Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भाईकट्टींवरील हल्ल्याचा निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या मैदानावर आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी लातुरात सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढला.

भाईकट्टी यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील अभय साळुंके, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, पोलिस यांचे फोन कॉलची तपासणी करून त्यांना त्वरीत अटक करावी आणि मोक्का कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सर्व पक्षांच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.

भाईकट्टी यांच्या संपूर्ण परिवाराला पोलिस संरक्षण द्यावे, भाईकट्टी यांनी शाहू कॉलेजच्या बेकायदा इमारती संदर्भात केलेली मागणी शासनाने पूर्ण करावी, आरटीआयखाली काम करणाऱ्या राज्यातील नागरिक कार्यकर्त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेऊन पारदर्शक, गतिमान प्रशासनाची चुणूक दाखवावी, भाईकट्टी यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्यांना व आव्हान स्वीकारणाऱ्यांना तात्काळ अटक करून शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करावी आदी मागण्या करण्यात आल्या. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. पानसरे यांच्या मारेकरी पुराव्याअभावी सापडत नाहीत, याचा निषेध ही करण्यात आला.

डॉ. आंबेडकर पार्कवरून निघालेल्या मोर्चाच्यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाने तोंडाला काळ्यापट्टया बांधल्या होत्या. या मोर्चाला विरोध करणारे पत्रक छावा आणि अन्य संघटनांनी काढल्यामुळे मोर्चा निघणार किंवा नाही याची मोठी उत्सुकता शहरात होती. परंतु, निर्भयपणे, शिवसेना आणि मनसे वगळता सर्वपक्षाचे नेते रस्त्यावर उतरले होते. मोर्चात शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, ओबीसी महिला काँग्रेसच्या पुनम शहाणे, सभागृह नेते नरेंद्र अग्रवाल, नगरसेवक राहुल माकणीकर, प्रशांत पाटील, अशोक गोविंदपूरकर, अॅड. भारत साबदे, अॅड. प्रदिप मोरे, चंद्रकांत चिकटे, प्रा. व्यकंट कीर्तने, मुप्टाचे प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे, सिद्धेश्वर लटपटे, अॅड. आर. झेड. हाश्मी, अॅड. संतोष गिल्डा, बसवंतअप्पा उबाळे, उमाकांत पंचाक्षरी, इराण्णा पावले, शैलेश भुजबळ, विश्वनाथ खोबरे, प्रा. सुधीर देशमुख, बाळ होळीकर, प्रीती गुर्जर, हमीदखान पठाण, बरकत काझी, अॅड. अतिश चिकटे, जीवन कांबळे, विनोद खांडके, बसवंत भरडे, बाबुअप्पा सोलापूरे, सुभाष लवटे यांचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाडा विद्यापीठाचे मेन कँटीन कायमचे बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शुल्कवाढीचा प्रश्न असो की शिक्षकांचे वेतनाचा. या सर्व प्रश्नांची चर्चा, आंदोलनाची दिशा विद्यापीठाच्या मुख्य कँटीनमध्ये ठरते. अनेक घटना व आंदोलनाची साक्षीदार असलेली मेन कँटिन आता कायमचे बंद करण्यात येणार आहे.

विद्यापीठातील तीन कँटीन आहेत. शिवाय नवीन लंच होमचे काम अंतिम टप्प्यात आहे. विद्यापीठाने सोमवारी (२ नोव्हेंबर) नव्या कंत्राटदारांना कँटीन चालविण्यासाठी देण्यात आली. यात विद्यार्थी संघटनेच्या एका नेत्याला एका कँटीनचे कंत्राट देण्यात आले आहे. विद्यापीठातील कँटीनचे कंत्राट ७ ते ८ वर्षानंतर बदलण्यात आले आहेत.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थ्यांसाठीचे कँटीन २२ ऑगस्ट १९८६ पासून सुरू करण्यात आले. त्यानंतर हे कँटीन म्हणजे विद्यापीठातील सर्व भल्या- बुऱ्या घटनाचा साक्षीदार ठरले आहे. हे कँटीन बंद करून येथे स्टोअर रूम करण्यात येणार आहे. येथून विविध विभागांना शैक्षणिक साहित्य पुरविले जाणार आहे.

कँटीनचे कंत्राटदार निश्चित करताना वसतिगृहातील मेसचालकही बदलून दरनिश्चिती करण्यात आली आहे. नवीन दरानुसार मुलींसाठी १०५० तर मुलांसाठी १२५० रुपये दरमहा दर निश्चित करण्यात आला आहे. विद्यापीठात अकरा वसतिगृह असून त्यात चार हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी राहतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेट व टीईटी परीक्षा एकाच दिवशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अन् राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (नेट) एकाच दिवशी आल्याने हजारो उमेदवारांची एक परीक्षेची संधी हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाकडे वेळापत्रक बदलण्याचे परिषदेकडून सूचविण्यातही आले. परंतु याबाबतचा कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्याचवेळी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १७ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्य परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २७ डिसेंबर रोजी टीईटी घेण्यात येणार आहे. याच दिवशी देशपातळीवर होणारी राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (नेट) होत आहे. हजारो डीटीएड, बीएडधारक विद्यार्थ्यांनी नेट परीक्षेलाही अर्ज भरलेला आहे. त्यात दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

एकाच दिवशी परीक्षा आल्यामुळे एका परीक्षेवर पाणी सोडण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. याचवेळी टीईटीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय पर‌िषदेने घेतला आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया १४ ऑक्टोबरपासून सुरू आहे. नव्या वेळापत्रकानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. या अर्जाची हार्डकापी १९ नोव्हेंबरपर्यंत जमा करावी लागणार आहे.

.......

