्या तपासात सहकार्य करत नव्हते म्हणून शिवाजीनगर पोलिसांनी त्यांचा जामीन नामंजूर करून घेण्यात यश मिळवले आणि त्यांना ३० जून २०१५ रोजी अटक करण्यात आली. एक जुलै रोजी डॉ. केसरीने न्यायालयात पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी जमिनीत विहिरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

तालुक्यातील सटाणा शिवारात चाळीस वर्षांपूर्वी लघु सिंचन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीची परस्पर विक्री करून ४९ विहिरी खोदण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या विहिरी ताब्यात घेऊन अतिक्रमण दूर करण्याच्या तहसीलदारांनी दिलेल्या निर्देशांचे पालन जलसिंचन विभागातर्फे केले जात नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

तालुक्यातील सटाणा शिवारात लघु सिंचन प्रकल्पासाठी सुमारे शंभर एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. या लघु सिंचन प्रकल्पातून घायगाव, सटाणासह पाच ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजनेद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जाते. गेल्या काही वर्षांपासून लघु सिंचन प्रकल्पातील जमिनीची परस्पर विक्री होत आहे. मोबदला मिळाला असतानाही काही शेतकरी दोन ते तीन लाख रुपये गुंठा या दराने जमीनी विकत असल्याची तक्रार जांबरगाव येथील सुभाष मगन साठे यांनी केली आहे. या जमिनीत अवैधरित्या विहिरी खोदून विद्युत मोटारीने पाण्याचा उपसा केला जातो, त्याकडे जलसिंचन विभागाचे दुर्लक्ष आहे, अशी तक्रार आहे. या तक्रारीनंतर वैजापूरच्या तहसीलदार सारिका शिंदे यांनी सटाणा येथे भेट देऊन या परिसरातील सर्व विहिरींचा पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शाखा अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पाहणीत सटाणा शिवारातील गट क्रमांक १६६ व १६७ सह अन्य गटातील तलावाच्या बुडित क्षेत्रात जवळपास ५३ विहिरी असल्याचे स्पष्ट झाले. त्यातील काही विहीर भूसंपादनापूर्वीच्या, काही ग्रामपंचायतीच्या आहेत. या शिवाय ४७ विहिरी जमिनीची परस्पर विक्री करून अवैधरित्या खोदण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

ग्रामपंचायतीच्या विहिरीपासून शंभर फुटांवर दुसरी विहीर खोदण्यात आली. त्यामुळे पाच गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याकडे सिंचन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप साठे यांनी तक्रारीत केला आहे. विहिरी ताब्यात घेण्याचे आदेश असतांनाही आतापर्यंत सिंचन विभागाने कोणतीही कारवाई केली नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. एका महिन्यात कारवाई न झाल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा साठे यांनी दिला आहे.

सटाणा येथील लघु सिंचन प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात अवैधरित्या ४९ विहिरी खोदल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांना विद्युत मोटार व पाइप काढण्यासाठी आठ दिवसांपूर्वी नोटीस दिली आहे. त्यांनी मोटार व पाइप न काढल्यास विभागामार्फत कारवाई केली जाईल.

- एम. के. चरवंडे, शाखा अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणचे दोन कर्मचारी निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैजापूर येथील धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेने ग्राहकांची वीज बिलाची रक्कम वर्षभर थकवल्याप्रकरणी वैजापूर येथील महावितरणचे एक अधिकारी व एका लिपिकास निलंबित करण्यात आले आहे. या पतसंस्थेकडे दोन वीज बिल भरणा केंद्र असून त्यांनी महावितरणचे ८० लाख रुपये भरले नाहीत.

महावितरण कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वैजापूर येथील धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेने महावितरणाकडून दोन वीज भरणा केंद्राचे कंत्राट घेतले होते. पतसंस्थेकडे जमा झालेली संपूर्ण रक्कम महावितरणकडे भरणे बंधनकारक आहे. मात्र पतसंस्थेने जुलै २०१४ ते जून २०१५ या कालावधीत रक्कम भरली नाही. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवून वैजापूर उपविभागातील उपव्यवस्थापक विजय दत्तायत्र कुलकर्णी आणि लिपिक सुनील अंभोरे यांच्या निलंबनाचे आदेश औरंगाबाद ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक फुलकर यांनी दिले. या प्रकरणात दोघांसह इतर कर्मचाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. धन्वंतरी प्रकरणात वर्षभर रक्कम न भरल्याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आणखी काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे.

