Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अधिकाऱ्यांच्या घरासमोर मनसेने खोदले खड्डे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन छेडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी महापालिकेच्या आयुक्तांसह सात अधिकाऱ्यांच्या घरांसमोर खड्डे खोदले. सकाळी सहा वाजेच्या सुमारासच हे कार्यकर्ते अधिकाऱ्यांच्या घरा बाहेर जमले व त्यांनी घरासमोर असलेल्या रस्त्यावर खड्डे खोदण्याचे काम सुरू केले.

दिल्ली गेट येथील महापालिकेच्या आयुक्तांच्या शासकीय बंगल्यासमोर खड्डा खोदून आंदोलनकर्ते कार्यकर्ते इतर अधिकाऱ्यांच्या घरांकडे रवाना झाले. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, मुख्यलेखाधिकारी अशोक थोरात यांच्या घरासमोरही मनसेच्या कार्यकर्त्यांनी खड्डे केले. यासाठी गौतम आमराव यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या सोबत अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी अधिकाऱ्यांच्या घरासमोर खड्डा केल्यावर त्यात मनसेचा झेंडा लावला.

या संदर्भात पत्रकारांशी बोलताना शहर अभियंता सखाराम पानझडे म्हणाले, त्या कार्यकर्त्यांनी कुठे खड्डे केले आहेत याची माहिती जमवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छेडछाड करणाऱ्यास जमावाने चोपले

$
0
0

औरंगाबाद : विद्यार्थिनीची छेड काढत असल्याच्या संशयावरुन ४० वर्षीय व्यक्तीस संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. औरंगपुऱ्यातील बसस्टॉप परिसरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. मंगळवारी दुपारी औरंगपुऱ्यात नेहमीप्रमाणे विद्यार्थी, विद्यार्थिनी घरी जाण्यासाठी बस, रिक्षांची वाट पहात उभे होते. त्याचवेळी एक ४० वर्षीय व्यक्ती तेथील विद्यार्थिनीची छेड काढत असल्याचा संशय आल्याने संतप्त जमावाने त्यास बेदम मारहाण केली.

याबाबत माहिती मिळताच दामिनी पथकाने घटनास्थळी धाव घेत छेडछाडीचा आरोप असलेल्या हरिश्चंद्र मोहन पिंपळे ( वय ४०, रा- वनगाव) यास ताब्यात घेतले. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायरान विक्रीप्रकरणी चौथा आरोपी गजाआड

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

हर्सूल शिवारातील शासकीय गायरान जमीन स्वत:च्या मालकीची भासवून विकल्याच्या आरोपावरून चौथ्या आरोपीला बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. त्याला मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.व्ही. हिंगणे यांच्या समोर हजर करण्यात आले असता त्यांनी २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक युनूस सत्तार शेख यांना हर्सूल शिवारातील गायरान जमीन स्वत:च्या मालकीची असल्याचे भासवून सय्यद अल्ताफ हुसेनी सय्यद अख्तर याने एक एकर ३० गुंठे शेत जमीन विकली. अल्ताफने बनावट कागदपत्र तयार करून २ कोटी ५० लाख रुपयास ही जमीन विकली होती. बांधकाम व्यावसायिकाकडून ९० लाख रुपये घेतले. पोलिसांनी तपास करून आतापर्यंत तीन जणांना अटक केली. चौथा साथीदार सय्यद अल्ताफ यास सोमवारी रात्री अटक केली. त्याला पुढील तपासासाठी पोलिस कोठडी देण्यात यावी अशी विनंती कोर्टापुढे केली. ती कोर्टाने ग्राह्य धरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य केंद्राअभावी पडेगावात हाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिटमिटा, पडेगाव भागात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. गरीब रुग्णांना उपचारासाठी पायपीट करीत घाटी हॉस्पिटलमध्ये जावे लागते.

महापालिका निर्माण करताना मिटमिटा, पडेगावचा शहरात समावेश करण्यात आला. परंतु, या गावांमध्ये नागरी सुविधा देण्याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले आहे. स्वच्छता, पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहेच. परंतु, पालिका निर्माण झाल्यापासून येथे साधे प्राथमिक आरोग्य केंद्रही स्थापन करण्यात आलेले नाही. या दशकात पडेगाव व मिटमिटा भागात नागरी वस्ती वाढत आहे. वाळूज औद्यागिक वसाहतींतील कामगार येथे घरे घेण्यास प्राधान्य देत आहेत. या भागात नवनवीन गृहसंकुले बांधली जात असल्याने

मध्यमवर्गियांची संख्याही वाढत आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येला आरोग्य सुविधा देण्याच्या महापालिकेला विसर पडला आहे.पडेगाव, मिटमिट्यातील नागरिकांना मुलांना डोस देण्यासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागते. 'पालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने मुलांना लस, डोस देण्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागते. तेथे लस उपलब्ध नसेल, तर शहरात जावे लागते,' अशी व्यथा प्रियांका गायकवाड यांनी मांडली. आर्च आंगणचे रहिवासी प्रा. पांडुरंग सवाई यांनी, या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याकडे होणाऱ्या दूर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला. सुनील म्हस्के यांनी ठिकठिकाणी साचलेल्या डबक्यांमुळे डासांची पैदास होऊन आजार वाढत असल्याकडे लक्ष वेधले.

