Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तहसीलदारांचे गुरुवारी आंदोलन

$
0
0

औरंगाबादः नायब तहसीलदार, गट-ब राजपत्रित पदाच्या वेतनश्रेणीतील तफावत दूर करण्याच्या मागणीसाठी १० डिसेंबर रोजी तहसीलदार, नायब तहसीलदार हे सामूहिक रजा आंदोलन करणार असून, विभागीय आयुक्तालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष डी. एम. देशपांडे यांनी सांगितले.

नायब तहसिलदार या संवर्गातील पदांना राजपत्रित अधिकारी गट ब हा दर्जा देण्यात आलेला आहे. हा दर्जा देऊन १७ वर्षांचा कालावधी होऊन गेला आहे. तरीही वेतनश्रेणीत अद्यापही सुधारणा झालेली नाही व शासनस्तरावरही याचा विचार झाला नाही. पाचव्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणी लागू झाली. त्यानंतर सहाव्या वेतन आयोगात वेतन बँड ९३००-३४८०० ग्रेड पे ४३०० ही वेतनश्रेणी देण्यात आली. ही वेतनश्रेणी अराजपत्रीत पदाची आहे. वेतनश्रेणीमध्ये वाढ होण्याच्या मागणीसाठी नायब तहसिलदार संघटनेने सामूहिक रजा टाकून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर तहसीलदर-नायब तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष विजय राऊत; तसेच महसूल कर्मचारी संघटनेचे देशपांडे, महेंद्र गिरगे, अरविंद धोंगडे, वसुधा बागूल, तहसीलदार रमेश मुंडलोड, एस. बी. गायकवाड, छाया पवार, आनंद बोबडे, एस. एस. बिडवे, शैलेश पटवारी, पी. के. जाधव यांच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्य महिला आयोगाला मिळणार अध्यक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल १४ महिन्यांच्या वनवासानंतर अखेर राज्य महिला आयोगाला लवकरच अध्यक्ष मिळणार आहे. आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांना दिले. स्त्री अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे कायम चर्चेत असलेल्या महाराष्ट्रातील महिलांची बाजू मांडायला सक्षम यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

महाराष्ट्रात स्त्री अत्याचार, बलात्कार, छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, हे सातत्याने घडलेल्या घटनांवरून सिद्ध होते. शहरात नुकत्याच घडलेल्या मिसारवाडी प्रकरणाने कायदा व सुव्यवस्थेलाच गालबोट लागले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने शहराला हादरले. महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित आहे का, असा प्रश्नही निर्माण झाला. राज्यात व केंद्रातील महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांवर अशा घटनांचा नकारात्मक परिणाम होतो. महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री मेनका गांधी यांनीही लोकसभेत दिली होती. येथेच राज्य महिला आयोगाची भूमिका महत्त्वाची ठरते.

समाजात वावरताना स्त्री कुठल्या ना कुठल्या अन्यायाला बळी पडते. या अन्यायग्रस्त पीडित महिलांच्या तक्रारींचा तपास लवकरात लवकर करून सुनावणी व्हावी व त्यांना न्याय मिळावा, यासाठी महिला आयोग काम करते, परंतु राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपदच रिक्त होते. त्यामुळे आयोगाच्या कामात सुसूत्रता नव्हती.

महिला सुरक्षा व सन्मानासाठी काम करणारी यंत्रणाच स्त्रीपासून दूर गेली. २००९मध्ये आयोगाला अध्यक्ष नव्हत्या. त्यानंतर २०१४मध्ये अॅड. सुसीबेन शहा यांची आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली, पण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक शहा यांनी लढवली. नियमाप्रमाणे त्यांनी पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद रिक्त होते.

आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर महिला तक्रार नोंदवू शकतात, पण ही वेबसाइटही अद्ययावत नाही. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय महिला आयोगाच्या सदस्या सुषमा साहू यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला होता. या घटनेचे गांर्भीय ओळखून मुख्यमंत्र्यांनी लवकरच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष निवडीचे संकेत दिले आहेत.

मिसारवाडीतील पीडितेला भेट दिल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. त्यानंतर मुंबईचा दौऱ्यात मुख्यमंत्र्यांशी पुन्हा या विषयावर चर्चाही झाली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची निवड लवकरच होईल, असे आश्वासन त्यांनी पुन्हा दिले. तत्पूर्वी केंद्रीय महिला आयोगाच्या सदस्य सुषमा साहू यांनीही याविषयी मुख्यमंत्र्याशी या विषयावर चर्चा केली होती.

- ‌‌विजया रहाटकर, अध्यक्ष, भाजप महिला आघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंपा चौक रस्त्याचे मार्किंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर विकास आराखड्यातील चंपा चौक ते जालना रोड या ६० फुटी रस्त्यासाठी मार्किंगचे काम सोमवारपासून महापालिकेने सुरू केले. या रस्त्यात सुमारे ७००पेक्षा जास्त घरे बाधित होणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणाची चर्चा होती. आता प्रत्यक्ष मार्किंगला सुरुवात करण्यात आली आहे.

चार वर्षांपूर्वी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शहरातील १४ रस्त्यांचे रुंदीकरण केले. त्याच वेळी चंपा चौक ते जालना रोड या नव्या रस्त्यासाठी मार्किंग केले जाणार होते, परंतु त्यावेळी ही मोहीम थांबली. सुनील केंद्रेकर यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर चंपा चौक ते जालना रोड या प्रस्तावित रस्त्यासह शहर विकास आराखड्यातील काही रस्त्यांची पाहणी केली. त्यांनी या रस्त्याच्या मार्किंगचे काम सुरू करण्याचे आदेश नगररचना विभागाला दिले. गेल्या आठवड्यातच रस्त्याच्या मार्किंगचे काम केले जाणार होते, पण ते सोमवारी सुरू झाले.

