Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आयुक्त महाजन यांना हटवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे आयुक्त प्रकाश महाजन यांची राज्य सरकारने सोमवारी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागात बदली केली. 'सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयानुसार महाजन यांना आयुक्तपदावरून दूर करण्यात येत आहे,' असे बदलीच्या आदेशात म्हटले आहे. अविश्वास मंजूर झाल्यामुळे आयुक्तांची बदली करण्याची ही महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्याकडे अायुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. निवृत्ती महिनाभरावर आलेली असताना त्यांची बदली केली आहे.

प्रकाश महाजन यांच्याविरुद्ध २० ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव बहुमताने मंजूर केला. प्रस्तावाच्या बाजूने ९५ व विरोधात १३ मते पडली होती. महापालिका अधिनियमानुसार आयुक्तांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव पाच अष्टमांश मतांनी मंजूर झाल्यास शासनाने आयुक्तांना तात्काळ परत बोलवणे बंधनकारक होते, पण सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर झाल्यावरही तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ शासनाने महाजन यांना आयुक्तपदावर कायम ठेवले. दिवाळीनंतर त्यांना शासनाच्या सेवेत परत बोलवण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार आज सायंकाळी पाचच्या सुमारास महाजन यांच्या बदलीचे आदेश त्यांच्या कार्यालयाला प्राप्त झाले. सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या अविश्वास प्रस्तावाचा संदर्भ बदलीच्या आदेशात देण्यात आला आहे. त्यांनी सामान्य प्रशासन विभागात रुजू व्हावे, असे त्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात येत असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले.

महाजन यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सभागृहनेते जंजाळ यांनी पालिकेच्या आवारात फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. महाजन ९ सप्टेबर २०१४ रोजी आयुक्त म्हणून रुजू झाले होते. रमेश पवार यांनी १ सप्टेबर २०१४ रोजी अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. महाजन यांच्या विरोधात सर्वात प्रथम 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव महापौर त्र्यंबक तुपे यांच्याकडे दाखल केला होता. वि‌िवध तक्रारींचा पाढा महाजन यांच्या विरोधात वाचला जाऊ लागला. त्यातच भाजपच्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी महाजन यांच्या विरोधात आघाडी उघडली व त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली. दरम्यानच्या काळात पालकमंत्री रामदास कदम यांनीही अविश्वास प्रस्तावात विशेष लक्ष घातले. अविश्वास प्रस्तावाला खासदार चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला. तो मोडून काढण्यासाठी कदम यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर पालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व महाजन यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी ठाकरे यांच्याकडूनच आदेश घेतले. त्यानंतर महाजन यांच्या विराेधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला.

भाजपने मांडला अविश्वास प्रस्ताव

पालकमंत्र्यांकडून प्रस्तावाची पाठराखण

उद्धव ठाकरेच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक

अविश्वास प्रस्तावाला साथ देण्याचा ठाकरेंचा आदेश

अविश्वास प्रस्तावासाठी 'एमआयएम'चीही साथ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नक्षत्रवाडी परिसरात नवे शहर

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com

औरंगाबाद - स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नक्षत्रवाडी परिसरात सुमारे ५०० एकर जागेवर 'ग्रीन फिल्ड' प्रकल्प राबवून संपूर्ण नवीन शहर वसवण्याचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवला जाणार आहे. या नवीन शहरात ३० टक्के घरे कमी किंमतीची असावीत, असा प्रयत्न केला जाणार आहे. रेट्रोफिटिंग व रिडेव्हलपमेंट या प्रकल्पांला फाटा देऊन 'ग्रीन फिल्ड'चा प्रस्ताव मांडला जाणार आहे.

स्मार्ट सिटी अभियान राबवताना संबंधित शहरांनी रेट्रोफिटिंग, रिडेव्हलपमेंट व ग्रीन फिल्ड यांपैकी एका प्रकल्पावर काम करणे बंधनकारक आहे, असे आदेश शासनाने दिले होते. रेट्रोफिटिंग, रिडेव्हपलमेंट व ग्रीन फिल्ड यांपैकी कोणत्या प्रकल्पांवर काम करायचे, यासंदर्भात पालिकेचे प्रशासन व पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) यांनी विचार सुरू केला. औरंगाबाद शहरात ऐतिहासिक इमारती, वारसास्थळे आहेत. त्यांना कायम ठेवून स्मार्ट सिटी प्रकल्प राबवावा, अशी मते व्यक्त आली होती. त्यामुळे ग्रीन फिल्ड क्षेत्रात काम करणे सोपे जाईल, असे पीएमसी व पालिका प्रशासनाचे मत आहे. 'ग्रीन फिल्ड'साठी चिकलठाणा, नक्षत्रवाडी, बसस्थानकाच्या जवळील सिल्क मीलचा परिसर व हर्सूल परिसराचा विचार केला जाऊ शकतो, असे पीएमसीने प्राथमिक अहवालात नमूद केले. नक्षत्रवाडी येथे शासनाच्या मालकीची ५५० एकर जागा आहे. ती मिळवणे तुलनेने सोपे जाईल. त्यामुळे नक्षत्रवाडी येथे ग्रीन फिल्ड प्रकल्प विकसित करावा, अशी शिफारस सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. सर्वसाधारण सभेत नक्षत्रवाडी व चिकलठाणा या दोन्ही ठिकाणांचा पर्याय ठेवला जाणार आहे. ग्रीन फिल्ड प्रकल्पात संपूर्ण शहर नव्याने वसविण्याची तरतूद आहे. त्यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम होणार आहे. ग्रीन फिल्डअंतर्गत किमान ३० टक्के घरे कमी किमतीची असावीत, असा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी- रिक्षाची धडक; दोन ठार, नऊ जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पैठण पाचोड रस्त्यावरील लिंबगाव फाट्याजवळ मोटारसायकल व लोडिंग रिक्षाच्या मंगळवारी झालेल्या अपघातात दोन जण ठार तर नऊ जखमी झाले. पाचोड रोडवरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