एकाच दिवशी दोन परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर परीक्षेबाबतची ही माहिती अन् विद्यार्थ्यांची मागणीबाबतचा विचार करत परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलावा असा, प्रस्ताव परिषदेकडून शासनाकडे पाठविण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. शासनाकडून याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. शासनाकडून उशिर होत असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायो डायव्हर्सिटी पार्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुगल राजवटीत औरंगाबादचे वैभव असलेल्या गुलशन महल परिसरातील उद्यान पुन्हा एकदा फुलणार आहे. सध्या ओसाड पडलेल्या उद्यानाचा दीड वर्षात तब्बल एक कोटी रुपये खर्च करून कायापालाट करण्यात येणार असून येथे बायो डायव्हर्सिटी पार्क (जैववैविध्य उद्यान) तयार करण्यात येणार आहे.

औरंगाबाद शहरात गतवैभवाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू आहेत. त्यापैकी एक गुलशन महल ही एक वास्तू आहे. गुलशन महलमध्ये विभागीय आयुक्तांचे निवासस्थान असले तरी, मुळ उद्यान कधीच ओसाड झाले आहे. या चार एकरच्या मुघलकालीन उद्यानात त्यावेळी फुलांचे ताटवे फुललेले असत, सलीम अली सरोवरातून हत्ती हौदात आलेले पाणी चादरीवरून उद्यानात खेळवण्यात आले होते. कारंजे थुई थुई नाचत होते. काळाच्या ओघात ओसाड झालेल्या या उद्यानाचे दिवस साधारणतः दीड वर्षात पालटणार आहेत. या चार एकरच्या उद्यानत बायो डायव्हर्सिटी पार्क ( जैववैविध्य उद्यान) साकारले जाणार आहे. सध्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या या जागेत सध्या दोन भग्न कारंजे, चौथरे आजही आहेत.

पार्कचे स्वरुप

थीमपार्कच्या धर्तीवर फुलवण्यात येणाऱ्या या उद्यानात भारतीय परंपरेत महत्त्व असलेली बेल, कवट, पांढऱ्या फुलांची झाडे लावण्यात येणार आहेत. उद्यानातील चौथऱ्यांची डागडुजी करणे, पाण्याची चादर व कारंजे कार्यान्वयीत करणे, पूर्वीप्रमाणे सलीम अली सरोवरातून येणाऱ्या पाण्याचे स्त्रोत पुनर्जिवीत करणे ही कामे करण्यात येणार आहेत. या उद्यानत पाण्याच्या तीन चादरी असून नहरीद्वारे पाणी आणले जात होते. हे स्त्रोत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दगड, चुना आणि पुस्तकी विटांचा वापर करून पार्कमध्ये रस्ता (पाथ वे) तयार करण्यात येणार आहे. यासाठी वास्तुशास्त्र संवर्धकांची मदत घेण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

MIDC संजीवनी योजना

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

उद्योग थाटण्यासाठी भूखंड घेऊन वर्षानुवर्षे ते रिकामे ठेवल्याचे प्रकार राज्यातील सर्वच उद्योग क्षेत्रांमध्ये घडलेले आहेत. या भूखंडांवर बांधकाम करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एक संधी दिली आहे. उद्योग विभागाने संजीवनी योजना जाहीर केली असून २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योग थाटण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने भूखंड उपलब्ध करून दिले होते. गरजेनुसार उद्योजकांनी आपापले कारखाने उभारले, पण काहींनी जागा फ्यूचर प्लॅन म्हणून विकत घेतली. त्यावर बांधकाम केले नाही. राज्यभरात २००० हून अधिक भूखंड पडून आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात ठोस कारवाई करत वापरात नसणारे भूखंड परत घेण्याची कार्यवाही केली होती. त्यानुसार १,२०० जणांना कारणे दाखवा नोटिसाही बजावल्या होत्या. कोल्हापूर एमआयडीसीमध्ये काही भूखंड परतही घेण्यात आले. मात्र, ही कारवाई पुढे न करता उद्योग विभागाने नवीन योजना जाहीर केली आहे. उद्योग संजीवनी योजनेंतर्गत मोकळे भूखंड, अंशतः बांधकाम असलेले भूखंड असलेल्यांना ३१ जानेवारी २०१७ पर्यंत योजना लागू असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारी २०१६ पर्यंत इच्छुक उद्योजकांना अर्ज, विहित नमुन्यातील करारनामा सादर करणे बंधनकारक आहे. भूखंडांच्या आकारमानानुसार ठराविक रक्कम एमआयडीसीकडे जमा करणे आवश्यक आहे. केवळ या योजनेंतर्गत सहभागी होणाऱ्या सर्व क्षेत्रफळांच्या भूखंडधारकांना मुदतवाढ मंजूर करणे, बांधकाम नकाशे मंजूर करणे, महामंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र देणे याबाबत महामंडळाच्या संबंधित विभागाकडून २५ दिवसांत कार्यवाही करण्यात येणे अपेक्षित आहे. अन्यथा संबंधित विभागाची त्यास मंजुरी आहे, असे ग्राह्य धरून त्यापुढील विभागाने पुढील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, ज्याठिकाणी दिरंगाई होईल त्यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाईचे संकेतही एमआयडीसीने दिले आहेत. २०१७ पर्यंत बांधकाम करण्याचे शपथपत्र भूखंडधारकाला भरून द्यावे लागणार आहे. उद्योग संजीवनी योजनेतून पुन्हा मुदतवाढ दिली गेली असली तरी, पुढील प्रक्रिया कडक अंमलबजावणीची असल्याने फ्यूचर प्लॅन केलेल्यांसाठी अडचण ठरणार आहे.

