Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लक्ष्मी समृद्धीच्या पावलांनी आली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लक्ष्मी कशानं आली,

लक्ष्मी सुख-समृद्धीनं आली,

लक्ष्मी कशानं आली,

लक्ष्मी माणिक-मोत्यांनी आली,'

गणपतीच्या जल्लोषात आगमनानंतर शनिवारी घरोघरी गौरींचे आगमन झाले. लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घरोघरी लगबग सुरू होती. गौरींचे मुखवटे, दागिने, साड्या, मखर व सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी उसळली. घरोघरी सायंकाळी गौरीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपतीचे गुरुवारी आगमन झाल्यानंतर गौरी माहेरी आल्या आहेत. घरोघरी शनिवारी गौरींचे आगमन झाले. या प्रतिष्ठापनेची सजावट व पूजनासाठी महिलांची लगबग सुरू होती. कौटुंबिक कौटुंबिक परंपरेनुसार काहींनी गौरीच्या मुखवट्यांना झळाळी दिली. यंदा प्रथमच घरी गौरीचे आगमन झालेल्या कुटुंबियांनी नवीन मुखवटे खरेदी केले. गुलमंडी, औरंगपुरा व कुंभारवाडा या मुख्य बाजारपेठेत मुखवटे व सजावटीचे साहित्य खरेदी करण्यात आली. पितळी मुखवट्यांची किंमत एक हजार ते बारा हजार रुपयांपर्यंत होती. सणानिमित्त बाजारपेठेत फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. झेंडू, गुलाब, शेवंती आणि जरबेरा फुलांनी बाजारपेठ दरवळली. दरम्यान, घरोघरी विधीवत महालक्ष्मी (गौरी) प्रतिष्ठापना करण्यात आली. रविवारी गौरीचे महाप्रसाद असून सोमवारी गौरी विसर्जन आहे.

खरेदीसाठी गर्दी

महालक्ष्मी प्रतिष्ठापना व सजावट यांचे वेगळे समीकरण आहे. सोने-चांदीची नवीन मंगळसूत्रे, कमरपट्टा, बाजूबंद व इतर दागिने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. सोन्याच्या दुकानात पारंपरिक दागिन्यांचे विविध प्रकार उपलब्ध होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरवठा आजही विस्कळित

$
0
0

पाण्याच्या विहिरीत गवतामुळे समस्या

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे फारोळा जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याच्या दुरुस्तीसाठी वेळ लागल्याने गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादेत पाणी पुरवठा बंद आहे. या अतिवृष्टीमुळे जायकवाडीतील उद्भव विहिरीत गवताचे प्रमाण वाढल्याने रविवारीही पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे. ऐन सणासुदीत गेल्या चार दिवसांपासून अर्ध्या औरंगाबादचा पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यात आणखी भर पडणार आहे.

गुरूवारच्या पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने रात्री शहराकडे येणारे पाणी बंद झाले होते. परिणामी शुक्रवारी नियोजित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा झाला नाही. हा बिघाड कधी दुरूस्त झाला हे माहित नाही, पण शनिवारीही बहुतांश भागात निर्जळी होती. शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा होतो. ज्या वसाहतींत मंगळवारी पाणीपुरवठा झाला होता. तिथे शुक्रवारी पुरवठा होणे अपेक्षित होते, पण तांत्रिक अडचणीमुळे शुक्रवार व शनिवारी असे दोन दिवस म्हणजे सलग चार दिवस अर्ध्या वसाहतींमध्ये निर्जळी आहे. गणेशोत्सव सुरू असताना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यात जायकवाडीतील उद्भव विहिरीत गवत वाढल्याने ते साफ करण्याचे काम औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनीने हाती घेतले आहे. हे काम शनिवारी सुरू होते. परिणामी, शहराकडे येणारे पाणी थांबले होते. रविवारी चार ते पाच तास उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाच दिवस पाण्याविना काढावे लागत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंजना नदीच्या पुरात तरुणाचा मृतदेह

$
0
0

कन्नड : नाचनवेल शिवारात एक युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे अंजना नदीला पूर आला आहे. खुलताबाद तालुक्यातील भांडेगाव येथील युवक संजय चव्हाण (वय ३०) हा नाचनवेल येथे काही कामानिमित्त आला होता. शुक्रवारी सायंकाळी नाचनवेलहून आपल्या गावाकडे जात असताना आळंद रोडवरील अंजना नदीला आलेल्या पुरात पूल ओलांडत असताना त्याची दुचाकी घसरली आणि तो पाण्यात वाहून गेला. शनिवारी सकाळी अंजना नदीवरील केटी बंधाऱ्यामध्ये युवकाचा मृतदेह आढळून आला.

