Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

एकाच सोसायटीत दोन घरफोड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन ८ परिसरातील कीर्ती सोसायटीमध्ये गेल्या तीन दिवसांत दोन घरफोड्या झाल्या. यामध्ये लाखोंचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. चोरीचा पहिला प्रकार शनिवारी घडला. येथील सुखदेव भाले हे से‌वानिवृत्त मुख्यकार्यकारी अधिकारी गुरुवारी वाढदिवसानिमित्त नांदेडला गेले होते. शनिवारी ते परत आले. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून ८५ हजार रुपयांची भांडी व रोख तीन हजार असा ८८ हजारांचा ऐवज लंपास केला. पोलिस ठाणे गाठून त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. यानंतर सोमवारी चोरीची दुसरी घटना विनोद लक्ष्मण खिल्लारे यांची घरी घडली. विनोद यांची बहीण रागिनी पुण्यात नोकरी करतात. त्या सध्या औरंगाबादला भावाकडे आल्या होत्या. मंगळवारी त्यांना जायचे असल्यामुळे त्यांनी बॅग भरवून ठेवली. सोमवारी पहाटे चोरट्यानी त्यांच्या घरातील वरच्या मजल्यावर प्रवेश केला. विनोद खिल्लारेंच्या रूमला बाहेरून कडी लावली. यानंतर रागिणी खिल्लारे यांच्या बॅगमधील नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने, सहा तोळे चांदीचे दागीने व रोख बारा हजार असा लाखोंचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


५० प्रश्नांचा भड‌िमार; तनवाणीचा गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहाडसिंगपुरा जमीन फसवणूक प्रकरणी नगरसेवक राजू तनवाणी व राज आहुजा यांच्यावर आर्थिक गुन्हेशाखेने पन्नास प्रश्नांची सरबत्ती केली. या भडिमारापुढे तनवाणी व आहुजा गोंधळून गेले. शनिवारी नोटीस बजावल्यानंतर तनवाणी, आहुजा हजर होण्याची शक्यता पोलिसांनी गृहित धरली होती. चौकशी दरम्यान एखादा महत्त्वाचा मुद्दा राहू नये म्हणून रविवारीच पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. या जमिनीबाबत त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या कागदपत्रावरून तनवाणीला विचारण्यासाठी प्रश्नावली तयार केली होती. यामध्ये नाव, पत्ता, वडिलांचा व्यवसाय या साध्या प्रश्नाबरोबरच हा व्यवसाय किती वर्षापासून करता, जमीन खरेदी करताना सर्च रिपोर्ट काढला होता का, २१ फेब्रुवारी २००४ रोजी कोरडे याच्याकडून जमीन खरेदी केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्याच्या कुटुंबीयाचे संमतीपत्र व आहुजाला तात्काळ जीपीए करून देण्याचे कारण काय, ले आउट प्लॅन अधिकृत बनवून घेतला का, कोणाकडून बनवून घेतला, जमिनीचे व्यवहार कशा पध्दतीने केले. त्याच्या आयकर नोंदी केल्या का, अशा प्रश्नांचा समावेश होता. या प्रश्नांची उत्तरे देताना तनवाणी अनेक ठिकाणी अडखळले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच प्रकरणी आरोपीला कोठडी

$
0
0



औरंगाबाद : छावणीतील लाच प्रकरणामध्ये एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे न्यायाधीश एस. एस. पठाण यांनी दिले.

छावणी परिषदेतील नगरसेवक संजय गारोल यांच्यावर एक लाखाची लाच मागितल्यावरून गुन्हा दाखल आहे. त्यांचा मेहुणा व आरोपी अजय नागभूषण नायडू (रा. छावणी) याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी व नगरसेवक संजय गारोल फरार असून, त्याला अटक करण्यासाठी माहिती घ्यायची आहे, या प्रकरणी सखोल तपास करायचा आहे व इतर आरोपींचा शोध घ्यायचा असल्याने पाच दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील भीमराव पवार यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रॉडिंग’खरेदीची चौकशी

$
0
0

महापौरांची घोषणा; दोषींवर कारवाई करणार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रॉडिंग मशीन खरेदी प्रकरणाची मुख्य लेखापरीक्षकांच्या माध्यमातून चौकशी करण्याची घोषणा महापौर त्र्यंबक तुपे यांनी सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्चून खरेदी केलेल्या रॉडिंग मशीन पडून आहेत. त्या गंजल्यामुळे त्यांचा काहीच उपयोग होत नाही. महापालिकेने कोणत्या निधीतून या मशीनची खरेदी केली, त्या मशीनचा उपयोग का केला नाही, या सर्व प्रकरणात कोण दोषी आहे, असे प्रश्न सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी विचारले. शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी या बद्दल खुलासा केला. ते म्हणाले, '२००९-१०मध्ये या मशीनची खरेदी केली. मशीन चालवणाऱ्या सोलापूरच्या ठेकेदाराला पेमेंट न केल्यामुळे त्याने हे काम सोडून दिले. काम सोडून गेल्यावर तो पुन्हा आलाच नाही. मशीन पडून आहेत. त्यामुळे पालिकेचे नुकसान झाले असे म्हणता येणार नाही, कारण मोहन मेघावाले यांच्या वॉर्डात या मशीनच्या सहाय्याने सलग वीस - पंचेवीस दिवस ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम करण्यात आले,' असा उल्लेख त्यांनी केला. पानझडे यांचा मुद्दा जंजाळ यांनी खोडून काढला व 'मशीनमुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे,' असे ते म्हणाले.

पालिका अधिनियमाच्या कलम ५६ (२) (ड)नुसार या प्रकरणात जे अधिकारी दोषी असतील त्या अधिकाऱ्याच्या पगारातून मशीनची किंमत वसूल करा, अशी मागणी त्यांनी केली. यावर मुख्यलेखापरीक्षकांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले.



