Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पळून जाण्यापूर्वीच अश्फाकला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुंदरवाडी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात सोमवारी (३१ ऑगस्ट) सायंकाळी पकडण्यात आलेला चौथा आरोपी शेख अश्फाक शेख हुसेन हा पत्नीसह जिल्ह्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता, पण पोलिसांना कुणकुण लागल्याने त्याचा प्लॅन फसला. दरम्यान, न्यायालयीन कोठडीत असलेल्या शेख तय्यब शेख शेख नईम याची मंगळवारी ओळख परेड झाली असून, या टोळीने यासारखे आणखी काही गुन्हे केले असावेत, असा कयास बांधला जात आहे.

सुंदरवाडी शिवारात मित्रासोबत फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या तरुणीवर गुरुवारी (२७ ऑगस्ट) सामूहिक बलात्कार झाला. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत शेख तय्यब शेख शेख नईम (रा. सुंदरवाडी), तालिबअली सय्यद अली शाह (रा. हीनानगर), शेख जमील शेख हुसेन बागवान आणि शेख अश्फाक यास अटक केली. त्याला कोर्टाने चार सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती चिकलठाणा पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रिया थोरात यांनी दिली.

त्याला प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी मनिषा कुलकर्णी यांच्या समोर हजर करण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून चाकू जप्त करावयाचा आहे, गुन्हा करण्यासाठी कोणते वाहन वापरले याचा तपास करुन ते जप्त करावयाचे असल्यामूळे सात दिवसाची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. कोर्टाने ही विनंती ग्राह्य धरुन शेख अश्फाकला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आतापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेख तयब शेख नईम, तालेब अली सय्यद शहा आणि शेख जमील शेख हुसेन आणि शेख अश्पाक या चौघांना अटक केली आहे.

'तयार राहा', पत्नीला निरोप

अत्याचाराच्या घटनेपासूनच शेख अशफाक (वय २२, हीनानगर) हा पसार होता. ओळख दडवण्यासाठी त्याने दाढी काढली आणि कटिंग केली होती. टोळीचा हा म्होरक्या पत्नीसह पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याची पत्नी गेल्या काही दिवसांपासून माहेरी राहत होती. खुलताबाद परिसरात डोंगरात दडून बसलेल्या शेख अशफाकने सार्वजनिक टेलिफोन बूथवरून पत्नीशी तीन ते चार वेळा संपर्क साधला. 'तयार राहा' असा निरोप त्याने पत्नीला दिला होता. परंतु पोलिसांनी आधीच त्याच्यावर झडप घातली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉक्टरचा तपास विशेष पथकाकडे

$
0
0

औरंगाबादः गारखेडा परिसरात हॉस्पिटल असलेल्या एका डॉक्टरवर बंगळुरू येथील एका २९ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात सोमवारी (३१ ऑगस्ट) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. रोहन हेमके असे त्या डॉक्टरचे नाव आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला आहे. पीडित महिला मेडिकलची विद्यार्थिनी आहे. डॉक्टर रोहन याच्या जवळचा नातेवाईक आणि पीडित महिलेची ओळख आहे. डॉ. रोहन या महिलेवर व्याभाचारीपणाचा आरोप करत होता. त्याचा जाब विचारणासाठी म्हणून त्या २७ एप्रिल २०१५ रोजी गारखेड्यातील हॉस्पिटलमध्ये गेल्या, तेव्हा डॉ. हेमके याने क्लिनिकचा दरवाजा बंद केला आणि तेथील धारदार वस्तूचा धाक दाखवून अत्याचार केला, अशी तक्रार त्या महिलेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झनझन, शिंदेंच्या घरावर हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांचे बंधू कृष्णा झनझन आणि माजी महापौर रुख्मिणीबाई शिंदे यांच्या घरावर मंगळवारी महापालिकेचा हातोडा पडला. घराचे जास्त नुकसान होऊ नये यासाठी दोघांनीही स्वतःहून बांधकाम पाडून घेण्यास सुरुवात केली.

हायकोर्टाच्या आदेशानुसार मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन ते जयभवानी चौक रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सोमवारपासून मालमत्ता हटविण्यात येत आहेत. प्रस्तावित २४ मीटर रस्त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेणे गरजेचे असताना रुंदीकरणाचे काम टाळण्याचाच प्रयत्न पालिका अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केला. नगररचना विभागाचे अधिकारी ताकासतूर लागू देत नसल्याने रुंदीकरणाबदद्ल शंका होती. त्यातच महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांचे बंधू कृष्णा झनझन यांची जयभवानीनगर चौकापासून काही फुटाच्या अंतरावरच इमारत आहे. त्यांच्या घराच्या थोडे पुढे गेल्यानंतर रुख्मिणीबाई शिंदे यांच्या मालकीची इमारत आहे. या दोन्हीही इमारतींमुळे रुंदीकरण रखडले होते, असे मानले जाते. शिवाजी झनझन यांच्याकडे गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुखपदही होते. त्यामुळे रस्ता रुंदीकरणातील घरे पाडण्याची जबाबदारी झनझन यांच्यावरच होती, पण त्यांच्याच भावाचे घर बाधित होत असल्याने ते लक्ष घालणार नाहीत, असे मानले जात होते. परंतु पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या संपूर्ण भागातून फेरफटका मारला आणि रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला.

मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी कृष्णा झनझन आणि रुख्मिणीबाई शिंदे यांच्या इमारतीवर पालिकेने हातोडा मारल्याने २४ मीटर रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

५१ मालमत्ता पाडल्या

जयभवानीनगर चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन या रस्त्यावरील ५१ इमारतींवर महापालिकेने मंगळवारी कारवाई केली. घरे पडणार असेल लक्षात आल्यानंतर नागरिकांनी स्वतः कटरच्या साह्याने इमारती पाडून घेतल्या. ही कारवाई बुधवारीही सुरु राहणार असून कामगार चौकापर्यंतचा रस्ता रुंद केला जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. जयभवानीनगर चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यावरील मालमत्ता काढण्यास सोमवारी हायकोर्टाच्या आदेशाने सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी नागरिक स्वतःहूनच बांधकाम पाडून घेताना दिसले. पालिकेच्या पथकासोबत दोन पोलकेन मशीन्स, एक जेसीबी मशीन, विद्यूत विभागाची मोटार असा ताफा होता. पोकलेन आणि जेसीबीने उंच इमारती पाडण्यात आल्या. नागरिकांनी स्वतः कटरने कापलेल्या भागाला जेसीबी मशीनचा एक फटका मारला की बाधित इमारत पडत होती.

इमारत पत्त्यासारखी कोसळली

जयभवानीनगरच्या चौकापासून काही फुटाच्या अंतरावरील एका तीन मजली इमारतीचा आठ ते दहा फुटाचा बाधीत भाग इमारत मालकाने कटरने कापला. इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीजवळ पोलिसांचा ताफा उभा होता, काही नागरिक ये-जा करीत होते. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. पण इमारत पत्त्यासारखी कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वीज तोडल्याने गैरसोय

पाडापाडी करण्यासाठी या परिसरातील वीज पुरवठा सोमवारपासून खंडित करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. घरे पडलेल्या नागरिकांना मिट्ट अंधारात राखण करताना त्रास होत आहे. भंगारावर डोळा ठेवून फिरणाऱ्या चोरांचा बंदोबस्त कसा करावा याची चिंता नागरिकांना सतावत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळसूत्र, सोनसाखळी पळवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या दोन दिवसात शहरात मंगळसूत्र व सोनसाखळी पळवण्याच्या घटना घडल्या. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनमधून प्रवासी महिलेची २२ हजाराची पोत पळवण्यात आली. हर्सूल परिसरात मुलीला बसमध्ये बसवून देण्यासाठी आलेल्या पित्याच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळी पळवणाऱ्या चोरट्याला ताब्यात घेण्यात आले, मात्र त्याचे साथीदार पसार झाले आहेत.

जालना येथील पूजा मिलिंद नगराळे (वय २५) ही महिला शहरातील अंबीकानगर भागात भावाकडे आली होती. मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजता तिचा भाऊ तिला सोडण्यासाठी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर गेला होता. पूजा रेल्वेत चढत असताना एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २२ हजारांची सोन्याची पोत हिसकावून पलायन केले. आरडाओरड करेपर्यंत चोरटा पसार झाला होता. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना सोमवारी दुपारी हर्सूल टी पॉइंट येथे घडली. बजरंग चौकातील कैलास रंगनाथ जाधव वय ५५ हे त्यांच्या मुलीला चोपडा येथे जाणाऱ्या बसमध्ये बसवून देण्यासाठी आले होते. जागा मिळवण्यासाठी ते बसमध्ये चढत असताना रमेश कुंडलिक गायकवाड (वय ३६ रा. घनसावंगी) याने त्यांची दोन तोळ्यांची सोनसाखळी हिसकावली. जाधव यांनी आरडाओरड केल्याने रिक्षातून पलायनाचा प्रयत्न करणाऱ्या गायकवाडला नागरिकांनी पकडले, मात्र त्याचे साथीदार पसार झाले. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३४ रहिवाशांना १५ दिवसांचा दिलासा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

पहाडसिंगपुऱ्यातील अतिक्रमण हटाव मोहिमेला ३४ रहिवाशांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यांना १५ दिवसांचे संरक्षण मिळाले आहे. हे संरक्षण याचिकाकर्त्यानांच मिळणार आहे.पण १५ दिवसात या याचिकाकर्त्यांनी प्लॉट किंवा घर रिकामे नाही केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेलअसे कोर्टाने बजावले आहे.

औरंगाबाद खंडपीठात मुळ मालकाने अवमान याचिका दाखल केलेली आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच मुळमालकाला १८ एकर २९ गुंठे जमीन देण्याचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही म्हणून मूळ मालक माधवराव माणिकराव सोनवणे यांनी कोर्टाकडे पुन्हा धाव घेतली. त्यात प्रशासनाने २१ऑगस्ट रोजी जमिनीचा ताबा देण्याची हमी घेतली. तहसीलदारांनी सर्व अतिक्रमणधारकांना २५ ऑगस्ट रोजी नोटीस पाठवून ३१ ऑगस्टपासून अतिक्रमण हटाव मोहिम सुरु केली.

प्रशासनाच्या कारवाईविरोधात चांगदेव बारकू मोटे,शारदा शिंदे,पंचशीलाबाई सुरडकर ,पूनम सलामपुरे,साजेदा फहीम आकेफुद्दिन रझवी यांच्यासह ३४ नागरिकांनी अतिक्रमण काढण्याची २५ऑगस्टची नोटीस रद्द करण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका केली.

नानासाहेब सर्जेराव पवार यांनी शेतजमिनीसाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. नानासाहेब पवार यांनी सोनवणे यांच्याकडून १९३५ मध्ये ६ एकर १० गुंठे जमीन खरेदी केली व त्यातील ४ एकर २९ गुंठे जमीन राजू तनवाणी यांना हक्क सोडपत्राद्वारे दिल्याचे याचिकेत म्हटले आहे.

याप्रकरणी मंगळवारी न्या.रवींद्र बोर्डे व न्या. पी. आर. बोरा यांच्यासमोर सुनावणी झाली.पावसाळा संपेपर्यंत संरक्षण मिळावे अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली.मात्र ही विनंती कोर्टाने फेटाळली. याचिकाकर्त्यांनी १५ दिवसांत घर किंवा प्लॉट रिकामे करू अशी हमी दिली. त्यास कोर्टाने मान्यता दिली. यातील काहीं घरांचा ताबा मूळ मालकाला दिल्याचे अतिरिक्त सरकारी वकील अर्चना गोंधळेकर यांनी कोर्टाला सांगितले. मूळ मालकाने त्या चाव्या तहसीलदार यांना द्याव्यात.