या रस्त्यात चंपा चौक, रेंगटीपुरा, कैलासनगर, भवानीनगर, नवाबपुऱ्याचा काही भाग आदी परिसर बाधित होतो. दाट लोकवस्ती असलेल्या या परिसरात चार ते पाच दशकांपासूनची घरे आहेत. हा रस्ता तयार झाल्यानंतर जालना रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होईल, तसेच दक्षिण व उत्तर औरंगाबादला जोडणारा हा एक नवीन दुवा ठरेल. जुन्या शहरात जाण्यासाठी सध्या मोंढानाका, महर्षी दयानंद चौक, सेव्हन हिल्स हे पर्यायी रस्ते आहेत. तथापि सेव्हन हिल्स वगळता अन्य रस्ते अरूंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. शहरात पूर्णपणे नव्या स्वरूपाचा हा पहिलाच रस्ता ठरेल.

पुनर्वसन होणार?

मालमत्तांवर मार्किंगसाठी महापालिकेने दोन टीम तयार केल्या आहेत. सोमवारी मार्किंगचे काम सुरू झाले त्यावेळी चंपा चौकात मोठा जमाव जमला. घरे पडण्याच्या धास्तीने या परिसरात अस्वस्थता होती. मार्किंगनंतर महापालिका भूसंपादनाबाबत निर्णय घेणार आहे. रोख मोबदला दिला जाण्याची शक्यता कमी असून, रहिवाशांना पर्यायी जागा किंवा टीडीआर दिला जाईल असे मानले जाते. ही प्रक्रिया दोन वर्षे चालू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीत साठा घटला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे मराठवाड्याला पुन्हा एकदा दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार जायकवाडीत सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले असून रोजचा वापर व बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यात सातत्याने घट होत आहे. सध्या जायकवाडी धरणामध्ये २३३.७ दशलक्ष घनमीटर (१०.७६) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

नगर-नाशिक जिल्ह्यांतील धरण समूहातून सोडलेल्या ११.५८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यापैकी जायकवाडी धरणात केवळ ६.६३ टीएमसी पाणी पोचले. ऊर्ध्व भागातील कालव्यांना १.१८ टीएमसी पाणी सोडल्यामुळे जायकवाडीसाठी सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी झाला होता. सोडलेल्या पाण्यापैकी निम्मेच पाणी जायकवाडीला मिळाले, प्रवाह मार्गातील खड्ड्यांमुळे तब्बल ३६ टक्के पाणी वाटतच मुरले आहे. सध्या ऊर्ध्व भागातील धरण समूहांमधील पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. काही प्रमाणात पाणी सोडणे शिल्लक असले तरी सोडलेले किती पाणी जायकवाडीला मिळेल हा प्रश्नच आहे.

सध्या विभागातील लहान मोठ्या ८४३ प्रकल्पांमध्ये केवळ १००८.२० दशलक्ष घनमीटर (१३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, जायकवाडी धरणामध्ये गेल्या तीन वर्षांनंतर यंदा सर्वात कमी पाणी शिल्लक आहे. जायकवाडी धरणामध्ये २०१०मध्ये ११६८ दलघमी, २०११ मध्ये १०५८ दलघमी, २०१२ मध्ये १३० दलघमी तर २०१३ मध्ये ६६१ तर २०१४ मध्ये ६०१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा जायकवाडीमध्ये उपलब्ध होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३ तासांच्या दौऱ्यांवर लाखोंचा खर्च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ते आले. त्यांनी पाहिलं आणि काही नाही, त्यांचं काम झालं. या ३ तासांसाठी त्यांच्या दौऱ्यावर मात्र लाखोंचा खर्च झाला. हो हे सोमवारी घडलं. ते दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता यांच्या सिकंदराबाद-औरंगाबाद प्रवास फेरीत.

दरवर्षी प्रत्येक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी वर्षातून एकदा त्यांच्या विभागातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचा दौरा करावा, तिथल्या विकास कामांची, अडचणींची माहिती घ्यावी असा नियम आहे. यापूर्वी २०१२मध्ये तत्कालीन ‌महाव्यवस्थापकांनी हा सोपस्कार उरकला होता. यानंतर पूर्णवेळ महाव्यवस्थापक या विभागाला मिळाला नाही. ज्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी होती.

त्यांनीही दौरे केले. मात्र, प्रश्न सुटले नाहीत. आता तीन वर्षांनतर सोमवारी रवींद्र गुप्ता दौऱ्यावर होते. त्यांच्यासह रेल्वेचे अधिकारी औरंगाबादला पहाटे ५.४० वाजता १६ डब्यांच्या रेल्वेने दाखल झाले. सोबत स्पेशल सलून, वाणिज्य तसेच अन्य वरिष्ठ विभागाचे अधिकारी. इतकेच काय सोबत स्पेशल पेन्ट्री कार. रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या दिमतीला असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष बोगी. सुरक्षा म्हणून तगडा फौजफाटा. तब्बल १५० जणांचा लवाजमा. महाव्यवस्थापकांनी या दौऱ्यात सिकंदराबाद ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते नांदेडपर्यंत पाहणी केली. त्या पाहणीसाठी विशेष ट्रॉली, अन्य सामानही सोबतीला होते. रेल्वे नियंत्रण कक्षासह अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी विशेष वायरलेस यंत्रणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. या दौऱ्यात वाहतुकीसाठी लाखो रुपयांचे डिझेल खर्च झाले. अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी शाही व्यवस्था होती. मात्र, इथे लगेच कसलाही ठोस निर्णय झाला नाही. पुढे कधी होणार हे ही माहित नाही.

