Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पोळ्यावर दुष्काळाचे सावट

0
0

कन्नडः गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही श्रावणात पावसाने पाठ फिरवल्याने बैल पोळ्यावर दुष्काळाचे सावट आहे. तालुक्यातील नदी-नाले कोरडे असल्याने बैलांना खांदे मळणीसाठी पाणी मिळणेही दुरापास्त झाले.

तालुक्यातील पिके दोन महिन्यांपासून जेमतेम पावसावर तग धरून आहेत. कन्नड तालुक्यात ५९३.५० मि.मी. पाऊस अपेक्षित असताना ४३०.५१ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदाही बैल पोळा साजरा करण्याचा उत्साह दिसून येत नाही. दुसरीकडे शेतीची भिस्त यांत्रिक शेतीवर असल्याने बैलांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही शहराप्रमाणे मातीच्या बैलाजी पुजा करून पोळा साजरा करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैठण येथे रविवारी दुसरे शाही स्नान

0
0

पैठण : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त पैठण येथे दुसरे शाही स्नान रविवारी (१३ सप्टेंबर) होणार आहे. यावेळी मुर्डेश्वर संस्थानचे महंत बालयोगी काशिगीरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पैठण येथे २९ ऑगस्ट रोजी पहिले शाही स्नान पार पडले. दुसऱ्या शाही स्नानाआधी रविवारी खंडोबा चौकातून सकाळी आठ वाजता शाही मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक संभाजी चौक, महाराणा प्रताप चौक, शिवाजी चौक, गागा भट्ट चौक, तेली धर्मशाळा, संतनगर चौकमार्गे मोक्ष घाटावर पोहचेल. तेथे धार्मिक विधी केल्यानंतर शाही स्नानाला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती सिंहस्थ कुंभमेळा समितीचे निमंत्रक केशव महाराज चावरे यांनी दिली. बालयोगी काशिगीरीजी महाराज, योगी दयानंद महाराज, कैलासगिरी महाराज, रामगिरी महाराज आदी महाराजांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचेही चावरे म्हणाले. श्रावण अमावस्येला गंगा-गोदावरी स्नानाचे महत्त्व असून या पर्वकाळात सूर्य, चंद्र आणि गुरू हे ग्रह सिंह राशीत येतात. हा दुर्मिळ योग अनेक वर्षानंतर १२ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. या पर्वकाळात गोदावरी नदीत स्नान केल्याने तीर्थ समुद्रस्नानाचे पुण्य मिळते, अशी माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष सुयश कमलाकरगुरू शिवपुरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रब्बीचे क्षेत्र वाढणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यल्प पावसामुळे खरीप पीक हातचे गेल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची तयारी केली आहे. खर‌िपाचे क्षेत्र रिकामे असल्यामुळे यंदा रब्बीच्या क्षेत्रात तब्बल ७५ हजार हेक्टर वाढ होणार आहे. काही तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ३३६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. जूननंतर थेट सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस झाल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले. कन्नड, सिल्लोड व फुलंब्रीचा अपवाद वगळता इतर तालुक्यात कमी पाऊस झाला. परिणामी सोयाबीन, मूग, कापूस व मका पिकांची सरासरी उत्पादकता घटली आहे. पीक योग्य स्थितीत नसल्याने शेतकऱ्यांनी पिके मोडली; तसेच रब्बीच्या पेरणीसाठी शेत तयार केले. सध्या परतीचा पाऊस सुरू आहे. विभागात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. पण, परतीच्या पावसाच्या संभाव्य शक्यतेवर कृषी विभाग व शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली आहे. दरवर्षी रब्बीचे क्षेत्र २ लाख ६६ हजार हेक्टरपर्यंत असते. यंदा रब्बीचे क्षेत्र ३ लाख २५ हजार हेक्टर होण्याची शक्यता आहे.

खरिपात क्षेत्र रिकामे राहिल्याने हरभरा व ज्वारी या मुख्य रब्बी पिकांची लागवड वाढणार आहे. सध्या पाणी टंचाई असल्याने गव्हाचे क्षेत्र घटणार आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी तयारी केली असली तरी अजून पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. बागायती क्षेत्रात लक्षणीय घट होणार असल्याने मोठी आर्थिक झळ बसणार आहे.