पालिकेकडून आरोग्य सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे मान्य केले. 'मी स्थायी समिती सदस्य असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीसाठी प्रयत्न करीन.

- रावसाहेब आमले, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा संचालिका, शिक्षिकेस कारावास

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

कलश मंगल कार्यालयाजवळ असलेल्या प्ले ग्रुप नर्सरीतील साडे तीन वर्षीय चिमुकला पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू पावला होता. या प्रकरणात शाळेच्या संचालिका प्रिया पाठक आणि शिक्षिका संपदा किवळेकर यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखले - पुरकर यांनी दोषी ठरवून एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.

खडकेश्वर येथील अनुराधा अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या राघवेंद्र भीमराव दातार यांचा नातू पियूष रामकृष्ण दातार (वय ३) कुशल मंगल कार्यालयाच्या परिसरात असलेल्या अबोली अपार्टमेंटमधील लिटल ग्लोरी किडस गार्डन प्ले ग्रुप नर्सरीमध्ये शिकत होता. १८ डिसेंबर २००९ रोजी सकाळी पियुषला अॅटोरिक्षाने शाळेत पाठविले. त्यानंतर दोन तासांनी शाळेतून घरी फोन आला की, पियूष नर्सरीच्या पाठीमागील पाण्याच्या हौदात पडला आहे. त्याला उपचारासाठी चेतना नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आजोबा राघवेंद्र, त्याची आई धावत हॉस्पिटल मध्ये गेले असता पियुषचा मृत्यू झाला होता. दातार यांच्या तक्रारीवरून नर्सरीच्या संचालिका प्रिया प्रकाशचंद्र पाठक (रा. उल्कानगरी), शिक्षिका संपदा यशवंत किवळेकर, कार्तिकी विजय बोडखे (रा. शिवशंकर कॉलनी) या तिघांविरुद्ध पियुषच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन पोलिस निरीक्षक गोपीनाथ पाटील यांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकारी वकील योगेश सरवदे यांनी नऊ साक्षीदार तपासले. नर्सरीच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या हौदाला संरक्षक भिंत नव्हती. तो हौद जमिनीच्या समांतर होता. त्यामुळे पाण्याचा हौद आहे की नाही हे समजत नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. कोर्टाने संचालिका प्रिया पाठक आणि शिक्षिका संपदा किवळेकर यांना दोषी ठरवून दोघींना एक वर्ष साधा कारवास आणि नुकसान भरपाईपोटी मृताच्या वारसास २५ हजार रुपये निकाल लागल्याच्या सात दिवसांत द्यावे, नुकसान भरपाई न दिल्यास एक महिना साधी कारावासाची शिक्षा सुनावली.

गाजलेले प्रकरण

लिटल ग्लोरी किडस गार्डन प्ले ग्रुप नर्सरी मध्ये १८ डिसेंबर २००९ रोजी घडलेले हे प्रकरण गाजले होते. एआएसएफ या विद्यार्थी संघटनेने आंदोलन करून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलन हा सांस्कृतिक संचिताचा सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पिंपरी-चिंचवड येथील नियोजित ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रसिद्ध समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) मराठवाडा साहित्य परिषदेत उमेदवारी अर्ज भरला. संमेलन हा सांस्कृतिक संचिताचा सोहळा असून संमेलनाध्यक्ष झाल्यास वाङमयीन चळवळीत तरुणांची स्वतंत्र फळी निर्माण करू, असे सबनीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पिंपरी-चिंचवड येथे ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनासाठी प्रसिद्ध समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मराठवाडा साहित्य परिषदेत उमेदवारी अर्ज भरला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे सूचक असून डॉ. डी. बी. जगत्पुरिया, दगडू लोमटे, के. एस. अतकरे, प्रा. वीरा राठोड, विश्वास वसेकर अनुमोदक आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी अर्ज स्वीकारला. दरम्यान, यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत सबनीस यांनी भूमिका मांडली. 'अध्यक्षपद मिरवण्यासाठी नसते आणि असू नये. मराठी साहित्य-संस्कृतीची सेवा करण्यासाठी ही जबाबदारी आहे. संत साहित्य, ग्रामीण, दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन, नागरी, जलवादी अशा साहित्य प्रकारांवर भरपूर लिखाण केले. सामर्थ्य व मर्यादा या सूत्रावर आधारित अभ्यास केला. त्यामुळे वैचारिक व समीक्षा लेखनाला चांगला प्रतिसाद मिळाला' असे सबनीस म्हणाले. सध्याच्या तरुण पिढीचे व्हॉटसअॅपवरील सर्व लिखाण गलिच्छ मानत नाही. उलट वाड्मयाचे नवीन दालन मानतो. या मुलांसाठी भरीव काम करण्याची इच्छा असल्याचे सबनीस यांनी सांगितले. मागील वर्षी डॉ. सदानंद मोरे यांच्यासाठी सबनीस यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. येत्या ३१ ऑगस्ट रोजी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती सबनीस यांनी दिली.

