Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कर्जमाफीची अपेक्षा ठेऊ नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

'जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीककर्ज रकमेत वीस टक्के वाढ व नवीन सभासदांना कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अपेक्षा ठेऊ नये,' असे आवाहन माजी खासदार व बँकेचे संचालक रामकृष्ण बाबा पाटील यांनी केले. तालुक्यातील २०,७११ चालू कर्जदारांना ३१ ऑगस्टपर्यंत या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

बाजार समिती सभागृहात विविध विकास सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन, गटसचिव व बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक राजेश्वर कल्याणकर, बाजार समिती सभापती अॅड. आसाराम रोठे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, बाजार समिती संचालक संजय निकम, भाऊसाहेब पाटील गलांडे, कल्याण जगताप, नानासाहेब गायके, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक सारंगधर पाटील डिके, रावसाहेब जगताप, नंदू गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

तालुक्यात लागोपाठ तीन वर्षांपासून दुष्काळ असल्याने जिल्हा बँकेने वाढीव पीक कर्ज देण्याचा धाडसी निर्णय शेतकऱ्यांची परवड होवू नये यासाठीच घेतल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अपेक्षा ठेऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

कार्यकारी संचालक राजेश्वर कल्याणकर यांनी १२ वर्षापूर्वी १०४ कोटी रुपयांच्य तोट्यात आलेली संस्था विद्यमान चेअरमन सुरेश पाटील व संचालकांनी काटकसर करून नफ्यात आणल्याचे सांगितले. या मेळाव्यास मोठ्या संख्येने सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. चालू वर्षात खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखेतून सुमारे १ लाख ६८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे.

जिल्हा बँकेची सद्यस्थिती

सद्यस्थितीत बँकेकडे १,५४८ कोटी रुपयांच्या ठेवी असून, १८०० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांशी नाळ जोडलेली असल्याने छातीवर दगड ठेवून पीककर्जाच्या रकमेत २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कार्यकारी संचालक राजेश्वर कल्याणकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यात्रा मैदानासाठी एमआयएमची मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

नाथषष्टीसाठी आरक्षित यात्रा मैदान वाचवण्यासाठी ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएम) मैदानात उतरला आहे. मैदानात व्यापारी संकुल बांधण्याच्या नगर पालिकेच्या निर्णयाविरुद्ध पक्षाने सह्यांची मोहीम राबवली. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

नाथषष्ठी उत्सवासाठी आरक्षित करण्यात आलेल्या यात्रा मैदानात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये, असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश आहेत. तरीही बांधकामासंबंधी नियमांचे उल्लंघन करून नगरपालिकेच्या वतीने यात्रा मैदानात व्यापारी संकुल बांधण्यात येत आहे. नव्याने बांधण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलामुळे नाथषष्ठी यात्रेत येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांसाठी जागाच शिल्लक राहणार नाही.

दरवर्षी साजरा करण्यात येत असलेल्या नाथषष्ठी उत्सवावर कोणतीही गदा येवू नये व यात्रा मैदान अबाधित राहावे, याकरिता एमआयएमने शहरात सह्यांची मोहीम घेतली. नळपट्टी, मालमत्ता कर दुप्पट करणे, पत्रकारांच्या कार्यालयाला कुलूप व निकृष्ट काम करणाऱ्या कंत्रांटदारावर कारवाई या मागण्यांही निवेदनात करण्यात आल्या आहेत. एमआयएमतर्फे रविवारपासून (२३ ऑगस्ट) नागरिकांच्या सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. दोन दिवसांत शेकडो नागरिकांनी सह्या केल्याची माहिती तालुकाध्यक्ष अजमत पठाण व शहराध्यक्ष सय्यद तौसिफ कादरी यांनी दिली. हे निवेदन सोमवारी मुख्याधिकारी, पैठणचे तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

उपोषणाचा इशारा

संत एकनाथ षष्ठी उत्सवादरम्यान पैठण शहरात येणाऱ्या लाखो भाविक व बाहेरगावच्या नागरिकांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या यात्रा मैदानात शॉपिंग सेंटर बांधून पैठण नगर पालिका नाथषष्टी उत्सव नामशेष करण्याचा प्रयत्न करत आहे. नगर पालिकेने शॉपिंग सेंटरचे बांधकाम न थांबवल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शहरातील ज्येष्ठ समाजसेवक बंडेराव जोशी यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्या थांबवण्याचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'संपूर्ण मराठवाडा दुष्काळाचा तिसऱ्या वर्षी सामना करीत आहे. खरीप पिके वाया गेली आहेत. चारा, पाणी व रोजगाराचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. या परिस्थितीत सरकार मात्र अत्यंत निष्क्रिय आहे,' असा आरोप किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. अतूल अंजान यांनी केला. तातडीने मदत देऊन संभाव्य आत्महत्या थांबवणे हे आज सर्वात मोठे आव्हान आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या गाजगाव (ता. गंगापूर) येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे उदघाटन किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. अंजान यांनी केले. ज्येष्ठ नेते कॉ. अॅड. मनोहर टाकसाळ अध्यक्षस्थानी होते. 'शेतकरी, अल्पभूधारक, शेतमजूर, छोट्या व्यावसायिकांना कर्ज मिळणे राष्ट्रीयकृत बँकांमुळे सोपे झाले. परंतु, आता बँकांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे,' असा आरोप त्यांनी केला. 'अच्छे दिनची लालूच दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. सुषमा स्वराज, स्मृती इराणी, छत्तीसगढ व मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा,' असे कॉ. अंजान म्हणाले.

मेळाव्याचे प्रास्ताविक भाकपचे जिल्हा सचिव प्रा. कॉ. राम बाहेती यांनी केले. कॉ. अश्फाक सलामी, कॉ. विलास शेंगुळे, कॉ. रंगनाथ कुळसकर, कॉ. गणेश कसबे यांची भाषणे झाली. किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. कैलाश कांबळे यांनी दहा ठराव मांडले. मेळाव्यासाठी कॉ. प्रेम थोरात, कॉ. रमेश शिंदे, सुभाष शिंदे, अय्यास शेख, देविदास राजाळे आदींसह १५ गावांतील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

शेतकरी मेळाव्यातील ठराव

गंगापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, वीज बिल माफ करावे, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, पीक विम्याची थकित रक्कम द्यावी, रोहयोची कामे सुरू करावीत, टेंभापुरी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे मिळतील, कामे करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

राज्याच्या अर्थसंकल्पात तीर्थक्षेत्र विकास योजनेत घृष्णेश्वर मंदिरासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली असून भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 'एएसआय'ने कामाचा वेग वाढवावा. नियोजन विभागाकडून आर्थिक तरतूद करण्यात येणार असून घृष्णेश्वर मंदिराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

