Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

चित्रकलेत चारच विषय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांना देता येणारी शासकीय रेखाकला परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. कला संचालनालयाने याबाबत स्पष्ट केले आहे. अनेक वर्षानंतर प्रथमच बदल झालेल्या या अभ्यासक्रमातून दोन विषय रद्द करून चार विषयांवरच परीक्षा घेतली जाणार आहे.

चित्रकलेला चालना मिळावी म्हणून कला संचालनालयातर्फे दरवर्षी एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा घेण्यात येते. हे दोन विषय अवांतर आहेत. परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी ग्रेड दिले जातात. यासाठी शाळांमध्ये चित्रकला शिक्षकही नेमण्यात येतो. पाचवीनंतर एलिमेंटरी परीक्षा देता येते. यानंतर इंटरमिजिएट परीक्षा असते. सातवी, आठवीनंतर डीटीएड, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर अशा विविध अभ्याक्रमाच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. या विषयांच्या अभ्यासक्रमांत गेल्या तीस वर्षांपासून बदल झाले नव्हते. अखेर कला संचालनालयाने अभ्यासक्रमात बदल करूत दोन विषय कमी केले. नव्या बदलात निसर्गचित्र आणि मुक्तहस्त चित्र हे विषय वगळण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना यापुढे आता चारच विषय द्यावे लागणार आहेत.

नोव्हेंबरमध्ये परीक्षा

एलिमेंटरी, इंटरमिजिएट या परीक्षांसाठी जून ते ऑगस्ट या कालावधीत अर्ज स्वीकारले जातात. त्यानंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यभरात एकाच वेळीही परीक्षा घेण्यात येते. यात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे प्रमाणपत्र दिले जाते.

साधारण ३० वर्षांपासून विषयात बदल करण्यात आले नव्हते. यंदा हे बदल करून दोन विषय कमी केले आहेत. विद्यार्थ्यांना चार विषयांचीच परीक्षा द्यावी लागेल. याबाबत केंद्रप्रमुखांना माहिती देण्यासाठी कार्यशाळाही लवकरच घेण्यात येणार आहे.

- प्रल्हाद शिंदे, सरचिटणीस, ललित कला शिक्षक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुलगुरूंनी राजीनामा द्यावा; मनविसेची मागणी

$
0
0

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात विद्यापीठात प्रशासकीय व शैक्षणिक अनियमितता झाली आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप-शहराध्यक्ष गौतम आमराव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

बारकोड उत्तरपत्रिकांची खरेदी, केंद्रीय विद्यापीठाच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. यासह वित्त व लेखाधिकारी पदावर डॉ. सय्यद अझरुद्दीन यांची करण्यात आलेली नियुक्तीही योग्य नसल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. पत्रकार परिषदेला राज कल्याणकर, विशाल आमराव, आनंद खरात आनंद भिसे, सागर जाधव यांची उपस्थिती होती. तर हे आरोप पूर्णपणे चुकीचे व बिनबुडाचे असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१ जुलैपासून सैन्यदलाची महाभरती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सैन्यदलातील भरतीसाठी मराठवाडा, खान्देश आणि विदर्भाच्या बुलडाणा जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना संधी चालून आली आहे. सुमारे १ हजार जागांसाठी विभागीय क्रीडा संकुलात २१ जुलै ते ६ ऑगस्ट यादरम्यान भरती सुरू होणार आहे, अशी माहिती कर्नल समीर चौधरी यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.

सैनिक (सोल्जर जनरल ड्युटी), सैनिक तांत्र‌िक (सोल्जर टेक्निकल), सैनिक कारकून (सोल्जर क्लर्क-एसकेटी), सैनिक ट्रेडमन (सफाईवाला, आचारी, मसाजी) या पदांवर सुमारे १ हजार जणांची भरती करण्यात येणार आहे. विविध जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी वेळापत्रक ठरविण्यात आले अाहे. यंदा सुमारे ५० हजारांहून अधिक उमेदवार भरतीसाठी येतील, असा अंदाजही कर्नल चौधरी यांनी व्यक्त केला. परीक्षा व वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापूर, अहमदाबाद येथील प्रत्येकी ४ जणांची टीम येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

भरती प्रक्र‌िया मध्यरात्रीपासून

फिजिकल टेस्ट, कागदपत्रांची तपासणी व अन्य चाचण्या मध्यरात्री एकपासून सुरू होईल. सकाळी ६पर्यंत ही सर्व भरती प्रक्र‌िया सुरू असेल. औरंगाबादेत सध्या उष्ण व दमट वातावरण आहे. फिजिकल टेस्टदरम्यान त्याचा उमेदवारांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे पहाटे १ ते सकाळी ६ या कालावधीत भरती प्रक्र‌िया राबविण्यात येणार असल्याचे असे कर्नल चौधरी यांनी स्पष्ट केले.

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

सैनिक(सोल्जर जनरल ड्युटीः दहावी पास (४५ टक्के अॅग्र‌िगेट, सर्व विषयांत ३३ टक्के सरासरी आवश्यक)

सैनिक तांत्र‌िक (सोल्जर टेक्निकल) ः तीन वर्षांचा डिप्लोमा इन इंजिनीअरिंग (एआयसीटी मान्यता असलेल्या संस्थेतून), बारावी सायन्समध्ये (पीसीएम व इंग्लिश) ४५ टक्के गुण. दहावीला किमान ५० टक्के गुण आवश्यक.

