Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भरदिवसा जोडप्याला लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अजबनगरात भर दिवसा दोन भामट्यांनी वृद्ध जोडप्याला घरात घुसून गंडविल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. शासकीय अनुदान योजनेची माहिती देण्याची थाप मारीत या भामट्यांनी घरात प्रवेश केला आणि सोन्याचे सहा तोळ्यांचे दागिने लंपास केले.

अजबनगर येथे त्रिंबकराव काळे (वय ८५) हे निवृत्त शिक्षक पत्नी निर्मलाबाई (वय ७८), मुलगा व सुनेसह राहतात. त्यांचा मुलगा सिल्लोड येथील एसबीएच बँकेत तर, सून औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत कार्यरत आहे. शुक्रवारी त्रिंबकराव व निर्मलाबाई दोघेच घरी होते. सकाळी पावणेअकराच्या सुमारास दोन भामट्यांनी शासकीय अनुदान योजनेची माहिती देण्याचा बहाणा करीत घरात प्रवेश केला. त्यांनी कॅमेऱ्यामध्ये त्यांनी त्रिंबकराव काळे व निर्मलाबाई काळे यांचे फोटोही काढले. फोटो काढताना त्यांनी दोघांना गळ्यात असलेले दागिने काढायला लावले. निर्मालाबाई यांनी हाताच्या मुठीत दागिने ठेवले होते. यावेळी त्यांना मूठ उघडायला लावून दागिने काढून घेतले. यानंतर दोघांना भुरळ घातली आणि निर्मलाबाई यांना कपाटाची चावी कुठे ठेवली, असे विचारले. चावी सुनेला माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर एका भामट्याने मोबाइल काढून त्यावर त्यांच्या सुनेशी बोलत असल्याचे भासवले व निर्मलाबाईंना सुनेनी चावी तुमच्याकडे असून, ती देण्यास सांगितल्याची थाप मारली. त्याला भुलून निर्मलाबाईंनी कपाटाची चावी त्यांच्याकडे सोपवली. त्यांच्यासमोर कपाटातील दागिने घेऊन हे भामटे पसार झाले.

भामट्यांनी अडीच तोळ्यांचे गंठण, दीड तोळ्याचे मंगळसूत्र, महालक्ष्मीच्या मुखवट्याचे मंगळसूत्र अंगठ्या व रोख दहा हजार रुपये भामट्यांनी लांबविले. भुरळ उतरल्यानंतर हा प्रकार काळे दांपत्याच्या लक्षात आला. त्यांनी नातेवाईकांना फोन करून माहिती दिली. हा प्रकार कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इराणी टोळीवर संशय

इराणी टोळीतील गुन्हेगार भुरळ घालून, बोलण्यात गुंतवून अशा पद्धतीचे गुन्हे करण्याबाबत प्रसिद्ध आहेत. त्यामुळे इराणी टोळीवर संशय घेण्यात येत आहे. दरम्यान, रेकॉर्डवरील काही गुन्हेगारांचे फोटो काळे याना दाखविण्यात आले. यापैकी काही गुन्हेगारांवर त्यांनी संशय व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वातंत्र्यसैनिक कौसडीकर यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अॅड. आनंदराव कौसडीकर (९१) यांचे शुक्रवारी (३० ऑक्टोबर) निधन झाले. हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर १९५५ पासून त्यांनी परभणीत वकिलीला प्रारंभ केला होता. मराठवाड्यातील पदवीधर वकिलांच्या पहिल्या पिढीचे ते प्रतिनिधी होते.

स्वातंत्र्योत्तर काळात मराठवाड्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत त्यांचा पुढाकार होता. समाजवादी पक्षाचे असलेले आनंदराव हे एस. एम. जोशी यांच्या जवळचे होते. जयप्रकाश नारायण हे त्यांच्या परभणीतील घरी येऊन गेल्याचा त्यांना अभिमान होता. गेली काही वर्षे आजारी असल्याने ते मुलांकडे औरंगाबादला होते. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर प्रतापनगर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तनवाणी, आहुजावर ६५० पानी आरोपत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‌पहाडसिंगपुऱ्यातील बेकायदा जमीन विक्रीत १०४ रहिवाशांना बेघर करणाऱ्या नगरसेवक राजू तनवाणी व राज आहुजाविरुद्ध शुक्रवारी कोर्टात ६५० पानी आरोपत्र दाखल करण्यात आले. या दोघांविरुद्ध ६ सप्टेंबर २०१५ रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रेणुकामातानगर व ताजमहल कॉलनी येथील ग्रीन झोनमधील पाच एकर २९ गुंठे जमिनीवर बेकायदा प्लॉटिंग करून तिची विक्री करण्यात आली होती. या प्रकरणी नगरसेवक राजू तनवाणी, या जमिनीचा मुख्यातरनामा नावावर असलेला राज आहुजा, जमिनीची विक्री करणारा मृत संतराम कोरडे व तत्कालीन तलाठी, मंडल अधिकारी यांच्यावर रामदास ढोले या रहिवाशाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी तनवाणी व आहुजाला अटक केली. या प्रकरणी सबंधित तलाठ्यालाही अटक करण्यात आली. सध्या तनवाणी व आहुजा हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

८३ तक्रारी; ४ जबाब

पहाडसिंगपुऱ्यातील बेकायदा जमीन विक्री प्रकरणी ८३ तक्रारी आल्या होत्या. चार जणांचे कोर्टासमोर जबाब झाले. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपपत्र तयार करून छाननी समितीपुढे मांडण्यात आले. पोलिस आयुक्त, उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त व दोन सरकारी वकिलांच्या समितीने या दोषारोपपत्राची छाननी केली. त्यानंतर कोर्टात दाखल करण्यास परवानगी दिली, अशी माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयटी’वर आधारित पॅनसिटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्मार्ट सिटीच्या अंतर्गत विकसित केली जाणारी पॅनसिटी माहिती तंत्रज्ञानावर आधारितच असली पाहिजे. त्या दृष्ट‌िने नियोजन करा,' असे आदेश केंद्र सरकारचे अतिरिक्त सचिव व स्मार्ट सिटी अभियानाचे संचालक समीर शर्मा यांनी आयुक्तांना दिले आहेत.

