Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘शेतकऱ्यांना केंद्राने अनुदान द्यावे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

कृषिमूल्य आयोगाच्या सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार साखर किंमत स्थिरीकरण निधीतून थेट शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. हा निर्णय १५ ऑगस्ट २०१५ पर्यंत न झाल्यास पुढील गळीत हंगाम सुरू करायचा की नाही, याबद्दल खासगी साखर उद्योग गंभीर विचार करतील, असे मत वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) उपाध्यक्ष रोहित पवार यांनी व्यक्त केले. खाजगी साखर कारखानदारांच्या संघटनेतर्फे पुणे येथे ५ जुलै रोजी महाराष्ट्रातील ८७ साखर कारखाने व इतर राज्यातील कारखान्याची सभा घेण्यात आली. या सभेत शासनाकडून मागण्या मान्य होण्याबद्दल १५ ऑगस्ट २०१५पर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतरच पुढील हंगाम सुरू करण्याची तयारी केली जाईल. अन्यथा कारखाने सुरू करता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

साखरेचे दर ४० टक्क्यांनी घसरले असून उसाचे प्रमाणित व किफायतशीर मूल्य (एफआरपी) ७० टक्क्यांनी वाढले आहेत. ही परिस्थिती साखर उद्योगासाठी मारक आहे. कृषिमूल्य आयोगाकडून २०१४-१५ करिता उसाचा एफआरपी ९.५० टक्के साखर उताऱ्यासाठी २,२०० रुपये प्रती टन शिफारस केला होता, त्यासाठी साखरेचा दर ३, ०११ ते ३,४०० रुपये गृहित धरला होता. प्रत्यक्षात साखरेचा दर २,२०० ते २,३०० रुपयेच मिळाला आहे. गळीत हंगाम २०१५-१६ करिता मागील हंगामापेक्षा १०० रुपये वाढवून उसाची प्रती टन एफआरपी २,३०० रुपये केली आहे. ही रक्कम कारखानदारांना देणे अशक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

खासगी कारखानदारांच्या मागण्या

७० ते ७५ टक्के रक्कमशिवायची फरकाची रक्कम केंद्र व राज्य सरकारने थेट ऊस उत्पादकांना अनुदान स्वरूपात अदा करावी. केंद्र शासनाने २०१४-१५ मधील उत्पादित साखरेच्या १० टक्के साखर थेट खरेदी करून साठा करावा. कायमस्वरुपी उत्पन्नाच्या २० टक्के साखर निर्यातीस परवानगी देवून विशेष अर्थसहाय्य द्यावे किंवा शासनाने स्वतः निर्यात करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बस, ट्रकची टक्कर;१४ जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावर कन्नड शहरापासून सात किलोमिटर अंतरावरील तेलवाडीनजिक रविवारी (१९ जुलै) सकाळी सहा वाजता एसटी बस व ट्रकची टक्कर झाली. या अपघातात १४ प्रवाशी जखमी झाले आहेत.

औरंगाबादहून पहाटे सुटणारी धुळे आगाराची औरंगाबाद-नवापूर बस (एम.एच.१४, बी.टी.२७११) कन्नडहून पुढे गेली. त्यानंतर अंबाडी धरणाच्या पुढील वळणावर तेलवाडीनजिक समोरून येणाऱ्या ट्रकची (एच. आर. ५५ के ८२३९) बसला जोरदार धडक बसली. या धडकेत ट्रक एका बाजूला गेला व बस गोल फिरून उलट्या दिशेने वळाली व लिंबाच्या झाडावर कलाडंली. यामुळे बस उलटता उलटता थांबली. बसमध्ये वाहक, चालक व प्रवासी असे १७ जण होते. बसमधील काही जखमींना कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. काही गंभीर प्रवाशांना औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.

अपघातानंतर कन्नड आगरप्रमुख लक्ष्मण लोखंडे, बसस्थानक प्रमुख बी. एन. सहजराव यांनी जखमींना मदत केली. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, हेडकॉन्सटेबल दीपक नागझरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील काही जखमी प्रवाशांना औषधोपचारासाठी ५०० ते १००० रुपये, असे एकूण पाच हजारपर्यंत रोख देऊन नुकसान भरपाई अर्ज देण्यात आला आहे. बसवाहक शंकर खतगावे यांच्या फिर्यादीवरून कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बसमधील जखमी पुढीलप्रमाणेः खलील गुफरान पिंजारी, युवराज नागराज माळी, पुष्पा युवराज माळी, विद्या संजीवकुमार सोनवणे व हर्षल संजीवकुमार सोनवणे, गोविंद पुंजाजी जाधव (कन्नड), दिलीप धोंडू ठाकूर (अंमळनेर), आशा विजय माळी (बजाजनगर) ललित पवार (धुळे) , वसंत लक्ष्मण बलख (तळेगांव), रवींद्र भगवान चव्हाण (दापोडी), (कन्नड) चालक प्रदीप बारकू पाटील (धुळे) वाहक शंकर माधव खतगावे (लातूर) ट्रकमधील अतुल मनोहरलाल विर्दी (पंजाब).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमबाह्य बदल्यांकडे झेडपीत दुर्लक्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तालुकांतर्गत बदल्यांमध्ये अनियमितता झाली. याबाबत कागदपत्रे सादर करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. महिला कर्मचाऱ्यांनी दाद मागूनही त्यांना डावलले जात असल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

औरंगाबाद तालुक्यातील आरोग्य विभागाच्या बदल्या मे २०१५ मध्ये झाल्या. नियमानुसार तालुक्यातील सेवाज्येष्ठता विचारात घेणे आवश्यक होते. तालुक्यात चौका, ओव्हर, ढवळापुरी आणि टाकळीमाळी या चार उपकेंद्रातील आरोग्यसेविकांच्या बदल्या केल्या गेल्या. त्यात दोन बदल्या नियम डावलून करण्यात आल्या. २००९ ची सेवाज्येष्ठता गृहित धरून बदल्या केल्या गेल्या ते चुकीचे आहे. वास्तविक पिंप्रीराजा येथील कर्मचारी २००६ पासून तर गोलटगाव येथील कर्मचारी २००७ पासून कार्यरत आहेत. सेवाज्येष्ठतेचा निकष लावला असता या दोन कर्मचाऱ्यांच्या बदल्या यादीत अव्वल होणे आवश्यक होते. मात्र, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्षच दिले नाही.