धन्वंतरी पतसंस्थेकडून रक्कम न भरल्याच्या प्रकरणात दोघांना निलंबित केले आहे. पतसंस्थेने निलंबन कारवाई आधी ४२ लाख रुपये भरले आहेत. आणखी ३८ लाख रुपयांची वसुली आहे. रक्कम थकविल्याबद्दल पतसंस्थेकडून १८ टक्के व्याज वसूल केले जाणार आहे.- सतीश चव्हाण,

मुख्य अभियंता, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुऱ्हाडीने मारहाण; आरोपीस ६ महिने कैद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

खुलताबाद तालुक्यातील जमालवाडी येथील शेतीच्या बांधावरून झालेल्या मारहाणीत कु-हाडीने डाव्या डोळ्यावर गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणातील आरोपीस सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा खुलताबादचे न्यायाधीश अभय घुगे यांनी सुनावली. या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती अशी की, खुलताबाद तालुक्यातील जमालवाडी येथील बळीराम धुमा जाधव व राजेंद्रसिंह किसनसिंह ठाकूर यांच्या शेतीच्या बांधावरून ११ जानेवारी २००५ रोजी वाद झाला होता. या वादात राजेंद्रसिंहने बळीरामच्या डाव्या डोळ्यावर कु-हाडीने मारून गंभीर जखमी केले होते. घटना घडली त्याचदिवशी बळीराम जाधव यांनी राजेंद्रसिंह याने मारहाण केल्याची फिर्याद नोंदवली होती.

सहायक फौजदार बी. एच. खंदारे यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सात तर आरोपीतर्फे एक साक्षीदार तपासण्यात आला. सुनावणीनंतर राजेंद्रसिंह ठाकूर या आरोपीस सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा खुलताबादचे न्यायाधीश अभय घुगे यांनी सुनावली. सरकारी पक्षातर्फे वकील प्रमोद कुर्लेकर यांनी काम पाहिले त्यांना सखाराम सोनवणे यांनी सहाय्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीआय’पाइपवर उद्या फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या कामात एचडीआय पाइप वापरल्यामुळे उठलेल्या वादळावर उद्या, बुधवारी थेट मंत्रालयात चर्चा होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीवरून नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे.

महापालिकेने कंपनी बरोबर समांतर जलवाहिनीचा करार करताना डीआय पाइपचा वापर करण्याचा उल्लेख करारात केला होता, पण आता जलवाहिनीचे काम सुरू होताना डीआय ऐवजी एचडीपीआय पाइप वापरण्याचा ऐनवेळचा प्रस्ताव मार्च महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाने घुसडून मंजूर केला. त्यामुळे पालिकेला १५३ कोटी रुपयांचा फायदा होईल, असे पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी स्पष्ट केले होते. त्याला भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी आक्षेप घेतला. १५३ कोटी रुपयांचा लाभ ही फसवी बाब आहे. त्यामुळे करारानुसार डीआय पाइपच वापरा अशी मागणी पदाधिकारी व नगरसेवकांनी केली. त्याबद्दलची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे बुधवारी दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. बैठकीसाठीची आवश्यक माहिती सोबत घेऊन आयुक्त प्रकाश महाजन, शहर अभियंता सखाराम पानझडे व कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे सोमवारी मुंबईला रवाना झाले. पदाधिकारी व भाजपचे काही नगरसेवक उद्या सायंकाळी मुंबईला रवाना होण्याची शक्यता आहे.

१३ जुलै रोजी विशेष सभा

पाणीपट्टी वसुली आणि नळ कनेक्शनला लावण्यात येणारे मीटर या संदर्भाच चर्चा करण्यासाठी स्थायी समितीमधील भाजपच्या चार नगरसेवकांनी महापौरांकडे विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत महापौर त्र्यंबक तुपे यांनी १३ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरसेविकेला जाब विचारला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तुम्ही नगरसेविका झाल्यापासून आमच्या भागात समस्या सुरू झाल्या. पूर्वीचे नगरसेवक काम करायचे. त्यांच्या काळाता नियमित पाणी यायचे, रस्ते नीट होते. अन् तुम्हाला तर जनतेला भेटायलाही वेळ नाही, असे म्हणत महिलांनी सोमवारी नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांना धारेवर धरले. एन. चारच्या दर्पण सभागृहात ही शाब्दिक चकमक रंगली. माझे भेटणे महत्त्वाचे की, काम करणे असे म्हणत अदवंत यांनी संतापलेल्या महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