तहसीलदाराने त्या घराच्या चाव्या याचिकाकर्त्यांना द्याव्यात असे कोर्टाने आदेश दिले.१५ दिवसाच्या आत त्या चाव्या पुन्हा तहसीलदार यांच्याकडे सुपुर्द कराव्यात असे कोर्टाने प्रशासनाला सांगितले. मोटे यांच्यातर्फे चंद्रकांत थोरात, पवार यांच्यावतीने रविंद्र गोरे व रझवी यांच्यातर्फे प्रमोद गपाट यांनी बाजू मांडली.

पहाडसिंगपुऱ्यातील कारवाईविषयी मी वर्तमानपत्रातून वाचले. जे घडले ते दुर्दैवी आहे, पण शेवटी अनधिकृत बांधकाम म्ह‌टल्यावर हे होणारच. असे असले तरी शहरात अनधिकृत बांधकांमांची संख्येत वाढ होत आहे. तरी महापालिका मात्र डोळेझाक करते. स्वतःचे घर असावे हे स्वप्न रंगवणाऱ्या सामान्य माणसाची दिशाभूल केली जाते, पण प्रशासन योग्य माहिती पोचवत नाही. त्यामुळे एका दिवसात रस्त्यावर आलेल्या पहाडसिंगपुऱ्यातील नागरिकांचे पुर्नवसन करण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. मी लवकरच महापौरांची भेट घेऊन संस्थेच्या वतीने पहाडसिंगपुऱ्यातील नागरिकांचे पुनर्वसन व एकूणच शहरातले अतिक्रमण यावर बोलणार आहे.

- भारती भांडेकर, जागृती महिला मंच

पहाड‌सिंगपुऱ्यात झालेल्या कारवाईचे दुःख आहे, पण नागरिकांनीही डोळसपणे व्यवहार करायला हवा होता. कमी भावात प्लॉट मिळतात तर नागरिकही लागलीच खरेदी करतात. जमिनींच्या व्यवहारामध्ये फसगत होण्याकरता शहर कुप्रसिद्ध आहे. असे असूनही नागरिक व्यवहार करतात. पहाडसिंगपुऱ्यात घर घेऊ नका, असे आम्ही अनेकांना सुचवले. घटना घडल्यानंतर आम्ही तिथे जाऊन काय उपयोग होता? यामध्ये नागरिकांची चूक आहे.

मंगल खिंवसरा, सजग महिला संघर्ष कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सहारा'ला नुकसानभरपाई देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सहारा प्राईम सिटी प्रक्रल्पात आलिशान फ्लॅट देण्याचा करार करून मुदतीच्या आत बांधकाम केले नाही. त्यामुळे सहारा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सुब्रतो रॉय, स्वप्ना रॉय, जॉय रॉय, सुशांतो रॉय, सिमान्तो रॉय, ओमप्रकाश श्रीवास्तव व सहारा प्राइम सिटी या प्रतिवादींनी तक्रारदाराला मूळ रक्कम १२ टक्के व्याजासह द्यावी, असे आदेश औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष के.एन. तुंगार, सदस्य संध्या बारलिंगे व किरण ठोले यांनी दिले आहेत.

बीड रस्त्यावर गांधेली शिवारात दोन वर्षांपूर्वी सहारा प्राईम सिटी नावाने प्रकल्प सुरू करण्यात आला होता. ही आलिशान फ्लॅटची योजना होती. त्यामुळे गोपाल काळे, शिल्पा काळे व पांडुरंग काळे यांनी मिळून ९० लाख ६५ हजार रुपये किंमतीचा एक फ्लॅट खरेदीचा करारनामा केला होता. यासाठी तक्रारदाराने १६ ऑगस्ट २०१२ रोजी ४ लाख ५३ हजार २५० रुपये सहाराला दिले. २९ डिसेंबर २०१२ रोजी व्यवहार झाल्याचे पत्रही काळे यांना दिले. प्रत्यक्षात बांधकाम झालेच नाही. वारंवार विनंती करूनही प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे रक्कम परत देण्याची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने ३० ऑगस्ट २०१२ रोजी करारनामा रद्द केला. रक्कम परत न दिल्याने काळे कुटुंबीयांनी ग्राहक मंचामध्ये धाव घेतली.

या प्रकरणात चेअरमन सुब्रतो रॉय यांच्यासह सर्व संचालकांना प्रतिवादी करण्यात आले. बुकिंगच्या वेळी सर्व फ्लॅट बुक झाले तरच बांधकाम सुरू होईल हे स्पष्ट करण्यात आले होते. तक्रारदाराने फ्लॅट मिळावा म्हणून केवळ अर्ज केला आहे. त्यांना कोणताही फ्लॅट दिलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेसुमार उपशाने उस्मानाबादचे वाळवंट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाचा दगा, सारी भिस्त जमिनीतल्या पाण्यावर. मग उन्हाळा आला पाड बोअरवेल, ऊस लावला पाड बोअरवेल, नवीन शेती घेतली तिथेही पाड बोअरवेल. उस्मानाबाद जिल्ह्यात शासकीय बोअरवेलची संख्याच ६ हजार ८१३. खासगी विचारूच नका. एकूण काय तर जमिनीची पाण्यासाठी चाळणी झाली, पण कुठही पाणी मुरले नाही. येत्या काळात जिल्ह्याची वाळवंटाकडे वाटचाल झाली तर नवल नको.