वरिष्ठांना विशेष बोगी

पाहणी दौऱ्यासाठी क‌मर्शियल ऑफिसर तसेच अन्य अधिकाऱ्यांना रेल्वे विभागाकडून विशेष बोगी देण्यात आली होती. ही बोगी सामान्य रेल्वेला लावून रेल्वे अधिकारी प्रवास करतात. महाव्यवस्थापकांसोबतचे सलूनसाठीही अशाच बोग्या लावल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विशेष बैठक कक्ष

पाहणी दौऱ्यानंतर, अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी रेल्वेच्या एका बोगीत कॉन्फरन्स रुमची व्यवस्था करण्यात आली होती. महाव्यवस्थापकांनी या दौऱ्यात या अधिकाऱ्यांसोबत ही चर्चा केली असेलही. आता याचे फलित केव्हा मिळणार, असा सवाल इथली जनता करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेलिफिशिंग अॅटॅकरचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एटीएम कार्ड बंद पडल्याची थाप मारून टेलिफिशिंग अॅटॅकरने शहरातील दोन कार्डधारकांना ४५ हजार रुपयांना गंडा घातला आहे. यातील एक प्रकार आठ महिन्यांपूर्वी घडला आहे. या प्रकरणी सिटीचौक व सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आठवड्यात अशाप्रकारे सहा नागरिकांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

संजिवचंद्रा श्रीकृष्णाचंद्रा (वय ३८ रा. अंगुरीबाग) या तरुणाला २१ मार्च २०१५ रोजी अनोळखी तरुणाचा मोबाइलवर कॉल आला होता. समोरील तरुणाने बँकेतून बोलत असल्याचे सांगत संजिवचंद्रा यांच्याकडून त्यांचा एटीएम कार्डचा क्रमांक व पासवर्ड माहित करून घेतला. यानंतर काही वेळातच त्याच्या बँक खात्यातून २५ हजार रुपयाची रक्कम ऑनलाइन वळती करून घेण्यात आली. मेसेज आल्यानंतर हा प्रकार संजिवचंद्राच्या लक्षात आला. या प्रकरणी रविवारी सिटीचौक पोलिस ठाणे गाठून त्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अशाप्रकारे तरुणाला गंडा घालण्याचा प्रकार गुरूवारी देखील मिसारवाडी भागात घडला. येथील शब्बीर खान गुलाब खान या मजुराला अनोळखी मोबाइलधारकाने फोन केला. बँकेतून बोलत असल्याची थाप त्याने मारली.

शब्बीरखानचे एटीएम बंद पडले असून ते सुरू करण्यासाठी त्याने पासकोडची मागणी मागणी केली. शब्बीरखानला ही थाप खरी वाटल्यामुळे त्याने एटीएमचा पासवर्ड सांगितला. यानंतर काही वेळातच शब्बीरखानच्या बँक खात्यातून २० हजार रुपये काढून घेण्यात आले. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाइलधारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सात दिवसात सहा गुन्हे

गेल्या सात दिवसात टेलिफिशिंग अॅटॅकरने सहा जणांना गंडा घातल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टेलिफिशिंग अॅटॅकच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी शाळांत रुजले ई-लर्निंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शाळेतून रचनावादी शिक्षण पद्धती राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सातारा, कराड तालुक्यांत पथदर्शी प्रकल्पही राबविला गेला. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांनी मात्र ही पद्धती आधीपासूनच आत्मसात केली आहे. लॅपटॉप, मॅग्निफाइंग ग्लास (भिंग) आणि स्वयंस्फूर्तीने केलेली रचनावादी पद्धती यामुळे जिल्ह्यात निवडक शिक्षकांनी आदर्श निर्माण केला आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात रचनावादी शिक्षण पद्धतीसंदर्भात कार्यशाळा घेतली. २७५ शिक्षक यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना हसतखेळत शिक्षण देताना, प्रश्न त्यांनीच उपस्थित करावेत, चित्र, स्थळ महात्म्याच्या माध्यमातून अक्षर, स्थळ ओळख करून देणे, गणिते सोडविणे, इंग्रजीचे शिक्षण आदीचा या पद्धतीत समावेश आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या काही शिक्षकांनी आपापल्या कल्पना लढवून विद्यार्थ्यांना रचनावादी शिक्षण पद्धती पूर्वीपासूनच सुरू केली आहे. कार्यशाळेत याचा उलगडा झाला. ई-लर्निंग, लॅपटॉप, टॅबद्वारे विद्यार्थ्यांना शिकवणे, खरेखुरे रचनावादी शिक्षण आपले शिक्षक वर्षानुवर्षे देत असल्याचे पाहून झेडपीचे अधिकारीही आश्चर्यचकित झाले.

औरंगाबाद तालुक्यातील तीन शिक्षकांनी ई-लर्निंगसाठी अभिनव उपक्रम राबविला आहे. केवळ १५० रुपयांत ई-लर्निंग पद्धत आत्मसात केली आहे. सचिन पोलास, महेश लबडे आणि लक्ष्मीकांत नाईक या तीन शिक्षकांनी एक मॅग्निफाइंग ग्लास आणली. त्याच्या मागे एक पट्टी लावून मोबाइलसाठी स्टँड लावले. मोबाइलमध्ये विविध रचनावादी गोष्टी साठवून ठेवल्या आणि वर्गात त्याद्वारे शिकविले जाते. मोबाइल स्क्रिनवरून येणारे चित्र मॅग्निफाइंग ग्लासवर मोठ्या आकारात दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलनशक्तीही वाढली आहे. कन्नड तालुक्यातील एकलव्य नगर, देभेगाव येथील नितीन हारदे यांनी गेल्या दोन वर्षांपासून रचनावादी पद्धती त्यांच्या शाळेत राबविेले आहे. पहिलीपासूनच्या वर्गात अक्षर ओळख, अंकज्ञान तसेच इंग्रजीचे ज्ञान देताना हसतखेळत शिक्षण पद्धती हारदे सरांनी रूढ केली. आज त्यांच्या शाळेतील विद्यार्थी एखाद्या मोठ्या इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना लाजवतील एवढे हुशार झाले आहेत.

