Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खांब, डीपी न काढता रस्त्याचे काम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वैजापूर

गंगापूर रस्त्यातील महावितरणचे विजेचे खांब व डीपी हटवण्यासाठी ३६ लाख रुपये नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खांब न काढताच चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे या खांबांचा भविष्यात रहदारीस अडथळा होण्याची शक्यता वाढली आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यात आंबेडकर पुतळ्यापासुन ४५० मीटर अंतराच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामांतर्गत रस्त्याचे शंभर फूट रुंदीकरण करण्यात येणार असून, दुभाजकासह दोन्ही बाजूला गटार बांधण्यात येणार आहे. दीड कोटी रुपये खर्चाच्या या कामामुळे गंगापूर रस्त्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. मात्र, रुंदीकरणाच्या कामात महावितरणचे चार खांब व दोन डीपींचा मोठा अडथळा ठरत आहे. हे खांब स्थलांतरित करण्यासाठी महावितरणने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३६ लाख रुपयांची मागणी केली. याउलट बांधकाम विभागाकडे या कामासाठी केवळ ४ लाख रुपये असल्याने वाढीव रकमेची मागणी करणारा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. दरम्यान, याच कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून काम बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे रस्त्यावर एका बाजुला खडीकरणासाठी खोदलेली जागा व पसरलेल्या बांधकाम साहित्याचा वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर वाढीव खर्चाला मंजुरी न मिळाल्याने बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने गंगापूर रस्त्याची डावी बाजू खोदून खडीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

काम झाल्यानंतर खांब, डीपी काढू!

विजेचे चार खांब व दोन डीपी गटारापासून केवळ दोन ते तीन फूट अंतरावर असल्याने रहदारीस फारसा त्रास होणार नाही. काम झाल्यानंतर हे खांब काढण्यासाठी प्रयत्न करू, असे बांधकाम विभागाचे सहायक अभियंता पी. बी. पवार यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आधी वीजबिल भरा, मगच दुरुस्ती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

'ट्रान्सफार्मर जळालाय, नादुरुस्त झालाय, मग एक करा; आधी संबंधित ट्रान्सफार्मरवर वीज जोडणी असलेल्या शेतकऱ्यांनी विज बिले तातडीने भरा. मग नंतर बघू या दुरुस्तीचे,' असा अजब आणि अलिखित नियम फुलंब्री तालुक्यातील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांनी काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

फुलंब्री तालुक्याकडे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कायम दुर्लक्ष असते. त्याला महावितरणचा अपवाद नाही. फुलंब्री, वारेगाव, आळंद, पाथ्री येथील उपकेंद्रात अनेक शेतकरी बिल दुरुस्ती, जळालेले ट्रान्सफार्मर केव्हा मिळेल याची चौकशी करण्यासाठी जातात, मात्र त्यांच्या समस्यांकडे कायम दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे. हे दुृर्लक्ष सोईस्करपणे केले जाते, असा आरोप आहे. सध्या तालुक्यात थोड्याफार पाण्यावर रब्बी हंगामातील पिकांना जगविण्याच्या प्रयत्न सर्व शेतकरी करत आहेत. तालुक्यातील अनेक ट्रान्सफार्मर जळालेले व बिघडलेले आहेत. या तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. लोडशेडिंग व विजेच्या लपंडावामुळे त्यांच्या नाकी नऊ आले आहेत. यावेळी शेतकरी संबंधित वीज उपकेंद्रात समस्या घेऊन गेल्यानंतर तेथील अधिकारी आधी बिल भरा मग काय ते काम करू, असे सांगत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. विशेष म्हणजे नियमित बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

आधी विजबिल भरा, मगच दुरुस्ती, हा नियम कुणी व कधी तयार केला, याप्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरून महावितरणचे अधिकारी काय साध्य करत आहेत, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

अतिरिक्त भार आल्याने ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे, परंतु उपलब्धतेनुसार व क्रमवारीनुसार ट्रान्सफार्मर अग्रक्रमाने देण्यात येत आहेत. सर्व ग्राहकांनी विज बिले भरून महावितरणला सहकार्य करणे अपेक्षित आहे.

- सुरेश दौड, उपअभियंता, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अजिंठ्यात पाली ‌विद्यापीठ सुरू करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फर्दापूर

अजिंठा लेणी परिसरात पाली भाषेचे विद्यापीठ सुरू करा, अशी मागणी बुधवारी झालेल्या दहाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत करण्यात आली. परिषदेला धम्माचल अजिंठा येथे हजारो बौद्ध उपासकांची उपस्थिती होती.

सकाळी साडेदहा वाजता भदंत डॉ. एन. महाथेरा (उल्हासनगर) यांनी धम्म परिषदेचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी भदंत प्रज्ञादीप महाथेरो होते. परिषदेच्या सुरुवातीस भदंत बुद्धप्रकाश महाथेरो (पाटणा, बिहार) यांच्या हस्ते धम्माचल स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अॅँड बुद्ध‌िझम यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. परिषदेत बिहार सरकारचा १९४९ चा कायदा रद्द करून बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन अखिल भारतीय बौद्ध भ‌िक्कू संघाच्या ताब्यात द्यावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अॅँड बुद्ध‌िझम या संस्थेला अजिंठा लेणी परिसरात पाली भाषेचे ‌विद्यापीठ स्थापन करण्यास शासनाने मान्यता द्यावी, अजिंठा लेणीत येणाऱ्या प्रवाशांसाठी जपान, कोरिया, थायलंड, म्यानमार, श्रीलंका या देशांतून थेट औरंगाबादला विमानसेवा सुरू करावी अशा मागण्या करण्यात आल्या.

