Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दोन लाखांचा ऐवज आईने पळविल्याचा आळ

0
0

मुलीच्या तक्रारीवरून आईची चौकशी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

एका विवाहित मुलीने जन्मदात्या आईवरच दोन लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज पळवल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात केली आहे. हा प्रकार सहा महिन्यांपूर्वी घडला असून गुन्हा दाखल झालेली आई नातीला सांभाळण्याकरिता मुलीकडे राहत होती.

राजनगर भागातील रेखा मोहन दिवटे (वय ३२) यांच्या मुलीला सांभाळण्यासाठी आई मैनाबाई मोहन दिवटे (रा. मोमीनपुरा, बीड) या १७ मार्च रोजी आल्या होत्या. काही दिवस राहिल्यानंतर त्या बीडला परत परतल्या. परत जाताना रेखाबाईने कार खरेदीसाठी जमा केलेले एक लाख ६० हजार रुपये, सोन्याचा ३४ हजार रुपयांचा घट व सोन्याची ४२ हजार रुपयांची मनगटी पट्टी, असा एकूण दोन लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार मंगळवारी नोंदव‌िण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


५० हजार मागणाऱ्या पीएसआयला अटक

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पीएसआय व खाजगी लेखनिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली. फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला या दोघांनी कलमे कमी करण्यासाठी ५० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २० हजार व दुचाकीवर हा व्यवहार ठरला होता.

एकनाथ जगताप विरुध्द जमिनीच्या व्यवहारात फसवणुकीवर गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास पीएसआय स्नेहा सुरेशराव करेवाड यांच्याकडे होता. करेवाड यांनी जगतापला गुन्ह्यातील कलमे कमी करण्यासाठी तसेच शिक्षा होणार नाही, असे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. जगताप याने १ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणीअंती करेवाड यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा खासगी लेखनिक रमेश नारायण शिंदे याने जगतापकडे दुचाकीची मागणी केली, लाचेच्या रक्कमेची २० हजारांवर तडजोड करीत ही लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी बुधवारी लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या तक्रारीवरून करेवाड व शिंदेविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना अटक केल्याचे पोलिस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लघुउद्योगांना येणार ‘अच्छे दिन’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औद्योगिक नकाशावर औरंगाबादची 'अॅटोमोबाइल हब' अशी ओळख आहे. मोठ्या उद्योगांना पार्ट पुरविणाऱ्या लघुउद्योजकांना उत्पादकतेत वाढ करून अधिक दर्जेदार उत्पादननिर्मिती व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने पाच लिन क्लस्टरना मंजुरी दिली आहे. यामुळे औरंगाबादच्या औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळणार आहे, अशी माहिती चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) चे अध्यक्ष आशिष गर्दे, मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (मासिआ)चे अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

यावेळी प्रसाद कोकीळ, रमण अजगावकर, मोहिनी केळकर, सुनील किर्दक आदींची उपस्थिती होती. अजगावकर म्हणाले, 'लघुउद्योजकांना एकत्र करून त्याचे क्लस्टर बनविले जाते. याठिकाणी आपापल्या उद्योगाशी संबंधित तंत्रज्ञान, उत्पादनविषयक मार्गदर्शन सल्लागारामार्फत केले जाते. देशात अनेक शहरात विविध उत्पादनांशी संबंधित क्लस्टर बनविले आहेत.

औरंगाबादेत असे लिन क्लस्टर असावे, यासाठी आम्ही ऑगस्ट महिन्यात मेटल, प्लास्टिक, मशिनिंग, इंजिनीअरिंग आणि परिवर्तन या पाच लिन क्लस्टरच्या मंजुरीसाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंगळवारी मंजुरी मिळाली. या अंतर्गत केंद्राकडून प्रोत्साहन म्हणून ८० टक्के अनुदान दिले जाईल. प्रत्येक क्लस्टरसाठी नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी कौन्सिल मान्यताप्राप्त सल्लागार नेमावा लागेल. या सल्लागाराकडून १८ महिने मार्गदर्शन केले जाईल. त्यासाठी फिस दिली जाईल. यासाठी केंद्राचा ८० टक्के वाटा असेल. पाचही लिन क्लस्टरला कार्यान्वित करण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. आपल्याकडे अॅटोमोबाइल हब असल्याने या पाचही क्लस्टरमध्ये सहभागी होणाऱ्या लघुउद्योजकांना निश्चितच फायदा होईल.'

'पाचही क्लस्टरमधून ४४ लघुउद्योजकांची नोंदणी झाली आहे. लवकरच सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. औरंगाबादेत कौन्सिल मान्यताप्राप्त सल्लागारांची कमतरता आहे. आपल्याकडे असलेल्या तांत्रिक सल्लागारांनी कौन्सिलकडे नोंदणी केली तर आपल्याला स्थानिक लाभ होईल. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी येत्या शुक्रवारी दुपारी चार वाजता सीएमआयए कार्यालयात जागृती कार्यक्रम आयोजित केला आहे,' असे श्री. गर्दे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तिकरात औरंगाबादचा वाटा ३०० कोटींचा

0
0

सहा महिन्यांत अर्ध्यापेक्षा जास्त टार्गेट पूर्ण

औरंगाबाद : शहरवासीयांनी आजपर्यंत जवळपास ३०० कोटींचा प्राप्तिकर भरला आहे. वर्षभरासाठी ५०२ कोटींच्या वसुली टार्गेट आहे. सहा महिन्यांत अर्ध्यापेक्षा जास्त टार्गेट पूर्ण झाले असून, आगामी पंधरा दिवसांत हा आकडा वाढेल, अशी माहिती प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. ३० सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ऑनलाइन प्राप्तिकर भरण्याची मुभा देण्यात आली आहे.