मोफत बियाणे देणार

रब्बीचे क्षेत्र वाढवून तूट भरून काढण्यासाठी कृषी विभागाने तयारी केली आहे. चारा पिके व धान्य उत्पादकता वाढवण्यासाठी मोफत बियाणे पुरवण्याचे नियोजन आहे. तालुकास्तरावर शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधून बियाणे पुरवले जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याचा प्रश्न बिकट होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे.

सर्व भागात पाऊस झाला नाही. रब्बीची पेरणी सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत करता येते. भारी जमिनीत ५० ते ६० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस असल्यास पेरणी करता येईल. इतर ठिकाणी पुरेसा पाऊस आवश्यक आहे.

- सतीश शिरडकर, उपसंचालक, 'आत्मा'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुंभमेळा’ पाणी; याचिका फेटाळली

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

कुंभमेळासाठी गंगापूर धरणातून सोडलेल्या पाणीप्रश्नावर केलेली जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.ए.बी.चौधरी व न्या.इंदिरा जैन यांनी फेटाळून लावली.

कोपरगावचे नागरिक संजय काळे व संदीप कुलकर्णी यांनी ही याचिका केली होती. नाशिक येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या शाही स्नानास राज्य शासनाने ३ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या कृतीला याचिकाकर्त्याने आव्हान दिले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे हे पाणी सोडण्याची परवानगी राज्य शासनाने घेतली नाही. शासनाची ही कृती बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेत केला होता.

पहिले शाही स्नान २८ ऑगस्टला झाले. आता उर्वरित दोन शाही स्नान १८ व २५ सप्टेंबरला होणार आहेत. सलग चौथ्या वर्षी दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यासह नगर जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील तीन धरणांत नगर व मराठवाड्यातील सर्व धरणांपेक्षा उपयुक्त जलसाठा अधिक आहे. महाराष्ट्रात धरणामध्ये ८ टक्के जलसाठा आहे . मराठवाडा व नगर भागातील शेतकरी दाहक दुष्काळाने पिचला आहे. खरीप पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांचे आत्महत्येचे सत्र चालूच आहे. गेल्या १० दिवसांत मराठवाड्यातील तब्बल ३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे याचिकेत म्हटले होते. त्यामुळे गंगापूर धरणातील पाणी कुंभमेळ्याच्या शाही स्नानास सोडू नये, अशी विनंती याचिकाकर्त्याचे वकील सतीश तळेकर यांनी केली होती.

नाशिक व गंगापूर धरण औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. पहिले शाही स्नान झाले आहे. या कुंभमेळ्याला जुलै मध्येच सुरुवात झाली आहे. देशभरातून ७५ लाख भाविक व ३ लाख साधू या कुंभमेळ्याला अपेक्षित आहेत. त्यामुळे ही याचिका फेटाळावी, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील महेंद्र नेरलीकर यांनी केली. कुंभमेळा शेवटाला असताना सप्टेंबरमध्ये याचिका करण्यात आली आहे. कोर्टाने याचिका करण्यास उशीर झाल्याचे मत नोंदवून याचिका फेटाळून लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार नावे असलेली कमलबाई पसार

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुकुंदवाडी परिसरात उघडकीस आलेल्या माजी सैनिक संपत खंडागळेच्या खुनाचे गूढ अद्याप उलगडले नाही. त्यांची दुसरी पत्नी पसार असून, या महिलेचे तीन वेगवेगळ्या नावाने बँकेत खाते असल्याचे तपासात उघड झाले आहे. अंबिकानगर, सी - गल्ली क्रमांक ४ येथे राहणाऱ्या संपत खंडागळे या माजी सैनिकाचा खून झाला.

मृतदेहाला दुर्गंधी सुटल्यानंतर चार दिवसांनी हा प्रकार समोर आला. खंडागळे या ठिकाणी त्यांची दुसरी पत्नी कमल राजपूतसोबत राहत होते. हा प्रकार घडल्यानंतर कमलबाई पसार आहे. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये तिची तीन नावे समोर आली आहेत. कमल सूर्यवंशी, कमल खंडागळे व कमल राजपूत आणि शकुंतला मुधोळकर या नावांचा वापर ती करीत होती. स्टेट बँकेत तिचे खाते असून, या खात्यावर काही रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिचे आधार कार्ड देखील पोलिसांनी मिळविले असून यावर असलेल्या फोटोवरून कमलबाईचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी दिले आहेत.

