Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘सिंचना’चे १६ कोटी गेले परत

0
0

मकरंद कुलकर्णी, औरंगाबाद

सततचा गोंधळ, योजनांना ओरबडण्याची प्रवृत्ती यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा राज्यस्तरावर डागाळली आहे. त्यामुळे पालकमंत्री रामदास कदम यांनी डीपीसीतून सिंचन विभागासाठी मंजूर केलेल्या ३४ कोटींपैकी १६ कोटी रुपये स्थानिक स्तर विभागाकडे वळविले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा फटका अशा प्रकारे ग्रामीण भागातील विकासकामांना बसला आहे.

जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) च्या बैठकीत आलेल्या मागण्यांची दखल घेऊन पालकमंत्री निधीसंबंधी निर्णय घेतात. पालकमंत्र्यांनी चालू आर्थिक वर्षासाठी जि.प. सिंचन विभागाला ३४ कोटी रुपये मंजूर केले होते. यातून पाझर तलाव, लघु पाटबंधारे, कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे मोठ्या प्रमाणावर होणार होती. राज्यात युतीची सत्ता आहे आणि जिल्हा परिषद काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस - मनसे आघाडीच्या ताब्यात आहे. कदम यांनी निधी मंजूर केला, पण त्याचे नियोजन करण्यात झेडपीचे कारभारी अपयशी ठरले. साडेतीन वर्षांपूर्वीचे सुधारित बंधाऱ्यांचे प्रकरण, त्यानंतर केवळ औरंगाबाद तालुक्यात मंजूर केलेले कोल्हापुरी बंधारे आणि दुष्काळात गाळ काढण्याच्या पाच कोटींच्या कामातील घोळ चव्हाट्यावर आला. विशिष्ट सदस्यांनी हे पैसे परस्पर लाटले. त्यानंतर गेल्या महिन्यातील सर्वसाधारण सभेत सिंचनाच्या हिशेबावरून सर्वपक्षीय सदस्यांनी पदाधिकारी आणि प्रशासन दोघांना धारेवर धरले. त्यावर चार सदस्यीय समिती नेमून चौकशी करण्यात आली.

या प्रकरणांमुळे सिंचन विभागाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली. त्यामुळे झेडपीला दिलेल्या निधीपैकी १६ कोटींचा निधी स्थानिक स्तर विभागाकडे वळविण्यात आला आहे. जिल्ह्यातील कामांसाठी निधी मागण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे मागणी केली होती. आता निधी याच कारभाऱ्यांमुळे गेल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे.

''डीपीसीतून मिळालेल्या निधीमधून १६ कोटी रुपये दुसरीकडे वर्ग करण्यात आले आहेत. सिंचन विभागासाठी मिळालेल्या निधीतून हा पैसा वर्ग करण्यात आला आहे.''

- उत्तम चव्हाण, मुख्य लेखा व वित्त अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिका, ‘सिद्धार्थ’च्या विजेवर टांगती तलवार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल आठ कोटी रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे महापालिकेचे मुख्यालय, सिद्धार्थ उद्यान आणि संत एकनाथ रंगमंदिराच्या वीज पुरवठ्यावर टांगती तलवार आली आहे. पालिका प्रशासनाने बिल न भरल्यास या तिन्ही ठिकाणंचा वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, असा इशारा महावितरणने महापालिकेला दिला आहे.

तीन प्रशासकीय इमारती, सहा वॉर्ड कार्यालये, उद्याने, प्राणिसंग्रहालय, संशोधन केंद्रे आणि रंगमंदिर यांसह विविध समाज मंदिरांचे विजेचे बिल महापालिका भरते. महापालिकेला दर महिन्याला किमान सुमारे सव्वा कोटी रुपयांचे विजेचे बिल येते. स्थानिक संस्था करावरून (एलबीटी) महापालिका आणि महावितरण यांच्यात वाद सुरू होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेने विजेचे बिलच भरले नाही. 'एलबीटी'च्या थकबाकीच्या रक्कमेतून विजेचे बिल वळते करावे, असा महापालिकेचा प्रस्ताव होता. परंतु शासनाने विजेला एलबीटीतून सूट दिली. त्यामुळे महापालिकेला आता वीज बिलाची थकबाकी पूर्णपणे भरावी लागणार आहे. आठ कोटी रुपयांचे बिल थकल्यामुळे महावितरणने महापालिकेच्या विद्युत विभागाला पत्र पाठवून लवकरात लवकर बिल भरावे, अन्यथा मुख्य कार्यालय, सिद्धार्थ उद्यान आणि संत एकनाथ रंगमंदिराचा वीज पुरवठा तोडावा लागेल, असा इशारा दिला आहे. एलबीटी रद्द झाल्यामुळे ऑगस्ट महिन्यात कर्मचाऱ्यांचे वेतन कसे द्यावे, ही चिंता महापालिका प्रशासनाला सतावित आहे. त्यात आता वीज बिलाचा शॉक महावितरणने दिल्याने भर पडली आहे.

आठ महिन्यांपासून वाद

विजेवरील 'एलबीटी'वरून गेल्या आठ महिन्यांपासून वाद सुरू आहे. वीज वितरण व्यवस्था 'जीटीएल'कडे असताना या वादाला सुरुवात झाली. मुकुंदवाडीतील महापालिका शाळेचे एक लाख रुपये वीज बिल थकले होते. त्यामुळे शाळेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्याची स्थायी समितीच्या बैठकीतही चर्चा झाली होती. आता थेट पालिका मुख्यालयाचाच वीज पुरवठा संकटात सापडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासनाकडे निवडणुकांचे २२ कोटी थकीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'निवडणूक आयोगाचे काम केवळ निवडणुका घेणे असून, यासाठी पैसा देण्याचे काम राज्य शासनाचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे निकष अत्यंत कालबाह्य झाले असून या निकषांमध्ये सुधारणा आवश्यक आहे. याच कालबाह्य निकषांमुळे ग्रामपंचायत निवडणुकीचे २२ कोटी रुपये राज्याकडे थकले आहेत', असे मत राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी गुरुवारी (३० जुलै) व्यक्त केले.