स्मार्ट सिटी अभियानात शहराचा समावेश झाल्यावर त्या दृष्टिने काय तयारी केली जात आहे, याचा आढावा घेण्यासाठी शर्मा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पुणे येथे यशदामध्ये दहा शहरांच्या आयुक्तांची बैठक झाली. औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, 'सात नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दहा शहरांच्या आयुक्तांना स्मार्ट सिटी अभियानातील तयारीबद्दल सादरीकरण करायचे आहे.

या सादरीकरणाची काय तयारी आहे, याचा आढावा समीर शर्मा यांनी घेतला. पॅनसिटीमध्ये घनकचरा व्यवस्थापन, सिटीबस, रस्ते, पाणीपुरवठा अशा योजना घेता येणार नाहीत. पॅनसिटी पूर्णपणे आयटी टेक्नॉलॉजिवर आधारित असली पाहिजे. आयटी टेक्नॉलॉजीवर आधारित पॅनसिटी उभारण्याच्या दृष्टिने नियोजन करा, असे आदेश केंद्रीय सचिवांनी दिले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत रिडेव्हलपमेंटमध्ये मध्यवर्ती बसस्थानकाच्या जवळच्या मिलचा परिसर व पुंडलिकनगरचा परिसर घेण्याचे नियोजन आहे. त्या संदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे शर्मा यांच्या लक्षात आणून दिले आहे.

डीएमआयसीमध्ये ग्रीनसिटी

आयुक्त म्हणाले, 'डीएमआयसीमध्ये ग्रीनसिटी विकसित करण्याचा विचार आहे. या शहरासाठी कोणते ठिकाण निवडायचे यावर विचार सुरू आहे. कांचनवाडी येथे २१६ एमएलडी क्षमतेचा एसटीपी उभारण्याचे काम सुरू आहे. यामधून शेंद्रा - बिडकीन औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना सांडपाणी देण्याचे नियोजन आहे. या कारखान्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी जायकवाडीचे पाणी वापरावे, सांडपाण्यासह कारखान्यातील प्रक्रियेसाठी एसटीपीचे पाणी वापरावे असा प्रस्ताव आहे,' याची माहितीही शर्मा यांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार खैरेंविरुद्ध पोलिसांत तक्रार

$
0
0

वाळूज : बजाजनगर येथील बेकायदा धार्मिक स्थळे हटविताना शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी अर्वाच्च भाषा वापरून कारवाई बंद पाडल्याप्रकरणी तहसीलदार रमेश मुनलोड यांनी शुक्रवारी रोजी खैरे यांच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

अनाधिकृतपणे उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश कोर्टाने दिल्यानंतर बुधवारी कारवाईस सुरवात करण्यात आली होती. यावेळी खैरे घटनास्थळी आले. त्यांनी धार्मिक स्थळ हटविण्यास विरोध केला. त्यावेळी बाचाबाची झाली होती. याप्रकरणी तहसीलदार मुनलोड यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावा, असा तक्रार अर्ज पोलिसांत देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर औरंगाबाद जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी, तलाठी संघटनेने शनिवारपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाम’च्या नावाने गंडविणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिनेअभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या भामट्याला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने श‌न‌िवारी अटक केली. वडीगोद्री (जि. जालना) येथील दीपक सर्जेराव आटोळे असे या आरोपीचे नाव आहे. मुलाला शिक्षण व एक लाख रुपयाचे अनुदान मिळवून देतो, अशी थाप मारून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांकडून त्याने प्रत्येकी तीन हजार रुपये उकळले होते.

नाम फाउंडेशनच्या नावाने भामटा पैसे लुबाडत असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना मिळाली होती. त्याचा शोध घेण्याचे काम ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले होते. मोबाइल क्रमांकावरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता, तो वापरत असलेले सीमकार्ड कृष्णा काळे यांच्या नावावर असल्याचे समोर आले. काळे यांचे दोन महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले. तांत्रिक पैलुंचा अभ्यास करून पोलिसांनी या भामट्याला अटक करण्यात यश मिळवले. दीपक आटोळे (वय २५ रा. वडीगोद्री, ता. अंबड, जि. जालना) असे या आरोपीचे नाव आहे. दीपकने सिरसगाव, वडोदखुर्द, खुलताबाद, इंदिरानगर, विहामांडवा, वडीगोद्री येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयाशी संपर्क साधून प्रत्येकी तीन हजार रुपये उकळल्याची कबुली दिली. काकासाहेब भुसारे (वय ३० रा. सिरसगाव ता. गंगापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी दीपकविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक कांचनकुमार चाटे, सहायक निरीक्षक महेश आंधळे, उत्तम डिघोळे, विकास चौधरी, गणेश जाधव यांनी केली.

