Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पीडब्ल्यूडी-पालिका वादात पाणी बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सरकारी निवासस्थानात राहणाऱ्या रहिवाशांनी रितसर पाण्याचे पैसे भरूनही हे पैसे सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेकडे भरले नाहीत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत तब्बल ८० लाख रुपये थकबाकी झाली. वारंवार मागणी करून पीडब्ल्यूने पैसे न भरल्याने पालिकेने कोटला कॉलनीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. सरकारी कार्यालयांच्या वादात ऐन सणासुदीत नागरिकांना मात्र हाल सोसावे लागत आहेत.

विविध सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) वतीने कोटला कॉलनी परिसरात निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जे कर्मचारी याठिकाणी राहतात ते दरमहा घरभाडे तसेच पाणीपट्टी पीडब्ल्यूडीकडे जमा करतात. गेल्या काही वर्षांपासून पाणीपट्टीचा मुद्दा कोटला कॉलनीवासियांसाठी त्रासाचा बनला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटला कॉलनीतील पाणीपट्टीची थकित रक्कम ८० लाख पोचली आहे. महापालिका प्रशासनाने पीडब्ल्यूडी प्रशासनाला पत्र देऊन तातडीने थकित रक्कम भरावी अशी मागणी केली होती. महिनाभरापूर्वी पालिकेने पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यावेळी पाच लाख रुपये भरून उर्वरित रकमेसाठी मुदत मागून पीडब्ल्यूडीने पाणीपुरवठा पूर्ववत करून घेतला होता. काही दिवस उलटून जात नाही तोच सोमवारी पुन्हा एकदा कोटला कॉलनीचे पाणी बंद केले गेले. ऐन सणासुदीत पाणीपुरवठा बंद केल्याने कोटला कॉलनीवासिय त्रस्त झाले आहेत.

पालिकेने जेवढी रक्कम सांगितली आहे त्याची तपासणी सुरू आहे. कारण आमच्या खात्याने वेळोवेळी पैसे भरले आहेत. ते तपासून उर्वरित रक्कम भरली जाईल. पाणीपुरवठा सुरू करण्यासंदर्भात मी शहर अभियंत्यांशी बोलणार आहे.

- एच. ई. सुखदेवे, कार्यकारी अभियंता, पीडब्ल्यूडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२६ हजार रुग्णांना ‘जीवनदायी’तून मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा नांदेड जिल्ह्यातील २५ हजार ८४५ रुग्णांनी लाभ घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून ५३ कोटी ३५ लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.

गरीब व गरजू रुग्णाला फायदेशीर असणारी ही योजना २ जुलै २०१२ रोजी नांदेड जिल्ह्यात प्रायोगीक तत्त्वावर लागू करण्यात आली. कालांतराने आताच्या राज्य शासनाने २१ नोव्हेंबर २०१४ रोजी संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. ही योजना शेतकरी कुटुंबियांसाठीही लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेविषयी केलेल्या जागृतीमुळे जिल्ह्यातील २५ हजार ८४५ रुग्णांनी लाभ घेतला आहे. त्यासाठी राज्य शासनाने ५३ कोटी ३५ लाख रुपये इतका खर्च रुग्णालयाला देण्यात आलेला आहे.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राज्यामध्ये तीन वर्षांत टप्याटप्याने राबवली गेली आहे. या योजनेअंतर्गत ९७१ प्रकारच्या शस्त्रक्रिया, औषधोपचार व १२१ फेरतपासणी उपचारांचा लाभ घेता येतो. तसेच, या योजनेअंतर्गत ३० विशेष तज्ज्ञ सुविधाही देण्यात येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड दक्षिणमध्ये शिवसेनेची मुसंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेनेने विजय मिळविला आहे. त्यामुळे काँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेने मारलेली मुसंडी राजकीय चर्चेचा विषय झाला आहे.

महिनाभरापासून सुरू असणाऱ्या या ग्रामपंचायतींच्या प्रचारामध्ये शिवसेनेने नांदेड दक्षिणवर लक्ष केंद्रीत केले होते. त्यामध्ये आमदार हेमंत पाटील आणि जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांनी विशेष प्रयत्नशील होते. त्याचे फळ विजयाच्या रुपामध्ये मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. तसेच, पालकमंत्री दिवाकर रावते आणि संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरुरकर यांनाही या विजयाचे श्रेय देण्यात आले. सर्वच ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सकाळपासून निकाल हाती येऊ लागल्यानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तसेच, विजयाच्या घोषणेनंतर हेमंत पाटील यांच्या निवासस्थानाकडे शिवसैनिकांचा ओघ सुरू झाला होता. हेमंत पाटील यांनी दूरध्वनीवरून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच, त्यांच्या निवासस्थानी राजश्री हेमंत पाटील व श्रीराम पाटील यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

मरकळवरही विजय

नांदेड जिल्ह्याचे लक्ष असलेल्या मरळक ग्रामपंचायतींवर भगवा फडकला. याठिकाणी निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना या दोन पक्षांमध्ये चुरस रंगली होती. यामध्ये शिवसेनेला वर्चस्व कायम टिकवून ठेवण्यात यश आले आहे. तालुकाप्रमुख जयवंत कदम या विजयाचे मानकरी ठरल्याचे मानले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजयावर सर्वांचाच दावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. पॅनेल पद्धतीने लढविण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुकीतील विजयामध्ये राजकीय पक्षांचे स्थान फारसे स्पष्ट होत नसले, तरीही बहुतांश ग्रामपंचायतींवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे.