घरोघरी, शेतीला पाणी देण्यासाठी खोदलेल्या बोअरवेलची संख्या मोजण्याची यंत्रणा नाही. तरीही खासगी जमिनीवरील बोअरवेलची संख्या कमीत कमी ५० हजारांपेक्षा अधिक आहे. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र झाली. पाणी मिळवण्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी सुरू झाली. यातला सर्वांत सोपा मार्ग तो बोअरवेल पाडणे हीच धारणा झाली.

मात्र, आज घडीला ७०० ते १ हजार फुटांवरही पाणी लागत नाही. लहान मोठे सारेच प्रकल्प कोरडेठाक पडले. परिणामी मारलेले बहुतांश बोअरवेलही आटले. अनेकांनी बोअरवेल खोदले, पण पाणीच नसल्याने पैसेही वाया गेले. आता येणारा काळ कठीण आहे.

यंदाही समाधानकारक पाऊस नाही. पाणीपातळी खालावत चालली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरचेचे आहे. प्रशासन टँकरची व्यवस्था करेल. मात्र, पाणी कोठून आणायचे असा प्रश्न शासनापुढे उभा राहील. बेसुमार उपसा बंद केल्यासच उस्मानाबाद वाळवंट होण्यापासून वाचू शकेल.

- डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस घेणार भूमाफियांचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मकबऱ्यामागील १०४ रहिवाशांना क्षणात बेघर करणाऱ्या पडद्यामागील भूमाफियांच्या गळ्याभोवती पोलिसांनी चौकशीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाची युद्धपातळीवर चौकशी करून सात दिवसांत अहवाल द्या, असे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेला दिले. यातील सर्व दोषींवर गुन्हे दाखल केले जातील, असे त्यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. रेणुकामातानगर, ताजमहल कॉलनी परिसरातील फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे दाद मागतली होती.

बेगमपुरा परिसरातील रेणुकामातानगर, ताजमहल कॉलनी येथील घरे महसूल प्रशासनाने ताब्यात घेतली. मूळ मालक माधव सोनवणे यांच्या ताब्यात जमीन देण्यासाठी कोर्टाच्या आदेशाने महसूल विभागाने पोलिसांच्या मदतीने सोमवारी कारवाई केली. या भागात गेल्या काही वर्षांत नागरिकांनी प्लॉट विकत घेऊन घरे बांधली. मूळ मालक सोनवणे असले तरी भूमाफिया, दलालांनी त्यांची फसवणूक करत प्लॉटविक्री केली. यापैकी काही नागरिकांच्या प्लॉटची अधिकृत रजिस्ट्रीही झाली असून, सातबाऱ्यावरही काहींची नावे आहेत. या प्रकरणी शाहीराज उत्तम पाखरे व इतर २० रहिवाशांनी मंगळवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रारअर्जाद्वारे दाद मागितली. आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते रडारवर

पहाडसिंगपुरा येथील नागरिकांनी दलालाकडून प्लॉट विकत घेतले आहेत. मुखत्यारनामा असलेल्या व्यक्तीने दलालांच्या मदतीने प्लॉट विक्री केली. मात्र, यामागे एक विद्यामान नगरसेवक, माजी मंत्र्याचा मुलगा, शिवसेना भाजपच्या काही कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा पोलिसांचा संशय आहे. फसवणूक झालेल्या रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीवरून हे भूमाफिया पोलिसांच्या रडारवर आले असून, लवकरच त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

मकबऱ्याप्रकरणी सुरुवातीच्या बैठकीतच हा गुन्ह्याचा प्रकार असावा, अशी शंका आली होती. वकिलांनी कोर्टात रहिवाशांची बाजू व्यवस्थित मांडली नसल्याचे यावरून दिसून येते. या प्रकरणी युध्दपातळीवर सखोल चौकशी करण्याचे ‌आदेश दिले आहेत. सात दिवसांत अहवाल मागवण्यात आला असून, दोषींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

- अमितेशकुमार; पोलिस आयुक्त

यापुढे एनए-४४ असल्याशिवाय कोणत्याही प्लॉटचा फेर घेऊ नये, रजिस्ट्री करू नये असे पत्र सर्व तलाठी, मंडळ अधिकारी तसेच रजिस्ट्री कार्यालयाला दिले आहे.

- रमेश मुनलोड, तहसीलदार

पहाडसिंगपुरा प्रकरणात महापालिकेचा काहीच संबंध नाही. विकणाऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने जमीन विकली. त्या जमिनीबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडे कधी विचारणा केली नव्हती. ज्यांनी प्लॉट विकत घेतले त्यांनीही विचारणा केली नव्हती. बांधकाम परवानगीसाठीही कुणी महापालिकेकडे आले नाही. काही घरांना कर लागला असेल तर तो पीआर कार्ड, रजिस्ट्री व सात - बाराच्या आधारे लागला असेल.

- डी. पी. कुलकर्णी, सहाय्यक संचालक, नगररचना, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पक्षांतराची चर्चा अफवाचः विखे

$
0
0

औरंगाबादः 'कॉँग्रेसनेते आणि विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील पक्षांतर करणार,' या मेसेजने मंगळवारी नगर-औरंगाबाद जिल्ह्यात चर्चा रंगली. 'या चर्चेत काहीही तथ्य नाही' असे म्हणत विखे यांनी अफवांना पूर्णविराम दिला.

२९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विखे पाटील यांच्या आमंत्रणावरून नगर जिल्ह्यात आले होते. मुख्यमंत्र्यांना बोलाविल्यावरून विखे यांच्यावर टीका सुरू होती. १९९५ मध्ये युतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना बाळासाहेब विखे पाटील यांनी शिर्डीला बोलाविले होते. हा संदर्भ जोडून नगर जिल्ह्यातून सोशल मीडियावर विखे काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा आशयाचा मजकूर फिरत होता.