मातीशी नाते

'या निवडणुकीत प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ, लेखक चंद्रकुमार नलगे, शरणकुमार लिंबाळे, डॉ. जनार्दन वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत. प्रत्येक लेखकाशी जिव्हाळ्याचे नाते आहे. विठ्ठल वाघ यांच्याप्रमाणेच माझे मातीशी घट्ट नाते आहे. लातूर जिल्ह्यातील हाडोळी माझे मूळ गाव असून, शेतीचा अनुभव आहे', असे सबनीस म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महादेव मंदिरातील दानपेटी फोडणारे आरोपी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तळेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी लांबविणाऱ्या दोन चोरट्यांना बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. तिजोरी फोडता न आल्याने त्यांनी तिजोरीच लंपास केली व मकबऱ्याच्या मागील डोंगर परिसरात लववून ठेवली होती. तिजोरीतील पैशांवर त्यांनी मौजमजा केल्याचे पोलिसांच्या चौकशीमध्ये सांगितले.

बेगमपुऱ्यातील बीबी का मकबरा रोडवर तळेश्वर महादेव मंदिर आहे. भाविकांची येथे नेहमीच वर्दळ असते. साहजिकच येथील दानपेटीत भाविकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे टाकले जातात, हे हेरून पडेगाव येथील शहेजाद खान युनूस खान व त्याचा साथीदार शोएब पठाण शकील सलीम पठाण (रा. इब्राहिम कॉलनी) या दोघांनी तळेश्वर महादेव मंदिरास टार्गेट केले.

९ ऑगस्टच्या रात्री या चोरट्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. येथील दानपेटीच घेऊन ते पसार झाले. या दानपेटीचीच किंमत सुमारे अकरा हजार रुपये आहे व त्यात भाविकांनी टाकलेले पाच ते सहा हजार रुपये होते.

या घटनेनंतर या परिसरातील भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. दरम्यान, बीबी का मकबरा भागात संशयितरित्या फिरत असताना शोयब व शहेजाद यांना बेगमपुरा पोलिस स्टेशनचे पोलिस हेडकॉन्स्टेबल युवराज हिवराळे, राजेंद्र कांबळे, शेख खालेद यांनी पकडले. आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय वाढला. या दोघांच्या चौकशीमध्ये या आरोपींनी महादेव मंदिरातील दानपेटी लंपास केल्याचे कबूल केले.

दानपेटीतील पैशांनी केली मौजमजा

दानपेटी फोडणे शक्य न झाल्याने आरोपींनी दानपेटीच लंपास केली. मकबऱ्याच्या मागील परिसरात असलेल्या झुडपात त्यांनी ती दडवून ठेवली. नंतर ती फोडून त्यातील पैशांतून हॉटेलामध्ये जेवण, पत्ते खेळणे अशी मौजमजा केल्याचे त्यांनी कबूल केले असल्याची माहिती हेड कॉन्स्टेबल हिवराळे यांनी दिली. दानपेटी हस्तगत करण्यात आली असून अधिक तपास बेगमपुरा पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरानेच लांबविले दुकानातील दागिने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या नोकराने सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जितेंद्र प्रकाश जाधव (रा. शिवाजीनगर, मूळ रा. आठपाडी, जि. सांगली) असे फिर्यादीचे नाव आहे. सराफा व्यापारी असलेल्या जाधव यांचे यांचे शिवाजीनगरात कृष्णा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दुकानात पंडित जगन्नाथ जाधव ( रा. शिवाजीनगर) हा नोकर म्हणून कामावर होता. पंडित जाधव याने २० ते २१ ऑगस्टदरम्यान रात्री दहा हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख आठ हजार असा अठरा हजारांचा ऐवज चोरून नेला, अशी तक्रार जितेंद्र जाधव यांनी दिली आहे. अधिक तपास जमादार ठोंबरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दरोडेखोरांच्या मुसक्या बांधल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कन्नड तालुक्यात रस्त्यावर झाडे आडवी टाकून लुटमार करणाऱ्या टोळीतील दोन दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली. दरोडेखोरांच्या या टोळीने धुळ्यासह, मालेगावातील कुसुंबा घाटातही काही दरोडे टाकले होते. खेमसिंग रतीलाल आर्य (वय २२, रा. भेजदड, जि. बडवणी) आणि शांत्या सुंदऱ्या बारेला (वय ३८, रा. जोडमोडा) अशी या दरोडेखोरांची नावे आहेत.

कन्नड तालुक्यातील प्रेमनारायण राधेशाम जैस्वाल (रा. हस्ता) हे १८ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास कुटुंबीयांसह गौताळ्याच्या जंगल परिसरातून वाहनाने पिशोरकडे जात होते. जैस्वाल कुटुंबीयांना दहा दरोडेखोरांनी अडविले. त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड हिसकावून त्यांना मारहाण करत पळ काढला होता. जैस्वाल यांच्यासह दरोडेखोरांनी अन्य चार वाहनेही अडवून लुटमार केली होती. या आरोपींच्या शोधार्थ कोम्ब‌िंग ऑपरेशन राबविण्यात आले होते, परंतु आरोपी हाती लागले नाही. याप्रकरणी जैस्वाल यांच्या तक्रारीवरुन कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच दरोडेखोरांनी १३ ऑगस्ट रोजी मालेगाव येथील कुसुंबा घाटात अशाच पद्धतीने दरोडा टाकला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतमकुमार यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे, सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे व पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. हे आरोपी मध्य प्रदेशातील सेंधवा येथील असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांच्या पथकाने सेंधवा येथे दरोडेखोरांचा शोध घेतला. जंगल परिसरात दोन दिवस ते आरोपींच्या मागावर होते. जोडमोडा येथे शांत्या बारेला याला ताब्यात घेतले. त्यानंतर खेमसिंह आर्य यालाही ताब्यात घेतले गेले.