जालना जिल्ह्यातील ६५० ग्रामपंचायतीसाठी एक नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. गावातील विकासकामाच्या नाड्या हाती येणार असल्यामुळे, चुरशीने प्रचार झाला आणि तेवढ्याच स्पर्धात्मकरित्या मतदानही झाल्याचे दिसून येत होते. गावस्तरावरील प्रश्नांबरोबरच नव्या सत्तेवर आलेल्या राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या कारभाराचा मुद्दाही प्रचारात होता. या निकालातून, ग्रामीण जनतेने भाजप सरकारच्या कारभारावर समाधान व्यक्त केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. तर, ग्रामीण भागामध्ये भाजपची जादू चालली नाही, असा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. निकाल जाहीर झाल्यानंतर, सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची कार्यालये विजयानंतर गुलालाने माखलेल्या विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी भरलेली दिसत होती.

प्रतिष्ठेच्या जामवाडीमध्ये भाऊसाहेब वाढेकर व प्रशांत वाढेकर यांच्या पॅनेलने ९ पैकी ७ जागांवर विजय मिळविला. तर, दहीफळ काळे येथील सर्व सातही जागा जिंकत काँग्रेस समर्थकांनी एकहाती वर्चस्व मिळविल्याचा दावा करण्यात आला. आंतरवालामध्येही ९ पैकी ८ जागा जिंकून, काँग्रेसच्या पॅनेलने एकहाती सत्ता मिळविली. धारकल्याण, पारेगाव, जैतापूर, कुंभेफळ, वडगाव, जळगाव, सारवाडी, पिरकल्याण या गावांमध्येही विजयाचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तर, भोकरदन, जाफराबाद, अंबड, बदनापूर या तालुक्यांमध्ये भाजपच्या पॅनेलना सर्वाधिक जागा मिळाल्या असून, भाजपचे वर्चस्व यातून दिसत असल्याचा दावा पक्षाकडून म्हटले आहे. घनसावंगी, जालना आणि अंबड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर गुलालाची उधळण करतानाच, मोबाइल फोटो काढण्याचा ट्रेंडही जोरात होता. त्यामुळे व्हॉट्स अॅपसारख्या सोशल मीडियावर या फोटोंचा आणि विजयाच्या घोषणांचा धुमाकुळ सुरू झाला होता.

'कामांना पावती'

जिल्ह्यामध्ये सर्वत्रच भाजपच्या कामांना मतदारांनी प्रतिसाद दिला असून, बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपचीच सत्ता आली आहे, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यांच्या कार्यालयामध्ये विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

'दुष्काळी कामांना पसंती'

जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी परतूर आणि मंठा तालुक्यामध्ये भाजपचे वर्चस्व दिसून आल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील दुष्काळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, सरकार म्हणून ठामपणे कामे करून घेतली. त्यामुळे मतदारांनी भाजपला पसंती दिल्याचे म्हटले आहे.

'भाजपविरोधात रोष'

सत्तेवर आलेल्या भाजपच्या नेत्यांनी वर्षभरात विकासाची कामे करण्याऐवजी पोकळ गप्पाच मारल्या. त्यामुळे ग्रामीण मतदारांनी रोष मतपेटीतून व्यक्त करत, सत्ताधाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे,' अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे.

'राष्ट्रवादीचा विजय'

घनसावंगी, जालना आणि अंबड तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व निर्माण केल्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. घनसावंगीतील ४३, जालन्यातील १८ आणि अंबडमधील २४ ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'जालन्यावर भगवा'

जालना विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे एकतर्फी वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे. या मतदारसंघातील ४० पैकी २८ ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय मिळवत, त्यांवर भगवा फडकला आहे, असे प्रतिपादन आमदार अर्जुन खोतकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसीलला नगर पालिकेच्या अहवालाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार नगर पालिकेचे शॉपिंग सेंटर राज्य शासनाच्या जागेवर बांधण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र नगर पालिकेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे तहसीलदार संजय पवार यांनी सांगितले.

नगर पालिकेतर्फे नाथषष्टी यात्रा महोत्सवासाठी आरक्षित जागेवर शॉपिंग सेंटर बांधण्यात येत आहे. या जागेचा नगर भूमापन क्रमांक १०५१, १०५३, १०५४, १०५६ व १०५७ असून ती महाराष्ट्र शासनाची असल्याचे निवेदनाद्वारे तहसीलदार पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यानंतर तहसीलदारांनी नगर पालिका मुख्याधिकारी यांना याबद्दलचा अहवाल सादर करण्याचे व पैठणचे मंडळ अधिकारी, तलाठी यांना जागेचा पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. पैठणचे तलाठी गोसावी व मंडळ अधिकारी यांनी गुरुवारी पंचनामा केला. शॉपिंग सेंटरचे बांधकाम १०५१, १०५३, १०५४, १०५६ व १०५७ या नगर भूमापन क्रमांकावर होत आहे. या भूखंडाच्या सीमा दिसून येत नाहीत. तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडून जागेचे मोजमाप केल्याशिवाय ही जागा गावठाण, शासकीय किंवा खाजगी असल्याचे बोध होत नसल्याचा उल्लेख पंचनाम्यात आहे. याविषयी तहसीलदार संजय पवार यांच्याकडे संपर्क केला असता ते म्हणाले, महसूल विभागाच्या पंचनाम्यात शॉपिंग सेंटरचे बांधकाम शासनाच्या जागेवर होत असल्याचे प्रथमदर्शनी वाटत आहे. पण या जागेची मोजणी केल्याशिवाय ती कोणाच्या मालकीची आहे, स्पष्ट होणार असल्याची नोंद पंचनाम्यात आहे. नगर पालिकेचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करणार असल्याचे तहसीलदार पवार यांनी सांगितले. दरम्यान, तहसीलदार यांनी आदेश देवून दहा दिवसाचा कालावधी लोटल्यावरही अद्याप नगर पालिकेने अहवाल सादर केलेला नाही.

