Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाच हजार मागितले; लिपिकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कन्नड येथील हॉटेलकरीता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. कन्नड येथील हॉटेलचालकाने ३१ जुलै २०१५ रोजी महसूल शाखेत खाद्य व लॉजिंग परवाना मिळण्यासाठी अर्ज केला होता. हा अर्ज लिपिक रवींद्रसिंग राजपूत यांच्याकडे चौकशीसाठी होता. नाहरकत प्रमाणपत्र व नवीन परवाना देण्यासाठी राजपूत याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. त्याने ७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पाच हजार रुपये घेऊन हॉटेलचालकास बोलावले होते. त्यावेळी पोलिसांनी सापळा लावला होता. पंरतु, राजपूत हॉटेलचालकास दुचाकीवरून सिडको एन १२ येथील विवेकानंद गार्डनसमोर घेऊन गेला व लाच मागितली. परंतु, संशय आल्याने त्यांने पैसे घेतले नाहीत.

पोलिसांच्या पडताळणीत राजपूत याने लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यावरून सिटीचौक पोलिस ठाण्यात राजपूत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रवींद्रसिंग प्रतापसिंग राजपूत याला लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी दुपारी अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा हजारांची लाच घेताना मनपा कर्मचारी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इमारत धोकादायक असल्याचे सांगून न पाडण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. कैलास जाधव, असे त्याचे नाव असून तो अतिक्रमण हटाव पथकातील इमारत निरीक्षकाचा सहायक आहे.

महापालिकेतर्फे शहरातील जुन्या मालमत्तांची तपासणी करण्यात येत असून धोकादायक इमारती पाडण्याचे ठरवण्यात आले आहे. अतिक्रमण हटाव पथकातील सहायक कैलास जाधव याने सराफ्यातील महेश कुलथे यांची भेट घेतली. तुमचे घर जुने व धोकादायक असून ते पाडावे लागणार असल्याचे सांगितले. कुलथे यांनी विनंती केल्यानंतर घर पाडायचे नसल्यास २५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. दोघांमध्ये दहा हजार रुपयांवर तडजोड झाली. लाच देण्याची इच्छा नसल्याने कुलथे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान कैलास जाधव याने कुलथे यांना शुक्रवारी (१४ ऑगस्ट) दुपारी एक वाजता हर्षनगर, लेबर कॉलनी परिसरातील एका मंदिराजवळ दहा हजार रुपये घेऊन बोलावले. या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताच कैलास रखमाजी जाधव (वय ४२ रा. मनपा क्वाटर्स, दिल्ली गेट) याला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास पाटील, सम्राटसिंग राजपूत, कैलास कामठे, सुनील फेपाळे, गणेश पंडुरे, अजय आवले, नितीन घोडके, बाळासाहेब महाजन व संदीप चिंचाले आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपूर्ण बीओटी प्रकल्प ताब्यात घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अपूर्ण बीओटी प्रकल्प ताब्यात घ्या. महापालिका स्वतः हे प्रकल्प पूर्ण करेल. प्रकल्पांच्या विकसकांना आठ दिवसांची नोटीस द्या, त्या काळात त्यांनी परवानगी घेतली नाही तर कारवाई करून अहवाल सादर करा', असे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी शुक्रवारी (१४ ऑगस्ट) अधिकाऱ्यांना दिले.

महापालिकेच्या रखडलेल्या बीओटी प्रकल्पांबाबत शुक्रवारी बैठक झाली. बैठकीला उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, गटनेते राजू वैद्य, गजानन बारवाल, नासेर सिद्दिकी, बीओटी कक्षप्रमुख सिकंदर अली, नगररचना विभागाचे सहायक संचालक डी.पी. कुलकर्णी, मालमत्ता अधिकारी वसंत निकम उपस्थित होते.

महापालिकेच्या ९ बीओटी प्रकल्पांच्या कामाला २००६ मध्ये सुरुवात झाली, पण अद्याप एकही काम पूर्ण नाही, असे यावेळी चर्चेतून लक्षात आले. रेल्वेस्टेशनजवळचा प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावा सिंकदर अली यांनी केला. हा दावा गजानन बारवाल यांनी खोडला. या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण झाले नाही, दोनवेळा मुदतवाढ दिली. करारानुसार काम झालेले नाही, भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा दिलेली नाही, असे मुद्दे त्यांनी मांडले. त्या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय महापौरांनी घेतला.

शहानूरवाडी येथील युरोपियन मार्केटच्या बीओटीचा आढावा यावेळी घेतला. या परिसरात इझी-डे मॉलसाठी बांधलेल्या इमारतीवर अनधिकृतपणे तिसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे, त्यावर पालिकेने काय कारवाई केली असा प्रश्न राजेंद्र जंजाळ यांनी विचारला. त्यांनी प्रकल्पाचा करारनामाच मागवून घेतला. इमारतीच्या वरच्या मजल्यावर चित्रपटगृहाचे बांधकाम सुरू आहे, असे सिकंदर अली म्हणाले. या बांधकामाला नगररचना विभागाची परवानगी नसल्याचा मुद्दा डी. पी. कुलकर्णी यांनी लक्षात आणून दिला. यावर राजू वैद्य म्हणाले, त्या बांधकामाच्या विकसकाला आज नोटीस द्या. २४ तासांत त्यांनी परवानगी घेतली नाही, तर ते बांधकाम पाडून टाका. केवळ नोटीस देऊन शांत बसू नका, असे त्यांनी सिंकदर अली यांना बजावले. बीओटी प्रकल्पांच्या कामाची स्थिती, त्यावर अधिकाऱ्यांचे नसलेले नियंत्रण या बाबी लक्षात घेता महापौरांनी सर्व बीओटी प्रकल्पाच्या विकसकांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

विकसक पालिकेची परवानगी घेणार नसतील, पैसे भरणार नसतील, तर सर्व बीओटी प्रकल्प ताब्यात घेतले जातील. महापालिका स्वत: हे प्रकल्प पूर्ण करेल.

