Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उड्डाणपुलावरुन पडून २ ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतिचौक येथे भरधाव वेगाने जाणारी दुचाकी कठड्यावर आदळल्याने दुचाकीवरील दोन तरुण साधारण २० ते २५ फूट उंच उडून पुलावरून खाली कोसळले. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दोघे तरुण विमानतळाच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान होते.

डी. देवेंद्र (वय २५ रा. गुंटूर, मध्यप्रदेश) व एस. चैतन्य (वय २६ रा. विशाखापट्टणम) हे दोघे जवान विमानतळ सुरक्षा यंत्रणेमध्ये कार्यरत होते. गुरुवारी रात्री हॉस्पिटलला जात असल्याची अशी नोंद करून ते बाहेर पडले होते. ते दुचाकीवरून (क्रमांक एपी ०१ एस ९१२६) आकाशवाणीकडून बाबा पेट्रोलपंपकडे जात होते. क्रांतिचौक उड्डाणपुलाच्या गतिरोधकावर त्यांची दुचाकी जोरात आदळून पुलाच्या कठड्यावर जाऊन धडकली. यावेळी दोघेही उंच उडून पुलाखाली कोसळले. त्यांची दुचाकी ५० ते ६० फूट घसरत पुलाच्या मध्यभागी जाऊन पडली. हे दोघे खाली कोसळताच तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. दोघांना तातडीने क्रांतिचौक पोलिस ठाण्याच्या टू-मोबाइलमधून घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

भाषेची अडचण

हा अपघात घडल्यानंतर जागरूक नागरिकांनी त्यांच्या मोबाइलवरून त्यांच्या कॉल लिस्टमध्ये असलेल्या क्रमांकावर माहिती देण्यासाठी फोन लावले, मात्र समोरील व्यक्तीला हिंदी भाषा येत नसल्याने त्यांना अपघात झाला हे सांगता येत नव्हते. अखेर हिंदी भाषा समजणाऱ्या व्यक्तीशी संवाद झाल्याने अपघाताची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांना देता आली.

पुलावर दुसरा अपघात

या पुलाचे वळण धोकादायक आहे. वेगात आलेल्या वाहनधारकाला वळणाचा अंदाज येत नाही. परिणामी कठड्यावर जाऊन वाहन आदळते. दोन वर्षांपूर्वी दिल्ली येथील तरुणाचा अशाचा पद्धतीने या पुलावर अपघात झाला होता. पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू झाला होता.

हेल्मेट नव्हते

या अपघातात 'सीएसएसएफ'चे जवान मृत्युमुखी पडले. या दोन्ही जवानांनी हेल्मेट घातलेले नव्हते. खाली कोसळल्यानंतर ते डोक्यावरच आदळले. यामध्ये गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी हेल्मेट घातले असते तर त्यांचा जीव कदाचित वाचला असता, अशी प्रतिक्रीया उपस्थितांमध्ये उमटत होती.

'ड्रायव्हिंग सेन्स' पाळावा

एकीकडे शहरात उड्डाणपुलांचे धडाक्यात काम सुरू असतांना दुसरीकडे सध्या असलेल्या पुलांवर अपघातांची संख्या वाढली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या क्रांतिचौक उड्डाणपुलावर झालेल्या अपघातामुळे पुलाच्या डिझाइनचा प्रश्न पुन्हा पुढे आला आहे. हे डिझाइन शंभर टक्के चुकीचे असून इंडियन रोड कॉग्रेसच्या नियमांना पूर्णपणे धाब्यावर बसवले आहेत. एकीकडे स्मार्ट सिटीच्या मोठ्या गप्पा मारत असतांना शहरातील नागरिकांनीही 'ड्रायव्हिंग सेन्स' पाळत स्मार्ट होण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. उड्डाणपूल म्हटला की तेथे गाडी जोरात चालवावी, असा काही नियम नाही. मात्र आपल्याकडे तसे होतांना दिसत नाही, उड्डाणपुलावरून हमखास गाडीचा वेग वाढवलेला असतो. आपल्याकडील रस्त्यांची अवस्था पाहता वेग वाढवण्याची काहीही गरज नसल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...म्हणून वाचले त्यांचे प्राण

$
0
0

औरंगाबाद : वेळ दुपारी साडेबारा ते पाऊणची.. दिवाळीनिमित्त रस्त्यावरून जाणाऱ्याची लगबग सुरू होती. तोच सेंट्रल नाका ते सेव्हन हिल पूल यादरम्यान दुचाकी घसरून एक तरूण दुभाजकावर आपटून रक्तस्त्राव सुरू झाला. नेहमीप्रमाणे बघ्याची गर्दी जमली व हळहळ व्यक्त होऊ लागली, मात्र मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हते. इतक्यात दोन युवक सरसावले. त्यांच्यासह आणखी एका तरुणाने मदत केली. यामुळे वेळेवर उपचार मिळाल्याने या गंभीर जखमीचे प्राण वाचले.

पत्रकार अविनाश नलावडे हे गुरुवारी दुपारी सेट्रल जकात नाका येथून सेव्हन हिलकडे जाताना दुचाकी घसरून दुभाजकवर कोसळल्याने जखमी झाले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विजय वाहुळ, त्यांचे मित्र शंकर अडसूळ व दुसरा तरूण सुनील छत्रे यांनी मदत केली. त्यांनी नलावडे यांना तातडीने एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेचे गंभीर्य पाहून त्यांनी हॉस्पिटलच्या नियमानूसार पूर्तता केली. अगदी थोड्यावेळात नलावडेंवर आयसीयूत उपचार सुरू झाले. त्याचेवळी नलावडेंच्या खिशात सापडलेल्या एका व्हिजिटिंग कार्डवरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा एका तरुणाने फोन उचलला व मोबाइल अपघातस्थळी पडल्याचे सांगितले. नलावडेंची ओळख पटल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना वाहुळ व दोन तरुणांनी लगेच माहिती कळवली. नलावडे यांना वेळीच मदत मिळाल्याने लगेच उपाचार सुरू झाले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’लाही ‘अमृत’चा हादरा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अमृत'मुळे भूमिगत गटार योजनेबरोबर समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पालाही हादरा बसणार, हे स्पष्ट झाले आहे. या योजनेसाठी सरकारकडून मिळणाऱ्या निधीत सुमारे २०० कोटी रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. हा निधी कंत्राटदाराने उभारावा व त्याच्या बदल्यात १७ऐवजी ३४ वर्षे पाणीपुरवठा योजना औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या ताब्यात ठेवावी, अशा हालचाली महापालिकेत सुरू झाल्या आहेत.

महापालिकतर्फे राबवण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी व भूमिगत गटार योजनेसाठी केंद्र सरकारच्या यूआयडीएसएसएमटी (अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम फॉर स्मॉल अँड मिडियम टाउन्स) या योजनेतून मंजुरी मिळाली होती. केंद्रातील सत्तांतरनंतर नव्या सरकारने 'यूआयडीएसएसएमटी' योजना रद्द करून त्या जागी 'अमृत' योजना आणली. 'यूआयडीएसएसएमटी'अंतर्गत समांतर जलवाहिनी व भूमिगत गटार योजनांसाठी एकूण खर्चापैकी ८० टक्के रक्कम केंद्र सरकार देणार होते. आता 'अमृत'मधून केंद्र सरकार एकूण खर्चाच्या ३३.३३ टक्केच निधी महापालिकेला देणार आहे. राज्य सरकारला १६.६७ टक्के हिस्सा द्यावा लागणार असून, महापालिकेला योजनेच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम स्वतःचा हिस्सा म्हणून भरावी लागणार आहे.

