Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘कृत्रिम’ पावसाचाही चकवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्याला कृत्रिम पावसानेही चकवा देणे सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून विमान उड्डाण घेतात. मात्र, सिडिंग होणाऱ्या गावातही समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळाचे ढग गडद झालेत.

मंगळवारी प्रायोगिक तत्त्वावर विमानाने उड्डाण घेतले. २० फ्लेअर्स सोडण्यात आले. मात्र, ज्या गावात प्रयोग झाला, त्या ठिकाणी केवळ रिमझिम पावसाची नोंद झाली. बुधवारी शिरुर कासार, पाटोदा तालुक्यातील काही गावांमध्ये फ्लेअर्स सोडले. मात्र तेथेही कुठे ७ तर कुठे ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी विमानाने दोन वेळेस उड्डाण केले. पहिल्या टप्प्यात लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी व नगर जिल्ह्यातील राहुरीत २४ फ्लेअर्स सोडले. दुसऱ्या टप्प्यात विमानाने औरंगाबाद, सांगली व सोलापूरसाठी उड्डाण घेतले यामध्ये २० प्लेअर्सचा उपयोग केला. यात बाभळगाव, कानसूर, गुंज, रामेटाकळी, लोणी (ता. पाथरी, जिल्हा परभणी) या ठिकाणी पाऊस झाल्याची नोंद झाली. मात्र, इतर ठिकाणी यश मिळाले नाही.

इथले ढग गायब

चाटेपिंगपळगाव, रेणापूर (ता. पाथरी, जि. परभणी), पोहंडूळ, भारखाड वाघाळा, मुदगल, लिंबा, डाकू पिंप्री, रामपुरी, वझूर (ता. सोनपेठ, जि. परभणी), गांजूर, रुई, रामेश्वर, सारसा (ता. रेणापूर, जि. लातूर), मंढा, पाडोळी, बेंबळी, पलारी, मासुर्डी, सिंदळवाडी, शिंदाळा, बेलकुंड, एकंबी तांडा (ता. औसा, जि. लातूर), पोहनेर, जुनोनी पिंप्री, चिलवडी, सुर्डी (जि. उस्मानाबाद), पानकनेरगाव, वडगाव सिद्धेश्वर (ता. जि. उस्मानाबाद), मेडसिंगा, सांजा, शेकापूर, देवळाली, खंडाळा, अमसूर्डा, राघुचीवाडी (ता. जि. उस्मानाबाद) या ठिकाणी गुरुवारी क्लाउड सिडिंगचा प्रयोग झाला. मात्र, विरळ ढग व कमी आर्द्रतेमुळे प्रयोग फसला. दरम्यान, गुरुवारी सांगली व सोलापूरसाठी विमानाने उड्डाण घेतले. या ठिकाणी क्लाउड सिडिंग केली. मात्र, विभागीय आयुक्त कार्यालयाकडे या प्रयोगाची कोणतीही आकडेवारी मिळाली नाही.

रडार आज होणार सुरू

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर शुक्रवारी (७ ऑगस्ट) दुपारी डॉप्लर रडार बसवण्यात आले. डॉप्लरसाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इन्स्टॉलेशनचे काम सुरू असून उद्या ते पूर्ण होईल आणि रडारचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी शुक्रवारीही विमानाने बीड, उस्मानाबाद, तुळजापूरसह लातूर भागात फेरी मारली. उस्मानाबाद, बीड, तुळजापूर येथे फ्लेअर्सचा मारा केला. बीड, आणि उस्मानाबाद येथे पाऊस पडला. तुळजापूरमध्ये चांगला पाऊस पडल्याची माहिती आहे. मात्र, उर्वरित मराठवाड्यात उपयुक्त ढग सापडत नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातील भीमाशंकर, कोल्हापूर या भागातही आठ दिवसांपासून पाणी नाही. कोकणातही परिस्थिती वाईट आहे. उपयुक्त ढग मिळत नसल्याने, काय करावे असा प्रश्न आमच्या समोरही आहे.

- सुहास दिवसे, संचालक, आपत्ती व्यवस्थापन विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रॉकस्टार गिटारप्रेमींची नवलाई कायम

$
0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

शहरातील तरुणांवर रॉकबँडचा प्रभाव वाढल्याने गिटार खरेदी लक्षणीय वाढली आहे. ऑनलाइन व प्रत्यक्ष खरेदी यातून दरमहा किमान ४० गिटारची विक्री सुरू आहे. भारतीय व पाश्चात्य संगीत क्लासमुळे वाद्यांची बाजारपेठ तेजीत असली तरी दर्जानुसार फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत.

पाश्चात्य वाद्यांकडे तरुणांचा कल वाढल्यानंतर पारंपरिक वाद्यांची मागणी घटली होती. लोकप्रिय चित्रपट व रिअॅलिटी शो यांचा संगीत क्षेत्रावर मोठा प्रभाव पडतो. या प्रभावातूनच दोन्ही वाद्यांची मागणी अचानक वाढली आहे. तबला, ढोलकी, हार्मोनिअम या पारंपरिक वाद्यांची मागणी स्थिर आहे. रॉकबँडच्या चाहत्यांमध्ये गिटार, कॅसिओ, ड्रम, माउथऑर्गन वाद्ये लोकप्रिय आहेत. औरंगाबाद शहरात वेस्टर्न म्युझिकचे दहा वर्ग, तर भारतीय संगीताचे किमान शंभर वर्ग आहेत. सध्या शास्त्रीय वाद्य व गायन शिकण्याचा कल वाढल्यामुळे तबला-पेटीची विक्री चांगली होते,' असे 'स्वरशृंगार'चे श्रीनिवास भोकरे यांनी सांगितले.