६५० भूखंडांना जीवदान

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील तब्बल ६५० भूखंडांना पुढील दीड वर्षे जीवदान मिळाले आहे. वाळूज, रेल्वेस्टेशन, शेंद्रा, चिकलठाणा, जालना एमआयडीसीमध्ये काही भूखंड अजूनही रिक्त आहेत. दुसरीकडे नवीन उद्योजकांना जागा उपलब्ध नाही, त्याबाबत उद्योग विभागाने धोरण निश्चित करणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाचा विसर

$
0
0

मकरंद कुलकर्णी । औरंगाबाद

सलग तिसऱ्या वर्षी औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळ आहे. 'धरण उशाशी औरंगाबाद जिल्हा उपाशी' या उक्तीप्रमाणे जायकवाडी प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात असूनही त्याचा अगदी कमी सिंचनक्षेत्रासाठी फायदा आहे. हमखास पाऊस पडणारे तालुकेही यंदा अडचणीत आहेत. गणेश उत्सव सुरू होण्याच्या दिवशी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव आणि खुलताबाद तालुक्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, पण त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न काही प्रमाणात मिटला. खरीप तर गेले होतेच पण रबीचाही भरवसा नाही. या सगळ्यावर मात करून दुष्काळ निर्मूलनाचे काम करणे आवश्यक आहे. दुष्काळ निवारणाची बहुतांश जबाबदारी जिल्हा परिषदेची असते. पाण्याचे टँकर, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करणे यासारखी कामे तातडीने सुरू करणे आवश्यक असते. जून महिन्यांत टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार कामेही सुरू झाली, पण पुढे पाऊस न पडल्याने यंदा दुष्काळाची तीव्रता वाढणार आहे. हे गृहित धरून पुढच्या तीन महिन्यांचा आराखडा प्रशासनास सादर केला आहे, पण त्यात सद्यस्थिती काय आहे, याची मात्र फारशी माहिती नाही. सण, उत्सव, पंचायत राज समितीच्या नादात जिल्हा परिषदेच्या मूळ कामकाजाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. प्रशासनाकडून जसे दुर्लक्ष आहे त्यापेक्षा वाईट अनुभव पदाधिकाऱ्यांकडून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीकडे जणू अच्छे दिन असल्याचा फार्स केला जात आहे. टंचाई आढावा बैठका नावापुरत्याही घेतल्या जात नाहीत, यापेक्षा दुर्दैव ते काय? गंगापूर, वैजापूर आणि पैठण तालुक्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या तीनही तालुक्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी झेडपीतील सत्ताधारी काहीच पावले उचलत नाहीत. लातूर आणि उस्मानाबादमध्ये दुष्काळासाठी ज्या पद्धतीने मागणी झाली तसे आपल्या जिल्ह्यात अजूनही घडलेले नाही. जानेवारीनंतर अर्ध्या राज्यात पाणीटंचाई भेडसावणार आहे. त्यावेळी आपण ओरड केली तर शासन कितपत लक्ष देईल याबाबत शंका आहे. जिल्ह्यात भाजप शिवसेनेचे सहा आमदार आहेत. त्यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हा परिषदेने दुष्काळासाठी स्वतंत्र पॅकेज आणले पाहिजे. प्रशासनाला सोबत घेऊन त्याचा सविस्तर अहवाल केला पाहिजे.

केवळ एखाद्या मतदारसंघात निधी आणून त्याचे मार्केटिंग करणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळामुळे त्रस्त असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांना तरच दिलासा मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पळवून नेऊन बलात्कार, आरोपीस सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील १२ वी विज्ञान शाखेच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन बलात्कार करणाऱ्या २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला ७ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी ठोठावली.

सातारा परिसरातील पीडित १६ वर्षीय मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, पीडित मुलगी १९ एप्रिल २०१४ रोजी महाविद्यालयात जाते म्हणून घराबाहेर गेली, ती सायंकाळपर्यंत परतलीच नाही. महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये तिची दुचाकी आढळली. दुचाकीमध्ये ४०० रुपये, मोबाइल व पालकांसाठी चिठ्ठी होती. त्यावरून मुलीच्या वडिलांनी क्रांतिचौक पोलिस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार दिली. संबंधित मुलीचा नेहमी पाठलाग व छेडछाड करणारा आरोपी अविनाश पुंजाराम बुवा (२२, रा. एकता रेसिडेन्सी, हायकोर्ट कालनी, सातारा) हाही हरविल्याची तक्रार त्याच्या भावाने सातारा पोलिस ठाण्यामध्ये दिली होती. ही मुलगी २७ एप्रिल २०१४ रोजी घरी परतली. तिने सांगितल्यानुसार, १९ एप्रिल रोजी महाविद्यालयामध्ये गेली असता, महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये आरोपी अविनाश याने मुलीला सोबत येण्यास सांगितले; अन्यथा हाताची नस कापून आत्महत्या करेन, अशी धमकी दिली; तसेच बळजबरीने मुलीला स्वतःच्या हाताने चिठ्ठी लिहिण्यास सांगून दुचाकीच्या डिक्कीमध्ये चिठ्ठी व मोबाइल ठेवण्यास सांगितले. त्यानंतर रेल्वेने निझामबाद व मनमाडला नेले. 'तू १८ वर्षांची झाल्यावर आपण लग्न करू, तोपर्यंत दोन वर्षे आपण फिरू,' असे आमिष दाखवून खंडवा (मध्यप्रदेश), भोपाळमधील लॉजवर नेले. तिथे रूम घेऊन तिच्यावर बलात्कार केला. माधवपूर (राजस्थान), मुंबई, पुणे, गोवा, मीरज आदी ठिकाणीही नेले आणि २७ एप्रिल २०१४ रोजी औरंगाबादला आणले आणि आई-वडिलांना सांगू नको म्हणून धमकीही दिली.

वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. तत्कालिन सहाय्यक सरकारी वकील राजेंद्र मुगदिया, फिर्यादी, पंच, डॉक्टर, शाळा मास्तर यांच्यासह ९ जणांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. त्याचवेळी शालेय पुरावाही महत्वाचा ठरला. सहाय्यक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर कोर्टाने कलम ३६३ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास साधी कैद, कलम ३७६ अन्वये सात वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरदिवसा घरफोड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील उल्कानगरी, उत्तमनगर परिसरात गेल्या दोन दिवसांत चोरट्यांनी दिवसाढवळ्या दोन घरफोड्या केल्या. घरमालक नसल्याची संधी साधत चोरट्यांनी हे प्रकार केले. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्कानगरी येथील सुधीर अर्जुनराव गिते यांच्या पत्नी सोमवारी सकाळी घराला कुलूप लावून समर्थनगर येथे दवाखान्यात गेल्या होत्या. दुपारी त्या घरी परतल्या. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटातील सोन्याची अंगठी व कानातले असा २५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळविला; तसेच दुसरी घरफोडीची घटना उत्तमनगर परिसरात मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. येथील सुवर्णा रामेश्वरराव गायकवाड ही महिला मुलांच्या कपडे खरेदीसाठी रिलायंस मॉल येथे गेली होती. काही वेळाने सुवर्णा गायकवाड घरी परतल्या. यादरम्यान चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून १५ हजार रुपयाचे मंगळसूत्र पळविले. या दोन्ही प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गस्त नावालाच

शहरात पोलिस आयुक्तांनी दहा कंट्रोल रूम मोबाइल, चार्लीचे पथक, गुन्हेशाखेची पथके आदी तैनात केली आहेत, मात्र ही यंत्रणा नावालाच असल्याचे गेल्या काही घटनातून दिसून येत आहे. एक महिन्यापूर्वी शहरातील सर्व पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथके बरखास्त करण्यात आलेली आहेत. या पथकामध्ये नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे. गेल्या महिन्यात दशमेशनगर येथे दिवसाढवळ्या घडलेल्या जबरीचोरीच्या घटनांचा देखील तपास लावण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबाद पालिकेत आयुक्तच सर्वोच्च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सर्वसाधारण सभेपेक्षा आपणच सुपिरियर आहोत हे महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांनी सिद्ध केले आहे. महाजन यांना शासन दरबारी परत पाठवण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत २० ऑक्टोबर रोजी झाला. त्यानंतर आतापर्यंत शासनाने या निर्णयावर काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे आयुक्तांची बाजू प्रबळ होत असल्याचे बोलले जात आहे.

प्रकाश महाजन यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करत महापालिकेतील नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव आणला. महाजन यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर पाच अष्टमांशपेक्षा जास्त सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या व बहुमतांने हा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानुसार शासनाने विनाविलंब आयुक्तांना परत बोलवले पाहिजे, असा कायदा महापालिका अधिनियमात आहे. प्रस्तावाच्या बाजूने ९५ तर, विरोधात १३ मते पडली. पाच नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे शासन आयुक्तांना तत्काळ परत बोलवेल असे मानले जात होते. मात्र, सर्वसाधारण सभा होऊन पंधरा दिवस झाले तरी आयुक्तांवर परत बोलवण्याची कार्यवाही झाली नाही. आयुक्तांच्या बदलीचे आदेश आज येणार, उद्या येणार अशी चर्चाच फक्त होत आहे.

सर्वसाधारण सभेनंतर पंधरा दिवसांपर्यंत शासनाने आयुक्तांवर कारवाई न केल्यामुळे जीबीपेक्षा आपण सुप्रीम आहोत, असे आयुक्तांनी दाखवून दिल्याचे बोलले जात आहे. आयुक्तांना राज्यमंत्रिमंडळातील भाजपच्या दोन वरिष्ठ मंत्र्यांचा आशीर्वाद आहे.

अविश्वास प्रस्ताव आणण्यात महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेतला होता हे विशेष. अविश्वास प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्याच्या दिवसापासून महाजन महापालिकेत आलेले नाहीत. त्यांच्या शासकीय निवासस्थानी एक कार्यालय आहे. या कार्यालयातूनच आयुक्तांचा कारभार सुरू आहे.

........

महापालिकेचे सर्व अधिकारी आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी जातात. तेथेच बैठका होतात. निर्णयही घेतले जातात. गेल्या बारा दिवसांत शासन दरबारी झालेल्या बैठकांनाही आयुक्तांनी हजेरी लावली आहे. या सर्व प्रकारामुळे सध्यातरी आयुक्तांचे पारडे जड असल्याची पालिकेच्या वर्तुळात चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चीनच्या उपराष्ट्रपतींची ३५ मिनिटे शिक्षकाघरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'घर कधी बांधले, किती खर्च आला, फ्रिज मोठा का नाही, गॅस कोण देते, पाणी गरम कशावर करता, पलंग विकत घेतला की बनवला,' हे प्रश्न पडले चीनचे उपराष्ट्रपती ली युआनचो यांना. त्यांनी औरंगाबाद भेटीतील बुधवारची आपली ३५ मिनिटे सिल्लोड येथील शिक्षक माधव सोमवंशी यांच्या घरी घालवली आणि सामान्य भारतीय कुटुंबाची जीवनपद्धती जाणून घेतली. 'मध्यमवर्गाने खर्चासाठी थोडा हात सैल सोडत जीवनमान उंचावण्याकडे लक्ष द्यावे,' असा प्रेमळ सल्लाही दिला.

ली युआनचो यांनी मंगळवारी रात्री संपर्क अधिकारी, परकीय भाषाचे प्राध्यापक व्ही. एस. कुमार व भूगोलाचे डॉ. मदन सूर्यवंशी यांच्याकडे आपल्याला मध्यवर्गीय कुटुंबाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि या भेटीचा योग जुळला.