काँग्रेसच्या पर्दाफाश आंदोलनासाठी विखे मंगळवारी औरंगाबादेत आले होते. मोर्चानंतर पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, 'तुम्ही म्हणता त्या माध्यमातून काही फिरत असेल. त्याचा कंट्रोल अमेरिकेतून आहे. आपण इथून कसे नियंत्रण ठेवणार? आणि पक्ष बदलाच्या अफवा आहेत. त्यात तथ्य नाही.' दोन - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अफवांना विखेंनी उत्तर दिल्याने आता या चर्चेस पूर्णविराम मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिक शैक्षणिक फी माफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

'दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांची व्यावसायिक शिक्षणाची फी भरणे शक्य नसल्यामुळे ती फी माफ करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. वेळप्रसंगी कर्ज काढू; पण संकटात सापडेल्या शेतकऱ्यांना मदत करू,' अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लातूरमध्ये दुष्काळग्रस्तांना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ, निलंगा तालुक्यातील निटुर, गौर, तुपडी या गावांना भेटी देऊन औसा तालुक्यातील गावाकडे प्रयाण केले. मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यामध्ये लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रिय यांच्याबरोबर; तसेच शेतकऱ्यांशी मुक्त संवाद साधला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शेतकऱ्यांशीही ताफा थांबवून त्यांनी संवाद साधला. धान्याच्या पुरवठ्याविषयी चौकशी केली. या वेळी ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतींनी शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी दावणीला चारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शेतमजुरांना गावातच काम मिळेल आणि पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. चारा छावण्यांबाबत मुख्यमंत्री म्हणाले, 'मागील दुष्काळात जनावरांसाठीचा चारा इतरांनीच खाल्ला. आता हे होऊ दिले जाणार नाही. शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांनाच मिळेल, अशी व्यवस्था केली जात आहे. चारा छावणीचे नियम शिथिल केले आहेत. शेतकऱ्यांच्या दावणीजवळ चारा उपलब्ध करून देता येईल का, याचा अभ्यास सुरू आहे.'

खर्चाचा शेतकऱ्यांना लाभ नाही

मुख्यमंत्री म्हणाले, 'सत्तर हजार कोटी रुपये सिंचनावर खर्च झाले. परंतु, त्याचा शेतकऱ्यांना लाभ झाला नाही. आता हे चालणार नाही. जलयुक्त शिवार योजना लोकसहभागातून यशस्वी केली जात आहे. या दुष्काळाचेसुद्धा संधीत रुपांतर करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून शेततळी आणि आणि शक्य असेल, तिथे विहिरीची कामे सुरू करण्याचे आदेश दिलेत. वेळप्रसंगी कर्ज काढू; पण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना प्रतीक्षा आश्वासनपूर्तीची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीत लातूर, उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यांतील स्थिती चिंताजनक आहे. त्याची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे. त्यामुळे आता सरकारकडून काय मदत केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठिकठिकाणी जे ऐकले, त्यात जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्या, मजुरांच्या हाताला काम द्या, विद्यार्थ्यांची फी माफ करा, या प्रमुख मागण्या होत्या. मुख्यमंत्र्यांनीही निटूर, गौर, येरोळ, आशिव या ठिकाणी आश्वासने दिली. त्यात प्रामुख्याने दुष्काळाचा सामना करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, वेळ आली तर कर्जही काढण्याची तयारी दाखवली. पण, दुष्काळासंदर्भात एखादा निर्णय झाल्याशिवाय कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे आता तातडीने दिलेल्या आश्वासनांचे शासकीय आदेश निघाले पाहिजेत. वेळेवर मिळालेला न्याय आणि मदत जनता कधीच विसरू शकत नाही. तसेच, वेळेनंतर मदत मिळाली, तर जनताही माफ करत नाही, हेदेखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे. दुष्काळग्रस्त भागामध्ये अनेक जणांचे दौरे झाले. शेतकऱ्यांच्या पदरी मात्र काय पडले, याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात १९७२च्या दुष्काळात जुन्या उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांत इंदिरा गांधी यांनी खडी फोडण्याचे काम मजुरांना उपलब्ध करून दिले. कळंब आणि परिसरात खडीचे डोंगर उभे राहिले होते आणि त्याच खडीचा लातूर-मिरज रेल्वे रुंदीकरणाच्या कामासाठी उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे आजही दुष्काळ म्हटले, की खडी फोडणे आणि सुकडी खाऊन दिवस कंठणे, हे आठवते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्र्यांनीही रस्त्याच्या कामाचा, शेततळी निर्माण करण्याचा उल्लेख केला आहे. या उल्लेखांचे प्रत्यक्ष निर्णयात रूपांतर व्हायला हवे. मुख्यमंत्र्यानी या दौऱ्यात ठिकठिकाणी चाराछावणीबाबत वेळ पडली, तर नियम शिथिल करू, असे सांगितले आहे. ती वेळ आली आहे, असे सध्या म्हणावे लागेल. जनावरांसाठी चारा आणणे किंवा विकत घेणे सुरू झाले पाहिजे. कारण स्वयंसेवी संस्था सरकारला कितपत साथ देतील, हे सांगता येणार नाही. परंतु, ज्या संस्थानांवर तहसीलदार, जिल्हाधिकारी पदाधिकारी आहेत, त्यांनी शेतकऱ्यांसाठी चारा छावणीचा निर्णय घेतला पाहिजे. तुळजाभवानी देवस्थान, शिर्डी संस्थान यांना प्रोत्साहित केले पाहिजे. मराठवाड्यातील माणूस पावसाची चातकासारखी वाट पाहात आहे. त्याला आता सरकारने आता अध्यादेशाची वाट पाहायला लावू नये, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांची दौऱ्यातील देहबोली ही अस्वस्थपणे एखादा कार्यकर्ता सर्व काही पाहात असतो, अशी होती. त्यांनी लोकात मिसळून लोकांची 'मन की बात' समजून घेतली आहे. आता प्रतीक्षा सरकारच्या निर्णयाची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पशुधन अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

$
0
0

लातूरः पशुधन असल्याचे प्रमाणपत्र देण्याच्या कामासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पशुधन विकास अधिकाऱ्यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले.