परिषदेला हजारो भाविकांची उपस्थिती होती. या भाविकांना भीमशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य भीमराव बोराडे, कडूबा दाभाडे, सागर बिरारे, नितीन शिंदे, विशाल शिंदे, सचिन बोर्डे, राजू तायडे यांच्यातर्फे मोफत खीर वाटप करण्यात आले. परिषदेसाठी पोलिस निरीक्षक संतोष घाडेकर यांनी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईचा ठराव टोपलीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

घोटाळेबाजांचे अभिनंदन आणि कारवाई करण्याचा प्रस्ताव केराच्या टोपलीत टाकण्याचा प्रकार पंचायत समितीत घडला आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनाच्या विहीर घोटाळ्यात अधिकाऱ्यांसह तालुक्यातील सर्वपक्षीय नेते गुंतले आहेत. त्यामुळे या घोटाळ्यातील आरोपीवर कार्यवाही करण्याचा ठराव आणणाऱ्या पंचायत समिती सदस्य प्रज्ञा कुलकर्णी यांना पंचायत समिती सभागृहात एकाकी पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, विहीर प्रकरणात घोटाळा करणाऱ्या प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी संमत करण्यात आला.

पैठण तालुक्यातील बोगस विहीर मंजूर प्रकरणाची जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी डी. ई चाटे यांनी चौकशी केली असून विहीर वाटपात अनियमितता झाल्याचा ठपका त्यांनी त्यांच्या अहवालात ठेवला आहे.

पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी यांनी त्यांच्या जवाब देताना तत्कालीन आमदार संजय वाघचौरे, तत्कालीन सभापती विलास भुमरे, तत्कालीन जिल्हा परिषद सभापती सुनील शिंदे, तत्कालीन जिल्हा परिषद सभापती रामनाथ चोरमले व विद्यमान आमदार यांच्या दबावात येऊन बेकायदेशीर विहिरी मंजूर केल्याचा सांगितले आहे. विहीर वाटप प्रकरणात अनियामितता झाल्याचे स्पष्ट झाल्याने खरा लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिला. म्हणून दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचा ठराव पंचायत समिती सदस्या प्रज्ञा कुलकर्णी यांनी मंगळवारी झालेल्या पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत मांडला. मात्र, या घोटाळ्यात अधिकाऱ्यांसह सर्वच पक्षाचे स्थानिक नेते गुंतल्याने पंचायत समितीच्या अन्य सर्व सदस्यांनी प्रज्ञा कुलकर्णी यांना प्रस्ताव मांडू दिला नाही. त्यांना सभागृहात बोलू सुद्धा दिले नाही.



निर्ढावलेपणाची हद्द

विशेष म्हणजे, राजकीय नेत्याच्या दबावाखाली बेकायदेशीरपणे विहीर मंजूर केल्याचे जवाब देणारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी यांनी यूटर्न घेत विहीर वाटपात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे व विहिरीच्या मंजुरी पारदर्शकपणे केल्याचे सभेत सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तालुक्यात अनियमितता करून मंजूर करण्यात आलेल्या विहिरीमुळे तालुक्यात सिंचन क्षमता वाढली आहे. यासाठी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य प्रह्लाद औटे यांनी आणलेला प्रशासनाचा अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.

अधिकाऱ्यांनी केलेल्या विहीर घोटाळ्यामुळे पैठण तालुक्यातील खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याचा ठराव मी पंचायत समिती सभागृहात आणला असता अधिकारी व अन्य सदस्यांनी माझी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. मी शांत बसणार नसून लवकरच याप्रकरणी उपोषण करणार आहे.

- प्रज्ञा कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबादेत दूषित पाणी; सोशल मीडियावर संताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

गिरिजा मध्यम प्रकल्पातून खुलताबाद शहराला दूषित पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

बुधवारी शहरातील काही भागात झालेल्या पाणीपुरवठयामध्ये गढूळ पाणी नळाला आल्याने नागरिकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. शहरातील १५ हजार नागरिकांच्या आरोग्याशी नगरपालिकेला काळजी नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गढूळ पाण्याने भरलेले जार आणि पाण्याच्या बाटल्यांचे फोटो सोशल मीडियावर फिरत होते. नगरपालिकेला जबाब कोण विचारणार, सुस्त नगरपालिका कधी जागी होणार, जनतेला हक्काचे शुद्ध पाणी कोण पाजणार, अजून किती दिवस नगरपालिका जनतेच्या आरोग्याशी खेळणार, खुलताबादकरांना हक्काचे शुद्ध पाणी कधीच मिळू शकणार नाही का, अशा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. नगरपालिकेला आज सुटी असल्याने नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्यायला कोणीही नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाच्या प्रश्नावर आळीमिळी

$
0
0

मदतीच्या पाठपुराव्यावरून राजकीय नेत्यांवर जनता नाराज

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

राज्यामध्ये, विशेषत: मराठवाड्यामध्ये दुष्काळाचे सावट आणि केंद्राच्या पथकांकडून पाहणीसाठी फक्त दौरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून मात्र आवाज उठविला जात नाही, त्यामुळे दुष्काळाच्या 'जीवन-मरणा'च्या प्रश्नावरही काहीही हाती लागत नसल्याची तक्रार सामान्य जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.

उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांसह राज्यातील अनेक भागात सध्या पाण्याची तीव्रटंचाई आहे. जनावरांसठी पुरेसा चारा उपलब्ध नाही. रोजगाराच्या शोधात स्थलांतर होत आहे. खरिपानंतरच रब्बीचीही आशा मावळत चालली आहे. तरी, राज्य व केंद्र सरकारच्या दुष्काळाच्या भूमिकेविषयी नाराजी आहे. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकांचे सातत्याने दौरे होत आहेत. मात्र, प्रत्यक्ष मदतीच्या दृष्टीने कोणतीही हालचाल होत नाही, असा आरोप आहे. आढावा बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्स यांऐवजी सरकार व प्रशासनाने थेट मदतीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. यातच, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी तर दुष्काळग्रस्तांना जानेवारी २०१६ मध्ये मदतीचा हात दिला जाईल, त्यातून नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पाणी व चाऱ्याअभावी राज्यातील पशुधन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, चारा छावण्या उघडण्याबाबतही शासन व प्रशासन धीम्या गतीने पावले उचलत आहे. मुख्यमंत्र्यांनी चारा छावणीच्या अटी शिथील करण्याचे अभिवचन दोन सप्टेंबर रोजी उस्मानाबादेत दिले. मात्र, याबाबत अपेक्षित कार्यवाही झालेली नाही. पिण्याचे पाणी, रोजगार आणि चारा या तीन प्रमुख मागण्या ग्रामीण भागातून होत आहे. शासनाकडे पाठपुरावा करतानाच, अर्थसहाय्य करीत दिलासा देण्याबरोबरच जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याबाबत आवाज उठविणाऱ्या नेत्यांची वानवा दिसत आहे.