- त्र्यंबक तुपे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाशे टन डायखाली दबून तंत्रज्ञाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

बजाज ऑटोमध्ये स्वयंचलित यंत्राची (रोबोट) ६०० टन डाय अंगावर पडल्याने तंत्रज्ञ मरण पावल्याचे स्पष्ट झाले आहे. रिक्षा प्रेस शॉपमध्ये ते मेन्टनन्ससाठी गेले होते.

भानुदास आनंदा बोरकर (वय ५१, रा. होनाजीनगर, जटवाडा रोड, औरंगाबाद, मूळ रा. धुळे) यांचा गुरुवारी (१३ ऑगस्ट) रात्री नऊच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. ते २५ वर्षापासून कंपनीच्या मेन्टनन्स विभागात कार्यरत होते. त्याची गुरुवारी दुसरी शिफ्ट होती. रिक्षाचे हुड व टप आदी लोखंडी पत्रा बसविण्यापूर्वी एका स्वयंचलित यंत्राने (रोबोट) प्रेस केले जाते. या रोबोटचे मेन्टनन्स करताना ६०० टन वजन असलेली डाय बनकर यांच्या अंगावर पडली. त्याखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना या विभागात कॅज्युअलमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने पाहिल्याने उघडकीस आली. घटनेची माहिती बजाज कंपनीतील सर्व विभागाच्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांना व एमआयडीसी वाळूज पोलिसांना देण्यात आली. उपनिरीक्षक प्रवीण पाटील व पोलिस हेडकॉन्स्टेबल पी. ए. गुंजाळ यांनी घटनास्थळी जाऊन बोरकर यांना घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी रात्री उशिरा नोंद करण्यात आली. बोरकर यांच्या मृतदेहाचे शुक्रवारी (१४ ऑगस्ट) सकाळी पोस्टमार्टेम करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राकाज्’ प्रकरणी खोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सर्व नियम धाब्यावर बसवून, मसाज पार्लर सुरू करणाऱ्या वादग्रस्त 'राकाज'विरोधात पोलिसात तक्रार करण्याची तयारी महापालिकेने सुरू करताच कारवाई रोखण्यासाठी भाजपचे काही नेते सरसावले आहेत. राकाजविरुध्द पालिकेच्या ‌विधी ‌विभागाने तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला, त्यावर पालिका आयुक्तांची स्वाक्षरीही झाली, परंतु रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदवली गेली नाही.

'राकाज'मध्ये सुरू असलेल्या काळ्या कारनाम्यामुळे पालिकेने हा क्लब सील केला. तसेच शलाका इंजिनीअर्स, राकाज् लाइफस्टाइल क्लबचे संचालक सुनील राका यांच्या विरोधात पोलिस तक्रार देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी लावून धरली होती. याबाबत आयुक्तांनी विधी सल्लागार ओ.सी. शिरसाट यांच्याकडून कायदेशीर सल्ला मागितला. ३१ जुलै रोजी शिरसाट यांनी राकाज विरुध्द भादंवि कलम २०४, २६८, ४०५, ४२०, ४२५, ४१५, ३५४ (क) नुसार गुन्हा दाखल करता येईल', असा लेखी अहवाल दिला होता. त्यानंतरही 'राकाज्'वर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

याबाबत शुक्रवारी पालिकेतील 'बीओटी' संदर्भातील बैठकीत वादळी चर्चा झाली. पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल होईपर्यंत बैठक तहकूब करण्याचा निर्णय महापौरांनी घेतला. त्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, सभापती दिलीप थोरात यांनी आयुक्तांची भेट घेऊन विधी विभागाच्या अहवालावर त्यांची स्वाक्षरी घेतली. पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचीही भेट घेत तक्रार दाखल करून घेण्याची विनंती केली. पोलिस आयुक्तांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासनही दिले, परंतु रात्री सूत्रे फिरली आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याविषयी अनिश्चितता निर्माण झाली. दोन दिवस सुटी असल्याने तक्रार बारगळण्याची चिन्हे आहेत.

भाजप नेत्याचा दबाव

राकाज् लाइफ स्टाइल क्लबचे संचालक सुनील राका यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ नये, यासाठी भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील महिला नेत्याने स्थानिक पदाधिकाऱ्याला हाताशी धरून दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. हा पदाधिकारी महापालिकेतही काही वर्ष होता. पूर्व विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी त्याने पक्षानेत्यांकडे हट्ट धरला होता. 'राकाज्'च्या विरोधात ज्योतीनगरातील महिला एकवटल्या होत्या. महापालिकेतील सर्व नगरसेवक एकत्र झाले, असे असताना राष्ट्रीय स्तरावरील त्या नेत्या एका मंत्र्यांच्या माध्यमातून महापालिका यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्या पदाधिकाऱ्याला समोर केले जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांबरमध्ये सापडला उंदीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तुम्ही, आता मसाला डोसा, सांबर खाऊन पेटपूजा करू, असे ठरवले व सांबरमध्ये उंदीर निघाला तर काय होईल? याचा अनुभव रेल्वे स्टेशनवरील 'ला फुस्टा फुड' या रेस्टॉरंटमध्ये एका प्रवाशाला आला. यामुळे धक्का बसलेल्या रेल्वे प्रवाशाने रेस्टॉरंट चालकांविरुद्ध लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रेल्वेच्या अन्न विभागाने सांबरचा नुमना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे.

तपोवन एक्स्प्रेसने जाण्यासाठी शुक्रवारी (१४ ऑगस्ट) दुपारी मुकुंद जंजाळे हे तीन सहकाऱ्यांसह स्टेशनवर आले होते. रेल्वे येण्यास उशीर असल्याने ते ला फुस्टा फुडमध्ये गेले. त्यांनी मसाला डोसाची ऑर्डर दिली. या रेस्टॉरन्टमध्ये सेल्फ सर्व्हिस असल्याने पैसे देऊन चार मसाला डोसा टेबलवर घेऊन आले. त्यावेळी एका प्लेटमधील सांबरमध्ये मेलेला उंदीर असल्याचे लक्षात आले. रेस्टॉरंट व्यवस्थापक कृष्णप्रसाद यादव यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी आधी, असे होणारच नाही, अशी भूमिका घेतली. त्यावरून येथे जोराचा वाद झाल्याने लोहमार्ग पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी उंदीर असलेले सांबर व डोसा ताब्यात घेतला व रेल्वेचे आरोग्य निरीक्षक आशुतोष गुप्ता यांना बोलावून यांच्या ताब्यात दिला. या प्रकारामुळे स्टेशनवरील खाद्य पदार्थांचा दर्जा अत्यंत वाईट असल्याचे समोर आले आहे. रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांची नियमित तपासणी करण्याची प्रवाशांची मागणी आहे.

