Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लेखापरीक्षण अहवालातील शेरे आणि वार्षिक प्रशासन अहवालातील त्रुटी तपासण्यासाठी विधिमंडळाची पंचायत राज समिती गुरुवारी औरंगाबाद जिल्हा परिषदेत दाखल झाली. ज्या प्रकरणांत आक्षेप घेतले गेले. त्या विषयाशी संबंधित तत्कालीन अधिकारी समितीसमोर गैरहजर असल्यास एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात आढाव्यादरम्यान निर्णय झाल्याचे कळते.

पंचायत राज समिती सदस्यांपैकी काही सदस्य बुधवारी रात्री शहरात दाखल झाले होते. आमदार अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, उपाध्यक्ष दिनकर पवार, सभापती संतोष जाधव, सरला मनगटे, शीलाताई चव्हाण यांनी गुरुवारी सकाळी सुभेदारी विश्रामगृहावर आमदार भरतसेठ गोगावाले, अनिल बाबर, राहुल मोटे, दीपक चव्हाण, अनिल तटकरे आदींचा सत्कार केला आणि झेडपीच्या मुद्यांवर चर्चा केली. चेअरमन आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे तातडीच्या कामानिमित्त सकाळी मुंबईला गेले होते. ते दुपारी परतले. सकाळच्या सत्रात समितीचे कामकाज यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समितीसमोर हजर न राहिलेल्या अधिकाऱ्यांची एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्याची सूचना देण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत समितीकडून कागदपत्र तपासणी व अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी समिती जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

उपस्थित सदस्य

आमदार संभाजी पाटील निलंगेकर, विकास कुंभारे, भीमराव तापकीर, आर. टी. देशमुख, राजेंद्र नजरधने, अनिल बाबर, भरतशेट गोगावाले, राजाभाऊ वाजे, राहुल मोटे, दीपक चव्हाण, पांडुरंग फुंडकर, अनिल तटकरे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाचखोर निरीक्षकाला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईतील भरारी पथकात काम करणाऱ्या निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख २० हजारांची लाच घेताना अटक केली. सुभाष जाधव असे या आरोपीचे नाव आहे. सूतगिरणी चौकातील एसपी वाइन शॉपजवळ गुरुवारी दुपारी एक वाजता ही कारवाई करण्यात आली. वाइन शॉपचालकावर कारवाई करण्याची धमकी देऊन ही लाच घेण्यात आली होती.

हितेश मखवानी यांचे शहरात एसपी वाइन शॉप व लकी वाइन शॉप ही दुकाने आहेत. बुधवारी त्यांना पंढरपूर येथे मुंबई येथून आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागच्या भरारी पथकाचे निरीक्षक सुभाष महादेव जाधव (रा. कोलबाड रोड ठाणे) याने बोलावून घेतले. तुमच्या दुकानाची तपासणी करून कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केली. दर महिन्याला तीन हजार याप्रमाणे गेल्या तीन वर्षांच्या दीड लाख रुपयाची मागणी केली. चर्चेनंतर महिना दोन हजार रुपयांप्रमाणे एक लाख २० हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली. गुरुवारी दुपारी एक वाजता भरारी पथकातील सहा जणांसह जाधव यांने गारखेडा चौकातील एसपी वाइन शॉप गाठले. मखवाणी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. मखवाणी यांच्याकडून लाचेची रक्कम घेतानाच जाधव याला अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपाधीक्षक प्रकाश कुलकर्णी, विकास पाटील, कृष्णा‌ शिंदे यांच्या पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगपुरा भाजीमंडईत गुप्तधनाची अफवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगपुरा भाजीमंडईमध्ये गुप्तधन सापडल्याचे फोटो गुरुवारी व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. हे प्रकरण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहचल्याने सिटीचौक पोलिसांना श‌ह‌ानिशा करावी लागली. चौकशीत ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले.

औरंगपुरा भाजीमंडईमध्ये सध्या मनपातर्फे पोकलेनने खोदकाम सुरू आहे. येथे गुप्तधन सापडल्याची अफवा दोन दिवसांपासून सुरू आहे. या कथित गुप्तधनाचे फोटो गुरुवारी पोलिस अधिकाऱ्यांच्या व्हट्सअॅपवर व्हायरल झाले. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सिटीचौक पोलिसांना चौकशीच्या सूचना दिल्या. पोलिस उपनिरीक्षक हंबीरराव यांनी सहकाऱ्यांसह सायंकाळी पोकलेनचालकाची चौकशी केली. शिवाय इतर काही जणांकडे चौकशी केल्यानंतर ही अफवा असल्याचेच निष्पन्न झाल्याचे पीएसआय हंबीरराव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच कोटींची फसवणूक