प्राप्तिकर विभागाला सुमारे १ लाख नवे करदाते तयार करण्याचा वर्षभराचे उद्दीष्ट आहे. ३० सप्टेंबरपर्यंत साधारणतः २५ ते ३० हजार नवे करदाते तयार झाले आहेत. विविध व्यवसायानुसार कर भरणारे वाढत आहेत. इंडियन मेडिकल असो‌सिएशन, व्यापारी महासंघ, इन्स्ट‌िट्यूट ऑफ इंजिनिअर्स आणि चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्र‌िकल्चर, आर्किटेक्ट असो‌सिएशन यांच्या माहितीनुसार शहरातील विविध कर दात्यांची आकडेवारी खूप बोलकी आहे. संबंधित संघटनांकडे नोंदणी झालेले सर्वजण करदाते आहेत. शिवाय नोंदणी न झालेले देखील करदाते आहेत. ३० तारखेपर्यंत किती टॅक्स भरला जाईल, याचा आकडा तसा सांगणे कठीण आहे. मात्र, निम्मे टार्गेट तरी पूर्ण झालेलेच असते. टॅक्स भरण्याचे काम हे १५ ऑक्टोबरपर्यंत चालते, असे सीए आणि प्राप्तिकर विभागाच्या अधिकारी वर्गाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसंगे महापालिकेचे ‘स्मार्ट टुरिझम’!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'येत्या काळात औरंगाबाद स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाईल. त्यादृष्टीने कामाला सुरुवात झाली आहे. आता शहराची 'स्मार्ट टुरिझम' अशी ओळख प्रस्थापित करण्यासाठी जोमाने काम करू,' असा निर्धार महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला.

गुजरातच्या गांधीनगरजवळ स्मार्ट सिटी संकल्पनेतील 'गिफ्ट सिटी' उभारण्याचे काम सुरू आहे. या सिटीला महाजन यांच्यासह विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी निधी पांडेय यांच्यासह काही बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्ट यांनी भेट दिली. तेथील कामाची पाहणी त्यांनी केली. गुजरातहून परतल्यानंतर आयुक्तांशी 'मटा'ने संवाद साधला.

महाजन म्हणाले, 'गिफ्ट सिटीची संकल्पना अफलातून आहे. ८०० एकर जागेवर फायनान्शियल ट्रेड सेंटर विकसित केले जात आहे. त्या पध्दतीचे शहर आपल्याकडे विकसित करणे शक्य नसले तरी, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात आपल्याला काम करता येईल. औरंगाबाद पर्यटन राजधानीचे शहर आहे. स्मार्ट टुरिझमच्या दृष्टीने या शहराचा विकास कसा करता येईल, याचा अभ्यास केला जाईल. त्यासाठी नागरिकांच्या सहभागाची व प्रतिसादाची गरज आहे. औरंगाबादला ऐतिहासिक वारसा तर आहेच, पण शहरापासून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी आहेत. तीन ज्योर्तिलिंग, नांदेडचा गुरुद्वारा मराठवाड्यात आहे. शिर्डी, शनिशिंगणापूरला जाण्यासाठी औरंगाबाद सोयीचे आहे. त्यामुळे या शहरात टुरिझमचा व्यवसाय जोर धरू शकतो. दक्षिण भारतातील नागरिकांनी टुरिझमचा व्यवसाय म्हणून स्वीकार केला आहे. त्यातून रोजगार निर्मिती होते. स्वयंरोजगाराला चालना मिळते. आपल्याकडे शिर्डी, त्र्यंबकेश्वर येथे हा प्रकार पाहायला मिळतो. अशीच संस्कृती नागरिकांच्या सहभागाने औरंगाबादेत प्रस्थापित करता येईल. स्मार्ट सिटीचाच हा एक भाग असेल,' असे महाजन म्हणाले.

शासनाकडून किंवा प्रशासनाकडून सर्व गोष्टी होण्याची शक्यता नाही. त्यांना काम करताना मर्यादा येतात. त्यामुळे अशा उपक्रमात नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी येत्या काळात काही ठोस योजना आखण्याचा विचार आहे. नागरिकांनी ठरवले तर, हे शहर स्मार्ट टुरिझमचे शहर होऊ शकेल.

- प्रकाश महाजन, आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅँकेला गंडा घालून ऑर्बिट कंपनी फरार

0
0

मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

अदालत रोडवरील पंजाब नॅशनल बॅँकेला साडेतीन कोटींचा गंडा घालून ऑर्बिट कंपनीचा मालक अनिल राजदयाल रॉय फरार झाला आहे. या प्रकरणी मुख्य व्यवस्थापक अनिलकुमार प्रसाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऑर्बिटचा मालक अनिल रॉय, व्यवस्थापक दादा पाटील-घोगडेसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

वाळूज एमआयडीसीतील सेक्टर एल-४५ मधील ऑर्बिट इन्डस्ट्रीजचे मालक अनिल राजदयाल रॉयने २०१२मध्ये सी.सी (कॅश क्रेडिट लोन) कर्ज घेतले होते. या कर्जासाठी सेक्टर एल-४५ येथील ८०० स्क्वेअर मीटरचे बांधकाम केलेला प्लॉट व कंपनीतील एकूण १७ मशीन तारण ठेवल्या. बँकेने नियमानुसार रॉयला एकूण ३ कोटी ५० लाखांचे कर्ज दिले. कर्जातील खात्याचा व्यवहार मार्च २०१५पर्यंत सुरळीत होता. मात्र, खात्यावरील रक्कम काढून घेतल्यानंतर रॉयने खात्यावरील सर्व व्यवहार बंद केले. त्यानंतर बँकेने रॉय यास डिफॉल्टर घोषित करून ६० दिवसांची नोटीस बजावली. कर्जापोटी जप्तीच्या कारवाईचा इशारा दिला. या नोटीसचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच रॉयने पलायन केल्याचे पा‌ेल‌िसांनी सांगितले.

बॅँकेने चौकशी केली असता १६ सप्टेंबर रोजी हा प्रकार उघड झाला. त्यानंतर ऑर्बिटचा मालक अनिल राजदयाल रॉय, कर्ज जामिनदार सुनील राजदयाल रॉय, संगीता अनिल रॉय व व्यवस्थापक दादा पाटील-घोगडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१०० कामगारांचा पगार बुडवला

'ऑर्बिट'मध्ये काम करणाऱ्या जवळपास १०० कामगारांचे सहा महिन्यांचे पगार बुडविण्यात आले आहेत. कामगारांना आज, उद्या पैसे देतो असे सांगून रॉयने पगार करण्याची मुदत १६ सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. अन् १५ सप्टेंबरच्या रात्रीच त्याने पलायन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिसेंबरच्या बिलात व्याज

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात आता सर्वांना दर दोन महिन्याला पाणीपट्टीचे बिल दिले जाणार आहे. निर्धारित वेळेत पाणीपट्टी न भरल्यास वार्षिक १८ टक्के व्याज आकारले जाणार आहे. पालिका प्रशासनाने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला व्याज आकारणीबद्दल कळवले आहे. त्यामु्ळे डिसेंबर महिन्याचे पाण्याचे बिल व्याजासह आकारण्यात येणार आहे.

औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे समांतर जलवाहिनी टाकणे, पाणीपुरवठा व पाणीपट्टीचे वितरण ही कामे देण्यात आली आहेत. पाणीपट्टी वसुलीचे काम पालिकेनेच करावे, असे आदेश पालकमंत्री रामदास कदम व खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले होते. सर्वसाधारण सभेतही तसा ठराव घेऊन प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. परंतु, त्यानंतरही कंपनीतर्फेच पाणीपट्टी वसुली केली जात आहे.

मीटर बसवेल्या नळ कनेक्शनधारकाला कंपनीतर्फे दर दोन महिन्याला पाणीपट्टीचे बिल दिले जाते. मीटर नसलेल्या ग्राहकांना मार्चपूर्वी पाणीपट्टी भरण्याची सक्ती केली जात आहे. पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना एसएमएस आणि फोन केले जात असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. व्याज आकारणीबद्दल महापालिका प्रशासनाने कंपनीला आदेश दिले असून डिसेंबरमध्ये दिल्या जाणाऱ्या बिलात व्याज आकारणीचा उल्लेख केलेला असेल. सर्वच ग्राहकांनी दर दोन महिन्याने पाणीपट्टीचे बिल भरण्याची सक्ती केली जाणार आहे.

मीटर नसलेल्यांनाही बिल

मीटर नसलेल्या नळधारकांना सरसकट ३३५५ रुपये वार्षिक पाणीपट्टी आकारली जाणार आहे. या रक्कमेला १२ ने भागाकार करून एक महिन्याची रक्कम काढली जाईल, त्यानुसार दर दोन महिन्यांला ग्राहकांना बिल दिले जाणार आहे. त्यावर भरणा करण्याच्या अंतिम तारखेचा उल्लेख असणार आहे. त्या तारखेनंतर बिल भरले तर दरमहा दोन टक्के व्याज आकारले जाणार आहे.

शासनाने व्याज आकारणीला मान्यता दिली आहे. मीटर नसलेल्या ग्राहकांना बिल भरण्याचे येणारे एसएमएस एक प्रकारची नोटीस आहे. नोटीस दिल्यावर लगेच कारवाई करता येत नाही. पण नागरिकांनी देखील सतर्क राहून वेळेत पाणीपट्टी भरावी.

- हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता

जे ग्राहक ३० सप्टेबरपर्यंत बिल भरतील त्यांना व्याज आकारले जाणार नाही. त्यानंतर तारखेनंतर बिल भरणाऱ्यांना व्याज आकारले जाईल. डिसेंबर महिन्याच्या बिलात त्याचा समावेश केला जाणार आहे. पाणीपट्टी ऑनलाइन भरता यावी यासाठी लवकरच सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

- राहुल मोत‌ियाळे, पीआरओ, 'समांतर'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्षदा निठवेची सुवर्णझेप !

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय संघातून प्रथमच खेळताना औरंगाबादची उदयोन्मुख नेमबाज हर्षदा निठवेने सांघिक सुवर्ण व वैयक्तिक ब्राँझ अशा दोन पदकांची कमाई केली. हर्षदाच्या यशाने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

मुलींच्या यूथ गटात १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात हर्षदाने १७४.८ गुणांची कमाई करताना वैयक्तिक ब्राँझपदक जिंकले. या प्रकारात रोस्तमियान हनी हिने (१९५.६ गुण) सुवर्णपदक तर, लिया मोहंमदीने (१९५.४) रौप्यपदक मिळविले. सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देताना हर्षदाने ३७३ गुणांची कमाई केली. हर्षदा निठवे, मलाइका गोयल व नयनी भारद्वाज या भारतीय संघाने सांघिक सुवर्णपदक मिळविले.

एमजीएम शूटिंग रेंजवर गेल्या चार वर्षांपासून नियमित सराव करणाऱ्या हर्षदाला प्रशिक्षक संग्राम देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. आशियाई नेमबाजी स्पर्धेसाठी हर्षदाची भारतीय संघात प्रथमच निवड झाली आहे. राज्य नेमबाजी स्पर्धेत तिने अनेक पदके जिंकली आहेत. भारताच्या यूथ एअर पिस्तुल संघात हर्षदा ही एकमेव महाराष्ट्रीयन नेमबाज आहे. एअर पिस्तुल प्रकारात दिल्ली, पंजाब यांचा अधिक दबदबा आहे. या कामगिरीबद्दल हर्षदाचे प्रशिक्षक संग्राम देशमुख म्हणाले, 'आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा प्रथमच खेळताना तिने दोन पदके जिंकली. चांगली कामगिरी करण्याचा तिच्यावर दबाव होता. दोन पदके जिंकून तिने अपेक्षापूर्ती केली. आता तिच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षणमंत्र्यांवर आगपाखड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या धोरणांविरोधात संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत आगपाखड केली. पंधरा वर्षापासून कायम विनाअनुदानित तत्तवार काम केल्यानंतर आणखी किती दिवस फुकट काम करायचे असा सवाल करत, नवी धोरणांसह केंद्रीय भरती प्रक्रियेला विरोध केला. मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याची भाषा करणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी आधी आपली पदवी तपासून पाहा, असा घणाघातही यावेळी संस्थाचालकांनी केला.

औरंगाबादमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे शैक्षणिक प्रश्नांवर संस्थाचालक, विविध संघटनांची देवगिरी कॉलेजच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात बैठक झाली. या बैठकीला आमदार विक्रम काळे, डॉ. गफ्फार कादरी, उद्धव भवलकर, सुशिला मोराळे, मिलिंद पाटील, द्वारकादास पाथ्रीकर, वसंत पाटील, डॉ. प्रकाश भांडवलदार यांची उपस्थिती होती.

शिक्षण मंत्री तावडेंनी मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर आरोप करण्यापेक्षा आपली पदवी तपासून पाहावी, असे टोमणे अनेकांनी आपल्या भाषणात मारले. मंत्रिमंडळ बैठकीवर महामोर्चा काढण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. बैठकीला डॉ. अविनाश येळीकर, कृष्णा डोणगावकर, किरण पाटील, सलीम मिर्झा, अजमल खान, प्रा. सुनील मगरे, मारोती खेडेकर, रावसाहेब आवारी, रवींद्र तौर, सुजाता पवार आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक एस. पी. जवळकर यांनी केले. वाल्मिक सुरासे यांनी सूत्रसंचालन तर, आभार मनोज पाटील यांनी मानले.