चार पिढ्यांपासून भोकरे पारंपरिक वाद्य विक्री करतात. सध्या त्यांनी पारंपरिक वाद्यांसोबत गिटार विक्री सुरू केली आहे. गिटारला खूप मागणी असून, प्रत्येक विद्यार्थ्याला चार-दोन गाणी गिटारवर वाजवण्याची इच्छा असते असे ते म्हणाले. शहरात साडेतीन ते सहा हजार रुपयांदरम्यान गिटार उपलब्ध आहे. काही गिटारप्रेमी ऑनलाइन मागणी करतात.

ऑनलाइन सुविधेत गिटारसह की-बोर्ड, बॅगस्टँड, कव्हर, बेंच, अॅडॉप्टर या साहित्याचीही मागणी आहे. दक्षिण आफ्रिकेतील 'झांबे' वाद्य शहरात विक्रीसाठी उपलब्ध आहे, पण वेस्टर्न वाद्यात गिटारची सर्वाधिक विक्री आहे. दर्जेदार प्लायवूड व रोजवूडची गिटार उत्कृष्ट असते, मात्र दुय्यम लाकडाची गिटार कमी किमतीत देऊन फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत.

'रॉकस्टार' चित्रपट गाजल्यानंतर गिटार वाजवण्याची क्रेझ निर्माण झाली. खासगी कार्यक्रम आणि कॉलेजात गिटारवर गाणी वाजवण्याची फॅशन वाढली. या ट्रेंडमधूनच गिटारची विक्री वाढली आहे. यापूर्वी सरगम (डफली), हिरो (बासरी), कर्मा (बुलबुल तरंग) या चित्रपटांनी वाद्यांना ग्लॅमर दिले. 'रॉकस्टार'ने गिटारप्रेमींची संख्या वाढवली. एक तरी वाद्य चांगले वाजवता आले पाहिजे असा आग्रह तरुण धरताना दिसतात. असे विक्रेत्यांनी सांगितले.

पाश्चात्य वाद्यात गिटारला सर्वाधिक मागणी आहे. ग्राहकांची मागणी कायम असल्याने वारंवार मागणी नोंदवावी लागले. तरुणांमध्ये गिटार अधिक लोकप्रिय आहे.

- श्रीनिवास भोकरे, विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीएमआयसी’त जूनमध्ये पाणी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) शेंद्रा-बिडकीन मल्टीनोडल लॉजिस्टिक पार्कसाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येत आहे. १६७ कोटी रुपयांच्या या जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, जायकवाडी ते शेंद्रा अशी ५५ किलोमीटरची ही जलवाहिनी असेल. जुलैअखेर या जलवाहिनीचा १२ किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे.

डीएमआयसी प्रकल्पाच्या उभारणीत पाण्याच्या नियोजनाचा मुद्दा सुरवातीपासून ध्यानात घेण्यात आला. 'डीएमआयसीडीसी'ने शेंद्रा व बिडकीन येथील ४००० हेक्टर जमीन संपादित केली. जागा संपादित झाल्यानंतर या परिसराच्या विकासासंदर्भात नियोजन सुरू झाले. या भागासाठी पाण्याचे स्वतंत्र नियोजन करणे आवश्यक होते. जायकवाडी ते शेंद्रा (फक्त डीएमआयसीसाठी संपादित जागेसाठी) स्वतंत्र जलवाहिनीचा प्रस्ताव प्रकल्पात समाविष्ट करण्यात आला होता. गेल्या वर्षी या जलवाहिनीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. एका स्थानिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला या कामाचे कंत्राट मिळाले. १६७ कोटींच्या जलवाहिनी योजनेत ५५ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. जायकवाडी- घोडेगाव-कचनेरमार्गे शेंद्रा असा जलवाहिनीचा मार्ग असेल. घोडेगाव येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. हे काम जायकवाडीच्या दिशेने सुरू झाले असून, सद्यस्थितीला १२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जून २०१६पर्यंत शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत हे काम पोचण्याचे उद्दिष्ट आहे. सध्याचा वेग पाहता नियोजित वेळेपर्यंत काम पूर्ण होणार आहे. डीएमआयसीमधील औद्योगिक, नागरी वसाहतींना या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

स्वतंत्र वीज केंद्र

डीएमआयसीसाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीलगत २२० केव्ही क्षमतेचे स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारण्याचे नियोजन प्राथमिक टप्प्यात करण्यात आले आहे. भविष्यात अधिकच्या वीजेची गरज भासण्याची शक्यता निर्माण झाली तर, उपकेंद्राची क्षमता वाढविण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांच्या सहा टप्प्यांतील निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीज उपकेंद्र उभारणीची प्रक्रिया राबविली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त राधे माँ औरंगाबादमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव/औरंगाबाद

कौंटुंबिक छळाच्या आरोपावरून चर्चेत असलेल्या वादग्रस्त सुखविंदर कौर उर्फ राधे माँ शुक्रवारी अचानक औरंगाबादेत आल्याने चर्चेला उधाण आले. नांदेड येथे दर्शनासाठी जाताना त्या पडेगाव येथील हॉटेल मिडोजमध्ये थांबल्या. दरम्यान, पोलिसांनी त्यांची हॉटेलला भेट दिली व राधे माँ औरंगाबादेत आल्याची माहिती मुंबई पोलिसांना कळविली.

