Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मराठवाड्यातील हज यात्रेकरू सुखरुप

$
0
0

औरंगाबाद : हज यात्रेसाठी मराठवाड्यातून गेलेले सर्व यात्रेकरू सुखरूप असल्याचे हज समितीचे माजी अध्यक्ष जी. एस. ए. अन्सारी यांनी सांगितले. मक्का येथे गुरुवारी झालेल्या चेंगराचेंगरीत ७१७ यात्रेकरू मृत्युमुखी पडले होते. यावर्षी मराठवाड्यातून हज यात्रेला २३८४ हाजी रवाना झाले आहेत. हे सर्व मक्का येथे सुखरूप आहेत. त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधाला असल्याचे अन्सारी यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी या ०९६६१२५४५८०००, ८००२४७७७८६ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठगन पाटीलला न्यायालयीन कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पायी जात असलेल्या महिलेचा विनयभंग करणारा आरोपी ठगन पाटील याला न्यायालयलीन कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. ए. डोईफोडे यांनी शुक्रवारी (२५ सप्टेंबर) दिले.

गारखेडा परिसरातील परीमल हौसिंग सोसायटीमध्ये राहणारी ४३ वर्षीय महिला २५ जानेवारी २०१५ रोजी रात्री पायी जात असताना ठगन देवाराव पाटील व त्याच्या चार साथीदारांनी त्यांना अडवून 'माझ्याविरुद्ध केलेली केस पाठीमागे घे' असे म्हणत हात धरून ओढत विनयभंग केला. त्यानंतर त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात ठगन पाटील व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करून ठगन पाटील यास २३ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्याला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजचे तरुण निघाले घरफोडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जवाहरनगर पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या चारजणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. पकडलेल्या आरोपींमध्ये तीन अल्पवयीन बालकांसह एका तरुणाचा समावेश आहे. सर्व आरोपी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. एकूण आठ घरफोड्यांची कबुली या चोरट्यांनी दिली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून जवाहरनगर पोलिस ठाणे हद्दीत घरफोड्यांच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध सुरू होता. दरम्यान, विष्णूनगर भागातील काही महाविद्यालयीन तरुण महागडे मोबाइल व दुचाकी वापरत असल्याची माहिती जवाहरनगर गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. यापैकी अक्षय मधुकर पाटील (वय १९ रा. विष्णूनगर) या तरुणासह इतर तिघे सतरा वर्षांचे अल्पवयीन विद्यार्थी निघाले. या चौकडीने गेल्या दोन महिन्यात जवाहरनगर व उस्मानपुरा पोलिस ठाणे हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली.

आठ घरफोड्यांची माहिती देत या चोरट्यांनी साडेसहा तोळे सोने, चांदीचे दागिने, एलईडी, मोबाइल आयपॅड, कॅमेरे असा लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, एसीपी सुखदेव चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील तेलुरे, पीएसआय सतीश भोसले, कैलास काळे, अण्णासाहेब शिरसाठ, मधुकर गोरे, जालिंदर मांटे, प्रकाश चोपडे, अजिजखान, मोहन चव्हाण आदींनी ही कामगिरी केली.

चैनीसाठी चोऱ्या

या टोळीचा सूत्रधार अक्षय पाटील हा बीएससीचे शिक्षण घेत आहे. तर उर्वरित तीन विद्यार्थ्यांनी नुकतेच दहावी पास झाल्यानंतर अकरावीला प्रवेश घेतला आहे. इतर विद्यार्थ्यांसारखी मौजमजा करावी, अशी या चौकडीची इच्छा होती. त्यामुळे यांनी चोरीचा मार्ग ‌स्विकरला. चोरीच्या पैशातून ही मंडळी चैन करीत होती, अशी माहिती समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबा भांड यांचा आज जाहीर सत्कार

$
0
0

औरंगाबादः महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल साहित्यिक व प्रकाशक बाबा भांड यांचा मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे. परिषदेच्या सभागृहात शनिवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल.

ख्यातनाम साहित्यिक डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भांड यांचा सत्कार होणार आहे. यावेळी भांड यांचे लेखन व व्यक्तिमत्त्वावर डॉ. अनिरुद्ध मोरे भाष्य करणार आहेत. दरम्यान, भांड यांचा सत्कार करण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती व संस्थांनी डॉ. रामचंद्र काळुंखे यांच्याशी संपर्क साधावा. या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, किरण सगर व भास्कर बडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणप्रकरणी दोघांना कोठडी

$
0
0

औरंगाबाद : दोन पत्नी असल्याचे लपवून ठेवत तिसरा विवाह करून गुजरातमधील एकाने फसवणूक केल्याच्या समजातून त्याला गंभीर स्वरुपाची मारहाण करणाऱ्या दोघांना रविवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. ए. डोईफोडे यांनी शुक्रवारी दिले आहेत. या प्रकरणातील सात आरोपी फरार आहेत.