श्रीक्षेत्र वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठकीत ते बोलत होते. दोन महिन्यात आराखडा तयार करण्यासाठी कन्सल्टंट, आर्किटेक्ट नेमण्याची सूचनाही त्यांनी केली. घृष्णेश्वराला सपत्निक अभिषेक करून पूजा झाल्यानंतर वेरूळ पर्यटन केंद्रात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, एएसआयचे अधीक्षक मदनसिंग चव्हाण आदींची उपस्थिती होती. या बैठकीत १० कोटी रुपये खर्चाच्या घृष्णेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. वेरूळ येथे बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती तयार करा, संपूर्ण बारा ज्योतिर्लिंगाचे याठिकाणी दर्शनाची सोय व्हावी, कल्पनेने सुसंगत अशी विकास कामे करण्याची सूचना अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केली. १९९ दुकानांचे पुनर्वसन करताना भाविकांना सहजपणे पूजासाहित्य खरेदी करता यावे, असा आराखडा करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महादेव मंदिर उद्यान

मंदिर परिसरात वनविभागाने भगवान महादेव मंदिर उद्यान तयार करून रुद्राक्ष, पांढरे फुलझाडे, बोगनवेलीचे एक हजार तर तुळशीचे ५०० झाडे दोन महिन्यांत लावून त्यांचे संवर्धनाचे काम करण्याचे आदेश अर्थ व वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिले आहेत.गणपती पुळेच्या धर्तीवर भव्यदिव्य भक्तनिवास उभारावे. यंत्राद्वारे भक्तांची संख्या मोजल्यानंतर पुरेशा सुविधा विकसित करणे सोयीचे होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जरोख्यातून २५ हजार कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राज्यातील सिंचनाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ८० हजार कोटी लागतील. त्यापैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कामे अपूर्ण आहेत. ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याकरिता सरकारने परदेशी बँकांकडून कर्ज, कर्जरोखे उभारणे आणि मोठे ठेकेदार, सरकार, बँका यांच्याशी करार करण्यात येईल. येत्या तीन महिन्यात त्यातून २५ हजार कोटी उभारण्यात येतील', अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी महाजन यांच्या उपस्थितीत सोमवारी गोदावरी खोरे मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, 'मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी १३ हजार ४६ कोटींची आवश्यकता असून, यंदा केवळ ९२२ कोटींची तरतूद बजेटमध्ये केली. राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ८० हजार कोटी लागतील. त्यापैकी केवळ ७ हजार २०० कोटींची तरतूद यावर्षीच्या अर्थसंकल्पात केली आहे.

ही कामे पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षे लागतील. निधीची तरतूद नसल्याने कामे प्रलंबित आहेत. या कामांच्या किमंती पाचपटीने वाढल्या आहेत. एकदम एवढा निधी उभारणे शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणी मंत्रीमंडळात निर्णय घेतला जाईल.

मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील २३.६६ टीएमसी पाणी देण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली. कृष्णा खोरे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७ हजार कोटींची आवश्यकता आहे. त्या कामावर ६६० कोटी रुपये खर्च झाले असून, हा प्रकल्प पूर्ण करण्याच्यादृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे. या सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला पाणी देता येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीच्या तरतुदीबाबत निर्णय घेतला जाईल.

- गिरीष महाजन, जलसंपदामंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेअर मार्केटमध्ये ५० कोटींचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेअरमार्केटमध्ये सोमवारी (२४ ऑगस्ट) झालेल्या पडझडीचे हादरे गुंतवणूकदारांना बसले. शहरातील १५ हजार गुंतवणूकदारांचे अंदाजे ५० कोटींहून अधिकचे नुकसान झाले. स्थानिक पातळीवर शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक वाढली आहे. शेअरमार्केटमील पोर्टफो‌लिओ सुमारे ३५० कोटींहून अधिक झाल्याचा अंदाज आहे. सुमारे ७ हजार ते ८ हजार अधिकृतरित्या डी-मॅट अकाऊंट आहेत. शेअर-ए-खान, ऐंजल ब्रोकिंग, आनंद राठी असोसिएट किंवा विविध बँकांच्या डी-मॅट अकाऊंट होल्डर्सद्वारे शहरात शेअर्सची देवाण-घेवाण होते.

सोमवारी झालेल्या नुकसानीचा अचूक अंदाज नाही. मात्र, डी-मॅट अकाऊंट होल्डिंग आणि अकाऊंटची साइज यानुसार अंदाजे ५० कोटींचे नुकसान झाले. सर्वच अकाऊंट धारकांचे नुकसान ते किमान ५० हजार ते ३ लाखापर्यंत आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीतील स्मॉलकॅप, मिडकॅप आणि लार्जकॅपमधील बहुतेक सर्व कंपन्यांच्या शेअरची विक्रीवर सोमवारी विपरित परिणाम दिसला. याला 'ब्लॅक मंडे' म्हणता येईल.

- अल्केश रावका, शेअरमार्केट तज्ज्ञ

शहरातील अंदाजे नुकसान हे ५० कोटींहून अधिक असू शकते. डी-मॅट अकाऊंटधारक पोर्टफोलिओ कसा मेंटेन करतोय हे सांगणे तसे कठीण आहे.

- अभय सावजी, शेअरब्रोकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्रेस वे’सोबत नवीन लोहमार्ग टाका

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबई-औरंगाबाद-नागपूर मार्गावर धावणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसला ११२४ किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. हे अंतर ३०० किलोमीटरने कमी करण्यासाठी, मुंबई-औरंगाबाद-नागपूर एक्सप्रेस वे या रस्त्याच्या कामासोबतच नवीन रेल्वे मार्ग टाकण्याची मागणी केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यांकडे करण्यात आली आहे.

मुंबई, मराठवाडा आणि विदर्भ जोडण्यासाठी एक्सप्रेसवे तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर 'एक्स्प्रेस वे'ने जोडल्यानंतर या भागाचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो. एक्स्प्रेस वे तयार करण्यासाठी सहा लेनचा प्रस्ताव आहे. हा रस्ता १२ जिल्ह्यातून जाणार आहे.