सेवाज्येष्ठता गृहित धरली असती तर वरूड काजी आणि टाकळी माळी येथील बदलीपात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना बदलून जावे लागले नसते. या अन्यायाविरोधात आरोग्य विभागाकडे दाद मागण्यात आली पण त्यावर अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. तक्रारीची चौकशी करण्यासाठी डॉ. विजयकुमार वाघ यांची नेमणूक करण्यात आली. पण डॉ. वाघ ज्यांच्या समोर बदल्या झाल्या. त्यांनाच चौकशी नेमले गेले. परिणामी नियमबाह्य बदल्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.

याप्रकरणी सविस्तर चौकशी करून तपासणी केली जाईल जर नियमबाह्य बदल्या झाल्या असतील तर दोषींवर कारवाई प्रस्तावित केली जाईल.

- डॉ. अभिजित चौधरी, सीइओ जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेकॉर्डवरील अल्पवयीन गुन्हेगार गुन्हेशाखेच्या ताब्यात

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल सोळा वर्षांच्या बालकाला गुन्हेशाखेने शनिवारी ताब्यात घेतले. या बालकाकडून हिंदूस्थान आवास परिसरातील एका चोरीच्या गुन्ह्यातील दागिने जप्त करण्यात आले आहे. या बालकाला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

उस्मानपुरा परिसरातील सराफा गल्लीमध्ये एक बालक चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने पिरबाजार चौक ते तारा पान सेंटर या दरम्यान सापळा लावला होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांना एक सोळा वर्षाचा बालक संशयास्पदरित्या त्या ठिकाणी आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील बाल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या झडतीमध्ये त्याच्याकडे सोन्याचे दागिने व एक मोबाइल असा २० हजार रूपयांचा ऐवज आढळून आला. हे दागिने ‌हिंदूस्थान आवास परिसरातील एका घरफोडीतील असल्याची माहिती बालकाने दिली. या बालकाला सातारा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रशांत आवारे, नंदकुमार भंडारे, अशोक नरवडे, नंदलाल चव्हाण, सिद्धार्थ थोरात, योगेश गुप्ता व धर्मराज गायकवाड यानी केली.

हॉस्टलमधून मोबाइल चोरण्यात पारंगत

या बाल गुन्हेगारावर यापूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये एक दुचाकी चोरीचा गुन्हा आहे. मुलांच्या हॉस्टेलमध्ये शिरून त्यांचे मोबाइल पळविण्यात हा बालक तरबेज आहे. त्याच्याकडून अशाप्रकारे चोरलेले नऊ मोबाइल पोलिसांनी जप्त केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणगेट भागात दंगल; गुन्हा दाखल

0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठणगेट भागात शुक्रवारी रात्री घडलेल्या दंगलीप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन गटाविरूद्ध क्रांत‌िचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैठणगेट भागातील कपडा मार्केट शुक्रवारी रात्री रमजान ईद निमीत्त उशीरापर्यंत सुरू होते. यावेळी तरुणांच्या जमावाने गोंधळ घालत दुकानदाराला मारहाण केली होती. यानंतर वातावरणात तणाव पसरला होता. दरम्यान, यावेळी क्रांतिचौक पोलिस ठाण्याच्या पीएसआय मयुरी पवार पथकासह बंदोबस्तासाठी पैठणगेट भागात गेल्या होत्या. यावेळी जमावाने केलेल्या हुल्लडबाजीमध्ये पवार किरकोळ जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी पवार यांच्या तक्रारीनंतर रविवारी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात तरुणाच्या दोन गटांविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दंगल करणे, मारहाण करणे आदी कलमानुसार अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोडफोडप्रकरणी १३ अटकेत

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगपुरा भागात गोंधळ घालून टपऱ्यांची तोडफोड करणाऱ्या ‌सहा जणांना क्रांतिचौक पोलिसांनी रविवारी अटक केली. तसेच दुसऱ्या घटनेत तरुणांना मारहाण करणाऱ्या सहा जणांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगपुरा परिसरात दोन गटातील वादानंतर तरुणाच्या टोळक्याने चहा तसेच वडापावच्या हातगाडीवर दगडफेक करून तोडफोड केली होती. या घटनेनंतर वातावरण तणावग्रस्त झाले होते. क्रांतिचौक पोलिसांनी या टोळक्याचा शोध घेतला. पोलिसांनी सिल्लेखाना येथील शाहरूख कुरेशी, इरफान, वसीम, कलीम, सोहेल व शाहरूख फारूख यांच्यासह एका अल्पवयीन बालकाविरूद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सहाजणांना अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या प्रकरणात एसबी कॉलनी परिसरात तरुणांच्या टोळक्याने काही तरुणांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपी युवराजसिंह झाला, अक्षय, योगेश कंडेरा तसेच सोमेश रिडलॉन यांच्यासह तीन अल्पवयीन तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

कडक बंदोबस्त व ड्राय डे

पैठणगेट व औरंगपुरा येथे घडलेल्या घटनानंतर शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी देखील केंद्रीय राखीव दलाची तुकडी पैठणगेट येथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शनिवारी झालेल्या ड्रायडेनंतर रविवारी देखील ड्राय डे जाहीर करण्याची विनंती पोलिस प्रशासनाने जिल्ह‌ाधिकारी कार्यालयाला केली होती. या मागणीनुसार रविवारी देखील शहरात ड्राय डे घोषित करण्यात आल्याने देशी विदेशी दारूची दुकाने, बियर बार, परमीट रूम बंद ठेवण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या सभेत गाजणार ‘राकाज्’चा विषय

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सोमवारी (२० जुलै) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राकाज् लाइफ स्टाइल क्लबचा विषय नगरसेवक उपस्थित करणार आहेत. त्याचबरोबर पाणीपुरवठ्यातील अनियमितपणा, शहरातील साफसफाईची समस्या आणि दिवाबत्तीचा प्रश्न मांडण्याच्या तयारीत आहेत. 'मटा'शी बोलताना काही नगरसेवकांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

महापालिकेने ज्योतीनगर भागात 'बीओटी' तत्त्वावर जलतरण तलाव विकसित केला आहे. या तलावाच्या परिसरात कंत्राटदाराने बेकायदा बांधकाम करून हुक्का पार्लर, मसाज सेंटर, पूल टेबल आदी सुरू केल्याचे उघड झाले होते. हा प्रश्न सर्वसाधारण सभेत नगरसेवक उपस्थित करणार आहेत. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे गटनेते भगवान घडमोडे यांनी सांगितले की, सर्वसाधारण सभेत राकाज् लाइफ स्टाइल क्लबचा विषय उपस्थित करण्याचा विचार आहे. त्यातप्रमाणे डीव्हीआरमधील हार्डडिस्क देखील गायब झालेली आहे. या सर्व प्रकरणात संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार आहोत.

