Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

५० अतिक्रमणांवर नांगर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्यावसायिकांचा विरोध, राजकारण्यांचा दबाव झुगारून सिडकोतील उच्चभ्रू कॅनॉट प्लेस मार्केटमधील ५० दुकाने, व्हीआयपी हॉटलांचे अतिक्रमण महापालिकेच्या पथकाने गुरुवारी काढले. या कारवाईनंतर खऱ्या अर्थाने कॅनॉट प्लेसने मोकळा श्वास घेतला.

कॅनॉट प्लेसच्या मार्केटमध्ये सिडको प्रशासनाने व्यावसायिकांना दुकाने विकली आहेत. मूळ दुकानांचे क्षेत्रफळ तुलनेने कमी आहे, दुकानासमोरचा परिसर खुला ठेवण्यात आला आहे. मार्केटमध्ये खरेदीसाठी येणाऱ्यांना तेथे फिरता यावे, खरेदी करता यावी हा त्यामागचा उद्देश होता. मात्र, बहुतेक व्यावसायिकांनी दुकानांच्या समोरचा खुला परिसर गिळंकृत केला होता, त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या व्यक्तींना मार्केटमधील मुख्य रस्त्यांवरून फिरावे लागत होते. बहुतेक व्यावसायिकांनी आपल्या मूळ दुकानांच्या पुढच्या भागात शेड उभारून दुकानाचे क्षेत्रफळ वाढवले होते. त्या संदर्भात अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी झाल्या, पण जुजबी कारवाई करण्यापलीकडे महापालिकेने काहीच

केले नाही.

सुनील केंद्रेकर यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाची सूत्रे आल्यावर गुरुवारी या भागात धडक कारवाई करण्यात आली. कारवाईचे नेतृत्व उपायुक्त रवींद्र निकम यांनी केले. दोन जेसीबी, मोठा कर्मचारी वर्ग व पोलिसांच्या ताफ्यासह पालिकेचे पथक कॅनॉट परिसरात दाखल झाले. दुकानांच्या समोरचे फूटपाथ महापालिकेच्या पथकाने रिकामे केले. या कारवाईदरम्यान वाय झेड फोर्ड कंपनीच्या शोरुमचे कार्यालय पाडण्यात आले. हे कार्यालय फूटपाथवर थाटण्यात आले होते. याशिवाय व्हीआयपी मराठा हॉटेल, मराठा हॉटेल, शिवा हॉटेलचे अतिरिक्त बांधकाम पाडण्यात आले. हे बांधकाम पाडताना काही राजकीय व्यक्तींनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण या दबावाला पालिकेच्या पथकाने जुमानले नाही.

चायनीज खाद्यपदार्थ तयार करून त्याची विक्री करणाऱ्या हॉटेल्सची अतिरिक्त बांधकामे देखील पाडण्यात आली. सुमारे पन्नास हॉटेल्स व दुकानांवर कारवाई करण्यात आल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. पालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या कारवाईत टीन शेड, पत्र्यांचे कंपाउंड वॉल, दुकानांचे ओटे, खुर्च्या, स्टँड, कुलर, डिजिटल बोर्ड, कमान आदींवर कारवाई करण्यात आली व ते हटवण्यात आले.



सिडकोला पत्र देण्याचे आदेश

कॅनॉट प्लेस ही सिडकोची मालमत्ता आहे. सिडको प्रशासनाने काही दुकाने मालकी हक्कावर तर, काही दुकाने लीजवर विकली आहेत. मालमत्तांवर सिडकोचाच ताबा आहे. सिडकोच्या मालमत्तेचा व्यावसायिकांनी गैरवापर केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, असे पत्र सिडको प्रशासनाला द्या, अशी सूचना आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांना केली आहे. निकम यांनी पत्र दिल्यावर जागेच्या गैरवापराबद्दल सिडको प्रशासन व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेला २० हजारांचा भुर्दंड

$
0
0


औरंगाबाद ः वारंवार नोटीस बजावूनही हरित लवादापुढे महापालिका आयुक्त हजर न झाल्याने लवादाने वॉरंट बजावले होते. हे वॉरंट रद्द करण्यासाठी पालिकेला २० हजार रुपयांचा भुर्दंड बसला. हे पैसे येथील वनसंरक्षकांना चार आठवड्यात देण्याचे आदेश लवादाने पालिकेला दिलेत. पैशांचा विनियोग वनीकरणासाठी करण्याचे निर्देशही दिले.

तक्रारदार विवेक शेषराव ढाकणे यांनी लवादाकडे धाव घेऊन पगारिया कॉलनी परिसरात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरुद्ध दाद मागितली आहे. या प्रकरणात पालिका आयुक्त बेजबाबदार वागल्यामुळे लवादाने नाराजी व्यक्त केली होती. नोटीस बजावूनही आयुक्त उत्तर देत नाहीत. शासनाचे अधिकारी कोर्टाचा अनादर करतात. हे वारंवार घडते, अशा शब्दांत लवादाने नाराजी व्यक्त केली. वॉरंट रद्द करण्यासाठी पालिकेतर्फे लवादापुढे अर्ज करण्यात आला. २३ नोव्हेंबर रोजी लवादाचे न्या. व्ही. आर. किनगावकर व तज्ञ्ज सदस्य अजय देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी कोर्टात हजेरी लावून शपथपत्र दाखल केले. आधीच्या आदेशांचे पालन पालिकेने केले नाही ही दुर्दैवाची बाब आहे, असे मत व्यक्त करून वॉरंट रद्द केले. पालिकेची बाजू जे. एम. मुरकुटे यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला स्वच्छतागृहांची वाईट अवस्था

$
0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद

'सार्वजनिक स्वच्छता स्थळे

प्रसन्नता तिथे मिळे'

प्रवाशांनी गजबजलेल्या सिडको बसस्थान‌कातला हा सुविचार वाचायला अत्यंत चांगला वाटतो, पण या सुविचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड द्यायला मात्र एसटी महामंडळ विसरले. प्रवाशांना स्वच्छता राखा, असे आवाहन करणारे महामंडळ इथल्या महिला स्वच्छतागृहाविषयी कोणत्याच प्रकारची काळजी घेत नाही. पाय टाकताच भोवळ आणणारे हे स्वच्छतागृह व स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या औरंगाबादची वास्तविकता तात्काळ नजरेसमोर आणते. वर्षानुवर्षे महिला प्रवाशांची ही थट्टा एसटी महामंडळाच्या आवारात चालते तरीही प्रशासनाला याचे गांर्भीय नाही आणि सुविधा न देताही संबंधित एजन्सी महिला प्रवाशांकडून पैसे आकारते. यामुळे महिला प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

औरंगाबादमध्ये सध्या विविध नागरी समस्यांवर काम सुरू आहे. स्मार्ट सिटीचा आपल्या सोयीने अर्थ लावला जात असला तरी कुठल्याही शहराला आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा स्मार्ट सिटीमध्ये अपेक्षित आहेत, पण सिडको बसस्थनाकतील महिला स्वच्छतागृहात प्रवेश करताच स्मार्ट सिटीचे स्वप्न हवेतच विरून जाते. सुलभ इंटरनॅशनल सोशल ऑर्गनायजेशन, महाराष्ट्र ही एजन्सी या सुलभ शौचालय व स्नानगृह संकुलाचे काम बघते. एजन्सीने इथले व्यवस्थापक म्हणून पुरुष कर्मचारी ठेवले आहेत. वास्तविक इथे महिला कर्मचारीही काम बघू शकतात. पुरुष कर्मचारी पाहून महिला संकोचतात व भिंतीचा आडोसा घेतात. यामुळे दिवसा पुरुषांच्या नजरा चुकवायच्या तर रात्रीच्या वेळी महिलांना वाईट प्रसंगांचा सामना करावा लागतो. महिलांना येणाऱ्या अडचणी व त्यांच्या आरोग्याबाबत एसटी महामंडळाला काहीच घेणे देणे नाही, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट ती कोणती ? नुकतेच महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. ‌आपल्या महिला कर्मचाऱ्यांनाच दुजाभाव देणाऱ्या महामंडळाची महिला प्रवाशांबाबतची भूमिकाही नकारात्मकच दिसून येते.