यात नागपूर, वर्धा, कारंजा, मेहकर, जालना, औरंगाबाद, वैजापूर, सिन्नर, घोटी, कल्याण, मुंबई असा हा प्रस्तावित रस्ता आहे. साधारणतः आठशे किलोमीटरचा हा एक्स्प्रेस वे तयार केला जाणार आहे. या सहा लेनच्या रस्त्यामध्ये आणखी दोन लेन वाढवून नागपूर ते मुंबई हा लोहमार्ग टाकण्याची मागणी नमो हायवे रेल्वे प्रवासी संघटनेचे गौतम नाहाटा यांनी केली आहे. एक्स्प्रेस वे सोबतच रेल्वे लाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले तर सध्या मुंबई औरंगाबाद नागपूर या मार्गाचे अंतर ३०० किलोमीटरने कमी होणार आहे. हा प्रस्ताव केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासह रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

मुंबई-औरंगाबाद-नागपूर एकसप्रेस वे सोबत रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाल्यास, रोटेगाव पुणतांबा रेल्वेमार्ग तसेच जालना खामगाव प्रलंबित रेल्वे मार्ग या मागण्याही आपोआप पूर्ण होऊ शकतील. याशिवाय भूमी अधिग्रहणसाठी रेल्वेला जास्त खर्च करण्याची गरज पडणार नाही. सहा लेन वाहनांच्या वाहतुकीसाठी राखीव राहणार आहेत. तर दोन लेनमध्ये इलेक्ट्रिफिकेशनसह रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाल्यास, रेल्वे मार्गाचे काम अधिक वेगाने होऊ शकते.

गौतम नाहटा, अध्यक्ष, नमो हायवे रेल्वे प्रवासी ऑर्गनायझेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करीत सोनसाखळी लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुलमंडी भागात दुकानदाराला जुन्या वादातून मारहाण करीत १३ हजार रुपये व सोनसाखळी पळवण्याची घटना गुरूवारी रात्री घडली. सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश रमेश आहुजा या तरुणाचे गुलमंडी भागात केक, चिप्स व खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान आहे. गुरूवारी रात्री उमेश दुकानात बसला होता. यावेळी सजन जरावले, रितेश उर्फ बिबट्या व जगदीश उखमनवाले तसेच एका अनोळखी तरुणाने दुकानात प्रवेश केला. जुन्या वादातून त्यांनी उमेशला मारहाण करीत गल्ल्यातील तेरा हजार रूपये व सोनसाखळी हिसकावून पसार झाले.

अपघातात एक जखमी

कारचालकाने निष्काळजीपणे कार चालवत दुचाकीस धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी खोकडपुरा भागात घडली. या अपघातात दुचाकीवरील प्रदीपकुमार सचिंद्रकुमार (वय ६० रा. विष्णुनगर) हे जखमी झाले. कार (क्रमांक एमएच २३ अेडी ८५०) च्या चालकाविरुद्ध प्रदीपकुमार यांच्या तक्रारीवरून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे अपघातात एक ठार

शिवाजीनगर भागात रेल्वेने चिरडल्यामुळे सुनील पंडित उटीका (वय ५० रा. पुंडलिकनगर) यांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे ही घटना घडली. मुकुंदवाडी पोलिसांनी मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये हलविला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कत्तलीसाठी नेण्यात येणारी जनावरे ताब्यात

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैधरित्या कत्तलीसाठी शहरात आणलेली तेरा जनावरे हर्सूल पोलिसांनी पाठलाग करून पकडली. सोमवारी सकाळी हर्सूल परिसरात हा प्रकार घडला. पिकअप व्हॅनचालकाला अटक करण्यात आली असून तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्सूल पोलिस ठाण्यातील कर्मचारी कैलास काळे हे पोलिस ठाण्याबाहेर उभे असताना एक पिकअप व्हॅन संशयास्पदरित्या जाताना दिसली. काळे यांनी व्हॅनचालकाला थांबण्याचा इशारा केला असता त्याने पलायन केले. त्याचा दुचाकीवर पाठलाग करून हर्सूल टी पॉइंटजवळ पकडण्यात आले. व्हॅनची तपासणी केली असता गायी व वासरे अशी १३ जनावरे आढळली. वडोदबाजारवरून सिल्लेखान्यात अवैधरित्या ही वाहने कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती व्हॅनचालकाने दिली. चालक व आरोपी कय्युमखान अय्युबखान पठाण (रा. जुना मोंढा), ही जनावरे विकत घेणारा शब्बीर कुरेशी व व्हॅन मालकाविरूद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक कय्युमखानला अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक होण्याऐवजी तो झाला दरोडखोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डीएड करताना मित्रांच्या संगतीने दारुच्या नशेमध्ये मंगळसूत्र चोरीचा गुन्हा केला आणि तो पकडला गेला. यानंतर दुचाकी चोरी, दरोडा अशी गुन्ह्याची मालिकाच सुरू झाली. शिक्षक होण्याचे स्वप्न राहूनच गेले. गुन्हे शाखेने पकडलेल्या दरोडेखोराची ही कथा आहे. शनिवारी रांजणगाव शेणपुंजी येथे त्याला अटककरण्यात आली.

संतोष लक्ष्मण सोळंके (वय २६ रा. रांजणगाव) हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. एका दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये तो पोलिसांना वाँटेड होता. शनिवारी संतोष रांजणगावात आला असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीवरून त्याला सापळा रचून पकडण्यात आले. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, मच्छींद्र ससाणे, अशोक नागरगोजे, देवीदास इंदोरे, संतोष साळवे, धीरज काबलीये, सुरेश काळवणे, प्रभाकर राऊत आदींनी ही कामगिरी केली.

मित्रांची संगत अन् दारूचे व्यसन

संतोषला बारावीमध्ये ७३ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्याचा डीएडसाठी नंबर लागला. शिक्षण सुरू असताना काही वाईट मित्राची संगत लागली. २००९मध्ये हॉटेलमध्ये दारू पिल्यानंतर त्यांनी वाळूज एमआयडीसीत मंगळसूत्र चोरीचा पहिला गुन्हा केला. संतोष दुचाकी चालवित होता. त्यांना जागेवरच पकडण्यात आले. यानंतर तो काही दुचाकीचोरांच्या टोळीमध्ये सहभागी झाला. औरंगाबाद; तसेच इतर शहरात त्याच्यावर दुचाकीचोरीचे नऊ गुन्हे दाखल आहेत. यानंतर वाळूज एमआयडीसीमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्ह्यामध्ये त्याचा समावेश होता. या गुन्ह्यामध्येच तो पसार होता. पसार असताना गुजरात येथे मावशीच्या घरी त्याचे वास्तव्य होते. फॅब्रिकेशनच्या दुकानात तो कामाला होता. त्याला दोन पत्नी व दोन मुले आहेत. त्याच्या अशा कृत्यांमुळे पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाचखोर जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या दोन कारवायामध्ये दोघांना लाच घेताना अटक करण्यात आली. सोमवारी कॅनॉट प्लेस व वाळूजमध्ये ही कारवाई झाली. शेंद्रा एमआयडीसी येथे देशी दारुचे दुकान टाकण्यासाठी दुकानदाराने मे २०१४मध्ये अर्ज केला होता. ग्रामसभेत ठराव मंजूर करून ना हरकत प्रमाणपत्रासाठी सदस्य अॅड. रमेश कचरू जाधव (वय ५३ रा. सौजन्यनगर, काल्डा कॉर्नर) याने ५० हजारांची मागणी केली होती. दुकानदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. सोमवारी सायंकाळी कॅनॉट प्लेस भागात लाच घेताना जाधवला पोलिसांनी अटक केली.