समांतर जलवाहिनीची योजना ७९२ कोटी रुपये खर्चाची आहे. त्यापैकी सुमारे ४०० कोटी रुपये सरकारकडून मिळतील, असे गृहित धरण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून १४६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता महापालिकेला मिळाला आहे. उर्वरित सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा हिस्सा मिळणे बाकी आहे. आता ही योजना 'अमृत'मध्ये स्थलांतरित केल्यामुळे अडीचशे कोटी रुपये संकटात सापडल्याचे मानले जात आहे. ही रक्कम मिळाली नाही तर, समांतर जलवाहनीच्या कामात कपात करावी लागणार आहे. कामात कपात होऊ नये म्हणून समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीने 'अमृत'मधून कपात होणारी रक्कम उभी करून खर्च करावी. त्याच्या मोबदल्यात पाणीपुरवठा योजना १७ऐवजी ३४ वर्षांपर्यंत कंपनीच्या ताब्यात देण्याच्या हालचाली महापालिकेत सुरू झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीसाठ्यात घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे मराठवाड्याला पुन्हा एकदा दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. सध्या विभागातील लहान मोठ्या ८४३ प्रकल्पांमध्ये केवळ १११० दशलक्ष घनमीटर (१४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, जायकवाडी धरणामध्ये गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात कमी पाणी शिल्लक आहे.

सध्या लहान-मोठ्या प्रकल्पांतील शिल्लक पाणीसाठ्यातही झपाट्यात घट होत असून, अनेक गावांत पुन्हा टॅँकर सुरू करावे लागत आहे. विभागामध्ये सध्या ३६० गावे व १७४ वाड्यांना ५०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जून महिन्याच्या प्रारंभीच मान्सूनचे जोरदार आगमन व त्यानंतर सप्टेबरमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे लहान मोठे प्रकल्प भरले, मात्र परतीच्या पावसाने दिलेली हुलकावणी व दररोजच्या होत असलेल्या बाष्पीभवनामुळे मराठवाड्याला यंदा मार्च महिन्यानंतर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त आहे.

मराठवाड्यातील सर्व लहान मोठ्या ८३५ प्रकल्पांमध्ये १११०.२१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. दुष्काळी परिस्थिती, तापमानात झालेली वाढ यामुळे पाणीसाठ्यात उन्हाळ्याप्रमाणेच घट नोंदवण्यात येत आहे. सध्या माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, सीना-कोळेगाव या चार मोठ्या प्रकल्पांमधील पाणी जोत्याखाली आहे.

....

जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातून पाणी सोडणे सुरू झाले, मात्र उन्हामुळे दररोज बाष्पीभवन होत अाहे. प्रत्येकी दोन दिवसाला सुमारे १ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाल्याने दररोजचे बाष्पीभवनाचे प्रमाण शून्य झाले होते.

..

औरंगाबाद जिल्ह्यात दमदार पावसामुळे मोठ्याप्रमाणवर टँकरसंख्येत घट झाली होती, मात्र आता जिल्ह्यामध्ये ६६ टँकर सुरू आहेत. पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होत असल्यामुळे विविध गावांतून टँकरची मागणी सुरू झाली आहे. विभागातील इतर जिल्ह्यांचीही अशीच अवस्था आहे. सध्या ८ जिल्ह्यांमध्ये ३६० गावांना व १७४ वाड्यांना ५०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर बीड जिल्ह्यात आहेत.

....

जायकवाडी - १८८.५२२ (८.६८ टक्के)

येलदरी - १२० (१५ टक्के)

सिद्धेश्वर - ८१ (२ टक्के)

उर्ध्व पैनगंगा - ३३२ (३४ टक्के)

निम्न मनार - २ (१ टक्के)

विष्णूपुरी - ४२ (५१ टक्के)

निम्न दुधना - ११९ (४९ टक्के)

(साठा दशलक्ष घनमीटरमध्ये)

जायकवाडी धरणामध्ये २०१० ते २०१५ या कालावधीत नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत सर्वात कमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. धरणामध्ये २०१०मध्ये १२९७ दशलक्ष घनमीटर, २०११मध्ये १२७९ दलघमी, २०१२मध्ये ८५ दलघमी, २०१३मध्ये ६८७ दलघमी तर, २०१४मध्ये ७६४ दलघमी पाणीसाठा शिल्लक होता, मात्र यंदा पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर घसरली असून, सध्या धरणामध्ये १८८.५२२ दलघमी (८.६८ टक्के) साठा शिल्लक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या वेबसाइटवर जुनीच माहिती

$
0
0

Ravindra.taksal@timesgroup.com

औरंगाबादः शहर स्मार्ट सिटी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू पाहणाऱ्या महापालिकेला संकेतस्थळही अद्ययावत ठेवता येत नाही. लोकोपयोगी माहिती अपडेट करणे सोडाच महापौर, उपमहापौर वगळता पदाधिकाऱ्यांचीही छायाचित्रे संकेतस्थळावर नाहीत. त्यावर संबंधितांकडून छायाचित्र उपलब्ध नसल्याचे अजब उत्तर दिले जात आहे. याबद्दल नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

औरंगाबाद शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात असल्याने महापालिकेचे संकेतस्थळ अद्ययावत असेल, असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, http://www. aurangabadmahapalika.org या संकेतस्थळावर भेट दिल्यास भ्रमनिरास होतो. सर्व क्षेत्रात इंटरनेटचा वापर वाढला असून शासकीय-खासगी कार्यालयांत ऑनलाइन कारभारावर भर दिला जात आहे. त्यामुळे संकेतस्थळाचे महत्त्व वाढले असून नागरिकांना कार्यालयात न येता विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र महापालिका या जगराहटीपासून दूर आहे. तिच्या संकेतस्थळावर महत्वाची माहितीच उपलब्ध नसल्याचा नगरसेवकांचा आरोप आहे.

मनपाच्या सर्व अभिलेखांची योग्य नमुने, सूची तयार करून संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. अधिकारी, नगरसेवकांची माहिती, फोन नंबर अधिकाऱ्यांच्या सेवा दर्शविणारे विवरणपत्र, निर्दशिका यासंदर्भात पूर्णतः कार्यवाही करण्यात आलेली नाही. भूमिगत गटार, समांतर जलवाहिनी आदी योजनाची काही प्रमाणात माहिती आहे. जन्म व मृत्यू नोंदणी, शोध निकष, तक्रारी नोंदवा आदी माहिती व ऑनलाइन सुविधा संकेतस्थळावर आहेत. पण त्या इतर पालिकांच्या तुलनेत खूप मागे असल्याचे जाणवते. रस्त्याची कामे, कंत्राटदार, काम पूर्ण होण्याचा कालावधी आदी अद्ययावत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे, कोर्टाच्या आदेशाने बंधनकारक आहे. मात्र प्रशासनाला त्याचाही विसर पडला आहे.

संकेतस्थळावर महापौर, उपमहापौर, आयुक्तांचे छायाचित्र मुख्यपृष्ठावर आहे. स्थायी समिती सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता, नगरसेवकांची माहिती, छायाचित्र उपलब्ध नाही. यासंदर्भात संगणक विभागाचे अधिकारी अब्दुल बारी पटेल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित विभागाकडून सर्व पदाधिकारी, नगरसेवकांची छायाचित्रे अद्याप प्राप्त झाले नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण रस्त्याची दुरुस्ती रखडली

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com

औरंगाबादः जिल्ह्यातील पर्यटनाचे महत्वाचे केंद्र असलेल्या पैठण रस्तादुरुस्तीकडे गेल्या १० वर्षांपासून दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. रस्ता रुंदीकरण तसेच दुरुस्तीसाठी आजवर कित्येक प्रस्ताव शासनदरबारी पाठविले गेले. पण त्यावर कधीही विचार झाला नाही. खड्ड्यातून वाट काढत जाणारे पैठणकर आता कंटाळले आहेत.