0
0

औरंगाबाद : कंत्राटदाराच्या बिलाची पाच कोटी ११ लाख रुपयांची रक्कम परस्पर उचलून फसवणूक केल्याचा प्रकार वाळूज एमआयडीसीमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनी संचालकाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अशोक कारभारी शिनगारे (रा. बजाजनगर) हे कंत्राटदार असून त्यांनी २०१२ ते २०१५ या काळात भारत उद्योग कंपनीचे एसटीपी प्लॅँट व ड्रेनेजलाइनचे काम केले आहे. या कामाचे पाच कोटी ११ लाख रुपयांचे बिल झाले होते. वारंवार मागणी करूनही कंपनीने रक्कम दिली नव्हती, तसेच बनावट कागदपत्रे तयार करून एमआयडीसीतून परस्पर बिल मंजूर करून घेतले. हा प्रकार शिनगारे यांना समजल्यानंतर त्यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सूर्यकांत कुकरेजा, श्र‌ीकांत कुकरेजा, राजेंद्र यादव, आर. एन. झा, रितेश जयवंत माल्या, अरूण मौर्या, अब्दुल शेख व भारत उद्योग कंपनीचे संचालक व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दशमेशनगरात सलग दुसरा दरोडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दशमेशनगरात चोरट्यांनी निवृत्त बँक मॅनेजरच्या घरात घुसून दीड ते दोन लाख रुपयांसह सोन्याचे लाखोंचे दागिने पळविले. गुरुवारी पहाटे चार ते पावणेपाच यादरम्यान हा थरारक प्रकार घडला. बंगल्यात एकट्या असलेल्या वयोवृद्ध निवृत्त बँक मॅनेजरला चौघांनी धाक दाखवत तोंडावर पांघरूण टाकून झोपण्यास भाग पाडले आणि चोरी केली. या घटनेनंतर पोलिस आयुक्तांसह सर्वच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बुधवारी दुपारी याच परिसरात राहणाऱ्या आर्किटेक्टच्या घरात घुसून साडेतीन लाखांचा ऐवज पळविला होता.

दशमेशनगरातील मुख्य चौकामध्ये मिश्रीलाल कन्हैयालाल बरेडिया (वय ८१) यांचा आनंद बंगला आहे. ते पंजाब नॅशनल बँकेचे निवृत्त व्यवस्थापक अाहेत. सहा खोल्यांच्या या बंगल्यात एकटे राहतात. त्यांचा मुलगा, सून व नातवंडे एसबीएच कॉलनीमध्ये वास्तव्यास आहेत. गुरुवारी पहाटे चार वाजता बरेडिया लघुशंकेसाठी उठले होते. बाथरूममधून बाहेर आल्यानंतर त्यांना बेडरूमजवळच एक अनोळखी तरुण दिसला. या तरुणाने त्यांना हातातील स्क्रू ड्रायव्हरचा धाक दाखवत पलंगकडे नेले. त्यांना पलंगावर ढकलून देत अंगावर पांघरूण टाकून आरडाओरड न करता झोपण्याची धमकी दिली. या प्रकाराने गर्भगळीत झालेले बरेडिया निपचित पडले होते. चोरट्यांनी तिन्ही बेडरूममधील कपाटे फोडून रोख दीड ते दोन लाख रुपये व सोन्याचे लाखो रुपयांचे दागिने चोरून नेले. चोरटे निघून गेल्यानंतर बरेडिया यानी मुलाला फोन करून हा प्रकार सांगितला. उस्मानपुरा पोलिस ठाण्याला ही घटना कळवण्यात आली. घटनास्थळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, राहुल श्रीरामे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव आदींनी भेट दिली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. त्याने काही अंतरापर्यंत माग काढला.

ग्रील तोडून प्रवेश

बंगल्याच्या समोरील बेडरूमच्या खिडकीचे ‌ग्रील तोडून चोरटे आत शिरले. बेडरूमचा दरवाजा बाहेरून लावलेला होता. तो तोडण्यात आला. त्यानंतर चोरट्यांनी अन्य बेडरूममधील कपाटे उघडली. बरेडिया यांनी हालचाल करण्याचा प्रयत्न केल्यास चोरट्यांनी त्यांना धाक दाखवत अन्य कपाटे उघडून ऐवज पळवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनेकांना मणके विकार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल २५ ते ३० टक्के औरंगाबादकर मणक्यांच्या विविध विकारांनी ग्रस्त आहेत. वर्षानुवर्षे अत्यंत वाईट अवस्थेत असलेले शहरातील रस्ते तसेच खड्ड्यांनी या विकारांमध्ये भरच पडली आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे मणक्यांच्या विकारांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत असून, व्यायामाशिवाय मणक्यांच्या विकारांमध्ये २२ टक्क्यांपर्यंत वाढ होत असल्याचेही नव्याने स्पष्ट झाले आहे.

'वर्ल्ड स्पाईन डे' शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) साजरा होत आहे. 'स्ट्रेटन अप अँड मूव्ह' म्हणजेच ताठ मानेने जगा अशी यंदाची थीम आहे. सद्यस्थितीत विविध अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण होत असले तरी मणक्यांचे किंवा 'स्पायनल कॉर्ड'चे (मेंदूपासून कमरेच्या मणक्यांपर्यंत खाली आलेली नस) प्रत्यारोपण अजूनही होऊ शकत नाही. 'स्पायनल कॉर्ड' हा मेंदूचाच भाग असून, मेंदूचे प्रत्यारोपण होऊ शकत नाही. त्यामुळेच 'स्पायनल कॉर्ड'ला शेवटपर्यंत योग्यरित्या जपणे अत्यंत महत्वाचे आहे, असे स्पाइन सर्जन डॉ. उदय फुटे यांनी 'मटा'ला सांगितले. योग्यरित्या बसणे म्हणजेच सरळ-ताठ बसणे, मान-पाठ-कंबरेसह हाता-पायांना आधार (सपोर्ट) असणे आवश्यक आहे. तसेच झोपताना पूर्णपणे समान (फ्लॅट) जागेवर झोपणे आवश्यक आहे. गादी व पातळ उशीचा वापर केला जाऊ शकतो.