युवराज बाबू पवार (वय १८), बाबू खंडू दिवटे (वय ६६) व दोन लहाने मुले (सर्व रा. कानवडगाव, ता. अंबड) गावाहून ऊसतोडीसाठी शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे जात होते. पाचोड रस्त्यावरील लिंबगाव फाट्याजवळ त्यांच्या मोटारसायकलची विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोडिंग रिक्षासोबत समोरासमोर धडक झाली. या अपघातात युवराज पवार व बाबू दिवटे हे जागीच ठार झाले, तर त्याच्यासोबतची दोन व पाच वर्षाची मुले जखमी झाली. अपघातानंतर लोडिंग रिक्षा उलटल्याने त्यातील गणेश शेषराव देशपांडे (वय ३०), शांताबाई गणेश देशपांडे (वय २६), सुभाष दिगंबर देशपांडे (वय ४०), दयानंद सुधाकर गायकवाड (वय ३५), आशाबाई सुभाष नाईक (वय ३५, सर्व रा. सायगाव ता. बदनापूर) हे सर्वजण जखमी झाले. जखमींना पाचोड शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पैठण पाचोड रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. खड्ड्यामुळे या रस्त्यावर दररोज अपघात घडत होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फक्त १३ दिवसांत हिरवागार चारा उत्पादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

तालुक्यातील सुलतानपूर येथील तरूण शेतकरी दीपक चव्हाण यांनी दुष्काळावर मात करत हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून मातीविना मका चारा निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या तंत्राने जनावरांसाठी १३ दिवसांत हिरवागार चारा उपलब्ध होतो.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत तालुक्यात ५६ ठिकाणी या नवीन तंत्राने चारा निर्मितीबद्दल कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून मकापासून १५ दिवसांत चारा निर्मिती कशी करायची यांचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी वैजीनाथ हांगे यांनी 'मटा' ला सांगितले. कमी पावसामुळे दुष्काळाच्या झळा माणसांबरोबरच जनावरांही बसू लागल्या आहेत. काळाची गरज ओळखून सुलतानपूर येथील तरूण शेतकरी दीपक चव्हाण यांनी दुष्काळावर मात करत हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून मातीविना मका चारा निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. रसायनशास्त्रातील पदवीधर असलेले दीपक चव्हाण हे एका कंपनीत नोकरीला होते. त्यांनी नोकरी सोडून शेतीत वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत.

कृषी सहसंचालक जनार्दन जाधव व कृषी पर्यवेक्षक प्रदीप अजमेरा यांच्या मार्गदर्शनाखाली कमी वेळेत, कमी पाण्यात, कमी खर्चात चारा निर्मितीचा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाची परिसरातील शेतकऱ्यांनी पाहणी केली. पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. आर. कांबळे यांनी भेट देऊन इतरही शेतकऱ्यांनी हा प्रयोग करण्याचे आवाहन केले. तालुका कृषी अधिकारी वैजीनाथ हांगे यांनी सांगितले की, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सुलतानपूर आणि भांडेगाव येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. निना फूड कोल्हापूरचे व्यवस्थापकांशी संपर्क साधून प्रत्यक्ष भेट अंमलबजावणीसाठी नियोजन झाले आहे. या दोन्ही गावातील ४० ते ५० शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रदीप पाठक म्हणाले, सध्या आधुनिक शेतीची गरज ओळखून नवनवीन तंत्रज्ञान समजून घेऊन शेती केली पाहिजे. १० गुंठे क्षेत्रात ४० ते ५० दिवसांत १२ हजार ते १५ हजार रुपयांचा फायदा होतो. हा चारा जनावरांचे दूध वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे फॅट, एसएनएफ व इतर प्रतवारी सुधारते.

हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञान

दोन लिटर कोमट पाण्यात २५० मिली गोमूत्र टाकून त्यात एक किलो मका २४ तास भिजवला जातो. भिजलेल्या बियाण्यातून पाणी निथळून घेतल्यानंतर बियाणे ओल्या बारदानात सकाळ- संध्याकाळ पाणी टाकून ते ओलसर ठेवले जाते. सुमारे ४८ तासानंतर मोड फुटतात. मोड आलेले बियाणे ट्रे मध्ये पसरवले जाते. त्यानंतर सुमारे १२ ते १३ दिवसानंतर मका साधारणतः एक फुटापर्यंत वाढतो. एक किलो बियाण्यापासून सुमारे १५ दिवसांत ८ ते १० किलो चारा तयार होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१० गावांत साठले १५ कोटी लिटर पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

तालुक्यातील ताजनापूर, दरेगाव, भांडेगाव, पाडळी, विरमगाव, खांडी पिंपळगाव, रसूलपुरा, खिर्डी, वेरूळ, कनकशीळ या दहा गावांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे सिमेंट बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. यामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. हा पाणीसाठा सुमारे १५ कोटी ४० लाख लिटर आहे.

वेरूळ येथील येळगंगा नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने स्वंयसेवी संस्था, उद्योजकांच्या सहभागातून झाले आहे. या कामाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली होती. येळगंगा नदी व ताजनापूर येथील बोडखी नदीचे खोलीकरण व रुंदीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. तालुक्याच्या डोंगराळ भागात अनेक छोट्या नद्या, ओढे आहेत. त्यांचे पाणी अडवण्यात आल्याने तालुक्याचा लाभ झाला आहे. तालुक्यात २८ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य आहे. आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात तालुक्यातील २९ टंचाईग्रस्त गावांची अभियानात निवड करण्यात आली आहे. योजनेत गावपातळीवर अंमलबजावणीसाठी विभागीय अधिकारी राजू नंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालक अधिकाऱ्यांची निवड करून ७६ गावांचे 'वॉटर बजेट' तयार करण्यात आले. तालुक्यात पाऊस पडत असला तरी डोंगर उतारामुळे पाणी वाहून जाते. हे पाणी अडवल्याने १५ कोटी ४० लाख लिटर पाणीसाठा झाला आहे. विहिरींच्या पाणीपातळीत १ ते दीड मीटरची वाढ दिसून आली आहे. या कामासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, तालुका कृषी अधिकारी वैजीनाथ हंगे, लघुसिंचन जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता खरात, कार्यकारी अभियंता सत्तार खान, सहाय्यक अभियंता व्ही. ए. गालफाडे यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखोंची उलाढाल; सुविधांचा ठणठणाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

'तालुक्याचे ठिकाण असलेल्या फुलंब्री येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात विविध सेवा सुविधांचा अभाव आहे. नागरिक व व्यापाऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथील स्थानिक प्रशासनाने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,' अशी मागणी होत आहे. या बाजारात लाखोंची उलाढाल होत असली तरी सुविधा मात्र बारा अाण्यांच्याही नाहीत.

