Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कार-बस अपघातात एक ठार, एक जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंपनीच्या कामगारांची वाहतूक करणाऱ्या खासगी बस व कारच्या अपघातात एक जण ठार तर एक जखमी झाला. तीसगाव फाट्याजवळ बुधवारी सकाळी सात वाजता हा अपघात घडला. मृतामध्ये नगरच्या एमप्युअर फार्मासिट्युकल्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक संजय श्रीराम नागरे (वय ४५ रा. सिरसगाव ता. श्रीरामपुर) यांचा समावेश आहे.

संजय नागरे व जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचे व्यवस्थापक महेंद्र मारशे (रा. नगर) हे दोघे कारने कामानिमित्त बुधवारी सकाळी औरंगाबादला येत होते. तीसगाव फाट्याजवळ त्यांच्या कारला समोरून राँग साइड येणाऱ्या खासगी बसने धडक दिली. या अपघातात कारच्या उजव्या बाजूचा चेंदामेंदा झाला तर बस रस्त्यालगत असलेल्या खड्डयामध्ये गेली. दोन्ही जखमींना तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी नागरे यांना तपासून मृत घोषित केले. तर मारशे यांना उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातानंतर बसचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्विमिंग पूल पालिकेकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्योतीनगर येथील 'राकाज्'चा स्विमिंग पूल आता महापालिका चालविणार आहे. येत्या एक महिन्यात हा पूल नागरिकांच्या सेवेत पुन्हा रुजू होईल. या संदर्भात आज बुधवारी महापालिकेत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यात हा निर्णय घेण्यात आला. स्विमिंगपूल कसा सुरू करता येईल याबद्दल अधिकाऱ्यांनी चर्चा करून एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल आता आयुक्त प्रकाश महाजन यांना सादर केला जाणार आहे.

कराराचा भंग करून राकाज् लाइफस्टाइल क्लब चालविला जात असल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी या क्लबच्या परिसरात चालविल्या जाणाऱ्या हुक्का पार्लरवर धाड टाकल्यावर तेथे कराराचा भंग करून विविध उपक्रम सुरू असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी 'राकाज्' क्लबची पाहणी केली व क्लबच्या परिसरात कराराचा भंग झाल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देत क्लब सील करण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडले होते. क्लबमध्ये पोहोण्याच्या तलावासह मसाज पार्लर, पूल टेबलची सेवा कराराचा भंग करून दिली जात होती. या संदर्भात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही वादळी चर्चा झाली होती. त्यावेळी नगरसेविकांनी एकत्र येत 'राकाज्'वर कारवाई करण्यास आयुक्तांना भाग पाडले होते. त्यानंतर 'राकाज्'चे संचालक सुनील राका यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टातही त्यांचा टिकाव लागू शकला नाही. कोर्टाने 'राकाज्'ची याचिका फेटाळल्यानंतर महापालिका राकाज् क्लबबद्दल काय निर्णय घेणार याची उत्सुकता होती.

या क्लबरील कारवाईच्या संदर्भात आयुक्त प्रकाश महाजन यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीमध्ये उपायुक्त अय्युब खान, बीओटी कक्षप्रमुख सिकंदर अली, मालमत्ता अधिकारी वसंत निकम यांचा समावेश करण्यात आला. या समितीची बैठक आज बुधवारी झाली. राकाज् क्लबवर चार टप्प्यात कारवाई करण्याचे ठरविण्यात आले. तेथील तलावात साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वप्रथम तलावात असलेले पाणी काढून टाकले जाणार आहे. त्यानंतर 'राकाज्' ला क्लबच्या परिसरात त्यांच्या मालकीचे असलेले साहित्य काढून घेण्यासाठी अवधी दिला जाणार आहे. दरम्यानच्या काळात पोहोण्याच्या तलावाच्या परिसरात काही डागडूजी करायची असेल तर डागडूजी करून तलावात नवीन पाणी भरले जाणार आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार असून आयुक्तांच्या आदेशानुसार प्रत्येक टप्प्यातील कारवाई केली जाणार आहे.

लाइफ मेंबर्सचा निर्णय सर्वसाधारण सभेत

राकाज् लाइफस्टाइल क्लबमधील पोहोण्याच्या तलावासाठी ज्यांनी लाईफ मेंबरशिफ स्वीकारली आहे व ज्यांनी वार्षिक शुल्क भरलेले आहे त्यांच्याबद्दल सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाईल. दोन्हीही प्रकारच्या मेंबर्सची माहिती सर्वसाधारण सभेसमोर ठेवली जाणार आहे. सभेने धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे सांगितले जाणार आहे.

राकाज् लाइफस्टाइल क्लबच्या संदर्भात आयुक्तांनी स्थापन केलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीची बैठक आज झाली. बैठकीचा सविस्तर अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या आदेशाने क्लबमधील पोहोण्याचा तलाव सुरू करण्याची कार्यवाही केली जाईल. साधारणपणे एका महिन्यात हा तलाव नागरिकांसाठी खुला होऊ शकतो.

अय्युब खान, उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीआय कार्यकर्त्याला शिवसैनिकांची मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना लातूरच्या राजर्षी शाहू कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांच्या समोरच शुक्रवारी लोखंडी रॉड, कातडी पट्टे, चेनने अमानुष मारहाण करून त्यांच्यावर काळे ऑइल टाकण्यात आले. याप्रकरणी कॉलेजशी संबंधित असलेले शिवाजी भोसले व अज्ञात व्यक्तींविरोधात भाईकट्टी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, कॉलेजच्या प्रतिष्ठेला धक्का लावला तर सहन केले जाणार नाही, असे सांगत या घटनेची जबाबदारी शिवसेनेचे अभय साळुंके यांनी घेतली आहे.