सूर्यनमस्कारसारखे 'स्ट्रेचिंग'चे व्यायाम किंवा योगासने मणक्यांसाठी उत्तम परिणामी ठरतात. त्याचवेळी मणक्यांचा कुठलाही विकार उद्भवला तर लवकरात लवकर उपचार करण्यातून पुढील तीव्र त्रास व गुंतागुंत कमी करता येते. अलीकडे विविध प्रकारच्या उपचार पद्धतींमुळे, नवनवीन 'इम्प्लान्टस'मुळे शस्त्रक्रिया सुलभ झाल्या आहेत. 'टायटॅनियम स्क्रू' किंवा विविध उपकरणे वापरून मणके सरळ रेषेमध्ये आणणे शक्य झाले आहे, असेही डॉ. फुटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायपास करतानाही रुग्ण ऐकतो गाणे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मागच्या सलग २५ वर्षांपासून भूलशास्त्रातील आमूलाग्र प्रगतीमुळेच आज नव्वदीतील व्यक्तीवरही सहज शस्त्रक्रिया होऊ शकते आणि चक्क गाणे ऐकत-ऐकत रुग्ण बायपाससारख्या हृदयशस्त्रक्रियेलाही सामोरा जाऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या 'मॉनिटरिंग डिव्हायसेस'मुळे गंभीर गुंतागुंत असलेल्या रुग्णांनाही औषधांचा नेमका 'डोस' प्रभावीपणे देण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या औषधांची 'रिअॅक्शन' आल्यास तत्क्षणी नियंत्रणात आणणेही शक्य झाल्याचे भूलतज्ज्ञांनी स्पष्ट केले.

१६ ऑक्टोबर रोजी 'जागतिक भूलशास्त्र दिन' साजरा केला जात आहे. यानिमित्त भूलतज्ज्ञांनी पत्रकारांशी संवाद साधला. भूलशास्त्रामध्ये अधिकाधिक सुरक्षितता आली असून, भूल दिल्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ०.१ ते ०.५ म्हणजेच एक हजार रुग्णांमध्ये एक इतके घटले आहे. अर्थात, एकाचवेळी विविध प्रकारचे आजार किंवा एकूणच गंभीर गुंतागुंत, अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये हजारात एक, असे मृत्यूचे प्रमाण आहे, मात्र सर्वसामान्य रुग्णांमध्ये तर लाखात एक, इतके प्रमाण अत्यल्प झाले आहे. भूलशास्त्रातील सुरक्षिततेमुळेच आज ८०-९० वर्षांच्या व्यक्तीवरही शस्त्रक्रिया होऊ शकते. अशा प्रकारची शस्त्रक्रिया २०-२५ वर्षांपूर्वी शक्य नव्हती. भूलशास्त्रातील अद्ययावत औषधे देण्याच्या पद्धतीमुळे व त्यासाठीच्या नवीन उपकरणांमुळे 'पेसमेकर' बसविण्यात आलेल्या किंवा थेट हृदयाचे प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तींवरही दुसऱ्या आजारांसाठी शस्त्रक्रिया केली जाऊ शकते व शहरामध्येही अशा प्रकारच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया होत आहेत, असे भूलतज्ज्ञ संघटनेचे शहर अध्यक्ष डॉ. रोशन रानडे, उपाध्यक्ष डॉ. प्रमोद भाले, सचिव डॉ. सुजित खाडे, सहसचिव डॉ. ज्योती तुपकरी, समन्वयक डॉ. संगीता देशपांडे, सहकोषाध्यक्ष डॉ. वैशाली देशपांडे यांनी सांगितले.

आज प्रदर्शन

भूलतज्ज्ञ संघटनेच्या शहर शाखेच्या वतीने शुक्रवारी आयएमए हॉलमध्ये भूलशास्त्रातील वेगवेगळी उपकरणे, मॉनिटर, व्हिडिओ, पोस्टरचे प्रदर्शन सकाळा दहा ते रात्री आठ या वेळेत भरविण्यात येणार आहे; तसेच सायंकाळी सहाला होणाऱ्या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त अमितेशकुमार, संघटनेचे माजी राज्य अध्यक्ष डॉ. शकील मोमीन यांची उपस्थिती राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री कदमांची खासदारांवर कुरघोडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावरून पालकमंत्री रामदास कदम यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर कुरघोडी केली आहे. दोनच दिवसांपूर्वी खैरे यांनी एका कार्यक्रमात आयुक्तांवर अविश्वास आणू नका, असे आदेश महापालिकेतील शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे कदम यांनी खैरेंवर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे.