गावोगावी भरणारे आठवडी बाजार अद्यापही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे. सध्याच्या काळात शहरी बाजारातील वस्तू थेट आठवडी बाजारात मिळत आहेत. त्यामुळे या आठवडी बाजारात स्थानिक प्रशासनाने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आहे. फुलंब्री हे जवळपास १६ हजार लोकसंख्येचे तालुक्याचे ठिकाण आहे. येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारासाठी परिसरातील २० ते २५ खेड्यातील ग्रामस्थ खरेदीसाठी येतात. परिसरातील व्यापारी कपडे, किराणा, भांडी, भाजीपाला, मिठाई, भुसारमाल, स्टेशनरी व या भागात उत्पादित होणाऱ्या अन्य वस्तू विक्रीसाठी बाजारात आणतात. प्रशासकीय कामाबरोबरच आठवडे बाजारही करता येतो, या हेतुने तालुक्यातील नागरिक मंगळवारी फुलंब्रीत येणे अधिक पसंत करतात. तालुका झाल्यापासून बाजार दिवसेंदिवस बहरत आहे. या आठवडे बाजारात विविध सेवा सुविधा पुरविण्यासाठी स्थानिक प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. बाजारात वस्तू विक्रीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांकडून करही वसूल केला जातो. त्यानंतरही सुविधा पुरविण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. अचानक वारा पाऊस आल्यानंतर व्यापाऱ्याचे मोठे हाल होतात. भाजीपाला व अन्य मालाच्या संरक्षणासाठी येथे पत्र्याचे एकही शेड नाही. बाजारात एकही स्वच्छतागृह नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. नगर पंचायतीने याकडे लक्ष देऊन आठवडे बाजारातील व्यापारी व नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

पिण्याचे पाणीही नाही

आठवडे बाजारात व्यापाऱ्यांना ओटे, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वादळ-वारा-पावसापासून मालाचे संरक्षण करण्याची सोय असण्याची गरज आहे. मात्र या सुविधांअभावी अचानक वारा-पाऊस आल्यानंतर व्यापाऱ्याचे मोठे हाल होतात. भाजीपाला व अन्य मालाच्या संरक्षणासाठी येथे पत्र्याचे एकही शेड नाही. बाजारात एकही स्वच्छतागृह नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

१४ व्या वित्त आयोगातून लवकरच सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे. शिवाय निधी उपलब्ध होईल त्यानुसार इतर कामे करण्यात येतील. व्यापारी व ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न राहील.

- अशोक कायंदे, मुख्याधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजपुरवठा खंडित केल्याने पाणीटंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्पातून जायकवाडी धरणात २ नोंव्हेबरपासून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातून पाणीउपसा होऊ नये याकरिता प्रशासनाने १९ तास वीजपुरवठा बंद ठेवण्याच्या सूचना महावितरणला दिला. पण महावितरणने सलग २४ तास वीजपुरवठा खंडित ठेवून नागरिकांना वेठीस धरले आहे. वीज नसल्याने पाणीपुरवठा बंद पडल्याने नदीकाठच्या गावात टंचाई निर्माण झाली आहे.

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्पातून गोदावरी नदीतून जायकवाडी धरणांत पाणी सोडण्यात आले आहे. नदीपात्रालगतच्या शेतकऱ्यांनी पाण्याचा बेकायदा उपसा करू नये यासाठी प्रशासनाने महावितरणला वीज १९ तास बंद ठेवण्याचे पत्र दिले आहे. पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मनमानी करून २४ तास वीजपुरवठा बंद ठेवला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. समोरून पाणी वाहत असताना ते पिण्यासाठी घेता येत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. महावितरणने निर्णय बदलून ५ तास वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसीलमधून पळवले जप्त केलेले दोन ट्रक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पैठणचे तहसीलदार संजय पवार यांची बदली होताच वाळूमाफिया सक्रिय झाले आहेत. वाळूचोरी करताना पकडून जप्त केलेले दोन ट्रक वाळूमाफियांनी तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेले. यातील एक ट्रक विद्यमान नगरसेवकाच्या मालकीचा असून याप्रकरणी मोक्काअंतर्गत कार्यवाही करण्याचे पत्र तहसीलदार पवार यांनी पैठण पोलिसांना दिले आहे.

तहसीलदार संजय पवार यांनी केलेल्या कारवाईमुळे शहर व तालुक्यात वाळू चोरीला काही प्रमाणात लगाम लागला होता. त्यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावले आहेत. तहसीलदारांची बदली होणार असल्याची वार्ता शहरात ५ नोव्हेंबर रोजी आली. त्यानंतर अचानक वाळूमाफिया सक्रिय झाले. त्यांनी दोन ट्रक (एमएच-२० एटी ९९२५) व (एमएच-२० बीटी- ३८६६) तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेले. माहिती मिळताच तहसीलदार पवार यांनी पैठण पोलिसांना याबाबत माहिती कळविली आहे. त्यात जप्त केलेले ट्रक पळवून नेणाऱ्या व्यक्तींविरुद्ध चोरी, शासकीय कामात अडथळा व मोक्का अंतर्गत कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत. त्यावरून पैठण पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कानावर हात

अवैध वाळू वाहतूक करताना जप्त केलेला एमएच २०, एटी ९९२५ या क्रमांकाचा ट्रक नगरसेवक अजीम कट्यारे यांच्या नावावर असल्याची माहिती वाहनचालकाने दिली होती. हा ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारातून ५ नोव्हेंबर रोजी गायब झाला आहे. त्याबद्दल अजीम कट्यारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, हा ट्रक माझा नसून तो पूर्वीच विकल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मित्राकडून मित्राचा नशेत खून

$
0
0

कन्नड तालुक्यातील जामडी घाट येथील घटना

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

झोपण्यासाठी शेतवस्तीवर गेलेल्या दोन मित्रांना दारूच्या सवयीमुळे एकाला जीव गमावावा लागला. दारूच्या नशेने व पार्टीच्या नादात मित्राकडून मित्राचाच खून झाल्याची घटना सोमवारी (१६ नोव्हेंबर) सायंकाळी जामडी घाट येथे घडली. मृताचे नाव लक्ष्मण सखाराम वावरे (वय ४०), असे असून पोलिसांनी संतोष लक्ष्मण पवार (वय ३५) याला अटक केली आहे.