पाणीप्रश्न तर महत्वाचा आहेच पण त्याच बरोबर गुंठेवारी भागात विकास कामे झाली पाहीजेत असा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. गुंठेवारी भागात प्रामुख्याने ड्रेनेज लाइनचे काम झाले पाहिजे, अशी मागणी सर्वसाधारण सभेत करणार आहे. दिवाबत्तीचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक पथदिवे बंद आहेत, याकडे महापौरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू, असे शिवसेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांनी सांगितले.

महापालिकेची आर्थिक स्थिती फारच नाजूक आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने महापालिकेला विशेष निधी दिला पाहिजे. त्यासाठी सर्वसाधारण सभेत तसा ठराव मंजूर करण्याचा आमचा आग्रह असेल, असे एमआयएमचे नगरसेवक जमीर कादरी यांनी सांगितले. भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी सांगितले की, समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पाबद्दल मी काही प्रश्न प्रशासनाला विचारले आहेत. डीआय आणि एचडीपीआय पाइपचा प्रस्ताव ऐनवेळी कसा घुसविला. या प्रस्तावातून फायदा कुणाला मिळणार आहे, असे प्रश्न विचारले आहेत. याशिवाय वॉर्डाचा साफसफाईच्या कामाचा प्रश्न मांडणार आहे.

पथदिव्यांचा प्रश्न गंभीर आहे. सिडको एन-२ भागात बहुतेक पथदिवे बंद आहेत. याविषयी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला जाब विचारणार आहे. त्याशिवाय साथीचे आजार व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न या विषयावर चर्चा करण्याचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे शिवसेनेचे कमलाकर जगताप यांनी सांगितले. मिसारवाडी भागात आरोग्य केंद्र, शाळा नाही. हे दोन्ही मुद्दे सर्वसाधारण सभेत मांडण्याचा माझा विचार आहे. गेल्या दहा वर्षांत महापालिकेने मिसारवाडी भागाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, असे एमआयएमच्या संगीता वाहुळे यांनी सांगितले.

मोफत अंत्यसंस्कार योजना महापालिकेच्या प्रशासनाने एकतर्फी बंद केली आहे. सर्वसाधारण सभेने मंजूर केलेली योजना प्रशासनाला बंद करता येत नाही. या योजनेबद्दल सर्वसाधारण सभेत जाब विचारणार असल्याचे भाजपच्या माधुरी अदवंत यांनी सांगितले.

शिवसेनेच्या मीना गायके यांनी सांगितले की, पुंडलिकनगर, हनुमाननगर, स्पंदननगरात पाण्याची समस्या गंभीर आहे. अवेळी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडणार आहे. नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे. प्रशासनाने त्यात लक्ष घातले पाहिजे व दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी करणार आहे.

राकाज् लाइफ स्टाइल प्रकरणात कोर्टाने सांगूनही महापालिकेने संबंधितांवर अद्याप कायदेशीर कारवाई केलेली नाही. हा प्रश्न सर्वसाधारणसभेत उपस्थित करणार आहे.

- भगवान घडमोडे,

गटनेते, भाजप.

शहरात साथीचे आजार नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने काय उपाययोजना केली, या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा व्हावी, असा माझा प्रयत्न आहे.

- कमलाकर जगताप, शिवसेना.

आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेला केंद्र आणि राज्य सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे. त्याबाबत सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करावा.

- जमीर कादरी, एमआयएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात लवकरच १५ नव्या सिटीबस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात ४३ शहर बसच्या जोरावर समाधानकारक सेवा पुरविण्याचा दावा महामंडळातर्फे केला जातो. १५ लाखांच्या शहरात एवढ्या तोकड्या संख्येने सिटी बस असल्याने नागरिकांची अडचण होत आहे, पण लवकरच ही अडचण दूर होणार आहे. १५ नव्या कोऱ्या बस शहरवासियांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

राजकीय कुरघोड्या; तसेच महापालिका आणि राज्य सरकारच्या वादामुळे औरंगाबादेतील सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेची कोंडी झाली आहे. दहा वर्षांपूर्वी महापालिकेने शहर बससेवा सुरू केली होती. खासगी संस्थेला दिलेली ही सिटी बस सेवा काही महिन्यांतच बंद पडली. सर्वत्र तोटा पाहून कंत्राटदाराने सेवा बंद केली. राजकीय कुरघोडी आणि भांडवल करत तत्कालीन राज्य सरकारने औरंगाबादेत पुन्हा एकदा एसटी महामंडळाने सिटी बस सेवा सुरू केली. सुरवातीला २६ बस देण्यात आल्या. बससाठी शहरातील कोणते मार्ग निवडले जाणार याबाबत उत्सुकता होती. दुर्दैवाने आजवर आवश्यक असलेल्या मार्गांवर सिटी बस सेवा सुरू झालेली नाही. दोन वर्षांत ८० मार्ग निवडले गेले आणि गरज वाढली त्यामुळे शहर बसची संख्या ४३वर पोचली. मध्यंतरी सिटी बससेवेकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने दहा गाड्या सांगली, सातारा येथे पाठविण्यात आल्या. त्यामुळे शहरातील अडचण पुन्हा वाढली होती. महसूल वाढावा, यासाठी महामंडळाने औरंगाबाद - जालना शटल बस सर्व्हिस सुरू केली.

वाळूज, पंढरपूर, बजाजनगर, सातारा, देवळाई, नक्षत्रवाडी या शहरालगतच्या भागांसाठी सिटी बससेवा सुरू केली आहे. शहराचा हळुहळु विस्तार होत असल्याने आता पुढचा भाग कनेक्ट करण्यासाठी एसटी महामंडळाने आखणी केली आहे. सिटी बसच्या ताफ्यात आणखी १५ नवीन बसची भर पडणार आहे. भोसरी येथे नवीन सिटी बसची बांधणी सुरू असून, महिनाभरात या गाड्या तयार होऊन औरंगाबादेत येण्याची शक्यता आहे.