एसटी कॉलनी परिसरातील एक १६ वर्षीय युवती आपल्या बहिणीसोबत घरात असताना आरोपी अनिल वसंत ठोंबरे (२०, आडगाव खुर्द) हा १० सप्टेंबर २०१५ रोजी दारू पिऊन संबंधित युवतीच्या घरात आला व बहिणीला ढकलून देऊन त्याने युवतीचा विनयभंग केला. युवतीने आरोपीला प्रतिकार केल्यानंतर आरोपीने युवतीवर हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. युवतीने फिर्याद दिल्यानंतर आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला शुक्रवारी (११ सप्टेंबर) विशेष न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर, गुन्हा गंभीर असून, मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे आरोपीला १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील राजेंद्र मुगदिया यांनी केली. ही विनंती ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी आरोपीला १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकाने प्रवाशाला लुबाडले

0
0

औरंगाबादः ‌रिक्षाचालकाने साथीदाराच्या मदतीने प्रवाशाला मारहाण करून ४२०० रुपये पळविले. बुधवारी हा प्रकार एन-६ भागातील प्रशांत बीयर बारजवळ घडला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोती अमेरीलाल शर्मा (वय २३ रा. जवाहर कॉलनी) हा तरुण बुधवारी सायंकाळी टीव्ही सेंटर चौकातील रिक्षा स्टँडवर रिक्षाची वाट पाहत उभा होता. एका रिक्षात (क्रमांक एमएच २० टी ९३४२) तो जवाहर कॉलनीला जाण्यासाठी बसला. रिक्षात चालकाचा एक साथीदार आधीच बसलेला होता. रिक्षा सेंट्रलनाक्याजवळ आल्यानंतर अचानक तेथील प्रशांत बियर बारजवळ रिक्षाचालकाने रिक्षा ‌थांबवली. शर्माचा गळा दाबून त्याच्या खिशातील ४२०० रुपये त्यांनी काढून घेतले तसेच याला रिक्षाबाहेर ढकलून देत पलायन केले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोन्याची पोत पळविण्याऱ्या जहागिरदारला मोक्का कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्योतीनगर भागामध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत पळविण्याच्या संघटित गुन्ह्यामध्ये आरोपी राजू जहागिरदार याला १८ सप्टेंबरपर्यंत मोक्का कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष मोक्का न्यायाधीश एस. जी. शेट्टे यांनी दिले.

ज्योतीनगर भागातील जिम्नॅशियम हॉलसमोर मॉर्निंग वॉक करणाऱ्या मंगलबाई लक्ष्मणराव देशमुख यांच्या गळ्यातील १८ हजार रुपयांची सोन्याची पोत २५ जून २०१५ रोजी काहीजणांनी पळविली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपास करून इमरान सैफुद्दीन उर्फ सुलतान (रा. वाशीम, ह.मु. कटकटगेट), शेख सेहजाद शेख समीन (रा. सादातनगर), शेख जावेद शेख मक्सूद (रा. गारखेडा), शेख इरफान शेख लाल यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातील दुचाकी (एमएच २० बीके १२१३) जप्त करण्यात आली. त्यांना अटक करून घाटी रुग्णालयामध्ये तपासणीसाठी नेत असताना त्यांच्या संवादावरून या गुन्ह्याचा संबंध शेख राजू उर्फ राजू जहागिरदार शेख गुलाब (४६, रा. अहिल्यानगर, नेवासा) याच्याशी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तपासाअंती वरील आरोपींनी गुन्ह्यातील सोने आरोपी राजू जहागिरदारला दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर राजू जहागिरदारवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाला. यापूर्वी त्याच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत.

याप्रकरणी आरोपी राजू जहागिरदारला शुक्रवारी (११ सप्टेंबर) मोक्का कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा तपास करणे आहे, त्याच्या साथीदारांचा शोध घ्यायचा आहे, त्याचा मोबाइल व इतर साहित्य हस्तगत करायचे असल्यामुळे आरोपी राजू जहागिरदारला १५ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील राजेंद्र मुगदिया यांनी केली. ही विनंती ग्राह्य धरून विशेष मोक्का न्यायाधीश एस. जी. शेट्टे यांनी आरोपीला १८ सप्टेंबरपर्यंत मोक्का कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाच दरोडेखोरांना बेड्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या आठवड्यात शहरात लुटमार करून दहशत पसरविणाऱ्या पाचजणांच्या टोळीला क्रांतिचौक गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. गुरुवारी रात्री रेल्वे स्टेशन एमआयडीसीत दरोड्याच्या तयारीत असताना ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. कुख्यात गुन्हेगार विश्वकांत खरे उर्फ बंटी खरे या टोळीचा सूत्रधार आहे.