जामडी घाट येथील लक्ष्मण वावरे व संतोष पवार (३५) हे दोघेही पक्के मित्र होते. ते सोमवारी सायंकाळी जामडी घाट शिवारातील गटनंबर ४५/२ येथे झोपण्यासाठी गेले होते. पण मंगळवारी (१७ नोव्हेंबर) सकाळी शेताशेजारील नाल्याच्या बाजूला लक्ष्मण वावरे याचा मृतदेह असून शेजारी संतोष पवार बसला असल्याची माहिती कन्नड पोलिसांना मिळाली. यावरून सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, उपनिरीक्षक रोहीत बेंबरे, बीट जमादार दीपेश नागझरे, मनोज घोडके, पोलिस शिपाई गणेश गोरक्ष, सूर्यकांत भामरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या अंगावर मारहाण झाल्याच्या खूणा आढळल्या आहेत.

मृताचा भाऊ रामभाऊ वावरे यांच्या तक्रारीवून मंगळवारी सायंकाळी संतोष पवार याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या खुनाचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पायघन करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोज तीन शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सततची नापिकी व पावसाअभावी शेतीच्या होत असलेल्या अवस्थेला शेतकरी कंटाळला असून, दुष्काळी परिस्थितीमुळे या वर्षी मराठवाड्यातील ९२४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे भीषण वास्तव आहे. गेल्या तीन महिन्यांचे आकडे पाहता दररोज ३ शेतकरी जीव संपवत असून, या आत्महत्यांपैकी १९२ आत्महत्यांना शासनाच्या समितीने अपात्र ठरवले आहे तर, १६७ कुटुंब अद्यापही हक्काच्या मदतीची वाट पाहत आहेत.

पेरणीवर हजारो रुपये खर्च करून पाऊस गायब झाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. खरीप पूर्णपणे वाया गेलेल्या शेतकऱ्यांना रब्बी पीकांकडून मोठी आशा होती, मात्र परतीच्या पावसाने गुंगारा दिल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून परिस्थितीत फारसा बदल न झाल्यामुळे यंदाही आत्महत्यांचा आकडा दरवर्षीप्रमाणेच वाढला आहे. सावकारी पाश, बँकांचा तगादा सहन न करू शकलेल्या या शेतकऱ्यांनी जीवनयात्राच संपवून टाकल्याचे चित्र मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांपासून दिसत आहे.

दुष्काळामुळे आत्महत्यांचे प्रमाण बीड जिल्ह्यात सर्वाधिक असून, आतापर्यंत जिल्ह्यात २६० शेतकऱ्यांनी जीवन संपविले. या वर्षात आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात १२०, जालना ५८, परभणी ७१, हिंगोली ३२, नांदेड १६५, लातूर ७८ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १४० शेतकरी आत्महत्यांची नोंद शासन दरबारी आहे. चौकशीअंती त्यापैकी ५६५ प्रकरणे प्रशासनाने मदतीसाठी पात्र ठरवली असून, १९२ प्रकरणांना अपात्र ठरवले आहे. १६७ प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. पात्र असलेल्या ५६५ प्रकरणांमध्ये मृतांच्या वारसांना ५ कोटी ४४ लाख रुपयांची मदत देण्यात आली. आत्महत्या केलेल्या काही शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वीच पीककर्ज घेतले आहे. काहींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समितीला मिळाला नाही तर, काही शेतकऱ्यांच्या नावावर पीककर्ज नसल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. काही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीसंदर्भातील कागदपत्रे पूर्ण नसल्याने त्यांच्या वारसांना मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.

३ महिन्यांत ३५० आत्महत्या

कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी दररोजचा होणारा खर्च, खरीप, रब्बीच्या उत्पन्नाचे स्वप्न पाहून शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र पावसाअभावी संपूर्ण खरीप वाया गेले. आता रब्बी पीकेही वाया जाण्याच्या अवस्थेत आहेत. १४ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीमध्ये तब्बल ३५० आत्महत्या झाल्या असल्याची नोंद सरकारी दप्तरात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड कोटी भारतीय ‘सीओपीडी’ग्रस्त

$
0
0

'सीओपीडी' रुग्णांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण चौपट

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल पाच टक्के म्हणजेच दीड कोटी भारतीयांना 'सीओपीडी' हा सतत वाढत जाणारा गंभीर प्रकारचा दमा असून, हेच जगभरातील मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. 'सीओपीडी' रुग्णांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण इतरांच्या तुलनेने चौपटीने आढळते; तसेच स्नायू कमकुवत होणे, कॅल्शिमची कमतरता, नैराश्य, यासह एकूणच जगण्याचा दर्जा खालावतो. त्याचवेळी अर्ध्याअधिक व्यक्तींना हा आजार असल्याची जाणीवच नसते. त्यामुळेच धुम्रपानापासून दूर राहा, शक्य तेवढे प्रदूषण रोखा, व्यायाम करा आणि वेळीच निदान करून योग्य उपचार घ्या, असा सल्ला दिला आहे शहरातील श्वसनविकारतज्ज्ञांनी.

१७ नोव्हेंबर रोजी 'वर्ल्ड सीओपीडी डे' साजरा होतो. यानिमित्त 'औरंगाबाद चेस्ट असोसिएशन'ने मंगळवारी 'क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डीसीज'विषयी (सीओपीडी) वस्तुस्थिती मांडली. सर्वसामान्य दमा होण्यामागे अनुवंशिकता, प्रदूषण आदी कारणे आहेत. 'सीओपीडी' दमा होण्यामागे वर्षानुवर्षे केले जाणारे धुम्रपान, चुलीचा धूर, सर्व प्रकारचे वायू प्रदूषण, अत्यल्प प्रमाणात अनुवंशिकता आदी कारणे आहेत.