अंतर्गत भागांची अडचण

जुन्या शहरातील अंतर्गत भाग असलेल्या ठिकाणी सिटी बस पोचण्याची कुठलीच व्यवस्था नाही. सिडको, हडको, गारखेडा, बेगमपुरा, जयसिंगपुरा या अंतर्गत भागात सिटीबस सुरू करण्याविषयी मात्र अजूनही एसटी महामंडळाने काहीच विचार केलेला नाही. भविष्यात याचा विचार प्राधान्याने करावा लागणार आहे.

नवीन बसची बांधणी सुरू असून लवकरच आपल्याला १५ नवीन शहर मिळणार आहेत. त्यातून अनेक नवीन मार्गांवर शहर बस सुरू करता येईल.

- आर. एन. पाटील, विभाग नियंत्रक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइन प्रवेशाचा फज्जा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) पशुवैद्यकीय, दुग्धतंत्रज्ञान व मत्स्यशास्त्र अभ्यासक्रमासाठी राबविलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फज्जा उडाला आहे. माहितीपुस्तिकेत दर्शविलेल्या वेळेपेक्षा आधीच प्रक्रिया बंद करून टाकल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. यासंदर्भात विद्यापीठाकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने यंदाची प्रवेश वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया नुकतीच पार पडली. तात्पुरती गुणवत्तायादी १४ जुलै रोजी वेबसाइटवर उपलब्ध करून देणे अपेक्षित होते, पण ती १५ जुलै रोजी उपलब्ध करून देण्यात आली. तक्रार व शंका निरसन करण्यासाठी १६ जुलैपर्यंतचा वेळ असल्याचे विद्यापीठाच्या माहितीपुस्तिकेत नमूद केले होते, पण एक दिवस उशिराने तात्पुरती गुणवत्तायादी अपलोड केल्याने विद्यार्थ्यांना केवळ एकच दिवस मिळाला.

प्रसिद्ध केलेल्या यादीत अनेक त्रुटी आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली, पण अनेक पात्र उमेदवारांच्या यादीत अपात्र उमेदवारांची नावे आहेत. 'माफसू'च्या माहितीपुस्तिकेतील परिच्छेद क्रमांक पाचनुसार बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये सर्वसाधाण प्रवर्गासाठी किमान ५० टक्के व राखीव प्रवर्गासाठी ४० टक्के गुण मिळविणाऱ्या व एमएच सीईटी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल, असे नमूद केले होते. या व्यतिरिक्त कुठलाही निकष 'माफसू'च्या माहितीपुस्तिकेत नाही. असे असूनही वैधता प्रमाणपत्र, गुणपत्रिका नसणे, नॉन क्रिमीलेअर मर्यादा प्रमाणपत्र, डोमिसाईल हे माहितीपत्रकात नसलेले मुद्दे व निकष लावून पात्र उमेदवारांना अपात्रांच्या यादी टाकून विद्यार्थ्यांचा संभ्रम वाढविला आहे.

माहिती पुस्तकाच्या पान क्रमांक १३वर तक्रार, शंका निरसन करण्याबाबत कुठलीही नवीन कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असे नमूद केले आहे. प्रत्यक्षात वेबसाइटवर झळकत असलेल्या अपात्र उमेदवारांच्या यादीत नोट क्रमांक एकमध्ये त्रुटींची पूर्तता करण्याचे सुचविले आहे. त्रुटींच्या कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अपलोड कशी होणार, हा प्रश्न आहे. ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविणाऱ्या समितीला या कुठल्याच गोष्टींचा प्रश्न का पडला नाही, याबाबत कोडे आहे.

प्रक्रिया नव्या राबविण्याची मागणी

प्रवेश समितीने वेबसाइटवर अपलोड केलेली पात्र व अपात्र असे वर्गीकरण केलेली उमेदवारांची यादी 'माफसू्'च्या माहिती पुस्तकातील मुद्दा क्रमांक पाचचे उल्लंघन करणारी आहेत. राज्यभरातील हजारो विद्यार्थी या प्रकारामुळे संभ्रमात असून, विद्यापीठाने प्रवेशप्रक्रिया रद्द करून नव्याने राबवावी अथवा त्रुटींची पूर्तता करावी, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात नागपूर विद्यापीठात संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसमित्र समितीत राजकारण्यांना ‘नो एन्ट्री’

0
0

विजय देऊळगावकर, औरंगाबाद

जातीय सलोखा टिकविण्यासाठी मोहल्ला कमिटी, शांतता समिती बरखास्त करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. यासंदर्भात नुकताच एक जीआर काढण्यात आला आहे. या समितीऐवजी पोलिसमित्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना समितीमध्ये स्थान नसल्याचे गृह खात्याने स्पष्ट केले आहे.

राज्यातील जातीय तणावाच्या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था; तसेच जातीय सलोखा व शांतता राखण्यासाठी जिल्हा आणि पोलिस मुख्यालयाच्या स्तरावर शांतता समिती, मोहल्ला कमिटी यांची स्थापन करण्यात आली होती, मात्र या कमिटी सदस्यांमध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा समावेश केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये शांतता समिती, मोहल्ला कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

राज्यातील जिल्हा, आयुक्तालय, तालुका, परिमंडळ व पोलिस ठाणे स्तरावरील शांतता समित्या बरखास्त करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. आता या समित्यांची जागा पोलिस मित्र समिती घेणार आहे. पोलिस मित्र समितीतमध्ये सक्रिय राजकीय कार्यकर्त्यांना स्थान नसेल. त्याचबरोबर जातीवादी, धर्मवादी पक्ष, संघटना, संस्था यांच्याशी संबंधितांनाही पोलिस मित्र समितीत स्थान देण्यात येणार नाही.

सदस्य असे असतील...

सदस्यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात येईल

सदस्य निष्कलंक चारित्र्याचा व्यक्ती असावा

सदस्यावर दखलपात्र, अदखलपात्र गुन्हे नसावेत

जातीयवादी म्हणून ओळख असलेल्यांची नेमणूक नको

शिक्षक, वकील, पत्रकार व निवृत्त पोलिस अधिकारी यांना प्राधान्य

कट्टरपंथी; तसेच राजकीय कार्यकर्त्यांना स्थान नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग !

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सलग तीन वर्षांपासून अवर्षणाला तोंड देणाऱ्या मराठवाड्याला यंदाही पावसाने हुलकवणी दिल्याने पुन्हा एकदा दुष्काळाचे ढग आहेत. पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या संकटात आल्या असून जुलै महिन्यातच मराठवाडा ओसाड माळरानासारखा भासत आहे. मराठवाड्यातील सर्व लहान मोठ्या ८३५ प्रकल्पांमध्ये केवळ ६ टक्के साठा शिल्लक आहे.