'बांधकाम होत असलेली जागा केवळ महाराष्ट्र शासनाच्या मालकीचीच नाही तर नवीन शहर सुधारित विकास आराखड्यात ही जागा यात्रा मैदान म्हणून आरक्षित दाखवण्यात आलेली आहे. ही पूर्ण जागा पूर नियंत्रण रेषेत येते,' असे तक्रारदार रमेश लिंबोरे यांनी सांगितले.

तर बांधकाम पाडू

शॉपिंग सेंटर बांधत असलेली जागा नवीन सुधारित शहर विकास आराखड्यात आरक्षित दाखवण्यात आल्याचे मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी विकास आराखडा अद्याप मंजूर झाला नसल्याचे सांगितले. आराखडा मंजूर झाला तर नगर पालिका शॉपिंग सेंटर पाडून टाकेल, अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नड तहसीलमध्ये पिले विष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा या मागणीसाठी जैतापूर येथील शेतकरी कैलास उत्तमराव कोरडे (वय ४७) व त्यांचा मुलगा रामेश्वर कैलास कोरडे (वय २२) यांनी तहसील कार्यालयात विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.

कैलास कोरडे यांची गट क्रमांक २६८ मधील १० एकर जमीन शिवना- टाकळी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे. या गटालगच्या गट क्रमांक २७५ मध्ये त्यांची जमीन शिल्लक आहे. या जमिनीत जाण्या-येण्यासाठी रस्ता असूनही शेजारील शेतकरी अशोक कारभारी भिंगारे अडथळे निर्माण करत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे हा प्रश्न निकाली काढून रस्ता द्यावा या मागमीसाठी कोरडे ८ वर्षांपासून तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. तत्कालीन तहसीलदार अर्पणा सोमाणी यांनी २०१२ मध्ये या गटात जमीन शिल्लक नसल्याचे कारण देत त्याचे अपिल फेटाळले होते. यावर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील केले असता त्यांनी फेरतपासणीसाठी सदर प्रकरण तहसीलदारांकडे पाठवले. त्यावर नायब तहसीलदार आर. व्ही. शिंदे यांनी रस्ता मोकळा करून दिला असल्याचे कैलास कोरडे यांचे म्हणणे आहे. हे शेतकरी २०१३पासून रस्त्यासाठी तहसील कार्यालयात खेट्या घालत असून रस्त्याची नोंद सातबारावर करण्याकरिता सहा महिन्यांपासून सुनावणी चालू होती. ही सुनावणी सुरू असताना मंगळवारी कोरडे पिता-पुत्रांनी विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विषाची बाटली हिसकावून घेतली. या दोघांना उपचारासाठी कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दोघांपैकी रामेश्वर कोरडे यांना अधिक उपचारासाठी औरंगाबाद पाठवण्यात आले आहे.

शेत रस्त्यासाठी पिता-पुत्राचा आत्महत्येचा प्रयत्न

कैलास कोरडे यांनी २६ ऑक्टोबर रोजी प्रशासनाला रस्ता न मिळाल्यास विष प्राशन करणार आहे, असा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर ३१ ऑक्टोबर रोजी देवगाव रंगारी पोलिसांनी कलम १०७ अन्वये कारवाई केली होती. ८ वर्षापासून दाद मिळत नसल्याने पिता-पुत्रांनी विष प्राशन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृत्रिम’चे २७ कोटी पाण्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यल्प पर्जन्यमानामुळे मराठवाड्यासह राज्यात पाण्यासाठी २७ कोटी रुपये खर्च करून सुरू करण्यात आलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग तीन महिन्यानंतर संपुष्टात आला आहे. केवळ 'बॉडी स्प्रे'प्रमाणे झालेल्या पावसासाठी प्रशासनाचे २७ कोटी रुपये अक्षरशः पाण्यात गेले.

मराठवाड्यात ४ ऑगस्टपासून कृत्रिम पावसाच्या उड्डाणाला सुरूवात झाली. या प्रयोगाला उपयुक्त ढग मिळत नसल्याने फारसे यश मिळाले नाही. प्रयोगाच्या ९० दिवसानंतर क्लाउड सिडिंग प्रयोगाचे विमानही दोन दिवसांपूर्वीच परतले असून विभागीय आयुक्त कार्यालयात लावण्यात आलेले सी बॅन्ड डॉप्लर रडारही लवकरच काढून घेण्यात येणार आहे. ऐन मोसमात अत्यल्प पर्जन्यमानामुळे शासनाने २७ कोटी रुपये खर्च करून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा निर्णय घेतला. यासाठी अमेरिकेहून खास कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी उपयुक्त असलेले विमान व डॉप्लर रडार मागवण्यात आले. राज्यात होणाऱ्या या प्रयोगासाठी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कृत्रिम पावसाच्या यंत्रणेचे कंट्रोल रूम उभारण्यात आले; मात्र अवघ्या काही दिवसातच उपयुक्त ढगांअभावी क्लाउड सिडिंग प्रयोगाला फारसे यश मिळाले नाही. परतीच्या पावसाचा प्रदेश म्हणून ओळखणाऱ्या मराठवाड्यात यंदा परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्याने उपयुक्त ढग मिळाले नाहीत. त्यामुळे अपेक्षित पाऊसही झाला नाही. यापूर्वीही मराठवाड्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्यात आले होते. त्या प्रयोगांनाही फारसे यश मिळाले नव्हते. त्यामुळे या प्रयोगाच्या प्रारंभीच शंका उपस्थित करण्यात येत होती.