रामदास कदम यांनी पालकमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून खासदार खैरे यांची पालिकेवरील पकड ढिली झाल्याचे मानले जात आहे. वेळोवेळी घेण्यात आलेले निर्णय, त्यातून खैरे यांना देण्यात आलेली दुय्यम वागणूक यावरून हे प्रकर्षाने समोर आले आहे. पण खैरेंसोबत सलोख्याचे संबंध असून काहीच वाद नाहीत, असे सांगून पालकमंत्त्री भूमिका स्पष्ट करत होते. ही भूमिका स्पष्ट करताना खैरे यांचे खच्चीकरणाची कोणतीही संधी ते सोडत नसल्याचे चित्रही निर्माण होत होते. दोन दिवसांपूर्वी एका रस्ते कामाच्या उद्घाटनावेळी खासदार खैरे यांनी आयुक्तांवर अविश्वास प्रस्ताव आणू नका, असे आदेश पालिका पदाधिकाऱ्यांना दिले. तीन महिन्यानंतर महाजन निवृत्त होणार असून त्यानंतर सक्षम आयुक्त देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करावी, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यावरून आता अविश्वास प्रस्ताव बारगळल्याचे मानले जात होते. परंतु, बुधवारी रात्री बैठकीचा निरोप आल्यानंतर १९ शिवसेना नगरसेवक गुरुवारी सकाळी मुंबईत पोहोचले. त्यांची 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे व पालकमंत्री कदम यांच्या उपस्थितीत बैठक झाली. इतर नगरसेवक वैयक्तिक कारणांमुळे मुंबईला गेले नाहीत. या बैठकीत कदम यांनी अविश्वास प्रस्तावाच्या आवश्यकतेबद्दल माहिती दिल्यानंतर ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवला. भाजपचे पदाधिकारी अविश्वास प्रस्ताव आणणार असल्यामुळे त्यांच्यासोबत राहण्याचे आदेश त्यांनी नगरसेवकांना दिले. या बैठकीला खैरे उपस्थित नव्हते. त्यांना बैठकीचे निमंत्रण होते की नाही, हे स्पष्ट झाले नाही. यावरून महापालिकेत आता 'कदमशाही' चा उदय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अविश्वासाला ‘मातोश्री’चा आशीर्वाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. या ठरावासाठी भारतीय जनता पक्षासोबत राहण्याचे निर्देश त्यांनी नगरसेवकांना दिले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने अविश्वास प्रस्ताव आणल्यास, त्याला शिवसेना पाठिंबा देईल, हे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या इतिहासात आयुक्तांवर अविश्वास प्रस्ताव दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

आयुक्त महाजन यांच्या कार्यपद्धतीबद्दल नगरसेवकांमध्ये सुरुवातीपासूनच नाराजी होती. त्यामुळे त्यांची राज्य शासनाने त्यांची बदली करावी व त्यांच्या जागी दुसरा सक्षम अधिकारी द्यावा, यासाठी पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक प्रयत्न करीत होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही पाठविले होते, पण त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही. सरतेशेवटी महाजन यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणून त्यांना शासनाच्या सेवेत परत पाठवण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला. पंधरा दिवसांपूर्वी सुभेदारी विश्रामगृहात पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या आमदार व महापालिका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 'भाजपने अविश्वास प्रस्ताव मांडावा, त्याला शिवसेना पाठिंबा देईल,' असे या बैठकीत ठरवण्यात आले, परंतु खासदार चंद्रकांत खैरे यांनी, 'आयुक्तांवर अविश्वास ठराव आणू नका,' असे आदेश दोन दिवसांपूर्वीच पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव आणला जाणार की नाही, याबद्दल चर्चा सुरू झाली.

दरम्यान, याचसंदर्भात गुरुवारी सायंकाळी मुंबईत 'मातोश्री'वर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक झाली. बैठकीला पालकमंत्री रामदास कदम, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांच्यासह १९ नगरसेवक उपस्थ‌ित होते. बैठकीत झालेल्या चर्चेची व ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाची माहिती जंजाळ यांनी दिली. ते म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुमारे २० ते २५ मिनिटे बैठक झाली. आयुक्तांवर अविश्वास प्रस्ताव आणण्यामागची भूमिका त्यांनी जाणून घेतली. पालकमंत्री रामदास कदम यांनीही त्यांना यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यानंतर ठाकरे यांनी आयुक्तांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यास मान्यता दिली. या ठरावासंदर्भात भाजपच्या सोबत राहावे, असे आदेश त्यांनी दिले.'

प्रस्ताव मंगळवारच्या सभेत

महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी होत आहे. या सभेची मूळ विषयपत्रिका काढण्यात आली आहे. त्यात आयुक्तांवरचा अविश्वास प्रस्तावाचा समावेश नाही. सभेची पुरवणी विषयपत्रिका शनिवारी काढली जाणार आहे. त्यात अविश्वास प्रस्ताव असेल, अशी माहिती मिळाली आहे. सध्या या प्रस्तावावर नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनवर दुसऱ्या पत्नीचा हक्क

0
0

औरंगाबाद खंडपीठाचा निर्वाळा

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

पतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या पत्नीला कौटुंबिक निवृत्ती वेतन न देण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. ए. एम. बदर यांनी रद्द ठरवला. दुसऱ्या पत्नीचाही कौटुंबिक निवृत्ती वेतनावर कायदेशीर हक्क होऊ शकतो, असा निर्वाळा खंडपीठाने दिला.