सिडको बसस्थानकातील महिला स्वच्छतागृहाचे काम सुरू आहे, पण स्वच्छतागृहाची सफाई ही एजन्सीने करायलाच हवी. आम्ही विभागीय स्तरावर याबाबत चौकशी करू व एजन्सीलाही जाब विचारू. कोणत्याच सुविधा न देता एजन्सी महिला प्रवाशांकडून दर आकारत असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे. एजन्सी दोषी आढळली तर थेट कारवाईही करू. - आर.एन.पाटील, विभाग नियंत्रक

मी दररोज औरंगाबाद ते जालना अपडाऊन करते. सिडको बसस्थानकातल्या महिला स्वच्छतागृहाची अवस्था खूप वर्षांपासून अशीच आहे. माझे घर जवळ असल्याने फार अडचण येत नाही, पण दूरचा प्रवास करणाऱ्या सहप्रवासी महिलांची फजिती मी कायमच पाहते. या स्वच्छतागृहांमध्ये प्रशासनाने लवकरात लवकर सुधारणा करणे गरजेचे आहे, असे मला वाटते. - माया राऊत, महिला प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत डॉक्टरांचे ‘काम बंद’ आंदोलन

$
0
0

औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) निवासी डॉक्टरांनी गुरुवार (२६ नोव्हेंबर) रोजी विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून आंदोलन केले. अत्यावश्यक सेवा डॉक्टरांनी दिल्या, परंतु ओपीडीमध्ये मात्र काम केले नाही. यामुळे आंदोलनाचा फारसा प्रभाव रुग्णालयावर पडला नाही.

जुलैमध्ये शासनाने मागण्यांबाबत दिलेले आश्वासन नोव्हेंबर संपत आला तरी पाळले नाही, नागपूर येथील प्रकरणाबाबत संबंधित पीजी गाइडवर कारवाई करा अशा मागण्यासांठी सेंट्रल मार्ड संघटनेतर्फे गुरुवारी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार औरंगाबादमध्येही हे आंदोलन करण्यात आले. निवासी डॉक्टारांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर यांनी मटाशी बोलताना सांगितले की, निवासी डॉक्टर ओपीडला आले नाहीत, परंतु अत्यावश्यक सेवांमध्ये त्यांनी खंड पडू दिला नाही.

परिणाम जाणवला नाही

निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून दिवसभर काम केल्याचे संघटनेचे सचिव डॉ. विकास राठोड यांनी मटाशी बोलताना सांगितले. बाह्यरुग्ण विभागात मात्र निवासी डॉक्टर न आल्याने काहीवेळ रुग्णांना ताटकळत बसावे लागले. रुग्णांची गैरसोय झाली. असे असले तरी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू होत्या. यावर बहिष्कार नसल्याने एकूणच रुग्णसेवेवर फारसा परिणाम जाणवला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळासाहेब ठाकरे महामार्ग धोक्याचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतिचौक ते रेल्वे स्टेशन हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महामार्ग महाधोक्याचा रस्ता झाला आहे. वर्षभरापूर्वी नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला हा रस्ता आता अपघाताला अमंत्रण देणारा ठरत आहे. मूळ आराखड्यानुसार काम झालेले नसल्यामुळेर्सता कुठे रूंद तर कुठे अरूंद असे चित्र आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांपेक्षा कंत्राटदाराच्या मर्जीने तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

महापालिकेने क्रांतिचौक ते रेल्वे स्टेशन हा रस्ता अत्यंत प्रतिष्ठेचा बनवला होता. तत्कालीन सभापती विकास जैन यांनी हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा व्हावा, यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. शिवसेनेचे उपनेते, खासदार चंद्रकांत खैरे यांनी या रस्त्यासाठी वेळोवेळी पालिकेच्या यंत्रणेला जाब विचारला व रस्त्याचे काम वेगात पूर्ण करण्यासाठी आग्रह धरला. सुरुवातीला या रस्त्याला डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे नाव देण्यात आले. पुढे ते बदलून 'बाळासाहेब ठाकरे महामार्ग' असे करण्यात आले. कागदोपत्री हा रस्ता १२० फूट रूंद, सहा पदरी आहे. चार पदर सिमेंट काँक्रिटचे तर, दोन डांबरीकरणाचे आहेत. रस्ता दुभाजकापासून दोन्ही बाजचे पहिले दोन पदर सिमेंटचे, तर त्यानंतरचा एक - एक पदर डांबराचा असे नियोजन करण्यात आले. या कामासाठी २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापैकी १६ कोटी रुपये वित्त आयोगाच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आले. उर्वरित सात कोटी रुपयांचा रस्ता डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून करण्यात आला आहे. 'जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर' या कंपनीला रस्त्याचे काम देण्यात आले. 'क्रिएशन इंजिनीअर्स' या संस्थेला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट (पीएमसी) म्हणून नियुक्त करण्यात आले.

रस्त्याचे काम निकषानुसार होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी महापालकेने 'पीएमसी'वर टाकण्यात आली. रस्त्याची सध्याची अवस्था लक्षात घेता कंत्राटदाराने स्वतःच्या मर्जीनेच काम केल्याचे दिसून येते. महापालिका आणि 'पीएमसी'ला त्याने अलगद बाजूला ठेवल्याचे चित्र आहे.



स्पीड ब्रेकरच्या पट्ट्या तुटल्या

हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा असल्यामुळे सुसाट झाला आहे. वाहने वेगाने चालण्याची स्पर्धाच अनेकवेळा वाहनचालकांमध्ये लागते. त्यामुळे काही महिन्यांपासून अपघातांचे प्रमाण वाढले होते. या रस्त्यामुळे तीन जणांचे प्राण गेले. त्यानंतर महापालिकेला जाग आली. कंत्राटदाराने जागोजागी प्लास्टिकचे स्पीड ब्रेकर बसविले. आता हे स्पीड ब्रेकरच अनेक ठिकाणी 'ब्रेक' झाले आहेत. शिवाय, काही ठिकाणी हे स्पीड ब्रेकर अपुरे आहेत. डांबरी रस्त्यावर स्पीड ब्रेकर नाहीत, त्यामुळे सिमेंटच्या रस्त्यावरील स्पीड ब्रेकर टाळण्यासाठी वाहनचालक डांबरी रस्त्यावरून वाहने दामटतात आणि छोटे मोठे अपघात होतात. उस्मानपुरा चौकातून संत एकनाथ रंगमंदिराकडे वळतानाच्या रस्त्यावर गरज असतानाही तेथे मात्र स्पीड ब्रेकर लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या चौकात रोज चार-पाच अपघात होत आहेत. याकडे पालिकेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

अडीच किलोमीटरच्या या संपूर्ण रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी मात्र कोणतीच सुविधा देण्यात आली नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथ बांधण्याची मूळ कंत्राटात तरतूद आहे, पण फुटपाथ फक्त कंत्राटदाराच्या हॉटेललगतच आहेत. फुटपाथअभावी पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरूनच त्यांना चालावे लागते. त्यामुळे वाहनांची धडक लागून पादचारी जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणांची कोठेही नोंद होत नाही. संपूर्ण रस्त्यावर कुठेही ठळकपणे झेब्रा क्रॉसिंग करण्यात आलेले नाही. त्यामुळे १२० फुटांचा रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांची अक्षरशः दमछाक होते. केव्हा कोणते वाहन अंगावर येईल याचा नेम नसल्यामुळे जीव मुठीत घेऊनच त्यांना रस्ता ओलांडावा लागतो.