एका विवाहितेने राधे माँ यांच्यावर छळाचा आरोप केला. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्या शुक्रवारी सकाळी मुंबईहून औरंगाबादेत आल्या. त्याच्यासमवेत काही भक्त होते. राधे माँ शहरात आल्याची माहिती मिळताच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी हॉटेल मिडोजमध्ये गर्दी केली, पण दिवसभर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अखेर सायंकाली त्यांचे स्वीय सहायक संजीव गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राधे माँ निःस्वार्थपणे सेवा करीत आहेत. त्यांच्यावरीस सर्व आरोप निराधार अाहेत, असा दावा गुप्ता यांनी केला.

राधे मॉँ शहरात आल्याची माहिती मिळताच हॉटेल मिडोज येथे दुपारी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, सायबर क्राइमचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल खटावकर, अर्चना पाटील यांनी पथकासह भेट दिली. ही माहिती त्यांनी मुंबई पोलिसांनाही कळविल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी हॉटेल परिसरात तळ ठोकून होते. दरम्यान, सीआयडी विभागाच्याही एका अधिकाऱ्यांनेही राधे मॉँ यांचे स्वीय सहायक गुप्ता यांच्याशी चर्चा केली.

राधे मॉँ यांच्याबरोबर पीए गुप्ता, त्यांची पत्नी व अन्य तीन ते चार भक्त आले आहे. अलिशान जग्वार कारमधून ते शुक्रवारी सकाळी आले असून, शनिवारी ते नांदेडला जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिर परिसरात कचरा टाकल्यास गुन्हा

$
0
0

खुलताबादः श्रावणात बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचे दर्शनासाठी श्रीक्षेत्र वेरूळ येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांची गर्दी होत असते. घृष्णेश्वर मंदिर परिसरात कचरा टाकल्यास गुन्हा दाखल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी दिली.

श्रावण महिन्यानिमित्त वेरूळ येथे घृष्णेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजू नंदकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच मंदिर परिसरातील अस्वच्छतेमुळे दुर्गंधीचा भाविकांना होणारा त्रास लक्षात घेता परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यक्ती विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे ठरले. यावेळी संजय वैद्य, राजेंद्र कौशिके, दीपक शुक्ल, चंद्रशेखर शेवाळे आदि उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मशानभूमी अपहारप्रकरणी नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

कसाबखेडा येथील ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या स्मशानभूमीच्या विकास कामात दोन लाख ५४ हजार रुपयांचा अपहार करणाऱ्या प्रतिवाद्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांनी नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथील ग्रामपंचायतीने स्मशानभूमी कामाला जनसुविधा कार्यक्रमांतर्गत २०१२-१३ मध्ये मान्यता देण्यात आली होती. ३ डिसेंबर २०१३ रोजी ४ लाख ९८ हजार ८७५ रुपयांच्या कामाला तांत्रिक मान्यता देण्यात आली. याप्रकरणी तक्रारीनंतर स्मशानभूमीच्या कामाची तपासणी करून चौकशी करण्यात आली. खुलताबाद पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी चौकशी अहवाल सादर केला. सरपंच रुपाली किशोर सोनवणे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी विकास मोरस्कर, कनिष्ठ अभियंता आर. एन. कीर्तने यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. ४ लाख ९८ हजार ८७५ रुपयांची तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. परंतु, चौकशी अहवालात कामाच्या मूल्यांकनानंतर या कामाची किंमत फक्त २ लाख ४४ हजार ३३७ रुपये असल्याचे आढळून आले. तर हे काम व मान्यतेत तब्बल २ लाख ५४ हजार ४४२ रुपयांची तफावत आढळून आली आहे.

सिमेंट कॉलम उभे दिसत असलेतरी प्रत्यक्षात ते मातीचे बांधकाम असल्याचे समोर आले आहे. लोकवर्गणीतून खरेदी केलेले लोखंडी अँगल स्मशानभूमीच्या कामात वापरण्यात आले. याप्रकरणी प्रशासनाने तिघांना दोषी ठरवले. पण त्यांच्याविरोधात कारवाई केली नाही. त्यामुळे सुनील औटे यांनी अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली असता खंडपीठाने महसूल सचिव, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद, पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, श्याम उगले, सरपंच रुपाली सोनवणे, कनिष्ठ अभियंता आर. एन. कीर्तने यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

विवाहीतेचा शारीरिक मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीता दीपक भिवसने (वय २८ रा. वडोदचाथा) हिचा पती दीपक लक्ष्ण भिवसने (वय २८ रा. वडोदचाथा) हा सुनीता हीस तुला मुलीच होतात मुलगा होत नाही, म्हणून वेळोवेळी शारीरीक मानसिक छळ करीत होता. या त्रासाला कंटाळून २ ऑगस्ट रोजी वांगी खुर्द शिवारातील शेतातील घरात तिने मकाच्या तटव्यामध्ये टाकले जाणारे विषारी औषध पिल्याने तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर मृत विवाहीतेचा भाऊ ज्ञानेश्वर सांडु नवगिरे यांच्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिलींद खोपडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेताना तलाठ्याला पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