भाईकट्टी यांनी शाहू कॉलेजच्या बेकायदा इमारतीचे प्रकरण माहिती अधिकारातून समोर आणले होते. त्याची माहिती त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी भाईकट्टी यांना काही अज्ञात व्यक्ती भेटले, आणि तुम्ही खूप चांगले काम केले आहे. तुमचा सत्कार करायचा आहे, असे सांगत त्यांना गाडीने शाहू कॉलेजच्या मैदानात आणले. तिथे भोसले यांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर भोसले यांच्याबरोबर असलेल्यांनी भाईकट्टी यांना लोखंडी रॉड, कातडी पट्टे, चेनने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावर काळे ऑइल टाकले. मारहाणीनंतर जखमी झालेल्या भाईकट्टी यांना पोलिसांनी पोतदार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेक इन’साठी शेती आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मेक इन इंडिया' ही संकल्पना साध्य करण्यासाठी शेतीचा विकास आवश्यक आहे. शेतीचा विकास हा शाश्वत विकास आहे. शेतीमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून प्रयोग होत आहे. शेतीची खरी गरज काय? देशाची गरज काय? हे ओळखून शेती आधारित व्यवसायाला चालना देण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे. तसेच या क्षेत्रात संशोधन आणि विकास करण्यासाठी विद्यापीठाने महत्त्वाची भूमिका घेऊन शेती विकासासाठी कार्य करायला हवे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'युनिर्व्हसिटी इंडस्ट्री इंटरॅक्शन समीट'चा समारोप शुक्रवारी सायंकाळी झाला. या वेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे, सीएमआयएचे माजी अध्यक्ष मुनिष शर्मा, डॉ. सुभाष मोराळे, प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. अजहरोद्दीन यांचीच् उपस्थिती होती.

डॉ. उमाकांत दांगट म्हणाले, 'देशाच्या दरडोई उत्पन्नात शेतीचा वाटा कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे. देशाची खरी गरज ओळखून शेती संवर्धनासाठी उद्योगांनी काम करण्याची गरज आहे. शेतीला वगळून 'मेक इन इंडिया' होऊ शकत नाही. यासाठी कृषी व्यवसायावर आधारित उद्योग निर्माण करून सेवा क्षेत्र वाढवून मूल्यवर्धित काम करण्याची गरज आहे.' मुनिष शर्मा यांनी उद्योगांच्या गरजांबाबत माहिती दिली. विद्यापीठातून कुशल मनुष्यबळ मिळविण्यासाठी आगामी काळात उद्योजक आणि विद्यापीठाची एकत्रित बैठक घेण्यात येणार असल्याचे आशिष गर्दे यांनी सांगितले. आपले विद्यापीठ केंद्रीय दर्जा म्हणून घोषित व्हावे, यासाठी उद्योजकांनीही आमच्यासोबत पाठपुरावा करावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी या वेळी केले.

विद्यार्थ्यांसाठी मोबाइल अॅप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सिलॅबसपासून ते निकालापर्यंत सर्व माहिती मोबाइलवर देण्यासाठी बामू ई-सुविधा मोबाइल अॅप सुरू करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. गुगल प्ले स्टोअरवरून हा अॅप डाऊन लोड करून विद्यार्थ्यांनी लॉगीन आणि पासवर्ड टाकल्यास विद्यापीठाची सर्व माहिती त्यांना मिळू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायकोर्टाच्या आदेशाचे स्वागत

$
0
0

तातडीने पाणी सोडण्याची व्यक्त केली गरज

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील भागांसाठी नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या धरणांतील पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या हायकोर्टाचे मराठवाड्याच्या सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. केवळ पिण्यासाठी पाणी सोडता येईल, असे स्पष्ट करतानाच प्रवाहाच्या मार्गात पाण्याचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी सरकारने घ्यावी, याकडेही हायकोर्टाने लक्ष वेधले आहे.

जायकवाडीमध्ये पाणी सोडणे अत्यावश्यकच होते; याचे कारण हे जे काही पाणी सोडण्यात आले आहे ते सिंचनासाठी किंवा उद्योगासाठी नसून, ते केवळ पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. जायकवाडी धरणातून औरंगाबाद, जालना, अंबड, माजलगावसह किमान २०० छोट्या-मोठ्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडल्या जाते, म्हणूनच ते आवश्यक होते. मात्र नगर-नाशिक जिल्ह्यातील उसाच्या शेतांना कमी पाणी मिळेल, म्हणून पाणी सोडण्यास विरोध केला जात होता. मात्र हे पाणी ऑगस्टअखेर आणि ऑक्टोबरअखेर या दोन टप्प्यांमध्ये सोडले गेले पाहिजे. ऑगस्टमध्ये नदीचा ओलसरपणा कायम असतो आणि पावसाळ्यामुळे बाष्पीभवनही कमी होते. त्यामुळे सोडलेले पाणी अधिकाधिक प्रमाणात आणि वेगाने जमा होते. मात्र तसे न करता आता पहिल्यांदाच सोडण्यात आल्यामुळे ठिकठिकाणी वळविण्यात येणारे पाणी आणि बाष्पीभवनामुळे साडेबारा टीएमसीपैकी केवळ सहा-सात टीएमसी पाणी प्रत्यक्षात जायकवाडीमध्ये येणार आहे.

- डॉ. विजय दिवाण, पर्यावरणतज्ज्ञ

पाणी सोडण्याचा निर्णय चांगलाच आहे आणि तो अत्यावश्यक होता. आता मात्र गोदावरी पाटबंधारे महामंडळाने तातडीने पाणी सोडण्याची अंमलबजावणी केली पाहिजे; नाहीतर पाणी सोडण्यासाठी पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातून दबाव वाढू शकतो. नेते मंडळी व्यत्यय आणू शकतात. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर तातडीने पाणी सोडले जावे. तसेच पाणी सोडण्यासाठी पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलिस संरक्षणात पाणी सोडण्याची अंमलबजावणी व्हावी.