या रस्त्याचे भूसंपादन रखडल्यामुळे काही भागात रस्ता १२० फुटांचा तर, काही भागात ७० ते ८० फुटांचाच आहे. अनेक मालमत्तांचा ताबा मिळणे पालिकेला सहज शक्य आहे, पण त्यासाठी पालिकेने प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. रेल्वे प्रशासन रस्त्यासाठी महापालिकेला जागा देण्यास तयार आहे. त्याविषयी अनेक वेळा बैठकाही झाल्या, पण त्यातून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काहीच मार्ग काढलेला नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या परिसरात रस्ता अरुंद झाला आहे. उस्मानपुरा चौकातील काही दुकाने व कार्यालयेही रस्ता रुंदीकरणात बाधित होतात, पण त्या ताब्यात घेण्यासाठी कोणत्याही हालचाली महापालिकेने न केल्यामुळे तो विषय मागे पडला आहे.

विजेचे खांब शोभेचे

रस्त्याच्या दुभाजकामध्ये खांब उभारण्यात आले आहेत, पण त्यावर दिवे लावण्यात आलेले नाही. तीन खांबांवर टेस्टिंगसाठी दिवे लावण्यात आले आहेत. दोन-तीन महिन्यांपासून टेस्टिंगच सुरू आहे. खांबांवर दिवेच नसल्यामुळे रस्ता पूर्णपणे काळोखात बुडतो.

या रस्त्याचे काम तीन वर्षांपासून सुरूच आहे. योग्य प्रकारे काम न झाल्यामुळे रस्ता धोकादायक झाला आहे. पद्मपुरा भागातील दोघांचे गेल्याच आठवड्यात म्हाडा कॉलनीसमोर अपघातात निधन झाले. त्यापूर्वी तीन जण दगावले. या रस्त्याचे काम किती जणांचा बळी घेणार आहे, असा प्रश्न निर्माण होतो. पूर्ण रुंदीचा रस्ता नाही, साइड ड्रेन नाहीत, जागोजागी दुभाजक बंद करून ठेवले आहेत. दिवे सुरू नाहीत अशा अनेक समस्या या रस्त्यावर आहेत. पालिकेचे अधिकारी मात्र त्याकडे लक्ष देत नाहीत.

- विजय वाघचौरे, माजी सभापती.

क्रांतिचौक ते रेल्वे स्टेशन हा ऐतिहासिक रस्ता आहे, पण त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. रस्त्याचे काम कसे सुरू आहे, हे पाहण्यासाठी अधिकारी येतच नाहीत. रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून वारंवार विनंती केली, पण त्याकडे लक्ष देत नाही. विजेचे खांब, ड्रेनेज लाइन, पाण्याची लाइन, डीपी हटविणे ही सर्व कामे टेंडरमध्ये आहेत, पण यापैकी कोणतेही काम झालेले नाही. या रस्त्यावर चार ते पाच जणांना जीव गमवावा लागला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पीएमसीवर अवलंबून न राहता स्वतः रस्त्यावर यावे व काम पूर्ण करून घ्यावे. आयुक्त केंद्रेकर यांनी या कामात लक्ष घातल्यास नागरिकांना दिलासा मिळेल. - विकास जैन, नगरसेवक व माजी सभापती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादेत सहकाराचा ‘उद्धार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यातील २४७५ संस्थांपैकी तब्बल ९०४ संस्था या केवळ कागदोपत्रीच असल्याचे सहकार विभागाने केलेल्या तपासणीमध्ये स्पष्ट झाले आहे. तर १४ सहकारी संस्था या पत्यावर नसल्याचेच आढळून आले आहे.

महाराष्ट्रातील १ लाख ८२ हजार संस्थांपैकी सुमारे ४९ हजार ३०४ सहकारी संस्था या केवळ कागदोपत्रीच असल्याचे सहकार खात्याने केलेल्या तपासणीमध्ये उघड झाले आहे. ठावठिकाणा नसलेल्या व बंद अवस्थेतील या सर्व संस्थांची नोंदणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रद्द करण्यात येणार आहे.

राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या आदेशानुसार ही तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. उस्मानाबाद जिल्ह्यात ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये या जिल्ह्यातील नोंदणीकृत २४७५ संस्थांपैकी ९०४ संस्था या केवळ कागदोपत्रीच असल्याचे उघड झाले आहे. शिवाय १४ सहकारी संस्थांचा थांगपताच नाही, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक एस. पी. बडे यांनी दिली.

अनेक संस्थांचे ऑडिट अहवाल न आल्याने या संस्थांच्या अस्तित्वाबद्दल सहकार खात्याला शंका होती. त्या पार्श्वभूमीवर सहकार खात्याने या संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्याची मोहीम १ जुलै २०१५ रोजी हाती घेतली होती. या तपासणी पथकातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष संस्थांना भेट देऊन ऑडीट झाले का, नियमाप्रमाणे संचालक मंडळाच्या निवडणुका होतात, का संचालक मंडळावर कोण कोण आहेत, तसेच संस्थेच्या कारभाराचा प्रकार आदीची इत्यंभूत माहिती घेतली. त्याप्रमाणे बंद अवस्थेत व कार्यरत नसलेल्या संस्थांची माहीती शोधून काढली. कार्यरत नसलेल्या संस्थांना नोटीस बजावण्याचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातुरात भाजपची सरशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूर जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चार पैकी जळकोट आणि देवणी या दोन जागी भाजपने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसला चाकुरात नशिबाने साथ दिली तर काँग्रेसला शिवसेनेने जीवदान दिले. शिरुर अनंतपाळमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीने सत्ता मिळवली आहे.

चाकुर नगर पंचायतीचे अध्यक्षपद अनुसुचित जातीसाठी आरक्षीत होते. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिलिंद महालिंगे यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी भाजप आणि विनायकराव पाटील मित्रमंडळाने काँग्रेस आघाडीच्या विरोधातील संख्याबळासाठी शिवसेनेला उपाध्यक्षपदासाठी बिनशर्त पाठिंबा केला होता. परंतु, आमदार विनायकराव पाटील आणि माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या राजकारण्यात पडायचे नाही असे सांगत शिवसेना सदस्य मतदानाला गैरहजर राहिले. त्याचा फायदा काँग्रेसच्या विलास पाटील यांना झाला.

शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपानगराध्यक्षपदी अनुक्रमे महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले. अध्यक्षपदी भाग्यश्री देवंग्रे तर उपाध्यक्षपदी संतोष शेट्टे यांची निवड झाली. जळकोट नगराध्यक्षपदी भाजपचे व्यंकट तेलंग आणि उपाध्यक्षपदी किशन धुळशेट्टे यांची निवड झाली. देवणी नगर पंचायतीमध्ये भाजपने महाराष्ट्र विकास आघाडीशी युती करून अध्यक्षपद ताब्यात ठेवले. या ठिकाणी भाजपच्या विद्यावती मानसुरे आणि उपाध्यक्षपदी अंजली जीवणे या विजयी झाल्या आहेत.

बीडमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व

बीड जिल्ह्यातील चार नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या निवडी शुक्रवारी पार पडल्या. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे चार पैकी तीन नगर पंचायतीचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर एक ठिकाणी भाजपकडे आले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तीन नगरपंचायतीत राष्ट्रावादी काँग्रेसने बहुमत प्राप्त केले होते.

आष्टी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी नवाब खान बिनविरोध निवडून आले. तर उपाध्यक्षपदी शकुंतला सुरवसे यांची निवड झाली. पाटोदा नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी मनीषा पोटे या १३ विरूद्ध चार मते मिळवून निवडून आल्या. तर उपाध्यक्षपदी मज्जिद खान पठाण यांची निवड झाली. शिरूर नगर पंचायतीच्या अध्यक्षपदी रोहिदास पाटील निवडून आले तर उपाध्यक्षपदी बाबुराव झिरपे यांची निवड झाली.

भाजपच्या ताब्यात आलेल्या वडवणी नगर पंचायतीच्या अध्यक्षपदी मंगला राजाभाऊ मुंडे निवडून आल्या. तर उपाध्यक्षपदी वर्षा वारे यांची निवड झाली. या निवडी झाल्यानंतर वडवणी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेकडून दुष्काळी भागाची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचतात की नाही याचे ऑडिट सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेकडून करण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सेनेच्या आठ आमदारांचे पथक शनिवार व रविवारी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहे.

शिवसेनेच्या या पथकाकडून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचतात की नाही याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील पाणी पुरवठा, रेशनिंग वाटप, रोहयोची उपलब्ध कामे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, सुरू असलेल्या चारा छावण्याचा आढावा या शिवसेनेच्या पथकाकडून घेतला जाणार आहे.

दोन दिवस आढावा घेऊन झाल्यानंतर या सर्व परिस्थितीचा आढावा सेनेचे पक्षप्रमुख उद्ध्रव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर उपाययोजना करण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्याबारोबरच ग्रामीण भागातून होणारी स्थलांतर रोखणे गरजेचे आहे. यासाठी मागेल त्याला काम, पिण्यासाठी पाणी, जनावराला चारा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत असलेल्या शिवसेनेच्या पथकाकडून या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन त्यासाठीच्या उपाययोजना केल्या तरच शिवसेनेचा हा दुष्काळी भागाचा दौरा फलदायी ठरेल.

जनतेची कामे खोळंबली

चार दिवसांपूर्वी झालेला केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानंतर आता शिवसेना स्वतंत्रपणे दुष्काळाची पाहाणी करणार असल्यामुळे प्रशासनातील अधिकारी वैतागले आहेत. वारवार येणारे पथक उच्चपदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना माहिती देण्यात अधिकाऱ्यांचा वेळ वाया जात आहे. त्याचा परिणाम प्रशासनातील अन्य कामावर होत आहे. जनतेची कामे खोळंबू लागली आहेत.

शिवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांना मदत

शिवसेनेच्यावतीने मराठवाड्यातील दुष्काळ, आपत्ती आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनो शिवसेना आपल्या पाठिशी आहे, आत्महत्या करू नका लढायला शिका अशी साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे घालणार आहेत. रविवारी (२९ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता मल्टीपर्जज मैदान वजीराबाद येथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला शेतकरी बांधव तसेच शिवसैनीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार हेमंत पाटील यांनी केले आहे.

सिडको येथील साहेबराव मामीलवाड यांच्या निवासस्थानी आमदार हेमंत पाटील, सेना जिल्हाप्रमुख भूजंग पाटील, तालुकाध्यक्ष बोंढारकर, शहरप्रमुख वैजनाथ देशमुख, राजु गोरे, गंगाधर बडवणे यांच्या उपस्थितीमध्ये सेना पदाधिकारी व शिवसैनीकांत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे संचलन साहेबराव मामीलवाड यांनी केले. यावेळी आमदार पाटील यांनी सेना पक्ष मजबुती त्यासोबतच सेना ही सर्वसामान्य आणि शेतकरी बांधवांसाठी काम करणारी संघटना आहे. त्यामुळेच ज्या बळीराजावर आज संकट आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिग्रहणावर सर्वाधिक खर्च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाड्यासाठी डिसेंबरपर्यंतचा टंचाई आराखडा शासनाकडे पाठवण्यात आला असून, आराखड्यात सर्वाधिक ४४ कोटी रुपये खर्च टँकर व खासगी विहीर अधिग्रहणासाठी करण्यात येणार आहे.

मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पावसाळ्यानंतरही अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्यात ही परिस्थिती बिकट होण्याची शक्यता असून, प्रशासनाने टंचाई निवारणासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा ६१ कोटी ६८ लाख रुपयांचा टंचाई आराखडा शासनाकडे पाठविला आहे. आराखड्यामध्ये सर्वाधिक खर्च टँकरवर करण्याचे नियोजन आहे. यासाठी औरंगाबाद जिल्ह्यासाठी ३ कोटी ७६ लाख, जालना १ कोटी, परभणी १ कोटी ६८ लाख, हिंगोली ६४ लाख, नांदेड ६ कोटी ६८ लाख, लातूर २ कोटी २९ लाख तर, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी २ कोटी ३१ लाख रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे.

खासगी विहीर व विंधन विहीर अधिग्रहणासाठी १५ कोटी ८८ लाख पैकी औरंगाबाद जिल्ह्यासाठी ३३ लाख ३७ हजार, जालना १७ लाख ४० हजार, परभणी १ कोटी ५० लाख, हिंगोली ५१ लाख ८४ हजार, नांदेड २ कोटी ६५ लाख, बीड २ कोटी ८४ लाख, लातूर ३ कोटी ५७ लाख तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ४ कोटी २७ लाख रुपयांचा निधीचे नियोजन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने केलेल्या कृती आराखड्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा, खासगी विहीर, बोअर घेणे, नळ योजना विशेष दुरुस्ती, नवीन विहिरी घेणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना, विहिरी खोल करणे, तात्पुरती पाणीपुरवठा योजना दुरुस्ती आदी उपाययोजना सुचविल्या आहेत.

नांदेड १७ कोटी ५९ लाख १२ हजार

बीड १४ कोटी २२ लाख ३८ हजार

लातूर ७ कोटी ५० लाख ९४ हजार

उस्मानाबाद ७ कोटी ८ लाख ९७ हजार

औरंगाबाद ६ कोटी ९८ लाख ४५ हजार

परभणी ३ कोटी ३९ लाख ३९ हजार

जालना १ कोटी ८० लाख ४४ हजार

एकूण ६१ कोटी ६८ लाख ६२ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौलताबादला बायपास तयार करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'दौलताबादला पर्यायी वळण रस्ता तयार करा,' अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. सोलापूर-औरंगाबाद-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर दौलताबाद किल्ला परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी खैरे यांनी हा पर्याय सूचवला आहे. दरम्यान, हा प्रस्ताव वार्षिक अहवालात जोडण्याच्या सूचना गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सोलापूर-औरंगाबाद-धुळे या राष्ट्रीय महामार्गार औरंगाबाद ते धुळे या दरम्यान अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. यामध्ये दौलताबादचा ऐतिहासिक किल्ला, वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिरासह भद्रामारोती, सुलीभंजन परिसरचा समावेश आहे. देश- विदेशातील पर्यटक, भाविकांसह स्थानिक जिल्ह्यातील लोकही याच मार्गाचा वापर करतात. दौलताबाद किल्ला परिसरातील प्रवेशद्वारातून राष्ट्रीय महामार्ग जातो. हा मार्ग दुपदरी आहे. मात्र, प्रवेशद्वार अरूंद असल्यामुळे परिसरात ट्रक आणि पर्यटकांच्या गाड्यांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या असतात. ही कोंडी सुटण्यासाठी तीन-चार तास लागतात. यामुळे सध्या राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाकडून सोलापूर-धुळेराष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणचे काम सुरू केले आहे. तेव्हा या चौपदरी रस्ता रुंदीकरणामध्ये दौलताबाद परिसरात बायपासची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे. ही मागणी मान्य न झाल्यास या भागातील पर्यटकांवर परिणाम होण्याची भीती आहे.