मुद्देमाल हस्तगत

गुन्ह्यासाठी वापरलेल्या मारुती व्हॅनसह, आठ मोबाइल, १६ हजार ५२५ रुपये रोख, विळा, चाकू, बॅटऱ्या, असा १ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींवर मध्यप्रदेशातही अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत.

यांनी बजावली कामगिरी

मध्य प्रदेशातील जंगल परिसरात दोन दिवस राहून डॉ. चाटे, आंधळे यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर पायघन, दीपक सरोदे, संजय खंडागळे, प्रकाश मोहिते, जितेंद्र बोरसे, रोहिदास तांदळे, सुनील शिराळे, शेख कासम, सुनील ढेरे, विठ्ठल चव्हाण, संजय घुगे, रवी लोखंडे, विक्रम देशमुख, नितीन उणे, गणेश माळी, गुलाब पाटील, सुभाष ठोके आणि सागर पाटील यांनी या दरोडेखोरांच्या मुसक्या बांधल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईओंसह आठ जणांना जामीन

$
0
0

म. टा . विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेत सौरदिवे खरेदी प्रकरणात २९ लाख ४० हजारांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे तत्कालीन सभापती आणि सीईओ यांच्यासह ७ जणांचा सेशन कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्याला आव्हान दिले असता मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एन. डब्लू. सांबरे यांनी ८ जणांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना सौर ऊर्जा दिवे देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यासाठी बनावट लाभार्थींची यादी तयार करून २९ लाख ४० हजार रुपयांचे दिवे खरेदी केले. या प्रस्तावाला तत्कालीन समाजकल्याण सभापती रामनाथ चोरमले, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, मुख्य लेखाधिकारी विलास जाधव, समाजकल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे, दीपक जोशी, समाजकल्याण निरीक्षक सीमा शिंदीकर, महारू राठोड यांनी मान्यता देऊन गैरव्यवहार केल्याचा गुन्हा क्रांतिचौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. कोर्टाच्या आदेशावरून या सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अटक टाळण्यासाठी त्यांनी सेशन कोर्टात धाव घेतली होती, पण त्या कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्याला ८ आरोपींनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. कोर्टाने त्यांचा अटकपूर्व अर्ज सशर्त मंजूर केला. या सर्व अधिकाऱ्यांना एक दिवसाआड पोलिस ठाण्यात दोन आठवडे हजेरी लावण्याची अट आहे. प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर झाला. तपास अधिकाऱ्याने बोलाविल्यास या सर्वांनी त्यास प्रतिसाद द्यावा, असे निर्देश कोर्टाने दिले. या सात जणातर्फे जॉयदीप चटर्जी, अजित कडेठाणकर, सिद्धेस्वर ठोंबरे, सुदर्शन साळुंके, ज्ञानेश्वर बागुल, रवींद्र गोरे, एम. पी. भास्कर, अविनाश आघाव, मुरलीधर कराड यांनी तर, सरकारतर्फे श्रीनिवास आब्बड यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेक बाउन्सप्रकरणी सक्तमजुरीची शिक्षा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चेक बाउन्स प्रकरणात आरोपी शेख गनी यास ६ महिन्याची सक्तमजुरी शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मनिषा कुलकर्णी यांनी ठोठावली. जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात फिर्यादी ईश्वरलाल कायस्थ यांच्याकडून पळशीचे शेख गनी यांनी एक लाख रुपये घेतले होते. मात्र, हा व्यवहार रद्द झाल्याने शेख गणी यांनी फिर्यादीस १ लाख रुपयांचा चेक दिला. फिर्यादीने बँकेत चेक वाटण्यास टाकला असता तो वटला नाही. फिर्यादीने आरोपीविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीकडे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्यानुसार तक्रार दाखल केली. कोर्टात गुन्हा सिद्ध झाला. सक्तमजुरीच्या शिक्षेशिवाय फिर्यादीस दीड लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले. फिर्यादीच्या वतीने जयसिंग तौर व सुजित पाटील यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिसर्चवर युनिव्हर्सिटीचे नियंत्रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय अभियांत्रिकी कॉलेजला स्वायत्तता देताना पदवी, पदव्युत्तरसह संशोधन प्रक्रियाही राबविण्याचा देण्यात आलेला अधिकार अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने काढून घेतला आहे. यापुढे ही प्रक्रिया पूर्णपणे विद्यापीठाच्याच नियंत्रणाखाली पूर्ण केली जाणार आहे. नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठात नव्याने नोंदणी करावी लागली आहे.