मोहसीन खान मोहम्मदभाई यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी कमाच्या शोधात शहरात आला होता. त्याची रेल्वे स्टेशनवर एका मौलानाशी ओळख झाली व त्याने नुकताच धर्म प्रवेश केल्याचे मौलानाला सांगितले. मौलानाने फिर्यादीला आरोपी जावेदभाई फंक्शन हॉलवाले याच्याकडे पाठविले. जावेदभाई फिर्यादीला पेरीबाग येथील घरी राहायला घेऊन गेला व योग्य जावई वाटल्यामुळे जावेदभाई याने आपल्या मुलीचा विवाह फिर्यादीशी लावून दिला. विवाहानंतर फिर्यादीचे यापूर्वीच दोन विवाह झाल्याच्या गैरसमजातून त्याला गंभीर स्वरूपाची मारहाण करून जखमी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस पथकावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शुक्रवारी पहाटे तीन वाजता पोलिस पथकावर चोरट्यांनी हल्ला केल्याची थरारक घटना सातारा परिसरात घडली. गुंडांच्या तुफान दगडफेकीत व्हॅनमधील पोलिस कर्मचारी डोक्यात दगड लागून रक्तबंबाळ झाला. तशा अवस्थेतही मोठ्या धाडसाने त्याने दोन चोरट्यांना जेरबंद केले. मच्छिंद शेळके असे त्या जिगरबाज पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सातारा परिसरातील भीमाशंकर कॉलनी येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये चोर घुसल्याची माहिती तेथील वॉचमन लक्ष्मण सौदागर याने कंट्रोलरूमला दिली होती. कंट्रोलरूमने ही माहिती त्या भागात पेट्रोलिंगसाठी असलेल्या पीसीआर मोबाइलच्या कर्मचाऱ्यांना दिली. पीसीआर मोबाइलमधील पोलिस नाईक मच्छिंद्र शेळके व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मदतीला चार्लीचे पथक देखील आले. पोलिसांना पाहताच इमारतीमध्ये घुसलेल्या चोरट्यांनी त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. तसेच इमारतीला लावण्यात आलेल्या पाइपवरून उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेळके यांनी चोरट्याकडे धाव घेतली. त्यांना पाहताच चोरट्यांनी त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. या घटनेत डोक्याला दगड लागल्याने शेळके गंभीर जखमी झाले. रक्तश्राव सुरू झाला. अशा अवस्थेतही त्यांनी सहकाऱ्यांना आवाज देत दोन चोरट्यांना पकडले. विनोद विजय बत्तीसे व अनिल प्रकाश पोळ (रा. मिलिंदनगर) अशी या चोरट्यांची नावे असून दोघेही रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरूद्ध सातारा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासहीत दरोडा टाकण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’चे तीन संशयित रुग्ण दाखल

$
0
0

औरंगाबाद : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) स्वाइन फ्लू वॉर्डामध्ये 'स्वाइन फ्लू'चे तीन संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये दोन रुग्ण बीड येथील आहेत, तर एक रुग्ण शहरातील उस्मानपुरा भागातील आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे अधिकाऱ्याचा शोध लागेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील बगळ्यांच्या मृत्यूप्रकरणी प्रमुख दोषी असलेले रेल्वे अधिकारी के. बापूराव अजूनही पसार आहेत. याप्रकरणी योग्य दिशेने तपास सुरू असून लोहमार्ग पोलिसांना मदतीसाठी पत्र दिले आहे असे वन विभागाने सांगितले. वन विभागाने दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी पर्यावरणप्रेमींची मागणी जोर धरत आहे.

रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील वाहनांवर पक्ष्यांची विष्ठा पडते या कारणावरून संबंधित ठेकेदाराने झाड तोडले. या ठेकेदाराला झाडाच्या फांद्या तोडण्यास रेल्वे अधिकारी के. बापूराव यांनी परवानगी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात झाडाच्या जास्त फांद्या तोडण्यात आल्या. फांद्यांवर घरटी असलेल्या बगळ्यांचा जीव गेला. शेकडो अंडी फुटली तसेच फांद्यांखाली दबून बगळे मृत्यूमुखी पडले. पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर १६ सप्टेंबर रोजी तिघांना अटक करण्यात आली. मात्र, मुख्य दोषी असलेले रेल्वे अधिकारी के. बापूराव पसार आहेत. बापूराव यांचा शोध घेण्यासाठी वन विभागाने लोहमार्ग पोलिसांना पत्र पाठवले. या तपासात त्यांचे सहकार्य अपेक्षित आहे असे तपास अधिकारी सहवनरक्षक जगदिश येडलावार यांनी सांगितले. तर बापूराव सुटीवर असून शासकीय नियमानुसार हजर राहणे गरजेचे आहे असे रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्यिक व्यवस्थापक के. मधुसूदन यांनी स्पष्ट केले.