निवृत्तीराव कांडनगिरे यांना दोन पत्नी असल्यामुळे सेवा निवृत्तीनंतर नियम ११५ महाराष्ट्र नागरी कायदा निवृत्ती नियम १९८२ (म.ना.नि.वि.)मधील तरतुदीनुसार दोन्ही पत्नीचा उल्लेख करून त्यांनी समान निवृत्ती वेतनाची मागणी केली होती, मात्र २००४मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. पुढे २०११मध्ये निवृत्तीराव कांडनगिरे यांचेही निधन झाले. त्यानंतर हयात असलेल्या मंगलबाई या दुसऱ्या पत्नीने महालेखापाल (नागपूर) यांच्याकडे कौटुंबिक निवृत्ती वेतनाची मागणी केली, मात्र दुसरी पत्नी ही हिंदू विवाह कायद्यानुसार कायदेशीर पत्नी नसल्याने दुसऱ्या पत्नीला कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळू शकणार नाही, असा निर्णय महालेखापालांनी दिला होता. या निर्णयला मंगलबाईंनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. म.ना.नि.वि. नियम ११६ पोटनियमानुसार एक किंवा एकापेक्षा जास्त पत्नी असतील तर दोन्ही पत्नीना समान हिस्सा मिळू शकतो. दोन्हीपैकी एकच पत्नी जिवंत असेल तर, तिला कौटुंबिक निवृत्ती वेतनाचा पूर्ण हिस्सा मिळू शकतो, असा युक्तिवाद त्यांचे वकील शिवकुमार मठपती यांनी केला. सुनावणीनंतर खंडपीठाने महालेखापाल यांचा निर्णय रद्द ठरवून महालेखापाल यांनी निवृत्ती वेतनातील पूर्ण कागदपत्र तपासून तीन महिन्यांत गुणवत्तेवर निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले. शासनाची बाजू एस. के. कदम यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस दलाचा ई-मेल संवादावर भर

0
0

औरंगाबाद : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्यावर पोलिस दलाने भर दिलेला असतानाच अद्यापही अनेक कर्मचारी टेक्नॉसॅव्ही नाहीत. परंतु, आता कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच ऑनलाइन राहावे लागणार असून त्याचे कारण म्हणजे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सर्वांनाच मेल आयडी उघडण्याच्या सूचना केल्या आहेत. लाखो पोलिस कर्मचाऱ्यांचा या डाटामुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतीमान होण्यास मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

काम अधिक गतीमान व्हावे, यासाठी संगणक युगात सर्वजण जास्तीत जास्त टेक्नॉसॅव्ही होण्याचा प्रयत्नात आहेत. इंटरनेटचा वापर वाढला आहे. व्हॅटस्अॅपपासून सोशल मीडियाचा वापरावर अनेकजण भर देतात. माहितीची देवाणघेवाण, संवाद साधणे आदीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. पोलिस दलातही अधिकाऱ्यांसह नव्याने भरती झालेले बहुतांशी कर्मचारी टेक्नॉसॅव्ही आहेत. परंतु, या त्यांच्या खासगी मेल आयडीची एकत्रित असा डाटाची माहिती आतापर्यंत कुणीही संकलित केली नव्हती.

ही माहिती उपयुक्त ठरले, हे लक्षात घेत राज्याचे पोलिस महासंचालक दीक्षित यांनी कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांचे ई मेल आयडीची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिकारी, कर्मचारी यांच्या मेल आयडी संदर्भात माहिती एकत्रित संकलित करण्याचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे.

- विश्वास नांगरे पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीच्या सीईओंची कार, खुर्ची जप्त

0
0

जालना : पाझर तलावासाठी शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीचा वाढीव मोबदला न दिल्याने न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कार व अधीक्षक अभियंत्याची खुर्ची जप्त करण्यात आली.

घनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथील भीमराव देशमुख या शेतकऱ्यांची गट क्र. १९७ मधील ३२ आर जमीन २००० साली राजेगाव पाझर तलावासाठी सम्पादित करण्यात आली होती. दरम्यान, देशमुख यांनी अॅड. राजेश वाघ यांच्यामार्फत वाढीव मोबदल्यासाठी दावा दाखल केला होता. दिवानी न्यायाधीश वरिष्ठस्तर ए. आर. उबाळे यांच्या न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी करण्यात आली. न्या. उबाळे यांनी व्याजासह वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिले. जिल्हा परिषदेने या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने न्यायालयाच्या आदेशाने मुख्य कार्यकारी अधिकारीची कार व कार्यकारी अभियंत्याची खुर्ची जप्त करण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने जप्ती होताच तात्काळ एक लाख सोळा हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांना जागेवर निलंबित करा