- डॉ. प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

मराठवाड्याला पाणी सोडण्याचा हायकोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आहे. पाणी जायकवाडी प्रकल्पात पोहचताना खूप तूट होणार आहे. यात अहमदनगर जिल्ह्याचा तोटा नाही. किमान चार टीएमसी तूट मराठवाड्याच्या अंगावर पडणार आहे. त्यामुळे १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याऐवजी आणखी दोन टीएमसी पाणी सोडण्याची गरज आहे.

- जयाजीराव सूर्यवंशी, अध्यक्ष, अन्नदाता शेतकरी संघटना

हायकोर्टाने कायद्यानुसार घेतलेला निर्णय योग्य आहे. पिण्यासाठी पाणी मिळावे अशीच जनतेची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे मराठवाड्याला चांगला फायदा होईल. वरील धरणातून पाणी सोडल्यानंतर मधली गावे पाणी अडवणार आहेत. तरीसुद्धा जेवढे येईल तेवढे पाणी आपल्यासाठी फायद्याचे आहे.

- डॉ. एस. बी. वराडे, कृषीतज्ज्ञ

मराठवाड्यासाठी पाणी सोडणार ही आनंदाची बाब आहे. पाणी कुणाच्या मालकीची गोष्ट नाही. ज्यांना गरज असेल त्यांना पाणी दिले पाहिजे. राजकारण्यांना पाण्यासाठी केलेले प्रकार योग्य नाही. पिण्यासाठी पाणी सोडणार असून शेतीसाठी नाही. मग दारू कारखान्यांचे काय करणार? या उद्योगांवर बंधने आणावी.

- द्वारकादास लोहिया, सामाजिक कार्यकर्ते

बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे कधी बंद करावेत, याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणेच गोदावरी खोऱ्यातील पाणी वाटपावर तोडगा काढला पाहिजे.

- डॉ. किशोर सूर्यवंशी, पाण्याच्या राजकारणाचे अभ्यासक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लालफितीचा चारा छावणीला फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या सात चारा छावण्या सुरू असून, यातून लहान मोठी ६ हजार ४९६ जनावरे सध्या आश्रय घेत आहेत. या चारा छावण्या सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयातील लालफितीच्या काराभारामुळे या चारा छावण्यांची सुमारे दोन कोटींची बिले प्रलंबित आहेत.त्यामुळे या चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय चाराछावणी चालक घेण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा आहे.

२ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आलेल्या भूम तालुक्यातील हाडोंग्री येथील सर्वात मोठ्या चारा छावणीचा यामध्ये समावेश आहे. सध्या या चारा छावणीत २ हजार ३२९ जनावरे आहेत. या चारा छावणीचे सुमारे ६१ लाख रुपयांचे बिल जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यासाठी अनेक प्रस्ताव आले. यापैकी १४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यापैकी सात चारा छावण्या सद्या जिल्ह्यात सुरू आहेत. यातून सद्या ६ हजार ४९६ जनावरांचे पालन पोषण केले जाते.

आगामी काळात जिल्ह्यातील पाण्याचे व चाऱ्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता चारा छावण्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामधून मोठ्या प्रमाणात जनावरे दाखल होती. चारा छावण्या सुरू करण्यासाठी साखर कारखाने, सहकारी संस्था उत्सुक आहेत. मात्र, केवळ प्रशासनाच्या लालफितीच्या कारभाराला वैतागून शिवाय टक्केवारीच्या भाषेला कंटाळून ही मंडळी पुढे यायला धजावत नाहीत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात हाडोंग्री (२ हजार ३२९), भूम (६९६), ज्योतीबाचीवाडी (१ हजार ७१) आणि उस्मानाबाद तालुक्यात येवती (५४१), खामगाव (६२८), कौडगाव (५१५) तसेच भूम (७१६) येथे या चारा छावण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय खासगी क्षेत्रातही काही संस्थांनी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. परंतु, प्रशासनाच्या जाचाला कंटाळून त्यांनी या चारा छावण्याची नोंद शासन दरबारी केलेली नाही.

चारा छावण्यासाठी लागणारा कोट्यावधीचा निधी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहे. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या कार्य बाहुल्यामुळे त्याचे वितरण रखडले आहे.

- साहेबराव घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दगडफेक प्रकरणात राज ठाकरे दोषमुक्त

$
0
0

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना झालेल्या अटकेनंतर बीड व जालना जिल्ह्यात बसवर कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. तीन गुन्ह्यांमध्ये राज ठाकरे यांचाही समावेश करण्यात आला होता. या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावरील दोषारोपपत्र रद्द करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए .व्ही.निरगुडे व न्या. व्ही. के. जाधव यांनी दिले आहेत.

राज ठाकरे २१ ऑक्टोबर २०१० रोजी अटक करण्यात आली होती. या निषेधार्थ राज्यभर मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. बीड जिल्ह्यात माजलगाव येथे दोन ठिकाणी, तर जालना येथे एका ठिकाणी बसवर दगडफेक करून नुकसान करण्यात आली होते. या प्रकरणात जालना व माजलगाव येथे एकूण तीन गुन्हे दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांच्यासह संबंधित कार्यकर्त्यांच्या विरोधात बीड व जालना कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या विरोधात ठाकरे यांनी फौजदारी अर्ज करून दोषारोपपत्र रद्द करण्याची विनंती केली होती. पुरावा दोषारोपपत्रात सादर केलेला नाही, असा युक्तिवाद राज यांचे वकील अरुण शेजवळ यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात नगरपंचायतीसाठी चुरस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जिल्ह्यातील बदनापूर, घनसावंगी, मंठा आणि जाफराबाद या नगर पंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अवघ्या काही तासांवर मतदान येऊन ठेपले आहे. येत्या एक नोव्हेंबर रोजी होणारी ही निवडणूक जिल्ह्यातील प्रतिष्ठित राजकीय नेत्यांच्या कसोटीची आणि चुरशीची होणार आहे.

