Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पत्नीचा खून; पतीला जन्मठेप

$
0
0

वैजापूर : गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील रहिवासी संदीप हरिभाऊ चव्हाण याला पत्नीस जाळून मारल्याच्या आरोपावरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. ए. कोठेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

संगीता संदीप चव्हाण (वय २०) यांच्या ८ एप्रिल २०१३ रोजी मृत्यू झाला होता. घटनेच्या दोन वर्षांपूर्वी संगीता यांचे संदिपसोबत लग्न झाले होते. संदीप खासगी कंपनीत काम करत होता. तो बाहेरख्याली असल्याने पती पत्नीमध्ये वारंवार खटके उडत असत. एका महिलेसोबत ३० मार्च रोजी रात्री बाराच्या सुमारास मोबाइल फोनवरून संभाषण केल्याचा संगीताने जाब विचारल्याने संदीपला राग आला. त्याने त्यांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना संगीता यांचा मृत्यू झाला. सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी ११ साक्षीदार तपासले. यात नायब तहसीलदार संजय गायधनी, डॉ. रामानुज काबरा, आप्पासाहेब मखरे यांची साक्ष महत्वाची ठरली. खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने संदीप चव्हाण यास जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरा डेपो नकोच

$
0
0

म.टा.प्रतिनिधी वाळूज

तिसगाव परिसरातील खवडा डोंगर परिसरात कचरा डेपो सुरू करण्याचा मानस खासदार चंद्रकांत खैरे यांनी बोलून दाखवला आहे. त्याला गावकऱ्यांनी तीव्र विरोध करून आंदोलनाचा पवित्रा घेतला. दरम्यान, माजी सरपंच संजय जाधव यांनी खासदारांविरुद्ध मुंडण करून निषेध व्यक्त केला.

औरंगाबाद शहरातील घनकचऱ्याचा डेपो तिसगाव येथे करण्याचा प्रयत्न आहे. सरपंच अंजन साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावकऱ्यांनी घेतलेल्या मंगळवारी घेतलेल्या बैठकीत ठाम विरोध केला. ही बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झाली. खवडा डोंगर परिसरात कचरा डेपो करण्याचा मानस खासदार चंद्रकांत खैरे यांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे हा विषय पेटला आहे. 'शहरापासून काही अंतरावर असलेल्या तिसगावाच्या विकासाचा मार्ग कधी खासदारांना सापडला नाही, मात्र शहरातील घनकचरा टाकण्यासाठी ठिकाण सापडले. गावकऱ्यांचा कडवा विरोध असून, देखील कचराडेपो तेथेच होणार असा हुकूम सोडणाऱ्या खासदारांचा मुंडण करून निषेध करतो,' अशी भूमिका मांडत माजी सरपंच संजय जाधव यांनी मुंडण केले.

'कचरा डेपो होणे हा काही गावाचा विकास नाही. कचरा डेपोमुळे परिसरातील जमिनीचे भाव कमी होतील. शिवाय रोगराईचाही त्रास होणार आहे. त्याच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करू,' अशी भूमिका सरपंच अंजन साळवे यांनी मांडली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामचंद्र कसुरे, माजी सरपंच मिठठूलाल तरैय्यावाले, ग्रामपंचायत तारासिंग तरैय्यावाले, विजय साळे, दशरथ महापुरे, मोहन चौधरी, फकीरचंद दाभाडे, किशोर साळे, गौतम मोरे, भूषम साळवे, सुनील जाधव, अनिल जाधव, साजापूर करोडीचे उपसरपंच भारत दळे, रामसिंग सलामपुरे, सुगंध दाभाडे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.

आंदोलनाचा इशारा

कचरा डेपोप्रश्नी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध बैठक व आंदोलन होणार असल्याची कुणकुण लागल्यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख बप्पा दळवी बैठकीच्या ठिकाणी हजर झाले होते. तेव्हा नागरिकांनी आमचा प्रश्न पक्षाच्या नेत्यांकडे मांडा, असे त्यांना सुनावले. खासदार खैरे यांची गुरुवारी भेट घेऊन हा विषय सांगू, असे दळवी यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑटो क्लस्टरसाठी मिळाले पाच कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा अाॅटो क्लस्टरच्या तिसऱ्या व अंतिम टप्प्याच्या पूर्णत्वासाठी राज्य सरकारकडून पाच कोटींचे बिनव्याजी कर्ज मंगळवारी प्राप्त झाले. मुंबईत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्यमंत्री प्रवीण पोटे, सहसंचालक अपूर्व चंद्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत धनादेश दिल्याची माहिती क्लस्टरचे अध्यक्ष राम भोगले यांनी पत्रकारांना दिली.