औरंगाबाद-पैठण हा ५० किलोमीटरचा रस्ता गेल्या ९ वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. तत्कालीन सरकारने दोन वेळा बीओटीवर रस्ता दुरुस्तीची घोषणा केली. पण त्यासाठी कंत्राटदार पुढे आले नाहीत. कारण ३०० कोटी रुपये खर्चून रस्ता तयार करून दिला, तर नियोजित कालावधीत रस्त्यावरून टोलवसुली अशक्य असल्याचे गणित लावण्यात आले. सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून त्यासाठी विशेष निधी मंजूर करण्याबाबत सरकारची कायम नकारात्मक भूमिका होती. केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवूनही त्यावर सकारात्मक विचार झाला नाही, त्यात ८ वर्षे निघून गेली. युती सरकार सत्तेत येताच रस्त्याची कामे मार्गी लागतील अशी चिन्हे होती. पण त्यांनीही जुन्या सरकारचीच 'री' ओढली. बीओटी पद्धत बंद करण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याने राज्य सरकारनेही रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर असताना औरंगाबाद-अजिंठा रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला. अजिंठा लेणी पाहण्यासाठी परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. चीनच्या उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यातही या रस्त्याची मर्यादा स्पष्ट झाली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या रस्त्याप्रमाणेच महत्वाच्या असलेल्या पैठण रस्त्याच्या डागडुजीसाठी मात्र अद्याप काहीच पावले उचलली गेली नाहीत.

केंद्राने मोठ्या बजेटच्या रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी अॅमिटी पद्धती अवलंबिण्याचे ठरविले आहे. त्यानुसार रस्त्याला लागणारा खर्च निविदा मान्य झालेल्या कंत्राटदाराने करावा, त्यापोटीची रक्कम सरकार व्याजासह परत करेल, अशी ही योजना आहे. या प्रकल्पातून पैठण रस्त्याला मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ही योजना जेव्हा सुरू होईल तेव्हा होईल, तोवर रस्त्याच्या डागडुजीसाठी राज्य सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणी चालक त्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

चारा छावण्या या आर्थिक लाभाच्या ठरू नयेत यासाठी शासन व प्रशासनाने जनावरांच्या शेणाची रक्कम चारा छावणी चालकांकडून वसूल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चारा छावणी चालक हे आता शेणाला महाग झाले आहेत. एवढेच नव्हे तर शासकीय अनुदानातून चारा छावण्याला मिळणाऱ्या रक्कमेतून २.३० टक्के इतकी रक्कम टीडीएस स्वरूपात आयकर म्हणून कपात करण्यात येत आहे.

चारा छावणीसाठी देय असलेल्या रकमेतून उस्मानाबाद जिल्हा प्रशासन सुमारे २८ टक्के इतकी रक्कम कपात करू लागल्यामुळे चारा छावणीचालक त्रस्त झाले आहेत. शासनाच्या किचकट व जाचक अटींची डोकेदुःखी नको म्हणून खिशाला चाट ही नको या हेतूने चारा छावण्या बंद करण्याच्या मनस्थितीत आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण १४ चारा छावण्यांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली. यापैकी केवळ सात चार छावण्या उस्मानाबाद व भूम तालुक्यात प्रत्यक्षात सुरू झाल्या. या चाऱ्या छावण्यातून सुमारे ५६०० जनावरे सध्या आश्रय घेत आहेत. सप्टेंबर व ऑक्टोंबर या दोन महिन्यांचे या चारा छावण्यांचे सुमारे २ कोटी ९४ लाखाचे बील केवळ जिल्हा प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे अनेक दिवस प्रलंबित होते. वारंवार चारा छावणीचालकांकडून या बिलाची मागणी केल्यानंतर सुमारे २७.५० टक्के इतकी रक्कम कपात करून उर्वरित रक्कम दिवाळी दरम्यान चारा छावणी चालकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली.

मोठ्या जनावरांसाठी ७० रुपये आणि लहान जनावरांसाठी ३५ रुपये प्रतिदिन अशा स्वरूपात शासन चारा छावणीसाठी अनुदान देते. प्रत्यक्ष खर्चाच्या तुलनेत अनुदानाची ही रक्कम अत्यंत तोकडी आहे. बाजारपेठेत सध्या कडब्याबरोबरच उसाच्या वाड्याचे दरही गगनाला भिडलेले आहेत. चाऱ्यासोबत दररोज प्रत्येक जनावराला अर्धाकिलो सरकी पेंड किंवा सुग्रास (पशुखाद्य) देण्याचेही प्रशासनाने बंधनकारक केले आहे. या सर्व खर्चाची बेरीज सध्या १२५ रुपयांच्या घरात जाते. याशिवाय छावणीच्या ठिकाणी लागणारे मनुष्यबळ, पाणी, वीज आदींचा येणारा खर्च हा वेगळाच. यापूर्वी जनावरांच्या मिळणाऱ्या शेणातून छावणीचालक हा खर्च भागवून खर्चाचा ताळमेळ घालायचे.

परंतु, यंदा शासन व प्रशासनाचे लक्ष शेणावर गेले व त्यांनी छावणीचालकांकडून शेणाची किंमत वसूल करण्याचे निश्चित केले. यासाठी नियुक्त तज्ज्ञ समितीने शेणाचा दर हा प्रतिकिलो एक रुपया निश्चित केला. मोठेजनावर दररोज सहा किलो व लहान जनावर तीन किलो शेण देते असे गृहीत धरून शेणाची किंमत अनुदान रक्कमेतून वजा करण्याचे निश्चित करण्यात आले.

सध्या विविध कारण दर्शवित शासन व प्रशासन मोठ्या जनावरांसाठी ७० रुपये अनुदानातून सुमारे २० रुपये कपात करून केवळ ५० रुपये छावणी चालकाच्या खाती जमा करीत आहेत. ही रक्कम मिळविण्यासाठी छावणी चालकांना तलाठी, ग्रामसेवक, तहसिलदार याशिवाय जिल्हा कोषागार अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांची मनधरणी करावी लागत आहे. यामुळे केवळ ५० रुपयांत मोठ्या जनावरांचे छावणीतून संगोपन करणे अशक्य असल्याचे छावणीचालकांचे म्हणणे आहे.

अनुदानासाठी मनधरणी

सध्या विविध कारण दर्शवित शासन व प्रशासन मोठ्या जनावरांसाठी ७० रुपये अनुदानातून सुमारे २० रुपये कपात करून केवळ ५० रुपये छावणी चालकाच्या खाती जमा करीत आहेत. ही रक्कम मिळविण्यासाठी छावणी चालकांना तलाठी, ग्रामसेवक, तहसिलदार याशिवाय जिल्हा कोषागार अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांची मनधरणी करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपीची समिती कोमात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुधारीत शहर विकास आराखड्यासाठी (डीपी) दोन वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेली समिती कोमात गेली आहे, समितीमधील सदस्य देखील कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे नवीन समिती नेमण्याचे आव्हान महापालिका प्रशासनाच्या समोर निर्माण झाले आहे. नवीन समिती स्थापन झाल्यास आयुक्तांकडे दाखल करण्यात आलेल्या 'डीपी' ला न्याय मिळेल, असे मानले जात आहे.