देवगिरी कॉलेजमधून मिळवली यादी

मध्यंतरी देवगिरी कॉलेज येथे नाम फाउंडेशनचा एक कार्यक्रम झाला होता. त्यावेळी दीपक आटोळे हा तेथे क्लर्क म्हणून कामाला असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. या कार्यक्रमातून त्याने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांची यादी मिळवली होती. या यादीतून फोन क्रमांक मिळवून तो त्यांच्याशी संपर्क साधत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

RTI कार्यकर्त्याला लातूरमध्ये बेदम मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

'आरटीआय' कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या आवारात शुक्रवारी चार हजार विद्यार्थ्यांसमोर मारहाण करण्यात आली. भाईकट्टी यांनी याच महाविद्यालयाच्या अवैध इमारतीचे प्रकरण समोर आणले होते. या प्रकरणात महाविद्यालयाशी संबंधित शिवाजी भोसले आणि अज्ञात व्यक्तींविरोधात भाईकट्टी यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे अभय साळुंके यांनी मी त्यांच्या तोंडाला काळे फासले अशी जाहीर कबुली दिली. शाहू महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेला कोणी धक्का लावणार असेल, तर ते सहन आम्ही त्याला सोडणार नाही, असा इशारा दिला.

भाईकट्टी यांना शुक्रवारी सकाळी काही अज्ञात व्यक्तींनी, तुम्ही खूप चांगले काम केले आहे. तुमचा सत्कार करायचा आहे, असे सांगून गाडीत बसवले आणि शाहू महाविद्यालयाच्या मैदानात नेले. त्या ठिकाणी त्यांना महाविद्यालयाशी संबंधित भोसले यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत अन्य काही जणांनी लोखंडी रॉड, कातडी पट्टे, चेनने बेदम मारहाण केली. त्यानंतर भाईकट्टी यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी दाद न दिल्याने त्यांना गांधी चौकात सोडून देण्यात येत असताना भाईकट्टी यांनी, मला किमान तहसीलसमोर सोडा, अशी विनंती केली. त्यामुळे त्यांच्या अंगावर ऑईल टाकून तहसील कार्यालयासमोर सोडून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरहातून दरोड्याचा बनाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जवाहरनगर भागात चोरट्यांनी हातपाय बांधून घर साफ केल्याचा फोन शनिवारी सकाळी नियंत्रण कक्षाला आला. त्यानंतर पोलिसांची धावपळ झाली, फटाफट पोलिस यंत्रणा दाखल झाली. तीन तासांनंतर एका सुरक्षारक्षकाने पत्नीच्या विरहामुळे बनाव केल्याचे उघड झाल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, पोलिसांची दिशाभूल करून धावपळ करणाऱ्यास भाग पडणाऱ्या सुरक्षारक्षकाविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मीनगरात एका व्यक्तीला चोरट्यांनी बांधून ठेवले व त्याच्या घरातील साहित्याची लूट केलीख, अशी माहिती शनिवारी पहाटे सव्वाचार वाजता पोलिस नियंत्रण कक्षात गस्त घालणाऱ्या एका गुरख्याने दिली. माहिती मिळताच जवाहरनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी, चार्ली पथक, गस्तीचे पथक लक्ष्मीनगरात दाखल झाले. तोपर्यंत जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील तेलुरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव हेही घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षारक्षक दीपक रुस्तुम वाघ (वय ३२, मूळ रा. आजेगाव ता. सेनगाव, हिंगोली) यास दोरीने बांधून ठेवल्याचे त्यांना दिसताच त्यांनी तातडीने त्याची सुटका केली.

परंतु, प्रकरण संशयास्पद वाटल्याने पोलिस निरीक्षक आघाव यांनी दीपकला विश्वासात घेऊन चौकशी केली असता हा निव्वळ बनाव असल्याचे समोर आले. तशी कबूलीही त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पत्नीचा विरह म्हणून...

दीपक हा महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्यांच्या घरी सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. आठ दिवसांपूर्वी त्याचे पत्नीसोबत वाद झाला. तेंव्हापासून पत्नी घरातून आपल्या मुलाला घेऊन बीडबायपास येथील हरिरामनगरमध्ये राहणाऱ्या एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या घरी घरकामासाठी गेली. ती काम करून त्याच ठिकाणी राहत होती. पत्नीला बोलावूनही येत नसल्याने तिने घरी यावे, म्हणून चोरट्यांनी मारहाण केली, लुटले, असा बनाव दीपकने रचला. दोरीने स्वत:च बांधून घेतल्यानंतर गुरखा वीरबहादूर याला फोन करून घटनेची माहिती दिली. वीरबहादूर घटनास्थळी आले, त्या वेळी दीपकचे हात मोकळेच होते, मी स्वत:चे हात सोडवून घेतल्याचे तो सांगत होता. माझ्या पत्नीला फोन करून माहिती दे, असा आग्रह तो वीरबहादूरकडे धरत होता. मात्र, प्रकरण वेगळच असल्याचे लक्षात आल्याने वीरबहाद्दूर यांनी थेट पोलिसांना फोन केल्याने बनाव फसला. पोलिसांना वेठीस धरून त्रास दिल्याबद्दल दीपकच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ट्रकच्या धडकेत मृत्यू

वाळूज ः वाळूजपासून काही अंतरावर असलेल्या लिंबेजळगाव येथे एका आयशर ट्रकने धडक दिल्याची माहिती प्रत्येक्षदर्शीने देताच वाळूज पोलिसांनी तात्काळ नाकेबंदी करून आयशर ट्रक पकडला. त्यामध्ये १३ जनावरे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याची बाब उघडकीस आली. या अपघातात अज्ञात पादचारी मरण पावला. ही घटना शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिस उपनिरिक्षक सागरसिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रक चालकासह तिघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खोटे स्वप्न दाखवू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटीच्या नावाखाली चुकीच्या संकल्पना लादल्या जात आहेत. चाळीस वर्ष जुना डाटा समोर ठेवून खोटे स्वप्न दाखवले जात आहे अशी टीका जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केली. आपण जागृत झालो तर आपले शहर स्मार्ट सिटी आपोआप होईल असे ते म्हणाले.