'केंद्र सरकार, राज्य सरकार आणि उद्योजक यांच्या भागिदारीतून ८२ कोटींचा हा प्रकल्प वाळूज एमआयडीसीमध्ये उभारला आहे. पहिल्या टप्प्यात प्रोटोटाइप यंत्रणा कार्यान्वित झाली. दुसऱ्या टप्प्यात सेंटर ऑफ एक्सलन्स उभारले गेले. चार जुलै रोजी त्याचे लोकार्पण झाले होते. या कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केल्यानुसार त्यांनी पाच कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचे जाहीर केले होते. पण राज्याच्या अर्थ खात्यासमोर यासंदर्भात तांत्रिक अडचणी होत्या. केंद्राने मदत केलेल्या योजनेसाठी कर्ज देण्याची तरतूद कुठे नव्हती. अजित पवार अर्थमंत्री असल्यापासून मंजूर असलेली रक्कम मिळत नव्हती. दिल्लीतील उद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांनी मार्ग शोधून काढला. नाहरकतीनंतर राज्य सरकारने चेक प्रदान केला. यामुळे आपला तिसरा टप्पा लवकरच सुरू होईल. चार महिन्यांत हे काम संपेल. केंद्राकडून पाच कोटी ८० लाख, राज्य सरकारकडून ८० लाखांचे अनुदान तर उद्योजकांकडून पाच कोटी रुपये जमा करण्यात येतील. पहिल्या दोन टप्प्यांत उद्योजकांनी आपला शेअर दिल्यानंतर त्यांना प्राप्तिकर खात्याकडून नोटिसा आल्या होत्या. त्यामुळे गुंतवणुकीची इच्छा असूनही उद्योजक पुढे येत नव्हते. आता राज्य सरकारच्या मदतीनंतर हा मार्ग सुकर होणार आहे. आमदार अतुल सावे आणि प्रशांत बंब यांची राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी मदत झाली,' असे भोगले यांनी सांगितले. याप्रसंगी उमेश दाशरथी, मिलिंद कंक, मुकुंद कुलकर्णी, अजित मुळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंक रोडवरच्या खड्ड्यांना मलमपट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणीतील वाहतूक कोंडी टाळून नगर, वाळूजकडे जाण्यासाठी पर्याय उपलब्ध झालेल्या वाळूज लिंक रोडवर वर्षभरातच खड्डे पडले आहेत. जून महिन्यात झालेला पाऊस आणि त्यानंतर गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीने मोठे खड्डे पडले होते. हे खड्डे माती, खडी, मुरूमाने (वेटमिक्स तंत्रज्ञान) बुजविण्यात आले. मात्र, त्यामुळे त्रास आणखी वाढणार आहे. कारण एखादा पाऊस आला किंवा वाहतूक वाढली तर ही माती उडून जाऊन पुन्हा खड्डे उघडे पडणार आहेत.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या औरंगाबाद एकात्मिक रस्ते विकास योजनेतून ए. एस. क्लब ते पैठण रोड असा ४.४ किलोमीटरचा लिंक रोड मंजूर करण्यात आला होता. जमीन संपादित करण्यास अडचणी आल्याने रस्त्याचे काम लांबले होते. अखेरीस तिढा सुटला आणि रस्ता तयार झाला. ३८ कोटींचे हे काम इगल इन्फ्रास्ट्रक्चर्स यांनी केले. नियमानुसार रस्ता केल्यानंतर विहित मुदतीपर्यंतची डागडुजी संबंधित कंत्राटदाराला करून द्यावी लागते. २०१४ मध्ये हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला होता. वर्षभरातच या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले.

बाबा पेट्रोलपंप चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. पुढे छावणीत सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळून लिंक रोडवरून वाळूजला जाणाऱ्या गर्दीत मोठी वाढ झाली होती. मात्र, या रस्त्यावरून जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने खड्ड्यांचे प्रमाण वाढले. त्यात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाची भर पडली. खड्डे तात्पुरत्या स्वरुपात बुजविण्यासाठी जीएसबी तंत्राचा वापर केला गेला. त्यात खडी आणि मुरूम टाकून दबाई करण्यात आली. दीर्घकालीन उपाययोजनेसाठी हे अडचणीचे आहे. कारण यावरून मोठे वाहन गेले तर, माती उडून जाते आणि पाऊस आला तर वाहून जाते. तात्पुरत्या मलमपट्टीपेक्षा कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

लिंक रोडचे खड्डे बुजविण्यासाठी वेटमिक्स तंत्राचा अवलंब केला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी खड्डे बुजविले आहेत. डांबरीकरण सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत सगळे खड्डे बुजविण्यात येतील.

- उदय भरडे, उपअभियंता, एमएसआरडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅग पळवणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

औरंगाबादः बॅग पळवण्याचे गुन्हे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सिडको पोलिसांनी जळगाव पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. सिडको बसस्टँड येथून ३० जुलै रोजी ट्रॅव्हल्सचालकाची तीन लाखांची बॅग पळवल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.