सैनिक कारकून (सोल्जर क्लर्क- एसकेटी) ः ५० टक्के गुणांसह बारावी पास व सर्व विषयात किमान ४० टक्के गुण आवश्यक (कला, वाणिज्य किंवा विज्ञान) गणित व अकाउंटन्सी, बुक किपिंग विषय असल्यास दहावी व बारावीमध्ये किमान ४० टक्के गुण आवश्यक)

पदवीधर असल्यास गणित आणि इंग्लिश विषयात किमान ४० टक्के असणे आवश्यक. पदवीधर इंग्लिश किंवा गणित, अकाउंट्स, बुक किपिंग विषय घेऊन उत्तीर्ण झाले नसतील त्यांनी किमान दहावी व बारावीत या विषयांत किमान ४० टक्के गुण आवश्यक)

सैनिक ट्रेडमॅन (सफाईवाला, आचारी, मसाजी)ः आठवी किंवा दहावी उत्तीर्ण आवश्यक



भरतीचे जिल्हानिहाय वेळापत्रक

२१ जुलै ः हिंगोली व नंदुरबार (सर्व तालुके)

२२ जुलै ः जळगाव (तालुके ः जळगाव, अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड)

२३ जुलै ः जळगाव (तालुकेः चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जामनेर)

२४ जुलै ः जळगाव (तालुकेः मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल)

२५ जुलै ः परभणी (तालुके ः गंगाखेड, मानवत, पालम, पाथरी, पूर्णा, सेलू, परभणी, सोनपेठ, जिंतूर)

२६ जुलै ः नांदेड (तालुके ः नांदेड, अर्धापूर, बिलोली, भोगर, देगलूर, धर्माबाद, हादगाव, हिमायतनगर)

२७ जुलै ःनांदेड (तालुके ः कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुखेड, मुदखेड, नायगावखैर, उमरी)

२८ जुलै ः बुलडाणा (तालुके ः खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, मोताळा)

२९ जुलै ः बुलडाणा (तालुकेः बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, जळगाव जामोद)

३१ जुलै ः बुलडाणा (तालुके ः नांदुरा, संग्रामपूर, सिंदखेडराजा, शेगाव)

१ ऑगस्ट ः जालना (तालुकेः जालना, अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफ्राबाद, मंठा, परतूर)

२ ऑगस्ट ः औरंगाबाद (तालुके ः पैठण, फुलंब्री, सिल्लोड)

३ ऑगस्ट ः औरंगाबाद (तालुके ः सोयगाव, वैजापूर, कन्नड)

४ ऑगस्ट ः औरंगाबाद(तालुके ः औरंगाबाद, खुलताबाद, गंगापूर)

५ ऑगस्ट ः धुळे (तालुके ः धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर)

६ ऑगस्ट ः माजी सैनिकांची मुले (सर्व नऊ जिल्ह्यांसाठी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैष्णवी, श्रावणी बनल्या ‘मुख्यमंत्री’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेत शालेय संसद निवडणूक मंगळवारी जल्लोषात घेण्यात आली. शालेयस्तरावर लोकशाहीचे प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने ही निवडणूक घेण्यात आली. वैष्णवी घारापूरकर व श्रावणी कुलकर्णी यांनी 'मुख्यमंत्री' म्हणून बाजी मारली आहे. जयश्री गुंगे व आकांक्षा पोफळे यांना 'संसद अध्यक्ष' म्हणून निवडून देण्यात आले. निकालानंतर विद्यार्थिनींनी विजयी उमेदवारांना खांद्यावर उचलून जल्लोष केला.

माध्यमिक विभागात जयश्री गुंगेची संसद अध्यक्षपदी निवड झाली. तनिष्का चव्हाणने उपाध्यक्षा म्हणून विजय मिळविला. वैष्णवी घारापूरकरची 'मुख्यमंत्री' म्हणून निवड करण्यात आली. उच्च प्राथमिक विभागाच्या १५ तुकड्यांमधून श्रावणी कुलकर्णीने मुख्यमंत्री म्हणून बाजी मारली. संसद अध्यक्षा म्हणून आकांक्षा पोफळे तर उपाध्यक्षा म्हणून गार्गी क्षीरसागरची निवड झाली. मुख्याध्यापिका सुरेखा देव-कुलकर्णी यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. उपमुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव-निकाळजे, पर्यवेक्षिका प्रभावती गोंधळी, आशा आल्टे यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. सविता पवार, वैशाली देशपांडे, साधना गोराडे, स्वाती पुंड यांनी संसद निवडणुकीचे कामकाज पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७५ टक्क्यांखाली ऑक्सिजन धोकादायक

$
0
0

निखिल निरखी, औरंगाबाद

स्वाइन फ्लूमध्ये रुग्णाच्या शरीरातील प्राणवायूची पातळी (ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन) पुरेशी असणे अत्यंत आवश्यक असल्याचे घाटीच्या अभ्यासामध्ये स्पष्ट झाले आहे. ऑक्सिजनची पातळी ७५ टक्क्यांपेक्षा कमी होणे रुग्णांसाठी घातक असल्याचे समोर आले आहे.

स्वाइन फ्लूचे रुग्ण दाखल होताना शरीरातील ऑक्सिजनची पातळी ६० टक्क्यांपर्यंत असलेल्यांचा मृत्यू झाला आहे. ७५ टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन असलेले तब्बल ७८ टक्के रुग्ण दगावले आहेत, तर ७६ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन असलेले सर्वाधिक रुग्ण आणि ८८ टक्क्यांपुढे ऑक्सिजन असलेले सर्व रुग्ण वाचल्याचे या अभ्यासामध्ये दिसून आले आहे.