नेते आरोपांमध्ये मश्गुल

राज्यामध्ये गेल्या वर्षी सत्तांतर झाले, तरीही त्याचा फरक दुष्काळग्रस्त कामांमध्ये दिसून येत नाही. राज्यामध्ये सत्तेत असणारे नेत्यांमध्ये परस्परांमध्येच शीतयुद्ध असल्यासारखे चित्र आहे. तर, विरोधी पक्षांकडूनही दुष्काळासारख्या मुद्द्यांकडे जोरकसपणे लक्ष दिले जात नसल्यामुळे जनतेमध्ये राजकीय नेत्यांविषयी नाराजी वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चायनीज मांजावर संक्रांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चायनीज नायलॉन मांजा विक्री व वापरण्यावर पोलिस विभागाने बंदी घातली आहे. त्यामुळे यंदा पंतगबाजांना पतंगबाजीत या मांजाचा उपयोग करता येणार नाही.

चायनीज मांजावर बंदीचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी (२४ नोव्हेंबर) दिले असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास अशा व्यक्तींविरुद्ध कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. २१ जानेवारी २०१५ पर्यंत हा आदेश लागू लाहील. दिवाळीनंतर मकरसंक्रांतीपर्यंत उत्सव, हौस म्हणून उतंग उडविले जातात. फर्रा, आधा, चौकडा, पन्नी, अहमदाबादी, जयपुरी या देशी पतंगासह चायनाच्या कापडी पतंगाबरोबरच विविध प्रकारचे मांजा, चक्री आदींना पतंग शौकिनांकडून मोठी मागणी असते. मागील काही वर्षे चायनीज मांजा मोठ्या प्रमाणात वापरात आणला जात होता, पण हा मांजा आता वापरता येणार नाही. या मांजाच्या विक्री व वापरावर बंदी घातली गेली आहे. चायनीज नायलॉन मांजाचा धागा हा धारदार असून सहजासहजी हाताने तुटत नाही. पंतग उडविताना मांजामुळे हाताला जखम होणे तसेच पंतग कटल्यानंतर मांजा रोडवर व इतरत्र पडल्यास त्यामुळे लहान मुले, वाहनधारक, पादचारी अडकून अपघात, जखमी होण्याची शक्यता असते.

उडणाऱ्या पक्ष्यांना चायनीज नायलॉन मांजाचा स्पर्श झाल्यास दुखापत, अपंगत्व येते. तसेच काहीवेळा त्यांचा जीवही गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पक्षी अशा मांज्यात अडकल्यास त्याची सहजासहजी सुटका होत नाही. अशा घटनांना आळा घालण्यासाठी असलेल्या विशेषाधिकाराद्वारे पोलिस आयुक्तांनी या मांजावर बंदी घातल्याचे प्रसिद्धी प्रत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकनाथी भागवत ग्रंथाला ४४२ वर्षे पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

संत एकनाथ महाराज यांनी शके १४९५ च्या कार्तिकी पौर्णिमेला (इ.स. ५७३) शेवटचा एकतीसावा अध्याय लिहून एकनाथी भागवत ग्रंथ पूर्ण केला. या घटनेला २५ नोव्हेंबर रोजी ४४२ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त एकनाथ महाराज भक्त मंडळाने एकनाथी भागवत ग्रंथाची मंत्रोच्चारात महापूजा केली.

संत एकनाथ पैठणचे. नाथांनी सामान्य जनतेला अध्यात्म समजावे यासाठी शके १४९५ च्या कार्तिकी पौर्णिमेला एकनाथी भागवत ग्रंथाचा एकतिसावा अध्याय लिहून पूर्ण केला होता हा ग्रंथ लिहिल्यावर काशी येथील धर्माचार्यांनी ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढून या ग्रंथाला एकनाथी भागवत असे नाव दिले. प्रसिद्ध कवी मोरोपंत यांनीही भागवत ग्रंथाची प्रशंसा केली.

'श्री भागवतवराने केली

यश शुद्ध एकनाथे !

येणे प्रमुदित झाला साधू

जसा बाळ सेविते थनी !!१!!

ग्रंथ श्री भागवत श्रीरामायण

करी सुविस्तर ते!

जरि न सविता दयानिधी

केवल जड जवि तरि कसे करते !!२!!'

हा ग्रंथ लिहून चारशे बेचाळीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बुधवारी पैठण येथील एकनाथ महाराज भक्त मंडळाच्या वतीने पुरोहित रवींद्र साळजोशी व उत्तम सेवनकर यांनी मंत्रोच्चाराच्या घोषात एकनाथी भागवत ग्रंथाची महापूजा केली. ग्रंथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. रघुनाथ महाराज पालखीवाले, वसंत महाराज पांडव, रखमाजी महाराज नवले आदींनी भागवत ग्रंथाविषयी माहिती सांगितली. यावेळी दिनेश पारीख, ऋषिकेश जगताप, दीपक निकम, अभिषेक वेदी, विलास मोरे, सुरेश गायकवाड, जगन्नाथ जमादार, विठ्ठल खराद, शाम फुलभाटी, मच्छिंद्र निवारे, सुरेश चपडे, मारोती वाणी, प्रमोद दौंड यांच्या सह मोठ्या संख्येने भाविक व वारकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संविधानदिन उत्साहात; शहीदांना वाहिली श्रद्धांजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