पैसे त्याच कामी खर्च करा

एअरटेल कंपनीचे केबल टाकण्यासाठी भर पावसाळ्यात रस्ते खोदण्याचे काम सुरू असल्याकडे नगरसेवकांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या संदर्भात झालेल्या चर्चेत राजेंद्र जंजाळ, राजू वैद्य, राजू शिंदे, विकास जैन, अब्दुल नाईकवाडी आदींनी भाग घेतला. पावसाळ्यात खोदकाम करणे चुकीचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 'खोदकामापोटी त्या कंपनीने अडीच कोटी भरलेत. त्यातून रस्ते दुरुस्त करू,' असे शहर अभियंता सखाराम पानझडे म्हणाले. 'तेव्हा ज्या कामासाठीचा पैसा त्याच कामासाठी खर्च करा,' असे आदेश महापौरांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्मशानात सहल

$
0
0

एन-सहाच्या स्मशानभूमीत प्रयोग सादर करताना शहाजी भोसले.

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शनिअमावस्येला स्मशानात भूतांचा वावर असतो हा समज खोटा ठरवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (१२ सप्टेंबर) थेट स्मशानातच एक रात्र जागवली.

सिडको एन-सहाच्या स्मशानभूमीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सहल काढली. शनिवारी रात्री नऊ वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाची सांगता मध्यरात्री साडेबारा वाजता झाली. समितीचे राज्य सचिव शहाजी भोसले यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. 'मृत्यूवर माणूस चर्चा करीत नाही. कारण त्याला त्याची भीती वाटते, असे सांगून भारत सिरसाट यांनी या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. भूत होऊन घाटी परिसरातील मुलांना कसे घाबरवले होते याचा किस्सा बुद्धप्रिय कबीर यांनी सांगितला. डॉ. रश्मी बोरीकर यांनी त्यांच्या सासरी झालेला किस्सा सांगितला. त्यांच्या सासूने देहदान केले. त्यांचे डोळेही दान करण्यात आले, पण कोणताही धार्मिक विधी करण्यात आला नाही. डॉ. अजित खोजरे यांनी आत्मा ही संकल्पनाच अस्तित्त्वात नसते. त्यामुळे मृत्यूनंतर भूत-आत्मा असे काहीही नसते असे सांगत त्याचे वैज्ञानिक आधारही सांगितले.

शहाजी भोसले यांनी पेटता टेंभा हातावरून फिरवून तो पेटत नसल्याचे किंवा चटकाही बसत नसल्याचे दाखवून दिले. अॅड. महेश भोसले यांनीही त्यांच्या आयुष्यातही एक भुताचा किस्सा यावेळी सांगितला. यात डॉ. रेणू चौहान, शिरीष तांबे, डॉ. शुभांगी पलवदे, सोनालिका नागभोडे, अतुल बडवे, गीता कोल्हटकर, श्रीकांत कोल्हटकर, अभय निकाळजे, प्रशांत कांबळे, प्रवीण भालेराव, सुनील चौथमल, शेख इरफान, रिंकू कडवे, वृषाली पाटील आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरुग्णाचा आयुक्तालयात गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस आयुक्तालयात सोमवारी दुपारी एका मनोरुग्णाने आरडाओरड करीत गोंधळ घातला. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता त्याने एसीपीच्या के‌बीनबाहेर असलेल्या नळाखाली आंघोळीचा प्रयत्न केला. पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याला तेथून ओढत बाहेर काढले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पोलिस आयुक्तांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच अलंकार हॉलमध्ये देखील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परवानगीसाठी गर्दी केली होती. यावेळी मळकट कपडे घातलेल्या एका मनोरुग्णाने आवारात प्रवेश केला. सुरुवातीला त्याने पार्किंगमध्ये आरडाओरड करीत शिवीगाळ केली. यानंतर त्याने पासपोर्ट विभागाबाहेर गोंधळ घातला. हा प्रकार घडताना नागरिकांची गर्दी झाली होती. त्याला कोणी अडवत नसल्याने तो थेट गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस आयुक्ताच्या केबीनबाहेर असलेल्या बेंचवर येऊन बसला. या ठिकाणी देखील त्याची बडबड सुरूच होती. यानंतर त्याने समोर असलेल्या नळाखाली आंघोळीलाच सुरुवात केली. काही महिला पीएसआय तेथे उपस्थित होत्या. वेड्याचा हा प्रकार पाहून त्यांनी काढता पाय घेतला. दरम्यान, सलामीसाठी उभ्या असलेल्या गार्डच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने सिक्युरिटी केबीनमध्ये असलेल्या सहकाऱ्यांना ही माहिती देत मनोरुग्णाच्या दिशेने धाव घेतली. ओल्या कपड्यात त्याला बाहेर काढण्यात आले. तरीदेखील त्याची बडबड सुरूच होती. कसेबसे त्याला ओढत नेत आयुक्तालयाच्या गेटबाहेर काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटारूंना घातल्या बेड्या

$
0
0

गुलमंडीवर व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न फसला; सहा जण गजाआड

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुकान बंद करून दुचाकीवर घरी निघालेल्या कापड व्यापाऱ्याची ९५ हजाराची बॅग पळवण्याचा प्रयत्न रविवारी रात्री दहा वाजता घडला. एका आरोपीला नागरिकांनी घटनास्थळावरच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, तर, उर्वरित पाच आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली. कर्ज फेडण्यासाठी सूत्रधाराने हा प्लॅन आखला, मात्र तो अयशस्वी झाला.