वाळूज येथील एका सेवानिवृत्त नागरिकाने त्याच्या मुलीच्या नावावर प्लॉट खरेदी केला होता. त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्ज आहे. त्याचा डीडी सेवानिवृत्त नागरिकाच्या मुलीच्या नावावर मिळणार होता. बँकेने सिडकोचे नाहरकत प्रमाणपत्र व हस्तांतर पत्राची मागणी केली होती. लिपिक सतीश अमृतराव शिरसाठ (वय ३५, रा. गुलमोहर कॉलनी, सिडको एन ५) याने या कामासाठी एक हजार रुपये मागितले होते. सोमवारी वाळूज येथे लाच स्वीकारताना सापळा रचून त्याला पकडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुशेषावर दुष्काळ वरचढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्यासाठी झालेल्या आमदारांच्या विशेष बैठकीत दुष्काळाचाच विषय ऐरणीवर आला. अनुशेष बाजूला सारून आमदारांनी दुष्काळाचेच प्रश्न मांडले आणि मंत्र्यांनीही हा 'नावडता' विषय टाळला. वीजपुरवठा आणि आरोग्य क्षेत्रातील अनुशेष दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे, एवढेच सांगून अनुशेषाची बैठक अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आटोपती घेतली.

सोमवारी (२३ ऑगस्ट) विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी घेण्यात आलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, खासदार चंद्रकांत खैरे, संजय जाधव उपस्थित होते. यावेळी मराठवाड्यातील आमदारांनी दुष्काळाचेच प्रश्न मांडण्यास सुरुवात केली. शिवसेनेच्या आमदारांनी अनुशेषाबाबत सूचना, प्रश्न मांडण्यासाठी केवळ दोन-दोन मिनिटे दिल्याचे सांगून बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली. सिंचनाच्या अनुशेषावर त्यावर केळकर समितीच्या अहवालाचा हवाला देऊन अर्थमंत्र्यांनी त्यावर पडदा टाकला. मराठवाड्यातील आमदारांनी अनुशेषावर केलेल्या सूचनांचा एकत्रित विचार मंत्रिमंडळ बैठकीत करणार असल्याचे सांगितले. अनुशेष दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाबाबत केलेल्या उपाययोजनांचा पुन्हा एकदा पाढा वाचला.

मराठवाड्यातील तीव्र पाणीटंचाई आहे. त्याचबरोबर येत्या काळात पाऊस न पडल्यास टंचाई निवारणासाठी विभागाच्या लगत असलेल्या धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा पर्याय असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

शेतकरी आत्महत्यांचे खापर आघाडीवर

शेतकरी आत्महत्या या गेल्या १५ वर्षांमधील चुकीच्या धोरणांचा परिपाक असल्याचे सांगून मुनगंटीवार यांनी आत्महत्यांचे खापर गेल्या सरकारच्या माथी फोडले. ५२ टक्के रोजगार कृषी क्षेत्रात आहे. देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या या 'जाणते राजे' म्हणवून घेणाऱ्या शरद पवार यांच्या काळात झाल्याची टीकाही मुनगंटीवार यांनी केली.

पाणीपुरवठा योजनेच्या थकित बिलांची २५ टक्के रक्कम टंचाई निधीतून

दुष्काळी भागातील उपसा जलसिंचन योजनांची बिले सरकार भरणार

जून २०१६नंतर कृषिपंपाच्या विद्युतीकरणाचा अर्ज प्रलंबित राहणार नाही

विशिष्ट कालावधीत जलसंपदा विभागाची कामे पूर्ण करणार

विशिष्ट कालावधीत आमदारांच्या निधी टंचाईसाठी खर्च करता येईल

कार्ड उपलब्ध नसलेल्या शेतकरी, मजुरांना स्वस्त धान्य देण्याचा विचार

दुष्काळ मदत निधी म्हणून ६० लाख रुपये झाले जमा

आवश्यकतेनुसार इतर जिल्ह्यांत जनावरांसाठी छावण्या वाढविणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संयुक्त कुटुंबातला ‘वर’ हवा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केलाय. 'वर' म्हणून मला नोकरीवाला, व्यावसायिक मुलगा चालेल. फक्त तो संयुक्त कुटुंबात राहणारा हवा'. हजारो लोकांच्या उपस्थितीत एका मुलीने आपल्या अपेक्षा मोठ्या आत्मविश्वासने व्यक्त केल्या. तेव्हा लिंगायत-वीरशैव वधू-वर परिचय मेळाव्यातील उपस्थित थक्क झाले.

रविवारी (२३ ऑगस्ट) लिंगायत वीरशैव वधू-वर मेळावा समितीतर्फे हा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्या ज्योतीनगरातील विश्वरुप हॉलमध्ये झाला. मेळाव्यास लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील मुला-मुलींची उपस्थिती होती. खासदार चंद्रकांत खैरे यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी अॅड. उमाकांत पाटील होते. दीप प्रज्वलन व महात्मा बसवेश्वर व मन्मथस्वामी यांच्या प्रतिमेस मार्ल्यापन करून कार्यक्रम सुरू झाला. संयोजक विश्वनाथ संगशेट्टी यांनी प्रास्ताविक केले. 'वधू-वर मेळावे काळाची गरज असून, त्यातूनच सामूहिक विवाह व्हावेत', असे आवाहन खैरे यांनी केले. मेळाव्यास कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यातून प्रतिसाद मिळाला. जंगम, वाणी, गवळी, कोष्टी, तेली, माळी, सोनार, गुरव, कुंभार, न्हावी, परीट, फुलारी, सुतार, बुरुड, कक्कया आदी लिंगायत पोटजातीतील ५०० हून अधिक मुला-मुलींची यावेळी नोंदणी झाली. स्मिता ममदापुरे, माधुरी दोंडगे, शकुंतला विभुते यांनी सूत्रसंचलन केले. विश्वनाथ संगशेट्टी, जगन्नाथ वाडकर, सुधाकर काचेवार, सुधाकर मापारी, मंगल मिटकरी, उमेश लिंभारे, दीपक उरगुंडे, सुधाकर वाडकर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरता काम पाहिले. यावेळी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, गिरजाराम हाळनोर, वीरभद्र गादगे, प्रदीप बुरांडे, अॅड. बसवराज सोनटक्के, अॅड. सुनील वारद आदींची उपस्थिती होती.

