Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

इतवारा पोलिसांनी पकडला ५० लाख रुपयांचा गुटखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

इतवारा पोलिसांनी पकडलेला गुटखा हा २५ लाखांचा नसून तब्बल ५० लाखांपेक्षा जास्त किमतीचा आहे. हे आता गुन्हा दाखल झाल्यावर स्पष्ट झाले आहे. इतवारा पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुटखा या प्रतिबंधित पदार्थाविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीत हा गुटखा ५ संप्टेबरच्या रात्री १ वाजता पकडल्याचे लिहिले आहे. हा गुटखा ५० लाख ३४ हजार रुपयांचा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गुटखा गोडावून मण्यार गल्ली जवळील केला मार्केट भागात आहे. छापा टाकला तेव्हा पोलिस उपनिरीक्षक सदाशिव ढाकणे, पोलिस कर्मचारी गणपत पेदे, माधव गवळी, शेख लियाकत, चंद्रकांत स्वामी, रामकिशन मोरे आणि अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे हजर होते.

सकाळी १० वाजताच या बातमीला प्रसिद्धी मिळत होती त्या वेळी मिळालेल्या माहितीनुसार हा पकडलेला गुटखा २५ लाखांच्या आसपासच्या किमतीचा होता. आता गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यातील रक्कम ५० लाख ३४ हजार अशी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन प्र‌कल्पांच्या ‘उंची’वाढीला खो

$
0
0

Sachin.Waghmare@timesgroup.com

सिंचन प्रकल्पांच्या उंची वाढविण्यातून बुडीत क्षेत्रावर धरणातील गाळाच्याच मदतीने साठवण क्षमता वाढविण्याच्या प्रयोगाला प्रशासनाने खो दिला आहे. या प्रकारचे काम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याच्या सूचना मिळालेल्या असतानाही, या कामांकडे दुर्लक्ष झाले आहे. पर्यायाने, यंदाच्या दुष्काळात बीड जिल्ह्यातील सिंधफणा व लातूर जिल्ह्यातील घरणी प्रकल्पांच्या परिसरात यंदाच्या दुष्काळात त्याचा फायदा होऊ शकतो, मात्र ते चित्र दिसून आले नाही. आता तरी हे काम हाती घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दोन वर्षांपूर्वीच्या दुष्काळामध्ये 'माता रमाई सिंचन मूल्यवर्धन योजना' राबविण्यासंदर्भातील वृत्त 'मटा'मधून प्रसिद्ध झाले होते. तत्कालिन आघाडी सरकारने त्याची दखल घेत हा प्रयोग राबविण्यास तत्त्वत: मान्यता दिली होती. राज्यात सत्तांतर झाले आणि नव्या सरकारसमोर या योजनेचे नव्याने सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर बीड जिल्ह्यातील सिंधफणा व लातूर जिल्ह्यातील घरणी प्रकल्पाचे सर्व्हेक्षण करण्यात आल्याने या दोन प्रकल्पांची निवड केली.

सिंधफणा येथील रखडलेल्या प्रकल्पावर सरकारने १२ कोटी रुपये खर्च केले होते. या प्रकल्पाची उंची वाढविल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावे लागणार असल्याने विरोध दर्शविला होता. मात्र, या योजनेनुसार उंची वाढविल्यानंतर कसलेच भूसंपादन करावे लागणार नसल्याने शेतकऱ्यांचा विरोध मावळला. त्यांनी हे रखडलेले काम पूर्ण करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे आता हा प्रकल्प मार्गी लागेल, असे वाटत असतानाच काही अधिकाऱ्यांनी या योजनेस खो घालण्याचे काम केल्याने काम रखडले आहे.

या योजनेसाठी कोणतीच शासकीय गुंतवणूक करावी लागणार नाही. बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बिओटी) या तत्त्वावर ही योजना सर्वत्र राबविता येईल.

- रवींद्र पाठक, प्रस्तावकर्ता, निर्मिती कन्स्लटंट, पुणे

घरणी प्रकल्पाची उंची वाढविल्यांनतर भूसंपदानामुळे काही शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने प्रकल्पाला विरोध केला होता. माता रमाई सिंचन योजनेमुळे शेतकऱ्यांची जमीन बुडित क्षेत्रात जाणार नसल्याने या प्रकल्पाचे काम सुरू करण्यास विरोध नाही.

- शिवाजी तोंडारे, शेतकरी, ‌नळेगाव, जि. लातूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयुक्त हटाव’साठी शिवसेनेवर मदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांना हटविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले असले तरी, त्यांना या पदावरून दूर करण्याची शक्यता धूसर आहे. महसुलमंत्री एकनाथ खडसे यांच्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात 'आस्ते कदम' जाण्याची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपची संपूर्ण मदार शिवसेनेवरच आहे.