पुण्यातही फसगत

क्लाउड सिडिंग करणाऱ्या कंपनीकडून १०० तासांच्या उड्डाणावर १०० तासांचे उड्डाण मोफत देण्यात आले होते. मात्र तीन महिन्यांपैकी दीड महिन्यांपैक्षा अधिक वेळेपर्यंत शंभर तासांचेच उड्डाण पूर्ण होऊ शकले नाही. ढगांच्या स्थितीनुसार क्लाउड सिडिंगचा प्रयोग काही दिवस पुण्यात करण्याचे ठरले. मात्र तेथे जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने एकही दिवस उड्डाण न करता विमानाला पुन्हा औरंगाबादला आणावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाइप लाइन टाकणे बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेले समांतर जलवाहिनीसाठी पाइप टाकण्याचे काम बंद पडले आहे. कंपनीने पहिल्या टप्प्यात आणलेले पाइपही अद्याप टाकलेले नाहीत. पाइप टाकण्यासाठी खोदलेल्या चाऱ्यांमध्ये साचलेले पाणी देखील काढून टाकण्याचे कामही केलेले नाही.

समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सर्वप्रथम जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम केले पाहिजे, अशी मागणी नगरसेवक, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत होती. ही जलवाहिनी टाकणे हेच कंपनीचे मुख्य काम आहे, असे बोलले जात होते. पण कंपनी हेच काम सोडून अन्य कामाला प्राधान्य देत होती. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. हे आरोप थांबवण्यासाठी कंपनीने १६ सप्टेंबर रोजी मोठा गाजावाजा करून दोन हजार मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले. हे काम जायकवाडी पासून सुरू होणे गरजेचे असताना बिडकीनपासून काम सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात २५ पाइप आणण्यात आले. हे पाइप टाकण्याचे काम वेगात केले जाईल, असे त्यावेळी कंपनीतर्फे सांगण्यात आले.

पाइप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले, तेथे 'मटा' प्रतिनिधीने ३१ ऑक्टोबर रोजी भेट दिली असता हे काम बंद असल्याचे लक्षात आले. पाइप टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या चाऱ्यांमध्ये पाणी साचले असून पाइप इतस्ततः पडलेले आहेत. पाइप टाकण्यासाठीची यंत्रेही जागेवर दिसली नाहीत. येथे पालिका किंवा कंपनीचा कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता. पाइपलाइन टाकण्याचे काम गतीने सुरू असल्याचे कोणतेही लक्षण दिसले नाही. एकूणच पाइपलाइन टाकण्याचे काम बंद पडल्याचे निदर्शनास आले.

पाइपलाइन टाकण्याचे काम बंद पडल्याचे आज दिसत असले तरी ते २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार काम केले जात आहे. पाइप प्राप्त होतील त्यानुसार काम केले जाईल.

- राहुल मोतियळे, पीआरओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेन्शनसाठी खून केल्याचा ठपका; महिलेस रविवारपर्यंत कोठडी

$
0
0

औरंगाबाद : पेन्शन नावावर करण्यासाठी अंबिकानगरातील माजी सैनिकाच्या खूनप्रकरणातील आरोपी शकुंतला आनंदराव मुधोळकर उर्फ कमल राजपूत हिला रविवारपर्यंत (८ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. डोईफोडे यांनी मंगळवारी दिले.

अंबिकानगरातील माजी सैनिक संपत खंडागळे यांच्यासोबत आरोपी महिला गेल्या नऊ वर्षांपासून राहत होती. खंडागळे यांनी आपल्या नावावर पेन्शन करून द्यावी म्हणून दोघांमध्ये खटके उडत होते. यातूनच आरोपी महिलेने ३ सप्टेंबर २०१५ रोजी झोपेत खंडागळे यांचे हात-पाय बांधून लोंखडी गजाने गुप्तांगावर वार करून खून केला. त्यानंतर ही महिला फरार होती. मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शेख ताहेर यांच्या पथकाने पुण्यातून आरोपीस अटक करून आणले. तिला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, सरकारी वकील आशिष दळे यांनी आरोपीचे कोणी साथीदार आहेत का, याचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीस पोलिस कोठडीचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरासाठी निवृत्त अभियंत्याच्या खेट्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वतःचे हक्काचे घर असून निवृत्त अधीक्षक अभियंत्याला नांदेड येथे किरायाच्या घरात राहावे लागत आहे. गेल्या नऊ वर्षापासून अर्जफाटे करून देखील त्यांना न्याय मिळालेला नाही. भाडेकरू असलेले वकील व पोलिस अधिकारी भाडेह‌ी देत नाही तसेच घर देखील खाली करीत नसल्याने अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा व घर रिकामे करून द्यावे, अशी मागणी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे एका तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

नांदेड येथील चंद्रकांत वाघमारे सिंचन विभागाचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता आहेत. त्यांची पत्नी शकुंतला वाघमारे यांच्या नावावर कोकणवाडी येथे प्लॉट क्रमांक ७ वर ८ रूमचे घर आहे. १९८६ साली त्यांनी अॅड, सदाशिव गायके यांना चार रूमचे घर किरायाने दिले होते; तसेच काही वर्षांनी दुसऱ्या चार रूम सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक टी. डी. पाटील यांना भाड्याने दिल्या होत्या. गेल्या २० वर्षांपासून ही मंडळी घरभाडेही देत नाही; तसेच घर खाली करीत नाहीत असा आरोप वाघमारे यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे. सध्या या घरामध्ये गायके यांनी पोटभाडेकरू ठेवला आहे. तसेच पोलिस निरीक्षक टी. डी. पाटील यांचे निधन झाले असून त्यांची मुले डीवायएसपी नंदकुमार पाटील व पोलिस निरीक्षक विजयकुमार पाटील त्या ठिकाणी राहत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाघमारे २००० मध्ये निवृत्त झाले असून सध्या नांदेड येथे किरायाच्या घरात राहत आहेत.