महात्मा बसवेश्वरांनी सर्व पोटजातींमधील भेद मिटवला. स्त्री-पुरुष, वर्णभेद नाकारला. पोटजातींना एकत्र आणून विवाहसंबंध जोडले. १०० नोंदणींपासून आमची सुरुवात झाली. ती यंदा ५०० वर पोचली. यंदा मुलींचा सहज व आत्मविश्वासपूर्वक वावर पाहून परिचय मेळाव्याचे आयोजन सफल झाले.

- विश्वनाथ संगशेट्टी, संयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायसन्ससाठी हेल्मेट घालून परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहन चालविण्यासाठी आवश्यक असणारे लायसन्स काढण्यापूर्वी उमेदवारांना ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागते. पर्मनंट लायसन्ससाठी ड्रायव्हिंग टेस्ट देताना आता हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी उमेदवारांनी हेल्मेट घालूनच ही परीक्षा दिली, मात्र चार चाकी वाहन चालविण्याचे लायसन्स काढणाऱ्या अनेक उमेदवारांनी सीट बेल्ट न लावता परीक्षा दिली.

औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयात सोमवारपासून लायसन्स घेण्यासाठी आलेल्यांचा कोटा वाढविण्यात आला आहे. प्रत्येक दिवशी दोनशे लर्निंग आणि दोनशे पक्के लायसन्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरटीओ कार्यालयात सोमवारी लायसन्स घेण्यासाठी आलेल्यांची फार मोठी रांग नव्हती. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नुकतीच लायसन्सबाबत नवीन नियमावली घोषित केली आहे. त्यानुसार पक्के लायसन्स काढण्यापूर्वी ड्रायव्हिंग टेस्टसाठी दुचाकी वाहनधारकांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. सोमवारी अनेक उमेदवारांनी हेल्मेट घालूनच ही टेस्ट दिली. चार चाकी वाहनधारकांकडे मात्र मोटार वाहन निरीक्षकांचे लक्ष नसल्याने याचा फायदा घेऊन अनेक उमेदवारांनी कारचा सीट बेल्ट न बांधताच आपली परीक्षा उरकली.

एकच हेल्मेट

पक्के लायसन्स तयार करण्यासाठी आलेल्या उमेदवारांकडे हेल्मेटच नव्हते. यामुळे तिथे उपलब्ध असलेले एकच हेल्मेट घालून अनेक उमेदवारांनी परीक्षा दिली. एका उमेदवारांची परीक्षा संपल्यानंतर तो आपली हेल्मेट काढून दुसऱ्या उमेदवाराला देत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आंबेडकरांचे घर सरकारच खरेदी करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये वास्तव्य केलेल्या घराच्या खरेदीचा व्यवहार सुरू करण्याचे आदेश सचिवांना देण्यात आले आहेत. त्यासाठी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेच तातडीची बैठक होणार आहे, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेरूळ येथे दिली.

अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी श्रावणी सोमवारनिमित्त वेरूळ येथे घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर 'मटा'शी बोलताना त्यांनी लंडनमधील घर राज्य सरकार खरेदी करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासंदर्भात मंत्रालयात संपर्क करून लंडनला येथील उच्च आयुक्तांना ई-मेल करण्याच्या सूचना दिल्या. 'याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून, मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याबद्दलचा निर्णय १५ मिनिटांत घेतला जाईल. खरेदी व्यवहार सुरू करण्याचा आदेश समाज कल्याण सचिवांना दिला असून, त्यासाठी ४० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे,' अशीही माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संथारा’ निर्णयाला शांतीमोर्चाने विरोध

$
0
0

'संथारा' निर्णयाला शांतीमोर्चाने विरोध

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'संथारा' व्रतावर बंदी घालण्याच्या राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सोमवारी (२४ ऑगस्ट) सकल जैन समाजातर्फे विराट शांतीमोर्चा काढण्यात आला. जवळपास दहा हजार बांधव या आंदोलनात सहभागी झाले. दिवसभर दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली.

पैठणगेट येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. गुलमंडी, सिटीचौक मार्गे हा मोर्चा शहागंज भागातील गांधी पुतळा चौकात पोहाचला. याठिकाणी मोर्चाची सांगता झाली. जैन समाजातील जवळपास ४० संघटना मोर्चात सहभागी झाल्या. वाळूज तसेच अन्य भागातून जैनबांधव आले होते. सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यावेळी म्हणाले, 'जैन समाज हा शांतीप्रिय आहे. मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात न्याय मागितला जाईल.' आंदोलनात सरचिटणीस महावीर पाटणी, कोषाध्यक्ष जी. एम. बोथरा, कार्याध्यक्ष सुभाष झांबड, उपाध्यक्ष विकास जैन, प्रशांत देसरडा, प्रकाश बाफना, ललित पाटणी, डॉ. शांतीलाल संचेती, जीनदास मोगले, चांदमल सुराणा, प्रकाश मुगदिया, रतिलाल मुगदिया यांच्यासह जैनबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी अनुज दगडा, ऋषभ कासलीवाल, अमोल पाटणी, सावन चुडीवाल, अमित काला, विनोद बोकडिया आदींनी पुढाकार घेतला.

लक्षवेधी फलक

मोर्चात महिला, युवक-युवतींनी विविध घोषणांचे फलक हाती घेतले होते. या घोषणा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. 'ये लढाई है न्याय की धर्म के सन्मान की, आखिर कब तक चूप बैठेंगे, धर्म बचाव आंदोलन, संथारा आत्मघात नहीं आत्मउथ्थान है, जगमग चमके जैन समाज संथारा पे विश्वास है, जैन धर्म की एक ही आवाज संथारा है आत्मकल्याण, संथारा है विरो का काम, आत्महत्या कायरो का काम' अशा विविध घोषणा मोर्च्यात चर्चेचा विषय ठरल्या. जैन धर्माचा पंचरंगी ध्वजही लोकांच्या हातात दिसत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सामाजिक दातृत्वाने भारलेला सोहळा

$
0
0

गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मदत सुपूर्द, गुणवंतांच्या पालकांना अश्रू अनावर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हलाखीच्या परिस्थितीतही परिश्रमपूर्वक गुणवंत ठरलेल्या दहावीच्या पाच विद्यार्थ्यांना मदत करणारा 'मटा हेल्पलाइन' कार्यक्रम अतिशय भावुक ठरला. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी समाजातील शेकडो दात्यांनी भरभरून केलेली मदत या गुणवंतांच्या स्वाधीन करण्यात आली. या मदतीने भारावलेल्या विद्यार्थी व पालकांना अश्रू अनावर झाले.