शहराच्या सुधारित विकास आराखड्याची चर्चा महापालिकेत ३-४ वर्षांपासून सुरू आहे. आराखडा तयार करण्यास दोन वर्षांपूर्वी गती आल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेने आराखड्या संदर्भात समिती स्थापन केली. समितीमध्ये स्थायी समितीचे तत्कालीन सभापती विकास जैन, स्थायी समितीच्या तत्कालीन सदस्य सविता घडमोडे, प्राजक्ता राजपूत यांचा समावेश करण्यात आला. समितीचे सदस्य अस्तित्वात असेपर्यंत सुधारित विकास आराखड्याचे काम झाले नाही. दरम्यानच्या काळात महापालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या रिंगणात सविता घडमोडे व प्राजक्ता राजपूत या दोघीही उतरल्या नाहीत, त्यामुळे त्या पुन्हा निवडून येऊ शकल्या नाहीत. विकास जैन नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले, पण त्यांना स्थायी समितीमध्ये स्थान मिळाले नाही.

विकास आराखड्यासाठी नेमण्यालेल्या या समितीमध्ये स्थायी समिती सभापती व दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र महापालिकेच्या निवडणुकीनंतर पूर्वीचे सदस्य व स्थायी समिती सभापतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याचे मानले जाते. त्यामुळे सुधारित विकास आराखड्याच्या संदर्भात नेमण्यात आलेली समिती कोमात गेल्याचे चित्र आहे.

पालिका निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या स्थायी समितीमधील दोन सदस्य व स्थायी समितीचे सभापती या समितीमध्ये असले पाहिजेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पूर्वी स्थापन झालेली समिती बरखास्त झाल्याची औपचारिक घोषणा करून महापालिकेच्या प्रशासनाने नवीन समिती स्थापन केली पाहिजे. राजकीय दबावामुळे पालिका प्रशासनाला हे शक्य होईल का, असा प्रश्नही विचारला जात आहे. 'डीपी' संदर्भात नवीन समिती स्थापन झाल्यास स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात हे समितीचे अध्यक्ष होतील, शिवाय स्थायी समितीच्या दोन सदस्यांची नियुक्ती केली जाईल.

आयुक्तांकडे सादर झालेला 'डीपी' सर्वसाधारण सभेत सादर झाल्यावर त्यावर सूचना व हरकती मागवाव्या लागतात. प्राप्त सूचना, हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतींच्या अध्यक्षतेखालील समितीची आवश्यकता आहे. त्यामुळे नव्याने समिती स्थापन करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्मार्ट सिटी’ संकटात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्मार्ट सिटी'च्या प्रस्तावावर महापालिकेच्या आयुक्तांवरील अविश्वासाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत स्मार्ट सिटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आव्हान महापालिकेच्या प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.

औरंगाबाद शहराचा समावेश केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात झालेला असल्यामुळे महापालिकेने स्मार्ट सिटीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम 'नाईट फ्रँक' व 'फोट्रेस' या संस्थांच्या माध्यमातून सुरू केले आहे.

या संस्थांची 'पीएमसी' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी अभियानात ज्या शहरांचा समावेश झाला आहे, त्या शहरांच्या महापालिकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रकल्प अहवाल प्रस्तावाच्या स्वरुपात राज्य शासनाकडे पाठवायचा आहे. या प्रकल्प अहवालाची छाननी करून राज्य सरकार प्रकल्प अहवाल केंद्र शासनाकडे पाठवणार आहे. परंतु, औरंगाबाद महापालिकेत नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आयुक्त प्रकाश महाजन यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाचे अस्त्र उगारल्यामुळे प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम काही दिवसांपासून बॅकफूटवर गेले आहे. पीएमसी व अधिकारी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम करीत असले तरी नगरसेवक-पदाधिकाऱ्यांकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यापूर्वी त्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची मान्यता मिळणे गरजेचे आहे. येत्या आठ दिवसांत सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मान्य झाला नाही, तर तो राज्य शासनाकडे पाठवण्यात अडचणी येऊ शकतात. त्याचा परिणाम केंद्र सरकारच्या स्तरावर होण्याची शक्यता आहे. पहिल्या वर्षी स्मार्ट सिटी अभियानात केंद्र सरकारतर्फे वीस शहरांची निवड केली जाणार आहे. या वीस शहरांमध्ये औरंगाबाद शहराचा क्रमांक लागण्यासाठी नगरसेवक-पदाधिकाऱ्यांना अविश्वासाच्या सावटाच्या बाहेर येऊन 'स्मार्ट सिटी'च्या प्रस्तावाबद्दल निर्णय घ्यावा लागणार आहे.

महापालिकेची सर्वसाधारण सभा २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सभेत स्मार्ट सिटीच्या प्रकल्प अहवालाचा प्रस्ताव ठेवण्याची आमची तयारी आहे. या सभेत प्रस्तावाला मान्यता मिळाली किंवा प्रस्तावाच्या संदर्भात ठोस सूचना सर्वसाधारण सभेने केली, तर ३० नोव्हेंबरपर्यंत शासनाकडे प्रस्ताव पाठवणे शक्य होईल. दरम्यान 'ओमिक्रॉन एजन्सी'च्या माध्यमातून स्मार्ट सिटीसंदर्भात नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी 'डोअर टू डोअर सर्व्हे' सुरू करण्यात आला आहे. - सिकंदर अली, नोडल ऑफिसर, स्मार्ट सिटी अभियान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादमध्ये राज्य नाट्यस्पर्धा

$
0
0


औरंगाबाद टाइम्स टीम

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला मंगळवारी (१७ नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. तापडिया नाट्यमंदिरात दररोज सायंकाळी ६.४५ वाजता ही स्पर्धा होणार असून एकूण १९ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी औरंगाबाद केंद्रावर १७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान होणार आहे. तापडिया नाट्यमंदिरात दररोज सायंकाळी एक नाट्य प्रयोग होईल. उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, नाट्यकलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि सांस्कृतिक वातावरण निर्मितीसाठी मागील ५४ वर्षांपासून स्पर्धा घेतली जात आहे. चार वर्षांपूर्वी जेमतेम सात प्रवेशिका असल्यामुळे औरंगाबाद केंद्र रद्द करण्यात आले होते. राज्य नाट्य स्पर्धेला कलाकार व रसिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा होती; मात्र मागील तीन वर्षांपासून रंगकर्मी प्रयत्नशील झाल्यानंतर चित्र बदलले आहे. यावर्षी तब्बल १९ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत नवीन विषयांवरील नाटकांचे प्रमाण लक्षणीय आहे. रसिकांनी नाटकाला उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक अजय अंबेकर यांनी केले आहे.

सराव जोरात

राज्य नाट्य स्पर्धेत अनेक नाट्य संघ चुरशीने सहभागी झाले आहेत. राज्य नाट्य स्पर्धेचे वलय नवोदित रंगकर्मींना नेहमी खुणावत असते. स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी नाटकाच्या तालमी सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील बहुतेक सर्व विद्यार्थी स्पर्धेतील नाटकाशी संबंधित आहेत. त्यामुळे विभागात नाटकाची तालीम करण्यात विद्यार्थी मग्न आहेत.