लॅपटॉप व टॅब

फर्दापूर (ता. सोयगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत २०११ मध्ये स्वप्निता महाजन यांची कन्नडहून बदली झाली. त्यांना चौथीचा वर्ग देण्यात आला. ६५ विद्यार्थी होते, पण अनेकांना वाचता, लिहिता येत नव्हते. हे पाहून महाजन मॅडम काहीशा नाराज झाल्या. दोन दिवसानंतर त्यांचे पती जयंत यांनी दिलासा दिला आणि निश्चय करून वर्गात शिकव, सगळी मुले हुशार आहेत, असा धीर दिला. असे करताना त्यांनी श्रीमती महाजन यांना टॅब घेऊन दिला. खडू फळ्याशिवाय टॅबवर शिकविण्याचा अनुभव त्यांना नव्हता पण सरावाने त्या शिकल्या आणि पाहता पाहता त्या तज्ज्ञ झाल्या. त्यानंतर महाजन यांनी त्यांना लॅपटॉप घेऊन दिला. महाजन यांनी वर्षभर लॅपटॉप आणि टॅबच्या माध्यमातून शिक्षण दिले. त्यातून ३० विद्यार्थी तयार झाले. दुसऱ्या वर्षी पहिलीच्या वर्गातही हाच प्रयोग त्यांनी राबविला. वर्गातील २० विद्यार्थी अक्षर ओळख, अंकज्ञान, इंग्रजीत निष्णात झाले.

जिल्हा परिषदेचे अनेक शिक्षक उपक्रमशील आहेत. आपल्यातील कलागुणांच्या आधारे अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी रचनावादी पद्धती राबविली आहे. या उपक्रमशीलतेचा विद्यार्थ्यांना अभ्यासात निश्चित फायदा होईल असे वाटते.

- एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या दोघांना बीडमध्ये अटक

$
0
0

बीड : अवैध रिव्हॉल्व्हर बाळगल्याप्रकरणात बीड पोलिसांनी सोमवारी रात्री दोन जणांना पकडले. या प्रकरणातील एक आरोपी फरार असून, पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शेख मुस्तफा शेख इब्राहीम (रा. रविवार पेठ, बीड) आणि शेख शहारुख शेख युसुफ (रा. भोई गल्ली. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नाव आहेत. बीड शहरातील तेलगाव नाका परिसरात दोन जण विनापरवाना रिव्हॉल्व्हर बाळगून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाली होती. या माहितीवरून सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यात दोघांची झडती घेतली असता, एकाच्या कमरेला गावठी रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतूस आढळून आले. हे गावठी रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतुस आयुब खान गुलमहंमद पठाण (रा. दिलावर नगर, बीड) याने ठेवण्यासाठी दिल्याचे आरोपींनी सांगितले. या तीनपैकी दोन आरोपीला अटक करण्यात आली असून, आयुब खान गुलमहम्मद पठाण फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यात दोन दिवस ‘शाळा बंद’

$
0
0

विविध मागण्यांसाठी शिक्षण बचाव कृती समितीचे आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, लातूर

राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रात गोंधळ निर्माण केला आहे, शिक्षकांच्या शिक्षणाच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने नऊ आणि १० डिसेंबर रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच दिवशी नागपूरला विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य सरकारच्या विरोधात लढण्यासाठी पक्षविरहीत महाराष्ट्र राज्य शिक्षम बचाव कृती समिती गेल्या महिन्यात स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये सर्व शिक्षक संघटना, संस्थाचालक यांचा सहभाग असल्याचे सांगून नियोजित शाळा बंद आंदोलन शिक्षण संस्था बचाव यासाठी नसल्याचा खुलासा करून आमदार विक्रम काळे म्हणाले की, दोन दिवस शाळा बंद राहिल्यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान जादा तास घेऊन आणि सुट्टीच्या दिवशी शाळा घेऊन भरुन काढण्यात येणार आहे.

कृती समितीच्या प्रमुख ११ मागण्या आहेत. त्यामध्ये सरकारने २८ ऑगस्टचा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करणे, खासगी शिक्षण संस्थाची स्वायत्तता कायम ठेवणे, शालेय पोषण आहार यंत्रणा स्वतंत्र राबविणे यांसारख्या मागण्यांचा समावेश आहे.

राज्य सरकारने २०११मध्ये पडपताळणी केली. त्याचे निष्कर्ष सरकार अद्यापपर्यंत सांगू शकले नाही, न्यायालयाने सरकाराला काही निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी नव्या सरकारने करावी, अशी आपली मागणी असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले. राज्यात गणित आणि इंग्रजी विषयांच्या शिक्षकांच्या साडेआठ हजार जागा रिक्त असल्याचे सांगून काळे यांनी सांगितले. या वेळी संस्थाचालक डी. एन. केंद्रे, रामदास पवार, गोविंद घार, डी. बी. लोहारे, वसंतराव पाटील, मुख्याध्यापक संघाचे प्रकाश देशमुख, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे मदन धुमाळ, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे पांडुरंग चिंचोलकर, पांडुरंग देडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अणेंच्या पुतळ्याचे सेनेकडून दहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी घेतलेल्या भूमिकेचे पडसाद मंगळवारी लातुरात उमटले. शिवसैनिकांनी अणे यांच्या भूमिकेचा निषेध करताना, त्यांच्या पुतळ्याचे दहनही केले.

श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केल्यामुळे, राज्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका घेतली आणि त्यानंतर सभागृहामध्येही त्याविषयी गदारोळ झाला. भाजपचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा आहे, तर शिवसेनेने या मागणीच्या विरोधातील भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा फूट दिसून आली. त्याचेच पडसाद लातूरमध्ये उटताना, शिवसैनिकांनी मंगळवारी जोरदार निदर्शने केली. शिवाजी चौकामध्ये आंदोलकांनी घोषणाबाजी करताना, अणे यांच्या पुतळ्याचे दहनही केले. या वेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख धोंडू पाटील, बालाजी भोसले, माजी जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी, किशन समुद्रे, दिलीप सोनकांबळे, संतोष बेंबडे, गणेश गवारे, योगेश स्वामी, मयूर स्वामी, योगेश शिरसाट, नगरसेवक विष्णू साठे, रवी सुडे, सुनील बसपुरे, संध्या आरदवाड, अविनाश रेशमे, गजानन खामिदकर, प्रमोद गुडे, नारायण माने, राजू चिताडे, विशाल माने, शंकर रांजनकर, धनराज कदम, विष्णू साबदे, सुनील पवार, अमित खंडेलवाल, प्रल्हाद पाटील सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामसेवक परीक्षेमध्ये गडबड

$
0
0

ग्रामसेवक निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामसेवक भरतीमध्ये कॉपी पुरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून, एका ग्रामसेवकाचाच यामध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेने या ग्रामसेवकाला निलंबित केले आहे.