गुलमंडी, टिळकपथ रोडवर मदनलाल बोरा यांचे मॅचवेल मॅचिंग सेंटर दुकान आहे. रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास बोरा यांनी दुकान बंद केले. गल्ल्यातील ९५ हजारांची रोकड त्यांनी एका बॅगमध्ये घेतली होती. दुचाकीवर ते घरी जाण्यासाठी निघाले. त्यांच्या पाठीमागे त्यांचा मुलगा व इतर नोकर होते. बाराभाई ताजिया चौकातून ते वळण घेत असताना एका तरुणाने दुचाकीला लाथ मारून त्यांना पाडले व त्यांच्या जवळील बॅग हिसकावली. यावेळी बोरा यांनी आरडाओरड केली. नागरिकांनी तात्काळ ही बॅग हिसकावणाऱ्या तरुणाला जागेवरच पकडून चोप दिला. व क्रांतिचौक पोलिसांना ही माहिती दिली. दरम्यान, या तरुणाचे साथीदार पसार झाले. पकडलेला आरोपी नरेश गणपत साळवेची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने त्याच्या साथीदाराची माहिती दिली. पोलिसांनी रात्रीतून आरोपी वैभव रावसाहेब मालोदे, अमोल केशवराव खेडकर, विकी सोनवणे, प्रकाश दिलीप चव्हाण, विशाल मिश्रीलाल पवार यांना अटक केली. सहायक फौजदार अन्वर पठाण, समद पठाण, प्रकाश डोंगरे, संतोष मुदीराज, नवनाथ परदेशी, मुरली मनमोहन कोलमी व शेख ऐजाज यांनी केली.

साळवे मास्टरमाइंड

नरेश साळवे याच्यावर साठ हजार रूपयांचे कर्ज आहे. काही दिवसापासून तो पैशांच्या विवंचनेत होता. त्याने पाळत ठेवून बोरा यांची माहिती काढली होती. सहा मित्रांना त्याने यामध्ये सहभागी केले होते. दोन दिवसापासून त्यांनी ट्रॅप लावला होता, पण यश आले नव्हते. अखेर रविवारी त्यांनी प्रयत्न केला, मात्र सूत्रधारच जागेवर पकडला गेल्याने हा ट्रॅप फसला.

कट्ट्यावरची मैत्री

हे सर्व आरोपी समवयस्क आहेत. समर्थनगर येथील कट्ट्यावर त्यांची मैत्री जमली. यापैकी दोघे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. तर एक जण बाऊंसर आहे. नरेश साळवेची ही योजना असल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. कुलकर्णी सक्तीच्या रजेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैद्यकीय अधिकारी आणि आक्रमक नगरसेवकांच्या रेट्यापुढे महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांना रजेवर पाठविण्याचा निर्णय आयुक्त प्रकाश महाजन यांनी सोमवारी घेतला.

डॉ. कुलकर्णी यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासामुळे वैतागलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी सर्व पदाधिकारी व आयुक्तांना डॉ. कुलकर्णी यांच्या विरोधात निवेदन दिले होते. सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून सुमारे पंचवीस वैद्यकीय अधिकारी सर्वसाधारण सभेच्या सभागृहाबाहेर जमा झाले. काही महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉ. कुलकर्णी यांच्या निषेधार्थ काळ्या साड्या नेसल्या होत्या. सभागृहात नगरसेवक राजू वैद्य यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. सभागृहाच्या बाहेर मोठ्या संख्येने वैद्यकीय अधिकारी आले आहेत, त्यांच्याशी चर्चा करा असे ते म्हणाले. त्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे यांनी सभा तहकूब करून स्थायी समितीच्या सभागृहात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, सभापती दिलीप थोरात, आरोग्य सभापती विजय औताडे, आयुक्त प्रकाश महाजन उपस्थित होते. डॉ. मेघा जोगदंड यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्यावतीने निवेदन केले. सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर प्लास्टिक कचरा, वैद्यकीय कचऱ्याचा मुद्दा राजेंद्र जंजाळ यांनी उपस्थित केला. गजानन बारवाल, राजू वैद्य, विजय औताडे यांनी या संदर्भात मनोगत व्यक्त करून या कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. दिलीप थोरात यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. महापौरांनी डॉ. जयश्री कुलकर्णी यांना खुलासा करण्यास सांगितले. त्या खुलासा करीत असतानाच नगरसेवकांनी त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. डॉ. कुलकर्णी यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, अशी मागणी लावून धरली. महापौरांनी पुन्हा सभा तहकूब केली. सभा पुन्हा सुरू झाली तेव्हा, डॉ. कुलकर्णी यांना रजेवर पाठवल्याचे आयुक्तांनी सांगितले.

मला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले नाही. मीच स्वतःहून रजेवर गेले आहे. सभागृहात आज जे काही घडले, त्यामुळे मला धक्काच बसला. सभागृहाने माझी बाजू ऐकून घ्यायला हवी होती. माजी बाजू ऐकून न घेता एकतर्फी निर्णय घेतला गेला आहे. अशा प्रकारे निर्णय होत असतील तर, प्रामाणिक अधिकाऱ्याला काम करणे अवघड होऊन बसेल.

- जयश्री कुलकर्णी, आरोग्य-वैद्यकीय अधिकारी, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गडाच्या जतनासाठी ‘मॅपिंग’ प्रणाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील साडेतीनशे किल्ल्यांची पडझड दुर्गप्रेमींसाठी चिंतेची बाब ठरली आहे. वास्तू पडल्यानंतरही मूळ संरचना जतन करण्याच्या उद्देशाने दुर्ग संवर्धन समितीने 'मॅपिंग' प्रणाली हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात २५ किल्ल्यांचे नकाशे बनवून किल्ल्याचा मूळ आराखडा जतन केला जाणार आहे. अंतूर व माहूर गडावर लवकरच मॅपिंगचे काम सुरू होणार आहे.