भारतीय संविधानदिन खुलताबाद शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राज्यघटनेचे सामूहिक वाचन आले. तसेच २६/११ मुंबई हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

खुलताबाद तहसील कार्यालयात नायब तहसीलदार प्रशांत काळे, पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी डॉ. आर. एस. लाहोटी, गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गटशिक्षणाधिकारी व्ही. सी. केवट, नगरपालिकेत नगराध्यक्ष सुषमा भावसार व मुख्याधिकारी सविता हारकर, ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष नाईकवाडे, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मंडळ अधिकारी अशोक अहिरे, पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, वेरूळ ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच साहेबराव पांडव, यशोदीप विद्या मंदिर शाळेत लक्ष्मीबाई भारती व मुख्याध्यापक राजाभाऊ वायाळ यांच्या प्रमुख उपस्थीतीत संविधानदिन साजरा करून मुंबई हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनादेश न वटल्याने तीन महिन्यांची कैद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

शेती उपयोगी साहित्य खरेदी केल्यानंतर त्याच्या किंमतीपोटी दिलेला धनादेश न वटल्यामुळे सिल्लोड येथील प्रथमवर्ग न्यायालयाने आरोपीस तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. फिर्यादीस नुकसान म्हणून ३ लाख रुपये देण्याचे आदेश दिले. संतोष धुमाळ असे आरोपीचे नाव असून तो औरंगाबादचा राहणारा आहे.

सिल्लोड येथील एस. एस. खंडेलवाल यांच्या श्रीराम ट्रेडर्स या दुकानातून आरोपी संतोष विठ्ठल धुमाळ (रा. गारखेडा औरंगाबाद) यांनी २०१३ मध्ये २ लाख ९० हजार २२५ रुपयांचे शेती उपयोगी साहित्य खरेदी केले. देयकापोटी फिर्यादीच्या हतात आरोपीने त्याच्या बँक खात्याचा धनादेश दिला होता. फिर्यादीने धनादेश बँकेत सादर केला असता पुरेशा रकमेअभावी तो वटला नाही. त्यामुळे खंडेलवाल यांनी संतोष झाल्टे यांच्या मार्फत आरोपीस कायदेशीर नोटीस देऊन धनादेश रकमेची मागणी केली. नोटीस तामील होऊनही आरोपीने धनादेश रक्कम अदा न केल्याने फिर्यादीने आरोपीच्या विरोधात सिल्लोड कोर्टात फिर्याद दाखल केली. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली असता तीन साक्षीदार तपासण्यात आले. उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकूण न्यायाधीश सुशील देशमुख यांनी संतोष विठ्ठल धुमाळला तीन महिने साधी कैद व नुकसान भरपाईपोटी तीन लाख रुपये देण्याचे आदेश दिले. फिर्यादीतर्फे संतोष झाल्टे यांनी काम पाहिले. त्यांना रेखा जैस्वाल, जी. एस. आरके, सनी हटीकर यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेळी गिळलेला १० फुटी अजगर पकडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी रस्त्याजवळ शेळी गिळलेल्या १० फुटी अजगराला गुरुवारी सर्पमित्रांनी पकडले. त्याला जंगलात सोडून देण्यात आले. लेणी क्रमांक एक जवळच्या रस्त्यालगत १० फुटी अजगर शेळी गिळल्यामुळे सुस्तावलेल्या अवस्थेत पडलेला दुपारी गुराख्याला दिसला.

परिसरातील लोकांनी लगेच सर्पमित्र सागर गायकवाड यांना ही माहिती दिली. गायकवाड यांनी अजगर पकडून त्याला खुलताबादच्या जंगलात सोडून दिले. या अजगराचे अंदाजे वजन ४० किलो होते. त्याने बकरी गिळल्यामुळे त्याचे वजन वाढले होते.

हा अजगर पकडण्यासाठी सर्पमित्र गायकवाड यांना कडूबा साळवे, ज्ञानेश्वर रिठे, देवचंद चव्हाण, प्रकाश रिठे, अमोल रिठे यांनी मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गूढ आवाजाने पैठण हादरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर गुरुवारी पैठणमध्ये पुन्हा एकदा चार तासांत दोनदा गूढ आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेक वर्षांपासून होत असलेल्या गूढ आवाजाची चौकशी करण्याची मागणी पैठणकरांनी केली आहे. तीन वर्षांपासून पैठण तालुक्याच्या दक्षिण भागातून गूढ आवाज येत आहेत.

गुरुवारी सकाळी १० वाजून ५० मिनिटाला स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला. आवाज फटाक्याचा नसल्याचे लोकांच्या लक्षात आल्यावर शहरातील नागरिक घाबरून घराबाहेर आले. शहरातील उत्तर भागातील नाथ गल्ली, रेणुकादेवी गल्ली, तारगल्ली, रंगारहाटी, नेहरू चौक या भागात आवाजाची तीव्रता अधिक होती. सकाळी आलेल्या गूढ आवाजाची चर्चा शांत होण्यापूर्वीच दुपारी २ वाजून ५ मिनिटाला पुन्हा एकदा शहरवासीयांना गूढ आवाज ऐकू आला. सतत ऐकू येणाऱ्या या गूढ आवाजांमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे व घबराटीचे वातावरण असून प्रशासनाने गूढ आवाजाची चौकशी करावी. हा आवाज कशाचा आहे, हे जाहीर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या दोन्ही गूढ आवाजांची जायकवाडी येथील भूकंप मापक केंद्रावर कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आभाळाएवढे यश

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com

इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यानंतरच स्वतःचा उद्योग थाटण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अनुभव घेतल्यानंतर अल्प भांडवलाच्या जोरावर उद्योग थाटला. सगळ्यांपेक्षा वेगळे करण्याची इर्षा आभाळाएवढे यश मिळवून गेली. जगातील २५ देशांमध्ये निर्यात होणाऱ्या प्रोडक्टची विश्वासार्हता टिकून आहे. देशातील अत्युत्कृष्ट लॅबचा बॅकअप आणि नावीन्यपूर्ण उपक्रमाची कास धरणाऱ्या रवींद्र कोंडेकर यांची ही यशोगाथा...