भाषणात गोंधळ

सर्जेराव ठोंबरे भाषणासाठी उभे राहिले. त्यांनी शासनाची सकारात्मक बाजू मांडतो असे सांगताच उपस्थितांनी संताप व्यक्त केला. 'संस्थाचालकांचे प्रतिनिधी म्हणून बोला, सरकारचे नको. तावडेंच्या आठमुठे धोरणाचे समर्थन करू नका,' असे सांगत अनेकजण उभे राहिले. अधिकाऱ्यांनी जुजबी त्रुटी काढून आमच्याकडून लाखो रुपये घेतले असा आरोपही काही जणांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरव्यवहार चव्हाट्यावर येणार

0
0

तुळजाभवानी मंदिराची सीआयडी चौकशी पूर्ण होणार

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

तुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहाराची चौकशी दोन महिन्यांत पूर्ण करावी, असे आदेश गृहमंत्रालयाने सीयडी विभागाला देताच सीआयडी पथक तातडीने तुळजापूरात दाखल झाले आहे. यामुळे या मंदिरातील गैरव्यवहार चव्हाट्यावर येणार या भितिने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. राजकीय दबावापोटी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील बहुचर्चीत गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी रखडली होती.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन दान पेटीत मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू (सोने, चांदीचे दागिने) पडत होत्या. मात्र, १९९१ ते २००९ या कालावधीत लिलाव धारकांनी लिलावासंदर्भातील नियम व अटी गुंडाळून या सिंहासन पेटीतील मौल्यवान वस्तूंचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

१९९१ ते २००९ या सुमारे १९ वर्षांच्या कालावधीत सिंहासन दानपेटीत केवळ ४६ ग्रॅम ७०० मिली सोने व ५१२ मिलीग्रॅम चांदी देवस्थानकडे जमा झाली होती. या अनुषंगाने तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन पेटीत भाविकांकडून श्रद्धेने अर्पण केल्या जाणाऱ्या सोने व चांदीच्या वस्तूंचा अपहार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर धर्मदाय सहआयुक्त, लातूर यांच्या आदेशानुसार १९ मार्च २०१० रोजी सायंकाळी ६.१० वाजता सिंहासन दानपेटी सील बंद करण्यात आली. ती पंचाच्या उपस्थितीत १९ एप्रिल २०१० रोजी उघडली असता ३२ दिवसांत या पेटीत ४४१ ग्रॅम सोने व ६ हजार १७१ ग्रॅम चांदी आढळून आली होती. त्यासोबतच २३ लाख १३ हजार ८३७ रुपये रोख प्राप्त झाले होते. म्हणजेच सिंहासन दान पेटीत सुमारे ३२ लाखांचा ऐवज मिळाला.

१९९१ ते २००९ या कालावधीत सिंहासन पेटीतील रक्कमेचा लिलाव केला जात होता. २००९ ते २०१०मध्ये सिंहासन पेटीतल मौल्यवान वस्तूंचा लिलाव केला असता तो अवघ्या ३७ लाखाला गेला होता. यावरून या दानपेटीमध्ये सोने चांदीच्या मौल्यवान वस्तू भाविकांकडून अर्पण करण्यात येत होत्या. मात्र, ठेकेदांरांनी या वस्तूंवर डल्ला मारल्याने सकृतदर्शनी सिद्ध झाले होते. त्यामुळे दान पेटीत मागील २० वर्षांत झालेल्या सर्वच व्यवहाराची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने १४ मे २०१२ रोजी या प्रकरणाची चौकशीही सुरू झाली. मात्र, व्यवहाराशी संबंधित अनेक महत्वाची कागदपत्रे प्राप्त होण्यास अडथळे येत असल्यामुळे व राजकीय दबावापोटी ही चौकशी प्रक्रिया रखडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सनातन’मधून मुलीच्या सुटकेसाठी धडपड

0
0

कारवाई करण्यासाठी जनहित याचिका दाखल

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

सनातनचे संस्थापक जे. बी. आठवले आणि त्यांच्या पत्नीने संमोहन शास्त्राच्या माध्यमातून मुलीला जाळ्यात ओढले. त्या मुलीचे ब्रेनवॉश करून सनातन संस्थेच्या कळपात खेचले आहे. अशाच प्रकारे राज्यातील अनेक निरागस तरुण आणि तरुणींना धर्माच्या नावाने जाळ्यात ओढून गैरमार्गाला लावणाऱ्या सनातन संस्थेच्या आश्रमावर छापे टाकावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका अणदूर (ता. तुळजापूर) येथील राजेंद्र स्वामी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक असलेल्या समीर गायकवाडला अटक झाली. त्यानंतर सनातन संस्था आणि त्यातील साधक संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अणदूर येथील राजेंद्र स्वामी यांना तीन मुली व दोन मुले आहेत. यापैकी उच्च शिक्षित असलेली प्रियंका ही सनातनच्या संपर्कात आली. ३ जुलै २००९ पासून ती गायब असून सनातन आश्रमात असल्याचे समजल्यानंतर तिला तेथून बाहेर काढण्याचा स्वामी यांनी आटोकाट प्रयत्न

केला. यासाठी अध्यात्मिक गुरु बरोबरच राजकीय मंडळींचे दरवाजे ठोठावले. गेल्या सहा वर्षांपासून ते आपल्या प्रियंका सनातनच्या तावडीतून सोडवू शकले नाहीत. सनातनमधील गैरप्रकाराचा संशय असल्याने स्वामी यांनी २०११ पासून आवाज उठविला. परंतु त्याला प्रतिसाद ही मिळाला नाही.

हिप्नॅटिझम आणि मानसिक उपचार करून प्रियंकाला सनातनच्या आश्रमात डांबून ठेवण्यात आले आहे. सनातन संस्थेचे संस्थापक हे संमोहन शास्त्राच्या आधारे युवक-युवतींची फसवणूक करून आपल्या जाळ्यात ओढत आहेत.

- राजेंद्र स्वामी, अणदूर, ता. तुळजापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खात्यातून सक्तीची वसुली

0
0

उस्मानाबाद डीसीसी बँकेमुळे शेतकऱ्यांना सोसावा लागतोय भुर्दंड

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याऐवजी उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँक गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या खात्यातून सक्तीने वसुली करीत आहे. बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखा सीबीएस पद्धतीने (कम्प्युटर पद्धत) जोडण्यासाठी महिन्याला दहा रुपये खात्यातून आकारले जात आहेत. प्रति महिना ४७ लाख ५० हजार रुपये रक्कम खात्यातून काढून काम करणाऱ्या एजन्सीला देण्यात येत आहे.

उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या सर्व शाखा सीबीएस पद्धतीने (कम्प्युटर पद्धत) जोडण्याचे काम पुणे येथील ट्रायमॅक्स इन्फ्ररास्ट्रकचर एजन्सीला देण्यात आले आहे. ऑक्टोबर २०१२ ते ऑक्टोबर २०१७ पर्यंत हे काम या एजन्सीला देण्यात आले आहे. या कामाचा मोबदला म्हणून प्रति महिना ४७ लाख ५० हजार रुपये रक्कम एजन्सीला देण्याचा करार बँकेने केला आहे.

कराराची ही भली मोठी रक्कम देण्याची बँकेची ऐपत नसल्याने बँकेच्या प्रत्येक खातेधारकांकडून महिन्याला दहा रुपये रक्कम खात्यातून आकारले जात आहेत. बँकेचे सर्वेसर्वो तथा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या आग्रहास्तव ही प्रणाली बँकेत कार्यान्वित करण्यात आली असल्याचे समजते. ऑक्टोबर २०१३ पासून बँकेकडून शेतकऱ्याच्या वैयक्तीक, सेव्हींग, चालू आणि सोसायटीच्या खात्यातून तीन महिन्याला ३० रुपये काढले जात आहेत.

उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या सर्व शाखातून सुमारे ७,९३,००० विविध प्रकारची खाते आहेत. यापैकी ४ लाख ७० हजार खात्यातून ही रक्कम सध्या आकारली जात आहे. या सीबीएस प्रणालीसाठी किती खर्च आतापर्यंत झाला अथवा संबधित एजन्सीला किती रक्कम अदा करण्यात आली, याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाही. केवळ करारानुसार ४७ लाख ५० हजार रुपये रक्कम एजन्सीला देण्याचे ठरले असल्याचे या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्रीत नव्याने आरक्षण सोडत

0
0

म. टा प्रतिनिधी, फुलंब्री

येथील नगरपंचायत प्रभाग अारक्षणाची सोडत गुरुवारी काढण्यात आली. यावेळी १७ प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यापूर्वी २० अाॅगस्ट राेजी प्रभाग रचना व अारक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र पानवाडीच्या महसूल हद्दीच्या प्रश्नामुळे लाेकसंख्या कमी झाल्याने नव्याने प्रभाग रचना करून अारक्षण सोडत काढण्यात आली.

फुलंब्री-पानवाडी अशी ग्रुपग्रामपंचायत होती. फुलंब्री नगरपंचायत झाल्यानंतर पानवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. त्यामुळे पानवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्याने फुलंब्री नगरपंचायतीचे चार वार्ड कसे अाले अशी हरकत घेतली. तेथील मतदार पानवाडी ग्रामपंचायतीला जोडावेत असा युक्तीवाद केला. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याने गुरुवारी नव्याने प्रभाग रचना करून अारक्षण सोडत काढावी लागली.

फुलंब्रीची २०११ च्या जनगणनेनुसार १६ हजार ६६५ लोकसंख्या होती, त्यानुसार नगरपंचायत अस्तित्वात आली. येथील ३९८२ लोकसंख्या पानवाडी ग्रामपंचायतीमध्ये गेली. त्यामुळे आता नगरपंचायतची लाेकसंख्या १२ हजार ६८३ राहिली आहे.

प्रभाग रचना व सोडत काढणे ही प्रक्रिया उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार तथा प्रशासक किशाेर देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अशाेक कायंदे यांनी पूर्ण केली. यावेळी माजी सरपंच सुहास शिरसाठ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठाेंबरे, देवगिरी साखर कारखान्याचे नितिन देशमुख, रऊफ कुरेशी, महेमूद पटेल, अजय गंगावणे, शेखलाल पटेल, राजेंद्र नागरे, जमीर पठाण, रवींद्र काथार यांच्यासह राजकीय पुढाऱ्यांची उपस्थिती होती.

वॉर्डनिहाय आरक्षण

प्रभाग १ (सर्वसाधारण), प्रभाग २ (सर्वसाधारण महिला), प्रभाग ३ (अाेबीसी महिला), प्रभाग ४ (अनुसूचित जाती), प्रभाग ५ (सर्वसाधारण), प्रभाग ६ (अाेबीसी), प्रभाग ७ (सर्वसाधारण महिला), प्रभाग ८ (सर्वसाधारण महिला), प्रभाग ९ (सर्वसाधारण), प्रभाग १० (सर्वसाधारण महिला), प्रभाग ११ (सर्वसाधारण महिला), प्रभाग १२ (अाेबीसी महिला), प्रभाग १३ (अनुसूचित जमाती महिला) प्रभाग १४ (अाेबीसी), प्रभाग १५ (अाेबीसी महिला), प्रभाग १६ व १७ (सर्वसाधारण).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावांच्या भेटीसाठी सेना-भाजपात स्पर्धा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांना भेट देण्यासाठी शिवसेना व भाजपमध्ये जणू स्पर्धा लागली आहे. शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याकरिता शुक्रवारी पालकमंत्री रामदास कदम आणि विधानसभा अध्यक्ष हर‌िभाऊ बागडे हे भेट देणार आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ९९ गावे बाधित झाली आहेत. कदम दोन दिवस तर बागडे एक दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत.