यंदा दहावीचा निकाल लागला अन् काजल अंबिलवादे (वेणुताई चव्हाण हायस्कूल), पवन बनगर (स्वामी समर्थ विद्यालय), पूजा लुटे (जय भवानी विद्या मंदिर), गीता शिंदे (आर. पी. नाथ हायस्कूल), असरार शहा (वेणुताई चव्हाण हायस्कूल) या पाच विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. एवढी टक्केवारी मिळवणारे अनेक विद्यार्थी आहेत. पण, दररोज गरिबीशी झगडत या पाच विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण चकीत करतात. कुणाचे वडील गवंडीकाम करतात, तर कुणाची आई धुणी-भांडी करते. हातावर पोट असलेल्या कुटुंबांमध्ये गुणवंतांनाही परिस्थितीशी दोन हात करावे लागले. या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'मटा हेल्पलाइन' उपक्रमाअंतर्गत आपले संवेदनशील वाचक आणि समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले अन् भरभरून मदत आली. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात सोमवारी (२४ ऑगस्ट) ही मदत (चेक वाटप) विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमाला सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर, एमआयटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद निकाळजे व देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ संपादक पराग करंदीकर यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चेक प्रदान करण्यात आले. वरिष्ठ सहाय्यक संपादक प्रमोद माने यांनी आभार मानले. मकरंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन् शब्द अबोल झाले

मुलगी गुणी असली तरी पुढे कसे शिकवावे, असा प्रश्न काजल अंबिलवादे हिच्या आई-वडीलांना पडला होता. जेमतेम चौथी शिकलेले काजलचे वडील मुलगी झाल्यामुळे नाराज होते, पण याच मुलीने घराचे नाव मोठे केले, असे सांगताना आई प्रीती अंबिलवादे यांना अश्रू अनावर झाले. 'मटा हेल्पलाइन'मुळे तिच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. या ऋणातून मुक्त होण्यासाठी माझी मुलगी पुढील काळात गरजूंना मदत करील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मनोगताने उपस्थित गहिवरले.

'मटा' तुमच्या सोबतीला

मागील वर्षीचा गुणवंत विद्यार्थी देवेंद्र रंधवे याचे मनोगत विद्यार्थ्यांसाठी प्रेरक ठरले. रेल्वे स्टेशन परिसरात राहणारा देवेंद्र बारावीत शिकतो. वडील मिस्त्रीकाम आणि आई धुणी-भांडी करते. या परिस्थितीत शिकणे कठीण होते, मात्र 'मटा'ने मदत केल्याने शिक्षण सुरू आहे.माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी यश मिळवल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपावी अन् 'मटा' आपल्या पाठिशी असल्याची जाण ठेवावी, असे देवेंद्र म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

सामाजिक ऋण

'मटा हेल्पलाइन'साठी समाजातील दानशूर व्यक्तींनी भरभरून मदत केली. या मदतीतून साडेबारा लाख रुपयांचा निधी जमा झाला. तब्बल २४२ दात्यांनी चेकद्वारे मदत केली. औरंगाबाद शहरासह सेलू, नांदेड, जिंतूर, जालना, बीड अशा अनेक गावातून मदतीचा ओघ सुरू होता.



कुटुंबाचे आणि 'महाराष्ट्र टाइम्स'चे पाठबळ आमच्या यशासाठी महत्त्वाचे आहे. शिक्षणाची जिद्द कायम असून, चांगल्या पदावर काम करायचे आहे. या वाटचालीसाठी 'मटा'ने दिलेली मदत अनमोल आहे. - पूजा लुटे, गुणवंत विद्यार्थिनी

घरची परिस्थिती बिकट असताना चांगले शिक्षण घेणे कठीण आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असती तर उच्च शिक्षण सहज घेता येते, मात्र परिस्थितीत शक्य नसते. माझ्यासारख्याला'मटा'ने मोलाची मदत केली याचा अभिमान आहे. - पवन बनगर,गुणवंत विद्यार्थी

समाजात भरपूर हुशार विद्यार्थी आहेत, पण घरची परिस्थिती चांगली नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येतात. माझ्याप्रमाणे इतर मुलांनाही समाजाने मदत केल्यास कुणाचाही शिक्षणाचा हक्क हिरावला जाणार नाही. - काजल अंबिलवादे, गुणवंत विद्यार्थिनी

'मटा हेल्पलाइन'च्या मदतीमुळे आता मला चांगले शिक्षण घेता येईल. माझ्या यशात शिक्षक, आई-वडील यांचा वाटा आहे. आता 'महाराष्ट्र टाइम्स'ने मदतीचा हात दिल्याने अधिक उत्साह आला आहे. - असरार शहा, गुणवंत विद्यार्थी

सध्या अकरावी सायन्सला प्रवेश घेतला आहे. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात चांगले शिक्षण घेण्याची इच्छा आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने केलेल्या या मदतीमुळे अभ्यास करण्यासाठी अधिक बळ मिळाले. - गीता शिंदे, गुणवंत विद्यार्थिनी

गुणवंतांच्या जिद्दीला शाबासकी

बिकट परिस्थितीवर मात करून यशाचे नाणे खणखणीत वाजविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांचे अनुभवी बोल प्रेरणादायी ठरले. ध्येय गाठताना अडचणी टाळून वाटचाल करण्याचा विचार विद्यार्थ्यांना प्रेरित करून गेला.