कंधार तालुक्यातील एका तक्रारकर्त्याच्या भाच्याच्या नावावरील सात बाऱ्यामधील अज्ञान पालककर्ता नावाची नोंद कमी करण्यासाठी दहिकळंबा येथील तलाठी शिवकुमार वैजवाडे याने ‌तिनशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. परंतु, तक्रारदाराने हे पैसे देण्यास असर्मथता दर्शवून नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाशी संपर्क साधला आणि वैजवाडेविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीची शहानिशा करीत एसीबी पथकाने ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ही लाच स्वीकारताना तलाठी वैजवाडे यांना पकडले. याबाबत पोलिस निरीक्षक संदीप हजारे यांनी तक्रार नोंदवून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एलबीटीची थकबाकी १५ ऑगस्टपर्यंत भरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील व्यापाऱ्यांनी एलबीटीची थकबाकी आहे त्यांनी १५ ऑगस्टपर्यंत भरून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर त्र्यंबक तुपे यांनी व्यापारी महासंघाला शुक्रवारी केले. स्थानिक संस्थाकरासंदर्भात मौलान आझाद संशोधन केंद्रात महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त प्रकाश महाजन, उपायुक्त अय्युब खान यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व सदस्यांना बोलावण्यात आले होते. महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (मस‌िआ) चे पदाधिकारी यांची बैठकीला उपस्थिती होती. स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, विरोधी पक्षनेते जहांगीरखान यांच्यासह गटनेतेही उपस्थित होते. महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले, शासनाने १ ऑगस्ट २०१५ पासून स्थानिक संस्थाकर बंद केला आहे. त्यामुळे या करापोटी व्यापाऱ्यांकडे असलेली ३१ जुलै २०१५ पूर्वीची थकबाकी भरण्याच्या संदर्भात शासनाचे निर्देश आले आहेत. त्यादृष्टीने व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी भरावी. औरंगाबाद शहराची स्मार्ट सिटी अभियानासाठी निवड झाली आहे. शहराला स्मार्ट बनवण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे, असा उल्लेख त्यांनी केला. स्थानिक संस्थाकराची थकबाकी भरण्यासाठी एक महिन्याची मुदत द्या, अशी मागणी अजय शहा यांनी केली. यासंदर्भात पालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे, शासनाने प्रस्ताव मंजूर केला तर मुदतवाढ दिली जाईल असे आयुक्त महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता करवसुलीचे कर्मचाऱ्यांना ‘टार्गेट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने एका कर्मचाऱ्याला १२३२ घरांचे टार्गेट देण्याचे ठरविले आहे. आयुक्त प्रकाश महाजन यांनी स्थायी समितीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात त्याचा ठळकपणे उल्लेक करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांन अशा स्वरुपाचे टार्गेट देऊन कराची वसुली प्रथमच करण्यात येत आहे.

शहरात मालमत्ता कराची थकबाकी २०० कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. चालू वर्षाची मालमत्ता कराची मागणी ८० कोटी रुपये आहे. या २८० कोटी रुपयांपैकी २०१५-१६ या अार्थिक वर्षात १८० कोटी रुपये वसूल करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

नवीन मालमत्तांचा शोध व करआकारणीची मोहीम येत्या १५ ऑगस्टपासून सुरू केली जाणार आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या रेकॉर्डवर १ लाख ९४ हजार ६२७ मालमत्ता अाहेत. या मालमत्तांच्या कर वसुलीसाठी १५८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला १२३२ मालमत्तांचे टार्गेट देण्यात आले आहे. मालमत्ता कर वसुलीची मॅरेथॉन मोहीम राबविण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक, कंत्राटदार यांच्याविरुद्ध याचिका

$
0
0

औरंगाबाद : छावणीतील वार्ड क्रमांक पाचमध्ये पटेल चौकात अवैध रिक्षा स्टँड उभारणारे नगरसेवक शेख हनिफ शेख इब्राहीम व कंत्राटदाराविरुद्ध मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका करण्यात आली आहे.

छावणी परिषदेच्या वाॅर्ड क्रमांक ५मध्ये असलेल्या पटेल चौकात अवैध रिक्षा स्टँड उभारण्यासाठी कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी घेण्यात आली नाही. पदाचा दुरुपयोग करून नगरसेवक शेख हनिफ शेख इब्राहीम यांनी छावणी परिषदेच्या पैशाची उधळपट्टी केली म्हणून त्यांच्याविरुद्ध कॉन्टोनमेंट अॅक्ट २००६नुसार योग्य कारवाई करून नगरसेवक, कंत्राटदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका मिर्झा आजम बेग यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट औरंगाबादसाठी हवे प्राधिकरण

$
0
0

मकरंद कुलकर्णी, औरंगाबाद

ऐतिहासिक औरंगाबादचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. मात्र, हा प्रकल्प महापालिका किंवा सरकारकडे न राहता नागपूरच्या धर्तीवर स्वतंत्र औरंगाबाद विकास प्राधिकरण निर्माण झाले पाहिजे. अन्यथा स्मार्ट सिटीचा फज्जा उडेल, अशी भूमिका माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी 'मटा'कडे व्यक्त केली.