माधव सोमवंशी हे बोरगाव बाजार येथील जवाहर विद्यालयात शिक्षक आहेत. उपराष्ट्रपतींनी त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रश्न विचारले. घरातील वस्तूंची पाहणी केली. कुटुंबाचा खर्च जाणून घेतला. ३५ मिनिटांच्या भेटीत त्यांनी आहार, शिक्षण, विवाहपद्धती, वाहन असे सर्वसामान्य जीवनमान जाणून घेतले. त्यांनी सोमवंशी यांना घर कधी बांधले, किती खर्च आला, कसा केला, मुलांच्या शिक्षणावर किती खर्च करता, फ्रिज मोठा का नाही, गॅस कोण देते, पाणी गरम कशावर करता, पलंग विकत घेतला की, स्वतः बनविला, पाणी तापविण्यासाठी सौर उर्जेचा वापर का केला जात नाही, असे प्रश्न विचारले. तर त्यांच्या पत्नी उज्ज्वला यांना संस्कृती पुरूष प्रधान आहे की स्त्री प्रधान असा प्रश्न केला. त्यांनी घरातील किचनरूममधील विविध वस्तूंची पाहणी केली. उपकरणांची माहिती जाणून घेतली. जगातील दुसरी महासत्ता म्हणून ओळख असलेल्या चीनचे उपराष्ट्रपती घरी आल्याने सोमवंशी कुटुंबाचा आनंद गगणात मावेनासा झाला. त्यांनी औक्षण करून उज्ज्वला सोमवंशी यांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. भेटीनंतर कुटुंबाला चीनला येण्याचे आमंत्रण ली युआनचो यांनी दिले.

उपराष्ट्रपतींच्या या भेटीने सोमवंशी कुटुंबीय आंनदून गेले होते. त्यांच्याशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. त्यांनी विचारलेल्या शंकाचे योग्यरित्या निरसन ‌केले.

हुंडापद्धत काय आहे?

उपराष्ट्रपतींनी सोमवंशी यांची मुलगी माधुरी हिच्याशी संवाद साधला. 'शालेय शिक्षण कोठे घेतले, शिक्षणाची पद्धती आनंददायी आहे का, इंजिनीअरिंग क्षेत्र का निवडले, भविष्यात काय करायचे आहे, पदव्युत्तर शिक्षण परदेशात घेण्याची इच्छा आहे का, लग्नातील खर्च मुलीकडचेच करतात का, किती खर्च होतो, हुंडा दिला जातो का, अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली. शिक्षणपद्धती आनंददायी आहे, पदव्युत्तरचे शिक्षण भारतातच घेण्याची इच्छा असल्याचे माधुरीने त्यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाराचे आदान प्रदान व्हावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'चीन मधील ड्युहाँग शहर व औरंगाबादमध्ये संस्कृती, व्यापार व पर्यटन क्षेत्रात आदान प्रदान झाल्यास, दोन्ही शहरांना त्याचा लाभ मिळेल. पर्यटनामध्ये वाढ होईल. त्यामुळे या तीन क्षेत्रांकडे लक्ष दिले पाहिजे,' अशी अपेक्षा चीनचे उपराष्ट्रपती ली युआनचो यांनी व्यक्त केली.

उपराष्ट्रपतींनी युआनचो यांची महापौर त्र्यंबक तुपे यांनी बुधवारी रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धातास बैठक झाली. प्रारंभी महापौरांनी शहराच्यावतीने उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. 'चीन आणि भारत या दोन्हीही देशांचा इतिहास, संस्कृती खूप जुनी आहे. चीनमधील ड्युहाँग शहर आणि भारतातील औरंगाबाद या दोन्हीही शहरांमध्ये सिस्टर सिटीचा करार झाला आहे. ड्युहाँग शहरात देखील लेणी आहेत.

औरंगाबादच्या जवळ अजिंठा येथेही लेणी आहेत. या दोन्हीही लेणी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडण्यात आल्या तर, त्याचा उपयोग पर्यटक व अभ्यासकांना होऊ शकेल,' असे मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले.

.........

महापौर तुपे यांनी 'मराठी व चिनी भाषेच्या अभ्यासासाठी सिस्टर सिटीमध्ये एज्युकेशन हब असावे. चीनची विमान सेवा मुंबईपर्यंतच आहे. ही औरंगाबादपर्यंत करण्यात यावी. औरंगाबाद-अजिंठा दरम्यान चीनच्या मदतीने हेलिकॉप्टरसेवा सुरू केली जावी,' अशा अपेक्षा उपराष्ट्रपतींकडे व्यक्त केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, कार्यकारी अभियंता सिकंदर अली उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेणी पाहून भारावले

$
0
0

औरंगाबादः चीनचे उपराष्ट्रपती ली युआनचो यांनी बुधवारी (४ नोव्हेंबर) शिष्टमंडळासह जगप्रसिद्ध अजिंठा लेणीस भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याच्या मंत्री पंकजा पालवे-मुंडे या होत्या. त्यांचे सकाळी सव्वाअकरा वाजता लेणी परिसरात आगमन झाले. लेणी क्रमांक १, १७, २४, २६ आणि १० या लेणी पाहताना दुभाष्याकडून सविस्तर माहिती घेतली. प्राचिन काळात एवढ्या सुंदर लेणी साकारल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. शिष्टमंडळात चीनच्या मंत्रीमंडळातील झांग मिंग, ट्यांग टाओ, गाओ यान, शान जीझांग, कोंग झनायु, होंग ली, शी योनम, लू सुझेंग, चेनफेंग, टांग झिन यांच्यासह २४ जणांचा शिष्टमंडळात समावेश होता. या शिष्टमंडळाचे भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक मदनसिंग चौहान, उपाधीक्षक डॉ. एस. वाजपेयी, डी. एस. दानवे यांनी स्वागत केले.

