Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस

$
0
0

कन्नडः शहरासह तालुक्याच्या काही भागात शुक्रवारी हस्त नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस तासभर पडला. शहरासह तालुक्यातील रेल नावडी, अंधानेर चिकलठाण परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यापावसामुळे सोंगणी झालेली बाजरी व मका पिंकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसामुळे शिवना टाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा ओघ सुरू आहे. दरम्यान, खुलताबाद शहर परिसरात सायंकाळी सात वाजता पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडला. पैठण तालुक्यात रात्री साडेसात ते पावणेआठ या पंधरा मिनिटात जोरदार सरी आल्या. पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आहे. फुलंब्री परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘धोंदलगावचा कायापालट करू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने वैजापूर तालुक्यातील धोंदलगावचा कायापालट करण्याचे ठरवले आहे. या दोघांनी केलेल्या आवाहनाला आमदारांसह सामान्य व्यक्तीपर्यंत सर्वांनी प्रतिसाद दिला.

नाम फाउंडेशनने लोकसहभागातून धोंदलगावाचा कायापालट करण्यासाठी काम सुरू केले आहे. या गावात मकरंद अनासपुरे यांनी काही दिवसापूर्वी येऊन पाहणी केली होती. गांधी जयंतीनिमित्त आयोजित ग्रामसभेला नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी हजेरी लावल्यामुळे गावात प्रचंड उत्साह होता. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत गावात शौचालये, गरिबांना घरे व वृक्षारोपण करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली. नाना पाटेकर व मकरंद अनासपूरे यांनी ग्रामसभेच्या आधी बाभुळगाव रोडवरील शेतात दोन विहीरींचे पुनर्भरण केले. त्यानंतर या दोन्ही सेलिब्रिटींनी ग्रामसभेत गावकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतकामाचे अनुभव सांगितले. पुण्यात एका भिकाऱ्याने फाऊंडेशनला तीनशे रुपयांची मदत केली. कार्यालयाच्या खाली पार्क केलेल्या वाहनधारकांनी सहा हजार रुपये जमवून फाऊंडेशनला दिल्याचे त्यांनी सांगितले. असे अनुभव सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कटकडाट केला.

सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या धोंदलगावात पाचपट झाडे लावली पाहिजेत. पुढच्या दौऱ्यात या सर्व कामांची फाउंडेशनतर्फे पाहणी करण्यात येईल, नाना पाटेकर यांनी सांगितले. शौचालय न बांधल्यास महिलांनी जेवण बनवू नये असे आवाहन विश्वस्त डॉ. अविनाश पोळ यांनी केले. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बांधबंदिस्ती करुन पाणी जिरवावे असे आवाहन करण्यात आले.

धोंदलगावात ८० टक्के घरात शौचालय नसल्याने या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच गरिबांना घरे, गावातील पडिक जागेवर वृक्षारोपण ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. कामे करण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली. सरपंच आण्णासाहेब डमाळे यांनी पडिक जागा तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी वॉटर प्युरीफायर देण्याचे जाहीर केले. आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी २५ लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले. सटाणा येथील मराठा इंग्लिश व्हाट्सअप ग्रुपतर्फे ६१ हजार रुपयांची मदत करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिनकर पवार, नामचे विश्वस्त डॉ. अविनाश पोळ, आनंद आसुलकर, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, रमेश बोरनारे, अहिलाजी डमाळे, सुभाष वाघ, अशोक ढंगारे, रवींद्र आवारे, नितीन कुलकर्णी आदींसह गावकरी उपस्थित होते.

अन् नाना हळवे झाले

गावाच्या मदतीचे आवाहन करताच दानशूर व्यक्तिंनी स्टेजवर धाव घेऊन नाना व मकरंदला गराडा घातला. यात भाजीपाला विक्रेता, रिक्षाचालक यांच्यासह महाविद्यालयातील तरुण व शालेय विद्यार्थीही होते. एका तरुणाने नानांकडे तीन हजार रुपये देताच नानांनी त्या तरुणाला हे पैसे कुठुन आणले असे विचारले. त्याने वडिलांकडे हात दाखवला. त्यावर नानांनी त्या तरुणाला नवीन कपडे घेतलेस का, असे विचारले. यावर नाही म्हणताच नाना क्षणभर भावूक झाले व त्यांनी आपला चेहरा मागे वळवला.

कवितेतून महत्व

नाना पाटेकर यांनी 'बारीश' या कवितेतून पाण्याचे महत्व गावकऱ्यांना पटवून दिले. अनासपुरे यांनी नानांच्या आग्रहाखातर शौचालयावर लिहलेल्या कवितेच्या दोन ओळी सादर केल्या. गावात १०० टक्के घरात शौचालय बांधल्यानंतर पूर्ण कविता ऐकवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी समाजातील छोट्या व्यक्तिने केलेल्या मदतीचे मोल अंबानीसारख्या उद्योजकाने दिलेल्या कोट्यावधी रुपयांपेक्षा जास्त आहे

- नाना पाटेकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणविरुद्ध वाळूजमध्ये उपोषण

$
0
0

वाळूजः सिडको वाळूज महानगरात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे काही दिवसांपूर्वीच दोन मुकी जनावरे मरण पावली. यामुळे परिसरातील सर्व भूमिगत केबल बदलावी या मागणीसाठी शुक्रवारपासून सिडकोतील महावितरण कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

सिडकोमध्ये महावितरणकडून दोन दशकांपूर्वी भूमिगत केबल टाकण्यात आली आहे. ही केबल ठिकठिकाणी तुटल्यामुळे धोकादायक झाली आहे. साईबाबा मित्रमंडळाचे दत्तात्रय वरपे यांनी ही बाब महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात अनेकवेळा आणून दिली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे केबल बदलण्याच्या मागणीकरिता दतात्रय वरपे व आम आदमी पार्टीचे प्रकाश जाधव यांनी उपोषण सुरू केले आहे. केबल दुरुस्ती, वितरण बॅक्स बदलणे, भूमिगत केबल बदलणे या मागण्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार करण्यात आला आहे. या आंदोलनाला भिवसन ज्ञानोबा जगताप, लक्ष्मण निवृत्ती गोसावी, विजय पोफळे, महादेव काकडे, गणेश पाटील, संतोष सूर्यंवशी आदी नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनए परवानगी; हायकोर्टात आव्हान

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हयातील सर्व गावात अकृषक जमिनीच्या वापराची (एन.ए.) परवानगी देण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी स्वत:कडे घेण्याचे आदेश २४ सप्टेंबर रोजी काढले. या आदेशाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.