राज्यात नांदेड जिल्ह्याचा कॉपीमुक्तीचा पॅटर्न राबविला गेला असला, तरी नुकत्याच झालेल्या ग्रामसेवक भरतीत उमेदवारांना कॉपी पुरविणाऱ्या ग्रामसेवकास जिल्हा परिषदेने निलंबित करण्यात आले आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्या जाणाऱ्या अहवालाची प्रतीक्षा आहे. चौकशी अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती.

ग्रामसेवकांच्या ४५ जागांसाठी जवळपास १२ हजार अर्ज प्राप्त झाले असून, २ डिसेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षा कालावधीत शहरातील प्रतिभा निकेतन हायस्कूल या केंद्रावर एका परीक्षार्थ्याला नकला पुरविल्याप्रकरणी एका कर्मचाऱ्याची अन्य उमेदवारांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार केली. ही तक्रार करताना त्यांनी सीसीटीव्ही फुटेजही पुरविले होते. या सीसीटीव्ही फुटेजवरून तो संशयीत म्हणजे पी. डी. उबाळे हे ग्रामसेवक असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर दोषारोप ठेवत त्यांना जिल्हा परिषदेने निलंबितही केले.

मात्र उबाळे यांनी केलेल्या खुलाशात आपल्याकडे त्या केंद्रावरील नियुक्ती आदेश असल्याचे सांगितले. मात्र दुसरीकडे पंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र ते आदेश आपण दिले नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे सदर ग्रामसेवकास नियुक्ती आदेश दिले कुणी, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. यात वरिष्ठ दर्जाचे अधिकारी गुंतले आल्याचा संशय आहे.

दरम्यान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांनी या प्रकरणाच्या चौकशीत काही अधिकाऱ्यांचे म्हणणेही नोंदविले आहे. जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा अहवाल सोपवला जाणार आहे. या आधी शिक्षक बदली प्रकरणाने नांदेडची जिल्हा परिषद गाजली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांची स्वाक्षरी करून शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या, या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी एका पदाधिकाऱ्याच्या पीए असलेल्या शिक्षकास अनेकांना निलंबित केले होते. ग्रामसेवक भरती परीक्षेविषयी अनेक उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. या परीक्षेमध्ये गडबड झाली असून, त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. या गडबडीमध्ये प्रशासनातील अन्य कोणत्या अधिकाऱ्याचा हात आहे का, याविषयी चर्चा रंगू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी सावकारांवर जालन्यात गुन्हे

$
0
0

जालना : खासगी सावकारी करत, त्रास देणाऱ्या दोन जणांविरुद्ध जालना जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पत्नीच्या आजारावर उपचार करण्यासाठी व्याजाने घेतलेले १ लाख ३८ हजार रुपये व्याजासह परत करण्यास तयार असलेल्या शेतकऱ्याची अडीच एकर शेत जमीन खासगी सावकाराने हडपल्याचे समोर आले आहे. हा प्रकार प्रकार भोकरदन तालुक्यातील वाकडी येथे घडला आहे. वाकडी येथील शेतकरी भाऊराव शिरसाठ यांनी आजारी पत्नीवर उपचार करण्यासाठी गावातीलच खासगी सावकार राजू मुरलीधर याच्याकडून २००७ मध्ये एक लाख रुपये तीन टक्के व्याजाने आणि ३८ हजार रूपये पाच टक्के व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात शिरसाठ यांनी स्वत:ची अडीच एकर जमीन राजू सोनवणे याच्या नावावर करून दिली होती. ठरलेल्या व्याजानुसार झालेले २ लाख ३५ हजार रूपये देण्यास जगन्नाथ शिरसाठ हे तयार होते. मात्र, राजू सोनवणे हा त्यांची शेती परत देण्यास तयार नव्हता. याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी राजू सोनवणेविरुद्ध सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चंदनझिरा परिसरातील त्रिंबक जाधव, मालन जाधव, भरत जाधव आणि दिनेश मरकड यांनी तुपेवाडी (ता. बदनापूर) येथील विलास घाडगे याचे सावकारीच्या वसुलीसाठी अपहरण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना झेडपीत घमासान

$
0
0

पाणीपुरवठा, आरोग्य, शालेय पोषण आहारावरून प्रशासन धारेवर

सुरेश कुलकर्णी, जालना

दुष्काळ असतानाही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून नाकारलेला निधी, त्यातून प्रलंबित पडलेल्या पाणीपुरवठा योजना यांसह शालेय पोषण आहार आणि ग्रामीण आरोग्य केंद्र यांमुळे जालन्याच्या जिल्हा परिषदेमध्ये मंगळवारी घमासान दिसून आले. जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी या कारभाराचे वाभाडे काढताना, अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे अत्यंत आक्रमक झालेले सदस्य आणि पडती भूमिका घेणारे अधिकारी अशा अवस्थेमध्ये सुमारे पाच तास जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चालली.