७०० जणांचा फौजफाटा

चीनचे उपराष्ट्रपती ली युआनचो यांच्या दौऱ्यानिमित्त अजिंठा परिसरासह औरंगाबाद-अजिंठा मार्गावर अधिकाऱ्यांसह ७०० पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी पहाटे सहापासून तैनात करण्यात आले होते. उपराष्ट्रपतींनी या बंदोबस्ताचे कौतुक केले. उपराष्ट्रपती ली युआनचो, चीनचे सहा मंत्र्यांसह ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे मुंडे यांचा ताफा शहरातून सकाळी आठ वाजता अजिंठा लेणीकडे निघाला. हर्सूल सावंगी येथून पुढील सुरक्षेची जबाबदारी ग्रामीण पोलिसांकडे होती. सकाळी सहापासूनच सर्व मार्गावर जागोजागी अधिकारी व पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. लेणी परिसर, डोंगर आदी ठिकाणी बंदोबस्त होता. तसेच बॉंब शोधक व नाशक पथक, दंगा काबू पथकही तैनात होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुवारी जामिनावर सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्रुती कुलकर्णी हिच्या आत्महत्येस जबादार असलेल्या स्वप्निल मणियारच्या नियमित जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांच्या कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निकाल राखीव ठेवला असून गुरुवारी (५ नोव्हेंबर) निकाल अपेक्षित आहे.

स्वप्निल मणियारच्या छळास कंटाळून सिडकोतील श्रुती कुलकर्णी या तरुणीने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली होती. त्यावरून स्वप्निल मणियारला सिडको पोलिसांनी अटक केली होती. अटकेपासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. स्वप्निलने नियमित जामीन मिळविण्यासाठी अॅड. सोमनाथ लढ्ढा यांच्यामार्फत अर्ज दाखल केला. सरकारच्या वतीने या खटल्यासाठी विशेष सहायक लोकभियोक्ता म्हणून अॅड. के. जी. भोसले यांची नियुक्ती केलेली असून, त्यांनी बुधवारी नियमित जामीन देण्यास विरोध दर्शवला. स्वप्निल हा गुन्हेगारी प्रवृतीचा आहे, त्याने श्रुतीला धमकाविण्यासाठी, अश्लील एसएमएस पाठविण्यासाठी अमोल कारभारी याचा मोबाइल वापरला होता. श्रुतीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना स्वप्निल मणियार पोलिस व वकिलासोबत आला असल्याच्या बातम्या वृतपत्रातून आलेल्या आहेत, असा युक्तिवादही त्यांनी कोर्टात केला. फिर्यादी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून स्वप्निलवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचबरोबर त्याच्यावर अन्य गुन्हा देखील आहे. स्वप्निलने १ जुलै २०१५ ते १६ ऑगस्ट २०१५ पर्यंत जे कॉल केले, त्यापैकी ८० टक्के कॉल श्रुतीने स्वीकारले नाहीत. जे कॉल तिने घेतले, त्यात त्याने शिवीगाळ करून भांडणच केले असल्याचे रेकॉर्डमध्ये दिसून येते आहे. मृत्यूपूर्व जबाब नोंदवितांना डॉक्टारांचा सल्ला घेण्यात आला होता व तेव्हा ती शुद्धीवर होती, असेही कोर्टाच्या निदर्शनास आणले. त्याला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, पुरावा नष्ट करू शकतो. त्यामुळे त्याला जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तीवाद करण्यात आला. हा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निकाल राखीव ठेवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदोष ट्रॉमा केअर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अख्त्यारीतील तीन उपजिल्हा रुग्णालय तसेच तीन ग्रामीण रुग्णालयातील सहा ट्रॉमा केअर सेंटरचे बांधकाम तब्बल ७ वर्षांपासून अपूर्ण आहे. प्रत्येक सेंटरच्या बांधकामामध्ये त्रुटी असून, गरजेनुसार बांधकाम झालेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अपेक्षेप्रमाणे बांधकाम झाले नसल्याने आरोग्य विभागाने हस्तांतरण करून घेतलेले नाही.

वैजापूर येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, सिल्लोड येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, पाचोड येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय व कन्नड येथील ५० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयालसाठी २०१० मध्ये ट्रॉमा केअर सेंटर मंजूर आहे. अजिंठा येथील ५० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला २००८ मध्येच ही मंजुरी मिळाली आहे. सर्व ६ ट्रॉमा केअर सेंटरमध्ये २० खाटांचा वॉर्ड आहे. बहुतेक सेंटरच्या इमारतींचे बांधकाम निकृष्ठ असल्याच्याही तक्रारी आहेत. अजिंठा वगळता सर्व सेंटरसाठी १२ जणांचा स्टाफही मंजूर असून, रुग्णालयामध्ये ट्रॉमा सेंटर सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पण ट्रॉमा सेंटरची स्वतंत्र इमारत नसल्याने अपेक्षेप्रमाणे वैद्यकीय उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

अजिंठ्याच्या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे गेल्यावर्षी सुरू झालेले काम अत्यंत संथ सुरू आहे. त्यामुळे ट्रॉमा सेंटरचे काम ठप्प आणि रुग्णालयाचे काम संथ, अशी एकंदर स्थिती आहे. सर्वच रखडलेल्या सेंटरच्या कामांबाबत आणि संथ कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळो लेखी तसेच तोंडी कळविण्यात आलेले आहे. मात्र त्यानंतरही बांधकाम विभागाकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नाही आणि सर्रास दुर्लक्ष केले जाते, असेही सूत्रांनी सांगितले.