महापालिकेचे आयुक्त आणि पदाधिकारी यांच्यातील वाद हा नवा नाही. प्रत्येक आयुक्त व पदाधिकारी यांच्यात कोणत्या न कोणत्या विषयावरून वाद झाले आहेत, पण कोणीही फार टोकाची भूमिका घेतली नाही. आता महापालिकेत आयुक्त प्रकाश महाजन विरुद्ध सर्व पदाधिकारी, असे चित्र निर्माण झाले आहे. महाजन सहकार्य करीत नाहीत, असे कारण पुढे करून सर्व पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून आयुक्तांच्या बदलीची मागणी केली आहे. मागणी केली असली तरी बदली कोण घडवून आणणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सहकार्य करीत नाहीत हा मुद्दा बदलीसाठी पुरेसा आहे, असे मानले जात नाही. त्यातच महसुलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी महाजन यांचे चांगले संबंध आहेत. महाजन यांच्या सेवानिवृत्तीला तीन ते चार महिनेच बाकी राहिलेले असताना त्यांची बदली होऊ नये, असा प्रयत्न केला जात अाहे. त्यासाठी महसुलमंत्र्यांचाही पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रासंदर्भात आता शिवसेनेनेच पुढाकार घ्यावा, अशी भूमिका भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

यासंदर्भात भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, आयुक्तांच्या बदलीच्या पत्रावर आम्ही स्वाक्षऱ्या केल्या आहेत, पण त्यासंदर्भात आमची भूमिका अद्याप ठरलेली नाही. पक्षाच्या पातळीवर यासंदर्भात चर्चा करावी लागेल. या चर्चेबाबत काहीच ठरलेले नाही.

शिवसेनेचे 'वेट अँड वॉच'

आयुक्तांच्या बदलीसंदर्भात काय भूमिका घ्यायची, याबद्दल शिवसेनेच्या गोटात वेट अँड वॉचची स्थिती आहे. नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे बदलीचे अधिकार मुख्यमंत्र्यांनाच आहेत. मुख्यमंत्री भाजपचे असल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनीच पुढाकार घ्यावा असे शिवसेनेचे पदाधिकारी खासगीत सांगतात. आयुक्तांच्या बदलीप्रकरणात पालकमंत्री रामदास कदम यांना विनंती केली तर ते मदत करण्यात येईल, पण त्यांना यासंदर्भात बोलायचे की नाही हे शिवसेनेच्या गोटात ठरलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिटमिट्यात डोंगर उकरून अवैध प्लॉट विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिटमिटा परिसरात डोंगर कापून अवैध प्लॉट विक्री जोरात सुरू आहे, मात्र गैरप्रकारांची माहिती असूनही महसूल प्रशासन व वन विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. गायरान जमीन, डोंगरमाथा आणि पायथ्याला सर्रास प्लॉट विक्रीच्या पाट्या लागल्या आहेत. स्थानिक नेते, वन अधिकारी व दलालांच्या हातमिळवणीतूनच जमीन विकली जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

भूमाफियांनी शहर परिसरातील डोंगर व टेकड्या गिळंकृत करण्याचा सपाटा लावला आहे. या तडाख्यात मिटमिटा गावामागील डोंगरही अपवाद ठरले नाहीत. शेकडो एकर गायरान जमीन महसूल प्रशासनाच्या हद्दीत असून, डोंगर व इतर जमीन वन विभागाच्या हद्दीत आहे. खुलताबाद वनपरिक्षेत्रातील जमीन व डोंगराबाबत वन अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. परिणामी, शेकडो एकर जमिनीवर अनधिकृत प्लॉटींग सुरू आहे. गायरान जमिनीवर राजकीय नेत्यांनी खांब रोवून कोट्यवधी रुपयांची जमीन ताब्यात घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी भटक्या समाजाची अतिक्रमित वस्ती प्रशासनाने तातडीने काढली, पण नेत्यांची अतिक्रमणे काढण्यासाठी महसूल अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. जमीन ताब्यात घेऊन अवैधपणे कुंपण घातले आहे तर, वन जमिनीवर प्लॉटिंग सुरू आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल यांना माहिती असूनही काणाडोळा करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला, मात्र भूमाफियांची दहशत असल्याने कुणीही तक्रार करण्यास धजावत नसल्याची वस्तुस्थिती आहे. मिटमिटा डोंगरपायथ्यापर्यंत प्लॉट पडले आहेत. डोंगराच्या तळाचा भाग पोकलेनने उकरून जमीन 'लेव्हल' करण्यात आली आहे. येथे खोली बांधून सर्वत्र मार्किंग केले आहे. एका ओढ्यावर चक्क तीन मजली इमारत उभी आहे. परिसरात वीज, पाणी, रस्ता या सुविधा नाहीत, मात्र चढे दर पाहून दलालांनी सर्वत्र अतिक्रमण वाढवले आहे.

डोंगर धोक्यात

निसर्गसंपन्न मिटमिट्याची मूळ ओळख धोक्यात आली आहे. शहरीकरणाचा पहिला फटका डोंगरांना बसला आहे. मिटमिटा डोंगरावर गोशाळा बांधली असून, गोशाळेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. वन विभागाने बांधकामाला दीड वर्षांपूर्वी आक्षेप घेतला होता, पण राजकीय बळावर गोशाळा पूर्ण करण्यात आली. गोशाळेचा हौद अगदी माथ्यावर बांधण्यासाठी डोंगराचा मोठा भाग जमीनदोस्त करण्यात आला. अगदी डोंगरावर बांधकाम करण्यास परवानगी कशी मिळाली, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच मिटमिटा येथील डोंगराचा आढावा घेण्यास सांगितले होते. अतिक्रमणे वाढली असतील तर पुन्हा पाहणी करून कारवाई केली जाईल.

- अशोक गिऱ्हेपुजे, उप वनसंरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमाफियांवर कारवाईस उशीर का’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहाडसिंगपुरा भागातील बेघर झालेल्या २५० कुटुंबांच्या आक्रोशाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. भूमाफियांमुळे आमची फसवणूक झाली. महसूल प्रशासनाने आमची घरांवर तातडीने कारवाई केली, मात्र माफियांविरोधात कारवाई करण्यास एवढा उशीर का, असा रोकडा सवाल नागरिकांनी केला.

भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे शनिवारी (५ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा सरचिटणीस प्रा. राम बाहेती यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. खोकडपुरा भागातील भाकप कार्यालयापासून मोर्चाची सुरुवात झाली. अॅड. अभय टाकसाळ, अश्फाक सलामी, भास्कर लहाने, प्रीतम धनघावे, पंचशीला खोब्रागडे, महेंद्र कुरील, माधुरी जमधडे, सुनीता वैष्णव, शारदा शिंदे, मुकेश होळकर, भारती कुंभार, सम्यक जमधडे यांच्यासह बेघर नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.

मोर्चोकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. भूमाफिया; तसेच राजकारण्यांच्या संगनमताने रहिवाशांना बेघर करण्यात आले, असा आरोप यावेळी करण्यात आला. दोषी महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. बेघरांसाठी छावण्या उभाराव्यात तसेच न्यायालयात आमची बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणीही यावेळी बेघर नागरिकांनी केली.

तात्पुरत्या निवाऱ्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्हाधिकारी निधी पांडेय यांच्यासमोर अॅड. अभय टाकसाळ यांनी या प्रकरणातील वस्तुस्थितीचे कथन केले; तसेच बेघरांसाठी तात्पुरत्या निवारा उभारण्यासाठी आग्रह धरला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. अतिरिक्त जिल्हाधिकारी चोरमारे यांनी निवारा उभारण्याबाबत सूचनाही केली. याप्रकरणी प्रशासनातील अधिकारी, तहसीलदार दोषी असल्याचे सांगून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी टाकसाळ यांनी यावेळी केली.

पावसामुळे दाणादाण

पहाडसिंगपुरा भागातील रेणुकामातानगर व ताजमहलनगरातील घरांना महसूल प्रशासनाने सील केले. त्यामुळे जवळपास २५० कुटुंब बेघर झाले. घरांना सील असले तरी त्यांनी अद्याप आपल्या घराचा परिसर सोडलेला नाही. शुक्रवारी मध्यरात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे त्यांची दाणादाण उडाली. पावसापासून बचाव करण्याकरिता नागरिक, लहान मुलांना जनावराच्या गोठ्यामध्ये आश्रय घ्यावा लागला. कठीण परिस्थितीतच त्यांनी रात्र जागून काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूल कारागृहात कैद्याचे उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल कारागृहातील कच्चा कैदी अमोल खोतकर याने उपोषण सुरू केले आहे, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. अमोल हा एका गुन्ह्याच्या आरोपाावरून गेल्या अडीच वर्षांपासून कारागृहात अाहे, त्याचा पोलिसांकडून छळ होत आहे. त्याला मारहाण केली जाते, असा आरोप नातेवाईकांनी केला. या छळाला कंटाळून त्याने उपोषण सुरू केल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले.

कच्च्या कैद्यांना आठवड्यातून एक वेळा कुटुंबीयांची भेट घेत येते, परंतु भावास भेटण्यासाठी गेले असता माझी अडवणूक केली जाते. भेटीसाठी नियमापेक्षा कमी कालवधी दिला जातो. त्याचबरोबर एकदा पैशांची मागणी करण्यात आली, असा आरोप अमोलच्या बहिणीने निवेदनात केला आहे. नियमाप्रमाणे नातेवाईकांशी बोलू द्यावे, अशी विनंती अमोलने तेथील अधिकाऱ्यांना केली असता, त्याला शिवीगाळ करण्यात आली. तेव्हापासून छळ सुरू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

१८ ऑगस्ट रोजी तो कोर्टात तारखेसाठी आला असता त्याने छळाबाबत माहिती अर्जाद्वारे दिली. त्यानंतरही त्यास त्रास देणे सुरुच आहे. त्याला कंटाळून त्याने उपोषण सुरू केले आहे, अशी माहिती त्यांची नातेवाईकांनी निवेदनात दिली आहे. ४ सप्टेंबर रोजी हर्सूल कारागृहात गेले असता त्याला भेटू दिले नाही, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. यासंदर्भात हर्सूल कारागृहात संपर्क साधला असता, वरिष्ठ अधिकारी नसल्याने माहिती देता येणे शक्य नाही. रविवारी संपर्क साधावा, असे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधी पर्यायी जागा द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पर्यायी जागा देण्याची मागणी करीत मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन जवळील नागरिकांनी शनिवारी रस्त्याच्या मार्किंगचे काम बंद पाडले. शिवाजीनगर ते रामनगर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या घरांवर मार्किंग केले जात आहे.

महापालिकेने जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम कोर्टाच्या आदेशानुसार हाती घेतले आहे. हा रस्ता विकास आराखड्यानुसार २४ मीटर रुंदीचा आहे. या रस्त्यात येणारी घरे व दुकाने पाडण्याचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याबरोबरच शिवाजीनगर ते रामनगर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम देखील हाती घेण्याचे महापालिकेच्या प्रशासनाने ठरविले. त्यानुसार मार्किंग करण्याचे काम सुरू करण्यात आले. शिवाजीनगर ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन हा रस्ता ८० फूट तर, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन ते रामनगर हा रस्ता ६० फूट रुंदीचा आहे. ८० आणि ६० फुटांचा रस्ता कसा, संपूर्ण रस्ता एकतर ८० किंवा ६० फुटांचा हवा, असा आक्षेप नागरिकांनी घेतला आहे. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या परिसरात शनिवारी महापालिकेचे अधिकारी रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या घरांवर मार्किंगचे काम करीत होते. काही नागरिकांनी हे काम बंद पाडले.