एन तीन व एन चार वॉर्डात होणारा अनियमित पाणीपुरवठा, कचऱ्याचा ढीग व चाळणी झालेल्या रस्त्यांची कैफियत मांडण्याकरता वॉर्डातल्या काही महिलांना पुढाकार घेत नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांना आमंत्रित केले. नगरसेवक भेटणार म्हणून ७० हून अधिक महिला परिसरातल्या दपर्ण सभागृहात एकत्र आल्या. पाणी व कचऱ्याचे योग्य नियोजनाचा आदर्श म्हणून या वॉर्डाकडे पाहिले जायचे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका मात्र, अद्यापही आम्हाला भेटायला आल्या नाहीत अशी या महिलांची तक्रार होती. सुरुवातीला अदवंत यांनी अत्यंत शांतपणे तीन महिन्यांची कार्यशैली स्पष्ट करत 'मी आपल्या समस्या सोडवण्याचेच काम करत होते', असे सांगितले. त्यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर मात्र महिलांचा संयम सुटला.

एकीकीने समस्या मांडायला सुरुवात केली. अनियमित पाणीपुरवठा होतो, पाण्याच्या वेळा निश्चित नाही, रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, कचरा उचलला जात नाही अशा समस्या सांगितल्या. एका नोकरदार महिलेने मला पाण्यासाठी सुटी घ्यावी लागली म्हणत आपला रोष व्यक्त केला. अदवंत यांनी या सर्व तक्रारी ऐकूण घेतल्या व पाणीपुरवठ्यासह वॉर्डातल्या प्रत्येक भागात नियमित भेट देत जाईल, असे स्पष्ट केले.

मी वॉर्डात येत नाही, भेटत नाही अशी नागरिकांची तक्रार होती. मात्र, निवडून आल्यापासून वॉर्ड समस्या व विशेषतः पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या कामास प्राधान्य दिले. पाण्याकरता तर आम्ही भाजपाच्या नगरसेवकांनी मिळून आंदोलनही केले. काही दिवसांत ही समस्या राहणार आहे. नगरसेविका म्हणून व त्याहीपेक्षा एक महिला म्हणून मला पाण्याची समस्या काय आहे, याची जाणीव आहे. सर्व काही सुरळीत व्हायला काही वेळ जाईल, हे नागरिकांनीही समजून घ्यावे.

- अॅड. माधुरी अदवंत, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी जाळ्यात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड पोलिसांना खंडणीच्या गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीला सिटीचौक पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण प‌थकाने अटक केली. रविवारी रात्री बारा वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली असून आरोपीला बीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

बीड शहर पोलिस ठाण्यात शहेबाज शेख कलीम (वय २७ रा. बीड) याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. शहेबाज हा सध्या रोहीलागल्ली येथे वास्तव्यास असून त्याने गुन्ह्यात वापरलेली कार (क्रमांक एमएच २३ एडी ०८१०) जुना बाजार येथे लपवून ठेवली आहे तसेच आरोपी शहेबाज लोटाकारंजा येथे असल्याची माहिती पोलिस नाईक इरफानखान याना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी कार ताब्यात घेत लोटाकारंजा येथून शहेबाजला अटक केली. त्याची झडती घेण्यात आली असता त्याच्याजवळ विविध कंपनीचे सीमकार्ड आढळून आले. पोलिसांनी त्याला बीडच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई एसीपी खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिनेश बन, सुनील राऊत, इरफान खान आदींनी केली.

हद्दपार गुन्हेगार गजाआड

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला अट्टल आरोपी शेख कैसर शेख अन्वर (वय २३ रा. कैसर कॉलनी) हा रविवारी औरंगपुरा भागात आला असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने औरंगपुऱ्यातून आरोपी शेख कैसरला अटक केली. त्याच्याजवळ धारदार चाकू पोलिसांना आढळला. त्याच्याविरूद्ध् क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार जणांना पोलिस कोठडी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको परिसरातील घरातून झालेल्या ६८ हजार रुपयांच्या मुद्देमालाच्या चोरीप्रकरणी तिघा आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. व्ही. कस्तुरे यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये आई, मुलगा, सून व नातवाचा समावेश आहे.