घरांचे नुकसान

तालुक्यातील पिशोर येथे पावसामुळे तीन ते चार घरांच्या भिंती पडून पुष्पाबाई विठ्ठल मोकाशे, मो. सिद्दिकी मुनिरोद्दिन, राहीबाई मोकाशे, सुभाष दवंगे, विलास मोकशे यांच्या घरांचे नुकसान झाले, तर उंबरखेड येथील अनिता संतोष बळे यांच्या घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागाची सरासरी ५०%

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गणरायाच्या आगमनासोबत आलेल्या धुवांधार पावसाने मराठवाडा विभागाची पावसाची सरासरी ५० टक्क्यांवर गेली आहे. मराठवाड्यात शनिवारी सकाळी साडेआठपर्यंत वार्षिक सरासरीच्या ५२. ८२ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. औरंगाबाद, जालना आणि हिंगोली जिल्ह्यांत अनुक्रमे ७४.४६, ६४.३६ आणि ६१.७३ टक्के पाऊस झाला. मात्र बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांची स्थिती अजूनही चिंताजनक आहे.

गुरुवारी सायंकाळपासून मराठवाड्यात यंदाच्या मोसमातील पहिला दमदार पाऊस झाला. विशेष म्हणजे हा पाऊस औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत सातत्याने बरसला. गुरूवारी रात्रभर पावसाने या पाच जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले. जूनपासून मोठ्या पावसाची प्रतीक्षा असलेल्या नागरिकांना संततधार पाहावयास मिळाली. गुरुवारी सायंकाळी सात वाजता सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दुपारी अडीचपर्यंत सुरू होता. अधूनमधून हलक्या सरींनी वातावरणातील बदल अनुभवायला मिळाला. रात्रभर पावसाचा जोर कायम होता. या पावसाने सिल्लोड, फुलंब्री, औरंगाबाद या तालुक्यांत पुरती दाणादाण उडवली. या तालुक्यांमधील सर्व नद्या दुथडी भरून वाहत होत्या. शुक्रवारी अडीचनंतर पावसाने विश्रांती घेतली. रात्री नऊ नंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. औरंगाबादसह पाच जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. या पावसाने बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांकडे मात्र पाठ फिरविली. हे तीनही जिल्हे दुष्काळाच्या गडद छायेत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी या जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीच्या साठ्यात एक टक्क्यावर वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्यात एक टक्का पाण्याची भर पडली. शनिवारी सायंकाळी सहाला प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा ५.४२ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी साडेआठपर्यंत औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, बदनापूर या चार तालुक्यांत सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली. सायंकाळी सहाला जायकवाडी प्रकल्पात सुमारे २२०० क्युसेस पाणी येत होते. त्याचवेळी नागमठाण येथून धरणाकडे २२,१०० क्युसेस पाणी येत होते.

औरंगाबादसह, नगर, नाशिक जिल्ह्यांत गुरुवारी व शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. नाथसागराच्या मुक्त पाणलोटात झालेल्या या पावसामुळे प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ होण्यास काही तासांत सुरुवात झाली. शुक्रवारी दुपारपर्यंत प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा ११४.७२० दशलक्ष घनमीटरपर्यंत (५.२८टक्के) पोचला. प्रकल्पात १०९६ क्युसेस पाणी येत होते. नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ६००० क्युसेस पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यात येत होते. शुक्रवारी सकाळी प्रकल्पातील साठा ९२.६२९ दशलक्ष घनमीटर (४.२६ टक्के) होता.

दरम्यान, शुक्रवारीही औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात ६०.९५ आणि जालना जिल्ह्यात २४.५२ मिलीमीटर पाऊस पडला. औरंगाबाद तालुक्यात ८७ मिलीमीटर, फुलंब्री १०१, सिल्लोड ६६.३८ आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यांत ८४ मिलीमीटर पाऊस पडला. औरंगाबाद, जिल्ह्यात पैठण तालुक्यात ४७, सोयगाव ३५, वैजापूर ४६, गंगापूर ४७, कन्नड ५१ आणि खुलताबाद तालुक्यात ६२ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. शनिवारी औरंगाबादेत ढगाळ वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्राचीन वस्तूंचा छडा लावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देवगिरी किल्ल्यातील वस्तूसंग्रहालयातील चोरीचा प्रकार गंभीर आहे. वस्तूंचा शोध घेण्यासाठी कडक मोहीम राबवावी. तसेच, किल्ल्याच्या आवारातील चित्रपटाचे चित्रीकरण थांबवावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केली. याबाबत वस्तूसंग्रहालयाची शनिवारी (१९ सप्टेंबर) पाहणी करून दानवे यांनी पोलिस ठाण्यात निवेदन दिले.