पाहणी

साडेतीन किलोमीटरच्या दौलताबाद बायपास निर्मितीसाठी २१ कोटी १९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसा प्रस्ताव यापूर्वी राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणला दिला आहे. त्यामुळे या भागाची तत्काळ पाहणी करण्याचे आदेश गडकरींनी दिले. प्राधिकरणचे अधिकारी शनिवारी खासदार खैरे यांच्या समवेत या बायपासची पाहणी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना वीज बिल सक्ती नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील बहुतेक गावांमध्ये यंदा कमी पावसाने दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पन्नासपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांतील शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिलाची वसुली करू नये. त्यांची वीज तोडू नये, असे आदेश राज्य शासनाने महावितरणाला दिले आहेत. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना वीज बिलात ३३.५ टक्के सूट देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील गावांमध्ये पाण्याअभावी हातची पिके गेली आहेत. औरंगबााद जिल्ह्यातील पैठण आणि सिल्लोड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे आत्महत्या केली आहे. दुष्काळाची प‌रिस्थिती गंभीर असल्याने शेतकऱ्यांवरील वीज बिलाचा ताण कमी करण्यासाठी राज्यात पन्नासपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये वीज बिलासाठी सक्ती न करण्याचे आदेश महावितरणने मुख्य अभियंता कार्यालयाला दिले आहेत. त्याचबरोबर या गावांतील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बिन न भरल्याच्या कारणावरून खंडित करू नये, असे आदेशही दिले आहेत. दुष्काळग्रस्त गावांच्या वीज बिलाचे ३३.५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकित रक्कमेचा बोजा कमी करण्यासाठी सरकार व महावितरण कंपनीने कृषी संजीवनी योजनेला मार्च २०१६पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी ३१ मार्च २०१४च्या मूळ थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरणा केल्यास ५० टक्के रक्कमेच्या थकबाकीसह व्याज व दंडाची रक्कम माफ करण्यात येणार आहे. १ एप्रिल २०१४नंतर वितरित करण्यात आलेल्या चालू वीज बिल भरावे लागेल. कृषी ग्राहकांना वीज बिल भरण्यासंबंधी सुलभ हफ्ते आवश्यक असल्यास ही मुभा मार्च २०१६पर्यंत देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या ५ वर्षातील कामांची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत गेल्या पाच वर्षांत करण्यात आलेली विविध कामे चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहेत. या कामांची माहिती आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मागवली आहे. या माहितीच्या आधारे योग्य प्रकारे चौकशी झाली तर, काही अधिकारी, ठेकेदार गळाला लागण्याची शक्यता आहे.

आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यावर सुनील केंद्रेकर यांनी महापालिकेला शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिस्त लावण्याबरोबरच भ्रष्टाचार निपटून काढण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. महापालिकेच्या अभियंता विभागाकडून गेल्या पाच वर्षांच्या काळात शहरात विविध कामे करण्यात आली. त्यात प्रामुख्याने रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. त्याच प्रमाणे ड्रेनेज लाइन, जलवाहिनी बदलण्याची कामेही मोठ्या प्रमाणावर झाली. फुटकळ कामांच्या नावाखाली वॉर्डा-वॉर्डांमधून अनेक कामे करण्यात आली. मात्र, त्यांचा दर्जा राखण्यात आला नाही. त्यामुळे तीच ती कामे पुन्हा करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. नव्याने निवडून आलेले नगरसेवकही तीच ती कामे करण्याचा आग्रह अधिकाऱ्यांकडे धरत आहेत.

या पार्श्वभूमीवर सुनील केंद्रेकर यांनी गेल्या पाच वर्षांत करण्यात आलेल्या कामांचा तपशीलच मागवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. माहिती प्राप्त झाल्यावर या सर्व कामांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयुक्तांच्या भूमिकेमुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

पत्रव्यवहार

महापौर त्र्यंबक तुपे यांचा पत्रप्रपंच सुरूच आहे. शुक्रवारी त्यांनी आयुक्त सुनील केंद्रकर यांना तीन पत्र देत कारवाईचे आवाहन केले. तुपे यांनी गुरुवारीही केंद्रेकर यांना पाच पत्र देत कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्र्यंबक तुपे यांनी शुक्रवारी आयुक्तांच्या नावे दिलेल्या पत्रांमध्ये म्हटले आहे की, 'महात्मा गांधी मिशनला संगोपन व देखभाली दिलेले प्रियदर्शनी उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात यावे. या उद्यानाच्या कराराची मुदत १३ जानेवारी २०१६ रोजी संपत आहे. मुदत संपल्यावर हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात यावे. एम्पायर मॉल यांच्याशी रस्त्याच्या विकासा बद्दल झालेल्या करारनाम्यातील अटी, शर्तींची फेरतपासणी करण्यात यावी. मे. अजिंठा इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याशी रस्ता विकासाचा केलेला करारनामा, त्यातील अटी-शर्तींची तपासणी करण्यात यावी,' असे महापौरांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा चार वेळा बळजबरीने गर्भपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सारख्या मुलीच होतात म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा चार वेळा गर्भपात केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. पाच लाख रुपयांची मागणी करून शारीरिक मानसिक छळ केल्याचा आरोपही, या महिलेने सासरच्या लोकांवर केला आहे. त्यावरून तिच्या पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विवाहिता गेल्या काही महिन्यांपासून जिन्सी पोलिस स्टेशन हद्दीत आपल्या माहेरी दोन मुलींसह राहत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथील नावेद अहेमद नियाज अहेमद याच्याशी रितीरिवाजाप्रमाणे तिचा विवाह २००६ मध्ये झाला. त्यांना दोन मुली आहेत. लग्नानंतरची तीन वर्षे सुखाने गेली. त्यानंतर कामधंद्याच्या शोधात नावेद पत्नी व मुलींसह औरंगाबादेत राहण्यास आला. या दरम्यान, सासरे नियाज अहेमद शेख, सासू फरजाना बेगम शेख, मोठे दीर जमील नियाज शेख व तन्वीर नियाज शेख हे अधूनमधून घरी येत असत. पतीला कामधंदा नसल्याने त्यावरून टोमणे मारत व त्याला व्यवसायासाठी तसेच गावाकडील शेतीसाठी म्हणून पाच लाख रुपये माहेरून आणावे यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अनेकदा उपाशीपोटी ठेवले जायचे, पण पुढे संसार सुरळीत होईल, या आशेपोटी सर्व छळ निमूटपणे सहन करत केल्याचे तिने सांगितले. त्यात दोन मुली झाल्यामुळे सासरकडील लोक संतप्त होते.