घरांचे बांधकाम केले जात होते तेव्हा महापालिकेने आक्षेप का घेतला नाही. त्यावेळीच बांधकामे थांबवली असती तर पाडापाडी करण्याची वेळ आली नसती. या भागात राहणारे बहुतेक नागरिक अल्प उत्पन्न गटातील आहेत. त्यांनी मोठ्या कष्टाने घरे बांधली आहेत. घर पाडणार असाल तर, घरासाठी पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे केली. नागरिकांचा रोष लक्षात घेऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मार्किंगचे काम बंद केले. या भागातील सुमारे १५० घरे रस्तारुंदीकरणात बाधित होत आहेत.

पालिका आयुक्तांना 'घेराओ'

महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांनी शनिवारी सायंकाळी मुकुंदवाडी ते रामनगर रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी नागरिकांनी त्यांना घेराओ घातला. 'आमची पर्यायी व्यवस्था करेपर्यंत आम्ही घरे पाडू देणार नाहीत. जेसीबी आमच्या अंगावरून घाला,' असे नागरिकांनी त्यांना सांगितले. 'घरासंबंधीची कागदपत्रे महापालिकेत जमा करावीत. त्यांची छाननी करून पुढील निर्णय घेण्यात येईल,' असे आयुक्त महाजन यांनी नागरिकांना सांगितले. जयभवानी नगर चौकातही आयुक्तांची गाडी नागरिकांनी अडविली होती.

पर्यायी जागा दिल्याशिवाय पाडापाडी नको

शिवाजीनगर ते रामनगर या प्रस्तावित रस्त्यासाठी गोरगरीबांची मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ असलेली घरे पाडली जाणार आहेत. गेल्या २० वर्षांपासून या भागात नागरिकांनी २० बाय ३०चे प्लॉट खरेदी करून घरांचे बांधकाम केले आहे. हे नागरिक वीज बिल भरतात, त्यांच्याकडे आधार कार्ड, निवडणुकीचे कार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड आहेत. असे असताना हे नागरिक बेकायदा राहतात असे कसे म्हणता येईल, असा आक्षेप घेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या रस्त्यात बाधित होणाऱ्या नागरिकांना पर्यायी जागा देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर प्रा. राम बाहेती, सुभाष लोमटे, अश्फाक सलामी, मधुकर खिल्लारे, भास्कर लहाने आदींची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा शुल्कमाफीला विद्यापीठाचा हरताळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शुल्कमाफीचा घोषणा कागदावरच राहिली आहे. दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांकडूनही सर्रास परीक्षा शुल्क वसुली सुरू आहे. शासनाने २५ जुलै रोजी शुल्कमाफीबाबत पत्र पाठविले, मात्र त्याकडे विद्यापीठाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मात्र संतापाचे वातावरण आहे.

मराठवाड्यात सलग तीन वर्षांपासून दुष्काळजन्य स्थिती आहे. त्याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला असून, दुष्काळामुळे अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजांचे शुल्क भरणेही अडचणीचे झाले आहे. हे लक्षात घेत शैक्षणिक, परीक्षा शुल्क माफी करावी, अशी मागणी सुरुवातीपासून होत आहे. २५ जुलै रोजी शासनाने त्याबाबत परिपत्रक काढले. अंतिम पैसेवारी ५०पेक्षा कमी असलेल्या गावांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. परिपत्रक निघाल्यानंतरही परीक्षा शुल्क आकारणी सर्रास सुरू आहे. सध्या विद्यापीठांच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१६मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेची परीक्षा शुल्क आकारणी सुरू आहे.

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये पारंपारिक अभ्यसाक्रमांपेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे परीक्षा शुल्क अधिक आहे. ९४५ ते १२०० रुपये परीक्षा शुल्क आहे. पारंपरिक अभ्यासक्रमाचे शुल्क सहाशेच्या घरात आहे. दुष्काळाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे शुल्क भरणेही अचडणीचे असताना विद्यापीठ प्रशासन, सहसंचालक कार्यालयांकडून दुर्लक्ष होते आहे. विभागात अंतिम पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या गावांची संख्या सुमारे ३ हजारांपेक्षा अधिक आहे.

शुल्कमाफीबाबत विद्यापीठाच्या कोणत्याही सूचना नाहीत. परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कही भरणे शक्य नाही. याकडे खरेच गांभीर्याने पहायला हवे.

- डॉ. एस. व्ही. बिराजदार, प्राचार्य, एस. बी. सायन्स कॉलेज

दुष्काळामुळे संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांचा विचार करायला हवा. शुल्क माफीबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यांनही शुल्क आकारले जाते आहे, ही गंभीर बाब आहे. शासनाने त्वरित लक्ष घातून अशा प्रकारची वसुली थांबवायला हवी.

- तुकाराम सराफ, विद्यापीठ प्रमुख, भाविसे

दुष्काळाचा विचार करत कॉलेजांनी अशा प्रकारे परीक्षा शुल्क वसूल करणे योग्य नाही. विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे कॉलेजांनी सुरू केलेली वसुली थांबवायला हवी.