जून महिन्यात पावसाळ्याची सुरुवात दणदणित झाल्याने शेतकरी सुखावले होते. त्यांनी अत्यंत उत्साहात खरीप पिकांची पेरणी केली. परंतु, जवळपास एक महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने परिस्थिती अत्यंत कठीण झाली आहे. पावसाला लगेच सुरुवात झाली नाही, तर पाणीटंचाईचे ‌भीषण संकट येणार आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र मंदावले असून गेल्या सात महिन्यातच विभागातील साडेचारशे शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले, येत्या महिन्यात पाऊस झाला तरी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत.

औरंगाबाद विभागामध्ये १९ जुलैपर्यंत केवळ १२७.७६ (१६.५५ टक्के वार्षिक सरासरी) मिलीमीटर एकूण पावसाची नोंद झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १७९.१ मि.मी. (२६.५२ टक्के), जालना १३४.०१ (१९.४७ टक्के), परभणी ९१.०९ (११.७६टक्के), हिंगोली १६७.६५ (१८.७८ टक्के), नांदेड १६९.७५ (१७.७६ टक्के), बीड ८२.७१ (१२.४१ टक्के), लातूर ११२.२२ (१३.९९ टक्के) तर उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ९२.४ मिलिमीटर (११.८५ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.

शेतकरी आत्महत्यांचे लोण

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोनुसार यावर्षी देशात ६५०० व राज्यात २५६८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. मराठवाड्यातही दुष्काळी परिस्थितीमुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत आहे. पेरणीसाठी झालेला खर्च, शेतीसाठी काढलेले कर्ज यामुळे त्रस्त शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र मराठवाड्यात आहे. गेल्या तीन महिन्यांत २०२ सात महिन्यांतील ४२८ प्रकरणांपैकी आत्महत्या पात्र ठरवण्याच्या निकषामध्ये ७१ प्रकरणे बसत नसल्यामुळे या आत्महत्यांना अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. १०६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. आत्महत्या केलेल्या काही शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वीच पीककर्ज घेतले आहे. काहींचा शवविच्छेदन अहवाल समितीला प्राप्त झाला नाही. काही शेतकऱ्यांच्या नावावर पीककर्ज नसल्याने या आत्महत्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. काहींच्या वारसांकडे जमिनीसंदर्भातील कागदपत्रे पूर्ण नसल्यानेही मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.

पाणीसाठा तळाला

मराठवाड्यात भर पावसाळ्यात उन्हाचे चटके जाणवत आहेत. पावसाळ्यातील या कडक उन्हामुळे विभागातील प्रकल्पांमधील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. सध्या विभागातील ८३३ प्रकल्पांमध्ये फक्त ६ टक्के (४६८.२६ दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा शिल्लक आहे. ११ मोठे, ७५ मध्यम, ७२३ लघु प्रकल्प, गोदावरी नदीवरील ११ व मांजरा नदीवरील १७ बंधारे अशा ८३७ प्रकल्पांत सध्या ४६८.२६ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे. हा साठा वेगाने कमी होत असल्याने ऐन पावसाळ्यात मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. विभागात असलेल्या मोठ्या प्रकल्पात ६ टक्के, मध्यम प्रकल्पात १०,लघु प्रकल्पा‌त ५, गोदावरीवरील बंधाऱ्यांमध्ये ७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिकांनी माना टाकल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एक महिना उलटूनही पावसाची दडी कायम असल्याने खरीप पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी ठिबक व तुषार सिंचन वापरून पिके जगवण्याची धडपड करीत आहेत; मात्र, विहिरींनीही तळ गाठल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. पिके जगवण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी उपाययोजना सूचवल्या आहेत.

जून महिन्यात धो-धो कोसळलेला पाऊस महिनाभरापासून बेपत्ता झाल्याने खरीप हंगाम संकटात आहे. औरंगाबाद विभागात ८७ टक्के आणि लातूर विभागात ६५ टक्के पेरणी झाली आहे. सध्या मातीतील ओल संपल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. सिल्लोड, गंगापूर, वैजापूर व कन्नड या तालुक्यातील पिके पिवळी पडली आहेत. दुपारी उन्हाची तीव्रता वाढताच पिके माना टाकत आहे. येत्या आठ दिवसांत पावसाची नितांत आवश्यकता आहे. पावसाची दडी कायम राहिल्यास दुबार पेरणीची शक्यता वाढणार आहे. जिल्ह्यात कापसाचे तीन लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. तर विभागात जवळपास १४ लाख हेक्टरवर कापसाची लागवड आहे.

'पाणी नसल्यामुळे पिके सुकली असून पुढील आठ दिवसात पाऊस पडणे आवश्यक आहे,' असे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी सांगितले. टंचाईच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. विभागातील पांढरी पिंपळगाव, आडूळ, रजापूर, चितेगाव या परिसरातील पिकांची बुधवारी (१५ जुलै) पाहणी करण्यात आली. यावेळी विभागीय कृषी अधिकारी प्रकाश उगले, डॉ. संजय पाटील, तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. शेतकऱ्यांची भेट घेऊन मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. तसेच काही फळबागांची पाहणी कृषी तज्ज्ञांच्या पथकाने केली. उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवन वाढले आहे. आर्द्रता घटल्याने पिके सुकत आहेत. उशिराच्या पावसाचा खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.

उपाययोजनांची गरज

टंचाईच्या काळात पीक जगविण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी उपाययोजना सूचविल्या आहेत. पाणी असल्यास शेतकऱ्यांनी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. हलकी कोळपणी करून पिकाला आर्द्रता उपलब्ध करावी. पिकावर पोटॅशिअम नायट्रेट फवारणी केल्यास पीक तग धरू शकते. तर फळबागांमध्ये बहार धरू नये आणि बाष्परोधक फवारणी करावी असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

टंचाईच्या परिस्थितीत पिके जगविण्यासाठी प्रत्येक गावात मार्गदर्शक फलक लावत आहोत. शेतकऱ्यांची भेट घेऊन उपाय सांगितले आहेत. सद्यस्थितीत पिकांना पाण्याची गरज आहे.