मुलगी नव्हे मुलगाच हवा, असे म्हणत तिला टोमणे मारले जायचे. पुढे चार वेळा गर्भवती ती गर्भवती राहिली. चारही वेळेस मुलगीच होईल, असे म्हणून तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यात आला, असा आरोप विवाहितेने केला आहे. तिने दिलेल्या तक्रारीवरून पती नावेद अहेमद नियाज अहेमद याच्यासह पाच जणांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळनिवारणासाठी यज्ञ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

वेरूळ येथे दुष्काळ निवारणासाठी १५ डिसेंबर ते २२ डिसेंबरच्या काळात यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जनार्दन स्वामी महाराज यांच्या २६ व्या पुण्यस्मरणार्थ व १०१ वी जन्मोत्सव वर्ष निमित्ताने उत्तराधिकारी शांतीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

लाखों भक्त, संत, मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्यात १००८ कुंडात्मक महायज्ञ, जपानुष्ठान, शिवकालीन युद्ध प्रात्यक्षिके, कुस्ती स्पर्धा, सर्व रोगनिदान शिबिर, प्रवचने, व्याख्याने आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या नित्य नैमित्यिक कल्याणासाठी, पर्जन्यवृष्टी, असंवेदनशील भावना निवारण, सौभाग्यवृद्धी, विश्वशांती धामाचे निर्माण, कुबेर-विश्वकर्मा भगवानांची प्रसन्नता या करिता २६१८९ माता भगिणींच्या हस्ते १००८ कुंडात्मक महायज्ञ होईल. एका कुंडावर दरडोई कमीत कमी दोन महिला पूजेस बसतील. यज्ञात दरडोई १११ ब्रम्हवृंद मंत्रघोष करतील. प्रधान आचार्य म्हणून सुयश कमलाकर गुरू शिवपुरी (पैठण) हे काम पाहतील. सध्या १००८ कुंड उभारणीच्या कामाने मोठी गती घेतली असून, या कामाकरिता लागणाऱ्या विटासह विविध साहित्य सोहळ्याकरिता लागणारा किराणा अनेक दानशूरांनी दान दिला आहे. सोहळ्यामध्ये सहभागी होण्याकरिता आधी नोंदणी करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी जनेश्वरानंदजी महाराज, विष्णू महाराज, प्रसिद्धि प्रमुख राजेंद्र पवार , विश्वस्त झुंबरशेट मोडके, शिवाभाऊ अंगुलगावकर, जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यावरुन आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दररोज केंब्रिज शाळेशेजारच्या रस्त्यावरून होणारी कचरा वाहतूक शुक्रवारी अचानक नारेगावमधून सुरू झाली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ही वाहने रोखली. गावातून कचरा वाहतूक होऊ देणार नाही, असा इशारा दिला. ही वार्ता समजताच सिडकोच्या कामासाठी परतूरला गेलेले आयुक्त सुनील केंद्रेकर काम संपवून तत्काळ नारेगावला पोहचले. फक्त केंब्रिज रस्ता दुरुस्त होईपर्यंत गावातून कचरा वाहतूक करू द्या, असे आवाहन केले. त्यानंतर, 'फक्त तुमच्यावर आमचा विश्वास आहे,' म्हणत नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.

औरंगाबादमधून गोळा होणारा कचरा नारेगाव येथील कचरा डेपोमध्ये टाकला जातो. कचऱ्याने भरलेली वाहने पूर्वी वोखार्ड कंपनीमार्गे नारेगावातून कचरा डेपोवर नेली जात. नारेगावातून ही वाहने घेऊन जाण्यास नागरिकांचा विरोध होता. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या. त्याचा परिणाम म्हणून केंब्रिज शाळेच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्यावरून सर्व वाहने कचरा डेपोवर नेली जाऊ लागली. महापालिकेचे आयुक्त म्हणून केंद्रेकर यांनी सूत्रे स्वीकारल्यावर त्यांनी घनकचरा व्यवस्थापनाचा अतिरिक्त कार्यभार मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांच्याकडे दिला. कचरा वाहतुकीचा अभ्यास करून झनझन यांनी आज अचानक वाहनांचा मार्ग बदलला. केंब्रिज शाळेच्या शेजारच्या रस्त्याने जाणारी वाहने नारेगावातून जाऊ लागली. त्यामुळे नगरसेवक गोकुळ मलके आक्रमक झाले. त्यांनी नारेगावच्या चौकातच वाहने थांबवली. नागरिकांनीही त्यांना साथ दिली. या प्रकारामुळे कचरा वाहतूक ठप्प झाली. नागरिकांच्या आंदोलनाची माहिती परतूर येथे असलेल्या सुनील केंद्रेकरांना मिळाली. परतूर येथील बैठक संपवून दुपारी साडेतीनच्या सुमारास केंद्रेकर थेट नारेगाव येथील कचराडेपोच्या परिसरात आले. त्या ठिकाणी त्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त अय्युब खान, शिवाजी झनझन यांनाही बोलावले. उपमहापौर प्रमोद राठोड, आरोग्य सभापती विजय औताडे, शिक्षण सभापती शिवाजी दांडगे, नगरसेवक गोकुळसिंह मलके हे देखील दाखल झाले. या सर्वांनी मिळून केंब्रिज शाळेपासून नारेगावला येणाऱ्या रस्त्याची पाहणी केली.

या रस्त्यावर खड्डे असल्यामुळे वाहनांना येण्या-जाण्यासाठी त्रास होतो, असे या सर्वांच्या लक्षात आले. त्यानंतर केंद्रेकर यांनी कचरा डेपोची पाहणी केली. तेथे जमलेल्या नागरिकांशी संवाद साधला. केंब्रिज शाळेच्या शेजारच्या रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत नारेगावातून वाहने नेण्यास परवानगी द्या, असे आवाहन केले. रस्त्याची दुरुस्ती झाल्यावर एकही वाहन नारेगावातून जाणार नाही, अशी ग्वाही दिली. 'तुमच्यावर आमचा विश्वास आहे, दिलेला शब्द तुम्ही पाळाल याची खात्री वाटते. त्यामुळे तो रस्ता दुरुस्त होईपर्यंत गावातून वाहने घेऊन जाण्यास आमची हरकत नाही,' असे नागरिकांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन संपले.

...........

नारेगावातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य असते. कचरा डेपो ते नारेगाव रस्त्यावर विजेचे खांब नाहीत. अशी तक्रार नागरिकांनी केली. या तक्रारीची दखल सुनील केंद्रेकर यांनी घेतली. सुमारे ५० खांब या परिसरात नव्याने लावण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या व उद्या शनिवारी संध्याकाळपर्यंत विजेचे खांब उभे करून पथदिवे सुरू करा, असे आदेश दिले.

..........

केंब्रिज शाळेपासून नारेगावकडे येणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. मोठमोठे खड्डे या रस्त्यावर तयार झाले आहेत. हे लक्षात आल्यावर सुनील केंद्रेकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना फोन लावला. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम का करीत नाही, असा सवाल केला. रस्त्याच्या कामाचे टेंडर झाले आहे, ८ दिवसांत काम सुरू करतो, असे त्या अधिकाऱ्याने केंद्रेकरांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तांड्यावरच्या शाळेला ISO मानांकन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आयएससो हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करीत ऊसतोड कामगार, शेतमजुरांच्या वरवंडी तांडा गावच्या (पैठण तालुका) जिल्हा परिषद शाळेने शैक्षणिक क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन शिक्षक व पालकांचे अथक परिश्रम आणि लोकसहभागातून या शाळेने शिक्षण क्षेत्रास आपली नव्याने ओळख करुन दिली.