जिल्ह्यात १८ सप्टेबर रोजी सकाळपर्यंत ७२.९५ मिलिमीटर तर १९ रोजी सकाळपर्यंत औरंगाबाद ६०.९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ‌अतिवृष्टीमुळे औरंगाबाद, फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. आपत्तीग्रस्तांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे व पालकमंत्री रामदास कदम अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी देणार आहेत. हर‌िभाऊ बागडे शुक्रवारी सकाळी ९ पासून कनकोरा, अंजनडोह, धोंडखेडा, लाडसावंगी, सय्यदपूर, औरंगपूर, चारठा, सेलूद व नायगव्हाण या गावांना भेट देणार आहेत. पालकमंत्री रामदास कदम हे साडेनऊपासून औरंगाबाद तालुक्यातील अंजनडोह, सेलूद, चारठा, औरंगपूर, सय्यदपूर व लाडसावंगी या गावांना भेटी देणार आहेत. शनिवारी रामदास कदम हे भालगाव, बनकिन्होळा या गावांना भेट देणार आहेत. बागडे व कदम यांचा शुक्रवारचा दौरा एकत्र की वेगवेगळा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जिल्ह्यात तब्बल दीड हजार घरांची पडझड झाली असून १३३ जनावरांचा बळी गेला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

बैठकाही स्वतंत्र

अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट दिल्यानंतर पालकमंत्री रामदास कदम शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. विधानसभा अध्यक्ष हर‌िभाऊ बागडे शनिवारी (३ ऑक्टोबर) फुलंब्री तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व त्यावरील उपाययोजनांबद्दल विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अद्रकाच्या मुळांना रोग

0
0

मर रोग, कंदसडमुळे शेतकरी हवालदिल

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यात सध्या अद्रक पिकावर कंदसड, मुळकूज व मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तालुक्यात सुमारे ५ हजार हेक्टरवर अद्रकाची लागवड झाली असून, रोगामुळे उत्पादन घटण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. सध्या या रोगाचा प्रादूर्भाव एक हजार एकरवर दिसत आहे.

तालुक्यातील बहिरगाव, कन्नड, अंधानेर, हतनूर, चिंचोली लिंबाजी, नेवपूर या गावांमध्ये अद्रक लागवड केली जाते. येथील शेतकरी २००५पासून रायपूर पॅटर्नचा उपयोग करून अद्रकचे विक्रमी उत्पादन घेतात. शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतल्याने बँकांना अद्रक उत्पादकांकरिता पीक कर्ज दिले आहे. या पिकाला मुबलक पाणी लागत असल्याने शेतकऱ्यांनी पाणी मिळवण्याकरिता मोठा खर्च केला आहे. लागवड, मशागत, फवारणी व मजुरी आदी खर्च एकरी एक लाखावर पोहोचला आहे.

तालुक्यात सर्वप्रथम २०१३मध्ये सुमारे २० टक्के क्षेत्रावर मुळकूज रोगाचा प्रादूर्भाव झाला. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी दुकानदाराच्या सल्ल्याने औषधी वापरल्याने २०० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. त्याबद्दल कृषी विभागाकडून नाममात्र कारवाई करण्यात आली. यावेळी पुन्हा रोगांचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

रोगावर उपाय

मोरचूद २ किलो, कळीचा चुना २ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून एक एकरसाठी ड्रेचिंग करावे. मेटालॅक्सील ५०० ग्रॅम, बेनोफीट ५०० ग्रॅम, क्लोरोपायरीफॉस ५०० मि.लि., २०० लिटर पाणी याप्रमाणात ठिबक संचाच्या सहाय्याने सोडावे. जैविक औषधी प्रकारात ट्रायकोडर्मा विरीडी ५ किलो, शेणाची स्लरी ठिबक संचाद्वारे १०० लिटर पाण्याद्वारे द्यावे. जैविक औषधीचा वापर केल्यानंतर रासायनिक खते व औषधीचा वापर किमान १० ते १२ दिवस टाळावा. पाण्यात खताचा अतिवापर टाळावा, असा उपाय तालुका कृषी अधिकारी एस. एम. पेंडभाजे यांनी सुचव‌िला आहे.

रोगाची कारणे

लागवडीसाठी अयोग्य बेन्याची निवड, लागवड करताना जमीन नैसर्गिकरित्या निर्जंतूक न करणे, पीक फेरपालटाचा अभाव, सूक्ष्म अन्नद्रव्य व रासायनिक खतांचा ओव्हरडोस, वातावरण बदलाच्या नोंदी न घेणे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मेक इन औरंगाबाद’

0
0

Makarand.Kulkarni @timesgroup.com

वडिलांचा उद्योग पुढे सांभाळताना त्यात नाविन्यपूर्ण बदल केले. पारंपारिक साधनांचा वापर करण्याऐवजी संशोधन करून स्वतः एखादे फायदेशीर यंत्र बनविण्याची जिद्द अंगी बाळगली. चीन, जपानचे तंत्रज्ञान वापरण्यापेक्षा आपणच मशीन विकसित करावे, असा विचार करून हर्षवर्धन छल्लानी यांनी 'इन्फ्रारेड ओव्हन'चे तंत्र विकसित केले आहे. भारतात प्रथमच हे तंत्र वापरण्यात येत असून, याचे पेटंट छल्लानी यांच्या नावावर असणार आहे. उद्योगांसाठी हे तंत्र निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

अकोला जिल्ह्यातल मंगरूळपीर हे विजय छल्लानी यांचे मूळ गाव. उद्योगानिमित्त ते औरंगाबादेत आले. १९९०मध्ये त्यांनी पॅकिंग पट्टीचा उद्योग सुरू केला. त्यांचे द्वितीय चिरंजीव हर्षवर्धन. लिटल फ्लॉवर शाळेतून २००३मध्ये दहावी. 'देवगिरी'तून बारावी आणि २००९मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून कम्प्युटर सायन्स विषयात पदवी पूर्ण केली. वडिलांचा उद्योग असल्याने २००६पासूनच हर्षवर्धन यांचा तिकडे ओढा होता. वाळूज औद्योगिक वसाहतीतील 'विजय को पॉल्यूमर्स'मध्ये पॅकिंग पट्टी बनविल्या जातात. प्रत्येक बॉक्सला पॅकिंगची पट्टी आवश्यक असते. ग्राहकांच्या मागणीनुसार पट्टी बनवून दिल्या जातात. हर्षवर्धन यांनी तीन वर्षे उद्योगाचे तंत्र अात्मसात करून घेतल्यानंतर २००९पासून पूर्णवेळ उद्योगाकडे लक्ष देण्यास सुरवात केली. तयार होणाऱ्या एकूण उत्पादनातून २५ टक्के उत्पादन निर्यात होते. विविध नामांकित बहुराष्ट्रीय उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना हर्षवर्धन यांच्या कंपनीतून पट्टी सप्लाय होतात. एसबीआय, देसाई ब्रदर्स, प्रविण मसालेवाले यांच्यासह प्रमुख वृत्तपत्रांसाठीही विजय को पॉल्यूमर्सच्या पट्टी पुरविल्या जातात. देशभरातील सर्व प्रमुख उद्योगांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हर्षवर्धन यांचा उद्योग 'कनेक्टेड' आहे. उद्योगाचे जाळे वाढविण्यासाठी त्यांनी देशभरात फिरून मोठे जाळे विणले आहे. कंपनीमध्ये उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या मशीनरी अद्ययावत करण्यावर त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. जपान, कोरियामधील तंत्रज्ञानाची कास धरून उत्पादनातील दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी संशोधनात्मक कार्य केलेले आहे. कंपनी पूर्णपणे अॅटोमेटेड आहे. सर्व यंत्रांची देखभाल दुरुस्ती करताना त्यात काही नवीन आले असेल तर, अपडेट करून घेण्यावर त्यांचा भर असतो. सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचा विचार हर्षवर्धन यांच्या मनात आला. त्यांनी कंपनीत ही सिस्टिम उभी केली. याच वर्षी हा सेटअप पूर्ण झाला. सध्या सोलरच्या माध्यमातून दररोज १२ युनिट वीजनिर्मिती केली जाते. उद्योगाला लागणाऱ्या एकूण विजेच्या तुलनेत ही निर्मिती कमी असली तरी भविष्याचा वेध घेऊन हर्षवर्धन छल्लानी यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद म्हणावे लागेल. २०१३मध्ये त्यांचे लग्न अमृता यांच्याशी झाले. अमृता व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. नवीन उपक्रम राबविण्यासाठी वडील विजय, आई सुलोचना, मोठे बंधू जयंत यांचे मार्गदर्शन आणि पत्नी अमृता, छोटे बंधू स्वराज यांचे प्रोत्साहन, ऊर्जा देत असल्याचे हर्षवर्धन सांगतात.