औरंगाबाद झालर किसान संघर्ष समितीचे अध्यक्ष अबुल आला हाशमी यांनी ही याचिका केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने ४ ऑक्टोबर २०१३ रोजी प्रशासकीय सोय लक्षात घेता महानगरपालिका व "अ" वर्ग नगरपालिका हद्दीतील जमिनीचे व्यवस्थापन व अकृषक परवानगी जिल्हाधिकारी, "ब" व "क" वर्ग नगरपालिका हद्दीतील अकृषीक परवानगी अतिरिक्त जिल्हाधिकारी तर वर्ग-२ गावांसाठी अकृषक परवानगी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांना अधिकार प्रदान करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये व प्रशासकीय अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतुने परिपत्रकान्वये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १३(१) मधील तरतुदी विचारात घेऊन सूचना दिल्या. त्यानुसार अकृषीक आकारणीस परवानगी देण्याबाबतचे अधिकार उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना दिले.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या ४ ऑक्टोबर२०१३ च्या परिपत्रकामधील सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी १९ जून रोजी शासनाची भूमिका व जनहित लक्षात घेवून या आदेशाची अंमलबजावणी सर्व संबंधितांनी काटेकोरपणे करण्यात यावी म्हणून आदेश दिले. डॉ. निधी पांडेय या जिल्हाधिकारी म्हणून ५ ऑगस्ट रोजी रुजू झाल्या. औरंगाबाद शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड झालेली आहे. डीएमआयसीसाठी जमीनदेखील संपादित झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने नियोजनबध्द रितीने विकास होण्याच्या दृष्टीने जिल्हयातील सर्व गावांतील कृषक जमिनीच्या अकृषक वापराची परवानगी देण्याचे अप्पर जिल्हाधिकार, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचेकडील सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आले. जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांचा हा आदेश महराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६कलम १३ (४) व शासनाच्या धोरणाशी विसंगत आहे असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केले अधिकारांचे केंद्रीकरण

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे जनहित व सर्वसामान्यांची सोय या उद्देशास हरताळ फासला जाईल. अकृषीक परवानगी देण्यास विलंब लागेल व त्यासोबत अधिकारांचे केंद्रीकरण झाल्यामुळे भ्रष्ट्राचारास वाव मिळेल, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ लाखांची लकी ड्रॉद्वारे फसवणूक

$
0
0

वाळूज : लकी ड्रॉ च्या माध्यमातून मोठ्या बक्षिसाचे आमिष दाखवून १५ लाख २० हजार रुपये घेऊन तिघांनी पोबारा केला आहे. या भामट्यांनी वाळूज परिसरातून २० लाख रुपये जमा केले व केवळ ४ लाख ८० हजार रुपयांचे बक्षिस वाटप केले आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवकुमार मधुकर मूर्ती, राजेंद्र पलाटे व गणेश लुक्कड या तिघांनी जय भद्रा सुलभ हप्ता वस्तू विक्री ही योजना परिसरात सुरू केली होती. या योजनेत मोठ्या रकमेचे आमिष दाखवून सभासद करण्यात आले व त्यांच्याकडून २० लाख रुपये जमा करण्यात आले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक हप्त्याला ड्रॉ काढून बक्षिस दिले जात होते. प्रथम तिघांनी लहान मोठी बक्षिसे देवून सभासदांना आर्कषित करून विश्वास संपादान केला. योजनेचे दहावे बक्षिस बंपर होते. त्यात दुचाकी, चारचाकी अन्य मोठ्या रक्कमेच्या बक्षिसाचा समावेश होता. मात्र बंपर बक्षिसाचे वितरण न करता रक्कम घेऊन त्यांनी पळ काढला. याप्रकरणी अशोक उत्तमराव महेत्रे (रा. बजाजनगर) यांनी पोलिसआयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेवून तक्रार केली. या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तुमचा कचरा इकडे नकोच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

तीसगाव येथील नियोजित कचरा डेपोविरुद्ध शुक्रवारी वाळूज व तीसगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी औरंगाबाद-नगर रस्त्यावरील ए. एस. क्लब चौकात रास्ता रोको केला. या आंदोलनात सुमारे एक हजार नागरिक सामील झाले होते. पोलिसांनी दीडशे आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले.

औरंगाबाद महापालिकेचा नारेगाव येथील कचरा डेपो तीसगाव येथील खवडा डोंगर परिसरात कचरा डेपो सुरू करण्यात येणार आहे. यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, असा गावकऱ्यांचा आक्षेप आहे. धरमपूर व वडगाव कोल्हाटी येथील नागरिकांचाही कचरा डेपोला विरोध आहे. यामुळे तीसगावचे सरपंच अंजन साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. या रास्तो रोकोत शेकडो नागरिक सामील झाले होते. यावेळी बोलताना आंदोलनातील नेत्यांनी महापालिकेच्या कारभाऱ्यांविरुद्ध रोष व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत तीसगावला कचरा डेपो होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी सरकार व पालिकेच्या विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी चौकात येणारी वाहतूक काहीकाळ बंद करण्यात केली होती.