ग्रामीण भागामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर चुलीवर स्वयंपाक केला जातो आणि चुलीच्या धुरामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर 'सीओपीडी' दिसतो. ग्रामीण भागात एकूण 'सीओपीडी'ग्रस्तांमध्ये ५० टक्के पुरूष व ५० टक्के महिला आढळतात. शहरी भागात ६०-६५ टक्के पुरूष व ३५-४० टक्के महिलांमध्ये हा आजार दिसतो. या आजारामध्ये श्वसननलिका आकुंचन पावतात आणि कालांतराने आजाराची तीव्रता वाढत जाते. औषधोपचारांचा परिणाम तात्कालिक होतो व 'सीओपीडी'चा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. चार हजार विषारी घटक व टोकाला ४०० अंश तापमान असलेली बिडी-सिगारेट हेच शहरी भागातील सर्वांत मोठे आजाराचे कारण आहे. त्याजोडीला वाहनांचे-उद्योग-कारखान्यांचे प्रदूषणही वाढत असून, आता हेदेखील महत्त्वाचे कारण ठरत आहे, असे ज्येष्ठ श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. सुहास बर्दापूरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रसंगी वर्षानुवर्षे 'सीओपीडी'शी यशस्वी झुंज देणाऱ्या व नियमित औषधांमुळे एकदाही रुग्णालयात दाखल करावे न लागलेल्या सुशीला नाथ नेरळकर यांचा सत्कार करण्यात आला.

श्वसनाचे व्यायाम उपयुक्त

आजाराची शंका किंवा लक्षणे असल्यास अवघ्या काही मिनिटांमध्ये आजाराचे निदान होऊ शकते. लवकरात लवकर निदान व 'इन्हेलर थेरपी' या आजारामध्ये उपयुक्त ठरते; तसेच श्वसनाचे विविध व्यायामही खूप उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर विविध आजारांना बळी पडण्याचा धोका असणाऱ्या 'सीओपीडी'ग्रस्तांना लसीकरणही खूप उपयुक्त ठरते, असेही श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश देशपांडे, डॉ. शिवप्रसाद कासट व डॉ. बालाजी गुंगेवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता बंद केल्याने वाढली डोकेदुखी

$
0
0

सूचना फलक नसल्याने वाहनचालक त्रस्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावीर चौकातील उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी सोमवारपासून क्रांतिचौक ते महावीर चौक हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रशासनाने कुठेही माहिती फलक लावला नसल्याने वाहनचालकांना दुहेरी त्रास होत आहे. मोठ्या गाड्या वळण्यास अडचण येत असल्याने त्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे.

महावीर चौकातील उड्डाणपुलाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम कालपासून सुरू झाले. हा पूल दक्षिण-उत्तर असल्याने एरव्ही सर्वात रहदारीचा पूर्व पश्चिम रस्ता बंद करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; हा रस्ता तीन महिने बंद असणार आहे, मात्र याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. शहरातील रस्त्यांची कामे सुरू असताना पालिकेकडून रस्त्याचे काम सुरू असल्याने बंद असल्याचा माहिती फलक लावण्यात येतो, पण याठिकाणी अद्याप काहीच दिसून आलेले नाही.

क्रांतिचौक, चुन्नीलाल आसाराम पेट्रोलपंप आणि जिल्हा न्यायालय या तीन ठिकाणी वाहतूक पोलिसांनी अडथळे उभारले आहेत, पण त्यातून वाहने जाण्याचे प्रमाण सुरूच आहे. कारण पुढे रस्ता बंद आहे की सुरू याची स्पष्ट माहिती नाही. क्रांतिचौक उड्डाणपुलावरून जाणाऱ्या बाहेरगावच्या बस थेट जिल्हा न्यायालयापर्यंत जातात. तिथून पुढचा रस्ता बंद असल्याने अरूंद जागेतून गाडी वळविण्याची कसरत करावी लागत आहे.

तेथून वळालेल्या गाड्या कोकणवाडी किंवा समर्थनगरमार्गे बसस्टँडकडे जात आहेत. रस्ता बंद असल्याची माहिती असलेले वाहनधारक क्रांतिचौक, सिल्लेखाना, समर्थनगरमार्गे बसस्टँडकडे जातात. त्यामुळे या रस्त्यावरही वाहनांची गर्दी वाढली आहे.

माहिती फलक कोण लावणार?

उड्डाणपुलाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. बंद केलेला रस्ता महापालिकेच्या अखत्यारित आहे तर, रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी पोलिसांकडे आहे. त्यामुळे या रस्त्याबाबत माहिती फलक कोण लावणार, असा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तनवाणी, आहुजा यांच्या जामिनावर सुनावणी पूर्ण

$
0
0

औरंगाबाद : पहाडसिंगपुरा प्रकरणातील आरोपी नगरसेवक राजू तनवाणी व राज आहुजा यांचा जामीन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने फेटाळल्यानंतर दोघांनी आता जिल्हा कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद पूर्ण झाला असून, कोर्टाने निकाल राखीव ठेवला असून बुधवारी (१८ नोव्हेंबर) निकाल अपेक्षित आहे.