'स्वाइन फ्लू'शी संबंधित अशा प्रकारचा अभ्यास पहिल्यांदाच झाला असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) औषधवैद्यकशास्त्र विभागाचे निवासी डॉक्टर डॉ. सागर पाटील व डॉ. विम्लेश पांडे यांनी विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला आहे. घाटीच्या स्वाइन फ्लू वॉर्डामध्ये दाखल झालेल्या स्वाइन फ्लूच्या ५९ पॉझिटिव्ह रुग्णांच्या अभ्यासावरून हा निष्कर्ष काढण्यात आला असून, 'जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया'च्या 'जापी' या पाक्षिकासाठी हा शोध निबंध पाठविण्यात आला आहे.

देशभरात नोव्हेंबर ते मे या काळात घाटीतील स्वाइन फ्लू वॉर्डामध्ये शहरासह मराठवाडा व विदर्भाचे १५२ रुग्ण दाखल झाले आणि 'एनआयव्ही'च्या रिपोर्टवरून ५९ रुग्णांना स्वाइन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले. यातील ३५ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले तर, २४ पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वाइन फ्लू वॉर्डामध्ये दाखल होताना ऑक्सिजनची पातळी ६० टक्क्यांपर्यंत होती, असे सर्व ८ रुग्ण दगावले. 'ऑक्सिजन लेव्हल' ६१ टक्के ते ७५ टक्क्यांपर्यंत असलेल्या ९पैकी ७ म्हणजेच ७८ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. ७६ ते ८८ टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन असलेले ३३ रुग्ण वाचले व ९ रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पातळी ८८ टक्क्यांपेक्षा जास्त असलेले सर्व रुग्ण वाचल्याचेही या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

ऑक्सिजन वाढला तरीही...

स्वाइन फ्लूचा कुठलाही रुग्ण दाखल होताना, आधी 'पल्स ऑक्सिमिटर'वरून त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्याचा प्रोटोकॉल पाळण्यात आला. ऑक्सिजन कमी असल्याचे लक्षात येताच अशा रुग्णांना तात्काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. व्हेंटिलेटरवरील अशा रुग्णांची 'ऑक्सिजन लेव्हल' वाढली तरी दाखल होताना ६० टक्क्यांपर्यंत 'ऑक्सिजन लेव्हल' असलेल्या सर्व रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

असे आहेत निष्कर्ष...

६० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन म्हणजेच फुफ्फुसांना गंभीर इजा

गरोदरपणा, बाळंतपणामध्ये स्वाइन फ्लू ठरू शकतो जीवघेणा

मधुमेह, एचआयव्ही, उच्च रक्तदाब, स्थूलता हे 'रिस्क फॅक्टर'

सर्वसामान्य ऑक्सिजन पातळी ९५ ते ९८ टक्के असणे गरजेचे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करारानुसार पाइप वापरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीसाठी डीआय पाइपऐवजी दुय्यम दर्जाचे एचडीपीआय पाइप वापरण्याचा महापालिकेचा डाव सरकारने उधळून लावला आहे. 'समांतर जलवाहिनीसाठी डीआय (ड्युक्टाइल आयर्न) पाइपच वापरावेत. महापालिकेने कंपनीशी केलेल्या कराराचे पालन झालेच पाहिजे,' असे स्पष्ट आदेश शासनाच्या नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर यांनी सोमवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे 'डीआय'ऐवजी 'एचडीपीआय' (हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन) पाइप वापरण्याचा मुद्दा आता निकाली निघाला आहे.

समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पात डीआयऐवजी एचडीपीआय पाइप वापरण्याचा ऐनवेळचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशासनाने मार्च महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेतला होता. करारात मात्र डीआय पाइप वापरण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे डीआय पाइपच वापरा, अशी मागणी करून पालिकेतील भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळच्या प्रस्तावाला आक्षेप घेतला होता. एचडीपीआय पाइप वापरण्याचा प्रस्ताव रद्द करा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याची बुधवारी दुपारी चार वाजता नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. बैठकीचे ब्रिफिंग घेण्यासाठी सोमवारी रात्री नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीला आयुक्त प्रकाश महाजन, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता के. एम. फालक, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

समांतर जलवाहिनीसाठी करारानुसार फक्त डीआय पाइपच वापरा, असे आदेशच म्हैसकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. करारात बदल खपवून घेतले जाणार नाही, अशी ताकीदही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. या प्रकल्पाची नुसतीच चर्चा होत आहे. प्रत्यक्ष कामही कधी करणार, असा सवाल त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारला व लवकर काम सुरू करा, असे आदेश दिले. काम योग्य प्रकारे सुरू झाले तर शासकीय अनुदानाचा दुसरा हप्ता राज्य सरकार देईल, असे आश्वासन म्हैसकर यांनी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

आज राज्यमंत्र्याबरोबर बैठक

पाइप वापराच्या मुद्यासंदर्भात बुधवारी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पालिकेतील भाजपचे पदाधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौरदिवे खरेदीप्रकरणी गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने २९ लाख ४० हजार रुपयांचे निकृष्ट दर्जाचे सौरदिवे खरेदी केल्याप्रकरणी कोर्टाच्या आदेशाने क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीमध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अॅडिशनल सीईओ संभाजी लांगोरे, समाज कल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे, मुख्य लेखा अधिकारी विलास जाधव, प्रभारी समाजकल्याण अधिकारी एम. सी. राठोड, सहायक लेखाधिकारी डी. डी. जोशी, समाजकल्याण निरीक्षक एस. एम. सिंदीकर यांच्यासह क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक बालाजी सोनटक्के यांचा समावेश आहे.