या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. पोलिसांचा बंदोबस्तामुळे चौकाला छावणीचे रूप आले होतो. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी आंदोलकांना सहकार्याचे आवाहन केले.

तीसगावचे माजी सरपंच संजय जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र कसुरे, सुगंध दाभाडे, ज्ञानेश्वर शेलार, नागेश कुठारे, साजापूर येथील सचीन जाधव, गौतम मोरे, अमोल रत्तपारखी, सय्यद हरूण, अशोक त्रिभुवन, अनिल जाधव, करोडी येथील माजी सरपंच अनिल जाधव, निलेश गोफने, किशार साळवे, सोपान नाडे, अमोल गायकवाड आदींसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे जितेंद्र देहाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश घुले, बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव डॉ. शरदचंद्र वानखेडे, जिल्हाध्यक्ष किशोर म्हस्के, भाजपचे अनिल चोरडिया, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संतोष पाटील सूर्यंवशी, छावाचे शिवाजी मर्तांडे आदींनी हजेरी लावली.

महिलांची गर्दी

रास्ता रोको आंदोलनात माहिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. कचरा डेपोला विरोध करण्यासाठी त्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचा निर्धार केला.

भाजपची फक्त हजेरी

भाजप नेत्यांनी कार्यकर्तांसह आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात करताच भाजप नेते, कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८० कोटींची उलाढाल ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टोलविरोधात वाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे १२०० ट्रक शहरात थांबले. ८० कोटींची उलाढाल ठप्प झाली. दसरा, दिवाळीचा बाजारात येणारा माल ठिकठिकाणी अडकून पडला आहे. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने एक ऑक्टोबरपासून हे आंदोलन पुकारले आहे.

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी वाळूज, पंढरपूर, चितेगाव भागातील अनेक कंपन्यात माल वाहतुकीसाठी गाड्या लावण्यात आल्या नाहीत. यामुळे मद्य, पाणी आणि इतर मालाची वाहतूक पूर्णतः बंद आहे. राज्याच्या विविध भागातून दसरा, दिवाळीसाठी कपडे आणि इतर सामानांची मोठ्या प्रमाणात होणारी आवकही थांबली आहे. आज औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी शहरातील विविध भागातील वाहतूकदार आणि ट्रकचालकांशी चर्चा केली. आंदोलनाचा उद्देश सांगत संपात शंभर टक्के सहभागी व्हा, असे आवाहन केले. दरम्यान, बॉंम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने आजपासून आंदोलनात भाग घेतला. त्यामुळे जेएनपीटी, ठाणे, नवीन मुंबई, वाशी भागातील मालवाहतूक थांबविण्यात आली.

दगडफेकीच्या घटना

शहरात आंतरराज्यीय वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रकना, विविध मार्गावर थांबविण्यात आले. मात्र, इतर परिसरात तसेच राज्यातंर्गत मालाची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे नाशिक आणि पुणे रोडवर काही ट्रकवर दगडफेकीची घटना झाली. आंदोलनात स्थानिक वाहतूक सुरू राहिल्यास हिंसक वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती ट्रक चालकांनी व्यक्त केली.

क्रेडिट कार्डवर जेवण

मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनचालकांना जेवायला आणि इतर खर्चाला ट्रान्सपोर्टकडून क्रेडिट कार्ड देण्यात आले आहे. काहींना पदरचे पैसे टाकावे लागत आहेत. आंदोलन तीव्र झाल्यास परगावातील ट्रकचालकांना असोसिएशनच्या वतीने जेवणाची सोय करण्यात येणार आहे, असा निर्णय ट्रान्सपोर्टच्या बैठकीत घेण्यात आला.

चक्का जाम आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनात शहरातील डिलेव्हरी करणाऱ्या गाड्यांनीही सहभाग नोंदविला. आज ट्रक, कंटेनर, आणि ट्रेलरही थांबले आहे. दोन दिवसांत सत्तर ते ऐंशी कोटींचा व्यवहार ठप्प झाला आहे.

- फैय्याज खान, अध्यक्ष, औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिऐशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसभरात पाच मोबाइल लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील विविध भागातून चोरट्यांनी मोबाइल लंपास केल्याच्या पाच घटना घडल्या. यात जिल्हा परिषदेच्या आवारातून एका मूकबधिराचाही मोबाइल चोरला गेला. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेचे कर्मचारी चंद्रकांत कुलकर्णी हे गुरुवारी दुपारी औरंगपुऱ्यातील एका हॉटेलात चहा पिण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे आलेल्या भामट्याने कुलकर्णी यांना दोन मिनिट बोलायचे म्हणून त्यांचा मोबाइल घेतला. बोलता-बोलता तो हॉटेलच्या पाठीमागील दरवाजाने पसार झाला. मूकबधीर असल्याने कुलकर्णी यांना आवाज देता आला नाही. कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात भामट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना विभागीय क्रीडा संकूल येथे गुरुवारी सकाळी सात वाजता घडली. फिर्यादी संजय व्यास (रा. ज्योतीनगर) यांचा मोपेड गाडीत ठेवलेला वीस हजार रुपये किंमतीचा मोबाइल चोरट्यांने लंपास केला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विश्रांतीनगर येथील राहत्या घरातून चोरट्याने दोन मोबाइल चोरल्याची तक्रार सिराज खान भिकू खान पठाण याने केली. मुकुंदवाडी पोलिस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

चौथी घटना तहसील कार्यालयात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता घडली. निवडणूक विभागात कामात मग्न असताना टेबलावर ठेवलेला बारा हजार रुपये किंमतीचा मोबाइल चोरीला गेला, अशी तक्रार कर्मचारी सय्यद फारुख सय्यद कासीम यांनी सिटी चौक पोलिसांकडे केली. सिडको एन-१ भागात मोबाइल चोरीची पाचवी घटना घडली. रोहीत धूत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याचे एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून मोबाइल चोरीच्या घटनांत वाढ झाली असून, गुरुवारीही दोन मोबाइल चोरीला गेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठगन पाटीलला पोलिस कोठडी

$
0
0

औरंगाबाद : भर रस्त्यामध्ये शहरातील महिला व तिच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न करणारा आरोपी ठगन देवराव भागवत पाटील याला पाच ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. शेख यांनी शुक्रवारी (दोन ऑक्टोबर) दिले.