काळे म्हणाले, ''तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांनी नागपूरच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण केले होते. चंद्रशेखर हे आयएएस अधिकारी खास त्यासाठी पाठविले होते. त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलून गेला. आता स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या टप्प्यापासून औरंगाबादचा समावेश झाला तर, पाच वर्षे आपल्या १००० कोटी रुपये मिळतील. या निधीतून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, पर्यटनाला चालना मिळेल असे उपक्रम, पाण्याचे नियोजन करण्यासाठीचे प्रकल्प राबविणे अपेक्षित आहे. दुर्देवाने आपल्या महापालिकेच्या कार्यपद्धतीबद्दल फारसे चांगले मत नाही. अनेक खासगी प्रकल्पांचा उडालेला बोजवारा डोळ्यांसमोर आहे. या प्रकल्पासाठी मिळणारा निधी पालिकेकडे देऊ नये. योग्य अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करण्याची गरज आहे.''

पायाभूत सुविधा, उद्योजक, सामाजिक क्षेत्र, आरोग्य, इंजिनीअरिंग, शैक्षणिक क्षेत्रातील शहर व जिल्ह्यातील पाच-सात तज्ज्ञांचे गट निर्माण करावेत. त्यांच्याकडून त्या त्या क्षेत्रातील विकासासाठी काय अपेक्षा आहेत, याचे संकलित करावे. या माहितीच्या आधारे एक व्हिजन डॉक्युमेंट तयार केले पाहिजे. त्याआधारे अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज काळे यांनी व्यक्त केली.

सरकारने मुंबई, पुणे, औरंगाबादमधील सक्षम आयएएस अधिकाऱ्यांचा गट निर्माण करावा. मिळणारा निधी आणि लागणाऱ्या अपेक्षित निधीचा लेखाजोखा समोर ठेवूनच विकास योजना राबवाव्यात. अन्यथा स्मार्ट सिटी योजनेचा उपयोग होणार नाही.

- डॉ. कल्याण काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त राधेमाँ नांदेडमध्ये दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

वादग्रस्त अध्यात्मिक गुरू राधेमाँ यांनी शनिवारी सकाळी नांदेड गाठले. सकाळी त्यांनी गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाची चौकशी केली. अटक वॉरंट नसल्यामुळे राधेमाँला पोलिसांनी अटक करता आली नाही. मुंबई बोरीवली येथील निकी गुप्पा या महिलेने राधेमाँच्या विरोधात कौटुंबिक छळ होत असल्याचा आरोप केल्याने त्यांच्याविरूद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अटक होण्याच्या भीतीने राधेमाँ यांनी मुंबई सोडली असून गेल्या दोन दिवसांपासून त्या औरंगाबाद वास्तव्यास होत्या.

नांदेड येथील सीटीप्राईड हॉटेलमध्ये त्या उतरल्या आहेत. त्यांना भेटण्यासाठी पत्रकारांना मज्जाव केला असला तरी काही मोजकेच भक्त त्यांच्या दर्शनासाठी गेले होते. नांदेड येथे त्यांच्यासोबत भक्तांचा मोठा ताफा होता. दरम्यान, राधेमाँ यांचे स्वीय सहाय्यक संजीव गुप्ता व विशाल शर्मा यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.​

छायाचित्रकारांसोबत भक्तांची अरेरावी

शनिवारी सकाळी ६.३० वाजेताच्या दरम्यान राधेमाँ यांचे गुरुद्वारा परिसरात आगमन झाले. दर्शन करून बाहेर आल्यानंतर वृत्तपत्राच्या छायाचित्रकारांनी त्यांची छायाचित्र काढत असताना, त्यांच्या भक्तांचा पारा चढला. त्यांचे छायाचित्र काढणाऱ्या छायाचित्रकारांच्या अंगावर भक्तगण धाऊन आले. त्यामुळे क‌ाही काळ गोंधळाचे वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विज्ञान प्रदर्शनाकडे शाळांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना इनोव्हेशन करण्याची संधी मिळावी म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी इन्स्पायर अॅवॉर्ड योजनेकडे औरंगाबाद जिल्ह्यातील शाळांना पाठ फिरविली आहे. केवळ २१ संघाचाच सहभाग आसल्याने यंदा जिल्ह्याचे प्रदर्शन रद्द करण्याची वेळ आली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच विज्ञानाची गोडी लागावी, त्यांच्यातील कल्पकता समोर, यासावी यासाठी केंद्राच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे इन्स्पायर अॅवॉर्ड योजना राबविली जाते. सहावी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होता येते. विज्ञान प्रदर्शनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कल्पक व नाविन्यपूर्ण वैद्यानिक प्रयोग सादर करण्याची संधी मिळते. त्यासाठी विद्यार्थ्याला पाच हजार रुपयांची शिष्यवृत्तीही दिली जाते. जिल्हा, राज्य आणि केंद्रपातळीवर विद्यार्थ्यांना आपली कल्पकता दाखविण्याची संधी मिळते. या योजनेकडे औरंगाबाद जिल्ह्यातील शाळांनी पाठ फिरविली आहे. शिक्षण विभागाचेही विज्ञान प्रदर्शनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थी सरकारच्या योजनेपासून वंचित राहिले आहेत.