हनंमतखेडा येथील राजेंद्र राठोड यांनी याप्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. २०१२मध्ये समाज कल्याण विभागाने वैयक्तिक लाभ योजनेत सौरदिवे बसविण्यासाठी २९ लाख ४० हजारांची तरतूद केली होती. समाज कल्याण समितीच्या २० ऑक्टोबर २०१२ रोजी झालेल्या सभेमध्ये हा मुद्दा विषय पत्रिकेवर नव्हता. २९ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या तहकूब सभेमध्ये हा विषय नियमबाह्य पद्धतीने मांडून मान्यता देण्यात आली होती. त्याचबरोबर ९ नोव्हेंबर रोजी पुरवठा आदेश देत १४७० सौर दिवे बी. जी. अप्लाएन्सेस या कंपनीकडून खरेदी करण्यात आले होती. यासाठी लाभार्थ्यींची खोटी यादी तयार करण्यात आली. हे दिवे निकृष्ट दर्जाचे असून, त्याची किंमत देखील जास्त लावली, असे आरोप राजेंद्र राठोड यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, मात्र ती तक्रार तत्कालीन पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दाखल करून घेतली नव्हती. याप्रकरणी राठोड यांनी अखेर कोर्टात धाव घेतली. कोर्टाने याप्रकरणी सबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे केवळ ढोंग’

$
0
0

नांदेडः गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस आघाडीचे सरकार असतानाही जिल्ह्यात ६६८ कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु, आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या घरी जावून काँग्रेसच्या नेत्यांनी साधे सांत्वन सुद्धा केले नाही. आता मात्र, शेतकऱ्यांचा प्रश्नावरुन वेगवेगळे आंदोलन करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे केवळ ढोंग करीत असून, या पुढाऱ्यांचा कावा जनतेने ओळखावा, असे आवाहन शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी केले.

थोरात म्हणाले, 'काँग्रेसचे पुढारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे साधे अश्रू पुसण्यासाठी सुद्धा त्यांच्या घरी गेले नाहीत. जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी पालकमंत्री पदाची सुत्रे हाती घेताच जिल्ह्यातील सहा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे जावून सांत्वन केले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाभापासून भाजप कार्यकर्ते दूरच

$
0
0

उस्मानाबादः केंद्रासह राज्यात भाजप व त्यांच्या मित्रपक्षाची सत्ता येऊन वर्ष लोटले. परंतु, अद्यापही भाजपच्या कार्यकर्त्यांनी कामाबरोबर सन्मानाची वागणूक मिळत नाही. शिवाय मानाची व सन्मानाची पदे मिळत नाहीत, अशी खंत उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्याकडे व्यक्त केली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांची या वेळी उपस्थिती होती.

तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर ते तुळजापूर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलत होते. भाजप व सेनेच्या वरिष्ठ नेतेमंडळींना मंत्रीपदे मिळाली. मात्र, त्याच वेळी पक्षश्रेष्ठींबरोबरच राज्यकर्त्यांनी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. आघाडी सरकारच्या काळात भाजप-सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उदासीन होते. आज सत्ता येऊनही त्यांच्या स्थ‌ितीत काहीही बदल झालेला नाही. आजही प्रशासकीय अधिकारी भाजपच्या कार्यकर्त्यांना जुमानत नाहीत. सन्मानाची वागणूक देत नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत पारंगत झालेली ही अधिकारी मंडळी अद्यापही त्यांनाच सन्मानाने वागवतात. भाजप व सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हातात आजही सत्तेचे कसलेही गाजर नाही. पाटबंधारे विभागात आजही काँग्रेस व राष्ट्रवादीचा बोलबाला आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या तक्रारीचा पाढा ऐकण्यापलीकडे राज्यमंत्री पोटे काहीच करू शकले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सौर ऊर्जेच्या उजेडासाठी पुढाकार घेणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद ज‌िल्ह्यामध्ये सौर उर्जेसाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात सौर उर्जेच्या उजेडासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे उद्योग, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी उस्मानाबाद येथे पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याबरोबरच शेतीपूरक व्यवसाय उभारावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तीन वर्षांपासून दुष्काळ असल्याने विकासाची गती मंदावली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. या वेळी कृषिपूरक व्यवसायाकडे लक्ष पुरवून त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. राज्य शासन त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत.

राज्य शासनाने अलीकडेच सौर ऊर्जा धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार सौर उर्जेस प्रोत्साहन देण्याचेच शासन धोरण आहे. सौर उर्जेसाठी उस्मानाबाद जिल्ह्याची अनुकूलता लक्षात घेऊन या जिल्ह्यात सौर उर्जेच्या उजेडासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही पोटे यांनी या वेळी स्पष्ट केले.

उस्मानाबाद जिल्ह्यात मैदानी प्रदेशही आहे. या मोकळ्या मैदानाचा सौर ऊर्जेसाठी चांगल्या पद्धतीने वापर करता येईल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अपारंपरिक स्रोतासाठीच्या नव्या धोरणामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्तीचा चांगल्या पद्धतीने वापर होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिन‌िधींनी शासन धोरणाचा लाभ घेण्यासाठी म्हणून सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी पाठपुुरावा करण्याची गरज आहे.