अनंत भालेराव प्रतिष्ठानतर्फे आज शनिवारी डॉ. राजेंद्रसिंह यांना अनंत भालेराव पुरस्कार देण्यात आला यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सवीता पानट, डॉ.प्रभाकर पानट, डॉ.सुधीर रसाळ, न्या. नरेंद्र चपळगावकर, प्राचार्य प्रताप बोराडे, सुभाषचंद्र वाघोलीकर, संजीव कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी पुरस्काराच्या निमित्याने डॉ. राजेंद्रसिंह यांना मानचिन्ह, सन्मानपत्र व पंचेवीस हजार रुपये डॉ. राजेंद्रसिंह यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकरराव मुळे यांच्या हस्ते देण्यात आले. प्रा. विजय दिवाण यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.

यानंतर दृकश्राव्य माध्यमातून डॉ. राजेंद्रसिंह यांनी त्यांनी राजस्थानात केलेल्या कामाची माहिती कार्यक्रमास उपस्थित असलेल्या नागरिकांना दिली. त्यांच्या मनोगतानंतर काही प्रश्नोत्तरे देखील झाली.

एका नागरिकाने स्मार्ट सिटी बद्दल प्रश्न विचारला, त्याला उत्तर देताना डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, 'आम्ही स्वतःच स्मार्ट आहोत. कुणी एखादा आमचे शहर कसे काय स्मार्ट बनवू शकतो. औरंगाबादचा स्मार्टनेस औरंगाबादमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या स्मार्टनेसवर अवलंबून आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली चाळीस वर्षांपूर्वीचा डाटा समोर ठेवला जात आहे, अशा चुकीच्या संकल्पना स्मार्ट सिटीच्या नावाखाली लादल्या गेल्या तर संघर्ष अटळ आहे. नागरिक जागृत झाले तर हे शहर निश्चितपणे स्मार्ट सिटी होईल.'

जायकवाडी धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ७६ टीएमसी आहे, पण सध्या या धरणात फक्त २७ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. एवढया कमी पाण्यात औरंगाबाद शहर, डीएमआयसी, ३०२ गावांची मेगा सिटी या सगळ्यांना पाणी कोण आणि कसे देणार असा प्रश्न प्रा. विजय दिवाण यांनी यावेळी उपस्थित केला. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये पाणी माफीया सक्रीय होऊ लागले आहेत असेही त्यांनी यावेळी बोलातना स्पष्ट केले.

मराठवाड्यातील नेतृत्वात दूरदृष्टी असती तर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नसता असे डॉ. राजेंद्रसिंह आपल्या भाषणात म्हणाले. मराठवाड्याचे नेतृत्व द्रष्टे नेतृत्व असते तर त्यांनी मराठवाड्यात उसाची शेती होऊ दिली नसती. उसाच्या ऐवजी दाळीचे, भाजीपाल्याचे उत्पादन त्यांनी शेतीच्या माध्यमातून केले असते. मराठवाड्याला उसाचा प्रदेश बनवू नका असे आवाहन त्यांनी केले. उसाची शेतीमुळे मराठवाड्यावर दुष्काळ ओढावला आहेत्र त्यामुळे आगामी काळात दुष्काळापासून सुटका व्हायची असेल तर उसाच्या ऐवजी शेतकऱ्याने कमी पाण्याचे उत्पादन घेण्याची गरज आहे. नदी जोड प्रकल्प हा भारताला तोडणारा प्रकल्प आहे अशी टीकाही त्यांनी केली. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

जलयुक्त विद्यापीठ बनवणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ८०० एकर क्षेत्रात विस्तारले आहे. आता आम्ही या संपूर्ण परिसरात शिक्षक, विद्यार्थी यांच्या मदतीने पाण्याचे नियोजन करीत आहोत येत्या एक वर्षात दहा कोटी लिटर पाणी जिरवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. विद्यापीठाला जलयुक्त विद्यापीठ बनवणार असल्याची ग्वाही विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दावरवाडीच्या शेतकऱ्याची नापिकी, कर्जामुळे आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पैठण तालुक्यातील अजून एका शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. तालुक्यातील दावरवाडी येथे शनिवारी ही घटना घडली. रामेश्वर बाबूराव राखे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

रामेश्वर (वय. ४४) यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांच्यावर सोसायटीचे तेहतीस हजार व खासगी दोन लाखांचे कर्ज होते. यावर्षी कमी पावसामुळे संपूर्ण पिकाचे क्षेत्र वाया गेले. त्यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून रामेश्वर राखे नैराश्यात होते. शनिवारी सकाळी नैराश्यात त्यांनी स्वतःच्या घरी शेतात फवारणीसाठी आणलेले विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणाची पाचोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागेच्या योग्य वापरासाठी विचार होणे आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील सहा उड्डाणपुलांच्या खाली महापालिकेने पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली तर रस्त्यावर वाहने लावण्याचे प्रमाण कमी होईल तसेच पालिकेच्या तिजोरीत काही रक्कम पडेल. याशिवाय वाहतूक पोलिस कार्यालयासाठीही विचार होऊ शकतो. मात्र, त्यासाठी संबंधित यंत्रणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. अर्थात त्यासाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी हालचाली झाल्या पाहिजेत.