नऊ वर्षांपासून पाठपुरावा

हक्काच्या घरासाठी वाघमारे दांपत्य नऊ वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. १४ ऑक्टोंबर २०१३ रोजी क्रांतिचौक पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर गायके व पाटील यांच्याकडून लेखी अर्ज घेऊन वाघमारे यांची केस दप्तर करण्यात आल्याचे त्यांना कळविण्यात आले. पोलिसांनी थातूर मातूर चौकशी करून ही केस बंद केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

घर नावावर करून देण्याची मागणी

वाघमारे यांचे दुसरे भाडेकरू टी. डी. पाटील यांच्या कुटुंबीयाची प्रतिक्रिया घेण्यासाठी वाघमारे यांनी दिलेल्या क्रमांकावर संर्पक साधण्यात आला. यावेळी दत्ता पाटील नावाच्या व्यक्तीने फोन घेतला. यामध्ये वाघमारे यांनी घर आमच्या नावावर करून देण्याची मागणी त्यांनी केली.

अधिकासोबतचा पत्रव्यव्हार

१४ नोव्हेंबर २००६ रोजी तत्कालीन गृहमंत्री आर. आर पाटील यांना पत्राद्वारे तक्रार

२३ जुलै २०१३ रोजी पोलिस अधिक्षक नागरी हक्क सरंक्षण विभागाकडे पत्राद्वारे तक्रार

५ ऑक्टोबर २०१३ तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्याकडे तक्रार

२१ ऑगस्ट २०१५ रोजी आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार

२७ ऑगस्ट २०१५ रोजी आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन तक्रार

वकील व पोलिस अधिकारी भाडेकरू असून भाडेह‌ी देत नाही व घर देखील खाली करीत नाही. त्यांच्यावर अनुसुचित जाती जमाती संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे व घर खाली करून मिळावे.

- चंद्रकांत वाघमारे, घरमालक

वाघमारेंचे आरोप चुकीचे आहेत. त्यांना ३० वर्षापूर्वी घर विकत घेण्याचे ठरल्यानंतर ३ लाख रुपये दिले. एक लाख देणे बाकी असताना त्यांची नियत बदलली. रजिस्ट्रीसाठी ते आलेच नाहीत. तेथे पोटभाडेकरू ठेवला नसून आमचे कार्यालय आहे.

- अॅड. सदाशिव गायके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅव्हल्स एजन्सी चालकाला गंडा

$
0
0

औरंगाबाद : ऑनलाइन तिकिटे खरेदी करून ट्रॅव्हल्स एजन्सी चालकाला भामट्याने पावणेदोन लाखाचा गंडा घातला आहे. आरेफ कॉलनी भागातील हानिया टुर्स अँड ट्रॅव्हल्स चालकाची यामध्ये फसवणूक झाली असून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहमद मिराज या तरुणाची हानिया टुर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी आहे. २१ ऑक्टोबर रोजी ट्रॅव्हल्स आयडिया टेक्नॉलॉजी या मेल आयडीधारकाने त्यांच्याशी संपर्क केला. तिरुपती, हैद्राबाद, बंगलोर, बागडोगरा आदी शहरातील बारा एअर तिकिटे त्यांनी मागविली. याचे एक लाख ५८ हजार व कमीशन असे मिळून एक लाख ७६ हजार रुपये रक्कम हानीया ट्रॅव्हल्सची झाली होती. ही तिकिटे विकत घेतल्यानंतर या मेलधारकाने याची रक्कम मोहमद मिराज यांना पाठवली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेव्हन हिल्स पुलाखालील बिऱ्हाडांचे स्थलांतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखाली वसलेल्या बिऱ्हाडांवर मंगळवारी महापालिकेने कारवाई केली. तेथे राहणाऱ्यांना रात्रनिवारागृहात स्थलांतरित करण्यात आले. शहरातील विविध उड्डाणपुलांखाली झालेली अतिक्रमणे व भटक्यांनी थाटलेले संसार यासंदर्भात 'मटा' ने वृत्त मालिका प्रसिद्ध केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

रस्ते विकास मंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागात उड्डाणपूल उभारले आहेत. हे पूल मंडळाने महापालिकेकडे हस्तांतरित केले. हस्तांतरानंतर महापालिकेने पुलांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे उड्डाणपुलाखालचा मोकळा परिसर अतिक्रमणांनी वेढला जाऊ लागला. सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखाली दोन-तीन बिऱ्हाडे थाटण्यात आली होते.

उड्डाणपुलाखालील जागांचा गैरवापर करण्यात येत असल्याबाबत 'मटा'ने वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेऊन आज महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने या बिऱ्हाडांवर कारवाई केली व त्यांना सिडको एन-६ येथील रात्रनिवारागृहात स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, महापालिकेचे सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनीही उड्डाणपुलांखाली अतिक्रमणे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख महावीर पाटणी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई इमारत निरीक्षक आर. एस. राचतवार व अन्य कर्मचाऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधींच्या खरेदीच्या विद्यापीठातील नोंदी गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कोट्यवधींच्या खरेदी-विक्रीच्या नोंदीच नसल्याचे लेखा परीक्षणातून समोर आले आहे. महालेखाधिकाऱ्यांनी (ऑडिटर जनरल) विद्यापीठाच्या खर्चातील अनियमिततेवर बोट ठेवून, तात्कळ खुलासे करावेत. अन्यथा 'कॅग'मार्फत चौकशीला सामोर जा, असा इशारा दिला आहे. यामुळे विद्यापीठात खळबळ उडाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील खर्चाच्या नोंदींमध्ये आढळेलेल्या अनियमिततेवर महालेखाधिकाऱ्यांनी कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. विद्यापीठाला राज्य शासन, यूजीसी, विविध केंद्रीय संस्था यांच्याकडून विद्यापीठाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी दिला जातो. याचा हिशेब ठेवून त्याचे लेखापरीक्षण करणे आवश्यक असते. विद्यापीठाला कोट्यवधींचा निधी मिळाला, परंतु त्यातील अनेक खर्चाच्या नोंदीच विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विविध विभागांनी खर्चाच्या नोंदीच न दिल्याने मोठी ‌अफरातफर झाल्याचे बोलले जात आहे. महालेखाधिकाऱ्यांच्या तपासणीत याबाबी समोर आल्या आहेत.