देवगिरी किल्ल्याच्या आवारातील वस्तूसंग्रहालयात चोरीचा प्रकार घडला. प्राचीन मौल्यवान आठ वस्तू चोरीस गेल्यामुळे इतिहासाचा महत्त्वाचा ठेवा गमावला आहे. या प्रकाराची शिवसेना व दुर्गप्रेमींच्या वतीने गंभीर दखल घेण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दुर्गप्रेमींसह शनिवारी किल्ल्याची पाहणी केली. तसेच वस्तूसंग्रहालत जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. या वेळी केंद्रीय पुरात्त्व विभागाचे डॉ. तेजस गर्गे उपस्थित होते. दरम्यान, किल्ल्यातील भारतमाता मंदिर परिसरात चिनी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रीकरणाला दिल्ली कार्यालयाने परवानगी दिली आहे. मात्र, नियम डावलून चित्रीकरण करण्यात येत आहे. चित्रीकरणासाठी अवजड वस्तू आवारात आणल्या आहेत. मोठे पंखे व जनरेटरच्या आवाजाताने भिंतींना हादरे बसत आहेत. या चित्रीकरणावर कारवाई करावी व चोरीस गेलेल्या वस्तूंचा त्वरित शोध घ्यावा, असे निवेदन दानवे यांनी दौलताबाद पोलिस ठाण्यात दिले. यावेळी फोर्ट रिस्टोअर्स ग्रुपचे दीपक शिंदे, वैभव गायकवाड यांच्यासह माजी नगरसेवक अनिल जैस्वाल, राहुल जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तनवाणी, आहुजा न्यायालयीन कोठडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहाडसिंगपुरा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी भूमाफिया राजू तनवाणी व राज आहुजाला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. व्ही. हिंगणे यांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर दोघांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे शनिवारी दोघांची रवानगी हर्सूल जेलमध्ये करण्यात आली. चार दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर तनवाणी आणि आहुजाला कोर्टासमोर हजर केले होते. पहाडसिंगपुरा येथील न्यायप्रविष्ट जमीन गोरगरिबांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने राजू तनवाणी व राज आहुजाला अटक केली आहे.

तनवाणी व आहुजाची पोलिस कोठडी संपल्याने दोघांना शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले. 'हे दोघेही तपासात सहकार्य करत नाहीत. ज्या-ज्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली, त्यांची नावे सांगण्यास आरोपी तयार नाहीत. त्यासाठी त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी द्यावी,' अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली.

राजू तनवाणीतर्फे अॅड. दिनेश गंगापूरवाला यांनी युक्तीवाद केला. 'हे प्रकरण दिवाणी स्वरुपाचे आहे. यातील सर्व कागदपत्र सेतू सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत. सरकारी अधिकाऱ्यांची यादी व नावे प्रशासनाकडे उपलब्ध असल्याने आरापींच्या अटकेची गरज नाही,' असा युक्तीवाद त्यांनी केला.

दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर कोर्टाने दोघांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आदेश दिले. त्यानंतर दोघांनी तात्काळ जामीन मिळवण्यासाठी अर्ज सादर केला. त्यावर पोलिसांनी हरकत घेतली. पोलिस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांनी सांगितले की, 'या प्रकरणात फसवणूक झालेले तक्रारदार अशिक्षित व गरीब आहेत. सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास प्रगतीपथावर आहे. आरोपी विरुद्धचे पुरावे, महत्त्वाचे दस्ताऐवज व परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. आरोपींना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांना जामीन दिला तर, ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतील. त्यामुळे पुरावे मिळण्यास अडथळे निर्माण होतील, म्हणून त्यांना जामीन देण्यात येऊ नये,' अशी बाजू पोलिसांतर्फे सरकारी पक्षाने मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात धरणसाठ्यात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या अडीच महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर जोरदार बरसलेल्या पावसामुळे राज्यातील धरणांचा पाणीसाठा वाढून ५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळी भागांत झालेल्या या पावसाने मोठा दिलासा मिळाला असून त्यामुळे पिण्याचे पाणी व चाऱ्याच्या टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, राज्यात सर्वदूर हा पाऊस झाला असला तरी धरणसाठ्याची तूट अद्याप भरून निघालेली नाही.

राज्यातील प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षी याच काळामध्ये सुमारे ७९ टक्के पाणीसाठा होता. मागील आठवड्यामध्ये या धरणांमध्ये ४८ टक्के पाणी होते. या पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील अडीच हजार मोठ्या, मध्यम व लघु धरण प्रकल्पांची प्रकल्पीय साठवण क्षमता १,३३० अब्ज घनफूट (टीएमसी) एवढी आहे. या धरणांमध्ये सद्यस्थितीत ५२ टक्के म्हणजे ६९२ टीएमसी पाणी साठले आहे. मराठवाड्यातील धरणांत फक्त आठ टक्के पाणी होते. मराठवाड्यातील दुष्काळी भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे मराठवाड्यातील धरणांचा पाणीसाठा ११ टक्क्यांवर (२८ टीएमसी) पोहोचला आहे.