पुरातन वास्तूंचे जतन करताना सर्वेक्षण, उत्खनन, दस्तावेजीकरण, संरक्षण, संवर्धन आणि जिर्णोध्दार या विविध पद्धतींचा अवलंबन करतात. राज्यात साडेतीनशे किल्ले असून बहुतेक किल्ल्यांची पडझड सुरू आहे. काही ठिकाणी प्राचीन पद्धतीनुसार काम शक्य आहे. मात्र, मूळ संरचना माहीत नसल्याने नवीन बांधकाम करताना अडचणी येतात. राज्य सरकारच्या दुर्ग संवर्धन समितीने किल्ल्यांच्या संवर्धनासाठी या मुद्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रत्येक किल्ल्याचे मॅपिंग झाल्यास जुनी रचना लक्षात घेऊन काही प्रमाणात बांधकाम शक्य असल्याचे सदस्यांचे एकमत आहे. कोकणातील काही किल्ल्यांची मूळ रचना शंभर वर्षांपूर्वी तयार केलेल्या नकाशामुळे लक्षात आली. याबाबत समितीचे सदस्य डॉ. सचिन जोशी यांनी गड संवर्धन कार्यशाळेनिमित्त सविस्तर माहिती दिली. 'राज्यात पूर्वी साडेतीनशेपेक्षा अधिक किल्ले होते. मात्र, डॉक्युमेंटेशन व मॅपिंग नसल्यामुळे त्यांची माहिती मिळत नाही. आता शास्त्रीयदृष्ट्या अचूक माहिती मिळवण्यासाठी मॅपिंग करणे आवश्यक आहे. इतिहास अभ्यासक आणि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी किल्ल्यांचे ड्रॉइंग किंवा नकाशा काढल्यास महत्त्वाचा दस्तावेज ठरेल' असे डॉ. जोशी यांनी सांगितले.

पर्यटकांना किल्ल्याची माहिती देण्यासाठी नकाशे आवश्यक आहेत. 'जीपीएस' प्रणालीमुळे किल्ल्यांची भौगोलिक रचना लक्षात येते. मॅपिंगमुळे दुर्ग संवर्धनाचे महत्त्वाचे काम होईल असा विश्वास समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला.

मराठवाड्यातील दोन किल्ले

मॅपिंगसाठी निवडलेल्या राज्यातील २५ किल्ल्यात मराठवाड्यातील दोन किल्ले आहेत. पहिल्या टप्प्यात अंतूर (जि. औरंगाबाद) व माहूर (जि. नांदेड) या किल्ल्यांचा समावेश आहे. दुर्ग संवर्धन समितीने सांस्कृतिक विभागाला याबाबत प्रस्ताव दिला असून महिनाभरात काम सुरू होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या पथकाला स्थानिक स्वयंसेवक मदत करणार आहेत.

नकाशे उपलब्ध नसल्यामुळे किल्ल्यांची रचना लक्षात येत नाही. सध्या अस्तित्वात असलेली वास्तू कालांतराने पडली तरी रचना जतन करण्यासाठी नकाशे महत्त्वपूर्ण ठरतात. पर्यटन क्षेत्रासाठी मॅपिंग महत्त्वपूर्ण ठरेल.

- डॉ. सचिन जोशी, सदस्य, दुर्ग संवर्धन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे दिले; खरेदीखत नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने १५ वर्षांपूर्वी जमीन संपादित केली. त्या जागेचा मोबदला दिला, पण खरेदीखत केले नाही. त्यामुळे जमिनीचा मूळ मालक मांगीलाल फुलफगर यांनी पुन्हा जमिनीवर कब्जा केल्याचा प्रकार सोमवारी नगरसेवकांनी पालिकेच्या सभेत उघड केला. विशेष म्हणजे 'जमिनीचे खरेदीखत केले नाही,' अशी कबुली नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांनी यावेळी दिली.

नगरसेवक कैलास गायकवाड यांनी या भूखंडाचा मुद्दा सर्वसाधारण सभेत मांडला. ते म्हणाले, 'गारखेडा येथील सर्व्हे क्रमांर ५१-१ येथील तीन एकर जागा पंधरा वर्षांपूर्वी महापालिकेने संपादित केली. या जागेचे मालक मांगीलाल फुलफगर यांना त्यावेळी महापालिकेने सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांचा मोबदला दिला.

पंचनामा व ताबापावती करून तो भूखंड ताब्यात घेतला. मात्र, त्यानंतर फुलफगर यांनी त्या भूखंडावर दावा करीत स्वतःच्या मालकीचा फलक लावला. दरम्यानच्या काळात याठिकाणी वीस बाय तीसचे प्लॉटस् पाडून त्याची विक्री केली. त्यावर बांधकामे देखील झाली. हे प्लॉटस् रद्द करून महापालिकेने ती जागा ताब्यात घ्यावी अशी मागणी करून गायकवाड यांनी एक वर्षापूर्वी पालिकेसमोर उपोषण केले. तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी प्लॉट विक्रीच्या संदर्भात संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील असे आश्वासन दिल्यामुळे गायकवाड यांनी त्यावेळी उपोषण

मागे घेतले. मात्र, एका वर्षाच्या काळात महापालिकेने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा हा विषय सर्वसाधारण सभेत मांडला. ती जागा ताब्यात घ्या, 'वीस बाय तीस' चे प्लॉटस् निष्काशित करा, संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशा मागण्या त्यांनी केल्या. यावर बोलताना नगरसेवक नंदकुमार घोडेले म्हणाले, 'पालिकेने जमीन मालकाला त्या जागेचा मोबदला दिला, पण 'सात बारा' उताऱ्यावर अद्याप पालिकेचे नाव लागलेले नाही. पालिकेने संपादित केलेल्या सर्व मालमत्ता सात बारा उताऱ्यावर आणणे गरजेचे आहे.

नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. डी.पी. कुलकर्णी यांनी याबद्दल खुलासा केला. ते म्हणाले, 'फुलफगर यांना त्या जागेचा पंधरा वर्षांपूर्वी मोबदला दिला, पण त्यांच्याकडून खरेदी खत करून घेतले नाही. खरेदीखत करून घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे.'

तीन दिवसांत कारवाई

महापौर त्र्यंबक तुपे यांनी या संदर्भात प्रशासनाने तीन दिवसांत कायदेशीर कारवाई करावी असे आदेश दिले. आयुक्तांनी स्वतः या प्रकणाची चौकशी करावी, अशी सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेत थकले; आता ‘कृत्रिम‘साठी पुण्यातून उड्डाण!