विश्वनाथ स्वामी हा औरंगाबाद - माजलगाव या खासगी मिनीबसचा चालक आहे. ३० जुलै रोजी त्याच्या अंगावर घाण पडल्याचे सांगत त्याची तीन लाखांची बॅग दोन भामट्यांनी पळवली होती. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने बॅग लंपास करताना जळगाव शहर पोलिसांनी दोन परप्रांतीय आरोपींना अटक केली. सुनिल शेट्टी व मदन शेट्टी अशी या आरोपींची नाव असून, ते आंध्र प्रदेशातील रहिवासी आहेत. या आरोपींना सिडको पोलिसांनी जळगाव पोलिसांच्या ताब्यातून कोर्टाच्या आदेशाने हस्तांतरित करून घेतले आहे. या आरोपींवर बीड व परळी येथेही बॅग पळवल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्यांना मंगळवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासमोर हजर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम कार्ड तपासणीच्या बहाण्याने ऑनलाइन गंडा

$
0
0

औरंगाबाद : एटीएम कार्डचे व्हेरिफिकेशन करण्याची थाप मारीत टेलिफिशिंग अॅटॅकरने तरुणाला ऑनलाइन २१ हजार रुपयांचा गंडा घातला. लेबर कॉलनी भागात ६ जुलै रोजी हा प्रकार घडला असून, सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षनगर भागातील शेख महंमद हुसेन शेख या तरुणाला ६ जुलै रोजी अनोळखी मोबाइलवरून फोन आला. समोरील भामट्याने मुंबईच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून बोलत असल्याची थाप मारली. तुमच्या एटीएम कार्डचे व्हेरिफिकेशन करायचे आहे, असे सांगत कार्डवरील सोळा अंकी व सात अंकी क्रमांक विचारून घेतला. ही माहिती दिल्यानंतर काही वेळातच महंमदच्या खात्यातून २१ हजार ४४७ रुपयाची रक्कम काढून घेण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महंमद याने पोलिस ठाणे गाठून अज्ञात आरोपविरूद्ध गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी नऊ संशयित ताब्यात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोलवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी चोवीस तास उलटले तरी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. नऊ संशयितांना गुन्हेशाखा व छावणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. मंगळवारी पुन्हा पोलिसांच्या फौजफाट्याने घटनास्थळी भेट देत पुरावे शोधले. दरम्यान, तरुण-तरुणींनी निर्जन स्थळी जाणे टाळावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे.

गोलवाडी येथील मैदानाजवळ सोमवारी रात्री १६ वर्षाच्या मुलीवर तीन नराधमांनी सामुहिक बलात्कार केला. तिच्या मित्राला मारहाण करून हाकलून देण्यात आले होते. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात मध्यरात्री एक वाजता मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा रात्रीपासून शोध सुरू करण्यात आला आहे. साजापूर, तिसगाव, पडेगाव, मिटमिटा, गोलवाडी, दौलताबाद, पंढरपूर आदी परिसर पोलिसांनी ‌पिंजून काढला आहे. मुलीने दिलेल्या आरोपीच्या वर्णनावरून संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. सकाळी गुन्हेशाखा व चार्लीच्या जवानांनी घटनास्थळ गाठून पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली. छावणी पोलिसांनी चार तर गुन्हेशाखेने पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. आरोपी अद्याप पकडण्यात आलेले नसल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुंदरवाडी प्रकरणाचीच गोलवाडीत पुनरावृत्ती घडली आहे. तरुण तरुणींनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. निर्जन ठिकाणी जाणे टाळल्यास पुन्हा पुन्हा अशा घटना घडणार नाहीत.

पोलिस आयुक्त, अमितेशकुमार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांच्या’ चेहऱ्यावर हास्य फुलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकदा चोरी झालेली वस्तू परत मिळणे दुरापास्तच, पण मंगळवारी शहरातील ६४ नागरिक खरोखर भाग्यवंत ठरले. आपले सौभाग्य लेणे परत मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावरील दिसलेला आनंद शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचा होता तर मोठ्या कष्टाने घेतलेली दुचाकी अचानक परत मिळाल्याचा आनंदही असाच होता.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील ६४ नागरिकांना त्यांचा चोरीस गेलेला मुद्देमाल एका विशेष कार्यक्रमात परत केला. त्यावेळी काहींच्या डोळ्यात आनंदाश्रूही तरळले. विविध गुन्ह्यात पकडलेल्या आरोपींकडून त्यांच्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात येतो. कोर्टाच्या आदेशाने हा मुद्देमाल सबंधित तक्रारदाराला परत करण्यात येतो, मात्र आपला ऐवज कधी परत मिळेल याची तक्रारदाराला शाश्वती नसते. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी यासाठी विशेष मोहीम राबविली. त्याअंतर्गत ६४ तक्रारदारांचा मुद्देमाल त्यांना सुपूर्द करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. या ऐवजामध्ये दुचाकी, लॅपटॉप, मोबाइल, मंगळसूत्रांसह रोख रकमेचा समावेश होता. अलंकार हॉल येथे एका कार्यक्रमात त्यांना वस्तू परत करण्यात आल्या. चोरीस गेलेली वस्तू मिळाल्यामुळे नागरिकांना समाधान वाटले. पोलिसांवर विश्वास असल्यामुळे हे घडले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