औरंगाबादपासून २३ किमी व पैठणपासून ४५ किमी अंतरावर असलेल्या वरवंडी तांड्यातील जिल्हा परिषद शाळा पहिली ते आठवीपर्यंत आहे. दुर्गम भागातील शाळा म्हणूनही शाळा ओळखली जाते. या शाळेत येणारे बहुतांश विद्यार्थी ऊसतोड कामगारांची मुले आहेत. पालक ऊसतोडणीसाठी गेले की विद्यार्थी गळती ठरलेली. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी ही बाधा दूर करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र ब्रम्हणात व आत्माराम गोरे, सुभाष माणके, गजेंद्र बारी, मनोहर नागरे, भरत काळे या शिक्षकांनी पालकांशी संवाद साधला. मुलांना सोबत नेऊ नका, हे पालकांना समजावून सांगताना शिक्षकांना खूप संघर्ष करावा लागला. सोबतच गळती थांबविण्यासाठी मुलांनाही अभ्यासासोबतच इतर शैक्षणिक उपक्रमात गुंतविण्याची गरज होती. यासाठी सर्वप्रथम इ-लर्निंग उपक्रमास प्राधान्य दिले गेले, पण गावात सातत्याने वीजपुरवठा खंडित व्हायचा. यावर तोडगा काढत आपल्या वेतनातून मुख्याध्यापकांनी रु. २०,००० तर इतर शिक्षकांनी प्रत्येकी रु. १०,००० रुपये जमा केले. शिक्षकांची धडपड पाहून पालकही सरसावले व आपल्या कष्टाची कमाई शाळेला निधी म्हणून दिली. भारनियमनाला पर्याय म्हणून शिक्षक-पालक सहभागातून सौरऊर्जा विद्युतसंच खरेदी करण्यात आला. दररोज ३०० व्हॅट क्षमतेच्या या वीजनिर्मिती संचामुळे शैक्षणिक कामातील अडचणी दूर झाल्या. गळतीचे प्रमाण कमी करण्यात यश मिळविल्यावर गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयोगशील उपक्रम राबविले.

शाळेचे काम पाहून उपक्रमांत गावातील लोकही सहभागी झाले. लोकवर्गणीतूनच शाळेने संगणक, झेरॉक्स मशीन, साऊंड सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक बेल, दिवे आदी यंत्रणा कार्यान्वित केल्या. इ-लर्निंग कक्षाद्वारे मनोरंजक पद्धतीने अध्यापन होत आहे. शाळेचे काम पाहून आयएसओसाठी प्रयत्न झाले. हे मानांकन प्रदान करणाऱ्या पथकामध्ये राजेंद्र जैन, ज्योती नेटके आदींचा समावेश होता. पथकाने आयएसओ मानांकन जाहीर करताच मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. शैक्षणिक क्रांतीसाठी शाळा सज्ज झाली आहे, असा विश्वास मुख्याध्यापक व शिक्षकांनी व्यक्त केला. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष युवराज राठोड, हिरामन राठोड यांची उपस्थिती होती. मुख्यकार्यकारी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.

उपक्रमांची बाग

शाळेच्या उपक्रमांना मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहून शिक्षक सातत्याने उपक्रम घेतात. यामध्ये विद्यार्थ्यांची बचत बॅँक, संत गाडगेबाबा परसबाग, वसंतराव नाईक फुलबाग, टाकाऊ वस्तू व साधनांपासून बनविलेले स्प्रिंकलर, चालता-बोलता सामान्यज्ञान स्पर्धा, किल्ल्यांची निर्मिती, अद्ययावत प्रयोगशाळा असे विज्ञान व पर्यावरणपूरक कार्यक्रम इथे घेतले जातात. तर अभ्यास व व्यक्तिमत्व विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय, मुलांच्या प्रत्येक शंकांचे निरसन करणारी प्रश्नपेढी, बालमनाचे विचारविश्व, डिजीटल परिपाठ, वक्तृत्व स्पर्धा, स्नेहसंमेलन, व्याख्याने, चावडी वाचन, आदर्श विद्यार्थी पुरस्कार, क्रीडा स्पर्धा, बोलक्या भिंती, हस्ताक्षर स्पर्धा, जो दिनांक तो पाढा, झाडावर पक्षांची शाळा अशा अॅकेडमिक अॅक्टीव्हिटीज घेण्यात येतात. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या स्वप्नातील शाळा प्रत्यक्षात साकारण्यासाठी सर्व शिक्षक सतत व्यस्त असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्धव ठाकरे करणार मदतीचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जालना जिल्ह्यातील दुष्काळपिडीत शेतकऱ्यांना एका हाताने रोख आर्थिक मदत तर दुसऱ्या हाताने जिल्ह्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने चाललेल्या विविध लोकोपयोगी कामांची झाडाझडती असा अजेंडा घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

यावेळी शिवसेनेचे सर्व दहा मंत्री आणि साठ आमदार तसेच पक्ष संघटनेतील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. यातील तालुका निहाय आमदार आणि शिवसेना पदाधिकारी यांचे पथक खालील सर्व मुद्यांवर प्रत्यक्ष पाहणी करून विशेष अहवाल तयार करणार आहे.

जालना जिल्ह्यात राज्य आणि केंद्र सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजनांचा नेमका काय आणि किती लाभ शेतकऱ्याला मिळत आहे. कोणत्या योजना चालू आहेत आणि त्यात लाभार्थीची संख्या व त्यांचे सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत का? त्यात किती लोक काय काम करत आहेत? बेरोजगारी आणि कामापासून वंचित लोक किती आहेत? केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने दुष्काळपिडीत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत किती वाटप करण्यात आली असून त्यासर्व लाभार्थ्यांची यादी करण्यात येणार आहे.जलयुक्त शिवार योजनेतील सर्व कामांची सविस्तर माहिती, झालेल्या कामांचा खरोखरच किती आणि काय फायदा झाला आहे? जिल्ह्यातील किती गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे? जून २०१६ पर्यत काय स्थिती निर्माण होईल? सरकारी यंत्रणा सक्षम आहे का? आत्महत्या केलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळाली काय ? या सगळ्या मुद्द्यावर प्रत्यक्ष माहीती आणि सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून आकडेवारी गोळा करून हा अहवाल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे.

जालना जिल्ह्यात आठ तालुक्यात आठ समितीचे गठण करण्यात आले आहे. यामध्ये जालना-आमदार अर्जुन खोतकर, संतोष मोहीते. बदनापूर- अनिल कदम, अंकुश शिंदे. भोकरदन- शशिकांत खेडेकर, कैलास पुंगळे. जाफराबाद- राजाभाऊ वाझे, परमेश्वर जगताप. मंठा - संजय रायमुलकर, प्रसाद बोराडे. परतूर- योगेश घोलप, अशोक बरकुले. घनसावंगी-रवींद्र आर्द्रड आणि अंबड - अनिल बाबर, हनुमंत धांडे. ही समिती प्रत्येक तालुक्यात तहसीलदार आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या बैठका घेऊन माहिती गोळा करण्याचे काम शनिवारी करणार आहे.

..........