पहाडसिंगपुऱ्यातील रेणुकामाता नगर व ताजमहाल कॉलनीतील 'ग्रीन झोन'मधील भूखंडांची बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करण्यात आली आणि लाखोंची फसवणूक करण्यात आल्याची फिर्याद रामदास ढोले यांनी दिलेली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींचा नियमित जामीन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने फेटाळल्यानंतर या निर्णयाला दोघांनी जिल्हा कोर्टात आव्हान दिले आहे. या विषयी दोघांच्या नियमित जामीन अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एल. पठाण यांच्या कोर्टात दोन्ही पक्षांकडून मंगळवारी (१७ नोव्हेंबर) युक्तिवाद पूर्ण झाला. आरोपी राजू तनवाणी याच्या वतीने अॅड. दिनेश गंगापूरवाला, आरोपी आहुजा याच्या वतीने अॅड. अशोक ठाकरे, तर सरकार पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील ए. पी. बागूल यांनी बाजू मांडली. या प्रकरणी कोर्टाने निकाल राखीव ठेवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाच्या आमिषाने ५५ हजारांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षकाला पाच लाखाच्या कर्जाचे आमिष दाखवत दिल्लीतील भामट्याने ५५ हजाराचा गंडा घातला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मधुकर पंडित वाल्हे (वय ४९ रा. भीमनगर, पडेगाव) हे खुलताबाद तालुक्यातील खिर्डी येथे शिक्षक आहेत. ५ ऑक्टोबर रोजी त्यांना आकाश सिंघानिया या भामट्याचा मोबाइलवर फोन आला. आपण दिल्ली येथून बजाज अलायंस सोल्युशन कंपनीतून बोलत असल्याचे सांगत पाच लाखाचे कर्ज मिळवून देण्याची थाप मारली. यासाठी पॅनकार्ड, आधारकार्ड, पासबुक व सुरुवातीला २५ हजार रुपयांचा चेक पाठविण्यास सांगितले. वाल्हे यांनी ही कागदपत्रे तसेच २५ हजारांचा चेक पाठवला. यानंतर या भामट्याने पुन्हा फोन करून कर्ज मंजुरीसाठी ३० हजाराचा चेक पाठविण्यास सांगितले. हा चेक देखील वाल्हे यांनी पाठविला. हे दोन्ही चेक मिळाल्यानंतर सिंघानिया यांच्याकडून वाल्हे यांच्यासोबतचा संपर्क कमी झाला. त्यांनी पाठपुरावा केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यानंतर या भामट्याने मोबाइल देखील बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाल्हे यांनी पोलिस ठाणे गाठून सिंघानियाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय ठेकेदाराला ३४ लाखांचा गंडा

$
0
0

औरंगाबाद : शासकीय ठेकेदाराला जुन्या भागीदाराने ३४ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरे चेक गहाळ झाल्याचे भासवत बनावट सह्या करून ही रक्कम वळती करण्यात आली. शैलेंद्र स्वरुपसिंह चव्हाण (वय ३८, रा. दिशानगरी, बीड बायपास परिसर) हे महावितरणचे शासकीय ठेकेदार आहेत. त्यांच्यासोबत २०१३ मध्ये जयंत उत्तम पांडे हे काम करीत होते. यावेळी चव्हाण यांनी विश्वासाने त्यांच्याकडे कोरे चेक ठेवले होते. यापैकी दोन चेक गहाळ झाल्याचे पांडे यांनी सांगितले होते. दरम्यान पांडे यांनी या चेकवर खोटा मजकूर टाकून व बनावट सही करून चव्हाण यांच्या खात्यावरील ३४ लाख २५ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या अथर्व इन्फास्ट्रक्चर कंपनीच्या खात्यावर वळती करून घेतली. हा प्रकार समजल्यानंतर चव्हाण यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जयंत पांडे यांच्याविरूद्ध फसवणूक, अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लांबी वाढ प्रस्ताव धूळखात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडकोतील वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलाची लांबी पश्चिमेकडे ४०० मीटर वाढविण्याचा प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपासून सरकार दरबारी पडून आहे. याला मंजुरी दिली तर तब्बल चार किलोमीटरच्या प्रवासाची सोय होणार आहे.

औरंगाबाद एकात्मिक रस्ते विकास योजनेतून जालना रस्त्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे पाच उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. त्यापैकी सेव्हन हिल, क्रांतिचौकातील उड्डाणपूल पूर्वी उभे राहिले. मोंढानाका चौकातील पूलही सुरू झाला. महावीरचौक आणि सिडकोच्या वसंतराव नाईक चौकातील पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नाईक चौकातील पुलाची लांबी एक किलोमीटर असून ५६.२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या पुलाचे काम सुरू होण्यापूर्वी एमएसआरडीसीने सुधारित प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. पश्चिमेकडील बाजूने पूल वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या पश्चिम दिशेपर्यंत येतो. तिथून पुढे ४०० मीटर पुलाची लांबी वाढविली तर हॉटेल अजंठा अंबेसिडर समोर येऊ शकतो. ज्यामुळे अग्रसेन चौक पुलाखाली जाईल आणि सिडको एन पाचकडून येणारी वाहने पुलाखालून जालना रस्त्याला विनाअडथळा लागू शकतात.

या सुधारित प्रस्तावात ४०० मीटर वाढीव बांधकामासाठी ३५ कोटी रुपये अधिक लागणार आहेत. प्रस्ताव पाठवून सहा महिने उलटून गेले तरी त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे पश्चिमेकडील बाजूने पुलाचे काम हळुवारपणे सुरू आहे. जालना रस्त्यावरची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा पर्याय अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

... तर चार किलोमीटरची सोय

पुलाची लांबी ४०० मीटरने वाढविल्यास जालना रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या व्यक्तीची चार किलोमीटरची सोय होणार आहे. चिकलठाणा विमानतळाकडून आलेले वाहन मुकुंदवाडी चौकातून उड्डाणपुलावरून थेट उच्च न्यायालयासमोर येऊ शकेल. तिथून काही अंतर पार केले की सेव्हन हिल उड्डाणपूल लागतो. त्याचा वापर करून वाहन थेट आकाशवाणी चौकात येईल. उड्डाणपुलाची लांबी जर ४०० मीटर वाढविली तर चार किलोमीटरचा रस्ता विनाअडथळा पार करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गेल्या वेळी २ हजार कोटींवर अर्थसाह्य

$
0
0

Shripad.Kulkarni@timesgroup.com

नैसर्गिक संकटांत राज्य सरकारांकडून केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात येते. राज्याकडून करण्यात आलेली अवाढव्य मागणी कशी पूर्ण करावी, असा प्रश्न केंद्र सरकारसमोर असतो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पातळीवर राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधी (एनडीआरएफ) स्थापन करण्यात आला आहे. राज्यांकडून करण्यात आलेल्या मागण्यांमागील सत्यता पडताळून पाहण्याचा नियम केंद्र सरकारने केला आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या विविध विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे पथक पाहणी करण्यासाठी येते. या पथकाने दिलेल्या अहवालावर केंद्र सरकारकडून राज्याला अर्थसाह्य केले जाते.