क्रांतिचौक गुन्हे प्रकटीकरण पथक गुरुवारी रात्री पेट्रोल‌िंग करीत होते. या पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना एमआयडीसी परिसरातील आयटीआयजवळ पाच तरुण तलवारीसह संशयास्पदरित्या फिरत असल्याची मा‌ह‌िती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी त्या ठिकाणी तातडीने सापळा लावला. या कारवाईमध्ये पाच संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये कुख्यात गुन्हेगार विश्वकांत रमाकांत खरे (वय २० रा. हायकोर्ट कॉलनी, सातारा) याची ही टोळी असल्याचे निष्पन्न झाले. टोळीच्या म्होरक्यासह पोलिसांनी सुनील उर्फ मुन्ना नारायण वाकळे (वय २३ रा. खंडोबा मंद‌िराजवळ, सातारा), दीपक भिकाजी जोगदंड (वय २१ रा. क्रांतीनगर), जितेंद्र भीमराव बहीरव (वय २०, संसारनगर) व अमोल भास्कर हिवराळे (वय २४ रा. क्रांतीनगर) या चौघांनाही अटक केली.

अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून एक तलवार, दोन लाकडी दांडके जप्त करण्यात आले. ही कारवाई क्रांतिचौक गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, एसीपी खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अशोक आव्हाड, शेख अन्वर, संतोष मुदीराज, प्रकाश डोंगरे, समद पठाण, मनमोहनमुरली कोलमी, शेख ऐजाज, चंदन साकला व नवनाथ परदेशी यांनी केली.

चोरी

कुख्यात गुन्हेगार विश्वकांत खरे उर्फ बंटी खरे याने लढविलेल्या शक्कलवरून ही टोळी दरोडेखोरीत सक्रिय झाली होती. अटक करण्यात आलेले पाचही दरोडेखोर आपले सावज हेरून त्याला मारहाण करीत पैसे लुटायचे. चोरी केल्यानंतर न‌िव्वळ ते पैसे मौजमजेसाठी उधळले जायचे. चोरीनंतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन हे पाचही आरोपी दारूच्या पार्ट्या करायचे.

एकच फंडा वापरत चार गुन्हे

सात दिवसांत या आरोपींनी चार जणांना मारहाण करीत लुबाडले होते. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही लुटमार करताना आरोपी ज्या तरुणाला लुबाडायचे आहे. त्याला 'तू आमच्या मित्रांना का मारले' असे म्हणत भांडणाला सुरुवात करून नंतर लुबाडत होते.

या नागरिकांची केली लुटमार

तारीख ३० ऑगस्ट - एमआयडीसी परिसरात चक्रधर देशमुखचे साडेपाच हजार व मोबाइल पळविला

३० ऑगस्ट - परमेश्वर निलावार या सॉक्स विक्रेत्याचे क्रांतिचौकातून दोन हजार रुपये

२ सप्टेंबर - अनिल पवारचे रोख पाचशे व आठ हजाराचा मोबाइल

५ सप्टेंबर - संकेत घागरे या तरुणाचा अदालत रोडवरून बारा हजाराचा मोबाइल लंपास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतिचौक परिसरात खड्डेच खड्डे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या आठवड्यात झालेल्या भुरभुर पावसानंतर आधीच खराब असलेले औरंगाबादचे रस्ते पुरते उखडले आहेत. पॅचवर्कसाठी महापालिकेची टाळाटाळ होत असल्याने क्रांतिचौकात जीवघेणे खड्डे पडले आहेत.

बाबा पेट्रोलपंप ते क्रांतिचौक उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील हा जालना रस्त्याचा भाग, आता पालिकेच्या अखत्यारित आला आहे. पूर्वी अदालत रोडचा पॅच वगळता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित होता. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी फूटभर खोलीचे खड्डे पडले आहेत. रमानगर ते क्रांतिचौक हा रस्ता जीवघेणा झाला आहे. उड्डाणपुलाच्या जाताना कसरत करावी लागते. शुक्रवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत या रस्त्यावर पाच छोटे अपघात झाले. सुदैवाने त्यात फार नुकसान झाले नाही, पण पालिकेच्या दुर्लक्षाचा आता वाहनधारकांना फटका बसत आहे. अशीच परिस्थिती कृषी कार्यालय ते क्रांतिचौक रस्त्याची झाली आहे. उड्डाणपुलाच्या खाली वाहतूक पोलिस तैनात असतात. मात्र, चारही बाजूंनी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. अॅपे अर्धा रस्ता अडवून उभे राहतात. त्यात आता खड्ड्यांची भर पडल्याने वाहनधारक उड्डाणपुलावरून जाण्यास प्राधान्य देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रुती कुलकर्णी प्रकरण जलदगती न्यायालयात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार आहे. याप्रकरणी एका महिन्यात दोषारोपपत्र दाखल केले जाईल,' अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. २० ऑगस्ट रोजी एकतर्फी प्रेमातून होत असलेल्या जाचाला कंटाळून श्रुतीने आत्महत्या केली होती.