कठोर कायदे

बगळ्यांच्या मृत्यूप्रकरणी शिकार करणे व शिकार करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. वन्यजीव कायद्याच्या शेड्यूल चारमध्ये बगळ्यांचा समावेश आहे. कठोर कायदे असल्यामुळे वन्यजीवांची हत्या करण्यास कुणी धजावत नाही. मात्र, हेतूपूर्वक झाड तोडल्याने बगळ्यांचा मृत्यू झाला. कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

तपास प्रक्रियेचा एक दिवसापूर्वीच आढावा घेतला. गुन्हेगार सुटू नये म्हणून योग्य तपासाची गरज आहे. तपास संथ असला तरी योग्य दिशेने सुरू आहे. पर्यावरणप्रेमींनी सतत आढावा घेतल्यास तपासात सातत्य राहील.

- डॉ. दिलीप यार्दी, मानद वन्यजीवरक्षक

बगळ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी. या संदर्भात रेल्वे विभागानेही लक्ष घालावे. दोषीला शिक्षा झाल्याशिवाय ही घटना उदाहरण ठरणार नाही.

- किशोर गठडी, निसर्ग मित्रमंडळ

शेकडो पक्ष्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दोषींना शिक्षा व्हावी असे वाटते. मात्र, या प्रकरणात जनरेटा आवश्यक आहे. वृक्षतोड व पक्ष्यांची शिकार रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.

- अमर परदेशी, रोहित नेचर क्लब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन मुलींस‌ह महिलेची आत्महत्या

$
0
0

उस्मानाबाद : आर्थिक चणचणीमुळे निराश झालेल्या महिलेने दोन चिमुकल्या मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना उस्मानाबाद तालुक्यातील कौडगांव येथे शुक्रवारी (२५ सप्टेंबर) दुपारी घडली.

सलमा शर्मा (शेख), मुस्कान शेख (वय ७), गुड्डी शेख (४) असे मृतांची नावे आहेत. सलमा शेख ही पती समीर व दोन लहान मुलींसह कौडगांव येथे राहत होती. सलमा शेतात मिळेल, ते काम करत होती. समीरही कधी वाहनावर, तर कधी हॉटेलमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. समीरला गेल्या महिन्यापासू काहीच काम नव्हते. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. बकरी ईददिवशीही घरात काहीच नसल्यामुळे, तसेच मुलींना कपडेही घेतले नसल्यामुळे सलमा निराश होती. त्यातूनच, तिने नाईकवाडी यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६५ डीपी रस्त्यांचे मार्किंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर विकास आराखड्यातील ६५ 'डीपी' रस्त्यांचे मार्किंग गणेशोत्सवानंतर महापालिकेतर्फे केले जाणार आहे. प्रत्येक रस्त्यालगत संबंधित रस्त्याची माहिती देणारा फलक लावण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांची फसवणूक होणार नाही व नुकसानही टळेल, असे मानले जाते

जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन या शहर विकास आराखड्यातील (डेव्हलपमेंट प्लान) रस्त्याचे रुंदीकरण महापालिकेने कोर्टाच्या आदेशाने केले. या रुंदीकरणादरम्यान १४४ घरे पाडण्यात आले. त्यानंतर शिवाजीनगर ते रामनगर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून मार्किंग केले जात आहे. या रस्त्यावरील किमान दोनशे घरांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. भविष्यात असे प्रकार घडू नयेत व नागरिकांवर बेघर होण्याची वेळ येऊ नये, म्हणून विकास आराखड्यातील सर्व रस्त्यांचे मार्किंग करण्याचे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी महापालिका प्रशासनाला दिले. रस्त्यांचे मार्किंग करा, मार्किंगनंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने रुंदी दर्शविणारे फलक लावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यानुसार नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी आठ दिवस काम करून विकास आराखड्यातील रस्त्यांची यादी तयार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार; या यादीत ६५ रस्त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या रस्त्यांवर मार्किंग करण्याबाबतची एकत्रित फाइल आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. आयुक्तांची मंजुरी मिळाल्यावर गणेशोत्सवानंतर मार्किंगचे काम सुरू केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस गायब; टॅँकरची सुगी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या आठवड्यात दमदार हजेरी लावणाऱ्या वरुणराजाने पुन्हा एकदा मराठवाड्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे २३ तालुक्यांत जलसंकट गंभीर झाले आहे. सध्या विभागातील ५७७ गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

१७ व १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. मराठवाड्यातील ७६ तालुक्यांपैकी परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील २३ तालुक्यांनी आतापर्यंत पावसाची ५० टक्के सरासरीही ओलांडली नाही हे विशेष. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे नेहमीच दुष्काळाला समोरे जात असलेल्या मराठवाड्यावर कृपादृष्टी झाली. मात्र, बीड, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसानंतरही मोठ्या प्रमाणावर टँकर सुरू आहेत.

औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस

विभागात औरंगाबादमध्ये सर्वाधिक ८४.२० टक्के पाऊस झाला. यामध्ये औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, कन्नड, खुलताबाद तालुक्यांमध्ये ४०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला. भर उन्हाळ्यात साडेपाचशे टँकर सुरू असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आता टँकरची संख्या दोन आकड्यावंर आली आहे.

या तालुक्यात निम्माही पाऊस नाही

मराठवाड्यातील ७६ पैकी २३ तालुक्यांमध्ये आतापर्यंतच्या सरासरी पावसापेक्षा ५० टक्केही पाऊस झाला नाही. यामध्ये परभणी जिल्ह्यातील परभणी ३७.२९ टक्के, पालम ३८.८१, गंगाखेड ३६.३७, सोनपेठ ४९.५०, पाथरी ३९.१२, जिंतूर ४९.३१, हिंगोली जिल्ह्यातील वसमत ४७.२१, नांदेड जिल्ह्यातील देगलूर ३३.९०, बिलोली ३९.२३, धर्माबाद ३६.२३, नायगाव ४१.९०, मुखेड ४८.५८., बीड जिल्ह्यातील गेवराई ४२.३६, शिरूर कासार ३७.४७, लातूर जिल्ह्यातील उदगीर ४६.७९, चाकूर ४५.६६, जळकोट ४९.७०, शिरूर अनंतपाळ ४३.८३., उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद ४९.७५, तुळजापूर ४६.८९, कळंब ४९.०६, भूम ४४.५६, वाशी ४०.६१ या तालुक्यांचा समावेश आहे.

तज्ज्ञ म्हणतात हिवाळ्यातही पाऊस

मराठवाड्यातील पावसाबाबत हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर म्हणाले की, 'येत्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यात पावसाची शक्यता नसली तरी, सुपर अप निनोच्या प्रभावामुळे नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत गारपिटीसह पावसाच्या सरी कोसळतील. या काळात थंडी मात्र कमी राहील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोर गजाआड; तीन गाड्या हस्तगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका दुचाकी चोरास पकडण्यात सातारा पोलिसांना यश आले. त्याच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. कोर्टाने त्याला २७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शेख तौफिक शेख युसुफ (रा. सादातनगर) असे अटकेत असलेल्या संशयिताचे नाव आहे.

ईदनिमित्त सातारा पोलिस शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास सादातनगर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी शेख तौफिक शेख युसुफ हा दुचाकीवरुन भरधाव वेगाने जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने दुचाकी वेगाने नेली. संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करत त्यास परिसरातील नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याचे समोर आले. त्याने दडवून ठेवलेल्या तीन दुचाकी हस्तगत केल्याचे पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले. प्रजापती यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण गिरी, सतीश हर्बेर्ड, राजेंद्र साळुंके, संदीप तायडे यांनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस शिपाई महिलेस शिवीगाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस शिपाई महिलेस शिवीगाळ केल्याप्रकरणी दोनजणांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रारदार महिलेने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत निवेदनही सादर केले.

तक्रारदार महिला पोलिस मुख्यालयात कार्यरत असून त्या काजीवाडा टाऊन हॉल येथे राहतात. वार्डन ड्युटीसाठी त्यांना ११ सप्टेंबरपासून नागरूर येथे पाठविण्यात आलेले आहे. १८ सप्टेंबर रोजी तक्रारदार यांची मुलीस अपघात झाल्याने त्या रजा घेऊन घरी आल्या आहेत. दरम्यान, इमारतीच्या गच्चीवर काही मुले पंतग उडवित असताना फिर्यादीने त्यांना खाली पडण्याच्या भीतीने मनाई केली. त्यावरुन संतप्त झालेल्या शौकत अली व त्याचा साथीदार अब्दुल हाक हाश्मी (दोघे रा. काजीवाडा टाऊन हॉल) यांनी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरा समोर येत शिवीगाळ सुरू केली. घरातील सामना बाहेर काढू, अशी धमकी देत विनयभंग केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीवरून गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केल्याचे सिटी चौक पोलिसांनी सांगितले.दरम्यान, गुंडप्रवृत्तीच्या या लोकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