ग्रामीण भागातील जनतेच्या मनात नेमके काय आहे ? याचे प्रतिबिंब या निमित्ताने उमटेल, तर वर्षभरातील बदललेल्या परिस्थितीचा दावा जनतेच्या मनात किती रूजला आहे, ही बाब लक्षात आणून देणारी निवडणूक समजली जाते आहे. अर्थात निवडणूक म्हटली की सगळ्या राजकीय वर्तुळातील बाबींचा समावेश मोठ्या प्रमाणावर झालाच आहे, अतिशय प्रचंड खर्च आणि कार्यकर्ते व मतदार यांची मर्जी संपादन करण्याचे रोज नवनवीन फंडे चालले आहेत. जिल्ह्यातील पहिल्यांदा होणाऱ्या या निवडणुकांमध्ये अवघ्या १६८ मतदारांचा एक वार्ड घनसावंगीला आहे. तर असेच काही कमीजास्त मतदार संख्या असलेल्या वार्डात मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहेत. गावच्या प्रशासकीय आणि राजकारणात निर्णायक भूमिका असलेल्या या नगर पंचायतीच्या निवडणुकीत जाफराबाद, बदनापूर, घनसावंगी तालुक्यातील वाळू माफीयांचा उघड-उघड सहभाग सामाजिक अस्वस्थता निर्माण करणारा आहे. भविष्यातील त्यांच्या योजनेच्या आणि वाटचालीच्या दिशा अगदीच स्पष्ट करणारा आहे. जाफराबाद आणि बदनापूर नगर पंचायतीच्या निवडणूकीत मुस्लिम समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. घनसावंगी येथे पहिल्यांदाच एमआयएम निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्टूवादी आणि कॉँग्रेसच्या पक्षाची मते हेच त्यांचे लक्ष असल्याचे त्यांच्या प्रचारात स्पष्ट दिसत आहे. आमदार राजेश टोपे यांच्या घनसावंगी या बालेकिल्ल्यात टोपे यांच्या राजकारणाच्या विरोधात शिवसेनेचे डॉ. हिकमतराव उढाण आणि भाजपचे माजी आमदार विलास खरात एकत्र झालेले आहेत. पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांच्या सर्वत्र सभा झाल्या आहेत. राष्ट्रवादीचा संपूर्ण भार टोपे यांच्या एकहाती वटलेला आहे. शिस्तबद्ध पद्धतीने काम करणे हे त्यांचे नेहमीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे नगर पंचायतीच्या निवडणूकीत त्यांना कसे यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसची अवस्था मोठी विकलांग दिसते. स्थानिक नेत्यांना कुणाचाही फार मोठा आधार नाही. पंजाचे निवडणूक चिन्ह मिळाले बस यापलीकडे काही नाही.

बदनापूर आणि जाफराबाद भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी हेलिकॉप्टर दौऱ्यामधून पिंजून काढले. आमदार नारायण कुचे बदनापूरात व आमदार संतोष दानवे जाफराबादेत येथे ठाण मांडून बसलेले आहेत. पालकमंत्री बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांनी मंठा आणि घनसावंगीत लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादीने नवाब मलिक यांच्या सभा घेतल्या, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण प्रचारात येऊन गेले.

शिवसेनेच्यावतीने जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी बदनापूर, जाफराबाद तर दुसरे जिल्हा प्रमुख ए. जे. बोराडे यांनी मंठा आणि घनसावंगीची जवाबदारी उचलली आहे. आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या प्रचारार्थ सभा बैठका झाल्या आहेत.

युतीच्या कार्यकर्त्यांत अदला-बदल

शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत अदलाबदली झाली आहे. ती मंठ्यात त्यामुळे मंठ्यात कालपर्यंत जे भाजपचे कार्यकर्ते होते ते शिवसेनेचा भगवा रूमाल गळ्यात घालून फिरतात तर कालपर्यंतचे शिवसैनिक आता भाजपचा झेंडा घेऊन रॅली काढताना दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एफआरपी’ बिलासाठी शेतकरी संतप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र सरकारने साखर कारखान्यांना बिनव्याजी कर्ज देऊनही शेतकऱ्यांना उसाचे पैसे 'एफआरपी'प्रमाणे मिळाले नाही. नियमाप्रमाणे बिल न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला; मात्र अजूनही शेतकऱ्यांना नियमानुसार पैसे मिळत नसल्याच्या निषेधार्थ अन्नदाता शेतकरी संघटनेने शुक्रवारी साखर उपायुक्त कार्यालसमोर निदर्शने केली. या आंदोलनाची तीव्रता वाढताच नियमानुसार पैसे देणार असल्याचे काही साखर कारखान्यांनी जाहीर केले.

मागील वर्षीचे उसाचे बिल दिल्याशिवाय साखर कारखान्यांना ऊस गाळपाची परवानगी मिळणार नाही असे राज्य सरकारने जाहीर केले. पण, नियम धुडकावून कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. 'एफआरपी'नुसार पैसे देणे बंधनकारक असूनही शेतकऱ्यांना कमी पैसे देण्यात आले. शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याच्या निषेधार्थ अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली साखर उपायुक्त कार्यालय परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी सूर्यवंशी यांनी मराठवाड्यातील साखर कारखान्यांचा बनाव उघडकीस आणला. गेवराईच्या जय भवानी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना पहिले बिल ११२० रूपये दिले; मात्र १५०० रुपयांप्रमाणे अदा केल्याचे दाखवले असे सूर्यवंशी यांनी सांगितले. पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना गाळपाची परवानगी नसताना गाळप करून साखर विक्री करीत आहे. सरकार केवळ पोकळ घोषणा करून शेतकऱ्यांची लूबाडणूक करणाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला. शेतकऱ्यांना 'एफआरपी'ची रक्कम तातडीने द्यावी. कारखान्यांवर कारवाई न करता संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर टाच आणून शेतकऱ्यांची बिले द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. दरम्यान, शेतकऱ्यांचे आंदोलन वाढताच साखर उपायुक्त श्रीमती गायकवाड यांनी साखर कारखान्यांशी फोनवरून संपर्क साधला. या कारखान्यांनी आठ दिवसात 'एफआरपी'प्रमाणे बिल देण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात पाराजी मोरे, राजाभाऊ मोरे, विक्रम नरके, बद्री गिरगे, गोविंद औटे, नंदलाल बांगरे, सुधाकर उगले यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले.