‌'चुहा गीर गया होगा'

सांबरमध्ये उंदीर सापडल्याचे सांगितल्यानंतर व्यवस्थापक कृष्णप्रसाद यादव यांने आधी टोलवाटोलवी केली. त्यानंतर ही बाब गांभीर्याने न घेता 'चुहा ग‌िर गया होगा' असे उत्तर दिल्याची माहिती मुकुंद जंजाळे यांनी दिली. हा उंदीर पाहून काही वेळापूर्वी डोसा, इडली सांबर खाल्लेल्या एका महिलेले तेथेच उलटी केल्याचे जंजाळे यांनी सांगितले.

फेस्टा फुड रेस्टॉरंटमध्ये सांबरमध्ये उंदीर सापडलाची तक्रार आहे. सांबरचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. त्याचा अहवाल नांदेड विभागाला पाठविण्यात येईल. यानंतर कारवाई करण्यात येईल.

- आशुतोष गुप्ता, आरोग्य निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळावरून संघर्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

मराठवाड्यासह राज्याच्या काही भागांत अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. उस्मानाबाद जिल्हा तीन वर्षांपासून सलग दुष्काळाचा सामना करीत आहे. राज्य सरकारने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा राजकीय संघर्ष अटळ आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. दुष्काळी जिल्ह्यातील जनतेच्या हाताला काम, पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी चारा व कर्जमाफीबरोबरच प्रत्येक शेतकऱ्याला रब्बी पेरणीसाठी प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये देण्यात यावेत, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना दिल्याचे पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले की, दुष्काळप्रश्नी ‌वेळीच उपाययोजना न झाल्यास शेती उद्वस्त होईल व पशुधनावर विपरित परिणाम होतील. मदतीबाबतचे राज्य सरकारने धोरण अद्यापही स्पष्ट नाही. मराठवाड्यातील हवामान पर्जन्यमानास अनुकूल नाही, असा अहवाल मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे याकडे लक्षही वेधले होते, परंतु सरकारचे धोरण नकारात्मकच आहे.

दुष्काळी भागाची पाहणी करून मुख्यमंत्री व पंतप्रधानांना स्वतंत्र अहवाल देऊन दुष्काळग्रस्तांना भरीव मदतीसाठी विनंती करणार असल्याचे सांगून पवार म्हणाले की, दुष्काळावरून कोणीही राजकारण करू नये किंवा राजकीय ‌अभिलाषा बाळगू नये. एकजुटीने या नैसर्गिक संकटाचा सामना करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार हे दिलीप कुमार!: पंकजा मुंडे

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । लातूर

'सिनेसृष्टीत अभिनेते दिलीप कुमार यांना जे स्थान आहे, तेच स्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारणात आहे. अतिशय ज्येष्ठ आणि अनुभवी असलेले पवारसाहेब राजकारणातील दिलीप कुमारच आहेत,' अशा शब्दांत राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी आज पवारांबद्दल आदर व्यक्त केला. तर, शरद पवार यांनीही पंकजा मुंडे यांना नव्या पिढीची दीपिका पदुकोण असं म्हणत दाद दिली.

लातूरमध्ये आज राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. यावेळी शरद पवार, पंकजा मुंडे, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते. यावेळी पंकजा यांनी शरद पवार यांना दिलीप कुमार असं म्हणून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. त्यानंतर बोलताना शरद पवार यांनीही पंकजांना दीपिका पदुकोणची उपमा दिली. आपण दीपिकाचेच नाव का घेतले याचा किस्साही त्यांनी आपल्या खास शैलीत सांगितला. 'पंकजांनी माझा उल्लेख दिलीप कुमार असा केला. मग मी विचार करायला लागलो पंकजाची तुलना कुणाशी करायची? मी आजकाल चित्रपट बघत नाही, म्हणून माझं अज्ञान लपवण्यासाठी रितेश देशमुखला बोलावून घेतलं आणि विचारलं, सध्या सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्री कोण? त्यानं माधुरी दीक्षितचं नाव सांगितलं. तर त्याला म्हटलं, ती जुनी झाली, हल्लीची सर्वात लोकप्रिय कोण, तर तो म्हणाला दिपीका पदुकोण. म्हणून मी पंकजांना नव्या पिढीची दीपिका पदुकोण म्हणतो,' असं पवार म्हणाले. 'जुन्या पिढीचा दिलीप कुमार इथं आला असेल तर नव्या पिढीची दीपिका पदुकोणही इथं आहे,' असं त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हास्यस्फोट झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘दिलीपकुमार’ पवार, ‘दीपिका’ मुंडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लातूर

पूर्वी शरद पवार, विलासराव देशमुख, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे एकाच व्यासपीठावर येणार असले, की हास्यस्फोट पक्के असायचे. एकमेकांची यथेच्छ स्तुती करताकरता मधूनच शालजोडीतला 'चिमटा' काढायचा, स्वभावगुणाची प्रशंसा करतानाच टवाळी करायची आणि उपस्थितांना अक्षरश: लोटपोट व्हायला लावायचे हा या नेत्यांचा शिरस्ता आणि खुद्द पवार यांच्याच मते महाराष्ट्रातील मैत्रिपूर्ण राजकारणाचा गुणविशेष! अशीच एक हास्यसभा शनिवारी लातूरमध्ये रंगली...ही सभा रंगवणारे होते शरद पवार आणि पंकजा मुंडे.