तक्रारदाराकडे असलेल्या पशुधनाचे प्रमाणपत्र देण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद येथील पशुधन विकास अधिकारी ओमप्रकाश पोपले यांनी पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. या तक्रारानुसार लाचलूचपत विभागाचे पोलिस अधिक्षक श्रीकांत परोपकारी व पोलिस उपाधिक्षक सुरेश शेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांनी सापळा रचून आरोपी पशुधन विकास अधिकाऱ्यास ताब्यात घेतले.

या प्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक पंकज भालेराव, खंडारे, अशोक गायकवाड, विलास मलवाडे, व्यंकट पडीले, देशमुख, परमेश्वर अभंगे, नानासाहेब भोंग, प्रदिप स्वामी, शैलेश सुडे, सचिन धारेकर, विष्णू गुंडरे, धर्मपाल गुटे, दत्ता विभूते, जाधव आदिनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उस्मानाबाद पॅटर्न’चे कौतुक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही या अभियानाचे चांगले काम झाले आहे. या अभियानाचा उस्मानाबाद पॅटर्न राजस्थानने स्वीकारला, असे गौरवोद‍्गार त्यांनी काढले. उस्मानाबाद जिल्ह्याची परिस्थिती पाहून निकषांच्या बाहेर जाऊन या अभियानांतर्गत जिल्ह्यात जास्तीची कामे हाती घेऊ, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

परंडा तालक्यातील दुष्काळी भागाची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीय क्षत्रीय, प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्यासह आमदार राहुल मोटे, ज्ञानराज चौगुले, नारायण पाटील, सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, सुजितसिंह ठाकूर, नितीन काळे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले,'राज्य शासन संवदेनशील असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांत आत्मियतेने लक्ष घातले आहे. शासन शेतकरी आणि त्यांची गुरे यांना वाऱ्यावर सोडणार नाही.'

पालकमंत्री डॉ. सावंत यांनी या टंचाईच्या परिस्थितीत राज्य शासन संपूर्णपणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. आमदार मोटे आणि सुजितसिंह ठाकूर यांनी कृष्णा खोऱ्याचे काम पूर्ण करून सीना कोळेगावमध्ये पाणी आणण्यासंदर्भात मागणी केली.

चारा छावणी चालवणाऱ्या संस्थेच्यावतीने बाळासाहेब पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली व काही अटी शिथील करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रामस्थांना प्रातिनिधीक स्वरुपात विविध प्रमाणपत्रे आणि विविध योजनांचा लाभ प्रदान करण्यात आला.

हवामान केंद्र वाढविणार

राज्यात अवघे ५४ हवामान केंद्र असून ही संख्या २०५९ एवढी करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे. त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होईल. उस्मानाबाद जिल्ह्याने विविध बाबतीत चांगले काम केले आहे. याचा मुख्यमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख करुन त्याबद्दल जनतेचे तसेच जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या नेतृत्वाखालील यंत्रणेचे कौतुक केले.

एक लाख कामे पूर्ण

राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेचा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमात सहा महिन्यात एक लाख कामे पूर्ण झाली असून राजस्थान सारख्या राज्याने उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना या कामाचे महत्व सांगण्यासाठी निमंत्रण दिले. राजेंद्रसिंह यांच्यासारख्या जाणकार जलतज्ज्ञांनी या कामाचा गौरव केला. कमी खर्चात आणि कमी वेळात पाणी साठवण्याचे काम या योजनेमुळे होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक कर्मचाऱ्यांचा मूक मोर्चा

$
0
0

लातूरः प्रस्तावित कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेचे कर्मचारी सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला. कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊन कामकाज केले नाही. लातूरातील बँक कर्मचाऱ्यांनी मूक मोर्चा काढून केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाची जनतेला माहिती करून दिली.

महाराष्ट्र बँकेच्यासमोर निदर्शने करून बँक कर्मचाऱ्यांनी हातात मागण्यांचे फलक घेऊन मुक मोर्चा काढला. हा मोर्चा सुभाष चौक, गंजगोलाई, सराफलाइन, गुळमार्केट मार्गे स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या शाखेसमोर विसर्जित करण्यात आला.

कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात बहुमतातील सरकारला कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन दिलेले हे उत्तर असल्याचे बँक कर्मचारी संघटनेचे नेते धनंजय कुलकर्णी यांनी प्रस्ताविक कायद्यात कामगार विरोधी धोरणाची माहिती दिली. या आंदोलनाचे नेतृत्व प्रशांत धामणगावकर, उत्तम होळीकर, दीपक माने, बाळकृष्ण धायगुडे, सुरेंद्र कुलकर्णी, सरस्वती हेड्डा, संजिवनी गोजमगुंडे यांनी केले. बँका बंद राहिल्यामुळे लातूरात सातशे ते आठशे कोटीचा व्यवहार ठप्प झाल्याचा दावा धनंजय कुलकर्णी यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद प्रकल्पांतून रोजगाराचा मार्ग

$
0
0

Sachin.Waghmare@timesgroup.com

दुष्काळाची इष्टापत्ती करण्याविषयीच्या चर्चा सुरू असतानाच, मराठवाड्यात रखडलेल्या १८९ लघू व मध्यम सिंचन प्रकल्प व उपसा जलसिंचन योजनेचा सर्वांनाच विसर पडला आहे. शेतीतून जवळपास शून्य उत्पन्न येण्याची भीती असल्यामुळे, शेतकऱ्यांसमोर रोजगाराचा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला काम देतानाच, रखडलेल्या प्रकल्पांपैकी काही कामे निश्चित मार्गी लावता येतील. अन्य रखडलेल्या प्रकल्पांनाही राज्य सरकारने निधी देत, त्याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात खरीप हंगाम हातचा गेला आहे, तर रबीविषयीही चिंतेचे वातावरण आहे. या परिस्थितीमध्ये पाण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्नही येत्या काळामध्ये उपस्थित होऊ शकतो. आघाडी सरकारच्या काळात मराठवाड्यातील अनेक छोट्या-मोठ्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली होती. काही ठिकाणी कामे सुरू झाली. मात्र, सरकारकडून या कामांसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध न झाल्याने मराठवाड्यातील १८९ प्र‌कल्प रखडले आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाच्या काही कामांचाही समावेश आहे.