विशेष म्हणजे शाळांना यंदा ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव सादर करावे लागणार होते. जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू झाली होती. या प्रदर्शनात जिल्ह्यातील केवळ २१ संघच सहभागी झाले आहेत. शाळांची अनास्था आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष, यांमुळे यंदा जिल्ह्यात होणारे विज्ञान प्रदर्शन रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. आता औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना हिंगोली येथे होणाऱ्या प्रदर्शनात सहभागी व्हावे लागणार आहे.

विभागही पिछाडिवरच

औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शाळांचीही अनास्था समोर आली आहे. विज्ञान व पर्यवेक्षकांची राज्यस्तरीय बैठक शनिवारी पार पडली. त्यावेळी या योजनेचा आढावा घेण्यात आला. यात औरंगाबादेत २१ परभणी येथे ९०, हिंगोलीत २५० संघांनी नोंदणी केल्याची माहिती सांगण्यात आली. या तीन जिल्ह्यांचे मिळून हिंगोली येथे हे प्रदर्शन घेण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवरील एकूण सहभागी संघांपैकी साडेसात टक्के संघ राज्यस्तरासाठी पात्र ठरतात यानंतर २० ते २५ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनातील निवडलेले गेलेले पाच टक्के संघांना राष्ट्रीय पातळीवर आपला प्रयोग सादर करण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांना याबाबतची माहितीच दिली नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे. शाळांची ही अनास्था मराठवाड्यातील बाल वैज्ञानिकांसाठी अडचणीची ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लहानग्या बहीण भावाचा बुडून मृत्यू

$
0
0

औरंगाबादः काकडी धुण्यासाठी गेलेल्या चिमुकल्या बहीण-भावाचा डबक्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पीरवाडी शिवारातील दर्गा पुलालगत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. दोघांचे मृतदेह सायंकाळी सापडले. रईस रशीद शेख (वय ५) आणि सानिया रशीद शेख (वय ७) अशी त्यांची नावे आहेत.

रईस आणि सानिया नेहमी आईसोबतच राहत्या घरापासून सुमारे दीड किलोमीटरवरील शेतात जात. ते शुक्रवारी शेतातील काकडी खाण्यासाठी आई निघण्याच्या आधीच घराबाहेर पडले. शेतातून त्यांनी काकडी घेतली व ती धुण्यासाठी सानिया दर्गा पुलाजवळील डबक्याजवळ गेली. तोल जाऊन ती पाण्यात पडली. बहिणीची आरडाओरड ऐकून रईस धावून गेला, पण तोही डबक्यात पडला. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या एका नातेवाईकास सानियाची चप्पल डबक्याजवळ आढळली. याची माहिती मिळताच पालकांनी धाव घेतली. चिखलठाणा पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल एस. बी. काळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


७० लाख ५५ हजारांची फाइल गायब!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या मालमत्ता विभागातून ७० लाख ५५ हजार रुपयांची फाइल गायब झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. 'फाइलचा शोध घ्या किंवा फाइल हाताळणाऱ्यांची नावे कळवा,' असे पत्र उपायुक्तांनीच मालमत्ता अधिकाऱ्यांना दिले आहे.

महापालिकेने २००६मध्ये शहरात अकोला प्रवासी व माल वाहतूक संस्थेतर्फे सिटीबस सेवा सुरू केली होती. या संस्थेने जाहिरात करण्याचा करार अभिषेक अॅड्स या संस्थेबरोबर केला होता. हा करार केल्यानंतर संस्थेने महापालिकेकडे केलेल्या जाहिरातीपोटी दर महिन्याला विशिष्ट रक्कम भरणे गरजेचे होते, पण लेखापरिक्षण विभागाने मालमत्ता विभागाचे लेखापरीक्षण केल्यावर संस्थेने महापालिकेकडे जाहिरातीच्या शुल्कापोटी ७० लाक ५५ हजार ४४० रुपये भरलेच नसल्याचे स्पष्ट झाले. २००६ ते २०१० या काळात ही रक्कम मालमत्ता विभागाने वसूल करणे गरजेचे होते, पण महापालिकेने ही वसुली केलीच नाही. यासंदर्भात संबंधितांना वेळोवेळी फक्त नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.

उपायुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यावर अय्युब खान यांनी अकोला प्रवासी व माल वाहतूक संस्था, अभिषेक अॅड्सची फाइल मालमत्ता विभागाकडून पुढील कारवाईसाठी मागवली, पण एक महिन्यापासून त्यांना यासंदर्भातील फाइल उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. स्मार्ट सिटी अभियानाच्या दृष्टीने महापालिकेने स्वतःच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे ७० लाख ५५ हजार रुपयांची रक्कम महापालिकेसाठी मोठी आहे. फाइल सापडली तर रक्कम वसूल करणे सोपे जाईल, असे मानले जात आहे.