जिल्ह्यात होत असलेल्या ५८७ सार्वत्रिक व ३९ पोटनिवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सहारिया शहरात आले होते. यावेळी ते म्हणाले, 'राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींचा आकार लहान मोठा आहे. त्यामुळे येथे निवडणुकीदरम्यान करण्यात येणारा खर्चही वेगवेगळा असतो. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे निकष आता कालबाह्य झाले असून, खर्चाचे हे निकष बदलण्यात यावेत. या संदर्भात राज्य शासनाला सूचना केली आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेली इमारत, वाहनांवर होणारा खर्च, भत्ते, भोजन, मंडप यासाठी मोठा खर्च होतो. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला सध्या देण्यात येत असलेल्या २० हजार रुपये निधीमध्ये सुधारणा कराव्यात, असे शासनाच्या नजरेस आणून दिले. जिल्ह्यात सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी १,९४९ मतदान केंद्रे असून यासाठी २५० निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी ९ हजार निवडणुकीच्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. निवडणूक शांतता व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सुमारे ५ हजार पोलिस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे', असे सहारिया यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा चालकाने केले २५ हजार रुपये परत

0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जालन्यातील एका रिक्षाचालकामुळे अजुनही माणुसकी जीवंत असल्याचा प्रत्यय आला. त्याने प्रवाशाचे २५ हजार रूपये असलेली बॅग परत आणून दिली. या प्रामाणिक रिक्षाचालकाचा सदर बाजार पोलिसांच्यावतीने सत्कार करण्यात आला. शेख जावेद शेख जफर (वय, ४० रा. वाल्मिकनगर) असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे.

शहरातील ढोरपुरा परिसरातील सरस्वती दत्तात्रय इंगळे ही महिला बुधवारी दुपारी औरंगाबादहुन जालन्याला परतल्या. बस स्थानकावरून घरी जाण्यासाठी त्या आपल्या दोन मुलांसह शेख जावेद याच्या एमएच २०-५६१३ या रिक्षात बसल्या. दरम्यान, घरी पोचल्यावर काही वेळेनंतर त्यांच्या निदर्शनास आले की एक बॅग रिक्षातून काढायाची राहिली आहे. या बॅगेत रोख २५ हजार आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे होती. इंगळे कुटुंबियांनी तडकाफडकी सदर बाजार पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकाराची तक्रार दिली. तक्रार येताच पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी डीबी पथकाला तात्काळ या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवित असतानाच रिक्षाचालक शेख जावेद स्वतःहून थेट पोलिस ठाण्यात हजर झाला. रिक्षात एका महिला प्रवाशाने ही बॅग रिक्षामधे विसरल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ही बॅग सदर महिलेच्या स्वाधीन केली. तसेच सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी प्रामानिकपणा दाखविल्याबद्दल रिक्षाचालक शेख जावेद यांचा सत्कार केला. यावेळी पोलिस डीबी पथकाचे नंदू खंदारे, सुधीर वाघमारे, साई पवार, किरण चेके, राहुल तंगे, नितिन झोटे, श्रीमती कांबळे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीक विमा देण्यास टाळाटाळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

बिलोली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ हैद्राबाद येथून पीक विम्याची रक्कम दिली जात नाही. विशेष म्हणजे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यामधून पीक विम्याची रक्कम वितरीत करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बिलोली तालुक्यातील कोटग्याळ येथील शेतकरी संभाजी पाटील व अन्य शेतकऱ्यांनी बिलोलीचे तहसीलदार सुरेखा स्वामी यांना निवेदन दिले. याबाबत प्रशासनाने बँकेला पत्र दिल्याचे सांगण्यात आले.

बिलोली तालुक्यातील शेतकरी दुष्काळामुळे त्रस्त झाला आहे. शेतात पीक नाही. पैसे भरून पीक विमा काढला. पीक विम्याचे पैसे नाहीत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नापसंती व्यक्त केली. पीक विम्याची रक्कम न आल्यामुळे, रक्कम वाटप होत नसल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते. अनेक शेतकऱ्यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आणि ग्रामीण बँकेत पीक विमा भरला होता. त्याची रक्कम त्यांना प्राप्त होत आहे. याची माहिती घेऊन बिलोली तालुक्यातील कोटग्याळ येथील शेतकरी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा बिलोली येथे संपर्क साधला. यावेळी पाटील यांना समाधानकारक उत्तर देण्यात आले नाहीत. त्याचबरोबर पिक विम्याची रक्कम आली नसल्याचे सांगण्यात आले. पीक विम्याची रक्कम अन्य बँकाकडे उपलब्ध झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद पिक विम्याच्या बाबतीत टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ही माहिती माध्यमांना पुरविली.

दरम्यान, स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे प्रभारी शाखा व्यवस्थापक राकेश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पीक विम्याची कोणाचीही रक्कम शिल्लक नसल्याचे सांगितले. दरम्यान, संभाजी पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी बिलोलीचे तहसीलदार सुरेखा स्वामी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. याबाबत तहसीलदार स्वामी यांनी बँकेला पत्र देऊन शेतकऱ्यांची अडचण तातडीने सोडवावी असे सुचित केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणतर्फे बेरोजगार मेळावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बेरोजगार इंजिनीअरच्या हाताला काम देण्यासाठी शासनाने फिडर फ्रॅन्चायझी मॅनेजर योजना व बेरोजगारांना लॉटरी पद्धतीने कामे देण्याचे जाहीर केले आहे. त्यासोबतच बेरोजगार अभियंत्यांचा सहभाग वाढावा याकरीता महावितरण प्रशासनाने मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता विभागनिहाय मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी दिली.