कॉलेजांकडील आग्रीम रक्कम, परीक्षा विभागात उत्तरपत्रिका खरेदी, शैक्षणिक साहित्य खरेदीतील अनेक नोंदीच विद्यापीठाकडे उपलब्ध नाहीत. ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असून, त्याची वर्गवारी करण्यात विद्यापीठ प्रशासन सध्या गुंतले आहे. राज्य सरकार, यूजीसीसारख्या संस्थांकडून विकासासाठी मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या नोंदीच उपलब्ध नसून ही गंभीरबाब असल्याचे महालेखापरीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्ती विक्रेते, नर्सरींसमोर पालिकेचे लोटांगण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सेव्हन हिल्स ते सूत गिरणी हा रस्ता आता चकचकीत होणार आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या फूटपाथवर मूर्ती, झाडे, कुंड्या विक्रेत्यांनी थाटलेल्या कायमच्या संसारांपुढे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः लोटांगण घातले आहे. वारंवार मागणी होऊनही फूटपाथवरील अतिक्रमणे काढण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विक्रेत्यांशी असलेल्या 'अर्थपूर्ण सुसंवादा'मुळे महापालिकेचे अधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.

व्हाइट टॉपिंगच्या कामांसाठी शासनाने दिलेल्या २४ कोटी रुपयांमधून सध्या सेव्हन हिल्स ते सूत गिरणी चौक या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. या रस्त्यालगत सेव्हन हिल्स ते गजानन महाराज मंदिर यादरम्यान दोन्ही बाजुंनी फूटपाथ आहेत. तेथे मूर्ती, झाडे, कुंड्या विक्रेत्यांनी संसार थाटले आहेत. त्याचबरोबर त्यांची दुकानेही जोरात सुरू आहेत. यामुळे रस्त्याची शोभा लयाला गेली आहे. शिवाय पादचाऱ्यांना जाण्या-येण्यासाठी फूटपाथ राहिलेले नाहीत. या विक्रेत्यांवर अनेक वेळा महापालिकेने कारवाई केली, मात्र अतिक्रमण हटाव पथकाची पाठ फिरताच पुन्हा त्यांची दुकाने जोमाने सुरू झाली. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाची (कडा कार्यालय) संपूर्ण संरक्षण भिंत या विक्रेत्यांनी ताब्यात घेतली आहे. त्याचबरोबर पाण्याच्या टाकीसमोरील मोकळी जागाही त्यांनी काबीज केली आहे.

मूर्ती विक्रेते, नर्सरीचालक यांच्यावर कारवाई करण्याचा देखावा केला जातो. किरकोळ कारवाई करून पालिकेचे अधिकारी आपला 'कार्यभाग' साधतात, अशी चर्चा उघडपणे केली जाते. या चर्चेला उत्तर न देता व ठोस कारवाई न करता महापालिकेचे अधिकारी मूग गिळून गप्प आहेत.

या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नर्सरी व मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत व सर्वसाधारण सभेत वारंवार आवाज उठविला, पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. हा रस्ता पूर्णपणे व्हाइट टॉपिंगचा करण्यात येत आहे. हे निमित्त करून महापालिकेने रस्त्यालगतची अतिक्रणे हटविणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात फूटपाथवरील अतिक्रमणाला धक्काही न लावता रस्त्याचे काम करण्यात येत आहे. टाकीतून चोरल्या जाणाऱ्या पाण्यावर गेल्या १५ वर्षांपासून वसलेली ही अतिक्रमणे वाहतुकीसही अडथळा ठरत आहेत.

सेव्हन हिल्स ते गजानन महाराज मंदिर रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथवर थाटलेल्या दुकानांवर कारवाई करावी. त्यांची दुकाने काढून टाकावीत, अशी मागणी आतापर्यंत अनेकवेळा मी स्वतः उपायुक्त रवींद्र निकम, अय्युब खान यांच्याकडे केली आहे, पण ते का कारवाई करीत नाहीत, त्यांचा या प्रकरणात काय इंटरेस्ट आहे, हेच कळत नाही. सध्या या रस्त्याच्या व्हाइट टॉपिंगचे काम सुरू आहे. काम सुरू असेपर्यंत अतिक्रमण हटाव पथकाने फूटपाथवरील दुकानांची अतिक्रमणे हटवावीत.

- रेणुकादास वैद्य, गटनेते, शिवसेना, महापालिका

मूर्ती विक्रेते आणि नर्सरीचालकांनी अतिक्रमणे काढावीच लागतील, त्यात काही संशय नाही. सध्या आमच्याकडे कामगार कमी आहेत आणि पोलिस बंदोबस्तही पुरेसा नाही. ती अतिक्रमणे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामगारांची गरज आहे. यासंदर्भात उपायुक्तांशी चर्चा करून, योग्य ती कारवाई केली जाईल.