उस्मानाबाद जिल्हा हा सौर जिल्हा म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचे तत्कालीन केंद्रीय अपारंपरिक उर्जामंत्री फारुख अब्दुल्ला यांनी २०११ मध्ये उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथे जाहीर केले होते.

उस्मानाबाद जिल्ह्यात सौरऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पासाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना राज्य सरकार नि‌श्चित अर्थसहाय्य करेल, अशी घोषणा २०१३ मध्ये तत्कालीन राज्यमंत्री सचिन आहेर यांनी उस्मानाबाद भेटीदरम्यान केली होती. वीजन‌िर्मितीसाठी उस्मानाबाद जिल्ह्याचे पोषक वातावरण लक्षात घेऊन सौर उर्जेद्वारे शंभर मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे १७२ हेक्टर जमीनही खरेदी केली; परंतु सौरउर्जेबाबत धोरण निश्चित करण्यास झालेला विलंब व निधीअभावी हा प्रकल्प अद्यापही रखडलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

पिकविम्याची रकम देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क बँकेतच विष घेतल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जुना जालना शाखेत घडला. पीडित शेतकऱ्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ज्ञानेश्वर उर्फ बालाजी जगन्नाथ चौधरी असे या शेतकऱ्यांचे नाव असून तो दरेगाव (ता. जालना) येथील रहिवाशी आहे. चौधरी याची सिरसगाव शिवारात एक हेक्टर शेती असून त्याच्यावरच त्याच्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह अवलंबून आहे. चौधरी याने गेल्यावर्षी आपल्या शेतातील पिकाचा विमा काढला होता. यासाठीची नियमानुसार लागणारी रक्कम ही त्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जूना जालना शाखेत भरले होते. दरम्यान, पिकविम्याची सदर रक्कम मिळावी म्हणून तो गेल्या काही दिवसांपासून बँकेत खेटे मारत होता. परंतु, बँक व्यवस्थापकाकडून त्याला अनुकूल ‌असा प्रतिसाद मिळत नव्हता. बँक व्यवस्थापकाच्या टाळाटाळीमुळे संतप्त झालेल्या चौधरी याने मंगळवारी दुपारी बँकेतच विष प्राशन केले. बँकेत यामुळे खळबळ माजली. चौधरी याला तडकाफडकी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ज्ञानेश्वर यांच्यावर एसबीएच आणि आंध्र बँकेचे सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज आहे. पेरणीसाठी त्याने उधारित बि-बियाणे व इतर शेती सहित्याची खरेदी केली होती. पिकविम्याच्या पैशातून उधारी फेडण्याचा त्याचा विचार होता.

- शंकर चौधरी, पीडित शेतकऱ्याचा भाऊ

दरम्यान, विष प्राशन केलेल्या ज्ञानेश्वर चौधरी यांना तात्काळ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने ऑर्गान फॉस्फेट हे विष प्राशन केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

- डॉ. हिना शेख, घाटी, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रशर, खदानींची मुदत संपूनही उत्खनन सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गौणखनिज व महसूल विभागाच्या कारवाईनंतरही रात्री खवड्या डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. रात्री नऊनंतर दगड खाणीमधून उत्खनन करून रातोरात दगड, मुरुमाची वाहतूक केली जाते, अशी माहिती मिळाली आहे. या परिसरातील पाच खदानींची मूदत तीन वर्षांपूर्वीच संपली आहे.

मुंबई महामार्गालगत परिसराच्या सौंदर्यात भर घालणारा खवड्या डोंगर उभा आहे. या डोंगराच्या दक्षिणेस वाळूज औद्योगिक वसाहत व बजाजनगर कामगार वसाहत आहे. या भागामध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. ही गरज ओळखून खवड्या डोंगर पोखरण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. गौणखनिजाचे उत्खनन करण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक आहे; मात्र अशा प्रकारची कोणतीही परवानगी काढली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बिनबोभाट सुरू असलेल्या या उद्योगात अनेकांनी लाखो रुपयांचे व्यवहार केले आहेत. चोहुबाजूने डोंगर फोडल्यामुळे अनेक ठिकाणी खंदक व तळी निर्माण झाले आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खवड्या डोंगर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. काही दिवसांपूर्वीच डोगरालगतच्या खदानीवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली होती; मात्र अंधारात येथून दगड, मुरूमाचा उपसा सुरू आहे.

तीसगाव परिसरातील खवड्या डोंगर परिसरामध्ये होत असलेल्या अवैध उत्खननाविरुद्ध संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. एटीएस द्वारे किती दगडाचा उपसा केला हे तपासण्यात येईल व त्यानुसार दंड वसूल करण्यात येईल.

रमेश मुनलोड, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रेयनगरातून दोन लाखांचा ऐवज लंपास

$
0
0

औरंगाबादः श्रेयनगर, झांबड इस्टेट भागात बुधवारी दुपारी संदीप छगनराव कदम यांचे घर फोडून दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदम यांचा पायात बसविणाऱ्या रॉडचा व्यापार असून पत्नी छत्रपती कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे. पती-पत्नी कामानिमित्त घराबाहेर पडले, सायंकाळी ते परत आल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरांनी दाराचा कडीकोंडा तोडून प्रवेश केला व कपाटातील रोख पाच हजार रुपये, पाच तोळ्यांचे दागिने, असा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. लाल शर्ट व काळी पँट घातलेला १८ ते २० वर्षाचा तरूण दुपारी कदम यांची चौकशी करीत होता. त्याने चोरी केली असावी असा संशय आहे.