सहा उड्डाणपुलांच्या खाली असलेल्या जागेचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी दुचाकी, चारचाकी पार्किंगसाठी मुबलक जागा उपलब्ध होऊ शकते. या जागा वार्षिक करारावर महापालिकेने जर दिल्या तर, जागेची स्वच्छता चांगली राहील आणि अतिक्रमणही होणार नाही. मुंबई, पुणे,नागपुरात असे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. पुलाखाली पार्किंग करताना त्याची दक्षता राखणेही आवश्यक आहे. त्यासाठी सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक नेमणे,मासिक तसेच दैनंदिन पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था असे अनेक विषय पालिकेला हाताळता येतील, पण त्यासाठी प्रशासनाकडून आजवर कुठलेही पाऊल उचलले गेल्याचे ऐकिवात नाहीत. असा उपक्रम राबविताना कायदेशीर बाबीही तपासून पाहणे गरजेचे आहे. जालना रस्त्यावर तीन उड्डाणपूल उभे राहिले आहेत. चौथा पूल काही महिन्यांत पूर्ण होईल. रेल्वेस्टेशन, संग्रामनगर उड्डाणपुलाखाली जागा आहे. तेथे पार्किंग वा व्यावसायिक वापरासाठी गाळे उपलब्ध करून देता येतील. याशिवाय जालना रस्त्यावर वाहतूक पोलिसांसाठी चौक्यांची सुविधा उपलब्ध करून दिली तर, ट्रॅफिक कंट्रोल करण्यास अधिक सोयीचे जाईल. सद्यस्थितीला झालेली अतिक्रमणे प्राधान्याने काढली पाहिजेत. एकीकडे शहर स्मार्ट करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. मात्र, मुख्य रस्ता असलेल्या जालना रस्त्यावरील उड्डाणपुलांची बकालावस्था अजून प्रशासनाने का ध्यानात घेतली नाही हे कोडेच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराच्या विकासासाठी ‘चिनी’ वादा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेला शनिवारी चीनच्या शिष्टमंडळाने भेट दिली. अजिंठा वेरुळ लेण्यांमुळे औरंगाबादची ओळख बौध्द तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करणारे शहर अशी आहे. त्यामुळे या शहराच्या विकासासाठी हातभार लावण्याचा मनोदय या शिष्टमंडळाने महापौर त्र्यंबक तुपे यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केला.

४ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत चीनचे उपराष्ट्रपती ली यांचो येणार असून त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या परिषदेत औरंगाबादला मदत करण्याचा ठोस निर्णय होणार आहे. आजच्या शिष्टमंडळात चीनच्या दुतावासाचे प्रतिनिधी श्रीमती ली फिंघुई, कॉन्सिल जनरल झिंज झियान यांचा समावेश होता.

चीनी शिष्टमंडळाने सकाळी साडेदहा वाजता महापालिकेला भेट दिली. यावेळी महापौर त्र्यंबक तुपे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपायुक्त अय्युब खान, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, अफसर सिद्दिकी आदी उपस्थित होते. शिष्टमंडळाशी चर्चा केल्यावर महापौरांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, '४ नोव्हेंबर रोजी चीनचे उपराष्ट्रपती औरंगाबादला येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत दुपारी साडेतीन वाजता एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबादचा समावेश स्मार्ट सिटी अभियानात झाल्याचे आम्ही चीनी शिष्टमंडळाच्या लक्षात आणून दिले आहे. या समावेशाबद्दल शिष्टमंडळाने पालिकेचे अभिनंदन केले. अजिंठा लेणीकडे जाणारा रस्ता सहा पदरी असला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हा रस्ता सहा पदरी होण्यासाठी चीनचे सरकार मदत करायला तयार आहे, असे शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले. याशिवाय औरंगाबाद शहरातील काही विकास कामांना हातभार लावता येईल का, याचाही विचार चीन सरकार करीत आहे. ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परिषदेत याबद्दल ठोस निर्णय जाहीर केला जाईल,' असे महापौर म्हणाले.

व्हिजिटिंग कार्डसाठी धावपळ

शिष्टमंडळाला महापौरांचे व्हिजिटिंग कार्ड द्यायचे होते. कार्ड देण्यासाठी महापौरांना खिशात मराठी भाषेतील व्हिजिटिंग कार्ड आहे, असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे इंग्रजी भाषेतील कार्ड आणा, असे फर्मान त्यांनी सोडले आणि त्यांच्या स्टाफची धावाधाव सुरू झाली. कसे तरी इंग्रजी भाषेतील कार्ड मिळवले आणि ते त्या शिष्टमंडळाच्या हाती सोपवले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकारच्या बदनामीचा डाव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याचा निर्णय आघाडी सरकारच्या काळातील आहे. अधिकाऱ्यांनी तेव्हा कारवाई केली नाही. आता केली जात आहे. यात धार्मिक भावना भडकावून युती सरकारला बदनाम करण्याचा जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि अधिकांऱ्याचा डाव आहे,' असा आरोप खासदार चंद्रकांत खैरे शनिवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत केला.

बजाजनगर येथील मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करून बांधलेली मंदिरे हटविण्यात येत होती. त्यावेळी खासदार खैरे यांनी तहसीलदार रमेश मुनलोड यांना आक्षेपार्ह शब्द वापरले. त्याबद्दल मुनलोड यांनी तक्रार दाखल केली आहे. ही अर्वाच्च शिवीगाळ इलेक्ट्रॉनिक मीडियात व्हायरल झाली. त्यामुळे खैरेंवर टीकेची झोड उठली आहे. यावर आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'मी तेथे गेलो नसतो तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. धार्मिक स्थळे हटविण्याबाबतचा निर्णय तीन वर्षापूर्वी काँग्रेस आघाडीच्या काळात झाला. आजपर्यंत कारवाई करण्यात आली नाही. आता कारवाई केली जात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांची सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे. राजकारणही केले जात आहे. मुनलोड यांच्यावर अनेक भष्ट्राचाराचे आरोप असून ते ५० लाख रुपये देऊन पदावर आले आहेत. या अधिकाऱ्यांचा बदला घेतला जाईल, बदला कसा घ्यायचा हे ठरवू,' असे ते म्हणाले.

...ते शब्द मागे!