- महावीर पाटणी, प्रशासकीय अधिकारी, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार खैरे, शिरसाटांवर अद्याप कारवाई नाही

$
0
0

औरंगाबाद : तहसीलदार रमेश मुनलोड यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी खासदार चंद्रकांत खैरे व आमदार ‌संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल होऊन २४ तास उलटले आहे, मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई पोलिसांकडून झाली नाही. सध्या पोलिस चीनच्या उपराष्ट्रपतीच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याचे आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

वाळूज एमआयडीसीत मंदिर पाडण्याच्या कारवाईला विरोध करीत तहसीलदार रमेश मुनलोड यांना खासदार चंद्रकांत खैरे यांनी ‌शिवीगाळ केली होती. याप्रकरणी मुनलोड यांनी सोमवारी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये खासदार खैरे, आमदार शिरसाट यांच्यासह ३० जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सामान्य नागरिकावर नोंदविल्यास त्याला लगेचच अटक करण्यात येते, मात्र याच प्रकारचा गुन्हा दाखल होऊन २४ तास उलटले. खासदार खैरे, आमदार शिरसाट यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

चीनचे उपराष्ट्रपती मंगळवारी व बुधवारी शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या बंदोबस्तामध्ये वरिष्ठ अधिकारी व्यस्त आहेत. त्याचबरोबर खासदार खैरे व आमदार शिरसाट देखील शहरात नसल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रॅव्हल्समध्ये विद्यार्थिनींना लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ट्रॅव्हल्स बसने मुंबईला जाणाऱ्या दोन विद्यार्थिनींचे ११ हजार रुपये लांबविण्याचा प्रकार २७ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद ते मुंबईदरम्यान घडला. याप्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या विद्यार्थिनींना ट्रॅव्हल्स एन्जसी चालकाने अरेरावी केली तर, गुन्हा दाखल करण्यास क्रांतिचौक पोलिसांनी टोलवाटोलवी केली. अखेर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

अंतरा शांतीलाल राठोड (वय २२, रा. कॅनाट गार्डन, सिडको) ही तरुणी २७ ऑक्टोबर रोजी मैत्रिणीसोबत मुंबईला गेली होती. बाबा पेट्रोल पंपापासून मनमंदिर ट्रॅव्हल्स येथून विजय ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये त्या रात्री पावणेअकरा वाजता रवाना झाल्या होत्या. प्रवासादरम्यान अंतरा व तिच्या मैत्रिणीच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने ११ हजार २०० रुपयांची रक्कम लंपास केली. बसचालकाला त्यांनी हा प्रकार सांगितला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

मनमंदिर ट्रॅव्हल्सकडे त्यांनी हा प्रकार सांगितला असता त्यांनी देखील अरेरावीची भाषा वापरली. त्यानंतर क्रांतिचौक पोलिस ठाण्यात त्या तक्रार देण्यासाठी गेल्या असता तेथील पोलिसांनी त्यांना हा प्रकार मुंबईत घडला असून मुंबईला जाऊन गुन्हा दाखल करण्याचा अजब सल्ला दिला.

ट्रॅव्हल्स चालक आणि पोलिस आपली तक्रार ऐकूनच घेत नसल्यान अखेर या तरुणींनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेत हा प्रकार त्यांच्या कानावर टाकला. गुन्हा दाखल करण्यास टोलवाटोलवी झाल्याने आयुक्त संतापले. त्यांनी गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांकडे या प्रकरणाची चौकशी सोपविली. ट्रॅव्हल्स चालकांना बोलावून घेण्याचे आदेश देण्यात आले. तसेच पोलिस ठाण्यातून त्यांना मुंबईला जायचा सल्ला देणाऱ्या कर्मचाऱ्याचा शोध घेण्याचे देखील सांगण्यात आले. याप्रकरणी अंतरा राठोडच्या तक्रारीवरून सोमवारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा विरोधकांमध्ये चक्क दानवे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकीकडे मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे म्हणून मराठवाड्यातील नेते-कार्यकर्ते, पर्यावरणवादी, कायदेतज्ज्ञ, जागरुक नागरिक पेटले असताना आणि सुप्रीम कोर्टापर्यंत रणकंदन सुरू झाले असताना, दुसरीकडे मराठवाड्याचे खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे 'मराठवाड्याला पाणी सोडू नका,' असे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी गेलेल्या नगर जिल्ह्यातील नेत्यांसोबत चक्क स्मितहास्य करीत 'फोटोसेशन' करताना दिसून आले.

मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हा मेसेज व फोटो फिरत आहे. नगर जिल्ह्यातील नेते मंडळींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाठून 'मराठवाड्याला पाणी देऊ नये,' असे निवेदन दिले. या वेळी मधुकरराव पिचड व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामध्ये किमान दोन डझन नेते-कार्यकर्ते होते. यामध्ये विखेंच्या खांद्याला खांदा लावून स्मितहास्य करीत 'फोटोसेशन' करताना खासदार दानवेही स्पष्टपणे दिसत आहेत. हा मेसेज आणि फोटो गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्यामध्ये फिरत अाहे. या विषयी दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये उपस्थित होतो, असे मान्य केले आहे.

मी मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या दालनात चर्चा करीत असताना विखे पाटील तेथे आले आणि शिष्टमंडळ निवेदन देण्यास आल्याची माहिती त्यांनी दिली. लगोलग संपूर्ण शिष्टमंडळ दालनात आले. पाण्याविषयी निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ आल्याचे कळाले तेव्हा, मी नंतर येतो म्हणून निघून जाण्याच्या तयारीत होतो. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मला थांबवून घेतले. त्यामुळे थांबलो आणि तेवढ्यात फोटो काढण्यात आला. मी मराठवाड्यावर अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने कसा असेन?

- रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीपुरती एसटीही महाग!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऐन दिवाळीच्या काळात एसटीच्या प्रवास दरात २० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. गुरुवारपासून (५ नोव्हेंबर) लागू झालेली ही दरवाढ २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पर्यंत असेल.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने यात्रा, सुट्टया किंवा गर्दीच्या काळात दरवाढ करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. या आदेशाप्रमाणे यंदा दिवाळीच्या सुट्टयांमध्ये साधी, निमआराम, रातराणी आणि शिवनेरी सेवेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने आगामी २० दिवसांसाठी ही दरवाढ केली आहे. साधी आणि रातराणी बसच्या दरात १० टक्के, निमआराम बसच्या दरात १५ टक्के तर शिवनेरी बसच्या दरात २० टक्के दरवाढ केली आहे. याबाबत आगार प्रमुखांची तातडीची बैठक घेऊन सदर निर्णयाबाबत विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी माहिती दिली.