सौभाग्यलेणे पुन्हा मिळाले

एका वर्षापूर्वी रोपळेकर चौकातून कौशल्या पांढरे यांचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळविले होते. एकदा पळवलेले मंगळसूत्र परत मिळण्याची शक्यता कमी वाटत होती, मात्र पोलिसांमुळेच सौभाग्यलेणे पुन्हा मिळाले, अशी प्रतिक्रिया कौशल्या पांढरे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


PI कदम यांची ACB कडून २ तास चौकशी

$
0
0

अंगरक्षकाने लाच घेतल्याचे प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांची मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कसून चौकशी केली. कदम यांचा अंगरक्षक संदीप सोळुंके याला शनिवारी कदम यांच्या केबिनमध्ये पाच हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दुपारी साडेचारच्या सुमारास कदम यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांची दोन तास चौकशी करण्यात आली. यामध्ये संदीप सोळुंके त्यांच्याकडे किती दिवसापासून अंगरक्षक म्हणून काम करतो, त्याचे नेमके काम काय आहे, त्याच्याजवळ असलेल्या रकमेबाबत काही माहिती आहे का, त्यांच्याजवळ असलेल्या पावती पुस्तकावरून त्या दिवशी दंडाची किती रक्कम जमा झाली, तीस हजारांची अतिरिक्त रक्कम कोठून आली आदी प्रश्नांचा भडिमार करून कदम यांचा जवाब नोंदविण्यात आला. शनिवारी पोलिस निरीक्षक कदम यांचा अंगरक्षक संदीप सोळुंके हा सायंकाळी त्यांच्यासोबत कॅनाट प्लेस येथे बंदोबस्तावर होता. त्याला एक फोन आल्याने तो वाहतूक शाखेच्या कार्यालयात गेला. या ठिकाणी त्याला ट्रक चालकाकडून पाच हजारांची लाच घेताना अटक झाली. त्याच्या जवळ तीस हजारांची अतिरिक्त

रक्कम सापडली.

याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कदम यांना सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, बंदोबस्तावर असल्याचे सांगत त्यांनी हजेरी लावली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुधारित डीपी २० दिवसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शहराचा सुधारित विकास आराखडा येत्या वीस दिवसांत महापालिकेला सादर केला जाईल,' असे आश्वासन राज्य शासनाच्या नगरविकास खात्याचे सचिव नितीन करीर यांनी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळाने मंगळवारी करीर यांची मुंबईत भेट घेतली.

सुधारित विकास आराखडा तयार करण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे, पण ते पूर्ण होण्यास मुहूर्त लागलेला नाही. आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाने पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध करून दिला नाही, त्यामुळे प्रभारी अधिकाऱ्याच्या भरवशावर आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते. सध्या हे काम सोलापूर येथील नगरविकास खात्याच्या उपसंचालकाकडे प्रभारी पद्धतीने दिले आहे. औरंगाबादचा स्मार्ट सिटी अभियानात समावेश झाल्यामुळे विकास आराखडा तयार असणे गरजेचे आहे. आराखडा तयार नसेल तर, स्मार्ट सिटी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात नंबर लागणे अवघड आहे. ही बाब लक्षात घेऊन गेल्या महिन्यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

बैठकीला नितीन करीर यांच्यासह पालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक डी. पी. कुलकर्णी आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. एक महिन्यात विकास आराखडा तयार करून तो महापालिकेला सादर करण्याचे या बैठकीत ठरले होते. मंगळवारी भाजप आमदार अतुल सावे, नारायण कुचे, उपमहापौर प्रमोद राठोड, माजी महापौर डॉ. भागवत कराड, भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडमोडे, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात यांनी नितीन करीर यांची भेट घेतली आणि विकास आराखड्याच्या संदर्भात चौकशी केली. 'तेव्हा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वीस दिवसात संपूर्ण आराखडा तयार करून तो महापालिकेकडे दिला जाईल,' असे आश्वासन करीर यांनी दिले, अशी माहिती उपमहापौर प्रमोद राठोड यांनी दिली.

अशी असेल पुढची प्रक्रिया

महापालिकेला सुधारित विकास आराखडा सादर झाल्यानंतर तो सर्वसाधारण सभेत मांडला जाईल. सभेने मान्यता दिल्यानंतर सुधारित विकास आराखड्यासंदर्भात सूचना हरकती मागवल्या जातील. आलेल्या सूचना-हरकतींची सुनावणी घेऊन त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी आराखडा शासनाकडे पाठवला जाईल. या संपूर्ण प्रक्रियेला सहा महिने लागतील.