इलेक्ट्रीकल इंजिनीअरची पदवी किंवा पदविका पूर्ण केलेल्या व वीज क्षेत्रात अनुक्रमे १ व ३ वर्षाचा अनुभव असलेल्या इंजिनीअरना महावितरण फिडर फ्रॅन्चायझी मॅनेजर केले जाणार आहे. यासाठी ४२ टक्क्यांपेक्षा जास्त वितरण व वाणिज्यिक हानी असलेल्या फिडरची निवड केली आहे. लातूरपरिमंडळातून ११ के. व्ही. चे १४ गावठाण फिडर निवडण्यात आले असून त्यात निलंगा विभागात अशोकनगर, शिरसी हंगरगा व सिंदखेड, उस्मानाबाद विभागात ईटकूर, रायगव्हाण व पारगाव, तुळजापूर विभागातील होर्टी, येडोळा, शहापूर, बीड विभागात बार्शी नाका व कंकाळेश्वर तर अंबाजोगाई विभागातील नागापूर, दौनापूर व तळेगाव या फिडरचा समावेश आहे. यासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सुरूवातीला एक वर्षाकरिता काम दिले जाणार आहे. कामाच्या मुल्यमापनानुसार हा कालावधी दोन ते पाच वर्षांपर्यंत वाढवता येतो. याव्यतिरिक्त बेरोजगार अभियंत्यांना देण्यात येणारी कामे लॉटरी पद्धतीने वितरीत करण्यात येणार असून त्यात कुठलीही स्पर्धा राहणार नाही. कामासाठीचा मोबदला कंपनीच्या प्रचलित दरानुसार देण्यात येईल. मेळाव्यामध्ये कामाच्या स्वरुपांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेश जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जळगाव घरकुल घोटाळ्यातील मुख्य संशयित सुरेशदादा जैन यांचा नियमित जामीन अर्ज गुरुवारी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे यांनी फेटाळून लावला.

सुरेश जैन यांना घरकूल घोटाळ्याप्रकरणी ११मार्च २०१२ रोजी अटक झाली होती. यानंतर सुरेश जैन यांनी जामीन मंजूर व्हावा यासाठी सहा वेळेस अर्ज केला आहे, मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. वर्षभर कुठल्याही कोर्टात जामिनासाठी या संशयितांनी अर्ज करू नये, अशी ताकीद सुप्रीम कोर्टाने दिली होती तरीही जैन यांनी औरंगाबाद खंडपीठात जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता. सुरेश जैन राजकारणातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्याकडून साक्षीदार किंवा पुराव्यांमध्ये फेरफार करण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारचे विशेष वकील प्रवीण चव्हाण यांनी केला. आजपर्यंत जळगाव कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत १५ वेळा जैन यांचा जमीन फेटाळण्यात आला आहे, असे चव्हाण यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. जैन यांची बाजू जेष्ठ वकील राजा ठाकरे यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रायपोर्टचा मार्ग मोकळा

0
0

सुरेश कुलकर्णी, जालना

मराठवाड्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्यर जालन्यातील ड्रायपोर्टच्या उभारणीतील महत्त्वाची अडथळे दूर करण्यात आली आहेत. जमिनीच्या संपादनात मावेजाची रक्कम देतांना अतिक्रमणे नियमित करून देण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. त्यासोबतच जेएनपीटीला जमिनीचे त्वरीत हस्तांतरण करावे अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या संदर्भातील काम वेगाने सुरू करण्यासंदर्भात जेएनपीटीच्या संचालक मंडळाची शुक्रवारी (३१ जुलै) बैठक होणार आहे.

यासंदर्भात मुंबई येथे बुधवारी महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये दरेगाव (ता. जालना) आणि जवसगांव (ता. बदनापूर) येथील या सरकारी गायरान जमीनीवर थोडी अतिक्रमणे आहेत. त्यांना नियमित करण्यात आले आहे. या सर्वांचा विचार करून योग्य तो पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले आहे.

जालना येथील ड्रायपोर्टच्या उभारणी संदर्भात मुंबई येथे शुक्रवार (३१ रोजी) संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती जेएनपीटीचे संचालक उद्योगपती राम भोगले यांनी 'मटा'शी बोलताना दिली. प्रथम जालन्यात जमिनीचा ताबा घेणे, त्यानंतर संपूर्ण जमिनीच्या कंपाऊंड वॉल उभारण्याचे काम सुरू करणे हा पहिला टप्पा असणार आहे. प्रारंभापासूनच प्रत्येक निर्णय झपाटय़ाने घेतला जातो आहे. त्यामुळे विक्रमी वेळात हा प्रकल्प पूर्ण होईल असे वाटते.

नेमका काय होणार फायदा?

सध्या तरी मराठवाडा, विदर्भ या संपूर्ण भागातील परदेशातून आयात आणि निर्यात उद्योग व्यवसाय जो चालतो तो रोडने ट्रकच्या माध्यमातून चालतो. जेएनपीटी बंदरात पंधरा पंधरा दिवस ट्रक उभे असतात आणि जहाजातून मालाची वाहतूक कोंडी होत असते हे चित्र बदलायचे असेल तर समुद्रापासून दूर अंतरावर असलेल्या भागातून थेट रेल्वेच्या मालवाहतूकीतून जेएनपीटीमध्ये समन्वय साधून मालवाहतूकीचा पर्याय म्हणजे ड्रायपोर्ट. रोड वाहतूक व्यवस्था अत्यंत महागात पडते. रस्त्यावर वाहनांची संख्या कमी होईल. डिझेल इंधनाची बचत, रेल्वे मालवाहतूक तुलनेत अत्यंत स्वस्त आणि रेल्वेच्या फायद्याची आहे. सर्व बाजूंनी फायदेशीर प्रकल्प असून वेगवान आणि अत्यंत किफायतशीर दरात वाहतूक व्यवस्था. थेट परदेशी आयात आणि निर्यात व्यापाराची संधी उपलब्ध होणार आहे.