मराठवाड्यातील माजलगाव, मांजरा व निम्न तेरणा ही धरणे वगळता अन्य धरणांत उपयुक्त पाणीसाठा होण्यास मदत झाली आहे. विष्णूपुरी धरणात ३६ टक्के, दुधना धरणात ४८ टक्के, साठा झाला आहे. जायकवाडी धरणामध्ये पाच टक्के उपयुक्त साठा आहे. नाशिक व अमरावती विभागातील धरणांमध्ये अनुक्रमे ५० व ६९ टक्के जलसाठा झाला आहे. नाशिकमधील दारणा धरणात ६९, गंगापूरमध्ये ६७, कडवा ८८ टक्के, भावली ९५ टक्के व पालखेड धरण ८६ टक्के भरले आहे. भंडारदरा धरणात ७२ टक्के, मुळा ४५ टक्के, निळवंडे ४३ टक्के व हातनूर धरण ५१ टक्के भरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यांवर फूटभर खड्डे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरात गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडविली. अनेक घरांत पाणी शिरून नागरिकांचे हाल झाले होते. आधीच खराब असलेल्या रस्त्यांवर या पावसामुळे अक्षरशः एकेक फूट खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव सुरू असून सणासुदीच्या काळात खड्डेमय रस्त्यातून वाट कशी काढायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

शहरात शुक्रवारी अतिवृष्टी झाली. जोरदार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. शिवारी दुपारी अडीचच्या सुमारास पाऊस थांबला. रात्री पुन्हा पावसाने हजेरी लावली. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती हा नेहमी वादाचा विषय राहिलेला आहे. व्हाइट टॉपिंग, सिमेंट रस्त्यांची कामे गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहेत. जिथे कामे संपली तिथे डागडुजी शिल्लक आहे. जोरदार पावसाने बहुतांश भागातील रस्ते उखडले आहेत. क्रांतिचौक उड्डाणपुलाखालचा भाग पुरता खराब झाला आहे. पूर्वेकडील साइड रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. स्टेट बँकेच्या समोर फूटभर खोलीचे खड्डे पडले आहेत. अशीच परिस्थिती रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची झाली आहे. शनिवारी दिवसभर वाहनधारक जीव मुठीत घेऊन हा रस्ता पार करत होते.

बाजारपेठेतील सर्वात महत्त्वाचा असलेला रंगारगल्ली रस्ताही पावसाने उखडला आहे. या रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव, महालक्ष्मीच्या सणानिमित्त खरेदीसाठी बाहेर पडलेल्या औरंगाबादकरांची खड्डेमय रस्त्यांमुळे चांगलीच तारांबळ उडाली. विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून राहिले आहे. किलेअर्क आणि सिटीचौकातील रस्त्याचीही पुरती वाट लागली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेने रस्तेदुरुस्ती, पॅचवर्क करण्याचा दावा केला होता. एकाच पावसाने हा दावा फोल ठरविला आहे. सिडकोतील रस्त्यांचीही चाळणी झाली आहे. चिश्तिया चौक ते बजरंग चौक रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून दुरुस्तीच्या बाबत लोकप्रतिनिधी, पालिका अधिकारी कुणीच गंभीर नसल्याचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे.

कामे कधी पूर्ण होणार ?

शहरातील १४ रस्ते व्हाइट टॉपिंगचे करण्यात आले. रस्ता रुंदीकरणासोबतच मजबुतीकरण झाले. रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेची सफाई मात्र अजूनही झालेली नाही. या रस्त्यावर नियम धाब्यावर बसवून गाड्या उभ्या केल्या जातात. पार्किंगचे रस्ते म्हणून आता व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यांची ओळख व्हायला लागली आहे. कंत्राटदार ही अर्धवट कामे कधी पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रोहयोद्वारे स्थलांतर रोखा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

'शेतमजुरांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे आणि मजुरीची साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात यावीत,' अशी सूचना राज्याचे जलसंधारण व रोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव प्रभाकर देशमुख यांनी केली.बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियान आणि रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा प्रधान सचिव प्रभाकर देशमुख यांनी बैठकीत घेतला. या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.ते म्हणाले, 'ऊसतोडीसाठी आणि इतर कामांसाठी स्थलांतरित होणाऱ्या लोकांची माहिती ही रोजगार हमी योजनेच्या कामांच्या नियोजनासाठी अत्यंत आवश्यक आहे. गतवर्षीच्या तुलनेने या वर्षीचे स्थलांतर कमी-अधिक असल्यास त्यानुसार कामे हाती घेण्यात यावीत. मजुरांची उपस्थिती वाढविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. दोन ऑक्टोबरच्या ग्रामसभेत चर्चा करून सर्वेक्षण कार्य हाती घेण्यात यावे. मजुरांच्या कमी उपस्थितीच्या अचूक कारणांच्या अभ्यास करण्याची गरज असून सर्वच मजुरांना स्थलांतरित होऊन हाताला काम मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे मजुरांना त्यांच्या गावाजवळच रोहयोची कामे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याची गरज आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलमुक्तीसाठी बेमुदत संपाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