0
0

पंचायत राज समिती पथकाच्या सूचना

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागात झालेल्या गैरप्रकारांची दखल पंचायत राज समितीनेही घेतली. अध्यक्ष आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या पथकाने फुलंब्री, सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांचा शुक्रवारी दौरा केला. फुलंब्री तालुक्यातील दोन कोल्हापुरी बंधारे निधी देऊनही अपूर्ण राहिल्याचा ठपका ठेवत कार्यरत अधिकाऱ्यांना जागेवर निलंबनाचे आदेश देण्यात आले. विशेष म्हणजे जिल्ह्यात तीन पथकांपैकी याच पथकाचा दौरा रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

पथकाने फुलंब्रीपासून सुरवात केली. पंचायत समितीच्या बैठकीनंतर सिल्लोड रस्त्यावरील फरशीपूल परिसरात उभारलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची पाहणी पथकाने केली. हा बंधारा अपूर्ण होता. त्यानंतर त्यापुढे अजून एका जागेवरील बंधाऱ्याची साइट व्हिजिट करून तेथील अव्यवस्था पथकाने पाहिले. कामात कुचराई केल्यावरून तिथेही एका अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अखत्यारित नसलेल्या निलंबनाच्या प्रस्तावांना तातडीने तयार करून सरकारकडे पाठवावे, अशी सूचनाही अध्यक्षांनी केल्याचे कळते. सिल्लोड तालुक्यातील एका गावात आमदारांनी दिलेल्या निधीतून सभागृह बांधण्यात आले आहे. तिथे जिल्हा परिषदेची शाळा भरली होती, या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. तिथून पथक सिल्लोडला पोचले. सोयगाव तालुक्यातील शाळा, अंगणवाडी इमारतींना भेटी देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पथक सिल्लोड तालुक्यात भेटी देणार आहे.

दुसरे पथक खुलताबाद, वैजापूर आणि कन्नड तालुक्यांच्या भेटीला गेले होते. तिसरे पथक औरंगाबाद, गंगापूर आणि पैठणच्या दौऱ्यावर होते. औरंगाबाद तालुक्यातील बहुतांश भेटी समाधानकारक होत्या. गंगापूर पंचायत समितीत आढावा घेताना गटविकास अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती पुरविली न गेल्याने झाडाझडती झाल्याचे कळते. सायंकाळी हे पथक पैठण तालुक्याकडे रवाना झाले. शनिवारी पथक जिल्हा परिषद मुख्यालयात आढावा घेऊन पुढची कारवाई जाहीर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरीक्षकाला पोलिस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाइन शॉपवर कारवाई न करण्यासाठी एक लाख २० हजारांची लाच घेणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचा निरीक्षक सुभाष महादेव जाधव याला शनिवारपर्यंत (१७ ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. जी. शेटे यांनी शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) दिले. सूतगिरणी चौकातील एसपी वाइन शॉपची तपासणी करून कारवाई न करण्यासाठीही लाच घेताना पकडण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आरोपीला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदामाला चोरांनी लावली आग

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

चोरी करण्यात अपयश आल्याने अज्ञात चोरट्यांनी शहरातील शासकीय गोदामाला गुरुवारी मध्यरात्री आग लावली. अग्निशमन दलाने वेळीच आग विझवल्याने धान्य सुरक्षित राहिल्याची माहिती तहसीलदार संजय पवार यांनी दिली.

शहरातील गेस्ट हाउस रस्त्यावरील शासकीय गोदामांपैकी उजव्या बाजुच्या गोदामात मागील बाजुचे पत्रे उचकटून अज्ञात चोरांनी गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान घुसले. मात्र या भागात रिकामा बारदाण्याचे गठ्ठे असल्याने चोरांना धान्याच्या पोत्यापर्यंत पोहचता आले नाही. चोरी करण्यात अपयश आल्याने चोरांनी जाताजाता बारदान्याला (रिकामे पोते) आग लावून दिली. गोदामातून धूर निघत असल्याचे लक्षात आल्याने काही नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आईला फसवणाऱ्या मुलीला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मित्राच्या मदतीने आईला तब्बल ५२ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुलीला शनिवारपर्यंत (१७ ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एच. सैय्यद यांनी दिले आहेत.

या प्रकरणी संबंधित मुलीची आई कांताबाई दयानंद भोसले (७२, रा. रविराजभवन, कोतवालपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी मुलगी छाया दयानंद भोसले उर्फ छाया अनिल केदारे उर्फ छाया किरण लोखंडे हिने मित्र दिलीप पातारे (मृत) याच्या मदतीने वडिलांच्या मृत्यूनंतर सख्ख्या आईच्या नावावर असलेली जमीन आईला विश्वासात घेऊन ७० लाख ६० हजार रुपयांना विकण्यास भाग पाडले. त्यानंतर जालना रोडवरील डीसीबी बँकेत ही रक्कम 'एफडी'मध्ये ठेवली आणि खोट्या सह्या करून व आईला वेगवेगळी कारणे देत वेळोवेळी रक्कम लंपास केली.