आपण नेहमी मेहनत करतो. कधी कधी गरजेपेक्षा जास्त मेहनत घेतो, पण ज्या मशीनरीवर काम करतो ते तंत्र परदेशीच का विकसित करतात, असा प्रश्न आपल्याला पडायला हवा. संशोधनावर कायम भर द्यावा, असा सल्ला हर्षवर्धन छल्लानी नव्याने उद्योगात येऊ इच्छिणाऱ्यांना देतात.

इन्फ्रारेड ओव्हनची निर्मिती

हर्षवर्धन छल्लानी यांनी इन्फ्रारेड ओव्हनची निर्मिती केली आहे. हिट प्रोसेसिंग प्लँटमध्ये प्रोडक्टला हिट देण्यासाठी पाणी किंवा वाफेचा वापर केला जातो. यात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वाया जाते. ती टाळून नवीन काहीतरी करावे या उद्देशाने हर्षवर्धन यांनी इन्फ्रारेड ओव्हन तयार केले आहे. ज्याद्वारे इनडायरेक्ट हिटिंगची प्रक्रिया सोपी जाणार आहे. या उत्पादनाचे पेटंट मिळविण्यासाठी त्यांनी प्रक्रिया पूर्ण केली आहे. लवकरच त्यास मान्यता मिळेल. देशात प्रथमच अशा प्रकारची प्रोसेस तयार करण्यात आली आहे.

परिवर्तन प्रमुख

केंद्र सरकारने औरंगाबाद औद्योगिक वसाहतींसाठी नुकतेच पाच लिन क्लस्टर मंजूर केले आहेत. लघुउद्योजकांनी एकत्र येऊन व्यवसायवृद्धी, दर्जेदार उत्पादनासाठी ही क्लस्टर प्रक्रिया फायदेशीर असते. या पाचपैकी एका क्लस्टरची जबाबदारी छल्लानींकडे सोपविण्यात आली आहे. त्याचे नाव परिवर्तन लिन क्लस्टर असे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा डेपोविरुद्ध वाळूजमध्ये मुंडण

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

तीसगाव येथील नियोजित कचरा डेपोविरुद्ध गुरुवारी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मुंडण आंदोलन केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. दरम्यान शुक्रवारी (२ ऑक्टोबर) ए. एस. क्लब चौकात रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे.

स्वाभामीन शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बजाजनगर येथील मोहटादेवी मंदिर चौकात दुपारी बारा वाजेच्या सुमारास मुंडण आंदोलन करण्यात आले. यावेळी दुर्गेश राठोड, राहुलसिंग राजपूत, सुनील गुराळकर ज्ञानेश्वर फुलारे, पंकज थोरात, देवीदास चिकने, लक्ष्मण पांडव यांनी मुंडण करून निषेध केला. तिसगाव येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. गणेश घुले यांच्या मार्गदर्शनखाली झालेल्या या मोहिमेत दीड हजार नागरिकांनी सह्या केल्या. हे निवेदन जिल्हाधिकारी, महापौरांना देण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निलेश राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य रामंचंद्र कसुरे, सरपंच अंजन साळवे, माजी सरपंच संजय जाधव आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑर्बिटची मशीनरी गोदामात दडवली

0
0

व्यवस्थापक व एका जाम‌ीनदाराला अटक

म. टा. प्रतिनिधी वाळूज

बँकेचे साडेतीन कोटी रुपयांचे कर्ज बुडवून रातोरात पोबारा केलेल्या ऑर्बिट इंडस्ट्रिजच्या मालकाला बँक गॅरंटी देणारा व व्यवस्थापक या दोघांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखविताच व्यवस्थापकाने कारखान्यातील मशीनरी एका गोदामात दडवून ठेवल्याचे उघड झाले.

ऑर्बिट कंपनीचा मालक अनिल राजदयाल रॉय याने पंजाब नॅशनल बँकेकडून साडेतीन कोटी रुपयांचे कर्ज घेऊन बँकेसोबतचा व्यवहार बंद केला. त्यामुळे बँकेने नोटीस बजाविली होती, पण नोटीसचा कालावधी पूर्ण होण्याआधीच कंपनी मालक सर्व मशीनरी घेऊन पसार झाला. या प्रकरणी पंजाब नॅशनल बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनिलकुमार जगन्नाथ प्रसाद यांनी २९ सप्टेंबर रोजी ऑर्बिट कंपनीचा मालक अनिल रॉय, बँक गॅरंटी घेणारे संगीता अनिल रॉय, सुनील रॉय व व्यवस्थापक दादा पाटील धोंडगे यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करून गुरुवारी (१ ऑक्टोबर) गॅरंटी देणारा सुनील राजदयाल रॉय व व्यवस्थापक दादा पाटील धोंगडे या दोघांना अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखविताच दादा पाटील धोगडे याने कंपनीतील सर्व मुद्देमाल परिसरातील एका खासगी गोदामात असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील व बँक कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या गोदामाची पहाणी केली.