संपूर्ण देशातून टोलप्लाजा हद्दपार व्हावेत या व अन्य मागण्यांसाठी 'ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट' संघटनेच्यावतीने एक ऑक्टोबरपासून देशव्यापी संप केला जाणार आहे. या संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपसिंघ शंकरसिंघ गाडीवाले यांनी एका पत्रकात ही माहिती दिली.

टोलप्लाजा आणि वाहतूक व्यवसायाला लागू असलेला टीडीएस या संदर्भात देशभरातील वाहतूकदार व्यावसायिकांमध्ये असंतोष आहे. ट्रक वाहतूकदारांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत नुकतीच एक बैठक झाली होती. त्यावेळी ट्रकमालकांच्या अनेक अडचणींच्या संदर्भात चर्चा झाली. टोलमुळे लाखो वाहनांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे इंधन आणि वेळेचे नुकसान होते. संपूर्ण देशभरात कोट्यवधी ट्रक व अन्य वाहनांच्या इंधनाचे दर वर्षी साधारणपणे एक लाख कोटीचे इंधन वाया जाते, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. भारत टोलमुक्त केला आणि सर्वच वाहतूक विनाअडथळयाची केली, तर इतक्या प्रचंड किंमतीच्या इंधनाची आणि खूप मोठ्या वेळेचीही बचत होईल.

ट्रक व्यवसायातून रोड टॅक्स, नॅशनल परमिट, प्रवेश शुल्क, ओव्हर लोडिंग, डिजेल-पेट्रोलवर प्रतिलिटर सहा रुपये सेस इतके उत्पन्न सरकारला दिले जाते. याशिवाय, टोल टॅक्सची काय गरज असा सवाल संघटनेने केला आहे. या टोलमुळे वाहतूक खर्च वाढल्याने लोकांना महागाईला सामोरे जावे लागते. म्हणून वाहतूकदारांसाठी अन्यायकारक असणारा व महागाईला कारणीभूत असणारा टोल रद्द करावा आणि अन्य मागण्यांसाठी येत्या एक ऑक्टोबरपासून बेमुदत देशव्यापी संप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा राहून घरात चोरी

$
0
0

६३ हजारांचा मुद्देमाल हडपला; ८ जणांना कोठडी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडकोतील विकलेल्या घरात बेकायदा राहून ६३ हजारांचा मुद्देमाल चोरणाऱ्या आठ आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी बुधवारपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे घर ज्याला विकले आहे, त्या खरेदीदाराच्या पुतण्यालाच मारहाण करून हाकलून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या संदर्भात चंद्रकांत मारोतराव जोशी (वय ४७, रा. कासलीवाल पूर्व, एअरपोर्टसमोर) यांनी आरोपी सुधीर मोकळे (२६, रा. त्रिवेणीनगर, सिडको), संदीप आढाव (३३, रा. मिलिंदनगर, उस्मानपुरा), सनू माधवन (२७, रा. त्रिवेणीनगर), अमोल दाभाडे (२२, रा. आंबेडकरनगर), किरण दाभाडे (१९, रा. त्रिवेणीनगर), अजय घुसळे (२८, रा. गौतमनर), सतीश शिंदे (३०, जयभीमनगर), सागर खिल्लारे (१९, रा. आंबेडकरनगर) यांच्याविरुद्ध शनिवारी (१९ सप्टेंबर) सिडको पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, १ जानेवारी २०१५ रोजी फिर्यादीने पी. के. जोसेफ (रा. एन-७, सिडको) याच्या मालकीचे जी, ३/३५, एन-७, सिडको हे घर ९० लाख रुपयांना खरेदी करण्यासाठी पहिला करारनामा इसारपावती केली. या खरेदीपोटी फिर्यादीने १६,११,००० रुपये रोख व प्रत्येकी ५ लाखांचे दोन धनादेश असे २६,११००० रुपये १ जानेवारी १५ रोजी साक्षीदारांसमक्ष देऊन नोटरी करून घेतली. त्यानंतर २२ मे २०१५ रोजी ३३,९०,१११ रुपये रोख व धनादेशद्वारे देऊन दुसरी इसारपावती करून घेतली. जोसेफ याने ठरल्याप्रमाणे ४ सप्टेंबर २०१५ रोजी घराचा ताबा दिला.