दिनांक नाटक दिग्दर्शक

१७ नोव्हेंबर इतिहासाच्या पानाविरुद्ध एक खटला परमेश्वर शिंदे

१८ नोव्हेंबर जागरण अमर सोनवणे

१९ नोव्हेंबर दोघामधले नाते सुभाष मोरे

२० नोव्हेंबर खरं काय अन् खोटं काय राजेंद्र सपकाळ

२१ नोव्हेंबर दास्ताँ हेमंत कुलकर्णी

२२ नोव्हेंबर बरबाद्या रावसाहेब गजमल

२३ नोव्हेंबर कोण म्हणतं टक्का दिला प्रेमानंद लोंढे

२४ नोव्हेंबर मुक्ती बालाजी शेळके

२५ नोव्हेंबर भेट (स.११.३०) प्रा. अमजद

२५ नोव्हेंबर पास असलम शेख

२६ नोव्हेंबर गोडसे@गांधी डॉट कॉम डॉ. गणेश शिंदे

२७ नोव्हेंबर अकरा बेचाळीस महेश मुंढे

२८ नोव्हेंबर निनाद कथा डॉ. उमेश राजहंस

२९ नोव्हेंबर लाइव्ह टेलिकास्ट विजय क्षीरसागर

३० नोव्हेंबर देखणी बायको दुसऱ्याची विवेक खराटे

१ डिसेंबर एक हसीना वाल्मिक जाधव

२ डिसेंबर टिकली प्रा. विनोद दळवी

३ डिसेंबर तहान विनोद आघाव

४ डिसेंबर स्टेलमेट अशोक शिवनगी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांची दिवाळी; नागरिकांचं दिवाळं!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाळी सणानिमित्त नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोड्या केल्याच्या घटना नारेगाव व उस्मानपुरा परिसरात घडल्या. या घटनेत चोरट्यांनी २ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी व उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

नारेगाव परिसरातील साईनगर येथे किशोर रामदास भिवसने (वय २९) हा तरुण कुटुंबासह राहतो. भाऊबिजेनिमित्त भिवसने; तसेच त्यांचे भाडेकरू देखील गावाकडे गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. भिवसने व भाडेकरूंच्या घरातून चोरट्यांनी एक लाख ४८ हजारांचा ऐवज लंपास केला.

यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेचा समावेश आहे. या प्रकरणी भिवसने यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची दुसरी घटना शहानूरवाडी परिसरात रविवार ते शुक्रवारच्या दरम्यान घडली. येथील शंकर पुरुषोत्तम सुभेदार (वय ६३) हे या काळात बाहेरगावी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या स्वच्छतागृहाच्या पाइपवरून गच्चीवर प्रवेश केला. गच्चीच्या जिन्याचे दार तोडून चोरटे घरात शिरले. कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची गस्त नावालाच

पोलिसांनी दिवाळी सणानिमित्त शहरात कडक बंदोबस्त लावला होता. ठिकठिकाणी फिक्स पॉइंट तैनात करण्यात आले होते. सीआर मोबाइल, चार्लीची पथके तसेच गुन्हेशाखेची पथके या काळात तैनात करण्यात आली होती. मात्र हा बंदोबस्त नावालाच असल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ परिसरात गुराख्याची आत्महत्या?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यापीठ परिसरातील सोनेरी महलच्या मागे असलेल्या जंगलात गुराख्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

परमेश्वर उर्फ प्रेम अण्णा चौधरी (वय ३९ रा. पहाडसिंगपुरा) हा गुराखी शनिवारी सकाळी शेळ्या चारण्यासाठी सोनेरी महलामागे असलेल्या जंगलात गेला होता. दुपारी बारा वाजेच्या सुमारास शेळ्यांसोबत गेलेला त्याचा कुत्रा घरी परतला. सायंकाळी शेळ्यादेखील दुसऱ्या गुराखी मुलाने घरी आणून सोडल्या, मात्र परमेश्वर घरी परतला नाही. त्याचा रात्री शोध घेण्याचा प्रयत्न नातेवाईकांनी केला मात्र यश आले नाही. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह जंगलातील झुडूपात आढळून आला. त्याच्या मृतदेहाजवळ थायमेट ही विषारी औषधाची बाटली देखील होती. बेगमपुरा पोलिसांना ही माहिती देण्यात आली. चौधरीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी घाटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आला. परमेश्वर हा विभागीय क्रीडा संकुल येथे सुरक्षारक्षक म्हणून देखील कार्यरत होता.

पत्नीसोबत वाद होत असल्याने त्याची पत्नी त्याला सोडून सहा महिन्यांपूर्वी माहेरी गेली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसरी घटना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या परिसरात औरंगाबाद लेणी व गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी घनदाट जंगल आहे. ५ नोव्हेंबर रोजी लेणीच्या पायथ्याजवळ असलेल्या जंगलात शिवाजी कोरडे या पहाडसिंगपुरा येथीलच रहिवाशाने आत्महत्या केली होती. त्यानंतर पहाडसिंगपुरा येथीलच परमेश्वरने या जंगलात आत्महत्या केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण समितीचे 'झोपमोड' आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. सात नोव्हेंबर रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शनिवारी रात्री माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांच्या नेतृत्वाखाली झोपमोड आंदोलन करण्यात आले. राज्यातील २०१३पासून घोषित केलेल्या व अघोषित शाळा त्वरित घोषित करून अनुदान पात्र प्राथमिक, माध्यमिक शाळा व तुकड्यांना त्वरित अनुदान देण्यात यावे, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सुधारित अहवाल तातडीने मंजूर करून त्यानंतरच संघ निश्चिती करण्यात यावी, खासगी शिक्षण संस्थांची स्वायत्ता कायम ठेवण्यात यावीत, कला - क्रीडा शिक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती करणे व सात ऑक्टोबर रोजीचा शासनिर्णय रद्द करण्यात यावे आदी मागण्या मांडण्यात आल्या. शनिवारी रात्री समिती सदस्य विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे यांच्या घरी गेले आणि झोपमोड आंदोलन केले. समिती सदस्यांनी यावेळी निवेदन सादर केले. विजय नवल पाटील, एस. पी. जवळकर, वाल्मिक सुरासे, मनोज पाटील, अजमल खान यांच्यासह शिक्षण बचाव समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफआरपी’चा तिढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला वेगवेगळा भाव जाहीर केल्यामुळे 'एफआरपी'चा तिढा निर्माण झाला आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांची कमी दरावर बोळवण करण्याचे धोरण कारखान्यांनी स्वीकारले आहे. या परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील जास्त दर देणाऱ्या साखर कारखान्यांना ऊस घालण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

मागील वर्षी उसाला २२५० रूपये 'एफआरपी' दर असूनही शेतकऱ्यांच्या हातात अवघे १६०० रुपये पडले. या मुद्यावर शेतकरी व साखर कारखान्यात वाद निर्माण झाला. किमान यावर्षी 'एफआरपी'प्रमाणे उसाला भाव मिळणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी वेगवेगळे दर जाहीर केले आहेत. उसाचे क्षेत्र वाढत असताना भाव पडले आहेत. काही कारखान्यांनी अवघा १६०० रुपये दर जाहीर केला आहे. पहिली उचल १४०० रुपये दिल्यानंतर उरलेली रक्कम मिळेलच याची शाश्वती नसते. कारण मागील वर्षीची फरकाची रक्कम अनेक कारखान्यांनी बुडवली आहे. कन्नड आणि पैठण तालुक्यात उसाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. तीन जिल्ह्यांतील साखर कारखान्यांची उसाला मागणी आहे; मात्र, सर्वाधिक दर देणाऱ्या साखर कारखान्यांना ऊस घालण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

कन्नड तालुक्यात 'बारामती अॅग्रो' हा खासगी कारखाना असूनही इतर कारखान्यांनी सर्वाधिक ऊस ताब्यात घेतला आहे. सिल्लोड तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर व नेवासा तालुक्यातील साखर कारखान्यांनी उसाला दोन हजार ते २२०० रुपये प्रतिटन दर दिल्यामुळे शेतकऱ्यांनी या कारखान्यांना ऊस दिला आहे. मागील वर्षी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, मुक्तेश्वर साखर कारखाना, जय भवानी साखर कारखाना, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, माजलगाव सहकारी साखर कारखाना, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, छत्रपती संभाजीराजे साखर कारखाना यांच्याकडे शेतकऱ्यांची 'एफआरपी'ची तब्बल ६४ कोटी रुपये रक्कम अडकली होती. गेवराईच्या जय भवानी साखर कारखाना वगळता इतर कारखान्यांनी शेतकऱ्यांनी पैसे दिल्याचे अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले.