अकोला प्रवासी व माल वाहतूक संस्था, अभिषेक अॅड्स यांच्या झालेला व्यवहार आणि त्यातून थकलेली ७० लाख ५५ हजार ४४० रुपयांची रक्कम वसूल करणे गरजेचे आहे. त्यासाठी मालमत्ता विभागाकडे एक महिन्यापासून त्या फाइलची मागणी केली, पण ती मिळाली नाही. त्यामुळे मालमत्ता अधिकाऱ्याना पत्र पाठवून, 'संबंधित ती फाइल द्या,' असे आदेश दिले आहेत. फाइल मिळत नसेल तर त्या काळात ती कोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हाताळली, याची माहिती द्या, असेही त्या पत्रात म्हटले आहे. पत्राचे उत्तर आल्यावर आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल.

- अय्युब खान, उपायुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय खेचाखाचीत ‘जनशताब्दी’ सुटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

रेल्वे संघर्ष समितीचे दोन स्वतंत्र कार्यक्रम. पदाधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांचा केलेला सत्कार आणि मग त्याच व्यासपीठावर पुढाऱ्यांकडून संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्काराची परतफेड. रावसाहेब दानवेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असे म्हणत आता तरी आम्हाला कुठेतरी बसायला आरक्षित जागा द्या,अशी सेनेची टोमणेबाजी. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकुशराव टोपे यांना श्रेय देण्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा एल्गार, अशा बहुविध राजकीय खेचाखाचीत जनशताब्दी एक्स्प्रेस जालन्यातून रविवारी पहाटे साडेचार वाजता सुटली.

जालना रेल्वे संघर्ष समितिच्यावतीने खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सत्कार शनिवारी रात्री झाला. या कार्यक्रमावेळी स्थानिक रेल्वेच्या डझनावारी समस्या मांडताना उपस्थितांनी राजकीय भाष्य करत परस्परांना जोरदार चिमटे काढले. रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष अॅड. ब्रम्हानंद चव्हाण म्हणाले, 'पंधरा वर्षांच्या काळात दानवे यांनी रेल्वेच्या या एका प्रश्नावर पहिल्यांदा त्यांची स्वतःची ताकद त्यांनी वापरली आहे.'

खासदार दानवे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका. ते काम करणारे नेते आहेत. त्यांच्या हातात काम असते ते नक्कीच करतात, असे म्हणत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी वेगळेच चिमटे काढायला सुरुवात केली. श्री गणपती राजूरचा रस्ता दुरुस्त करणे हे त्यांचे काम नाही तर, ते राज्य सरकारचे काम आहे. हे लक्षात न घेता दानवे यांना कसे काय जवाबदार धरतो? असा प्रश्न अंबेकर यांनी मांडून विषय दुसऱ्याच ट्रकवर नेला. लोकांनी जरा पालकमंत्र्याच्या दरबारात गेले पाहिजे. सत्ता सुरूवातीला तुम्ही एकट्यांनीच उपभोगली. मात्र, आता आम्ही तुमच्यासोबत आहोत, मग आम्हाला पण आरक्षित जागा बसायला द्या, असे बोलत अंबेकरांनी सध्याच्या काळात चालू असलेल्या महामंडळाच्या नियुक्तयांच्या विषयाला स्पर्श केला.

राष्ट्रवादीचे माजी खासदार अंकुशराव टोपे यांनीच जालन्यात ब्रॉडगेज आणली आहे. रेल्वे संघर्ष समितिने त्यांची देखील आठवण ठेवली पाहिजे असे राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस एकबाल पाशा म्हणाले. पालकमंत्री लोणीकर यांनी जनशताब्दी एक्सप्रेस जालन्यातून सुटत आहे याचे खासदार दानवे आणि रेल्वे संघर्ष समिती या दोघांना समान श्रेय देऊन टाकले. आपले सगळे प्रश्न सुटलेले नाहीत. मराठवाडा विभागाचे मुख्यालय मुंबईला जोडले गेले पाहिजेत असे लोणीकर म्हणाले.

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना जालन्यात नक्की बोलाऊ आणि मग सगळ्या मागण्या त्यांच्या समोर मांडू, मान्य करून घेऊ याच नेमक्या शब्दात खासदार दानवे यांनी भाषणाची सुरूवात केली. मी जालन्याचा खासदार असलो तरी जालन्यातील तीन आणि औरंगाबादचे तीन असे समसमान विधानसभा मतदारसंघ माझ्या कार्यक्षेत्रात येतात, याची जरा जालनेकरांनी जाणीव ठेवली पाहिजे, जनशताब्दी जालन्यातून सुरू करताना औरंगाबादच्या प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली आहे असे ते म्हणाले. सर्व लोकप्रतिनिधींचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर लगेचच लोकप्रतिनिधींकडून पदाधिकाऱ्यांच्या सत्काराची परतफेड करण्यात आली. जनशताब्दी एक्सप्रेस मुक्कामी आली. यावेळी मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीच्यावतीने स्वतंत्र स्वागत करण्यात आले.