६८ कोटी थकले

'एफआरपी'प्रमाणे पैसे न देता साखर कारखाने राज्य सरकारची दिशाभूल करीत आहेत. औरंगाबाद विभागात शेतकऱ्यांचे कारखान्यांकडे तब्बल ६८ कोटी ५० लाख रूपये थकले आहेत. साखर कारखान्यांनी ही रक्कम तातडीने द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कमी भाव देण्यासाठी काही साखर कारखाने साखरेचा उतारा कमी दाखवतात असा आरोपही शेतकऱ्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जय जवान’विरोधात हायकोर्टात याचिका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

लातूर जिल्ह्यातील जय जवान जय किसान साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी साखर आयुक्त व नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालकांना नोटीस देण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले .

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील साखर कारखान्यावर संभाजी पाटील व इतर संचालकांचे मंडळ निवडून आले. चार वर्षांपासून कोणतेही लेखापरिक्षण (आॅडिट) केले नाही. कारखाना सुरू करण्यात अपयश आले. कामगारांच्या पगाराविषयी भूमिका घेतली नाही. दहा हजार सभासद असलेल्या या कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली नाही. तसेच ३१ मार्च २०१३ अखेर कर्मचारी वेतनासाठीचे ९०४ लाख रुपये देणे बाकी आहे, असे कारण देत मंडळावर गंडातर आणले. मंडळ बरखास्त करण्याचा व प्रशासन नेमण्याच्या निर्णयाविरोधात सहकार मंत्र्यांसमोर अपील दाखल करण्यात आले. मंत्र्यांनीही सहसंचालकांचा आदेश कायम ठेवला. त्यामुळे संचालक मंडळाने हायकोर्टात धाव घेतली.

कारखाना अवसायानात काढण्याची प्रक्रिया, बरखास्ती व प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. खंडपीठाने साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. कर्मचाऱ्यांतर्फे गिरीष आवाळे यांनी बाजू मांडली. या प्रकरणाची सुनावणी २४ नोव्हेंबरला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकर्त्याच्या मारहाणीचा निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

'आरटीआय' कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या आवारात शुक्रवारी अमानूष मारहाण करण्यात आली. भाईकट्टी यांना झालेल्या मारहाणीची बातमी लातूर शहरभर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सारे शहर हादरुन गेले. महाविद्यालयाच्या मैदानात नेऊन एखाद्याला मारहाण करण्याची ही पहिलीच घटना आहे. या मारहाणीचा सर्वस्तरातून निषेध करण्यात येत आहे.

आम आदमी पार्टीचे डॉ. सुधीर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद सावे, भाजपचे सुधीर धुत्तेकर, काँग्रेसचे माईज शेख, शेकापचे अॅड. उदय गवारे यांनी शाहू महाविद्यालयाच्या मैदानात झालेल्या मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध केला असून आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी ही घडलेली घटना निंदनीय असल्याचे म्हटले आहे. खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी या प्रकरणी पोलिस अधिक्षकांशी बोलून मारहाण करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. भाजप नेते शैलेश लाहोटी म्हणाले, 'मी शहरात घडलेला सर्व प्रकाराची मुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती दिली आहे.'

चौकशीसाठी समितीची स्थापना

शाहू कॉलेजच्या आवारात शुक्रवारी दुपारी काही अज्ञात व्यक्तींकडून अज्ञात व्यक्तीला काळे फासून धक्काबुकी केली. त्यामुळे महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी जमा झाले. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या बैठकीत उपस्थित होत्या. त्यामुळे या प्रकाराशी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांचा काहीच संबध नाही. या घटनेची चौकशी करण्यासाठी महाविद्यालयाने प्राचार्य एस. डी. साळुखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांनी प्र‌सिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

महाविद्यालयाच्या मैदानात चार हजार विद्यार्थ्यांच्या समोर मारहाण करण्यात आली. माफी मागायली लावली आहे. मी फक्त शिवाजी भोसले या संस्थेच्या सदस्यांना ओळखतो. इतरांनी मी समोर आणले तर ओळखू शकेन.

- मल्लिकार्जून भाईकट्टी, माहिती अधिकाराचे कार्यकर्ते, लातूर

भाईकट्टी यांनी शाहू महाविद्यालयाशी संबंधित एका व्यक्तीविरुद्ध आणि काही अनोळखी व्यक्तीविरुद्ध मारहाण केल्याची माहिती जबाबात दिली आहे.

- मंगेश चव्हाण, पोलिस उपअधिक्षक, लातूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रश्न ७५,००० प्रवाशांचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रविवारपासून शहरातील जवळपास ७५ हजार प्रवाशांचे हाल सुरू होणार आहेत. डिझेल रिक्षा हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, स्वस्तातील सक्षम वाहतूक व्यवस्थेचा पर्याय नसल्याने सर्वसामान्य, चाकरमानी, विद्यार्थी भरडले जाणार आहेत.

प्रादेशिक परिवहन समितीच्या बैठकीत १ नोव्हेंबरपासून शहरातून डिझेल रिक्षा हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे यापूर्वी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हा निर्णय रद्द केला होता. आता पोलिस आयुक्तालयाने प्रदूषणाच्या नावाखाली डिझेल रिक्षावर बंदी आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे जवळपास दोन हजार डिझेल रिक्षांना शहराबाहेर वाहतूक करावी लागेल.