लातूर जिल्ह्यातील मुरूड हे रवींद्र रतनचंद कोंडेकर यांचे मूळ गाव. गावातील शाळा अख्ख्या महाराष्ट्रात फेमस. तिथून १९८७मध्ये दहावी झाल्यानंतर लातूरच्या राजर्षि शाहू महाविद्यालयातून बारावी पूर्ण केले. घरची परिस्थिती जेमतेम. शिक्षण घेतानाच ठरविले होते. लातूरच्याच बिडवे अभियांत्रिकीमधून बीई मेकॅनिकल शाखेतून १९९३मध्ये पूर्ण केली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुभवासाठी औरंगाबाद गाठले. त्या काळात औरंगाबादेत लघु उद्योग मोठ्या संख्येने सुरू होत होते. मोठ्या कंपनीमध्ये कोंडेकरांना सहजपणे नोकरी लागली असती, पण त्यांना अनुभव घ्यावयाचा असल्याने एका छोट्या लघु उद्योगात त्यांनी काम सुरू केले. मोठ्या उद्योगात काम करताना एखाद्या विशिष्ट विभागातच काम करावे लागते. उलट छोट्या उद्योगात सर्व डिपार्टमेंटची जबाबदारी पार पाडताना दांडगा अनुभव पाठीशी मिळू लागला. चार वर्षे त्यांनी मन लावून काम केले.

वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांनी भूखंड घेतला होता. नोकरी करताना अतिशय कमी वेतन मिळत होते. त्यातून सेव्हिंग करत कोंडेकरांनी स्वतःचे केवळ १६ हजारांचे भांडवल उपलब्ध केले. वाळूजमध्ये घेतलेल्या जागेवर १९९८ मध्ये 'के. सी. प्रेसिजन' नावाची कंपनी सुरू केली. कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील दुसऱ्या पिढीतील तरुणाईने उद्योग थाटणे तेही मराठवाड्यातील हे साधे काम नव्हे. त्यासाठी प्रचंड मेहनतीची तयारी आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. कोंडेकर यांनी के. सी. प्रेसिजनच्या माध्यमातून गेजेस आणि लांबी तपासणी करणारी इन्स्ट्रुमेंट्स बनविणे सुरू केले. चिकाटी, मेहनतीची तयारी तर होतीच. अॅडव्हान्स गेजिंगच्या क्षेत्रात के. सी. प्रेसिजन मराठवाड्यात सुरू झाली आणि पाहता पाहता देशभरात ख्याती पसरली. इंजिनीअरिंग क्षेत्रात कुठल्याही मोजमापाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्लिप गेज प्रॉडक्ट बनविताना लांबी मोजण्याचे परिणाम निश्चित केले जाते. त्यावरून सगळी इन्स्ट्रुमेंट्स तपासली जाताता. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्सच्या क्षेत्रात देशात सर्वाधिक उच्च दर्जाची इन्स्ट्रुमेंट कोंडेकरांच्या के. सी. प्रेसिजनमध्ये बनविली जातात. हैदराबाद, दिल्लीतून मशीनरी आणली गेली. ग्राहकाला एखादे प्रोडक्ट तयार करताना त्यांची लांबी वा विशिष्ट परिमाणे मोजण्यासाठी एक स्वतंत्र पद्धती असते. ते बनवून देण्याचे काम के. सी. प्रेसिजनमध्ये केले जाते. अशा प्रकारचे उत्पादन करणारे देशात नव्हे जगात फार कमी लोक आहेत. हे काही एका वर्षात मिळालेले यश नाही. त्यामागे प्रचंड मेहनत आणि सतत नवीन करण्याच ध्यास आहे.

मुंबई येथील एका जागतिक दर्जाच्या प्रदर्शनातून कोंडेकर यांना पहिला ब्रेक मिळाला. १९९९मध्ये मुंबईतीली प्रदर्शनात त्यांनी सहभाग नोंदविला. पहिल्यांदा तिथून ऑर्डर मिळाली तेव्हापासून आजवर कोंडेकरांनी मागे वळून पाहिलेले नाही.

२००१ मध्ये त्यांना तुर्कस्तान येथील पहिली परदेशी ऑर्डर मिळाली. के.सी.पी. हा ब्रँड आंतरराष्ट्रीय पातळीवर रुजविण्यासाठी कोंडेकरांनी २००८पर्यंत उद्योगातून मिळालेला सर्व पैसा कंपनीतच गुंतविला. अतिशय दर्जाचे प्रोडक्ट निर्माण होत गेले. परदेशात त्यावर विश्वासाचे शिक्कामोर्तब झाले आणि मग काय कॅनडा, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, इराण, तुर्कस्थान, थायलंड, फिलिपाइन्ससह २५ विविध देशांत मटेरिअल निर्यात होऊ लागले. एवढ्या मोठ्या शिखरावर जाताना कोंडेकरांनी स्वतः एक शिस्त लावून घेतली. आधी स्वतःतील बलस्थाने तपासली आणि त्या दृष्टिने उद्योग विकसित करण्याचे ठरविले. १९९८मध्ये कंपनी सुरू केल्यानंतर १९९९मध्ये मुंबईमध्ये गरवारे मैदानावर जागतिक प्रदर्शन भरविण्यात येते. या प्रदर्शनात कोंडेकरांनी सहभाग नोंदविला. तिथे जगभरातून उद्योजक आले होते. कोंडेकर यांना पहिला ब्रेक या प्रदर्शनातून मिळाला आणि देशासह परदेशात के. सी. प्रेसिजनचा बोलबाला सुरू झाला.