कॉलेजला २००६मध्ये स्वायत्ता मिळाल्याने कक्षा रुंदावल्या. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची रचना करण्यासह संशोधनाची प्रक्रिया ‌कॉलेजस्तरावर देण्याची संधी मिळाली. विषयनिहाय संशोधन अधिमान्यता समिती (आरआरसी) स्थापन करणे, विद्यार्थ्यांचे प्रोग्रेस रिपोर्ट, मुलाखती अशा सर्व प्रक्रिया कॉलेजच्या स्तरावरच पूर्ण करून पीएच.डी. प्रदान केली जात होती. २०११मध्ये यूजीसीने संस्थास्तरावर संशोधन प्रक्रिया थां‌बविण्याच्या निर्णय घेतला. यानंतर १४ डिसेंबर २०१२ रोजी ही प्रक्रिया थांबविण्याच्या सूचना दिल्या. यानंतर नोव्हेंबरमध्ये हे संशोधन पूर्ववत ठेवण्याचे विद्यापीठाने पत्र दिले. यानंतर आता विद्यापीठाने पुन्हा ही प्रक्रिया स्वतःकडे घेण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना, संशोधक मार्गदर्शकांना विद्यापीठाकडे नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कॉलेजकडे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा, दर्जा लक्षात घेता, विद्यापीठाकडे ही प्रक्रिया जाण्यास प्रशासनाने विरोध केला होता, परंतु विद्यापीठाने कॉलेज प्रशासनाला दाद न घेता पूर्ण प्रक्रिया आपल्याकडे घेतली आहे. सर्व संशोधकांनी नव्याने विद्यापीठाकडे नोंदणी केली आहे. त्यांना आता नव्याने आरआरसीसमोर आपले प्रेझेंटेशन सादर करावे लागणार आहे.

पदवी, पदव्युत्तरसह संशोधनाची प्रक्रिया कॉलेजस्तरावर करण्याचे आपल्याला अधिकार आहेत. दिलेल्या निकषांनुसार प्रक्रिया सुरूही होती. विद्यापीठाने आता आपल्याकडे हे सर्व अधिकार ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे. पूर्वीही विद्यापीठाकडूनच पदवी दिली जात होती. केवळ प्रक्रिया आम्ही पूर्ण करायचो.

- डॉ. पी. एस. अडवाणी, प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशात अडचण नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाला. उत्तीर्ण झालेल्या ४ हजार ६८८ विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. अकरावीच्या ४५ हजार ९१५ जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रवेशास अडचण निर्माण होणार नसल्याचे शिक्षण विभागाचे अधिकारी दावा करत आहेत.

औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यातून १६ हजार ९५२ ‌परीक्षार्थीं पैकी ४ हजार ६८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यामुळे घेण्यात आलेल्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. विभागातून २७.६५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे आकडेवारी सांगते. विभागात कला, वाणिज्य, विज्ञान अशा अभ्यासक्रमांची अकरावी प्रवेशक्षमता १ लाख ७३ हजार ८७७ आहे. यापैकी १ लाख २७ हजार ९६२ जागांवर प्रवेश झाले असून, विभागातील पाच जिल्ह्यांतील विविध कॉलेजांत विविध शाखांच्या ४५ हजार ९१५ जागा रिक्त आहेत. उत्तीर्ण झालेल्या सर्वांना प्रवेश शक्य आहे.

उत्तीर्ण संख्या ४,६८८

अकरावीच्या रिक्त जागा ४५,९१५

एकूण प्रवेश क्षमता १,७३,८७७

प्रवेशित विद्यार्थी १,२७,९६२

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी आणि रिक्त जागांची आम्ही जुळवाजुळव केल्यास विभागात प्रवेशाला अडचण येण्यासारखी परिस्थिती नाही. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल.

- भाऊसाहेब तुपे, सहायक उपसंचालक, विभागीय उपसंचालक कार्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरवणी परीक्षेचा निकाल घसरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निकालानंतर महिनाभरात घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. या परीक्षेत औरंगाबाद विभाग राज्यात तिसऱ्या स्थानावर आहे. विभागाचा निकाल २७.६५ टक्के लागला आहे. १६ हजार ९५२ परीक्षार्थींपैकी ४ हजार ६८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या तुलनेत निकालात ५.५० टक्क्यांनी ‌घसरण झाली आहे. फेब्रुवारी-मार्चप्रमाणे जुलै-ऑगस्टच्या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे.

दहावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून निकालानंतर लगेच महिनाभरात फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार दहावीची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आली. याचा निकाल मंगळवारी www.mahresult.nic.in या वेबसाइटवर दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. राज्यात ९ विभागातून १ लाख ३९ हजार ३२९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ३५ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी दहावीचा टप्पा पार केला आहे. निकालाचे प्रमाण २५.३७ टक्के आहे.

औरंगाबाद विभागाचा निकाल ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१४च्या तुलनेत घसरला आहे. विभागातून परीक्षेला बसलेल्या १६ हजार ९५२ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ६८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाचे प्रमाण २७.६५ टक्के आहे.

मुलींचीच बाजी

फेबुवारी-मार्चप्रमाणे जुलै-ऑगस्टच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाम अधिक आहे. राज्यात ४१ हजार ७४८ मुलींनी दहावीची फेरपरीक्षा दिली होती. त्यापैकी ११ हजार ९६० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण होणाचे प्रमाण ४.६८ टक्क्यांनी अधिक आहे.

महिनाभरात प्रक्रिया पूर्ण

राज्य मंडळाने फेरपरीक्षेची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केली. २१ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी केंद्रीय पातळीवर उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली. जिल्हानिहाय कॅम्प सुरू करून उत्तरपत्रिका तपासल्या. यानंतर लगेच निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्ट रोजी गुणपत्रिका दिल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाग माणुसकीने त्याला सोडले वाऱ्यावर...

$
0
0

गणेश ठाकूर ही रिक्षा चालवत असताना भोवळ येऊन पडले.