आईच्या घराच्या वरील मजल्यावर शाळेच्या नावाने सुरू झालेल्या गैरप्रकारांना विरोध करताच मुलीने आईविरुद्ध पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आईने संबंधित मुलीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी मुलीला अटक करून शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मुदत संपल्यामुळे शुक्रवारी आरोपी मुलीला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकळी लव्हाळीत बिबट्याचा धुमाकूळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील शिवना-टाकळी परिसरातील टाकळी-लव्हाळी शिवारात बिबट्याने एक महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने गुरुवारी रात्री एका शेतकऱ्याच्या डोळ्यादेखल कुत्र्याचा फडशा पाडला. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.

या भागात बिबट्याचा वावर असल्याने वन विभागाने एक महिन्यापासून पिंजरा लावला आहे. पण बिबट्या वन विभागाला गुंगारा देऊन शेतवस्तीवरील कुत्रे व शेळ्या-मेंढ्या यांना फस्त करत आहे. लव्हाळी शिवारातील गट नंबर ८६ मधील कारभारी डगळे यांच्या शेतात गुरुवारी सायंकाळी साडेआठ वाजता बिबट्याने दर्शन दिले. पाळीव कुत्रे अचानक भुंकायला लागल्याने त्यांनी पहिले असता त्यांच्या नजरे समोरून बिबट्याने कुत्र्यावर झडप घालून मक्याच्या शेतात नेले व तेथे फडशा पाडला. या शेतकऱ्यांना अत्यंत दडपणाखाली तेथेच रात्र घालवली. शुक्रवारी सकाळी टाकळीचे सरपंच आबासाहेब आहेर यांनी ही बाब वन विभागास कळवली. वन कर्मचारी व स्थानिक राहिवाशी कैलास साळुंके, भाऊसाहेब बोर्डे, मच्छिंद्र शेळके, भाऊसाहेब बारगळ आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नड घाटातून रेल्वे; सर्वेक्षण पूर्ण

0
0

Abdulwajed.Shaikh@timesgroup.com

औरंगाबादहून उत्तर भारतात जाण्यासाठी दौलताबाद-कन्नड-चाळीसगाव या रेल्वेमार्गाची मागणी करण्यात आली होती. या ७० किलोमीटरच्या रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. हा प्राथमिक सर्वेक्षण अहवाल रेल्वे विभागाकडे सादर करण्यात आला आहे.

सध्या उत्तर भारतात जाण्यासाठी औरंगाबाद-मनमाडमार्गे जावे लागते. त्यामुळे १५० किलोमिटरचा फेरा पडतो. यामुळे रेल्वेचा इंधनावरील खर्च वाढत आहे. हा खर्च टाळण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ सोबतच रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करावे व रेल्वे मार्ग टाकावा, अशी मागणी केली होती. यासाठी वर्ष २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून रेल्वे विभागाने दौलताबाद-चाळीसगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला प्रारंभ केला होता.

रेल्वे विभागाने आयआयटी कन्स्ट्रक्शन विभाग रुडकी हरिद्वारद्वारे सर्वेक्षण करण्याचे काम दिले होते. या संस्थेने आपला प्राथमिक सर्वेक्षण अहवाल तयार केला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली. या अहवालात हायवेसाठी करण्यात येणाऱ्या बोगद्याबद्दल काही अडचणी आहेत. रेल्वेच्या नियमानुसार तयार होणारे भुयारी मार्ग आणि रस्ते नियमानुसार दोन असे दोन वेगवेगळ्या नियमांची सांगड घालून हा बोगदा तयार करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा प्रकल्पासाठी लागणाऱ्या खर्चाबद्दलचा असून तो रेल्वे विभागाला लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

१४ कि.मी.चा बोगदा

रेलवे मार्ग आणि हायवेसाठी केला जाणारा बोगदा १४ किलोमीटरचा राहणार असून दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक जाण्यासाठी व दुसरा येण्यासाठी राहणार आहे.

सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले ही आनंददायी बाब आहे. आगामी रेल्वे अर्थसंकल्पात शासनाने भरीव तरतूद करावी. या मार्गामुळे उत्तरेकडचा प्रवास सोयीस्कर होणार आहे.

- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डेंटल’ची कामे ढेपाळली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाची विद्यार्थी केंद्रित अर्धा डझन विकास कामे किमान पाच ते सहा वर्षांपासून केवळ निधीअभावी रखडली आहेत. २४० विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे काम मागच्या चार ते पाच वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. तर, दोन प्रयोगशाळा, एक परीक्षा हॉल, एक सभागृह, एक उपहारगृह व एका व्यायामशाळेचे काम पूर्ण होऊन सहा वर्षे लोटली आहेत; परंतु केवळ विद्युतीकरणाचे काम निधीअभावी रखडले आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे 'शासकीय दंत'साठी आलेला निधी परस्पर दुसऱ्या शासकीय कामांसाठी वळविण्यात आल्यामुळे ही कामे रखडल्याचे समोर आले आहे.