वाळूजमधील उद्योगात अधिकारी, कर्मचारी म्हणून ४५ लोक कार्यरत आहेत. शिस्तप्रिय असलेल्या कोंडेकर यांनी कंपनीतही शिस्त मेंटेन ठेवली आहे. आयएसओ ९००१ प्रमाणपत्र, परदेशी ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी आखून ठेवलेली एक सिस्टिम विकसित केली आहे. ४० मशीन आणि बहुतांश सिस्टिम अॅटोमेशन असल्याने दर्जात कुठेही तडजोड नाही. वाढता व्याप पाहून आता वाळूजमध्येच नवीन प्लँट उभारणे सुरू आहे. नवीन आर्थिक वर्षा तो कार्यान्वित होईल. दर्जात कुठेही कॉम्प्रमाइज न करता नवीन गोष्टींची कास धरणे या रवींद्र कोंडेकर यांचा मूलमंत्र यशस्वी ठरला आहे. केवळ आपल्या उत्पादनात अव्वल असून, चालत नाही. मार्केटमध्ये काय गरज आहे, कस्टमरला काय पाहिजे, तंत्रज्ञान कसे आहे याचाही अभ्यास उद्योजकाला असायला हवा. या सर्व गोष्टींची योग्य ती काळजी घेतली तर प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात यशस्वी होईल, असे कोंडेकर म्हणतात. सामाजिक क्षेत्रात कोंडेकर यांचे मोठे योगदान आहे. जाएंट्स ग्रुप ऑफ वाळूजचे अध्यक्ष म्हणून त्यांनी यंदा विविध उपक्रम राबविले आहेत. ग्लोबल डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संरक्षणासाठी कोंडेकर कायम अग्रेसर असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांचे ‘समांतर’च्या विरोधात उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील विविध भागात पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यांच्याकडे औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीचे दुर्लक्ष करीत आहे. शहरातील पाणी व्यवस्था सुधारावी या मागणीसाठी 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी गुरुवारी विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

विभागीय आयुक्तालयासमोर 'मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन'चे नगरसेवक सय्यद मतीन यांनी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या विरोधात आंदोलनाची सुरवात केली. या आंदोलनात आमदार इम्तियाज जलील यांच्यासह विरोधी पक्षनेता अज्जू पहेलवान, नगरसेवक जमीर कादरी, नगरसेवक अजीम अहेमद यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती. या आंदोलनाद्वारे आरेफ कॉलनी, बिस्मिल्लाह कॉलनी आणि टाउन हॉल या भागांत पाणी पुरवठ्यासाठी १५०० मिलीमीटर व्यासाचा जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करावे. आवश्यकता असलेल्या सर्व भागांत जलवाहिनी टाकावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने महापालिकेशी करार केला आहे. त्यानुसार सध्या कामे केली जात नाही, असाही आरोप आंदोलकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रुटी दूर करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य परीक्षा परिषदतर्फे १६ जानेवारी २०१६ रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया असून, अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी उमेदवारांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन दुरूस्ती करता येणार आहे.

परीषदेतर्फे प्रारंभी २७ डिसेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार होती, परंतु याच दिवशी राष्ट्रीय पातळीवर होणारी राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (नेट) होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली. ही परीक्षा १६ जानेवारी रोजी होणार आहे. त्यात अर्ज भरण्याची मुदतही वाढविण्यात आली. यासह अर्जात काही त्रुटी असेल तर, विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन दुरुस्ती करता येणार आहे. १४ ऑक्टोबरपासून परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन अर्ज करताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अर्ज करताना त्रुटी आढळून आल्या होत्या. या तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना अर्जात ऑनलाइन दुरुस्ती करता येणार आहे.

अर्ज करताना नाव, जन्मतारीख, पत्ता, भाषा, शैक्षणिक अर्हता, माध्यम आदी भरताना एखादी त्रुटी राहिली असेल तर, त्यात विद्यार्थ्यांना त्याची दुरुस्ती करता येणार आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत सुधारित अर्जांची प्रत डाउनलोड करून विद्यार्थ्यांना ते गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे जमा करावे लागतील. दिलेल्या मुदतीनंतर दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना संधी मिळणार नासल्याचे परीषदेने स्पष्ट केले आहे.

४० हजारांवरून अर्जांची संख्या ८ हजारांवर

'टीईटी'चे हे तिसरे वर्ष आहे. शिक्षक पात्रता परीक्षा तीन झाल्या, परंतु एकही शिक्षक भरती परीक्षा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे 'टीईटी'बाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे परीक्षेसाठी इच्छुकांची संख्या रोडावली आहे. पहिल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या २५ टक्क्यावर आली आहे. डिसेंबर २०१३मध्ये घेण्यात आलेल्या 'टीईटी'ला औरंगाबाद जिल्ह्यातून ४० हजार परीक्षार्थी होते. यंदा हा आकडा ८ हजारांवर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com

शहर व परिसरात गेल्या काही दिवसात लागोपाठ झालेल्या अपघातांमुळे सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलिसांनी कारवाईचे सत्र हाती घेत गेल्या दहा महिन्यांत दोन कोटी रुपयांचा दंड वसूल केला. वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे, अडथळे दूर करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी प्रयत्न केले. मात्र, बेशिस्त वाहतुकीला पूर्णतः लगाम लावता आला नाही. त्यात वाहनचालकांच्या चुकीबरोबरच सिग्नल बंद, दुभाजक नसणे, खड्डेमय रस्ते आदी कारणांमुळेही अपघातास निमंत्रण मिळत आहे.

हे टाळण्यासाठी आवश्यकता आहे ती सर्व संबंधित विभागाने समन्वयाने काम करण्याची.

वा ढते अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे. अपघाताची कोणतीही घटना घडताच बघ्यांची गर्दी होते. त्यातून कधी-कधी माणूसकी जपणाऱ्यांकडून मदतीसाठी धावपळ केली जाते. हा रस्ता मृत्युचा सापळा बनला आहे, तो रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे, अशी चर्चाही करत झालेल्या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जाते.