- राहुल तायडे, शहराध्यक्ष, राष्टवादी विद्यार्थी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थकित वेतनासाठी मुप्टाचे ‘टक्कल करो’ आंदोलन

$
0
0

औरंगाबाद : महाराष्ट्र विनानुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेतर्फे (मुप्टा) थकित वेतनासाठी शिक्षकदिनी टक्कल करो आंदोलन करण्यात आले. गेल्या १४ वर्षांपासून शासनाच्या विनानुदानित धोरणाचा फटका राज्यातील जवळपास ४८०० विनानुदानित शाळांमधील ४५ ते ४६ हजार कर्मचाऱ्यांना बसला आहे. या शाळांमधील कर्मचाऱ्यांना संस्थाचालक तसेच शासनाकडून एकही रुपया कामाचे वेतन मिळत नाही. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. २०१३-१४ या वर्षी शासनाने या शाळांमधील कर्मचाऱ्यांना अनुदान देण्यासाठी अनुदान मूल्यांकन करून घेतले. जाचक अटी लावूनही ४८०० शाळांपैकी १६२२ शाळा अनुदानास पात्र ठरल्या, परंतु शासनाने अनुदान न देण्यासाठी त्रयस्त समिती नेमून फेरमूल्यांकन करून घेतले. त्यातही १६२२ शाळा अनुदानास पात्र ठरल्या. संघटनेतर्फे निधीसाठी आंदोलने करण्यात आली, परंतु शासनाने याकडे दखल घेतली नाही. या आंदोलनात शिवराम म्हस्के, शिवाजी जाधव, सुरेश गवळी, हकीम पठाण आदींनी सहभाग घेतला. संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात शिक्षकदिनी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलेली बेताल वक्तव्ये, शिक्षण विभागाने गेल्या काही दिवसांत घेतलेले जाचक निर्णय, शिक्षकांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांकडे होत असलेले दुर्लक्ष याचा निषेध करत शिक्षक संघटनांनी शिक्षकदिनाचे (५ सप्टेंबर) औचित्य साधत आंदोलने केली. धरणे आंदोलन, काळ्या फिती लावणे तसेच मुंडण आंदोलन करण्यात आले.

शिक्षण विभागाने घेतलेले जाचक निर्णय, शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत शनिवारी विविध शिक्षक संघटनांनी काळा दिन पाळला. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन केले. शिक्षकांना कामचुकार संबोधून जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे, संस्थाचालकांना 'दरोडेखोर' म्हणणे, असे शब्द आजवर राज्यातील कोणत्याच शिक्षणमंत्र्यांनी वापरलेले नव्हते. शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांची माफी मागावी. रोज जाचक निर्णय घेवून शिक्षण क्षेत्राला नाहक त्रास देणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शनिवारी दुपारी एक वाजता विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाचे अध्यक्ष वाल्मिक सुरासे, काँग्रेस शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मनोज पाटील, संस्थाचालक संघटनेचे एस. पी. जवळकर, उर्दू शिक्षक संघटनेचे मिर्जा सलिम बेग, मुख्याध्यापक संघटनेचे शिवाजी चव्हाण, मोहन चव्हाण, मंगला हुमे, आनंद खरात यांच्यासह विना अनुदान कृती समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिक्षक भारती संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत, शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला विनाविलंब करण्यात यावे, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याच्या अटीतून वगळण्यात यावे, सावित्री - फातेमा कॅशलेस आरोग्य योजना सुरू करण्यात यावी, विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान सुरू करून शिक्षकांची उपासमार बंद करावी, वस्तीशाळा शिक्षकांची सेवा मूळ नियुक्तीपासून ग्राह्य धरून सर्व लाभ देण्यात यावेत आदीं मागण्यासाठी शिक्षक भारतीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे, शेख मुश्ताक, संतोष ताठे, रामदास कवठेकर, दत्तात्रय गायकवाड, महेंद्र बारवाल, इरफान पठाण, राजेश भुसारी यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस ठाण्याच्या आवारात जादूचे प्रयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील व्हीआयपी पोलिस स्टेशन असलेल्या क्रांती चौक पोलिस ठाणे आवारात शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पोलिस निरीक्षकांच्या खास उपस्थितीत जादूचे प्रयोग रंगला. पोलिस कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी हा प्रयोग पाहण्यासाठी चांगली गर्दी केली होती. तक्रारीचा निपटारा व्हावा, यासाठी पोलिस आयुक्त कसोशीने प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे मात्र येथे असे वेगळेच प्रयोग पाहण्यात अधिकारी दंग राहिल्याने उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावणाऱ्याबरोबरच गुन्हेगारांवर वचक निर्माण केला आहे. त्यांच्या खास कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये एक विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि त्यामुळेच त्यांच्या दालनाबाहेर तक्रारादारांनी, त्यांना भेटणाऱ्यांची नेहमीच रिघ असते. शनिवारी सकाळापासून ते दुपारपर्यंतही अशीच गर्दी होती. नागरिकांच्या तक्रारीची सोडवणूक व्हावी, यासाठी पोलिस आयुक्त काम करत असतानाच त्याचवेळी मात्र क्रांती चौक पोलिस ठाण्यात अमरावती येथून आलेल्या एका सय्यद नावाच्या जादूगाराचे प्रयोग रंगला होता. त्यासाठी ठाणे आवारात चक्क खुर्ची टाकून दस्तुरखूद पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर बसले होते. साहेबच बसले म्हटले की, अन्य कर्मचाऱ्यांनी गर्दी केली तसेच अन्य बघ्याचीही गर्दी झाली होती. चेंडू गायब करणे, नरसाळ्यातून पाणी काढण्यासारखे अनेक प्रयोग त्याजादूगाराने दाखविल्यानंतर पोलिसांसह अन्य लोकांनी बक्षीस म्हणून त्यास पैसे दिले.