त्यानंतर फिर्यादीचा पुतण्या मयूर सुभाष जोशी घरात राहू लागला. १५ सप्टेंबर २०१५ रोजी जोसेफ हा वरील ८ आरोपींसह आला व त्याने फिर्यादीच्या पुतण्याला शिवीगाळ करून बळजबरीने घरातून काढून मारहाण केली व घराबाहेर हाकलून दिले. त्याचे ६०,००० रुपये रोख, मार्कशीट व कपड्यांची बॅग (अंदाजे ३००० रुपये) असा एकूण ६३००० रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. पोलिस तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली. त्यांना कोर्टात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी बुधवारपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मुख्य आरोपी फरार

यातील प्रमुख आरोपी जोसेफ फरार असून वरील आरोपी जोसेफबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. फिर्यादीवरून पोलिसांनी ८ आरोपींना अटक करून कोर्टात हजर केले. कोर्टाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवकालीन भांड्यांची चोरी

$
0
0

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील शिवकालीन भांड्यांची चोरी झाल्याची बाब नुकतीच निदर्शनास आली आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी प्रशान्त नारनवरे यांनी दिले आहेत.

यापूर्वीही देवस्थानातील दानपेटीतील रक्कम, देवीला अर्पण केलेल्या साड्यांची चोरी अशा घटना घडल्या आहेत. ही बाब १३ सप्टेंबर रोजी निदर्शनास आली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज; तसेच त्यांच्या अगोदरही अनेक मान्यवर महाराजांनी, संस्थानिकांनी दिलेल्या मौल्यवान भांड्याचा समावेश आहे. आनंदीबाई पेशव्यांनी दिलेल्या वस्तूचाही यात समावेश आहे. तुळजाभवानी देवस्थानाकडे अशी मौल्यवान २५० भांडी होती. त्यापैकी किती भांडी चोरीला गेली याबाबत मंदिर प्रशासन अद्यापही अनभिज्ञ आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. याप्रकरणात हलगर्जीपणा दाखविणाऱ्या विरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा मृत्यू; तिघांना अटक

$
0
0

जालनाः महिलेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून बदनापूर येथे महिलेच्या सासरकडील तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पैसे देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला होता.

जयपूर (ता. औरंगाबाद) येथील दामोदर मते यांची मुलगी सगुना हिचा धोपटेश्वर (ता. बदनापूर) गावात एकनाथ दाभाडे यांच्याशी विवाह झाला. सगुना १६ सप्टेंबर रोजी घरातून गायब झाल्याची तक्रार तिच्या सासरच्या मंडळींनी गुरुवारी बदनापूर पोलिस ठाण्यात दिली. शनिवारी सकाळी सगुनाचा मृतदेह धोपटेश्वर ते देवगाव रस्त्यावरील एका विहिरीत सापडले. सगुनाचा तिच्या सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे.

दरम्यान, पोलिसांनीदेखील तक्रार दाखल न करता प्रकरण दडपून टाकण्यासाठी प्रयत्न केल्याचे सगुनाच्या माहेरकडील नातेवाईकांनी म्हटले आहे. गुन्हा दाखल केल्याशिवाय सगुनावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर शनिवारी रात्री उशिरा यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आणि सगुनाचा नवरा, सासू, सासरा यांना अटक करण्यात आली. या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू, असे जालन्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पित्याची दोन मुलांसह आत्महत्या

$
0
0

नैराश्यातून केले कृत्य; मुलगी बचावली

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

बेरोजगारी आणि कुटंबातील वारंवार खटके यामुळे नैराश्य येऊन पित्याने स्वतःच्या तीन लहान मुलांना विहिरीत फेकले आणि नंतर स्वःही विहिरीत उडी घेतली. यात दोन मुलांसह पित्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर मोठी मुलगी बचावली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मौजे कडोळी येथील शिवारात शनिवारी दुपारी ही घटना घटना घडली.

कडोळी येथील महेंद्र बळीराम गुडदे (वय २८) याचा नेहमीच पत्नी प्रतिज्ञाबरोबर वाद व्हायचा. नेहमीप्रमाणे प्रतिज्ञा गुडदे शनिवारी शेतामध्ये शेळी घेऊन गेल्या होत्या. त्यावेळी महेंद्र शेतात गेला आणि तिच्याजवळचा मोबाईल मागितला. त्यावेळी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. महेंद्रने शनिवारी दुपारनंतर घरी येऊन घरातील मोठी मुलगी आरती (७) आणि मुलगा राजरत्न ऊर्फ भैय्या (६) आणि लहान मुलगा जय (४) यांना आजीकडे जायचे आहे, असे सांगून गोरेगावच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. शिवारातील रस्त्यालगतच्या विहिरीत महेंद्रने आपली मुलगी आणि दोन मुलांना फेकून दिले आणि त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेत मोठी मुलगी विहिरीतील पाइपजवळ पडल्याने बचावली. मात्र, महेंद्र आणि त्याची दोन मुले बुडून मृत्युमुखी पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

दुष्काळामुळे आवळलेला फास रोजगारासाठी स्थलांतर करूनही न सुटल्यामुळे बोरी (ता. उमरगा) येथील २२ वर्षांचा तरूण शेतकरी सचिन बाळू इंगळे याने १७ सप्टेंबर रोजी पुणे येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई व बहीण आहे. वडील गेल्या आठ वर्षांपासून बेपत्ता आहेत. २०१५मधील उस्मानाबाद जिल्ह्यातील ही १११वी आत्महत्या आहे.

दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या सचिनकडे अडीच एकर कोरडवाहू जमीन होती. वडील आठ वर्षांपासून घर सोडून गेल्यामुळे आई व बहिणीचा सांभाळ करण्याची जबाबदारी सचिनवर होती. त्याच्या आजोबांनी नाईचाकूर (ता. उमरगा) येथील 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या शाखेतून ९४ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड करणेही त्याला शक्य नव्हते. नापिकी, कर्जबाजारीपणा, दुष्काळांमुळे तो वैतागून गेला होता. कुटुंबाचे पालन पोषण करीत उदर निर्वाह करणे शक्य नसल्याने रोजगारासाठी तो पुणे येथे गेला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ लाखांचा गुटखा उस्मानाबादेत जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद शहरातील गजबजलेल्या भागातील नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्समधील 'सानिया ट्रेडर्स' या दुकानातून सुमारे आठ लाखांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रियांका भगत (नारनवरे) यांच्या नेतृतवाखाली शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यापूर्वीही या दुकानावर दोनदा कारवाई झालेली आहे. या प्रकरणी शेख मुन्ना शेख पाशासह दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उस्मानाबाद शहरात गुटखाविक्री बिनधास्तपणे व अवैध होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी भगत यांनी आधारे तातडीने कारवाई करून सुमारे आठ लाखांचा गुटखा जप्त केला. राज्यात गुटखाबंदी लागू केल्यानंतर निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिस यंत्रणेकडे नव्हे, तर अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाकडे सोपवल‌ी. परंतु, अपुरा कर्मचारी वर्ग, वाहन व्यवस्थेचा अभाव शिवाय व्यापारी वर्गाबरोबरचे अर्थपूर्ण हितसंबंधांमुळे गुटखा विक्रीवर म्हणावी तशी बंदी आलेली नसल्याचे चित्र आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात खेड्यापाड्यात शिवाय तांड्यावरसुद्धा गुटखा चढ्या दराने सर्रास विकला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुटखा जप्ती कारवाई प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचे अधिकार पोलिसांना नसल्यामुळे या प्रकरणी गुन्हा सोमवारी दाखल होईल. उस्मानाबाद येथील अन्न व औषध प्रशासनातील बहुतांश अधिकारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास नसतात. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांचे सोमवारी उस्मानाबादेत आगमन झाल्यानंतरच या प्रकरणी गुन्हा दाखल होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसमृद्धी बंधाऱ्यांत १५ कोटी लिटर पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

तालुक्यात गुरुवार व शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे जलयुक्त शिवार अभियानातून केलेल्या २६ सिमेंट बंधाऱ्यांमध्ये तब्बल १५ कोटी ४० लाख लिटर (१५४.८० सहस्त्र घनमीटर) पाणीसाठा झाला आहे. ताजनापूर येथील बोडखी नदी व वेरूळ येथील येळगंगा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केल्याने तेथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

तालुक्यात २८ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य आहे. गावाच्या शिवारातील पाणी गावातच साठवण्याच्या प्रयोगाला यश येत असल्याचे दिसत आहे. लघुसिंचन व कृषी विभागामार्फत झालेल्या या कामांतील जलसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. शिवाय रब्बी हंगामातील कृषी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे ममनापूर, भडजी, गदाना, गोळेगाव, खांडी पिंपळगाव ही पाच गावे कायमस्वरूपी टंचाईमुक्त होण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये सिमेंट बंधाऱ्यांच्या कामाला सुरुवात झाली व सप्टेंबरमध्ये त्यात पाणी साठल्याचे दिसून आले. ताजनापूर शिवारात सिमेंट नालाबांध तसेच बोडखी नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम झाल्याने या परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गावाच्या परिसरात तीन सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवले गेल्याने बाजारसावंगी परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीची तयारी सुरू केली आहे. ' पाण्याचा थेंब आपण निर्माण करू शकत नाही. पण पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवला जाऊ शकतो. हा कार्यक्रम लाभदायी आहे,' असे किशोर नलावडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडिलांनी हडपली मृत मुलाची मालमत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या नावावरील मालमत्ता वारसा हक्काने पत्नी व मुलांच्या नावावर होते. परंतु, त्यांचा हक्क डावलून निधन झालेल्या एक व्यक्तीच्या आई, वडील व भावाने स्वतःच्या नावावर मालमत्ता करून घेतल्याचा प्रकार कन्नड तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आई, वडील, भाऊ व त्यांना मदत करणाऱ्या उपसरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