प्रकल्पाबाबत उत्सुकता

पोर्ट म्हटल्यावर समुद्र आणि जहाजातून मालाची वाहतूक चालते जालना समुद्र नसताना येथे हा पोर्ट कसा काय काम करणार याबाबात सर्वांना उत्सुकता आहे. मुंबईत असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विस्तारीत जालना येथील हे ड्रायपोर्ट म्हणजे जमिनीवरील कोरडे बंदर असेल. जालना ते जेएनपीटी मुंबई अशी थेट रेल्वेच्या मालवाहतूकीतून कंटेनरची वाहतूक व्यवस्था असेल. कस्टम क्लिअर तसेच संबंधित सर्व प्रकारच्या सुविधा ज्या मुंबईतील पोर्टमध्ये आहेत त्या जालना येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या नियोजित जमिनीच्या मध्यभागात हैदराबाद ते मनमाड हा रेल्वे मार्ग आहे. त्यामुळे ड्रायपोर्टसाठी आवश्यक रेल्वे व मोकळ्या जागेचे गायरान जमीन हा स्पॉट जुळून आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसाच्या हुलकावणीने चिंता

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच हजेरी लावून शेतकऱ्यांना आशा दाखविणारा पाऊस दोन महिन्यापासून गायब झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी धास्तावला आहे. यंदाच्या खरीप हंगाम निम्मा झाला तरी अद्याप काही ठिकाणी पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. तर मृगावर पेरणी झालेली पिके जळू लागल्याने तसेच करपू लागल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट आहे. जुलै महिना संपण्याच्या वाटेवर असतानाही जिल्ह्यात सर्वदूर अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या १४९ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

यंदा रोहिणी व मृग नक्षत्रात पावसाने थोडीफार हजेरी लावली. या परिस्थितीतच शेतकऱ्यांनी भविष्यावर हवाला ठेवून खरीपाची पेरणी केली. त्यानंतर आर्द्रा व पुनर्वसू हे नक्षत्र कोरडे गेल्याने केलेली पेरणी आता धोक्यात सापडली आहे. पावसाअभावी उगवून आलेली पिके पिवळी पडू लागली आहेत. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पिकांनी माना टाकल्या आहेत. पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे ग्रामीणसह शहरी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उग्र स्वरूप धारण करू लागला आहे. जिल्ह्यात सध्या १४९ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वरूण राजाच्या अवकृपेने यंदा खरीपा पाठोपाठ रब्बीबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. परतीच्या पावसावरच रब्बीचे भवितव्य अवलंबून आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ९५.८६ मिली मीटर इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पावसाची सरासरी ७६७.५ मिली मीटर इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस लोहारा तालुक्यात १३३.०१ मिली मीटर इतका झाला आहे. तर सर्वात कमी पाऊस उस्मानाबाद तालुक्यात ७०.२ मिली मीटर इतका झाला आहे. गतवर्षी २८ पूर्वेअखेर जिल्ह्यात सरासरी १४६.११ मिली मीटर इतका पाऊस झाला होता. जिल्ह्यातील आठ पैकी एकाही तालुक्यात अद्यापही सरासरीच्या २५ टक्के इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता खरीपाची आशा सोडून दिली आहे.

यंदाही दुष्काळाचे सावट

निसर्गाचा लहरीपणा, पीक हाती लागेल याची नसलेली शाश्वती यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य नाहिसे झाले आहे. दुष्काळाने होरपळत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यावर यंदाही अजूनपावेतो वरूणराजाची म्हणावी तशी कृपा झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात केवळ ९८ खासगी डॉक्टर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण भागातील हॉस्पिटल्सची नर्सिंग कायद्यानुसार नोंदणी करणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांपासून याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. जिल्हाभरात शेकडो डॉक्टरांची रुग्णालये असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे मात्र केवळ ९८ डॉक्टरांचीच नोंदणी आहे. जिल्हाभरातील ग्रामीण भागातील डॉक्टरांनी लवकरात लवकर नोंदणी करावी अन्यथा हॉस्पिटल सील करण्यात येईल, असा इशारा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिला आहे.

नर्सिंग कायद्यानुसार कुठेही खासगी वैद्यकीय सेवा पुरवायची असेल, तर नोंदणी आवश्यक असते. बाह्य रुग्ण विभाग असेल तरीही नोंदणी बंधनकारक आहे. जिल्ह्यात आजवर ९८ जणांचीच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोंदणी झाली. नोंदणी केल्यानंतर संबंधित डॉक्टर आणि रुग्णालयांकडून २३ प्रकारांच्या विकारांची माहिती झेडपी आरोग्य विभागात देणे आवश्यक आहे. कायदा असला तरी त्याचा वचक नसल्याने ग्रामीण भागातून नोंदणीसाठी कायम टाळाटाळ होत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. आरोग्य विभागाने गेल्या महिन्यात चाचपणी मोहीम सुरू केली. त्यात हे उघड झाल्यानंतर पुढे कडक कारवाईचा इशारा दिला आहे. ही नोंदणी अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी रुग्णालयांसाठी आवश्यक आहे. लवकरात लवकर नोंदणी केली नाही तर सील ठोकण्याचा इशाराही दिला आहे.