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माणुसकी महाग झाल्याचे दर्शन मंगळवारी (२५ ऑगस्ट) उस्मानपुरा चौकात घडले. चालत्या रिक्षातून भोवळ आल्याने ड्रायव्हर रस्त्यावर पडला. डोक्याला गंभीर मार लागून बेशुद्ध झाला. रस्त्यावर रक्ताचे थारोळे साचले, मात्र त्याला मदत करण्याऐवजी कृतघ्न प्रवासी रिक्षातून उड्या मारून पळून गेले.

शहराच्या जगण्यातला जिवंतपणा हरवत चालल्याचा प्रत्यय देणारी ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी या रिक्षाचालकाला एका खासगी वाहनातून हॉस्पिटलमध्ये नेले. गणेश ठाकूर (चौधरी कॉलनी, चिकलठाणा) हे ड्रायव्हर रेल्वे स्टेशनकडून रिक्षा (एम.एच. २० बीटी ७८९६) घेऊन क्रांतिचौकाकडे जात होते. उस्मानपुरा चौकात येताच त्यांना भोवळ आली. रिक्षाचे नियंत्रण सुटले. रिक्षाने दोन-चार हेलकावे घेतले. दरम्यान, ठाकूर यांचा तोल गेल्याने ते भर रस्त्यात पडले. मागून येणारी वाहने जागेवरच थांबली. इतका कठीण प्रसंग आपल्याला सुखरूप नेणाऱ्या रिक्षाचालकावर आलेला असताना आतील प्रवाशांनी मात्र कृतघ्नपणा दाखविला. ठाकूर यांना मदत करण्याऐवजी त्यांनी रिक्षातून पटापटा उड्या मारल्या. ठाकूर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. रिक्षा डिव्हायडरला जाऊन धडकली. ठाकूर यांना रस्त्यावरून जाणाऱ्या काही पादचाऱ्यांनी उठवले. तेथून जाणारी राष्ट्रीय समाज पक्षाचे नाव असलेली व्हॅन त्यांनी थांबवली अन् त्यांना घाटी रुग्णालयात नेले. ठाकूर यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपास क्रांतिचौक पोलिस करत आहेत.

चटका लावला राव

ठाकूर रस्त्यावर पडताच अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या दुचाकी थांबवल्या. त्यांना सावरण्यासाठी मुले पुढे धावली. 'गोपाळ टी'जवळ चहा पिणारे काहीजण तिथे आले. त्यांना व्हॅनमध्ये घालून घाटीत दाखल केले. उड्या मारलेले प्रवासी, मात्र तिथे जमलेल्या बिनचेहऱ्याच्या समूहाचा भाग बनून राहिले. 'प्रवासी उड्या मारून पळून गेल्याचे पाहून आम्हाला चटका लावला राव,' अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिका अधिकाऱ्यांची मालमत्ता गुलदस्त्यात

$
0
0

उन्मेष देशपांडे, औरंगाबाद

महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांनी दरवर्षी आपली मालमत्ता आणि कर्जांचे विवरण जाहीर करावे, असे आदेश महाराष्ट्र शासनाने काढले, पण औरंगाबाद महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. केवळ २२६ जणांनी मालमत्तेचे विवरण सादर केले असून, ४७३ जणांनी शासनाचा आदेश झुगारला आहे. यासंदर्भात दिलेल्या स्मरणपत्रांनाही त्यांनी केराची टोपली दाखविली आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १७ नोव्हेंबर २०१४ रोजी याबाबत अध्यादेश काढला. सरकारच्या अखत्यारित असलेली सर्व निमशासकीय कार्यालये व संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपली मालमत्ता जाहीर करण्याची सक्ती करण्यात आली. सर्व निमशासकीय संस्था, पंचायत राज संस्था, महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायती, संवैधानिक संस्था, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, मंडळांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मालमत्ता व त्यांच्यावरील दायित्वे दरवर्षी जाहीर करणे बंधनकारक आहे. वर्ग 'ड'च्या कर्मचाऱ्यांना त्यातून सूट देण्यात आली आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९च्या नियम १९मधील तरतुदीनुसार ही सक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या अध्यादेशानुसार मालमत्तांचे विवरण ३१ डिसेंबर २०१४पर्यंत सादर करणे गरजेचे होते. त्यानंतर प्रत्येक वर्षी ३१ मार्चच्या स्थितीस अनुसरून मालमत्ता व दायित्वाचे विवरण ३१ मेपर्यंत सादर करावे, असे स्पष्ट आदेश आहेत. या अध्यादेशाची प्रत औरंगाबाद महापालिकेलाही प्राप्त झाली आहे. अस्थापना विभागाने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांची मालमत्ता जाहीर करण्यासंदर्भात पत्र दिले. त्याला प्रतिसाद देत आतापर्यंत फक्त २२६ जणांनी मालमत्तेचे विवरण अस्थापना विभागाकडे सादर केले आहे. त्यात काही विभागप्रमुखांचा समावेश आहे.

'बडे मासे' मात्र नामानिराळेच राहिले आहेत. तब्बल ४७३ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मालमत्तेचे विवरण सादर केले नाही. त्यांना स्मरणपत्रेही देण्यात आली. त्याला त्यांनी केराची टोपली दाखवली आहे.