$
0
0

ramchandra.vaybhat@timesgroup.com

औरंगाबादः निसर्गासोबतच कृत्रिम पावसानेही मराठवाड्याला दगा दिला. ढगांच्या गुंगाऱ्यामुळे या प्रयोगाला दीड महिन्यात पूर्णतः यश आले नाही. त्यामुळे कृत्रिमचा प्रयोग आता पुण्याच्या धरणक्षेत्रात केला जाणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठ दिवसांमध्ये या भागात पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे समजते. पुणे येथील विमानतळावरून उड्डाण घेण्यासाठी विमानतळ प्राधिकरण; तसेच सैन्य विभागाकडून आवश्यक त्या परवानग्या घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर बसविण्यात आलेल्या सी-बॅण्ड डॉप्लर रडार सिस्ट‌िम तसेच महाबळेश्वर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी (आयआयटीएम); तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाचीही मदत घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात मराठवाडा; तसेच राज्याच्या इतर भागांमध्ये उपयुक्त ढग असल्यास, औरंगाबाद येथील रडारच्या माध्यमातून विमानाला माहिती दिली जाईल. त्यानंतर त्या परिसरामध्येही क्लाउड सिडिंगचा प्रयोग करता येईल. दरम्यान, औरंगाबाद येथे कृत्रिम पावसासाठी तयार केलेल्या पथकातील अधिकारी, वैमानिकांनी पुणे येथे पाहणी केली.

उपयुक्त ढग आढळल्यानंतर पुणे विभागामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी नेहमीच सैन्य तसेच इतर विभागांच्या परवानगीची आवश्यकता होती. आता विमान उड्डाणाची परवानगी मिळाल्यानंतर या अडचणी काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळावरून ४ ऑगस्टपासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली. क्लाउड सिडिंगसाठी विमानाचे आतापर्यंत १०० तासही पूर्ण झालेले नाहीत. पुण्यातील विमानतळावरुन येत्या काही दिवसांत प्रयोगाला सुरुवात होणार असली तरी, हा प्रयोग किती दिवस सुरू राहील हे मात्र निश्चित नाही.

सध्या कोकण तसेच गोवा येथे चांगला पाऊस सुरू आहे. पुणे विभागामध्ये येत्या काही दिवसांमध्ये कृत्रिम पावसासाठी हवामान पोषक दिसत आहे. त्यामुळे पश्चिम घाट परिसरातील मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात क्लाउड सिडिंगचा प्रयोग शक्य आहे. येत्या काही दिवसांतच हा प्रयोग करण्यात येईल.

- सुहास दिवसे, संचालक, आपत्ती व्यवस्थापन विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाभरात लवकरच ‘कॅन्सर स्क्रीनिंग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील शासकीय विभागीय कर्करुग्णालय अर्थात कॅन्सर हॉस्पिटलमध्ये 'प्रिव्हेन्टिव्ह ऑन्कॉलॉजी' हा स्वतंत्र विभाग पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून, या विभागाअंतर्गत संपूर्ण शहर; तसेच जिल्ह्यामध्ये कॅन्सरचे स्क्रिनिंग होणार आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने तालुका-तालुक्यांमध्ये महिला, तरुण, ज्येष्ठांसाठी 'डिटेक्शन कॅम्प' घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कॅन्सर होण्याची शक्यता असलेल्यांना किंवा कॅन्सर झाल्याचे निदान झालेल्यांना योग्य तो सल्ला-मार्गदर्शन करण्यात येणार असून, पुढील उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात येणार आहे.

हॉस्पिटलमध्ये यापूर्वीच 'प्रिव्हेन्टिव्ह ऑन्कॉलॉजी' हा स्वतंत्र विभाग सुरू झाला असला तरी पूर्वी या विषयाचा एकच सहाय्यक प्राध्यापक हॉस्पिटलमध्ये होते. आता मात्र एक सहयोगी प्राध्यापक, एक सहाय्यक प्राध्यापक, दोन वैद्यकीय सामाजिक अधीक्षक, दोन इंटर्न अशी 'टीम' सज्ज झाली आहे. या विभागाअंतर्गत हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारचा कर्करोग असल्याची शंका असणाऱ्यांची चाचपणी, तपासणी सुरू झाली आहे. विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयातून तपासणीसाठी पाठविलेल्या सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. त्याशिवाय कॅन्सरची शंका असल्यास, अशी व्यक्ती या विभागामध्ये चाचणी करून घेऊ शकते. त्याचबरोबर कर्करोग होऊ नये म्हणून दररोज विभागाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये मार्गदर्शन केले जात आहे. अशा प्रकारचे स्क्रिनिंग संपूर्ण शहरात महापालिकेच्या सहकार्याने, तर सगळ्या तालुक्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने केले जाणार आहे. त्यासाठी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात निदान शिबिरे घेतली जातील. यापूर्वी अशा प्रकारचे शिबिर शहरातील एकनाथनगरमध्ये मागे घेण्यात आले आहे.

वर्धापनदिनानिमित्त पॅपस्मिअर तपासणी

शासकीय कॅन्सर हॉस्पिटलच्या वर्धापनदिनानिमित्त २४ सप्टेंबर रोजी हॉस्पिटलमध्ये दिवसभर गर्भाशय व गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठी मोफत पॅपस्मिअर तपासणी करण्यात येणार आहे; तसेच निदानानुसार योग्य त्या उपचारांबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

आधी शहरामध्ये आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्क्रिनिंग केले जाणार आहे. त्यासाठी शासकीय वाहन, अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे कॅन्सरचे निदान होऊन लवकरात लवकर उपचार सुरू व्हावेत आणि कॅन्सरचे प्रमाण कमी व्हावे, अशी अपेक्षा आहे. कॅन्सर होऊच नये, हाच 'प्रिव्हेन्टिव्ह ऑन्कॉलॉजी'चा मूळ उद्देश आहे.

- डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, कॅन्सर हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाठी परीक्षेतील चुकांचे खापर कुणाच्या माथी?