टाऊन सेंटर परिसरातील प्लॉट क्रमांक ५५ (सेक्टर एक) परिसरातील अर्चना जितेंद्र दिघे (४६) यांनी या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ३ जुलै रोजी स्वयंपाकघरात कुकरी शोची तयारी करीत असताना त्यांच्या घराचे समोरचे दार उघडे होते आणि कामानिमित्त बाहेरच्या खोलीत आल्यावर पर्सची चोरी झाल्याचे लक्षात आले. या पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने व रोख पाच हजार रुपये चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले होते.

दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पाच जुलै रोजी मिसारवाडीच्या कादरिया कॉलनीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार मालनबाई मकळेला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. तपासी अंमलदार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हरिष खटावर यांनी तपास करून मालनबाई शंकर मकळे (५७), अंकुश शंकर मकळे (४०), मंगलबाई अंकुश मकळे (३२) व राहुल अंकुश मकळे (१९) (सर्व रा. मिसारवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. खटल्यावेळी आरोपींकडून रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करणे बाकी आहे. तसेच आरोपी सराईत असून तपास करण्यासाठी पोलिस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकार पक्षाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कस्तुरे यांनी आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

बीड जिल्ह्यातील तीन बहिणी ताब्यात

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हरवलेल्या बालकांच्या शोधासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत बीड जिल्ह्यातून आलेल्या तीन बहिणींना गुन्हेशाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या पालकांना हा प्रकार कळवण्यात आला असून सध्या त्यांची रवानगी महिलागृहात करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी दीडशे पोलिस कर्मचारी अधिकारी पथकांमध्ये नेमण्यात आले आहेत.

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी गुन्हेशाखेचे पथक सोमवारी सकाळी बसस्टँड परिसरात फिरत होते. यावेळी एका हॉटेलमध्ये तीन तरुणी आढळल्या. यामध्ये एक १९ वर्षांची विवाहिता तर उर्वरित दोघी अल्पवयीन होत्या. यांची चौकशी केली असता या तिघी सख्ख्या बहिणी असून रविवारी शहरात आल्याची माहिती मिलाली. त्यांच्या गावातील एका परीचिताने त्यांना औरंगाबाद शहर दाखविण्यासाठी स्कॉर्पियो कारमध्ये आणल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, ही व्यक्ती सोमवारी गावाकडे अचानक निघून गेली. हरवलेल्या या तीन बहिणींना गुन्हेशाखेत आणण्यात आले. त्यांच्या पालकांना फोन करून ही माहिती देण्यात आली. जिल्हा बाल कल्याण समितीच्या सदस्यांना हा प्रकार कळवित बोलावून घेण्यात आले. सायंकाळपर्यंत या बहिणीचे पालक आले नसल्याने त्यांची रवानगी महिलागृहात करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

विविध पथके तैनात

ऑपरेशन मुस्कान मोहीम राबवण्यासाठी सोमवारी पोलिस आयुक्तालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध पोलिस ठाण्याचे दहा अधिकारी, ८९ कर्मचारी, गुन्हेशाखेचे दोन अधिकारी व ३० कर्मचारी तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल सरंक्षण कक्ष व जिल्हा बाल कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

आमदाराचा वाद पोलिस ठाण्यात

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील एका आमदाराने नो-पार्किंगमध्ये कार उभी करण्यावरून वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याशी चांगलाच वाद घातला. उस्मानपुरा परिसरात सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. पोलिस कर्मचारीही खमक्या निघाला. हा वाद पोलिस ठाण्यात पोहचला. मात्र, वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर आपसात मिटविण्यात आला.

जिल्ह्यातील एक आमदार शहरातच वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळी कारमध्ये आमदार उस्मानपुरा परिसरात आले होते. त्यांनी नो पार्किंग झोनमध्ये त्यांची कार उभी केली. एका वाहतूक कर्मचाऱ्याने हे पाहून त्यांना नो पार्किंग झोन असल्याचे सांगितले. यावर आमदारांनी येथे कुठे असे लिहिले आहे, असा सवाल केला. पोलिस कर्मचारी म्हणाला, 'साहेब येथे पार्किंग करा असे तरी कुठे लिहिले आहे दाखवा.' यावरून दोघांत चांगलाच वाद झाला. उस्मानपुरा पोलिस ठाण्यापर्यंत प्रकरण पोहचले. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत हा वाद आपसात मिटविला.