झाड पडल्याने वीज बंद

औरंगाबादः घाटी परिसरातील ३३ केव्ही वीज वाहिनीवर बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास झाड कोसळले. त्यामुळे शहरातील विविध भागातील वीजपुरवठा चार ते पाच तास बंद होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाचा खून करणाऱ्या सावत्र आईस जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सात वर्षीय मुलाचा गळा आवळून खून करणाऱ्या सावत्र आई दुर्गाबाई चव्हाण हिला सेशन्स कोर्टाने जन्मठेप सुनावली, तर दुसऱ्या पत्नीला मदत करणाऱ्या मुलाचे वडील रवींद्र चव्हाण याला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

रवींद्र चव्हाण याची पत्नी संगीता हिचा २००६ मध्ये जळून मृत्यू झाला. त्यांचा तेजस उर्फ सनी नावाचा मुलगा असताना, रवींद्र याचे दुर्गाबाईसोबत दुसरे लग्न झाले. रवींद्र व त्याची दुसरी पत्नी दुर्गाबाई हे जाधववाडी परिसरातील सुरेवाडी येथे नंदा रवींद्र राऊत यांच्या घरात भाड्याने राहात होते. त्यांच्यासोबत तेजस हादेखील राहत होता. तो कधी आजी-आजोबा सोबतही राहत होता. २६ सप्टेंबर २०१० रोजी सायंकाळी तेजसला आजोबाने मुलाकडे (रवींद्र) आणून सोडले आणि ते परत गावी निघून गेले. त्याच रात्री रविंद्रच्या घरातून जोरजोरात रडण्याचा आवाज आला. हा आवाज ऐकून घर मालक नंदा राऊत धावत खाली आल्या, तर त्यांना तेजस हा ओल्या कपड्यांमध्ये फरशीवर पडलेला दिसला. त्याच्या भोवती दुर्गाबाई व रवींद्र अाक्रोश करत होते. या घटनेची माहिती तातडीने सिडको पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तेजसचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलवला. शवविच्छेदन अहवालामध्ये तेजसचा गळा आवळल्याचे व्रण आढळून आले. त्याचा खून करून त्याला पाण्याच्या ड्रममध्ये टाकल्याचा बनाव करण्यात आल्याचा संशय पोलिस उपनिरीक्षक दिलीप इंगळे यांना आल्यामुळे त्यांनी दुर्गाबाई व रवींद्रला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तेजसचा गळा आवळून त्याला पाण्याच्या ड्रममध्ये टाकून तो पडल्याचा बनाव केल्याची कबुली दोघांनी दिली. त्या दोघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुन न्यायालयात दोषरोप पत्र दाखल केले.

या खटल्याची अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या समोर झाली. सहायक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी सात साक्षीदार तपासले. यात डॉक्टर, तेजसची आजी यांची साक्ष महत्वाची ठरली. कोर्टाने सावत्र आई दुर्गाबाईस दोषी ठरवून जन्मठेप, २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी, भा.दं.वि. २०१ कलमान्वये ५ वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी, रवींद्र चव्हाण यास पुरावा नष्ट करून खोटी माहिती दिली म्हणून ६ महिने सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, भा.दं.वि. २०३ कलमान्वये दुर्गाबाई आणि रवींद्रला एक वर्ष सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठवली.

माता न तू वैरीणी

तेजसला त्याची सावत्र आई दुर्गाबाईने पलंगाला बांधून लाटण्याने बेदम मारहाण केली होती. त्यामुळे त्याच्या अंगावर व्रण आले होते. ही बाब घरमालक नंदा राऊत तसेच आजीला तेजसने सांगितले होते. त्याला मारहाण झाल्यानंतर रवींद्रच्या वडिलांनी नेले होते. पाच-सहा महिन्यानंतर सुरेवाडी येथे आणून सोडल्यानंतर त्याचा खून केला असल्याचे इंदुबाई एकनाथ राठोड यांनी तक्रारीत म्हटले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करून वाहन पळविणाऱ्यांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहन भाड्याने घेऊन चालकास मारहाण करून वाहन पळविणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातून अटक केली आहे. जावेद सत्तार पठाण (वय २१) आणि सत्तार बशीर पठाण (वय ४०, रा. महाकाळा जि. जालना) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आडूळ येथील रहिवासी शफिक पाशू पठाण (वय २४) यांच्या मालकीचा टाटा एस (छोटाहत्ती) हे वाहन असून ते मालवाहतुकीची व्यवसाय करतात. आडूळ येथील बसस्थानक परिसरात १० जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्याकडे दोन व्यक्ती आले. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे जाण्यासाठी त्यांनी शफिक यांच्याकडे विचारणा केली. अडीच हजार रुपयांत भाडे ठरल्यानंतर ते तिघे छोटा हत्तीने (एम. एच. २०, सी. टी ८५३७) बालानगर पैठण मार्गे निघाले. हे वाहन आपेगाव रोडवर आल्यानंतर प्रवासी म्हणून बसलेल्या आरोपींनी वाहन थांबवण्यास भाग पाडले आणि शफिक यांना मारहाण करत दोरीने हातपाय बांधून रस्त्यावर टाकले. ते वाहनसह पसार झाले होते. पाचोड पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यात जावेद आणि सत्तार यांचा हात असल्याची माहिती खबऱ्याद्वारे ग्रामीण पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाला मिळाली. पथक प्रमुख ए. व्ही. केंद्रे यांच्यासह पोलिस कर्मचारी जितेंद्र बोरसे, शेख कासीम, सुनील ढेरे, संतोष तांदळे, सुभाष ठोके, नितीन उणे यांनी दोघांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षात शिक्षिकेची छेड; रोडरोमिओ गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका रोडरोमिओने वाळूजहून रिक्षातून येणाऱ्या एका शिक्षिकेला छेड काढून त्रास दिला. तिने रिक्षा बदलल्यानंतर पुन्हा तिच्या रिक्षात येऊन बसला. त्याची तक्रार एका वाहतूक पोलिसाकडे केल्यानंतर त्याला गजाआड करण्यात आले. 'चार्ली'पथकाने त्याला ताब्यात घेऊन क्रांतिचौक पोलिसांत दिले.