सध्या शहरातील रेल्वे स्टेशन, जालना रोड, एपीआय कॉर्नर ते हर्सूल टी पाइंट आणि हर्सूल टी पाईंट ते रेल्वे स्टेशन, बीड बायपास, पैठण रोड, वाळूज, पंढरपूर या मार्गावर डिझेल रिक्षातून स्वस्त वाहतूक सुरू असते. हा निर्णय लागू झाल्यानंतर या मार्गावरील प्रवाशांचे हाल होतील. विशेष म्हणजे इतक्या कमी खर्चात त्यांना पर्यायी वाहन, व्यवस्था मिळेल याची खात्री सध्या नाही. यापूर्वी महापालिकेने एएमटीचा प्रयोग केला होता. मात्र, टप्प्याटप्प्याने ही सेवा बंद पडली.

नियम तोडणे भोवले

डिझेल रिक्षाचालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करतात. अनेकजण महिला, मुली एकट्या पाहून छेड काढण्याचा प्रयत्न करतात. प्रवाशांशी ते उद्धटपणे बोलतात. ठिकठिकाणच्या चौकात रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अशा काही जणांच्या बेजबादार वागण्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

डिझेल रिक्षा बंद केल्याने कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही एसटी प्रशासनाला सूचना केली आहे. सध्या सिटीबसच्या ६०० फेऱ्या होत आहेत. १ नोव्हेंबरपासून सिटीबसच्या १३० फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.

- खुशालचंद बाहेती, सहाय्यक पोलिस आयुक्त (वाहतूक)

सातारा भागातून येण्यासाठी सिटीबस सेवा नाही. त्यामुळे रिक्षाचा प्रवास आम्हाला करावा लागतो. दहा ते पंधरा रुपयात आम्ही शहरात येतो. जर शेअररिंग रिक्षाची सेवा नसेल तर, आमच्या सारख्यांनी काय करावे.

- गजानन केदारे, प्रवासी

घराची जबाबदारी, गाडीचे कर्ज फेडण्यासाठी दररोज परिश्रम घ्यावे लागतात. दिवसभरात पाच ते सहा ट्रीप झाल्यानंतर आमच्या पदरात थोडेफार पडते. आता शहरातून आम्हाला बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आमचे घर कसे चालणार?

- मनोज बोरुळे, डिझेल रिक्षाचालक

शहरातील मुख्य रस्त्यांवर या गाड्या चालत आहेत. व्होडाफोन कॉल सेंटरवर काम करणारे अनेक तरुण या रिक्षातून प्रवास करतात. शहरासाठी परवाना असल्यामुळे या रिक्षा शहरातच राहू द्याव्यात. आमच्या पोटावर लाथ मारू नये.

- मोहम्मद फारूख, डिझेल, रिक्षाचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतवस्तीवर हल्ला; ११ जणांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतजमिनीच्या वादावरून फुलंब्री तालुक्यातील नायगाव येथील शेतीवस्तीवर हल्ला करणाऱ्या ११ जणांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. एम. झाठे यांनी प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी एक लाख रुपये फिर्यादी कोकिळाबाई ठोकळ यांना नुकसान भरपाईपोटी देण्यात यावेत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

नायगाव येथील कोकिळाबाई ठोकळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या कुटुंबासह शेतवस्तीवर राहतात. २९ मार्च २००७ रोजी दुपारी नवनाथ चतरू गायकवाड याची जनावरे ठोकळ यांच्या शेतात गेली होती. पूर्वीच्या भांडणावरून जनावरे का हाकलून दिली, असे म्हणत रात्री उशिरा नवनाथ चतरू गायकवाड याच्यासह ११ जण वस्तीवर शिवीगाळ करीत लाठ्या काठ्या घेऊन आले.

भीतीपोटी कोकिळाबाई आपल्या मुलांना घेऊन अंधारात मक्याच्या शेतात लपून बसली. या जमावाने घरावर हल्ला करून टी. व्ही., संसारपयोगी साहित्याची नासधूस केली आणि ओरडून जिवे मारण्याची धमकी देत जमाव निघून गेला.

रस्त्यात जगन्नाथ काळे दिसल्यामुळे त्याला जमावाने मारहाण केली असल्याचे कोकिळाबाई यांनी फुलंब्री पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून नवनाथ चतरू गायकवाड, चतरू तान्हाजी गायकवाड, बाळू चतरू गायकवाड, गणेश चतरू गायकवाड, श्रीराम विश्वनाथ गायकवाड, अंकुश पंडित गायकवाड, दीपक अवचित गायकवाड, पोपट पंडित गायकवाड, शिवाजी गायकवाड, विठ्ठल तान्हाजी गायकवाड, काळू तान्हाजी गायकवाड, पंडित तान्हाजी गायकवाड या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून कोर्टात दोषोरोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणीत सहाय्यक सरकारी वकील रमेश शिंदे यांनी पाच साक्षीदार तपासले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता बालिकांचा काही तासात शोध

$
0
0

औरंगाबाद : न्यायनगर, भारतनगर प‌रिसरातील अनुक्रमे दहा, आठ व सहा वर्षांच्या तीन मुली गुरुवारी दुपारपासून बेपत्ता होत्या. सायंकाळी त्यांच्या आईने मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. तिघी अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने पोलिसही हादरून गेले. पीएसआय हारूण शेख, कल्याण शेळके यांनी तातडीने पथकासहित त्यांचा शोध सुरू केला. सायंकाळच्या सुमारास न्यायनगर भागातच या बालिका आढळून आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रुद्रा’च्या ‘एमडी’ला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या 'रुद्रा मल्टिट्रेड'च्या व्यवस्थापकीय संचालकाला सोमवारपर्यंत (दोन नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी शुक्रवारी (३० ऑक्टोबर) दिले. या प्रकरणातील इतर चार आरोपी फरार आहेत.