- प्रकाश उगले, उपविभागीय कृषी अधिकारी

पिके फक्त आठ दिवस तग धरतील एवढीच आर्द्रता आहे. ऊन तीव्र झाल्यानंतर पिकांवर प्रतिकूल परिणाम जाणवत आहे. फळबागा टिकविण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करावा.

- डॉ. संजय पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री जाताच स्टेशन ‘जैसे थे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा ३ जुलै रोजी औरंगाबाद दौरा होता. मंत्री येणार असल्याने रेल्वे स्टेशनची सफाई करण्या आली. ३ जुलैला स्टेशन चकाचक होते. आता १५ दिवस उलटून गेल्यानंतर आज रेल्वे स्टेशनची परिस्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे बकाल झाली आहे. दक्षिण-मध्य रेल्वेतील महत्त्वाचे स्थानक म्हणून औरंगाबादची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा कायम राबता असतो. मुंबई, दिल्लीहून येणाऱ्या पर्यटकांचीही संख्या मोठी असते. असे असूनही रेल्वे स्टेशनवर साध्या प्राथमिक गोष्टीही नाही. मंत्र्यांच्या दौऱ्यांच्या वेळेस नांदेडहून मेटल डिटेक्टर मागविले होते. शनिवारी ते काढून नेण्यात आले. स्थानकावर कुठल्याही प्राथमिक सुरक्षा तपासणी नाही.

विशेषतः रेल्वे येण्याच्या वेळेस सुरक्षेचा प्रश्न अनेकवेळा उपस्थित झाला आहे. प्रभू येण्यापूर्वी स्थानक, लोहमार्गाची स्वच्छता करण्यात आली होती. आज मात्र स्थानक आणि रूळ दोन्हीकडे मोठ्या प्रमाणावर घाण पसरली आहे. स्थानकात पार्किंगची व्यवस्थाही वाईट आहे. पूर्वेकडील गेटमधून आत गेल्यानंतर वाहतूक पोलिसांची चौकी आहे. चौकीच्या आजुबाजुला पार्किंग केले जाते. पुढे रिझर्व्हेशन केंद्राजवळ अधिकृत पार्किंग आहे. त्याचा उपयोग अनेकजण करत नाहीत. रिक्षा तर नियम डावलून कुठेही उभ्या केल्या जातात. नवीन स्थानकाच्या समोरील बाजूला ३ जुलै रोजी स्वच्छता केली होती. तेथे आता पुन्हा कचरा साचला आहे.

स्थानक परिसारत २४ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. ही यंत्रणा कार्यरत आहे. मंत्र्यांची पाठ फिरताच रेल्वे स्टेशनची झालेली बकाल अवस्ता पुन्हा कधी नीट होणार, हा प्रश्न मात्र आहे. यासंदर्भात दक्षिण-मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४८ तासांत सरींची अपेक्षा

0
0

रामचंद्र वायभट, औरंगाबाद

मराठवाड्यात गेल्या महिनाभरापासून गायब झालेल्या पावसाचे येत्या ४८ तासांत पुनरागमन होण्याची अपेक्षा अाहे. विभागात आठवडाभर पावसाचा मुक्कम असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

विभागात महिनाभरापासून पाऊस नाही. त्यामुळे खरिपाची पिके संकटात सापडली आहेत. येत्या दोन दिवसांत पावसाला सुरुवात झाल्यास खरीप पिकांना जीवदान मिळेल. मराठवाड्यात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाला सुरुवात झाली. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात विभागात दमदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दगा दिला. गेल्या काही दिवसांपासून ढगांची गर्दी होते, मात्र पाऊस पडत नाही. उत्तर मध्य प्रदेशर आणि उत्तर भारताच्या दक्षिण भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ढगांची स्थिती चक्राकार झाल्यामुळे मध्य भारतामध्ये नि‌र्माण झालेल्या ढगांना वारे उत्तर भारताकडे घेऊन जात अाहे. त्यामुळे अरबी समुद्रावर निर्माण होणारे वारेही उत्तरेकडे जात आहेत. अशा स्थितीमुळे उत्तर भारतामध्ये दमदार पाऊस होत असल्याचे हवामानशास्त्राचे अभ्यासक सांगतात. मध्य भारतामध्ये ढगांची निर्माण झालेली ही स्थिती सध्या दक्षिण-पश्चिम भागात सरकत आहे. त्याच वेळी बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला निर्माण झालेल्या स्थितीमुळे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये येत्या ४८ तासांमध्ये पावसाची चिन्हे आहेत. हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार; येत्या दोन दिवसात मराठवाड्यात पाऊस होईल. त्यानंतर विभागात तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल. मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त असेल.

मध्य भारतात निर्माण झालेल्या चक्राकार स्थितीमुळे दिल्ली, उत्तरांचल या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे. सध्या मध्य भारतात असलेल्या या चक्रकार स्थितीचे केंद्र हे रतलाम, इंदूरकडे सरकले आहे. त्याचा परिणाम हा पूर्व गुजरातमध्ये दिसून येत आहे. अशा स्थितीत येत्या २४ ते ४८ तासांमध्ये मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

- श्रीनिवास औंधकर, हवामान अभ्यासक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबाद जिल्ह्यात पशुधन घटण्याची भीती

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यात चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या समस्येने पशुपालक व बळीराजाला ग्रासले आहे. दुष्काळाचे तीव्र सावट पशुधनावर आक्रमण करीत आहे. यंदाचा दुष्काळ हा प्रचंड प्रमाणात पशुधन घटवणार असेच काहीसे चित्र सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात अनुभवास मिळत आहे. बैल, गाय, म्हैस, शेळ्या-मेंढ्यांची ही दयनीय अवस्था तर जंगलातून रानोमाळ भटकंती करणाऱ्या वन्य प्राण्यांची आणि पक्ष्यांची स्थिती काय होईल, याची कल्पना करवत नाही.