तरुणास मारहाण

औरंगाबादः हात उसने पैसे मागितल्याने तिघांनी एका तरुणास बेदम मारहाण केली. रांजणगाव परिसरात बुधवारी (२३ सप्टेंबर) सकाळी ही घटना घडली असून एमआयडीसी वाळूज पोलिस अधिक तपास करत आहेत. हात उसने पैसे मागण्यासाठी गेलो असता जिता मगरे, मालती मगरे व सविता (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी मारहाण करुन जखमी केले, अशी तक्रार सुनील दिलीप खिल्लारे (वय ३०, रा. रांजणगाव) यांनी केली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हद्दपार आरोपी गजाआड

औरंगाबादः हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कुणाल सुभाष राऊत (वय २३, रा. भीमनगर, भावसिंगपुरा ) यास शुक्रवारी भीमनगर परिसरातून छावणी पोलिसांनी पकडले. राऊत यास जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. परंतु, कोणतीही पुर्वपरवानगी न घेता तो शहर हद्दीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी पथकासह कारवाई करत राऊत यास अटक केली.

वाहनचालकास दमबाजी

औरंगाबादः निर्धारित टोल पेक्षा अधिक पैशांची मागणी करणे व धमकी दिल्याप्रकरणी पडेगाव टोलनाक्यावरील अज्ञात चार कर्मचाऱ्यांविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमजान अब्दुल खान (वय ३०, रा. फलोदी, जि. जोधपुर) असे फिर्यादीचे नाव आहे. पडेगाव येथील टोलनाक्या येथून गाडी घेऊन जात असताना तेथील कर्मचाऱ्यांनी देय करापेक्षा अधिक ३०० रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास गाडी जाऊ देणार नाही, असे धमकावल्याचे खान यांनी तक्रारीत नमूद केले.

रिक्षाचालक जखमी

औरंगाबादः खासगी बसच्या धडकेत रिक्षाचालक जखमी झाला. जळगाव रोडवरील मयुरी हॉटेलजवळ गुरुवारी (२४ सप्टेंबर) सायकांळी सव्वा सहा वाजता हा अपघात झाला. यात प्रशांत प्रभाकर कुटाके (वय ४८, रा. हडको) जखमी झाले असून रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर बसचालक ज्ञानेश्वर शेषराव साळुंके पसार झाला, असे तक्रारी नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सिडको पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाको राखे साइयां, मार सके ना कोय!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नशिबाची दोरी बळकट असेल तर कितीही मोठे संकट आले तरी त्यातून आपली सुटका होते. जालना रोडवर शनिवारी दुपारी झालेल्या दोन अपघातातून बचावलेल्या तिघांना याची प्रचिती आली. दुपारी तीन वाजता सिंचन भवनासमोर कारच्या धडकेने रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वाराला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची धडक बसते की काय, अशी भीती होती. मात्र, ट्रकचालकाने प्रसंगावधान राखून वेगावर नियंत्रण मिळविले आणि रस्त्यावर पडलेल्या जखमी तरुणाला मध्यभागी ठेवून ट्रकची दोन चाके त्याच्या बाजूने जातील अशी वळवली.

शनिवारी कडक उन होते. दुपारी तीनच्या सुमारास आकाशवाणी चौकातून मोंढा नाका उड्डाणपुलाकडे जाणारा सिग्नल सुटला. गाड्या भरधाव वेगाने पळत होत्या. सिंचन भवन विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारासमोर एका दुचाकीस्वाराला (एम.एच. २० सीएस ७३९४) मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. काही कळेपर्यंत दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. मागून वाहने जोरात येत होती. त्यात पुढे ट्रक होता. समोरचा अपघात पाहून ट्रक ड्रायव्हरही संभ्रमात पडला. गाडीचा वेग कमी केला तर, ट्रक उलटण्याची शक्यता होती. त्यामुळे आणखी अपघात घडू शकले असते. ट्रक ड्रायव्हरने वेगावर नियंत्रण मिळवून दुचाकीस्वाराला वाचविले. हृदयाचा ठोका चुकविणारा हा प्रसंग पाहणाऱ्यांनी ट्रक बाजूला जाताच दुचाकीस्वाराकडे धाव घेतली. जवळच्या एका रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. 'केवळ नशीब बलवत्तर होते म्हणून...' अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी नोंदविली.

... तरीही धोका टळला

जालना रस्त्यावर विश‌िष्ट वेळांमध्ये जड वाहतुकीस बंदी असते. हे दोन्ही अपघात एक ते चारच्या दरम्यान घडले. त्यावेळी जालना रस्त्यावर जड वाहतुकीस परवानगी होती.