लातूर येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शनिवारी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या १२ फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. देशमुख परिवारातील आमदार दिलीप देशमुख, अमित, रितेश, वैशाली देशमुख यांच्यासह खासदार अशोक चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. विलासराव यांच्या आठवणींनी श्रोते गलबलून गेले असतानाच, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू झाले. विलासराव व गोपीनाथ मुंडे यांच्यामधील मैत्रीचे बंध पंकजा उलगडून सांगत होत्या. 'विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची राजकारणापलिकडची मैत्री होती. त्यांच्याकडून आपण खूप काही शिकलो', असे सांगतच पंकजा यांनी सभा जिंकण्याचा आपल्या वडिलांचा कित्ता गिरवला. 'व्यासपीठावर उपस्थित असलेले राजकारणातील दिलीप कुमार म्हणजे शरद पवार यांच्याकडूनही मी खूप काही शिकले', असे सांगताच उपस्थितांमध्ये प्रचंड हशा पिकला. खुद्द पवार यांनीही हसून पंकजा यांच्या या उपमेला दाद दिली. पवार आता पंकजा यांना कसे प्रत्युत्तर देणार याविषयी सर्वच आतूर झाले होते.

सुरुवातीला पवार यांनीही विलासराव यांचे किस्से सांगितले. त्यानंतर ते पंकजा यांच्या वाक्याकडे वळले. 'पंकजा यांनी मला दिलीप कुमार म्हटले. मी आजकाल चित्रपट पहात नाही. म्हणून मी रितेशला विचारले की, सध्या सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्री कोण? तेव्हा त्याने माधुरीचे नाव घेतले. मी त्याला म्हटले की, हल्लीची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण, तर तो म्हणाला दीपिका पदुकोण. तेव्हा पंकजा या नव्या पिढीच्या दीपिका आहेत', या पवार यांच्या वाक्यफेकीवर कार्यक्रमस्थळी पुन्हा हास्य उधळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणध्ये दुप्पट भाडेवाढ लागू

$
0
0

नगरपालिकेतर्फे नव्या दराने वसुली

म. टा. प्रतिनिधी, पैठण

नाथषष्ठी यात्रेत व्यापाऱ्यांच्या भाड्यात दहापट भाडेवाढ केल्यानंतर नगरपालिकेने एक एप्रिलपासून दुकान भाडे ३३ रुपये चौरस फुटावरून ६६ रुपये चौरस फुट केले आहे. सर्वसाधारण सभेत सहा महिन्यांपूर्वी भाडेवाढीचा ठराव मंजूर झाल्याचे नगरपालिकेतून सांगण्यात आले. मालमत्ता कराची सुमारे ९० लाख रुपयांची थकबाकी आहे.

शहरातील जवळपास पन्नास टक्के व्यापारी नगरपालिकेच्या मालकीची जागा भाडेतत्वावर घेवून व्यापार करीत आहेत. या व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात भाडे थकित आहे. त्यामुळे नगरपालिकेतर्फे सध्या भाडेवसुली मोहीम राबविली जात आहे. थकबाकी वसूल करताना दुप्पट भाडे आकारत असल्याची व्यापाऱ्यांची तक्रार आहे. दरम्यान, याबद्दल संपर्क केला असता सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार भाडेवाढ झाली आहे, त्यानुसार भाडेआकारणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. नगरपालिकेने यापूर्वी अनेकदा भाडेवाढ केली; त्यावेळी सुमारे पाच ते दहा टक्केपर्यंत भाडेवाढ केली जात होती. यावेळी दुप्पट भाडेवाढ केल्याने व्यापाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. येथील व्यापाऱ्यांनी संभाजी चौकात बुधवारी बैठक घेऊन दुप्पट भाडेवाढीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षांची भेट घेऊन सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने भाडेवाढ कमी करण्याची मागणी केली आहे. पालिकेच्या भाडेवाढीविरुद्ध बोलल्यास जागा परत घेतली जाईल, अशी व्यापाऱ्यांना भीती आहे. त्यामुळे ते व व्यापारी महासंघाचे पदाधिकारीही प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहेत.

सध्या दुष्काळी परिस्थिमुळे मंदी आहे. या बिकट परिस्थितीत नगरपालिकेने दुकान भाडे दुप्पट केल्याने आमचे कंबरडे मोडले आहे. नगरपालिकेने भाडेवाढीच्या निर्णयाचा पूनर्विचार करावा. - जयदीप दुशाल, व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यात्रा सफल करणारे श्री घृष्णेश्वर

$
0
0

विजय चौधरी , खुलताबाद

सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् उज्जयिन्या महाकालमोंकारममलेश्वरम् परलयां वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकरम् सेतुबंधे तू रामेशं नागेश दारुकावने वारण स्यांत्रू विश्वेशं त्र्यंबक गौतमीतरे हिमालये तू केदारं घृसृणेशं तू शिवालये

भारतातील १२ ज्योतिर्लिगांचा महिमा वर्णविणारा हा श्लोक. ते श्रीक्षेत्र वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिग श्री घृष्णेश्वर होय. श्रावण महिन्यात सोमवारी वेरूळ येथील या बाराव्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या काना-कोपऱ्यातून भाविकांची प्रचंड गर्दी होते. श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय बारा ज्योतिर्लिग यात्रा सफल होत नाही, अशी श्रद्धा आहे.

औरंगाबाद शहरापासून ३० किलोमिटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग २११ वर खुलताबाद तालुक्यात वेरूळ येथे श्री घृष्णेश्वर मंदिर आहे. श्री घृष्णेश्वराचे दर्शन झाल्याशिवाय भगवान शंकराची ज्योतिर्लिग यात्रा पूर्ण होत नाही, हे वैशिष्ट्य आहे. या मंदिराच्या गर्भगृहातील शंकर-पार्वतींची प्रतिकात्मक पिंड स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच महाराष्ट्रात, त्यापैकी तीन मराठवाड्यात आहेत. एका दंतकथेनुसार पार्वतीने तळहातावर कुंकू घेऊन बोटाने ते घासले. या घर्षणामुळे त्यावेळी प्रगट झालेली ज्योत प्रगट पूर्णत्वास स्थापन केली. कुंकवाच्या घर्षणाशी संबंधित असल्यामुळे या मंदिराची कुंकुमेश्वर व घृष्णेश्‍वर ही दोन्हीही नावे समर्पक वाटतात. सर्व ज्योतिर्लिगांची यात्रा झाल्यानंतर पुन्हा एकदा श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय बारा ज्योतिर्लिग यात्रा सफल होत नाही, अशी श्रद्धा आहे.