'मटा हेल्पलाइन' हा उपक्रम वेगळा व महत्त्वाचा आहे. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांना मदत आवश्यक असते. खडतर परिस्थितीत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांची निवड करून 'मटा'ने आर्थिक मदतीचा हात दिला. ही निव्वळ आर्थिक मदत आहे, असे मी मानत नाही. आर्थिक मदतीसोबतच हा भक्कम आधार आहे. या वाटचालीत आपल्या पाठिशी कुणीतरी असल्याची जाणीव आहे. त्यामुळे इथपर्यंत पोहचलेल्या विद्यार्थ्यांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता उमेदीने वाटचाल करावी. काळे-गोरे, उच्च-नीच असा भेद यश मिळवण्यापासून तुम्हाला रोखू शकत नाही. आपले ध्येय साध्य करण्यासाठी विविधांगी वाचन आवश्यक आहे. भरपूर वाचन केल्यास तुमची मते बनवायला शिकता. अन्यथा, आपल्यावर कुणी मते लादत आहे याची जाणीव अस्वस्थ करील. महागड्या वस्तूंचा सोस टाळून बचत करायला शिका. नेहमी स्वतःशी स्पर्धा करा. स्पर्धेत अपयशी ठरल्यास कारणांचा शोध घ्या. पुढील यश तुमचेच असेल. आपल्या यश-अपयशाबद्दल इतरांना कधीच दोषी धरू नका. कारण आपल्या कष्टावरच यश अवलंबून असते. - डॉ. आनंद निकाळजे, संचालक, एमआयटी हॉस्पिटल.



एखाद्याला परिपूर्ण मदत करणेही आवाक्याबाहेर असते. कारण आर्थिक मदत केली तरी पूर्ण मदतीची अपेक्षा असतेच. बीडला जिल्हाधिकारी असताना याचा मला पुरेपूर अनुभव आला. दुष्काळ असल्यामुळे घरी काही पिकले नाही, असे विद्यार्थी सांगत. कॉलेजांना फोन करून शक्य तेवढी मदत केली. काही कॉलेजने विनाशुल्क शिक्षण दिले, मात्र आपण मोजक्याच विद्यार्थ्यांना मदत करतो. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाची परवड झालेली शेकडो मुले आहेत. त्यांच्या भवितव्यासाठी कॉर्पोरेट, प्रसारमाध्यमे आणि महाविद्यालयांनी एकत्र येण्याची गरज आहे. दरमहा दोन हजार रुपये मदत शक्य झाली तरी खूप आहे. खानावळीचे पैसे आणि थोडा इतर खर्च दिल्यास अडचण दूर होईल. 'मटा हेल्पलाइन' माध्यमातून वेगळा प्रयत्न सुरू असल्याचा आनंद आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी कौशल्ये प्राप्त करून प्रत्येक विद्यार्थ्याने यश मिळवावे एवढीच अपेक्षा आहे.

- सुनील केंद्रेकर, मुख्य प्रशासक, सिडको.



सभोवताली प्रतिकूल परिस्थितीचे चटके अन् अनंत अडचणी. या अडचणींवर मात करीत गरीब विद्यार्थ्यांनी यश मिळवले याचा अतिशय आनंद वाटतो. कुणाच्या घरात लाइट नव्हती. पाणी नव्हते. लहानसे घर, आजुबाजुला गोंगाट अशा समस्यांकडे दुर्लक्ष करून अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. परीक्षेतील मार्क्स हा प्रश्न नसतो तर, आपण कुठे पोहचलो हे महत्त्वाचे आहे. चांगले काम केल्यास समाज कौतुक करण्यासाठी पुढे येईल. सुरक्षित असूनही आपण किती अभ्यास करतो याची जाणीव इतर विद्यार्थ्यांनी ठेवावी. कारण पाचपर्यंत कॉलेज व थोडा अभ्यास एवढ्याच चाकोरीत विद्यार्थी अडकले आहेत. व्यक्तिमत्त्व विकासासाठी भरपूर वाचन करा. देशभरातील घडामोडी ज्ञात असल्यास अभ्यासाला मदतच होते. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी देवगिरी अभियांत्रिकी कॉलेज तयार आहे. विद्यार्थ्यांनी फक्त ध्येयाकडे वाटचाल करावी या शुभेच्छा.

- डॉ. उल्हास शिऊरकर, संचालक, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय.



थोडक्यात

गुणवंतांचे अनुभव ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी

मुलांचे कौतुक पाहताना पालकांना भावना अनावर

उच्च शिक्षणासाठी मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन

मटा हेल्पलाइन उपक्रमाला भरभरून शुभेच्छा

मराठवाड्यातील शेकडो दात्यांनी केली मदत

मी दोन वर्षांपासून हा उपक्रम पाहतो आहे. अशा उपक्रमामुळे समाजातील अनेकांना बळ मिळाले आहे. अशा उपक्रमातून 'मटा'ने सामाजिक भान जपले आहे. अशा उपक्रमांना सर्वसामान्यांचाही पाठिंबा उर्त्स्फूतपणे मिळतो आहे. यात दरवर्षी निश्चित भर पडेल.

- जीवन साहू

सुरुवातीपासून मी या उपक्रमाकडे पाहते आहे. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे. याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. - प्रिती नारखेडे

गरीब कुटुंबातील हुशार मुलांना इच्छा असूनही शिक्षण घेणे शक्य होत नाही. हा उपक्रम त्यांना आधार देणारा आहे. शहरातील नागरिकही उपक्रमाला भरभरून मदत करतात. त्यांचे हे मोठेपणही महत्त्वाचे आहे. या उपक्रमाची व्यापीत निश्चितच वाढेल अन् अनेक विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊ शकतील. - ए. डी. मनवर

महाराष्ट्र टाइम्सचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. समाजातील अनेकजणांना परिस्थितीमुळे शिक्षण घेणे अशक्य होते. मदतीचा हात देऊन त्यांना उभे करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. निश्चितच हे विद्यार्थी भविष्यात याचा उपयोग करत आपला ठसा उमटवतील. - तेजपाल कानसा

प्रत्येकाची कहाणी ऐकली की अंगावर शहारे उभे राहतात. त्यांना मदत करण्यासाठीचा 'मटा'चा हा उपक्रम प्रेरणा देणारा आहे. यामुळे अशा अनेकांना प्रोत्साहन ‌मिळेल. या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा तर झालाच. ते स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतर इतरांनाही मदत करतील. - कुनिका पटेल

कठीण परिस्थितीवर मात करत यशाचे शिखर गाठणाऱ्या या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. मोठ्या कष्टात ते विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना 'महाराष्ट्र टाइम्स'ने वाचकांच्या माध्यमातून केलेली ही मदत वाखणण्याजोगी आहे. - भाग्यश्री जाधव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वाळूचा ट्रक पकडला