आराखड्याचा प्रवास

१९७५ - नगरपालिकेच्या काळात पहिला विकास आराखडा

१९९१ - वाढीव हद्दीसह विकास आराखडा तयार केला

२०११ - वाढीव हद्दीचा विकास आराखडा सुधारणेसह

तयार करण्याचे अपेक्षित वर्ष

२०१५ - अद्याप सुधारित विकास आराखडा तयार नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचा संप

$
0
0

औरंगाबादः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांचा बेमुदत संप मंगळवारीही सुरू होता. अंतर्वासीय निर्वाहभत्ता वाढवून द्यावा, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मासिकभत्ता लागू करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांनी २१ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. सध्या निर्वाहभत्ता २,८५० रुपये असून, तो इतर राज्यांच्या बरोबरीने म्हणजेच १२००० ते १४००० रुपयांपर्यंत असावा. त्याचवेळी इतर राज्यातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मासिक भत्ता देण्यात येतो; परंतु तो आपल्या राज्यात दिला जात नाही. हा मासिक भत्ता १५,००० रुपये द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय विद्यार्थी संघटनेने विद्यापीठाकडे वारंवार केली आहे. मात्र, विद्यापीठाने दखल न घेतल्यामुळे संप सुरू केल्याचे संघटनेने म्हटले आहे. राज्यामध्ये नागपूर, परभणी, मुंबई, शिरवळ, उदगीर व अकोला येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १,२०० पेक्षा जास्त पशुवैद्यकीय विद्यार्थी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डी क्लास’चा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चकचकीत, स्वच्छ सर्व सुविधांनी युक्त मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रेल्वे स्टेशनचा दर्जा ई वरून डी क्लास करण्यात आला. मात्र, येथील सुविधा वाढविण्यात आल्या नव्हत्या. आता विविध कामांसाठी ७० लाखांचा प्रस्ताव नांदेड रेल्वे विभागाकडे पाठविण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत हे काम मार्गी लागेल.

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. इथे सध्या रोज १२ पॅसेंजर गाड्या थांबतात. दररोज जवळपास अडीच ते तीन हजार प्रवासी स्टेशनवरून प्रवास करतात. सिडको आणि सातारा भागातील युवक, नोकरदार जालना, रोटेगाव, लासूर आणि दौलताबादकडे जाताना मुकुंदवाडी स्टेशन जवळ करतो. स्मार्ट सिटीतल्या या स्टेशनचा दर्जा ई क्लासमधून मागेच डी क्लास करण्यात आला. मात्र, इथल्या सुविधांत कसलिही वाढ झाली नाही. सध्या स्टेशनवर प्रवाशांना थांबण्यासाठी शेड नाही, प्यायला पाणी नाही. त्यामुळे प्रवासी त्रस्त होतात. त्यामुळे स्टेशनवरील सुविधा वाढवा, अशी मागणी मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी केली होती.

या मागणीची दखल घेत रेल्वेचे नांदेड विभागीय व्यवस्थापक पी.सी. शर्मा यांनी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनची पाहणी केली. प्रवाशांसाठी वेटिंग रूम तयार करा, शेड बांधा, पाण्याची व्यवस्था करा, संरक्षक भिंत बांधा असे आदेश दिले. त्यांच्या सूचनेनुसार मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या विविध कामांसाठी ७० लाखांचा प्रस्ताव नांदेड विभागाला पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच या कामास सुरुवात केली जाईल.

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवरील काम रस्ता रुंदीकरणामुळे केले जात नव्हते. आता हे काम झाले आहे. या ठिकाणी पोलिस चौकीची व्यवस्था करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिलेत. यामुळे नांदेड रेल्वे विभागाला सत्तर लाखांच्या कामाचा प्रस्ताव पाठविला आहे. हे काम लवकर सुरू होईल.

- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

असे बदलेल रुपडे

तिकीट विक्री केंद्राची जागा कमी करणार

तिकीट केंद्राच्या जागेत विश्रांतीकक्ष उभारणार

२०० मीटर लांबीची संरक्षक भिंत बांधणार

२०० मीटरचा लांब शेड टाकणार

पाण्यासाठी बोअरवेल, पाण्याची टाकी बांधणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कोडा कामगारांना १० लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जास्त परतावा देण्याचे अामिष दाखवून स्कोडा कंपनीच्या कामगारांना रुद्रा मल्टिट्रेड या कंपनीने १० लाख ७८ हजार रुपयांना गंडा घातला. कॅनॉट प्लेस भागात या कंपनीने कार्यालय सुरू केले होते. त्याला टाळे ठोकून कंपनीचे संचालक पसार झाले आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॅनाट प्लेस येथील शीतल कॅपिटल या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर श्रीकांत जग्गनाथ गटकाळ व इतर संचालकांनी रुद्रा मल्टिट्रेड नावाने कार्यालय थाटले होते. स्कोडा कंपनीचे कामगार गो‌विंद बालाजी बोडके (वय २९, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी गटकाळ यांनी संपर्क साधला. आमच्या कंपनीमध्ये ठेवी ठेवल्यास जास्त दराने परतावा देण्याचे आमिष कामगारांना दाखविण्यात आले. त्याला भुलून कामगारांनी रुद्रा कंपनीमध्ये तब्बल १० लाख ७८ हजार रुपयाची गुंतवणूक केली. सप्टेंबर महिन्यात मुदत संपल्यानंतर कामगारांनी आपली रक्कम घेण्यासाठी कंपनीचे कार्यालय गाठले. यावेळी कंपनीला टाळे ठोकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संचालक गटकाळकडे विचारणा केली, मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

याप्रकरणी बोडके यांच्या तक्रारीवरून आरोपी श्रीकांत जगन्नाथ गटकाळ, संध्या गटकाळ, जगन्नाथ गटकाळ, अंजना जगन्नाथ गटकाळ व विजय पांडुरंग लेभे यांच्याविरुद्ध फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदार हितसरंक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील उच्च शिक्षणासाठी २५१ कोटी

$
0
0

Yogesh.Borate@ timesgroup.com

पुणे : केंद्राच्या राष्ट्रीय उच्च शिक्षा मोहिमेद्वारे (रुसा) राज्यातील चार प्रकल्पांसाठी एकूण २५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील एकूण १६३ कोटी रुपयांचा वाटा केंद्र सरकार उचलणार असून, उर्वरित एकूण ८६ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उभारण्याची जबाबदारी राज्य सरकारवर टाकण्यात आली आहे. याच निधीमधून मुंबईमध्ये एका क्लस्टर युनिव्हर्सिटीची निर्मिती होणेही अपेक्षित आहे.

'रुसा'च्या प्रकल्प मान्यता बोर्डाच्या (पीएबी) नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात एक नवी क्लस्टर युनिव्हर्सिटी उभारण्यासाठी ५५ कोटी, विद्यापीठांमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकूण १८० कोटी, कॉलेज पातळीवरील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दहा कोटी, तर शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या उच्च शिक्षण खात्याने त्यासाठी पाठविलेल्या प्रस्तावांमधून या चार प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. औरंगाबाद येथील शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नागपूर येथील वसंतराव नाईक कला आणि समाजशास्त्र महाविद्यालय, नागपूरचीच शासकीय विज्ञान संस्था, गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय आणि कोल्हापूर येथील राजाराम कॉलेज यांना पायाभूत सुविधांसाठीचा प्रत्येकी दोन कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.

'रुसा अंतर्गत योजनेसाठी राज्याने आपला प्रस्ताव सादर केला होता. त्याला केंद्राने मान्यता दिली आहे. यापूर्वीच्या सरकारने अशी प्रक्रिया करण्याकडे कधीही लक्ष दिले नव्हते,' असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 'मटा'ला सांगितले. ते म्हणाले, 'निधीमधील ३५ टक्क्यांचा वाटा उचलल्यास केंद्र आपल्याला ६५ टक्के निधी देणार आहे. ही संधी दवडणे योग्य वाटत नाही. त्यामुळेच आम्ही पहिल्या टप्प्यात शासकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी 'रुसा'कडे निधी मागितला. त्यासाठी ५४० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यातून २५१ कोटींच्या निधीला मान्यता मिळाली आहे.'

नऊ विद्यापीठांना प्रत्येकी वीस कोटी

राज्यातील नऊ विद्यापीठांमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी वीस कोटी रुपयांचा निधीही या बैठकीत मंजूर करण्यात आला. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, एसएनडीटी विद्यापीठ मुंबई, मुंबई विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठाचा समावेश आहे.

मुंबईत क्लस्टर युनिव्हर्सिटी

या निधीमधून मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एलफिन्स्टन कॉलेज, सिडनेहॅम कॉलेज, गव्हर्न्मेंट लॉ कॉलेज आणि गव्हर्न्मेंट बी. एड. कॉलेज यांच्या एकत्रिकरणातून एक क्लस्टर युनिव्हर्सिटी तयार केली जाणार आहे. मात्र त्यासाठीचा निधी उपलब्ध करून देण्यापूर्वी राज्य सरकारने त्यासाठीच्या अटींची पूर्तता करणे गरजेचे असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी ३ आरोपी अटक