$
0
0

औरंगाबाद : उत्तरपत्रिकेतील चुकांमुळे तलाठ्यांची भरती परीक्षा तत्काळ रद्द केल्यानंतर आता प्रशासन या प्रकाराची जबाबदारी निश्चित करण्याच्या कामाला लागले आहे. 'ओएमआर शीट' तयार करणाऱ्या पुण्याच्या कुणाल आयटी कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली असून, मंगळवारी होणाऱ्या बैठकीत चुकांचे खापर याच कंपनीच्या माथ्यावर फुटण्याची शक्यता आहे.

परीक्षेमध्ये १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 'ओएमआर शीट'मध्ये (उत्तरपत्रिका) केवळ ८० प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचे पर्याय दिले. त्यामुळे सर्व १५ परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाला. परीक्षेसाठी प्रत्येक उमेदवारासाठी ५ रुपये याप्रमाणे १ लाख ७७ हजार २०० रुपये, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक आदी ४१४ कर्मचाऱ्यांचा भत्ता, वाहतूक, स्टेशनरी व अन्य खर्च २ लाख रुपये आणि प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांसाठी सुमारे ३ लाख असा सुमारे ५ लाख रुपयांचा खर्च केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा पैसा आणि फेरपरीक्षेचा होणारा खर्च कुणाकडून वसूल करायचा असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.

आज ठरणार तारीख

१५ सप्टंेबरला होणाऱ्या जिल्हा निवड समितीच्या बैठकीत फेरपरीक्षेची तारीख निश्चित करण्यात येेईल. फेरपरीक्षेसाठी पात्र उमदेवारांकडून शुल्क आकारले जाणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जपानी उद्योजक औरंगाबादेत गुंतवणूक करण्याची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जपानी उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिष्टमंडळाने जपान दौरा केला. या दौऱ्यात पुण्यात गुंतवणुकीची घोषणा झाली. दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअर कॉरिडॉरमुळे (डीएमआयसी) औरंगाबादेत पुढील टप्प्यात गुंतणवूक होऊ शकेल, असा विश्वास कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिजचे (सीआयआय) सुनील किर्दक यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

मुख्यमंत्र्यांसमवेत विविध संघटनांचे उद्योजकही जपानला गेले होते. त्यात सीआयआयच्या १२ सदस्यांचा समावेश होता. औरंगाबाद शाखेचे चेअरमन श्रीराम नारायणन् आणि किर्दक यांनी मराठवाड्याचे नेतृत्व केले. दौऱ्याविषयी माहिती देताना किर्दक म्हणाले,'जापनीज एक्स्टर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन (जेट्रो) या भारतात गुंतवणुकीसाठी पुढाकार घेणाऱ्या संघटनेबरोबर महत्वाची चर्चा झाली. भारतीय राजदूत दीपा गोपालन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एमआयडीसीचे सीईओ भूषण गगराणी, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राचे ब्रँडिंग केले. स्मार्ट सिटी, इलेक्ट्रॉनिक्स, हायस्पीड ट्रेन आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रात गुंतवणुकीचे आवाहन केले. जपानमधून औरंगाबादेत निश्चितपणे गुंतवणूक होईल, असा विश्वास वाटतो.'

गुंतवणूकदार येणार

'सीआयआय'च्या वतीने जानेवारी २०१६मध्ये इंटरनॅशनल फ्रेंडशीप एक्स्चेंज काउंन्सिलच्या मदतीने गुंतवणूकदारांची परिषद औरंगाबादेत बोलाविण्यात येणार आहे. यासाठी जगभरातील गुंतवणूकदारांना सीआयआयने निमंत्रित केले आहे. अमेरिका, आफ्रिका, जपाननंतर जर्मनीमधील उद्योजकांच्या भेटीसाठी सीआयआयचे सदस्य रवाना झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेट नाही, मग ३० रुपये मोजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरीटीओमध्ये (प्रादेशिक परिवहन कार्यालय) अनेकांनी सरकारी नियमांवर बोट ठेवत स्वतःची तुंबडी भरणे सुरू केले आहे. वाहन परवाना काढायला गेलात, पण सोबत हेल्मेट अन् दुचाकीही नाही. मग हेल्मटचे ३० आणि गाडीचे ५० असे ८० रुपये मोजले की झाले, अशी ऑफर देत आरटीओतल्या दलालांची वरकमाई सुरू आहे.

तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी गोंविद सैंदाणे यांनी दुचाकी वाहन परवान्याच्या चाचणी परीक्षेसाठी उमेदवारांना हेल्मेट सक्तीचे आदेश दिले. तेव्हापासून दलालांच्या नव्या कमाईला सुरुवात झाली. कार्यालयात चार हेल्मेट आणि एक दुचाकी घेऊन एक व्यक्ती उभा राहायचा. ज्यांच्याकडे हेल्मेट नाही अशांकडून ३० रुपये घेऊन चाचणीसाठी हेल्मेट देणे सुरू केले. तर ज्यांच्याकडे वाहन नाही त्यांच्याकडून ५० रुपये देत दुचाकी देणे सुरू केले होते. याबाबत काही सुज्ञ ग्राहक प्रतिनिधींनी तक्रार त्यानंतर हे प्रकरण थांबले. सहाय्यक परिवहन अधिकारी मोरे यांनी याची दखल घेत वाहन परवान्यासाठी आलेल्या उमेदवारांना स्वतःची गाडी आणि हेल्मेट सक्तीचे करण्याचे आदेश दिले.

रोज तीन हजारांची कमाई

आरटीओ कार्यालयात दलालांनी हेल्मेटसाठी ३० रुपये आणि गाडीसाठी ५० रुपये वसूल करत, साधारणतः दिवसाकाठी रोज तीन-तीन हजारांची कमाई केली, असा आरोप ग्राहक प्रतिनिधींनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अनुकंपा’त भेदाभेद नको

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

अनुकंपा नेमणुकीत कोणताही राखीव व अराखीव असा भेदाभेद करणे न्यायोचित नसल्याचे मत व्यक्त करून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए. व्ही. निरगुडे ब न्या. व्ही. के. जाधव यांनी अर्जदारास नोकरीत सामावून घेण्याचे आदेश दिले. तब्बल ११ वर्षांनंतर या याचिकेचा निकाल लागला.