मुनलोड प्रकरणात खैरे यांच्या बोलण्यात माफीचेही शब्द होते. ते म्हणाले, 'माझ्यावर आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावे. मी अधिकाऱ्याला बोललो ते संतापाच्या भरात. रागाच्या भरात बोलले असेल तर, त्याबाबत माझे शब्द मागे घेतो,' असे सांगत त्यांनी अचंबित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खैरेंविरोधात गुन्हा नोंदवा; महसूल कर्मचारी आक्रमक

$
0
0

औरंगाबाद : बजाजनगर अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान खासदार चंद्रकांत खैरे यांनी तहसीलदार रमेश मुनलोड यांना केलेल्या शिविगाळीच्या निषेधार्थ खैरेंविरुद्ध गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटनेने शनिवारी काम बंद आंदोलन केले. उर्वरित मराठवाड्यात कर्मचाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.

खैरे यांच्या विरोधात तहसीलदार मुनलोड यांनी तक्रार दाखल करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. या घटनेने महसूल कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी सकाळपासूनच काम बंद आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी काम थांबविले, तसेच निदर्शने केली. निदर्शनामध्ये राजपत्रित संघटनेचे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर, संभाजी अडकुने, संगिता सानप, स्वाती कारले यांच्यासह महसूल कर्मचारी संघटनेचे डी. एम. देशपांडे, बी. डी. म्हस्के, महेंद्र तिटगे, महेश खोसरे, सतीश पेंडसे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यानंतर हे कर्मचारी विभागीय आयुक्तालयात गेले. तेथील कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत काम बंद केले. संघटनेतर्फे दुपारी दोन वाजता विभागीय आयुक्तांना निवेदन देवून कारवाईची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साळुंकेची सेनेतून हकालपट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या मैदानात माहिती अधिकाराचे कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना काळे फासून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शाहू कॉलेजशी संबंधित आरोपीला शुक्रवारी रात्रीच अटक केली. अन्य आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार शोधून काढून संबंधिताविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी अभय साळुंके यांच्यासह संबधित शिवसैनिकाची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

या प्रकरणी शिवाजी भोसले या शाहू कॉलेजशी संबधित आरोपीला शुक्रवारी रात्रीच अटक केली असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक चव्हाण यांनी दिली.

पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे म्हणाले, 'लातूरच्या शैक्षणीक परंपरेला काळीमा फासणारी ही घटना आहे. या माध्यामातून काही जणांनी लोकशाहीचा खून केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी जनतेसमोर आले पाहिजेत.'

भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी म्हणाले, 'भाईकट्टी यांच्यावर झालेल्या हल्ला हा पुर्वनियोजित कट होता. मारहाण करणारे सर्वसाधारणपणे पळून जातात परंतु, यावेळी मारहाण करणारे माध्यमांना प्रतिक्रिया देतात याचाच अर्थ हा कट असून पोलिसांशी ही त्यांचे लागेबांधे आहेत.'

भाईकट्टी यांना पोलिस संरक्षण देण्याची सूचना पोलिस अधिक्षक डॉ. एस. पी. चव्हाण यांना केली होती. त्यांनी संरक्षण दिले नाही. त्यामुळे ते ही तेवढेच या हल्याला जबाबदार आहेत, असा सणसणाटी आरोप लाहोटी यांनी केला. यावेळी भाजपचे जिल्हा संघटनमंत्री गुरुनाथ मगे, प्रवीण कस्तुरे, मोहन माने यांची उपस्थिती होती.

त्यांची सेनेतून हकालपट्टी

शिवसेनचेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत, अभय साळुंके हा शिवसैनिक असला तरी झालेली मारहाण हा शिवसेनेचा कार्यक्रम नव्हता. या हल्यामुळे लातूरचा जातीय सलोखा बिघडणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन संजय सावंत यांनी केले. दरम्यान, अभय साळुंके आणि त्यांच्या सोबतच्या सहभागी सैनिकांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी टिवटरवरून जाहीर केले. पत्रकार परिषदेला अॅड. बळवंत जाधव, नागेश माने, संतोष सोमवंशी नगरसेवक सुनील बसपुरे,श्रीमती सुनीता चाळक आदि उपस्थित होते.

संचालकावर कारवाईची मागणी

विद्रोही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. महाविद्यालयाच्या संचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्रोही संघटनेचे अध्यक्ष अॅड. अतिश चिकटे यांनी केली. यावेळी विकास वाघमारे, प्रशांत गायकवाड आदि उपस्थित होते.

प्रशासनाची बघ्याची भूमिका

राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्याला प्रवेश करायचा असेल तर ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. परंतु ३० ऑक्टोबर रोजी महाविद्यालयाच्या परिसरात अज्ञात व्यक्ती येऊन तासभर मारहाण करत होते. हे कृत्य घडत असताना महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक, हजारो विद्यार्थी यांनी बघ्याची भूमिका घेतली ही गोष्ट महाविद्यालयाच्या शिस्तीच्या नियमात बसते असा का ? असा खडा सवाल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने प्राचार्य डॉ. एस. डी. साळुंके यांना भेटीत केला. यावेळी अभिजित पाटील, सिध्देश्वर लटपटे, स्वप्नील गंगणे, योगेश शेळके यांचा समावेश होता.