सलग चौथ्या वर्षीही पावसाने अद्यापपर्यंत दडी मारल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालक संकटात आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपलब्ध पाणीस्त्रोत पिण्यासाठी राखीव ठेवणे आत्रर जेथे ज्याप्रमाणे आवश्यकता असेल तेथे गरजेनुसार चारा डेपो आणि चारा छावण्या सुरू करण्यासंदर्भात सरकार मागे-पुढे पाहणार नाही, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत देत असले, तरी ही मदत जिल्ह्यातील लाखो पशुपालकांच्या माध्यमातून जनावरांपर्यंत कशी पोहोचवणार याचे कोणतेही व कसलेही नियोजन प्रशासन स्तरावर झाल्याचे दिसून येत नाही. केवळ जिल्ह्याबाहेर चाराविक्रीस बंदी घालण्यापलीकडे जिल्हा प्रशासनाचीही कसलीही हालचाल दिसून येत नाही. शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात सात लाख ३७ हजार ३४७ लहान मोठी जनावरे असून, यामध्ये गाय, बैल, म्हैस, रेडे, शेळ्या-मेंढ्या यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात हायब्रीड, ज्वारीचा कडबा, कडवळ यांचे दर गेल्या दोन महिन्यांपासून भर पावसाळ्यात देखील गगनाला भिडल्यामुळे पशुपालकांना पशुपालन करणे अवघड झाले आहे. जनावरांसाठीचा चारा त्याचबरोबर सरकी पेंड, खापरी पेंड (शेंगदाणा पेंड) सुग्रास, पशुखाद्य यांच्या दरामध्ये सातत्याने वाढ होऊ लागल्याने पशुपालक दुभती जनावरे बाजारात विक्रीसाठी आणू लागले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आणि यंदाही उस्मानाबाद जिल्ह्यावर पाऊस रुसलेला असल्यामुळे शिवाय पीक पेरा पद्धतीत बदल झाल्यामुळे हायब्रीड, ज्वारी बरोबरच कडवळच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे कडब्याचे व कडवळचे शिवाय उसाच्या वाड्याचे दर आताच तेजीकडे वाटचाल करू लागले आहेत.

जिल्ह्यातगेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाही चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या समस्येने पशुपालक व कळीराजाला ग्रासले आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची अवस्था सध्या वैराण वाळवंटाप्रमाणे झाली आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना करावी लागणारी वणवण, कोरडे पडलेले प्रकल्प, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे सर्वांचे लक्ष आभाळाकडे लागलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कळंब तहसीलदारांचा अटकपूर्व जामीन मंजूर

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

कळंबचे तत्कालीन तहसीलदार व सध्या नागपूरचे उपजिल्हाधिकारी धोंडीराम हिराजी राठोड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. एम. देशपांडे यांनी सशर्त मंजूर केला. कळंब तहसील कार्यालयातील कर्मचारी रवींद्र भांडे यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात तहसीलदार धोंडीराम राठोड व अन्य ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून १ कोटी ९ लाख ५३ हजार ९२९ रुपयांची बिले मंजूर करून शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे .त्यास राठोड जबाबदार आहेत. या प्रकरणात राठोड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उस्मानाबाद सेशन कोर्टाने फेटाळला होता. या निर्णयास राठोड यांनी हायकोर्टात आव्हान दिले. कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सशर्त मंजूर केला. राठोड यांना आरोपपत्र दाखल करेपर्यंत कळंब ठाण्यात रविवारी हजेरी लावण्याची अट घातली आहे. याचिकाकर्त्यातर्फे सुदर्शन साळुंके यांनी तर सरकारतर्फे दिघे यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषाच्या बाटलीसह आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

रोजगार हमी योजनेची रक्कम मिळण्यास उशीर होत असल्याने तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात सोमवारी (२० जुलै) विषाच्या बाटलीसह आंदोलन केले. दरम्यान, गटविकास अधिकाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत मस्टर क्लिअर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पंचायत समितीमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रोहयोची अंमलबजावणी करताना २०११-१२ मध्ये गैरप्रकार केल्याच आरोप आहे. या कालावधीतील मंजूर ४५० विहिरींचे काम करणाऱ्या कुशल व अकुशल कामगारांचे सव्वासहा कोटी रुपयांचा निधी शासनाने थांबवला होता. दोन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर शासनाने दोन महिन्यांपूर्वी या विहिरींचे पेमेंट देण्यास सुरुवात केली. मात्र, पैठण पंचायत समितीमध्ये अत्यंत धिम्या गतीने मस्टर क्लिअर केले जात असल्याचा आरोप करून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी यांच्या दालनात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

गटविकास अधिकारी हेतुपुरस्सरपणे काही विशिष्ट गावांचे मस्टर क्लिअर करत असल्याचा आरोप करण्यात आला. पंचायत समितीमधून पैसे मिळण्यास उशीर होत असल्याचा आरोप शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी केला. आंदोलनात जगन्नाथ नेमाने, पद्माकर शिंदे, मदन फासाटे, लक्ष्मण जाधव, अशोक पाचोडे, आसाराम डोईफोडे आदी शेतकरी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक वर्षापासून कुलूप

0
0

नीलेश सोनटक्के, सिल्लोड

अपघातातील जखमींना अत्यावश्यक सेवा तातडीने देण्यासाठी एक कोटी २० लाख रुपये खर्च करून ट्रामा केअर युनिट इमारतीचे गेल्या वर्षी २१ जुलै रोजी उदघाटन करण्यात आले. मात्र शस्त्रक्रिया विभागातील किरकोळ बदल, उरलीसुरली इलेक्ट्रिक कामे यामुळे एक वर्षापासून इमारतीचा वापर सुरू झालेला नाही. परिणामी येथे ट्रामा केअर युनिट सुरूच होऊ शकलेले नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने महामार्गावरील शहरांत उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारत अपघातातील जखमींवर तत्काळ उपचार मिळावेत यासाठी ट्रामा केअर युनिट बांधण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक कोटी २० लाख रुपये खर्च करून इमारत बांधून घेण्यात आली. विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार व तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते २१ जुलै २०१४ रोजी ट्रामा केअर युनिटचे उदघाटन करण्यात आले. पंरतु, एक वर्षाच्या काळात सुविधांतील किरकोळ बदल होऊ शकले नाहीत.

ट्रामा केअर युनिटसाठी नियुक्त करण्यात आलेल्या तेरा कर्मचाऱ्यांची उपजिल्हा रुग्णालयात सेवा घेतली जात आहे. पाच मेडिकल ऑफिसर, एक शल्यचिकित्सक, तीन स्टाफ नर्स, एक नर्स इन्चार्ज, एक वाहनचालक, एक कक्षसेवक, व एक परिसेविका ही पदे भरण्यात आली आहेत.