औरंगाबाद ते पुणे आणि दादर ते पुणे-औरंगाबाद ही शिवनेरी बससेवाही महागणार आहे. याशिवाय औरंगाबाद-अजिंठा आणि औरंगाबाद ते वेरूळ या पर्यटन बसच्या भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. याशिवाय शहर बससेवेचे तिकिटदर वाढविण्याची शक्यता एसटी महामंडलाच्या सूत्रांनी वर्तविली.

राज्य परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिल्याने ही दरवाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यात खूप वाढ नाही. १० ते २० टक्केंपर्यंत तिकीट महागले आहे. यामुळे सामान्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.

- आर. एन. पाटील, विभाग नियंत्रक, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याला आडकाठी नाही

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

नाशिक व नगर मधील धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती द्यावी, ही विनंती मुंबई हायकोर्टाने फेटाळल्यानंतर नगर-नाशिककरांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. त्यांच्या पाचही विशेष याचिका (स्पेशल लिव्ह पिटिशन) सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्या. एच. एल. दत्तू व न्या. अरुण मिश्रा यांनी निकाली काढल्या. या निर्णयामुळे जायकवाडी धरणात पाणी येणे सुरुच राहणार आहे.

नगरचे शेतकरी बाळासाहेब घुमरे, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, संजीवनी (टाकळी) साखर कारखाना, पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखाना यांच्यासह पाच याचिका करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचा पूर्वीचाच आदेश अंतिम मानून नाशिक आणि नगरच्या धरणांमधून १२. ८४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडले जात आहे. या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.

मराठवाड्याची पिण्याच्या पाण्याची गरज ४.८५ टीएमसी एवढीच आहे. जायकवाडीत पाणी सोडल्यास नगर व नाशिक जिल्ह्यांत पिण्यासाठी पाणी राहणार नाही. या जिल्ह्यातील पिके व फळबागा उद्ध्वस्त होतील. जायकवाडी धरणाच्या मृत साठ्यात २६ टीएमसी पाणी आहे. उपयुक्त पाणीसाठा ४.३३ टीएमसी आहे. मृत साठ्यातील २६ टीएमसी पाण्याचा वापर केल्यास जायकवाडी धरणात १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याची गरज नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे जेष्ठ वकील कपिल सिब्बल व शेखर नाफडे यांनी केला. जायकवाडी धरणाच्या मृत साठ्यातील २६ टीएमसी पाणी हे पिण्यायोग्य नाही. मृत साठा आणीबाणीच्या परिस्थितीत वापरला जातो. आज जायकवाडी धरणात फक्त ४.३३ टीएमसी पाणी हे पिण्यायोग्य आहे. जायकवाडीच्या वरच्या धरणात ६२ टक्के पाणी आहे. जायकवाडी व त्याखालील धरणात केवळ १४ टक्के पाणी आहे. नगर व नाशिक जिल्ह्यासाठी केवळ ९ ते १० टीएमसी पाणी लागते, पण वरच्या धरणांमध्ये ५७ टीएमसी पाणी साठा आहे, असा युक्तिवाद गोदावरी महामंडळाचे वकील सतीश तळेकर यांनी केला. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाणी व्यवस्थित जात आहे का? यावर देखरेख व नियंत्रण करण्याचे आदेश दिले आहेत. हे पाणी पिण्यासाठीच वापरले जावे, असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी १७ डिसेंबरऐवजी १८ नोव्हेंबरला घेण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणात महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्यातर्फे वकील कोर्टात हजर नव्हते.

मुळाचे पाणी औरंगाबाद जिल्ह्यात

दरम्यान, मुळा धरणातून जायकवाडीसाठी सोडलेले पाणी मंगळवारी रात्री नगर जिल्हा ओलांडून प्रवरा संगमहून पुढे औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाले. धरणातून विसर्ग कमी झाल्याने त्याचा वेग मात्र मंदावला आहे. तर निळवंडे धरणांतून सोडलेले पाणी प्रवरा नदीतून संथ गतीने प्रवास करीत असून, त्याने कोल्हारपर्यंतचा प्रवास केला आहे.

नगर जिल्ह्यात आंदोलने

जायकवाडीसाठी नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी संगमनेर शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरातून सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव फाटा येथे दोन तास रास्तारोको करण्यात आला. या वेळी तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. गडाख यांच्यासह ३०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरा त्यांना सोडून देण्यात आले.

समन्यायी पाणी वाटप धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील धरणांतून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय मंडळाने घेतला. यंदा मराठवाड्यात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊर्ध्व भागात सुकाळ व जायकवाडीच्या खालच्या भागात दुष्काळ हे समीकरण योग्य नाही.

- सतीश तळेकर, महामंडळाचे वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात ३ शेतकऱ्यांची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

सततचा दुष्काळ व कर्जबाजरीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. जालना जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. या तीन घटनांमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मंठा तालुक्यात केव्हळ वडगांव येथील शेतकऱ्यांने नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. सखाराम रामा राठोड (वय ५५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सखाराम यांनी घरातील लोखंडाच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दुसरी घटना भोकरदन तालुक्यातील पारध जवळील वालसावंगी गावात बुधवारी दुपारी घडली. समाधान यशवंत गवळी ( वय २५ रा. भोकरदन) यांनी वालसावंगी शिवारातील शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तिसरी घटना जाफराबाद तालुक्यातील सोनखेडा येथे बुधवारी दुपारी घडली. गेल्या काही ‌दिवसांपासूनच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने मृत्यूला कवठाळले. देवराव गोपाल वानखेडे (वय ६०, रा. सोनखेडा) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. देवरावने सोनखेडा शिवारातील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. जालना जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images