शहरातील गारखेडा भागातील ४३ वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादी महिला व तिची मुलगी ही एक जानेवारी २०१५ रोजी विशालनगर भागातून जात असताना आरोपी ठगन पाटील, प्रिती सोनवणे व मनोज वाघ यांनी फिर्यादीला मारहाण करून 'माझ्यावरील केस मागे घे' असे धमकावत पेट्रोलने भरलेली कॅन गाडीतून बाहेर काढली. त्यावेळी फिर्यादी व मुलीने आरडाओरड केल्याने आसपासचे रिक्षाचालक व इतर नागरिकांनी आरोपीकडून कॅन ओढून घेतली. दोघींना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्यावरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामध्ये आरोपी ठगन पाटील यास अटक करून शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने आरोपीला पाच ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातन संस्थेवर बंदीसाठी मोर्चा

$
0
0

औरंगाबाद : सनातन संस्था समाजात दहशतवाद, हिंसाचार पसरवित असून संविधान विरोधी काम करीत आहे. या संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळीने शुक्रवारी मोर्चा काढून केली.

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून डावे, पुरोगामी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत शुक्रवारी पैठण गेट येथून मोर्चा काढला. गोडसे प्रवृत्ती वाढणे हे भारतीय लोकशाही व सहिष्णू परंपरा यांना मोठे आव्हान आहे. ते परतवून लावण्यासाठी अशा प्रवृत्तीच्या लोकांवर शासनाने कठोर कारवाई करावी, मारेकऱ्यांना कडक शिक्षा करावी, अशी मागणीही करण्यात आली. महात्मा गांधींचा खून करणाऱ्या गोडसे प्रवृत्तीनेच डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांचे खून केले, असा आरोप करण्यात आला. गुलमंडीमार्गे निघालेल्या मोर्चाचा समारोप शहागंज येथील गांधी पुतळ्याजवळ करण्यात आला. डॉ. भालचंद्र कानगो, मनोहर टाकसाळ, राम बाहेती, भीमराव बनसोड, सुभाष लोमटे, बुद्धप्रिय कबीर, अॅड. अभय टाकसाळ, अॅड. संघपाल भारसाकळे, कॉ. भास्कर लहाने, प्रा. पंडित मुंडे, देविदास किर्तीशाही उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुमच्याप्रमाणे आमचे पाय मातीचेच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शेतकऱ्यांसाठी 'नाम फाउंडेशन' स्थापन केल्यानंतर सोशल मीडियातून मला आणि मकरंदला अनेकांनी देवत्व बहाल केले. पण, तुमच्याप्रमाणे आमचेही पाय मातीचेच आहेत. आम्ही निमित्तमात्र असून तुमच्या सहभागातूनच हा यज्ञ धगधगत ठेवू' असे भावनिक आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. निधी संकलनासाठी नाना आणि मकरंद अनासपुरे शुक्रवारी शहरात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत नाना बोलत होते.

नाम फाउंडेशनने धोंदलगाव (ता. वैजापूर) वर्षभरासाठी दत्तक घेतले. या गावात फाउंडेशन व लोकसहभागातून पाणलोटाचे काम सुरू आहे. या गावाला भेट दिल्यानंतर दुपारी नाना व मकरंद अनासपुरे यांनी शहरात मदत निधी संकलन केले. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत त्यांनी फाउंडेशनची भूमिका मांडली. 'फाउंडेशन फक्त मदत करून थांबणार नाही. तर शिक्षण, रोजगार, शेती व पाणीप्रश्नावर काम करणार आहे. पहिल्या टप्प्यात धोंदलगाव (जि. औरंगाबाद) व आमला (जि. वर्धा) गावे निवडली आहेत. या गावांना वर्षभरात स्वावलंबी करण्यात येईल' असे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. गावात तंटा नसेल व ग्रामस्थांची श्रमदानाची तयारी असल्यास फाउंडेशन मदत करील असे मकरंद म्हणाले. या उपक्रमाचा प्रतिसाद पाहून नाना भारावले आहेत. 'कोणत्याही उपक्रमात दहा लोक सोबत आणि दहा विरोधात असतात. इथे मात्र शंभर लोक सोबत आहेत. पक्षीय वितुष्ट सोडून लोक मदत करीत आहेत. सरकारी यंत्रणा व राजकीय पक्षांबाबत लोकांमध्ये नकारात्मक दृष्टिकोन आहे. मात्र, आमचा चेहरा लोकांना विश्वासार्ह वाटल्याने चळवळ व्यापक झाली. समाजातील खरे हिरो पुढे आणून मोहीम सुरू राहील. प्रत्येक गावासाठी 'नाम फाउंडेशन' थोरल्या भावाची भूमिका बजावेल' असे नाना म्हणाले. यावेळी डॉ. अविनाश पोळ, शुभा महाजन, राधेश्याम ओमला, राजाभाऊ शेळके, चंदू मोरे, आनंद आसोलकर उपस्थित होते. राज्यात एक कोटी झाडांची लागवड केली जाईल अशी घोषणा करण्यात आली.