वाळूज बजाजनगर येथील एका खासगी शाळेत एक ४० वर्ष वयाची शिक्षिका आहे. त्या बाबा पेट्रोलपंप परिसरातील एका बँकेत काम असल्याने मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास बजाजनगरवरून बाबा पेट्रोलपंप येथे येण्यासाठी रिक्षाने निघाल्या. त्या रिक्षात प्रशांत अनिल तांदळे (वय ३०, रा. नुतन वसाहत जालना, सध्या रा. लुधीयाना ढाबा, वाळूज) हा देखील होता. प्रशांतने या‌ शिक्षिकेची छेड काढण्यास सुरूवात केली.

बाबा पेट्रोलपंप येथे उतरल्यानंतरही त्याने त्यांचा पाठलाग केला. त्याला चुकवण्यासाठी ही शिक्षिका दुसऱ्या रिक्षातून क्रांतिचौकाकडे जाण्यास निघाल्या, पण तो पुन्हा त्या रिक्षात येऊन बसला. हा प्रकार असह्य झाल्याने या शिक्षिकेने वाहतूक पोलिसास हा प्रकार सांगितला. वाहतूक पोलिसाने त्यांना थांबवून घेऊन ही माहिती 'चार्ली' पथकाला दिली. पथकातील बालकराम मेत्तलवार व सुभाष राऊत यांनी तेथे तत्काळ पोहचून प्रशांत तांदळेला ताब्यात घेऊन क्रांतिचौक पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून प्रशांत तांदळेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवार भेट याचिकेतून ‘पीएमओ’स वगळले

$
0
0

औरंगाबादः निवडणुकीच्या आचारसंहितेत पंतप्रधान व अन्य राजकीय व्यक्तींना नग्न तलवारी भेट दिल्याने कायद्याने गुन्हा आहे. या प्रकरणी केलेल्या याचिकेत पंतप्रधान कार्यालयाला प्रतिवादी म्हणून वगळण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या.व्ही. के. जाधव यांनी दिले.

संजय भास्कर काळे व संदीप कुलकर्णी यांनी ही याचिका केली आहे. धारदार तलवारी भेट देणाऱ्या व स्वीकारणाऱ्या व्यक्तीवर कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. प्रभारी अॅडव्होकेट जनरल अनिल सिंग यांनी पंतप्रधान कार्यालयाची बाजू मांडली. ही याचिका सवंग लोकप्रियतेसाठी केलेली आहे. पंतप्रधान कार्यालयाचा या प्रकरणाशी संबंध नाही. तरीदेखील या याचिकेत प्रतिवादी केल्यामुळे त्यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. याचिकाकर्त्याचे वकील प्रज्ञा तळेकर यांनी प्रतिवादी म्हणून पंतप्रधान कार्यालयास वगळण्याची विनंती कोर्टाला केली. ही विनंती मान्य केली. राजकीय व्यक्तींना भेट म्हणून देण्यात आलेली तलवार खरी नाही त्याची प्रतिकृती देण्यात आल्याचे नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. या प्रकरणात शासनाची बाजू डी.आर.काळे हे मांडत आहेत. या याचिकेची सुनावणी ४ आठवड्यानंतर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेने चोप दिला, गुन्हा नाही नोंदवला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उत्तर प्रदेशातील पिलिभीतमध्ये शाळकरी मुलगी रोडरोमिओला चोप देत होती, त्याच वेळी एक औरंगाबादकर रणरागिणी छेड काढणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाचा समाचार घेत होती. पुणे-औरंगाबाद बसमधून प्रवास करणाऱ्या या महिलेने पोलिसांना ही माहिती कळविली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यातही दिले, परंतु पोलिसांनी कोणतीही नोंद न करता त्याला सोडून दिले.

पुणे स्थानकातून हिरकणी बस मंगळवारी सकाळी ११ वाजता निघाली. तेथे दोन महिला ज्या सीटवर बसल्या होत्या, त्याच्या मागच्या सीटवर एक साठीतील गृहस्थ बसले. त्या गृहस्थांचा पाय सीटमधील गॅपमधून महिलांना लागत होता. महिलांनी त्या गृहस्थाला तसे सांगितले, तेव्हा तो चपापला, पण काही वेळाने पुन्हा त्याचा पाय लागला. तो हे मुद्दाम करतोय, हे लक्षात येताच त्यापैकी एक महिला संतापली. नगरच्या तारकपूर स्थानकातून बस निघताच त्या प्रवाशाचा त्रास वाढला. त्यामुळे महिलेने त्या गृहस्थाला जाब विचारत चोप देण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी मध्यस्थी करीत त्या गृहस्थाला सोडविले आणि शेवटच्या रिकाम्या सीटवर त्याला बसवले, मात्र काही वेळाने तो प्रवासी उठून पुन्हा त्या महिलांच्या मागच्या सीटवर जाऊन बसला आणि त्याने त्यांना पाय लावून 'चाळे' सुरू केले. त्यामुळे प्रवासी महिला संतापली. तिने पुन्हा त्याला चोप दिला आणि या वेळी थेट औरंगाबाद पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांना बसचा क्रमांकही कळवला.