तर प्रयोग चांगला झाल्याचे एक लेखी पत्रही पोलिस अधिकाऱ्याने दिल्याचे सुत्रांनी दिले. यादरम्यान, एका तक्रारादार तेथे आला होता. पण, अधिकाऱ्यासह कर्मचारी जादूचटे प्रयोग पाहण्यात दंग असल्याने त्या तक्रारदारालाही काहीकाळ प्रतिक्षा करावी लागली. परंतु, त्याने यावर भाष्य करण्याचे टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाना, मकरंदची शेतकऱ्यांना मदत

$
0
0

औरंगाबाद : सामाजिक बांधिलकी जपत मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना धीर देऊन त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पुढाकार घेतला आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त १३५ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सोमवारी (७ सप्टेंबर) प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. मराठवाडा गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळाने होरपळत आहे. सतत होणाऱ्या नापिकीमुळे मराठवाड्यातील शेतकरी त्रस्त आहेत. गेल्या दोन वर्षांत औरंगाबाद व जालना जिल्ह्यात जवळपास १३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीला प्रख्यात चित्रपट कलावंत नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे हे धावून आले आहेत. त्यांनी नुकताच बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली आहे. सोमवारी दुपारी एक वाजता सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजक चंद्रकांत मोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंप उद्या बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका क्षेत्रातील पेट्रोल व डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या एलबीटीच्या विरोधात 'फामपेडा' या राज्यव्यापी पेट्रोलपंच चालक संघटनेतर्फे सोमवारी (७ सप्टेंबर) पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहेत.

शासनाने व्यापाऱ्यांना एलबीटी माफ केली, परंतु त्याचा जनतेला कोणत्याही वस्तू स्वस्त मिळण्यास उपयोग झाला नाही. व्यापाऱ्यांचा नफा वाढला. पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी माफ झाल्यास त्याचा थेट फायदा नागरिकांना होईल, असे संघटनेचे म्हणणे आहे. या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे पेट्रोल पंप बंद करण्याचे आंदोलन करावे लागत आहे. राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रातील पेट्रोल पंप सोमवारी बंद राहतील, असे 'फामपेडा'चे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्याला दहा दिवसांआड पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फळबागांचा जिल्हा असलेल्या जालना जिल्ह्यात यंदाही दुष्काळामुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. मोसंबी, डाळिंब व उसाचे चांगले उत्पादन घेणाऱ्या या जिल्ह्यात यंदा या पीक लागवडक्षेत्रही घटले आहे.

जिल्ह्यात २०१०मध्ये ३५ हजार हेक्टरवर मोसंबी होती. यंदा केवळ २२ हजार हेक्टरवर आहे. डाळिंबांचे जिल्ह्यात दर्जेदार उत्पादन होते. मात्र, यंदा ८ हजार हेक्टरवर डाळिंब आहे. जिल्ह्यात यंदा उसाची लागवड चारपटीने घटली आहे. जिल्ह्यात केवळ पाच हजार हेक्टरवर ऊस असून गेल्या वर्षी २१ हजार हेक्टरवर उसलागवड होती. उस गाळप नसल्यामुळे यंदा जिल्ह्यातील लहान मोठे सर्व कारखाने बंद पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जालना शहराला जायकवाडी धरणातून रोज १८ ते २० एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येतो. मात्र सध्या जालन्याला आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. जुन्या जालना भागाला हा पुरवठा केला जात असून नवीन जालना भागाला घाणेवाडीचे पाणी सोडले जाते. या प्रकल्पात केवळ ६ फूटापर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. ऐन दुष्काळात महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून जायकवाडी प्रकल्पातून उपसा करण्यासाठीचे वीजबिलही थकले आहे. येत्या काही दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर, खडकपूर्णा व लोअर दुधनामधुन टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

चार तालुक्यांना दुष्काळाचा फटका अधिक

जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा तालुक्यांना यंदा दुष्काळाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. या चार तालुक्यांतील प्रत्येकी सरासरी शंभर गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र आहे. विहिरी, बोअरचे पाणी आटल्यामुळे मिळेल त्या ठिकाणांवरुन पाणी आणावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळामुळे शिक्षण सोडण्याची वेळ

$
0
0

ramchandra.vaybhat @timesgroup.com

दुष्काळामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. कष्ट करून, पोटाला चिमटा काढत शेतकऱ्यांनी मुलांना उच्च शिक्षणासाठी शहरात पाठविले, मात्र दुष्काळामुळे त्यांच्यावर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. काही विद्यार्थी हॉटेल, हॉस्पिटल, नेट कॅफेमध्ये काम करून खर्च भागवित आहेत.

परभणी शहरात परिसरातील गावांतील बहुतांश विद्यार्थी शिक्षणासाठी रोज ये-जा करतात. यंदा प्रवासाचाही खर्च मिळू शकत नसल्यामुळे त्यांना परभणीत भाड्याच्या खोलीत राहून शिकावे लागत आहे. विद्यार्थ्यांना खर्च भागवण्यासाठी हॉटेल, हॉस्पिटल, इंटरनेट कॅफे, तसेच इतर ठिकाणी नोकरी करावी लागत आहे. अनेक मुलींनी खर्च परवडत नसल्याने यंदा केवळ परीक्षेसाठीच कॉलेजला जायचे ठरवून परभणी सोडले. काही मुली शिकवण्या घेऊन शिक्षणाचा खर्च भागवित आहेत.