यावर्षीसुद्धा साखर कारखाने शेतकऱ्यांना 'एफआरपी'पेक्षा कमी पैसे देत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने फसवणूक करणार असतील तर इतर जिल्ह्यात ऊस पाठवू.

- जयाजीराव सूर्यवंशी, अध्यक्ष, अन्नदाता शेतकरी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणचा ऊस शेजारच्या तालुक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

संत एकनाथ सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेडने गेल्यावर्षी इतर कारखान्याच्या तुलनेत कमी भाव दिला व यावर्षी अद्याप भाव जाहीर केलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी 'संत एकनाथ' ऊस द्यायचे टाळत असून, त्यांचा कल शेजारील तालुक्यातील साखर कारखान्याकडे वाढला आहे.

गेल्यावर्षी पैठण तालुक्यात १५ हजार हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली होती. बहुतांश शेतकऱ्यांनी 'संत एकनाथ' साखर कारखान्याला ऊस दिला. कारखान्याने गेल्यावर्षी फक्त १५७५ रुपये प्रती टन भाव दिला. त्याचवेळी शेजारील तालुक्यातील कारखान्यांनी 'संत एकनाथ' पेक्षा जास्त भाव दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. यावर्षी पाऊस कमी असल्याने पैठण व शेजारील तालुक्यात उसाची लागवड घटली आहे. तालुक्यात केवळ १० हजार हेक्टरवर ऊस आहे. परिणामी, शेजारील तालुक्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी दोन हजार रुपये प्रती टनच्या आसपास भाव जाहीर केला आहे. 'संत एकनाथ'ने गळीत हंगामाचा शुभारंभ केला, त्यादिवशी भाव जाहीर करतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र भाव जाहीर न केल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी शेजारील तालुक्यातील भेंडा, समर्थ, गंगामाई या कारखान्यांना ऊस देत आहेत. परिणामी, गळीत हंगाम प्रारंभ होऊन तीन दिवस लोटले तरी 'संत एकनाथ' कारखाना सुरू झालेला नाही. चेअरमन सचिन घायाळ भाव जाहीर न करता 'इमोशनल ब्लॅकमेल' करत आहेत, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

मला तालुक्यातील 'संत एकनाथ' ला ऊस देण्याची इच्छा होती. मात्र, गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही 'संत एकनाथ' ने भाव जाहीर केलेला नाही. त्यामुळे नाइलाजास्तव भेंडा साखर कारखान्याला ऊस द्यायचे ठरवले आहे.

- संभाजी दसपुते, उसउत्पादक, नायगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अजिंठा लेणीत भरला पर्यटकांचा कुंभमेळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाळीच्या सुट्या लागताच जागतिक वारसास्थळ अजिंठा लेणी येथे पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे ८० हजार पर्यंटकांनी लेणीला भेट दिली. गर्दीमुळे बससाठी मोठ्या रांगा लागत असून जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर खासगी वाहनांची पार्किंग करावी लागत आहे.

अजिंठा लेणीचा पर्यटन हंगाम दिवाळीच्या सुट्यापासून जानेवारीपर्यंत असतो. सध्या सकाळी ८ पासूनच लेणीत जाणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी होत आहे. या गर्दीचा ताण यंत्रणेवर येत आहे. फर्दापूर टी पॉइंट ते लेणीपर्यंत १० एस. टी. बस आहेत. या संख्येपुढे त्या अपुऱ्या पडत आहेत. पर्यटकांना बस मिळवण्यासाठी किमान एक तासापेक्षा जास्त काळ उन्हात रांगेत उभे राहावे लागत आहे. दरम्यान पर्यटकांच्या गर्दीमुळे एमटीडीसीचे वाहनतळ अपुरे पडत असून खासगी वाहने जळगाव-औरंगाबाद रस्त्यालगत उभी केली जात आहेत.

दरम्यान, एस. टी. महामंडळाचे कर्मचारी, सुरक्षारक्षकांची दिवाळी लेणीतच गेली. पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर, पोलिस नाईक मेढे, अण्णा गवळी व तीन सुरक्षारक्षक परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. सोयगावचे आगारप्रमुख साठे, वाहतूक नियंत्रक वाकेकर हे बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

बससाठी रांगा

सध्या प्रचंड गर्दी असल्याने सुविधा कमी पडत आहेत. प्रवेश शुल्क भरणे, बस तिकीट काढणे, खासगी वाहनाची पार्किंग, पिण्याचे पाणी आदी सर्व ठिकाणी रांगा लागत आहेत. त्यामुळे अनेक पर्यटकांची चिडचीड होत आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाला गुरुवारी ५० हजार, शुक्रवारी ७० हजार व शनिवारी ६९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

अभ्यागत केंद्र ओस

पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असूनही फर्दापूर टी पॉइंटवर ७० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले अभ्यागत केंद्र ओस पडले आहे. या अभ्यागत केंद्राकडे एकही पर्यटक फिरकत नाही. त्यामुळे हा खर्च वाया गेल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळ काही शिजेना

$
0
0

जप्त केलेली डाळ अजूनही बाजारात नाही

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या २ महिन्यांपासून डाळीच्या दरात होत आहे. सरकारने जप्त केलेली आणि आयात केलेली डाळ औरंगाबादमध्ये मोंढा, इतर परिसरात उपलब्धच होत नसल्याने नागरिकांना डाळ १५० ते १७० रुपये किलो या भावातच विकत घ्यावी लागत आहे. गेल्या दोन आठवड्यापांसून जप्त केलेली डाळ दुकानात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक, व्यापाऱ्यांनी केली आहे.

दिवाळीपूर्वी सुमारे २०० टनांहून अधिक डाळ जप्त करण्यात आली होती. जप्त केलेल्या डाळीबाबत व्यापाऱ्यांकडून हमीपत्र लिहून घेऊन ती डाळ १०० रुपये किलोने विकायला सांगण्यात आले होते, परंतु ही डाळ बाजारात आलीच नाही. याबाबत पुरवठा अधिकारी संजय जाधवर यांनी सांगितले की, आम्ही सुमारे २१६ टन डाळ जप्त केली आहे. ही डाळ १०० रुपये किलो या दराने विकण्यास सांगितली आहे. सुमारे ३० ते ४० व्यापाऱ्यांकडून डाळ जप्त करण्यात आली आहे. डाळीसंबंधी अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे. जप्त केलेली डाळ संबंधित व्यापाऱ्यांना देण्यात आली नाही. यामुळे डाळ महागच आहे, असे व्यापारी संजय कांकरिया यांनी सांगितले. दरम्यान, दोन महिन्यांत कारवाया वाढल्या असून, ३५हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत तपासणी करण्यात आली; तसेच छापे टाकण्यात आले. १९७ पथकांनी सुमारे १ हजार ३३५ छापे टाकले व २०० टन डाळ जप्त केली आहे. डाळीच्या भावात तरीही घसरण झालेली नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे.