१९९९मध्ये राज्यात सत्तांतर झाले. त्यावेळी मराठवाड्यात दुष्काळी स्थिती होती. त्यावर मात करण्यासाठी विभागातून राज्य सरकारकडे अर्थसाह्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे पथक विभागात आले होते. त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी स्थिती २०१२मध्ये निर्माण झाली. त्यावेळी केंद्रीय पथका संपूर्ण विभागाचा दौरा केला होता. दोन वर्षांपूर्वी विभागाला गारपिटीने तडाखा दिला. त्यावेळीही केंद्रीय पथकाने परिस्थितीची पाहणी केली होती.

विभागात २०१२मध्ये दुष्काळाची स्थिती भीषण होती. त्यावेळी केंद्रीय पथकाने मराठवाड्याची पाहणी केली होती. मराठवाड्यात पाण्याअभावी फळबागा संकटात सापडल्या होत्या. त्या जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर होते. फळबागा जगविण्यासाठी केंद्राकडे मदत मागण्यात आली होती. त्यावेळी मोसंबीच्या बागांत मल्चिंगसाठी अर्थसाह्य करण्यात आले होते. विभागात २०१३मध्येही पावसाचे प्रमाण कमी होते. त्यावेळीही केंद्रीय पथकाने पिकांची पहाणी केली होती. त्यानंतर विभागात खरिपाच्या पिकाच्या भरपाईपोटी २०४३ कोटी ५० लाख रुपयांचे अर्थसाह्य करण्यात आले होते. सरत्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण २०१२पेक्षाही कमी होते. नांदेड, परभणी, हिंगोली या हामखास पावसाच्या भागातही यावर्षी दुष्काळ आहे. त्याशिवाय औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांकडेही पावसाने पाठ फिरविली होती. खरिपाचे पीक हाती लागले नाही. रब्बीच्या आशाही मावळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाचा दौरा महत्त्वाचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीचे अर्थकारण कोलमडले

$
0
0

Tushar.Bodkhe@timesgroup.com

मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे पथक येत आहे. विभागातील बिकट परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या काळात किती अर्थसाह्य करायचे, याचा निर्णय या पथकाच्या अहवालावर अवलंबून आहे. त्यामुळे विभागाची परिस्थिती केंद्रीय अधिकाऱ्यांसमोर योग्य पद्धतीने ठेवणे गरजेचे आहे...

पाऊस नसल्याने सुकलेली ज्वारीची ताटं, खुरटलेले हरभरा पीक अन् सिंचनाअभावी रखडलेली गव्हाची पेरणी. संपूर्ण मराठवाड्यात रब्बी पिकांची ही दयनीय अवस्था चिंतेत भर घालणारी आहे. खरीप पीक हातचे गेल्यानंतर रब्बी पीक हाती लागण्याची आशासुद्धा मावळली आहे. विभागात ६२ टक्के पेरणी झाली असली तरी उत्पादनात तब्बल ५० टक्के घट होणार आहे.

परतीच्या पावसाने पाठ फिरवताच खरीपाप्रमाणे रब्बी पिकांचेही अतोनात नुकसान झाले. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत मराठवाड्यात जेमतेम ६२ टक्के पेरणी झाली आहे. पेरणीचे क्षेत्र मोठे असले तरी पिकांची अवस्था बिकट आहे. रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई ही रब्बी हंगामातील महत्त्वाची पिके आहेत. पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने अपेक्षित पेरणी झाली नाही. परिणामी, रब्बीचे क्षेत्र पडीक आहे. खरीप हंगामात सतत ४२ दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे पिकांची उत्पादकता घटली आहे. कापूस उत्पादनात तब्बल ४५ टक्के घट झाली आहे. एकरी १० ते १२ क्विंटल कापूस उत्पादन अपेक्षित असताना जेमतेम ४ क्विंटल उत्पादन निघत आहे. सोयाबीन, मका या पिकांनाही अत्यल्प पावसाचा फटका बसला आहे. खरिपात शेतीचे अर्थकारण कोलमडलेले असताना १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात सुटला. ऑक्टोबरमध्ये पाऊस होईल, असा हवामान विभागाचा अंदाज होता, पण पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी रखडली. काही भागात पेरणीयोग्य ओल असल्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारी व हरभरा पेरणी केली. उगवणीनंतर एक पाऊस झाला नसल्याने जेमतेम दीड फूट उंचीचे ज्वारीचे पीक आता सुकले आहे. या पिकांना जोमदार कणीस लागण्याची शक्यता नसल्याचे कृषीतज्ज्ञांनी सांगितले. पीक हाती लागणार नसले तरी किमान जनावरांना चारा होणार आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ७४.८९ आणि नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी ३०.४१ टक्के पेरणी झाली आहे. रब्बीचे जेमतेम ५० टक्के उत्पादन हाती पडण्याची शक्यता आहे. दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेतीचे झालेले नुकसान ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करीत आहे. पीक विमा, पीक कर्ज, चारा पिकांना प्रोत्साहन योजना असे उपक्रम राबवण्यात येत असले तरी परिणामकारकता अत्यंत कमी आहे.

सिंचनाची समस्या

रब्बी हंगामात मागील काही वर्षांपासून गव्हाचे क्षेत्र वाढत आहे. बागायती क्षेत्र असलेले शेतकरी गव्हाची पेरणी करतात. यंदा सिंचनासाठी विहिरी व शेततळ्यात पाणी नसल्याने गव्हाची पेरणी घटली आहे. विभागात केवळ १५.९७ टक्के पेरणी झाली आहे. फळबागांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. डाळींब आणि मोसंबी या प्रमुख फळबागांना पाणी टंचाई भेडसावत आहे. सेंद्रीय व प्लास्टिक मल्चिंगद्वारे शेतकरी बागा वाचवण्यासाठी धडपड करीत आहेत. पाण्याची समस्या जानेवारी महिन्यापासून अधिक कठीण होणार आहे.