राज्यात पाच केंद्र

'नाम फाउंडेशन'ने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी माटुंगा, ठाणे, पुणे, नागपूर व औरंगाबाद शहरात स्वतंत्र केंद्र सुरू केले आहे. औरंगाबाद शहराची जबाबदारी शुभा महाजन सांभाळत आहेत. शेतीच्या प्रश्नावर अडचण असल्यास या केंद्राची मदत घेता येईल. एमजीएम महाविद्यालयात अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, बी. एड., कम्प्युटर सायन्स या शाखेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी राखीव जागा आहेत. मात्र, गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल असे फाउंडेशनने जाहीर केले.

हरियाणातून राधेश्याम आले

नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचे काम पाहून हरियाणातील सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम ओमला महाराष्ट्रात आले. हरियाणात गावाचा कायापालट केल्यामुळे 'युनो'ने शंभर गावांच्या विकासाची जबाबदारी राधेश्याम यांच्यावर सोपवली. हा माझा मानसपुत्र असून आमच्यासोबत काम करीत असल्याचे नाना यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविश्वासासाठी एकजूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावरील अविश्वास ठराव पुढील आठवड्यात महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत आणला जाणार आहे. हा ठराव मंजूर करण्यासाठी शिवसेना, भाजप व एमआयएम एकत्र येणार आहेत. याची शुक्रवारी रणनिती ठरविण्यात आली. आयुक्तांबद्दल नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी आहे. मात्र महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठबळामुळे महाजन यांच्याविरुद्धचा आवाज दडपला जात आहे, अशा नगरसेवकांच्या भावना आहेत. उपमहापौर प्रमोद राठोड यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन मनपा आयुक्तांची तक्रार केली आहे.

दरम्यान, स्वच्छता अभियानानिमित्त प्रकाश महाजन व प्रमोद राठोड समोरासमोर आले. महाजन यांनी राठोड यांच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न केला. पण राठोड यांनी प्रतिसाद दिला नाही. तुम्ही माझी बदनामी सुरू केल्याचे सांगून एका वृत्तवाहिनीवरून दाखवल्या जाणाऱ्या महाजन यांच्या क्लिपचा हवाला राठोड यांनी दिला. त्याचा संदर्भ देत राठोड यांनी महाजन यांना, 'मी तुम्हाला कधी रात्री बारा वाजता फोन केला. मी तुम्हाला फोन केल्याचे सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. फोन केला तरी वैयक्तिक काम सांगत नाही, नागरिकांच्या समस्या सांगतो,' असे सुनावले.

राठोड-महाजन यांच्यात हा संवाद सुरू असतानाच पालकमंत्री रामदास कदम स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमातून सुभेदारी विश्रामगृहात आले. त्यांच्या मागोमाग राठोड यांच्यासह भाजपचे पदाधिकारीही सुभेदारीत दाखल झाले. त्यांनी पालकमंत्र्यांकडे आयुक्तांची तक्रार केली. महाजन यांची एकतर बदली करा नाहीतर त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची परवानगी द्या, असे पालकमंत्र्यांना सांगण्यात आले. या बाबीवर सायंकाळी सुभेदारी विश्रामगृहात पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत भाजपचे आमदार अतुल सावे, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांची बैठक झाली. शिवसेना, भाजप व एमआयएम यांनी एकत्र येऊन आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याचे यावेळी ठरवण्यात आले. त्यासाठी उपमहापौरांकडून प्रस्ताव घेण्याचाही निर्णय झाला. पुढील आठवड्यात विशेष सर्वसाधारण सभा घेऊन अविश्वास ठराव आणला जाईल असे ठरवण्यात आले.

आमदारांकडे विचारणा

पालकमंत्री रामदास कदम यांनी बैठकीत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्याकडे तुमच्या नगरसेवकांनी महापौरांकडे अविश्वास ठराव दिला होता ना, अशी विचारणा केली. त्यावर शेजारी उभे असलेले सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी, आयुक्त महाजन हे आमदार जलील यांना घरी जाऊन भेटल्याचे सांगितले. त्यानंतर एमआयएमच्या नगरसेवकांनी अविश्वास ठराव मागे घेतल्याचा भंडाफोड जंजाळ यांनी केला. यामुळे चपापलेले आमदर जलिल गालात हसत बाहेर पडले.