$
0
0

कन्नडः औरंगाबाद- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हतनूर शिवाराती गट नंबर ३२५ नजिक मंगळवारी (२५ ऑगस्ट) सकाळी पावणेअकरा वाजता अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक (एम.एच. २० सी. टी. ५१७६) पकडला. हा ट्रक कन्नडहून औरंगाबादकडे जात होता. पथकात मंडळ अधिकारी बी. एस. पठाण, ई. एस. ढहाके, तलाठी रंजना कल्याणकर, विकास वाघ, आशीष सुरपाम, राम दुधभाते यांचा समावेश आहे. ट्रक व आठ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. याप्रकरणी कन्नड पोलिस ठाण्यात ट्रकमालक अजीम पटेल व चालक सलीम इसाक शहा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तपास पोहेकॉ. मनोज घोडके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागपूर-मुंबई हायवे फुलंब्रीमार्गे करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपूर - मुंबई हायवेची घोषणा केली आहे. हा मार्ग कोठून असेल यासंदर्भात मात्र अद्याप निश्चित नियोजन करण्यात आलेले नाही. हा मार्ग जाफराबाद व फुलंब्री तालुक्यातून न्यावा. यामुळे सद्यस्थितीतील मार्गात ४० किलोमीटर अंतर कमी होऊ शकते आणि देवस्थाने महामार्गाने जोडली जाऊ शकतात, अशी मागणी श्रीक्षेत्र राजूर तालुका कृती आणि विकास समितीने केली आहे. समितीचे अध्यक्ष बाबुराव खरात, सचिव अरविंद थोटे, बालाप्रसाद दरक, शिवाजीराव थोटे आणि सदस्यांनी सविस्तर निवेदन दिले आहे.

नव्याने जाहीर केलेला मार्ग नागपूर - अमरावती - अकोला - जालना - औरंगाबाद व नाशिकमार्गे मुंबई असा मार्ग प्रस्तावित आहे, पण हा मार्ग खामगाव - चिखली येथून वळवून जाफराबाद - टेंभुर्णी - राजूर गणपती - फुलंब्री - खुलताबाद - वेरूळ - कसाबखेडा फाटा येथून पुढे वैजापूर - नाशिककडे जाऊ शकतो. समितीने सुचविलेल्या मार्गावरून महामार्ग निवडल्यास शेगाव, राजूर, भद्रा मारोती, वेरूळ, शिर्डी ही देवस्थाने महामार्गाने जोडली जातात.

जालना हे शहर औरंगाबाद शहराचे उपनगर किंवा जुळे शहर म्हणून पुढे येत आहेत. या दोन्ही शहरांमध्ये वाहतुकीचे व दळणवळणाचे प्रमाण जास्त आहे. भविष्यात दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमुळे (डीएमआयसी) हे प्रमाण वाढणारच आहे. हा एक्स्प्रेस हायवे जालना व औरंगाबादमधून घेणे खर्चिक आहे.

मेहकर - सिंदखेडराजा - देऊळगावराजा असा येणार असल्यास हा मार्ग पुन्हा देऊळगावराजा येथून अकोलादेवमार्गे राजूरकडे वळविता येऊ शकतो. पुढे हा मार्ग फुलंब्रीकडे न्यायचे ठरले तर, कोलते टाकळी येथून हा मार्ग लाडसावंगी - करमाडमार्गे औरंगाबादला बीडबायपासला जोडून पुढे नाशिकला पाठवता येऊ शकतो. या दोन्ही पर्यायांचा विचार करावा, अशी मागणी कृती समितीने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संरक्षक भिंतीसाठी दीड कोटी मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिराची संरक्षक भिंत बांधण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने एक कोटी ४५ लाख रुपये मंजूर केले आहेत. मंदिराच्या १३ एकर दोन गुंठे जागेवर ही भिंत बांधण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक मदनसिंग चव्हाण यांनी दिली. घृष्णेश्वर मंदिराची संरक्षक भिंत मंदिराशी सुसंगत असावी, अशी सूचना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्याने निविदा काढण्यापूर्वी डिझाइनमध्ये फेरबदल करावे लागणार आहेत.

श्री घृष्णेश्वर मंदिर केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या ताब्यात असून, मंदिराची उर्वरित जागा राज्य सरकारच्या मालकीची आहे. हा प्राचिन वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी व परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षक भिंत आवश्यक आहे. घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी दररोज पाच हजार, तर वर्षभरात २५ ते ३० लाख भाविक येतात. त्यांच्याकडून देवस्थानला वार्षिक सरासरी सव्वाकोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यातुलनेत भाविकांना किमान मुलभूत सुविधा मिळथ नाहीत. भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

कल्याण मंडप

मंदिरानजिक तीन एकर जागा उपलब्ध झाल्यास तिरुपती बालाजी देवस्थानकडून कल्याण मंडपासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यातून कल्याण मंडप बाधला जाईल.

१७ कामे प्रस्तावित

घृष्णेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात १७ कामे प्रस्तावित असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी राजू नंदकर यांनी दिली. मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवणे, दुकानांचे पुनर्वसन, पार्किंग, स्काय वॉक किंवा भूमिगत रस्ता, कायमस्वरूपी बॅर‌िकेट, पोलिस मदत केंद्र, पादत्राणे-मोबाइल ठेवण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, दिशादर्शक फलक, पर्यटक-भक्तनिवास, स्वच्छतागृहे, पिण्याचे शुद्ध पाणी या कामांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या मदतीमुळे वाचले महिलेचे प्राण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त महिलेचा जीव वाचला. तीसगाव फाट्याजवळ मंगळवारी (२५ ऑगस्ट) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. जखमी महिलेवर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालतील पोलिस उपनिरीक्षक राजश्री आडे मंगळवारी गंगापूर तालुक्यात तपास कामानिमित्त जात होत्या. तेव्हा उड्डाणपुलाजवळ त्यांना नागरिकांची गर्दी दिसली. तेथे एक महिला जखमी असल्याचे दिसले व लोक केवळ पाहत होते, कोणी मदत करीत नव्हते. आडे यांनी जखमी महिलेस तत्काळ घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रिता संतोष कस्तुरे (वय ३० , रा. विष्णूनगर) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्या बजाजनगर येथील तनवाणी शाळेत शिक्षिका आहेत. स्कुटीवरुन शाळेत जाताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी झाल्या. दरम्यान, त्यांची प्रकृतीत सुधारणा असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 'अपघातग्रस्तांना वेळेवर मदत झालीच पाहिजे. तसे न झाल्यास कोणाच्याही जीवावरही बेतू शकते. शासकीय कर्तव्य म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल केले,' पोलिस उपनिरीक्षक राजश्री आडे यांनी सांगितले.

पोलिस अधिकारी आडे यांनी व त्यांच्या पथकाने जखमी रिताला दाखल केल्याने वेळेवर उपचार मिळू शकले. आम्ही हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत त्यांनी पत्नीची देखभाल केली.

- संतोष कस्तुरे (रिता यांचे पती)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images