या प्रकरणी 'स्कोडा' कंपनीतील गोविंद बालाजी बोडखे (२९, रा. चिकलठाणा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादी व त्याच्या संपर्कातील इतर सहा-सातजणांना सिडको कॅनॉट प्लेस परिसरातील 'रुद्रा मल्टिट्रेड' कंपनीने ११ हजार रुपये भरल्यास तीन महिन्यांत २० हजार रुपये, ५५ हजार भरल्यास तीन महिन्यांत १ लाख रुपये, १ लाख १० हजार रुपये भरल्यास तीन महिन्यांत २ लाख रुपये देण्याचे आश्वासन मार्च २०१४मध्ये दिले होते, मात्र तीन महिन्यानंतर फिर्यादी व इतरांना कंपनीचे कार्यालय कॅनॉट प्लेस येथून गायब झाल्याचे दिसून आले. त्यामुळे फिर्यादी व इतरांनी दहा लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात दिली. त्यानंतर महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण अधिनियम अंतर्गत चौकशी करून आरोपी व कंपनीचा मुख्य संचालक श्रीकांत जगन्नाथ गटकळ, आरोपी व कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक विजय पांडुरंग लेंभे (३४, जटवाडा), आरोपी संध्या श्रीकांत गटकळ, आरोपी जगन्नाथ संपत गटकळ व आरोपी अंजना जगन्नाथ गटकळ यांच्याविरुद्ध कलम ४२०, ४०६, ४६७, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, २२ ऑक्टोबर २०१५ रोजी आरोपी विजय लेंभे याला अटक करण्यात आली, तर इतर चार आरोपी अजूनही फरार आहेत.

आरोपी लेंभे याला कोर्टात हजर करण्यात आले असता या प्रकारची फसवणूक जालना, परभणी, बुलडाणा आदी ठिकाणी झाली असण्याची शक्यतचा असून, त्याबाबत तपास करणे आहे, फरार आरोपींचा शोध घेणे, कंपनीच्या मालमत्तांची चौकशी करणे आणि अटकेतील आरोपीने माहिती दिली नसल्याने, आरोपी लेंभे याला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील अॅड. सतीश मुंडवाडकर यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्रिमूर्ती स्कूलच्या प्राचार्य, रेक्टरवर गुन्हा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नेवासातील त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य अशोक गाढे व रेक्टर कुंदा शिंदे यांच्यावर गुरुवारी रात्री नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेजस्विनी डोंभाळच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तिच्या पालकांना आठ तास झुलवत ठेवून हा गुन्हा दाखल केला.

तेजस्विनी डोंभाळने मंगळवारी सकाळी आत्महत्या केली होती. हा प्रकार घातपाताचा असल्याचा आरोप ते‌जस्विनीची आई प्रिती डोंभाळ यांनी केला आहे. गळफास घेतलेल्या तेजस्विनीचा मृतदेह शाळेच्या प्रशासनाने पोलिस येण्यापूर्वीच हॉस्पिटलमध्ये हलविला होता. तसेच तिच्या हातावर टी व गाडे अशी दोन नावे लिहिलेली होती. तेजस्विनीच्या आत्महत्येला प्राचार्य अशोक गाढे व हॉस्टेलच्या रेक्टर कुंदा शिंदे कारणीभूत असल्याचा आरोप प्रिती डोंभाळ यांनी केला आहे. गुरुवारी नेवासा पोलिस ठाणे गाठून त्यांनी या प्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीवरून अशोक गाढे व कुंदा शिंदे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइलचे गूढ कायम

तेजस्विनीला नेहमी मोबाइल वापरण्याची सवय होती. सोमवारी तिने रात्री आठ वाजेच्या सुमारास आईला कोजागिरीचा शुभेच्छा संदेश पाठवला. पंधरा मिनिटांनी प्रिती डोंभाळ यांनी पाठवलेल्या मेसेज मात्र तेजस्विनीच्या वॉट्सअॅपवर रिसिव्ह झाला नाही. तिने आत्महत्या केली त्यावेळी देखील तिच्याजवळ मोबाइल आढळला नव्हता. बुधवारी हा मोबाइल एका स्वच्छतागृहाच्या भांड्यात आढळून आला, मात्र त्यामध्ये सीमकार्ड नव्हते. हे सीमकार्ड गुरुवारी अशोक गाढे यांनी पोलिसांकडे जमा केले. तिच्या स्कूल बॅगमध्ये हे सीमकार्ड असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली, मात्र मंगळवारी पोलिसांनी तिच्या बॅगची तपासणी केली तेव्हा पोलिसांना हे सीमकार्ड आढळून आले नव्हते. हा मोबाइल स्वच्छतागृहामध्ये कोणी टाकला, सीमकार्ड काढण्याचे कारण काय या प्रश्नांनी पोलिसांना देखील चक्रावून टाकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राथमिक शिक्षक संघाचा आज मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. एक नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, आंतरजिल्हा बदलीसाठी राज्यस्तरावर एकच रोष्टर तयार करून हा प्रश्न त्वरित सोडवणे, जिल्हा परिषद शिक्षकांच्या तालुकांतर्गत व आपसी बदल्या विनाअट कराव्यात यासह अनेक राज्यस्तरीय प्रलंबित मागण्या आहेत. शनिवारी दुपारी दोन वाजता काढण्यात येणाऱ्या मोर्चात शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य संपर्कप्रमुख मधुकर वालतुरे, जिल्हाध्यक्ष काकासाहेब जगताप, राज्य संपर्कप्रमुख राजेश हिवाळे, हारून शेख आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना सरकारमधील पाहुणे

$
0
0

भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांचा टोला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शिवसेना म्हणजे आमच्यावर प्रेम करणारे मित्र आहेत. ते अधुनमधुन वैफल्यापोटी बोलतात. मुळात ते सरकारमधील पाहुणे आहेत. विधानसभा निवडणुकीत काय दिसायचे ते दिसले. आमच्यापेक्षा शिवसेनेच्या निम्म्याच जागा निवडून आल्या,' असा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.