$
0
0

औरंगाबादः तरुणासोबत फिरण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. रुपचंद शिरसे, मच्छिंद्र गायकवाड, सत्तार अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याबद्दल अन्य माहिती देण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शविली. गोलवाडी परिसरात सोमवारी तीन जणांनी तरुणाला मारहाण करून मुलीवर बलात्कार केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीए ‘असावा ब्रदर्स’ची ‘प्राप्तिकर’कडून झडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको कॅनॉट प्लेस परिसरातील चार्टर्ड अकाउंटंट 'असावा ब्रदर्स' यांच्या फर्मची मंगळवारी प्राप्तीकर विभागाने झडती घेतली. यावेळी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसह विविध खात्यांची व खातेधारकांची माहिती घेण्यात आली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

गेल्या महिनाभरापासून सीएंच्या विविध व्यवहारांवर प्राप्तिकर खात्याची नजर होती. गुंतवणुकीचे वाढणारे प्रमाण आणि लपविल्या जाणाऱ्या माहितीबाबत वारंवार शंका व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी ही झडती घेण्यात आली. यावेळी विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. प्राप्तीकर विभागाच्या ६ जणांच्या टीमने ही कारवाई केली. किमान २ कोटी रुपयांचा कर चुकविल्याची शंका प्राप्तिकर विभागाला आहे. त्याबाबत चौकशी केल्याची माहिती या सूत्रांनी दिली.

२४ फेब्रवारी २०१५ रोजी शहरातील इलेक्ट्रॉनिक्स, सॉ मिल, हार्डवेअर, ऑप्टिकल, खाजगी क्लासेस, शैक्षणिक संस्था, अशा ८ प्रतिष्ठानांची सलग दोन दिवस तपासणी करण्यात आली होती. त्यात सुमारे ८ कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर या विभागाने १७ मार्च रोजी शहरातील ८ ज्वेलर्स, २ बिल्डर व एका भंगारवाल्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यातून सुमारे १५ कोटी रुपयांची करचुकवेगिरी उघड झाली होती.

सीए फर्मवर प्रथमच कारवाई

सीए फर्मची प्राप्तिकर विभागाने प्रथमच झडती घेतली आहे. मंगळवारच्या कारवाईसंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. दरम्यान, असावा यांची सीए, कॉमर्स अॅकॅडमीही आहे, अशीही माहिती या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेंदूत आरपार घुसलेला बाण काढण्यात यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरा वर्षांच्या मुलाच्या मेंदूमध्ये आरपार गेलेला धनुष्यबाण कुठल्याही दुष्परिणामां शिवाय मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. या प्रकारची ही देशातील पाचवी दुर्मिळ केस माणिक हॉस्पिटलमध्ये झाल्याचा दावा डॉ. जीवन राजपूत यांनी केला. तर अवघ्या दीड महिन्याच्या बाळावर याच रुग्णालयात मराठवाड्यातील पहिली बलून प्रक्रिया करण्यात आल्याचा दावाही डॉ. मिलिंद खर्चे यांनी मंगळवारी (२२ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत केला.

नेवासा (जि. नगर) तालुक्यातील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या शाळेत धनुष्यबाळ शिकण्याचा सराव सुरू होता. तिथे प्रवेश नसतानाही ऋतिक अंकुश तरटे हा विद्यार्थी गेला व त्याच्या डोक्यातून बाण आरपार गेला. त्याच्यावर ८ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली. बाण घुसलेल्या ठिकाणचे हाड काढण्यात आले, मेंदूचे कव्हर एक-एक करून उघडून हळवारपणे बाणाचे बारीक तुकडे मेंदूला इजा न होता काढण्यात आले. एंडोस्कोपद्वारे रक्तस्राव आटोक्यात ठेवल्याचे डॉ. राजपूत म्हणाले.

परभणीच्या उझेर शेख या दीड महिन्याच्या बाळाच्या हृदयातील महाधमनीच्या मुखाशी असलेली झडप बरोबर उघडत नव्हती. त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता ३० टक्क्यांवर येऊन दम लागण्यासह बाळाला दूध पिणेही त्रासदायक ठरत होते. बलून प्रक्रियेद्वारे झडप उघण्यात आली व पाच दिवसांत हृदयाचे पंपिंग सामान्य होऊन त्रास थांबला. बालरोगतज्ज्ञ डॉ. संध्या कोंडपल्ले, भूलतज्ज्ञ डॉ. माणिक देशपांडे, डॉ. सुजित खाडे, डॉ. बालाजी आसेगावकर यांनी महत्वाची भूमिका निभावल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढग अन् रडारचा गुंगारा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळी महाराष्ट्राची तहान भागावी यासाठी, कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय झाला. मराठवाड्यात या प्रयोगाला समाधानकारक यश मिळाले नाही. त्यामुळे शुक्रवारपासून पुणे धरण परिसरात 'कृत्रिम'चे विमान पाठवण्यात आले. तिथेही १८ ते २२ सप्टेंबर ढग आणि रडारने गुंगारा दिल्यामुळे या विमानाचे 'टेकऑफ' झाले नाही.