मंदिराचा जीर्णोद्धार

सध्याची लाल पाषाणातील ही वास्तू दोन शतकांपूर्वी इंदूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मंदिराचा जीर्णोद्धार केलेली आहे. त्यांनी सासू गौतमाबाई तथा बायजाबाई यांच्या स्मरणार्थ जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख शिलालेखात आहे. वेरूळ हे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पूर्वजांचे पाटीलकीचे गाव. घृष्णेश्‍वर हे या घराण्याचे कुलदैवत. मालोजीराजे भोसले यांनीही या मंदिराचा जीर्णोद्धार १७ शतकाच्या प्रारंभी केल्याचा उल्लेख येथील भांडारगृहावरील शिलालेखात आहे. यापूर्वी हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले होते. आठव्या शतकाच्या आधीचा मंदिराचा आकार व आराखडा याविषयी मात्र निश्चित उल्लेख सापडत नाही.

मंदिराचा आकार

या मंदिराचा कळस प्रमाणबद्ध असून सोन्याच्या पत्र्याने मढवलेला आहे. या मंदिराच्या आवाराची एकंदर लांबी-रुंदी ८० बाय ६१ मीटर आहे. प्रत्यक्षात मंदिराची लांबी-रुंदी २८ बाय २० मीटर आहे. सभामंडपाच्या मध्यभागी जमिनीवर कासव आहे. डाव्या बाजूला कोनाड्यात गणेशमूर्ती आहे.

मंदिराचे गर्भगृह सुमारे एक मीटर खोल आहे. याची लांबी-रुंदी ६ बाय ६ मीटर आहे. मध्यभागी पाषाणाचे पूर्वाभिमूख शिवलिंग आहे. उत्तरेकडील भिंतीत पार्वतीची दक्षिणाभिमूख मूर्ती आहे. या मंदिराची प्रदक्षिणा घालतांना नगारखान्याच्या बाजूच्या दोन्ही कोपर्‍यातून या मंदिराच्या शुकनासिकेतील शुभ्र नंदीवर आरूढ झालेले शिवपार्वतीचे आकर्षक शिल्प आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

$
0
0

शेतकरी कुटुंबातील मुले रमली कम्प्युटर शिकण्यात

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाच्या आघाताने आधार गमावलेल्या दोनशे मुला-मुलींना डॉ. हेडगेवार मेमोरिअल पब्लिक स्कूलने मदतीचा हात दिला. शिक्षण, निवास व जेवणाचा खर्च भागवून संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना सक्षम करण्यासाठी धडपड करीत आहे. या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी रविवारी (१७ ऑगस्ट) या शाळेला चार संगणक भेट देण्यात आले.

पावसाने पाठ फिरवली, तशी शिवारात दुष्काळाची छाया गडद झाली. अवघ्या मराठवाड्यातील भयाण चित्र मनात काळजीचे काहूर उठवते. तीन वर्षे दुष्काळामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांची स्थिती अधिक विदारक आहे. संघर्ष करूनही अपयशी ठरलेल्या बळीराजांनी जीवनयात्रा संपवली. अर्थात, पाठीमागे पत्नी व मुलांची परवड कायम आहे. या अभावग्रस्तांच्या मदतीसाठी परभणी येथील अडभंगनाथ सेवाभावी संस्थेने मराठवाडा पालथा घातला. या संस्थेचे सातारा परिसरात डॉ. हेडगेवार मेमोरिअल पब्लिक स्कूल आहे. संस्थाचालक श्यामसुंदर कणके यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळवली. या माहितीनुसार प्रत्येक कुटुंबाची भेट घेऊन व नातेवाईकांशी चर्चा करून कणके यांनी दोनशे मुला-मुलींना औरंगाबादला आणले. सध्या शाळेच्या परिसरातच त्यांच्यासाठी वसतीगृह आहे. मुलांसाठी मोफत निवास, शिक्षण व जेवणाची व्यवस्था केली आहे. सध्या शाळेत आठशे विद्यार्थी शिकत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अभिजीत देशमुख व विनोद पाटील यांनी रविवारी शाळेला चार संगणक भेट दिले. यावेळी पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. वंचितांचे दुःख दूर करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असते. पण, समाजातील मोजकेच लोक पुढे येतात. या प्रयत्नांना सर्वांचा हातभार लागल्यास प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

सामाजिक कणव

आर्थिक अडचण असूनही श्यामसुंदर कणके सेवाभावी वृत्तीने काम करतात. शाळेतील पूर्वीचे विद्यार्थी व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी अशी संख्या वाढल्याने शाळेची जागा कमी पडत आहे. त्यामुळे परिसरातील एका मोकळ्या मैदानावर प्रार्थना घेतली जाते. या कामातही काही लोक अडथळा आणत आहेत. परिसरात शाळेतील मुलांचा त्रास असून प्रार्थना होऊ देणार नसल्याची त्यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे शिक्षक व कणके चिंताग्रस्त आहेत.

प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख आठवडी बाजारात जनजागृतीसाठी पत्रके वाटून शेतकऱ्यांचे मनोधैर्य टिकवले. दोनशे मुलांना स्वतःच्या पायावर उभे करणार आहोत. मुलांना भेटण्यासाठी आलेल्या त्यांच्या आईला प्रवासभाडेसुद्धा देतो. आता सामाजिक सहकार्याची अपेक्षा आहे. - श्यामसुंदर कणके, प्रमुख, डॉ. हेडगेवार मेमोरिअल पब्लिक स्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘…हे तर शेतकऱ्यांना दाखवलेले गाजर’

$
0
0

औरंगाबाद : 'जगातील इतर भागांमध्ये शेतीच्या दृष्टीने कृत्रिम पावसाचा प्रयोग हा अपयशी ठरला असताना आपल्या राज्यात शासनाकडून हा प्रयोग करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्याला पावसाची आस लागली आहे. या प्रयोगात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे कृत्रिम पाऊस म्हणजे शेतकऱ्यांना दाखवलेले गाजर आहे,' असल्याचे मत अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी नुकतेच केले.