मू्ल्यमापन सुरू

गोदामात ठेवलेल्या मशिनरीचे मूल्यमापन करण्याकरिता बँकेने जालना येथून तज्ज्ञास पाचारण करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत मशिनरीची तपासणी करण्यात येत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंग प्रमाणपत्रांसाठी छुपे वेटिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीमध्ये काही महिन्यांपूर्वीपर्यंत अपंगांच्या प्रमाणपत्रासाठी वर्ष-वर्ष असलेले वेटिंग आता एक-दीड महिन्यावर आले असले तरी, मिळालेल्या तारखेला जाऊनही अनेकांना प्रमाणपत्र मिळत नाही. त्यासाठी चार-चार खेटा माराव्या लागतात आणि महिनोमहिने लोटतात.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) सर्व प्रकारच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते. यामध्ये कान-नाक-घसाशास्त्र विभाग, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभाग, नेत्र विभागातर्फे विविध प्रकारच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते. तर मनोरुग्णांना मतिमंदत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते. पूर्वी शहरामध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत ही प्रमाणपत्रे देण्यात येत होती. आजही इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत ही प्रमाणपत्रे देण्यात येतात. मात्र, सद्यस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये केवळ घाटीमधून ही प्रमाणपत्र दिली जातात. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून गोरगरीब अपंग, मनोरुग्ण प्रमाणपत्र घेण्यासाठी घाटीत येतात. एकीकडे प्रमाणपत्र घेण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत असताना, शासनाने सुमारे दोन-अडीच वर्षांपासून ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली. फॉर्म भरण्यासाठी पूर्वीच्या तुलनेत जास्त वेळ लागू लागला. त्यात सिस्टीम हँग होणे, अपुरे मनुष्यबळ व इतर तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्रांसाठी वेटिंग वाढत गेले. काही महिन्यांपूर्वीपर्यंत अपंगाच्या प्रमाणपत्रासाठी चक्क दोन वर्षांपर्यंतचे वेटिंग वाढले होते.

अपंगांसाठी आंदोलन

घाटीत अपंग प्रमाणपत्र देण्याची वेळ एक तासाने वाढवावी, प्रमाणपत्र वाटप तळमजल्यावर व्हावे, ८ दिवसांत प्रमाणपत्र मिळावे, घाटीत अपंगांना पार्किंगची व्यवस्था मोफत असावी, अपंगांना घाटीच्या धर्मशाळेत कमी पैशात राहण्याची व्यवस्था करावी आदी मागण्यांसाठी 'प्रहार अपंग क्रांती आंदोलन' या संघटनेतर्फे गुरुवारी (एक घाटी परिसरात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यात संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, राज्य समन्वयक रामदास म्हात्रे, धमेंद्र सातव, शहादेव उमप आदी उपस्थित होते.

एकतर मिळालेल्या तारखेलाच प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. त्यासाठी वेळ, दिवस, मनुष्यबळ वाढविले पाहिजे. संबंधित डॉक्टर उपस्थित नसल्यास पर्यायी डॉक्टर उपलब्ध केला पाहिजे. ओपीडीची लिफ्ट अनेकदा बंद राहात असल्याने अपंगांना अक्षरशः रांगत जावे लागते. त्यासाठी तळमजल्यावरच प्रमाणपत्र देण्यात यावीत. रँपचीही सोय करावी. तालुका-तालुक्यात प्रमाणपण मिळाले तर घाटीपर्यंत येण्याची गरज राहणार नाही.

शिवाजी गाडे, जिल्हाध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती आंदोलन

आम्ही रोज ५० प्रमाणपत्रे देतो आणि ८ दिवसांपेक्षा वेटिंग नाही. पूर्वी काही प्रमाणात वेटिंग होते, पण आता अजिबात नाही.

डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी गळती हेच टंचाईचे प्रमुख कारण

0
0



श हर आणि ग्रामीण भागात घरगुती वापरापैकी ४० टक्के पाण्याचा अपव्यय नळाच्या माध्यमातून होतो. नळाला तोटी नसणे आणि सतत पाणी गळतीमुळे पाणी वाटपाचा समतोल बिघडतो. खासगी आणि सार्वजनिक नळाच्या दुरुस्तीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढल्यास पाणी टंचाईवर मात करणे शक्य आहे.

सध्या शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, नळाला पाणी आल्यानंतर बेसुमार वापर केला जातो. घरगुती वापरासाठी पाणीसाठा केल्यानंतरही वाहने व फरशी धुणे, अंगणात सडा टाकणे या माध्यमातून पाण्याचा अपव्यय केला जातो. अर्थात, पाणी वापराबाबत बहुतांश नागरिकांमध्ये उदासीनता असल्याने पाणी बचत करणे कठीण झाले आहे. याबाबत जलतज्ज्ञांनी विविध कार्यक्रमांच्या पातळीवर नागरिकांसाठी उपाययोजना सांगितल्या, पण या उपायांची प्रभावी अंमलबजावणी नसल्याने पाण्याची नासाडी सुरू आहे. घरगुती वापरातील ४० टक्के पाणी वाया जाते. नळांना तोटी नसते किंवा तोटीतून पाण्याची गळती सुरू असते. या प्रकारातून घरात शेकडो लिटर पाणी वाया जाते. सार्वजनिक पाणवठे, पाणपोई आणि सार्वजनिक नळ या ठिकाणी सर्वाधिक अपव्यय असल्याचे निदर्शनास आले. जलसाठ्यांमध्ये जेमतेम पाणी असून चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे.

या परिस्थितीत सर्वांनी किमान घरगुती नळाची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. जायकवाडी धरण ते शहरादरम्यान शेकडो ठिकाणी पाणी गळती होते. स्थानिक प्रशासनाने पाणी गळती रोखण्यासाठी उपाय करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्येकाने घरातील पाणी वापरावर निर्बंध घातल्यास निश्चित पाणी बचतीला हातभार लागेल. वाया जाणारे पाणी झाडांना व उद्यानाला दिल्यास निसर्ग संवर्धन शक्य होईल.

काही उपाययोजना

पाणी भरल्यानंतर जास्तीचे पाणी सांडू नका.

नळाची नियमित दुरुस्ती करा.

सार्वजनिक नळांना तोटी लावा.

अंगणात पाण्याचा सडा टाकू नका.

पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images