'श्रुतीच्या सुसाइडनोटमध्ये स्वप्निल मणियारच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा उल्लेख होता. ही सुसाइड नोट पोलिसांनी हस्ताक्षर तपासणीसाठी तज्ज्ञाकडे पाठवली आहे. याचा अहवाल अद्याप आला नाही. विशेष सरकारी वकील नेमून हा खटला जलगती न्यायालयात चालवू,' अशी माहिती अमितेशकुमार यांनी दिली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास गुन्हेशाखेकडे सोपवण्यात आला होता. मणियारला अटक करण्यात आली असून, तो सध्या हर्सूल कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेशंटच्या नातलगांचा डॉक्टरांवर हल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

पेशंटला रुग्ण सेवा न दिल्याने नातलगानी कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी रात्री उशीरा घडली. रुग्णालयातील साहित्याची नासधूस केल्यामुळे शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी कंधार बंदचे आवाहन केले होते. केवळ अतिदक्षता पेशंटना सेवा देण्याचा निर्णय घेतल्याने गैरसोय झाली.

ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना गुरुवारी रात्री उशिरा शेख नईम यांच्यास‌ह त्यांचे दहा नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात आले. त्यावेळी नईम यांच्या मुलावर उपचारसुद्धा सुरू होते. मात्र, संबंधितांनी उपचार बरोबर होत नाहीत अशी तक्रार करत वैद्यकीय अधिकारी डॉ. ओमप्रकाश लखनलाल साबळे (वय ३०), परिचारिका वाय. के. कबीर, शिपाई रहेमान बेग, श्याम देवकांबळे, कक्षसेवक डी. एम. फुलवळे, चालक पद्माकर राहिरे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील साहित्याची नासधूस केली. याप्रकरणी डॉ. ओमप्रकाश साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी शेख नईम शेख सरदार (रा. छोटीगल्ली, कंधार) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बंदमुळे पेशंटचे हाल

डॉक्टरांना मारहाण झाल्याने संतापलेल्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सुध्दा कंधार बंदला पाठिंबा दर्शविला होता. यामुळे काही प्रमाणात कंधार येथील पेशंटचे हाल झाले. त्यांना उपचारासाठी इतरत्र जावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळालगतच्या घरांचे सर्वेक्षण रखडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संरक्षक भिंतीजवळ अनेक घरे बांधली आहेत. त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने अशा धोकादायक ठरणाऱ्या घरांचे घरांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय एरोड्रम सेफ्टी ‌बैठकीत घेण्यात आला, मात्र आतापर्यंत हे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले नाही.

विमानतळाच्या सुरक्षेबाबत महिन्यापूर्वी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त प्रकाश महाजन, विमानतळ संचालक आलोक वार्ष्णेय यांचासह अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. विमानतळालगत अनेक घरे उभारण्यात आली आहेत. काही घरे विमानतळाच्या संरक्षक भिंतीलगत उभारली आहेत. या घरांमुळे विमान उतरताना किंवा उड्डाण करताना अपघात होऊ शकतो, अशी चर्चा या बैठकीत करण्यात आली होती. त्यामुळे या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र महिन्यानंतरही मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले नाही. याबाबत विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, सर्वेक्षणाचे काम महापालिकेने करणे अपेक्षित आहे.