देसरडा म्हणाले, 'पावसाअभावी मराठवाड्यात खरिपाची पिके वाया गेली आहेत. शेती पिकांसाठी शासनाकडून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येत आहे. मराठवाड्यातील शेतकरी पावसासाठी आभाळाकडे पाहत आहेत. मात्र, कृत्रिम पावसाच्या प्रयोगाच्या माध्यमातून गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. तो शेतीसाठी उपयोगाचा नाही. परदेशात शेतीच्या दृष्टीने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला यश मिळालेले नाही. त्यामुळे आपल्याकडील हा प्रयोग म्हणजे शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचा प्रकार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकाचा संशायास्पद मृत्यू

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आपल्या सारसवाडीस गेलेल्या एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सिडकोमध्ये घडली. सिडको पोलिसांमध्ये या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संजय रामनाथ भिसे (वय ३५, रा. विटखेडा) याचा बारा वर्षापूर्वी संगीता हिच्याशी विवाह झाला होता. संगीताने वर्ष २००८ मध्ये संजयकडून छळ होत असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली होती. या तक्रारीनंतर संजय भिसे याच्यावर हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर संगीता सिडको एन-६ येथे असलेल्या आपल्या माहेरी राहत होती. संजय आणि संगीता यांचे प्रकरण कौटुंबिक न्यायलयात न्यायप्रविष्ठ होते. २४ ऑगस्ट रोजी न्यायलयाची तारीख असल्याने त्यापूर्वी तडजोड करण्यासाठी संजय भिसे सासुरवाडीस गेला होता. तिथे अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. संजयला विषबाधा झाल्याची माहिती मिळताच, त्याच्या नातेवाईकांनी त्याला घाटीत हलविले. मात्र, उपचारादरम्यान संजयचा मुत्यू झाला. या प्रकरणात संजयच्या नातेवाईकांनी त्याच्या मृत्यूला संगीता आणि त्यांच्या परिवारातील अन्य सदस्य जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

संजयच्या मृत्यू प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या मृत्युचे नेमके कारण लक्षात येईल, अशी माहिती सिडको पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजकुमार पाडवी हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मसाप’ची चुरस शिगेला

$
0
0

मतदानासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक, शुक्रवारी निकाल

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा साहित्य परिषद कार्यकारिणी निवडणुकीच्या मतदानासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत फक्त १,४०० मतदारांनी मतदानाचा केले असून शुक्रवारी (२१ ऑगस्ट) मतमोजणी होईल. या प्रक्रियेसाठी दहा प्रगणक नियुक्त केले असून पोलिस बंदोबस्तासाठी अर्ज केला असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

जोरदार प्रचार आणि चुरशीमुळे मराठवाडा साहित्य परिषदेची निवडणूक उत्कंठावर्धक ठरली आहे. परिवर्तनवादी आघाडी, विद्यमान कार्यकारिणी पॅनेल व मसाप विकास समिती यांच्यात लढत आहे. जवळपास अडीच हजार मतदार आहेत. टपाली मतदान असल्यामुळे २० ऑगस्टपर्यंत मतदान करता येणार आहे. पतेती सणाची मंगळवारी (१९ ऑगस्ट) सार्वजनिक सुटी असून मतदानासाठी १७, १९ व २० ऑगस्ट हे तीन दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत जवळपास १,४०० मतदान झाले आहे. किमान अकराशे मतदारांची प्रतीक्षा आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. चंद्रदेव कवडे यांनी सांगितले. औरंगाबाद शहरात ९०० मतदार आहेत. ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. शहरातील मतदारांनी कमी प्रमाणात मतदान केल्याचे दिसत आहे. दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेला उमेदवारांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहता येणार नाही. तर सर्व ५२ उमेदवारांना उपस्थित राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांच्या उपस्थितीत मोजणी करण्यावर निवडणूक अधिकाऱ्यांचा भर आहे. या माध्यमातून अधिक पारदर्शीपणा जपला जाणार आहे.

निकालाच्या दिवशी पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. कडेकोट बंदोबस्तात ही प्रक्रिया पूर्ण होईल. या प्रक्रियेवर १७ ऑगस्टपर्यंत उमेदवारांचे आक्षेप मागवण्यात आले आहेत. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र पत्र पाठवले आहे. - डॉ. चंद्रदेव कवडे, निवडणूक निर्णय अधिकारी

मतमोजणीचे नियोजन

'मतमोजणीची प्रक्रिया महत्त्वाची असल्यामुळे एकूण प्रक्रियेत पारदर्शीपणा ठेवला जाणार आहे. परिषदेच्या निवडणुकीत प्रथमच मतमोजणीचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीचे एकूण दहा टेबल असतील. एका टेबलवर २०० मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. या प्रक्रियेसाठी दहा प्रगणक नियुक्त केले जातील', असे डॉ. कवडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सारोळ्यात खुलेआम ‘ओल्या’ पार्ट्या