चार्लींच्या सतर्कतेने दुचाकी चोर गजाआड

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात सुरू असलेल्या चार्लींच्या गस्ती पथकाच्या सतर्कतेने दुचाकी चोर पकडण्यात यश आले आहे. रविवारी ही घटना घडली. दरम्यान, महिला चार्लीच्या सतर्कतेने चोरलेली दुचाकी सोडून चोरट्यांनी पलायन केले आहे. सिडको व सिटीचौक हद्दीत या घटना घडल्या.

सिडको पोलिस ठाणे हद्दीतील चार्ली पथक क्रमांक ३२ चे कल्याण पाटील व कुंदन आल्हाटे हे दोघे रविवारी जळगाव रोडवर गस्त घालीत होते. यावेळी त्यांना सय्यद हनीफ सय्यद हबीब हा तरुण संशयितरित्या विना क्रमांकाच्या अॅक्टिव्हा दुचाकीवर जाताना आढळला. हनीफला ताब्यात घेतले असता ही मोपेड चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. हनीफ रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. हनीफला दुचाकीसह सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पाच दिवसांपूर्वी सिटीचौक हद्दीतून एक हिरोहोंडा दुचाकी चोरीला जाण्याची घटना घडली होती. दुचाकी चालकाने तात्काळ ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर वायरलेस सेटवर ही माहिती देण्यात आली. सिटीचौक हद्दीतील महिला चार्ली पथकाच्या सुप्रिया मुरकुटे, जयश्री काकडे, हीना पठाण व अंबीका पवार यांनी वायरलेसवर ही माहिती ऐकली. नेमके त्याचवेळी ही दुचाकी त्यांना एका तरुणाकडे दिसली. त्यांनी तरुणाचा पाठलाग केला. आपला पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच या तरुणाने दुचाकी महानगरपालिकेजवळ असलेल्या नाल्यामध्ये टाकून पलायन केले. ही दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सिटीचौक पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पाठलाग करून संशयितांना अटक

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चोरीच्या हेतूने अंधारात लपून बसलेल्या दोघांना गुन्हेशाखेच्या पथकाने पाठलाग करून अटक केली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेशाखेचे जमादार नितीन मोरे, रणजीत राजपूत, वाल्मीक जगदाळे व देविदास राठोड शनिवारी मध्यरात्री हर्सूल टी पॉइंट भागात गस्त घालीत होते. यावेळी ऑडीटर सोसायटीच्या भिंतीजवळ दोन तरुण त्यांना अंधारात लपून बसलेले आढळले. पोलिसांनी त्यांना हटकले असता या दोघांनी पलायन केले. त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. पोलिसांनी संशयित आरोपी मिनाजखान अय्युबखान (वय २३ रा. किराडपुरा दर्गाजवळ) व जुबेरखान इलियासखान (वय १९ रा. रहेमानीया कॉलनी) यांच्याविरूद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