साठेबाजांवर छापेमारी सुरू असूनही अजून डाळ महागलेलीच आहे. डाळीचे दर केवळ २० रुपयांनी घसरलेत. सप्टेंबरमध्ये ११० ते १३० रुपये किलोने विक्री होणारी तूरडाळ ऑक्टोबरमध्ये १८० ते २२० रुपयांना विकली जात होती. आता तूरडाळ १७० ते १८० या दराने विकली जात आहे. मूग, उडीद, हरभरा, मटकी, चवळी डाळीचे भावही चढेच आहेत. त्यामुळे डाळींची विक्री ४० टक्क्यांनी घटली आहे. ओरिसातील लाखेची डाळ येणे सुरू झाली आहे, मात्र तिला उठाव नाही. ५० ते ६० रुपये किलोने ही डाळ विकली जात आहे. मोंढ्यात तूर १७० ते १८०, मूग १६० ते १८०, उडीद १५० ते १६०, हरभरा ७० ते ८०, मठ १०० ते ११०, मसूर - ८० ते ९० रुपये किलो या दरानेच विकली जात आहेत, असे हरिश पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहलीसाठी लाखो; बक्षीसांसाठी खडखडाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी पाच लाख रुपयांची तरतूद करणाऱ्या पालिका प्रशासनाने मात्र दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यासाठी पैसा उपलब्ध नाही. रिकाम्या तिजोरीचे कारण पुढे करून विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली नाहीत. या प्रकारामुळे गुणवंत विद्यार्थ्यांनी पालकांसह पालिकेत धाव घेऊन आमची बक्षीसाचे पैसे दिल्यास त्याचा शिक्षणाला उपयोगी पडेल अशी गळ महापौरांना घातली होती.

महापालिकेच्या ७७ शाळांपैकी १२ शाळांमध्ये दहावीपर्यंत वर्ग आहेत. या १२ शाळांमधील आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गुजरातमध्ये शैक्षणिक सहलीसाठी पाठवण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक शाळेतून गुणवत्तेनुसार दहा विद्यार्थी निवडून त्यांना या सहलीत सहभागी करून घेतले जाणार आहे. १२० विद्यार्थी सहलीत सहभागी होतील. त्यांच्या खर्चासाठी सुमारे पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आहे.

दहावीच्या परीक्षेत महापालिका शाळेतून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरुपात बक्षीस देण्याची परंपरा पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सुरू केली. गुणवंत विद्यार्थ्यांना एकच वर्ष बक्षीसांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पालिकेच्या आर्थिक स्थितीचे कारण पुढे करून बक्षीस समारंभ थांबविण्यात आला. सहलीसाठी पाच लाख रुपये खर्च करणाऱ्या पालिकेच्या प्रशासनाना विद्यार्थ्यांच्या बक्षीसांच्या रक्कमेचे ओझे झाले का, असा प्रश्न विचारला जात आहे.

शिक्षणासाठी गरज

काही दिवसांपूर्वी गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक महापालिकेत आले. त्यांनी महापौरांची भेट घेतली. जाहीर केलेल्या बक्षीसांची रक्कम मिळाल्यास त्याचा पुढील शिक्षणासाठी उपयोग होईल, असे त्यांनी महापौरांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चासाठी ५०० गाड्यांचे टार्गेट

$
0
0

काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांवर जबाबदारी

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

नागपूर हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी काँग्रेसने पहिल्याच दिवशी, म्हणजे ७ डिसेंबर रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात राज्यभरातून काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा करण्याची तयारी करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी ५०० गाड्यांचे टार्गेट देण्यात आले असून, तालुकानिहाय कार्यकर्ते जमविण्याचे उद्दिष्ट्य आजी, माजी आमदारांना देण्यात आले आहे.

वर्षभरापूर्वी सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या सरकारने लोकोपयोगी निर्णय घेतले नाहीत. मराठवाड्यातील दुष्काळाकडे दुर्लक्ष केले आहे. सणासुदीच्या काळात डाळीचे भाव २०० रुपये किलोवर पोचले त्याचे नियोजन केले गेले नाही. यासह अन्य प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेसने व्यूहरचना आखली आहे. नागपूर येथे सात डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी काँग्रेसचा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यभर या मोर्चाचे नियोजन योग्य पद्धतीने करण्याचा सूचना दिल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून किमान पाच हजार कार्यकर्ते मोर्चासाठी आणण्याचे उद्दिष्ट पक्षश्रेष्ठींनी दिले आहे. त्यानुसार औरंगाबादेत ५०० गाड्यांचे टार्गेट दिले गेले आहे. कन्नड, फुलंब्री, औरंगाबाद, सिल्लोड या तालुक्यांमधून सर्वाधिक कार्यकर्ते जमा होतील, पण उर्वरित चार तालुक्यांमधून अधिकाधिक कार्यकर्ते जमविण्याची जबाबदारी सर्व आजी, माजी आमदारांवर देण्यात आली आहे. दीड वर्षानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आपापल्या गटांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टिने स्थानिक नेत्यांची जबाबदारी वाढविण्यात आली आहे. आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, एम. एम. शेख, नितीन पाटील, नामदेव पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्यासह जिल्ह्यातील नेते कार्यकर्त्यांचे नेटवर्क मजबूत करण्यात गुंतले आहेत. ५०० गाड्यांचे टार्गेट जरी दिले असले तरी ७५० गाड्या नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे एका माजी आमदाराने 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले.

पुढचे नियोजन

मोर्चासाठी जास्तीत जास्त कार्यकर्ते जमविणाऱ्या नेत्याचे पुढचे नियोजन सोयीचे असणार आहे. हे गृहित धरून आगामी गणित जमविण्यासाठी काँग्रेस नेते कामाला लागले आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे या मोर्चावर विशेष लक्ष असल्याने या मोर्चापुरता तरी गटबाजीला थारा नसेल, असे चित्र निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अख्खे शहर बेहाल, मात्र लाखोंची उलाढाल

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com

फेरीवाल्यांमुळे वाहतुकीत अडथळा येतो, हातगाड्या रस्त्यांवर अतिक्रमण करतात अशा अनेक तक्रारी कायम केल्या जातात. दुसऱ्या बाजुला घरगुती वापराच्या अनेक साध्यासाध्या वस्तू आपल्याला या फेरीवाल्यांकडेच मिळतात. अनेक शहरांत फेरीवाल्यांसाठी खास विभाग तयार करण्यात आले आहेत, औरंगाबादेत मात्र त्यांच्यासाठी काही नियम नसावेत, असे चित्र आहे. अवघ्या शहरात फेरीवाल्यांचेच राज्य आहे. हातगाड्या रस्ता व्यापतात आणि उरलेला रस्ता वाहनधारकांना मिळतो. लाखोंची उलाढाल असलेल्या या हातगाड्यांचा विळखा कधी सुटणार, या प्रश्नाचे उत्तर काळच देईल...

फेरीवाले या संकल्पनेतील सगळ्यात मोठी सप्लाय चेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हातगाड्यांचे औरंगाबादेत फार मजबूत अर्थकारण आहे. शहर विकासाचे नियोजन करण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने या क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे व्हाइट टॉपिंग, सिमेंट, डांबराच्या गुळगुळीत रस्त्याचा बहुतांश भाग हातगाड्यांनी व्यापून शहर बेहाल करून टाकले आहे.