ग्रामीण भागातील रुग्णालयांची जिल्हा परिषदेकडे तर शहरी भागाची जिल्हा शल्यचिकित्सकांकडे नोंदणी होणे आवश्यक आहे. नियमानुसार नोंदणी न केल्यास रुग्णालय सील करण्याची कारवाई सुरू केली जाईल.

- डॉ. विवेक खतगावकर, प्रभारी अतिरिक्त डीएचओ, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुभंगलेले ओठ-टाळूच्या पाच हजार मोफत शस्त्रक्रिया

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मागच्या पाच ते सहा वर्षांपासून दुभंगलेले ओठ व टाळूच्या पाच हजारपेक्षा जास्त मोफत शस्त्रक्रिया केल्याचा दावा दहिफळे हॉस्पिटलचे डॉ. विजय दहिफळे यांनी केला आहे. 'ऑपरेशन स्माइल' ही आंतरराष्ट्रीय बाल धर्मादाय संस्था व 'जॉन्सन् अँड जॉन्सन्' कंपनीच्या वतीने वर्षभर हा उपक्रम राबविला जात असून, शुक्रवारी व शनिवारी (३१ जुलै, एक ऑगस्ट) आयोजित शिबिरामध्ये १० ते १२ शस्त्रक्रिया होणार असल्याचेही त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

गरोदर अवस्थेतील कुपोषण, फॉलिक अॅसिडची कमतरता व इतर काही कारणामुळे ६०० मुलांमागे एखाद्या बालकामध्ये जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळूचा दोष असू शकतो. अशा बालकांसाठी शस्त्रक्रिया हा उत्तम मार्ग आहे. सहा महिन्यांपुढील बालकांवर लवकरात लवकर शस्त्रक्रिया केल्यास त्याचे खूप चांगले परिणाम दिसून येतात.

बालकांच्या शरीरामध्ये लवचिकता असल्यामुळे शस्त्रक्रियेचे उत्तम परिणाम दिसून येतात. सर्वसाधारणपणे अशा बालकांना दोन ते तीन छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया लागतात. अशा दोन ते तीन शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये एक ते दीड लाखांचा खर्च येतो.

एवढा खर्च गोरगरीब नागरिकांना शक्य नसल्याने हा उपक्रम घेण्यात येत आहे. अशा शस्त्रक्रिया केवळ शिबिरात करण्यात येत नाहीत, तर वर्षभर सुरुच असतात. या उपक्रमाअंतर्गत करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी कुठलेही शुल्क घेण्यात येत नाही. या उपक्रमाअंतर्गत महिन्याला किमान ३० ते ३५ शस्त्रक्रिया केल्या जातात, असेही त्यांनी डॉ. दहिफळे यांनी सांगितले.

चेहऱ्यावर आले हास्य

या वेळी अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त विराज पौनिकर यांनी, गोरगरिबांसाठी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे कौतुक केले, तर उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणता आल्याचे समाधान 'ऑपरेशन स्माइल'चे उपाध्यक्ष अजित वर्मा यांनी व्यक्त केले. या प्रसंगी दुभंगलेले ओठ असलेल्या बालिकेस दत्तक घेतलेल्या श्री. पवार यांनी आपले अनुभव सांगितले. पत्रकार परिषदेला कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुशोमन दासगुप्ता, प्लँट मॅनेजर सुदीप पांडे, क्वालिटीट हेड जॉन लिमी, एचआर हेड इंद्रजित सेनगुप्ता, डॉ. विनोद गोपाल आदी उपस्थित होते.

बालकांना फेकून देण्याचा प्रकार

दुभंगलेले ओठ किंवा टाळू असलेल्या बालकांना फेकून देण्याचा, तसेच जमिनीत गाडून टाकण्याचा प्रकारही नगर जिल्ह्यात व इतर ठिकाणी झाले आहेत. असे बालक जन्मल्यानंतर अनेक पालकांकडून त्याची वाच्यता केली जात नाही. तसेच अशा मुलांना समोर आणले जात नाही. अगदी शाळेतही पाठवले जात नाही. त्यामुळे अशा बालकांच्या विकासावर विपरित परिणाम होतो, असेही डॉ. दहिफळे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी हॉस्पिटलवर मुकुंदवाडीत दगडफेक

0
0

औरंगाबाद : डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार न केल्याने आजीचे निधन झाल्याचा आरोप करत दोन तरुणांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलवर दगडफेक केली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. चिकलठाणा येथील कृष्णा प्रकाश बनसोडे यांची आजी तीन दिवसांपूर्वी पायऱ्यांवरुन पडून मांडीचे हाड मोडले होते. त्यांना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली, त्यानंतर ह्दयविकाराचा झटका आला. त्यांना अन्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, उपाचारादरम्यान बनसोडेच्या आजीचे बुधवारी निधन झाले.

दरम्यान, कृष्णा बनसोडे व एका साथीदार शुक्रवारी सायंकाळी दारुच्या नशेत सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी डॉक्टर कुठे आहेत, असे म्हणत हॉस्पिटलमधील खुर्ची उचलून आदळापट करीत गोंधळ घातला, काचा फोडल्या. ही माहिती समजताच मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले. सहायक पोलिस आयुक्त सुखदेव चौगूले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोघाची तरुणाची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत हॉस्पिटलकडून फिर्याद देण्यास आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे महिला कर्मचाऱ्याचा अधिकाऱ्याकडून छळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशनच्या बुकिंग काउंटवर महिला कर्मचाऱ्यांची नाइट शिफ्टसाठी ड्युटी लावली जात नाही. तरीही वरिष्ठ अधिकारी महिलांना नाईट ड्यूटी देऊन मानसिक त्रास देत असल्याची तक्रार महिला कर्मचाऱ्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