दीडशे ते दोनशे घरे

विमानतळाच्या भिंतीलगत अनेकांनी आपली घरे तयार केली आहे. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; भिंतीलगत सुमारे दीडशे ते दोनशे घरे आहेत. यात चिकलठाणा; तसेच मुकुंदवाडीतील घरांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्लास्टिक मनी’टाळण्याकडे व्यापाऱ्यांचा कल

0
0

dhananjay.kulkarni@timesgroup.com

औरंगाबाद : कॅशलेस ट्रँझॅक्शन, प्लास्टिक मनी यांच्या जगभरात वापर वाढला असला तरी, औरंगाबादकर व्यापारी मात्र त्याच्या वापरापासून दूर आहेत. शहरात केवळ दहा टक्के व्यापाऱ्यांकडेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड स्वाइप करण्याची यंत्रणा आहे. कार्डांच्या माध्यमातून व्यवहार केल्यास दोन टक्क्यांपर्यंत सरचार्ज आकारला जात आहे. त्यामुळे रोखीच्या व्यवहारांचा सल्ला व्यापारी देतात. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.

शहरात सुमारे ३० हजार व्यापारी आहेत. त्यापैकी केवळ ३ हजार (दहा टक्के) व्यापाऱ्यांकडे कार्ड स्वाइप करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. एकीकडे प्लास्टिक मनीचा वापर करण्यावर भर दिला जात असताना शहरातील तब्बल २५ हजारांवर व्यापाऱ्यांकडे कार्ड स्वाइप मशीन्सच नाहीत, असे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. मोठ मोठे मॉल, सोने-चांदीचे व्यापारी, मोंढ्यातील व्यापारी, मोठे कापड व्यावसायिक, मेडिकल व्यावसायिक, वाइन-विदेशी मद्यविक्रेते, मोठे हॉटेल व्यावसायिक, पेट्रोल पंप आदी ठिकाणी कार्ड स्वाइप मशीन आहेत. काही दुकानांत कार्ड स्वाइप मशीनच्या माध्यमातून बिलाची रक्कम दिल्यास त्यावर दोन टक्के सरचार्ज आकारला जातो. त्यात सोने-चांदी व्यापारी, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल आणि मद्यविक्रेत्यांचा समावेश आहे. हा भुर्दंड टाळण्यासाठी व्यवहार रोखीने करण्याचा सल्ला व्यापारी देत असल्याचा ग्राहकांचा अनुभव आहे. याविषयी जे. पी. सुराणा ड्रायफ्रूटचे संचालक महेंद्र सुराणा म्हणाले, 'आम्ही दोन टक्के सरचार्ज आकारत नाही.'

प्लास्टिक मनीच्या वापरातून काळा पैसा निर्माण होण्यास आळा बसतो. व्यापारी वर्गाने स्वाइप मशीन वापरताना दोन टक्के सरचार्ज वसूल करणे चुकीचे आहे. त्यांच्यावर प्राप्तिकर विभागाचे लक्ष असते, असे प्राप्तिकर विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांना बँकेकडून स्वाइप मशीन देताना ०.७५ टक्के ते २ टक्क्यांपर्यंत प्रत्येक स्वाइपला शुल्क आकारले जाते. हा खर्च आम्ही व्यापारी वर्गाकडूनच घेत असतो. त्याचे बँकनिहाय वेगवेगळे दर आहेत. व्यापारी हा खर्च ग्राहकांकडून वसूल करतात, परंतु ही दोन टक्के रक्कम द्यायची की नाही, हा ग्राहकांचा प्रश्न आहे.

- विजय कांबळे, विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र बँक

दोन टक्के सरचार्ज लावला जातो हे खरे आहे, पण व्यापारी वर्गाकडून बँका स्वाइप मशीन वापर व अन्य शुल्क वसूल करतात. त्याची वसुली व्यापारी ग्राहकांकडून करतात.

- अजय शहा, अध्यक्ष औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजदूताकडून कुलगुरूंचा अवमान

0
0

म.टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्यमंत्री आणि इतर पाहुण्यांसाठी जपानमधील भारतीय राजदूताकडून आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीच्या निमंत्रितांच्या यादीत नाव नसल्याने कुलगुरूंना मन:स्ताप सहन करावा लागला.