पक्षाच्या एका उपक्रमानिमित्त जिल्हा दौऱ्यावर असलेल्या भंडारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'राज्यात सत्तेत आल्यापासून भाजपने अनेक महत्त्वाची कामे केली. वचननाम्यातील २५ गोष्टींची पूर्तता केली, पण त्याची माहिती लोकांपर्यंत पोचली नाही. भविष्यात याच पद्धतीने सरकार काम करणार आहे. दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली आहेत. लोकसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोचवित आहोत.'

असे असूनही शिवसेना तुमच्या कामावर बोट का ठेवते ? असे विचारले असता भंडारी म्हणाले, 'ते वैफल्यापोटी असे बोलतात. सेनेच्या सत्तेत सहभागामुळे सरकारचे काम कमी दिसले. शिवसेनेकडून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांमुळे लोकांचे सरकारबद्दलचे परसेप्शन बदलले. केवळ आरोप-प्रत्यारोप होत राहिले. त्यापुढे जाऊन शिवसेनेकडे असलेल्या खात्यांकडे सांगण्यासारखे काही नसेल, पण भाजपने भरपूर केले आहे. वेळप्रसंगी कठोर पावले उचलली आहेत.'

मुख्यमंत्री फडणवीस यांनी साबरमती नसते तर तुमची माती झाली असती असा टोला शिवसेनेला लगाविला होता. त्यासंदर्भात भंडारी म्हणाले, 'मुख्यमंत्री खरच बोलले आहेत. सेनेचे १८ खासदार निवडून आले. एरव्ही एवढे खासदार निवडून आले असते काय ? लाटेचा फायदा मिळाला म्हणूनच ते निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काय दिसायचे ते दिसले. शिवसेनेच्या आमच्यापेक्षा निम्म्याच जागा निवडून आल्या.

शिवसेना सत्तेतच राहणार

शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल काय या प्रश्नावर भंडारी म्हणाले, 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांवरून तसे अजिबात वाटत नाही. आमचे सरकार पडणार नाही. जर काही हालचाली झाल्या तर आमच्याकडे संख्याबळ उपलब्ध आहे. कुणाची मदत घेण्याचीही आवश्यकता पडणार नाही,' असा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील पाणीप्रश्नी ७ नोव्हेंबरला सर्वपक्षीय बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासंदर्भात भूमिका ठरवण्यासाठी ७ नोव्हेंबर रोजी जनता विकास परिषदेच्या पुढाकाराने मराठवाड्यातील सर्व आमदार, खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे,' अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

अॅड. देशमुख म्हणाले, 'पाणी प्रश्नावरून नगर-नाशिक मधील लोकप्रतिनिधी एकत्र येतात, रस्त्यावर उतरतात, प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढतात. आता कोर्टाच्या आदेशानुसार नगर-नाशिक भागातील धरणांमधून जायकवाडी धरणात किमान १२.८४ टीएमसी पाणी सोडावेच लागणार आहे. हे पाणी सोडताना त्या भागातील सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन संघर्ष करण्याची शक्यता आहे, त्या दृष्टिने त्यांनी मोटही बांधली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी देखील पाणी प्रश्नाबद्दल ठोस भूमिका घेतली पाहिजे. यासाठी जनता विकास परिषदेतर्फे लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला जात आहे. काही जणांशी संपर्क झाला आहे. ७ नोव्हेंबर रोजी याच प्रश्नावर मराठवाड्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत पाणीप्रश्नाबद्दल पुढे काय करायचे, लढा कसा उभारायचा याचा निर्णय घेतला जाईल,' असे अॅड. देशमुख म्हणाले. पत्रकार परिषदेला प्राचार्य शरद अदवंत, सारंग टाकळकर, शंकरराव नागरे आदी उपस्थित होते.

आज पाणी कट्टा

औरंगाबादः पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण होण्याची भीती आहे. जलस्थितीची माहिती घेण्यासाठी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजनिअर्सच्या वतीने शनिवारी राजेंद्रसिंग राणा यांच्याशी शनिवारी संवादाचा 'पाणी कट्टा' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. दोन वाजता इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स सभागृहात कार्यक्रम होईल. सिंचन सहयोग, सरोवर संवर्धिनी, भारतीय जलसंस्कृती मंडळ यांच्यावतीने हा कार्यक्रम होत आहे.

मंत्र्यांना साकडे

'मराठवाड्यातील मंत्र्यांनी देखील या बैठकीला उपस्थित रहावे, असा आमचा प्रयत्न आहे. कोर्टाच्या आदेशामुळे आता किमान १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडावे लागणारच आहे. उद्याचा सूर्य जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याबरोबर उगवावा,' अशी अपेक्षा अॅड. प्रदीप देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याच्या तयारीतील संशयित टोळी गजाआड

$
0
0

औरंगाबादः दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा संशयित दरोडेखोरांना क्रांतिचौक पोलिसांनी गुरुवारी रात्री बाबा पेट्रोलपंप चौकात अटक केली. त्यांच्या विरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक शाखेचे पोलिस पथक बाबा पेट्रोलपंप चौकात गुरुवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी त्यांना सहा व्यक्ती संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळून आल्या. या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. आरोपीमध्ये संदीप ज्ञानोबा वाघमारे, प्रकाश अंकुश गव्हाणे, प्रेम धर्मराज कंडेकर, एकनाथ भागाजी खोमणे, अंबादास माणिकराव परकते, गणेश कचरू जाधव व मोहसीन युसूफखान यांचा समावेश आहे. याप्रकरणी वाहतूक शाखेचे पीएसआय प्रमोद इंगळे यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात दरोड्याच्या तयारीत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images