सर्व सहा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये काही ना काही त्रुटी आहेत. या त्रुटींबाबत बांधकाम विभागाला वारंवार कळविण्यात आले आहे. अनेक स्मरणपत्रेही देण्यात आली आहेत. दुरुस्ती न झाल्याने सेंटर ताब्यात घेतले नाहीत. - डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांसाठी सेनेची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आणि दुष्काळी परिस्थितीची सर्वात तीव्रतेची झळ सहन करत असलेल्या एक हजार शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या सहा नोव्हेंबर शुक्रवारी जालन्यात येत आहेत. शिवसेनेचे नेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांनी बुधवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

मराठवाड्यात दुष्काळ झेलत असलेल्या जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदत घेऊन स्वता शिवसेनेचे पक्षप्रमुख येत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या विचारातूनच आर्थिक मदत करावी ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मृती प्रतिष्ठानतर्फे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या फोटो प्रदर्शनातून जमा झालेल्या रक्कमेतून ही मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे असे खोतकर म्हणाले. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेनेचे नेते अनिल देसाई, विनोद घोसाळकर, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार बंडू जाधव यांच्यासह संपूर्ण मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवसेना ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारी संघटना आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत आम्ही ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कुटुंबाला मोफत धान्य वाटप केले आहे. त्यासोबतच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी जलकुंभ बसवून दिले आहेत,असे खोतकर म्हणाले. जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचा नंबर वन आला आहे. बहुतेक ग्रामपंचायतीची शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत. आता सरपंच निवडणूक झाल्यानंतर आम्ही त्या सर्वांचा मेळावा आयोजित करणार आहोत. मंठा नगर पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर विजयी झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, पंडितराव भुतेकर, रावसाहेब राऊत, नगरसेवक महेश दुसाने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रशासनाचा शिवसेनेशी असहकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

जिल्हा प्रशासनातील भाजपधार्जिण अधिकाऱ्यांकडून शिवसेनेला अपेक्षित सहकार्य मिळत नाही. त्यांच्याकडून असहकार्यची भूमिका घेतली जात आहे. शिवसेनेच्या नेतेमंडळीच्या आदेशाची पायमल्ली केली जाते. पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही, अशी खंत शिवसेना जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत हे शिवसेनेचे नेते आहेत. तसेच राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. त्यांचेकडे उस्मानाबादसह भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा कारभार आहे. याशिवाय ते तीन जिल्ह्याचे संपर्कमंत्री आहेत. आपल्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना उस्मानाबादला वारंवार भेटी देणे शक्य होत नाही. तरीदेखील ते जिल्ह्यातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत कामाचा सतत पाठपुरावा करतात. मात्र, जिल्हा प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून त्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नाही. उलट प्रशासनातील काही अधिकारी द्वेषभावनेतून पालकमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पालकमंत्र्यांनी केलेल्या सूचनाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शिवाय त्यांच्या आदेशावरही कारवाई संदर्भाने कसलीही तातडीने हालचाल होताना दिसत नाही, असे पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील चारा छावणी चालकांची तातडीने बिले अदा करावीत, अशी सूचना करूनही जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सात चारा छावणी चालकांचे पेमेंट अद्याप केलेले नाही. येत्या तीन-चार दिवसांत चारा छावणीचे सुमारे दोन कोटीची बिले अदा न केल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडण्याचा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.

तुळजापूर येथील प्राधिकरणाची बिले, चार छावणीचे बिले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील ठेकेदार व पुरवठाधारक यांची बिले देण्यासाठी जिल्हा प्रशासन हेतूतः दिरंगाई करीत आहे, असा आरोपही सुधीर पाटील यांनी यावेळी केला. शिवसेनेचे खच्चीकरण व्हावे यासाठीचा हा खटाटोप असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या असहकार भूमिकेबद्दल शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली कार्यपद्धती बदलण्याची गरज आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपण जनतेचे सेवक आहोत याचे भान ठेवले पाहीजे. अन्यथा सेनेला आक्रमक पवित्रा घेत आपल्या न्याय मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पाटील यांनी दिला.

जिल्ह्यातील जलशिवार अभियानाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून, याची सखोल चौकशी करण्याचे मागणी सेनेच्यावतीने यावेळी करण्यात आली. प्रशासनाकडून सर्वसामान्यांसह शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक मिळावी, तसेच जनतेची कामे विनाविलंब व्हावीत यासाठी येत्या पंधरवड्यात महामंडळसहित विविध समित्यावरील सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. शिवसेनेने यासाठीच्या नियुक्तीची विशेष यादी पालकमंत्र्यांकडे सादर केली आहे. शिवसेना व भाजप यांच्यामध्ये ६० ः ४० हा फार्म्युला ठरला आहे. भाजपला समिती सदस्यांची यादी देण्यास विलंब होणार असेल तर पालकमंत्र्यांनी सेनेच्या सदस्यांची नियुक्ती जाहीर करावी, अशी विनंती वरिष्ठांना करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक-बस अपघात, २२ जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

ट्रक आणि बसची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात २२ प्रवाशी जखमी झाले. औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा फाट्याजवळ बुधवारी दुपारी हा अपघात घडला.

बीड येथून औरंगाबादला जाणारी विनावाहक बस (क्र. एम. एच. २०/ बी. एल. ११००) व साडेगांव तांडा ता. अंबड येथून समर्थ साखर कारखाना येथे ऊसतोड मजूर घेवून जाणाऱ्या ट्रकची व बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये बसचालक गोपीनाथ जाधव (रा. कुंभारवाडी, ता. गेवराई), विजय बांगड (रा. बीड) या दोघांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून औरंगाबाद येथे नेण्यात आले. तर सय्यदाबी शे.गणी (रा. निसारवाडी, औरंगाबाद), सय्यद इरफार इब्राहिम (रा. बीड), नारायण रोटे (रा. औरंगाबाद), शरद पांचाळ (रा. रुई, ता. धारुर), निलेश पांडूरंग वाळकेश्वर (रा. बीड), बाळू पवार (रा. औरंगाबाद), उमाकांत देवळे (रा. औरंगाबाद), पल्लवी खडके (रा. बीड), प्रेमलता खडके (रा. बीड) यांच्यावर अंबड येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार करून बाळू पवार, पल्लवी खडके, सय्यदाबी गणी यांना उपचारार्थ जालना येथे हलविण्यात आले. ट्रकमधील संजय राठोड हे जखमी झाले आहेत.