महिला कर्मचारी सी. के. अर्पणा यांची काही महिन्यांपूर्वी परभणीहून औरंगाबाद येथे बदली झाली आहे. त्यांना बुकिंग काउंटरवर नेमण्यात आले आहे. या महिलेस एक वर्षाचा मुलगा आहे, घरात अडचण असतानाही, वरिष्ठ अधिकारी धनजंय सिंह नाइट ड्यूटी देत आहेक. या मानसिक छळामुळे सी. के. अर्पणा यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ही तक्रार तक्रार संबंधितांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, सुपरवायझर धनंजय सिंह यांनी सी. के. अपर्णा यांचा छळ करीत नसल्याचा दावा 'मटा' बोलताना केला. 'या महिलेला कर्तव्य न बजाविल्याने १७ जुलै रोजी निलंबीत करण्यात आले आहे. बुकिंग काऊंटर इतर विभागातही महिलांना नाईट ड्यूटी करावी लागते. मी जाणीवपूर्वक सी. के. अर्पणा व इतर महिलांचा मानसिक छळ केलेला नाही. त्याबद्दलचा जबाब पोलिसांना दिला आहे. अपर्णा यांनी कारवाईनंतर तक्रार दिली आहे,' असे धनंजय सिंह यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेरूळ लेणीचे विद्रुपीकरण अयोग्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठी सिनेअभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे यांनी वेरूळ लेण्यातील विद्रुपीकरणाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. लेणीत ठिकठिकाणी तरुण-तरुणींनीच खरडले आहे. हे चूक असून हा समृद्ध वारसा जपला पाहिजे,' अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या.

मनसे व मनविसेतर्फे शुक्रवारी संत एकनाथ रंगमंदिरात गुणवंतांच्या गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर डॉ. विलास वांगीकर, सुभाष पाटील, बिपीन नाईक, संदीप कुलकर्णी, अॅड. गणेश वानखेडे, जयकुमार जाधव, सतनामसिंग गुलाटी यांची उपस्थिती‌ होती.

भाषण सुरू करताना त्यांनी 'टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात' हे गाणे गाऊन आधी तरुणांचा ताबा घेतला. त्यानंतर कानपिचक्या देत उपदेश केला. 'आज वेरूळ लेणी पहिल्यांदाच पाहिली, त्याचा आनंद आहे. परंतु, लेण्यांत ठिकठिकाणी ‌भिंतीवर वाटे्टल ते व वाट्टेल तसे लिहलेले पाहून वाईट वाटले. लेण्यांमधून आपल्या वैभवशाली संस्कृतीचा परिचय होतो. हा वारसा जपला पाहिजे,' असे मत त्यांनी यावेळी बोलतना व्यक्त केले.

'मनविसे आणि मनसेकडून सध्या शहरात खूप सामाजिक उपक्रम होत आहे. आरोग्य तपासणी, गुणवंतांचा सत्कार, विहीर पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा विविध‌ कामांना चालना देण्यात येत आहे, असे डॉ. विलास वांगीकर म्हणाले.

मनविसेचे राज्य उपाध्यक्ष राजेश येरूणकर आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या मनोगतांची ध्वनीचित्रफित दाखवण्यात आली. यावेळी शैक्षणिक, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या सुमारे १०० जणांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

सेल्फीसाठी गर्दी

उर्मिला कानेटकर यांना प्रश्न विचारण्यासाठी, सोबत फोटो काढून घेण्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती. कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा दोन ‌तास उशिरा सुरू झाला. उर्मिला कानेटकर यांनी फक्त तीन-चार मिनिट भाषण केले. या वेळी तरूण व महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासन ‘आरंभशूर’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महसूल प्रशासनाचा १ ऑगस्ट हा पहिला दिवस असल्याने दरवर्षी या दिवशी महसूल दिन साजरा केला जातो. पण आरंभशूर प्रशासन कोट्यवधी रुपयांच्या योजनांची आखणी करते, मात्र या योजना पुढे अपूर्ण राहतात.

औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी विविध उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रशासकीय नेतृत्त्वाची खांदेपालट झाल्यानंतर जाहीर केलेले उपक्रम अडगळीत पडले. आता दोन महिन्यांमध्ये औरंगाबादचा कारभार सांभाळून प्रशिक्षणासाठी लंडनला निघालेले वीरेंद्र सिंह यांनीही ई-ऑफिस राबवण्यासाठी जोर दिला होता. मात्र नवीन जिल्हाधिकारी ई-ऑफिस प्रणाली राबविण्यासाठी किती महत्त्व देतात, यावर तिचे यश अवलंबून आहे.

औरंगाबाद हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे पर्यटकांच्या सोईसुविधांसाठी प्रशासकीय पातळीवर अनेक निर्णय घेण्यात आले, परंतु, एकही पूर्ण झालेली नाही. वेरूळ येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी टॅब्लेट उपलब्ध करून देण्याचा उपक्रमाची घोषणा करण्यात आली. ही घोषणा अद्याप कागदावरच आहे, तर शहरातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेली बसही रंगरंगोटीअभावी आगारातून रस्त्यावर आलेलीच नाही.

तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी वेरूळ लेणी येथे पर्यटकांसाठी टॅब्लेट, अॅप या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. टॅब्लेटच्या मदतीने पर्यटकांना दृकश्राव्य स्वरुपात लेण्यांचा इतिहास सांगण्यात येणार होता. मे २०१५ मध्ये टॅब्लेट उपलब्ध करून देण्यात येणार होते. आता ऑगस्ट सुरू झाला तरी हा उपक्रम कागदावरच आहे.