वैष्णवी बद्रीनाथ तायडे (रा. कन्नड, ह. मु. लासूरस्टेशन ता.गंगापूर) यांनी ही फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार सोपान शेकू तायडे (रा. शिवाजीनगर, ब्राह्मणगल्ली, कन्नड), मीराबाई सोपान तायडे, पुरुषोत्तम सोपान तायडे, रवींद्र विश्वनाथ राठोड (उपसरपंच नरसिंगपूर रिठ्ठी मोहडा) यांच्या विरुद्ध संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा कन्नड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. बद्रीनाथ तायडे यांचे ४ एप्रिल २०१५ रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी वैष्णवी तायडे तीन महिन्याच्या मुलीला घेऊन माहेरी वडिलांकड राहत होत्या. त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन या चौघांनी २१ मे रोजी बद्रीनाथा तायडे यांच्या नावाचे बनावट प्रतिज्ञापत्र बनवून घेतले. त्याद्वारे आई, वडील व भावाने वारस म्हणून नोंद केली, असा आरोप आहे. वैष्णवी तायडे यांना ही बाब ७ आगस्ट रोजी ग्रामसेविका श्रीमती नन्नावरे यांच्याकडे विचारणा केली असता समजल्यानंतर मानसिक धक्का बसला. त्यांनी सासू, सासरे व दिराकडे विचारणा केली असता 'काय करायचे ते कर, तुला गुंड लावून जिवंत जाळून टाकू,' अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक रोहित बेंबरे हे करत आहेत.

तेराव्या दिवशीच अर्ज

वडिलाने ३२ वर्षीच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला असताना व २५ वर्षाची पत्नी, तीन महिन्याची नात असताना १३ व्या दिवशीच नाव बदल करण्याकरिता ग्रामपंचायत कार्यालयाला अर्ज दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रब्बीची पिके तरारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रब्बी हंगामासाठी पुरेशा पावसाची चिंता असलेल्या बळीराजाला पावसाने दिलासा दिला. हा मान्सूनपूर्व परतीचा पाऊस शेतीसाठी फायदेशीर ठरला आहे. दमदार पाऊस झाल्याने वाफसा येताच पेरणी करण्याचा शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पीक वाया गेले. पाणी व चारा टंचाई या समस्याही समोर उभ्या राहिल्या. किमान रब्बी हंगाम हाती लागावा म्हणून शेतकरी चिंताग्रस्त होते. परतीच्या पावसावरच रब्बीचे भवितव्य अवलंबून होते. या पावसापूर्वीच मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने रब्बी हंगामाला फायदा होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत रब्बीची पेरणी सुरू होईल.

औरंगाबाद व जालना जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. हा पाऊस रब्बीसाठी अनुकूल आहे. वाफसा आल्यानंतर पेरणी करता येईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.

यंदा जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र रिकामे असल्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात तब्बल ७५ हजार हेक्टर वाढ अपेक्षित आहे. सर्व तालुक्यात जोरदार सरी कोसळल्याने पेरणीयोग्य वातावरण तयार झाले आहे. बहुतेक ठिकाणी ५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. खरीप पिकांची उत्पादकता घटली असली तरी रब्बी पीक जोमदार येण्याची शक्यता आहे.

फळबागांना जीवदान

औरंगाबाद, जालना जिल्ह्यात फळबागांचे मोठे क्षेत्र आहे. मोसंबी, डाळिंब ही मुख्य फळपिके आहेत. पाण्याअभावी अनेक ठिकाणी फळबागा जळण्यास सुरुवात झाली होती. शेततळी कोरडी पडल्याने ऐन उन्हाळ्यात बागा कशा जगणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. दमदार पावसाने फळबागांना जीवदान मिळाले आहे.

पाणी पातळी वाढली

रब्बी क्षेत्रः २ लाख ६६ हजार हेक्टर असते.

यंदा रब्बी क्षेत्र ३ लाख २५ हजार हेक्टर अपेक्षित.

हरभरा व ज्वारी या मुख्य पिकांची लागवड वाढणार.

विहिरी, कूपनलिकांचे पाणी वाढल्याने गव्हाचे क्षेत्र वाढेल.

हा पाऊस सातत्याने चार-पाच दिवस सुरू राहिल्यास अधिक सुसह्य स्थिती निर्माण होईल. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात पाऊस असला तरी बीड जिल्ह्यात कमी प्रमाण आहे. वाफसा आल्यानंतर रब्बीची पेरणी सुरू होईल.

- पी. डी. लोणारे, विभागीय कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images