राज्य सरकारकडून गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. अशाच पद्धतीने रखडलेल्या प्रकल्पांच्या कामांच्या माध्यमातून भविष्यातील सिंचनाबरोबर शेतकऱ्यांच्या रोजगाराचाही प्रश्न मिटू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना या रखडलेल्या प्रकल्पांना निधी मंजूर करून, दुष्काळाग्रस्त नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आह‌े.

रखडलेले प्रकल्प

मराठवाड्यातील रखडलेल्या प्रमुख प्रकल्पामध्ये निम्न तेरणा प्रकल्प (जि. उस्मानाबाद), माजलगाव प्रकल्प (जि. बीड), निम्न दुधना, लेंडी (जि. परभणी), उर्ध्व पैनगंगा (जि. नांदेड) या प्रमुख प्रकल्पासह अनेक लघू व मध्यम प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे.

दुष्काळाचे संधीत रूपांतर करा

दुष्काळाचे संधीत रूपांतर करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून विविध कामे हाती घेणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. राज्यातील १९७२च्या दुष्काळात तत्कालीन सरकारने मजुराच्या हाताला रोजगार मिळावा, म्हणून विविध कामे हाती घेतली होती. त्याचप्रमाणे विविध कामे हाती घेण्याची गरज आहे.

मजुराच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी, राज्य सरकारने रखडलेल्या प्रकल्पांची कामे हाती घ्यायला हवीत. जलशिवार योजनेसोबतच ही रखडलेली कामे पूर्ण झाल्यास मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात ‌पाण्याची साठवण करता येईल. त्यामुळे याकडे राज्य सरकारने गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.

- अॅड. प्रदीप देशमुख, अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गांजा पुरवठादारास ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात सर्रासपणे गांजा विक्री करणाऱ्या दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने(ए टी एस ) २५ ऑगस्ट रोजी रात्री गजाआड केले होते. या दोघांना गांजाचा पुरवठा करणाऱ्यास अटक केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मनिषा कुलकर्णी यांनी गांजावाला सुब्बारेड्डीला ९ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

परभणी जिल्ह्यातील सेलू शहरामध्ये सर्रासपणे गांजा विक्री करण्यात येत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकास मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसच्या नांदेड युनिटचे पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, राजेंद्रसिंग गौर, जे. एन. फुलवाडकर यांच्या पथकाने सापळा रचून राजीव गांधीनगरातील अजिंठा कॉलनीतील शेख कैसर शेख आमिर, शेख सरवर शेख कैसर यांच्या घरावर छापा मारून ३ लाख ८४ हजार रुपये किंमतीचा ४७ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्या दोघा विरुध्द मुंबईतील काळाघोडा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोर्टाने २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

पोलिस कोठडीदरम्यान त्या दोघांनी हा गांजा अांध्र प्रदेशातील विशाखपटणम जिल्ह्यातील रामापूरम येथून सुब्बारेड्डी गंगीरेड्डी यांच्याकडून घेतला असल्याचे सांगितले. एटीएस पथकाने सुब्बारेड्डीला अटक केली असून, त्याला मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मनिषा कुलकर्णी यांच्यासमोर हजर केले. त्याच्या साथीदारांचा शोध घ्यायचा आहे, महाराष्ट्रात कोणत्या शहरात गांजा विकतो याची माहिती घ्यावयाची असल्यामुळे १५ दिवस कोठडी देण्यात यावी अशी विनंती अॅड. रुपाली मेतकेवार यांनी केली होती. कोर्टाने ही विनंती ग्राह्य धरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृत्रिम’चे विमान सर्व्हिसिंगसाठी बेंगळुरूला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी आलेले विमान सर्व्हिसिंगसाठी ‌बंंेगळुरूला पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आता शनिवारपर्यंत (५ सप्टेबर) कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार नाही. गेल्या दीड महिन्यांपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग औरंगाबाद येथे सुरू आहे.

दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या मराठवाड्यात क्लाउड सिड‌िंग करून पाऊस पाडण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला. अचूक ढग शोधण्यासाठी अमेरिकेहून डॉप्लर रडारही मागवण्यात आले. गेल्या दीड महिन्यापासून हा प्रयोग सुरू असून क्लाउड सिडिंगच्या प्रयोगाला फारसे यश मिळाले नाही. तरीही ढगांच्या शोधात विमान मात्र रोज घिरट्या घालणाऱ्या विमानाला बुधवारी (२ सप्टेबर) बेंगळुरू येथे सर्व्हिसिंगसाठी पाठवण्यात आले आहे.

कृत्रिम पावसासाठी रडार आल्यामुळे ढगांची अचूक छायाचित्रही मिळणे सुरू झाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात पाऊस पाडणारे उपयुक्त ढगच नसल्यामुळे प्रयोगाला ग्रहण लागले आहे. राज्यात कुठेही उपयुक्त ढग दिसत नसल्यामुळे कृत्रिम पावसाबा‌बत उत्तर देतांना तंत्रज्ञांचीही अडचण होत आहे.