$
0
0

नियम पायदळी तुडवून उपद्रवी पर्यटकांचा प्रताप, स्वयंपाकाच साग्रसंगीत बेत

तुषार बोडखे, औरंगाबाद

वन विभाग, संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि पोलिस प्रशासनाच्या नियमांची ऐशीतैशी करीत सारोळा पर्यटनस्थळी शनिवारी (१५ ऑगस्ट) खुलेआम ओल्या पार्ट्या रंगल्या. वनक्षेत्रात आग पेटविण्यास बंदी असूनही 'हौशी' पर्यटकांनी मटणाचा साग्रसंगीत बेत केला. विशेष म्हणजे 'उपद्रवी' पर्यटकांना कर्मचाऱ्यांनी रोखले नाही. या प्रकारामुळे नावाजलेले सारोळा वनक्षेत्र दारूड्यांचा अड्डा झाले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक उंच ठिकाण, हिरव्यागार डोंगररांगा, दाट झाडी आणि आल्हाददायक वातावरण. या अनुकूल संपन्नतेमुळे सारोळा (ता. फुलंब्री) पर्यटनस्थळ पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले. शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सारोळ्याला सुटीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी असते. मागील काही वर्षांपासून वन विभाग सारोळा गावाचा वन पर्यटनस्थळ म्हणून विकास करीत आहे. या कामासाठी आतापर्यंत लाखो रूपये खर्च झाला आहे. या वनक्षेत्राची देखरेख व संरक्षणासाठी वन व्यवस्थापन समितीही नेमली आहे. मात्र, पर्यटकांचा वावर वाढताच सारोळ्याची रया गेली. डोंगरकडे, व्ह्यू पॉईंट, उद्यान आणि रस्त्याच्या दुतर्फा दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. वेफर्सची पाकिटे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि प्लास्टिक पिशव्यांनी वनक्षेत्राची अक्षरशः कचराकुंडी केली आहे. सर्वत्र विखुरलेल्या प्लास्टिक कचऱ्याने निसर्गाची हानी सुरू आहे. स्वातंत्र्यदिनाची सुटी असल्यामुळे शनिवारी किमान एक हजार पर्यटक आले. औद्योगिक क्षेत्रातील ग्रुप व तरूणांच्या ग्रुपची यात सर्वाधिक संख्या होती. यातील अनेकजण ओली पार्टी करण्यात मग्न होते. वन विभागाचे रेस्ट हाऊस, वनोद्यान, व्ह्यू पॉईंट, पोलिस चौकी, सूखमणी महाराजांच्या गुहेकडे जाणारा रस्ता अशा प्रत्येक पॉइंटवर ओली पार्टी रंगली. पर्यटक मद्याच्या बाटल्या आणि खाद्य पदार्थ खुलेआम घेऊन बसले. वनक्षेत्र व सार्वजनिक क्षेत्रात मद्यपानास मनाई असूनही खुलेआम पार्टी रंगली. या पार्टीनंतर परिसरात बाटल्या, प्लास्टिक ग्लास व पाण्याच्या बाटल्यांचा खच पडला होता. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वन विभागाकडे यंत्रणा नसल्याने प्लास्टिक कचऱ्याने वनाची प्रचंड हानी सुरू आहे.

स्वयंपाकाचा बेत

वन कायद्याच्या कलम ४ अन्वये वनक्षेत्रात विस्तव पेटवण्यास मनाई आहे, पण पर्यटकांच्या एका गटाने व्ह्यू पॉइंटवर स्वयंपाक केला. आपल्या वाहनात गॅस सिलेंडर आणून हा स्वयंपाक करण्यात आला. कुणीही अटकाव केला नसल्यामुळे वनक्षेत्रात स्वयंपाक झाला. शिवाय झाडाची पाने, फांद्या तोडण्यास मनाई आहे, पण काही उपद्रवी पर्यटक फांद्यावर बसून फोटोसेशन करीत होते. या प्रकारात काही झाडांचे नुकसान झाले.

संरक्षण नावालाच

सारोळ्यात संयुक्त वन व्यवस्थापन समिती कार्यरत असून समितीत अकरा सदस्य आहेत. वन संरक्षण करणे व गैरप्रकार रोखण्याची समितीची जबाबदारी आहे. या समितीचे दुर्लक्ष असल्यामुळे सारोळा दारूड्यांचा अड्डा झाला आहे. शिवाय बिनतारी संदेश यंत्रणा पोलिस चौकी असूनही गैरप्रकार वाढले आहेत.

पर्यटकांसाठी 'एंट्री पॉइंट' सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या ठिकाणी वाहनांची तपासणी करून बंदी असलेले साहित्य जप्त करणार आहोत. गैरप्रकार रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात येईल. - आर. ए. नागापूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून पाणी बॉटल किंवा खाद्य नेता येत नाही. त्याप्रमाणे वन पर्यटनस्थळी नियम करणे शक्य आहे. प्लास्टिकवर बंदी आहे याची माहिती पर्यटकांना झाल्यास आपोआप प्लास्टिक कचरा बंद होईल. - दिलीप यार्दी, पर्यावरण अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अतिगरजू शेतकऱ्यांना मोफत धान्य योजना’

$
0
0

औरंगाबादः शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे शासन विशेष लक्ष देत असून या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नाममात्र किमतीत अन्नधान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वेळ पडल्यास काही अतिगरजू शेतकऱ्यांना मोफत धान्य देण्याची तयारी राहील. कोणताही शेतकरी उपाशीपोटी झोपणार नाही,' अशी ग्वाही पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली.

तालुक्यातील चितेगाव (पिंपळगाव) येथे शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. मराठवाड्यावरील अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने पावसावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यापुढील काळात झाडे लागवड करून जाग‌विण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल. जो अधिकारी जनतेला झाडे तोडण्याची परवानगी देईल त्यावर गुन्हे दाखल केले जातील. शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात कल्याणकारी कार्यक्रम राबवायचा आहे.विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यात असा कल्याणकारी कार्यक्रम राबवला जाईल, ज्यामुळे औरंगाबाद जिल्हा बिगर आत्महत्याग्रस्त म्हणून घोषित होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यात ५ लाख ६७ हजार शेतकऱ्यांना नाममात्र किंमतीत अन्नधान्य वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिक स्वरुपात १४ शेतकऱ्यांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे

$
0
0

पालकमंत्री रामदास कदम यांची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे, सर्वांनी मतभेद विसरून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या कामात सहभाग नोंदवला पाहिजे,' असे प्रतिपादन पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.

स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अपुऱ्या पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याच्या पाठिशी शासन आहेच, पण अशा वेळी राजकीय मदभेद बाजूला ठेऊन मदतीसाठी धावले पाहिजे, अशी शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यसैनिक तसेच खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, आमदार संजय शिरसाठ, अतुल सावे, इम्तियाज जलील, महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासह लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मनपा आयुक्त प्रकाश महाजन, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आदींची उपस्थिती होती.