अर्थकारण ठप्प

कापूस उत्पादनात ४५ टक्के घट झाल्यानंतर बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली आहे. मका, सोयाबीन पिकांचे उत्पादनही जेमतेम निघाले. दरवर्षी कापूस खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी मराठवाड्यात येतात. यंदा व्यापाऱ्यांची संख्या कमी आहे. सिल्लोड तालुक्यातील जिनिंग मिल्सला दर्जेदार कापूस मिळत नाही. प्रमुख पीक असलेल्या ज्वारी उत्पादनातही घट झाल्याने शेतीच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता नाही. परतीचा पाऊस झाला नसल्यामुळे पिकांची अवस्था बिकट आहे. पीक सुकल्यामुळे उत्पादनात घट होणार आहे. किमान एका पावसाची गरज होती.

- पी. डी. लोणारे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी

सिंचनाची सोय असलेले शेतकरी हरभरा व गव्हाला पाण्याच्या एक-दोन पाळ्या देतील; मात्र इतर ठिकाणी ज्वारी व हरभरा पिकाला पाण्याची गरज आहे. रब्बीची अवस्था बिकट असून उत्पादनात ५० टक्के घट होईल.

- सतीश शिरडकर, प्रकल्प उपसंचालक, 'आत्मा'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राठोड, जंजाळ यांच्यावर आयुक्तांचे याचिकेत आरोप

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेचे पालिकेतील सभागृह नेते राजेंद्र जंजाळ व उपमहापौर प्रमोद राठोड यांचे नाव न घेता महापालिकेचे पदमुक्त आयुक्त प्रकाश महाजन यांनी सोमवारी औरंगाबाद खंडपीठात सादर केलेल्या याचिकेत जोरदार आरोप केले आहेत. पारदर्शक कारभार करताना या नगरसेवकांची मर्जी न राखल्यानेच अविश्वास ठराव संमत झाल्याचे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

आयुक्तांनी जंजाळ यांना नगरसेवकपदावरून अपात्र का करू नये, अशा आशयाची नोटीस बजावली आहे. जंजाळ यांनी सिटीप्राइड या महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलात २०१३मध्ये गाळा भाड्याने घेतला होता. काही महिने या गाळ्याचे भाडे भरल्यानंतर त्यांनी हा गाळा सोडताना मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली. मोडतोडीमुळे महापालिकेचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. दीड लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि थकित भाडे तत्काळ भरा अन्यथा महाराष्ट्र महापालिका अधिनियम १० (फ) नुसार तुम्हाला अपात्र ठरवले जाईल, अशी नोटीस बजावण्यात आली. त्यामुळेच शिवसेनेचे पालकमंत्री रामदास कदम व पालिकेतील महापौर, स्थायी समितीचे सभापती यांच्याशी संगनमत करून अविश्वास ठराव आणला, असे या याचिकेत म्हटले आहे. उपमहापौर राठोड यांनी पालिकेत ध्वनीव्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यांच्या मर्जीतील संस्थेला याचा ठेका देण्याचा आग्रह उपमहापौर यांनी केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. पालकमंत्री कदम यांनी राजकीय दबाव आणून ही कारवाई करवून घेतल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. पालकमंत्री कदम यांना या याचिकेत नावानिशी प्रतिवादी केले आहे.

आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रेकरांकडे

औरंगाबादः महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सिडकोचे प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महापालिकेला प्राप्त झाले. केंद्रेकर बुधवारी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारतील. महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यांची सरकारने सोमवारी सामान्य प्रशासन विभागात बदली केली. पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी आयुक्त म्हणून काम पहावे, असे त्या आदेशात नमूद करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् कोल्ह्याने ठोकली धूम

$
0
0

चावा घेतल्याने वनमजूर जखमी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा परिसरात सोमवारी रात्री विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची वनविभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळी सुटका केली. विहिरीबाहेर काढल्यानंतर या कोल्ह्याने घेतलेल्या चाव्यामुळे एक वनमजूर जखमी झाला. त्याला साताऱ्याच्या जंगलात सुरक्षित सोडण्यात आले. जंगलात सोडण्यासाठी गोणीतून बाहेर काढताच त्याने क्षणात धूम ठोकली.

सातारा परिसरातील भारती विद्यापीठाच्या जागेत नवीन विहीर खोदण्यात आली आहे. या भागात सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांनी विहिरीत कोल्हा अडकला असल्याची माहिती सातारा पोलिसांना कळवी. दरम्यान, त्याला बाहेर काढण्यासाठी बादली आणून काही नागरिकांनी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. पण यामुळे घाबरून कोल्हा कपारीत दडून बसला. अखेर कोल्हा अडकल्याची माहिती वनविभाग व अग्निशामक दलाला देण्यात आली. वनरक्षक प्रकाश सूर्यवंशी, वनमजूर संजय सुकलाल मुळेकर, प्रभू बाबुराव पवार, दादाराव जाधव व सुदाम नरवडे हे घटनास्थळी आहे. तोपर्यंत सातारा पोलिस ठाण्याच्या टू-मोबाइलचे कर्मचारी सहायक फौजदार शेख जमादार, ए. ए. मरकड, ए. आर. शेळके घटनास्थळी दाखल झाले. वनमजूर मुळेकर व पवार यांनी विहिरीत उतरून जाळीच्या साह्याने कोल्ह्याला पकडले. यावेळी खवळलेल्या कोल्ह्याने प्रभू पवार यांच्या बोटाला कडकडून चावा घेतला. कोल्ह्याला गोणीत बांधून वनविभागाच्या सातारा येथील जंगलात सोडण्यात आले. ही कारवाई वनपरीक्षेत्र अधिकारी आर. ए. नागापूरकर, उपवनसरंक्षक अधिकारी अशोक गिरेपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अग्निशामन दलास उशीर

शिवसेनेचे उपविभागप्रमुख प्रदीप जाधव यांनी पोलिस व अग्निशमन दलास फोनवरून कोल्हा अडकल्याची माहिती दिली होती. पण कोल्ह्याला बाहेर काढल्यानंतर अग्निशमन दल पोहोचले. विहीर आडबाजूला असल्याने ती लवकर सापडली नाही, असे सांगण्यात आले.

विहिरीत अडकलेल्या कोल्ह्याची सुरक्षित सुटका केली असून त्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

- प्रकाश सूर्यवंशी, वनसरंक्षक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images