टायर फुटल्याने कार उलटली

दुसरी घटना जालना रस्त्यावरच शासकीय दूध डेअरीजवळ घडली. दुपारी साडेतीनच्या सुमारास या रस्त्यावरून जाणारी एक कार टायर फुटल्याने उलटली. त्यात कारचारक मुलीसह आई जखमी झाली. हर्षा आनंद पंजाबी (वय २३) व तिची आई सीमा आनंद पंजाबी (वय ४८, रा. सिंधी कॉलनी) या दोघी कारने (एम.एच. २० बीसी ९९८७) क्रांतिचौकातून सिंधी कॉलनीकडे जात होत्या. कार दूध डेअरी बसस्टॉपसमोरून जात असतानाच कारचे टायर फुटले. त्यामुळे दुभाजकाला जाऊन धडकली आणि रस्त्यावर उलटली. मागून एक ट्रक वेगाने येत होता. सुदैवाने ट्रकचालकाने तत्काळ ब्रेक लावत ट्रक थांबविला. नागरिकांनी धाव घेत कारमधून हर्षा व तिच्या आईला बाहेर काढले. याच भागातून जाणाऱ्या सिडको पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी जखमींना मदत केली. क्रांतिचौक पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश धोक्रट तसेच वाहतूक शाखेच्या पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरोपाचा दिनु

$
0
0

विसर्जन मिरवणुकांसाठी पोलिस, प्रशासन सज्ज

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तगण, शहरातील गणेश मंडळांमध्ये शनिवारी लगबग सुरू होती. वाजतगाजत मिरवणूक काढण्यासाठी मंडळ ढोलताशे, लेझीम पथक, झांज पथकांचे दिवसभर सराव सुरू होते. सकाळी ११ पासून मुख्य मिरवणूक निघणार आहे. पूर्वसंध्येला शनिवारी, देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांशी गणेश मंडळानी साधेपणा जपला. दहा दिवसांच्या उत्साहानंतर रविवारी विघ्नहर्त्याला निरोप दिला जाईल.

औरंगाबादकरांनी पुजेचे साहित्य घेण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. निरोपदिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी देखावे पाहण्यासाठी बच्चे कंपनी, महिलांनी गर्दी केली होती. राजाबाजार, सिडको हडको, पान दरिबा, छावनी, चिकलठाणा हा परिसर रात्री उशिरापर्यंत गर्दीने फुलून गेला होता. दरम्यान, विसर्जनाचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी महापालिका, पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे.

दरम्यान, मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन नंदकुमार घोडेले, पंकज फुलपगार, ऋषिकेश खैर, अनिल मानकापे, विजय वाघचौरे, संदीप शेळके, अनिकेत पवार यांनी केले आहे.

सकाळी ११ ला मिरवणूक निघणार

शहरातील संस्थान गणपतीपासून मुख्य मिरवणूक सकाळी ११ वाजता निघणार आहे. सिटी चौक, गुलमंडी, औरंगपुरामार्गे ती जिल्हा परिषदेच्या मैदानावर पोहोचेल. हडको-१२ सह काही ठिकाणी विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. हडको, सिडको भागातील मिरवणूक अविष्कार चौकातून निघणार असून ती, बजरंग चौक, बळीराम पाटील शाळा, छत्रपती संभाजी महाराज चौकामार्गे विसर्जन स्थळी पोहोचेल. चिकलठाणा, मुकुंदवाडी, शिवाजीनगर येथेही विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


CSR चा पैसा देशहितासाठी वापरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'गेल्या काही वर्षांत आपण पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास करत आहोत. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. यापेक्षा आपले दुर्दैव नाही. वृक्षतोड, पाण्याचा बेसुमार वापर आणि हवेतील प्रदूषण यामुळे देशाचे पर्यावरण धोक्यात आले आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. उद्योगांच्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटीमधून वेगळा ठेवला जाणारा पैसा जर राष्ट्रीय हितासाठी वापरला तर देशाचा चेहरामोहरा बदलून जाईल,' असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, मॅगसेसे पुरस्कार विजेते एम. सी. मेहता यांनी शनिवारी येथे केले.

एमजीएम आणि चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) च्या वतीने ' रोल ऑफ नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अँड कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इन प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायर्नमेंट' या विषयावर मेहता यांचे व्याख्यान झाले. एमजीएमचे सचिव अंकुशकुमार कदम, विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, 'सीएमआयए'चे सचिव प्रसाद कोकीळ, विनोद नांदापूरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

मेहता यांनी पर्यावरण संवर्धनासाठी देशपातळीवर मोठे लढे दिले आहेत. ताज महल परिसरात उभारल्या जाणाऱ्या उद्योगांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात लढा देऊन त्यांनी लढाई जिंकली होती. शाळा व महाविद्यालयीन अभ्यासक्रमास पर्यावरणशास्त्र हा विषय शिकविण्यात येतो. या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचे श्रेय त्यांचे आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या माध्यमातून त्यांनी ऋषिकेश, हरिद्वार, उत्तरकाशी येथील अनेक प्रकरणांत यश मिळविले आहे.

देशभरातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या चिंताजनक असल्याचे सांगून मेहता म्हणाले, 'लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत ? त्याच्या मुळाशी कुणी गेले नाही. शेतीला पाणी आवश्यक आहे. पर्यावरणाचा नाश झाल्यामुळे जमिनीच्या पोटात पाणी उरले नाही. वातावरण बदलले. देशाला काय झाले आहे ? कळत नाही. कुठेतरी चुकत आहे. पर्यावरण टिकवून ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे. जमिनीशिवाय आपण राहू शकत नाहीत, पण भ्रष्ट व्यवस्थेमुळे जमिनी विकून खाल्ल्या. पाणी संपविले. उद्योग थाटून वायूप्रदूषण करत आहोत. सगळेच उद्योग असे नाहीत, पण जे वाईट आहेत त्यांना वाईट म्हणण्याची हिंमत बाळगली पाहिजे. देशाच्या आर्थिक राजधानीची म्हणजे मुंबईची अवस्था वाईट झाली आहे. पिण्यासाठी वर्षभराचे पाणी नाही. अशी अवस्था आपल्यामुळेच आली आहे. घनकचरा व्यवस्थापन करत नसल्याने नद्यांचे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. झाडे वाचविण्यासाठी व्यापक मोहीम राबविली पाहिजे. वृक्षतोड केल्यानंतर फायदा झाला की तोटा याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे,' असे त्यांनी स्पष्ट केले.

पर्यावरणासाठी एकत्र या

'आपण पृथ्वीशी खोटारडे वागत आहोत. भारतातील सर्व नद्या प्रदूषित केल्या. नैसर्गिक स्त्रोत नष्ट केले. आपल्या भावी पिढीचे आयुष्य सुखकर करावयाचे असेल तर सर्वांनी पर्यावरणासाठी एकत्र आले पाहिजे. आपली मानसिकता बदलली पाहिजे.पर्यावरण संवर्धनासाठी राष्ट्रीय हरित लवाद स्थापन केला. प्रदुषण मंडळे स्थापन झाली पण ५०० उद्योगांमागे एक अधिकारी अशी परिस्थिती असताना प्रदूषण तपासणार तरी कसे ?' अशी खंत मेहता यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम आदमी काढणार संघर्ष यात्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

मराठवाड्यात नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. या पार्श्वमुमीवर शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन न करता त्यांचा सात बारा कोरा करावा, मनरेगा योजनेमार्फत कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या शेतात रब्बीची मशागतीची कामे आणि पेरण्या करून द्याव्यात अशी मागणी आम आदमी पार्टीचे शेतकरी आघाडीचे संघटक रंगा राचुरे यांनी केली आहे. गांधी जयंती (२ ऑक्टोबर) ते जयप्रकाश नारायण जयंती (११ ऑक्टोबर) दरम्यान आम आदमी पार्टीच्यावतीने संघर्ष यात्रा काढली जाणार आहे.

नांदेड येथे शनिवारी आम आदमी पक्षाच्या शेतकरी आघाडीची मराठवाडा पातळीवरील बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राचुरे म्हणाले की, आम आदमी पार्टीने आत्महत्याग्रस्त कुटूंबांसाठी विदर्भ ते मराठवाडा अशी संवाद यात्रा आयोजित केली होती. संवाद यात्रेदरम्यान मिळालेल्या माहितीचा अहवाल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आला आहे. केजरीवाल सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रती एकर ५० हजार रुपयांची मदत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अशी मदत का देऊ शकत नाहीत ? असा सवाल त्यांनी केला.

१७ मे ते २४ मे दरम्यान २०१५ दरम्यान आम आदमी पार्टीने मराठवाड्यात २६ गावात जाऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ३८ कुटुंबाशी संवाद साधला होता. व शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेत त्यांना आर्थिक मदत आणि आत्महत्या न करण्यासाठी धीर दिला होता. नांदेड जिल्ह्यात १४ विद्यार्थी दोन कुटुंबियांना एक रकमी १५ हजार रुपये देण्यात आले आहेत.

राज्यात १०५ मुलामुलींना प्रत्येकी १२-१२ हजार रुपये दानशूर व्यक्तींच्या मदतीने शिक्षणासाठी देण्यात आले आहेत. ज्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला पक्ष कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या होत्या. त्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च देणगीदारांच्या मदतीने करण्यात येते आहे अशी माहिती मराठवाडा विभागाचे संयोजक फारूक अहमद यांनी दिली. पक्षाच्या सचिव मनीषा चौधरी, आपच्या शहर संयोजक सरोजताई पेठे, भाऊ पंडगे यावेळी उपस्थित होते.