मान्यवरांना पुरस्कार प्रदान

पालकमंत्री कदम यांच्या हस्ते सहाय्यक पोलिस निरिक्षक माधव गायकवाड यांना राष्ट्रपती पोलिस प्रदक प्रदान करण्यात आले. अजहर जब्बार खान पठाण आणि अश्विनी मधुकर महिरे यांना जिल्हा क्रीडा कार्यालयाचा जिल्हा युवक, युवती पुरस्कार प्रदान करण्यात आला. वेलकम शैक्षणिक सामाजिक संस्थेला जिल्हा युवा संस्था पुरस्कार देण्यात आला. प्राथमिक तसेच माध्यमिक शिष्यवृती आणि राष्ट्रीय प्रज्ञा शोध परिक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शालिनी कीर्तीकर, साक्षी सोनवणे, सोनाली सुसुंद्र्रे, अजहर शेख, पार्थ मोरे, प्रतोष पाटणकर, वरुण पाटील, आकाश झंवर, वैभव बजाज, सुशांत राठी यांचा समावेश आहे.

अमितेश कुमारांभोवती गराडा

शासकीय कार्यक्रमासाठी शहरातील नागरिक, तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम संपल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी तरुणांनी गराडा घातला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसविरोधात भाजपचे धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संसदेचे पावसाळी अधिवेशन चालवू न दिल्याच्या निषेधार्थ भाजपने रविवारी क्रांतिचौकात काँग्रेस विरोधात धरणे आंदोलन केले. केंद्र आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपने हे पहिलेच आंदोलन होते.

'संसदेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो, सोनिया गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय, मोदीजी आगे बढो हम तुम्हारे साथ है,' आदी घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. अकराची वेळ असताना प्रत्यक्षात आंदोलन तासभर उशिराने सुरू झाले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात आमदार अतुल सावे, नारायण कुचे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, भगवान घडमोडे, एकनाथ जाधव, अनिल मकरिये, राजू बागडे, महेश माळवतकर, माधुरी अदवंत, आशा पाटील, जयश्री किवळेकर, दयाराम बसैये, राम बुधवंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. घोषणाबाजीनंतर दानवे यांनी उपस्थितांसमोर आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. त्यानंतर पत्रकारांशी दानवे म्हणाले,'हिवाळी अधिवेशन तीन आठवडे चालले, पण काँग्रेसच्या गोंधळी भूमिकेमुळे कामकाज होऊ शकले नाही. सुरुवातीला त्यांनी भू संपादन विधेयकाला मान्यता देण्याचे कबूल केले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी संसदेची परंपरा मोडली. ४४ खासदारांनी संसद बंद पाडली असे म्हणणे चुकीचे आहे. नियम तोडून त्यांनी काम केले. आम्ही शांत राहिलो. बहुमत असल्यामुळे गोंधळात विधेयके मंजूर करून घेता येणे शक्य होते, पण संसदेच्या परंपरेला धरू नव्हते. म्हणून शिस्त पाळली.'

केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्यावरील आरोपाबाबत विचारले असता रावसाहेब दानवे म्हणाले, 'सुषमा स्वराज यांनी ललित मोदींच्या पत्नीच्या उपचारासाठी केलेली मदत माणुसकीच्या दृष्टीकोनातून होती. देशाचे नुकसान करणाऱ्या क्वात्रोचीला तर काँग्रेसने स्वतः देशाबाहेर नेऊन सोडले. काँग्रेसकडे अधिवेशनात मुद्दे नसल्याने त्यांनी गोंधळ घातला,' असा दावा त्यांनी केला. एका मासिकाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह उल्लेखाचा दानवे यांनी निषेध केला. ते म्हणाले, 'बाळासाहेब महान नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यात वाटचाल केली आणि तोच वारसा पुढे सुरू आहे. त्यांच्याविषयी आक्षेपार्ह उल्लेख सहन केला जाणार नाही. '

पूर्वीच व्हायला हवे होते

राज्यातील दुष्काळाबद्दल राज्य सरकारची भूमिका काय असे विचारले असता दानवे म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांसमवेत यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. पालकमंत्री व आमदार पुढील आठवड्यात आपापल्या मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. पिण्यासाठी पाणी आणि जनावरांना चारा उपलब्ध करून दिला जाईल. दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी सरकार सज्ज आहे. शरद पवारांनी मराठवाड्याचा दौरा केला. पवार साहेब राज्याचे नेते आहेत. दुष्काळ उपाययोजना मागच्या सरकारच्या काळातच व्हायला हव्या होत्या. त्या झाल्या असत्या तर पवार साहेबांना आंदोलन करण्याची गरज भासली नसती'.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी डॉक्टर दाम्पत्य सरसावले

$
0
0

दहा कुटुंबांना दहा हजार रुपयांची मदत

म. टा. प्रतिनिधी, लातूर

डॉ. मधुकर आणि माया कुलकर्णी यांनी आपल्या विवाहाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून एक अनोखा उपक्रम राबवला आहे.

डॉ. मधुकर व डॉ. माया कुलकर्णी हे लातुरातील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य. विवाहाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचे ठरवले. काही सामाजिक संस्थांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे धनादेश, तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून दहा कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत त्यांनी दिली.

या वेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये माजी आमदार श्रीकांत जोशी, प्रा. राम डिंबले उपस्थित होते. डॉ. माया कुलकर्णी यांनी सामाजिक संस्थांना मदतीसाठी पूर्वीपासूनच नियोजन केल्याचे सांगून त्यांनी लिहिलेल्या स्नेहबंधाच्या पाऊलखुणा या पुस्तकाच्या विक्रीतून उभा राहणारा निधीही 'सेवालया'स देणार असल्याचे जाहीर केले. डॉ. अशोक कुकडे यांनी अध्यक्षीय समारोपात भारतात आर्थिक दारिद्र्य असले, तरी समाधानी लोकांची संख्या जास्त असून आपल्या समाजव्यवस्थेमुळेच हे शक्य असल्याचे सांगितले. डॉ. माया कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पप्पू कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, तर अनुजा कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images