शासकीय दंत महाविद्यालयाचे १२० विद्यार्थी व १२० विद्यार्थिनींसह संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) मुलांच्या वसतिगृहामागे 'दंत'चे तीन मजल्यांच्या वसतिगृहाचे काम दीर्घ प्रतिक्षेनंतर २००९ मध्ये एकदाचे सुरू झाले. त्यावेळी एकूण दहा कोटींच्या कामाला उत्साहात सुरुवात झाली खरी; परंतु योग्य वेळी योग्य प्रमाणात निधी न मिळाल्याने वेळोवेळी बांधकाम खंडित स्वरुपात होत गेले.

दहा कोटींच्या एकूण निधीपैकी आतापर्यंत केवळ तीन कोटी रुपये प्राप्त झाल्याचे समोर आले आहे. अजूनही वसतिगृहाचा आतून गिलावा, फरशी बसवणे, प्लंबिंगचे काम, रंगकाम, फिनिशिंगचे काम बाकी आहे. कंत्राटदाराची तब्बल ५० ते ६० लाखांची रक्कम थकल्यामुळे काही महिन्यांपासून वसतिगृहाचे जवळजवळ थांबले आहे. त्याचवेळी दंत महाविद्यालयाच्या वरच्या मजल्यावर दोन प्रयोगशाळा, सभागृह, परीक्षा हॉलचे काम पूर्ण होऊन सहा वर्षे लोटली आहेत. मात्र निधीअभावी विद्युतीकरणाचे काम झालेले नाही व त्यामुळेच प्रयोगशाळा, सभागृह व परीक्षा हॉल चक्क धूळखात पडून आहेत.

शासकीय दंत महाविद्यालयाच्या बाजूला उपहारगृह तसेच व्यायामशाळेचे काम पूर्ण होऊनही सहा वर्षे लोटली आहे. मात्र या ठिकाणीही विद्युतीकरण झालेले नसल्यामुळे महाविद्यालयासाठी आजपर्यंत कॅन्टीन व जिमखाना सुरू होऊ शकलेला नाही.

'डीन'च्या परस्पर निधी वळवला

शासकीय दंत महाविद्यालयाच्या विविध कामांसाठी मंजूर झालेला निधी आतापर्यंत अनेकवेळा वळविण्यात आला आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठातांची परवानगी न घेता किंवा न कळवताच हा निधी परस्पर वळविण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच वर्षानुवर्षे ही कामे प्रलंबित राहिली. त्याचवेळी हा निधी मिळावा म्हणून स्थानिक राजकीय नेते, आमदार-खासदारांनी आश्वासन देऊनही विद्यार्थ्यांच्या कामांकडे दुर्लक्ष केले. 'डीपीसी'तून 'शासकीय दंत'ला आतापर्यंत लाखांनी निधी मिळाला; परंतु तो केवळ उपकरणांच्या खरेदीसाठी वापरण्यात आला. हा निधी वापरण्याचा मार्ग अनेक ठिकाणी काढण्यात आला असताना, इथे का काढण्यात आला नाही, असा सवालही उपस्थित होत आहे.

निधीअभावी कामे रखडली आहेत. महाविद्यालयासाठी यापूर्वी मिळालेला शासकीय निधी परस्पर वळविण्यात आला आहे. याबाबत अधिष्ठातांना साधे कळविण्यातही आलेले नाही. त्यामुळे आता निधी मिळवून ही सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.

- डॉ. एस. पी. डांगे, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वजनदार पोलिस गाळताहेत घाम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

२४ तास ऑनड्युटी असलेले वजनदार पोलिस व अधिकारी सध्या वजन कमी करण्यासाठी घाम गाळत आहेत. वजन कमी करण्याकरिता त्यांना योगासने शिकवली जात आहेत.

कायदा सुव्यवस्थेच्या कामात गुंतल्याने अनेकांना नियमित परेड वगळता फिटनेससाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे शिथिलता येऊन मरगळ येते. हे लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी पोलिस शिपाई व अधिकाऱ्यांना मैदानी खेळ, व्यायामातून फिटनेस राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण पोलिसाकडे सध्या १८०० कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ असून ते २१ पोलिस ठाणी, स्थानिक गुन्हे शाखा, विशेष शाखा यामध्ये कार्यरत आहे. अलिकडच्या काळात गुन्ह्याचे स्वरुप बदलत असल्याने तपास लावण्यासाठी पोलिसांचा कस लागत आहे. शिवाय सततचे बंदोबस्त असतात. फिटनेस राखावा व वाढावा यासाठी नियमित परेड घेतली जाते. मात्र, प्रशिक्षणार्थी पोलिस शिपाई वगळता इतर शिपाई व अधिकारी परेडकडे अपवादानेच फिरकतात. फिटनेसकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांचे वजन वाढून आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

आता पोलिस अधीक्षकांनीच निर्दश दिल्यामुळे पोलिस शिपाई व अधिकारी मुख्यालयातील मैदानावर नियमित व्यायाम करताना दिसत आहेत. करमाड येथील पोलिस नाईक परमेश्वर आडे यांच्याकडून अनेकजण योगासनाचे धडे गिरवत आहेत. पुढील काळात हा उपक्रम पोलिस ठाणे स्तरावरही राबवला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images