यंदा परभणी जिल्ह्यात केवळ ३४ टक्के पाऊस झाला. संपूर्ण जिल्ह्याला दुष्काळाने झोडपले. खरिपाचा ८४.४८ टक्के पेरा झाला. १ लाख ७३ हजार हेक्टर पेरणी झाली. मात्र, अपुऱ्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली. काही ठिकाणी ठिबक सिंचनाद्वारे पिकास संरक्षित पाणी दिले जात आहे, पण रोग पडल्याने हे उत्पन्न हाती यायचा भरवसा नाही पाण्याविना पिके जळाली आहेत. यामुळे उत्पन्नात ७५ टक्क्यांची घट होईल.

४० शेतकऱ्यांनी संपवले जीवन

दुष्काळी परिस्थितीमुळे हतबल झालेल्या जिल्ह्यातील तब्बल ४० शेतकऱ्यांनी जीवन संपवले. यामध्ये समितीने २१ आत्महत्यांना पात्र ठरवले असून, ८ आत्महत्यांच्या घटनांना अपात्र ठरवले. ११ प्रकरणे चौकशीसाठी सरकारी दप्तरी प्रलंबित आहेत. आत्महत्या केलेल्या २१ शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारी मोबदला मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी न सोडल्याने उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

नांदूर-मधमेश्वर कालव्यात पाणी सोडण्याचे आश्वासन न पाळल्याने तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी सोमवारपासून (७ सप्टेबर) 'नांमका' कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली. 'नांमका'चे कार्यकारी अभियंता आर. पी. फुलंब्रीकर व कालवा विभागाचे उपअभियंत्यांनी फसवणूक केल्याचा आरोप करून गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

नांदूर-मधमेश्वर जलदगती कालव्यातून ३ ऑगस्टपासून ३५ दिवस पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. या आवर्तनातून नेहमीपेक्षा दीडपट म्हणजे १.६ टीएमसी पाणी सोडण्यात येऊनही वैजापूर तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. 'नांमका'च्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून हे पाणी कोपरगाव, निफाड भागातील सधन शेतकऱ्यांना विकले आहे. या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप अशोक थोरात, कृष्णा थोरात, मारुती निगळ, सुभाष रोहम,शांताराम राजगिरे, युनूस देशमुख यांच्यासह चारी क्रमांक ११ वरील अनेक शेतकऱ्यांनी केला. शिवसेनेचे नेते संजय पाटील निकम व भाजपचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील कलापुरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. 'नांमका'चे कार्यकारी अभियंता आर. पी. फुलंब्रीकर यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याबद्दल असमर्थता दर्शविली. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिसाला लाच घेताना अटक

$
0
0

पैठण : रिक्षा चालकाकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना पैठण पोलिस ठाण्यातील वाहतूक पोलिस संतोष चव्हाण यांला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (७ सप्टेंबर) पोलिस ठाण्यासमोर पकडले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षाचालक महेंद्र वाव्हळ यांना मालवाहतूकीची रिक्षा चालवायची असेल, तर हप्ता द्यावा लागेल, असे सांगून चव्हाण यांने पैशाची मागणी केली होती. हप्ता देण्याची इच्छा नसल्याने वाव्हळ यांनी औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर विभागाने पोलिस ठाण्यासमोर सापळा रचून वाहतूक पोलिस संतोष चव्हाण याला सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास दोन हजार रुपयांची लाच घेताना पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक भारत राठोड. प्रमोद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठी कट्ट्यासह एकाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज

वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सापळा रचून एकाला सोमवारी (७ सप्टेंबर) गावठी कट्यासह अटक केली. या व्यक्तीला गेल्यावर्षी गुन्हे शाखेने पाच कट्ट्यांसह अटक केली होती. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको वाळूज महानगरात कर्तारसिंग लक्ष्मीनारायण लोदी (वय ३८, रा. ठाणगोरमी ता. महेगाव उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम आंबेडकर चौक बजाजनगर) हा गावठी कट्टा विकण्यासाठी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरिक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून सिडको वाळूज महानगरातून सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता पितळी व लोखडी धातुचा गावठी कट्टा सापडला. कर्तारसिंग याला मार्च २०१४ मध्ये गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यावेळी त्याच्याजवळून पाच देशी कट्टे सापडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाकरीच्या शोधात शहराकडे धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

तालुक्यातील कमी पाऊस पडलेल्या भागात अत्यंत बिकट परिस्थिती आहे. ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याच्या भीतीने तालुक्यातील गावकरी स्थलांतर करत आहेत. आतापर्यंत तालुक्यातील जवळपास पंधरा ते वीस गावांतील दोन हजार गावकऱ्यांनी स्थलांतर केल्याची माहिती हाती आली आहे. ही मंडळी साधारणतः पुण्याला जात असल्याची माहिती मिळाली.