जपानमधील कोयासन विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्राचे शिष्टमंडळ जपान दौऱ्यावर आहे. गुरुवारी पुतळ्याचे अनावरण झाले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोयासन विद्यापीठ यांच्यात परस्पर सहकार्य करारही झाला. त्यावर कुलगुरू डॉ. चोपडे व कोयासन विद्यापीठाचे कुलगुरू कौकाना फुजिता यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी राजशिष्टाचारानुसार जपानमधील भारतीय राजदूत दीपा गोपालन् वाधवा यांनी मेजवानीचे आयोजन केले. या दौऱ्याच्या केंद्रस्थानी विद्यापीठ असल्यामुळे डॉ. चोपडे सपत्निक राजदूताच्या टोकियो येथील निवासस्थानी गेले, परंतु प्रवेशद्वारावर ठेवलेल्या निमंत्रितांच्या यादीत त्यांचे नाव नसल्याचे तेथील अधिकाऱ्याने त्यांना सांगितले. त्यामुळे कुलगुरूंना धक्काच बसला, पण ते तेथून शांतपणे परतले. या वेळी त्यांच्यासमवेत असलेले प्रा. चैतन्य भंडारे यांनी'मटा'ला सांगितले की, या वेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले हेदेखील कुलगुरूंसोबत होते. त्यांचे नाव यादीत असल्यामुळे ते आत गेले.कुलगुरू व त्यांच्या पत्नी नलिनी चोपडे हे तेथून निघाले तेव्हा काही अधिकाऱ्यांनी त्यांना 'परत का निघालात,' असेही विचारले, परंतु कुलगुरूंनी निमंत्रण नसल्यामुळे परत जात असल्याचे शांतपणे सांगितले. भंडारे यांना ते म्हणाले, 'अशा गोष्टींपेक्षा मला माझे विद्यापीठ माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळ जाहीर करा, उद्धव ठाकरेंची मागणी

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

यंदा पावसाअभावी महाराष्ट्रातील परिस्थिती भीषण आहे. त्यामुळे तातडीने दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मराठवाड्यातील दुष्काळ दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे ही मागणी केली.

महाराष्ट्रातील परिस्थिती भयंकर आहे. शेतीसाठी पाणी नाही, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठा आहे. अशा वेळी केंद्र सरकारने बिहारला सव्वा लाख कोटींचे पॅकेज दिले, तसे महाराष्ट्रालाही द्या, असेही उद्धव यांनी ठणकावून सांगितले. मात्र मी आज कोणावर टीका करण्यासाठी आलो नाही. सरकारने आता शेतकऱ्यांनी कर्ज मुक्ती करावी अशी मागणीही उद्धव यांनी पत्रकार परिषदेत केली.

शिवसेना दुष्काळी भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करणार असून शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणार आहे. तसेच पीडित शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी शिवसेना कन्यादान योजना राबवणार असून यातून मुलींच्या लग्नाचा खर्च करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलआयुक्तालय मराठवाड्यात करावे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा हा अवर्षण प्रवण भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी विविध योजनांमधून सिंचन प्रकल्प राबविण्यात येत असल्यामुळे प्रकल्पांची तांत्रिक आणि आर्थिक तरतुदीची माहिती मिळत नाही. सर्व विभाग एकत्र करून जलआयुक्तालय मराठवाड्यात स्थापन करावे, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

शिवतारे म्हणाले, की मराठवाड्याला कृष्णा - भीमा स्थिरीकरण योजनेतून २४ टीएमसी पाणी देण्याची घोषणा तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने करून मराठवाड्यातील जनतेची दिशाभूल केली. वास्तविक हे पाणी साठविण्यासाठी कुठलीही तरतूद केली नाही. केवळ सात टीएमसी पाणी मराठवाडा - कृष्णा खोऱ्यातून देण्याचे नियोजन करण्यात आले असून हे पाणी मराठवाड्यात मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या योजनेसाठी वेळप्रसंगी कर्ज काढण्याचीही मानसिकता तयार करावी लागेल.

राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. त्यात समावेश न झालेल्या गावांमध्ये शिवजलक्रांती योजनेमार्फत सिंचन प्रकल्पांची कामे केली जातील, असे सांगून शिवतारे म्हणाले की मराठवाड्यातील १६८२ गावांमध्ये ही योजना राबविली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नास नकार दिल्याने तरुणीस केली मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नास नकार दिल्याने एका २८ वर्षीय तरुणीस आरोपीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी नीलेश किशोर तिवारी (रा. बीड) विरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुणी व आरोपी नीलेश बीड येथील बीएचआर पतसंस्थेत नोकरी करतात. लग्नासाठी मार्च २०१५ पासून नीलेश त्रास देत होता. त्यास नकार दिल्याने त्याने शिवीगाळ व मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

पैशांसाठी विवाहितेचा छळ

पैशांसाठी एका २२ वर्षीय विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासू विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय नोकरीसाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, यासाठी पती जगदीश घनश्याम गायकवाड, सासू सुष्मा गायकवाड यांनी मानसिक व शारिरीक त्रास दिल्याचे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