आज विलंब झालेल्या मालेगाव येथील शेतकरी प्रभाकर नामदेव हिंगोले आणि सोनखेड येथील शेतकरी शिवाजी विश्वनाथ मोरे या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी १२-१२ हजारांचे धनादेश शनिवारी देण्यात आले. या वेळी आमआदमी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींनी मदत करावी

जिल्ह्यात सिनेकलावंत येऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देत आहेत. पण एवढे वर्षे सत्तेत राहून प्रचंड माया जमविलेले नांदेड जिल्ह्याचे नेते आमदार, खासदार, माजी मंत्री, मुख्यमंत्री खिशातून एक पैसाही मदत देण्यास का तयार नाहीत, असा सवाल आपच्या शहर संयोजक सरोजताई पेठे यांनी यावेळी बोलताना केला.

आर्थिक मदत उपाय नव्हे

आर्थिक मदत वाटणे हा काही आत्महत्येवर कायमस्वरूपी उपाय नाही. त्यासाठी शाश्वत उपाय म्हणून झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे तंत्र समजून घेऊन या तंत्राचा प्रचार नांदेड जिल्ह्याचे संयोजक मोहनराव पाटील-उमरेकर व मराठवाडा भागात करतील अशी माहिती रंगा राचुरे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५५ कोटी वादात अडकले

$
0
0

औरंगाबाद : वादग्रस्त मालमत्ता कर प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला आहे. न्यायालयीन प्रकरणे आणि आक्षेपांमुळे मालमत्ता कराचे सुमारे ५५ कोटी रुपये वादात सापडले आहेत. केंद्र शासनाने औरंगाबादचा समावेश स्मार्ट सिटी अभियानात केला आहे. या अभियानात ठसा उमटवण्यासाठी महापालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे लागणार आहेत. मालमत्ता कर हाच महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. मालमत्ता कराची बरीच वादग्रस्त व न्यायलयीन प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणात तडजोड करून वादग्रस्त मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ४८१ नुसार ही समिती स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना रस्ता होणार सुसाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील वर्दळीचा जालना रस्ता आता सहा पदरी होणार आहे. त्याच्या मार्किंगला शनिवारी सुरुवात झाली. जीव मुठीत घेऊन जाणाऱ्या वाहनधारकांनाही दिलासा मिळणार आहे. दरम्यान, रुंदीकरणामुळे शंभरावर मालमत्ता रडारवर आहेत.

आगामी काळात शहरात रस्ता रुंदीकरणाची कारवाई मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहर विकास आराखड्यातील ६५ रस्त्यांवर मार्किंगची योजना महापालिकेने आखली आहे. त्यात विमानतळ ते महावीर चौक या रस्त्याचादेखील समावेश आहे. गणेशोत्सवानंतर मार्किंग होणार असे सांगितले जात होते, पण शनिवारीच ते काम सुरू झाले. हा रस्ता सध्या चार पदरी आहे. रुंदीकरणानंतर तो सहा पदरी होणार आहे. त्याची रुंदी १२० फुट असणार आहे. शहरातील पाच रस्त्यांसाठी शासनाने २४ कोटी ३३ लाख रुपये महापालिकेला दिले आहेत. पुढील एखाद्या महिन्यात या रस्त्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. महावीर चौक ते क्रांती चौक हा सहा पदरी रस्ता होणार असून त्याचे चार पदर काँक्रिटचे तर, दोन पदर डांबरीकरण असेल. या रस्त्याच्या कामासाठी मार्किंग केले जाणारच होते, आता या मार्किंगची कार्यवाही क्रांतीचौक ते विमानतळ या रस्त्यावरही सुरू करण्यात आली आहे. शंभरपेक्षा जास्त मालमत्ता पाडल्या जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेवर बलात्कार; चुलत्यास अटक

$
0
0

जालना : चुलत्याने ५ वर्षांच्या पुतणीवर बलात्कार केल्याची घटना धाकलगाव (ता. अंबड) सोमवारी घडली. दरम्यान, चुलत्याला (वय ४०) पोलिसांनी अटक केली असून त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.‍‍

धाकलगाव येथील सदर मुलीचे आई-वडील बारामतीकडे ऊस तोडणीसाठी गेल्याने आजीजवळ राहत होती. दरम्यान, सोमवारी आजी जिप शाळेमध्ये मुलांना पोषण आहार शिजवण्यासाठी गेली होती. घरात सदर मुलगी एकटी असल्याची संधी साधून तिच्या काकाने तिला मावशीने बोलावल्याचे सांगून, घरी नेले व तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर आहेर व श्रीधर सानप हे करीत आहेत. दरम्यान चुलत्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टासमोर हजर केले असता त्यास पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images