ट्रकमधील सर्व जखमींना उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रक जागीच पलटी झाला तर बसचा दर्शनी भाग चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जप्त डाळीचा साठा ‘जैसे थे’

$
0
0

औरंगाबाद : तूर डाळीच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या छापासत्रामध्ये १६७. ५४ टन डाळ जप्त करण्यात आली होती. मात्र, या साठ्यांबाबत अद्यापही सुनावणी झाली नसल्याने डाळी, खाद्यतेलबियांचे साठे 'जैसे थे' पडले आहेत.

औरंगाबाद जि‌ल्ह्यात ४९.३२८ टन, जालना ८८.२१ तर, बीड जिल्ह्यात ३० टन डाळ जप्त करण्यात आली. नियमाप्रमाणे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त करण्यात आलेल्या साठ्यांबाबत सुनावणी घेऊन तसेच व्यापाऱ्यांकडून आवश्यक ते कागदपत्र तपासून निर्णय घेतल्यानंतर डाळी व्यापाऱ्यांना बाजारात आणता येणार आहेत, मात्र अद्यापही सुनावणी झाली नाही. सुनावण्या झाल्यानंतर हा साठा बाजारात येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आतापर्यंत १,७२८ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, ६ ठिकाणांवर मर्यादेपेक्षा अधिक साठा आढळला आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ३, परभणी २ तर बीड जिल्ह्यातील एका ठिकाणाचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामांसाठी पंधराशे कोटींची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षभरात अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी १ हजार ५७७ कोटी रुपयांची मागणी विभागीय आयुक्तालयाने राज्य सरकारकडे केली आहे.

गेल्या वर्षी सुरू झालेल्या या अभियानाअंतर्गत विभागातील १ हजार ६८२ गावे निवडून पावसाचे पाणी गावातच अडवणे व जिरवण्यासाठी प्रशासनाकडून विविध कामे हाती घेण्यात आली. कृषी, सिंचन, जलसंधारण, सामाजिक वनीकरण आदी विविध यंत्रणांमार्फत आतापर्यंत सुमारे ५६ हजार कामे हाती घेण्यात आली असून सुमारे २० ‌हजार कामे अपूर्ण आहेत. सप्टेबरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील शिल्लक कामांसाठी ३६२ कोटी ९० लाख ८९ हजार आणि दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी १९०३ कोटी ७६ लाख ६१ हजार असा एकूण २ हजार २६६ कोटी ६७ लाख ६१ हजार रुपये लागणार आहेत. यापैकी जिल्हा नियोजन समिती तसेच इतर स्त्रोताद्वारे ६८९ कोटी ५९ लाख ९२ हजार रुपये या कामांसाठी मिळणार असल्याने १ हजार ५७७ कोटी ७ लाख ६९ हजार रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तालयाने शासनाकडे पाठवला आहे.औरंगाबाद जिल्ह्याची सर्वाधिक मागणी

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये निवडण्यात आलेल्या २२८ गावांमध्ये सुमारे साडेतीन हजार कामे पूर्ण करण्यात आली असून दीड हजार कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांची बिले अदा करण्यासाठी शासनाकडे ३४६ कोटी २४ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे तर सर्वात कमी ६४ कोटी रुपयांची मागणी परभणी जिल्ह्याची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल कपातीचा छावणींना फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या सात चारा छावण्या सुरू असून, यापैकी चार या भूम तालुक्यातील आहेत. तर तीन छावण्या या उस्मानाबाद तालुक्यातील आहेत. या चारा छावण्यांतून लहान मोठी सुमारे ६ हजार ५०० जनावरे सध्या आश्रय घेत आहेत. या चारा छावण्या सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला. परंतु, या चारा छावणी चालकांचे सुमारे दोन कोटी रुपयांचे अनुदानित बील जिल्हा प्रशासनाने अदा केले नाही. त्यामुळे छावणी चालकांवर आर्थिक संकट ओढावले असून छावणीचालक या छावण्या बंद करण्याच्या मनस्थितीत आहेत.

चारा छावण्यातील त्रृटीबाबत दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळे त्यांचे पेमेंट देण्यात थोडी दिरंगाई झाली असली तरी या बिलातून २० टक्के रक्कम कपात करून ८० टक्के रक्कमेचे पेमेंट करण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या हाडोंग्री (ता. भूम) येथील चारा छावणीचा देखील बील कपात मोहिमेत समावेश आहे.

याशिवाय चार-पाच दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी येवती (ता. उस्मानाबाद) येथे भेट दिलेल्या चारा छावणीचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. या चारा छावणीतून जर त्रृटी असतील अशा चारा छावण्यांना मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष कशी भेट देतात किंवा उद्घाटन करतात असाही प्रश्न यानिमित्ताने चर्चिला जाऊ लागला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४ चारा छावण्यांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली. मात्र, या संदर्भातील अटी व नियमाला कंटाळून सात जणांनी परवानगी मिळाल्यानंतरही चारा छावण्या सुरू केल्या नाहीत. प्रशासनातील लालफितीच्या कारभाराला कंटाळून शिवाय पेमेंटला होणारा विलंब यामुळे आम्ही चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे काही छावणीचालक सांगत आहेत.

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन जिल्ह्यात चारा छावण्यांना तातडीने मंजुरी द्यावी तसेच नाममात्र त्रृटी दाखवून बीलामध्ये कपात करू नये, अशी विनंती शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images