शहागंज मंडईतील हातगाड्या हटवा

गांधी जयंती निमित्त महास्वच्छता अभियानात सहभागी झालेले पालकमंत्री रामदास कदम यांनी शहागंज भाजी मंडईतील अस्वच्छता पाहून कमालीचे संतापले. या भाजी मंडईत नियमीत साफसफाई करा, रस्त्यावरच्या व भाजी मंडईच्या परिसरातील हातगाड्या हटवा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पालकमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी सात वाजता अभियानाला सुरुवात झाली. यावेळी महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त प्रकाश महाजन, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, भाजपचे गटनेते भगवान घडमोडे आदी उपस्थित होते. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे यांची गैरहजेरी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाना-मकरंदच्या ‘नाम फाउंडेशन’वर पैशांचा पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खाऊचे पैसे, पेन्शनचे पैसे, गणेश मंडळाची वर्गणी, संस्थांनी जमवलेली रक्कम अशा विविध माध्यमातून नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या 'नाम फाउंडेशन'वर अक्षरशः पैशाचा पाऊस पडला. तापडिया नाट्यमंदिरात शुक्रवारी निधी संकलन करण्यात आले. अवघ्या दोन तासात तीनशे दात्यांनी 'नाम'ला तेरा लाख अठरा हजार रुपयांची मदत केली.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी सुरू केलेली मोहीम व्यापक झाली आहे. 'नाम फाउंडेशन'ला दानशूर भरभरून मदत करीत आहेत. याची प्रचिती औरंगाबाद शहरातही आली. तापडिया नाट्यमंदिरात नाना व मकरंद यांनी मदत स्वीकारण्यास सुरुवात केली अन् अवघ्या दोन तासांत तेरा लाख रुपयांची रक्कम जमा झाली. लहान मुलांनी खाऊचे पैसे नानाच्या हातात देताच वातावरण बदलले. वयोवृद्ध कामगाराने तीनशे तीस रुपये हातात देताच नानाने वाकून नमस्कार केला. तर एका सेवानिवृत्त शिक्षकाने २१ हजार रुपये दिले. 'उतारवयात तुम्हाला पैसे कामी येतील' असे नाना म्हणाले. 'आम्हा पती-पत्नीचा खर्च मर्यादित आहे. पुढील बारा महिने मी तुम्हाला पैसे देईन' असे बाणेदार उत्तर या शिक्षकाने दिले. 'आपल्या समाजात दातृत्व कमी नाही. फक्त पैशाचा योग्य विनियोग पाहिजे' असे नाना म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मदतीसाठी अक्षरशः रांग लागली होती. शहरातील सोसायट्या, गणेश मंडळ, मित्रमंडळ, असोसिएशन व कंपन्यांनी मदत केली. वेदांतनगर मित्रमंडळाने दोन लाख एक हजार रुपये आणि कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने एक लाख एक हजार रुपयांची मदत केली. दात्यांनी 'नाम फाउंडेशन'च्या खात्यात रक्कम जमा करावी व रोख पैसे देऊ नये असे आवाहन नानांनी केले. राज्यभरातून सात कोटी रुपयांची देणगी मिळाली असून अमेरिकेतील दात्याने चाळीस कोटी रुपये देण्याची इच्छा व्यक्त केली, असे नाना म्हणाले.

ज्येष्ठांची बांधिलकी

दुष्काळी परिस्थितीची तीव्रता पाहून शहरातील दानशूर वयोवृद्ध कार्यक्रमाला आले. चेतनानगर येथील ८७ वर्षांचे अच्युतराव कुलकर्णी यांनी दोन हजार रुपये दिले. त्यांच्यासोबत डॉ. विजय पांगरेकर होते. कुलकर्णी यांचे आभार मानण्यासाठी नाना खाली उतरणार होते. मात्र, गर्दीमुळे शक्य झाले नाही. विविध क्षेत्रातील दात्यांनी मदतीचा ओघ कायम ठेवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसाठी १०० कोटींची मागणी

$
0
0

पालकमंत्री धरणार मंत्र‌िमंडळ बैठकीत आग्रह

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शहरात होणाऱ्या मंत्र‌िमंडळ बैठकीकडून येथील नागरिक व मराठवाड्यातील जनतेच्या अपेक्षा आहेत. स्मार्ट सिटी करण्यासाठी औरंगाबादला १०० कोटी रुपये मिळालेच पाहिजेत. पालकमंत्री म्हणून मी ही मागणी बैठकीसमोर मागणी करणार आहे,' असे पालकमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पालकमंत्र्यांनी शुक्रवारी पाहणी केली. त्यानंतर सुभेदारी विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. शहरात अनेक वर्षांनंतर होणाऱ्या मंत्र‌िमंडळ बैठकीची तारीख निश्चित नसली तरी बैठक होत असल्याने लोकांच्या शासनाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. हे साहजिकच असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. 'मंत्र‌िमंडळ बैठकीत शहरासाठी निधी खेचून आणण्यासाठी मी पालकमंत्री म्हणून बसलो आहे. स्मार्ट सिटीकरिता १०० कोटी रुपये मिळालेच पाहिजे, असा आग्रह करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेसाठी निवडण्यात आलेल्या १०० शहरांच्या यादीत औरंगाबाद शहराचा समावेश केला आहे. यामध्ये राज्यातील मुंबई, पुण्यासह औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर, नवी मुंबई, ठाणे या शहरांचा समावेश आहे.

स्मार्ट सिटीसाठी ५ वर्षांसाठी केंद्र सरकारकडून ५०० कोटी, राज्य सरकार व महापालिका प्रत्येकी २५० कोटी रुपये खर्च करणार आहेत. यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रेकनंतर पुन्हा धुवांधार पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात पंधरा दिवसांपूर्वी जोरदार हजेरी लावून अदृश्य झालेल्या पावसाने शुक्रवारी राज्याच्या अनेक भागामध्ये हजेरी लावली. औरंगाबाद शहरामध्येही सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे परतीच्या मान्सूनविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

यंदा बहुतांशपणे पाठ फिरवलेल्या पावसाने गणपतीच्या आगमनावेळी हजेरी लावली होती आणि त्यानंतर पुन्हा दडी मारली. त्यामुळे परतीचा मान्सून तरी बरसणार का, अशी चिंता निर्माण झाली होती. दरम्यान, शुक्रवारी पावसाने पुनरागमन केले. औरंगाबादमध्ये दुपारी ३ वाजता वाजता सुरू झालेला पाऊस शहराच्या काही भागात बरसला. मात्र सायंकाळी साडेसातनंतर संपूर्ण शहरात पावसाचे जोरदार आगमन झाले. या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत १८.२ मिलिमीटर नोंद करण्यात आली. शहरातील शाहनूरवाडी, सिडको, हडको, हर्सूल, चिकलठाणा, गजानननगर, पुंडलिकनगर, मुकुंदवाडी, शिवाजीनगर, गारखेडा; तसेच जुन्या शहराच्या काही भागांमध्येही दमदार पाऊस झाला.

जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. कन्नड शहरासह तालुक्यातील रेल नावडी, अंधानेर चिकलठाण परिसरात हा पाऊस झाला. शिवना टाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा ओघ सुरू आहे. खुलताबाद शहर परिसरात सायंकाळी सात वाजता पावसाने हजेरी लावली. पैठण तालुक्यात रात्री साडेसात ते पावणेआठ या पंधरा मिनिटात जोरदार सरी आल्या. फुलंब्री परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

आजही पावसाचा अंदाज

अरबी समुद्राच्या पूर्वेला हवेच्या वरच्या थरात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा परिसरातही पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसाने विदर्भाचा अपवाद वगळता सर्वत्र हजेरी लावली आहे. कोकणासह कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. विदर्भाच्या काही परिसरातही पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथे वीज पडून एक महिला ठार झाली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस हजेरी लावली असून, दिंडोरी, चांदवड, निफाड, त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सुरगाण्यात वीज अंगावर पडून युवक ठार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वकिलास २५ लाखांचा गंडा

$
0
0

मॉलमध्ये भागीदारीचे आमिष

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एन मार्ट मॉलमध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखवून वैजापुरातील एका वकिलास २५ लाखांचा गंडा घालण्यात आला. वैजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर हा गुन्हा जवाहरनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी एन मार्टचा संचालक गोपाळ शेखावत यांच्यासह कमलेश शहा, रुमाना, सुरेश दोडिया, सलीम खान, अश्रफ खान आणि दिलीप पारीख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

एन मार्ट मॉलचा संचालक असल्याचे सांगत शेखावत याने २०१२ मध्ये जाहिराती देऊन विविध ठिकाणी मॉलच्या शाखा उघडायच्या आहेत, असे सांगितले. यात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, जागा देणाऱ्यांना कमीशन दिले जाईल, असे आमिष दाखविले होते. ही जाहिरात पाहून वैजापूर येथील अॅड. रसिक शांतीलाल कोठारी (वय ५७) यांनी कंपनीशी संपर्क साधला होता. त्यावेळी कंपनीचा एजंट दिलीप गोविंद पारीख याने अॅड. कोठारी व शेखावतची भेट घडवून आणली. शेखावत व त्यांच्या अन्य साथीदारांनी जालना रोडवरील एसएफएस बिल्डिंगमध्ये गाळा क्रमांक ४ येथे मॉल सुरू करणार असून गुंतवणूक केल्यास अधिक फायदा देऊ, असे सांगितले. पारीखने आपला चुन्नीलाल पेट्रोल पंपाजवळही मॉल असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर आतापर्यंत मॉल सुरू करण्यासाठी गुंतवणूक व भागीदार होण्यासाठी म्हणून शेखावत यास पारीखच्या मध्यस्थीने २५ लाख रुपये दिले. तसेच नियोजित मॉलच्या गाळ्याची साफसफाई रंगरंगोटी स्वखर्चाने केल्याचे तक्रारदार अॅड. कोठारी यांनी नमूद केले, पण पैसे घेतल्यानंतर शेखावत पुन्हा शहरात आलाच नाही. त्याचा शोध घेण्यासाठी अॅड. कोठारी हे गुजरातलादेखील गेले होते. मॉल सुरू होत नाही व शेखावतसह त्याचे साथीदारही भेटत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अॅड. कोठारी यांनी वैजापूर पोलिसांकडे धाव घेतली. तेथून हा गुन्हा जवाहरनगर पोलिसांकडे वर्ग झाला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील तेलूरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्ट न बसव‌िणाऱ्याचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीन मजली इमारतीसाठी १ लाख ४५ हजार रुपयांचा धनादेश देऊनही लिफ्ट बसवून न देणाऱ्या कंपनीचा प्रमुख व आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एस. जी. शेटे यांनी फेटाळला. या प्रकरणी डॉ. अनिल बळीराम पाटील (रा. टाऊन सेंटर, सिडको) यांनी सिडको पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, फिर्यादीने त्याच्या तीन मजली इमारतीमध्ये लिफ्ट बसविण्याचे काम 'मॅक एलिव्हेटर्स अँड पॅरामाऊंट मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल वर्क्स' या कंपनीच्या बाबा पेट्रोल पंपाजवळील शाखेला दिले होते. कंपनीचा प्रमुख मोहम्मद अश्फाक काझी याचा प्रतिनिधी नदीम काझी याच्यासोबत फिर्यादीने करार केला व त्याला एक लाख ४५ हजारांच्या धनादेश दिला. ६ डिसेंबर २०१२ रोजी कंपनीच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाल्याची नोंद आहे. मात्र, इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर नदीम काझीने संपर्क तोडला व फोन उचलणे बंद केले. दरम्यान, शहरातील कंपनीच्या कार्यालयाला कुलूप दिसून आल्यामुळे बेलापूर (मुंबई) येथील मुख्य कार्यालयात कंपनीचे प्रमुख मोहम्मद काझी याची फिर्यादीने भेट घेतली. 'नदीम माझा पुतण्या आहे, पण त्याने अफरातफर केली, मी तुम्हाला पैसे किंवा लिफ्टचे साहित्य देऊ शकत नाही' असे मोहम्मद काझीने सांगितल्यानंतर फिर्यादीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी सरकारी बाजू मांडली.

अॅसिड टाकण्याची धमकी

औरंगाबाद : लग्न कर अन्यथा चेहऱ्यावर अॅसिड टाकील, अशी धमकी देणाऱ्या अस्लम शेख चाँद (वय २२, रा. कैसर कॉलनी) विरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैसर कॉलनीतील अस्लमने याच परिसरात राहणाऱ्या सोळा वर्षीय मुलीकडे लग्नासाठी तगादा लावला होता. २८ सप्टेंबर रोजीही आरोपीने तिचा हात धरला आणि लग्न करण्याचा आग्रह धरला. तू नकार दिल्यास चेहऱ्यावर अॅसिड टाकील, तुझ्या घरांच्यानाही सोडणार नाही, अशी धमकी त्याने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी काळाबाजाराची चौकशी : प्रभू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'रेल्वे प्रवाशांसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा होत असलेल्या काळाबाजाराची चौकशी करण्यासाठी आदेश देण्यात येतील. याची माहिती मागवून पुढील कार्यवाही केली जाईल,' असे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिले.