पर्यटकांच्या सोयीसाठी एक कोटी ८० लाख रुपये खर्च करून औरंगाबाद ते वेरूळ आणि अजिंठा येथे भेट देण्यासाठी नवीन व्होल्व्हो बस खरेदी करण्यात आल्या. एक बस शहरातील पर्यटनस्थळे तसेच दौलताबाद, वेरुळ या ठिकाणांसाठी तर दुसरी बस अजिंठा लेणी पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी सुरू करण्यात येणार होती. या बसही सध्या आगारामध्येच आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने साहसी पर्यटनाचा एक भाग म्हणून म्हैसमाळ येथे तंबू उभारणीचे काम अंतिम टप्प्यात होते. ते काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. केवळ प्रशासकीय विलंबामुळे ही कामे रखडली आहेत. टॅब, पर्यटन बस हे उपक्रम अत्यंत कमी वेळेत सुरू होणे शक्य होते.

सर्वसामान्यांची कामेही संथ गतीने

महसूल दिन साजरा करून प्रशासन औपचारिकता पूर्ण करते. मात्र सर्वसामान्यांचे प्रश्न असलेले सातबारा, वारसा हक्क, अपील आदी प्रश्न प्रश्न सोडवण्याची गती मंद आहे. महसुली कामांऐवजी इतर कामांमध्येच महसूल यंत्रणा गुरफटून गेल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवकावर चाकूहल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकीवरुन जाणाऱ्या युवकास अडवत चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना रंगीन दरवाजाजवळ बुधवारी (२९ जुलै) रात्री दहाच्या सुमारास घडली. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे समजते. फहाद युसूफ बसरावी (वय १८,रा. समतानगर) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. मित्राला भेटण्यासाठी दुचाकीने रंगीन दरवाजाजवळून तो जात होता. त्यावेळी मुज्जमील संग्राम इद्रीस संग्राम ( रा. बायजीपूरा) व त्यांच्या तीन मित्रांनी त्याला अडविले. मारहाण करत फहादच्या छातीवर चाकूने वार करण्यात आला. फहादने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बेगमपुरा पोलिसांनी दिली.

युवकाला मारहाण

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी युवकाला लोखंडी रॉडने मारहाण केली. सिंकदर कॉलनी येथे बुधवारी (२९ जुलै) ही घटना घडली. जुम्मे खाँ रहेमान पठाण (वय -२६, रा. सिकंदरकॉलनी, मिसारवाडी) असे जखमीचे नाव आहे. सिकंदर कॉलनी परिसरात राहणारे शफिक व त्याचा भाऊ समीर (पूर्ण नाव माहित नाही) यांनी घरी येऊन दारूसाठी पैशांची मागणी केली. त्यास नकार देताच त्या दोघांनी भांडण करून रॉडने मारहाण केली, अशी तक्रार जुम्मेखाँ यांनी दिली. त्यावरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरांनी चोरले ९४ हजार रुपये

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांनी दुकानातील ९४ हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रामकरण भागुराम कपडिया यांचे सिटी चौक परिसरात कपड्याचे दुकान आहे. या दुकानात मार्च २०१५पासून सीयाराम मिसाराम मेघवाल, रामनिवास लोधीराम लुहार आणि पप्पुराम मीसाराम मेघवाल (सर्व रा. राजस्थान) हे तिघे काम करत होते. या तिघांनी दुकानातील ९४ हजार रुपयांचे चोरल्याची तक्रार कापडिया यांनी दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सिटी चौक पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेख सादिक टोळीचे दोन जिल्ह्यांत गुन्हे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या शेख सादिक शेख कचरू याच्यासह चौघांनी औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यात चंदन चोरीचे अनेक गुन्हे केल्याचे समोर येत आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक डॉ. कांचन चाटे यांनी दिली.

मालुंजा ते तांदूळवाडी रस्त्यावरील खोपेश्वर फाट्याजवळ टाटा इंडिगो कारसह दबा धरून बसलेल्या चौघांना सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे, पोलिस उपनिरीक्षक दीपक सरोदे यांच्या पथकाने सोमवारी (२७ जुलै) अटक केली आहे. शेख सादिक शेख कचरू (वय ३१, रा. अमिना मशिदजवळ नायगाव, फुलंब्री), मुनीर खान रशीद खान (वय ३२, रा. माहुली), तेजराव श्रीराम राठोड (वय २८, रा. आडगाव सरक), विष्णू गंगाराम राठोड (वय ३१, रा. होनाजीनगर, जटवाडा रोड, हर्सूल) अशी त्यांची नावे आहेत. अंधाराचा फायदा घेऊन भगवान गायकवाड (रा. जयसिंगपूर, ता. गंगापूर) व माधव जाधव (रा. पेंढापूर, ता. गंगापूर) पसार झाले. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. या टोळीने गेल्या काही महिन्यात चिकलठाणा परिसरातील चंदनाचे दोन झाडे, कोपरगाव परिसरात चंदन चोरीचे आठ गुन्हे केल्याचे समोर येत असल्याची माहिती डॉ. चाटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाइनमनला मारहाण; पिता पुत्राला दंड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कमी दाबाने पाणी सोडण्याचा राग मनात धरून महापालिकेचा लाइनमन व त्याच्या साथीदाराला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या पिता-पुत्र आरोपींना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी जे. व्ही. पेखले पुरकर यांनी कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व साडेअकरा हजार रुपये दंड ठोठावला. दंडापैकी दहा हजार रुपये फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून द्यावेत, असे आदेशात म्हटले आहे.