गेल्या दीड महिन्यांपासून मराठवाडा तसेच राज्याच्या इतर भागांमध्ये ढगांच्या गुंगाऱ्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोगाला यश मिळाले नाही. हवामानाच्या अनुकूलतेमुळे हा प्रयोग पुणे परिसरात करण्याचे ठरले. १८ सप्टेंबर रोजी विमान पुण्याला पाठविण्यात आले, मात्र, १९ सप्टेंबर रोजी पुणे विमानतळाची धावपट्टी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत बंद असल्यामुळे विमानाचे उड्डाण होऊ शकले नाही. तर २०, २१ व २२ रोजी पुणे परिसरामध्ये पावसासाठी उपयुक्त ढग आढळून न आल्यामुळे विमानाचे उड्डाण झाले नाही. या प्रयोगासाठी औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर बसविण्यात आलेल्या सी-बँड डॉप्लर रडार सिस्टीम तसेच महाबळेश्वर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी (आयआयटीएम) तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाची मदत घेण्यात येणार असल्याचे ठरले होते. मात्र, औरंगाबादमधील रडारची क्षमता २०० किलोमीटरच्या परिघापर्यंत आहे.

आता विमानच पुण्याला गेल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात तयार करण्यात आलेल्या कंट्रोल रुममध्येही शुकशुकाट आहे. कृत्रिमच्या प्रयोगासाठी शासनाने २७ कोटी रुपये खर्च केले आहेत. औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळावरून ४ ऑगस्टपासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली. मात्र, क्लाउड सिडिंगसाठी विमानाचे १०० तासही पूर्ण झाले नाही तोच, विमान पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’मुळे एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उंबरखेड (ता. कन्नड) येथील एकनुरे राजेंद्र बाबूलाल (५०) यांचा 'स्वाइन फ्लू'ने मृत्यू झाला. त्यांना १८ सप्टेंबर रोजी शहरातील एमआयटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 'एसआरएल लॅब'नुसार त्यांना 'स्वाइन प्लू' झाल्याचे निदान झाले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

सध्या हॉस्पिटलमध्ये कन्नड तालुक्यातील एक स्वाइन प्लू पॉझिटिव्ह पुरुष रुग्ण दाखल आहे, असे हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद निकाळजे यांनी सांगितले. तर, सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) एकही पॉझिटिव्ह रुग्ण दाखल नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी सांगितले. जूनपासून स्वाइन फ्लूमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी दोन रुग्ण औरंगाबाद शहरातील होते, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नडमध्ये ट्रॅक्टर शाळेत घुसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

कन्नड येथील समर्थनगरमधील सारा प्रायमरी स्कूल या खासगी इंग्रजी प्राथमिक शाळेत मंगळवारी दुपारी वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर घुसला. भिंतीला धडकून तो थांबल्याने ३० विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. दुपारी पावणेबाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. त्यानंतर ट्रॅक्टरचालक पसार झाला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

पहिली ते सहावीपर्यंत असलेल्या या शाळेत २८६ विद्यार्थी शिकतात. शाळा दोन इमारतींमध्ये भरते. मुख्य इमारतीशेजारी भाडेतत्त्वावर दुसरी इमारत घेतली असून, तेथे संगणक कक्ष व शिक्षक कक्ष, नर्सरीचा वर्ग व पहिलीचा वर्ग भरतो. या वर्गाला पार्टिशन व पत्र्याचा आडोसा करण्यात आला आहे. घटना घडली तेव्हा शाळा भरलेली होती.

दुपारी पावणेबारा वाजता वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर (एमएच ३४, २५२९) शाळेचे पत्रे तोडून शिरला व पहिलीच्या वर्गाबाहेरील शटरवर धडकला. तेथून पुढे येऊन ट्रॅक्टर लाकडी पार्टिशनला भिडला व थांबला. या हादऱ्याने वर्गात पार्टिशनला खेटून बेंचवर बसेलेले विद्यार्थी अचानक पुढे ढकलले गेले. वर्गात ट्रॅक्टर घुसल्याने विद्यार्थी व शिक्षक घाबरून गेले. वर्गाबाहेरील शटरच्या भिंतीमुळे ट्रॅक्टर रोखला गेला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

ही घटना कळताच पालकांनी शाळेत धाव घेतली. याप्रकरणी संस्थाचालक जानी अब्दुल रहीम मन्सुरी यांनी पोलिसात फिर्याद दिली. ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून, उपनिरीक्षक ए. डी. शिंदे पुढील तपास करीत आहेत.

सीसीटीव्हीत रेकॉर्डिंग

चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टरने आधी एका घराच्या संरक्षक भिंतीला, विजेच्या खांबाला धडक दिली. त्यानंतर ट्रॅक्टर शाळेकडे वळून इमारतीमध्ये घुसले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. हा प्रकार एका सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images