लाखोंची उलाढाल होत असलेल्या व्यवसायामुळे शहर विद्रुप झाले आहे. या व्यवसायाला बळ देण्यासाठी प्रशासनाने स्मार्ट सिटीच्या नियोजनात सगळ्यात आधी पुढाकार घेण्याची गरज आहे. फळे, भाजीपाला, गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीसाठी शहरात लाखो दुकाने उपलब्ध असताना आपल्या वाहनातून किंवा वाहनावरून जाताना कधी सिग्नलच्या शेजारी तर कधी रस्त्याच्या डाव्याबाजूला हव्या त्या वस्तू खरेदी करण्यासाठी उपलब्ध असलेल्या हातगाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रस्त्याच्या बाजूला मोकळ्या असलेल्या जागा जणू काही हातगाडी लावण्यासाठीच आहेत, अशा अविर्भावात शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांची ओळख हातगाडीवाले रस्ते अशी झाली आहे. सुरवातीला अगदी चोपून चापून लावलेली हातगाडी काही महिन्यांत रस्त्यावर कशी येते, ही जादू कुणाला समजतच नाही. अगदी हाकेच्या अंतरावर उभे असलेले पोलिस किंवा रस्त्यावरून दिवसभरात ५० वेळा जाणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हे अतिक्रमण कधी दिसणार, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

मोकळे फूटपाथ आणि व्यापलेले रस्ते

एखाद्या हातगाडीला मोक्याची जागा मिळाली तर तिथे हळुहळु बस्तान बसणे सुरू होते. सुरवातीला आडवी लागलेली गाडी उभी लागते. मग हळुहळु पुढे खोके लावून जागा व्यापली जाते. गाड्यांच्या मागे फूटपाथ असतात ते मात्र मोकळे असतात. औरंगाबादेतील बहुतांश फूटपाथचा उपयोगच होत नाही. हातगाड्यांनी व्यापलेले रस्ते मोकळे करण्यासाठी काहीच नियोजन नाही, हे दुर्दैव आहे.

लाखोंचे अर्थकारण

अगदी साधी हातगाडी साधारणपणे चार ते पाच हजार रुपयांना बनवून मिळते. ज्या भागात व्यवसाय करायचा आहे तेथील गरजा ओळखून गाडीची सजावट करण्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. एखाद्याने स्वतःची गाडी तयार करून व्यवसाय करणे तसे अवघड आहे. कारण फळे, भाजीपाला खरेदीसाठी वेगळे भांडवल शक्य होईलच असे नाही. अशांना मदतीसाठी फायनान्सर आहेत. ही यादी मोठी आहे. ठराविक भागासाठी ठराविक फायनान्सर पतपुरवठा करतात. सध्या अंदाजे १५ हजार हातगाड्या औरंगाबादमध्ये आहेत. त्यापैकी बहुतांश गाड्या भाडेतत्वावर चालविल्या जातात. भाड्याने हातगाडी पुरविणारी काही मंडळी आहेत. एका गाडीला दिवसाकाठी किमान २० रुपये भाडे आकारले जाते. काही भागांत रोज १५० ते २०० रुपये भाडे आकारले जाते. माल पुरविणारी यंत्रणा वेगळी आहे. जाधववाडी, नगर, पुणे, हैदराबादहून दररोज माल आणणारी ही यंत्रणा ठरलेल्या ग्राहकांना सकाळच्या सत्रात मालपुरवठा करते. दिवसाकाठी झालेल्या व्यवसायातून भाडे, मालाचे पैसे वजा झाल्यानंतर हातगाडीवाल्याचा खिशात फार कमी रक्कम उरते. जवळपास ८० टक्के हातगाडीचालकांची ही व्यथा आहे. त्यात कुठे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली तर, आठवड्याचा व्यवसाय बुडतो. हे नुकसान भरताभरता पंधरा दिवस कसे निघून जातात, हे कळत नाही, असे औरंगपुरा येथील एक हातगाडीचालक सांगत होता. आमचे नावही छापू नका. उद्या कार्पोरेशनवाले येऊन त्रास देतील. पोलिस आम्हाला रस्त्यावर उभे राहू देणार नाहीत, असे तो विनवून सांगत होता. या ४० वर्षीय व्यक्तीच्या घरी सात जण आहे. कुटुंब चालविण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून तो हातगाडी चालवतो. कसाबसा दिवस निघतो, असे तो सांगत होता. हातगाड्यांचे अर्थकारण विचारात घेतले तर दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

कारवाईचे काय?

शहरातील रस्ते मोकळे करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे, याबाबत वर्षानुवर्षे संभ्रम आहे. शहर विकास आणि स्मार्ट सिटीच्या नियोजनाच्या टप्प्यात जालना रोडचे रुंदीकरणही हाती घेण्यात आले आहे. दुसरीकडे माजी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शहरात रुंदीकरण मोहीम राबवून अनेक रस्ते मोकळे केले, पण त्यापुढे नियोजन गेलेले नाही. नियम डावलून उभे राहणाऱ्या वाहनांवर शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते, पण हातगाड्याबाबत अधिकार आमच्याकडे नाहीत, असे सांगितले जाते. दुसरीकडे पालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग त्यांच्या 'ठराविक' वेळापत्रकानुसार मोहिम राबवितो. एका भागात सकाळी मोहीम राबविली की पुन्हा पंधरा दिवस सहसा त्या रस्त्याचा नंबर नसतो. हे माहिती असल्याने पुढच्या टप्प्यातील फेरीवाले अलीकडे येऊन उभे राहतात. मध्यंतरी पोलिसांच्या वतीने अनेक चौक मोकळे केले गेले. पण आता त्या ठिकाणी पुन्हा हातगाड्या उभ्या राहत आहेत.

महापालिकेचे दुर्लक्ष

शहरातील रस्त्यांवर बेकायदा उभे असलेल्या हातगाड्यांबाबत ठोस धोरण ठरविण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. मुंबई, पुण्यामध्ये दोन पद्धती अवलंबिल्या जातात. फिरता परवाना दिलेल्या हातगाड्यांना रस्त्यावरून फिरण्याची मुभा असते. तर पालिकेच्या जागेवर उभे राहून व्यवसाय करावयाचा असल्यास त्यांना तसा परवाना दिला जातो. दोन्हीसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाते. चौका-चौकांत मोकळी जागा आहे, त्याचा विचार स्थायी विक्रेत्यांना देण्यासाठी झाला तर, पालिकेच्या तिजोरीत महसूलही जमा होईल आणि रस्त्यावरची कोंडी टळेल.

सर्वंकष विचार आवश्यक

हातगाड्यांच्या बाबतीत ठोस धोरण आखणे आवश्यक आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस या यंत्रणांनी एकत्र बसून जर एक सिस्टिम लागू केली तर शहराला शिस्त लागेल. हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांचे पोट हातावर आहे. त्याला टाच येऊ न देता पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत. कारण ही मंडळी असंघटित आहेत. त्यांना फिरते परवाने, स्थायी परवाने देण्यासोबत कडक नियम व बंधनेही घालून दिली पाहिजेत. मगच आपले पाऊल स्मार्ट सिटीच्या दिशेने पडेल, यात शंका नाही. महापालिकेने काही वर्षांपूर्वी 'नो हॉकर्स झोन' जाहीर केले, पण 'हॉकर्स झोन'बद्दल अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे संभ्रम कायम आहे.

हातगाड्यांनी व्यापलेले भाग...

औरंगपुरा भाजीमंडई

औरंगपुरा, गुलमंडी, टिळकपथ

शहागंज

चेलीपुरा

सिटी चौक

घाटी गेट

सेव्हन हिल चौक

अविष्कार कॉलनी

बजरंग चौक

उस्मानपुरा

गजानन महाराज मंदिर

टीव्ही सेंटर चौक ते शरद हॉटेल

मुकुंदवाडी चौक

बाबा पेट्रोलपंप चौक

रेल्वे स्टेशन परिसर

सूतगिरणी चौक

शिवाजीनगर

चिकलठाणा

शहानूरमिया दर्गा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images