त्या घटनेसंदर्भात पोलिसी कारवाई केली जाते आणि काही दिवसांनी ती घटनाही लोक विसरून जातात. पुन्हा त्याच रस्त्यावर अपघाताची दुसऱ्या घटनेची भर पडते. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असतानाही या प्रश्नाकडे मात्र, फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे वास्तव आहे आणि ते नाकारता येत नाही.

हा प्रश्न केवळ एकट्या औरंगाबाद शहराचा वा जिल्ह्याचा नाही तर हा सार्वत्रिक झाला आहे. वर्षाकाठी हजारो जणांचे बळी रोड अपघातामुळे जातात. अनेकांचे घर त्यामुळे उद‍्ध्वस्त होते. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक यासह अन्य घोषवाक्य केवळ फलकावरच राहतात. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी त्या तुलनेत फारसे काम, प्रयत्न होताना दिसत नाही.

शहर व परिसरात अपघाताची घटना ही नित्यांची बाब झाली आहे. एकट्या जालना रोडवर गेल्या महिन्याभरात झालेल्या अपघातात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यात मित्रासोबत जात असतानाच दुचाकीवरून पडल्याने समीर सुधीर पेडगावकर या १६ वर्षीय तरुणाचा काही दिवसांपूर्वी दुर्देवी मृत्यू झाला. तर दोन दिवसांपूर्वीच बीड बायपास रोडवर भरधाव ट्रकच्या धडकेत सामाजिक कार्यकर्त्या मंदा संजय वालतुरे यांचा मृत्यू झाला. जळगाव रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सय्यद नवाब सय्यद मुसा हे मरण पावले. अपघातात जखमी होणाऱ्याची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. अर्थात, आकडेवारीपेक्षा यापुढे रोड अपघातात होणार नाही, कोणाचाही जीव जाणार नाही, याकडे अत्यंत गांभीर्याने पाहणे व तशा उपाययोजना करणे आवश्यक आहे.

वाहन चालविण्याचा परवाना देताना आरटीओकडून वाहनधारकांची परीक्षा घेण्यात येते. नियमाची माहिती करून दिली जाते, पण खरंच प्रत्यक्षात परवाना मिळविल्यानंतर बहुतांश वाहनधारक त्याचे पालन करतात का? हा प्रश्नच आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार व वाहतूक विभागाने बेशिस्त वाहुतकीला लगाम लावण्यासाठी प्रयत्न केलेत. जड वाहनांना शहरात प्रवेशा संदर्भात निर्बंध घालण्यात आले. वाहतुकीस अडथळा करणारे अतिक्रमण दूर करत अनेक रस्त्यांचा, चौकांचा श्वास मोकळा झाला, हे खरे असले तरी सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक परिस्थिती अनेक कारणामुळे होऊ शकलेली नाही.

बेफाम वेगाने गाड्या चालविणे, नियम न पाळणे, अवैध प्रवासी वाहतूक, दारू पिउन गाडी चालविणे, वाहन सुस्थितीत नसणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे यासह बहुतांश मानवी चुकामुळे अपघात जास्त प्रमाणात होतात, पण त्याचबरोबर खराब रस्ते, अरुंद रस्ते, सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक त्या सुविधा नसणे, याबाबींही महत्वाच्या आहेत. ही जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची असते.

शहरातील अनेक सिग्नल आज बंद अवस्थेत आहेत. रुंदीकरणानंतरही अनेक ठिकाणचे विद्युत खांब काढण्यात आलेले नाही. पार्किंगची सुविधा अपुरी असल्याने रस्त्यावर वाहने उभे केली जातात तर अनेक ठिकाणी दुभाजक नसल्याने बेशिस्त वाहतुकीला नकळत प्रोत्साहन दिल्यासारखे होत आहे. केवळ पोलिसांना दोष देऊन चालणार नाही. यासाठी रस्ते व वाहतुकीशी संबधित असलेल्या विविध यंत्रणा यात आरटीओ, सार्वजनिक बांधकाम खाते, महापालिका यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी नीट पार पडल्यास काही अंशी का असेना हा प्रश्न तडीस लावण्यात निश्चित मदत मिळू शकते.

सुदैवाने शहर पोलिस आयुक्तालयाच्या प्रमुखपदी अमितेश कुमार तर महापालिका आयुक्तपदी सुनील केंद्रेकर यांच्या रुपाने कर्तव्यदक्ष अधिकारी लाभले आहेत. कणखर नेतृत्व मिळाल्यास ती यंत्रणा कोणती करामत करू शकते, याचा प्रत्यय या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे औरंगाबादकरांनी अनुभला आहे. त्यामुळे सुरक्षित वाहतुकीस आवश्यक असणाऱ्या सुविधांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी आशा करण्यास हरकत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाग्यवंतांना बक्षिसांचे वितरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील निवडक दालनांमध्ये 'महाराष्ट्र टाइम्स' च्या वतीने 'मटा बिग रिवार्ड शॉपिंग फेस्टिव्हल' ही आकर्षक योजना नुकतीच राबविण्यात आली. या योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांमधून काही भाग्यवंत विजेत्यांची नावे लकी ड्रॉच्या माध्यमातून काढण्यात आली असून बुधवारी (२५ नोव्हेंबर) रोजी बीड बायपास रोडवरील 'इंटेरियर बझार'मधील भाग्यवंत ग्राहकांना बक्षिसे देण्यात आली.

वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने विविध निवडक दालनांमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी 'मटा बिग रिवार्ड शॉपिंग फेस्टिव्हल'मध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. मागील चार महिन्यांपासून हा उपक्रम राबविण्यात आला. ५०० रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या योजनेचे कुपन देण्यात आले होते. त्या-त्या दालनात ठेवलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये जमा झालेल्या कुपनपैकी काही भाग्यवंतांची नावे जाहीर करण्यात येत आहे.