स्मरणपत्रे देऊनही मालमत्तेचे विवरण सादर न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा एक संधी दिली जाईल. एका महिन्यात त्यांनी मालमत्तेचे विवरण सादर केले नाही तर, त्यांचे वेतन थांबविण्याची कारवाई केली जाईल.

- किशोर बोर्डे, उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरल’ची वाट शाळांसाठी वाकडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण विभागाने सर्व शाळांना 'सरल' ऑनलाइन डेटाबेस बंधनकारक केले आहे. यात विद्यार्थ्यांचे रक्तगट, आधार क्रमांक नोंदवायचे आहेत, मात्र अनेक विद्यार्थ्यांना रक्तगट आणि आधार क्रमांक माहिती नसल्याने; तसेच वारंवार सर्व्हर डाउन होत असल्यामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक त्रस्त झाले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत ही माहिती भरून देणे बंधनकारक आहे. ही मुदत वाढवून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे ४००४ शाळा आहेत व सुमारे ५ लाखांहून अधिक विद्यार्थी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिकतात. त्यांची माहिती अपलोड करणे अवघड झाले आहे. राज्य शासनाने जुलैमध्ये सर्व शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांची माहिती संकलित करण्यासाठी सरल या संगणक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. माहिती संकलनाचा लाभ भविष्यात विविध योजना राबविणे, आर्थिक तरतूद करणे आदींसाठी होणार आहे.

शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार सध्या सर्व शाळांमध्ये सरल प्रणालीमध्ये माहिती भरण्याचे काम सुरू आहे. ही सर्व जबाबदारी वर्गशिक्षकांवर सोपविण्यात आली अाहे. मुख्यध्यापकांकडे देखरेखीचे काम आहे. या सर्व प्रक्रियेवर शिक्षणाधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी रक्तगट तपासणी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलची माहिती नोंदविताना अनेक अडचणी येत आहेत.

कम्प्युटर, इंटरनेट नाही

जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये कम्प्युटर, इंटरनेट उपलब्ध नाही. त्यामुळे सरलची माहिती कशी भरायची, असा प्रश्न ग्रामीण भागातील शिक्षकांना पडला आहे. केंद्रस्तरावर ही माहिती भरण्याची कामे केली जावीत, अशी मागणी केली जात आहे. परिसरातील शिक्षक सरल, संचमान्यता, शिष्यवृत्ती आदी कामे ऑनलाइन करण्यात मग्न असताना बीएसएनएलची सेवा सतत विस्कळित होत आहे. त्यामुळे सर्व्हर डाउन होते. परिणामी दिलेल्या मुदतीत ही कामे कशी करणार, असा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे. फेब्रुवारी २०१६मध्ये होत असलेल्या बारावीच्या लेखी परीक्षांचे अर्ज भरण्याची अंतिम मुदतही याच महिन्यात अाहे. या सर्व कामांच्या ताणामुळे इंटरनेट सेवा वारंवार विस्कळित होत अाहे.

आम्ही 'सरल'च्या कामाची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे. शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे ती मगाणी केली आहे. या कामासाठी निधीही नाही. शिवाय वर्कलोड वाढत आहे.

- राहुल शेवाळे, राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत, पण शासनाच्या आदेशानुसार काम करावेच लागणार आहे. शाळांमध्ये कामे सुरू असून, ती लवकरच कामे पूर्ण होतील.

-नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुसाट रिक्षाचालकांची बेबंदशाही

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खड्ड्यांमुळे चिंधड्या झालेल्या रस्त्यांवरून रिक्षांतून बेफिकीरपणे अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. दहा-दहा प्रवासी कोंबून रिक्षा सुसाट धावतात. पोलिसांची कारवाई थंडावल्याने पुन्हा एकदा शहरवासीयांचा जीव धोक्यात आला आहे.

अमितेशकुमार यांनी पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच बेशिस्त रिक्षाचालकांना ताळ्यावर आणण्यात पुढाकार घेतला. रिक्षांतून दहा-दहा, बारा-बारा प्रवासी कोंबण्यावर निर्बंध आणले. वाहतूक नियमांचे कडक पालन करण्याची भूमिका घेतली. जागोजागी वाहतूक पोलिस तैनात करून कडक कारवाई सुरू केली. पोलिस आयुक्तांच्या या भूमिकेविरोधात रिक्षासंघटनांनी आंदोलन पुकारले.

पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढला. यावेळी अमितेशकुमार यांनी रिक्षा संघटनांना फैलावर घेतले. नियम नाही पाळले तर कारवाई होणारच, अशी कडक भूमिका घेतली. त्यामुळे शहरातील बेशिस्त वाहतुकीला वळण लागले. मात्र, आता पुन्हा एकदा रिक्षाचालकांचे वारू चौखूर उधळलेत. जालना रोड, गारखेडा परिसर, गजानन महाराज रोड, जयभवानीनगर, जळगाव रोड, हर्सूल आणि व्हीआयपी रोडवर रिक्षातून सर्रासपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक सुरू आहे. यातील अनेक रिक्षा शेअरिंगवर चालतात. त्यामुळे जास्त प्रवासी, जास्त नफा असे रिक्षाचालकांचे धोरण असते. या बेबंदशाहीमुळे पुन्हा एकदा रिक्षातून प्रवास करणाऱ्यांचा जीव धोक्यात आलाय. महिला वर्गाला याचा त्रास सहन करावा लागतोय. पोलिस कधी सक्रिय होणार हे पाहावे लागेल.