या प्रकरणी अनिल बाबुराव सुरडकर (४१, मनपा, रा. किलेअर्क) यांनी उस्मानपुरा पोलिस स्टेशनमध्ये आरोपी हिंम्मतराव साळुबा दाभाडे (६५), संजय हिंम्मतराव दाभाडे (३७, दोघे रा. फुलेनगर, दोघे पिता-पुत्र) यांच्याविरूद्ध फिर्याद दिली होती. त्यानुसार फिर्यादी हा महापालिकेत पाणी पुरवठा विभागात कार्यरत असून व त्यांचे साथीदार दीपक गणपतराव ताराळकर (लाइनमन) हे फुलेनगर, एकनाथनगर भागात पाणी सोडण्याचे काम करतात. सात ऑक्टोबर २०१२ रोजी सकाळी फिर्यादी व दीपक यांनी फुलेनगर भागात पाणी सोडले व तेथून ते पुढे पाणी सोडण्यासाठी मैत्री बौद्ध विहार व्हॉल्व्हजवळ गेले असता दोघे आरोपी तेथे आले व 'आमच्या गल्लीत कमी दाबाने पाणी का सोडतो', असा जाब विचारत हिंम्मतराव दाभाडे याने फिर्यादी व लाईनमन दीपक यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याचवेळी दुसरा आरोपी संजय दाभाडे याने पाणी सोडण्याची चावी घेऊन फिर्यादीच्या डाव्या पायावर मारून जखमी केले. या भागातील नागरिक अविनाश खरातने मध्यस्थी करून हे भांडण सोडविले. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण झाला म्हणून फिर्यादीने उस्मानपुरा पोलिस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी जे. व्ही. पेखले पूरकर यांच्यासमोर झाली. सुनावणीच्या वेळी सहाय्यक सरकारी वकील वाय. पी. सरोदे यांनी पाच साक्षीदार तपासून आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध केला. सुनावणीअंती कोर्टाने आरोपींना दोषी ठरविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१० मिनिटे द्या; हृदयरोग दूर ठेवा!

0
0

डॉ. विकास रत्नपारखे यांचे संशोधन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब असूनही किमान १० ते २० मिनिटांच्या रोजच्या व्यायामामुळे हृदयरोगाला दूर ठेवता येऊ शकते, हे हायपरटेन्शनने ग्रस्त ३०१ लोकांच्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे. तीव्र व्यायामासह मध्यम स्वरूपाच्या व्यायामाचेही चांगले परिणाम दिसून आले आहेत. डॉ. हेडगेवार रुग्णालयातील ज्येष्ठ चिकित्सक डॉ. विकास रत्नपारखे यांनी हा अभ्यास केला असून, त्यांचा 'रिसर्च पेपर' ८ जुलैच्या 'जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ दि फिजिशियन्स ऑफ इंडिया'च्या (जापी) पाक्षिकात प्रसिद्ध झाला आहे.

या अभ्यासासाठी उच्च रक्तदाब असणाऱ्या ३० ते ६० वयोगटातील ३०१ व्यक्तींना निवडून त्यांच्याकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. त्यामध्ये फावल्या वेळेत तुम्ही कोणती शारीरिक कृती, व्यायाम करता, किती वेळ, आठवड्याचे किती दिवस करता, सौम्य की तीव्र आदी प्रश्न भरून घेण्यात आले. 'फिशर टेस्ट'नुसार सर्व ३०१ व्यक्तींची चाचणी घेऊन निष्कर्ष काढले. यामध्ये बैठी जीवनशैली (पहिला गट), मध्यम व्यायाम (दुसरा गट) व तीव्र व्यायाम करणारे (तिसरा गट) असे तीन गट केले.

गटनिहाय निष्कर्ष

पहिला गटः १४९ व्यक्तींनी कामाव्यतिरिक्त कुठलाही व्यायाम किंवा शारीरिक कृती करत नसल्याचे व बैठी जीवनशैली असल्याचे नोंदविले आणि यातील ७६ टक्के व्यक्तींमध्ये 'डायस्टोलिक डिस्फ्कंशन' म्हणजेच हृदयरोगाची प्राथमिक स्थिती आढळून आली व केवळ २४ टक्के व्यक्ती नॉर्मल आढळल्या.

दुसरा गटः दहा मिनिटे मध्य स्वरुपाचा व्यायाम किंवा शारीरिक कृती करणाऱ्या १०४ व्यक्तींमध्ये ६६ टक्के व्यक्ती नॉर्मल व ३४ टक्के व्यक्तींमध्ये हृदयरोगाची प्राथमिक स्थिती आढळली.

तिसरा गटः दहा मिनिटे तीव्र स्वरुपाचा व्यायाम करणाऱ्यांमध्ये ६० टक्के व्यक्ती नॉर्मल व ४० टक्के व्यक्तींमध्ये हृदयरोगाची प्राथमिक स्थिती आढळली.

२० मिनिटे ६० टक्के 'हार्ट रेट' हवा

व्यायामाविषयी डॉ. रत्नपारखे म्हणाले, २२० - तुमचे वय = संख्येच्या ६० टक्के हार्ट रेट हा सलग २० मिनिटे राहील, असा व्यायाम योग्य परिणामांसाठी आवश्यक आहे; म्हणजेच उदाहरणार्थ २२० - ४० (वय) = १८० च्या ६० टक्के म्हणजेच १०८ इतका हार्ट रेट हा सलग २० मिनिटे राहील, असा व्यायाम करावा. दहा मिनिटांत एक किलोमीटर चालण्याने सहजपणे अपेक्षित हार्ट रेट साधता येतो. अर्थात, सलग २० मिनिटे व्यायाम करताना देहभान विसरणे अपेक्षित आहे. म्हणजेच स्वतःचे दुःख, नकारात्मकता, प्रश्न-समस्या विसरून आवडत्या व्यायाम-खेळ-शारीरिक कृतीत तल्लीन होणे जास्त परिणामकारक आहे. उंची (सेंटिमिटरमध्ये) उणे १०० इतके वजन असावे आणि चड्डी ९५ सेंटिमीटरपेक्षा जास्त लागणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images