जालना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला मंगळवारी दुपारी सुरुवात झाली. जिल्हा परिषदेतील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, सभापती शहाजी राक्षे, ए. जे. बोराडे, कृषी सभापती लीलाबाई लोखंडे, संगीता कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपमुख्याधिकारी मुकिम देशमुख यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चर्चेसाठी समोर आला. अनेक गावांच्या पाणीपुरवठ्याच्या योजना अडकून पडल्या आहेत. त्यातच एका अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून, निधी नाकारल्याचे वास्तव सभागृहासमोर आले आणि घमासान चर्चेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे, भाजपचे राहुल लोणीकर आणि शिवसेनेचे बाप्पासाहेब गोल्डे यांनी राजकीय बंधने झुगारून पदाधिकाऱ्यांना चांगलेच अडचणीत आणले. जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष आहे.

सभेच्या प्रारंभीच राष्ट्रवादीचे सदस्य सतीष टोपे म्हणाले, 'राष्ट्रीय पेयजल योजनेमधील १० कोटी रुपये ग्रामपंचायतींना देणे बाकी आहेत. जिल्ह्यात भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जुन्या योजना दुरूस्तीची कामे ठप्प झाली आहेत. बिले का देत नाहीत? निधी का आणत नाहीत? नवीन कामे तर बंद आहेत, परंतु जुन्या कामाची दुरूस्ती बंद करण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्र्यांकडे जाण्याची काही अडचण आहे का? आपल्याला काही पक्षाची अथवा गटातटाची अडचण तर येत नाही ना? तशी अडचण असेल तर आम्ही ही मागणी करू शकतो.'

उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर म्हणाले, 'राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी लागणाऱ्या निधीचा मागणी अहवाल नियोजन मंडळाकडे पाठविला आहे. तो निधी प्राप्त झाल्यावर संपूर्ण बिले आदा करण्यात येणार आहेत.' राहुल लोणीकर म्हणाले, 'मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना येत्या मार्चपासून सुरू होणार असून, यामध्ये नवीन पाणीपुरवठा योजना व जुन्या पाणीपुरवठ्याची देखभाल करण्यात येणार आहे. मात्र तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या माहिती अहवालात ५० टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडे शिल्लक आहे. इतर कामासाठी निधी मिळावा, अशी मागणी केली होती.' ही बाब सभागृहासमोर येताच जोरदार गोंधळ उडाला. आता हा अहवाल कसा काय गेला, कोणत्याही पदाधिकाऱ्यांना ठाऊकच पडले नाही, ही आणखी एक बाब लक्षात आली. दोन्ही अधिकारी बदलून गेले आहेत, आपण सगळे मिळून पालकमंत्र्यांना लवकरच साकडे घालून प्रश्न मिटवू, असे सांगत खोतकरांनी सर्वांनाच अटोपते घेण्याची विनंती केली.

पोषण आहारातही गोंधळ

शालेय पोषण आहारात बालकांना दिला जाणारा आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून, त्यामध्ये आळ्या व किडे असल्याचे शिवसेना सदस्य बप्पासाहेब गोल्डे यांनी सभेत मांडले आणि पुन्हा एकदा वातावरण पेटले. 'अंबड तालुक्यातील लेंभेवाडी येथे एका बचत गटाला पोषण आहार योजनेत बालकांसाठी सुगडी तयार करून पुरविण्याचेे काम देण्यात आले होते. सुगडी बनविण्याचा प्रकल्प लेंभेवाडी येथे सुरू असल्याचे दाखवून अत्यंत निकृष्ट दर्जाची सुकडी बनविण्यात येत आहे. स्वत: अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी चौकशी करून कारवाई करणार होते. त्याचे काय झाले?' असा संतप्त सवाल गोल्डे यांनी केला. जो पोषण आहार बालकांना दिला जातो, तो जनावरेही खाऊ शकत नाहीत. त्याचा प्रत्यय आपण कधीही पाहावा. गेल्या दहा वर्षांपासून कित्येक समित्या नेमण्यात आल्या. त्यांचा आजपर्यंत अहवाल आला का? या प्रकरणी आपण न्यायालयात जाणार असून नागपूर अधिवेशनात ही माहिती पाठविणार असल्याचे ते म्हणाले. उपाध्यक्ष अनिरूद्ध खोतकर म्हणाले, 'पोषण आहाराची निविदा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मागविण्यात येते. आपण फक्त देखभाल करण्याचे काम करतो. तेच काम प्रामाणिकपणे करायला हवे.' असे म्हणत जवळपास सर्वच सदस्य संतापले.

आरोग्यावरून आव्हान

जिल्ह्यातील सर्व ग्रामीण आरोग्य केंद्र आता सहा दिवस पूर्णपणे चालू राहणार आहेत, या आरोग्य सभापती ए जे बोराडे यांच्या वक्तव्याचा माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी भलताच समाचार घेतला. 'एक दवाखाना सलग दोन दिवस उघडा दाखवा, तातडीने राजीनामा देतो,' असे खुले आव्हानच त्यांनी सभागृहात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड तालुक्यात ४३ आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जाचा डोंगर यामुळे गेल्या २० महिन्यात तालुक्यातील ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. साधारणतः प्रत्येक महिन्याला दोन शेतकरी, असे आत्महत्याचे प्रमाण आहे.

तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१४ ते २५ नोव्हेंबर २०१५ पर्यत ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ३६ शेतकऱ्यांच्या कुटुंबाना शासकीय मदतीसाठी पात्र ठरवण्यात आले. केऱ्हाळा येथील अशोक दारूटे यांचा प्रस्ताव तालुका समितीने मंजूर करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. पाटीलबा काळे (खुपटा), कैलास मोहिते (अंधारी), प्रकाश पंडित (हट्टी), संतोष काकडे (धानोरा), भगवान पंडित (आसडी), अशोक भालेराव (कायगाव), विष्णू गावंडे (चिचखेडा) या शेतकऱ्यांना मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. सतत तीन वर्षांपासून दुष्काळाचा समाना करावा लागत असल्याने कर्जमाफाची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्रीत फक्त एक स्वच्छतागृह

$
0
0

तालुक्याचे ठिकाण असूनही अक्षम्य दुर्लक्ष; नागरिकांची कुचंबणा

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

फुलंब्री हे तालुक्याचे ठिकाण असून मोठी बाजारपेठ आहे. येथे सरकारी कार्यालयेही आहेत. नुकतीच नगर पंचायत स्थापन झाली आहे; पण अवघे एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. बस स्थानकातील हे स्वच्छतागृह वगळता सरकारी कार्यालयांमधील स्वच्छतागृहेही कुलूपबंद आहेत.