डोक्यात पाटा घालून पतीचा खून

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मद्यपी पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने दोन जणासह पतीवर लोखंडी रॉडने मारहाण करीत डोक्यात पाटा घातल्याची खळबळजनक घटना संतोषीमातानगरात घडली. या अपघातात पतीचा मृत्यू झाला. दरम्यान, मुकुंदवाडी पोलिसांनी पत्नीसह दोघांना ताब्यात घेतले असून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोषीमातानगर, गल्ली क्रमांक ४ येथे वास्तव्यास असलेला रमेश शंकर मोरे (वय ४०) हा दुर्धर आजाराने त्रस्त आहे. मजुरी काम करून रमेश उपजिविका करतो. मद्याचे व्यसन असल्याने रमेश नेहमी मद्याच्या नशेमध्ये पत्नी व मुलामुलींना शिवीगाळ करीत होता. गेल्यावर्षी त्याने पत्नीवर संशयावरून चाकूहल्ला देखील केला होता. त्याच्या या सवयीमुळे पत्नी अनिता मुलांना घेऊन वेगळे राहत होती. या ठिकाणी देखील रमेश त्यांना येऊन त्रास देत होता. या छळाला कंटाळलेल्या पत्नी अनिताने मुलगा व एका व्यक्तीसह सोमवारी दुपारी संतोषीमाता नगर गाठले. गल्लीतच लोखंडी रॉडनी त्यांनी रमेशला बेदम मारहाण केली. नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना घरातील बाब आहे, असे म्हणत हाकलून लावण्यात आले. यानंतर घरात नेऊन रमेशला पुन्हा मारहाण करीत त्याच्या डोक्यात पत्नी अनिताने दगडी पाटा मारला. या मारहाणीत रमेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने घाटीमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळी एसीपी सुखदेव चौगुले, पोलिस निरीक्षक नाथा जाधव, पीएसआय शेख हारून आदींनी भेट दिली. पत्नी अनितासह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताटातूट झालेल्या माय-लेकांची मनमाडला झाली भेट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आजीला शाळेत जाण्याची सबब सांगून परतूरहून दोन मुले आई-वडिलांना भेटण्यासाठी रेल्वेने नाशिककडे निघाली. आई-वडिलांचा नाशिकचा पत्ता ठाऊक नसताना भेटीसाठी व्याकुळ झालेली ही मुले अखेर रेल्वे प्रवाशांच्या मदतीने आई-वडिलांपर्यंत सुखरूप पोहोचली.

जालना जिल्हयातील मंठा तालुक्यातील शिरपूर गावात प्रवीण (वय ८) व त्याचा भाऊ शैलेश उत्तम कांबळे (११) हे आपल्या आजीसोबत राहतात. त्यांचे आई- वडील आणि एक भाऊ नाशिक येथे कामावर गेले होते. दुरावलेल्या आईच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या या मुलांनी २९ जूनला आजीला शाळेत जातो, अशी थाप मारली. दप्तर बाथरुममध्ये लपवून दोघांनी पायीच परतूर स्थानक गाठले. नाशिकला जाण्यासाठी ते नंदीग्राम एक्सप्रेसच्या एस ७ डब्यात ५१ व ५६ या सीटजवळ बसले. ही रेल्वे औरंगाबादला आली असता काही प्रवाशांनी या मुलांबाबत पोलिसांना व रेल्वे प्रवासी सेनेला माहिती दिली. लोहमार्ग पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

लोहमार्ग पोलीसांना मुलांकडूनच शिरपूरचा पत्ता मिळाला. ही माहिती जालना पोलिस अधीक्षक कार्यालयाला देण्यात आली. त्यांनी शिरपूर पोलिस ठाण्याला मुलांचे वर्णन कळवले. तोपर्यंत गावात आजी आणि गावकरी दोन्ही मुलांचा शोध घेत होते. अखेर आजीकडून शिरपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक चारभरे यांनी मुलांच्या आई-वडिलांचा नाशिक येथील पत्ता मिळवून दिला.पोलिसांनी प्रवीण आणि शैलेश यांना रेल्वेत बसविले. त्यांना मनमाड रेल्वे स्टेशनवर उतरविण्याची हमी रेल्वे सेनेचे संतोष सोमाणी यांनी घेतली. मनमाड लोहमार्ग पोलिसांनाही माहिती कळविण्यात आली.

रात्री ११ वाजता रेल्वे मनमाडला पोहोचल्यानंतर तेथे मुलांचे नाशिकहून आलेले आई-वडील आणि भाऊ उभे होते. मुलांची भेट होताच आई-वडिलांसह स्टेशनवरील प्रवाशांची डोळेही पाणावले. दोन्ही मुलांना घेऊन त्यांच्या आई-वडिलांनी नाशिक गाठले.

आईला भेटल्याशिवाय जेवण नाही

आधी शिरपूर ते मंठा पायपीट करून नाशिकला निघालेले प्रवीण आणि शैलेश उपाशीच होते. त्यांना एक प्रवासी संगीता पाटील यांनी काही तरी खाऊन घेण्यास सांगितले, पण जोपर्यंत आई भेटणार नाही तोपर्यंत न जेवण्याचा निश्चय मुलांनी केला होता. मनमाडला आईला भेटल्यानंतरच त्यांनी जेवणाला हात लावला, अशी माहिती सोमाणी यांनी‌ दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिरुपतीपर्यंत कनेक्टिंग फ्लाइट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बालाजी दर्शनासह शिर्डीच्या भाविकांसाठी ट्रू मेगा जेटची औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा जुलैअखेर सुरू केली जाणार आहे. औरंगाबाद ते हैदराबाद या विमानसेवेला तिरुपतीचेही कनेक्शन मिळणार असून, बेंगळुरू आणि अन्य शहरांचेही कनेक्शन करण्याचा विचार कंपनीकडून सुरू आहे.