दुपारी साडेतीनच्या सुमारास महावीर (बाबा) चौकात बस पोहोचली तेव्हा दामिनी पथक हजर होते. शिवाय, प्रवासी महिलेने आपल्या नातेवाइकांनाही ही घटना कळविली होती. त्यामुळे तेदेखील आलेले होते. महिलेने दामिनी पथकाला 'तो' प्रवासी दाखवला. पथकाने त्याला ताब्यात घेतले, तेव्हा महिलेच्या संतप्त नातेवाइकांनी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तावडीतून त्या प्रवाशाला वाचविण्यासाठी सौम्य लाठीमारही केला. त्यानंतर प्रवासी आणि महिलेला क्रांतिचौक पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. हा संपूर्ण प्रकार बसमधील ३० ते ३५ प्रवासी पाहत होते. त्यांच्यापैकी एका प्रवाशाने बुधवारी ही घटना 'मटा' प्रतिनिधीला कळविली. त्यानुसार पोलिसांकडे चौकशी केली असता, त्या महिलेने तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे गुन्हा नोंदविण्यात आला नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्या प्रवाशाला पोलिसांनी सोडून दिले.

प्रवासात छेडछाड होत असेल तर ही गंभीर बाब आहे. महिलेने तक्रार दिली नसली तरी पोलिस ठाण्यात संबंधित प्रवाशावर प्रतिबंधात्मक कारवाई करता आली असती. यासंदर्भात चौकशी करण्यात येईल.

- वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राकाज् लाइफ’चे नळ कनेक्शन बेकायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राकाज् लाइफ स्टाइलमध्ये घरगुती कनेक्शनचा व्यावसायिक कामासाठी वापर केल्याचे बुधवारी उघड आले. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या दक्षता पथकाच्या तपासणीनंतर हे लक्षात आले. फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीने 'राकाज्'ला ६ लाख १६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

राकाज् लाइफ स्टाइल येथे जलतरणिकेव्यतिरिक्त हुक्का पार्लर, मसाज सेंटर व आणखी अनेक गैरप्रकार उघडकीस आले होते. याठिकाणच्या स्विमिंग पुलात पाणी कोठून येते, याबाबत समांतरच्या पथकाने तपासणी सुरू केली होती. आजुबाजुच्या नागरिकांना विचारणा केली असता येथे स्विमिंग पुलासाठी एकदाही खासगी टँकर आल्याचे पाहिले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कंपनीच्या दक्षता पथकाचा संशय बळावला. बुधवारी त्यांनी 'राकाज्'मध्ये चौकशी केली.

इमारतीला सील असल्याने 'राकाज्'चे व्यवस्थापक बाहेर भेटले. पाणी कोठून येते, अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी, 'आत तीन बोअर आहेत,' असे एडके यांच्या पथकाला सांगितले. इमारतीला सील असल्याने पथकाला आत जाता आले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; 'राकाज्'च्या चारही बाजूंनी महापालिकेची जलवाहिनी गेली आहे. त्यातून कनेक्शन घेतले असल्याचा संशय होता. पथक प्रमुख विशाल एडके व सहकाऱ्यांनी जेसीबीच्या सहायाने एका बाजूने खोदकाम केले. त्यात एक इंचाचे कनेक्शन 'राकाज्'साठी घेतल्याचे दिसून आले. यासंदर्भात मॅनेजरकडे विचारणा केली आणि पाणी बिलाची मागणी केली. बिल तपासल्यानंतर हे घरगुती वापरासाठी घेतलेले कनेक्शन असल्याचे नमूद केले होते, पण येथे व्यावसायिक वापर होत होता. नियमानुसार ६१ हजार ६०० रुपये आकार आणि दंडाची दहापट रक्कम असा ६ लाख १६ हजार रुपये दंड ठोठाविला.

पालिकेच्या परवानगीनंतर तपासणी

'राकाज्'ला महापालिकेने सील ठोकले आहे. स्विमिंग पुलला पाणी पुरवठा कसा केला जातो, त्यासाठी किती नळकनेक्शन घेतले आहेत, याची तपासणी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनी करणार आहे. महापालिकेच्या परवानगीनंतर ही तपासणी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूजला कंपनीत आग; त‌िघे भाजले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज

वाळूज औद्योगिक परिसरातील कृष्णा कोटिंग या कंपनीत बॉययरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत लागून तीन कामगार भाजले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनी एक तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

एमआयडीसी सेक्टर के-१७ मध्ये कृष्णा कोटिंग ही कंपनी आहे. या कंपनीत रात्री काम सुरू असताना अचानक आग लागली. या आगीत अभिषेककुमार समासिंग (वय २०), किरण फत्तेसिंग राठोड (वय १९), बबलू गुलाब पाटील हे तिघे भाजले. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळल्यानंतर एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. एक तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. ही आग बॉयलरचा स्फोट होऊन लागल्याची माहिती अग्निशमन विभागातून देण्यात आली. आग विझवण्यासाठी जवान एफ. एफ. वासनकर, एस. आर. गायकवाड, एस. सी. भुरंगे, एस. एस. अंभोरे आदींनी प्रयत्न केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images