फुलंब्री तालुक्याची निर्मिती होऊन १५ वर्षे उलटून गेली. येथे आसपासच्या खेड्यापाड्यातून अनेक नागरिक दररोज विविध कामांसाठी येतात. शिवाय जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला जाण्यासाठीचा प्रमुख मार्ग येथूनच जात असल्याने पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती आदी कार्यालयांमध्ये हजारो नागरिक रोज येतात. पूर्वी येथे ग्रामपंचायत होती, नुकतीच नगर पंचायतची स्थापना झाली आहे.

शहरात पुरूष व महिलांसाठी एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. आठवडी बाजारात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक व व्यापारी येतात. शहरातील बाजारपेठेतही मोठा राबता असतो. पण स्वच्छतागृह नसल्याने नागरिक नाईलाजाने खासगी जागा, सरकारी जागांवर आडोसा शोधतात. त्यामुळे शहरातील अनेक भागात दुर्गंधी पसरली आहे.

शहरातील शासकीय कार्यालयात स्वच्छतागृह आहेत. मात्र सर्वच ठिकाणी स्वच्छतागृह कुलूप लावून बंद ठेवली आहेत. तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहाच्या दारावर पाणी नसल्यामुळे स्वच्छतागृहाचा वापर करु नये, असा फलक लावलेला आहे. पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहात पाणी नसल्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. बाजार समितीच्या दुकान गाळ्याजवळ स्वच्छतागृह अनेक वर्षापासून अपुर्णावस्थेत आहे. स्वच्छतागृहास दारे नाहीत, पाणी नाही, अशी अवस्था बाजार समितीच्या स्वच्छतागृहाची आहे. बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींच्या दालनाबाहेरील स्वच्छतागृहात पाणी नाही. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतागृह असूनही वापर शक्य नाही.

फुलंब्री शहरामध्ये दोन ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव तयार आहे. तो लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

- अशोक कायंदे, मुख्याधिकारी, नगर पंचायत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन अभयारण्यात साकारणार ‘इको टुरिझम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्थानिक रोजगार निर्मितीसाठी 'व्हिलेज टुरिझम' व 'इको टुरिझम' वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा अभयारण्य व जायकवाडी अभयारण्यात 'इको टुरिझम' संकल्पना साकारली जाणार आहे. या प्रकल्पासाठी नाशिक-मराठवाडा वन्यजीव संरक्षक विभागाचे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी यांनी मंगळवारी पाहणी दौरा केला.

जायकवाडी व गौताळा अभयारण्यातील जैवविविधता 'इको टुरिझम'साठी पूरक आहे. आंतरराष्ट्रीय नकाशावर जिल्ह्याची पर्यटनासाठी वेगळी ओळख आहे. दरवर्षी लाखो पर्यटक अजिंठा व वेरूळ लेणी पाहण्यासाठी येतात. या पर्यटकांना 'इको टुरिझम'कडे वळवण्यासाठी वन्यजीव संरक्षक विभाग प्रयत्नशील आहे. राज्य शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार लवकरच जायकवाडी व गौताळा अभयारण्यात 'इको टुरिझम' साकार होणार आहे. या प्रकल्पासाठी अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी यांनी मंगळवारी पैठण-शेवगाव तालुक्यातील दहीफळ व खिर्डी परिसराची पाहणी केली. हा भाग जायकवाडी अभयारण्यात समाविष्ट आहे. स्थानिक ग्रामस्थांनी 'इको टुरिझम'मध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे. पर्यटकांची निवास व जेवणाची व्यवस्था, खासगी वाहन उपलब्ध करणे आणि गाइड अशा माध्यमातून रोजगार निर्मितीचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती चौधरी यांनी दिली. या दौऱ्यात उपवनसंरक्षक सुनील ओव्हाळ, मानद वन्यजीवसंरक्षक डॉ. दिलीप यार्दी व इतर अधिकारी सहभागी झाले. काही ग्रामस्थांनी टुरिझममध्ये सहभागी होऊ असे सांगितले. या प्राथमिक पाहणीनंतर लवकरच पर्यटन आराखडा ठरवला जाणार आहे. काही गावांमध्ये पर्यटनाची माहिती देण्यासाठी प्रात्यक्षिक कार्यशाळा आणि गाइड प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाणार आहे.

सुविधांचे आव्हान

ताडोबा अभयारण्यात दहा वर्षांपूर्वी पर्यटकांची फारशी वर्दळ नसायची. त्यामुळे जायकवाडी व गौताळ्यात खूप पर्यटक तातडीने दिसणार नाहीत; मात्र हा नवीन स्पॉट माहीत झाल्यानंतर हळूहळू पर्यटकांची वर्दळ वाढेल असे चौधरी यांनी सांगितले. पैठणच्या रस्त्याचे काम करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे विभाग पाठपुरावा करील, असेही चौधरी म्हणाले.

आपल्याकडील समृद्ध ठेवा देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहचलेला नाही. 'इको टुरिझम'च्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणे शक्य आहे. शिवाय औरंगाबाद जिल्ह्याची नवी ओळख तयार होईल.

- अनुराग चौधरी, अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमान कोसळून आग; मदतीची हाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः

'एटीआर क्रॅशड ऑन, एअर पोर्ट,' असा संदेश मिळताच, अग्निशमन दल आणि मदतीसाठी संबंधित यंत्रणांची अनेक वाहने विमानतळाकडे धावली. त्यांनी ३० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून हस्पिटलमध्ये पोहोचवले. विमानतळावर मदत कार्यासाठी मंगळवारी 'मॉक ड्रिल' घेण्यात आले. यावेळी प्रत्येक यंत्रणेचा रिस्पॉन्स टाइम मोजण्यात आला.

आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान अपघात झाल्यास मदत कार्य कसे केले जाणार आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ मानकांत किती रिस्पॉन्स टाइम आहे; त्याची पूर्ण तयारी करण्यात आली होती. त्यानुसार प्रात्याक्षिक करण्यात आले. एका विमानाला आग लागल्यास ही आग कितव्या मिनिटाला विझविण्यात यावी, याचा नियम आहे; त्याची चाचणी करण्यात आली.

विशेष मॉक ड्रिलची सुरवात मंगळवारी सकाळी ९.४० वाजता झाली. एटीआर विमानाला आग लागल्याची माहिती एटीएस कंट्रोल रूम, विमानतळावरील अग्निशामक दल, सीआयएसएफ, अत्यावश्यक सुविधा देणारी हॉस्पिटल यांना देण्यात आली. माहिती मिळताच अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या विभागाच्या मोटारी, रुग्णवाहिका, पोलिस सीआरपीएफचे जवान विमानतळावर दाखल झाले. अग्निशमन दलाने फॉगिंगचा वापर करून दोन मिनिटात आग विझवली. गंभीर जखमींना विमानातून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेण्याची कारवाई वेगात करण्यात आली. अपघाताची माहिती मिळल्यानंतर विमानतळावर पोहोचलेल्या नातेवाईकांना कसे रोखायचे, याचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने दोन लाखांचा गंडा

$
0
0

घाटीत वॉर्ड बॉयच्या नोकरीची लालूच

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका शेतकरी तरुणाला दोन लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौका येथील सांडू मुरलीधर सोनवणे या शेतकरी तरुणाची डिसेंबर २०१२ मध्ये प्रकाश गुलाबराव बर्डे (रा. पिंपळखुटा, ता. औरंगाबाद) याच्यासोबत ओळख झाली. सिडको एन ६ भागातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कामानिमित्त गेले असता सोनवणेची ओळख झाली होती. यावेळी बर्डे याने त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयच्या जागा निघाल्या असून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. सोनवणे याने होकार दिल्यानंतर त्या कामासाठी दोन लाख रुपये लागणार असल्याचे बर्डे याने सांगितले. सोनवणेकडून सुरुवातीला तीस हजार व नंतर घाटी हॉस्पिटलमध्ये बोलावून एक लाख ७० हजार रुपये बर्डे याने घेतले. रक्कम दिल्यानंतर त्याला नोकरीला लावण्यासंदर्भात बर्डे याने टाळाटाळ सुरू केली. सोनवणे याने त्याला दोन लाख रुपये परत मागितल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देत संपर्क बंद केला. दोन वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही रक्कम मिळाली नसल्याने सोनवणे याने पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी प्रकाश बर्डेविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्युरिफाइड वॉटरच्या गोरखधंद्याला चाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर व औद्योगिक वसाहतीत बेकायदा चालणाऱ्या प्युरिफाइड वॉटरच्या गोरखधंद्याचा 'मटा'ने पर्दाफाश केला. 'आतबट्ट्यातून खेचला जातोय पैसा' व 'जलमाफि‌यांचा जीवाशी खेळ' या दोन बातम्या ६ मे, ७ मे रोजी प्रसिद्ध केल्या. याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने २० मे या कारखान्यांवर कारवाई केली. पैठण रोडवरील मे. प्युअर वॉटर सप्लायर्स व मे. ए. जी. अॅक्वा तसेच वाळूज‌ एमआयडीसी परिसरातील मे. यशराज वॉटर सप्लायर्स या कंपनीवर अन्न व औषधी प्रशासनाने धाड टाकून यंत्रसामुग्री सील करण्यात आली.

या सर्व कंपन्यांकडे अन्न व औषधी प्रशासनाचा अधिकृत परवाना नव्हता. तसेच भारतीय मानक ब्युरोची (आयएसआय) नोंदणीही नव्हती. बेकायदा पाणी विकत असल्याचे 'मटा'ने उघड केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या सर्व व्यावसायिकांवर विनापरवाना व्यवसाय केल्याबाबत न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले. ही कारवाई सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त मिलिंद शहा, राम गुंडे, गजानन गोरे, गोपाल कासार व सर्व अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली होती.

यंत्रसामुग्री सील

अन्न व औषधी प्रशासनाने (एफडीए) मंगळवारी (१९ मे) पैठण रोडवरील दोन पाणी शुद्धीकरण कारखान्यांवर धाड टाकली होती. या कारवाईत सुमारे २० लाख रुपयांची यंत्रसामुग्री सील केली. कंपनीलाही टाळे ठोकले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१०४ कुटुंबांना क्षणात बेघर करणारे भूमाफिया गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहाडसिंगपुऱ्यातील १०४ कुटुंबांना क्षणात बेघर करणारे भूमाफिया गजाआड झाले. इतर आरोपींवर अजूनही कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचा 'मटा'ने पहिल्या दिवसापासून जोरकस पाठपुरावा केला.

भूमाफियांनी मध्यमवर्गीयांना त्यांच्या हक्काच्या घराचे आमिष दाखविले. बेकायदा प्लॉटिंगमधील जागेची विक्री केली. विशेष म्हणजे मूळ मालकाने देखील आर्थिक फायद्यासाठी या कामी या भूमाफियांना सहकार्य केले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महसूल विभागाने मूळ मालकाला घरे खाली करून ही जागा ताब्यात दिली. त्यामुळे १०४ रहिवाशांचे संसार अवघ्या एका दिवसात उघड्यावर आले. 'मटा'ने या कारवाईच्या पहिल्या दिवसापासून पाठपुरावा करत या बेघर रहिवाशांची बाजू मांडली. परिणामी पोलिसांनी भूमाफियांना बेड्या घातल्या. त्यानंतर शहरातील भूमाफियांच्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images