तालुक्यातील पूर्व व नैऋत्य भागात समाधानकारक पाऊस पडला. मात्र उर्वरित तालुक्यात आतापर्यंत अत्यंत कमी पाऊस पडला आहे. परिणामी, या भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. सध्या तालुक्यातील पन्नासपेक्षा जास्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. रहाटगाव, सोलनापूर, करंजखेडा, माळवाडी, शृंगारवाडी, डेरा, नांदर, दावरवाडी, वाहेगाव, कारकीन, हर्षी, डोणगाव, मुरमा आदी गावांमध्ये सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. ऐन पावसाळ्यात पिण्यासाठी पाणी व हाताला काम नसल्याने नागरिक हैराण आहेत. या गावांमध्ये भीषण परिस्थिती असून, गावकऱ्यांना मोठ्या कष्टाने पिण्याचे पाणी मिळवावे लागत आहे. जनावरे व सिंचनासाठी पाणी मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांसमोर जनावरांची विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

पावसाच्या भरवशावर लागवड केलेला कापूस, बाजरी, मका ही पिके व काही प्रमाणात फळबागा नष्ट झाल्या आहेत. भविष्यात परिस्थिती अधिक बिकट होण्याच्या भीतीने या भागातील नागरिकांनी शहरात स्थलांतर सुरू केले आहे. अंकुश इतरकर व मदन इरतकर यांनी रहाटगाव पंचक्रोशीतील अनेक नागरिक पुण्यात जात असल्याची माहिती दिली. सध्या प्रत्येक गावातून किमान २० ते २५ दांम्पत्यांनी रोजगारासाठी स्थलांतर केल्याची माहिती मिळाली. तालुक्यातील जवळपास पंधरा ते वीस गावांमधील जवळपास दोन हजार नागरिकांनी शहरी भागाकडे स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे. काही शेतकरी, गावकरी स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले.

ऊसतोड कामगारांचे हाल

राज्यातील वेगवेगळ्या तालुक्यात ऊसतोड कामगार जातात. साधारणतः, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात कामगारांना अनामत रक्कम मिळते. मात्र, यावर्षी साखर कारखाने सुरू होणार की नाही याबद्दल शाश्वती नाही. त्यामुळे तालुक्यातील एकही ऊसतोड कामगाराला अनामत रक्कम मिळालेली नाही. साखर कारखाने सुरू न झाल्यास तालुक्यातील ऊसतोड कामगारांपुढे मोठे संकट उभे राहणार आहे. ऊसतोड कामगार वर्षातून एकादाच मिळणाऱ्या उत्पन्नावर वर्षभर उदरनिर्वाह करतात.

पाऊस नसल्याने शेतात काम नाही. पीक येण्याचा भरवसा नाही. पुढील काळात चणचण भासणार असून भाकरीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे पुण्याला जाऊन मजुरी करणार आहोत.

- अंकुश फासाटे, रहाटगाव

सकाळी उठायचे आकाशाकडे मोठ्या अपेक्षेने बघायचे व दिवसभर गावच्या चावडीवर गप्पा मारायच्या एवढाच उद्योग आहे. रोज पोटाला चिमटा देवून कसे जगणार. त्यामुळे गाव सोडून जाण्याचे ठरवले आहे.

- निलेश शिंदे, रहाटगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळाई डोंगररांग मुरूम चोरीमुळे खिळखिळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महसूल विभाग व वन विभागाच्या वादात देवळाई डोंगराची प्रचंड हानी सुरू आहे. केवळ हद्दीत नसल्याचा दावा करून दोन्ही विभाग माती व मुरूम उत्खननाकडे दुर्लक्ष करीत आहेत. पहाटेपासूनच मुरूम चोरी सुरू असल्याने गाफिल वन कर्मचारी पोहचेपर्यंत माफिया पसार होतात. देवळाई ते कचनेर या रस्त्याच्या दुतर्फा असलेले डोंगर मुरूम उपशामुळे खिळखिळे झाले आहेत.

शहर विस्तारीकरणाने परिसरातील डोंगर व टेकड्यांचे प्रचंड नुकसान सुरू आहे. पर्यावरण समतोल टिकवण्यासाठी आवश्यक असूनही डोंगरांनाच सुरूंग लावले जात आहेत. देवळाई ते कचनेर परिसरात विपुल डोंगर व टेकड्या आहेत. या रस्त्याने वर्दळ नसल्याने मुरूम व माती उत्खनन बिनबोभाट सुरू आहे. माफियांनी प्रत्येक डोंगराचा पायथा कोरला आहे. उत्तम दर्जाचा मुरूम सहज मिळत असल्याने शहरातील बांधकामासाठी या डोंगरातून अवैधपणे मुरूम आणला जातोच; तसेच रस्त्यांच्या कामासाठीही डोंगररांगांवर आघात सुरू आहेत. 'रोजगार हमी योजने'तून कचनेर परिसरात रस्त्यांची कामे झाली. या कामांसाठी कंत्राटदारांनी परवानगी नसताना मुरूम उपसा केला. पोकलेनने उपसा केल्याने डोंगराच्या पायथ्याला मोठे खड्डे पडले आहेत. डोंगरापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी पाऊस झाल्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा उपसा सुरू केला जातो, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मुरूम चोरांवर प्रशासन कडक कारवाई करीत नाही; तसेच महसूल विभागात रॉयल्टीशिवाय मुरूम उपसा होत आहे. वन विभागाने आपल्या हद्दीला तारेचे कुंपण घातले असले तरी, अतोनात उपशामुळे कुंपण कोसळण्याच्या मार्गावर आहे. सातारा डोंगराप्रमाणे देवळाई परिसरात अनधिकृत प्लॉटिंग नाही, मात्र गौण खनिजांच्या उपशामुळे पर्यावरणाची हानी झाली आहे.

दरम्यान, महसूल प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच देवळाई व साई टेकडी परिसरात उत्खनन करीत असलेल्या व्यक्तींवर कारवाई केली. या कारवाईत पोकलेन व इतर साहित्य जप्त करण्यात आले, पण कारवाईला न जुमानता इतर माफिया मुरूम चोरी करीत आहेत. या प्रकाराची महसूल व वन अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती असूनही जुजबी कारवाई केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images