मीटरचा वापर शून्य

वाढती महागाई आणि पेट्रोलच्या चढ्या दरामुळे रिक्षा वाहतूक दर वाढविण्याची मागणी रिक्षाचालक संघटनेने केली. त्याप्रमाणे 'आरटीए' समितीने रिक्षा मीटर दरात वाढ केली. मात्र, तरीही शहरात मीटरवर चालणारे रिक्षा बोटावर मोजण्याइतक्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची लूट होते.

पोलिस आयुक्तांनी रिक्षा चालकांना नियमाप्रमाणे प्रवासी वाहतूक करण्याची सक्त ताकीद दिली. त्यानंतरही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, चालकाशेजारी प्रवासी बसवणे सुरू असेल आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असेल, तर अशांवर निश्चितच कारवाई झाली पाहिजे.

- निसार अहेमद, अध्यक्ष, रिक्षा चालक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववी नापासांनाही दहावीची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नववीत नापास झाला असल्यास टेन्शन घेऊ नका. नववी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना १७ नंबर फॉर्म भरून दहावीची परीक्षा लगेच देण्याची सुविधा शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. आजपर्यंत नववीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा गॅप घेतलेल्या विद्यार्थ्यांना अशी संधी देण्यात येत होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांना वर्षभर थांबावे लागत होते. नव्या बदलामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्याच वर्गातील विद्यार्थ्यांसोबत दहावीची परीक्षा देता येईल.

अर्धवट शाळा सोडलेली मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत. दहावीच्या परीक्षेपासून वंचित राहू नयेत म्हणून परीक्षा मंडळाने अशा विद्यार्थ्यांसाठी १७ क्रमांकाच्या फॉर्मची सोय केली आहे. नववी नापास विद्यार्थ्यांना खाजगी विद्यार्थी म्हणून थेट अर्ज भरून दहावी परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्याला फॉर्म क्रमांक १७ भरावा लागेल. विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे मंडळाचा दावा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पांच्या मांडवात विघ्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या नव्या कठोर नियमामुळे यंदा शहरातील मानाच्या मंडळांची प्रतिष्ठापना धोक्यात आली आहे. मोठ्या रस्त्यावर १२ फुटांचा मार्ग वाहतुकीसाठी सोडूनच गणेश मंडळांच्या मंडप उभारणीला परवानगी मिळेल. तर ८ फुटी रस्त्यांवर मंडप उभारणी करता येणार नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात नियमांनी विघ्न आणल्याची भावना भक्तांत आहे.

यंदा १७ ते २७ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा होईल. गणेशोत्सव नियम अंमलबजावणीचे नियोजन करण्यासाठी स्थापन झालेल्या पथकाची मंगळवारी (२५ ऑगस्ट) बैठक झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा क्षेत्रासाठी या पथकाची नियुक्ती केली आहे. उपविभागीय अधिकारी तथा पथकप्रमुख शशिकांत हदगल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीसाठी पोलिस निरीक्षक राजकुमार डोंगरे, तहसीलदार रमेश मुनलोड, अशोक ढोबाळे, महापालिकेचे मालमत्ता अधिकारी वसंत निकम यांची उपस्थिती होती.

पालिका क्षेत्रातील सार्वत्रिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना नियमांची सूचना देणे. नव्या नियमानुसार शहरातील गणेशमंडळांना स्टेज उभारणीसाठी महापालिकेकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. परवानगीसाठी शहरातील गणेश मंडळांनी कुठे अर्ज करावेत, परवानगी कुठे मिळेल, कशी काढावी याबाबत पालिकेला पुस्तिका तयार करावी लागेल. गेल्यावर्षी नोंद झालेल्या प्रत्येक गणेशमंडळाला परवानगी काढण्यासाठी ही माहिती पु‌स्तिका दिली जाईल. ही माहिती समजावून सांगण्यासाठी महापालिकेला सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी लागेल, असे निर्णय या बैठकीत झाले. दरम्यान, न्यायालयाचे आदेश आणि पालिकेचे कडक नियम या कोंडीत अनेक गणेश मंडळे सापडली आहेत.

न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे या आदेशांच्या चौकटीत राहून, आदर करून गणेशोत्सव साजरा करावा असे सर्वांना सांगितले आहे. लहान मंडळांना अडचण होईल हे खरे आहे.

- पृथ्वीराज पवार, संस्थापक अध्यक्ष, गणेश महासंघ

दरवर्षी जवळपास १२०० ते १४०० गणेश मंडळांची उभारणी करण्यात येते. जुन्या शहरात ३० ते ३५ वर्षांपासून एकाच ठिकाणी गणेशाची स्थापना होते. न्यायालयाच्या निर्णयामध्ये शासनाने हस्थक्षेप करून तोडगा काढावा.

- समीर राजूरकर, माजी अध्यक्ष, गणेश महासंघ

अद्याप गणेश मंडळांकडून मंडप उभारण्यासाठी परवानगीसाठी अर्ज आलेले नाहीत. वाहतुकीस अडथळा होऊ नये या दृष्टीने गणेशमंडळांनी काळजी घ्यावी.

- खुशालचंद बाहेती, सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images