'पाण्याच्या बाटल्यांचा काळाबाजार' या आशयाचे वृत्त बुधवारी 'महाराष्ट्र टाइम्स' मध्ये प्रसिद्ध झाले होते. कोका कोला कंपनीच्या 'किनले' पाण्याच्या बाटल्या रेल्वेत वितरित करण्यासंदर्भात आयआरसीटीसीने कंत्राट दिले आहे. या बाटलीची किंमत १५ रुपये असून त्यावर फॉर रेल्वेज असा शिक्का आहे. नियमानुसार या बाटल्या केवळ रेल्वेमध्ये किंवा रेल्वेस्थानकातील अधिकृत फूड प्लाझामध्ये विकणे अपेक्षित आहे. मात्र, औरंगाबादेत नियम धाब्यावर बसवून रेल्वे स्टेशन कार्यक्षेत्राबाहेरच्या बिअर बार व परमीटरूमध्ये विक्री केली जात असल्याचे एका वाचकाने निदर्शनास आणून दिले होते. 'मटा' प्रतिनिधीने याची शहानिशा करून त्याचे तथ्य तपासले होते. त्यानंतर दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक ए. के. सिन्हा आणि आयआरसीटीसीच्या ग्रुप सरव्यवस्थापक स्मिता रावत यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची विचारणा केली असता रावत यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी स्थानिक दक्षता पथकाकडून करण्यासंदर्भात आश्वासन दिले होते.

'मटा' प्रतिनिधीने शुक्रवारी प्रभू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की असा प्रकार दुर्दैवी आहे. या प्रकरणी माहिती मागवून तपासणी केली जाईल. त्यात तथ्य आढळून आले तर रिसतर चौकशी केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्गणीचा वाद विकोपाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गणेशोत्सवामध्ये जबरदस्तीने वर्गणी गोळा केल्या जात असल्याच्या घटना अनेकवेळा समोर आल्या आहेत. आता मात्र गणेश मंडळ कार्यकर्त्यांची मजल त्यापुढेही गेली असून वर्गणी न देणाऱ्याच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. हडको एन - ९ भागामध्ये वर्गणी न देणाऱ्या व्यक्तीच्या गाड्यांच्या काचा फोडण्याचा प्रताप गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी मध्यरात्री केला. एवढे होऊनही गाडीचे नुकसान झालेल्या व्यक्तीने मात्र पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला.

सिडको परिसरातील वैभव दहातोंडे यांचे सुजल वॉटर सप्लायर्स नावाचे दुकान असून त्यांच्याकडे पाणी पुरवठा करण्यासाठी दोन टँकर आहेत. श्रीकृष्णनगर गणेश मंडळाचे कार्यकर्ते महेश विटे आणि मयूर ठाकूर यांनी वैभव यांच्याकडे दहा हजारांच्या वर्गणीची मागणी केली होती. तेव्हा गणेशोत्सवाची वर्गणी नंतर देतो, असे वैभव यांनी सांगितले होते. गणेश विसर्जन झाल्यानंतर देखील वैभव यांनी वर्गणी न दिल्याने मयूर, महेश आणि वैभव यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता. वैभव यांचे पाणी पुरवठ्याचे टँकर दररोज ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उभे केले जात असल्याची माहिती महेश व मयूरला होती. त्यांनी गुरुवारी रात्री साथीदारांच्या मदतीने वैभव यांच्या दोन टँकरच्या काचा फोडल्या तसेच एक दुचाकीही फोडली. हा प्रकार पाहताच नागरिकांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्नही केला, मात्र ते हाती लागले नाहीत. या घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी वैभव यांनी तक्रार देण्यास नकार दिला असून अदखलपात्र स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकाच्या खूनप्रकरणी दोन जणांना जन्मठेप

$
0
0

वैजापूरः गंगापूर तालुक्यातील वाळूज येथील प्लॉटच्या किरकोळ वादातून तरुणाचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व अपर सत्र न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यातील अन्य आठ आरोपींना तीन वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला.

याह्याखान कय्युमखान पठाण ( वय ३०) , शोराजखान कय्युमखान पठाण ( वय २८ दोघेही रा. जामा मशिद जवळ वाळुज, ता. गंगापूर) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. कय्युमखान खान, अयुबखान चोपदार, शाईनबी पठाण, नइमबी पठाण, हमीदखान चोपदार, शहारुख चोपदार, अबुबकर पठाण, हुसेनखान पठाण यांना तीन वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. वाळुज येथील जामा मशीदच्या परिसरातील रिझवान रशीद पठाण यांनी भाऊ मोहसीन ६ एप्रिल २०११ रोजी घरासमोरील विकत घेतलेल्या प्लॉटची साफसफाई करीत होते. त्याचवेळी याहयाखान यांनी हा प्लॉट माझा आहे. त्याची तुम्ही साफसफाई करू नका असे म्हणत त्याने अटकाव केला. या वादानंतर त्यांनी त्या ठिकाणी खड्डे खोदून एक पोल उभा केला होता. दरम्यान, काम न थांबल्याने आरोपीने धारदार शस्त्राने मोहसीनवर हल्ला केला. त्यामध्ये मोहसीनचा मृत्यू झाला. तर अन्य आरोपींनी रिझवान याच्या अन्य सात नातेवाईकाना मारहाण करून जखमी केले होते. दरम्यान, या प्रकरणी रिझवान रशीद पठाण २१ याने दिलेल्या फिर्यादीवरून एकूण ११ जणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये सरकारतर्फे एकूण २२ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या साक्षीपुराव्याच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश के. ए. कोठेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images