औरंगाबाद विमानतळावरून ट्रू मेगा जेट कंपनीची विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. कंपनीचा औरंगाबाद ते हैदराबाद विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणाने मंजूर केला आहे. शनिवारी या विमानाची चाचणी औरंगाबाद विमानतळावर घेण्यात आली. जुलै अखेरपर्यंत कंपनीची औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा सुरू केली जाणार आहे. औरंगाबादेतून हैदराबादेत पोहोचल्यानंतर तिरुपतीला जाण्यासाठी विमान उपलब्ध होणार आहे. यामुळे औरंगाबादच्या प्रवाशांना थेट तिरुपतीपर्यंत कनेक्शन मिळणार आहे.

विमानसेवा जुलैअखेर

सुरू करण्यातय येणार आहे. प्रवासाच्या भाड्याचा कोणताही निर्णय आम्हाला अद्याप कळविलेला नाही, मात्र ओपनिंग सेरेमनीसाठी वि‌शेष सवलत असणार आहे. औरंगाबादहून तिरुपतीला जाणाऱ्यांसाठी कनेक्टिंग फ्लाइट उपलब्ध होणार आहे. यामुळे शिर्डी आणि तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांचा सोय होईल.

- स्वप्नील हरकळ, एअरपोर्ट मॅनेजर, ट्रु मेगा जेट कंपनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचनाम्यातून मसाज पार्लर गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राकाज् लाइफ स्टाइलच्या पंचनाम्यातून चक्क मसाज पार्लर गायब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मसाज पार्लर, लेडिज आणि जेंटस् पार्लर याचा उल्लेखही पंचनाम्यात नाही. दरम्यान, सील करण्याच्या विरोधात राकाज् लाइफ स्टाइलच्या संचलकांनी कोर्टात धाव घेतली असून, त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

ज्योतीनगर येथील राकाज् लाइफ स्टाइल क्लबची शनिवारी महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, आयुक्त प्रकाश महाजन यांनी झाडाझडती घेतली. पंचनामा करून संपूर्ण क्लबला सील करण्याचे आदेश आयुक्तांनी बीओटी कक्षप्रमुख सिकंदर अली यांना दिले. त्यानुसार त्यांनी शनिवारी रात्री क्लबला सील ठोकले. सोमवारी 'राकाज्'संदर्भात कोर्टाने महापालिकेला नोटीस बजावल्याचे स्पष्ट झाले. पालिकेच्या कारवाईच्या विरोधात 'राकाज्'ने कोर्टात धाव घेतली. जास्तीचे बांधकाम आम्ही स्वतः काढून घेतले, असा दावा कोर्टात केलेल्या अर्जात केला आहे. ही बाब महापौर, उपमहापौरांच्या निदर्शनास आली. त्यांनी सिकंदर अली, विधी सल्लागार ओ. सी. शिरसाट यांना चर्चेसाठी बोलावले. त्याचबरोबर तेथे करण्यात आलेला पंचनामाही मागवण्यात आला. पंचनाम्यात मसाज पार्लर, लेडिज आणि जेंटस् पार्लर याचा उल्लेखच नसल्याचे समोर आले.

पूल टेबल, डान्स क्लासचा पंचनाम्यात उल्लेख

पत्र्याचे तीन शेड, पूल टेबल, संगीत वर्ग, डान्स क्लास असे जास्तीचे बांधकाम करण्यात आले होते. ते विकासक स्वतः काढून घेत आहेत, असे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. पंचनाम्यावर तेथे काम करणारे इलेक्ट्रिशिअन मनोज जानकर, पंकेश व्यवहारे यांच्यासह बीओटी विभागाचे उपअभियंता एस. एस. रामदासी, विकासकाचे प्रतिनिधी म्हणून अजय पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images