येणारा आठवडाही कोरडाच

सध्या वातावरणात पाऊस पाडण्यायोग्य ढगच उपलब्ध नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून विमान केवळ घिरट्या मारत असून, पावसाचा मात्र पत्ता नाही. शनिवारपर्यंत विमानाचे टेक ऑफ होणार नाही, तर येणाऱ्या आठवड्यात पावसाचीही कोणतीही शक्यता नसल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबाद तालुक्यात मटका सुरू

$
0
0

खुलताबादः दुष्काळी परिस्थितीत मटका चालकांनी शेतकरी शेतमजुरांना जुगाराच्या जाळ्यात अडकवले असून तालुक्यात कागजीपुरा, खुलताबाद, वेरूळ, कसाबखेडा, पळसवाडी, गल्ले बोरगाव, बाजारसावंगी परिसरात राजरोसपणे मुंबई-कल्याण मटका, पत्त्याचे क्लब सुरू आहेत. याकडे स्थानिक पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष आहे. खुलताबाद तालुक्यात पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. पर्यटकांच्या वर्दळीत राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सुरू केलेली अवैध धंद्याविरुद्धची मोहीम थंडावली आहे. मटका चालक मोबाइल बुकींचा वापर करीत असून, शेतकरी शेतमजूर जुगाराच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. दुष्काळी परिस्थितीत काम धंदा नसतांना जवळ असलेले पैसे तरुण, शेतकरी, शेतमजूर जुगारात घालवत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूरच्या तरुणाला तीन वर्षे कारावास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

पत्नी व भांडण सोडवण्यासाठी आलेल्या एकाला कुऱ्हाडीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश के. ए. कोठेकर यांनी गंगापूर येथील अल्ताफ उस्मान बेग (वय ३५) याला तीन वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी तीन महिने शिक्षेचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

गंगापूर शहरातील मन्सुरी गल्ली भागातील रहिवासी अल्ताफ बेग याचे ६ मार्च २०१३ रोजी पत्नी रुख्सानासोबत काही कारणावरून भांडण झाले होते. त्याचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या धनसिंग बन्सी परमेश्वरे याच्यावर अल्ताफ याने कुऱ्हाडीने हल्ला करुन गंभीर जखमी केले व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा गुन्हा गंगापूर पोलिसात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, २६ जून २०१३ रोजी अल्ताफ याने न्यायालयाने जामीनावर लवकर सोडले नसल्याचा राग धरून रुख्साना हिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यांचा सहायक पोलिस निरीक्षक एम. आर. राठोड व एन. एम. मेहेत्रे यांनी तपास करून वैजापूर येथील सेशन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीच्यावेळी न्यायालयाने १७ साक्षीदार तपासले. साक्षीपुराव्याच्या आधारे अल्ताफ बेग याच्याविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला तीन वर्षाचा कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा भोगण्याचे आदेश दिले. तक्रारदारातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल अॅड नानासाहेब जगताप यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ घरांवर जेसीबी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

शासकीय जमिनीवर तीस वर्षांपासून झालेले अतिक्रमण नगर पालिका व महसूल प्रशासनाने बुधवारी (२ सप्टेंबर) बंदोबस्तात काढले. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने हे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाने येथे २५ कुटुंबांनी अतिक्रमण करून बांधलेली घरे व दुकाने पाडण्यात आली.

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार अतिक्रमण काढले जाणार याची कल्पना आल्याने येथील नागरिकांच्या मनात भीती होती. नगर पालिकेने शहरातील ४०० जणांना अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावली असल्याने चार दिवसांपासून त्यांच्यात भीती आहे. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यास बुधवारी सकाळी सुरुवात झाली. येथील घरे व दुकाने जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आली. नगर पालिकेचे ८० कर्मचारी व ४० पोलिस कर्मचाऱ्यांनी हे अतिक्रमण काढले.

तत्पूर्वी नागरिकांना सामान बाहेर काढण्यासाठी मुदत देण्यात आली होती. अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झाली तेव्हा तहसीलदार महेश सुधळकर, कन्नडचे तलाठी विकास वाघ, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यावलकर, पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्ना शहापूरकर, ज्ञानेश्वर पायघन, पोलिस उपनिरीक्षक संदीप काळे, ए. बी. शिंदे, नगर पालिकेचे मुख्यधिकारी संतोष आगळे, पथकप्रमुख स्वच्छता निरीक्षक नाना गायकवाड उपस्थित होते.

काय आहे प्रकरण

बस स्थानक नवीन ठिकाणी स्थलांतरित झाल्यानंतर सुमारे तीस वर्षांपूर्वी ही वस्ती झाली आहे. होती. सर्व्हे नंबर ४०मधील जागा वन विभागाची असून सर्व्हे नंबर १/२७ मधील जागा एसटी महामंडळाची आहे. शहरातील नागरिक एजाज शेख व अनिस कमरुद्दीन काजी यांनी हे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढावे यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने २३ जून २०१५ रोजी अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला.

राजकीय नेत्यांची पाठ

हायकोर्टाचा आदेश आल्यानंतर येथे राहणाऱ्या गरीब, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाना काय करावे सूचत नव्हते. कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना भूलथापा देणारे नेते प्रत्यक्षात कारवाई सुरू झाल्यानंतर फिरकले सुद्धा नाहीत. दरम्यान अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झाल्यानंतर शहरातील व्यवहार विस्कळीत झाले.

आज पुन्हा कारवाई

राष्ट्रीय महामार्ग २११ वरील अतिक्रमण काढण्याची कारवाई गुरुवारी (३ सप्टेंबर) रोजी केली जाणार आहे. रस्त्यावरील अतिक्रमणांना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे साईट इंजिनीअर आशिष देवतकर यांनी दिली. गुरुवारच्या कारवाईसाठी बुधवारी मार्किंग करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images