बेकायदा कामावर कारवाई करा

बेकायदा बांधकाम करणाऱ्या संस्थेवर आणि माहितीच्याअधिकाराचे काम करणाऱ्या व हल्ला करणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग सेलचे शहराध्यक्ष संजय सोनकांबळे यांनी केली. या हल्याच्या विरोधात जनआंदोलन उभे करण्यासाठी एक नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर सर्वपक्ष संघटनाची बैठक बोलविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२४ तासांत पाणी सोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जायकवाडीत अहमदनगर-नाशिकच्या धरणातून २४ तासांच्या आत पाणी सोडा. अन्यथा मराठवाडा गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयाला घेराव घालू,' असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

शनिवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिष्टमंडळासह महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी दानवे म्हणाले, 'नगर-नाशिकच्या धरणातून तत्काळ पाणी सोडा असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यानुसार पाणी सोडण्याची जबाबदारी गोदावरी खोरे विकास महामंडळाची आहे. त्यामुळे जायकवाडी धरणासाठी पाणी सुटले पाहिजे. यासाठी प्रयत्न करा. जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर, सरकार आणि सरकार मधील अधिकारी काय कामाचे. आज शिवसेनेतर्फे फक्त निवेदन दिले जात आहे. सोमवारी मोठे आंदोलन करू, कार्यालयाला घेराव घालू,' असा इशारा त्यांनी दिला. यावेळी शहरप्रमुख संतोष जेजूरकर, महापालिकेचे सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, सुनिता आऊलवार, किशोर कच्छवाह, चंद्रकांत इंगळे यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अडचणी मंत्र्यांच्या कानावर

पाणी सोडण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त मिळावा, पाणी ज्या मार्गाने नदीतून येते त्या मार्गावरच्या नदीकाठच्या गावांचा वीज पुरवठा खंडित करावा लागेल. याबाबत नगर-नाशिकच्या अधिकाऱ्यांकडून काहीच सहकार्य मिळत नाही, अशी व्यथा सी. ए. बिराजदार यांनी मांडली. त्यानंतर दानवे यांनी पालकमंत्री रामदास कदम व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांना फोन लावला. या दोन्ही मंत्र्यांसोबत बिराजदार यांचे बोलणे करून दिले. त्यामुळे पाणी सोडण्यात येणाऱ्या अडचणी मंत्र्यांच्या लक्षात आल्या.

रिपाइं डेमोक्रॅटिकचा घेराव

नाशिक-नगरच्या धरणातून जायकवाडीत हायकोर्टाच्या आदेशानुसार तत्काळ १२.८४ टीएमसी पाणी सोडा, अशी मागणी करत शनिवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)च्या कार्यर्त्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना घेराव घातला. २४ तासांच्या आत जायकवाडीत पाणी नाही आल्यास संपूर्ण मराठवाडा बंद करण्यात येईल, असा इशारा पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी दिला आहे. यावेळी नगरसेवक रमेश जायभाय, लक्ष्मण शिंदे, गौतम गणराज, सचिन गंगावणे, महेश रगडे, शिवा नरवडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर फौजदारासह तिघे गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरोपीला जामिनासाठी आणि तपासामध्ये मदत करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक, सहायक फौजदारासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी अटक केली.

पोलिस उपनिरीक्षक सतीश भोसले, सहायक उपनिरीक्षक रामदास फुसे आणि बाबासाहेब बुरांडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जवाहर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीविरोधात जवाहरलाल पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या व्यक्तीच्या पत्नीला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. तिच्या पतीला तत्काळ अटक करून, जामीन मिळवून देण्यासाठी आणि तपासात मदत करण्यासाठी फुसे यांच्यामार्फत वीस हजार रुपये देण्याची मागणी भोसले यांनी केली होती. त्यानंतर या महिलेने लाललुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली होती. एका हॉटेलमध्ये बुरांडेला पैसे घेताना अटक केली. त्यानंतर भोसले आणि फुसे यांनाही अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर अधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विवेक सराफ, सुरेश वानखेडे, पोलिस निरीक्षक वैशाली पवार यांनी ही कारवाई केली. या प्रकरणात अडकविण्यात आल्याचे सांगत, भोसले यांना रडू कोसळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याची भिस्त बंदोबस्तावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडीतील पाणी सोडण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतरही, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणे आणि बंधाऱ्यांवर शनिवारी शेतकरी मोठ्या संख्येने जमले होते. त्यामुळे पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त मिळाल्याशिवाय, या धरणांमधून पाणी सोडता येणार नाही, अशी माहिती मराठवाडा गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी दिली.

अहमदनगर-नाशिक भागातील धरणांमधून जायकवाडी धरणात तत्काळ पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शनिवारी बिराजदार यांना भेटले. तेव्हा बिराजदार यांनी त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी सांगितल्या. ते म्हणाले, 'शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता कोर्टाच्या आदेशाची प्रत आम्हाला मिळाली. त्यानंतर या आदेशाच्या लगोलग या पाणी सोडण्याबद्दल नगर-नाशिकचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या नावे आदेश काढण्यात आले. त्यांना ई-मेल व फोनवरून आदेश कळवण्यात आले. मंत्रालयात जलसंपदा मंत्री, राज्यमंत्री, मुख्य सचिव आदींनाही मेलद्वारे आदेशाची माहिती दिली. पाणी सोडण्यासाठी संरक्षण द्या, अशी विनंती केली. नगर-नाशिकमधून जायकवाडी धरणाकडे येणाऱ्या नद्यांवर शेतकऱ्यांच्या दोन ते अडीच हजार विद्युत मोटारी आहेत. या मोटारींचा विद्युत पुरवठा खंडित केल्याशिवाय पूर्ण क्षमतेने पाणी येणार नाही. शिवाय किमान शंभर कोल्हापुरी बंधारे या नदीपात्रांमध्ये आहेत. प्रत्येक कोल्हापुरी बंधाऱ्यांवर त्या-त्या भागातील शेतकरी जमा झाले आहेत. कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे ते शेतकरी उघडू देत नाहीत. त्यामुळे पाणी कसे सोडायचे, असा प्रश्न आहे. पुरेसा पोलिस बंदोबस्त मिळाल्याशिवाय पाणी सोडणे शक्य नाही. नदी पात्राच्या दोन्हीही बाजूला असलेल्या गावांचा वीजपुरवठाही खंडित करावा लागेल. तसे केले नाही तर, सोडलेले पाणी जायकवाडीपर्यंत येणारच नाही.'