खासदार दानवेंनी दाखविला ‌हिरवा झेंडा

रविवारी पहाटे साडेचार वाजता खासदार रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर यांनी जनशताब्दी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. जालन्यातील शंभरहून अधिक व्यापारी, उद्योजक आणि आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे यांच्यासोबत खासदार दानवे हे याच रेल्वेने मुंबईला रवाना झाले. सोमवारी ही सर्व मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जालन्याच्या विकासांवर चर्चा करणार आहेत, अशी माहिती खासदार दानवे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते खोदणाऱ्याचे काम नांदेडमध्ये बंद पाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

नांदेडच्या जीवन प्राधिकरण विभागाने सुरू केलेल्या पाणी पुरवठा पाइपलाइनच्या कामात गैरव्यवहार झाला आहे. दरम्यान, हे काम परत करण्यासाठी दुसऱ्यांदा रस्ता खोदणाऱ्या कंत्राटदारांना छत्रपतीनगर, काबरानगर, अंबिकानगर भागातील जनतेने काल रात्री रोखून हे काम बंद पाडले.

आसना नदीवरुन येणाऱ्या बहुप्रतिक्षित पाइपलाइनच्या कामाच्या वेगवेगळ्या कथा समोर येत आहेत. हे काम करत असताना दाखविण्यात आलेले किलोमीटर व करण्यात आलेली पाइपलाइन यात प्रचंड तफावत असून, किमान दोन किलोमीटरचा मार्ग केवळ कागदोपत्री दाखवून या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. तरोडा, पासदगाव, छत्रपतीनगर, मोर चौक ते काबरानगर जलशुद्धीकरणातंर्गत या पाइपलाइनचे काम करण्यात आले. याच कामातंर्गत पावडेवाडी व अन्य दोन गावांना देखील पाणीपुरवठा होणार असून, हे काम करत असताना जादा दराच्या निविदा घेवून संबंधितांनी संगनमत केल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबतच्या लेखी तक्रारी जिल्हाधिकारी, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त व महापौरांकडे या भागातील नागरिकांनी केल्या आहेत वास्तविक दोनवेळा या पाइपलाइनचे काम करत असताना रस्ता खोदण्यात आला. या रस्त्याची रक्कम परस्पर महापालिकेला भरण्यात आल्याचे दाखविण्यात आले. मात्र, हे काम कागदोपत्री पूर्ण करुन महापालिकेच्या अभियंत्याने व जीवन प्राधिकरण विभागाच्या कंत्राटदाराने संगनमत केल्याचे दिसून येत आहे. आयुक्त सुशील खोडवेकर यांनी याबाबत शंका व्यक्त केली आहे.

दरम्यान छत्रपतीनगर, अंबिकानगर, काबरानगर, पावडेवाडी या भागात या पावसाळ्यात सदरचा रस्ता दोनवेळा खोदण्यात आला. मात्र खोदल्यानंतर रस्त्याची पूर्ववत परिस्थिती व रस्त्याचे मजबुतीकरणक करत असताना कुठलेही नियम पाळण्यात आले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू ठेकेदारावरील कारवाईत भेदभाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

एकीकडे आंध्रप्रदेशात मांजरा व गोदावरी नदीच्या काठावरून दररोज पन्नास ट्रक पाठविण्यासाठी हिरवा कंदील दाखविणाऱ्या जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातील ठेकेदारांना वाळूसाठी अव्वाच्या सव्वा दंड लावण्याचा प्रकार सुरू केला आहे. भेदभाव करणाऱ्या या महसूल प्रशासनाविरुद्ध रविवारी शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत संताप व्यक्त केला.

शासकीय विश्रामगृहात शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत वाळू ठेकेदार, कंत्राटदार व वाहन चालक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचीही उपस्थिती होती. गेल्या अनेक दिवसांपासून वाळूच्या ठेकेदारांना व वाहकांना महसूल अधिकारी, तहसीलदार तसेच परिवहन अधिकारी मोठ्या प्रमाणात त्रास देत असून, अव्वाच्या सव्वा दंड लावण्यात येत असल्याने ही सर्वच मंडळी त्रस्त झाली आहे. एकीकडे वाहनांचे भाडे तसेच डिझेल, पेट्रोलच्या दरात वाढ झाली असताना कुठलीही शहानिशा न करता हा दंड आकारला जात असल्याने आज या बैठकीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आला.

ठेकेदार संघटनेचे चांदू पाटील, गोविंदराव पवार, गोविंद जाधव, संभाजी पाटील पुणेगावकर, श्रीराम पाटील, आनंदा पाटील बोंढारकर आदींनी आपल्या व्यथा मांडताना प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. शिवसेना जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, व्यंकोबा येडे, दयाल गिरी हेही यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच स्वीकारताना लिपिकास पकडले

$
0
0

नांदेडः लोहा तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास एक हजार रुपयांची लाच घेताना रविवारी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार प्राप्त झाली होती. आईच्या नावे असलेले पाण्याचे बोअर जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी अधिग्रहित केले आहे. त्याचे मंजूर असलेले बिलाचे धनादेश काढण्यासाठी तहसील कार्यालयाचे आवश्यक असलेले पत्र लवकर मिळावे अशी विनंती तहसील कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक उत्तम दत्तराव मुकाडे यांना केली. हे काम लवकर करण्यासाठी कनिष्ठ लिपिक उत्तम दत्तराव मुकाडे यांनी एक हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने या बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्या नुसार पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, उपधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बी.एल.पेडगावकर यांनी लोहा येथे सापळा रचला. लिपिक मुकाडे यांना तहसील कार्यालयातच लाच स्व‌िकारताना रंगेहाथ पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>