बिलावरून मारहाण

दारूचे बिल भरण्यास नकार दिल्याने एका तरुणास तिघांनी बेदम मारहाण केली. शक्तीप्रसाद शंकरकुमार बिस्वाल (रा. राजनगर) असे फिर्यादीचे नाव आहे. शक्तीप्रसाद मित्रासह शुक्रवारी रात्री अकरा वाजता माऊली बिअरबारमध्ये गेला होत. तो बिल देण्यासाठी गेला. त्यावेळी ओळखीचा असलेल्या विठ्ठल जाधव व त्याच्या दोन साथीदाराने आमचेही बिल भर, असा आग्रह धरला. त्यास नकार देताच जाधव व त्याच्या साथीदाराने मारहाण केली, असे तक्रारीत नमूद केले आहे.

क्रेनचालकाविरुद्ध गुन्हा

अवजड वाहनास प्रतिबंध असतानाही बारापुल्ला गेट येथून क्रेन (एम.एच. २० बीए ४१२७) नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या, बॅरिकेटसचे नुकसान करणाऱ्या क्रेनचालकाविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे अधिकारी अशोक मुदिराज यांनी याप्रकरणी तक्रार दिली.

कारची काच फोडली

मुकुंदवाडी भाजी मंडीतील अनधिकृत लावलेल्या फेरीवाल्याच्या गाड्या मुकुंदवाडी पोलिस हटवित असतानाच एका महिलेसह तिच्या मुलाने शिवीगाळ करत एका कारवर दगड मारत काच फोडली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पोलिस मंडईतील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या गाड्या हटवत होते. त्या वेळी गुलशन शेख, व फैय्याज शेख यांनी शिवीगाळ करत कार (एम.एच. २० - ९७२७) वर दगडफेक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाच्या धारात फुटला पोळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कृषीसंस्कृतीत महत्त्व असलेला पोळा सण शनिवारी (१२ सप्टेंबर) दुष्काळाच्या चिंताजनक वातावरणात साजरा झाला. जिल्ह्यात कमी पावसाने खरीप हंगामाचे नुकसान झाले. या बिकट परिस्थितीमुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे. पोळा सणावरही दुष्काळाचे सावट पडल्याने नेहमीचा उत्साह जाणवला नाही, पण सायंकाळी सर्वदूर परतीचा पाऊस पडल्याने काहीसा दिलासा मिळाला.

शेतकऱ्यांना शेतीचा डोलारा सांभाळण्यात मदत करणाऱ्या बैलांचे कृषीसंस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ऋणातून उतराई होण्यासाठी पोळ्याला बैलांची पूजा करण्याची परंपरा आहे. यंदा सणाचा नेहमीचा उत्साह दिसला नाही. शहर परिसरातील हर्सूल, चिकलठाणा, झाल्टा, पडेगाव, मिटमिटा, कांचनवाडी या गावांमध्ये उत्साहात पोळा साजरा झाला. चिकलठाणा गावातील हनुमान मंदिरापर्यंत वाजतगाजत बैलांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी जागरण-गोंधळ पार्ट्यांना निमंत्रित करण्यात आले होते. डॉल्बी व बँडच्या तालावर मिरवणुका निघाल्या. हर्सूल गावाच्या वेशीत सायंकाळी पोळा फुटला. यावेळी घरोघरी पुरणपोळीचा घास भरवून बैलांची पूजा करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक भागात पिण्यासाठीही पाणी नसल्याने पोळा सणाचा उत्साह जेमतेम होता.

रब्बीची आशा

पोळा फुटण्याच्या तयारीत असताना अनेक भागात दमदार पाऊस झाला. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला. परतीच्या पावसावरच रब्बीची पेरणी होणार आहे. त्यामुळे भरपूर पाऊस पडून किमान रब्बी हंगाम हाती लागावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी मागणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

0
0

औरंगाबादः व्यावसायिकाकडून एक लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी धनराज रमेश वणकर (रा. पहाडसिंगपुरा) यांचे लालमंडी बेगमपुरा येथे रिअल स्टेट एजन्सीचे कार्यालय आहे. शुक्रवारी सायकांळी साडेचार वाजता ते कार्यालयात असतानाच इलू नंदवशी, करण भातेवाल व त्याच्या अन्य एक साथीदाराने (सर्व रा. लालमंडी) त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला. हा आमचा एरिया असून व्यवसाय करायचा असल्यास एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली. शिवीगाळ करत हॉकी व बेस बॉलच्या बॅटने मारहाणही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images