बिराजदार यांनी दिलेल्या माहितीनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी आम्हीही औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी घेऊन जाऊन त्यांच्याशी संघर्ष करतो, असा इशारा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गाईच्या मृत्यूला पालिका कारणीभूत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

गोकुळनगरमध्ये झालेल्या गाईच्या संशयित मृत्यूप्रकरणी मनपाच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते बालाजी कल्याणकर यांनी सवाल उपस्थितीत केला होता. त्यांना साथ देत अन्य शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृह गाजून गाईच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी केली.

महानगर पालिकेचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी केला आहे. याबाबत महिला सदस्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. शहरातील गोकुळ नगर भागात गेल्या दोन दिवसांपासून १२ गाईंचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेमुळे शनिवारी रात्री गोकुळनगर भागात मोठा जमाव जमला होता. महापौर शैलजा स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या सदस्यांनी गायींच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त केला. पालिकेच्या प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत गदारोळ केला.

यासंदर्भात मनपाने काय कारवाई केली, असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी विचारून मनपाचे आयुक्त खोदावेकर यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देतांना आयुक्त म्हणाले, 'दगावलेल्या १२ जनावरांच्या शवविच्छेदनाचा अहवाल रोगनिदान प्रयोगशाळेकडे पाठविला आहे. मनपा अधिनियमाच्या कलम ३०९ प्रमाणे मनपाची जबाबदारी फक्त गायींच्या प्रेतांची विल्हेवाट लावणे हेच असते,' असे उत्तर देताच विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांनी आजवर शहरात गोवंश हत्या बंदीबाबत किती कारवाया केल्या असा प्रश्न उपस्थित केला. त्यासोबतच दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली.

यासह अन्य सदस्यांनी अश्या घटना आगामी काळात होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी असेही सुचविले. त्यानंतर विविध समस्या व प्रश्नावर आरोप-प्रत्यारोप एकूण २४ प्रस्ताव ठेवण्यात आले. यावेळी विविध समित्या नेमण्यावरून शिवसेना व काँग्रेस सदस्यात चांगलीच खडाजंगी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाबाबत राज्य सरकार असंवेदनशील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

केंद्र व राज्यातील भाजप-सेना सरकार हे निष्क्रिय असून, राज्यातील दुष्काळाबाबत असंवेदनशील आहे, असा आरोप महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा शोभा ओझा यांनी उस्मानाबादेत पत्रकारांशी बोलताना केला.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, माजी अध्यक्ष कमल व्यवहारे, उपाध्यक्षा डॉ. स्मिता शहापूरकर, मुंबई प्रदेशाध्यक्षा शीतल म्हात्रे, महाराष्ट्राच्या प्रभारी नेहा डिसुझा यांची या वेळी उपस्थिती होती.

ओझा म्हणाल्या, 'विद्यमान सरकारला महागाई रोखण्यात अपयश आले आहे. राज्यात भीषण दुष्काळस्थिती असताना देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बेफिकिर वृत्तीने वागत आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्याबरोबरच अर्थसहाय्य करण्याकामी हे सरकार कुचकामी ठरले आहे. राज्यातील भाजप व शिवसेना सरकार हे आरोप-प्रत्यारोप करण्यातच मग्न आहे. त्यांना जनतेचे प्रश्न सोडविण्यात कसलेही स्वारस्य नाही. राज्यातील भाजपा शिवसेनेचे सरकार हे उद्योजक धार्जिणे आहे. त्यांना या राज्यातील गोर गरीब जनता, युवक-युवती, महिला शेतकरी यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.'

राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे, ही बाब केंद्र व राज्य सरकारसाठी भुषणावह नाही. महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देशासाठी ही नामुष्कीची बाब आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने अर्थसहाय्य करून त्यांना दिलासा देण्याकामी राज्य सरकार अपयशी ठरले आहे. घोषणा करण्याकामी हे सरकार नंबर वन आहे. मात्र, हे सरकार कृतीशून्य आहे अशी टीका ओझा यांनी यावेळी केली. थापाडे सरकार म्हणून जनता आता यांचेकडे पाहू लागली आहे.

'मै नही खाऊँगा और नही किसी को खाने दुंगा' हे मोदी यांचे घोषवाक्य आता हवेत विरले आहे. भाजपप्रणित सर्वच राज्यात भ्रष्टाचाराने कहर केला आहे. महाराष्ट्रातील चक्की घोटाळा, मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळा हे कशाचे द्योतक आहे, असेही त्या म्हणाल्या.

आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्यासाठी अकराशे कोटीचे विशेष पॅकेज जाहीर केल्याची घोषणा केली. मात्र, या पॅकेजमधील गौडबंगाल अद्यापही सुस्पष्ट करण्यात आलेले नाही. वर्षपूर्ती सोहळ्यावर कोट्यावधीची उधळण करून स्वतःची कीर्ती मिरविणारे हे देवेंद्र सरकार शेतकऱ्याला दिवाळी भेट देण्यासाठी पुढे सरसावलेलेल नाही. कर्मचाऱ्यांना मात्र, दिवाळी बोनस तातडीने दिला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असताना किराणा, भुसार मालाच्या दराबरोबरच भाजीपाल्याचे व कांद्याचे दर नियंत्रयणात ठेवण्यात केंद्र व राज्य सरकारला अपयशच आले आहे.

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा शोभा ओझा या प्रथमच उस्मानाबादेत आल्याने त्यांना भेटण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेसप्रेमी युवती व महिलांनी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा डॉ. स्मिता शहापूरकर यांनी शोभा ओझा यांच्या कार्यक्रमाचे अप्रतिम नियोजन केले होते.

दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची मागणी

जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील यांनीही शोभा ओझा यांची भेट घेऊन मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना भरीव अर्थसहाय्य करण्याकामी राष्ट्रीय पातळीवरून हालचाली करण्याची विनंती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images