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी दुपारी तीन वाजता जुन्या जालन्यातील स्व. कल्याण घोगरे क्रीडा संकुलमध्ये जिल्ह्यातील हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदतीचे वाटप करणार आहे, अशी माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमुख भास्कर अंबेकर, ए. जी. बोराडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कच्च्या कैद्यांचा MIM घेणार जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जामीन घेण्याची ऐपत नसल्याने किरकोळ आरोपांवरून राज्यभरातील विविध कारागृहात बंद असलेल्या कच्च्या कैद्यांचा जामीन घेण्याचा निर्णय ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन (एमआयएम) पक्षाने घेतला आहे. विविध जाती-धर्मांतील अशा कच्चा कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

राज्यातील कच्च्या कैद्यांच्या पुर्नवसनासाठी औरंगाबाद-मध्यचे आमदार इम्तियाज जलील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी राज्यातील विविध कारागृहांत किरकोळ आरोपांमुळे कैदेत असलेल्यांची यादी अतिरिक्त महासंचालक (कारागृह) यांच्याकडून मागविली आहे. किरकोळ आरोप असलेल्या आणि आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने जामीन घेऊ शकत नसलेल्या कैद्यांचीच यादी द्यावी, अशी विनंती अतिरिक्त संचालकांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. या यादीत गुन्हेगार किंवा इतर गंभीर आरोपांतील कोणत्याही कैद्यांची माहिती देऊ नये. कारागृहात चांगले आचरण असलेल्या कच्चा कैद्यांचा यादीत समावेश करावा, असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

या कैद्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा जामीन घेण्याची कायदेशीर प्रक्रियाही 'एमआयएम'च्या वतीने केली जाणार आहे. यासंदर्भात आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले की, कारागृहात कच्च्या कैद्यांची संख्या वाढलेली आहे. अनेक वर्षांपासून हे कैदी तुरुंगात आहेत. पैशाअभावी त्यांचा जामीन होत नाही. गरिबीमुळे कैदेत असलेल्यांना किरकोळ आरोपांवरून कारागृहात राहावे लागत आहे. यामुळे कारागृहांवर ताण वाढला आहे. शिवाय या कैद्यांना सामान्य नागरिकांप्रमाणे जगता येत नाही. यामुळे अशा कैद्यांच्या परिवारातील मुलेही गरिबीमुळे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन किरकोळ आरोपांतील कच्च्या कैद्यांची 'एमआयएम'कडून जामीन घेऊन मुक्तता करण्यात येणार आहे. किरकोळ आरोपांतील सर्व जाती-धर्मांच्या कैद्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

राज्यातील तुरुंगात किरकोळ आरोपांतील कैदी आहेत. त्यांच्याकडे जामीन घेण्यासाठी पैसेही नाही. त्यांना जीवन जगण्यासाठी छोटीशी संधी माध्यमातून उपलब्ध व्हावी. यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. माहिती मिळाल्यानंतर अशा कैद्यांच्या सुटकेसाठी पक्षाकडून कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.- इम्तियाज जलील, आमदार, एमआयएम.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दागिने चोरीप्रकरणी एक जणास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साहित्यिक डॉ. प्रभाकर मांडे यांच्या बँक लॉकरमधून २२ तोळ्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी एकाला शनिवारी सिडको पोलिसांनी अटक केली. बँक अधिकारी असल्याची थाप मारत या आरोपीने लॉकरची माहिती मिळवली होती, असा आरोप आहे. तर या प्रकरणी मोलकरणीसह तिच्या मैत्रिणीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

सिडको परिसरात राहणारे साहित्यिक डॉ. प्रभाकर मांडे यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमधून २२ तोळ्याचे दागिने लंपास झाल्याची घटना १८ ऑक्टोंबर रोजी उघडकीस आली. डॉ. मांडे यांचा मोठा मुलगा दिल्ली व धाकटा मुलगा अहमदनगरमध्ये राहतो तर ते पत्नी ‌मंगल व भावजय निर्मला मांडे यांच्यासह सिडकोत राहतात. मंगल मांडे यांना गेल्या ८ वर्षांपासून दिसत नसल्याने घरकाम व देखभालीसाठी आशा ठाकूर व भावना भावसार या दोन मोलकरणी नेमल्या आहेत. एक महिन्यांपूर्वी घरातील लँडलाइनवर संभाजी पवार नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून डॉ. मांडे यांच्याकडून बँक लॉकरच्या नंबरची माहिती घेतली होती. डॉ. मांडे हे मुलगा अविनाश यांच्यासह १८ नोव्हेंबर रोजी बँकेत हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी लॉकरची तपासणी केली तेव्हा दागिने नव्हते.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणी केली असता घरकाम करणाऱ्या भावना भावसर व तिची साथीदार अरुणा जाधव यांनी बँकेत बनावट स्वाक्षऱी करत लॉकरमधून दागिने काढल्याचे समोर आले. या दोघांनाही यापूर्वीच अटक करण्यात आली. दरम्यान, संभाजी पवार या नावाने बँक अधिकारी असल्याची थाप मारुन लॉकरविषयी माहिती जाणून घेणाऱ्या आरोपीस शनिवारी (२८ नोव्हेंबर) पोलिसांनी अटक केली. सुनील बनसोडे (वय २४, रा. इंदिरानगर) असे त्याचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूर- मुंबई रेल्वेला ठाणे स्थानकावर थांबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूर-मुंबई एक्स्प्रेसला ठाण्याच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, ही लातूरकरांची मागणी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या प्रयत्नांमुळे पूर्ण झाली आहे. लातूरहून मुंबईकडे शनिवारी रात्री निघणारी रेल्वे आता रविवारी सकाळी ठाणे स्थानकावर थांबणार आहे. त्याचप्रमाणे रविवारी रात्री मुंबईहून निघणारी रेल्वेने यापुढे दररोज ठाण्याच्या रेल्वे स्थानकावर थांबणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुनील गायकवाड यांन दिली.

सहा वर्षांपूर्वी लातूर - मुंबई ही पहिली रेल्वेसेवा सुरू झाली. या रेल्वेला सुरुवातीपासून भरभरून प्रतिसाद लाभत आहे. या रेल्वेने प्रवास करणारे अनेक नागरिक ठाणे परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्य करतात. त्यांना ठाणे येथे उतरण्यासाठी कल्याण किंवा दादरला जावून परत दुसऱ्या रेल्वेने प्रवास करावा लागत होता. यामुळे सदर रेल्वे ठाणे येथे थांबावी, यासाठी लातूरकरांनी अनेक प्रयत्न केले. यासाठी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी गेल्या एक वर्षांपासून रेल्वे विभागाला पत्रव्यवहार केला. अनेक बैठकांमध्ये विषय उपस्थित केला. त्याचप्रमाणे २८ ऑक्टोबर रोजी पुणे येथे झालेल्या रेल्वे विभागाच्या बैठकीत मराठवाड्यातील एकमेव खासदार डॉ. सुनील गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील रेल्वे संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करून ठाणे व मुरूड स्थानकावर लातूर-मुंबई रेल्वेला का थांबा मिळत नाही, असा जाब विचारत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. त्याची दखल घेत एक महिन्यातच रेल्वे प्रशासनाने मागणीची पूर्तता करीत सदर रेल्वेला ठाणे रेल्वे स्थानकावर दोन मिनिटांचा थांबा दिला आहे. थांबा प्रायोगिक तत्वावर दोन महिन्यांसाठी आहे. या रेल्वेने ठाण्याला प्रवाशांची चढ-उतार जास्त प्रमाणावर झाल्यास तो कायम करण्यात येणार आहे, असे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images