जळगाव-औरंगाबाद महामार्गावर अपघाताचे प्रमाण मोठे आहे. या रस्त्यावर अपघात झाल्यानंतर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात आणले जाते, पण ट्रामा केअर युनिट सुरू नसल्यामुळे प्रथमोपचार करून औरंगाबादला पाठवले जाते. मात्र उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी ट्रामा केअर युनिट सुरू झाले नसले तरी रुग्णांवर उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून उपचार केले जात आहेत, असा दावा केला.

औरंगाबाद व जळगाव ही शहरे दूर आहेत. त्यामुळे जखमींवर तातडीने उपचार होण्यासाठी ट्रामा केअर युनिट सुरू करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व आरोग्य विभाग यांच्या टोलवाटोलवीत रुग्णांची परवड होत आहे. अनेक रुग्णांचा वाटेत मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकांची ऐपत असल्यास ते तातडीने रुग्णाला खासगी दवाखान्यात हलवतात. हे युनिट कार्यान्वीत झाले असते तर काही रुग्णांचे प्राण नक्कीच वाचले असते.

ही कामे शिल्लक

ट्रामा केअर युनिटच्या शस्त्रक्रिया विभागात काही त्रुटी राहिल्या आहेत. या विभातील इलेक्ट्रिकल विभागाचे काम, त्याचे पॉइंट शस्त्रक्रियेसाठी हवे त्या पद्धतीने करून द्यावे लागणार आहे.

आमदार काय करतात ?

अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाच्या कालावधीत पाठपुरावा करून ट्रामा केअर युनिट इमारतीचे बांधकाम पूर्ण करून घेतले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी उदघाटनही उरकले. ते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांच्या पक्षाची सत्ता नसली तरी आपण उदघाटन केलेले युनिट सुरू व्हावे यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले ते कळू शकले नाही.

इमारतीमधील शस्त्रक्रिया विभागातील काही बदल, इलेक्ट्रिकलचे काही काम राहिले आहे. त्यामुळे इमारत ताब्यात घेतलेली नाही. रुग्णसेवेवर याचा परिणाम होत नाही.

- डॉ. भूषणकुमार रामटके, वैद्यकीय अधीक्षक

आरोग्य विभागाला हव्या तशा सुविधा निर्माण

करून द्यायच्या आहेत. आरोग्य विभागाच्या गरजेनुसार काही ठिकाणी दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करणार आहोत.

- मधुसुदन कंडलीकर, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्त शिवारची ४० कामे नापास!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राज्य शासनाने आखलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या 'क्रॉस चेकिंग'मध्ये जिल्ह्यात बहुतांश कामे सुरूच झाली झाली नसल्याच आढळले आहे. तपासणी करण्यात आलेल्या कामांपैकी ४० कामांमध्ये चुका आढळल्या आहेत.

जलयुक्त शिवार अभियानातील कामांचे 'क्रॉस चेकिंग' करण्यासाठी शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या १२९ पथकांची नेमणूक करण्यात आली होती. कृषी, वन विभाग, सामाजिक वनीकरण, लघुसिंचन, भूजल सर्वेक्षण आदी विभागाअंतर्गत करण्यात आलेली १३०१ कामे पथकाकडे पथकाकडे तपासणीसाठी देण्यात आली होती. पथकाने ७७० कामांची तपासणी केली, त्यापैकी २६३ कामे पूर्ण झाली असून २४७ कामे प्र‌गतीपथावर आहेत. २२४ कामांना अद्यापही मुहूर्तच लागला नसल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. कंत्राटात नमूद निकष पूर्ण न केल्याने ४० कामे नापास ठरवण्यात आले. यामध्ये कमी उंचीचे बांधकाम करणे, कमी आकाराचा समतल चर खोदणे, कमी खोलीकरण करणे, कमी उंचीचे बंधारे आदी त्रुटी आहेत. त्यासाठी संबंधित विभागांना जबाबदार धरण्यात येणार असून त्यांना या त्रुटी दूर करण्याचे सांगण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेने केलेल्या कामांची तपासणी लघु पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी, वनविभागाची कामांची तपासणी कृषी विभाग, बांधकाम विभागाची कामे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आली. जिल्ह्यातील २२८ गावांमध्ये एकूण कामांची संख्या ४६५७ आहे. सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, नद्यांमधील गाळ काढणे, कंपार्टमेंट बंडिंग, साखळी सिमेंट बंधारा, बंधारा दुरुस्ती, नाला खोलीकरण, सरळीकरण, साखळी सिमेंट बंधारा, विहीर पुनर्भरण, गाळ काढणे आदी कामांची तपासणी पथकांनी केली.

१२ कामांची गुणवत्ता शून्य

जलयुक्त शिवार योजनेच्या पूर्ण झालेल्या शंभर कामांचा दर्जा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या त्रयस्थ संस्थेमार्फत तपासण्यात आला. या तपासणीत १२ कामांमध्ये दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात औरंगाबाद तालुक्यातील नायगव्हाण येथील बंधाऱ्यात पाणीच साचले नाही. पाणी का साचले नाही, याची तपासणी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णाचा मृत्यू; डॉक्टरला मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मेंदूमध्ये रक्तस्त्राव झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी मेडिसिन विभागाच्या निवासी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना रविवारी (१९ जुलै) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारहाण करणारे तिन्ही नातेवाईक कैद झाले असून, तिघांना मंगळवारी (२० जुलै) सकाळी आठपर्यंत अटक न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा 'मार्ड'ने दिला आहे.

मेंदूमध्ये रक्तस्त्राव झालेल्या ८० वर्षीय व्यक्तीला रात्री नऊच्या सुमारास घाटीच्या अपघात विभागामध्ये गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अपघात विभागामध्ये गोंधळ घालीत मेडिसिन विभागाच्या निवासी डॉक्टरला मारहाण केली. या प्रकारानंतर तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धाव घेतली व प्रकरण निवळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. संबंधित निवासी डॉक्टरला धक्काबुक्की व मारहाण करताना तिघेजण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. या प्रकारानंतर संबंधित निवासी डॉक्टरने बेगमपुरा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून, मारहाणीचे फुटेजही पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

मारहाण करणाऱ्या तिघांना मंगळवारी सकाळी आठपर्यंत अटक न झाल्यास मंगळवारपासून निवासी डॉक्टर बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपाला 'सेंट्रल मार्ड'चा पाठींबा असणार आहे.

डॉ. विकास राठोड, शहर अध्यक्ष, मार्ड

संबंधित रुग्णाला शक्य ते सर्व उपचार देण्यात आले होते. त्यानंतरही निवासी डॉक्टरवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images