यावेळी 'इंटेरियर बझार'चे संचालक अब्दुल रऊफ यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. 'इंटेरियर बझार'चे स्टोअर मॅनेजर जहीर मुन्शी यांच्यासह मोठ्या ग्राहकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाला ३० हजार रुपयांना लुटले

$
0
0

तिघांविरोधात गुन्हा दाखल, एकास अटक

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका तरुणाला तीन आरोपींनी ३० हजार रुपयांना लुटल्याची घटना पुंडलिकनगर भागातील एस. आर. पेट्रोलपंपासमोर बुधवारी (२५ नोव्हेंबर) रात्री घडली. यापैकी एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले असून शेख तरबेज सिंकदर अली (२३, हुसेन कॉलनी) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर मुंबईत खुनाचा आरोप आहे.

कुशनचे काम करणारे नामेदव व्यंकटराव जमदाडे (वय ३२, रा. हनुमाननगर गल्ली क्र.पाच) हे पुंडलिकनगर येथील एस. आर.पेट्रोलपंपासमोर बुधवारी रात्री पानटपरीवर उभे होते. सिगारेट घेण्यासाठी त्यांनी खिशातून पैशांचे बंडल काढले. नंतर ते घराकडे निघाले असता शेख तबरेजने दोन मित्रांसह त्यांचा पाठलाग केला. तिघांनी त्यांना मारहाण सुरू केली. शिवीगाळ करून त्यांच्या खिशातील ३० हजार रूपये हिसकावले. यानंतर तिघे पसार झाले. घटनेची माहिती समजताच मुकुंदवाडी ठाण्याचे उपनिरीक्षक कल्याण शेळके, शेख हारूण, प्रकाश सोनवणे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादीकडून संशयित आरोपीची माहिती घेत त्यांनी आरोपीचा परिसरात शोध सुरू केला. त्यावेळी एका हॉटेलजवळ आरोपींपैकी तबरेज पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. तर अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

मोबाइल लंपास

शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या वसतिगृहातून विद्यार्थ्याचा मोबाइल चोरीला गेला. ही घटना बुधवारी घडली असून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्वप्निल गजाजन मालनकर असे फिर्यादीचे नाव आहे. स्वप्निल हा वसतिगृहात शेजारच्या खोलीत मित्राकडे गेला असता ही संधी साधत चोरट्याने ५ हजार रुपये किंमतीचा मोबाइल लंपास केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारुच्या बाटलीने डोके फोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दारू न दिल्याने रागाच्या भरात आरोपीने दारुच्या बाटलीने मित्राचे डोके फोडले. मोगलपुरा, कोहिनूर कॉलनी परिसरात मंगळवारी ही घटना घडली. याप्रकरणी बेगमपरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख जावेद शेख गालीब (वय ३८, रा. मोगलपुरा कोहिनूर कॉलनी ) असे फिर्यादीचे नाव आहे. शेख जावेद हे मंगळवारी राहत्या घरी सैय्यद अनिस (रा.सदर) या मित्रासह मद्यप्राशन करत बसले होते. काही वेळानंतर सैय्यद याने पुन्हा दारुची मागणी केली, पण दारू नसल्याने शेख जावेदने त्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या सैय्यद याने फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण केली तसेच काचेची रिकामी बाटली डोक्यावर मारून शेखला जखमी केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप-लेकांस जन्मठेप

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

फिर्यादीच्या पुतणीची छेडछाडीच्या कारणावरून करण्यात आलेल्या सशस्त्र हल्ल्यामुळे झालेल्या खूनप्रकरणात सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी आरोपी पिता पुत्राला जन्मठेप आणि चौदा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

पैठण तालुक्यातील वरुडी गावचे सुभाष लक्ष्मण सदावर्ते यांनी एमआयडीसी पैठण पोलिस स्टेशनमध्ये आरोपी मनोहर उत्तम सदावर्ते (२०), उत्तमराव मारुती सदावर्ते (५०) व जिजाबाई उत्तम सदावर्ते (४२, तिघे रा. वरूडी, ता. पैठण) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यानुसार ४ जून २०१२ रोजी उत्तररात्री २ वाजता आरोपी मनोहर सदावर्ते व इतर दोघा जणांनी फिर्यादीच्या पुतणीचा हात धरून छेडछाड केली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पैठण पोलिस स्टेशनमध्ये आरोपी व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध तक्रार दिली होती. या भांडणाच्या कारणावरून २ जुलै २०१२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी सुभाष, त्याचा भाऊ अशोक, आई कांताबाई, मीराबाई अशोक सदावर्ते असे सर्वजण जेवण करण्यासाठी ओट्यावर बसलेले असताना आरोपी मनोहर दारू प्राशन करून आला आणि फिर्यादी व त्याच्या कुटुंबीयांना जुन्या वादावरून शिवीगाळ करू लागला.

याबाबत फिर्यादीने जाब विचारला असता मनोहरने दोघांची गचांडी पकडली. त्यावेळी मनोहरचे वडील उत्तम सदावर्ते हातात दोन गुप्त्या घेऊन आले. त्यापैकी एक गुप्ती त्यांनी मनोहरच्या हातात दिली. त्या गुप्तीने त्याने फिर्यादी व इतरांवर सशस्त्र हल्ला केला. त्याचवेळी आरोपीची आई जिजाबाई घटनास्थळी आली व तिने फिर्यादीच्या कुटुंबीयांना चापट बुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत अशोक बेशुद्ध झाला. तसेच कांताबाई, मीरा जखमी झाल्या. बेशुद्ध अशोकला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याबाबत सुभाषने दिलेल्या फिर्यादीवरून सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. एम. कदम यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध कलम ३०२, ३०७, ३२६, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्याच्या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त लोक अभियोक्ता सुदेश टी. शिरसाठ यांनी १३ जणांच्या साक्षी नोंदविल्या. यामध्ये फिर्यादी सुभाष, मीराबाई, डॉक्टरांचे जवाब महत्त्वाचे ठरले. कोर्टाने आरोपी मनोहर उत्तम सदावर्ते व उत्तम लक्ष्मण सदावर्ते यांना भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप, प्रत्येकी पाच हजार रुपये दंड; तसेच कलम ३२६ अन्वये १० वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images