याचिकाकर्ते बालाजी मोरे यांचे वडील सीताराम नांदेड येथे प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) कार्यरत होते. त्यांचे ७ सप्टेंबर १९९७रोजी निधन झाले. बालाजी यांनी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी म्हणून नांदेडच्या जिल्हधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला. त्यांना वाॅचमन या रिक्त पदावर नेमणूक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. नांदेड आरटीओ यांनी अर्जदार हे महादेव कोळी अनुसूचित जमातीतील असल्यामुळे वैध जात प्रमाणपत्र सादर केल्यावरच नेमणूक दिली जाईल, असे स्पष्ट केले. या निर्णयास बालाजी यांनी आव्हान दिले. बालाजी यांना रुजू करून घेण्याचे अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. त्यांची निवड २००१मध्ये झाली होती, पण प्रत्यक्षात त्यांना २००३मध्ये नेमणूक देण्यात आली. शासनाच्या अनुकंपा तत्वावरील ५ टक्के आरक्षित कोट्यात राखीव व अराखीव अशी भेदाभेद करणाऱ्या निर्णयास आव्हान दिले होते.

शासनाचे धोरण हे मूळ अनुकंपा तत्वाच्या धोरणाच्या उद्देशाच्या विरुद्ध आहे. त्यांची नेमणूक ही अनुकंपा धोरणातून दिलेली आहे. याचिकाकर्त्याच्या नेमणूक आदेशातील जात वैधता प्रमाणपत्राची अट रद्द करून फक्त अनुकंपा वर्गातून कोणत्याही अटीशिवाय नेमणूक गृहित धरण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

आरक्षणात पुन्हा आरक्षण बेकायदा

शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास घरातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर आर्थिक आधार देण्याच्या माणुसकीच्या धोरणातून दिलेली ही नेमणूक आहे. अशा नेमणुकीत कोणताही राखीव व अराखीव असा भेदाभेद करणे न्यायोचित नसल्याचे मत कोर्टाने व्यक्त केले. अनुकंपा नेमणूक हा एक स्वतंत्र वर्ग करून शासनाने त्यासाठी ५ टक्के जागा एकूण नेमणुकीत आरक्षित केलेल्या असल्याने त्यात पुन्हा ५ टक्के जागांमध्ये राखीव व अराखीव, असा वर्ग तयार करते. हे आरक्षणात पुन्हा आरक्षण ठेवण्यासारखे आहे. ही पद्धती बेकायदा आहे, असेही कोर्टाने म्हटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तनवाणी, आहुजाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहाडसिंगपुरा प्रकरणात सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेने भूमाफिया नगरसेवक राजू तनवाणी व राज आहुजाला अटक केली. सकाळी तेे दोघे पोलिसांसमोर हजर झाले. त्यानंतर त्यांची आठ तास कसून चौकशी करण्यात आली; तसेच त्यांचा इन कॅमेरा जवाब नोंदविण्यात आला. रात्री आठच्या सुमारास या दोघांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पहाडसिंगपुरा परिसरातील रेणुकामातानगर व ताजमहल कॉलनी परिसरातील वादग्रस्त जमिनीची खरेदी करून त्यावर बनावट ले-आउटद्वारे प्लॉटिंग केली होती. संतराम कोरडे यांच्याकडून राजू तनवाणी यांनी जमीन खरेदी करून राज आहुजा यांना मुखत्यारनामा (जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी) करून दिला होता. याआधारे आहुजा याने प्लॉट विक्री केली होती. दरम्यान, मूळ मालक माधव सोनवणे याने कोर्टात धाव घेतली. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. कोर्टाच्या आदेशाने महसूल विभागाने नुकताच ‌जमिनीचा ताबा मूळ मालकाला‌

दिला. त्यामुळे तेथील रहिवासी बेघर झाले होते. याप्रकरणी तनवाणी, आहुजा व कोरडे यांच्यावर रामदास ढोले या रहिवाशाने दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. तेव्हापासून तनवाणी व आहुजा बेपत्ता होते. शनिवारी पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन हजर राहण्याबाबत नोटीस बजाविली होती. सोमवारी सकाळी अकरा वाजता तनवाणी तर, साडेअकरा वाजता आहुजा आर्थिक गुन्हे शाखेत हजर झाले.

दुपारी बारापासून त्यांची इन कॅमेरा चौकशी सुरू करण्यात आली. त्यांना सायंकाळी आयुक्तांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर तनवाणी व आहुजा यांचे लेखी जवाब नोंदविण्यात आले. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशाने त्यांना अटक करण्यात आली.

नगरसेवक राजू तनवाणी व आहुजा यांची पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर चौकशी करण्यात आली. याप्रकरणी त्यांना रात्री अटक करण्यात आली आहे.

- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धूरमुक्त वाहनांचा अभिनव प्रयोग

$
0
0

Ashsish.Chaudhari@timesgroup.com

औरंगाबादः वाहनांच्या प्रदुषणाच्या समस्येवर औरंगाबाद शहरातील अभियंता सुकुमार कुलकर्णी यांनी प्रभावी उपाय शोधला आहे. त्यांनी तयार केलेल्या 'सायलेंसिंग-एक्झॉस्ट गॅसेस, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग' (वाव सायलेंन्सर) या उपकरणामुळे वाहनातून बाहेर पडणारा धूर रोकता येतो, असा दावा त्यांनी केला आहे.

वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे अनेक आजार होतात. जागतिक पातळीवर चिंतेचा ठरलेल्या या विषयावर कुलकर्णी यांनी हा उपाय शोधला आहे. कंपनीतून स्वेच्छा निवृत्तीनंतर वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुराचा प्रश्न त्यांनी हाती घेतला. त्यातून हे सायलेंन्सर आकारास आले. त्यांनी तयार केलेले सायलेंन्सर वाहनातून बाहेर पडणारा धूर रोकून धरते. हा धूर काॅम्प्रेसरच्या माध्यमातून एका टँकमध्ये जमा केला जातो. त्यांनी त्यासाठी पाच किलोचे गॅस सिलिंडर वापरले आहे. धूर काॅम्प्रेस करून सिलिंडरमध्ये साठविला जातो. अंदाजे ५०० किलोमीटर दुचाकी चालल्यानंतर सिलिंडर भरते. यानंतर धुराची विल्हेवाट लावण्यासाठी मोठी यंत्रणा उभारावी लागणार अाहे. त्यामुळे त्यांनी प्रकल्पासाठी 'सीएमआयए'संस्थेसह काही बड्या कंपन्यांची मदत मागितली आहे. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर सिलिंडरमध्ये साठविल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याचे उपायही असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबादच्या शासकीय पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा प्राप्त केला. त्यानंतर प्रोडक्शन इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. ५६ वर्षे वय असलेल्या कुलकर्णी यांनी बड्या कंपन्यात काम केल्यानंतर स्वेच्छानिर्वती स्वीकारत अशा प्रयोगांना वाहून घेतले आहे. सायकलस्वाराच्या सुरक्षेसाठी त्यांनी 'वाव-सेफ' आणि, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 'वाव' हे उपकरण तयार केले आहे. 'वाव-सेफ' या उपकरणाच्या मदतीने सायकलस्वारांना गर्दीतून वाट काढण्यास मदत होते.

असे आहे उपकरण

सायलेंन्सरला ५० आरपीएमचा किंवा त्यापेक्षा कमी मिनिएचर कॉम्प्रेसर बसविला जातो. त्यातून धूर कॉम्प्रेस करून तो सिलिंडरमध्ये जमा केला जातो. तात्पुरत्या स्वरुपात पाच किलो क्षमतेचे सिलिंडर त्यांनी वापरलेला आहे. सायलेंन्सरमधून बाहेर पडणारा धूर थंड करण्यासाठी कुलिंग डस्टही वापरण्यात आले आहे. त्यासाठी छोटा एक्झॉस्ट फॅन वापरला आहे. सुमारे पाचशे किलोमीटरचे आंतर पार केल्यानंतर पाच किलोचे सिलिंडर धुराने भरते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्यावरील मांसविक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

नगराध्यक्षांनी उघड्यावरील मांसविक्री बंद करण्याच्या आश्वासनानाची सात महिन्यापासून पूर्तता झालेली नाही. गणेशोत्सवात उघड्यावरील मांस विक्री बंद करण्याचा मुद्दा शिवसेना शहरप्रमुख प्रकाश वानोळे यांनी शांतता समितीच्या बैठकीत मांडला आहे त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पैठण पोलिस ठाण्यातर्फे मंगळवारी (१५ सप्टेंबर) पितांबरी मंगल कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला आयपीएस अधिकारी तथा पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी बच्चन सिंग, नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, नायब तहसीलदार सुधीर शेट्टी, पोलिस निरीक्षक चत्रभुज काकडे यांच्यासह व्यापारी, गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना शहरप्रमुख प्रकाश वानोळे यांनी शहरातील उघड्यावरील मांसविक्रीचा मुदा मांडला. ते म्हणाले, नगराध्यक्ष गोर्डे यांनी सात महिन्यांपूर्वी नाथषष्टी काळातच नाही, तर नेहमीसाठी उघड्यावरील मांसविक्री बंद करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, सात महिने उलटूनही खुलेआम विक्री सुरू आहे. नगर पालिकेने किमान गणोशोत्सवात तरी उघड्यावरील मांसविक्री बंद करावी. नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी काही तांत्रिक कारणामुळे उघड्यावरील मांसविक्री बंद करता येत नसल्याचे सांगून वेळ मारून नेली.

सध्या शहरातील दोन मुख्य रस्त्यांची कामे सुरू असून कंत्राटदारांनी पर्यायी रस्ता तयार केले नाही. त्यामुळे गणेशोत्सवात भाविकांचे हाल होवू नये याकडे नगर पालिकेने लक्ष द्यावे, अशी सूचना सतीश आहेर यांनी केली. भिकाजी आठवले, कांतराव औटे, प्राचार्य वल्ले, गाणी बागवान आदींनीही सूचना मांडल्या. गणेश मंडळानी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन बच्चन सिंग यांनी केले. राज्यामध्ये पर्युषणपर्वकाळात मांस विक्रीवरील बंदीचा विषय चांगलाच गाजला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधांच्या किमतींवरून दुकानदार वेठीस

$
0
0

उस्मानाबादः. अधिसूचित किमतीपेक्षा अधिक दराने औषध विकत असल्याचे सांगून औषध दुकानदारांविरोधात उस्मानाबादमध्ये मोहीम उघडण्यात आली आहे. याबद्दल प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.

उस्मानाबादेतील औषध प्रशासनाने एका पत्रकाद्वारे जीवनावश्यक २८ औषधांची एक यादी नुकतीच जारी केली. यादीतील नमूद औषधाच्या छापील किमती या अधिसूचित किमतीप्रमाणे नसल्यास त्याचा जाब दुकानदारांना विचारण्यात येत आहे. औषध प्रशासनाच्या आदेशानुसार औषध किंमत नियंत्रण कायदा २०१३ (डीपीसीओ २०१३) चे उल्लंघन केलेली जीवनावश्यक औषधे बाजारपेठेतून काढून घेतल्यास रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयविकाराशिवाय अॅसिडीटीच्या रुग्णांना तातडीने उपलब्धतेसाठी पर्यायी व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आले नसल्याचे चित्र आहे.

या कारवाईसंदर्भात उस्मानाबादचे सहाय्यक आयुक्त (औषध) संजय काळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी मोघम उत्तर दिले. 'हा विषय चर्चेचा आहे', असे केवळ सांगून या विषयावर अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images